श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द बारावा
एकादशोऽध्यायः

सांगोपांगायुधस्य भगवतः स्वरूपवर्णनं, सूर्यव्यूहवर्णनं च -

भगवंतांची अंगे, उपांगे आणि आयुधांचे
रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशौनक उवाच -
(अनुष्टुप्)
अथेममर्थं पृच्छामो भवन्तं बहुवित्तमम् ।
समस्ततन्त्रराद्धान्ते भवान् भागवत तत्त्ववित् ॥ १ ॥
शौनक म्हणाले -
( अनुष्टुप् )
सूतजी भगवंताचे तुम्ही भक्त शिरोमणी ।
समस्त शास्त्रसंबंधी आम्ही प्रश्न विचारितो ॥ १ ॥

शौनक म्हणाला - सूत महोदय ! आपण भागवताचे तत्त्व जाणणारे आणि अनेक विषय जाणणारे आहात. सर्व शास्त्रांच्या सिद्धांतांसंबंधी आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. (१)


तान्त्रिकाः परिचर्यायां केवलस्य श्रियः पतेः ।
अङ्‌गोपाङ्‌गायुधाकल्पं कल्पयन्ति यथा च यैः ॥ २ ॥
तन्नो वर्णय भद्रं ते क्रियायोगं बुभुत्सताम् ।
येन क्रियानैपुणेन मर्त्यो यायादमर्त्यताम् ॥ ३ ॥
क्रियायोगाचिये ज्ञाना जाणण्या इच्छितो अम्ही ।
चातुर्य करिता, ज्याने अमरत्वहि लाभते ॥ २ ॥
विष्णु आराधने वेळी पदादी अंग कोनते ।
तसेचि आयुधादींची कल्पना करणे कशी ॥ ३ ॥

भगवान आपले कल्याण करोत. आम्ही क्रियायोगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेऊ इच्छितो; कारण कौशल्याने आणि योग्य तर्‍हेने त्याचे आचरण केल्याने मनुष्य अमरत्व प्राप्त करून घेतो. म्हणून आपण आम्हांला हे सांगा की, पांचरात्र इत्यादी तंत्रांचा विधी जाणणारे लोक फक्त श्रीलक्ष्मीपती भगवंतांची आराधना करतेवेळी कोणकोणत्या तत्त्वांनी त्यांचे चरण इत्यादी अंगे, गरुडादी उपांगे, सुदर्शन इत्यादी आयुधे आणि कौस्तुभ इत्यादी अलंकारांची कल्पना करतात ? (२-३)


सूत उवाच -
नमस्कृत्य गुरून् वक्ष्ये विभूतीर्वैष्णवीरपि ।
याः प्रोक्ता वेदतन्त्राभ्यां आचार्यैः पद्मजादिभिः ॥ ४ ॥
सूत सांगतात -
नमस्कार गुरुंना मी करोनी सर्व सांगतो ।
ब्रह्मादी सांगती तंत्री वेदही पंचरात्रिला ॥ ४ ॥

सूत म्हणाले - मी श्रीगुरूदेवांच्या चरणांना नमस्कार करून, ब्रह्मदेव इत्यादी आचार्यांनी , वेदांनी तसेच पांचरात्र इत्यादी तंत्रग्रंथांनी श्रीविष्णूंच्या ज्या विभूतींचे वर्णन केले आहे, ते सांगतो. (४)


मायाद्यैर्नवभिस्तत्त्वैः स विकारमयो विराट् ।
निर्मितो दृश्यते यत्र सचित्के भुवनत्रयम् ॥ ५ ॥
मायेने निर्मुनी ईशे विकारमय जे विराट् ।
पंचेविस् तत्व जे दावी चेतनाऽधिष्ठितो अशी ॥ ५ ॥

भगवंतांच्या ज्या चेतन विराट रूपामध्ये हे त्रैलोक्य दिसते, ते प्रकृती, सूत्रात्मा, महतत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या नऊ तत्त्वांनी निर्माण झालेले आहे. (५)


एतद्वै पौरुषं रूपं भूः पादौ द्यौः शिरो नभः ।
नाभिः सूर्योऽक्षिणी नासे वायुः कर्णौ दिशः प्रभोः ॥ ६ ॥
पुरूष रूप हे त्याचे चरणो पृथिवी असे ।
अंतरीक्षचि नाभी ती स्वर्ग डोके नि सूर्य तो ।
नेत्रे नी नासिका वायु दिशा त्या कानची पहा ॥ ६ ॥

हे भगवंतांचेच पुरूषरूप आहे. पृथ्वी याचे चरण, स्वर्ग मस्तक, अंतरिक्ष नाभी, सूर्य नेत्र, वायू नासिका आणि दिशा कान आहेत. (६)


प्रजापतिः प्रजननं अपानो मृत्युरीशितुः ।
तद्‌बाहवो लोकपाला मनश्चन्द्रो भ्रुवौ यमः ॥ ७ ॥
लिंगप्रजापती तैसे गुदां मृत्युहि तो असे ।
लोकपाल भुजा त्याच्या मन चंद्र भ्रुवा यमो ॥ ७ ॥

प्रजापती लिंग, मृत्यू गुदस्थान, लोकपाल बाहू, चंद्र मन आणि यम भुवया आहेत. (७)


लज्जोत्तरोऽधरो लोभो दन्ता ज्योत्स्ना स्मयो भ्रमः ।
रोमाणि भूरुहा भूम्नो मेघाः पुरुषमूर्धजाः ॥ ८ ॥
मोह लाज अधरोष्ठ चांदण्या दंतपंक्ति नी ।
वृक्षरोम ढग केश हास्य ते भ्रमची पहा ॥ ८ ॥

लज्जा वरचा ओठ, लोभ खालचा ओठ, चांदणे दात, भ्रम हास्य, झाडे रोम आणि ढग हेच विराट पुरूषाच्या डोक्यावर उगवलेले केस आहेत. (८)


यावानयं वै पुरुषो यावत्या संस्थया मितः ।
तावानसावपि महा पुरुषो लोकसंस्थया ॥ ९ ॥
व्यष्टि जै सात वीते ती मोजिता आपुल्या विते ।
तसा समष्टि पुरुषो सात वीती असे पहा ॥ ९ ॥

ज्याप्रमाणे हा व्यष्टिपुरुष सात वितीएवढा आहे, त्याप्रमाणे तो समष्टिपुरुषसुद्धा या लोकांसह त्याच्या सात वितीएवढाच आहे. (९)


कौस्तुभव्यपदेशेन स्वात्मज्योतिर्बिभर्त्यजः ।
तत्प्रभा व्यापिनी साक्षात् श्रीवत्समुरसा विभुः ॥ १० ॥
कौस्तुभा कारणे घेई चैतन्य रूप ही तसे ।
सर्वव्यापी प्रभा ऐसी वक्षीं श्रीवत्स ये पहा ॥ १० ॥

भगवान कौस्तुभमण्याच्या रूपाने आत्मज्योतीलाच धारण करतात आणि त्याच्या परिसर व्यापून टाकणार्‍या प्रभेलासुद्धा वक्षःस्थळावर श्रीवत्सरूपाने धारण करतात. (१०)


स्वमायां वनमालाख्यां नानागुणमयीं दधत् ।
वासश्छन्दोमयं पीतं ब्रह्मसूत्रं त्रिवृत् स्वरम् ॥ ११ ॥
त्रैगुणी वनमाला ती पीत अंबर छंद ते ।
त्रिमात्रा प्रणवो त्याने पवीत धारिले असे ॥ ११ ॥

सत्त्व, रज इत्यादी गुणांच्या मायेला ते वनमालेच्या रूपाने, छंदाला पीतांबराच्या रूपाने, तसेच अ + उ + म या तीन मात्रांच्या प्रणवाला यज्ञोपवीताच्या रूपाने धारण करतात. (११)


बिभर्ति साङ्‌ख्यं योगं च देवो मकरकुण्डले ।
मौलिं पदं पारमेष्ठ्यं सर्वलोकाभयङ्‌करम् ॥ १२ ॥
सांख्य नी योग हे त्याचे मकराकार कुंडले ।
अभया किरिटो धारी ब्रह्मलोक शिरावरी ॥ १२ ॥

भगवान, सांख्य आणि योगरूप मकराकृती कुंडले, तसेच सर्व लोकांना अभय देणार्‍या ब्रह्मलोकालाच मुगुटाच्या रूपाने धारण करतात. (१२)


अव्याकृतमनन्ताख्यं आसनं यदधिष्ठितः ।
धर्मज्ञानादिभिर्युक्तं सत्त्वं पद्ममिहोच्यते ॥ १३ ॥
अव्ययी शेषशय्या ती तिथे नित्य विराज ती ।
धर्मादी ज्ञान सत्त्वो हे नाभिचे रूप वर्णिले ॥ १३ ॥

मूळ प्रकृती हीच त्यांची शेषशय्या आहे. तिच्यावर ते नेहमी विराजमान असतात आणि धर्म-ज्ञानादिकांनी युक्त असा सत्त्वगुण हे त्यांचे पद्मासन आहे. (१३)


ओजःसहोबलयुतं मुख्यतत्त्वं गदां दधत् ।
अपां तत्त्वं दरवरं तेजस्तत्त्वं सुदर्शनम् ॥ १४ ॥
देहेंद्रिय मनो शक्ति प्राणतत्त्व अशी गदा ।
पांचजन्यो जलतत्त्व तेजतत्त्व सुदर्शन ॥ १४ ॥

त्यांनी मन, इंद्रिये आणि शरीरसंबंधी शक्तींनी युक्त अशी प्राणतत्त्वरूप कौमोदकी गदा, जलतत्त्वरुप पांचजन्य शंख आणि तेजस्ततत्त्वरूप सुदर्शन चक्र धारण केले आहे. (१४)


नभोनिभं नभस्तत्त्वं असिं चर्म तमोमयम् ।
कालरूपं धनुः शार्ङ्‌गं तथा कर्ममयेषुधिम् ॥ १५ ॥
शुद्ध आकाश ते खड्ग अज्ञान तम ढाल ती ।
धनु ते कालरूपो नी कर्म भाता असे पहा ॥ १५ ॥

आकाशासारखे निर्मल आकाशस्वरूप खड्‍ग, तमोमय अज्ञानरूपी ढाल, काळरूप शार्ड्रःधनुष्य आणि कर्म हाच बाणांचा भाता धारण केला आहे. (१५)


इन्द्रियाणि शरानाहुः आकूतीरस्य स्यन्दनम् ।
तन्मात्राण्यस्याभिव्यक्तिं मुद्रयार्थक्रियात्मताम् ॥ १६ ॥
इंद्रीय बाणरूपी ते क्रियाशक्ति मनोरथ ।
रथ बाह्यांग तन्मात्रा मुद्रा ती अभयो वर ॥ १६ ॥

इंद्रियांनाच भगवंतांच्या धनुष्याचे बाण म्हटले आहे. क्रियाशक्तियुक्त मन म्हणजेच रथ होय. तन्मात्रा या रथाचे बाहेरचे भाग आहेत आणि अभय इत्यादी मुद्रांद्वारा त्यांचे वरदान, अभय इत्यादी रूपाने त्यांची क्रियाशीलता प्रगट होते. (१६)


मण्डलं देवयजनं दीक्षा संस्कार आत्मनः ।
परिचर्या भगवत आत्मनो दुरितक्षयः ॥ १७ ॥
सूर्य मंडल नी अग्नि पूजास्थान तया असे ।
संस्कारा मंत्रदीक्षा ती पूजा ती पापनाशची ॥ १७ ॥

सूर्यमंडळ किंवा अग्निमंडळ हेच भगवंतांच्या पूजेचे स्थान होय. अंतःकरणाची शुद्धी म्हणजेच मंत्रदीक्षा आहे आणि आपली सर्व पापे नाहीशी करणे हीच भगवंतांची पूजा होय. (१७)


भगवान् भगशब्दार्थं लीलाकमलमुद्वहन् ।
धर्मं यशश्च भगवान् चामरव्यजनेऽभजत् ॥ १८ ॥
आतपत्रं तु वैकुण्ठं द्विजा धामाकुतोभयम् ।
त्रिवृद्‌वेदः सुपर्णाख्यो यज्ञं वहति पूरुषम् ॥ १९ ॥
षडैश्वर्य असे पद्म भगवत्‌करिं जे असे ।
क्रमेचि चवरी पंखा धर्म नी यश ते पहा ॥ १८ ॥
वैकुंठ छत्र रूपाने निर्भयो धारिले असे ।
त्रिवेद गरुडा नाम तो याचे वाहनोच की ॥ १९ ॥

समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य हे सहा गुणरूप लीला-कमल भगवंत आपल्या हातात धारण करतात. धर्म आणि यशाला अनुक्रमे चवर्‍या आणि पंख्याच्या रूपाने तसेच निर्भय धाम वैकुंठाला छत्र रूपाने धारण केले आहे. तीन वेदांचेच नाव गरूड आहे. तेच अंतर्यामी परमात्म्याचे वहन करतात. (१८-१९)


अनपायिनी भगवती श्रृईः साक्षादात्मनो हरेः ।
विष्वक्सेनः तन्त्रमूर्तिः विदितः पार्षदाधिपः ।
नन्दादयोऽष्टौ द्वाःस्थाश्च तेऽणिमाद्या हरेर्गुणाः ॥ २० ॥
आत्माशक्ति असे लक्ष्मी पार्षदो पंचरात्र ते ।
अष्टसिद्धिरुपी त्याचे आठ ते द्वारपाल की ॥ २० ॥

आत्मस्वरूप भगवंतांपासून कधीही विभक्त न होणार्‍या त्यांच्या आत्मशक्तीचेच नाव लक्ष्मी आहे. भगवंतांच्या पार्षदांचे नायक विष्वक्‌सेन, पांचरात्र इत्यादी आगमरूप आहेत. भगवंतांचे स्वाभाविक गुण असणार्‍या अणिमा, महिमा इत्यादी अष्टमहासिद्धिंनाच नंद, सुनंद इत्यादी आठ द्वारपाल म्हणतात. (२०)


वासुदेवः सङ्‌कर्षणः प्रद्युम्नः पुरुषः स्वयम् ।
अनिरुद्ध इति ब्रह्मन् मूर्तिव्यूहोऽभिधीयते ॥ २१ ॥
वासुदेवो संकर्षणो प्रद्युम्न अनिरुद्ध हे ।
चारीही रूप ते त्याचे चतुर्व्यूह रुपो असे ॥ २१ ॥

शौनका ! स्वतः भगवानच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चार मूर्तींच्या रूपात आहेत. त्यांनाच चतुर्व्यूह म्हटले जाते. (२१)


स विश्वस्तैजसः प्राज्ञः तुरीय इति वृत्तिभिः ।
अर्थेन्द्रियाशयज्ञानैः भगवान् परिभाव्यते ॥ २२ ॥
जागृति विश्व तो होय स्वप्नीं तैजस होतसे ।
सुषुप्तीतचि तो प्राज्ञ तुरियीं ज्ञानपीठ तो ॥ २२ ॥

तेच जागृती अवस्थेचे अभिमानी ‘विश्व’ होऊन बाह्य विषयांना ग्रहण करतात, स्वप्नावस्थेचे अभिमानी ‘तैजस’ होऊन मनाने अनेक विषय ग्रहण करतात, तेच सुषुप्ती अवस्थेचे अभिमानी असे ‘प्राज्ञ’ होऊन विषय आणि मनाच्या संस्कारांनी युक्त अशा अज्ञानाने झाकले जातात आणि तेच सर्वांच्या साक्षी अशा ‘तुरीय’ अवस्थेत राहून सर्व ज्ञानांचे अधिष्ठान या स्वरूपात राहातात. (२२)


अङ्‌गोपाङ्‌गायुधाकल्पैः भगवान् तच्चतुष्टयम् ।
बिभर्ति स्म चतुर्मूर्तिः भगवान् हरिरीश्वरः ॥ २३ ॥
अंगोपांगायुधे ऐसे चारी रूपास घेउनी ।
विश्व तैजस नी प्राज्ञ तुरियीं तळपे हरी ॥ २३ ॥

अशा प्रकारे अंगे, उपांगे, आयुधे आणि अलंकारांनी युक्त तसेच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध या चार मूर्तींच्या रूपांमध्ये प्रगट होऊन सर्वशक्तिमान भगवान श्रीहरीच अनुक्रमे विश्व, तैजस, प्राज्ञ आणि तुरीय रुपाने प्रकाशित होतात. (२३)


(मालिनी)
द्विजऋषभ स एष ब्रह्मयोनिः स्वयंदृक्
     स्वमहिमपरिपूर्णो मायया च स्वयैतत् ।
सृजति हरति पातीत्याख्ययानावृताक्षो
     विवृत इव निरुक्तस्तत्परैरात्मलभ्यः ॥ २४ ॥
( मालिनी )
श्रुतिसिहि मुळ ऐसा स्वीय तेजी असा तो ।
     रचिहि स्वयचि माया ब्रह्मरूपास हेतू ॥
नच तरि मुळि लिंपे नाम कर्मात कोठे ।
     जरि रुप श्रुति वर्णी, आत्मरूपीं मिळे तो ॥ २४ ॥

तेच सर्वस्वरूप भगवान, वेदांचे मूळ कारण आहेत. ते स्वयंप्रकाश आणि आपल्या महिम्याने परिपूर्ण असे आहेत. ते आपल्या मायेने ब्रह्मदेव इत्यादी नावांनी आणि रूपांनी या विश्वाची सृष्टी, स्थिती आणि संहार करतात. परंतु त्यामुळे त्यांचे ज्ञान कधी झाकले जात नाही. शास्त्रांमध्ये, ते वेगवेगळे असल्याचे वर्णन केले आहे हे खरे; परंतु ते आपल्या भक्तांना आत्मस्वरूपानेच प्राप्त होतात. (२४)


(वसंततिलका)
श्रीकृष्ण कृष्णसख वृष्णि ऋषभावनिध्रुग्
     राजन्यवंशदहनान् अपवर्गवीर्य ।
गोविन्द गोपवनिताव्रजभृत्यगीत
     तीर्थश्रवः श्रवणमङ्‌गल पाहि भृत्यान् ॥ २५ ॥
( वसंततिलका )
श्रीकृष्ण पार्थसखया यदुवंशि जन्मे ।
     द्रोही नृपास वधुनी यश वाढवी तो ॥
गाती लिला हरि तुझ्या नित गोपबाला ।
     आम्ही पदास धरितो करणेच रक्षा ॥ २५ ॥

हे सच्चिदानंदस्वरूप श्रीकृष्णा ! आपण अर्जुनाचे मित्र आहात. हे यदुवंशशिरोमणी ! आपण अवतार घेऊन पृथ्वीचा द्रोह करणार्‍या राजेलोकांचे भस्म करून टाकलेत. आपले सामर्थ्य कधीही नाहीसे होत नाही. गोप-गोपींचा समूह आणि नारद इत्यादी भक्त नेहमी आपल्या पवित्र यशाचे गायन करीत असतात. हे गोविंदा ! आपले नाम, गुण आणि लीला इत्यादींचे श्रवण करण्यानेच जीवाचे कल्याण होते. आम्ही सर्वजण आपले सेवक आहोत. आपण आमचे रक्षण करावे. (२५)


(अनुष्टुप्)
य इदं कल्य उत्थाय महापुरुषलक्षणम् ।
तच्चित्तः प्रयतो जप्त्वा ब्रह्म वेद गुहाशयम् ॥ २६ ॥
( अनुष्टुप् )
असे चिन्ह उपांगाचे महापुरुष लक्षण ।
वर्णिता लाविता चित्त ब्रह्मज्ञानचि त्या मिळे ॥ २६ ॥

जो मनुष्य या वर्णनाचा भगवंतांचे ठिकाणी चित्त एकरूप करून, त्याला सर्वांच्या ह्रदयात राहाणार्‍या ब्रह्मस्वरूप परमात्म्याचे ज्ञान होईल. (२६)


श्रीशौनक उवाच -
शुको यदाह भगवान् विष्णुराताय श्रृण्वते ।
सौरो गणो मासि मासि नाना वसति सप्तकः ॥ २७ ॥
तेषां नामानि कर्माणि नियुक्तानामधीश्वरैः ।
ब्रूहि नः श्रद्दधानानां व्यूहं सूर्यात्मनो हरेः ॥ २८ ॥
शौनक म्हणाले -
भगवान् शौकदेवाने विष्णुरातास बोधिले ।
प्रत्येक महिन्या मध्ये येती ते गणसौर की ॥ २७ ॥
आदित्या सह ते बारा काय कार्यास साधिती ।
नामे व्यक्तिंचि ती काय सूर्य ते भगवान् स्वय ।
श्रद्धेने इच्छितो ऐकू कृपया सांगणे अम्हा ॥ २८ ॥

शौनक म्हणाला - ब्रह्मर्षी श्रीशुकांनी कथा ऐकणार्‍या परीक्षिताला सांगितले होते की, ऋषी, गंधर्व, नाग, अप्सरा, यक्ष, राक्षस आणि देवता यांचा मिळून एक सौरगण तयार होतो आणि हे सातहीजण दर महिन्याला बदलत राहतात. हे बारा गण आपले स्वामी असणार्‍या बारा आदित्यांबरोबर राहून काय काम करतात आणि त्याच्या अंतर्गत असणार्‍या व्यक्तींची नावे काय आहेत ? सूर्याच्या रूपामध्येसुद्धा स्वतः भगवंतच आहेत. म्हणून त्यांचे विभागही आम्ही मोठ्या श्रद्धेने ऐकू इच्छितो. तरी ते आपण आम्हांला सांगावे. (२७-२८)


सूत उवाच -
अनाद्यविद्यया विष्णोः आत्मनः सर्वदेहिनाम् ।
निर्मितो लोकतन्त्रोऽयं लोकेषु परिवर्तते ॥ २९ ॥
सूत सांगतात -
सर्व देहात तो विष्णु अविद्यारूपि या जगा ।
दाविण्या सूर्य तो झाला आकाशी भ्रमतो असा ॥ २९ ॥

सूत म्हणतात - सर्व प्राण्यांचे आत्मा असणार्‍या विष्णूंच्या अनादी अविद्येमुळे लोकांना व्यवहार करण्यास प्रवृत्त करावे, म्हणून सूर्यमंडळाची निर्मिती झालेली आहे. तेच लोकांमध्ये भ्रमण करीत असते. (२९)


एक एव हि लोकानां सूर्य आत्मादिकृत् हरिः ।
सर्ववेदक्रियामूलं ऋषिभिर्बहुधोदितः ॥ ३० ॥
आदिकर्ता खरा एक आंतरात्मचि सूर्य तो ।
एक तो कैक रूपाने वेदांनी वर्णिला असे ।
समस्त वेदक्रीयांचा मूळ तो सूर्यची पहा ॥ ३० ॥

सर्व लोकांचा आत्मा आदिकर्ता एकमेव श्रीहरीच सूर्य आहे. सर्व वैदिक क्रियांचे मूळ असणार्‍या त्याचे ऋषींनी अनेक रूपात वर्णन केले आहे. (३०)


कालो देशः क्रिया कर्ता करणं कार्यमागमः ।
द्रव्यं फलमिति ब्रह्मन् नवधोक्तोऽजया हरिः ॥ ३१ ॥
मायेने व्यक्त तो काळ देश क्रीया नि कर्म नी ।
कर्ता स्रुवा नि करणो कर्ता शाकल्य द्रव्यही ॥ ३१ ॥

शौनका ! एक भगवानच मायेमुळे काल, देश, क्रिया, कर्ता, साधन, कर्म, वेदमंत्र, द्रव्य आणि फळ या नऊ प्रकारांनी सांगितले जातात. (३१)


मध्वादिषु द्वादशसु भगवान् कालरूपधृक् ।
लोकतन्त्राय चरति पृथग् द्वादशभिर्गणैः ॥ ३२ ॥
कालरूप असा भानु व्यव्हारा चैत्र आदिने ।
भिन्न बाराहि मासात गणांच्या सह तो फिरे ॥ ३२ ॥

काळरूप धारण केलेले भगवान सूर्य, लोकांचे व्यवहार नीट चालण्यासाठी चैत्र इत्यादी बारा महिन्यांमध्ये आपल्या निरनिराळ्या बारा गणांसह फिरत असतात. (३२)


धाता कृतस्थली हेतिः वासुकी रथकृन्मुने ।
पुलस्त्यस्तुम्बुरुरिति मधुमासं नयन्त्यमी ॥ ३३ ॥
धाता कृतस्थली हेति वासुकी रथकृत् मुनी ।
पुलस्य तुंबरो तैसे गंधर्व चैत्रि कार्यरत् ॥ ३३ ॥

शौनका ! धाता नावाचा सूर्य, कृतस्थली अप्सरा, हेती राक्षस, वासुकी सर्प, रथकृत यक्ष, पुलस्त्य ऋषी आणि तुंबुरू गंधर्व हे चैत्र महिन्यामध्ये आपापली कार्ये पार पाडतात. (३३)


अर्यमा पुलहोऽथौजाः प्रहेतिः पुञ्जिकस्थली ।
नारदः कच्छनीरश्च नयन्त्येते स्म माधवम् ॥ ३४ ॥
अर्यमा पुलहोऽथौजा प्रहेति पुंजकस्थली ।
नारदो कच्छनीरो हे वैशाखी कार्य साधिती ॥ ३४ ॥

अर्यमा नावाचा राक्षस, पुंजिकास्थली अप्सरा, नारद गंधर्व आणि कच्छनीर साप, हे वैशाख महिन्यातील कार्यवाहक होत. (३४)


मित्रोऽत्रिः पौरुषेयोऽथ तक्षको मेनका हहाः ।
रथस्वन इति ह्येते शुक्रमासं नयन्त्यमी ॥ ३५ ॥
मित्र अस्त्री पौरुषेयो तक्षको मेनका दहा ।
रथस्वन् ज्येष्ठ मासात कार्य निर्वाह साधिती ॥ ३५ ॥

मित्र सूर्य, अत्री ऋषी, पौरुषेय राक्षस, तक्षक साप, मेनका अप्सरा, हाहा गंधर्व आणि रथस्वन यक्ष, हे ज्येष्ठ महिन्यातील कार्ये चालविणारे होत. (३५)


वसिष्ठो वरुणो रम्भा सहजन्यस्तथा हुहूः ।
शुक्रश्चित्रस्वनश्चैव शुचिमासं नयन्त्यमी ॥ ३६ ॥
वसिष्ठ वरुणो तंभा सहजन्य हुहू तसे ।
शुक्र चित्रस्वनो ऐसे आषाढी असती पहा ॥ ३६ ॥

आषाढामध्ये वरुण नावाच्या सूर्यासह वसिष्ठ ऋषी, रंभा अप्सरा, सहजन्य यक्ष, हूहू गंधर्व, शुक्र नाग आणि चित्रस्वन राक्षस आपापली कामे करतात. (३६)


इन्द्रो विश्वावसुः श्रोता एलापत्रस्तथाङ्‌गिराः ।
प्रम्लोचा राक्षसो वर्यो नभोमासं नयन्त्यमी ॥ ३७ ॥
इंद्र विश्वावसु श्रोता एलापत्र नि अंगिरा ।
प्रम्लोचा राक्षसोवर्य श्रावणीं कार्य साधिती ॥ ३७ ॥

श्रावणात इंद्र नावाचा सूर्य, विश्वावसू गंधर्व, श्रोता यक्ष, एलापत्र नाग, अंगिरा ऋषी, प्रम्लोचा अप्सरा तसेच वर्य नावाचा राक्षस आपापली कार्ये करतात. (३७)


विवस्वान् उग्रसेनश्च व्याघ्र आसारणो भृगुः ।
अनुम्लोचा शङ्‌खपालो नभस्याख्यं नयन्त्यमी ॥ ३८ ॥
विवस्वान् उग्रसेनो नी व्याघ्र आसारणो भृगु ।
अनुम्लोचा शंखपालो रहती भादव्या ते ॥ ३८ ॥

भाद्रपदात विवस्वान नावाचा सूर्य, उग्रसेन गंधर्व, व्याघ्र राक्षस, आसारण यक्ष, भृगु ऋषी, अनुम्लोचा अप्सरा आणि शंखपाल नाग, हे कार्ये करतात. (३८)


पूषा धनञ्जयो वातः सुषेणः सुरुचिस्तथा ।
घृताची गौतमश्चेति तपोमासं नयन्त्यमी ॥ ३९ ॥
पूषा धनंजयो वात सुषेण सुरुची तथा ।
घृताची गौतमो माघी आपुले कार्य साधिती ॥ ३९ ॥

माघ महिन्यामध्ये पूषा नावाचा सूर्य, धनंजय नाग, वात राक्षस, सुषेण गंधर्व, सुरूची यक्ष, घृताचि अप्सरा आणि गौतम ऋषी, हे असतात. (३९)


ऋतुर्वर्चा भरद्वाजः पर्जन्यः सेनजित्तथा ।
विश्व ऐरावतश्चैव तपस्याख्यं नयन्त्यमी ॥ ४० ॥
क्रतु वर्चा नि पर्जन्यो सनजित् फाल्गुनात त्या ।
विश्व ऐरावतो सर्प करिती कार्य ते पहा ॥ ४० ॥

फाल्गुन महिन्यात पर्जन्य नावाचा सूर्य, क्रतू यक्ष, वर्चा राक्षस, भरद्वाज ऋषी, सेनजित अप्सरा, विश्व गंधर्व आणि ऐरावत साप हे असतात. (४०)


अथांशुः कश्यपस्तार्क्ष्य ऋतसेनस्तथोर्वशी ।
विद्युच्छत्रुर्महाशङ्‌खः सहोमासं नयन्त्यमी ॥ ४१ ॥
अंशु काश्यप नी तार्क्ष्य कृतसेननि उर्वशी ।
विद्युच्छत्रु महा शंख मार्गशीर्षात राहती ॥ ४१ ॥

मार्गशीर्ष महिन्यात सूर्य अंशू, कश्यप ऋषी, तार्क्ष्य यक्ष, ऋत्सेन गंधर्व, उर्वशी अप्सरा, विद्युच्छ्त्रू राक्षस आणि महाशंख नाग, हे असतात. (४१)


भगः स्फूर्जोऽरिष्टनेमिः ऊर्ण आयुश्च पञ्चमः ।
कर्कोटकः पूर्वचित्तिः पुष्यमासं नयन्त्यमी ॥ ४२ ॥
भग स्फूर्जारिष्ठनेमी ऊर्ण आयू नि पाचवा ।
कर्कोटको पूर्वचित्ती पौषात असती पहा ॥ ४२ ॥

पौश महिन्यामध्ये भग नावाच्या सूर्यासह शूर्ज राक्षस, अरिष्टनेमी गंधर्व, ऊर्ण यक्ष, आयू रुषी, पूर्वचित्ती अप्सरा आणि कर्कोटक नाग, हे असतात. (४२)


त्वष्टा ऋचीकतनयः कम्बलश्च तिलोत्तमा ।
ब्रह्मापेतोऽथ सतजिद् धृतराष्ट्र इषम्भराः ॥ ४३ ॥
आश्विनी जामदग्नी नी कंबलो नि तिलोत्तमा ।
ब्रह्मपेतो नि शतजित् धृतराष्ट्रास काळ तो ॥ ४३ ॥

आश्विनात त्वष्टा सूर्य, जमदग्नी ऋषी, कंबल नाग, तिलोत्तमा अप्सरा, ब्रह्मपित राक्षस, शतजित यक्ष आणि धृतराष्ट्र गंधर्व हे, कार्य करतात. (४३)


विष्णुरश्वतरो रम्भा सूर्यवर्चाश्च सत्यजित् ।
विश्वामित्रो मखापेत ऊर्जमासं नयन्त्यमी ॥ ४४ ॥
विष्णु अश्वतरो रंभा सूर्यवचा नि सत्यजित् ।
विश्वामित्रो मखापेत आपुले कार्य साधिती ॥ ४४ ॥

कार्तिक महिन्यामध्ये विष्णू नावाच्या सूर्याबरोबर अश्वत नाग, रंभा अप्सरा, सूर्यावर्चा गंधर्व, सत्यजित यक्ष, विश्वामित्र ऋषी आणि मखापेत राक्षस आपापली कार्ये पार पाडतात. (४४)


एता भगवतो विष्णोः आदित्यस्य विभूतयः ।
स्मरतां सन्ध्ययोर्नॄणां हरन्त्यंहो दिने दिने ॥ ४५ ॥
भगवद्‌विभुती सर्व संध्याकाळी सकाळी ते ।
स्मरता नष्टते पाप सूर्यासी ऋषिनो पहा ॥ ४५ ॥

ही सगळी रूपे म्हणजे सूर्यरूप भगवान विष्णूंच्या विभूती आहेत. जे लोक यांचे दररोज सकाळी आणि सायंकाळी स्मरण करतात, त्यांची सर्व पापे नष्ट होतात. (४५)


द्वादशस्वपि मासेषु देवोऽसौ षड्भिरस्य वै ।
चरन् समन्तात्तनुते परत्रेह च सन्मतिम् ॥ ४६ ॥
सप्तगणांसवे बारा महिने फिरतो असे ।
लोक नी परलोकात बुद्धिविस्तार तो करी ॥ ४६ ॥

हे सूर्यदेव आपल्या सहा गणांसह बाराही महिने सगळीकडे विहार करतात आणि इह-परलोकामध्ये विवेक-बुद्धिचा विस्तार करतात. (४६)


सामर्ग्यजुर्भिस्तल्लिङ्‌गैः ऋषयः संस्तुवन्त्यमुम् ।
गन्धर्वास्तं प्रगायन्ति नृत्यन्त्यप्सरसोऽग्रतः ॥ ४७ ॥
ऋक् यजू सामवेदांच्या मंत्राने ऋषि गाति ती ।
सूर्याची स्तुति नी गान अप्सरा नाचती पुढे ॥ ४७ ॥

भगवंतांच्ता गणांपैकी ऋषी ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदातील सूर्यासंबंधी मंत्रांनी त्यांची स्तुती करतात, गंधर्व त्यांच्या सुयशाचे गायन करतात आणि अप्सरा नृत्य करीत करीत पुढे चालतात. (४७)


उन्नह्यन्ति रथं नागा ग्रामण्यो रथयोजकाः ।
चोदयन्ति रथं पृष्ठे नैर्‌ऋता बलशालिनः ॥ ४८ ॥
सर्पदोर रथासी त्या यक्ष त्यां साज घालिती ।
बलवान् राक्षसो त्याला मागोनी ढकलीत ते ॥ ४८ ॥

नाग दोरखंडाप्रमाणे त्यांच्या रथाला बांधलेले असतात. यक्ष रथ तयार करतात आणि बलदंड राक्षस तो (रथ) पाठीमागून ढकलतात. (४८)


वालखिल्याः सहस्राणि षष्टिर्ब्रह्मर्षयोऽमलाः ।
पुरतोऽभिमुखं यान्ति स्तुवन्ति स्तुतिभिर्विभुम् ॥ ४९ ॥
वालखिल्यादि ते साठ हजार विमलो ऋषि ।
स्तविती सूर्य पाहोनी चालती नित्य ते पुढे ॥ ४९ ॥

याशिवाय वालखिल्य नावाचे साठ हजार निर्मळ स्वभावाचे ब्रह्मर्षी, सूर्याकडे तोंड करून त्यांच्या पुढे पुढे स्तुतिपाठ गात चालतात. (४९)


एवं ह्यनादिनिधनो भगवान् हरिरीश्वरः ।
कल्पे कल्पे स्वमात्मानं व्यूह्य लोकानवत्यजः ॥ ५० ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
द्वादशस्कन्धे आदित्यव्यूहविवरणं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
अनंत नि अनादी हा अजन्मा भगवान् हरी ।
कल्पीं रूपा विभागोनी लोकांना पोषितो पहा ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अकरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

अशा प्रकारे अनादी, अनंत, अजन्मा भगवान श्रीहरी हेच प्रत्येक कल्पामध्ये आपल्या स्वरूपाचा विभाग करून लोकांचे पालन-पोषण करीत असतात. (५०)


स्कन्द बारावा - अध्याय अकरावा समाप्त

GO TOP