|
श्रीमद् भागवत पुराण श्रीमद् भागवतोक्त विषयाणानां संक्षेपतो विवरणम् - श्रीमद्भागवताची संक्षिप्त विषय-सूची - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच -
(अनुष्टुप्) नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेधसे । ब्रह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्ष्ये सनातनान् ॥ १ ॥
सूत सांगतात - ( अनुष्टुप् ) तमो या भागवत्धर्मा विधाता कृष्ण तो नमो । द्विजांसी नमुनी आता वदे धर्म सनातन ॥ १ ॥
सूत म्हणतात - भगवद्भक्तिरूप महान धर्माला नमस्कार असो. विश्वविधात्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार असो. आता मी ब्राम्हणांना नमस्कार करून श्रीमद्भगवतोक्त सनातन धर्म सांगतो. (१)
एतद् वः कथितं विप्रा विष्णोश्चरितमद्भुतम् ।
भवद्भिः यदहं पृष्टो नराणां पुरुषोचितम् ॥ २ ॥
पुसले तुम्हि जे प्रश्न चरित्र विष्णुचे तसे । अद्भूत श्रवणीयो तो कथिले सर्व ते असे ॥ २ ॥
हे ऋषींनो ! आपण मला जो प्रश्न विचारला होता, त्यानुसार मी भगवान विष्णूंचे हे अद्भुत चरित्र सांगितले. हे सर्व माणसांनी ऐकण्यायोग्य आहे. (२)
अत्र सङ्कीर्तितः साक्षात् सर्वपापहरो हरिः ।
नारायणो हृषीकेशो भगवान् सात्वतां पतिः ॥ ३ ॥
श्रीमद्भागवता मध्ये पवित्र हरिकीर्तन । हृदयीं नांदतो तोचि नाशितो पाप सर्वचि ॥ ३ ॥
यामध्ये सर्व पापे नाहीसे करणार्या श्रीहरींचेच संकीर्तन झालेले आहे. तेच श्रीहरी सर्वांच्या ह्रदयात विराजमान, सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवनसर्वस्व आहेत. (३)
अत्र ब्रह्म परं गुह्यं जगतः प्रभवाप्ययम् ।
ज्ञानं च तदुपाख्यानं प्रोक्तं विज्ञानसंयुतम् ॥ ४ ॥
ब्रह्मतत्त्व असे गुह्य ब्रह्माचे हेतु सर्व ते । ज्ञान जे अपरा ऐसे स्पष्ट साधन यात की ॥ ४ ॥
या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचे वर्णन आलेले आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणीच या जगाची उत्पत्ति, स्थिती आणि प्रलय यांची प्रचीती येते. या पुराणात त्याच परमतत्त्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधने, यांविषयी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. (४)
भक्तियोगः समाख्यातो वैराग्यं च तदाश्रयम् ।
पारीक्षितं उपाख्यानं नारदाख्यानमेव च ॥ ५ ॥
प्रथमस्कंधि तो सर्व वर्णिला भक्तियोग नी । वैराग्य वर्णिले तैसे संवाद व्यास नारदी ॥ ५ ॥
पहिल्या स्कंधात, भक्तियोग व त्यामुळे उत्पन्न होणार्या वैराग्याचे वर्णन आले आहे. तसेच परीक्षिताची कथा आणि नारद-चरित्र आले आहे. (५)
प्रायोपवेशो राजर्षेः विप्रशापात् परीक्षितः ।
शुकस्य ब्रह्मर्षभस्य संवादश्च परीक्षितः ॥ ६ ॥
द्विजाचा मिळता शाप अनशन व्रते नृप । परीक्षित् बैसला तेंव्हा शुक संवाद चालला ॥ ६ ॥
ब्राम्हणाचा शाप झाल्यानंतर राजर्षी परीक्षिताचे प्रायोपवेशन आणि ब्रह्मर्षी श्रीशुकांचा व त्याचा संवाद, ही कथा आहे. (६)
योगधारणयोत्क्रान्तिः संवादो नारदाजयोः ।
अवतारानुगीतं च सर्गः प्राधानिकोऽग्रतः ॥ ७ ॥
द्वितीयस्कंधि ते कैसे योगाने देह त्यागिणे । ब्रह्म नारद संवाद सृष्टि उत्पत्ति आदि ते ॥ ७ ॥
योगधारणेने आर्चिरादी गती, ब्रह्मदेव-नारद-संवाद, अवतारांचे वर्णन तसेच सुरूवातीपासूनच प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती इत्यादी विषयांचे वर्णन दुसर्या स्कंधामध्ये आहे. (७)
विदुरोद्धवसंवादः क्षत्तृमैत्रेययोस्ततः ।
पुराणसंहिताप्रश्नो महापुरुषसंस्थितिः ॥ ८ ॥
विदुरोद्धव मैत्रेय तिसर्या स्कंधि भेटती । पुराण संहिता प्रश्न महापुरुषसंस्थिती ॥ ८ ॥
तिसर्या स्कंधामध्ये विदुर आणि उद्धव यांचा संवाद, विदुर आणि मैत्रेय यांची भेट व संवाद, पुराणसंहितेविषयीचा प्रश्न आणि प्रलयकाळातील परमपुरूषाची स्थिती यांचे निरूपण केले आहे. (८)
ततः प्राकृतिकः सर्गः सप्त वैकृतिकाश्च ये ।
ततो ब्रह्माण्डसम्भूतिः वैराजः पुरुषो यतः ॥ ९ ॥
प्रकृती विकृती क्षोभ सृष्टिचे सात सर्ग ते । उत्पत्ति ब्रह्मअंडाची विराट रूप वर्णिले ॥ ९ ॥
नंतर गुणांच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी, महतत्त्व इत्यादी सात प्रकृति-विकृती व यांच्या पासून उत्पन्न झालेली कार्य-सृष्टी, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्या विराट पुरूषाची स्थिती यांचे वर्णन आहे. (९)
कालस्य स्थूलसूक्ष्मस्य गतिः पद्मसमुद्भवः ।
भुव उद्धरणेऽम्भोधेः हिरण्याक्षवधो यथा ॥ १० ॥ ऊर्ध्वतिर्यगवाक्सर्गो रुद्रसर्गस्तथैव च । अर्धनारीश्वरस्याथ यतः स्वायंभुवो मनुः ॥ ११ ॥ शतरूपा च या स्त्रीणां आद्या प्रकृतिरुत्तमा । सन्तानो धर्मपत्नीनां कर्दमस्य प्रजापतेः ॥ १२ ॥ अवतारो भगवतः कपिलस्य महात्मनः । देवहूत्याश्च संवादः कपिलेन च धीमता ॥ १३ ॥
स्थूल सूक्ष्मादि तो काळ उत्पत्ती लोकपद्मची । वराह रक्षितो पृथ्वी हिरण्याक्षवधो तदा ॥ १० ॥ देवता पशु पक्षी नी मनुष्य सृष्टि रुद्र ते । उत्पत्तीचे प्रसंगो नी नर नारीश्वरो रुप ॥ ११ ॥ स्वायंभूव मनू तैसे जन्म तो शतरूपिचा । कर्दमा जन्म नी तैसे मुनिपत्न्यास जन्म तो ॥ १२ ॥ भगवद् अवतारो तो महात्मा कपिलो मुनी । माता देवहुनीसी तो संवाद मुनिच्या पुढे ॥ १३ ॥
त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म काळाचे स्वरूप, लोक-पद्माची उत्पत्ती, समुद्रातून पृथ्वी वर आणताना केलेला हिरण्याक्षाचा वध, देवता, पशु-पक्षी आणि मनुष्यांची सृष्टी, रुद्रांची उत्पत्ती, ज्यापासून स्वायंभुव मनू आणि स्त्रियांमध्ये उत्तम अशी आद्य कारणरूप स्त्री शतरूपा यांचा जन्म झाला होता, त्या अर्धनारी- नराच्या स्वरुपाचे विवेचन, कर्दम प्रजापतीचे चरित्र, त्यांच्यापासून मुनिपत्न्यांना जन्म, महात्मा भगवान कपिलांचा अवतार आणि ज्ञानी कपिलदेव व देवहूती यांच्यातील संवाद हे प्रसंग आहेत. (१०-१३)
नवब्रह्मसमुत्पत्तिः दक्षयज्ञविनाशनम् ।
ध्रुवस्य चरितं पश्चात् पृथोः प्राचीनबर्हिषः ॥ १४ ॥ नारदस्य च संवादः ततः प्रैयव्रतं द्विजाः । नाभेस्ततोऽनुचरितं ऋषभस्य भरतस्य च ॥ १५ ॥ द्वीपवर्षसमुद्राणां गिरिनद्युपवर्णनम् । ज्योतिश्चक्रस्य संस्थानं पातालनरकस्थितिः ॥ १६ ॥
चौथ्या स्कंधात तो जन्म मरीच्यादी नवास नी । दक्षयज्ञ विनाशो नी ध्रुव नी बर्हि वर्णिले ॥ १४ ॥ प्रियव्रत उपाख्यान पाचव्या स्कंधि वर्णिले । नाभी ऋषभ भरत ययांचे चरितो तसे ॥ १५ ॥ द्वीप वर्ष समुद्राचे नद्यांची वर्णने पुढे । ज्योतिचक्र नि पाताळ नरकस्थिति वर्णिली ॥ १६ ॥
ऋषींनो ! चौथ्या स्कंधामध्ये मरीची इत्यादी नऊ प्रजापतींची उत्पत्ती, दक्षयज्ञानाचा विध्वंस, ध्रुव आणि पृथूचे चरित्र, प्राचीनबर्ही व नारद यांच्यामधील संवाद ही वर्णने आहेत. पाचव्या स्कंधामध्ये प्रियव्रताचे उपाख्यान, नाभी, ऋषभ आणि भरताचे चरित्र, द्विप, वर्ष, समुद्र, पर्वत आणि नद्यांचे वर्णन, ज्योतिश्चक्राचा विस्तार, त्याचबरोबर पाताळ व नरक यांच्या स्थितीचे निरूपण आले आहे. (१४-१६)
दक्षजन्म प्रचेतोभ्यः तत्पुत्रीणां च सन्ततिः ।
यतो देवासुरनराः तिर्यङ्नगखगादयः ॥ १७ ॥ त्वाष्ट्रस्य जन्मनिधनं पुत्रयोश्च दितेर्द्विजाः । दैत्येश्वरस्य चरितं प्रह्रादस्य महात्मनः ॥ १८ ॥
सहाव्या स्कंधि त्या दक्षा जन्म नी वंश तो पुढे । चराचरास तो जन्म वृत्रासुर गती तशी ॥ १७ ॥ सातव्या स्कंधि दैत्येंद्र हिरण्यकशिपू यया । महात्मा बाल प्रल्हाद चरित्र वर्णिले असे ॥ १८ ॥
शौनकादी ऋषींनो ! सहाव्या स्कंधामध्ये पुढील विषय आले आहेत. प्रचेतांपासून दक्षाची उत्पत्ती, दक्षकन्यांची संतती व तीपासून देवता, असुर, मनुष्य, पशू, पर्वत, पक्षी इत्यादींचे जन्म आणि वृत्रासुराची उत्पत्ती व त्याला परम गती. सातव्या स्कंधात दितिपुत्र हिरण्यकशपू व हिरण्याक्ष तसेच महात्मा प्रल्हाद यांची चरित्रे आली आहेत. (१७-१८)
मन्वन्तरानुकथनं गजेन्द्रस्य विमोक्षणम् ।
मन्वन्तरावताराश्च विष्णोर्हयशिरादयः ॥ १९ ॥ कौर्मं धान्वतरं मात्स्यं वामनं च जगत्पतेः । क्षीरोदमथनं तद्वद् अमृतार्थे दिवौकसाम् ॥ २० ॥ देवासुरमहायुद्धं राजवंशानुकीर्तनम् । इक्ष्वाकुजन्म तद्वंशः सुद्युम्नस्य महात्मनः ॥ २१ ॥ इलोपाख्यानमत्रोक्तं तारोपाख्यानमेव च । सूर्यवंशानुकथनं शशादाद्या नृगादयः ॥ २२ ॥ सौकन्यं चाथ शर्यातेः ककुत्स्थस्य च धीमतः । खट्वाङ्गस्य च मान्धातुः सौभरेः सगरस्य च ॥ २३ ॥ रामस्य कोशलेन्द्रस्य चरितं किल्बिषापहम् । निमेरङ्गपरित्यागो जनकानां च सम्भवः ॥ २४ ॥
आठव्यात कथा आल्या मनवंतर सर्व नी । गजेंद्रमोक्ष नी तैसे अवतारहि विष्णुचे ॥ १९ ॥ कूर्म वामन नी मत्स्यद् धन्वंतरि हयग्रिव । समुद्र मंथनो तैसे देव दानव संगर ॥ २० ॥ नवव्या स्कंधि ते आले मुख्यत्वे राजवंशची । इक्ष्वाकू जन्म कर्मोनी वंशविस्तार तो तसा ॥ २१ ॥ सुद्युम्न नि इला तारा उपाख्यानहि वर्णिले । वृत्तांत सूर्यवंशाचा शशाद नृप वर्णन ॥ २२ ॥ सुकन्या आणि शर्याती मांधता सौभरी तसे । खट्वांग सगरो तैसे बुद्धिमंत कुकुत्स्थ तो ॥ २३ ॥ पापहर अशी गाथा श्रीराम कोसलेंद्रची । निमिचा देहत्यागो नी उत्पत्ति जनकाचि ती ॥ २४ ॥
आठव्या स्कंधामध्ये मन्वन्तरांची कथा, गजेंद्रमोक्ष, निरनिराळ्या मन्वन्तरांत होणारे जगदीश्वर भगवान विष्णूंचे अवतार कूर्म, मत्स्य, वामन, धन्वन्तरी, हयग्रीव इत्यादी, अमृत मिळविण्यासाठी देव आणि दैत्यांचे समुद्र-मंथन आणि देवासुर संग्राम इत्यादी विषयांचे वर्णन आहे. नवव्या स्कंधामध्ये इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंशविस्तार, महात्मा सुद्युम्न, इला व तारा यांची उपाख्याने, सूर्यवंशाचा वृत्तांत, शशाद, नृग इत्यादी राजांची वर्णने, सुकन्येचे चरित्र, शर्याती, खट्वांग, मांधाता, सौभरी, सगर, बुद्धिमान ककुस्थ आणि कोसलेंद्र श्रीरामांचे सर्वपापहारी चरित्र, निमीचा देहत्याग, जनकांची उत्पत्ती यांचे वर्णन आहे. (१९-२४)
रामस्य भार्गवेन्द्रस्य निःक्षतृईकरणं भुवः ।
ऐलस्य सोमवंशस्य ययातेर्नहुषस्य च ॥ २५ ॥ दौष्मन्तेर्भरतस्यापि शान्तनोस्तत्सुतस्य च । ययातेर्ज्येष्ठपुत्रस्य यदोर्वंशोऽनुकीर्तितः ॥ २६ ॥
पर्शुराम कथा सर्व चंद्रवंशी पुरूरवा । ययाति नहुषो तैसे दुष्यंत भरतो कथा । शंतनू भीष्म आदी नी विस्तार यदुवंशिचा ॥ २५ ॥ दहाव्या स्कंधि ते आले यदुवंशी जगत्पती । श्रीकृष्ण अवतारो नी असुरा मोक्ष देइ तो ॥ २६ ॥
भृगुश्रेष्ठ परशुरामांनी केलेला पृथ्वीवरील क्षत्रियसंहार, चंद्रवंशी पुरूरवा, ययाती, नहुष, दुष्यंतनंदन भरत, शंतनू व त्याचा पुत्र भीष्म, ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याचा वंशविस्तार अशी मुख्यतः राजवंशांची वर्णने यात आहेत. (२५-२६)
यत्रावतीर्णो भगवान् कृष्णाख्यो जगदीश्वरः ।
वसुदेवगृहे जन्म ततो वृद्धिश्च गोकुले ॥ २७ ॥ तस्य कर्माण्यपाराणि कीर्तितान्यसुरद्विषः । पूतनासुपयःपानं शकटोच्चाटनं शिशोः ॥ २८ ॥
लीला अनंत त्या त्याच्या थोडक्या वर्णिल्या तिथे । देवकी वसुदेवाच्या गर्भीं श्रीकृष्ण जन्मले ॥ २७ ॥ गोकुळी नंदबाबाच्या वाढले कृष्ण ते पुढे । पूतना वधिली तैसे गाड पायेचि तोडिला ॥ २८ ॥
शौनकादी ऋषींनो ! याच यदुवंशामध्ये जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता. त्यांनी अनेक असुरांचा संहार केला. त्यांच्या लीला इतक्या आहेत की, त्यांचा कोणालाही अंत लागत नाही. दहाव्या स्कंधामध्ये त्यांचे वर्णन आहे. वसुदेवांच्या घरी जन्म, गोकुळात मोठे होणे, पूतनेचे प्राण दुधासह पिऊन टाकणे, लहानपणीच शकट उलथून टाकणे, (२७-२८)
तृणावर्तस्य निष्पेषः तथैव बकवत्सयोः ।
धेनुकस्य सहभ्रातुः प्रलम्बस्य च संक्षयः ॥ २९ ॥
तृणावर्त बको तैसे असूरवत्स मारिला । प्रलंब धेनुकासूरा गती तैसीच ती दिली ॥ २९ ॥
तृणावर्त, बकासुर आणि वत्सासुर यांचा वध, धेनकासुर आणि प्रलंबासुर यांना त्यांच्या परिवारासह मारणे, (२९)
गोपानां च परित्राणं दावाग्नेः परिसर्पतः ।
दमनं कालियस्याहेः महाहेर्नन्दमोक्षणम् ॥ ३० ॥
अग्नीत रक्षिले गोपां कालियादमनि तसे । अज्गरा पासुनी नंद बाबाना सोडवीयले ॥ ३० ॥
दावाग्नीने घेरलेल्या गोपांचे रक्षण, कालिया नागाची मस्ती जिरवणे, अजगराच्या मिठीतून नंदबाबांना सोडवणे, (३०)
व्रतचर्या तु कन्यानां यत्र तुष्टोऽच्युतो व्रतैः ।
प्रसादो यज्ञपत्नीभ्यो विप्राणां चानुतापनम् ॥ ३१ ॥
गोपिंनी पतिरूपात कृष्ण तो मेळवीयण्या । केलेसे व्रत ते तेंव्हा प्रसन्न कृष्ण जाहले । पावले यज्ञ पत्न्यांना द्विजांसी अनुताप तो ॥ ३१ ॥
गोपकन्यांचे कात्यायनीव्रत, त्यामुळे भगवंतांचे प्रसन्न होणे, यज्ञ-पत्न्यांवर कृपा, ब्राम्हणांना पश्चाताप, (३१)
गोवर्धनोद्धारणं च शक्रस्य सुरभेरथ ।
यज्ञभिषेकं कृष्णस्य स्त्रीभिः क्रीडा च रात्रिषु ॥ ३२ ॥
गोवर्धनासि उद्धार इंद्र नी कामधेनुने । यज्ञाभिषेक तो केला क्रीडा रात्रीस जाहली ॥ ३२ ॥
गोवर्धन धारण केल्यावर इंद्र आणि कामधेनू यांच्याकडून येऊन भगवंतांना यज्ञाभिषेक, शरद ऋतूच्या रात्रींमध्ये गोपींसह रासक्रिडा, (३२)
शङ्खचूडस्य दुर्बुद्धेः वधोऽरिष्टस्य केशिनः ।
अक्रूरागमनं पश्चात् प्रस्थानं रामकृष्णयोः ॥ ३३ ॥
शंखचूड अरिष्टो नी केशीला वधिले असे । अक्रूर पातता कृष्ण मथुरीं पातले पहा ॥ ३३ ॥
दुष्ट शंखचूड, अरिष्ट आणि केशीचा वध, अक्रूराचे आगमन व रामकृष्णांचे मथुरेकडे प्रस्थान, (३३)
व्रजस्त्रीणां विलापश्च मथुरालोकनं ततः ।
गजमुष्टिकचाणूर कंसादीनां तथा वधः ॥ ३४ ॥
विरहो सुंदर्यांचा तो मथुरी राम कृष्ण ते । चाणूर मुष्टिको हत्ती कंस आदीस मारिले ॥ ३४ ॥
श्रीकृष्णविरहाने गोपींचा आक्रोश, मथुरादर्शन, कुवलयापीड हत्ती, मुष्टिक, चाणूर, कंस इत्यादींचा वध, (३४)
मृतस्यानयनं सूनोः पुनः सान्दीपनेर्गुरोः ।
मथुरायां निवसता यदुचक्रस्य यत्प्रियम् । कृतमुद्धवरामाभ्यां युतेन हरिणा द्विजाः ॥ ३५ ॥
मेलेल्या गुरुपुत्राला जिवंत आणिले पुन्हा । मथुरीं राहता दोघे यदुंचे हित साधिले ॥ ३५ ॥
सांदीपनी गुरूंच्या मृत पुत्राला परत आणणे, मथुरेत, असताना श्रीकृष्णांकडून उद्धव, बलराम यांच्यासह यादवांचे प्रिय करणे, (३५)
जरासन्धसमानीत सैन्यस्य बहुशो वधः ।
घातनं यवनेन्द्रस्य कुशस्थल्या निवेशनम् ॥ ३६ ॥
ससैन्य तो जरासंध ठेचिता मारिला पुन्हा । जाळिला यवनेंद्रो नी रचिली द्वारकापुरी ॥ ३६ ॥
जरासंधाने आणलेल्या सैन्याचा पुष्कळ वेळा वध, कालयवनाचे मुचुकुंदामार्फत भस्म, द्वारकानिर्माण, (३६)
आदानं पारिजातस्य सुधर्मायाः सुरालयात् ।
रुक्मिण्या हरणं युद्धे प्रमथ्य द्विषतो हरेः ॥ ३७ ॥
सुधर्मा कल्पवृक्षो तो स्वर्गीचे आणिले पहा । शत्रुंचे दळ जिंकोनी जिंकिली रुक्मिणी प्रिया ॥ ३७ ॥
स्वर्गातून परिजातक आणि सुधर्मा सभा आणणे, भगवंतांकडून युद्धात शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचे हरण, (३७)
हरस्य जृम्भणं युद्धे बाणस्य भुजकृन्तनम् ।
प्राग्ज्योतिषपतिं हत्वा कन्यानां हरणं च यत् ॥ ३८ ॥
हरा नी लढता बाणासुराच्या बाहु कापिल्या । भौमासुरास मारोनी वरिल्या युवती तिथे ॥ ३८ ॥
युद्धात महादेवांच्यावर जृम्भणास्त्रप्रयोग, बाणासुराचे हात तोडणे, भीमासुराला मारून कन्यांचे पाणिग्रहण, (३८)
चैद्यपौण्ड्रकशाल्वानां दन्तवक्रस्य दुर्मतेः ।
शम्बरो द्विविदः पीठो मुरः पञ्चजनादयः ॥ ३९ ॥ माहात्म्यं च वधस्तेषां वाराणस्याश्च दाहनम् । भारावतरणं भूमेः निमित्तीकृत्य पाण्डवान् ॥ ४० ॥
चेद्य पौंड्रक शाल्वाला दंतवक्त्रा नि शंबरा । द्विवीद पीठ नी मूर मारिले वर्णिले तिथे ॥ ३९ ॥ चक्राने जाळिली काशी पुन्हा भारत युद्ध ते । निमित्त पांडवा केले पृथ्विचा भार हारिला ॥ ४० ॥
शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दुष्ट दंतवक्त्र, शंबरासुर, द्विविद, पीठ, मुर, पंचजन इत्यादी दैत्यांच्या सामर्थ्याचे वर्णन व भगवंतांकडून त्यांचा वध, काशीदहन, पांडवांना निमित्त करून पृथ्वीचा भार उतरविणे. (३९-४०)
विप्रशापापदेशेन संहारः स्वकुलस्य च ।
उद्धवस्य च संवादो वसुदेवस्य चाद्भुतः ॥ ४१ ॥
त्या एकादश स्कंधात यदुवंशास शाप तो । कृष्ण उद्धव संवाद स्कंधी अद्भूत तो असे ॥ ४१ ॥
अकराव्या स्कंधात भगवंतांकडून ब्राम्हणांच्या शापाचे निमित्त करून यदुवंशाचा संहार, श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा अद्भुत संवाद, (४१)
यत्रात्मविद्या ह्यखिला प्रोक्ता धर्मविनिर्णयः ।
ततो मर्त्यपरित्याग आत्मयोगानुभावतः ॥ ४२ ॥
आत्मज्ञान तयीं पूर्ण धर्म नीर्णय गोधही । आत्मयोग प्रभावाने कृष्णे हा लोक त्यागिला ॥ ४२ ॥
संपूर्ण आत्मज्ञान व धर्म-निर्णयांचे निरूपण आणि भगवंतांचा आत्मयोगाच्या प्रभावने मर्त्यलोकाचा त्याग हे विषय आले आहेत. (४२)
युगलक्षणवृत्तिश्च कलौ नॄणामुपप्लवः ।
चतुर्विधश्च प्रलय उत्पत्तिस्त्रिविधा तथा ॥ ४३ ॥
बाराव्यात युगांचे ती लक्षणे वर्णिली पहा । कलिची गति ती तैशी प्रलयो वर्णिले तसे ॥ ४३ ॥
बाराव्या स्कंधामध्ये निरनिराळ्या युगांची लक्षणे आणि त्या युगांतील व्यवहार, कलियुगात माणसांची अधर्मप्रवृत्ती, चार प्रकारचे प्रलय, तीन प्रकारच्या उत्पत्ती, (४३)
देहत्यागश्च राजर्षेः विष्णुरातस्य धीमतः ।
शाखाप्रणयनं ऋषेः मार्कण्डेयस्य सत्कथा ॥ महापुरुषविन्यासः सूर्यस्य जगदात्मनः ॥ ४४ ॥
परीक्षित् त्यागिती देहा वेदांचे ते विभाजन । मार्कंडेय कथा तैसी भगवत् अंग आयुधे । सूर्याचे गण ते सारे वर्णिले स्कंधि याच की ॥ ४४ ॥
ज्ञानी राजर्षी परीक्षिताचा शरीरत्याग, वेदांच्या शाखांची निर्मिती, मार्कंडेय मुनीची सुंदर कथा, भगवंतांच्या अंग-उपांगांचे स्वरूपकथन आणि विश्वात्मा सूर्यांच्या गणांचे वर्णन आले आहे. (४४)
इति चोक्तं द्विजश्रेष्ठा यत्पृष्टोऽहं इहास्मि वः ।
लीलावतारकर्माणि कीर्तितानीह सर्वशः ॥ ४५ ॥
सत्संगी पुसले तुम्ही वर्णिले सर्व मी तसे । घडले नच संदेह हरीचे कीर्तनो मला ॥ ४५ ॥
शौनकादी ऋषींनो ! या ठिकाणी आपण जे काही विचारले होते, ते मी तुम्हांला सांगितले. येथे मी सर्व प्रकारे भगवंतांच्या लीला आणि त्यांच्या अवतार-चरित्रांचेच वर्णन केले आहे. (४५)
पतितः स्खलितश्चार्तः क्षुत्त्वा वा विवशो ब्रुवन् ।
हरये नम इत्युच्चैः मुच्यते सर्वपातकात् ॥ ४६ ॥
पडता फसता दुःखी शिंकता उंच बोलणे । हरि हरी अशा शब्दे पळती पाप दूर ते ॥ ४६ ॥
जो मनुष्य पडताना, पाय घसरला असता, दुःख भोगत असता, किंवा शिंक आली असता, विवश होऊन का होईना, उच्च स्वरात "हरये नमः" असे म्हणतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. (४६)
(उपेंद्रवज्रा)
सङ्कीर्त्यमानो भगवान् अनन्तः श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसाम् । प्रविश्य चित्तं विधुनोत्यशेषं यथा तमोऽर्कोऽभ्रमिवातिवातः ॥ ४७ ॥
( इंद्रवज्रा ) संकीर्तनी श्रीहरिच्या लिला या नी वर्णिता नाम गुणोहि ऐसे । राही हरी त्या हृदयात नित्य नी दुःख संपे रवि जै तमाते ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणे सूर्य अंधार घालवितो किंवा सोसाट्याचा वारा ढगांना उधळून लावतो, त्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांचे संकीर्तन केले किंवा त्यांच्या लीलांचे श्रवण केले, तर ते स्वतःच येऊन भक्तांच्या हृदयात विराजमान होतात आणि त्यांचे सर्व दुःख नाहीसे करतात. (४७)
(मिश्र-१२)
मृषा गिरस्ता ह्यसतीरसत्कथा न कथ्यते यद्भगवानधोक्षजः । तदेव सत्यं तदुहैव मङ्गलं तदेव पुण्यं भगवद्गुणोदयम् ॥ ४८ ॥
जी वाणि ना घे गुण नाम त्याचे निरर्थकोची किति गोड राहो । जी पूरवानी हरिगान गाता ती मंगला नी मुळि सत्य तीच ॥ ४८ ॥
ज्या वाणीने, अधोक्षज भगवंतांसंबंधी बोलले जात नाही, ती वानी निरर्थक, सारहीन होय. आणि जी वाणी भगवांतांच्या गुणांनी परिपूर्ण असते, तीच परम पावन, तीच मंगलमय आणि तीच सत्य आहे. (४८)
तदेव रम्यं रुचिरं नवं नवं
तदेव शश्वन्मनसो महोत्सवम् । तदेव शोकार्णवशोषणं नृणां यदुत्तमःश्लोकयशोऽनुगीयते ॥ ४९ ॥
जी वाणि गाते यश श्रीहरीचे ती नित्य हो नूतन सुंदराची । आकल्प लाभे सुख त्याजला नी संपून जाति मुळि क्लेश सारे ॥ ४९ ॥
ज्या वचनाने भगवंतांच्या परम पवित्र यशाचे गायन होते, तेच रमणीय, आवडणारे व नव-नवीन मानावे. तेच नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत राहाते आणि तेच माणसाचा सगळा शोकसागर आटवते. (४९)
न यद्वचश्चित्रपदं हरेर्यशो
जगत्पवित्रं प्रगृणीत कर्हिचित् । तद् ध्वाङ्क्षतीर्थं न तु हंससेवितं यत्राच्युतस्तत्र हि साधवोऽमलाः ॥ ५० ॥
राही रजी वाणि अलंकृता ती ना गीत गाता हरिचे कधी ती । तो कावळ्याचा कवळोचि जाणा ते हंसभक्तो कधि सेवि ना की ॥ ५० ॥
जी वाणी, भगवान श्रीकृष्णांच्या जगाला पवित्र करणार्या यशाचे कधीच गायन करीत नाही, ती वाणी साहित्यगुणांनी परिपूर्ण असली तरी कावळ्यांसारख्या माणसांनाच आवडायची. ज्ञान्यांना नव्हे. कारण निर्मळ हृदयाचे साधुजन, जेथे भगवंत असतात, तेथेच निवास करतात. (५०)
तद्वाग्विसर्गो जनताघसंप्लवो
यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि । नामान्यनन्तस्य यशोऽङ्कितानि यत् श्रृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः ॥ ५१ ॥
नाही जरी सुंदर काव्य तैसे झाले जरी व्याकरणे दुषीत । त्या श्लोकि येता यश श्रीहरीचे पापास नष्टी तइ संत गाती ॥ ५१ ॥
या उलट, ज्या वाणीत साहित्यदृष्ट्या दोष आहेत, परंतु जिच्या प्रत्येक श्र्लोकामध्ये भगवंतांची सुयशसूचक नावे गुंफलेली असतात, ती वाणी, लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करीत असतात. (५१)
नैष्कर्म्यमप्यच्युत भाववर्जितं
न शोभते ज्ञानमलं निरञ्जनम् । कुतः पुनः शश्वदभद्रमीश्वरे न ह्यर्पितं कर्म यदप्यनुत्तमम् ॥ ५२ ॥
ते ज्ञान शुद्धो जइ मोक्ष लाभे भक्तीविना ना मुळि ज्ञान शोभे । झाले कितीही जरि श्रेष्ठ कर्म कृष्णार्पणी ना तइ दुःख घोर ॥ ५२ ॥
निर्मल ब्रह्मज्ञान जर भगवंतांच्या भक्ति-विरहित असेल, तर ते मुळीच शोभत नाही. जे कर्म भगवंतांना अर्पन केलेले नसेल, ते कितीही श्रेष्ठ प्रतीचे असले तरी नेहमी अमंगलच होय. ते सुंदर कसे असू शकेल बरे ? (५२)
यशःश्रियामेव परिश्रमः परो
वर्णाश्रमाचारतपःश्रुतादिषु । अविस्मृतिः श्रीधरपादपद्मयोः गुणानुवादश्रवणादरादिभिर्हरेः ॥ ५३ ॥
वर्णाश्रमीही बहु कष्ट घेती नी केवलो श्री यश घेति लोक । ऐको नि गाता हरि नाम लीला राही तयाचे पदु स्थीर चित्त ॥ ५६३ ॥
वर्ण आणि आश्रम यांनुसार आचरण, तपश्वर्या आणि अध्ययन यांच्यासाठी जे अपरंपार परिश्रम केले जातात, त्यांचे फळ म्हणजे फक्त यश किंवा संपत्तीची प्राप्ती. परंतु भगवंतांच्या गुणांचे श्रवण, किर्तन इत्यादी मात्र त्यांच्या श्रीचरणकमलांची स्मृती कधीच नाहीशी करीत नाही. (५३)
(मिश्र-११,१२)
अविस्मृतिः कृष्णपदारविन्दयोः क्षिणोत्यभद्राणि च शं तनोति च । सत्त्वस्य शुद्धिं परमात्मभक्तिं ज्ञानं च विज्ञानविरागयुक्तम् ॥ ५४ ॥
नी संपते पाप नि ताप सारे अमंगलो नष्टुनि शांति लाभे । नी भक्ति लाभे हरिची तयास वैराग्य ज्ञानो स्वरुपी मिळे की ॥ ५४ ॥
भगवान श्रीकृष्णांच्या चरण-कमलांची नित्य राहाणारी स्मृती, सगळे अमंगल नष्ट करते, परम शांती देते, अंतःकरण शुद्ध करते, भगवंतांची भक्ती निर्माण करते आणि वैराग्याने युक्त असे भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन साक्षात्कार घडवते. (५४)
(इंद्रवज्रा)
यूयं द्विजाग्र्या बत भूरिभागा यच्छश्वदात्मन्यखिलात्मभूतम् । नारायणं देवमदेवमीशं अजस्रभावा भजताविवेश्य ॥ ५५ ॥
तुम्ही द्विजांनो बहु धन्य आहा प्रेमे धरीला हृदयात कृष्ण । तो शक्तिमंतो अन सर्व आत्मा भजोनि घेता त्यजिता दुजाला ॥ ५५ ॥
हे ऋषींनो ! आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात. कारण आपण नेहमीच आपल्या हृदयात, सर्वात्मा सर्वशक्तिमान, आदिदेव, अशा भगवान नारायणांची स्थापना करून त्यांचे भजन करीत असता. (५५)
(मिश्र-११,१२)
अहं च संस्मारित आत्मतत्त्वं श्रुतं पुरा मे परमर्षिवक्त्रात् । प्रायोपवेशे नृपतेः परीक्षितः सदस्यृषीणां महतां च श्रृण्वताम् ॥ ५६ ॥
परेक्षिताला शुक बोलले जे ते ऐकिले मी बसुनी तिथेची । तुम्ही दिली ती स्मृति हे पुसोनी मी जाहलो की ऋणि आपुला तो ॥ ५६ ॥
ज्यावेळी राजर्षी परीक्षित अन्न-पाण्याचा त्याग करून मोठमोठ्या ऋषींनी भरलेल्या सभेमध्ये श्रीशुकदेव महाराजांच्या तोंडून श्रीमद्भागवताची कथा ऐकत होता, त्यावेळी मीही तेथेच बसून त्या परम ऋषींच्या तोंडून हे आत्मतत्त्वाचे श्रवण केले होते. आपण मला यावेळी ती आठवण करून दिलीत. (५६)
(अनुष्टुप्)
एतद्वः कथितं विप्राः कथनीयोरुकर्मणः । माहात्म्यं वासुदेवस्य सर्वाशुभविनाशनम् ॥ ५७ ॥
( अनुष्टुप् ) कीर्तनीय अशा लीला विप्रांनो हरिच्या अशा । प्रसंगी वर्णिल्या मी या अशूभ सर्व संपते ॥ ५७ ॥
शैनकादी ऋषींनो ! ज्यांची प्रत्येक लीला श्रवण, कीर्तन करण्याजोगी असते, त्या भगवान वासुदेवांचे माहात्म्य मी तुम्हांला सांगितले. ते सर्व अशुभ वासना नष्ट करणारे आहे. (५७)
य एतत्श्रावयेन्नित्यं यामक्षणमनन्यधीः ।
श्रद्धावान् योऽनुश्रृणुयात् पुनात्यात्मानमेव सः ॥ ५८ ॥
एकाग्रे क्षण वा जास्त गाती वा ऐकती यया । सदेह शुद्ध ते होती हृदयात तसेचि ते ॥ ५८ ॥
जो मनुष्य एकाग्रचित्ताने एक प्रहर किंवा एक क्षणभर का होईना, हे ऐकवितो, आणि जो श्रद्धेने याचे श्रवण करतो, तो स्वतःला खात्रीने पवित्र करून घेतो. (५८)
द्वादश्यामेकादश्यां वा श्रृण्वन्नायुष्यवान् भवेत् ।
पठत्यनश्नन् प्रयतः ततो भवत्यपातकी ॥ ५९ ॥
ऐके जो द्वादशीला वा त्या एकाद्दशिच्या दिनी । लाभते दीर्घ आयू त्या निरहंकारि वाचिता । संपते पाप ते सर्व पापबुद्धीहि नष्टते ॥ ५९ ॥
जो मनुष्य द्वादशी किंवा एकादशीच्या दिवशी याचे श्रवण करतो, तो दीर्घायुषी होतो आणि जो संयमपूर्वक निराहार राहून याचा पाठ करतो, तो पापरहित होतो. (५९)
पुष्करे मथुरायां च द्वारवत्यां यतात्मवान् ।
उपोष्य संहितामेतां पठित्वा मुच्यते भयात् ॥ ६० ॥
पुष्करीं द्वारकेमध्ये मथुरीं हीच संहिता । उपोष्ये वाचिती त्यांचे भय ते सर्व संपते ॥ ६० ॥
जो मनुष्य अंतःकरण ताब्यात ठेवून उपवास करून, पुष्कर, मथुरा किंवा द्वारकानगरीत या पुराणसंहितेचा पाठ करतो, तो भयापासून मुक्त होतो. (६०)
देवता मुनयः सिद्धाः पितरो मनवो नृपाः ।
यच्छन्ति कामान् गृणतः श्रृण्वतो यस्य कीर्तनात् ॥ ६१ ॥
ऐकोनी कीर्तनी सांगे त्याजला देवता मुनी । पितरे मनु नी राजे तोषोने तुष्टती तया ॥ ६१ ॥
जो मनुष्य याचे श्रवण किंवा उच्चारण करतो, त्याच्या त्या संकीर्तनाने देवता, मुनी, सिद्ध, पितर, मनू आणि राजे संतुष्ट होतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण करतात. (६१)
ऋचो यजूंषि सामानि द्विजोऽधीत्यानुविन्दते ।
मधुकुल्या घृतकुल्याः पयःकुल्याश्च तत्फलम् ॥ ६२ ॥
ऋग्यजु साम पाठाने द्विजांना सर्व लाभते । पाठे भागवताच्याही कामना पूर्ण होत तैं ॥ ६२ ॥
ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचा पाठ केल्याने ब्राह्मणाला मध, तूप व दुधाच्या नद्या म्हणजेच सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होते, तेच फळ श्रीमद्भागवताच्या पाठानेसुद्धा मिळते. (६२)
पुराणसंहितां एतां अधीत्य प्रयतो द्विजः ।
प्रोक्तं भगवता यत्तु तत्पदं परमं व्रजेत् ॥ ६३ ॥
पुराण संहिता ही जो संयमे द्विज वाचितो । पद लाभे तया श्रेष्ठ बोलले भगवान् स्वये ॥ ६३ ॥
जो ब्राह्मण संयमपूर्वक या पुराणसंहितेचे अध्ययन करतो, त्याला स्वतः भगवंतांनी वर्णन केलेल्या परमपदाची प्राप्ती होते. (६३)
विप्रोऽधीत्याप्नुयात् प्रज्ञां राजन्योदधिमेखलाम् ।
वैश्यो निधिपतित्वं च शूद्रः शुध्येत पातकात् ॥ ६४ ॥
प्रज्ञा ऋतुंभरा विप्रां वाचता मिळते पहा । क्षत्रिया राज्य ते लाभे कुबेरा परि वैष्य हो । शूद्राची सर्व ती पापे नष्टती ऐकता यया ॥ ६४ ॥
हिच्या अध्ययनाने ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते. क्षत्रियाला समुद्रापर्यंतच्या भूमंडळाचे राज्य मिळते. वैश्याला कुबेरासारखी संपत्ती मिळते व शूद्राची सर्व पापांपासून सूटका होते. (६४)
(unknown)
कलिमलसंहतिकालनोऽखिलेशो हरिरितरत्र न गीयते ह्यभीक्ष्णम् । इह तु पुनर्भगवानशेषमूर्तिः परिपठितोऽनुपदं कथाप्रसङ्गैः ॥ ६५ ॥
( पुष्पिताग्रा ) कलिमलगिरि नष्टितो हरी तो हरिगुण ना मिळती कुठेहि ऐसे । पदि पदि भरले ययीं पुराणी स्वरुप कथीं हरिचेचि वर्णियेले ॥ ६५ ॥
सर्वांचे स्वामी आणि कलियुगातील पापांचे ढीग उध्वस्त करणारे जे भगवान श्रीहरी त्यांचे वर्णन करणारी पुराणे पुष्कळ आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये सगळीकडे भगवंतांचे वर्णन आढळत नाही. यामध्ये मात्र प्रत्येक कथा-प्रासंगामध्ये पदोपदी सर्वस्वरूप भगवंतांचेच वर्णन केलेले आहे. (६५)
(पुष्पिताग्रा)
तमहमजमनन्तमात्मतत्त्वं जगदुदयस्थितिसंयमात्मशक्तिम् । द्युपतिभिरजशक्रशङ्कराद्यैः दुरवसितस्तवमच्युतं नतोऽस्मि ॥ ६६ ॥
जनन मरण मुक्त आत्मतत्त्व स्थिति प्रलयो जननोहि शक्ति हीच । कमलज शिव नेणती स्तवाया सदचिद मोदरुपा नमो तुला रे ॥ ६६ ॥
जे जन्म-मृत्यू इत्यादी विकारांनी रहित, देश, काळ इत्यादी मर्यादांपासून मुक्त तसेच स्वतः आत्मतत्त्वसुद्धा आहेत, जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय करणार्या शक्तीसुद्धा ज्यांचे स्वरूप आहेत, ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इ. लोकपाल सुद्धा ज्यांची किंचितशीसुद्धा स्तुती करणे जाणत नाहीत, त्या परमात्म्याला मी नमस्कार करीत आहे. (६६)
उपचितनवशक्तिभिः स्व आत्मनि
उपरचितस्थिरजङ्गमालयाय । भगवत उपलब्धिमात्रधाम्ने सुरऋषभाय नमः सनातनाय ॥ ६७ ॥
निपजि तनिच शक्ति सृष्टी दावी करुनि मनि स्वविचार स्थीर राही । भगवतपदप्राप्ति चित्ति होय पुजनीय देव पदा नमो तुझीया ॥ ६७ ॥
ज्यांनी आपल्या स्वरूपातच प्रकृती इत्यादी नऊ शक्तींचा संकल्प करुन या चराचर जगाची उत्पत्ती केली आणि जे तिचे अधिष्ठानही आहेत, तसेच ज्यांचे परम पद फक्त अनुभूतिस्वरूप आहे, त्या सनातन देवाधिदेव भगवंतांना नमस्कार असो. (६७)
(मालिनी)
स्वसुखनिभृतचेतास्तद्व्युदस्तान्यभावोऽपि अजितरुचिरलीलाकृष्टसारस्तदीयम् । व्यतनुत कृपया यः तत्त्वदीपं पुराणं तमखिलवृजिनघ्नं व्याससूनुं नतोऽस्मि ॥ ६८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे द्वादशस्कन्धार्थनिरूपणं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
निजसुखि शुक डिंबले सदाचे मुरलिधरे मन वेधिले जगाचे । कथन प्रगटवीयण्या पुराण तमहरि हे शुक मी पदी नमीतो ॥ ६८ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर बारावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीशुकदेव आत्मानंदामध्येच निमग्न असल्यामुळे त्यांची भेददृष्टी संपूर्णपणे नाहीशी झाली होती. तरीसुद्धा श्यामसुंदरांच्या मनोहर लीलांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. म्हणूनच त्यांनीसुद्धा जगातील प्राण्यांवर कृपा करण्यासाठी भगवत्तत्त्व प्रकाशित करणार्या या महापुराणाचा विस्तार केला. त्याच सर्वपापहारी व्यासनंदन श्रीशुकदेवांना मी नमस्कार करतो. (६८)
स्कन्द बारावा - अध्याय बारावा समाप्त |