|
श्रीमद् भागवत पुराण कलिधर्मनिरूपणं कल्क्यवतारस्य कृतयुगागमस्य च समयः - कलियुगाचे धर्म - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच –
(अनुष्टुप्) ततश्चानुदिनं धर्मः सत्यं शौचं क्षमा दया । कालेन बलिना राजन् नङ्क्ष्यत्यायुर्बलं स्मृतिः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) नृपा कलि बळी मोठा वाढता नेइ सत्य हा । क्षमा शौच दया धर्म नेई आयु बलो स्मृती ॥ १ ॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल. (१)
वित्तमेव कलौ नॄणां जन्माचारगुणोदयः ।
धर्मन्याय व्यवस्थायां कारणं बलमेव हि ॥ २ ॥
श्रीमंता कलियूगात कलीन गुणि मानिती । सोयीचा करिती धर्म न्याहही पाहिजे तसा ॥ २ ॥
कलियुगामध्ये ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल, त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील. धर्म आणि न्याय यांच्याबाबतीत शक्ती प्रभावी ठरेल. (२)
दाम्पत्येऽभिरुचिर्हेतुः मायैव व्यावहारिके ।
स्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिः विप्रत्वे सूत्रमेव हि ॥ ३ ॥
कुलशील कलि माजी विवाहीं नच पाहती । युवा नी युवती मध्ये होतील प्रीतिसंग ते ॥ व्यव्हारी सत्य ना राही कापट्य चतुराइ ती । रतिकौशल्य श्रेष्ठत्व पवीतधारि तो द्विज ॥ ३ ॥
विवाहसंबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. व्यवहारात कपटालाच महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरुन ठरेल. ब्राह्मण्याची ओळख ’जानवे’ एवढीच असेल. (३)
लिङ्गं एवाश्रमख्यातौ अन्योन्यापत्ति कारणम् ।
अवृत्त्या न्यायदौर्बल्यं पाण्डित्ये चापलं वचः ॥ ४ ॥
आश्रमा वस्त्र दंडोची कळेल कोण तो त्सा । लाच ना देइ तो त्याला न्यायही न मिळेल की । वाक्पटुत्वाचि ते लोक विद्वान मानितील हो ॥ ४ ॥
बाह्य वेषावरूनच आश्रम ठरेल आणि बाह्य वेषावरूनच दुसर्या आश्रमात प्रवेश करणे असेल. पैशाशिवाय न्याय मिळू शकणार नाही. बोलण्यातील चातुर्य हेच पांडित्य समजले जाईल. (४)
अनाढ्यतैव असाधुत्वे साधुत्वे दंभ एव तु ।
स्वीकार एव चोद्वाहे स्नानमेव प्रसाधनम् ॥ ५ ॥
गरीबा मानिती पापी पाखंडी साधु होय तैं । हुंडा मोथाच वाढेल विधि तो नच राहि की ॥ ५ ॥
गरिबी हेच दुर्जनत्त्वाचे लक्षण असेल. आणि दांभिकपणा हेच साधुत्वाचे लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाहसंस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. (५)
दूरे वार्ययनं तीर्थं लावण्यं केशधारणम् ।
उदरंभरता स्वार्थः सत्यत्वे धार्ष्ट्यमेव हि ॥ ६ ॥
दूरचे जळ ते तीर्थ लाअण्य केश राखणे । चरितार्था पुरुषार्थो धीट तो सत्य होय की ॥ ६ ॥
लोक दूरच्या जलाशयाला तीर्थ समजतील. डोक्यावर केस राखणे हे सौंदर्याचे चिन्ह समजले जाईल. आपले पोट भरणे हा मोठा पुरुषार्थ असेल आणि ठासून बोलण्यालाच सत्य मानले जाईल. (६)
दाक्ष्यं कुटुंबभरणं यशोऽर्थे धर्मसेवनम् ।
एवं प्रजाभिर्दुष्टाभिः आकीर्णे क्षितिमण्डले ॥ ७ ॥ ब्रह्मविट्क्षत्रशूद्राणां यो बली भविता नृपः । प्रजा हि लुब्धै राजन्यैः निर्घृणैः दस्युधर्मभिः ॥ ८ ॥ आच्छिन्नदारद्रविणा यास्यन्ति गिरिकाननम् । शाकमूलामिषक्षौद्र फलपुष्पाष्टिभोजनाः ॥ ९ ॥
कुटुंबा पोषि तो दक्ष यशार्थ धर्म सेविती । दुष्टां गौरवची वाटे बळी तो नृप होय की ॥ ७ ॥ समान चोर नी राजे होतील नृप क्रूर ते । प्रजेच्या लुटिती पत्न्या पळेल भिउनी प्रजा ॥ ८ ॥ शाका कंद मुळे मांस मध नी फळ फूल नी । बीज कोयाहि खावोनी प्रजा तेंव्हा जगेल की ॥ ९ ॥
कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दर्यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला , कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरील. (७-९)
अनावृष्ट्या विनङ्क्ष्यन्ति दुर्भिक्षकरपीडिताः
शीतवातातपप्रावृड् हिमैरन्योन्यतः प्रजाः ॥ १० ॥
करची अक्र वाढेल दुष्काळ पडतील ते । वाढेल ऊन्ह थंडी नी वारा ही तैंच होय की । उत्पात लढण्या मध्ये गलित जन होत तै ॥ १० ॥
कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल. कधी तुफान होईल, कधी उष्णता वाढेल, तर कधी पूर येतील. या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल. (१०)
क्षुत्तृड्भ्यां व्याधिभिश्चैव संतप्स्यन्ते च चिन्तया ।
त्रिंशद्विंशति वर्षाणि परमायुः कलौ नृणाम् ॥ ११ ॥
क्षुधा तृष्णिच हो लोक रोग कोणा न सोडिती । कलीत सर्व लोकांची आयु तीसचि वर्ष ते ॥ ११ ॥
लोक तहान-भूक, रोग व अनेक प्रकारच्या चिंतांनी दु:खी होतील. कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्षे असेल. (११)
क्षीयमाणेषु देहेषु देहिनां कलिदोषतः ।
वर्णाश्रमवतां धर्मे नष्टे वेदपथे नृणाम् ॥ १२ ॥
सान क्षीण असे देहे कलीत जन्मतील की । नासेल वेदमार्गी हा धर्म ना तो देसेलची ॥ १२ ॥
कलिकाळाच्या दोषांमुळे प्राण्यांची शरीरे लहान आणि रोगग्रस्त होऊ लागतील. वर्ण आणि आश्रम यांचे धर्म सांगणारा वेदमार्ग नष्टप्राय होऊन जाईल. (१२)
पाषण्डप्रचुरे धर्मे दस्युप्रायेषु राजसु ।
चौर्यानृतवृथाहिंसा नानावृत्तिषु वै नृषु ॥ १३ ॥
होईल धर्म पाखंड लुटितील न्रुप प्रजा । चोरी हिंसा कुकर्मींनी लोक ते जगतील की ॥ १३ ॥
धर्मकार्यात पाखंडी लोकांचे वर्चस्व राहील. राजे चोरांसारखे लोकांना लुबाडतील. चोरी, खोटे बोलणे, विनाकारण हिंसा इत्यादी अनेक प्रकारची वाईट कर्मे करून लोक उपजीविका चालवितील. (१३)
शूद्रप्रायेषु वर्णेषु च्छागप्रायासु धेनुषु ।
गृहप्रायेष्वाश्रमेषु यौनप्रायेषु बन्धुषु ॥ १४ ॥
शूद्रवत् सर्व ते लोक गाई शेळ्यांपरीच त्या । सान नी अल्प दुग्धाच्या होतील त्या कलीत की ॥ संन्यासी बांधुनी गेह गृहस्था परि राहती । लग्न संबंधियांनाच संबंधी मानितील ते ॥ १४ ॥
चारही वर्णांचे लोक शूद्रांप्रमाणे होतील. गाई शेळ्यांप्रमाणे लहान शरीराच्या आणि कमी दूध देणार्या असतील. आश्रमही घरांसारखे होतील. वैवाहिक संबंध असलेल्यांनाच नातलग मानले जाईल. (१४)
अणुप्रायास्वोषधीषु शमीप्रायेषु स्थास्नुषु ।
विद्युत्प्रायेषु मेघेषु शून्यप्रायेषु सद्मसु ॥ १५ ॥
धान होईल ते सान काटेरी वृक्ष माजती । विजांसह ढग येती न पडे वृष्टि त्यातुनी । सत्कार श्रुतिघोषो वा जन संख्या घटोनिया ॥ १५ ॥
धान्यांची रोपे आखूड होत जातील. मोठी झाडे शमीच्या झाडांप्रमाणे कमी उंचीची व दाट सावली नसलेली होतील. ढगांमध्ये विजाच जास्त चमकतील. घरेही सुनी सुनी होतील. (१५)
इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि ।
धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥
स्वभाव कलिच्या अंती गाढवा परि दुःसह । होवोनी विषयी ओझे वाह्तीलचि सर्व ते । धर्म रक्षावया तेंव्हा भगवान् प्रगटे पुन्हा ॥ १६ ॥
अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वत: सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील. (१६)
चराचर गुरोर्विष्णोः ईश्वरस्याखिलात्मनः ।
धर्मत्राणाय साधूनां जन्म कर्मापनुत्तये ॥ १७ ॥
चराचरगुरूविष्णु सज्जना रक्षिण्यास नी । उद्धार करण्या येई प्रगटोनी पुनः पुन्हा ॥ १७ ॥
सर्वशक्तीमान , सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात. (१७)
संभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः ।
भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति ॥ १८ ॥
शंभलग्रामि तो विष्णु संत श्रेष्ठ द्विजाचिया । विष्णुयशा घरी जन्मे कल्कि नामे पहा हरी ॥ १८ ॥
त्या काळी शंभल नावाच्या गावाचा प्रमुख असणार्या विष्णूयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाने भगवान अवतार घेतील. (१८)
अश्वं आशुगमारुह्य देवदत्तं जगत्पतिः ।
असिनासाधुदमनं अष्टैश्वर्य गुणान्वितः ॥ १९ ॥
देवदत्त अह्सा नामे शीघ्रगामीच अश्व जो । आरूढ त्या वरी होता घेईल खड्ग कल्कि तो ॥ १९ ॥
अष्टमहासिद्धींना संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय, चराचर जगताचे स्वामी भगवान, देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा नायनाट करतील. (१९)
विचरन् आशुना क्षौण्यां हयेनाप्रतिमद्युतिः ।
नृपलिङ्गच्छदो दस्यून् कोटिशो निहनिष्यति ॥ २० ॥
रोम रोमातुनी तेज दिशांना पसरेल की । कोटि कोटि हि दुष्टांना नृपा संहारिल प्रभू ॥ २० ॥
अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवरून संचार करतील आणि राजे म्हणवणार्या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील. (२०)
अथ तेषां भविष्यन्ति मनांसि विशदानि वै ।
वासुदेवाङ्गरागाति पुण्यगंधानिलस्पृशाम् । पौरजानपदानां वै हतेष्वखिलदस्युषु ॥ २१ ॥
दुष्टा संहारिता कल्की पावित्र्ये सर्व ती प्रजा । हृदयीं भरुनी राही होईल वायु गंधित ॥ २१ ॥
जेव्हा सर्व लुटारूंचा संहार होईल, तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील. (२१)
तेषां प्रजाविसर्गश्च स्थविष्ठः संभविष्यति ।
वासुदेवे भगवति सत्त्वमूर्तौ हृदि स्थिते ॥ २२ ॥
तयांच्या हृदया मध्ये वसुदेव विराजुनी । पुष्ट हृष्ट प्रजा होय बलवान् पहिल्या परी ॥ २२ ॥
त्यांच्या हॄदयामध्ये सत्त्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची संतती बलवान होऊ लागेल. (२२)
यदावतीर्णो भगवान् कल्किर्धर्मपतिर्हरिः ।
कृतं भविष्यति तदा प्रजासूतिश्च सात्त्विकी ॥ २३ ॥
मन मोहन तो स्वामी प्रगटे कल्कि रूपि तो । सत्ययुग तदा येई सत्वयुक्तचि सर्व ते ॥ २३ ॥
धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील, तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी संतती सात्विक होईल. (२३)
यदा चन्द्रश्च सूर्यश्च तथा तिष्यबृहस्पती ।
एकराशौ समेष्यन्ति भविष्यति तदा कृतम् ॥ २४ ॥
चंद्रमा गुरु नी सूर्य पुष्प नक्षत्रि पातता । एक राशीस येता तैं आरंभ सत्ययूगिचा ॥ २४ ॥
जेव्हा चंद्र , सूर्य आणि बृहस्पती एकाच वेळी पुष्य नक्षत्रात प्रवेश करतील, त्यावेळी सत्ययुगाची सुरुवात होईल. (२४)
येऽतीता वर्तमाना ये भविष्यन्ति च पार्थिवाः ।
ते ते उद्देशतः प्रोक्ता वंशीयाः सोमसूर्ययोः ॥ २५ ॥
परीक्षित् चंद्र नी सूर्य वंशाचे जेवढे नृप । संक्षीपे सर्व ते मी तो आपणा सर्व बोललो ॥ २५ ॥
चंद्रवंश आणि सूर्यवंशामध्ये जितके राजे होऊन गेले किंवा होतील, त्या सर्वांचे मी थोडक्यात वर्णन केले. (२५)
आरभ्य भवतो जन्म यावत् नन्दाभिषेचनम् ।
एतद् वर्षसहस्रं तु शतं पञ्चदशोत्तरम् ॥ २६ ॥
पासोनी तव जन्माच्य नंदराजाऽभिषेकचा । एक हजार शत नी पंधरा वर्ष काळ हा ॥ २६ ॥
तुझा जन्म झाल्यापासून नंदाला राज्याभिषेक होईपर्यंत एक हजार एकशे पंधरा वर्षे होतील. (२६)
सप्तर्षीणां तु यौ पूर्वौ दृश्येते उदितौ दिवि ।
तयोस्तु मध्ये नक्षत्रं दृश्यते यत्समं निशि ॥ २७ ॥
सप्तर्षी उदया वेळी दिसती दोनची पुढे । दक्षिणोत्तर त्या रेषीं दिसती अश्विनी पहा ॥ २७ ॥
जेव्हा आकाशात सप्तर्षींचा उदय होतो, तेव्हा प्रथम त्यातील दोनच तारे दिसतात. त्यांच्यामध्ये दक्षिणोत्तर रेषेवर मध्यभागी एक नक्षत्र दिसते.(२७)
तेनैव ऋषयो युक्ताः तिष्ठन्त्यब्दशतं नृणाम् ।
ते त्वदीये द्विजाः काले अधुना चाश्रिता मघाः ॥ २८ ॥
नक्षत्रा सह ते सप्त फिरती शतवर्ष ते । तुझ्या जन्मी मघा तेची आजही दिसते पहा ॥ २८ ॥
सप्तर्षी नक्षत्राबरोबर मनुष्यांची शंभर वर्षेपर्यंत राहातात. ते तुझ्या जन्माच्यावेळी आणि आतासुद्धा मघा नक्षत्रात आहेत. (२८)
विष्णोर्भगवतो भानुः कृष्णाख्योऽसौ दिवं गतः ।
तदाविशत् कलिर्लोकं पापे यद् रमते जनः ॥ २९ ॥
विष्णू भगवतो भानू क्रृष्ण तो करुनी लिला । जाताचि निज धामा मनुष्यबुद्धि संपली ॥ २९ ॥
भगवान विष्णूंचा सत्वमय श्रीकृष्णरूप अवतार जेव्हा परमधामाकडे गेला, तेव्हाच कलियुगाने या जगात प्रवेश केला. त्यामुळेच माणसे पापात रममाण झाली. (२९)
यावत् स पादपद्माभ्यां स्पृशनास्ते रमापतिः ।
तावत् कलिर्वै पृथिवीं पराक्रान्तुं न चाशकत् ॥ ३० ॥
माधवो ठेविता पाय आपुले धरणीस या । कली तो धरणीला या कधीच स्पर्श ना करी ॥ ३० ॥
जोपर्यंत लक्ष्मीपतींच्या चरणकमलांचा स्पर्श पृथ्वीला होत होता, तोपर्यंत कलियुग पृथ्वीवर येऊ शकले नाही. (३०)
यदा देवर्षयः सप्त मघासु विचरन्ति हि ।
दा प्रवृत्तस्तु कलिः द्वादशाब्द शतात्मकः ॥ ३१ ॥
कलिची आयु ती देव वर्षे द्वादश ती असे । मनुष्य गणना वर्षे चौ लक्षहुनि जास्तची ॥ ३१ ॥
ज्यावेळी सप्तर्षी मघा नक्षत्राभोवती फिरतात, त्याचवेळी कलियुग सुरू होते. देवतांच्या कालगणनेनुसार कलियुगाचे आयुष्य बाराशे वर्षांचे म्हणजेच माणसांच्या कालगणनेनुसार चार लक्ष बत्तीस हजार वर्षांचे आहे. (३१)
यदा मघाभ्यो यास्यन्ति पूर्वाषाढां महर्षयः ।
तदा नन्दात् प्रभृत्येष कलिर्वृद्धिं गमिष्यति ॥ ३२ ॥
पूर्वाषाढात सप्तर्षी नंदाचे राज्य ते तदा । वृद्धी होईल तेव्हाच्या पासुनी कलिची तसी ॥ ३२ ॥
जेव्हा सप्तर्षी मघा नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात गेलेले असतील, त्यावेळी पृथ्वीवर नंदांचे राज्य असेल. तेव्हापासून कलियुगाची वाढ होऊ लागेल. (३२)
यस्मिन् कृष्णो दिवं यातः तस्मिन् एव तदाहनि ।
प्रतिपन्नं कलियुगं इति प्राहुः पुराविदः ॥ ३३ ॥
ज्ञाते ते इतिहासाचे वदती कलिपातला । कृष्ण जैं निजधामाला गेले त्या दिनिची असा ॥ ३३ ॥
इतिहासवेत्त्या विद्वानांचे म्हणणे आहे की, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी परम धामाकडे प्रयाण केले, त्याच दिवशी त्याच वेळी कलियुगाची सुरुवात झाली. (३३)
दिव्याब्दानां सहस्रान्ते चतुर्थे तु पुनः कृतम् ।
भविष्यति तदा नॄणां मन आत्मप्रकाशकम् ॥ ३४ ॥
देवतागनना वर्षे हजार संपती तदा । भगवान् कल्कि रूपाने स्पर्शिता युग सत्य ये ॥ ३४ ॥
परीक्षिता ! देवतांच्या कालगणनेनुसार जेव्हा एकहजार वर्षे होऊन जातील, तेव्हा कलियुगाच्या शेवटच्या दिवसात पुन्हा माणसांची मने, सात्विक वृत्ती वाढून आपले खरे स्वरूप जाणतील. तेव्हापासून सत्ययुगाची पुन्हा सुरुवात होईल. (३४)
इत्येष मानवो वंशो यथा सङ्ख्यायते भुवि ।
तथा विट्शूद्रविप्राणां तास्ता ज्ञेया युगे युगे ॥ ३५ ॥
संक्षेपे मनुचा वंश परीक्षित् वर्णिला असे । परंपरा अशा विप्र वैश्य शूद्रासि त्या पहा ॥ ३५ ॥
मी तुला पृथ्वीवरील मनुवंशाचे वर्णन करून सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक युगामध्ये ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचीसुद्धा वंशपरंपरा असते, असे समज. (३५)
एतेषां नामलिङ्गानां पुरुषाणां महात्मनाम् ।
थामात्रावशिष्टानां कीर्तिरेव स्थिता भुवि ॥ ३६ ॥
ज्या ज्या त्या पुरुषा संता वर्णिले नाव फक्त ते । आज शेष तशी कीर्ती ऐकण्या मिळते पहा ॥ ३६ ॥
राजन ! जे पुरुष आणि महात्मे यांचे मी तुला वर्णन करून सांगितले, त्यांची फक्त नावे आहेत. गोष्टींच्या रूपात असलेल्या त्यांची फक्त कीर्तीच पृथ्वीवर आहे. (३६)
देवापिः शान्तनोर्भ्राता मरुश्चेक्ष्वाकुवंशजः ।
कलापग्राम आसाते महायोगबलान्वितौ ॥ ३७ ॥
शंतनू बंधु देवापी इक्ष्वाकुवंशिचा मरु । कलापग्रामि ते दोघे जिवंत युगयुक्त ते ॥ ३७ ॥
शंतनूचा भाऊ देवापी आणि इक्ष्वाकुवंशातील मरू हे सध्या कलाप नावाच्या गावात आहेत. ते तीव्र योगबमाने युक्त असे आहेत. (३७)
ताविहैत्य कलेरन्ते वासुदेवानुशिक्षितौ ।
वर्णाश्रमयुतं धर्मं पूर्ववत् प्रथयिष्यतः ॥ ३८ ॥
कलि हा संपता भगवान् कल्किने सांगता तया । वर्ण आश्रम तो पूर्ण विस्तार करितील ते ॥ ३८ ॥
कलियुगाच्या शेवटी, वासुदेवांच्या आज्ञेवरून ते पुन्हा येथे येतील आणि पूर्वीप्रमाणेच वर्णाश्रमधर्माची स्थापना करतील. (३८)
कृतं त्रेता द्वापरं च कलिश्चेति चतुर्युगम् ।
अनेन क्रमयोगेन भुवि प्राणिषु वर्तते ॥ ३९ ॥
कृत त्रेता नि द्वापार कलिच्यासह चारही । क्रमाने युग ते येती प्रभाव दाविती तसा ॥ ३९ ॥
सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे आहेत. याच क्रमाने ती आपापल्या वेळी पृथ्वीवरील प्राण्यांवर आपला प्रभाव पाडतात. (३९)
राजन् एते मया प्रोक्ता नरदेवास्तथापरे ।
भूमौ ममत्वं कृत्वान्ते हित्वेमां निधनं गताः ॥ ४० ॥
परीक्षित् तुजला राजे वदलो त्याहुनी नृप । मी मी ते म्हणती कैक आले मेले कितीक ते ॥ ४० ॥
परीक्षिता ! मी तुला जे वर्णन करून सांगितले, ते सर्व , तसेच इतर राजेसुद्धा या पृथ्वीला ’माझी माझी’ म्हणत शेवटी मरून गेले. (४०)
कृमिविड् भस्मसंज्ञान्ते राजनाम्नोऽपि यस्य च ।
भूतध्रुक् तत्कृते स्वार्थं किं वेद निरयो यतः ॥ ४१ ॥
राजाही असला कोणी मरता घाणची उरे । शरिरे त्रासिता अन्यां उघडे नर्कद्वार ते ॥ ४१ ॥
राजा हे नाव असलेल्याही या शरीराचे शेवटी किडा, विष्ठा किंवा राख यातच रूपांतर होते. त्यासाठी जो कोणत्याही प्राण्याला त्रास देतो, त्याला आपला स्वार्थच समजत नाही. कारण शेवटी आपल्याला नरकच मिळणार, हे त्याला कळत नाही. (४१)
कथं सेयमखण्डा भूः पूर्वैर्मे पुरुषैर्धृता ।
मत्पुत्रस्य च पौत्रस्य मत्पूर्वा वंशजस्य वा ॥ ४२ ॥
विचार करिती कोणी आजोबा बाप आणि मी । आहोत नृअप्ती तेंव्हा पुत्र नातूस ते मिळो ॥ ४२ ॥
ते लोक असा विचार करतात की, आपले पूर्वज ज्या अखंड पृथ्वीवर राज्य करीत होते, ते आता माझ्या ताब्यात कसे राहील आणि माझ्यानंतर माझा मुलगा, नातू किंवा माझे वंशज कशा तर्हेने याचा उपभोग घेतील ? (४२)
तेजोऽबन्नमयं कायं गृहीत्वाऽऽत्मतयाबुधाः ।
महीं ममतया चोभौ हित्वान्तेऽदर्शनं गताः ॥ ४३ ॥
मूर्ख ते मातिच्या देहा मानिती आपुला तसे । धरेसी मानिती हक्क मरता दोन्हिही सरे ॥ ४३ ॥
ते मूर्ख ह्या अग्नी, पाणी आणि मातीच्या शरीराला आपले मानतात आणि ही पृथ्वी आपली मानतात. शेवटी ते हे शरीर आणि जग दोन्ही सोडून स्वत: अदृश्य होतात. (४३)
ये ये भूपतयो राजन् भुंजते भुवमोजसा ।
कालेन ते कृताः सर्वे कथामात्राः कथासु च ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
बळाने तो ग्रासितो आहे कहाणी नावची उरे ॥ ४४ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दुसरा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
परीक्षिता ! ज्या ज्या राजांनी स्वसामर्थ्याने या पृथ्वीचा उपभोग घेतला, त्या सर्वांना काळाने फक्त कथेत शिल्लक ठेवले. (४४)
स्कन्द बारावा - अध्याय दुसरा समाप्त |