श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द बारावा
नवमोऽध्यायः

मार्कण्डेयकर्तृकं भगवन् मायानिर्मित महाप्रलय लीलादर्शनम् -

मार्कण्डेयाला मायेचे दर्शन -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच –
(अनुष्टुप्)
संस्तुतो भगवानित्थं मार्कण्डेयेन धीमता ।
नारायणो नरसखः प्रीत आह भृगूद्वहम् ॥ १ ॥
सूत सांगतात -
( अनुष्टुप् )
स्तविता हगवंताते बुद्धिमान् ऋषिने असे ।
नर नारायणो प्रीय हर्षोनी बोलले तयां ॥ १ ॥

सूत म्हणतात - बुद्धिमान मार्कंडेयाने जेव्हा अशी स्तुती केली, तेव्हा प्रसन्न होऊन नरासह असलेले भगवान नारायण मार्कंडेयाला म्हणाले. (१)


श्रीभगवानुवाच -
भो भो ब्रह्मर्षिवर्योऽसि सिद्ध आत्मसमाधिना ।
मयि भक्त्यानपायिन्या तपःस्वाध्यायसंयमैः ॥ २ ॥
भगवान नारायण म्हणाले -
अहो ब्रह्मर्षि सन्मान्य तुमचे तप ध्यान नी ।
स्वाध्याय संयमे माझी भक्ति ती सिद्ध जाहली ॥ २ ॥

भगवान नारायण म्हणाले - “हे श्रेष्ठ ब्रह्मर्षे ! चित्ताची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, संयम आणि माझी अनन्य भक्ती यांद्वारे तू सिद्ध झाला आहेस. (२)


वयं ते परितुष्टाः स्म त्वद्‌बृहद्‌व्रतचर्यया ।
वरं प्रतीच्छ भद्रं ते वरदेशादभीप्सितम् ॥ ३ ॥
ब्रह्मचर्यव्रते तुम्हा पसन्न जाहलो अम्ही ।
मागणे वर तो देतो कल्याण तुमचे असो ॥ ३ ॥

तुझ्या ह्या नैष्ठिक ब्रह्मचर्यामुळे आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत. तुझे कल्याण असो ! वर देणार्‍या सर्वांचा मी स्वामी आहे; म्हणून तुला इच्छित असणारा वर तू माझ्याकडून मागून घे." (३)


श्रीऋषिरुवाच -
जितं ते देवदेवेश प्रपन्नार्तिहराच्युत ।
वरेणैतावतालं नो यद्‌ भवान् समदृश्यत ॥ ४ ॥
मार्कंडेय मुनि म्हणाले -
जय हो देवदेवेशा भक्तांचे भय हारिता ।
पाहता तुमच्या पाया धन्य मी पूर्ण जाहलो ॥ ४ ॥

मार्कंडेय म्हणाला - हे देवदेवेशा ! शरणागतांचे भय नाहिसे करणार्‍या हे अच्युता ! आपला जयजयकार असो ! आपण स्वतः दर्शन दिलेत, एवढा एकच वर आम्हांला पुरेसा आहे. (४)


गृहीत्वाजादयो यस्य श्रीमत् पादाब्जदर्शनम् ।
मनसा योगपक्वेन स भवान् मेऽक्षगोचरः ॥ ५ ॥
ब्रह्माशंकर आदि ते एकाग्रे योग साधुनी ।
दर्शने तृप्त ते होती तेरूप मज दाविले ॥ ५ ॥

ब्रह्मदेव इत्यादी देवगण योगाने परिपक्व झालेल्या मनानेच ज्यांच्या परम-सुंदर श्रीचरणकमलांचे दर्शन घेतात, तेच आपण आज माझ्या डोळ्यांसमोर प्रगट झालात. (५)


अथाप्यम्बुजपत्राक्ष पुण्यश्लोकशिखामणे ।
द्रक्ष्ये मायां यया लोकः सपालो वेद सद्‌भिदाम् ॥ ६ ॥
तरीही पद्मपत्राक्षा आज्ञा मानोनि मागतो ।
माया ती इच्छितो पाहू ब्रह्मादी भ्रमती जयी ॥ ६ ॥

हे पवित्रकीर्ति-शिरोमणी ! कमलनयना ! असे असूनही, मी आपल्याकडे वर मागतो. जिला मोहित होऊन सर्व लोक आणि लोकपाल अद्वितीय वस्तू असलेल्या ब्रह्मामध्ये अनेक प्रकारचे भेद पाहू लागतात, ती आपली माया मी पाहू इच्छितो. (६)


सूत उवाच -
इतीडितोऽर्चितः कामं ऋषिणा भगवान् मुने ।
तथेति स स्मयन् प्रागाद् बदर्याश्रममीश्वरः ॥ ७ ॥
सूतजी सांगतात -
पूजोनी भगवम्ताला मागता वर हा असा ।
हासोनी वदुनी ठीक पातले बद्रिकाश्रमी ॥ ७ ॥

सूत म्हणतात - शौनका ! मार्कंडेय मुनीने जेव्हा अशा प्रकारे भगवान नर-नारायणांच्या इच्छेनुसार त्यांची स्तुती व पूजा केली आणि वर मागितला, तेव्हा हसून ते म्हणाले,‘ठीक आहे.’ यानंतर ते बदरीवनात आपल्या आश्रमाकडे गेले. (७)


तमेव चिन्तयन्नर्थं ऋषिः स्वाश्रम एव सः ।
वसन् अग्न्यर्कसोमाम्बु भूवायुवियदात्मसु ॥ ८ ॥
ध्यायन् सर्वत्र च हरिं भावद्रव्यैरपूजयत् ।
क्वचित् पूजां विसस्मार प्रेमप्रसरसम्प्लुतः ॥ ९ ॥
पाहती मुनि ती वात विश्वाते पूजिती मनीं ।
चंद्रमा सूर्य अग्नी नी पंचभूतासही तसे ॥ ८ ॥
प्रेमाचा पूर तो येई कधी ते पोहती तयीं ।
आठवे न कधी त्यांना पूजिणे भगवान् कसा ॥ ९ ॥

मार्कंडेय मुनी आपल्या आश्रमात राहून आपल्याला मायेचे दर्शन केव्हा होईल, या एकाच गोष्टीचे चिंतन करीत असे. तो अग्नी, सूर्य, चंद्र, जल, पृथ्वी, वायू, आकाश तसेच अंतःकरणामध्ये एवढेच नव्हे तर सगळीकडे भगवंतांचेच चिंतन करीत मानसिक वस्तूंनी त्यांची पूजा करीत असे. कधी-कधी तर प्रेमाच्या पुरात बुडून जाऊन भगवंतांची पूजा विसरे. (८-९)


तस्यैकदा भृगुश्रेष्ठ पुष्पभद्रातटे मुनेः ।
उपासीनस्य सन्ध्यायां ब्रह्मन् वायुरभून्महान् ॥ १० ॥
एकदा सांध्य वेळेला पुश्पभद्रा तटास ते ।
तन्मयी द्विज तै होता वारा तो सुटला बहू ॥ १० ॥

हे शौनका ! एके दिवशी संध्याकळच्या वेळी, पुष्पभद्रा नदीच्या तीरावर मार्कंडेय मुनी भगवंतांची उपासना करीत असता अचानक जोरदार तुफान आले. (१०)


(मिश्र-११)
तं चण्डशब्दं समुदीरयन्तं
     बलाहका अन्वभवन् करालाः ।
अक्षस्थविष्ठा मुमुचुस्तडिद्‌भिः
     स्वनन्त उच्चैरभि वर्षधाराः ॥ ११ ॥
( इंद्रवज्रा )
वार्‍यात मोठ्या भयभीत नादे
     विक्राळ आले ढग ते भरोनी ।
कडाडल्या त्याहि विजा नभात
     आखा परी त्या पदल्याहि धारा ॥ ११ ॥

त्यावेळी तो वारा भयंकर आवाज करू लागला, त्या मागोमाग अक्राळ विक्राळ ढग आकाशात दिसू लागले. चमकणार्‍या विजा कडाडू लागल्या आणि रथाच्या धुर्‍याएवढ्या पावसाच्या मोठमोठ्या धारा पृथ्वीवर कोसळू लागल्या. (११)


ततो व्यदृश्यन्त चतुः समुद्राः
     समन्ततः क्ष्मातलमाग्रसन्तः ।
समीरवेगोर्मिभिरुग्रनक्र
     महाभयावर्तगभीरघोषाः ॥ १२ ॥
न एवढेची दिसला समुद्र
     गिळोनि आला पृथिवीस सार्‍या ।
प्रचंड लाटा भवरे ब्यान
     नी नक्र त्याशी उसळोनि आले ॥ १२ ॥

त्यावेळी मार्कंडेयाला असे दिसू लागले की, चारही बाजूंनी चारही समुद्र सगळी पृथ्वीच गिळू लागले आहेत. वार्‍याच्या वेगाने समुद्रात प्रचंड लाटा उसळू लागल्या आहेत, मोठमोठे भोवरे उत्पन्न झाले आहेत आणि भयंकर आवाजामुळे कानठळ्या बसत आहेत. भयानक मगर ठिकठिकाणी उसळ्या मारीत आहेत. (१२)


(मिश्र-१२)
अन्तर्बहिश्चाद्‌भिरतिद्युभिः खरैः
     शतह्रदाभिरुपतापितं जगत् ।
चतुर्विधं वीक्ष्य सहात्मना मुनिः
     जलाप्लुतां क्ष्मां विमनाः समत्रसत् ॥ १३ ॥
पाणीच पाणी दिसले तसे ते
     न राहि पृथ्वी बुडलाहि स्वर्ग ।
वारा विजेने भयभीत विश्व
     नी सर्व प्राणी बुडले तयात ।
पानीच पाणी बघुनी उदास
     सवेचि झाले भयभीत विप्र ॥ १३ ॥

त्यावेळी आत-बाहेर सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले. त्या अपार पाण्यामध्ये स्वर्गसुद्धा बुडून जाऊ लागला आहे. वरून प्रचंड वारा वाहात आहे आणि विजा चमकत आहेत की, ज्यामुळे सगळे जगच संत्रस्त झाले आहे. मार्कंडेय मुनीने जेव्हा असे पाहिले की, या जलप्रलयात सगळी पृथ्वी बुडून गेली आहे, चारही प्रकारचे प्राणी आणि आपण स्वतःसुद्धा अतिशय व्याकूळ झालो आहोत, तेव्हा मात्र तो भयभीत झाला. (१३)


तस्यैवमुद्वीक्षत ऊर्मिभीषणः
     प्रभञ्जनाघूर्णितवार्महार्णवः ।
आपूर्यमाणो वरषद्‌भिरम्बुदैः
     क्ष्मामप्यधाद् द्वीपवर्षाद्रिभिः समम् ॥ १४ ॥
वेगात वारा सुटला तदा नी
     वृष्टीत आली भरती समुद्रा ।
नी पाहती की द्विप पर्वते नी
     पृथ्वी तया माजिहि ती बुडाली ॥ १४ ॥

त्याच्या समोरच प्रलयसमुद्रामध्ये प्रचंड लाटा उसळत होत्या. तुफानाच्या वेगाने पाणी उसळत होते आणि प्रलयकालीन ढग पाऊस पाडून पाडून समुद्राला पाण्याने आणखीनच भरून टाकीत होते. समुद्राने द्विप, वर्ष आणि पर्वतांसह सगळी पृथ्वीच बुडवून टाकली होती. (१४)


सक्ष्मान्तरिक्षं सदिवं सभागणं
     त्रैलोक्यमासीत् सह दिग्भिराप्लुतम् ।
स एक एवोर्वरितो महामुनिः
     बभ्राम विक्षिप्य जटा जडान्धवत् ॥ १५ ॥
नक्षत्र तारे बुडल्या दिशाही
     नी ते स्वता एकचे वाचले की ।
वेड्या नि अंधापरि धावले तै
     ते वाचवाया अपुलेच प्राण ॥ १५ ॥

पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, ज्योतिर्मंडल आणि दिशांसह तिन्ही लोक पाण्यात बुडून गेले. त्यावेळी तो वेड्याप्रमाणे किंवा आंधळ्याप्रमाणे जटा पसरून इकडून तिकडे भटकत होता. (१५)


क्षुत्तृट्परीतो मकरैस्तिमिङ्‌गिलैः
     उपद्रुतो वीचिनभस्वताहतः ।
तमस्यपारे पतितो भ्रमन् दिशो
     न वेद खं गां च परिश्रमेषितः ॥ १६ ॥
भाकूळले ते मग भूक तृष्णे
     तोडावया धावति नक्र अंगा ।
वारा कधी त्या ढकलीत लाता
     अज्ञान दाटे स्मृति ना उरे ती ॥ १६ ॥

तो तहान-भुकेने व्याकूळ झाला होता. एका बाजूने मगरी तर दुसरीकडून मोठमोठे मासे त्याच्यावर तुटून पडत होते. एकीकडून वार्‍याचे झोत तर दुसरीकडून लाटांचे तडाखे त्याला घायाळ करीत. अशा प्रकारे भटकत असता तो अंधकारात पडला. तो इतका थकून गेला की, त्याला पृथ्वी आणि आकाश यांचीसुद्धा जाणीव राहिली नाही. (१६)


(अनुष्टुप्)
क्वचिद् गतो महावर्ते तरलैस्ताडितः क्वचित् ।
यादोभिर्भक्ष्यते क्वापि स्वयं अन्योन्यघातिभिः ॥ १७ ॥
( अनुष्टुप् )
भोवर्‍यात कधी गेले वेगे लातात ही तसे ।
भांडती जलजंतू तै शिकार हेच होत की ॥ १७ ॥

कधी तो मोठ्या भोवर्‍यात सापडे, तर कधी त्याला लाटांचे तडाखे बसत. पाण्यातील प्राणी जेव्हा कधी एकमेकांवर आक्रमण करीत, तेव्हा हा अचानकपणे त्यांची शिकार होई. (१७)


क्वचिच्छोकं क्वचिन्मोहं क्वचिद् दुखं सुखं भयम् ।
क्वचित् मृत्युं अवाप्नोति व्याध्यादिभिरुतार्दितः ॥ १८ ॥
कधी शोक कधी मोह कधी दुःख सुखो भय ।
मरती कधी ते त्यांना रोगाने ग्रासिले असे ॥ १८ ॥

तो कधी शोकग्रस्त होई तर कधी मोहग्रस्त होई ! त्याला कधी दुःख तर कधी भय उत्पन्न होई. कधी मृत्यू येई, तर कधी निरनिराळ्या प्रकारचे रोग त्रासून सोडीत. (१८)


अयुतायतवर्षाणां सहस्राणि शतानि च ।
व्यतीयुर्भ्रमतः तस्मिन् विष्णुमायावृतात्मनः ॥ १९ ॥
विष्णुच्या मोह मायेने पडले चक्रि या अशा ।
करोडो वर्ष ते गेले जळाच्या प्रलयात त्या ॥ १९ ॥

अशा प्रकारे भगवंतांच्या मायेत गुरफटून त्या प्रलयकाळच्या समुद्रात भटकता भटकता त्याची शेकडो, हजारो, नव्हे तर लक्षावधी, कोट्यावधी वर्षे निघून गेली. (असे त्याला वाटले.) (१९)


स कदाचिद्‌ भ्रमन् तस्मिन् पृथिव्याः ककुदि द्विजः ।
न्याग्रोधपोतं ददृशे फलपल्लव शोभितम् ॥ २० ॥
जळात भ्रमता ऐसे दिसला वटवृक्ष तो ।
शोभली तै फळे लाल पानीं त्या हिरव्या अशा ॥ २० ॥

मार्कंडेय अशा प्रकारे भटकत असता एकदा त्याला पृथ्वीच्या एका उंबरठ्यावर एक लहानसे वडाचे झाड दिसले. त्यावर पाने आणि फळे शोभून दिसत होती. (२०)


प्राग्‌उत्तरस्यां शाखायां तस्यापि ददृशे शिशुम् ।
शयानं पर्णपुटके ग्रसन्तं प्रभया तमः ॥ २१ ॥
वृक्षी ईशान्यिसी फांदी द्रोणाच्या परि पान तै ।
प्रकाशमान ची बाळ अंधार तेथ तो नसे ॥ २१ ॥

वडाच्या झाडाच्या ईशान्येला एक डहाळी होती. तिच्यावर द्रोणाच्या आकाराचे एक पान होते. त्यावर एक बालक पहुडला होता. त्याच्या शरीरातून बाहेर पडणार्‍या तेजाने आसपासचा अंधार नाहीसा झाला होता. (२१)


महामरकतश्यामं श्रीमद् वदनपङ्‌कजम् ।
कम्बुग्रीवं महोरस्कं सुनासं सुन्दरभ्रुवम् ॥ २२ ॥
सावळा रंग तो त्याचा सौंदर्य मुखि शोभले ।
शंखाच्या परि ती मान भुवया नाक सुंदर ॥ २२ ॥

तो बालक पाचूच्या खड्यासारखा सावळ्या वर्णाचा होता. मुखकमल सौंदर्यसंपन्न होते. मान शंखासारखी होती. छाती रूंद होती. सुंदर नाक होते आणि भुवया अतिशय मनोहर होत्या. (२२)


श्वासैजदलकाभातं कम्बुश्रीकर्णदाडिमम् ।
विद्रुमाधरभासेषत् शोणायित सुधास्मितम् ॥ २३ ॥
कुरुळे केस ते छान हलती श्वास घेइ तै ।
डाळिंबपुष्प ते कर्णीं ओथ ते पोवळ्या परी ॥ २३ ॥

श्वासाने त्याचे कुरळे केस हलत होते. शंखाप्रमाणे असलेल्या कानांवर डाळिंबाची फुले शोभून दिसत होती. पोवळ्याप्रमाणे असणार्‍या लाल ओठांच्या कांतीने अमृतासारखे शुभ्र हास्य थोडेसे लालसरसे दिसत होते. (२३)


पद्मगर्भारुणापाङ्‌गं हृद्यहासावलोकनम् ।
श्वासैजद्‌बलिसंविग्न निम्ननाभिदलोदरम् ॥ २४ ॥
नेत्रात लालिमा चान गंभीर नाभि त्याजला ।
अश्वत्थपूर्ण जै पोट श्वासाने नाभि ती हले ॥ २४ ॥

डोळ्यांच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या. हास्ययुक्त नजर मनोहारी होती. खोल नाभी असलेले इवलेसे पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होते आणि श्वास घेताना त्यावरील वळ्या हलत होत्या. (२४)


चार्वङ्‌गुलिभ्यां पाणिभ्यां उन्नीय चरणाम्बुजम् ।
मुखे निधाय विप्रेन्द्रो धयन्तं वीक्ष्य विस्मितः ॥ २५ ॥
अंगठ्या सान बोटात दो हाते एक पाय तो ।
धरोनी अंगठा चोखी मुनी विस्मित जाहले ॥ २५ ॥

तो बालक सुंदर बोटे असलेल्या दोन्ही करकमलांनी चरणकमल तोंडात धरून चोखीत होता. हे पाहून मार्कंडेय आश्चर्यचकित झाला. (२५)


(मिश्र-१२)
तद्दर्शनाद् वीतपरिश्रमो मुदा
     प्रोत्फुल्लहृत्पद्मविलोचनाम्बुजः ।
प्रहृष्टरोमाद्‌भुतभावशङ्‌कितः
     प्रष्टुं पुरस्तं प्रससार बालकम् ॥ २६ ॥
( इंद्रवज्रा )
पाहिनि गेला श्रम सर्व त्यांचा
     त्या दिव्य बाळ बघता मुनीचा ।
रोमांचले सर्वचि अंग त्यांचे
     पुसावया ते शिशुपासि आले ॥ २६ ॥

त्याला पाहाताच मुनीचा सर्व थकवा नाहीसा झाला. आनंदाने त्याचे ह्रदयकमल आणि नेत्रकमल प्रफुल्लित झाले. शरीर पुलकित झाले. त्या बालकाचे भाव पाहून “हा कोण आहे?” इत्यादी निरनिराळ्या शंका त्याच्या मनात उत्पन्न झाल्या आणि त्यालाच हे विचारावे, म्हणून तो त्याच्याकडे पुढे सरकला. (२६)


तावच्छिशोर्वै श्वसितेन भार्गवः
     सोऽन्तः शरीरं मशको यथाविशत् ।
तत्राप्यदो न्यस्तमचष्ट कृत्स्नशो
     यथा पुरामुह्यदतीव विस्मितः ॥ २७ ॥
येती न येती जवळी तयाच्या
     तो श्वासि त्याच्या त‍इ आत गेले ।
सृष्टी तिथे पाहिलि सर्व त्यांनी
     जसी तसी ती प्रलयाहि आधी ॥ २७ ॥

इतक्यात त्या बालकाच्या श्वासाबरोबर तो, एखादा डास आत जावा, तसा त्याच्या शरीरात गेला. तेथेही त्याने प्रलयाच्या अगोदर बाहेर जशी सृष्टी पाहिली होती, तशीच ती संपूर्णपणे आत पाहिली. ते पाहून तो अधिकच चकित झाला. त्याला काहीच कळेना ! (२७)


खं रोदसी भागणानद्रिसागरान्
     द्वीपान् सवर्षान् ककुभः सुरासुरान् ।
वनानि देशान् सरितः पुराकरान्
     खेटान् व्रजानाश्रमवर्णवृत्तयः ॥ २८ ॥
महान्ति भूतान्यथ भौतिकान्यसौ
     कालं च नानायुग कल्पकल्पनम् ।
यत्किञ्चिदन्यद् व्यवहारकारणं
     ददर्श विश्वं सदिवावभासितम् ॥ २९ ॥
खं अंतरिक्षो अन ज्योति सर्व
     द्वीपो गिरि वर्ष नि देवता नी ।
नद्या पुरे गाव नि दैत्य खाने
     वर्णाश्रमो नी व्यवहार सारा ॥ २८ ॥
ती प्राणि देहो अन काल तैसा
     जै पूर्वि होते त‍इ सर्व झाले ।
व्यव्हारसंपन्नचि सर्व जीव
     न विश्व तेथे परि भास सत्य ॥ २९ ॥

त्याने त्याच्या शरीरात आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, पर्वत, समुद्र, द्विप, वर्षे, दिशा, देवता, दैत्य, वन, देश, नद्या, नगरे, खाणी, गावे, गौळवाडे, आश्रम, वर्ण, त्यांचे आचार, पंचमहाभूते, त्यांनी बनलेली शरीरे व वस्तू, अनेक युगे आणि कल्प याच्या भेदांनी युक्त असे काल इत्यादी पाहिले. एवढेच नव्हे, तर ज्यामुळे जगाचा व्यवहार चालतो, ते सर्व तेथे खरे असल्यासारखेच होते. (२८-२९)


(मिश्र ११-१२)
हिमालयं पुष्पवहां च तां नदीं
     निजाश्रमं तत्र ऋषीन् अपश्यत ।
विश्वं विपश्यञ्छ्वसिताच्छिशोर्वै
     बहिर्निरस्तो न्यपतल्लयाब्धौ ॥ ३० ॥
हिमालयो पुष्पनदीहि भद्रा
     निजाश्रमोनी मुनि सर्व तेथे ।
प्रत्यक्ष ऐसे बगह्ता शिशूच्या
     उछ्वास योगे प्रलयात आले ॥ ३० ॥

हिमालय पर्वत, तीच पुष्पवहा नदी, आपला आश्रम आणि तेथे राहाणारे ऋषीसुद्धा पाहिले. अशा प्रकारे संपूर्ण विश्व पाहात असतानाच तो त्या बाळाच्या उच्छ्‌वासातून बाहेर आला आणि पुन्हा त्या प्रलय-समुद्रात येऊन पडला. (३०)


(मिश्र-११)
तस्मिन् पृथिव्याः ककुदि प्ररूढं
     वटं च तत्पर्णपुटे शयानम् ।
तोकं च तत्प्रेमसुधास्मितेन
     निरीक्षितोऽपाङ्‌गनिरीक्षणेन ॥ ३१ ॥
नी पाहती ते वटवृक्ष तैसा
     पानावरी तो शिशु झोपलेला ।
प्रेमामृताच्या परिपूर्ण हास्ये
     पाही मुनीसी स्वय नेत्रि बाळ ॥ ३१ ॥

पुन्हा त्याला असे दिसले की, समुद्रामध्ये पृथ्वीच्या एका टेकडावर तेच वडाचे झाड असून त्याच्या पानाच्या द्रोणात तोच बालक पहुडला आहे आणि तो प्रेमामृताने परिपूर्ण असे मंद हास्य करीत आपल्याकडे कटाक्ष टाकीत आहे. (३१)


(अनुष्टुप्)
अथ तं बालकं वीक्ष्य नेत्राभ्यां धिष्ठितं हृदि ।
भ्ययादतिसङ्‌क्लिष्टः परिष्वक्तुं अधोक्षजम् ॥ ३२ ॥
क्रीडता पाहिला बाळ हृदयीं जो विराजला ।
श्रमे आलिंगिण्या त्याला पुढती पातले मुनी ॥ ३२ ॥

बालकाच्या रूपातील इंद्रियातील भगवंतांना मुनीने आपल्या डोळ्यांच्याद्वारे आत नेऊन ह्रदयात स्थिर केले होते. आता त्याला आलिंगन देण्यासाठी मुनी अतिशय कष्टाने पुढे सरकला. (३२)


तावत्स भगवान् साक्षात् योगाधीशो गुहाशयः ।
अन्तर्दधे ऋषेः सद्यो यथेहानीशनिर्मिता ॥ ३३ ॥
योग नी योगियांचेही स्वामी ते हृदयात की ।
मार्कडेय तिथे जाता गुप्त ते बाळ जाहले ।
अभाग्याचा जसा काळ निष्फळे सरतो तसा ॥ ३३ ॥

इतक्यात ते योगांचे अधिपती आणि सर्वांच्या हृदयात राहाणारे भगवान लगेच अंतर्धान पावले. जसे असमर्थ पुरूषांचे परिश्रम फळ न देताच वाया जातात, तसे. (३३)


तमन्वथ वटो ब्रह्मन् सलिलं लोकसम्प्लवः ।
तिरोधायि क्षणादस्य स्वाश्रमे पूर्ववन् स्थितः ॥ ३४ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
द्वादशस्कन्धे मायादर्शनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
अंतर्ध्यान शिशू होता न वृक्ष प्रलयो तसा ।
आश्रमी बैसले ठीक जसे पूर्वी तसेच की ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

हे शौनका ! तो बालक अंतर्धान पावताच ते वडाचे झाड, ते पाणी, तो प्रलयाचा देखावा तर काय, तो पहिल्यासारखाच आपल्या आश्रमात बसलेला आहे. (३४)


स्कन्द बारावा - अध्याय नववा समाप्त

GO TOP