समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

श्रीमद्‌भागवतमाहात्म्य - अध्याय ४ था

गोकर्ण उपाख्यान प्रारंभ -

सूतजी सांगतात -
(अनुष्टुप्)
अशी वैष्णवचित्तात भक्ति थोर बघोनिया ।
सोडोनी निजधामाला भगवान् पातला तिथे ॥ १ ॥
वनमाळी घनश्याम पीतांबर मनोहर ।
मुकुट कर्धनी तैसे कुंडली तेज फाकले ॥ २ ॥
भावे त्रिभंग ललितो उभा चित्तास चोरटा ।
कौस्तूभ शोभला कंठी अंगी चंदन चर्चित ।
करोडो कामदेवांचे जणू रुप हिराविले ॥ ३ ॥
परमानंद चिन्मूर्ती मधुरो मुरलीधर ।
नटला खूप सौंदर्ये भक्तचित्तात ठाकला ॥ ४ ॥
वैकुंठवासिचे भक्त उद्धवादी अनेक ते ।
कथेसी पातले तेथे गुप्त रूपात तेधवा ॥ ५ ॥
जय् जयो वदले आणि गुलाल फेकिली फुले ।
अद्‌भूत भक्तिगंगा ती शंखाचा नाद जाहला ॥ ६ ॥
मंडपी बैसले त्यांचे देहादि भान संपले ।
तल्लीनता बघोनिया देवर्षि बोलले असे ॥ ७ ॥
(इंद्रवज्रा)
मुनीश्वरांनो बहु थोर गोष्ट
    पाहीयली मी अजि या कथेत ।
हे मूर्ख पापी पशु पक्षि सारे
    निष्पाप झाले सगळेचि येथे ॥ ८ ॥
कलीत चित्ता करण्या पवित्र
    कथाचि आहे नच संशयो तो ।
नाही दुजे साधन या कलीत
    त्या पापराशी करण्यास नष्ट ॥ ९ ॥
मुनीश्वरांनो तुम्ही तो कृपाळू
    हा मार्ग केला बहुस्वल्प तुम्ही ।
सप्ताहयज्ञी जगि कोण थोर
    गेले तरोनी कृपया वदावे ॥ १० ॥
कुमार म्हणाले -
जी माणसे पापचि वर्ततात
    पापात होती रममाण नित्य ।
नी क्रोध कामी जळती असेही
    सप्ताह यज्ञी तरि मुक्त होती ॥ ११ ॥
माता पित्याची करितात निंदा
    अधर्मि सत्यच्युत दंभि तृष्णी ।
नी साधिती मत्सर अन्य लोका
    सप्ताहयज्ञी तरि मुक्त होती ॥ १२ ॥
जो मद्यपी ब्रह्म हत्यारी ऐसा
    सुवर्ण चोरो गुरुपत्‍नि भोगी ।
विश्वासघाती छळ क्रोधकर्मी
    सप्ताहयज्ञी तरी मुक्त होती ॥ १३ ॥
वाणी मनाने अन या शरीरे
    हट्टेचि पापी बहु भोग घेती ।
मलीन झाले हृदयी नि अंगी
सप्ताहयज्ञी तरि मुक्त होती ॥ १४ ॥
(अनुष्टुप्‌)
संदर्भा इतिहासाची गोष्ट तुम्हास सांगतो ।
तिच्या श्रवणमात्रेने पाप ते सर्व नष्टते ॥ १५ ॥
पूर्वी श्री तुंगभद्रेच्या तटी अनुपमापुरी ।
होते तै सर्ववर्णाचे लोक सत्कर्मतत्पर ॥ १६ ॥
आत्मदेव तिथे विप्र सर्ववेद विशारद ।
श्रौत-स्मार्तात निष्णात जो दुजा सूर्यची गमे ॥ १७ ॥
श्रीमंत असुनी भिक्षु अशीच उपजीविका ।
त्याची ती धुंधुली पत्‍नी कुलीन सुंदरी तशी ॥ १८ ॥
लोकात जल्पणे भारी स्वभावी क्रूरताचि ती ।
घरी सुगरणी तैशी कृपणा कलहप्रिया ॥ १९ ॥
असे नांदतसे प्रेमे दांपत्य रमुनी पहा ।
घरी विपुलता सारी परी सौख्य नसे मुळी ॥ २० ॥
वाढता वय त्या दोघे पुण्यकार्याहि योजिले ।
अन्न गो स्वर्ण वस्त्रादी पुत्रार्थ दान ते दिले ॥ २१ ॥
अर्धे धन असे त्यांनी दानात वाटिले तरी ।
पुत्र वा पुत्रिचे तोंड पहाया नच की मिळे ॥ २२ ॥
एकदा विप्र दुःखाने वनात पातला असे ।
दुपारी त्रासला तृष्णे तळ्याशी रिघला तदा ॥ २३ ॥
दुःखाने पीडिल्या देहा पाण्याने सुख लाभले ।
सुमुहूर्त पहा कैसे संन्यासी दिसला तिथे ॥ २४ ॥
ब्राह्मणे पाहिले तेव्हा संन्यासी तो पिता जळ ।
द्विजाने धरिले पाय दुःखे निश्वास टाकिला ॥ २५ ॥
संन्याशाने विचारिले -
सांगा ब्राह्मण देवाजी अश्रु हे लोचनी कसे ।
काय चिंता तुम्हा ऐसी त्वरीत मज सांगणे ॥ २६ ॥
ब्राह्मण(आत्मदेव) म्हणाला -
पाप ते पूर्वजन्माचे दिलेले अर्घ्यपानही ।
पिती ती पितरे सारे उष्ण श्वासे करोनिया ॥ २७ ॥
पुत्रहीन म्हणोनीया द्विजदेव तसेचि ते ।
अप्रसन्न अशा चित्ते घेतात दान की पहा ।
म्हणोनी प्राण त्यागार्थ पातलो मी असा इथे ॥ २८ ॥
धिक् जिणे नी तसे गेह धिक् सर्व धन कूळ ते ।
संतान नच ज्या त्याचे सर्वच्या सर्व व्याप की ॥ २९ ॥
धेनु मी पाळिल्या ज्या ज्या निघाल्या वांझ त्या पहा ।
लाविली रोपटे दारी निघाले सर्व वांझ ते ॥ ३० ॥
फळे मी आणिता गेही पहा त्वरित नासती ।
हीन भाग्य असे माझे जगावे काय कारणी ॥ ३१ ॥
द्विज तो वदुनी ऐसे रडला स्फुंद स्फुंदुनी ।
तेव्हा यतिवरा चित्ती करुणा प्राप्त जाहली ॥ ३२ ॥
योगनिष्ठ यतिंद्राने भाग्यरेखाहि जाणिल्या ।
सारा वृत्तांत ऐकोनी विस्तारे बोलले तया ॥ ३३ ॥
संन्यासी म्हणाला -
हे द्विजा ऐक माझे की प्रजेची आस सोड तू ।
विवेक ठेवुनी चित्ती सोडी संसारवासना ॥ ३४ ॥
ऐक विप्रा तुझ्या भाग्यी सात जन्मात हेच की ।
कोणत्याही प्रयासाने संतान नच होय ते ॥ ३५ ॥
सगरो अंग राजाला पुत्रांनी दुःखची दिले ।
म्हणोनी सोडणे आशा घ्यावा संन्यास युक्त हे ॥ ३६ ॥
ब्राह्मण म्हणाला -
बोधाचा मज ना लाभ बलाने पुत्र द्या मज ।
अन्यथा आपुल्या साक्षी शोक मूर्च्छे मरेन मी ॥ ३७ ॥
जया ना पुत्र स्त्री यांचे मिळाले सुख ते कधी ।
त्याचा संन्यासही व्यर्थ गृहस्थाश्रम धन्य तो ॥ ३८ ॥
विप्रहट्ट बघोनिया तपी तो बोलला पुढे ।
मोडता विधिलेखाला चित्रकेतूहि कष्टला ॥ ३९ ॥
मोडिता ईश‌इच्छा ती तूही तै फसशील की ।
इच्छोनी धरिशी हट्ट तुजला काय सांगणे ॥ ४० ॥
आग्रहो पाहता त्याला दिधले फळ एक नी ।
वदे पत्‍नीस दे खाया तेणे पुत्रचि होतसे ॥ ४१ ॥
सत्य शौच दया दान आणीक एक भुक्तची ।
राहता वर्ष ती पत्‍नी पुत्र जन्मेल शुद्ध तो ॥ ४२ ॥
बोलोनी योगि तो गेला गेला ब्राह्मण ही घरा ।
फळ ते पत्‍निशी देता निघाला हर्षुनी पुढे ॥ ४३ ॥
पत्‍नि ती कुटिला ऐसी रडोनी सखिशी म्हणे ।
सखये बघ हे कष्ट फळ मी नच भक्षिते ॥ ४४ ॥
फळे वाढेल तो गर्भ पिणे खाणेहि वर्ज्यते ।
वाढेल पोट ते मोठे क्षीण देह तसाचि हो ।
मग ही घरची कामे कसे होतील सांग पा ॥ ४५ ॥
दैवाने जर त्या वेळी डाकू गावात पातले ।
पळू मी कशि त्या वेळी मजला भय वाटते ।
बाहेर काढणे कैसे भयाने मज ग्रासिले ॥ ४६ ॥
आडला जर तो गर्भ प्रसूत समयी तसा ।
प्राणाशी गाठ ती बाई कुमारी त्याहुनी बरी ॥ ४७ ॥
अशक्त पाहता नंदा नेतील धन धान्यही ।
सत्य शौचादि पाळावे हेही कष्टप्रदो मला ॥ ४८ ॥
जिला मूल तिला कष्ट लालनी पालनी असे ।
त्याहुनी विधवा वंध्या होणे हे चांगलेच की ॥ ४९ ॥
मनी कुतर्क मांडोनी तिने फळ न भक्षिले ।
पुसता पतिदेवाने भक्षिले वदिली पहा ॥ ५० ॥
बहीण एकदा आली धुंधुलीची तिच्या कडे ।
धुंधुली वदली वृत्त चिंता सर्वही बोलली ॥ ५१ ॥
चिंतेने रोड मी झाले प्रिये सांग कशी करु ।
बहीण वदली तेव्हा माझ्या गर्भात पुत्र तो ॥ ५२ ॥
गर्भारपणाचे सोंग करोनी बैस तू घरी ।
मजला धन दे कांही देईन पुत्र तो तुला ॥ ५३ ॥
मेले षण्मासि ते बाळ लोकांना मी म्हणेल नी ।
इथे येईन मी नित्य पाजीन दूध त्याजला ॥ ५४ ॥
गाईला फळ हे द्यावे खरे खोटे हि देख तू ।
स्वभावे ब्राह्मणीने ते केले सर्व तसेचि की ॥ ५५ ॥
पुन्हा कालांतरे झाला पुत्र त्या भगिनीस जो ।
तिने गुप्तरितीने तो दिधला धुंधुलीसही ॥ ५६ ॥
धुंधुली आत्मदेवाला म्हणाली सुखरुप मी ।
झाले प्रसूत हे बाळ आनंदे पुत्र हा पहा ॥ ५७ ॥
संस्कारी जातकादींच्या ब्राह्मणे वाटिले धन ।
आनंदोत्सव मानोनी वाद्य मंगल लाविले ॥ ५८ ॥
पतीसी धुंधुली बोले दूध माझ्या स्तनी नसे ।
दुधाने वरच्या कैसे वाढेल बाळ आपुले ॥ ५९ ॥
प्रसुती भगिनी माझी परी बालक वारले ।
तिला बोलाविता येथे करील प्रतिपोषण ॥ ६० ॥
पतीने सर्व ते केले पुत्राच्या रक्षणार्थ जे ।
माता धुंधुलीने नाम धुंधुकारीच ठेविले ॥ ६१ ॥
त्रिमास लोटले तेव्हा गाईस मूल जाहले ।
सर्वांगी दिसण्या दिव्य निर्मळो कनकप्रभ ॥ ६२ ॥
आत्मदेवे तयाचेही केले जातक हर्षुनी ।
आश्चर्य वाटले लोका पाहण्या कैक पातले ॥ ६३ ॥
म्हणाले आत्मदेवाचे पहा हे भाग्य केवढे ।
गाईच्या उदरातून अहो बालक जन्मले ॥ ६४ ॥
रहस्य दैवयोगाने गुप्तची राहिले असे ।
गाईसम तया कर्ण गोकर्ण नाम जाहले ॥ ६५ ॥
लोटला काळ तो कांही तारुण्यी पुत्र पातले ।
ज्ञानी पंडित गोकर्ण दुसरा दुष्ट जाहला ॥ ६६ ॥
क्रोधिष्ठ धुंधुकारी तो स्नान शौचादि नाचरे ।
लुटी अन्यांचिये द्रव्य सूतकी भोजनप्रिय ॥ ६७ ॥
करणे द्वेष चौर्यादी दुजांची जाळि ती घरे ।
कोणाची उचली बाळे आडात फेकिही कधी ॥ ६८ ॥
हिंसको शस्त्रधारी तो दीन अंधासिही पिडी ।
रमे चांडाळ लोकात श्वानपाश सदा करी ॥ ६९ ॥
फसला फंदि वेश्याच्या वडिलार्जित संपले ।
माता पित्यासि ठोकोनी भांडीही विकिली तये ॥ ७० ॥
संपता सर्व संपत्ती चिक्कू बापहि स्फुंदला ।
वांझ माता सुखी होय कुपुत्र दुःखदायक ॥ ७१ ॥
करु काय कुठे जाऊ दुःख कोण निवारिल ।
मरेन दुःख होवोनी वदला द्विज तेधवा ॥ ७२ ॥
ज्ञानी गोकर्ण तेव्हा त्या पित्याशी नम्र बोलला ।
वैराग्य कथिले सर्व खूप तो समजाविला ॥ ७३ ॥
असार सर्व संसार दुःखी मोहेचि ओढितो ।
कोणाचे धन हे पुत्र लोभी दीपापरी जळे ॥ ७४ ॥
न सुखी नृप नी इंद्र वैराग्यी सुख लाभते ।
एकांती जीव जो राही त्यालाच सुख ते मिळे ॥ ७५ ॥
पुत्रांचा लोभ तो सोडा सोडा नरकमोह हा ।
होईल देह हा नष्ट सुखाने वन सेविणे ॥ ७६ ॥
ऐकोनी पुत्रवाणी ती आत्मदेवे विचारिले ।
निघतो परि मी काय करावे तेथे सांग ते ॥ ७७ ॥
मोठा मी मूर्ख लोभी नी कर्म स्नेहेचि बांधिलो ।
घरकूपात मी बद्ध कृपेने तारि तू मला ॥ ७८ ॥
गोकर्णजी म्हणाले -
(वसंततिलका)
देहात मास भरले अन रक्त हाडे
    दारा तनू नि तनयो ययिं मोह टाळा ।
क्रोधास त्याग करणे जग नाशिवंत
    वैराग्य ध्यास धरणे स्मरणे हरीला ॥ ७९ ॥
घ्यावा तुम्ही भजनधर्मचि थोर ऐसा
    साधूसि नित्य पुजिणे त्यजिणे भवाला ।
पापास स्पर्श नच हो गुण-दोष टाळा
    प्यावा कथारस सदा करणे त्वरा ती ॥ ८० ॥
ऐकोनि पुत्रवचना मग आत्मदेव
    गेले वनात करुनी दृढनिश्चयाते ।
नी लागले निशि दिनी हरिच्या पुजेत
    वाचोनि स्कंध दशमो हरि प्राप्त केला ॥ ८१ ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ तिसरा चौथा अध्याय हा ॥ माहात्म्य ४ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP