अश्वत्थामाकडून द्रौपदीचे पुत्र मारले जातात, अर्जुनाकडून अश्वत्थामाचे मानमर्दन -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
शौनकांनी विचारले -
(अनुष्टुप)
सर्वज्ञ शक्तिमान व्यासे ऐकता बोल नारदी ।
पुढती सूतजी काय केले त्या बादरायणे ॥ १ ॥
सूतजी सांगतात -
सरस्वती तिरी एक तो शम्याप्राश आश्रम ।
तीर्थीं त्या नित्यची होती ऋषिंचे यज्ञ याग की ॥ २ ॥
तिथे आश्रम व्यासांचा बोरांचे वन शोभते ।
संकल्प सोडिला तेथे आचम्य करुनी तये ॥ ३ ॥
भक्ति योगे तदा त्यांनी शुद्ध चित्तासि बांधिले ।
पाहिली परमात्म्याची सर्व माया तशीच ती ॥ ४ ॥
मुक्त तो जीवही बद्ध मायेच्या त्रिगुणामुळे ।
मानी होवोनिया तैसा भोगितो बहुदुःख तो ॥ ५ ॥
अनर्थी या अशा जीवा तारितो भक्ति योगची ।
प्रपंची गुंतला त्याला अनर्थ नच हा कळे ॥
हंसज्ञाने अशी व्यासे श्रीमद्भागवती कथा ।
उद्धारार्थ जगाच्या या संहिता रचिली असे ॥ ६ ॥
हिच्या श्रवणमात्रेने मिळते कृष्ण भक्ति ती ।
शोक मोह भया वारी अशी अद्भूत ही कथा ॥ ७ ॥
रचिता संहिता ऐसी वाचिली ती पुनःपुन्हा ।
निवृत्त शुक या पुत्रा तयांनी कथिली असे ॥ ८ ॥
शौनकांनी विचारले -
असता शुक निवृत्त आसक्ति नसता तया ।
रमती आत्मज्ञानात तये कां शिकली कथा ॥ ९ ॥
सूतजी सांगतात -
ज्ञानी जे असती लोक अविद्या तुटली जया ।
निर्हेते ध्याति ते ईशा हरिची आगळी लिला ॥ १० ॥
शुक तो भगवत्प्रेमी भगवान व्यासपुत्र ते ।
हरीने वेधिता चित्त त्यांनी अभ्यासिली कथा ॥ ११ ॥
आता परीक्षिताची मी जन्म कर्म नि मोक्षिची ।
वर्णितो सगळी वार्ता पांडवांचाही स्वर्ग तो ।
जयात कृष्ण लीला ती उदयो पावते पहा ॥ १२ ॥
(इंद्रवज्रा)
जै पांडवांचे अन कौरवांचे
अनेक मेले लढण्यात वीर ।
अशा महाभारत युद्ध क्षेत्री
गदे भिमाने जनु भग्न केली ॥ १३ ॥
दुर्योधनाचे ऋण आठवोनी
कृष्णासुतांना वधि द्रोणपुत्र ।
दुर्योधनाही बहु दुःख झाले
कृत्यां अशा निंदिती सर्व लोक ॥ १४ ॥
माता शिशुंची बहु दुःखि झाली
ढाळोनि अश्रू रडु लागली ती ।
पाहोनि त्या दुःखित माऊलीला
त्या सांत्वना अर्जुन बोलला तो ॥ १५ ॥
पुसील तेंव्हा तव मीच अश्रू
छेदीन डोके जव त्या अरीचे ।
ते शीर टाकीन तुझ्या पदासी
लावीन आंघोळ करावयाला ॥ १६ ॥
अर्जून ऐसा मधु बोलला तै
विचारुनी त्या प्रिय मित्र कृष्णा ।
सारथ्य देवोनिहि तो निघाला
गेला करी घेउनि गांडिवाते ॥ १७ ॥
उद्विग्न पापी जरि तो हत्यारी
पाहोनी ना तो पळला मुळी की ।
रुद्राभये या तिन्हिलोकताळी
लोकार्क काशीस जसा निमाला ॥ १८ ॥
(अनुष्टुप)
स्वरथा पाहिले विप्रे थकले अश्व तेधवा ।
कोणी ना रक्षिता आता ब्रह्मास्त्र हेचि साधन ॥ १९ ॥
आचम्य घेउनी त्याने ध्याने ब्रह्मास्त्र योजिले ।
न जाणी मागुता घेणे स्वरक्षार्थचि सोडिले ॥ २० ॥
दिशा त्या व्यापिल्या सर्व तेजे अस्त्र प्रचंडची ।
अर्जुने पाहिला धोका कृष्णासी प्रार्थिले तदा ॥ २१ ॥
अर्जुन म्हणाला -
कृष्णा कृष्णा महाभागा भक्तासी तूचि रक्षिसी ।
सच्चिदानंदरूपी तू भवज्वालीहि रक्षिसी ॥ २२ ॥
सृष्टिच्या वेगळा तूची तू आदी देवताहि तू ।
मायाजाळातुनी मुक्त कैवल्य आत्म चिंतनी ॥ २३ ॥
तोचि तू स्वप्रभावाने मायेने मोहिसी जिवा ।
त्यांना तू सांगशी धर्म कल्याणार्थ विधान जे ॥ २४ ॥
पृथ्विचा भार हाराया जन्मसी तू पुनः पुन्हा ।
अनन्य प्रेम भावाने ध्यावे नित्य उपासके ॥ २५ ॥
स्वयंप्रकाश तू देवा तेज ते मज ग्रासिते ।
कशाने कोठुनी आले स्वये मी हे न जाणितो ॥ २६ ॥
श्रीभगवान म्हणाले-
हे असे द्रोण पुत्राचे ब्रह्मास्त्र जे भयानक ।
सोडिले प्राणरक्षार्थ परी ना परतू शके ॥ २७ ॥
नसे याहूनि ती शक्ती या लागी दडपावया ।
ब्रह्मास्त्री तूही निष्णात त्यानेच मिटवी यया ॥ २८ ॥
सूतजी सांगतात-
विपक्षवीर संहारी ख्याता अर्जून वीर तो ।
कृष्णाचे ऐकुनी त्याने केले आचम्य एकदा ।
केली प्रदक्षिणा कृष्णा तेचि ब्रह्मास्त्र योजिले ॥ २९ ॥
बाणवेष्ठित ते दोन्ही आकाशी टकरावुनी ।
सूर्याग्नी प्रलयंकारी वाढला भडकोनि तो ॥ ३० ॥
त्रिलोक शकतो जाळू जन ते भाजु लागले ।
लोकांना कळले सार्या प्रलयंकारि अग्नि हा ॥ ३१ ॥
पाहता जन संहार पार्थे कृष्णां विचारुनी ।
ब्रह्मास्त्र प्रलयंकारी दोन्हीही परताविली ॥ ३२ ॥
क्रोधाने नेत्र पार्थाचे लाल होता पुढे तये ।
अश्वत्थामा पशू जैसा दोराने बांधिला असे ॥ ३३ ॥
बळाने बांधिले त्याला शिबिरी न्यावयास तै ।
क्रोधाने लाल होवोनी वदे श्रीकृष्ण अर्जुना ॥ ३४ ॥
अधमो पापि या विप्रा न सोडी ठारची करी ।
निष्पाप बालका येणे झापीत मारिले कि रे ॥ ३५ ॥
असावधां तसे स्त्रीसी वेड्यां मत्ता नि बालका
निद्रिस्त ज्ञानहीनांना शरणार्थी विनारथी ।
भयग्रस्त असा शत्रू ययांशी वीर धर्म जो
जाणता तो कधी त्यांना मारीना नच मारि ना ॥ ३६ ॥
परंतु दुष्ट जो मारी क्रौर्याने प्राण रक्षणा ।
त्याचा वध हिताचाची पुन्हा तो पाप नाचरे ॥ ३७ ॥
माझ्या समक्ष तूं केली प्रतिज्ञा द्रौपदी पुढे ।
ज्याने मारीयले पुत्र त्याचे छेदीन शीर ते ॥ ३८ ॥
पाप्याने कुलअंगारे वधिले पुत्र ते तुझे ।
दिले स्वामीसही दुःख अर्जुना ठार मारि यां ॥ ३९ ॥
पाहिली नीति श्रीकृष्णे पार्थाची बोलुनी असे ।
मनाने श्रेष्ठ तो पार्थ गुरुपुत्रा न मारिले ॥ ४० ॥
सारथ्या कृष्ण घेवोनी शिबिरी पातला पुन्हा ।
पापी हा सोपवीलासे माता शोकाकुला हिला ॥ ४१ ॥
(इंद्रवज्रा)
पशूपरी बद्धित द्रोणपुत्रा
पांचालि पाही नतद्रष्ट पाप्या ।
गुरूसुताचा अवमान ऐसा
न साहुनी त्या नमिले सतीने ॥ ४२ ॥
(अनुष्टुप)
गुरुपुत्रा असा बद्ध न साही द्रौपदी सती ।
सोडा सोडा वदे त्याला पूज्यब्राह्मण तो असे ॥ ४३ ॥
ज्यांनी सार्या धनुर्विद्या गुप्तसंहारके दिली ।
कृपेने ज्ञानही सारे तयांचे रूप पुत्र हे ॥ ४४ ॥
पुत्राच्या प्रेमपाशाने वीरमाता कृपी सती ।
न गेली पतिच्या अग्नी जिवत अजून अशी ॥ ४५ ॥
धर्मज्ञ आर्यपुत्रा हो महाभाग्य तुम्हा असे ।
नित्या पूज्य गुरुवंशा त्रास देणे न योग्यची ॥ ४६ ॥
जशी मी दुःखिता माता ढाळी अश्रु पुनः पुन्हा ।
तशी ती गौतमीमाता होईल दुःखिता पुन्हा ॥ ४७ ॥
उताविळा असा राजा द्वेषी द्विजकुळास जो ।
तयाचे कुळ ते भस्म द्विजशापचि होतसे ॥ ४८ ॥
सूतजी सांगतात -
ऐका हो नीति नी धर्म द्रौपदी बोलली तदा ।
समता शुद्ध कारुण्या वाखाणी धर्म राणिला ॥ ४९ ॥
नकुले सहदेवाने कृष्णे पार्थे हि मानिले ।
तसेचि अन्य लोकांनी द्रौपदी अनुमानिली ॥ ५० ॥
कोपोनी वदला तेंव्हा भीमवीर तदा पहा ।
हत्यारी व्यर्थ हा याला मारणे हेचि उत्तम ॥ ५१ ॥
श्रीकृष्णे द्रौपदीनेही भीमाचे शब्द ऐकुनी ।
हासुनी पाहिले पार्था पुढे श्रीकृष्ण बोलला ॥ ५२ ॥
श्रीकृष्ण भगवान म्हणाले -
पापी द्विजा न मारावे पाप्याला मारणे बरे ।
शास्त्रार्थ सांगतो दोन्ही माझ्या आज्ञाचि दोन्हि या ॥ ५३ ॥
केला पण तुझा पाळी तसाचि भीम द्रौपदी ।
मलाही प्रीय होशील असे कृत्य करी पहा ॥ ५४ ॥
सूतजी सांगतात-
जाणिली अर्जुने गोष्ट कृष्णाच्या जी मनीं असे ।
कापिली खड्ग काढोनी शिखा केसांसवे तये ॥ ५५ ॥
श्रीहीन बालहत्येने ब्रह्मतेज शिखेविना ।
जाता त्या सोडिला आणि हाकलोनी दिला तसा ॥ ५६ ॥
द्विजाचे धन ते घेता स्थान भ्रष्ट नि मुंडन ।
मानावा वध तो त्याचा द्विजां वध दुजा नसे ॥ ५७ ॥
पुत्रांच्या दुःखयोगाने द्रौपदी आणि पांडवे ।
मृतांची सर्व ती केली सर्वांनी की दशक्रिया ॥ ५८ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ १ ॥ ७ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥