[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
भगवंते स्वइच्छेने महत्तत्वातुनी असे ।
घेतले पुरुषीरूप कळा सोळा अशा पहा ॥ १ ॥
लाविली योगनिद्रा ती विशाल सागरात त्या ।
नाभीत उगवे पद्म ब्रह्मा त्यातून जन्मला ॥ २ ॥
विराट भगवत् रूप अंगी लोक हि कल्पिले ।
विशुद्ध श्रेष्ठ हे ऐसे सत्वदर्शन होतसे ॥ ३ ॥
(इंद्रवजा)
तपी पहाती नित रूप त्याचे
हजार पायास हजार मांड्या ।
ती डोकि डोळे अन कान नाक
प्रकाशत टोप नि कुंडले ती ॥ ४ ॥
( अनुष्टुप )
विराटरूप हे त्याचे त्यातून प्रगटे जग ।
मनुष्य पशु नी पक्षी सार्या योनी तयातुनी ॥ ५ ॥
सर्गारंभासि ब्रह्म्याला मानसीपुत्र चार ते ।
जाहले घेतले ज्यांनी ब्रह्मचर्य असे व्रत ॥ ६ ॥
रसातळास ही पृथ्वी गेली श्रीहरि पाहि तो ।
वराह रूप घेवोनी सुखे ती काढिली वरी ॥ ७ ॥
नारदा जाहला जन्म पंचरात्र वदे जगा ।
कर्माने कर्म तोडोनी मुक्तिची युक्ति तो वदे ॥ ८ ॥
नर नारायणो रूपी चौथा अव्तार जाहला ।
इंद्रीयदमने त्यांनी तपस्या घोर साधिली ॥ ९ ॥
पाचवा कपिलो रूपे सांख्यशास्त्र प्रबोधिले ।
आसुरी नाम विप्रासी लुप्त हे ज्ञान बोधिले ॥ १० ॥
अनसूयावरपूर्ते जाहला अत्रिनंदन ।
अवतारी सहाव्या त्या दत्ते अलर्क बोधिले ॥ ११ ॥
जन्मले यज्ञरूपाने रुची आकुतिचा सुतो ।
सवे घेवोनिया याम देवांना रक्षिले तदा ।
मन्वंतरास जो या त्या स्वायंभूवास रक्षिले ॥ १२ ॥
राजा त्या नाभिची पत्नी मेरुदेवी कुशीत तो ।
विरागी ऋषभो देव आठवा अवतार तो ।
धीरांना दाविला मार्ग श्रेष्ठ पारमहंस जो ॥ १३ ॥
ऋषिंनी प्रार्थिता देवा पृथुरूपात पातला ।
समस्त औषधी त्याने शोधून आपणा दिल्या ॥ १४ ॥
मन्वंतरात चाक्षूषी बुडता पृथ्वि काढिली ।
दहाव्या मत्स्य रूपाने वैवस्वतहि रक्षिला ॥ १५ ॥
अवतारो अकरावा कूर्मरूपहि घेतले ।
मंदरापर्वता पाठीं मंथनीं पेलिले असे ॥ १६ ॥
समुद्रातूनि बारावे रूप धन्वंतरी निघे ।
अमृतो आणिले कुंभी तोचि, तेरावि मोहिनी ।
दैत्यांना मोहिले सर्व सुधें देवांसि तृप्तिले ॥ १७ ॥
नृसिंह धारिले रूप चौदावा अवतार तो ।
हिरण्य कशपू त्याने फाडिला स्वनखे बळे ॥ १८ ॥
वामनो रूप पंध्रावे बळीच्या यज्ञिं पातले ।
इच्छि त्रिलोकिराज्या तो बळी पाताळि घातला ॥ १९ ॥
नृपांनी मांडिला द्रोह ब्राह्मणांचा न पाहवे ।
सोळाव्या परशूरामे सारे क्षत्रीय मारिले ॥ २० ॥
अज्ञान पाहता सर्व व्यासरूपेहि जन्मला ।
माता सत्यवती आणि पाराशर मुनी पिता ॥ २१ ॥
राम तो आठरावा त्या देवांच्या कार्य हेतुने ।
उदंड कार्य ते केले वधिले रावणादिका ॥ २२ ॥
बळीराम नि श्रीकृष्ण एकोणिस नि वीसवा ।
प्रगटोनी यदुवंशी भुमीचा भार हारिला ॥ २३ ॥
कलीत मगधो प्रांती अजानो बुद्ध होइल ।
दैत्यांना मोहपाडाया घडेल अवतार तो ॥ २४ ॥
बावीसावा पुढे ऐसा श्रीविष्णु यशपुत्र जो ।
कल्कि होवोनि तो राजे मारील दुष्ट जे प्रजी ॥ २५ ॥
महासरोवरातून ओढे निघती कैक जै।
तसेचि कैक जन्माते घेतो इच्छे स्वये प्रभू ॥ २६ ॥
ऋषि मनू मनूपुत्र प्रजापती नि देवता ।
महाशक्ति तिथे देव अंश रूपे वसे सदा ॥ २७ ॥
पूर्णावतार तो कृष्ण स्वये प्रगटला प्रभू ।
अत्याचारे भरे विश्व तेंव्हा प्रगटतो पुन्हा ॥ २८ ॥
गुह्यही अवताराची कथा नारायणी असे ।
सायं प्रभात वाचावी दुःखे सर्वचि नष्टती ॥ २९ ॥
जगदाकार हे रूप चिन्मयी भगवंत तो ।
मायाआदी गुणतत्वा भगवत् रूप मानिले ॥ ३० ॥
आकाशी असती मेघ धूळ वायू मधे जशी ।
दोघा आरोप दोघांचा तसे ईशासि रूप ते ॥ ३१ ॥
स्थूल रूपाहुनी भिन्न सूक्ष्म अव्यक्त तो असे ।
शिरे आत्मा जधी देही तो जीव जन्मतो पुन्हा ॥ ३२ ॥
अज्ञाने भासतो स्थूल ज्ञानाने सूक्ष्मरूप ते ।
ज्ञानाने पाहता त्याला साक्षात्कारचि होतसे ॥ ३३ ॥
प्रभूची संपते माया असे ज्ञानीच जाणती ।
स्वरूपी मिळतो जीव परमानंद पावता ॥ ३४ ॥
जन्मणे मरणे नाही निराकार हृदेश्वर ।
कर्म जे गुह्य वेदाचे ज्ञानीच जाणती खरे ॥ ३५ ॥
( इंद्रवजा )
अमोघ त्याच्या असती लिला त्या
निर्मोनि पोषी अन तोचि मारी ।
न लिंपतो राहुनि देहि त्यांच्या
चवीस घेतो बसुनी स्वतंत्र ॥ ३६ ॥
नटासि मानी कुणि सत्य रूप
अज्ञानी पाही हरि मानुषी तो ।
न जाणिती त्या निजरूप सत्या
कुबुद्धिवादी करितात तर्क ॥ ३७ ॥
जो चक्रपाणी नकळे कुणाला
निर्मोनि विश्वा असतो निराळा ।
जाणोनि त्याला भजि जो मनाने
नि सेवितो पद्मपदी सुगंध ॥ ३८ ॥
अहो तुम्हा भाग्य असेल कांही
त्रिलोक स्वामी वसुदेवपुत्र ।
अनन्य प्रेमे बघतो तुम्हासी
नाही भवाची पुढती भिती ती ॥ ३९ ॥
(अनुष्टुप)
भगवान् वेदव्यासाने रचिली भगवत्कथा ।
वेदासम हिची ख्याती पुराण भगवत् महान् ॥ ४० ॥
सोपी कल्याणकारी ही श्रीमद्भागवती कथा ।
ज्ञानेंद्र शुक जो पुत्र त्यासी हीच प्रबोधिली ॥ ४१ ॥
वेदांचे सार हे सर्व तसेचि इतिहास हा ।
परीक्षितां शुकदेवे मुक्त्यर्थ कथिली असे ॥ ४२ ॥
प्रायोपवेषणा जेंव्हा तो गंगातिरि बैसला ।
अज्ञान अंधकारी तो कली तेंव्हाचि पातला ॥ ४३ ॥
तेंव्हा या ग्रंथसूर्याचे पुन्हा तेज विखूरले ।
शौनका त्याच वेळेला कथा मी ऐकिली असे ॥ ४४ ॥
कृपेने शिकलो सारे जेवढी बुद्धि लाभली ।
सांगेन त्यानुसारेची संतांनी ऐकणे पुढे ॥ ४५ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ १ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥