भक्तिचे दुःख दूर करण्याचे नारदाचे प्रयत्न  - 
नारदजी म्हणाले - 
(अनुष्टुप्) 
वृथा खेद नको बाले मनीं चिंता कशास ही । 
भगवान कृष्णपायाच्या चिंतने दुःख संपते ॥ १ ॥ 
रक्षिली द्रौपदी त्याने कौरवांच्या सभेत की । 
सनाथ गोपिका केल्या कृष्ण दूर न त्या कधी ॥ २ ॥ 
तू तो प्रिया सखी त्याची भक्ति-कृष्ण न ते दुजे । 
प्रेमे बोलाविता त्याला नीचाघरिही धावतो ॥ ३ ॥ 
मुक्त्यर्थ ज्ञान वैराग्य सत्य आदी युगी तिन्ही । 
कलीत केवलो भक्ती ब्रह्म सायुज्य लाभण्या ॥ ४ ॥ 
ज्ञानस्वरुप ईशाने बुद्ध्याचि निर्मिले तुला । 
प्रत्यक्ष कृष्णचंद्राची प्रिया तू रूपसुंदरी ॥ ५ ॥ 
तयासी एकदा तूची प्रार्थिले कार्य सांगण्या । 
आज्ञापिले तदा त्याने माझ्या भक्तासि रक्षिणे ॥ ६ ॥ 
आज्ञा तू मानिली त्याची भगवान पावला तदा । 
दिधली मुक्ति ती दासी ज्ञान वैराग्य पुत्र हे ॥ ७ ॥ 
भक्तां सांभाळण्यासाठी साक्षात वैकुंठि नांदली । 
सावली होउनी तेथे त्यांच्या पुष्ट्यर्थ राहिली ॥ ८ ॥ 
वैराग्य मुक्ति नी ज्ञान सवे तू येथ पातली । 
द्वापार युग पर्यंत आनंदे राहिलीस तू ॥ ९ ॥ 
कलीत मुक्ति ही झाली पाखंडरोग ग्रस्त ती । 
तू तिला शीघ्र वैकुंठी आज्ञा देवोनि धाडिले ॥ १० ॥ 
तू तिला स्मरता ध्यानी येते जाते पुनःपुन्हा । 
वैराग्य ज्ञान ही बाळे तुझे म्हणुनि ठेविली ॥ ११ ॥ 
पुढती या कली मध्ये उपेक्षेने तुझी मुले । 
मंदवृद्ध अशी झाली त्यांची चिंता करू नको ॥ १२ ॥ 
कलीच्या परि ना चांग युग ते दुसरे पहा । 
गेही गेही तसेची मी पोचवील जनीं जनीं ॥ १३ ॥ 
अन्य धर्मासि दाबोनी तुला मी वाढवीन की । 
न करू शकता तैसे हरीचा दास मी नसे ॥ १४ ॥ 
महापापी जरी कोणी संयोगे या युगी तुझ्या । 
तरी तो धाम कृष्णाचे लीलया मिळवीतसे ॥ १५ ॥ 
ज्याच्या हृदीं सदाभक्ती मोक्षदा प्रेमरुपिणी । 
न दिसे त्यास स्वप्नीही यमधर्म कसाहि तो ॥ १६ ॥ 
न तया भूत-प्रेताचे भय स्पर्शू शके कधी । 
दैत्य दानव यांचीही मात्रा तेथे न चालते ॥ १७ ॥ 
तपाने वेदपाठाने ज्ञान कर्मे न बांधतो । 
भक्तिने हरि लाभे तो यासी गोपी प्रमाण की ॥ १८ ॥ 
हजारो जन्मपुण्याने भक्तीचे प्रेम ये मनी । 
या युगी भक्तिची एक जेणे श्रीकृष्ण लाभतो ॥ १९ ॥ 
करी जो भक्तिचा द्वेष तिन्ही लोकात दुःखि तो । 
दुर्वासे भोगिले सारे दुःख तैसे भयावह ॥ २० ॥ 
नको ज्ञान नको याग व्रत तीर्थ नकोच ते । 
ज्ञानचर्चा नको कांही भक्तिने मुक्ति लाभते ॥ २१ ॥ 
सूतजी सांगतात -  
ऐकता आपुली ख्याती नारदे जी कथीयली । 
सर्वांगपुष्ट होवोनी नारदा भक्ति बोलली ॥ २२ ॥ 
भक्ति म्हणाली -  
नारदा धन्य हो तुम्ही माझ्याशी प्रीत ही खरी । 
राहीन नित्य मी चित्ती कधी जाणे नसे कुठे ॥ २३ ॥ 
कृपाळू साधू हो तुम्ही क्षणात दुःख हारिले । 
परी पुत्रात चैतन्य यावे सत्वर ते करा ॥ २४ ॥ 
सूतजी सांगतात -  
भक्तिचे वाक्य ऐकोनी आले कारुण्य नारदा । 
मुलांना हात लावोनी उठवू लागले तदा ॥ २५ ॥ 
कानात जोर जोराने तोंडाने शब्द बोलले । 
वैराग्या रे अरे ज्ञाना व्हावे जागृत सत्वर ॥ २६ ॥ 
वेदघोष तसा पाठ गीतेचा नित्य बोलले । 
ऐकोनी मंत्र हे सारे प्रयासे उठले द्वय ॥ २७ ॥ 
नाही उघडिले डोळे आळसे देति जांभया । 
केस ते पांढरे होते अंग काष्ठापरी कृश ॥ २८ ॥ 
क्षुधा तृष्णे असे झाले दुबळे बंधु तेधवा । 
पुन्हा झोप बघोनीया नारदा भय वाटले ॥  
नारदे चिंतिले तेंव्हा काय मी करणे असे ॥ २९ ॥ 
त्यांची ती पाहुनी निद्रा वृद्धावस्था तशीच ती । 
गोविंदा ! नारदे तेव्हा भगवंतासि गायिले ॥ ३० ॥ 
तेव्हा त्या समयी झाली आकाशवाणि ती अशी । 
मुनी खेद नको ऐसा लाभेल यश ते खरे ॥ ३१ ॥ 
देवर्षि याज साठी ते सत्कर्म करणे असे । 
संतश्रेष्ठ तुम्हा अन्य ते कर्म वदतील की ॥ ३२ ॥ 
कर्माचे त्या अनुष्ठान करिता झोप जाय ही । 
वृद्धावस्थाहि संपोनी लोकात भक्ति ही वसे ॥ ३३ ॥ 
आकाशवाणि ही ऐसी नारदे स्पष्ट ऐकिली । 
आश्चर्य वाटले त्यांना अर्थ कांही कळेचिना ॥ ३४ ॥ 
नारदजी म्हणाले -  
गुप्तही ऐकिली वाणी नाही साधन बोलिले । 
ज्याने सिद्धीस हे कार्य निश्चये होय साजिरे ॥ ३५ ॥ 
संत ते कोणत्या ठायी भेटतील कधी मला । 
सांगतील मला अर्थ वाणीचा परिपूर्ण जे ॥ ३६ ॥ 
सूतजी सांगतात -  
त्या तिघा सोडुनी तेथे निघाले मुनि ते पुढे । 
जेथे तेथेहि साधुंना भेटता प्रश्न बोलिले ॥ ३७ ॥ 
सर्वांनी प्रश्न ऐकोनी नाही निश्चित बोधिले । 
असाध्य वदले कोणी कोणी गप्पचि राहिले ॥ ३८ ॥ 
कोणास वाटले न्यून टोलावा टोलवी दिली । 
हाहाःकार जगी झाला आश्चर्यी बुडले जन ॥ ३९ ॥ 
वेदांत घोष गीतेचा याहुनी साधना नसे । 
गीतापाठहि ऐकोनी ज्ञान वैराग्य ना मिळे ॥ ४० ॥ 
भक्त ज्ञानी नि वैरागी स्वयं नारदजीच ते । 
पुसती सर्व लोकांना लोकांनी काय सांगणे ॥ ४१ ॥ 
बोलले ऋषि ते सर्व यासी तंत्र ना काहिही ॥ ४२ ॥ 
चिंतेत नारदे तेव्हा फिरोनी जग सर्व हे । 
बदरीवनात जावोनी तप ते योजिले असे॥ ४३ ॥ 
तेव्हाचि दिसले त्यांना सनकादिक ते मुनी । 
आनंदे पाहुनी चौघां नारदाने विचारिले ॥ ४४ ॥ 
नारदजी म्हणाले - 
भाग्याने माझिया झाली आपुली भेट ही अशी । 
त्वरीत मजला सांगा काय साधन ते असे ॥ ४५ ॥ 
दिसता पाच वर्षाचे परी योगी तुम्ही असा । 
पूर्वजांचे तुम्ही आहा आदिपूर्वजची पहा ॥ ४६ ॥ 
सदा वैकुंठधामात निवास असतो तुम्हा । 
हरिकथारसवल्ली आधार तुमचा असे ॥ ४७ ॥ 
हरिः शरणम् मंत्राते तुम्ही तो नित्य गातसा । 
तेणे वृद्धापकाळाची मात्रा तुम्हा न ती चले ॥ ४८ ॥ 
एकदा विष्णुद्वारीच्या जय नी विजयासही । 
भ्रूभंगे तुमच्या तेव्हा शिक्षा ती लाभली असे ॥ ४९ ॥ 
भाग्याने मजला झाले श्रेष्ठ दर्शन आपुले । 
मज दीनावरी तुम्ही कृपा केलीच पाहिजे ॥ ५० ॥ 
सांगा आकाशवाणीचा अर्थ तो समजावूनी । 
कोणत्या साधना ध्यावे विस्तारे सांगणे मला ॥ ५१ ॥ 
वैराग्य भक्ति ज्ञानाला कैसे सुख मिळेल ते । 
वाढेल सर्व वर्णात प्रतिष्ठा प्रेमपूर्वक ॥ ५२ ॥ 
कुमार म्हणाले - 
न चिंता करणे योगी प्रसन्न चित्त ते करा । 
उपाय सहजी सोपा पूर्वीच सिद्ध जाहला ॥ ५३ ॥ 
धन्य हो नारदा तुम्ही विरक्तांचे शिरोमणी । 
सदा श्रीकृष्णदासाचे कोटिभास्कर दर्शक ॥ ५४ ॥ 
ऋषिंनी दाविले मार्ग परी ते कष्ट दायक । 
श्रमसाध्यचि सर्वांना अंती स्वर्गची लाभतो ॥ ५५ ॥ 
तुम्ही त्या भक्तिच्या साठी मांडिला हा प्रपंच की । 
तिजला कृष्णदासाने ठेवावि नित्यची मनी ॥ ५६ ॥ 
वैकुंठ लाभते ज्याने गुप्त तो मार्ग हा असा । 
मार्गाचे या उपदेशी भाग्याने संत लाभती ॥ ५७ ॥ 
तुम्हा आकाशवाणीने मार्ग हा गुप्त बोधिला । 
चित्ती प्रसन्न होवोनी ऐकावे हित सांगतो ॥ ५८ ॥ 
द्रव्ययज्ञ तपोयज्ञ हव्ययज्ञे तसेचि त्या । 
ज्ञान यज्ञादि कर्माने स्वर्ग केवळ लाभतो ॥ ५९ ॥ 
ज्ञानयज्ञात सत्कर्म सदाचि मोक्ष दायक । 
श्रीमद्भागवती वार्ता गायिली जी शुकादिने ॥ ६० ॥ 
जियेच्या श्रवणोमात्रे ज्ञान वैराग्य वाढते । 
भक्तिची मिटते चिंता तिला आनंद लाभतो ॥ ६१ ॥ 
सिंहाची गर्जना होता कोल्हे भीवूनि धावती । 
कथा ऐकोनिया तैसे कलीचे दोष धावती ॥ ६२ ॥ 
घेउनी ज्ञान वैराग्य भक्ती ती प्रेमदायक । 
प्रत्येक व्यक्तिच्या ठायी आनंदाने क्रिडेल की ॥ ६३॥ 
नारदजी म्हणाले -  
गीता वेदांत घोषाने यांना मी उपचारिले । 
परी ना शुद्धिसी आले ज्ञान वैराग्य हे द्वय ॥ ६४ ॥ 
श्रीमद्भागवती सार वेदांचेच असे पहा । 
तरी ती तारिते कैसी ज्ञान वैराग्य भक्तिला ॥ ६५ ॥ 
संशयो हा निवारावा उशीर याजला नको । 
भाविका पावता तुम्ही न जाय व्यर्थ दर्शन ॥ ६६ ॥ 
कुमार म्हणाले - 
वेदातुनी निघाली ही सार रूप कथा अशी । 
म्हणोनी उत्तमा ठेली फलरुप गुणोत्तमा ॥ ६७ ॥ 
वृक्षाचे अंग पाचीही चवीने भिन्न भिन्न की । 
फळ हे सार वृक्षाचे जगी सर्वासि आवडे ॥ ६८ ॥ 
तूप राही दुधामध्ये दोघांचा स्वाद भिन्न की । 
वेगळे निघता तूप देवांनाही अतिप्रिय ॥ ६९ ॥ 
शर्करा ती उसामध्ये जशी बाहेर काढिता । 
वेगळी चव ती श्रेष्ठ तशी भागवती कथा ॥ ७० ॥ 
श्रीमद्भागवती वार्ता व्यासांनी रचिली असे । 
वेदांच्या सम ही ख्याता वाढवी ज्ञान भक्ति ती ॥ ७१ ॥ 
वेदांत सारिणी गीता रचिली श्रेष्ठ ती तरी । 
खिन्नले व्यासजी चित्ती बुडालेऽज्ञानसागरी ॥ ७२ ॥ 
तेव्हाचि तुम्हि त्या चार श्लोकाने उपदेशिले । 
ऐकता सर्वची चिंता संपली व्यासजींचि तै ॥ ७३ ॥ 
तरी आश्चर्य कां तुम्हा आम्हास प्रश्न छेडिता । 
श्रीमद्भागवतो त्यांना ऐकवा दुःख नाशि जे ॥ ७४ ॥ 
नारदजी म्हणाले - 
(वसंततिलका) 
होताचि दर्शन जिवा तुमचे तयाने 
    नष्टोनि पाप शमतो भव दुःख अग्नि । 
निःशेष शेषमुखगीत कथाचि प्याले 
    प्रेम प्रकाश कळण्या नमितो तुम्हा मी ॥ ७५ ॥ 
भाग्योदयेचि बहु संचित पुण्य योगे 
    तो संतसंग घडतो मग मानवाला । 
अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार 
    नष्टे तयेनि मग तो उगवे विवेक ॥ ७६ ॥ 
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । 
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ दुसरा अध्याय हा ॥ माहात्म्य २ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
GO TOP