|
श्रीमद् भागवत पुराण
भूमिगीतं कलिदोषनिरासोपायः, युगधर्मनिरूपणं,
राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच –
(अनुष्टुप्) दृष्ट्वाऽऽत्मनि जये व्यग्रान् नृपान् हसति भूरियम् । अहो मा विजिगीषन्ति मृत्योः क्रीडनका नृपाः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) जिंकिण्या पाहती राजे पृथिवी हासुनी वदे । मृत्यूचे खेळणे हे तो जिंकिण्या पाहती मला ॥ १ ॥
श्रीशुक म्हणतात - राजे लोक आपल्याला जिंकण्यासाठी उतावीळ झालेले पाहून पृथ्वी त्यांना हसते आणि म्हणते, "केवढे आश्चर्य आहे पहा ! जे स्वत: मृत्यूच्या हातातील बाहुले आहेत, ते मला जिंकून घेऊ इच्छितात." (१)
काम एष नरेन्द्राणां मोघः स्याद् विदुषामपि ।
येन फेनोपमे पिण्डे येऽतिविश्रम्भिता नृपाः ॥ २ ॥
ठावे त्यांनाहि मृत्यू तो तरी व्यर्थचि इच्छिती । फुग्याच्या सारखा जीव फसती त्या विसंबुनी ॥ २ ॥
जे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असलेल्या शरीरावर फाजील विश्वास ठेवतात, त्या सुजाण राजांचीही ही इच्छा फोल ठरते. (२)
पूर्वं निर्जित्य षड्वर्गं जेष्यामो राजमंत्रिणः ।
ततः सचिवपौराप्त करीन्द्रानस्य कण्टकान् ॥ ३ ॥ एवं क्रमेण जेष्यामः पृथ्वीं सागरमेखलाम् । इति आशाबद्ध हृदया न पश्यन्ति अन्तिकेऽन्तकम् ॥ ४ ॥
इच्छिती इंद्रिया जिंकू स्वल्प तैं अरि बाह्यचे । जिंकोनी मंत्रि नी नेते सेना सर्व तशीच नी । विजये मार्गिचे काटे सहजी सारु सर्व ते ॥ ३ ॥ क्रमे सम्राट होवोनी समुद्र खंदकोचि की । विचार करिता ऐसा न स्मरे मृत्यु त्याजला ॥ ४ ॥
ते असाही विचार करतात की, आपण प्रथम मनासह आपल्या पाचही इंद्रियांवर विजय मिळवू. त्यानंतर आपल्या मंत्री, अमात्य, नागरिक, बांधव आणि सर्व सेनेलासुद्धा वश करून घेऊ. अशा रीतीने शत्रूला जिंकून क्रमाने समुद्रवलयांकित पृथ्वी जिंकू. अशा प्रकारे मनात मनोरे रचणारे ते जवळ आलेल्या मृत्यूला पाहात नाहीत. (३-४)
समुद्रावरणां जित्वा मां विशन्त्यब्धिमोजसा ।
कियदात्मजयस्यैतन् मुक्तिरात्मजये फलम् ॥ ५ ॥
मिळता एक ते द्वीप उत्साहे चालतो पुढे । चित्तरोधे मिळे मोक्ष कष्टता तुकडा मिळे ॥ ५ ॥
समुद्रवलयांकित मला जिंकल्यावर ते नवा प्रदेश जिंकण्यासाठी समुद्राची सफर करतात. अंत:करणजयाच्या तुलनेत हे किती क्षुद्र फळ आहे ! कारण मनोजयाचे फळ मुक्ती हे आहे. (५)
यां विसृज्यैव मनवः तत्सुताश्च कुरूद्वह ।
गता यथागतं युद्धे तां मां जेष्यन्त्यबुद्धयः ॥ ६ ॥
पृथिवी वदते थोर आले गेले रितेच की । मूर्ख राज मला युद्धी जिंकाया पाहती पहा ॥ ६ ॥
परीक्षिता ! मनू आणि त्यांचे पुत्र ज्या मला सोडून जेथून आले तेथे रिकाम्या हातांनी परत गेले, त्या मला हे मूर्ख राजे आता युद्धात जिंकून घेऊ इच्छितात. (६)
मत्कृते पितृपुत्राणां भ्रातृणां चापि विग्रहः ।
जायते ह्यसतां राज्ये ममता-बद्धचेतसाम् ॥ ७ ॥
स्वामित्व मानिता माझे जेवढे दृढ निश्चये । आपसी वाढते वैर लढती पुत्र बंधुही ॥ ७ ॥
’ही पृथ्वी आपली आहे,’ ही गोष्ट ज्यांच्या चित्तात ठाण देऊन बसली आहे, त्या दुष्टांच्या राज्यात माझ्यासाठी पिता-पुत्र आणि भाऊ-भाऊ सुद्धा आपापसात लढाई करतात. (७)
ममैवेयं मही कृत्स्ना न ते मूढेति वादिनः ।
स्पर्धमाना मिथो घ्नन्ति म्रियन्ते मत्कृते नृपाः ॥ ८ ॥
वदती आपसा मध्ये मूढा ही पृथिवी मम । या परी वदता राज लढती रमती स्वयें ॥ ८ ॥
ते एकमेकांना म्हणतात, "अरे मूर्खा ! ही सगळी पृथ्वी माझी आहे. तुझी नाही." अशा प्रकारे माझ्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करणारे राजे एकमेकांना मारतात आणि स्वत:ही मरतात. (८)
पृथुः पुरूरवा गाधिः नहुषो भरतोऽर्जुनः ।
मान्धाता सगरो रामः खट्वाङ्गो धुन्धुहा रघुः ॥ ९ ॥ तृणबिन्दुर्ययातिश्च शर्यातिः शन्तनुर्गयः । भगीरथः कुवलयाश्वः ककुत्स्थो नैषधो नृगः ॥ १० ॥ हिरण्यकशिपुर्वृत्रो रावणो लोकरावणः । नमुचिः शंबरो भौमो हिरण्याक्षोऽथ तारकः ॥ ११ ॥ अन्ये च बहवो दैत्या राजानो ये महेश्वराः । सर्वे सर्वविदः शूराः सर्वे सर्वजितोऽजिताः ॥ १२ ॥ ममतां मय्यवर्तन्त कृत्वोच्चैर्मर्त्यधर्मिणः । कथावशेषाः कालेन ह्यकृतार्थाः कृता विभो ॥ १३ ॥
पृथू पुरुरवा गाधी नहूष भरतोऽर्जुन । मांधाता सगरो राम खट्वांग धुंधु नी रघु ॥ ९ ॥ तृणबिंदु ययाती नी शर्याति शंतनू गय । भगीरथो कुलयाश्व कुकुत्स्थो नल नी मृग ॥ १० ॥ हिरण्यकशिपू वृत्र रावणो लोकद्रोहि तो । नमिची शंबरो भौम हिरण्याक्षो नि तारको ॥ ११ ॥ अनेक थोर ते राजे दैत्य नी नृपती तसे । सर्वची ज्ञानि नी शूर सर्वची अजितो पहा ॥ १२ ॥ परी मेलेचि ते सारे मजला प्रेम लावुनी । काळाने ग्रासिले त्यांना कथा ती शेष राहिली ॥ १३ ॥
पृथू, पुरूरवा, गाधी, नहुष, भरत, सहस्त्रबाहू अर्जुन, मांधाता, सगर, राम, खट्वांग, धुंधुमार, रघू, तृणबिंदू, ययाती, शर्याती, शंतनू, गय, भगीरथ, कुवलयाश्व, ककुत्स्थ, नल, नृग, हिरण्यकशिपू, वृत्रासुर, लोकद्रोही रावण, नमूची, शंबर, भौमासुर, हिरण्याक्ष, तारकासुर, इतर अनेक दैत्य आणि शक्तिशाली राजे होऊन गेले. हे सर्वजण ज्ञानी होते, शूर होते, सर्वांना जिंकणारे होते, अजिंक्य होते, तरीसुद्धा हे सगळे मरण पावले. राजन ! त्यांनी अगदी अंत:करणापासून माझ्यावर ममत्व बाळगले. परंतु हे राजा ! काळाने त्यांची इच्छा धुळीला मिळावून त्यांची कहाणीच फक्त शिल्लक ठेवली." (९-१३)
(मिश्र-१२)
कथा इमास्ते कथिता महीयसां विताय लोकेषु यशः परेयुषाम् । विज्ञानवैराग्यविवक्षया विभो वचोविभूतीर्न तु पारमार्थ्यम् ॥ १४ ॥
( इंद्रवज्रा ) झाले जगी कैक प्रतापी वीर जगी यशा विस्तरुनीहि गेले । मी जे तुला ज्ञानचि बोललो ते वाणीविलासे नच सत्य त्यात ॥ १४ ॥
परीक्षिता ! सर्व लोकांत यशाचा विस्तार करून, मरून गेलेल्या महान पुरुषांच्या या कथा मी तुला सांगितल्या. ज्ञान वैराग्याचा उपदेश करण्यासाठीच हा वाणीचा विलास आहे. यामध्ये पारमार्थिक सत्य काहीच नाही. (१४)
(इंद्रवज्रा)
यस्तु उत्तमश्लोकगुणानुवादः संगीगीयतेऽभीक्ष्णममंगगलघ्नः । तमेव नित्यं श्रृणुयादभीक्ष्णं कृष्णेऽमलां भक्तिमभीप्समानः ॥ १५ ॥
नाशी अशूभा हरिची कथा ही मोथे महात्मे म्हणुनीच गाती । जो प्रेम ठेवी हरिपादपद्मी त्याने हरीचे गुण ऐकणे ते ॥ १५ ॥
भगवान श्रीकृष्णांचे गुणकीर्तन सर्व अमंगलाचा नाश करणारे आहे. महात्मे नेहमी त्यांचेच गायन करीत असतात. श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भक्तीची ज्याला इच्छा असेल, त्याने नेहमी त्यांचेच श्रवण करावे. (१५)
श्रीराजोवाच -
(अनुष्टुप्) केनोपायेन भगवन् कलेर्दोषान् कलौ जनाः । विधमिष्यन्ति उपचितान् तन्मे ब्रूहि यथा मुने ॥ १६ ॥ युगानि युगधर्मांश्च मानं प्रलयकल्पयोः । कालस्येश्वररूपस्य गतिं विष्णोर्महात्मनः ॥ १७ ॥
राजा परीक्षिताने विचारले - ( अनुष्टुप् ) कलीत राशि दोषाच्या मला तो दिसतात की । लोके त्या समयी काय करणे दोष नष्टिण्या ॥ १६ ॥ युगांचे रूपे नी धर्म कल्पाची स्थिति नी लय । भगवत्काल रुपाचे यथावत् सांगणे मला ॥ १७ ॥
परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! या कलियुगात कलीचे असंख्य दोष लोक कोणत्या उपायांनी नाहीसे करू शकतील ? याशिवाय युगांचे स्वरूप, त्यांचे धर्म, कल्पाची स्थिती आणि प्रलयकालाचे प्रमाण, तसेच सर्वव्यापक , सर्वशक्तिमान भगवंतांच्या कालरूपाचे सुद्धा मला वर्णन करून सांगावे. (१६-१७)
श्रीशुक उवाच -
कृते प्रवर्तते धर्मः चतुष्पात् तज्जनैर्धृतः । सत्यं दया तपो दानं इति पादा विभोर्नृप ॥ १८ ॥
कृतयुगात धर्माला असती चार पाय ते । सत्य दया तपो दान धर्म तो भगवद्रुप ॥ १८ ॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! सत्ययुगामध्ये सत्य, दया, तप आणि दान हे संपूर्ण धर्माचे चार पाय असतात. त्या युगातील लोक चतुष्पाद धर्माचे पालन करतात. (१८)
सन्तुष्टाः करुणा मैत्राः शान्ता दान्ताः तितिक्षवः ।
आत्मारामाः समदृशः प्रायशः श्रमणा जनाः ॥ १९ ॥
तदा दया नि संतोषे शंतीने लोक राहती । द्वंद्वा समान पाहोनी बव्हंशी स्वरुपी स्थित ॥ १९ ॥
सत्ययुगातील बहुतेक लोक संतोषी, दयाळू, सर्वांशी मैत्री असणारे, शांत, इंद्रियनिग्रही, सहनशील, समदर्शी आणि आत्म्यात रममाण होणारे असतात. (१९)
त्रेतायां धर्मपादानां तुर्यांशो हीयते शनैः ।
अधर्मपादैः अनृत हिंसासंतोषविग्रहैः ॥ २० ॥
चारपाय अधर्माला खोटे हिंसा नि भाडणे । असंतोष, तसाच त्रेतीं चौथाइ धर्म क्षीण हो ॥ २० ॥
परीक्षिता ! अधर्माचेही असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह हे चार पाय आहेत. यांच्या प्रभावाने त्रेतायुगामध्ये हळू हळू धर्माचे पाय चतुर्थांशाने क्षीण होत जातात. (२०)
तदा क्रियातपोनिष्ठा नातिहिंस्रा न लंपटाः ।
त्रैवर्गिकास्त्रयीवृद्धा वर्णा ब्रह्मोत्तरा नृप ॥ २१ ॥
द्विजांची शक्ति तैं दृष्टी हिंसी लंपट ना कुणी । कर्मकांडी तपी सर्व धर्मार्थ काम सेविती ॥ २१ ॥
त्या युगात ब्राह्मणांचे आधिक्य असणारे चार वर्ण असतात. लोकांमध्ये हिंसा आणि स्त्रीलंपटता विशेष नसते. कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म, अर्थ व काम यांचे सेवन करतात. अधिकांश लोक वेदांत पारंगत असतात. (२१)
तपःसत्यदयादानेषु अर्धं ह्रस्वति द्वापरे ।
हिंसातुष्ट्यनृतद्वेषैः धर्मस्य-अधर्मलक्षणैः ॥ २२ ॥
द्वापारी तो असंतोष हिंसा खोटे नि द्वेष तो । वाढता तप सत्यो नी दया दानहि अर्ध हो ॥ २२ ॥
द्वापार युगामध्ये अधर्माच्या हिंसा, असंतोष, खोटेपणा आणि द्वेष या पायांची वाढ होते. तसेच यामुळे धर्माचे चार पाय असलेल्या तप, सत्य, दया आणि दान यांमध्ये अर्ध्याने घट होते. (२२)
यशस्विनो महाशीलाः स्वाध्यायाध्ययने रताः ।
आढ्याः कुटुम्बिनो हृष्टा वर्णाः क्षत्रद्विजोत्तराः ॥ २३ ॥
यश वेद तसे कर्मीं लोक तत्पर राहती । संयुक्त सुखि नी श्रीमान् द्विज क्षात्र प्रधान तैं ॥ २३ ॥
त्या युगातील लोक यशस्वी, कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन-अध्यापन करण्यामध्ये मोठे तत्पर असतात. लोक धनाढ्य कुटुंबवत्सल आणि सुखी असतात. त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोन वर्णांचे प्राधान्य असते. (२३)
कलौ तु धर्महेतूनां तुर्यांशोऽधर्महेतुभिः ।
एधमानैः क्षीयमाणो ह्यन्ते सोऽपि विनङ्क्ष्यति ॥ २४ ॥
कलीत क्षीण हो धर्म चवथाई उरे तदा । अंति तो सर्वचि लोपे अधर्म पूर्ण वाढतो ॥ २४ ॥
कलियुगात अधर्माच्या चारी पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळेच धर्माचे चारही पाय क्षीण होऊ लागतात व त्यांपैकी एक चतुर्थांश भाग शिल्लक राहातो. शेवटी तोही नाहीसा होईल. (२४)
तस्मिन् लुब्धा दुराचारा निर्दयाः शुष्कवैरिणः ।
दुर्भगा भूरितर्षाश्च शूद्रदासोत्तराः प्रजाः ॥ २५ ॥
क्रोधी लोभी दुराचारी स्पर्धेने लोक सर्व ते । बांधिती वैर ते अन्यां शूद्रा प्राधान्य येतसे ॥ २५ ॥
कलियुगामध्ये लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी विनाकरण वैर धरणारे, भाग्यहीन आणि आशाळभूत असतात. त्या युगात लोकांमध्ये शूद्र, कोणी यांचे वर्चस्व असते. (२५)
सत्त्वं रजस्तम इति दृश्यन्ते पुरुषे गुणाः ।
कालसञ्चोदितास्ते वै परिवर्तन्त आत्मनि ॥ २६ ॥
सत्व रज तोमो हे तो पुरुषीं गुण राहती । कली संचरता अंगी शरीर पाण जाळिती ॥ २६ ॥
सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्त्व, रज आणि तम असे तीन गुण असतात. काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्त होत असतात. (२६)
प्रभवन्ति यदा सत्त्वे मनोबुद्धीन्द्रियाणि च ।
तदा कृतयुगं विद्यात् ज्ञाने तपसि यद् रुचिः ॥ २७ ॥
मन इंद्रिय बुद्धीसी सत्त्व जैं स्थिर होतसे । तप नी ज्ञान जै प्रीय मानावे सत्ययूग ते ॥ २७ ॥
ज्यावेळी मन, बुद्धी आणि इंद्रियांवर सत्त्वगुणाचा प्रभाव असतो, तेव्हा सत्ययुग आहे असे समजावे. त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या यांची आवड असते. (२७)
यदा धर्मार्थ कामेषु भक्तिर्यशसि देहिनाम् ।
तदा त्रेता रजोवृत्तिः इति जानीहि बुद्धिमन् ॥ २८ ॥
प्रवृत्ति रुचि नी धर्म सुखाची वृत्ति वाढता । रजोवृत्ति स्थिरावे तै त्रैता हे युग मानणे ॥ २८ ॥
हे बुद्धिमान परीक्षिता ! जेव्हा माणसांची भक्ती धर्म, अर्थ आणि काम यांवर असते, तसेच अंत:करणात रजोगुण प्रबळ असतो, तेव्हा त्रेतायुग आहे, असे समजावे. (२८)
यदा लोभस्तु असन्तोषो मानो दम्भोऽथ मत्सरः ।
कर्मणां चापि काम्यानां द्वापरं तद् रजस्तमः ॥ २९ ॥
असंतोष तसा लोभ दंभ मत्सर गर्व तो । वाढता स्फूर्ति ये लोका द्वापारी रज नी तमे ॥ २९ ॥
ज्यावेळी रज-तम प्रबळ झाल्यामुळे लोभ, असंतोष, अभिमान , दंभ, मत्सर इत्यादी दोष दिसू लागतात, तसेच माणसांना सकाम कर्मे आवडतात, तेव्हा द्वापार युग आहे, असे समजावे. (२९)
यदा मायानृतं तन्द्रा निद्रा हिंसा विषादनम् ।
शोकमोहौ भयं दैन्यं स कलिस्तामसः स्मृतः ॥ ३० ॥
हिंसा विषाद नी खोटे शोक मोह भयो तसे । निद्रा नी दीनता वाढे तमी तो कलियूग की ॥ ३० ॥
ज्यावेळी खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल, तेव्हा तमोगुणप्रधान कलियुग आहे, असे समजावे. (३०)
यस्मात् क्षुद्रदृशो मर्त्याः क्षुद्रभाग्या महाशनाः ।
कामिनो वित्तहीनाश्च स्वैरिण्यश्च स्त्रियोऽसतीः ॥ ३१ ॥
कलिचे राज्य ते येता क्षुद्रा दृष्टीच होतसे । निर्धनी बहु खादाड मंदभाग्य नि कामुका । स्त्रियात दुष्टता वाढे स्वैराचारीहि होत त्या ॥ ३१ ॥
कलियुगात लोकांची दृष्टी संकुचित होईल, अधिकांश लोक अभागी व खादाड असतील, दरिद्री असूनही मनात मोठमोठ्या कामना करतील. स्त्रिया स्वैराचारी होतील. (३१)
दस्यूत्कृष्टा जनपदा वेदाः पाषण्डदूषिताः ।
राजानश्च प्रजाभक्षाः शिश्नोदरपरा द्विजाः ॥ ३२ ॥
सर्वत्र माजती चोर पाखंडी धर्म सांगती । राजा शोषी प्रजेला नी शिश्नोदर द्विजांप्रिय ॥ ३२ ॥
देशात चोर-लुटारूंची वाढ होईल. पाखंडी लोक वेदांना नावे ठेवतील. राजे प्रजेचे रक्तशोषण करतील. ब्राह्मण पोट भरणे आणि कामवासना तृप्त करणे यातच मग्न असतील. (३२)
अव्रता वटवोऽशौचा भिक्षवश्च कुटुम्बिनः ।
तपस्विनो ग्रामवासा न्यासिनोऽत्यर्थलोलुपाः ॥ ३३ ॥
ब्रह्मचारी अपवित्र गृहस्थ भीक मागती । वानप्रश्ती वसे ग्रामीं संन्यासी धनलोभि ते ॥ ३३ ॥
ब्रह्मचारी ब्रह्मचर्यव्रताचे पालन करणार नाहीत व अवित्रपणे राहू लागतील. गृहस्थाश्रमी, भीक मागू लागतील. वानप्रस्थ, गावामध्ये राहू लागतील आणि संन्यासी धनाचे लोभी होतील. (३३)
ह्रस्वकाया महाहारा भूर्यपत्या गतह्रियः ।
शश्वत्कटुकभाषिण्यः चौर्यमायोरुसाहसाः ॥ ३४ ॥
सान स्तिर्या नि खादाड संतान बहु वाढते । सोडिती लाज लज्जा नी कर्कशा कपटी धृता ॥ ३४ ॥
स्त्रियांची शरीरे लहान असली तरी त्यांचा आहार जास्त असेल. त्यांना संतती पुष्कळ होईल. त्या निर्लज्ज , नेहमी कर्कश बोलणार्या आणि चोरी व कपट करण्यात मोठ्या धाडसी होतील. (३४)
पणयिष्यन्ति वै क्षुद्राः किराटाः कूटकारिणः ।
अनापद्यपि मंस्यन्ते वार्तां साधु जुगुप्सिताम् ॥ ३५ ॥
व्यापारी काडी साठी दुजांना फसवी पहा । आपत्ती नसुनी हीन उद्योगा धनि लागती ॥ ३५ ॥
व्यापारी हलक्या वृत्तीचे व कपटाने व्यापार करणारे होतील. संकटकाळ नसूनही सत्पुरुषांनी त्याज्य मानलेला व्यापार ते उचित समजून करू लागतील. (३५)
पतिं त्यक्ष्यन्ति निर्द्रव्यं भृत्या अप्यखिलोत्तमम् ।
भृत्यं विपन्नं पतयः कौलं गाश्चापयस्विनीः ॥ ३६ ॥
चन जाताचि ते भृत्य मालका सोडिती पहा । जुन्या भृत्यास ते स्वामी संकटीं सोडिती तसे । भाकडा गायही लोक विकिती मोल घेउनी ॥ ३६ ॥
मालक सर्वश्रेष्ठ असला तरी निर्धन असल्यास सेवक त्याला सोडून जातील. सेवक संकटात असला तरी मालक त्याला सोडून देईल. गाय दूध देणे बंद करील, तेव्हा लोक तिचाही त्याग करतील. (३६)
पितृभ्रातृसुहृत् ज्ञातीन् हित्वा सौरतसौहृदाः ।
ननान्दृश्यालसंवादा दीनाः स्त्रैणाः कलौ नराः ॥ ३७ ॥
पितरे बंधु नी मित्रा त्यजुनी पत्नि मेहुणे । ययांची घेतसे राय दीन स्त्रैण कलीं नर ॥ ३७ ॥
कामवासना तृप्त करण्यासाठी प्रेम करणारी कलियुगातील माणसे स्त्रीलंपट व दीन होतील. ती माता-पिता, बंधू, मित्र आणि नातलगांना सोडून बायकोच्या बहीण-भावांकडून सल्ला घेऊ लागतील. (३७)
शूद्राः प्रतिग्रहीष्यन्ति तपोवेषोपजीविनः ।
धर्मं वक्ष्यन्ति अधर्मज्ञा अधिरुह्योत्तमासनम् ॥ ३८ ॥
तपिंचा वेष तो शूद्र घेतील दान मागण्या । मुळीच नसता ज्ञान उच्चआसनि बोधिती ॥ ३८ ॥
शूद्र तपस्व्याचा वेष घेऊन दान घेऊ लागतील. आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चसनावर बसून धर्माचा उपदेश करू लागतील. (३८)
नित्यं उद्विग्नमनसो दुर्भिक्षकरकर्शिताः ।
निरन्ने भूतले राजन् अनावृष्टिभयातुराः ॥ ३९ ॥
दुष्काळी कर ना शक्य भयभीत प्रजा तदा । अस्थिपंजर ते लोक तुकडे धुंडितील की ॥ ३९ ॥
हे राजा ! दुष्काळामुळे आणि करांमुळे त्रासलेली कलियुगातील प्रजा नेहमी खिन्न राहील. अन्न नसलेल्या पृथ्वीवर पाऊस न पडण्याच्या भीतीने नेहमी व्याकूळ राहील. (३९)
वासोऽन्नपानशयन व्यवायस्नानभूषणैः ।
हीनाः पिशाचसन्दर्शा भविष्यन्ति कलौ प्रजाः ॥ ४० ॥
कलीत भाकरी पाणी वस्त्र नी झोपण्या भुमी । दांपत्य जीवना स्नाना नटण्या सुविधा न तैं । आकृती प्रकृती चेष्टा पिशाच्या परि होत ते ॥ ४० ॥
कलियुगातील प्रजा अन्न -वस्त्र, पाणी, झोप, कामसुख, स्नान, अलंकार यांपासून वंचित राहील. लोकांचे दिसणे, पिशाच्चासारखे असेल. (४०)
कलौ काकिणिकेऽप्यर्थे विगृह्य त्यक्तसौहृदाः ।
त्यक्ष्यन्ति च प्रियान्प्राणान् हनिष्यन्ति स्वकानपि ॥ ४१ ॥
कौडिलोभे हि मित्राला मित्र ते तोडितील की । वधिती दमडीसाटी मरती त्याच त्या परी ॥ ४१ ॥
कलियुगात लोक, काही कवड्यांसाठीसुद्धा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील आणि एवढेच नव्हे तर आपल्या सग्या-सोयर्यांची हत्या करतील आणि आपले प्रिय प्राणही गमावून बसतील. (४१)
न रक्षिष्यन्ति मनुजाः स्थविरौ पितरौ अपि ।
पुत्रान् सर्वार्थ कुशलान् क्षुद्राः शिश्नोदरंभराः ॥ ४२ ॥
कलीत माय बापांना मुले ते पोषितीच ना । निपूण युक्त पुत्रांना वेगळे बाप ठेविती ॥ ४२ ॥
परीक्षिता ! कलियुगातील क्षुद्र माणसे फक्त कामवासनापूर्ती आणि आपले पोट भरणे यातच मग्न असतील. ती आपल्या म्हातार्या आई-बापांचे रक्षण करणार नाहीत आणि आई-वडिलसुद्धा सर्व कामांत कुशल अशा पुत्रांना वेगळे ठेवतील. (४२)
(मिश्र-१२)
कलौ न राजन् जगतां परं गुरुं त्रिलोकनाथानतपादपङ्कजम् । प्रायेण मर्त्या भगवन्तमच्युतं यक्ष्यन्ति पाषण्डविभिन्नचेतसः ॥ ४३ ॥
( इंद्रवज्रा ) जगद्गुरू नी पितरो हरीच ब्रह्मादि त्याचे नमितात पाय । कलीत पाखंडचि माजता ते न कोणि पूजी हरिच्या पदासी ॥ ४३ ॥
परीक्षिता ! इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी त्रैलोक्याचे अधिपतीसुद्धा ज्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक लववतात, त्या जगताचे परम गुरू भगवंतांचीही कलियुगामध्ये पाखंडामुळे बुद्धिभेद झालेली माणसे बहुधा पूजा करणार नाहीत. (४३)
यन्नामधेयं म्रियमाण आतुरः
पतन् स्खलन् वा विवशो गृणन् पुमान् । विमुक्तकर्मार्गल उत्तमां गतिं प्राप्नोति यक्ष्यन्ति न तं कलौ जनाः ॥ ४४ ॥
भावे तसे ठेचहि लागल्यास मृत्यूशि त्याचे स्मरताच नाव । तो बंध तोडी गति उत्तमा दे परी कलीमाजि न आथवे ते ॥ ४४ ॥
एखाद्या माणसाने मरतेवेळी व्याकुळतेने किंवा पडताना, घसरताना, अगतिक होऊन जरी भगवंतांचे नाव घेतले, तरीसुद्धा त्याची सर्व कर्मबंधने तुटतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. परंतु कलियुगातील लोक त्या भगवंतांच्या आराधनेला विन्मुख होतील. (४४)
(अनुष्टुप्)
पुंसां कलिकृतान् दोषान् द्रव्यदेशात्मसंभवान् । सर्वान् हरति चित्तस्थो भगवान् पुरुषोत्तमः ॥ ४५ ॥
( अनुष्टुप् ) कलिचे दोष ते कैक स्थानही भ्रष्टती तदा । हृदयो मूळ दोषाचे हरी त्या भगवान् हरी ॥ ४५ ॥
कलियुगामुळे वस्तू, ठिकाणे आणि अंत:करणे यांमध्ये उत्पन्न झालेले दोष भगवंतांचे स्मरण केले असता नाहीसे होतात. (४५)
श्रुतः सङ्कीर्तितो ध्यातः पूजितश्चादृतोऽपि वा ।
नृणां धुनोति भगवान् हृत्स्थो जन्मायुताशुभम् ॥ ४६ ॥
भगवद् गुण रूपो नी लीला नामास ध्यायिता । हृदयीं वसतो नित्य पापांच्या राशि जाळितो ॥ ४६ ॥
हृदयत असलेले भगवान, श्रवण, संकीर्तन, ध्यान, पूजन किंवा आदरभाव बाळगला तरी मनुष्याच्या हजारो जन्मातील पापे नष्ट करतात. (४६)
यथा हेम्नि स्थितो वह्निः दुर्वर्णं हन्ति धातुजम् ।
एवं आत्मगतो विष्णुः योगिनां अशुभाशयम् ॥ ४७ ॥
सोन्याचा मळ जैं अग्नि जाळोनी संपवीतसे । हृदयीं स्थिरता विष्णु अशूभ सर्व संपते ॥ ४७ ॥
जसा सोन्याशी संबंध आल्यावर अग्नी त्या धातूतील हीण नाहीसे करतो, त्याप्रमाणे भगवान विष्णू साधकांच्या हृदयात राहून त्यांच्या अशुभ वासना कायमच्या नाहीशा करतात. (४७)
(इंद्रवज्रा)
विद्यातपःप्राणनिरोधमैत्री तीर्थाभिषेक व्रतदानजप्यैः । नात्यन्तशुद्धिं लभतेऽन्तरात्मा यथा हृदिस्थे भगवत्यनन्ते ॥ ४८ ॥
( इंद्रवज्रा ) विद्या तपो प्राणनिरोध मैत्री तीर्थे व्रते दान नि जाप्य तैसे । न होय याने हृदयात शुद्धी होते जसी विष्णु ध्याता हृदेयी ॥ ४८ ॥
भगवान पुरुषोत्तम हृदयामध्ये विराजमान झाल्यावर मनुष्याचे अंत:करण जसे शुद्ध होते, तसे ते विद्या, तपश्चर्या, प्राणायाम, सर्व प्राण्यांविषयी मैत्रीचा भाव, तीर्थस्नान, व्रत, दान, जप इत्यादी कोणत्याही साधनाने होत नाही. (४८)
(अनुष्टुप्)
तस्मात् सर्वात्मना राजन् हृदिस्थं कुरु केशवम् । म्रियमाणो हि अवहितः ततो यासि परां गतिम् ॥ ४९ ॥
( अनुष्टुप् ) परीक्षित् ! तव मृत्यू तो पातला सावधान हो । हृदयासनि त्या कृष्णा स्थापिता सद्गती मिळे ॥ ४९ ॥
परीक्षिता ! आता तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे . म्हणूनच एकाग्रचित्ताने सर्वभावे भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदयसिंहासनावर स्थापना कर. असे केल्याने तुला परमगती प्राप्त होईल. (४९)
म्रियमाणैरभिध्येयो भगवान् परमेश्वरः ।
आत्मभावं नयत्यङ्ग सर्वात्मा सर्वसंश्रयः ॥ ५० ॥
सर्वांनी भगवान् ध्यावा पातता मृत्यु आपुल्या । सर्वात्मा लाविता ध्यान आपुले रूप देतसे ॥ ५० ॥
मृत्युकाळ जवळ आलेल्यांनी भगवंतांचेच ध्यान करावे. परीक्षिता ! असे केल्याने सर्वांचे परम आश्रय आणि सर्वात्मा भगवान त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. (५०)
कलेर्दोषनिधे राजन् अस्ति ह्येको महान् गुणः ।
कीर्तनात् एव कृष्णस्य मुक्तसङ्गः परं व्रजेत् ॥ ५१ ॥
कलि हा दोषभांडार परी सद्गुण एक तो । कीर्तनी कृष्ण तो गाता परमात्माचि लाभतो ॥ ५१ ॥
परीक्षिता ! दोषांचा खजिना असलेल्या कलियुगाच्या ठायी एक मोठा गुण आहे. तो म्हणजे कलियुगात श्रीकृष्णांचे फक्त संकीर्तन केल्यानेच सर्व आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते. (५१)
कृते यद् ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखैः ।
द्वापरे परिचर्यायां कलौ तद् हरिकीर्तनात् ॥ ५२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
कृतीं विष्णूस त्या ध्याता त्रेतात यज्ञि पूजिता । द्वापारीं पूजिता तैसे कलीत कीर्तने मिळे ॥ ५२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सत्ययुगात भगवंतांच्या ध्यानाने , त्रेतायुगात यज्ञांनी, द्वापारयुगात पूजा-सेवेने जे फळ मिळते, ते कलियुगामध्ये फक्त भगवन्नमाचे कीर्तन केल्यानेच प्राप्त होते. (५२)
स्कन्द बारावा - अध्याय तिसरा समाप्त |