श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द बारावा
षष्ठोऽध्यायः

परीक्षितो देहत्यागः, सर्पसत्रम्, वेदानां शाखविभागश्च -

परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


सूत उवाच –
(वसंततिलका)
एतन्निशम्य मुनिनाभिहितं परीक्षिद्
    व्यासात्मजेन निखिलात्मदृशा समेन ।
तत्पादमूलमुपसृत्य नतेन मूर्ध्ना
    बद्धाञ्जलिस्तमिदमाह स विष्णुरातः ॥ १ ॥
सूत सांगतात -
( वसंततिलका )
हे पाहती सम शुको सगळ्या जिवांना
     नी आत्मरूपि करिती अनुभाव सर्वां ।
हे ऐकिले नरपतें मन लाऊनीया
     पायी झुकोनि कर जोडुनिया म्हणाला ॥ १ ॥

सूत म्हणतात - चराचरात स्वत:ला पाहाणार्‍या आणि समदर्शी व्यासनंदन श्रीशुक मुनींनी सांगितलेले ऐकून परीक्षिताने मस्तक लववून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून तो त्यांना म्हणाला. (१)


राजोवाच –
(अनुष्टुप्)
सिद्धोऽस्मि अनुगृहीतोऽस्मि भवता करुणात्मना ।
श्रावितो यच्च मे साक्षात् अनादिनिधनो हरिः ॥ २ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
भगवन् करुणामूर्ती कृपेने बोलिले लिला ।
बोधाने तुमच्या आता धन्य मी जाहलो पहा ॥ २ ॥

राजा म्हणाला - भगवन ! करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी, अनंत अशा श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्या. आपल्या कृपेने मी कृत्यकृत्य झालो. (२)


नात्यद्‌भुतमहं मन्ये महतां अच्युतात्मनाम् ।
अज्ञेषु तापतप्तेषु भूतेषु यदनुग्रहः ॥ ३ ॥
ज्ञानशून्य असे प्राणी दुःखाने जळती किती ।
बोधिती त्यांजला संत न आश्चर्य स्वभाव तो ॥ ३ ॥

अनेक दु:खांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्यांची कृपा होणे, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, असे मला वाटते. (३)


पुराणसंहितां एतां अश्रौष्म भवतो वयम् ।
यस्यां खलूत्तमःश्लोको भगवान् अनवर्ण्यते ॥ ४ ॥
पुराणसंहिता सर्व मुखीची ऐकिली अम्ही ।
गुण नी हरिच्या लीला गाती ज्या संत कीर्तनी ॥ ४ ॥

ज्या पुराणात भगवान श्रीहरींचे वर्णन केले आहे, ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकले. (४)


भगवन् तक्षकादिभ्यो मृत्युभ्यो न बिभेम्यहम् ।
प्रविष्टो ब्रह्म निर्वाणं अभयं दर्शितं त्वया ॥ ५ ॥
भगवन् शांतीब्रह्मी मी आत्मा ब्रह्मसि पाहिले ।
भिती ना तक्षकादींची अभयी जाहलो पहा ॥ ५ ॥

गुरुवर्य ! आपण मला परम शांतिस्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले. आता मला तक्षक इत्यादी कोणापासूनही मृत्यूचे भय वाटत नाही. (५)


अनुजानीहि मां ब्रह्मन् वाचं यच्छाम्यधोक्षजे ।
मुक्तकामाशयं चेतः प्रवेश्य विसृजाम्यसून् ॥ ६ ॥
आज्ञापा मजला ब्रह्मन् वाचा बंद करावया ।
होईन मुक्त मोहात जाईन श्रेष्ठ त्या पदीं ॥ ६ ॥

ब्रह्मन ! आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करीन. (६)


अज्ञानं च निरस्तं मे ज्ञानविज्ञाननिष्ठया ।
भवता दर्शितं क्षेमं परं भगवतः पदम् ॥ ७ ॥
जाहले ज्ञान विज्ञान अज्ञान नष्टले असे ।
तुम्ही ते दाविले रूप हरीचे क्षेम थोर ते ॥ ७ ॥

आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचे नाहीसे झाले. भगवंतांच्या परम कल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडविला. (७)


सूत उवाच -
इत्युक्तस्तमनुज्ञाप्य भगवान् बादरायणिः ।
जगाम भिक्षुभिः साकं नरदेवेन पूजितः ॥ ८ ॥
सूत म्हणाले -
नृपती वदुनी ऐसे प्रेमाने पूजिता शुकां ।
निरोप घेउनी गेले भिक्षुंच्यासह तेथुनी ॥ ८ ॥

सूत म्हणतात - असे म्हणून राजाने महर्षी श्रीशुकांची पूजा केली. नंतर ते परीक्षिताचा निरोप घेऊन बरोबरीच्या मुनींसह तेथून निघून गेले. (८)


परीक्षिदपि राजर्षिः आत्मनि आत्मानमात्मना ।
समाधाय परं दध्यौ अवस्पन्दासुर्यथा तरुः ॥ ९ ॥
राजाने धारिले ध्यान धारिता अंतरी हरी ।
थांबला श्वास उच्छ्वास वृक्षाचे खोड ज्या परी ॥ ९ ॥

राजर्षी परीक्षितानेसुद्धा स्वत:च अंतरात्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो त्याच्या ध्यानात मग्न झाला. त्यावेळी त्याचा श्वासोच्छ्वासही चालत नव्हता. जणू एखादा वृक्ष असावा, तसा तो भासत होता. (९)


प्राक्कूले बर्हिष्यासीनो गङ्‌गाकूल उदङ्‌मुखः ।
ब्रह्मभूतो महायोगी निःसङ्‌गश्छिन्नसंशयः ॥ १० ॥
गंगातिरी कुशाचे ते पूर्वाभिमुख आसन ।
घातले त्यजिला मोह जाहले परब्रह्मची ॥ १० ॥

तो गंगातीरावर पूर्वेकडे टोके असलेल्या कुशासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याची आसक्ती आणि संशय नाहीसे झाले होते. आता तो ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतारूप महायोगामध्ये स्थिर होऊन ब्रह्मस्वरूप झाला. (१०)


तक्षकः प्रहितो विप्राः क्रुद्धेन द्विजसूनुना ।
हन्तुकामो नृपं गच्छन् ददर्श पथि कश्यपम् ॥ ११ ॥
शृंगीचा शाप तो होता तसा तक्षक पातला ।
कश्यपे पाहिला येता राजाला दंशिण्या तदा ॥ ११ ॥

ऋषींनो ! क्रुद्ध मुनिकुमार श्रृंगीने, परीक्षिताला दंश करण्यासाठी पाठविलेला तक्षक राजाकडे येत असता, वाटेत त्याने कश्यप नावाच्या एका ब्राह्मणाला पाहिले. (११)


तं तर्पयित्वा द्रविणैः निवर्त्य विषहारिणम् ।
द्विजरूपप्रतिच्छन्नः कामरूपोऽदशन्नृपम् ॥ १२ ॥
विषज्ञ् कश्यपा खूप तक्षके धन देउनी ।
लाविले परतोनीया स्वतः द्विजवेष तो ।
घेउनी पातला आणि राजाला दंश घेतला ॥ १२ ॥

सापाचे विष उतरविण्यात तो निष्णात होता. त्याला पुष्कळ धन देऊन तृप्त करून तक्षकाने तेथूनच परत पाठविले. नंतर इच्छेनुसार रूप धारण करू शकणार्‍या तक्षकाने ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाजवळ जाऊन पुन्हा सर्परूप घेऊन त्याला दंश केला. (१२)


ब्रह्मभूतस्य राजर्षेः देहोऽहिगरलाग्निना ।
बभूव भस्मसात् सद्यः पश्यतां सर्वदेहिनाम् ॥ १३ ॥
ब्रह्मात स्थित तो होता दंशाच्या पूर्वि भूपती ।
सर्वांसमक्ष आता तो विषाने भस्म जाहला ॥ १३ ॥

त्या‍आधीच राजर्षी ब्रह्मरूप झाला होता. आता तक्षकाच्या विषाच्या आगीने त्याचे शरीर सर्वांदेखतच तत्काळ जळून भस्म झाले. (१३)


हाहाकारो महान् आसीद्‌ भुवि खे दिक्षु सर्वतः ।
विस्मिता ह्यभवन् सर्वे देवासुरनरादयः ॥ १४ ॥
हळाळल्या दिशा स्र्व आकाश पृथिवी तशी ।
देवता माणसे सर्व स्तिमीत जाहले तदा ॥ १४ ॥

तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये मोठा हाहाकार माजला. परीक्षिताची परमगती पाहून देवता, असुर, माणसे इत्यादी सर्वजण आश्चर्यचकित झाले. (१४)


देवदुन्दुभयो नेदुः गन्धर्वाप्सरसो जगुः ।
ववृषुः पुष्पवर्षाणि विबुधाः साधुवादिनः ॥ १५ ॥
झडल्या दुंदुभी स्वर्गी आपोआपचि त्या तदा ।
गंधर्व अप्सरा गाती देवांनी पुष्प वर्षिले ।
साधु साधु म्हणोनीया देवता त्या प्रशंसिती ॥ १५ ॥

देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. गंधर्व आणि अप्सरा गायन करू लागल्या. "उत्तम, उत्तम" असे म्हणत देव पुष्पवर्षाव करू लागले. (१५)


जन्मेजयः स्वपितरं श्रुत्वा तक्षकभक्षितम् ।
यथाजुहाव सन्क्रुद्धो नागान् सत्रे सह द्विजैः ॥ १६ ॥
पित्याला तक्षके दंश करिता जनमेजय ।
क्रोधला विधिने त्याने केलेसे सर्पसत्र ते ॥ १६ ॥

जनमेजयाने जेव्हा ऐकले की, आपल्या पित्याला तक्षकाने दंश केला, तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला. आणि तो ब्राह्मणांसह विधिपूर्वक अग्निकुंडामध्ये सापांचे हवन करू लागला. (१६)


सर्पसत्रे समिद्धाग्नौ दह्यमानान् महोरगान् ।
दृष्ट्वेन्द्रं भयसंविग्नः तक्षकः शरणं ययौ ॥ १७ ॥
तक्शके पाहिले मोठे अग्नीत सर्व दग्धता ।
भयभीत तये होता इंद्रा शरण पातला ॥ १७ ॥

सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठ-मोठे सर्प भस्मसात होताना पाहून तक्षक भयभीत होऊन इंद्राला शरण गेला. (१७)


अपश्यन् तक्षकं तत्र राजा पारीक्षितो द्विजान् ।
उवाच तक्षकः कस्मान् न दह्येतोरगाधमः ॥ १८ ॥
अनेक जळता सर्प तक्षको नच पातला ।
का न ये पापि तो सर्प पुसले जनमेजये ॥ १८ ॥

तेव्हा अजूनही तक्षक आलेला नाही, असे पाहून राजा जनमेजय ब्राह्मणांना म्हणाला, "तो नीच तक्षक अजून भस्मसात कसा झाला नाही ?" (१८)


तं गोपायति राजेन्द्र शक्रः शरणमागतम् ।
तेन संस्तम्भितः सर्पः तस्मात् नाग्नौ पतत्यसौ ॥ १९ ॥
वदले द्विज ते राजा इंद्राने रक्षिले तया ।
म्हणोनी अग्निकुंडात नच तो पडला असे ॥ १९ ॥

ब्राह्मण म्हणाले, "राजेंद्रा ! शरण आलेल्या तक्षकाचे इंद्र रक्षण करीत आहे. त्याने तक्षकाला स्वत:जवळ स्थिर ठेवलेले असल्याने तो अग्निकुंडात पडत नाही." (१९)


पारीक्षित इति श्रुत्वा प्राहर्त्विज उदारधीः ।
सहेन्द्रस्तक्षको विप्रा नाग्नौ किमिति पात्यते ॥ २० ॥
बुद्धिमान् नृप तो वीर मोठाचि जनमेजय ।
ऋत्विजां वदला जाळा इंद्राच्या सह सर्प तो ॥ २० ॥

ते ऐकून बुद्धिमान जनमेजय ऋत्विजांना म्हणाला, "ब्राह्मणांनो ! आपण इंद्रासह तक्षकाला अग्निकुंडात का आणून टाकीत नाही ?" (२०)


तच्छ्रुत्वाऽऽजुहुवुर्विप्राः सहेन्द्रं तक्षकं मखे ।
तक्षकाशु पतस्वेह सहेन्द्रेण मरुत्वता ॥ २१ ॥
यज्ञकुंडी द्विजांनी तैं इंद्राच्या सह तक्षका ।
आआहिले त्वरे यावे पडावे यज्ञकुंडि या ॥ २१ ॥

ते ऐकून ब्राह्मणांनी त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून इंद्रासह तक्षकाला येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले- "अरे तक्षका ! मरुद्गणांचा सहचर इंद्र याच्यासह तू या अग्निकुंडात ताबडतोब येऊन पड." (२१)


इति ब्रह्मोदिताक्षेपैः स्थानादिन्द्रः प्रचालितः ।
बभूव सम्भ्रान्तमतिः सविमानः सतक्षकः ॥ २२ ॥
मंत्रे आकर्षिता ऐसे इंद्राने पळ काढिला ।
विमानी घिरट्या घाली सर्पाच्या सह इंद्रही ॥ २२ ॥

ब्राह्मणांनी जेव्हा असा कठोर मंत्र म्हटला, तेव्हा इंद्र, आपल्या स्थानापासून निघाला. विमानात तक्षकासह बसलेला इंद्र काय करावे, हे न कळून अतिशय गोंधळून गेला. (२२)


तं पतन्तं विमानेन सहतक्षकमम्बरात् ।
विलोक्याङ्‌गिरसः प्राह राजानं तं बृहस्पतिः ॥ २३ ॥
बृहस्पती जधी पाही देवेंद्रा तक्षकासह ।
पडता यज्ञकुंडात तो वदे जनमेजया ॥ २३ ॥

आकाशातून विमानात तक्षकासह बसलेला इंद्र अग्निकुंडात येऊन पडू लागलेला पाहून, अंगिरानंदन बृहस्पती राजा जनमेजयाला म्हणाले. (२३)


नैष त्वया मनुष्येन्द्र वधमर्हति सर्पराट् ।
अनेन पीतममृतं अथ वा अजरामरः ॥ २४ ॥
तक्षका जाळणे युक्त नरेंद्रा नच ते तसे ।
पिला तो अमृता तेणे अजरामरची असे ॥ २४ ॥

हे नरेंद्रा ! सर्पराज तक्षकाला मारणॆ तुला शक्य नाही. कारण हा अमृत प्याला आहे, म्हणून अजरामर झाला आहे. (२४)


जीवितं मरणं जन्तोः गतिः स्वेनैव कर्मणा ।
राजन् ततोऽन्यो नान्यस्य प्रदाता सुखदुःखयोः ॥ २५ ॥
राजा रे जगती प्राणी कर्माने गति पावती ।
कर्मा सोडोनि कोणीही सुख दुःख न दे शके ॥ २५ ॥

हे राजन ! जगातील प्राणी आपापल्या कर्मानुसारच जीवन, मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात. कर्माव्यतिरिक्त दुसरा कोणीही, कोणालाही सुख-दुख देऊ शकत नाही. (२५)


सर्पचौराग्निविद्युद्‌भ्यः क्षुत्तृड् व्याध्यादिभिर्नृप ।
पञ्चत्वं ऋच्छते जन्तुः भुङ्‌क्त आरब्धकर्म तत् ॥ २६ ॥
अग्निने सर्प चोराने रोग भूकें विजेंहि ते ।
कितेक मरती लोक निमित्त कर्म ते खरे ॥ २६ ॥

हे जनमेजया ! साप, चोर, आग, वीज पडणे, तहान-भूक, रोग इत्यादी निमित्ताने प्राणी मरण पावतात. हा सर्व प्रारब्ध -कर्माचाच भोग होय. (२६)


तस्मात् सत्रमिदं राजन् संस्थीयेताभिचारिकम् ।
सर्पा अनागसो दग्धा जनैर्दिष्टं हि भुज्यते ॥ २७ ॥
तू तो निरपराधी ते कितेक सर्प जाळिले ।
हिंसा या अभिचारात म्हणोनी बंद हे करी ।
जगीं सर्वचि ते प्राणी प्रारब्धे भोग भोगिती ॥ २७ ॥

राजन ! म्हणून हे अभिचारिक कर्म बंद कर. पुष्कळसे निरपराध साप मेले. नाहीतरी सर्व प्राणी आपापले प्रारब्ध-कर्मच भोगत असतात. (२७)


सूत उवाच –
इत्युक्तः स तथेत्याह महर्षेर्मानयन् वचः ।
सर्पसत्रादुपरतः पूजयामास वाक्पतिम् ॥ २८ ॥
सूत सांगतात -
महर्षि बोलता ऐसे सन्मानी जनमेजय ।
जी आज्ञा म्हणुनी त्याने पूजिले ते बृहस्पती ॥ २८ ॥

सूत म्हणतात - महर्षी बृहस्पतींच्या म्हणण्याचा आदर करुन जनमेजयाने “ठीक आहे.” असे म्हणून सर्प-सत्र बंद केले आणि बृहस्पतींची पूजा केली. (२८)


सैषा विष्णोर्महामाया बाध्ययालक्षणा यया ।
मुह्यन्त्यस्यैवात्मभूता भूतेषु गुणवृत्तिभिः ॥ २९ ॥
माया ती हरिची सारी शरीरा मोह तो पडे ।
देती नी भोगिती दुःख प्रयत्‍ने सुटका नसे ॥ २९ ॥

ही सर्व त्या भगवान विष्णूंची अनिर्वचनीय महामाया होय. हिच्यामुळेच भगवंतांचे स्वरूपभूत जीव, क्रोध इत्यादी गुणवृत्तींच्या द्वारे मोहाने शरीरांवर रागद्वेश इत्यादी करतात. पण आपल्या प्रयत्‍नाने हिच्यापासून परावृत्त होऊ शकत नाहीत. (२९)


(मिश्र-१२)
न यत्र दम्भीत्यभया विराजिता
     मायात्मवादेऽसकृदात्मवादिभिः ।
न यद्विवादो विविधस्तदाश्रयो
     मनश्च सङ्‌कल्पविकल्पवृत्ति यत् ॥ ३० ॥
( इंद्रवज्रा )
दंभादि दाटे हरिचीच माया
     चर्चेत ना ते प्रगटे स्वरूप ।
वादातितिओ ते परमात्मरूप
     ते भेटल्याने मन शांत होते ॥ ३० ॥

हा दंभी आहे, अशा प्रकारची बुद्धी ही माया होय. आत्मज्ञानी लोक जेव्हा आत्मचर्चा करु लागतात, तेव्हा ती त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निर्भयरूपाने प्रकाशित होत नाही. मायेच्या आश्रयाने राहणारे निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसेच संकल्प-विकल्पात्मक मन जेथे नाही, तेच परमात्मतत्व होय. (३०)


न यत्र सृज्यं सृजतोभयोः परं
     श्रेयश्च जीवस्त्रिभिरन्वितस्त्वहम् ।
तदेतदुत्सादितबाध्यबाधकं
     निषिध्य चोर्मीन् विरमेत् स्वयं मुनिः ॥ ३१ ॥
सामग्रि कर्मे अन साध्य कर्म
     ना ज्यां अहंकार न त्यास बाधा ।
जो चित्त लावी स्वरुपात नित्य
     न बाध येता स्वरुपात डुंबे ॥ ३१ ॥

कर्म, ते करण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याचे फळ या तिघांनी वेढलेला अहंकारात्मक जीव, हे सर्व ज्याच्यामध्ये नाही, तो आत्मस्वरूप परमात्मा कोणाकडून बाधित होत नाही की, कोणाचा बाधक होत नाही. म्हणून मुनीने मनाच्या मायामय वृत्तींचा बाध करून आत्मस्वरूपामध्ये विहार करावा. (३१)


परं पदं वैष्णवमामनन्ति तद्
     यन्नेति नेतीत्यतदुत्सिसृक्षवः ।
विसृज्य दौरात्म्यमनन्यसौहृदा
     हृदोपगुह्यावसितं समाहितैः ॥ ३२ ॥
निषेध त्यागो नच होय ज्याचा
     ते विष्णुचेची पद श्रेष्ठ जाणा ।
हे वेद नी संतचि बोलतात
     ध्याताचि अंती पद थोर लाभे ॥ ३२ ॥

मुमूक्षू, परमपदाव्यतिरिक्त सर्व वस्तूंचा “नेति-नेति” या श्रुतिवचनाने निषेध करून जी वस्तू प्राप्त करून घेतात, की जिचा कधी निषेध होऊ शकत नाही आणि कधी त्यागही होऊ शकत नाही, ती वस्तू म्हणजे भगवंतांचे परमपद आहे, असे सर्व महात्मे सांगतात. आपले चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतःकरणाची अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेमभावाने परिपूर्ण अशा हृदयाने त्याच परमपदाला आलिंगन देऊन आणि त्यातच विलीन होऊन जातात. (३२)


(अनुष्टुप्)
त एतदधिगच्छन्ति विष्णोर्यत् परमं पदम् ।
अहं ममेति दौर्जन्यं न येषां देहगेहजम् ॥ ३३ ॥
( अनुष्टुप् )
खरे हे विष्णुचे रूप तेच की परमोपद ।
अहंकार न ज्या थोर त्याला हे पद लाभते ।
मीपणा जगती थोर दुष्कृत्य हेच की खरे ॥ ३३ ॥

ज्यांच्या अंतःकरणात शरीराबद्दल अहंभाव नाही आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घर इत्यादी पदार्थांविषयी ममता नाही, त्याच लोकांना भगवान विष्णूंच्या या परमपदाची प्राप्ती होते. (३३)


अतिवादान् तितिक्षेत नावमन्येत कञ्चन ।
न चेमं देहमाश्रित्य वैरं कुर्वीत केनचित् ॥ ३४ ॥
इच्छि जो सद्‌गती त्याने निंदा ती साहिने तसे ।
नको देहास ती माया प्राण्यांसी वैर ते नको ॥ ३४ ॥

हे परमपद मिळविण्यासाठी दुसर्‍याचे कटू बोलणे सहन करावे. कोणाचाही अपमान करू नये. या शरीराविषयी आसक्ती ठेवून कोणाशीही वैर करू नये. (३४)


नमो भगवते तस्मै कृष्णायाकुण्ठमेधसे ।
यत्पादाम्बुरुहध्यानात् संहितामध्यगामिमाम् ॥ ३५ ॥
कृष्णपदांबुजा ध्याता संहिता शिकलो असे ।
नमोनी त्यांजला आता पुराण संपवीतसे ॥ ३५ ॥

अकुंठित ज्ञान असणार्‍या श्रीव्यासांना नमस्कार असो. त्यांच्या चरणकमलांचे ध्यान करूनच मला या श्रीमद्‌भागवत-महापुराणाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. (३५)


श्रीशौनक उवाच –
पैलादिभिर्व्यासशिष्यैः वेदाचार्यैर्महात्मभिः ।
वेदाश्च कतिधा व्यस्ता एतत्सौम्याभिधेहि नः ॥ ३६ ॥
शौनकांनी विचारले -
वेदाचार्यचि पैलादी व्यासांचे शिष्य उत्तम ।
वेदांचे ते किती भाग केले त्यांनी कथा अम्हा ॥ ३६ ॥

शौनकाने म्हटले - हे सूत महोदय ! वेदांचे आचार्य असणार्‍या महात्म्या वेदव्यासांच्या पैल इत्यादी शिष्यांनी किती प्रकारांनी वेदांचे भाग केले, हे आपण आम्हांला सांगावे. (३६)


सूत उवाच -
समाहितात्मनो ब्रह्मन् ब्रह्मणः परमेष्ठिनः ।
हृद्याकाशाद् अभून्नादो वृत्तिरोधाद् विभाव्यते ॥ ३७ ॥
ब्रह्म्याने पूर्वसृष्टीच्या ज्ञानार्थ ध्यान लाविता ।
हृदयाकाशि भागासी कळला तो अनाहत ॥ ३७ ॥

सूत म्हणाले - ब्रह्मन ! परमेष्ठी ब्रह्मदेव जेव्हा पूर्वसृष्टीचे ज्ञान संपादन करण्यासाठी एकाग्रचित्त झाले, त्यावेळी त्यांच्या हृदयाकाशातून नाद उमटला. जीव जेव्हा आपल्या मनोवृत्ती रोखतो, तेव्हा त्यालासुद्धा त्या अनाहत-नादाचा अनुभव येतो. (३७)


यदुपासनया ब्रह्मन् योगिनो मलमात्मनः ।
द्रव्यक्रियाकारकाख्यं धूत्वा यान्त्यपुनर्भवम् ॥ ३८ ॥
उपासिता तया नादा योग्यांचा मळ संपतो ।
त्रिताप संपुनी त्यांना मोक्षाची प्राप्ति होतसे ॥ ३८ ॥

हे ब्रह्मर्षे ! योगी ज्या नादाची उपासना करून त्याच्या प्रभावाने अंतःकरणातील द्रव्य(अधिभूत), क्रिया (अध्यात्म) आणि कारक (अधिदैव) रूप दोष नाहीसे करून, मोक्ष प्राप्त करून घेतात. (३८)


ततोऽभूत् त्रिवृदोंकारो योऽव्यक्तप्रभवः स्वराट् ।
यत्तल्लिङ्‌गं भगवतो ब्रह्मणः परमात्मनः ॥ ३९ ॥
त्रिमासयुक्त ओंकार प्रगटे शक्तिरूप हो ।
ॐकारा ब्रह्म हे नाम ब्रह्माचे रूप चिन्ह ते ॥ ३९ ॥

त्याच अनाहत नादापासून ‘अ’ कार, ‘उ’ कार आणि ‘म’ कार रूप तीन मात्रांनी युक्त असा ॐकार प्रगट झाला. हा ॐकार हेच प्रकृतीचे अव्यक्तातून व्यक्तरूपात प्रगट होणे. हा स्वयंप्रकाशी असून परब्रह्माचा बोध करून देणारा आहे. (३९)


श्रृणोति य इमं स्फोटं सुप्तश्रोत्रे च शून्यदृक् ।
येन वाग्व्यज्यते यस्य व्यक्तिराकाश आत्मनः ॥ ४० ॥
सरता ऐकणे शक्ति समाधी नी सुषुप्तिसी ।
हृदयी परमात्म्याच्या प्रगटे वेदरूपि तो ॥ ४० ॥

जेव्हा कान ऐकत नसतात, तेव्हासुद्धा जो हा ॐकार ऐकतो, तसेच सर्व इंद्रियांच्या अभावीही ज्याला ज्ञान असते, जो परमात्म्यापासून हृदयाकाशात प्रगट होऊन वेदरूप वाणीला अभिव्यक्त करतो, तोच हा ॐकार. (४०)


स्वधाम्नो ब्रह्मणः साक्षाद् वाचकः परमात्मनः ।
स सर्वमन्त्रोपनिषद् वेदबीजं सनातनम् ॥ ४१ ॥
ओंकार परब्रह्माचे प्रत्यक्ष वाणिवाचक ।
ॐकार पूर्ण तो मंत्र श्रुतिबीज सनातन ॥ ४१ ॥

आपला आश्रय असणार्‍या परब्रह्माचा ॐकार हा साक्षात वाचक आहे आणि तो सर्व मंत्र, उपनिषदे आणि वेदांचे सनातन बीज आहे. (४१)


तस्य ह्यासंस्त्रयो वर्णा अकाराद्या भृगूद्वह ।
धार्यन्ते यैस्त्रयो भावा गुणनामार्थवृत्तयः ॥ ४२ ॥
ययात तीन ते वर्ण सत्त्व रज तमो गुणी ।
ऋक् यजू साम हे तीन नाम त्याचेच की पहा ।
भूभुवः स्वः तिन्ही तैसे तिन्ही वृत्तीच भाव ते ॥ ४२ ॥

हे शौनका ! ‘अ’, ‘उ’, आणि ‘म’ हे ॐकाराचे तीन वर्ण आहेत. हेच तीन वर्ण सत्व, रज, तम, या तीन गुणांना, ऋक्‌, यजुः, साम या तीन नावांना, भूः, भुवः, स्वः या तीन अर्थांना आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन वृत्तींना धारण करतात. (४२)


ततोऽक्षरसमाम्नायं असृजद्‌ भगवानजः ।
अन्तःस्थोष्मस्वरस्पर्श ह्रस्वदीर्घादिलक्षणम् ॥ ४३ ॥
ओंकाराच्या मधोनीया अंतःस्थ ऊष्म नी स्वर ।
स्पर्श नी र्‍हस्व दीर्घो ते वर्णमालाचे होतसे ॥ ४३ ॥

यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी यापासूनच अंतःस्थ (य, र, ल, व), ऊष्म (श, ष, स, ह), स्वर (‘अ’पासून ‘औ’ पर्यंत) तसेच र्‍हस्व आणि दीर्घ इत्यादी लक्षणांनी युक्त अशी वर्णमाला उत्पन्न केली. (४३)


तेनासौ चतुरो वेदान् चतुर्भिर्वदनैर्विभुः ।
सव्याहृतिकान् सोकारांश्चातुर्होत्रविवक्षया ॥ ४४ ॥
पुत्रानध्यापयत्तांस्तु ब्रह्मर्षीन् ब्रह्मकोविदान् ।
ते तु धर्मोपदेष्टारः स्वपुत्रेभ्यः समादिशन् ॥ ४५ ॥
वर्णमाला मुखामध्ये ऋत्वि जी चार कर्म नी ।
व्याहृती सह ते चार जन्मती वेद ते पहा ॥ ४४ ॥
मरिची आदि पुत्रांची ब्रह्म्याने बुद्धी पाहुनी ।
बोधिले वेद नी धर्म केले शिक्षण पूर्ण ते ॥ ४५ ॥

त्याच वर्णमालेच्या योगाने त्यांनी आपल्या चार मुखांपासून होता, अध्वर्यू, उद्राता आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांचे कर्म सांगण्यासाठी ॐकार आणि वेदाध्ययनामध्ये कुशल असणार्‍या आपल्या ब्रह्मर्षी पुत्रांना वेदांचे शिक्षण दिले. धर्माचा उपदेश करणार्‍या त्यांनी नंतर आपल्या पुत्रांना ते शिकविले. (४४-४५)


ते परम्परया प्राप्ताः तत्तत् शिष्यैर्धृतव्रतैः ।
चतुर्युगेष्वथ व्यस्ता द्वापरादौ महर्षिभिः ॥ ४६ ॥
परंपरेत त्यांनी ते रक्षिले त्या धृतव्रते ।
सांप्रदायेचि चारी त्या द्वापारी ते विभागिले ॥ ४६ ॥

त्यानंतर त्यांच्याच नैष्ठिक ब्रह्मचारी शिष्य-प्रशिष्यांच्या द्वारे चारही युगांमध्ये परंपरेने वेदांचे रक्षण होत राहिले. द्वापर युगाच्या शेवटी महर्षींनी त्यांचे विभागसुद्धा केले. (४६)


क्षीणायुषः क्षीणसत्त्वान् दुर्मेधान् वीक्ष्य कालतः ।
वेदान् ब्रह्मर्षयो व्यस्यन् हृदिस्थाच्युतचोदिताः ॥ ४७ ॥
आयु शक्ति नि बुद्धी ती समये क्षीण होतसे ।
पाहिले ब्रह्मवेत्त्यांनी प्रेरिता ते विभागिले ॥ ४७ ॥

ब्रह्मवेत्त्या ऋषींनी कालमानानुसार लोकांचे आयुष्य, शक्ती आणि बुद्धी कमी होत असलेली पाहून आपल्या ह्रदयात विराजमान असलेल्या परमात्म्याच्या प्रेरणेने वेदांचे अनेक विभाग केले. (४७)


अस्मिन्नप्यन्तरे ब्रह्मन् भगवान् लोकभावनः ।
ब्रह्मेशाद्यैः लोकपालैः याचितो धर्मगुप्तये ॥ ४८ ॥
पराशरात् सत्यवत्यां अंशांशकलया विभुः ।
अवतीर्णो महाभाग वेदं चक्रे चतुर्विधम् ॥ ४९ ॥
याही मन्वंतरा मध्ये ईशाने लोकरक्षणा ।
ब्रह्मादी लोकपालांनी प्रार्थिता जन्म घेतला ॥ ४८ ॥
पराशरो सत्यवती अंशाने व्यास जाहले ।
या युगी चार भागात त्यांनीच वेद भागिले ॥ ४९ ॥

हे भाग्यवान शौनका ! या वैवस्वत मन्वन्तरामध्ये सुद्धा ब्रह्मदेव, शंकर इत्यादी लोकपालांच्या प्रार्थनेवरून, अखिल विश्वाला जीवन देणार्‍या भगवंतांनी, धर्माचे रक्षण करण्यासाठी पराशरांपासून सत्यवतीच्या ठिकाणी आपले अंशांश-कलास्वरूप अशा व्यासांच्या रूपामध्ये अवतार घेऊन वेदांचे चार विभाग केले. (४८-४९)


ऋगथर्वयजुःसाम्नां राशीन् उद्धृत्य वर्गशः ।
चतस्रः संहिताश्चक्रे मन्त्रैर्मणिगणा इव ॥ ५० ॥
तासां स चतुरः शिष्यान् उपाहूय महामतिः ।
एकैकां संहितां ब्रह्मन् एकैकस्मै ददौ विभुः ॥ ५१ ॥
मणि जै भिन्न जातीचे निवडावे स्वतम्त्र ते ।
तसेचि बुद्धिमान् व्यासे मंत्रसंग्रह साधुनी ॥ ५० ॥
ऋक् यजु सामवेदो नी अथर्व चार या अशा ।
संहिता करुनी शिष्या एकेका एक ती दिली ॥ ५१ ॥

ज्याप्रमाणे मण्यांच्या राशीतून वेगवेगळ्या जातीचे मणी निवडून वेगवेगळे केले जातात, त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यासांनी मंत्र-समुदयांमधून निरनिराळ्या विषयानुसार मंत्रांचे वर्गीकरण करून त्यातून ऋग्‌, यजुः, साम आणि अथर्व या चार संहिता तयार केल्या व आपल्या चार शिष्यांना बोलावून प्रत्येकाला एकेका संहितेचे शिक्षण दिले. (५०-५१)


पैलाय संहितां आद्यां बह्‌वृचाख्यां उवाच ह ।
वैशम्पायनसंज्ञाय निगदाख्यं यजुर्गणम् ॥ ५२ ॥
साम्नां जैमिनये प्राह तथा छन्दोगसंहिताम् ।
अथर्वाङ्‌गिरसीं नाम स्वशिष्याय सुमन्तवे ॥ ५३ ॥
पैलाला संहिता आद्य बह्‌वृचा ती दिली असे ।
वैशंपायन यांना ती निगद नावची दिली ॥ ५२ ॥
छंदौग जैमिनी यांना सामवेदी दिली असे ।
अथर्वाऽगिरसी नामे सुमंता दिधली पहा ॥ ५३ ॥

त्यांनी पहिली ऋक्संहिता पैलाला, यजुःसंहिता वैशंपायनाला, सामवेद जैमिनीला आणि अथर्ववेद सुमंतू नावाच्या शिष्याला शिकविला. (५२-५३)


पैलः स्वसंहितामूचे इन्द्रप्रमितये मुनिः ।
बाष्कलाय च सोऽप्याह शिष्येभ्यः संहितां स्वकाम् ॥ ५४ ॥
चतुर्धा व्यस्य बोध्याय याज्ञवल्क्याय भार्गव ।
पराशरायाग्निमित्रे इन्द्रप्रमितिरात्मवान् ॥ ५५ ॥
अध्यापयत् संहितां स्वां माण्डूकेयं ऋषिं कविम् ।
तस्य शिष्यो देवमित्रः सौभर्यादिभ्य ऊचिवान् ॥ ५६ ॥
पैलाने आपुला वेद दोन भागात वाटिला ।
बाष्कला इंद्रप्रमिति दो शिष्या दिधली असे ॥ ५४ ॥
बाष्कले आपुली शाखा चार भागात भागिली ।
बोध नी याज्ञवल्क्यो नी अग्निमित्र पराशरा ।
दिधला एक एकाते भाग तो वेगळा तसा ॥ ५५ ॥
प्रमती या महाभागे मांडुकेयास ती दिली ।
सौभरी देवमित्रादी शिकले त्याजची पुढे ॥ ५६ ॥

शौनका ! पैल मुनीने आपल्या संहितेचे दोन विभाग करून एक इंद्रप्रमितीला आणि दुसरा बाष्कल याला शिकविला. त्यानेसुद्धा आपल्या शाखेचे चार विभाग करून ते आपले शिष्य बोध्य, याज्ञवक्ल्य, पराशर आणि अग्निमित्र यांना शिकवले. संयमशील इंद्रप्रमितीने प्रतिभाशाली मांडूकेय ऋषीला आपली संहिता शिकविली. मांडूकेयाचा शिष्य देवमित्राने सौभरी इत्यादी ऋषींना वेद शिकविले. (५४-५६)


शाकल्यः तत्सुतः स्वां तु पञ्चधा व्यस्य संहिताम् ।
वात्स्यमुद्गलशालीय गोखल्यशिशिरेष्वधात् ॥ ५७ ॥
शाकल्य मांडुका पुत्र तयाने पाच भाग ते ।
वात्स्य मुद्‌गल शालीया गोखल्य शिशिरो यया ।
प्रत्येका भाग ते एक दिधले शिष्य उत्तमा ॥ ५७ ॥

मांडूकेयाच्या मुलाचे नाव शाकल्य. त्याने आपल्या संहितेचे पाच विभाग करून ते वात्स्य, मुद्रल, शालीय, गोखल्य आणि शिशिर नावांच्या शिष्यांना शिकविले. (५७)


जातूकर्ण्यश्च तच्छिष्यः सनिरुक्तां स्वसंहिताम् ।
बलाकपैलजाबाल विरजेभ्यो ददौ मुनिः ॥ ५८ ॥
जातुकर्मण्य या शिष्ये आपुली संहिता दिली ।
निरुक्ताच्या सर्व भागे बलाक पैज वैतला ॥ ५८ ॥

शाकल्याचा आणखी एक जातूकर्ण्यमुनी नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या संहितेचे तीन विभाग करून ते, त्यासंबंधीच्या निरूक्तासह, बलाक, पैज, वैताल आणि विरज या नावाच्या आपल्या शिष्यांना शिकविले. (५८)


बाष्कलिः प्रतिशाखाभ्यो वालखिल्याख्यसंहिताम् ।
चक्रे वालायनिर्भज्यः काशारश्चैव तां दधुः ॥ ५९ ॥
बाष्कली बाष्कला पुत्र तयाने सर्व शाखिची ।
वालखिल्य अशी एक शाखा ती रचिली असे ।
भज्य बालायनी तैसे कासारे ती स्विकारिली ॥ ५९ ॥

बाष्कलाचा पुत्र बाष्कली याने सर्व शाखांपासून “वालखिल्य” नावाची एक शाखा रचली. ती बालायनी, भज्य आणि कासार यांनी आत्मसात केली. (५९)


बह्‌वृचाः संहिता ह्येता एभिर्ब्रह्मर्षिभिर्धृताः ।
श्रुत्वैतत् छंन्दसां व्यासं सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ६० ॥
बह्‌वृचा संहिता यांनी पूर्वोक्त घेतली असे ।
कथा विभाजनाची ही ऐकता पाप जष्टते ॥ ६० ॥

या ब्रह्मर्षींनी ऋग्वेदाच्या या शाखा आत्मसात केल्या. वेदांच्या विभाजनाचा हा इतिहास जो माणूस श्रवण करतो,त्याची सर्व पापांपासून सुटका होते. (६०)


वैशम्पायनशिष्या वै चरकाध्वर्यवोऽभवन् ।
यच्चेरुर्ब्रह्महत्यांहः क्षपणं स्वगुरोर्व्रतम् ॥ ६१ ॥
वैशंपायनचे कांही चरकार्ध्युहि शिष्य ते ।
क्षाळाया ब्रह्महत्या ती केले व्रत तयांनि ते ।
म्हणोनी नाम हे सर्वां चरकार्ध्युचि जाहले ॥ ६१ ॥

वैशंपायनाच्या काही शिष्यांचे नाव चरकध्वर्यू होते. यांनी आपल्या गुरूदेवांच्या ब्रह्महत्या-पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी एका व्रताचे अनुष्ठान केले. म्हणून यांचे नाव चरकाध्वर्यू पडले. (६१)


याज्ञवल्क्यश्च तच्छिष्य आहाहो भगवन् कियत् ।
चरितेनाल्पसाराणां चरिष्येऽहं सुदुश्चरम् ॥ ६२ ॥
याज्ञवल्क्य दुजा शिष्य वदला गुरुसी अहो ।
न शक्ति चरकार्ध्युंची घोर मी तप साधितो ॥ ६२ ॥

वैशंपायनाचा एक शिष्य याज्ञवल्क्य होता. तो आपल्या गुरूंना म्हणाला - “अहो भगवन ! या चरकाध्वर्यूंच्या अंगी फारच थोडी शक्ती आहे. या व्रतपालनाने कितीसा लाभ होणार ? आपल्या प्रायश्चित्तासाठी मी फार कडक तपश्चर्या करीन.” (६२)


इत्युक्तो गुरुरप्याह कुपितो याह्यलं त्वया ।
विप्रावमन्त्रा शिष्येण मदधीतं त्यजाश्विति ॥ ६३ ॥
क्रोधले गुरु ऐकोनी वदले गप्प हो पहा ।
द्विजद्वेषी नको शिष्य विद्या सोडोनि जाय तू ॥ ६३ ॥

याज्ञवल्क्यमुनीचे हे म्हणणे ऐकून वैशंपायनाला अतिशय क्रोध आला. तो म्हणाला, “बस कर ! ब्राम्हणांचा अपमान करणार्‍या तुझ्यासारख्या शिष्याची मला आवश्यकता नाही. माझ्याकडून जे काही अध्ययन केलेस, ते ताबडतोब टाकून जा !” (६३)


देवरातसुतः सोऽपि छर्दित्वा यजुषां गणम् ।
ततो गतोऽथ मुनयो ददृशुस्तान् यजुर्गणान् ॥ ६४ ॥
यजूंषि तित्तिरा भूत्वा तल्लोलुपतयाऽऽददुः ।
तैत्तिरीया इति यजुः शाखा आसन् सुपेशलाः ॥ ६५ ॥
देवरातसुते आज्ञा गुरुची पाळिली असे ।
ओकिली सर्व ती विद्या गेला ही निघुनी तदा ॥ ६४ ॥
ऋषिंनी पाहिली विद्या ओकिली यजुची अशी ।
तित्तरीरूप घेवोनी केली ग्रहण ती तये ।
तैतरीय अशी शाखा रमणीयचि जाहली ॥ ६५ ॥

देवराताचा पुत्र याज्ञवल्क्याने गुरूजींनी सांगताच त्यांनी शिकविलेला यजुर्वेद ओकून टाकला आणि तो तिथून निघून गेला. यजुर्वेद टाकलेला मुनींनी पाहिला, तेव्हा तो घेण्याच्या लालसेने त्यांनी तित्तिर पक्ष्याचे रूप घेऊन ती संहिता घेतली. यजुर्वेदाच्या या सुंदर शाखा तैत्तिरीय नावाने प्रसिद्ध झाल्या. (६४-६५)


याज्ञवल्क्यस्ततो ब्रह्मन् छंदांस्यधि गवेषयन् ।
गुरोरविद्यमानानि सूपतस्थेऽर्कमीश्वरम् ॥ ६६ ॥
चिंतिले याज्ञवल्क्याने न गुरूपासि ज्या श्रुती ।
मिळवीन अशा, तेंव्हा सूर्योपस्थान मांडिले ॥ ६६ ॥

शौनका ! नंतर याज्ञवल्क्याने गुरूंच्याजवळही नसतील, अशा श्रुती मिळविण्यासाठी भगवान सूर्यांची स्तुती केली. (६६)


(गद्यरूप)
श्रीयाज्ञवल्क्य उवाच -
ओं नमो भगवते आदित्याय अखिलजगतां आत्मस्वरूपेण
कालस्वरूपेण चतुर्विधभूतनिकायानां ब्रह्मादिस्तम्बपर्यन्तानां
अन्तर्हृदयेषु बहिरपि चाकाश इव उपाधिनाव्यवधीयमानो
भवानेक एव क्षणलवनिमेषावयव उपचितसंवत्सरगणेनापामादान
विसर्गाभ्यामिमां लोकयात्रामनुवहति ॥ ६७ ॥
याज्ञवल्क्य म्हणतात -
( भृंगनाद )
ॐ नमो भगवते आदित्या । तू सकल जगता
आत्मा नी कालरूपही । ब्रह्म्यापासुनि तृण
पर्यंते जरायुज, अंडज स्वेदज नी उद्‌भिज हे
चार प्रकारचे प्राणी, तयीं हृदयाकाशा व्यापिशी
नी उपाधी धर्मापासुनी असंग राहसी, असा
अद्वितीय भगवान् तूं । तूंचि क्षण, लव,
निमिषादि अवयव संघटित संवत्सराद्वारा नी
जल आकर्षण, विकर्षणे समस्तांचे चालविसि
जीवनो ॥ ६७ ॥

याज्ञवल्क्य म्हणाले- हे भगवन सूर्यदेवा ! मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण संपूर्ण जगाचे आत्मा आणि कालस्वरूप आहात. ब्रह्मदेवापासून गवतापर्यंत जे जरायुज, अंडज, स्वदेज आणि उभ्दिज्ज असे चार प्रकारचे प्राणी आहेत, त्या सर्वांच्या ह्रदयाच्या आत आणि बाहेर आकाशासारखे व्यापलेले असूनही आपण उपाधींच्या धर्मापासून अलिप्त राहाणारे अद्वितीय भगवान आहात. आपणच क्षण, लव, निमेष इत्यादी अवयांनी संघटित झालेल्या संवत्सरांच्या द्वारा तसेच पाण्याचे ग्रहण व विसर्जन यांच्याद्वारे सर्व लोकांची जीवनयात्रा चालवीत आहात. (या ठिकाणी ‘तत्सवितुर्वरेण्यम्‌’ चा आशय आहे.) (६७)


यदु ह वाव विबुधर्षभ सवितरदस्तपत्यनुसवनं
अहरराम्नाय विधिनोपतिष्ठमानानां अखिलदुरितवृजिन
बीजावभर्जन भगवतः समभिधीमहि तपन मण्डलम् ॥ ६८ ॥
प्रभो तुम्ही समस्त देवतात श्रेष्ठची । ते
प्रतिदिनी वेदावधिने उपासिती, तयांचे पाप
दुःख बीजा तू जाळिसी । सूर्यदेवा तू सकल
सृष्टिचा मूलकारण, नी समस्त ऐश्वर्यस्वामिही ।
मी आपुल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रे
ध्यान करितसे ॥ ६८ ॥

हे प्रभो ! आपण सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ आहात. जे लोक दररोज तीन वेळा वेदामध्ये सांगितल्यानुसार आपली उपासना करतात, त्यांची सर्व पापे आणि दुःखांची बीजे आपण भस्मसात करून टाकता. हे सूर्यदेवा !आपण सर्व सृष्टीचे मूळ कारण तसेच सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचे स्वामी आहात. म्हणून आम्ही आपल्या या तेजोमय मंडलाचे पूर्ण एकाग्रतेने ध्यान करीत आहोत. (या ठिकाणी ‘भर्गो देवस्य धीमहि’ चा आशय आहे.) (६८)


य इह वाव स्थिरचरनिकराणां निजनिकेतनानां मन‍इन्द्रियासु ।
गणाननात्मनः स्वयं आत्मान्तर्यामी प्रचोदयति ॥ ६९ ॥
तू तो सकलाचा आत्मा नी अंतर्यामिही ।
जगींचे सर्व प्राणी आपुलेचि आश्रित । तुम्हीही
तयांचे अचेतन मन, इंद्रिय नि प्राण प्रेरको ॥ ६९ ॥

आपण सर्वांचे आत्मा आणि अंतर्यामी आहात. जगातील चराचर आश्रित आहे. आपणच त्यांच्या अचेतन मन, इंद्रिये आणि प्राणांचे प्रेरक आहात. (या ठिकाणी ‘धियो यो नः प्रचोदयात्‌’ चा आशय आहे.) (६९)


य एवेमं लोकं अतिकरालवदनान्धकारसंज्ञा
जगरग्रहगिलितं मृतकमिव विचेतनमवलोक्य
अनुकम्पया परमकारुणिक ईक्षयैवोत्थाप्याहरहरनुसवनं
श्रेयसि स्वधर्माख्यात्मावस्थाने प्रवर्तयति
अवनिपतिरिवासाधूनां भयमुदीरयन्नटति ॥ ७० ॥
लोक हे प्रतिदिनी अंधकार रूपी अजगरमुखी
अचेत पडती, जणु मुडदेचि ते । तुम्ही तो
करुणा रूपचि, म्हणोनि दृष्टि टाकिता सर्वां
सचेत करितसा नी कल्याण समयि धर्मासी
लाउनि अंतर्मुख करिता । जैसा राजा दुष्टाते
भयभीत करुनी आपुले राज्यां विचरतो, तसे
तुम्ही चोर जारादिका भयभीत करिता
विचरता ॥ ७० ॥

हा लोक दररोज अंधकाररूप अजगराच्या विक्राळ दाढेत सापडून प्रेतासारखा होऊन जातो. आपण परम दयाळू आहात. म्हणूनच आपल्या फक्त दृष्टिनेच याला सचेतन करता आणि वेळोवेळी परम कल्याणाचे साधन असलेल्या धर्मानुष्ठानमध्ये लावून त्यांना आत्माभिमुख करीत असता. राजा जसा दुष्टांना भयभीत करीत आपल्या राज्यामध्ये फिरत असतो, त्याचप्रमाणे आपणसुद्धा दुष्टांना भयभीत करीत विचरण करीत असता. (७०)


परित आशापालैस्तत्र तत्र कमलकोशाञ्जलिभिः उपहृतार्हणः ॥ ७१ ॥
चहूकडे दिक्पाल जाग जागी आपुली
कमल कलिकेपरी अंजुलि जोडोनी
तुम्हा उपहार असमर्पिती ॥ ७१ ॥

सर्व दिक्पाल चारही बाजूंनी ठिकठिकाणी कमळाच्या कळीप्रमाणे असणार्‍या आपल्या ओंजळींनी आपल्याला पूजासामग्री समर्पित करीत असतात. (७१)


अथ ह भगवन् तव चरणनलिनयुगलं त्रिभुवनगुरुभिः
अभिवन्दितम् अहमयातयामयजुःकाम उपसरामीति ॥ ७२ ॥
भगवान् आपुले चरणद्वय गुरुसदृश महात्मे
वंदिती । मी आपुल्या चरण युगुलीं पातलो
की मजला यजुर्वेदाची ऐशी प्राप्ति हो की
जी कोणा ना लाभली ॥ ७२ ॥

भगवन ! आपली दोन्हीही चरणकमले तिन्ही लोकांच्या गुरूंनी वंदिली आहेत. आजपर्यंत कोणालाही न मिळालेल्या यजुर्वेदाची प्राप्ती व्हावी, म्हणून मी आपल्या त्या चरणयुगलांना शरण आलो आहे. (७२)


सूत उवाच -
(अनुष्टुप्)
एवं स्तुतः स भगवान् वाजिरूपधरो रविः ।
यजूंष्ययातयामानि मुनयेऽदात् प्रसादितः ॥ ७३ ॥
सूतजी सांगतात -
( अनुष्टुप् )
स्तविता भगवान् ऐसा अश्वरूप धरोनिया ।
आले नी संहिता तैसी कृपेने दिधली असे ॥ ७३ ॥

सूत म्हणतात - अशी स्तुती केली, तेव्हा प्रसन्न होऊन भगवान सूर्यांनी घोड्याच्या रूपात प्रगट होऊन आतापर्यंत कोणालाही प्राप्त न झालेला यजुर्वेद त्याला दिला. (७३)


यजुर्भिः अकरोत् शाखा दश पञ्च शतैर्विभुः ।
जगृहुर्वाजसन्यस्ताः काण्वमाध्यन्दिनादयः ॥ ७४ ॥
पंधरा निर्मिल्या शाखा यजुर्वेदात त्या तये ।
प्रसिद्ध वाजसन्यो ती कण्वमाध्यांदिने स्विकृत् ॥ ७४ ॥

याज्ञवल्क्यमुनीने त्या यजुर्वेदाच्या पंधरा शाखांची रचना केली. त्याच वाजसनेय नावाने प्रसिद्ध आहेत. काण्व, माध्यंदिन इत्यादी ऋषींनी त्या ग्रहण केल्या. (७४)


जैमिनेः समगस्यासीत् सुमन्तुस्तनयो मुनिः ।
सुत्वांस्तु तत्सुतस्ताभ्यां एकैकां प्राह संहिताम् ॥ ७५ ॥
जैमिनीने सुमंतो या सुपुत्रा साम ती दिली ।
सुमंते पुत्र नी पौत्रा एकेक बोधिली असे ॥ ७५ ॥

सामवेदी जैमिनीचा पुत्र सुमंतुमुनी आणि नातू सुन्वान होता. जैमिनीने त्यांना प्रत्येकी एक-एक संहिता शिकविली. (७५)


सुकर्मा चापि तच्छिष्यः सामवेदतरोर्महान् ।
सहस्रसंहिताभेदं चक्रे साम्नां ततो द्विज ॥ ७६ ॥
सुकर्मा शिष्य तो त्यांचा हजार संहिता तये ।
निर्मिल्या सामवेदाच्या फांद्या वृषास ज्या तशा ॥ ७६ ॥

जैमिनी मुनीचा सुकर्मा नावाचा श्रेष्ठ शिष्य होता. एका वृक्षाच्या पुष्कळ फांद्या असतात, त्याप्रमाणे सुकर्म्याने सामवेदाच्या एक हजार संहिता रचल्या. (७६)


हिरण्यनाभः कौशल्यः पौष्यञ्जिश्च सुकर्मणः ।
शिष्यौ जगृहतुश्चान्य आवन्त्यो ब्रह्मवित्तमः ॥ ७७ ॥
हिरण्यनाभ कौसल्यीं पौष्यं जी तिसरा पुढे ।
आवंत्य ब्रह्मवेत्त्याने शाखा त्या घेतल्या पहा ॥ ७७ ॥

सुकर्माचे शिष्य, कोसलदेशचा हिरण्यनाभ, पौष्यंजी व ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आवन्त्य हे होते. त्यांनी या शाखा आत्मसात केल्या. (७७)


उदीच्याः सामगाः शिष्या आसन् पञ्चशतानि वै ।
पौष्यञ्ज्यावन्त्ययोश्चापि तांश्च प्राच्यान् प्रचक्षते ॥ ७८ ॥
तयांचे पाचशे शिष्य उत्तरेचे म्हणोनिया ।
औदित्त्य सामवेदी या नावाने बोलती तयां ।
प्राच्यही म्हणती कोणी शिकले एक एक ते ॥ ७८ ॥

पौष्यंजी आणि आवन्त्य यांचे पाचशे शिष्य होते. ते उत्तरेकडील राहाणारे असल्याने त्यांना औदीच्य सामवेदी म्हणत. त्यांनाच प्राच्य सामवेदी असेही म्हणतात. (७८)


लौगाक्षिर्माङ्‌गलिः कुल्यः कुशीदः कुक्षिरेव च ।
पौष्यञ्जिसिष्या जगृहुः संहितास्ते शतं शतम् ॥ ७९ ॥
लौगाक्षि मांगली कुल्य कुसीद कुक्षि शिष्य ते ।
प्रत्येके संहिता याची घेतली ती शतो शते ॥ ७९ ॥

पौष्यजींचे लौगाक्षी, मांगली, कुल्य, कुसीद आणि कुक्षी नावाचे आणखीही शिष्य होते. त्यांपैकी प्रत्येकाने शंभर शंभर संहितांचे अध्ययन केले. (७९)


कृतो हिरण्यनाभस्य चतुर्विंशति संहिताः ।
शिष्य ऊचे स्वशिष्येभ्यः शेषा आवन्त्य आत्मवान् ॥ ८० ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
द्वादशस्कन्धे वेदशाखाप्रणयनं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
कृते हिरण्यनाभाच्या शिष्याने शिकल्या पुढे ।
चोवीस संहिता त्यांच्या आवंत्ये उर्वरीत त्या ।
दिधल्या दोन शिष्यांना विसतार सामवेदहि हा ॥ ८० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

हिरण्यनाभाचा कृत नावाचा शिष्य होता. त्याने आपल्या शिष्यांना चोवीस संहिता शिकविल्या. संयमी आवन्त्याने राहिलेल्या संहिता आपल्या शिष्यांना दिल्या. (८०)


स्कन्द बारावा - अध्याय सहावा समाप्त

GO TOP