[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यासजी म्हणाले -
( अनुष्टुप )
त्या दीर्घकाल सत्रात ज्ञानवृद्ध कुलोपती ।
ऋग्वेदी शौनको यांनी सूत यांना प्रशंसिले ॥ १ ॥
शौनकाजी म्हणाले -
भाग्यवंत तुम्ही सूता वक्त्यात पुरुषोत्तम ।
कथा भागवती पुण्या शुकांची मज सांगणे ॥ २ ॥
ही कथा घडली केंव्हा कोठे नी काय कारणे ।
कृष्णद्वैपायने ही कां लिहिली संहिता अशी ॥ ३ ॥
समदर्शी शुक पुत्रा व्यासांनी स्थिर पाहता ।
लपून राहिला तेव्हा किंचित् अज्ञानि भासला ॥ ४ ॥
( वसंत तिलका )
संन्यास इच्छि मनि पुत्र निघे वनासी
पाहोनी नग्न ललना वसने न लेल्या ।
ज्या पोहती नि बघती मग व्यासजींना
लाजोनि उत्तर दिले तुज भेद आहे ॥ ५ ॥
(अनुष्टुप)
कुरुजांगल देशात वेड्याच्यापरि हा फिरे ।
हस्तिनापूरच्या लोके कसे ओळखिले तया ॥ ६ ॥
मौनी या शुकदेवांचा राजर्षी त्या परीक्षितां ।
कसा संवाद तो झाला निघाली ज्यात संहिता ॥ ७ ॥
ते गोदोहन मात्रीच थांबती एक गेहि की ।
तीर्थरूप करायाते गृहस्थघर ते पहा ॥ ८ ॥
आम्ही तो ऐकिले की ते अभिमन्यु सुतो महान् ।
आश्चर्यमय तो जन्म कर्म त्याचे वदा अम्हा ॥ ९ ॥
सम्राट काय हेतूने प्रायोपवेषणास त्या ।
बैसला त्यजुनी राज्य गंगातिरि तसा तदा ॥ १० ॥
(इंद्रवज्रा)
शत्रू जयाला धन अर्पुनीया
भल्याच साठी नमिती पदाला ।
जीवाहुनी प्रीय अशा धनाला
प्राणासवे कां मग तो त्यजीतो ॥ ११ ॥
जीणे जयाचे हरि अश्रितो नी
ते विश्व भद्रार्थचि जन्मतात ।
न होय त्यांचा जगण्यात स्वार्थ
वैराग्यवंतो मग का त्यजी ते ॥ १२ ॥
(अनुष्टुप)
षट्शास्त्र जाणिता तुम्ही वेद सोडोनि सर्व ते ।
जेवढे पुसले तुम्हा कृपया सर्व सांगणे ॥ १३ ॥
सूतजी म्हणाले-
सत्यवती वसूकन्या हिच्या गर्भातुनी पुढे ।
व्यासजी जाहले पुत्र पाराशर मुनीस ते ॥ १४ ॥
सरस्वती नदीकाठी स्नानादी करुनी तदा ।
सूर्योदयास एकांती जधी श्री व्यास बैसले ॥ १५ ॥
त्रिकालज्ञ अशी दृष्टीं पाहता वदले मनीं ।
धर्मसंकरता वाढे तेणे र्हासचि होतसे ॥ १६ ॥
तेणे बिघडते बुद्धी आयुही अल्प होतसे ।
करारी बुद्धिचा र्हास श्रद्धाहीन अशक्त ते ॥ १७ ॥
दुर्दैव पाहता लोकीं लाविली दिव्यदृष्टि ती ।
चारी वर्णाश्रमा कैसे लाभेल हित नित्य जे ॥ १८ ॥
होता अर्ध्वयु उद्गाता जी ब्रह्मकर्म जो करी ।
चातुर्होत्र तया शुद्धी होण्या वेद विभागिले ॥ १९ ॥
अथर्व यजु ऋक् साम वेदांचे भाग जाहले ।
इतिहास पुराणांना पाचवा वेद मानिती ॥ २० ॥
पहिला पैल ऋग्वेदी जैमिनी सामवेदि नी ।
वैशंपायनने तेंव्हा यजुर्वेदचि घेतला ॥ २१ ॥
सुमंतु दरुणोपुत्रे अथर्ववेद गायिला ।
इतिहास पुराणाचे रोमहर्षण छात्र ते ॥ २२ ॥
त्या द्विजे आणखी कांही शाखा शोधून काढिल्या ।
शिष्य आणि प्रशिष्यांनी आणीक भेद योजिले ॥ २३ ॥
कलीत मानवी शक्ती स्मरणाची कमी असे ।
हेतु हा ठेवुनी युक्त व्यासांनी उपकारिले ॥ २४ ॥
स्त्री शूद्र पतितो जाती यांना वेद नसे मुळी ।
तयांचा मोक्ष लक्षोनी महाभारत योजिले ॥ २५ ॥
जरी व्यासे अशी सर्व लाविली शक्ति ती तरी ।
कल्याणकारि कार्याला परी ना तोष पावले ॥ २६ ॥
खिन्न चित्ते असे व्यास सरस्वतिसि बैसुनी ।
धर्मवेत्ता मनीं सारा विचार करु लागले ॥ २७ ॥
निष्काम ब्रह्मचर्यादी पाळुनी वेद अग्निला ।
सन्मानिले गुरू यांना आज्ञा ना मोडिता कधी ॥ २८ ॥
भारता रचुनी सारे वेद अर्थ प्रबोधिले ।
स्त्रीया शूद्रादिके ज्याचे घेतले धर्मज्ञान ते ॥ २९ ॥
जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न नि समर्थ हा ।
तरी अपूर्ण ते कांही हृदयी कार्य वाटते ॥ ३० ॥
अवश्य घडली नाही सांगणे भगवत्कथा ।
तीच परमहंसांना प्रीय नी भगवत्प्रिय ॥ ३१ ॥
व्यासजी ते मनीं ऐसे विचारे खिन्न बैसले ।
तेंव्हाचि त्या तिथे आले देवर्षि नारदो पहा ॥ ३२ ॥
त्यांना येताचि पाहोनी व्यासे उत्थापनो दिले ।
पूजिले नारदा त्यांनी विधिपूर्वकची पहा ॥ ३३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ १ ॥ ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥