धुंधुकारीला प्रेतयोनी मिळते व त्यातून उद्धार -
सूतजी म्हणाले -
(अनुष्टुप्)
पिता वनात तो जाता मातेला धुंधुकारी तै ।
पुसे धन कुठे सांग अन्यथा जाळितो तुला ॥ १ ॥
त्याच्या या धमकीने ती त्वरे बाहेर धावली ।
घाबरी पडली कूपीं जाहली गतप्राण की ॥ २ ॥
तो योगनिष्ठ गोकर्ण गेला तीर्थाटना तसा ।
न दुःख सुख त्या भासे शत्रू मित्र न मानि तो ॥ ३ ॥
धुंधुकारी घरी आता पाच वेश्या सवे रमे ।
लालनार्थ तयांच्याच कुकर्म करु लागला ॥ ४ ॥
मागता दागिने खूप कामांध धुंधुकारी तो ।
न भिता मृत्युला गेला मोठी चोरी करावया ॥ ५ ॥
अनेक घातले डाके लुटिले द्रव्य खूप ते ।
खर्चुनी आणिले कांही वस्त्रालंकार भूषणे ॥ ६ ॥
अफाट धन पाहोनी वेश्यांनी मनि चिंतिले ।
त्याच्या नित्य अशा कृत्ये राजा दंडिल त्याजला ॥ ७ ॥
नेईल धन हे राजा मारील आपणा तसा ।
म्हणोनी मारुया याला कट गुप्त करोनिया ॥ ८ ॥
मारिता यास हे द्रव्य घेवोनी पळ काढुया ।
योजुनी युक्ति ही सारी बांधिले धुंधुकारीला ॥ ९ ॥
गळ्याशी लाविला फास परी मृत्यु घडेचिना ।
मरेना म्हणुनी त्यांना चिंताच वाटली मनी ॥ १० ॥
तेव्हा त्या क्रूर वेश्यांनी जळता विस्तु टाकिला ।
जळाले तोंड ते त्याचे मेला तडफडोनि की ॥ ११ ॥
बांधिले गाठडे त्याचे पुरले जमिनीत ते ।
अशा रांडा पहा होती मोठया दुःसाहसी किती ॥ १२ ॥
म्हणती पुसती लोका गेले प्रीय धनार्थ ते ।
येतील एक वर्षाने गेले दूर कुठे तरी ॥ १३ ॥
चतुरे दुष्ट स्त्रीयांशी विश्वासे आचरु नये ।
विश्वासे मूर्ख जो त्यांसी दुःख कष्टचि लाभते ॥ १४ ॥
मधुरा अमृतावाणी कामींच्या हृदयी घुसे ।
नच जार स्त्रियांना तो कोणी प्रीय असे मनी ॥ १५ ॥
मिळून कुटला सार्या तिथोनी पळल्या पुढे ।
कोण जाणे असे त्यांना कितीक पति लाभले ॥ १६ ॥
धुंधुकारी स्वकर्माने पापयोनीत पातला ।
वायुरूपे फिरे नित्य शीत घामेहि तापला ।
भुकें व्याकुळ होवोनी, रे दैवा ! ओरडे फिरे ॥ १७ ॥
परंतु त्याजला कोठे मिळाला नच आश्रय ।
गोकर्णास जने सारी वार्ता ही कथिली असे ॥ १८ ॥
अनाथ धुंधुकारी हा गोकर्णे समजोनिया ।
गयेसी तीर्थ तीर्थांसी श्राद्ध त्याचे स्वये करी ॥ १९ ॥
गोकर्ण फिरता ऐसा स्वग्रामी पातला पुन्हा ।
लोकांची दृष्टि टाळोनी स्वगृही रात्रि झोपला ॥ २० ॥
घरात झोपला बंधू बघून धुंधुकारी ने ।
घेतले विकटो रुप बंधूशी भेडवीतसे ॥ २१ ॥
हत्ती मेंढा कधी रेडा इंद्र अग्निरुपात ही ।
शेवटी माणुसी रुप धारिले धुंधुकारीने ॥ २२ ॥
विपरीत रुपे कोणी गोकर्णे मनि जाणिले ।
दुर्गती लाभली कोणा धैर्याने पुसले तया ॥ २३ ॥
गोकर्णजी म्हणाले -
कोण तू रात्रिच्या वेळी भयाण रुप दाविशी ।
कोण तू भूत का प्रेत कशाने दुर्दशा अशी ॥ २४ ॥
सूतजी सांगतात -
गोकर्णे पुसता त्याला रडला स्फुंदस्फुंदुनी ।
नव्हती अंगि ती शक्ती खुणेने बोलु लागला ॥ २५ ॥
गोकर्णे प्रोक्षिता पाणी करोनी अभिमंत्रित ।
शमता पाप ते थोडे पुढे तो बोलला असे ॥ २६ ॥
प्रेत म्हणाले -
धुंधुकारी तुझा बंधू असे मी ओळखी मला ।
माझ्याचि पाप दोषाने नासिले ब्राह्मणत्व मी ॥ २७ ॥
अपार पाप ते माझे मोजणे शक्य ही नसे ।
घडली लोकहत्या नी वेश्यांनी मज मारिले ॥ २८ ॥
प्रेतयोनी मिळाली ही भोगतो बहु कष्ट की ।
दैव कर्म फळाने मी वायू पीवोनि राहतो ॥ २९ ॥
अहो बंधु कृपासिंधु सोडवी मज यातुनी ।
गोकर्णे धुंधुकारीचे ऐकोनी मग बोलला ॥ ३० ॥
गोकर्णजी म्हणाले -
तुझे पींड गया तिर्थी दान केले विधी जसा ।
आश्चर्य वाटते चित्ती परी तू मुक्त का न हो ॥ ३१ ॥
न लाभे पिंडदानाने मुक्ति ती मग काय ते ।
करु मी कोणते कर्म जेणे मुक्ति तुला मिळे ॥ ३२ ॥
प्रेत म्हणाले-
गया श्राद्ध जरी केले शेकडो मजसाठि ते ।
तरी मुक्ति मला नाही दुजे कांही करी पहा ॥ ३३ ॥
प्रेत म्हणाले -
ऐकोनी प्रेतवाणी ती गोकर्ण विस्मये मनी ।
म्हणाला याहुनी कोठे मुक्त्यर्थ तंत्र ते नसे ॥ ३४ ॥
तरी मी पाहतो श्रेष्ठ मुक्त्यर्थ साधनास त्या ।
राही स्थीर स्थळी आता नको हिंडू पुढे कुठे ॥ ३५ ॥
गोकर्णशब्द ऐकोनी बसला एकस्थानि तो ।
गोकर्ण जागुनी रात्री केला व्यर्थ विचार की ॥ ३६ ॥
सकाळी कळता लोका प्रेम भेटीस पातले ।
प्रसंग रात्रिचा त्याने सर्व लोकां कथीयला ॥ ३७ ॥
विद्वान ज्ञानयोग्यांनी पाहिले शास्त्र चाळुनी ।
परी ना मिळली कांही साधना मुक्ति लाभण्या ॥ ३८ ॥
निश्चये वदले सर्व सूर्याचे ऐकुया पहा ।
गोकर्णे तपयोगाने सूर्यदेवासि रोधिले ॥ ३९ ॥
सर्वानी सूर्यदेवाला प्रार्थुनी नमिले असे ।
वदले धुंधुकारीच्या मुक्तिचा मार्ग कोणता ॥ ४० ॥
गोकर्णशब्द ऐकोनी वदला सूर्य भास्कर ।
श्रीमद्भागवते मुक्ति सप्ताह मांडुनी पहा ॥ ४१ ॥
गोकर्णे ऐकले सारे सर्वांनी तेच मानिले ।
गोकर्णे ऐकण्या वार्ता सप्ताहास नियोजिले ॥ ४२ ॥
अनेक गावचे तेव्हा कितेक लोक पातले ।
आंधळे पांगळे वृद्ध पापी मुक्त्यर्थ पातले ॥ ४३ ॥
गर्दी ही पाहुनी देवा नभी आश्चर्य वाटले ।
व्यासपीठास गोकर्ण बसोनी सांगु लागले ॥ ४४ ॥
प्रेतही पातले तेथे जागा कोठे दिसे न त्या ।
दिसता सात गाठीचा वेळू सहज जो तिथे ॥ ४५ ॥
त्यात छिद्रातूनी गेला घुसून ऐकण्या कथा ।
कर्तुमाशक्तिने वायुरूपे वेळूत बैसला ॥ ४६ ॥
मुख्य श्रोता द्विज एक म्हणोनी कल्पिला असे ।
पहिल्या पासुनी वार्ता स्पष्ट आरंभिली असे ॥ ४७ ॥
सायंकाळी कथा होता घडली घटना अशी ।
तड्तडा वाजुनी एका गाठीशी वेळु भंगला ॥ ४८ ॥
दुसर्या दिनिही तैसी दुसरी गाठ भंगली ।
तिसर्या दिनिही तैसी तिसरी भंगली असे ॥ ४९ ॥
असेचि घडले साती दिनी गाठी फुटोनिया ।
ऐकता स्कंध बाराही जाहले मुक्त प्रेत ते ॥ ५० ॥
धुंधुकारी शरीराने घनश्यामची शोभला ।
कुंडले पिवळे वस्त्र मुकुट तुळसीदळे ॥ ५१ ॥
गोकर्णा वंदिले घाई आणीक मग बोलला ।
बंधो ! तुझ्या कृपेने मी प्रेत मुक्तचि जाहलो ॥ ५२ ॥
धन्य भागवती वार्ता प्रेतपीडा निवारिते ।
हिच्या सप्ताह कार्याने कृष्णाचे धाम लाभते ॥ ५३ ॥
थर्थरा कापती पापे सप्ताह श्रवणी हिच्या ।
कथा भासे तयांनाही मोठीच प्रलयंकर ॥ ५४ ॥
अर्ध ओली हि ती काष्ठे आगीत भस्म होति जै ।
तशीच जळती पापे अग्नीत समिधा जशा ॥ ५५ ॥
राहोनी भारता मध्ये श्रीमद्भागवती कथा ।
जेणे ही ऐकिली नाही व्यर्थ तो सूर बोलती ॥ ५६ ॥
लाडिला पाळिला देह धष्ट पुष्ट हि जाहला ।
शुकशास्त्र कथा त्याने नैकता लाभ काय तो ॥ ५७ ॥
अस्थिस्तंभ शरीराच्या नाडी दोरेची बांधिला ।
लेपिले वरि ते मास कातडे मढिले असे ॥ ५८ ॥
जरा शोक परीणामे रोगांचे घर दुःख जे ।
तनू सांभाळिता त्रास क्षणात नासकी अशी ॥ ५९ ॥
पुरता सडते काया जाळता राख होतसे ।
असा नश्वर हा देह सुकर्म कां न साधिती ॥ ६० ॥
सकाळी शिजता अन्न संध्याकाळीच नासते ।
पोसतो असल्या अन्ने देह नश्वरची असे ॥ ६१ ॥
श्रवणे पाठ सप्ताही लाभतो भगवान् त्वरे ।
म्हणोनी सर्व दोषांची कथा निवृत्ति ही असे ॥ ६२ ॥
बुडबुडे आणि डासांचे क्षणात मरणे जसे ।
तसेचि मरती लोक कथाश्रवणवर्जित ॥ ६३ ॥
जड शुष्कहि वेळूच्या जियेने ग्रंथि भंगल्या ।
चित्ताच्या फुटती गाठी आश्चर्य यात काय ते ॥ ६४ ॥
सप्ताह ऐकता सार्या शंका जाती सुटोनिया ।
कृतकर्म विनाशोनी संपती ऐकता कथा ॥ ६५ ॥
भागवत्सार हे तीर्थ धुते संसारकर्दम ।
विद्वान वदती नित्य हृदयी स्थिरता गती ॥ ६६ ॥
धुंधुकारीस तेव्हा ते वैकुंठयान पातले ।
मंडलाकार तेजाने देवदूत प्रकाशले ॥ ६७ ॥
विमानी धुंधुलीसूत सर्वानी पाहिला तदा ।
विष्णूदूतास पाहोनी गोकर्ण वाक्य बोलला ॥ ६८ ॥
गोकर्णजी म्हणाले -
इथे सर्वचि श्रोत्यांनी श्रद्धेने ऐकिली कथा ।
विमाने सर्व लोकांना देवानी का न आणिली ॥ ६९ ॥
सर्वांनी समश्रद्धेने ऐकिली ही कथा बरी ।
समान फळ ना त्यांना ऐसे का मज सांगणे ॥ ७० ॥
हरिदास म्हणाले -
बाह्यरुपी कथा यांनी ऐकिली मनि ना तशी ।
भजनी भेद तो होता त्यांना मुक्ति कशी मिळे ॥ ७१ ॥
उपासी राहुनी नित्य प्रेताने ऐकिली कथा ।
मननादि जसे चित्त असावे ठेविले तसे ॥ ७२ ॥
न दृढ ज्ञान ते व्यर्थ संशये मंत्रही तसे ।
अस्थीर ठेविता चित्त जपाचे फळ काय ते ॥ ७३ ॥
अवैष्णव हरे देश अपात्री श्राद्ध नासते ।
अश्रोती दान नी कूळ आचाराविण नासते ॥ ७४ ॥
विश्वास गुरुवाक्याते मनात दीन भावना ।
मनासी ठेविणे ताबा अशाने फळ लाभते ॥ ७५ ॥
जर हे निश्चये ऐशा घेतील ऐकुनी पुन्हा ।
लाभेल याहि सर्वांना वैकुंठधाम राहण्या ॥ ७६ ॥
ऐका गोकर्णजी तुम्हा स्वये श्री विष्णु येतसे
गोलोकी न्यावया ऐसे भाग्य थोर तुम्हा असे ।
बोलोनी वाक्य हे सारे विष्णुचे दूत ते तदा ।
गात गेले हरीगीत वैकुंठधाम गाठण्या ॥ ७७ ॥
पुन्हा श्रावण मासात गोकर्णे योजिली कथा ।
श्रोते तेचि पुन्हा आले श्रीमद्भागवतास जे ॥ ७८ ॥
कथा ती संपली तेव्हा ऐका हो नारदा पुढे ॥ ७९ ॥
विमानी भक्त घेवोनी श्रीहरी तेथ पातले ।
जय्जय्कार दिशी झाला अपार ध्वनी नादला ॥ ८० ॥
आनंदे भगवंताने फुंकिला पांचजन्यही ।
कवटाळुनि गोकर्णा स्वरूप दिधले तया ॥ ८१ ॥
क्षणात सर्व श्रोत्यांना श्यामवर्ण हि लाभला ।
पीत अंबर धारी ते किरीट कुंडले तशी ॥ ८२ ॥
तेथील श्वान नी पापी सर्वच्या सर्व जीव ते ।
गोकर्णाची कृपा होता विमानी बैसले पहा ॥ ८३ ॥
जिथे योगी सदामुक्त तिथे सर्वास धाडिले ।
प्रसन्न होऊनी कृष्णे गोकर्णा घेतले सवे ।
प्रीय गोलोक तो त्याचा मुक्त तेथेचि ठेविले ॥ ८४ ॥
अयोध्यावासिया रामे साकेतधाम ते दिले ।
योगी दुर्लभ गोधाम कृष्णे सर्वास ते दिले ॥ ८५ ॥
ज्या लोका चंद्र सूर्याला सिद्धांना नच दर्शन ।
श्रोते भागवताचे जे त्यांना ते सहजी मिळे ॥ ८६ ॥
(इंद्रवज्रा)
सप्ताहयज्ञी कथनामृताचे
ते काय वाणू फळ केवढे ते ।
कथारस प्राशिति कर्णि शब्द
त्यांना पुन्हा ना कधि गर्भवास ॥ ८७ ॥
वायू जलो शुष्कहि पर्ण खाता
त्रासोनि देहा कुणि योग घेती ।
जो लाभ त्यांना न मिळे कदापि
तो लाभ होतो कथनामृताने ॥ ८८ ॥
(अनुष्टुप्)
इतिहास पवित्रो हा चित्रकूटी विराजमान् ।
शांडिल्य ब्रह्ममोदात डुंबोनी वाचिती पहा ॥ ८९ ॥
(इंद्रवज्रा)
आख्यान हे तो अति पावनो नी
हे ऐकता भस्मचि होति पापे ।
श्राद्धात होता पठणो ययाचे
पित्रांसि तृप्ती अन मोक्ष लाभे ॥ ९० ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ॥ तिसरा पाचवा अध्याय हा ॥ माहात्म्य ५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP