श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द बारावा
पञ्चमोऽध्यायः

परमार्थोपदेशेन राज्ञः परीक्षितो भीतिनिवारणम् -

श्रीशुकदेवांनी केलेला अंतिम उपदेश -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच –
(अनुष्टुप्)
अत्रानुवर्ण्यतेऽभीक्ष्णं विश्वात्मा भगवान् हरिः ।
यस्य प्रसादजो ब्रह्मा रुद्रः क्रोधसमुद्‌भवः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
वर्णिला या पुराणात विश्वात्मा भगवान् हरी ।
प्रसादे तोच हो ब्रह्मा कोपता रुद्र तोच की ॥ १ ॥

श्रीशुक म्हणतात - या श्रीमद्‌भागवत पुराणामध्ये ब्रह्मदेव ज्यांच्या रजोगुणातून आणि शंकर तमोगुणातून प्रगट झाले आहेत त्या विश्वात्मा भगवान श्रीहरींचेच वारंवार वर्णन आलेले आहे. (१)


त्वं तु राजन् मरिष्येति पशुबुद्धिमिमां जहि ।
न जातः प्रागभूतोऽद्य देहवत्त्वं न नङ्‌क्ष्यसि ॥ २ ॥
राजा तू मरणाच्या त्या पशुबुद्धीस त्यागिणे ।
नव्हता जन्मण्या पूर्वी नसशील पुन्हाहि तू ॥ २ ॥

हे राजन ! आता तू ’मी मरेन’ हा अज्ञान्यासारखा विचार सोडून दे. शरीरासारखा तू पूर्वी कधीही जन्मलेला नाहीस. आणि तुझा जन्म न झाल्यामुळे शरीरासारखा आज तू नष्टही होणार नाहीस. (२)


न भविष्यसि भूत्वा त्वं पुत्रपौत्रादिरूपवान् ।
बीजाङ्‌कुरवद् देहादेः व्यतिरिक्तो यथानलः ॥ ३ ॥
जसे बीजातुनी वृक्ष जन्मती ते पुनःपुन्हा ।
पुत्ररूपी पुढे विश्वीं उरशील पुढेहि तू ॥ ३ ॥

ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर आणि अंकुरापासून बीजाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे तू पुत्र-पौत्रादिकांच्या रूपानेही पुन्हा उत्पन्न होणार नाहीस. कारण, लाकडापासून अग्नी जसा वेगळा असतो, त्याचप्रमाणे तूसुद्धा शरीर इत्यादींहून वेगळा आहेस. (३)


स्वप्ने यथा शिरश्छेदं पञ्चत्वाद्यात्मनः स्वयम् ।
यस्मात्पश्यति देहस्य तत आत्मा ह्यजोऽमरः ॥ ४ ॥
स्वप्नात मरता नेता स्मशानी सर्व ते कळे ।
अवस्था शरिराची ती आत्मा तो शुद्ध वेगळा ॥ ४ ॥

जसे स्वप्नात स्वत:चे मस्तक छाटलेले दिसते, पण ते खोटे असते, त्याचप्रमाणे जागृतीतही मरण इत्यादी सर्व शरीराच्याच अवस्था दिसतात. आत्म्याच्या नव्हेत. त्या पाहाणारा आत्मा जन्म-मृत्यू-विरहित असतो. (४)


घटे भिन्ने घटाकाश आकाशः स्याद् यथा पुरा ।
एवं देहे मृते जीवो ब्रह्म सम्पद्यते पुनः ॥ ५ ॥
घटाकाश फुटे तेंव्हा महाकाशचि भासते ।
मरता ब्रह्म तो भासे अब्रह्म भासतो मुळी ॥ ५ ॥

जसे घडा फुटल्यावर घटकाश महाकाशरूप होते. त्याचप्रमाणे देहपात झाल्यावर मुळचा ब्रह्मरूप जीवच पुन्हा ब्रह्म होतो. (५)


मनः सृजति वै देहान् गुणान् कर्माणि चात्मनः ।
तन्मनः सृजते माया ततो जीवस्य संसृतिः ॥ ६ ॥
मनाच्या कल्पना सर्व आत्मा देहासि मानिता ।
अज्ञान वसता चित्ती जीव चक्रात त्या पडे ॥ ६ ॥

मनच आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्मांची निर्मिती करते आणि त्या मनाची निर्मिती करणारी अविद्याच जीवाला संसारात अडकवण्याला कारणीभूत आहे. (६)


स्नेहाधिष्ठानवर्त्यग्नि संयोगो यावदीयते ।
ततो दीपस्य दीपत्वं एवं देहकृतो भवः ।
रजःसत्त्वतमोवृत्त्या जायतेऽथ विनश्यति ॥ ७ ॥
पात्र तेल तशी वात अग्नि संयोग तो घडे ।
तदाचि पेटते ज्योत देहाचेही तसेचि की ॥ ७ ॥

जोपर्यंत तेल, समई, वात आणि अग्नीचा संयोग असतो, तोपर्यंतच दिव्यामध्ये दीपकपण आहे, त्याचप्रमाणे जोपर्यंत आत्म्याचा कर्म, मन, शरीर आणि त्यात राहाणार्‍या चैतन्याशी संबंध असतो, तोपर्यंतच त्याला जीवपण असते. आणि रजोगुण, सत्त्वगुण तसेच तमोगुण यांच्या वृत्तींमुळे त्याला उत्पन्न, स्थितीयुक्त व नष्ट व्हावे लागते. (७)


न तत्रात्मा स्वयंज्योतिः यो व्यक्ताव्यक्तयोः परः ।
आकाश इव चाधारो ध्रुवोऽनन्तोपमस्ततः ॥ ८ ॥
दीपाला विझवील्याने तेज ना संपते मुळी ।
सृष्टि ही सरता तैसी आत्म्याला नाश ना मुळी ॥ ८ ॥

परंतु देहातील स्वयंप्रकाशी आत्म्याचा नाश होत नाही; कारण तो कार्य-कारणाच्या पलीकडील आहे. तो आकाशाप्रमाणे सर्वांचा आधार , नित्य, निश्चल आणि अनंत आहे. म्हणून त्याच्यासारखा तोच आहे. (८)


एवं आत्मानमात्मस्थं आत्मनैवामृश प्रभो ।
बुद्ध्यानुमानगर्भिण्या वासुदेवानुचिन्तया ॥ ९ ॥
राजा शुद्ध विवेकाने परमात्म्यासि जाणणे ।
हृदयी स्थिर जो त्याचा साक्षात्कार करीं स्वये ॥ ९ ॥

हे राजन ! तू परमात्म्याच्या चिंतनाने भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीने आपल्याच अंत:करणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घे.


चोदितो विप्रवाक्येन न त्वां धक्ष्यति तक्षकः ।
मृत्यवो नोपधक्ष्यन्ति मृत्यूनां मृत्युमीश्वरम् ॥ १० ॥
मृत्यूचा मृत्यु तू होशी तू स्वये ईश्वरोच की ।
द्विजाचा शाप ना मारी न मृत्यू पास ये तुझ्या ॥ १० ॥

तू मृत्यूंचाही मृत्यू ईश्वर आहेस. म्हणून ब्राह्मणाच्या शापाने प्रेरित झालेला तक्षक तुला भस्म करू शकणार नाही. इतकेच नव्हे, तर मृत्यूचे कोणतेही कारण तुझ्याजवळही फिरकू शकणार नाही. (१०)


अहं ब्रह्म परं धाम ब्रह्माहं परमं पदम् ।
एवं समीक्ष्य चात्मानं आत्मन्याधाय निष्कले ॥ ११ ॥
मीचि ब्रह्म परंधाम ब्रह्म्याचे पदश्रेष्ठ मी ।
स्थित तू स्वय हो एक अनंत नित रूपि त्या ॥ ११ ॥

मीच परम धाम ब्रह्म आहे. परम पद ब्रह्म मीच आहे याचे अनुसंधान ठेवल्याने तू स्वत:ला आपल्या निरुपाधिक स्वरूपात स्थिर करशील. (११)


दशन्तं तक्षकं पादे लेलिहानं विषाननैः ।
न द्रक्ष्यसि शरीरं च विश्वं च पृथगात्मनः ॥ १२ ॥
घेईल डंख तो पाया दांते तक्षक तो तुझ्या ।
शरीर विश्व हे सारे आत्मरूपात पाहणे ॥ १२ ॥

त्यावेळी आपल्या विषारी जिभांनी ओठांच्या कडा चाटीत आलेला तक्षक तुझ्या पायाला चावला, तरी तो तुला दिसणार नाही. इतकेच नव्हे, तर तुला आपले शरीर आणि सारे विश्व स्वत:हून वेगळे भासणार नाही. कारण तुला त्यावेळी स्वत:सह सर्व ब्रह्मच अनुभवाला येईल. (१२)


एतत्ते कथितं तात यदात्मा पृष्टवान् नृप ।
हरेर्विश्वात्मनश्चेष्टां किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ १३ ॥
इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
द्वादशस्कन्धे ब्रह्मोपदेशो नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥
हरिच्या बोललो लीला प्रश्न संबंधि त्या अशा ।
आणखी ऐकणे काय आत्मरूप नृप प्रिया ॥ १३ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

हे आत्मस्वरूप परीक्षिता ! विश्वात्मा भगवंतांच्या लीलेसंबंधी तू जे विचारले होतेस ना, त्याचे मी तुला उत्तर दिले. आता आणखी काय ऐकू इच्छितोस ? (१३)


स्कन्द बारावा - अध्याय पाचवा समाप्त

GO TOP