|
श्रीमद् भागवत पुराण चतुर्विध प्रलयवर्णनम् - चार प्रकारचे प्रलय - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच –
(अनुष्टुप्) कालस्ते परमाण्वादिः द्विपरार्धावधिर्नृप । कथितो युगमानं च श्रृणु कल्पलयावपि ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) परमाणु पासुनी काळ द्विपरार्धहि बोललो । आता कल्पस्थिती तैसे प्रलया ऐकणे नृपा ॥ १ ॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! परमाणूपासून दोन परार्धापर्यंतच्या काळाचे स्वरूप आणि युगांचे परिमाण मी तुला सांगितले. आता तू कल्पाची स्थिती आणि त्याचे प्रलय यांचे वर्णनसुद्धा ऐक. (१)
चतुर्युगसहस्रं तु ब्रह्मणो दिनमुच्यते ।
स कल्पो यत्र मनवः चतुर्दश विशांपते ॥ २ ॥
चतुर्युग हजारांचा ब्रह्म्याचा दिन एक तो । कल्पही म्हणती त्याला चवदा मनु कल्पि त्या ॥ २ ॥
राजन ! एक हजार चतुर्युगे मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाच्य या एका दिवसाला कल्प म्हणतात. एका कल्पामध्ये चौदा मनू होतात. (२)
तदन्ते प्रलयस्तावान् ब्राह्मी रात्रिरुदाहृता ।
त्रयो लोका इमे तत्र कल्पन्ते प्रलयाय हि ॥ ३ ॥
प्रलयो तेवढा होत जेवढा कल्प तो असे । ब्रह्म्याची निशि ती होय लीन ती तिन्हि लोक तैं ॥ ३ ॥
कल्पाच्या शेवटी तितकाच काळपर्यंत प्रलय राहतो. त्याला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात. त्यावेळी या तिन्ही लोकांचा प्रलय होतो. (३)
एष नैमित्तिकः प्रोक्तः प्रलयो यत्र विश्वसृक् ।
शेतेऽनन्तासनो विश्वं आत्मसात् कृत्य चात्मभूः ॥ ४ ॥
नैमितिक यया नाम ब्रह्मा विश्वास मोडुनी । तसे नारायणो शेष झोपती प्रलयात त्या ॥ ४ ॥
याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. या प्रलयाच्या वेळी सगळे विश्व आपल्यात सामावून घेऊन ब्रह्मदेव आणि शेषशायी भगवान शयन करतात. (४)
द्विपरार्धे त्वतिक्रान्ते ब्रह्मणः परमेष्ठिनः ।
तदा प्रकृतयः सप्त कल्पन्ते प्रलयाय वै ॥ ५ ॥
या परी दिन रात्रीने ब्रह्म्याचे शतवर्ष ते । द्वपरार्ध असा काळ महत्तत्वेहि लीन तैं ॥ ५ ॥
अशा प्रकारे रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र होता होता जेव्हा ब्रह्मदेवाच्या गणनेनुसार शंभर वर्षे होतात, तेव्हा महत्तत्त्व , अहंकार आणि पंचतन्मात्रा या सात प्रकृती मूळ प्रकृतीत विलीन होऊन जातात. (५)
एष प्राकृतिको राजन् प्रलयो यत्र लीयते ।
अण्डकोषस्तु सङ्घातो विघाट उपसादिते ॥ ६ ॥
असा प्राकृतिको राजा प्रलयो घडुनी तदा । ब्रह्मांडरूप तो सोडी कारणी स्थिर होतसे ॥ ६ ॥
राजन ! याला प्राकृतिक प्रलय म्हणतात. या प्रलयामध्ये , प्रलयाचे कारण निर्माण झाल्यावर हे ब्रह्मांड आपले स्थूलरूप सोडून देऊन कारणरूपात मिसळून जाते. (६)
पर्जन्यः शतवर्षाणि भूमौ राजन्न वर्षति ।
तदा निरन्ने ह्यन्योन्यं भक्ष्यमाणाः क्षुधार्दिताः ॥ ७ ॥
पर्जन्य शत वर्षे तैं नपडे भूमिसी नृपा । न मिळे खावया अन्न लोक लोकास भक्षिती ॥ ७ ॥
परीक्षिता ! प्रलयाची वेळ आल्यावर ढग शंभर वर्षे पाऊस पाडीत नाहीत. त्यामुळे अन्नाच्या अभावी तहान-भुकेने व्याकूळ होऊन प्राणी एकमेकांना खाऊ लागतात. (७)
क्षयं यास्यन्ति शनकैः कालेनोपद्रुताः प्रजाः ।
सामुद्रं दैहिकं भौमं रसं सांवर्तको रविः ॥ ८ ॥ रश्मिभिः पिबते घोरैः सर्वं नैव विमुञ्चति ततः संवर्तको वह्निः सङ्कर्षणमुखोत्थितः ॥ ९ ॥
काळ तो त्रासितो ऐसे प्रजा ती क्षीण हौनी । सांवर्तक असा सूर्य आपुले तेज ओकुनी ॥ ८ ॥ पृथ्वीचे रस शोषोनी धार सम्तत वर्षितो । आणि सांवर्तको शेष संवर्तक् अग्नि ओकिता ॥ ९ ॥
अशा प्रकारे काळाच्या उपद्रवामुळे पिडलेली सगळी प्रजा हळू हळू कमी होत जाते. प्रलयकालीन सूर्य आपल्या प्रचंड किरणांनी समुद्र, प्राण्यांची शरीरे आणि पृथ्वीवरील सगळा रस शोषून घेतो आणि पुन्हा तो रस पृथ्वीवर सोडत नाही. त्यावेळी संकर्षणांच्या मुखातून प्रलयकालीन अग्नी प्रगट होतो. (८-९)
दहत्यनिलवेगोत्थः शून्यान् भूविवरानथ ।
उपर्यधः समन्ताच्च शिखाभिर्वह्निसूर्ययोः ॥ १० ॥ दह्यमानं विभात्यण्डं दग्धगोमयपिण्डवत् । ततः प्रचण्डपवनो वर्षाणामधिकं शतम् ॥ ११ ॥ परः सांवर्तको वाति धूम्रं खं रजसाऽऽवृतम् । ततो मेघकुलान्यङ्ग चित्र वर्णान्यनेकशः ॥ १२ ॥ शतं वर्षाणि वर्षन्ति नदन्ति रभसस्वनैः । तत एकोदकं विश्वं ब्रह्माण्डविवरान्तरम् ॥ १३ ॥
अग्निने जळती सर्व सप्तपाताळही तसे । केव्हाच मरती प्राणी ब्रह्मांड भाजते तइ ॥ १० ॥ गोवर्या जळता पूर्ण भस्म ते राहते जसे । पुन्हा सांवर्तको वायु शेकडो वर्ष चालतो ॥ ११ ॥ धूळची चूळ दातोनी रंगी बेरंगिते ढग । आकाशी दाटती आणि गर्जना होतसे बहु ॥ १२ ॥ शेकडो वर्ष ती वर्षा होवोनीया भयंकर । ब्रह्मांडा आत नी बाह्य होतसे जलमग्न ते ॥ १३ ॥
वेगवान वायूमुळे तो अग्नी आणखी वाढतो. तो पृथ्वीच्या खालील भागातील सात लोक भस्म करून टाकतो. खालून येणारे आगीचे प्रचंड लोळ आणि वरून येणारी सूर्याची प्रचंड उष्णता, यांमुळे त्यावेळी वर-खाली, चारही बाजूंनी जळणारे ब्रह्मांड पेटलेल्या शेणाच्या गोवर्यांप्रमाणे वाटू लागते. त्यानंतर प्रलयकालीन प्रचंड वायू शेकडो वर्षे वाहात राहतो. त्या काळातील आकाश धुरने आणि धुळीने भरलेले असते. त्यानंतर असंख्य रंगी-बेरंगी ढग अतिशय मोठ्याने गर्जना करून शेकडो वर्षेपर्यंत पाऊस पाडीत राहातात. त्यावेळी ब्रह्मांडाच्या आतील सर्व जग जलमय होते. (१०-१३)
तदा भूमेर्गन्धगुणं ग्रसन्त्याप उदप्लवे ।
ग्रस्तगन्धा तु पृथिवी प्रलयत्वाय कल्पते ॥ १४ ॥
जलप्रलय हा होता पृथ्विचा गंध संपतो । जळात गंध तो जाता धूळही जलरूप हो ॥ १४ ॥
तेव्हा पाणी, पृथ्वीचा गुण गंध शोषून घेते. गंध हा गुण पाण्यात विलीन झाल्यावर पृथ्वीचा प्रलय होतो. (१४)
अपां रसमथो तेजः ता लीयन्तेऽथ नीरसाः ।
ग्रसते तेजसो रूपं वायुस्तद्रहितं तदा ॥ १५ ॥ लीयते चानिले तेजो वायोः खं ग्रसते गुणम् । स वै विशति खं राजन् ततश्च नभसो गुणम् ॥ १६ ॥ शब्दं ग्रसति भूतादिः नभस्तमनु लीयते । तैजसश्चेन्द्रियाण्यङ्ग देवान्वैकारिको गुणैः ॥ १७ ॥
जळाला गिळिते तेज तेजाला वायु तो गिळी । वायुचा स्पर्श आकाश गिळोनी शांत होतसे ॥ १५ ॥ तमऽहंकार आकाशा शब्दाला गिळिते पुन्हा । इंद्रीयवृत्तिला तेची आपुल्या उदरात घे ॥ १६ ॥ देवता त्या अधिष्ठातृ सत्त्वाहंकारि मेळती । इंद्रीयवृत्तिला तोची आपुल्या उदरात घे ॥ १७ ॥
राजन ! यानंतर तेजतत्त्व जलाचा गुण रस शोषून घेते आणि जल नीरस होऊन तेजामध्ये विलीन होते. त्यानंतर वायू तेजाचा गुण रूप याला ग्रासतो, तेव्हा ते तेज रूपरहित होऊन वायूमध्ये लीन होते. आता आकाश वायूचा गुण जो स्पर्श त्याला आपल्यामध्ये सामावून घेते आणि वायू स्पर्शहीन होऊन आकाशात विलीन होतो. यानंतर तामस अहंकार आकाशाचा गुण जो शब्द त्याला ग्रासतो आणि आकाश शब्दहीन होऊन त्यात विलीन होते. याच रीतीने तैजस अहंकार इंद्रियांना आणि वैकारिक अहंकार इंद्रियांच्या देवतांना आणि इंद्रियांच्या वृत्तींना आपल्यामध्ये लीन करून घेतो. (१५-१७)
महान् ग्रसत्यहङ्कारं गुणाः सत्त्वादयश्च तम् ।
ग्रसतेऽव्याकृतं राजन् गुणान् कालेन चोदितम् ॥ १८ ॥
अहंकारा महत्तत्व महत्त्वासि त्रैगुण । ग्रासिती महिमा सारा काळाचाचि परीक्षिता ॥ १८ ॥
त्यानंतर महत्तत्त्व अहंकाराला आणि सत्त्व इत्यादी गुण महतत्त्वाला ग्रासतात. परीक्षिता ! नंतर काळाच्या प्रेरणेने अव्य्क्त प्रकृती गुणांना ग्रासते. (१८)
न तस्य कालावयवैः परिणामादयो गुणाः ।
अनाद्यनन्तं अव्यक्तं नित्यं कारणमव्ययम् ॥ १९ ॥
चराचरास तो मूळ नित्याव्यक्त अनादिनी । अनंत अविनाशी तो साम्यवस्थेस स्थीर हो । विकारहीन तै काल न त्या क्षण न वर्ष तै ॥ १९ ॥
तीच प्रकृती जगाचे कारण आहे. ती अव्यक्त, अनादी, अनंत, नित्य आणि अविनाशी आहे. तिच्यावर काळाच्या अवयवांचा परिणाम होत नाही. (१९)
(मिश्र-११)
न यत्र वाचो न मनो न सत्त्वं तमो रजो वा महदादयोऽमी । न प्राणबुद्धीन्द्रियदेवता वा न सन्निवेशः खलु लोककल्पः ॥ २० ॥
( इंद्रवज्रा ) न त्यास वाचा नि मनो न सत्व तमो रजो वा अन श्रेष्ठतत्व । न प्राण बुद्धिप्रिय देवता वा न कांहि इच्छा स्थितिही तयास ॥ २० ॥
कारण त्यावेळी प्रकृतीमध्ये वाणी, मन, सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण, महत्तत्त्व इत्यादी हे विकार, प्राण, बुद्धी, इंद्रिये, त्यांच्या देवता इत्यादी काहीच राहात नाही. तसेच लोकांचे आकारसुद्धा राहात नाहीत. (२०)
न स्वप्नजाग्रन्न च तत्सुषुप्तं
न खं जलं भूरनिलोऽग्निरर्कः । संसुप्तवत् शून्यवदप्रतर्क्यं तन्मूलभूतं पदमामनन्ति ॥ २१ ॥
न स्वप्न जागृत् अन तै सुषुप्ति न राहि सूर्यो अन पंचभूते । ते शून्य जैसे अनुमान नोहे अव्यक्त ते हो मुलभूत तत्व ॥ २१ ॥
त्यावेळी स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था नसतात. आकाश, जल, पृथ्वी, वायू, अग्नी आणि सूर्यसुद्धा नसतात. सर्व काही निद्रिस्तासारखे, शून्यासारखे असते. त्या अवस्थेला तर्कसुद्धा करणे शक्य नसते. त्या अव्यक्तालाच जगाचे मूलभूत तत्त्व असे म्हणतात. (२१)
(अनुष्टुप्)
लयः प्राकृतिको ह्येष पुरुषाव्यक्तयोर्यदा । शक्तयः सम्प्रलीयन्ते विवशाः कालविद्रुताः ॥ २२ ॥
( अनुष्टुप् ) लयो प्राकृतिको ऐसा पुरूष प्रकृती तदा । संपती दोन्हिही शक्ती मूळरूपी स्थिरावती ॥ २२ ॥
या अवस्थेचे नाव ’प्राकृत प्रलय’ असे आहे. त्यावेळी पुरुष आणि प्रकृती या दोहोंच्या शक्ती काळाच्या प्रभावाने क्षीण होतात आणि असहाय्यपणे आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. (२२)
बुद्धीन्द्रियार्थरूपेण ज्ञानं भाति तदाश्रयम् ।
दृश्यत्वाव्यतिरेकाभ्यां आद्यन्तवदवस्तु यत् ॥ २३ ॥
बुद्धि इंद्रिय नी रूप ज्ञानही भासची उरे । आदी नी अंतिही तेच म्हणॊनी सत्य ते नसे । दृश्य तो नच त्यां सत्ता माया सर्वचि मिथ्य ती ॥ २३ ॥
यावेळी बुद्धी, इंद्रिये आणि त्यांच्या विषयांच्या रूपामध्ये त्यांचे अधिष्ठान असलेले ज्ञानच भासते. त्या सर्वांना प्रारंभही आहे व शेवटही आहे. ते दिसू शकतात आणि आपल्या अधिष्ठानातून वेगळी अशी त्यांना सत्ताही नाही. म्हणून ते सर्वथैव खोटे होत. (२३)
दीपश्चक्षुश्च रूपं च ज्योतिषो न पृथग्भवेत् ।
एवं धीः खानि मात्राश्च न स्युरन्यतमादृतात् ॥ २४ ॥
दीप नेत्र तसे रूप तेजाच्या हुनि भिन्न जैं । ब्रह्माच्या वेगळे तैसे तन्मात्रा बुद्धि इंद्रिया ॥ २४ ॥
जसे दिवा, डोळे आणि रूप हे तिन्हीही तेजाहून वेगळे नाहीत. त्याचप्रमाणे बुद्धी, इंद्रिये आणि त्यांचे विषय अधिष्ठानस्वरूप ब्रह्मापेक्षा वेगळे नाहीत. मात्र ते ब्रह्म, या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. (२४)
बुद्धेर्जागरणं स्वप्नः सुषुप्तिरिति चोच्यते ।
मायामात्रमिदं राजन् नानात्वं प्रत्यगात्मनि ॥ २५ ॥
अवस्था बुद्धिच्या तीन आंतरात्मा ययांनि तो । विश्व तैजस नी प्राज्ञ मायेने भासतो त्रयी । बुद्धिगत अशा रूपा आत्मा तो भिन्नचे असे ॥ २५ ॥
परीक्षिता ! जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या बुद्धीच्याच अवस्था आहेत. म्हणून यांचे कारण जो अंतरात्मा तो विष्व , तैजस आणि प्राज्ञरूपाने वेगवेगळा भासतो. पण ती केवळ मायाच होय. (२५)
यथा जलधरा व्योम्नि भवन्ति न भवन्ति च ।
ब्रह्मणीदं तथा विश्वं अवयव्युदयाप्ययात् ॥ २६ ॥
अवस्था सृष्टिसी तीन ब्रह्मात दूरही कधी । आकाशात जसे मेघ असती नसती जसे ॥ २६ ॥
हे विश्व, उत्पत्ती आणि प्रलयाने युक्त असल्यामुळे अवयवयुक्त आहे. जसे आकाशात ढग कधी असतात कधी नसतात. त्याचप्रमाणे हे विश्व ब्रह्माचे ठिकाणी कधी भासते, कधी भासत नाही. (२६)
सत्यं ह्यवयवः प्रोक्तः सर्वावयविनामिह ।
विनार्थेन प्रतीयेरन् पटस्येवाङ्ग तन्तवः ॥ २७ ॥
अवयवी जगी वस्तु नसता सत्य वाटती । वस्त्र जैं सूत्ररूपाने तसे या जगता रुपो ॥ २७ ॥
परीक्षिता ! जगात सर्व अवयवयुक्त पदार्थ नसले, तरी त्यांचे अवयव खरे असतात. जसे वस्त्र नाहीसे झाले, तरी त्याचे कारण असलेले सूत शिल्लक राहातेच. (त्याचप्रमाणे कार्यरूप जगाच्या अभावीसुद्धा कारणरूप ब्रह्म राहू शकते.) (२७)
यत्सामान्यविशेषाभ्यां उपलभ्येत स भ्रमः ।
अन्योन्यापाश्रयात् सर्वं आद्यन्तवदवस्तु यत् ॥ २८ ॥
कार्यकारण ना ब्रह्मा सामान्य नि विशेष ते । भ्रमाने भासती भेद अवस्तु स्ःउन्य ते उरे ॥ २८ ॥
वास्तविक ब्रह्मामध्ये जो हा कार्यकारणभाव दिसतो, तोसुद्धा केवळ भ्रम आहे. कारण, कार्यभाव आणि कारणभाव हे सापेक्ष असून यांचा आरंभ आणि शेवट असतो. म्हणून यांना वास्तविक अस्तित्व नाही. (२८)
विकारः ख्यायमानोऽपि प्रत्यगात्मानमन्तरा ।
न निरूप्योऽस्त्यणुरपि स्याच्चेच्चित्सम आत्मवत् ॥ २९ ॥
प्रपंच असुनी खोटा ब्रह्मरूपा न वेगळा । मानिता वेगळा त्याला आत्म्याच्या परि सिद्ध हो ॥ २९ ॥
जरी प्रपंचरूप कार्य भासत असले, तरी ते अधिष्ठान असलेल्या आत्म्याहून जराही वेगळे नाही. जर याला आत्म्यापेक्षा वेगळे मानले, तर तो चिद्रूप आत्म्याप्रमाणे स्वयंप्रकाशित मानावा लागेल आणि अशा स्थितीत तो आत्म्याप्रमाणेच (सत्य) असल्याचे सिद्ध होईल. (२९)
न हि सत्यस्य नानात्वं अविद्वान्यदि मन्यते ।
नानात्वं छिद्रयोर्यद्वत् ज्योतिषोर्वातयोरिव ॥ ३० ॥
सत्याला नच भिन्नत्व अज्ञानी भिन्न पाहती । महाकाश घटाकाशा परी ते पाहणे असे ॥ ३० ॥
सत्य वस्तू ब्रह्मामध्ये अनेकता आहे, असे एखाद्या अज्ञानी माणसाला वाटले, तरी त्याचे ते वाटणे म्हणजे, महाकाश आणि घटाकाश आकाशातील सूर्य आणि पाण्यात प्रतिबिंब पडलेला सूर्य किंवा बाहेरील वायू आणि आतील वायू यांच्यामध्ये भेद आहे, असे वाटाण्यासारखेच आहे. (३०)
(मिश्र-१२)
यथा हिरण्यं बहुधा समीयते नृभिः क्रियाभिर्व्यवहारवर्त्मसु । एवं वचोभिर्भगवानधोक्षजो व्याख्यायते लौकिकवैदिकैर्जनैः ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा ) सोने जसे भिन्न रुपात भासे व्यवहार ज्ञाने तइ कोणि ज्ञाते । आधार घेती श्रुतिचाच आत्मा अनेक रूपी मग वर्णितात ॥ ३१ ॥
जसे, व्यवहारामध्ये माणूस एकाच सोन्याचे कंकण, कुंडल, इत्यादी अनेक रूपात रूपांतर करतो, त्याचप्रमाणे विद्वान लोक लौकिक आणि वैदिक वाणीने इंद्रियातीत असणर्या आत्मस्वरूप भगवंतांचेसुद्धा अनेक रूपांमध्ये वर्णन करतात. (३१)
यथा घनोऽर्कप्रभवोऽर्कदर्शितो
ह्यर्कांशभूतस्य च चक्षुषस्तमः । एवं त्वहं ब्रह्मगुणस्तदीक्षितो ब्रह्मांशकस्यात्मन आत्मबन्धनः ॥ ३२ ॥
सूर्या कडोनी ढग जन्मतांत तेजेचि होती मग भासमान । सूर्या बघायासहि आड येती ब्रह्मांश जीवो तइ आड येती ॥ ३२ ॥
ढग सूर्यापासून उत्पन्न होतो आणि सूर्यामुळेच प्रकाशित होतो. तरीसुद्धा तो सूर्याचाच अंश असलेल्या डोळ्याला, सूर्याच्या दर्शनात अडथळा निर्माण करतो. त्याचप्रमाणे अहंकारसुद्धा ब्रह्मापासूनच उत्पन्न झाला आहे, ब्रह्मामुळेच प्रकाशित होतो आणि ब्रह्माचाच अंश असलेल्या जीवाला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यात बाधक ठरतो. (३२)
घनो यदार्कप्रभवो विदीर्यते
चक्षुः स्वरूपं रविमीक्षते तदा । यदा ह्यहङ्कार उपाधिरात्मनो जिज्ञासया नश्यति तर्ह्यनुस्मरेत् ॥ ३३ ॥
दिसेचि भानू ढग पांगल्याने तसेचि इच्छी जधि जीव आत्मा । उपाधि सोडोनिहि आपुल्या त्या स्वरूप होते मग ज्ञात जीवा ॥ ३३ ॥
सूर्यापासून निर्माण होणारे ढग जेव्हा विखुरले जातात, तेव्हा डोळा आपलेच स्वरूप असलेल्या सूर्याचे दर्शन घेण्यास समर्थ होतो. तसाच , जेव्हा ज्ञानाने आत्म्याची उपाधी असणारा अहंकार नाहीसा होतो, तेव्हा जीवाला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. (३३)
यदैवमेतेन विवेकहेतिना
मायामयाहङ्करणात्मबन्धनम् । छित्त्वाच्युतात्मानुभवोऽवतिष्ठते तमाहुरात्यन्तिकमङ्ग सम्प्लवम् ॥ ३४ ॥
विवेक खड्गे जधि जीव तोडी मायामयाहंकरणात्मबंध । तै स्थीर होतो स्वरुपात जीव अत्यंतिको तो प्रलयोच जाणी ॥ ३४ ॥
परीक्षिता ! जीव जेव्हा या विवेकाच्या शस्त्राने मायामय अहंकाराचे बंधन तोडून टाकतो आणि आपल्या एकरस आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारामध्ये स्थिर होतो, त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. (३४)
(अनुष्टुप्)
नित्यदा सर्वभूतानां ब्रह्मादीनां परन्तप । उत्पत्तिप्रलयौ एके सूक्ष्मज्ञाः सम्प्रचक्षते ॥ ३५ ॥
( अनुष्टुप् ) सांगती ब्रह्मवादी ते जेवढे प्राणिमात्र हे । जन्मती समयी नित्य नित्य तो जन्म नी लय ॥ ३५ ॥
हे शत्रुदमना ! तत्त्वज्ञानी लोक, ब्रह्मादिक सर्व चराचराचे उत्पत्ती आणि प्रलय नेहमीच चालू असतात, असे सांगतात. (३५)
कालस्रोतोजवेनाशु ह्रियमाणस्य नित्यदा ।
परिणामिनां अवस्थास्ता जन्मप्रलयहेतवः ॥ ३६ ॥
प्रवाह वाहतो नित्य दीपज्योती जळे जशी । काळाने देह तै नित्य क्षणाने रूप पालटी । प्रत्येक क्षणि तो होतो जन्म नी लय ही पुन्हा ॥ ३६ ॥
नदीप्रवाहाप्रमाणे कालरूप प्रवाहाच्या वेगाने क्षणाक्षणाला बदलणारे जे देहादी पदार्थ त्यांच्या ज्या बदलणार्या अवस्था तेच त्यांचे उत्पत्ती आणि प्रलय होत. (३६)
अनाद्यन्तवतानेन कालेनेश्वरमूर्तिना ।
अवस्था नैव दृश्यन्ते वियति ज्योतिषां इव ॥ ३७ ॥
आकशी असती तारे तयांची गति ना दिसे । तसेचि भगवान् काल न दिसे पालटोनिया ॥ ३७ ॥
आकाशातील तारे जसे नेहमी फिरत असतात, परंतु त्यांचे फिरणे स्पष्टपणे दिसत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांचे स्वरूप असलेल्या ह्या अनादी-अनंत काळामुळे पदार्थांच्या क्षणाक्षणाला बदलणार्या अवस्था जाणवत नाहीत. (हाच नित्य प्रलय होय.) (३७)
नित्यो नैमित्तिकश्चैव तथा प्राकृतिको लयः ।
आत्यन्तिकश्च कथितः कालस्य गतिरीदृशी ॥ ३८ ॥
नित्य नैमित्तिको तैसे आत्यंतिक नि प्राकृती । प्रलया वर्णिले चारी काळाची गति सूक्ष्म ती ॥ ३८ ॥
परीक्षिता ! नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय, प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय अशा चार प्रकारच्या प्रलयांचे वर्णन मी तुला सांगितले. काळाची गती ही अशी आहे. (३८)
(मिश्र-११)
एताः कुरुश्रेष्ठ जगद्विधातुः नारायणस्याखिलसत्त्वधाम्नः । लीलाकथास्ते कथिताः समासतः कार्त्स्न्येन नाजोऽप्यभिधातुमीशः ॥ ३९ ॥
( इंद्रवज्रा ) नारायणो शक्ति नि आश्रयो त्या समस्त प्राण्यां कुरुश्रेष्ठ वीरा । लीला कथाया हरिच्याच सर्व ब्रह्मासही त्या नच पूर्ण ज्ञान ॥ ३९ ॥
हे कुरुश्रेष्ठा ! विश्व-विधाता, सर्व प्राणी आणि शक्तींचे आश्रय असणार्या भगवान नारायणांच्या या सर्व लीला-कथा मी तुला थोडक्यात सांगितल्या त्यांचे पूर्ण वर्णन ब्रह्मदेवसुद्धा करू शकणार नाही. (३९)
(वसंततिलका)
संसारसिन्धुमतिदुस्तरमुत्तितीर्षोः त नान्यः प्लवो भगवतः पुरुषोत्तमस्य । लीलाकथारसनिषेवणमन्तरेण पुंसो भवेद्विविधदुःखदवार्दितस्य ॥ ४० ॥
( वसंततिलका ) संसारसिंधु मधुनी तरणे जयाला त्यांना कथेविण नसे दुसरीच नौका । एको कथा नरपती पुरुषोत्तमाच्या तो सेवितो रस मिळे मन इच्छिते ते ॥ ४० ॥
जे लोक तरण्यास अत्यंत कठीण अशा संसार-सागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात, त्यांना भगवंतांच्या कथाश्रवणाखेरीज दुसरी नौका नाही. तसेच जे लोक अनेक प्रकारच्या दु:खाग्नीने होरपळले आहेत, त्यांच्यासाठी भगवान पुरुषोत्तमांच्या कथारूप रसाच्या सेवनाखेरीज दुसरे कोणतेही रसायन नाही. (४०)
(अनुष्टुप्)
पुराणसंहितामेतां ऋषिर्नारायणोऽव्ययः । नारदाय पुरा प्राह कृष्णद्वैपायनाय सः ॥ ४१ ॥
( अनुष्टुप् ) कथिलीही मला राजा भगवान् बादरायणो । कथा भागवती प्रेमे संहिता वेदतुल्य जी ॥ ४१ ॥
हे श्रीमद्भागवतपुराण सनातन ऋषी नारायणांनी पूर्वी देवर्षी नारदांना सांगितले आणि त्यांनी कृष्णद्वैपायनांना सांगितले. (४१)
स वै मह्यं महाराज भगवान् बादरायणः ।
इमां भागवतीं प्रीतः संहितां वेदसम्मिताम् ॥ ४२ ॥
संहितेच्या समान समश्लोक नाही.
महाराज ! त्याच महर्षी कृष्णद्वैपायनांनी प्रसन्न होऊन मला या वेदतुल्य श्रीभागवतसंहितेचा उपदेश केला. (४२)
इमां वक्ष्यत्यसौ सूत ऋषिभ्यो नैमिषालये ।
दीर्घसत्रे कुरुश्रेष्ठ सम्पृष्टः शौनकादिभिः ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
वक्ता सूत पुढे हीच नैमीषवनि सत्रि त्या । शौनकादी ऋषी यांना संहिता सांगतील की ॥ ४२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौथा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
हे कुरुश्रेष्ठा ! यानंतर काही काळाने जेव्हा शौनकादी ऋषी नैमिषाराण्यामध्ये दीर्घकाळ चालणार्या सत्राचा प्रारंभ करतील, तेव्हा त्यांनी विचारल्यावरून पुराणांचा वक्ता सूत त्यांना ही संहिता सांगेल. (४३)
स्कन्द बारावा - अध्याय चवथा समाप्त |