समश्लोकी श्रीमद्‌भागवत महापुराण

श्रीमद्‌भागवतमाहात्म्य - अध्याय १ ला

देवर्षि नारदांची भक्तिशी भेट -

(अनुष्टुप्‌)
सच्चिदानंदरुपी जो विश्वोत्पत्त्यादि हेतुही ।
तापत्रयविनाशी त्या श्रीकृष्णाला नमो नमो ॥ १ ॥
(वसंततिलका)
संन्यास इच्छुनि शिशू निघता वनासी
    द्वैपायना विरह ना सहवोनि पुत्राऽऽ
जासी कुठे वदत तै पुसताचि वृक्ष
    मी सर्वभूत वदले शुक ते नमी मी ॥ २ ॥
(अनुष्टुप्‌)
नैमिष्यारण्यि जे ज्ञानी कथा वक्ते चतूर त्या ।
सूतांना नमुनी ऐसे शौनके पुसले असे ॥ ३ ॥
शौनकजी म्हणाले-
करोडो ज्ञानसूर्यांचे तेज अंगी तुम्हा असे ।
ज्ञानामृत कथा तुम्ही कानीं ओता रसायन ॥ ४ ॥
भक्ति ज्ञान नि वैराग्य विवेक वाढतो कसा ।
मोह माया त्यजोनीया कैसे वैष्णव राहती ॥ ५ ॥
युगी घोर कलीमध्ये असूर जाहले बहू ।
क्लेशाने त्रासले लोक कैसे उद्धार पावणे ॥ ६ ॥
सांगा तंत्र असे काही सोपे कल्याणकारक ।
पवित्र आणि जे ऐसे जेणे श्रीकृष्ण पावतो ॥ ७ ॥
कल्पतरूत सामर्थ्य स्वर्ग संपत्ति लाभते ।
परी गुरुकृपेने ते वैकुंठधाम लाभते ॥ ८ ॥
सूतजी म्हणाले-
शौनका जाणिले मी तो कृष्णप्रेमी तुम्ही असा ।
विचारे सांगतो सूत्र संसारभयनाशक ॥ ९ ॥
वाढतो भक्तिचा स्त्रोत भगवान्‌ कृष्ण पावतो ।
ऐका श्रेष्ठ असे तंत्र व्हावे सावध सावध ॥ १० ॥
या कलीकाळ सर्पाने ग्रासिले त्रासिले जग ।
मुक्तीसाठी शुकांनी ते श्री भागवत बोधिले ॥ ११ ॥
साधनात असे कांही नाही याहूनि श्रेष्ठ की ।
पुण्याने जन्म-जन्मीच्या मानवा लाभते असे ॥ १२ ॥
राजा परीक्षिता लागी कथाया बैसता शुक ।
सुधाकुंभा सवे तेव्हा पातल्या देवदेवता ॥ १३ ॥
स्वकार्यकुशली देव शुका वंदोनि बोलले ।
सुधा घेवोनि आम्हाला द्यावी सुंदर ही कथा ॥ १४॥
ह्या अशा देव-घेवीने सुधा प्राशील तो नृप ।
आम्ही ऐकोत आनंदे श्रीमद्‌भागवतामृता ॥ १५ ॥
हसून शुकजी तेव्हा उत्तरा बोलले असे ।
कुठे रत्‍न कुठे काच तैसी वार्ता नि ती सुधा ॥ १६ ॥
भक्तिहीन अशा देवां शुकांनी नच बोधिले ।
श्रीमद्‌भागवतीवार्ता देवां दुर्लभ ही अशी ॥ १७ ॥
राजाचा मोक्ष पाहोनी झाले विस्मित ब्रह्मजी ।
बांधिली सत्यलोकात पुण्याची तौलनी तुळा ॥ १८ ॥
झाले चकित ते सारे ऋषी आचार्य पाहुनी ।
कथा भारी तुळी झाली सर्व योगात ती पहा ॥ १९ ॥
त्यांनी निश्चित केले की श्रेष्ठ भागवतो युगीं ।
पठणे श्रवणे मुक्ती आणि वैकुंठ दायक ॥ २० ॥
सप्ताही ऐकता आहे संसारी मुक्तिदायक ।
दयावंत अशा संते नारदांना प्रबोधिले ॥ २१ ॥
ब्रह्माजींच्या मुखे ब्रह्मर्षिनी ऐकिलिही कथा ।
सप्ताह श्रवणाचा तो संतांनी विधि बोधिला ॥ २२ ॥
शौनकजींनी विचारले -
हिंडतो नित्य हा योगी मुक्त संसारि नारद ।
कथा विधि विधानाची गोडी त्या लाभली कशी ॥ २३ ॥
सूतजी म्हणाले-
आता मी सांगतो तुम्हा भक्तिपूर्ण अशी कथा ।
श्रीशुके शिष्य जाणोनी एकांती कथिली मला ॥ २४ ॥
विशाला नगरी मध्ये सत्संगी ऋषि पातले ।
नारदा पाहता संते तयांनी पुसले असे ॥ २५ ॥
कुमारांनी विचारिले -
सांगा ब्रह्मन्‌ असे तुम्ही म्लानमुख कशामुळे ।
चिंतातुर असे तुम्ही लगेच निघता कुठे ॥ २६ ॥
दिसता दीन जै तुम्ही चोरांनी लुटिल्या परी ।
विरक्त संत तो तुम्ही सांगावे काय जाहले ॥ २७ ॥
नारदजी म्हणाले-
जाणोनी उत्तमा पृथ्वी आलो सुंदर लोकि या ।
प्रयाग पुष्करो येथे काशी गोदावरी तटी ॥ २८ ॥
हरिद्वार कुरुक्षेत्री श्रीरंगी सेतु बंधनी ।
न शांति मुळिही कोठे कलीने धर्म त्रासिला ॥ २९ ॥
न संतोष कुठेही तो अधर्म माजला तसा ।
अधर्मे पीडिले लोका अनर्थ सर्व जाहला ॥ ३० ॥
तप शौच तसे सत्य दया दान विलोपले ।
बिचारे जीव ते सर्व खोटे पोटार्थ बोलती ॥ ३१ ॥
आळशी मंद बुद्धी नी भाग्यहीन उपद्रवी ।
साधू दांभिक ते झाले विरक्त दिसती वरी ॥ ३२ ॥
घरात पगडा स्त्रीचा मेहुणे हित सांगती ।
लोभाने विकिती कन्या स्त्रिया-पुरुष भांडती ॥ ३३ ॥
आश्रमी तीर्थ क्षेत्रात यवने धाक ठेविला ।
कितेक मंदिरे त्यांनी फोडिली तोडिली पहा ॥ ३४ ॥
सिद्धज्ञानी नसे कोणी सत्कर्मी योगि ना कुणी ।
कली दावानलीं सर्व साधने भस्म जाहली ॥ ३५ ॥
अन्नही विकिती हाटीं धनार्थ वेद सांगती ।
नटती थटती जाया वेश्यावृत्ति बळावली ॥ ३६ ॥
कलीचा पाहता दोष यमुनातटि पातलो ।
इथे प्रत्यक्ष कृष्णाने लीला केल्या बहूत की ॥ ३७ ॥
मुनींनो ऐकणे तुम्ही आश्चर्य दिसले तिथे ।
युवती स्त्री कुणी एक बैसली खिन्न मानसी ॥ ३८ ॥
दोन वृद्ध तिचेपाशी श्वासे विकल जाहले ।
सचेत करण्या त्यांना लागली ती रडावया ॥ ३९ ॥
रक्षणार्थचि ती ईशा सर्वत्र धुंडु लागली ।
शेकडो तिजसी स्त्रीया पंखे ढाळोनि बोधिती ॥ ४० ॥
दुरोनी पाहिले सारे आश्चर्य वाटले मला ।
मला पाहोनिया आली शोक व्याकूळ बोलली ॥ ४१ ॥
युवती म्हणाली -
क्षण थांबा इथे साधो माझी चिंता हरा तुम्ही ।
तुमच्या दर्शने सारी पातके नष्ट होत की ॥ ४२ ॥
बोधाने तुमच्या मी तो दुःखात शांत होतसे ।
भाग्याच्या उदये होती संतांची दर्शने अशी ॥ ४३ ॥
नारदजी म्हणाले -
तिला मी पुसले कोण, तू नी दोघे पुरुष हे ।
कोण या देवता ऐशा तू अशी दुःखिता कशी ॥ ४४ ॥
युवती म्हणाली -
भक्ति नाम असे माझे ज्ञान वैराग्य ही मुले ।
कलीच्या गतिने त्यांची जाहली स्थिति ही अशी ॥ ४५ ॥
ह्या नद्या देवता गंगा माझ्या सेवेत पातल्या ।
प्रत्यक्ष देवता आल्या तरीही शांति ना मिळे ॥ ४६ ॥
हे तपी ध्यान देवोनी ऐकावी मम ही कथा ।
सर्वांना ज्ञात ती आहे ऐकोनी शांति द्या मला ॥ ४७ ॥
जन्मले द्रविडी मी नी वाढले कन्नडात की ।
कौतुकिले महाराष्ट्रे गुर्जरी वृद्ध जाहले ॥ ४८ ॥
पाखंडे कलिच्या काले येथेचि मज ताडिले ।
मुले नी मीहि त्या देशी अशक्त वृद्ध जाहलो ॥ ४९ ॥
वृंदावनात आल्याने लाभले रुप यौवन ।
जाहले सुंदरा देही पुन्हा सोज्वळ ही अशी ॥ ५० ॥
समोर पडले माझे पुत्र दुःखी अशक्त की ।
येथून वाटते जावे दूर कोठे निघोनिया ॥ ५१ ॥
हे दोघे वृद्ध पाहोनी वाटते दुःख दारुण ।
का बरे तरुणी मी अन्‌ पुत्र का वृद्ध जाहले ॥ ५२ ॥
सवेचि राहतो आम्ही तरी हे विपरीत कां ।
असावी वृद्ध ती माता तारुण्यी पुत्र हे हवे ॥ ५३ ॥
आश्चर्य वाटते आणि दुःख आणिक वाढते ।
सांगा योगी असे कां हो याचे कारण काय ते ॥ ५४ ॥
नारदजी म्हणाले -
न करी खेद तू बाले पाहतो ज्ञान दृष्टिने ।
रक्षील तुज तो देव क्षेम होवो तुझे तसे ॥ ५५ ॥
सूतजी म्हणाले -
क्षणात जाणूनी सारे मुनी हे वाक्य बोलले ॥ ५६ ॥
नारदजी म्हणाले -
देवी सावध हो ऐक आहे हे कलियूग की ।
येणे सर्व सदाचार तपोबल हरीयले ॥ ५७ ॥
अधाशी हो‌उनी लोक खोटे दुष्कर्म वर्तती ।
संतांना दुःख देवोनी सुखात दुष्ट नांदती ॥
अशा या समया मध्ये बुद्धिवंत पुरुष जे ।
धैर्याने राहती सत्य तेचि पंडित ज्ञानि की ॥ ५८ ॥
शेषभार धरा झाली आणि ती जड भासते ।
अस्पृश्य कुरुपा झाली अमंगळ अशीच ती ॥ ५९ ॥
मुलांसवे तुला कोणी नाही पाहत या जगी ।
विषयी रमले सारे तेणे वृद्ध तुम्ही असा ॥ ६० ॥
वृंदावनात आल्याने झालीस अशि सुंदरा ।
येथे तुझ्यात डुंबोनी गाती नाचति भक्त हे ॥ ६१ ॥
परी या तव पुत्रांना कोणी ग्राहक ना असे ।
म्हणोनी राहिले वृद्ध आत्मसुखि विसावले ॥ ६२ ॥
भक्ति म्हणाली -
सांगा परीक्षिते राये थारा कलिस का दिला ।
याच्या आगमने सारे सार निस्सत्व जाहले ॥ ६३ ॥
दयार्द्र हरि तो ऐसा अधर्म पाहतो कसा ।
मुनी शंका निवारावी वचने शांति लाभली ॥ ६४ ॥
नारदजी म्हणाले -
बाले तू ऐक प्रेमाने तुला उत्तर सांगतो ।
सर्व सांगेन जेणे तू जाशील सुखि हो‌उनी ॥ ६५ ॥
भूलोक सोडुनी जेव्हा स्वधामी कृष्ण पातले ।
त्या दिनी दोषकर्ता हा कली दारुण पातला ॥ ६६ ॥
दिग्विजय करोनीया राजा येताच त्या क्षणी ।
दीन रुपे कली आला शरणागत हो‌उनी ॥ ६७ ॥
न लाभे जे तपे योगे समाधीत न जे मिळे ।
कीर्तनी सर्व ते लाभे ऐसे तंत्र कलीत या ॥ ६८ ॥
सारहीन कली ऐसा सारयुक्तहि तो असे ।
सार पाहुनिया त्याला थारा राये दिला असे ॥ ६९ ॥
कुकर्मे वागती लोक गेले सत्त्व निघोनिया ।
निरर्थक भुसा जैसा झाल्या वस्तु निरर्थक ॥ ७० ॥
लोभाने धन धान्याच्या विप्र भागवती कथा ।
सांगती गेहि गेही तै निस्सार जाहली कथा ॥ ७१ ॥
अनंत घोर पापीही नरकी नास्तिकी नर ।
राहिले तीर्थि जावोनी प्रभाव संपला तिथे ॥ ७२ ॥
मनात काम-क्रोधादी लोभ माया खळाळली ।
ऐसे लोक तपी ढोंगी तेणे ते तप निष्फळ ॥ ७३ ॥
इंद्रियीं नसुनी ताबा दंभी पाखंडि होऊनी ।
अनभ्यासी मिटी डोळे तेणे ध्यान निरर्थक ॥ ७४ ॥
म्हशीच्या परि तो संग विद्वान्‌ पत्‍नीशि भोगती ।
प्रजोत्पादनि ते ज्ञानी मुक्तिचे ज्ञान ना तया ॥ ७५ ॥
वैष्णवता न ती कोठे संप्रदाय हि संपला ।
तेणेचि सर्व वस्तूंचे सार ते संपले जगी ॥ ७६ ॥
हा तो स्वभाव काळाचा नच दोषी कुणी तसा ।
पुंडरीकाक्ष तो नित्य साहितो हृदयी पहा ॥ ७७ ॥
सूतजी सांगतात -
ऐसे हे बोल ऐकोनी भक्ति विस्मित जाहली ।
मग काय पुढे बोले भक्ति शौनक ऐकणे ॥ ७८ ॥
भक्ति म्हणाली -
महर्षि धन्य हो तुम्ही माझ्या भाग्यात भेट ही ।
साधूची भेट या लोकी श्रेष्ठ कल्याणकारक ॥ ७९ ॥
(मालिनी)
क्षणभर तव भेटीं भक्त प्रल्हाद बाळ
    कयधुकुमर तेणे मोह माया गिळीली ।
ध्रुवपद ध्रुवबाळा लाभले एक भेटी
    सकल कुशलपात्री ब्रह्मपुत्रा नमी मी ॥ ८० ॥

॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ माहात्म्य १ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP