समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय ५ वा

भगवंताचे यश व कीर्तिचा महिमा व देवर्षि नारदाचे पूर्वचरित्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूतजी सांगतात -
(अनुष्टुप)
देवर्षि नारदे तेव्हा हाती घेवोनिया विणा ।
आसनी बैसुनी व्यासा हासोनी पुसले असे ॥ १ ॥
नारदजींनी विचारले -
भाग्यवंत तुम्ही व्यासा तुमचे मन नी तनू ।
कर्म नी चिंतने चांग आहे संतुष्ट का कसे ॥ २ ॥
प्रचंड अशि जिज्ञासा जाहली पूर्ण भारते ।
धर्म नी पुरुषार्थांनी अद्‍भूतपूर्ण ते असे ॥ ३ ॥
सनातनी असे ब्रह्मतत्त्वाच्या चिंतनी तुम्ही ।
जाणण्या राहिले नित्य तरी शोक कशास हा ॥ ४ ॥
व्यासजी म्हणाले-
संबंधि माझ्या वदले तुम्ही हे
    खरे परंतू हृदया न तोष ।
न जाणितो कारण काय झाले
    तुम्हीच सांगा मज काय झाले ॥ ५ ॥
ब्रह्माजिचे मानसपुत्र तुम्ही
    रहस्य सारे मनि जाणतात ।
अलिप्त स्वामी असता जगाचा
    इच्छे जयां मृत्युनि जन्म होय ॥ ६ ॥
सूर्या प्रमाणे फिरतात विश्वी
    वायू जसा देह देहात जातो ।
साक्षी तसे योगबले करोनी
    नी जाणिता शब्द ब्रह्मादिकासी ॥ ७ ॥
श्री नारदजी म्हणाले -
कृष्णाचे यश ते शुद्ध तुम्ही ना गायिले कधी ।
व्यर्थची असते सारे जिथे ना देव तुष्टतो ॥ ८ ॥
पुरुषार्थ तसे धर्म तुम्ही निरुपिले जसे ।
कृष्णाचा महिमा तैसा कधी ना गायिला पहा ॥ ९ ॥
(इंद्रवज्रा)
वाणी अलंकारित का असे ना
    ना गायि ती श्री हरि कीर्ति तेंव्हा ।
तो काक‍उष्टा अपवित्रखंड
    न भक्तहंसो रमती तिथे की ॥ १० ॥
प्राकृतवाणी भलती असो का
    ज्या श्लोकि आहे हरिकीर्ति स्पर्श ।
ती वाणि नष्टी जनपाप सारे
    ती ऐकती गातिहि संत थोर ॥ ११ ॥
मोक्षार्थ जे ज्ञान पवित्र तेही
    श्रीकृष्णभक्ती विण ना सजे हो ।
सिद्धी घृणा साधन काम्य कर्म
    कृष्णा न ध्याता नच त्यात शोभा ॥ १२ ॥
व्यासा तुम्हा लाभलि दिव्य दृष्टी
    कीर्ती तशी सत्यव्रते कठोर ।
तारावयाला जन सर्व नित्य
    श्रीकृष्ण लीला स्मरणे मनासी ॥ १३ ॥
कामूक भावे भजता तयाला
    बुद्धी भ्रमे नी नसरेचि कर्म ।
वार्‍यात नावेस न ठाव लाभे
    तै चंचलावृत्ति कधी स्थिरेना ॥ १४ ॥
वृत्तिस्वभावे जग गुंतले हे
    धर्मार्थ आज्ञाहि सकाम केली ।
मूढांसि हिंसा गमलाचि धर्म
    नाही तयां बोध मुळीच झाला ॥ १५ ॥
ज्ञानी विचारी पुरुषास होतो
    विरक्त त्यांना निज बोध सारा ।
बुद्धी नसे जी हरिच्या ठिकाणी
    त्याच्या हिता कृष्णलिला वदाव्या ॥ १६ ॥
त्यागोनि धर्म भजि जो पदाला
    होता असा पक्व भिती न त्याला ।
भक्तीविना जो घडतो स्वधर्म
    त्यासी मिळेना निजलाभ कांही ॥ १७ ॥
योनीत सार्‍या भ्रमला जरी तो
    ना लाभ काही श्रम ते सरेना ।
विद्वान त्यांनी करणे विचार
    कर्मेचि लाभे सुख दुःख सारे ॥ १८ ॥
जो कृष्णापायी कमळी निमाला
    संसार त्याला इतरां प्रमाणे ।
ना भेडवी तो नशिबी जरी ते
    जाता पदाला न फिरे कधीही ॥ १९ ॥
हेतू जयाचे जग सर्व आहे
    त्या श्रीहरीचे जगरूप सारे ।
दिसोनि राही हरि तो निराळा
    संकेत माझा तुम्हि जाणता तो ॥ २० ॥
जी लाभली दिव्य तुम्हास दृष्टी
    लावोनि पाहा अवतार तुम्ही ।
तो मुक्त आत्मा असला तरीही
    लोकार्थ सांगा हरिकीर्तने ती ॥ २१ ॥
ज्ञानी असे सांगति सार सारे
    वेदे तपे यज्ञ नि दान ज्ञाने ।
स्वाध्याय यांनी भजनी मिळावे
    त्या कृष्ण लीला भजनात गाव्या ॥ २२ ॥
मागील जन्मी सुत मी जियेचा
    ती विप्र दासी, भजलो पित्याला ।
चातूरमासीहि तशीच सेवा
    संतास केली जरि मी शिशू हो ॥ २३ ॥
न अंगि चांचल्य कधी न खेळे
    जितेंद्रियो नी नित लोकसेवा ।
बोले कमी फार तसेचि शील
    पाहोनि संते मज बोध केला ॥ २४ ॥
घेई तयांच्या अनुमोदनाने
    थाळीत अन्नो अन सेवि उष्टे ।
त्या सेवने पाप धुवोनि गेले
    नी कीर्तनाने रमलो सवे त्यां ॥ २५ ॥
त्या संगतीने नित रोज वार्ता
    श्रीकृष्णलीला स्मरलो मनासी ।
श्रद्धा असे रोज बसोनि राही
    तेणे मनीं प्रीत कृष्णीं निमाली ॥ २६ ॥
ऐका मुनी प्रेम कृष्णीं निमाले
    तेव्हा प्रभूने स्थिरबुद्धि केली ।
चराचरी जे लपले असे ते
    मी ब्रह्मरूपासहि ओळखीले ॥ २७ ॥
पाऊस थंडीत तिन्ही हि वेळी
    कथा हरीची नित ऐकिली मी ।
रजो तमाचा मुळि नाश झाला
    भक्तीवसा या हृदयात आला ॥ २८ ॥
(अनुष्टुप)
लाडका विनयी होतो श्रद्धाळू संयमी असा ।
शरीरे मन वाणीने आज्ञाधारीच जाहलो ॥ २९ ॥
दीनवत्सल संतांनी कृपेने गुह्यज्ञान जे ।
दिले ते स्वमुखे देवे पुन्हाही उपदेशिले ॥ ३० ॥
अशा या उपदेशाने जगाचा आदि कृष्ण जो ।
तयाची कळली माया जेणे मुक्तीच लाभते ॥ ३१ ॥
व्यासजी सत्यसंकल्पा ! कर्म कृष्णसि अर्पिणे ।
औषधे हरिती ताप गुह्य हे वदलो तुम्हा ॥ ३२ ॥
प्राण्यांनी सेविता अन्न होतो जो रोग तो पुन्हा ।
हरतो त्याच अन्नाने चिकित्सा होतसे तशी ॥ ३३ ॥
भवचक्रात कर्माने गुंततो जरि जीव हा ।
अर्पिता भगवंताला कर्माचे कार्य योजिणे ॥ ३४ ॥
या लोकी शुद्ध शास्त्राने कृष्णार्थ कर्म योजिणे ।
पराभक्ति असे ज्ञान लाभते नच संशय ॥ ३५ ॥
भगवत् कर्म मार्गात त्यांचे आज्ञेत राहुनी ।
नामसंकीर्तनी ध्यानी कृष्ण गौरव तो हवा ॥ ३६ ॥
नमस्ते वासुदेवाला ध्यातो मी भगवान् मनीं ।
संकर्षणा अनिरुद्धा प्रद्युम्ना ही नमो नमः ॥ ३७ ॥
चतुर्व्युह अशी मूर्ती अरूप मंत्ररूपिणी ।
यज्ञात पूजिता नित्य पूर्ण ज्ञानचि होतसे ॥ ३८ ॥
ब्रह्मन् ! मी भगवंताची आज्ञा पाळोनि जाणिले ।
ऐश्वर्य भक्ति नी ज्ञान त्याने दान दिले मला ॥ ३९ ॥
(इंद्रवज्रा)
ज्ञानी तुम्ही व्यास जगास सांगा
    श्रीकृष्णलीला अन कीर्ति त्याची ।
जिज्ञासु ऐकोनिच तृप्त होती
    त्या अन्य मार्गे बहु दुःख घोर ॥ ४० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ १ ॥ ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP