[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
॥ मंगलाचरण ॥
( शार्दूलविक्रीडित )
जन्मादी स्थितिसी प्रतीत हरीची सत्ता असे या जगी
ज्याने वेद दिले जगास, पडतो तो मोह ज्ञानीजना ।
तेजी वारि तयात भूमि गमते तैसा जगी तो गमे
मायामुक्त स्वतेज सत्यरुप ते आम्ही मनी ध्यातसो ॥ १ ॥
जो निष्कामचि संतधर्म कथिला निर्मत्सरी मोकळा
ज्यामध्ये कथिले शिवस्वरूप नी तापत्रयो नाशक ।
श्रीमद्भागवतो महामुनिकृती सायास अन्यो नको
पुण्यात्माधरिता मनात श्रवणा बंदी हृदीं ईश्वर ॥ २ ॥
( द्रुतविलंबित )
निगमकल्पतरुफळ पक्व हे
शुक मुखातुनिच जे द्रवले असे ।
सततही जन भाविक हो तुम्ही
रससमुद्रचि भागवता पिणे ॥ ३ ॥
कथारंभः -
(अनुष्टुप)
नैमिष्यारण्य क्षेत्रात शौनकादी ऋषींनि त्या ।
स्वर्ग हेतू धरोनिया अनुष्ठानास मांडिले ।
हजार वर्ष जो चाले असा यज्ञचि मांडिला ॥ ४ ॥
एकदा त्या उषःकाली संपता नित्यकर्म ते ।
आसनीं पूजिता सूता पुसला प्रश्न आदरे ॥ ५ ॥
ऋषि म्हणाले -
इतिहास पुराणे नी सर्व शास्त्रे तुम्ही तसे ।
चांगली वाचिली तैसी व्याख्याही कथिली असे ॥ ६ ॥
वेदवेत्त्यांमधे श्रेष्ठ भगवान् बादरायण ।
सगूण निर्गुणो तेची सर्व श्रेष्ठीत जाणते ॥ ७ ॥
त्यांच्या अनुग्रहा तुम्ही पात्र एकचि जाहला ।
गुरु ते गुप्तही सर्व शिष्यासी नित्य सांगती ॥ ८ ॥
कृपाकरून ते सांगा जेणे कलियुगात या ।
जीवाते सहजी लाभे कल्याण काय तंत्र ते ॥ ९ ॥
भूषणे संत जीवांचे, कलीत अल्प आयु ती ।
मंदबुद्धी तसे भाग्य विघ्नांनी बाधिले असे ॥ १० ॥
अनेक शास्त्र ते कर्म विवीध बोलती तसे ।
त्यांचा विस्तार ही मोठा ऐकण्या वेळ ना मिळे ।
सर्वांचे सार सांगावे जेणे शुद्धीच होतसे ॥ ११ ॥
भद्र हो तुमचे सूता यदुवंशात श्रीहरी ।
देवकी वसुदेवाच्या पोटी कां कृष्ण जन्मला ॥ १२ ॥
उत्सुक ऐकण्या आम्ही सांगा ती भगवत् कथा ।
तारण्या जडजीवांना जन्मतो भगवंत तो ॥ १३ ॥
सारे संसारचक्रात गुंतले जीव ते असे ।
भगवन्नाम ते घेता लाभते मुक्ति निश्चित ॥ १४ ॥
विरक्त शांत जे साधू राहती हरिचिंतनी ।
त्यांचिया स्पर्शने मुक्ति गंगातीर्थ जया परी ॥ १५ ॥
ज्याची भक्त लिला गाता कलीचे दोष नष्टती ।
इच्छितो आत्मशुद्धी जो न ऐके कोण ही कथा ॥ १६ ॥
लीलाधर हरीला त्या नारदे गायिले असे ।
आम्हा श्रद्धाळुना आता त्यांचे वर्णन सांगणे ॥ १७ ॥
योगमाये स्वयें देव लीला स्वच्छंद खेळले ।
मंगला हरिची कीर्ती करा वर्णन ती पुढे ॥ १८ ॥
भगवत् पुण्य त्या लीला न हो तृप्ति कधीहि ती ।
रसिकां नूतनो नित्य रसास्वाद पदोपदी ॥ १९ ॥
त्यांनी निश्चित केले की श्रेष्ठ भागवतो युगीं ।
श्रवणे पठणे मुक्ती आणि वैकुंठ दायक ॥ २० ॥
कलीचे ज्ञान होताची आम्ही हा यज्ञ मांडिला ।
हरीच्या ऐकण्या लीला वेळ ही योग्य लाभली ॥ २१ ॥
कली हा नष्टितो शुद्धी करीतो शक्तिहीनही ।
यातून पार होण्याला उतारी लाभले तुम्ही ॥ २२ ॥
ज्याचे छत्रचि विप्रांना असा योगेश्वरो हरी ।
स्वधाम पातला तेंव्हा धर्मे कोणास प्राथिले ॥ २३ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ १ ॥ १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥