[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
व्यासजी सांगतात -
(अनुष्टुप)
प्रश्न ऐकोनि सर्वांचा रोमहर्षणसूत जे ।
उग्रश्रवासि आनंद होताचि बोलले पुढे ॥ १ ॥
सूतजी म्हणाले -
( वसंततिलका )
संन्यास इच्छुनि शिशू निघता वनाते
पुत्रासि व्यास म्हणता विरहे सुताऽरेऽऽ!
वेली नि वृक्ष वदले प्रति उत्तरा मी
सर्वात्मरूप ! शुकदेव नमी असे मी ॥ २ ॥
हे वेदसार नि तसेचि पुराणसार
कृष्णस्वरूप मिळते अशि गूढ वार्ता ।
अध्यात्मदीप उजळे भगवत्कथेने
वक्ते असे शुक तया नमितो पुन्हा मी ॥ ३ ॥
(अनुष्टुप)
नरनारायणो ऐशा थोरांना नमितो पुढे ।
देवी सरस्वती व्यासा जयार्थचि नमो नमो ॥ ४ ॥
ऋषिंनो तुम्हि हा प्रश्न उत्तमचि विचारिला ।
कृष्णाच्या या कथे होते आत्मशुद्धि निरंतर ॥ ५ ॥
सर्वश्रेष्ठ असा धर्म नित्य निष्काम भक्ति ती ।
अशाच भक्तिने लाभे आनंदरूप कृष्ण तो ॥ ६ ॥
अनन्य भक्तियोगाने ज्ञान वैराग्य लाभते ।
परी चित्त असो शुद्ध श्रीकृष्णी नित्य गुंतले ॥ ७ ॥
धर्माने वागणे छान अनुष्ठानचि ते घडो ।
कथेत प्रेम ना ज्याचे त्याचे सर्वचि व्यर्थ ते ॥ ८ ॥
धर्माचे फळ ते मोक्ष गौण संपत्ति ती सदा ।
संपत्तीने घडो धर्म नको मोह धनीं पहा ॥ ९ ॥
नसावा भोग तृप्त्यर्थ जीवनार्थचि तो हवा ।
तत्वेच्छा फळ ते जीवा स्वर्ग ही हेतु ना असे ॥ १० ॥
तत्ववेत्ते असे लोक ज्ञाता ज्ञेय रहीत त्या ।
सच्चिदानंद रूपाला देव ब्रह्म म्हणे कुणी ॥ ११ ॥
श्रीमद्भागवता भक्त ऐकोनी ज्ञान भक्तिने ।
विरागी वृत्तिने जीवी जाणिती रूप दिव्य ते ॥ १२ ॥
वर्णाश्रमासि जाणोनी धर्माने जगतील जे ।
तयांना लाभतो मोक्ष तीच सिद्धि असे पहा ॥ १३ ॥
म्हणोनी एकचित्ताने भक्तवत्सल कृष्ण जो ।
त्याची आराधना होवो कथा कीर्तन ऐकणे ॥ १४ ॥
कर्माची गाठ ती मोठी चिंतने योगि कापिती ।
सांगा मग असा कोण कथाप्रेम नसे मनी ॥ १५ ॥
पवित्र फिरता तीर्थे सेवा आवडते मनीं ।
अनुतापे सश्रद्धांना आवडे ग्रंथ ऐकणे ॥ १६ ॥
ऐकता स्वकथा कृष्ण कथेत कीर्तनात ही ।
हृदयी स्थिर होवोनी वारितो सर्व वासना ॥ १७ ॥
ही कथा श्रवणाने त्या होती नष्ट कुवासना ।
तेव्हा पवित्र श्रीकृष्णावरी ते प्रेम राहते ॥ १८ ॥
आणि रज तमो भाव प्रपंची लोभ लोपतो ।
चित्ती स्थिरावते सत्व होते निर्मळ निर्मळ ॥ १९ ॥
अशा प्रसन्न चित्ताने भगवद्भक्ति योजिता ।
आसक्ती मिटुनी जाती साक्षात्कारचि होतसे ॥ २० ॥
दर्शने आत्मरूपाने मनीच्या ग्रंथि भंगती ।
संदेह मिटती सारे कर्मबंध उरेचि ना ॥ २१ ॥
म्हणोनि ज्ञानि ते नित्य आनंदे कृष्णभक्ति ती ।
प्रेमाने करिती सारे आत्मज्ञान मिळे तया ॥ २२ ॥
( वसंततिलका )
सत्वो रजो अन तसे तम या गुणांचा
निर्माण पोषण तसे विलयादि खेळा ।
विष्णू नि ब्रह्म तिसरे शिवरूप घेतो
सत्वात श्रीहरिमध्ये रमताचि मोक्ष ॥ २३ ॥
(अनुष्टुप)
मातीत जन्मते काष्ठ त्या काष्ठातुनि अग्नि तो ।
श्रेष्ठ जे तै असे सत्व भगवंत तये मिळे ॥ २४ ॥
शुद्ध सत्वीं वसे विष्णु जाणते भजती तया ।
या पथी चालती त्यांना थोर कल्याण लाभते ॥ २५ ॥
मुमुक्षू न करी निंदा दोष ना पाहती कुणा ।
भैरवादी त्यजोनिया भजती सत्व विष्णु तो ॥ २६ ॥
रज तमादि भावाने संतान धन लाभते ।
म्हणोनी भजती पित्रा भूत आणि प्रजापती ॥ २७ ॥
वेदांचे सार तो कृष्ण हवनोद्देश कृष्णची ।
कृष्णार्थ योग ते सारे कर्मोद्देशहि कृष्ण तो ॥ २८ ॥
ज्ञानाने लाभतो कृष्ण जपानेही तसाचि तो ।
अनुष्ठाने तयासाठी सर्व व्याप तयार्थची ॥ २९ ॥
गुणातीत जरी कृष्ण प्रकृतीहूनि भिन्न जो ।
मायेने दिसतो जातो जेणे हे निर्मिले जग ॥ ३० ॥
त्रिगुणात्मक मायेने खेळतो तोचि खेळ हे
विज्ञानानंद तो पूर्ण भासतो गुंतल्यापरी ॥ ३१ ॥
अग्नि तो एकची होय भासतो भिन्न इंधनी ।
सर्वात्मकू असा कृष्ण भासतो भिन्न तो तसा ॥ ३२ ॥
निर्मितो प्राणीमात्रांना जीवरूपे प्रवेशतो ।
स्वेच्छेने भोग तो भोगी भोगाया लावितो तसा ॥ ३३ ॥
रचिता सर्व लोकांना पशू पक्षात जन्मतो ।
पोषितो सर्व लोकांना कोणाला नकळे लिला ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ १ ॥ २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥