|
श्रीमद् भागवत पुराण विभिन्नपुराणानां श्लोकसंख्या श्रीमद् भागवत महत्त्वं च - विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद्भागवताचा महिमा - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच -
(शार्दूलविक्रीडित) यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः । ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॥ १ ॥
सूत सांगतात - ( शार्दूलविक्रीडत ) ज्या ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता गाती स्तवोनी गुणा । वेदो साम पदक्रमेचि श्रुति ते गाती ऋषी गान ज्यां । योगी ध्यान करोनि नित्य बघती लाभावया दर्शन । ज्याचा अर्थ सुरासुरा न कळला त्या दिव्य देवा नमो ॥ १ ॥
सूत म्हणतात - ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र, आणि मरुद्गण दिव्य स्तोत्रांनी ज्यांची स्तुती करतात, सामगायन करणारे ऋषी अंग, पद, क्रम तसेच उपनिषदांसह वेदांच्याद्वारे ज्यांचे गायन करतात, योगी ध्यानाच्या वेळी निश्वल झालेल्या मनाने ज्यांचे दर्शन घेतात आणि देव-दैत्यसुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत, त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो. (१)
पृष्ठे भ्राम्यदमन्दमन्दरगिरि ग्रावाग्रकण्डूयनान्
निद्रालोः कमठाकृतेर्भगवतः श्वासानिलाः पान्तु वः । यत्संस्कारकलानुवर्तनवशाद् वेलानिभेनाम्भसां यातायातमतन्द्रितं जलनिधेः नाद्यापि विश्राम्यति ॥ २ ॥
घेता पाठिसि मंदरा गिरि तदा ज्यां वाटली खाज ती । ज्याचा श्वास तसूभरेचि उठता वारा सुटोनी तदा । लाटा त्या उदधी मधोनि उठल्या त्या आजही दृश्यमान् । रक्षो श्वास प्रभावशालि सकळा विश्राम ना ते जया ॥ २ ॥
ज्यावेळी भगवंतांनी कच्छपरूप धारण केले होते आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदराचल रवीसारखा फिरत होता, त्यावेळी मंदराचलाच्या पहाडांच्या टोकांनी खाजविल्यामुळे ज्यांना झोप आली, त्यावेळचे त्यांचे श्वासरूप वायू तुमचे रक्षण करतो. त्यावेळी त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यात खळबळ माजली, त्या संस्कारांच्या खुणा आजही शिल्लक आहेत. त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची जी सतत किनार्यावर लाटांच्या रूपाने ये-जा चालू झाली, ती अजूनही थांबत नाही. (२)
(अनुष्टुप्)
पुराणसङ्ख्यासंभूतिं अस्य वाच्यप्रयोजने । दानं दानस्य माहात्म्यं पाठादेश्च निबोधत ॥ ३ ॥
( अनुष्टुप् ) श्लोकसंख्या पुराणांची तैसे याचे प्रयोजन । महिमा दान नी पाथ ऐका मी सांगतो पुढे ॥ ३ ॥
आता पुराणांची वेगवेगळी श्लोकसंख्या, त्यांची बेरीज, श्रीमद्भागवताचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचा हेतू, हा ग्रंथ दान देण्याची पद्धत, दान आणि पठण इत्यादींचा महिमासुद्धा ऐक. (३)
ब्राह्मं दश सहस्राणि पाद्मं पञ्चोनषष्टि च ।
श्रीवैष्णवं त्रयोविंशत् चतुर्विंशति शैवकम् ॥ ४ ॥
दहा हजार ब्रह्माचे नी पंचावन पद्मचे । विष्णुपुराणि तेवीस शैवी चोवीस ते पहा ॥ ४ ॥
ब्रह्मपुराणात दहा हजार, पद्मपुराणात पंचावन्न हजार, श्रीविष्णुपुराणात तेवीस हजार आणि शिवपुराणात चोवीस हजार श्लोक आहेत. (४)
दशाष्टौ श्रीभागवतं नारदं पञ्चविंशति ।
मार्कण्डं नव वाह्नं च दशपञ्च चतुःशतम् ॥ ५ ॥
अठरा श्रीभागवती नारदी पंचवीस की । मार्कंडी नऊ अग्नीचे पंधरा जास्त चारशे ॥ ५ ॥
श्रीमद्भागवतामध्ये अठरा हजार, नारदपुराणात पंचवीस हजार, मार्कंडेय पुराणात नऊ हजार तसेच अग्निपुराणात पंधरा हजार चारशे श्लोक आहेत. (५)
चतुर्दश भविष्यं स्यात् तथा पञ्चशतानि च ।
दशाष्टौ ब्रह्मवैवर्तं लैङ्गमेकादशैव तु ॥ ६ ॥
चवदा ती हविष्याची अधीक पाचशे तसे । अठरा ब्रह्मवैवर्तीं लिंगी ते अकराचि की ॥ ६ ॥
भविष्तपुराणाची श्लोकसंख्या चौदा हजार पाचशे, ब्रह्मवैवर्ताची अठरा हजार तसेच लिंग पुराणाची अकरा हजार आहे. (६)
चतुर्विंशति वाराहं एकाशीतिसहस्रकम् ।
स्कान्दं शतं तथा चैकं वामनं दश कीर्तितम् ॥ ७ ॥
वराहि चोविसो तैसे स्कंधि एक्यांशि नी शत । श्रीवान पुराणात दश सहस्र ते पहा ॥ ७ ॥
वराहपुराणाची श्लोकसंख्या चोवीस हजार, स्कंदपुराणाची एक्याऐंशी हजार एकशे आहे आणि वामनपुराणाची दहा हजार आहे. (७)
कौर्मं सप्तदशाख्यातं मात्स्यं तत्तु चतुर्दश ।
एकोनविंशत् सौपर्णं ब्रह्माण्डं द्वादशैव तु ॥ ८ ॥
कूर्मात सतरा तैसे मत्स्यीं चौदाचि श्लोक ते । एकोणवीस गरूडात ब्रह्मांडी द्वादशो तसे ॥ ८ ॥
कूर्मपुराण हे सतरा हजार श्लोकांचे आणि मत्स्यपुराण चौदा हजार श्लोकांचे आहे. गरुडपुराणामध्ये एकोणीस हजार श्लोक आणि ब्रह्मांड-पुराणात बारा हजार श्लोक आहेत. (८)
एवं पुराणसन्दोहः चतुर्लक्ष उदाहृतः ।
तत्राष्टदशसाहस्रं श्रीभागवतं इष्यते ॥ ९ ॥
एकूण श्लोकसंख्या ती होते जी चारलक्ष की । अठरा वदलो तैसे श्रीमद् भागवतात ते ॥ ९ ॥
अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोकसंख्या एकूण चार लक्ष आहे. त्यांपैकी श्रीमद्भागवत अठरा हजार श्लोकांचे आहे. (९)
इदं भगवता पूर्वं ब्रह्मणे नाभिपङ्कजे ।
स्थिताय भवभीताय कारुण्यात् संप्रकाशितम् ॥ १० ॥
नाभिच्या स्थित पद्मात संसारभयि ब्रह्मजी । कृपेने विष्णुने त्याम्ना दिधली संहिताच ही ॥ १० ॥
भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभिकमळात असलेल्या व संसारामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला कृपा करून हे सांगितले. (१०)
आदिमध्यावसानेषु वैराग्याख्यानसंयुतम् ।
हरिलीलाकथाव्रात अमृतानन्दितसत्सुरम् ॥ ११ ॥
आदी मध्ये नि अंतीही वैराग्यादायि त्या कथा । हरिलीला कथावार्ता सुधेने संत तृप्तती ॥ ११ ॥
याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी वैराग्य अत्पन्न करणार्या पुष्कळ कथा आहेत. भगवान श्रीहरींच्या ज्या लीला-कथा या महापूराणात आहेत, त्या अमृतस्वरूप असून सत्पुरुष आणि देवांनाही आनंद देणार्या आहेत. (११)
सर्ववेदान्तसारं यद् ब्रह्मात्मैकत्वलक्षणम् ।
वस्तु अद्वितीयं तन्निष्ठं कैवल्यैकप्रयोजनम् ॥ १२ ॥
वेदांतसार ते ऐसे ब्रह्म एकत्व सत्य ते । प्रतिपाद्य ययीं तेच कैवल्यचि प्रयोजन ॥ १२ ॥
सर्व वेदान्तांचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकतारूप अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणे व त्याचे फल म्हणजे मोक्ष. श्रीमद्भागवताचाही विषय तोच आहे. (१२)
प्रौष्ठपद्यां पौर्णमास्यां हेमसिंहसमन्वितम् ।
ददाति यो भागवतं स याति परमां गतिम् ॥ १३ ॥
भाद्रपदी पौर्णिमेला सुवर्णासनि ठेवुनी । श्रीमद्भागवतो देता गति उत्तम लाभते ॥ १३ ॥
जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद्भागवताचे सुवर्ण-सिंहासह दान करतो, त्याला परमगती प्राप्त होते. (१३)
राजन्ते तावदन्यानि पुराणानि सतां गणे ।
यावद् न दृष्यते साक्षात् श्रीमद् भागवतं परम् ॥ १४ ॥
संतांच्या त्या सभेमध्ये पुराण अन्य शोभती । श्रेष्ठ भागवतो येता अन्यांचे तेज संपते ॥ १४ ॥
जोपर्यंत सर्वश्रेष्ठ श्रीमद्भागवत महापुराणाचे दर्शन होत नाही, तोपर्यंतच संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणे शोभून दिसतात. (१४)
सर्ववेदान्तसारं हि श्रीभागवतमिष्यते ।
तद् रसामृततृप्तस्य नान्यत्र स्याद् रतिः क्वचित् ॥ १५ ॥
सर्व वेदाम्त हे सारे श्रीमद् भागवतात की । सुधारस पियी त्याचे मन ना रमते कुठे ॥ १५ ॥
हे श्रीमद्भागवत सर्व वेदान्तांचे सार आहे. या रसामृताचे पान करून जो तृप्त झाला, तो दुसर्या कोणत्याही पुराणात रमत नाही. (१५)
निम्नगानां यथा गङ्गा देवानामच्युतो यथा ।
वैष्णवानां यथा शम्भुः पुराणानां इदं तथा ॥ १६ ॥
गंगा नध्यात ती जैसी विष्णु तो देवतात नी । शिव तो वैष्णवांमाजी पुराणात तसेचि हे ॥ १६ ॥
जशी नद्यांमध्ये गंगा, देवतांमध्ये विष्णू आणि वैष्णवांमध्ये श्रीशंकर सर्वश्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे पुराणांमध्ये श्रीमद्भागवत आहे. (१६)
क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा ।
तथा पुराणव्रातानां श्रीमद्भागवतं द्विजाः ॥ १७ ॥
जेवढे क्षेत्र या विश्वींं त्यात काशीच श्रेष्ठ की । तसे भागवताचेही पुराणी स्थान श्रेष्ठची ॥ १७ ॥
हे ऋषींनो ! सर्व क्षेत्रांमध्ये जशी काशी सर्वश्रेठ आहे, त्याचप्रमाणे सर्व पुराणांमध्ये श्रीमद्भागवत आहे. (१७)
(शार्दूलविक्रीडित)
श्रीमद्भागवतं पुराणममलं यद्वैष्णवानां प्रियं यस्मिन् पारमहंस्यमेकममलं ज्ञानं परं गीयते । तत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविस्कृतं तत् श्रृण्वन् विपठन् विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नरः ॥ १८ ॥
( शार्दूलविक्रीडित ) श्रीमद्भागवतो पुराण विमलो जे वैष्णवांना प्रिय । जीवन्मुक्त अस्चि हंस करिती हे ज्ञानगानो तसे ॥ ते वैराग्य नि ज्ञान मिळते नैष्कर्मि जीवास की । नैष्कर्म्यो मिळते करोनिपठणा किंवाहि ऐकोनिया ॥ १८ ॥
श्रीमद्भागवत हे सर्व दृष्टींनी नर्दोष पुराण आहे. वैष्णवांना हे अत्यंत प्रिय आहे. या पुराणामध्ये जीवन्मुक्त परमहंसांच्या अद्वितीय तसेच मायेपासून पूर्णतः अलिप्त अशा ज्ञानाचे वर्णन केले गेले आहे. या ग्रंथात सर्व कर्मांपासून आत्यंतिक निवृत्ती ही ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त अशी आहे. जो याचे भक्तीने श्रवण, पठण आणि मनन करतो, तो मुक्त होतो. (१८)
कस्मै येन विभासितोऽयमतुलो ज्ञानप्रदीपः पुरा
तद् रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद् रूपिणा । योगीन्द्राय तदात्मनाथ भगवत् राताय कारुण्यतः तच्छुद्धं विमलं विशोकममृतं सत्यं परं धीमहि ॥ १९ ॥
नाही यास तुळाहि अन्य कुठली हा ज्ञानदीपो खरा । ब्रह्मासी वदले स्वयेंचि भगवान् ते नारदा बोलती ॥ व्यासांना कथिती मुनी नि पुढती श्रीशूकजी प्राशिती । त्यांनी ती विमला नृपास कथिले ते सत्य ध्यातो अम्ही ॥ १९ ॥
हा अजोड ज्ञानरूप दिवा सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला, नंतर ज्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदांना, पुढे नारदांच्या रुपाने व्यासांना, त्यानंतर ज्यांनी व्यासरूपाने योगींद्र शुकदेवांना आणि श्रीशुकदेवांच्या रुपाने दयाळू होऊन परीक्षिताला उपदेश केला, त्या परम शुद्ध मायामलापासून रहित, शोकरहित अविनाशी परम सत्यस्वरूप परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो. (१९)
(अनुष्टुप्)
नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे । य इदं कृपया कस्मै व्याचचक्षे मुमुक्षवे ॥ २० ॥
( अनुष्टुप् ) नमस्ते साक्षिमान् ईशा वासुदेवा नमो नमः । मोक्षाभिलाषि ब्रह्म्याला जेणे हे कथिले असे ॥ २० ॥
आम्ही त्या सर्वसाक्षी भगवान वासुदेवांना नमस्कार करतो. ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवांना याचा उपदेश केला. (२०)
योगीन्द्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे ।
संसारसर्पदष्टं यो विष्णुरातममूमुचत् ॥ २१ ॥
नमितो शुकदेवाला योगेंद्र ब्रह्मरूप जे । संसार सर्पदंशोनी नृपाला मुक्ति ती दिली ॥ २१ ॥
त्या योगिराज ब्रह्मस्वरूप श्रीशुकदेवांना नमस्कार असो. ज्यांनी हे महापुराण ऐकवुन संसारसर्पाने दंश केलेल्या परीक्षिताला मुक्त केले. (२१)
भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते ।
तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो ॥ २२ ॥
वारंवार मिळो जन्म पायाचे भक्ति ती घडो । कृपाही करणे ऐसी देवाधिदेवजी प्रभो ॥ २२ ॥
हे देवाधिदेवा ! प्रभो ! ज्या अर्थी आपणच आमचे पालनकर्ते आहात, म्हणून आपणच, आता आमच्यावर अशी कृपा करा की, प्रत्येक जन्मात आपल्या चरणकमलांवरच आमची भक्ती राहो. (२२)
नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनम् ।
प्रणामो दुःखशमनः त नमामि हरिं परम् ॥ २३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
नामसंकीर्तने ज्याच्या सर्वथा पाप नष्टते । प्रणामे संपती दुःख मनी मी श्रीहरी परं ॥ २३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तेरावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
ज्या भगवंतांच्या नामांचे संकीर्तन सर्व पापे सर्वथैव नष्ट करते आणि ज्या भगवंतांच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारची दुःखे नाहीशी करते, त्याच परमतत्त्वस्वरूप श्रीहरींना मी नमस्कार करतो. (२३)
स्कन्द बारावा - अध्याय तेरावा समाप्त |