भक्तीच्या कष्टाची निवृत्ती -  
नारदजी म्हणाले - 
(अनुष्टुप्) 
शुके जे कथिले शास्त्र तयाचा यज्ञ मांडितो । 
वैराग्य भक्ति ज्ञानाला स्थापीन यत्नपूर्वक ॥ १ ॥ 
सांगा मला कुठे मांडू कथेचा ज्ञानयज्ञ तो । 
तुम्ही वेदज्ञ हो संत कथा माहात्म्य सांगणे ॥ २ ॥ 
किती दिन करावी श्रीमद्भागवत् कथा। 
मजला सगळे सांगा श्रीमद्भागवतो विधी ॥ ३ ॥ 
सनकादिक संत म्हणाले -  
नम्र हो नारदा तुम्ही विवेकीही तसेच की । 
ऐका आनंद नावाचा हरिद्वारासि घाट तो ॥ ४ ॥ 
त्या तिथे ऋषि ते कैक देवता सिद्ध राहती । 
वृक्षवेली सदानंदी मऊ वाळू तिथे पहा ॥ ५ ॥ 
रम्य एकांत ते स्थान गंधे कमल शोभले । 
जिथे हिंस्त्र पशूही ते वैर सांडोनि राहती ॥ ६ ॥ 
निर्धास्त राहुनी तेथे आरंभा ज्ञानयज्ञ तो । 
कथेला त्याच जागेत भरेल रस गोडवा ॥ ७ ॥ 
जराजर्जर पुत्रांच्या सह ती भक्ति त्या स्थळी । 
आपोआपचि येईल पहा नेत्रे समोरची ॥ ८ ॥ 
जिथे भागवती वार्ता तिथे येईल भक्ति नी । 
तारुण्य प्राप्त होईल त्या तिघा ऐकता कथा ॥ ९ ॥ 
सूतजी म्हणाले -  
नारदे मानिले तैसे कुमारांसह तेधवा । 
कथामृत पिण्या आले गंगेच्या तटि सत्वर ॥ १० ॥ 
तिथे येताचि हे सर्व भूदेव ब्रह्म संत ते । 
सगळे धावले तेथे मिळवाया कथारस ॥ ११ ॥ 
आले प्रथम जे कोणी विष्णुचे नित्य सेवक । 
सर्वांच्या पुढती त्यांनी राखिले स्थान आपुले ॥ १२ ॥ 
(इंद्रवज्रा) 
भृगू वसिष्ठो च्यवनो नि व्यास 
    मेधातिथी देवल देवरात । 
ते गौतमो राम नि विश्वमित्र 
    मृकुंडपुत्रो  अन शाकलो ते ॥ १३ ॥ 
दत्तात्रयो जाजलि पिप्पलादी 
    जन्हू शुको हे मुनि पातले तै । 
स्त्रिया तसे शिष्यहि घेउनीया 
    सप्रेम आले कथि बैसण्याला ॥ १४ ॥ 
(अनुष्टुप्) 
तसेचि पातले तंत्र वेद वेदांत मंत्र ते । 
पुराणे सतरा शास्त्रे आले प्रत्यक्ष ते सहा ॥ १५ ॥ 
गंगादी सरिता सार्या पुष्करादी सरोवरे ।
दंडकादी वने सारी तशाच दश त्या दिशा ॥ १६ ॥ 
हिमालयादि गिरि ते देव गंधर्व दानव । 
पातले ऐकण्या वार्ता भृगुने अन्य आणिले ॥ १७ ॥ 
नारदे त्या प्रवक्त्यांना दिधले उच्च आसन । 
कुमारा स्थापिले तेथे श्रोत्यांनी वदिले तया ॥ १८ ॥ 
श्रोतीं विरक्त संन्यासी बैसले वैष्णवी गण । 
सुमुखे त्यात सर्वांच्या पुढे नारद बैसले ॥ १९ ॥ 
एकभागी ऋषी आणि एक भागात देवता । 
वेदोपनिषदे तीर्थे स्त्रिया अन्यत्र बैसल्या ॥ २० ॥ 
नमस्कार करोनिया जयघोष निनादला । 
शंखांचे शब्द ते झाले गुलाल पुष्प वर्षले ॥ २१ ॥ 
विमानी चढल्या तेंव्हा त्या श्रेष्ठ कांहि देवता । 
कल्पतरूफुलांचा तो केला वर्षाव अद्भुत ॥ २२ ॥ 
सूतजी म्हणाले -  
अशी होताच पूजा ती सनकादिक संत तै । 
श्रीमद्भागवताचे हे माहात्म्य कथु लागले ॥ २३ ॥ 
कुमार म्हणाले -  
महिमा सांगतो आता आम्ही भागवताचि ती । 
जिच्या श्रवणमात्रेने मुक्ति हातास लाभते ॥ २४ ॥ 
नित्य नित्यचि सेवावी अशी भागवती कथा । 
हिच्या श्रवण योगाने हृदयी श्रीहरी वसे ॥ २५ ॥ 
आठ्रा हजार श्लोकात बारा स्कंधी विराजली । 
राजा परीक्षितालाही बोधिली शुकदेवि जी ॥ २६ ॥ 
ऐका सावध चित्ताने जीव अज्ञान हा वश । 
नित्य हिंडे परी थांबे ऐकता श्रेष्ठ ही कथा ॥ २७ ॥ 
पुराणे शास्त्र ऐकोनी होतसे काय लाभ तो ।  
व्यर्थची भ्रम तो वाढे मुक्ती भागवतातची ॥ २८ ॥ 
कथा भागवताची ही ज्या घरी नित्य होतसे । 
घर ना तीर्थ ते जाणा त्या घरी पाप नष्टते ॥ २९ ॥ 
हजारो अश्वमेधाचे शेकडो वाजपेयचे । 
सोळांश ना तये पुण्य एका भागवतात जे ॥ ३० ॥ 
तपोधान ! पहा ऐका देहाचे पाप ते किती । 
नच सोडी कधी देहा नैकती जोवरी कथा ॥ ३१ ॥ 
न गंगा न गया काशी पुष्कर न प्रयाग ही । 
कोणते तीर्थ ते नाही या कथेहूनि श्रेष्ठ ते ॥ ३२ ॥ 
श्लोकार्थ अथवा चौथा भाग तो जरि वाचिला । 
तरी जीव गती पावे अशी भागवती कथा ॥ ३३ ॥ 
गायत्री वेद ओंकार पुरूष सूक्त नी तसे । 
श्रीमद्भागवतो आणि द्वादशाक्षरि मंत्र तो ॥ ३४ ॥ 
सूर्यदेव प्रयागो नी काल संवत्सरो तसे । 
विप्र नी अग्निहोत्रो नी गायनी द्वादशीतिथी ॥ ३५ ॥ 
तुलसी नी वसंतो नी भगवान् पुरुषोत्तम । 
या सर्वांच्या मधे प्राज्ञ भेद ना मुळि मानितो ॥ ३६ ॥ 
जो हे भागवतो शास्त्र सअर्थ नित्य वाचितो । 
कोटि जन्माचिये पापे नष्टती नच संशय ॥ ३७ ॥ 
श्लोकार्थ भाग चौथाई वाचिला जर नित्य तो ।  
राजसूयाश्वमेधाचे फळ त्या लाभते पहा ॥ ३८ ॥ 
श्रीमद्भागवता नित्य वाचणे हरिचिंतिणे । 
तुलसी धेनुची सेवा चारी पुण्य समान ते ॥ ३९ ॥ 
ऐके जो अंतकाळाला श्रद्धेने शुकशास्त्र हे । 
श्री विष्णु पावतो त्याला वैकुंठ धाम लाभते ॥ ४० ॥ 
सुवर्णासनि ठेवोनी देता ग्रंथचि वैष्णवा । 
सायुज्य मुक्ति ती लाभे देणार्यास न संशय ॥ ४१ ॥ 
(वसंततिलका) 
एकाग्रचित्त करुनी शुकशास्त्र जेणे  
    ना सेविले जगुनिया ठक पापि तोचि ।
चांडाळ गर्दभ असे समजा जिणे ते  
    मिथ्या स्वजन्मि जननी पिडिली तयाने ॥ ४२ ॥ 
जो ना पिलाचि शुकशास्त्र  जगोनि खूप 
    जीता असोनि समजा मुडदा सचेत । 
भारस्वरुप समजा पशुतुल्य धिक्क 
    इंद्रादि देव म्हणती मनि स्वर्ग ऐसे ॥ ४३ ॥ 
(अनुष्टुप्) 
दुर्लभा ही कथा लोकी श्रीमद्भागवती पहा । 
करोडो जन्मपुण्याने लाभते मानवा अशी ॥ ४४ ॥ 
बुद्धिवंत ! अहो योगी ! ऐका सावध ही कथा । 
वारांचे न हिला बंध केव्हाही फळ येतसे ॥ ४५ ॥ 
पाळावे ब्रह्मचर्यो नी सत्य ते वागणे हवे । 
शुकांनी कथिले तैसे वागणे चांगले असो ॥ ४६ ॥ 
ब्रह्मचर्य नि ते सत्य कलीत दीर्घकाळ ते । 
कठीण वाटते ज्यांना त्यांनी सप्ताह योजिणे ॥ ४७ ॥ 
श्रद्धेने कधिही ऐका किंवा त्या माघ श्रावणी । 
सप्ताही ऐकता तेची लाभते फळ श्रोतिया ॥ ४८ ॥ 
कलीत चंचला वृत्ती रोग अल्पायु कारणे ।
सप्ताह श्रवणाचा तो स्वल्प हा विधि बोलिला ॥ ४९ ॥ 
जे तपे योग ध्यानाने न मिळे सहजी कुणा । 
ते सर्व मिळते आता कथेच्या श्रवणातुनी ॥ ५० ॥ 
श्रेष्ठ यज्ञाहुनी आणि तपव्रत फिके पुढे । 
तीर्थ योगादि सायासाहुनी श्रेष्ठ कथा असे ॥ ५१ ॥ 
अधीक काय ते सांगू ज्ञान ध्यानहि धाकुटे । 
सर्वची त्या प्रयासात कथा ही श्रेष्ठची पहा ॥ ५२ ॥ 
शौनकजी म्हणाले - 
(इंद्रवज्रा) 
आश्चर्यवार्ता कथिली तुम्ही तो 
    ब्रह्मा नि नारायण योगवेत्ते । 
अवश्य श्री भागवता कथीती 
    मोक्षार्थ ना साधन ते दुजे की ॥ ५३ ॥ 
श्री सूतजी म्हणाले - 
(अनुष्टुप्) 
सोडण्या जग हे कृष्णे योजिले निजधाम तै । 
आकरा स्कंध ऐकोनी उद्धवे प्रश्न टाकिला ॥ ५४ ॥ 
उद्धवजी म्हणाले -  
गोविंदा ! कार्य भक्तांचे करोनी चालले तुम्ही । 
परी माझ्या मनी चिंता आहे ती हरणे प्रभो ॥ ५५ ॥ 
आलाचि समजा घोर कली या पृथवीवरी । 
माजेल दुष्टता भारी होतील संत उग्र ते ॥ ५६ ॥ 
तेव्हा भारवती भूमी गो रुपी आश्रया कुठे । 
जाईल सांगणे देवा तुम्हीच प्रतिपालक ॥ ५७ ॥ 
न जावे म्हणुनी कोठे देवा हो भक्तवत्सला । 
निराकार परब्रह्म आलात स्वजनास्तव ॥ ५८ ॥ 
मोठा वियोग तो तैसा भक्तांना नच साहवे । 
निर्गुणोपासनी कष्ट म्हणोनी मार्ग काढणे ॥ ५९ ॥ 
बोलणे उद्धवाचे हे कृष्णाने ऐकिले असे । 
मनात चिंतिले त्यांनी भक्तोद्धारार्थ कार्य ते ॥ ६० ॥ 
कृपाळू भगवंताने दिव्यशक्ति कथेत या । 
आपुली ओतुनी सारी स्वधाम गाठीले पुन्हा ॥ ६१ ॥ 
त्यामुळे वाङम्योमूर्ती प्रत्यक्ष भगवंत ही । 
म्हणोनी श्रवणे पाठे नष्टती पाप सर्व ते ॥ ६२ ॥ 
सप्ताही ऐकणे श्रेष्ठ पंडित मानिले असे । 
कलीत अन्य ते नाही तंत्र याहून श्रेष्ठ की ॥ ६३ ॥ 
कलीत एकची धर्म दुःख दारिद्रय हारिण्या । 
पाप कामादिकालाही हरिते नित्य ही कथा ॥ ६४ ॥ 
अन्यथा विष्णुची माया देवतांनाहि पीडिते । 
मायापाश तुटे सारा सप्ताही ऐकता कथा ॥ ६५ ॥ 
सूतजी सांगतात - 
(इंद्रवज्रा) 
माहात्म्य ऐसे जधि संत गाती 
    सप्ताह पारायण ऐकण्याचे । 
आश्चर्य झाले तयि वेळि एक 
    ऐका तयाते वदतो तुम्हाला ॥ ६६ ॥ 
दो वृद्धपुत्रा सह ती तरुणी 
    भक्ति तिथे पातलि नित्य बोले । 
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे 
    हे नाथ नारायण वासुदेव ॥ ६७ ॥ 
ऐकावया भक्ति सजोनि आली 
    सदस्य सारे बघती तिला की । 
बोलोनि गेले तयि आपसात 
    कैसी इथे पातलि ही कळेना ॥ ६८ ॥ 
कुमार तेव्हा वदती मुखाने 
    कथारसातूनचि पातली ही । 
ऐके जधी भक्तिहि त्याच वेळी 
    पुत्रांसवे ती मग बोलली की ॥ ६९ ॥ 
भक्ति म्हणाली - 
कलीत झाले बहु मी कृशा नी 
    तुम्ही कथेने मज पुष्ट केले । 
सांगा बरे मी मग कोण आहे ? 
    ऐकोनिया संतहि बोलले तै ॥ ७० ॥ 
तू भक्ति गे दाविशि कृष्णरुप 
    तू प्रेम देसी हरिशी भवाला । 
करोनि धैर्या तरि तू रमावे 
    श्रीविष्णुदासा हृदयात नित्य ॥ ७१ ॥ 
विश्वात होई कलिचा प्रभाव 
    आता तुला ना मुळि ताप होई । 
घेवोनि आज्ञा मग ती त्वरेने 
    श्रीविष्णुदासा हृदयात गेली ॥ ७२ ॥ 
(द्रुतविलंबित) 
सकल भुवनमध्ये निर्धनी तोहि धन्य 
    निवसत हृदि ज्याच्या श्रीहरीभक्ति एक । 
हरिजरि असला तो भक्तिने बद्ध होतो 
    अन हृदि बसतो तो सोडुनी श्रेष्ठधाम ॥ ७३ ॥ 
(वसंततिलका) 
वानू किती महति भागवताचिया मी 
    हे लोकि या प्रगटले परब्रह्म साक्षात् ।
जे ऐकती नि कथिती कथनामृताला 
    ते कृष्णरूप घडती मग काय व्हावे ॥ ७४ ॥ 
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । 
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ तिसरा अध्याय हा ॥ माहात्म्य ३ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
GO TOP