समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ६ वा

नारदजींच्या पूर्वचरित्राचा शेष भाग -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूतजी सांगतात -
(अनुष्टुप)
नारदांची अशी जन्म साधना ऐकुनी कथा ।
तेव्हा विचारिते झाले व्यास सत्यवती सुत ॥ १ ॥
व्यासजी म्हणाले-
नारदा त्या महात्म्यांनी बोधोनी निघता पुढे ।
काय केले तुम्ही तेंव्हा तेव्हा तो बाळची तुम्ही ॥ २ ॥
शेष आयु तुम्ही कैसी केली व्यतित ते वदा ।
शेवटी मृत्युच्या वेळी कशी त्यागिलिसे तनू ॥ ३ ॥
काळ तो संपवी सारे राहीना एक वस्तूही ।
तुमची पूर्वजन्मीची स्मृती कैसी न भ्रंशली ॥ ४ ॥
नारदजी म्हणाले-
संत गेले निघोनिया बोधोनी मजला परी ।
जगलो तरि मी सान जाता संत पुढे तसे ॥ ५ ॥
होतो एकूलता एक माझ्या मातेस पुत्र मी ।
मूढ स्त्री अन् ती दासी आधार तो परस्परा ॥ ६ ॥
मलाच पोसण्यासाठी होती चिंतेत नित्य ती ।
परतंत्रा करी काय जग हे सूत्र बाहूले ॥ ७ ॥
मातेच्या स्नेहपाशाने राहिलो द्विजवस्तिला ।
होतो मी पाच वर्षाचा न जाणी देश काल तो ॥ ८ ॥
एकदा धार काढाया माता रात्री घरातुनी ।
बाहेर पडली तेंव्हा वारली सर्पदंशिता ॥ ९ ॥
मनी समजलो तेंव्हा भक्तांचा हितचिंतक ।
असे संकेत त्याचाची निघालो उत्तरेकडे ॥ १० ॥
मार्गी मी पाहिले देश संपन्न धन-धान्यि जे ।
गावे पुरे तळे वस्त्या वने नी धातु पर्वते ॥ ११ ॥
कुठे ते रानटी वृक्ष डहाळ्या तोडिल्या गजें
भरल्या थंड पाण्याची पाहिली ती सरोवरे ।
जयात कमळे छान देवांना प्रीय नित्य जे
अनेक वदती भाषा पक्षी तेथे बसोनिया ॥ १२ ॥
भुंग्यांचे गीत ऐकोनी निघालो एकटा पुढे
पाहिले दूर मार्गाचे घोर वन चहूकडे ।
सराटे भरले काटे कुसळे वेळूही तिथे
दीर्घ ऐशा वना माजी चिखलें मार्ग व्यापिला ॥ १३ ॥
कीर्रर् दाट वनामाजी घुबडे साप या परी ।
जीवांची पाहुनी वस्ती मनात भयची भरे ॥ १४ ॥
चालता फिरता देहीं थकवा पूर्ण जाहला
भूका तृष्णितहो झालो व्याकूळ जाहलो पहा ।
मिळाली सरिता मार्गी स्नान कुंडात घेतले
आचम्य प्राशिले पाणी थकवा मिटला तदा ॥ १५ ॥
निर्जनी त्या वनामध्ये पिंपळा खालि बैसुनी ।
लाविले ध्यान ईशात जसे संते प्रबोधिले ॥ १६ ॥
भक्तिने ढळले अश्रू हरी तै प्रगटे पुढे ।
भक्ति भाववशे चित्ते ध्यायिले श्रीपदांबुजा ॥ १७ ॥
आनंदपूर्ण भावाने रोमरोमहि हर्षला ।
लहरीत अशा शांत डुंबलो भान ना उरे ॥ १८ ॥
रूप ते सांगणे कैसे शोकनाशी अतिप्रिय ।
पूर्ण ना पाहता त्याला उठोनी राहिलो उभा ॥ १९ ॥
पुन्हा मी पाहु गेलो तो पुन्हा ना दिसला कधी ।
लाविले जरि मी ध्यान तरी अतृप्त राहिलो ॥ २० ॥
वन्‌वनी फिरलो तेव्हा ध्यास माझा बघोनिया ।
अपार वाणिने बोले गंभीर मधुराक्षरे ॥ २१ ॥
खेद की न तुला होय या जन्मी मम दर्शन ।
संपल्या वासना ज्यांच्या योग्यांना त्याहि दुर्लभ ॥ २२ ॥
निष्पाप बालका तूते करण्या जागृती मनी ।
कळा ही दाविली ऐशी वासना साधु त्यागिती ॥ २३ ॥
अल्पशा संतसेवेने तूं माझ्यात स्थिरावला ।
मलीन सोड हा देह माझा तू हो सखाप्रिय ॥ २४ ॥
माझ्याची स्वरुपाचा तू ध्यास ना सोडिसी कधी ।
प्रलयी बुडली सृष्टी तरी तू स्मरशी मला ॥ २५ ॥
(इंद्रवज्रा)
आकार ज्याचा नभमंडलैसा
    शक्ती परा तो मग गप्प झाला ।
त्याचा असा भाव धरोनि चित्ती
    त्या श्रेष्ठ ईशा प्रणिपात केला ॥ २६ ॥
सोडोनि लज्जा तदनंतरे ती
    गुह्या पवित्रा मधूरा हरीची ।
केली कथा कीर्तनि ध्यान चांग
    प्रतिक्षिता काळ जगात हिंडे ॥ २७
(अनुष्टुप)
हृदयो हे असे झाले शुद्ध त्याच्याकृपे मुळे ।
आसक्ति मिटल्या सर्व एक कृष्णचि ध्यायिला ।
आकस्मात क्षणीं गेलो देहास त्यजुनी पदा ॥ २८ ॥
मिळाले भगवद्‌रूप गळाले पाचदेहही ।
त्या पूर्वी जळले सारे कर्म प्रारब्ध ते पहा ॥ २९ ॥
एकार्णवात भगवान् कल्पाच्या अंति झोपतो ।
झोपता मोडूनी सृष्टी गेलो श्वासी तया पहा ॥ ३० ॥
गेले हजार चौयुग ब्रह्माने सृष्टि इच्छिता ।
त्याच्या श्वासातुनी मी नी मरिचादिक जन्मलो ॥ ३१ ॥
तेव्हा पासोनि मी नित्य हिंडतो निर्भया जगीं ।
व्रत हे भगवत् भक्ती त्रिलोकी गात मी फिरे ॥ ३२ ॥
स्वरांनी भूषिता वीणा जी देवे दिधली मला ।
तारा या छेडिता गातो फिरतो मी जगत्रय ॥ ३३ ॥
जेंव्हा मी कीर्तनीं गातो तेव्हा तो गमतो प्रिय ।
तीर्थदुर्गम ते पाय स्मरता हृदयीं दिसे ॥ ३४ ॥
गुंतता चित्त भोगात तयाला सोडवी कथा ।
तराया पार ही नौका बोलतो प्रचिती अशी ॥ ३५ ॥
कामघायाळ लोभीही कृष्णसेवेत शांत हो ।
योग कर्मे कधी नाही अशी शांति मिळे तया ॥ ३६ ॥
व्यासजी तुम्हि निष्पाप पुसले तुम्हि जे मला ।
जन्म नी साधना यांचे साक्षात्कारी नि गुह्य हे ॥ ३७ ॥
सूतजी म्हणाले -
देवर्षि बोलुनी ऐसे व्यासानुमतिने पुढे ।
वीणा छेडीत स्वच्छंदे अंतर्धानहि पावले ॥ ३८ ॥
अहो नारद ते धन्य शारंग्‌पाणी विणेवरी ।
गाताना डुंबती मोदी तप्ताना मोदिती जगी ॥ ३९ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥ १ ॥ ६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP