श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द बारावा
दशमोऽध्यायः

मार्कण्डेयाय भगवतः शंकरस्य वरदानम् -

मार्कंडेयाला भगवान शंकराचे वरदान -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच -
(अनुष्टुप्)
स एवं अनुभूयेदं नारायणविनिर्मितम् ।
वैभवं योगमायायाः तमेव शरणं ययौ ॥ १ ॥
सूत सांगतात -
( अनुष्टुप् )
वैभवो योगमायेचे श्रीनारायणनिर्मित ।
पाहिले निश्चये आता शरेनीं स्थिर राहिले ॥ १ ॥

सूत म्हणतात - अशा तर्‍हेने मार्कंडेय मुनीने नारायणनिर्मित योगमाया-वैभवाचा अनुभव घेतला. आणि तो त्यांनाच शरण गेला. (१)


श्रीमार्कण्डेय उवाच -
प्रपन्नोऽस्म्यङ्‌घ्रिमूलं ते प्रपन्नाभयदं हरे ।
यन्माययापि विबुधा मुह्यन्ति ज्ञानकाशया ॥ २ ॥
मार्कंडेय मनात म्हणाले -
प्रभो ! ही आपुली माया असत्य सत्य भासते ।
मोठेही मोहती तेणे खेळ हा आगळा तसा ।
शरणार्थ्याऽभयो पाद म्हणोनी पदि पातलो ॥ २ ॥

मार्कंडेय म्हणाला - प्रभो ! आता मला कळले की, ज्या आपल्या मायेने ती खरीच आहे असे वाटून मोठमोठे विद्वानसुद्धा का मोहित होतात ते. शरणगतांना अभय देणार्‍या आपल्या चरणकमलांनाच मी शरण आलो आहे.(२)


सूत उवाच -
तमेवं निभृतात्मानं वृषेण दिवि पर्यटन् ।
रुद्राण्या भगवान् रुद्रो ददर्श स्वगणैर्वृतः ॥ ३ ॥
सूत सांगतात -
मुनि तन्मय ते होता पार्वती सह ते शिव ।
जाता आकाशमार्गाने पाहिले मुनि हे असे ॥ ३ ॥

सूत म्हणतात - अशा प्रकारे शरणागत झालेल्या त्याला पार्वतीसह नंदीवर स्वार होऊन आकाशमार्गाने फिरणार्‍या भगवान शंकरांनी पाहिले. त्यांच्याबरोबर त्यांचे गणसुद्धा होते. (४)


अथोमा तं ऋषिं वीक्ष्य गिरिशं समभाषत ।
पश्येमं भगवन् विप्रं निभृतात्मेन्द्रियाशयम् ॥ ४ ॥
निभृतोदझषव्रातं वातापाये यथार्णवः ।
कुर्वस्य तपसः साक्षात् संसिद्धिं सिद्धिदो भवान् ॥ ५ ॥
उमेने पाहता दाटे वात्सल्य हृदयी तिच्या ।
वदली शंकरा ती की पहा ब्राह्मण हा कसा ॥ ४ ॥
उदधी शांत जै होतो वादळो संपता पुन्हा ।
देहेंद्रिय तसा शांत तपाला फळ द्या तुम्ही ॥ ५ ॥

पार्वती देवींनी मार्कंडेय मुनीला ध्यानावस्थेत पाहून शंकरांना म्हटले, “भगवन ! या ब्राम्हणाकडे पहा ना ! वादळ शांत झाल्यावर, लाटा आणि मासे शांत झालेला समुद्र जसा असतो, तसा शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण शांत झालेला हा मुनी आहे. सर्व सिद्धी देणारे साक्षात आपणच असल्यामुळे आपण याला तपश्चर्येचे फळ द्यावे.” (४-५)


श्रीभगवानुवाच -
नैवेच्छत्याशिषः क्वापि ब्रह्मर्षिर्मोक्षमप्युत ।
भक्तिं परां भगवति लब्धवान् पुरुषेऽव्यये ॥ ६ ॥
भगवान् शंकर म्हणाले -
महर्षी नेच्छिती वस्तू मोक्षांही नच इच्छिती ।
भगवद्‌भक्ति ती श्रेष्ठ अव्ययी मिळते तया ॥ ६ ॥

भगवान शंकर म्हणाले - देवी ! हा ब्रह्मर्षी कोणत्याही वस्तूची, किंबहुना मोक्षाचीही इच्छा करीत नाही. कारण याला अविनाशी भगवंतांच्या ठिकाणी पराभक्ती प्राप्त झालेली आहे. (६)


अथापि संवदिष्यामो भवान्येतेन साधुना ।
अयं हि परमो लाभो नृणां साधुसमागमः ॥ ७ ॥
नेच्छिती जरि ते कांही तरीही भेटुया चला ।
संतांच्या भेटिचा लाभ दिवाळी दसराचि तो ॥ ७ ॥

देवी ! तरीसुद्धा आपण या महात्म्याशी बोलू. कारण संतांचा सहवास मिळणे, हाच माणसांच्या दृष्टीने फार मोठा लाभ आहे. (७)


सूत उवाच -
इत्युक्त्वा तमुपेयाय भगवान् स सतां गतिः ।
ईशानः सर्वविद्यानां ईश्वरः सर्वदेहिनाम् ॥ ८ ॥
सूत सांगतात -
विद्याधीष शिवो तैसे सर्वांच्या हृदयीं स्थित ।
आदर्श साशु संतांचे वदता पोचले तिथे ॥ ८ ॥

सूत म्हणतात - एवढे बोलून सर्व विद्यांचे प्रवर्तक, सर्व प्राण्यांच्या ह्रदयात असलेले व संतांचे आश्रय भगवान शंकर मार्कंडेयाजवळ आले. (८)


तयोरागमनं साक्षाद् ईशयोर्जगदात्मनोः ।
न वेद रुद्धधीवृत्तिः आत्मानं विश्वमेव च ॥ ९ ॥
मनोवृत्ति मुनिंच्या तै निमाल्या हरिभक्तिसी ।
देहाचे नव्हते भान न जाणी शिव पातले ॥ ९ ॥

मार्कंडेयाच्या मनोवृत्ती त्यावेळी निरूद्ध असल्यामुळे त्याला आपल्या शरीराचे किंवा जगाचे अजिबात भान नव्हते. त्यामुळे त्याला विश्वाचे आत्मा साक्षात भगवान गौरी-शंकर आलेले कळले नाही. (९)


भगवान् तदभिज्ञाय गिरिशो योगमायया ।
आविशत्तद्‌गुहाकाशं वायुश्छिद्रमिवेश्वरः ॥ १० ॥
शिवांच्या पासुनी त्यांची न कांही लपली स्थिती ।
योगमाये करोनीया हृदयीं शिव पातले ॥ १० ॥

भगवान कैलासपतींनी ते जाणून वारा ज्याप्रमाणे छिद्रात शिरतो, त्याप्रमाणे योगमायेने मुनीच्या हृदयाकाशात प्रवेश केला. (१०)


आत्मन्यपि शिवं प्राप्तं तडित्पिङ्‌गजटाधरम् ।
त्र्यक्षं दशभुजं प्रांशुं उद्यन्तं इव भास्करम् ॥ ११ ॥
व्याघ्रचर्माम्बरं शूल खट्वाङ्‌गचर्मभिः ।
अक्षमालाडमरुक कपालासिधनुः सह ॥ १२ ॥
जटा ते जाळती तैशा त्रिनेत्रा दश त्या भुजां ।
उअंच तेजस्वि तो देह हृदयीं पाहता मुनी ॥ ११ ॥
शरिरीं व्याघ्रचर्मो नी करी ढाल शुलो धनु ।
खट्वांग अक्षमाला नी डमरू खड्गखप्पर ॥ १२ ॥

मार्कंडेयाला दिसले की, त्याच्या हृदयामध्ये शंकर आले आहेत. त्यांच्या मस्तकावर विजेप्रमाणे चमकणार्‍या पिवळ्याधमक जटा शोभत आहेत. तीन डोळे आणि दहा हात आहेत. त्यांचे शरीर, उगवणार्‍या सूर्यासारखे तेजस्वी आहे. त्यांनी शरीरावर व्याघ्रजिन पांघरले आहे आणि हातामध्ये त्रिशूळ, खट्‍वांग, ढाल, रुद्राक्ष-माळ, डमरू, भिक्षापात्र, तलवार आणि धनुष्य घेतलेले आहे. (११-१२)


बिभ्राणं सहसा भातं विचक्ष्य हृदि विस्मितः ।
किमिदं कुत एवेति समाधेर्विरतो मुनिः ॥ १३ ॥
अकस्मात असे चित्ती मुनी आश्चर्य पावले ।
उदेल्या वृत्ति त्या ऐशा समाधी सोडिली तये ॥ १३ ॥

आपल्या हृदयात अचानकपणे प्रगट झालेल्या भगवान शंकरांना पाहून मुनी आश्चर्यचकित झाला. “हे काय आहे ? हे कोठून आले ?” या वृत्तींचा चित्तात उदय झाल्याने त्याची समाधी उतरली. (१३)


नेत्रे उन्मील्य ददृशे सगणं सोमयाऽऽगतम् ।
रुद्रं त्रिलोकैकगुरुं ननाम शिरसा मुनिः ॥ १४ ॥
पाहती उघड्या नेत्रे सपार्वति जगद्‌गुरू ।
गणांच्या सह ते येता डोके पायासि टेकिले ॥ १४ ॥

डोळे उघडून पाहिले तर तिन्ही लोकांचे एकमेव गुरू भगवान शंकर, पार्वतीदेवी व गणांसह आले आहेत. तेव्हा त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून प्रणाम केला. (१४)


तस्मै सपर्यां व्यदधात् सगणाय सहोमया ।
स्वागतासनपाद्यार्घ्य गन्धस्रग् धूपदीपकैः ॥ १५ ॥
स्वागतासन पाद्यार्घे गंध धूपादिने तयां ।
पूजिले ऋषिने दोघां गणांना पूजिले पुन्हा ॥ १५ ॥

त्यानंतर मुनीने स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, गंध, पुष्पमाला, धूप, दीप इत्यादी उपचारांनी भगवान शंकरांची पार्वती आणि गणांसह पूजा केली. (१५)


आह चात्मानुभावेन पूर्णकामस्य ते विभो ।
करवाम किमीशान येनेदं निर्वृतं जगत् ॥ १६ ॥
त्यांना मार्कडेय म्हणाले -
आहा आत्मानुभावी नी पूर्णकाय तुम्ही प्रभो ।
तुमच्या सुख शांतीने जग ऐसे निरामय ।
करू मी काय ती सेवा प्रभो तो सांगने मला ॥ १६ ॥

आणि म्हटले, “हे सर्वव्यापक आणि सर्वशक्तिमान प्रभो ! आपण आत्मानुभूतीने पूर्णकाम आहात. ज्या आपल्यामुळेच जग आनंदपूर्ण आहे, त्या आपली मी काय सेवा करू ? (१६)


नमः शिवाय शान्ताय सत्त्वाय प्रमृडाय च ।
रजोजुषेऽप्य घोराय नमस्तुभ्यं तमोजुषे ॥ १७ ॥
नमो शिवास शांतासी सत्त्वा नी त्रिगुणातिता ।
सर्व प्रवर्तको रूप स्वरुपा नमो ॥ १७ ॥

मी आपल्या त्रिगुणातीत सदाशिव स्वरूपाला आणि सत्वगुणाने युक्त अशा शांत स्वरूपाला नमस्कार करीत आहे. मी आपल्या रजोगुणयुक्त सर्वप्रवर्तक स्वरूपाला तसेच तमोगुणयुक्त अघोर स्वरुपालाही नमस्कार करीत आहे.”(१७)


सूत उवाच -
एवं स्तुतः स भगवान् आदिदेवः सतां गतिः ।
परितुष्टः प्रसन्नात्मा प्रहसन् तं अभाषत ॥ १८ ॥
सूत सांगतात -
स्तविता मुनिने ऐसे भगवान् शिवशंकर ।
अत्यंत तोषले चित्ती हांसोनी बोलु लागले ॥ १८ ॥

सूत म्हणतात - मार्कंडेयाने संतांचे परम आश्रय असलेल्या देवाधिदेव भगवान शंकरांची अशी स्तुती केली, तेव्हा ते त्याच्यावर अत्यंत संतुष्ट झाले आणि अतिशय प्रसन्न चित्ताने हसत हसत त्याला म्हणाले. (१८)


श्रीभगवानुवाच -
वरं वृणीष्व नः कामं वरदेशा वयं त्रयः ।
अमोघं दर्शनं येषां मर्त्यो यद् विन्दतेऽमृतम् ॥ १९ ॥
भगवान् शंकर म्हणाले -
विष्णु ब्रह्मा तसा मीही वरदेश्वर हो तिघे ।
मर्त्या अमृतही देतो म्हणोनी वर मागणे ॥ १९ ॥

भगवान शंकर म्हणाले - ब्रह्मदेव, विष्णू व मी असे आम्ही तिघेही वर देणार्‍यांचे स्वामी आहोत. आमचे दर्शन कधीही व्यर्थ जात नाही. आमच्याकडूनच मरणशील मनुष्यसुद्धा अमृतत्वाची प्राप्ती करून घेतो. म्हणून तुझी जी इच्छा असेल, तो वर माझ्याकडून मागून घे. (१९)


ब्राह्मणाः साधवः शान्ता निःसङ्‌गा भूतवत्सलाः ।
एकान्तभक्ता अस्मासु निर्वैराः समदर्शिनः ॥ २० ॥
द्विज तो साधुनी शांत लोकार्थ कष्ट सोशिती ।
विशेषता तयांची ती आमुचे प्रेमिभक्त ते ॥ २० ॥

ब्राह्मण सच्छील, शांतचित्त, अनासक्त, प्राण्यांवर प्रेम करणारे, कोणाशी वैर न करणारे, समदर्शी आणि आमचे निःसीम भक्त असतात. (२०)


सलोका लोकपालास्तान् वन्दन्त्यर्चन्त्युपासते ।
अहं च भगवान् ब्रह्मा स्वयं च हरिरीश्वरः ॥ २१ ॥
पूजिती वंदिती विप्रां लोक नी लोकपाल ते ।
प्रत्यक्ष विष्णु नी ब्रह्मा सेवेत राहती सदा ॥ २१ ॥

सगळे लोक आणि लोकपाल अशा ब्राम्हणांना वंदन करून त्याची पूजा-उपासना करतात. मी, भगवान ब्रह्मदेव व भगवान विष्णूसुद्धा त्यांचा आदर करतात. (२१)


न ते मय्यच्युतेऽजे च भिदामण्वपि चक्षते ।
नात्मनश्च जनस्यापि तद् युष्मान् वयमीमहि ॥ २२ ॥
तुम्ह्या नी आमुच्या मध्ये जीवात भेद ना मुळी ।
आत्मा तो सर्व देहात संतां तेणेचि पूजितो ॥ २२ ॥

असे महापुरूष, मी, विष्णू, ब्रह्मदेव, आपण स्वतः आणि सर्व जीव यांच्यामध्ये जराही भेद पाहात नाहीत. म्हणून आम्ही तुम्हासारख्या महात्म्यांची स्तुती करतो. (२२)


न ह्यम्मयानि तीर्थानि न देवाश्चेतनोज्झिताः ।
ते पुनन्ति उरुकालेन यूयं दर्शनमात्रतः ॥ २३ ॥
न तीर्थ जळ ते थोडे जड मूर्ती न देवता ।
तीर्थ नी देव ते संत दर्शने लाभ होतसे ॥ २३ ॥

केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे. फक्त जड मूर्तीच देवता नव्हेत. कारण तीर्थ आणि देवता पुष्कळ दिवसांनंतर पवित्र करतात, परंतु तुम्ही मात्र दर्शनानेच पवित्र करतात. (२३)


ब्राह्मणेभ्यो नमस्यामो येऽस्मद् रूपं त्रयीमयम् ।
बिभ्रत्यात्मसमाधान तपःस्वाध्यायसंयमैः ॥ २४ ॥
आम्ही तो नमितो विप्रां आमुचे वेदरूपि ते ।
एकाग्रे तप स्वाध्याये योगे ध्याने नि धारण ॥ २४ ॥

आम्ही ब्राम्हणांनाच नमस्कार करतो. कारण ते चित्ताची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ज्ञान आणि समाधीच्याद्वारे आमचे वेदमय रूप धारण करतात. (२४)


श्रवणाद् दर्शनाद् वापि महापातकिनोऽपि वः ।
शुध्येरन् अन्त्यजाश्चापि किमु संभाषणादिभिः ॥ २५ ॥
तरती पापिही थोर संतांच्या दर्शने तुम्हा ।
बोलता सान्निधी जाता न संशय तयात तो ॥ २५ ॥

महापापी आणि अंत्यजसुद्धा तुम्हासारख्या महापुरूषांचे चरित्रश्रवण आणि दर्शनानेच शुद्ध होतात, तर मग तुमच्याशी संभाषण, सहवास इत्यादींनी ते शुद्ध होतील, यात काय संशय ? (२५)


सूत उवाच -
इति चन्द्रललामस्य धर्मगुह्योपबृंहितम् ।
वचोऽमृतायनं ऋषिः नातृप्यत् कर्णयोः पिबन् ॥ २६ ॥
सूत सांगतात -
धर्मगुह्य अशा शब्दे बोलले चंद्र भूषण ।
सुधाधिपूर्ण ते शब्द ऐकता नच तृप्ति हो ॥ २६ ॥

सूत म्हणतात - चंद्रभूषण भगवान शंकरांचे धर्माच्या रहस्याने परिपूर्ण असे अमृतमय बोलणे कानांनी अत्यंत तन्मयतेने ऐकून मुनीची तृप्ती होत नव्हती. (२६)


स चिरं मायया विष्णोः भ्रामितः कर्शितो भृशम् ।
शिववागमृतध्वस्त क्लेशपुञ्जस्तमब्रवीत् ॥ २७ ॥
विष्णुमायीं भ्रमोनीया थकले बहु ते मुनी ।
शिवशब्दांमृते क्लेश संपता बोलले तयां ॥ २७ ॥

भगवंतांच्या मायेने पुष्कळ काळापर्यंत भटकल्याने तो अतिशय थकला होता. आता शंकरांच्या वाणीरूप अमृताचे प्राशन केल्याने त्याचे सर्व क्लेश नाहीसे झाले. तो त्यांना म्हणाला. (२७)


श्रीमार्कण्डेय उवाच -
अहो ईश्वरलीलेयं दुर्विभाव्या शरीरिणाम् ।
यन्नमन्तीशितव्यानि स्तुवन्ति जगदीश्वराः ॥ २८ ॥
मार्कंडेय म्हणाले -
अहो ती ईश्वरी लीला न कळे देहधारिया ।
जगाचे स्वामिची होता मज ऐशास वंदिती ॥ २८ ॥

मुनी म्हणाला- भगवंतांची ही लीला माणसांच्या आकलनशक्तीच्या पलीकडची आहे. कारण आपल्यासारखे सगळ्या जगाचे स्वामी असूनही ते त्यांच्या अधीन असणार्‍या आमच्यासारख्या पामरांना वंदन करून त्यांची स्तुती करतात. (२८)


धर्मं ग्राहयितुं प्रायः प्रवक्तारश्च देहिनाम् ।
आचरन्ति अनुमोदन्ते क्रियमाणं स्तुवन्ति च ॥ २९ ॥
धर्माचे भाष्य नी गुह्य-स्वरूप अनुमोदिता ।
आचरिती तसे धर्मा तयां ते हे प्रशंसिती ॥ २९ ॥

धर्माविषयी सांगणारे, साधारणतः प्राण्यांना धर्माचे रहस्य आणि स्वरुप समजावून सांगण्यासाठी धर्मानुसार आचरण करतात आणि त्यालाच दुजोरा देतात. तसेच जो कोणी धर्माचे आचरण करीत असेल, त्याची प्रशंसा करतात. (२९)


नैतावता भगवतः स्वमायामयवृत्तिभिः ।
न दुष्येतानुभावस्तैः मायिनः कुहकं यथा ॥ ३० ॥
जादुगार जसा खेळ दाविता राहि वेगळा ।
वंदिता संत तै तुम्ही न कांही त्रुटी होतसे ॥ ३० ॥

जादुगार ज्याप्रमाणे पुष्कळ खेळ दाखवितो, पण त्या खेळांमुळे त्याच्या प्रभावात काही उणेपणा येत नाही, त्याचप्रमाणे आपण आपल्या मायामय वर्तनाने कुणाची वंदन-स्तुती केली, तरी त्यामुळे आपला महिमा कमी होत नाही. (३०)


सृष्ट्वेदं मनसा विश्वं आत्मनानुप्रविश्य यः ।
गुणैः कुर्वद्‌भिराभाति कर्तेव स्वप्नदृग् यथा ॥ ३१ ॥
स्वप्नदृष्ट्यापरी त्म्ही मनाने सृष्टि निर्मिली ।
प्रवेशता तिच्यामध्ये निर्गुणा गुण भासती ॥ ३१ ॥

एखाद्या स्वप्न पाहाणार्‍याप्रमाणे आपण आपल्या मनाचेच संपूर्ण विश्वाची निर्मिती केली आणि स्वतः हिच्यामध्ये प्रवेश करून स्वतः कर्ता न होताही, कर्म करणार्‍या गुणांच्या द्वारा कर्त्याप्रमाणे आपण स्वतःला भासवत आहात. (३१)


तस्मै नमो भगवते त्रिगुणाय गुणात्मने ।
केवलायाद्वितीयाय गुरवे ब्रह्ममूर्तये ॥ ३२ ॥
नमोति भगवंताला त्रैगुनी आत्मरूपि या ।
अवितीय अशा ब्रह्मा ज्ञानमूला नमो नमः ॥ ३२ ॥

भगवन ! आपण त्रिगुणस्वरूप असूनही त्यांचा आत्मा आहात. केवल, अद्वितीय, ब्रह्मस्वरूप गुरू आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. (३२)


कं वृणे नु परं भूमन् वरं त्वद् वरदर्शनात् ।
यद्दर्शनात्पूर्णकामः सत्यकामः पुमान् भवेत् ॥ ३३ ॥
अनंता श्रेष्ठ ते काय तुमच्या दर्शनाहुनी ।
दर्शने पूर्णकामो नी सत्य संकल्प होतसे ॥ ३३ ॥

हे अनंता ! आपल्या श्रेष्ठ दर्शनाखेरीज मी आपणाकडून दुसरा कोणता वर मागून घेऊ ? आपल्या दर्शनानेच माणसाच्या सर्व कामना पूर्ण होऊन तो सत्यसंकल्प होतो. (३३)


वरमेकं वृणेऽथापि पूर्णात् कामाभिवर्षणात् ।
भगवति अच्युतां भक्तिं तत्परेषु तथा त्वयि ॥ ३४ ॥
भक्तांच्या कामना पूर्ण करिता भगवान तुम्ही ।
वर मी मागतो एक देवभक्ती रमो मन ॥ ३४ ॥

स्वतः परिपूर्ण असून भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणार्‍या आपल्याकडे मी एक वरदान मागतो. ते हे की, आपल्या ठिकाणी व आपल्या शरणागत भक्तांच्या ठिकाणी माझी अचल भक्ती असावी. (३४)


सूत उवाच -
इत्यर्चितोऽभिष्टुतश्च मुनिना सूक्तया गिरा ।
तं आह भगवान् शर्वः शर्वया चाभिनन्दितः ॥ ३५ ॥
सूत सांगतात -
मुनिंनी ऐकता वाणी शंकतां पूजिले असे ।
उमेची प्रेरणा होता बोलले शिवे ते पुन्हा ॥ ३५ ॥

सूत म्हणतात - मार्कंडेय मुनीने आपल्या सुमधुर वाणीने जेव्हा भगवान शंकरांची अशी स्तुती आणि पूजा केली. तेव्हा त्यांनी पार्वतीच्या प्रेरणेने त्याला म्हटले. (३५)


कामो महर्षे सर्वोऽयं भक्तिमान् त्वं अमधोक्षजे ।
आकल्पान्ताद् यशः पुण्यं अमजरामरता तथा ॥ ३६ ॥
कामना पूर्ण हो विप्रा लाभेल भक्ति ती तशी ।
कल्पांत यश ते होऊ अजरामर हो पहा ॥ ३६ ॥

महर्षे ! तुझ्या सर्व कामना पूर्ण होवोत ! परमात्म्याच्या ठिकाणी तुझी अनन्य भक्ती राहो. कल्पांतापर्यंत तुझे पवित्र यश राहो आणि तू अजर आणि अमर हो. (३६)


ज्ञानं त्रैकालिकं ब्रह्मन् विज्ञानं च विरक्तिमत् ।
ब्रह्मवर्चस्विनो भूयात् पुराणाचार्यतास्तु ते ॥ ३७ ॥
अक्षुण्ण ब्रह्मतेजो हो त्रिकालज्ञ असेचि ते ।
विशेष ज्ञान लाभेल वैराग्य स्थिति होय नी ।
स्वरूपस्थित् लाभोनी पुराणाचार्य हो तसा ॥ ३७ ॥

ब्रह्मन ! ब्रह्मतेज धारण करणार्‍या तुला तिन्ही काळातील ज्ञान असो. वैराग्ययुक्त विज्ञानही प्राप्त होवो. तसेच तू पुराणांचाही आचार्य हो. (३७)


सूत उवाच -
एवं वरान् स मुनये दत्त्वागात् त्र्यक्ष ईश्वरः ।
देव्यै तत्कर्म कथयन् अनुभूतं पुरामुना ॥ ३८ ॥
वर देवोनिया ऐसा तयांच्या प्रलया तसे ।
उमेसी सांगता गेले निघोनी ते त्रिलोचन ॥ ३८ ॥

सूत म्हणतात - त्रिलोचन भगवान शंकर, अशा प्रकारे मार्कंडेयाला वर देऊन मार्कंडेय मुनीची तपश्चर्या व त्याचे प्रलयासंबंधीचे अनुभव भगवती पार्वतीला सांगत, तेथून निघून गेले. (३८)


सोऽप्यवाप्तमहायोग महिमा भार्गवोत्तमः ।
विचरति अधुनाप्यद्धा हरावेकान्ततां गतः ॥ ३९ ॥
महायोगाचिये ऐसे मार्कंडेयास ते फळ ।
लाभले लाभली भक्ती फिरती पृथिवीवरी ॥ ३९ ॥

भृगुवंश-शिरोमणी मार्कंडेय मुनीला त्याच्या महायोगाचे परम फल प्राप्त झाले. तो भगवंतांचा अनन्य भक्त अजूनही पृथ्वीवर विहार करीत आहे. (३९)


अनुवर्णितमेतत्ते मार्कण्डेयस्य धीमतः ।
अनुभूतं भगवतो मायावैभवमद्‌भुतम् ॥ ४० ॥
ज्ञानसंपन्न त्या विप्रे योगमायेसि जाणिले ।
सर्व ते आपणा मी हे आत्ताच बोललो असे ॥ ४० ॥

ज्ञान संपन्न मार्कंडेय मुनीने, भगवंतांच्या योगमायेची जी अद्‍भुत लीला अनुभवली. ती मी वर्णन करून सांगितली. (४०)


एतत् केचिद् अविद्वांसो मायासंसृतिरात्मनः ।
अनाद्यावर्तितं नॄणां कादाचित्कं प्रचक्षते ॥ ४१ ॥
जाणिले प्रलया ते तो माया वैभवची असे ।
तात्कालिक असे होते न ते साधारणो मुळी ॥ ४१ ॥

मार्कंडेय मुनीने हा जो अनेक कल्पांचा अनुभव घेतला, तो म्हणजे मार्कंडेयाला दाखविण्यासाठी भगवंतांनी मायेने केलेली तात्पुरती लीला होती. तो खरा प्रलय नव्हता. हे जाणून न घेताच काही अज्ञानी लोक अनादिकाळापासून वारंवार होत असणरा हा प्रलय होय, असे म्हणतात. (४१)


(वंशस्था)
य एवमेतद्‌भृगुवर्य वर्णितं
     रथाङ्‌गपाणेः अनुभावभावितम् ।
संश्रावयेत् संश्रृणुयादु तावुभौ
     तयोर्न कर्माशयसंसृतिर्भवेत् ॥ ४२ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
द्वादशस्कन्धे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
( इंद्रवज्रा )
मी वर्णिली ही भृगुवंशि गाथा
     माया हरीची महिमानपूर्ण ।
जे ऐकती कीर्तनि गाति जे ते
     त्यांचे तुटे हो भव भेय सर्व ॥ ४२ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

हे भृगुश्रेष्ठा ! मी आपल्याला हे जे मार्कंडेयचरित्र ऐकविले, ते भगवान चक्रपाणींचा प्रभाव आणि महिमा यांनी भरलेले आहे. जे याचे श्रवण आणि कीर्तन करतात, ते दोघेही कर्म-वासनांमुळे प्राप्त होणार्‍या जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून मुक्त होतात. (४२)


स्कन्द बारावा - अध्याय दहावा समाप्त

GO TOP