|
श्रीमद् भागवत पुराण कलीयुगीय राजवंशवर्णनम् - कलियुगातील राजवंशांवे वर्णन - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
राजोवाच -
(अनुष्टुप्) स्वधामानुगते कृष्ण यदुवंशविभूषणे । कस्य वंशोऽभवत् पृथ्व्यां एतद् आचक्ष्व मे मुने ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले - ( अनुष्टुप् ) स्वधामा कृष्ण ते जाता कोणाचे राज्य जाहले । कोणती पुढती होती कृपया सांगणे मज ॥ १ ॥
परीक्षिताने विचारले - मुनिवर्य ! यदुवंशभूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणत्या वंशाचे राज्य झाले, ते मला सांगा. (१)
श्रीशुक उवाच -
योऽन्त्यः पुरञ्जयो नाम भाव्यो बार्हद्रथः नृपो । तस्यां आत्यस्तु शुनको हत्वा स्वामिनमात्मजम् ॥ २ ॥ प्रद्योतसंज्ञं राजानं कर्ता यत्पालकः सुतः । विशाखयूपः तत्पुत्रो भविता राजकस्ततः ॥ ३ ॥ नन्दिवर्धनः तत्पुत्रः पञ्च प्रद्योतना इमे । अष्टत्रिंशोत्तरशतं भोक्ष्यन्ति पृथिवीं नृपाः ॥ ४ ॥
श्रीशुकदेव सांगतात - नवव्या स्कंधि हे सर्व तुम्हा मी वदलो असे । बृहद्रथाचिये वंशी अंत्य राजा पुरंजय । शुनको मंत्रि हा त्याचा साधील वध स्वामिचा ॥ २ ॥ प्रद्योता अभिषेकिल राज्य सारे पहावया । तयाचा पालको पुत्र विशाखयूप त्याजला । तयाच्या राजको याला नंदिवर्द्धन पुत्र हा ॥ ३ ॥ प्रत्योदन असे पाच एकशे अडतीस ते । वर्षची पृथिवीचे या राज्याला भोगितील की ॥ ४ ॥
श्रीशुक म्हणाले- राजा ! जरासंधाचा पिता बृहद्रथ याच्या वंशात पुरंजय नावाचा शेवटचा राजा होईल. त्याचा मंत्री शुनक त्या राजाला मारून आपला पुत्र प्रद्योत याला राजा करील. प्रद्योताचा पुत्र पालक, पालकाचा विशाखयूप, विशाखयूपाचा राजक आणि राजकाचा पुत्र नंदिवर्धन होईल. हे पाच ’प्रद्योतन’ एकशे अडतीस वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. (२-४)
शिशुनागस्ततो भाव्यः काकवर्णस्तु तत्सुतः ।
क्षेमधर्मा तस्य सुतः क्षेत्रज्ञः क्षेमधर्मजः ॥ ५ ॥
शिशुनाग पुढे होई तयाचा काकवर्ण तो । तयाचा क्षेमधर्मा नी क्षेत्रज्ञ क्षेमधर्मचा ॥ ५ ॥
यानंतर शिशुनाग नावाचा राजा होईल. त्याचा पुत्र काकवर्ण, त्याचा क्षेमधर्मा आणि त्याचा पुत्र क्षेत्रज्ञ होईल. (५)
विधिसारः सुतस्तस्या जातशत्रुर्भविष्यति ।
दर्भकः तत्सुतो भावी दर्भकस्याजयः स्मृतः ॥ ६ ॥
तयाचा विरधो आणि अजातशत्रु हा तया । पुढती दर्भको याला अजेय पुत्र होइ तो ॥ ६ ॥
क्षेत्रज्ञाचा विधिसर, त्याचा अजातशत्रू, त्याचा दर्भक आणि दर्भकाचा पुत्र अजय होईल. (६)
नन्दिवर्धन आजेयो महानन्दिः सुतस्ततः ।
शिशुनागा दशैवैते षष्ट्युत्तरशतत्रयम् ॥ ७ ॥ समा भोक्ष्यन्ति पृथिवीं कुरुश्रेष्ठ कलौ नृपाः । महानन्दिसुतो राजन् शूद्रागर्भोद्भवो बली ॥ ८ ॥ महापद्मपतिः कश्चित् नन्दः क्षत्रविनाशकृत् । ततो नृपा भविष्यन्ति शूद्रप्रायास्तु अधार्मिकाः ॥ ९ ॥
नंदवर्धन हा त्याचा महानंद तया पुढे । वंशी त्या शिशुनागाच्या होतील दश हे नृप ॥ ७ ॥ तीनशेसाठ वर्षे हे करिती राज्य पृथ्विचे । महानंदीस शूद्रा या पत्निला नंद होय तो । महानंदा महापद्म निधिचा तो अधीपती ॥ ८ ॥ महापद्म असे नाव पडले त्याजला दुजे । विनाश करि हा सार्या क्षत्रिय राजवंशिचा । शूद्र होतील राजे तै अधार्मिक असेहि की ॥ ९ ॥
अजयाचा नंदिवर्धन आणि त्याचा महानंदी. शिशुनागवंशामधील हे दहाच राजे तीनशे साठ वर्षे पृथ्वीवर राज्य करतील. परीक्षिता ! महानंदीला शूद्र पत्नीपासून नंद नावाचा बलवान पुत्र होईल. महानंदी हा ’महापद्म’ नावाच्या निधीचा अधिपती होईल. क्षत्रिय राजांचा तो नाश करील. तेव्हापासून बहुधा राजे शूद्र आणि अधार्मिक होतील. (७-९)
स एकच्छत्रां पृथिवीं अनुल्लङ्घितशासनः ।
शासिष्यति महापद्मो द्वितीय इव भार्गवः ॥ १० ॥
नोल्लंघी शासना कोणी एकछत्रीचि हा नृप । मारील क्षत्रिया सार्या दुसरा पर्शुरामची ॥ १० ॥
महापद्म हा पृथ्वीवर एकछत्री अंमल करील. त्याची आज्ञा कोणीही मोडणार नाही. जणू दुसरा परशुरामच असा तो क्षत्रियांचा विनाश करील. (१०)
तस्य चाष्टौ भविष्यन्ति सुमाल्यप्रमुखाः सुताः ।
य इमां भोक्ष्यन्ति महीं राजानः स्म शतं समाः ॥ ११ ॥
सुमाल्य आदि त्या आथ पुत्र होतील भूपती । भूवरी शत वर्षे ते चालवीतील शासन ॥ ११ ॥
सुमाल्य इत्यादी त्याचे आठ पुत्र होतील. ते सर्व राजे होऊन शंभर वर्षेपर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतील. (११)
नव नन्दान् द्विजः कश्चित् प्रपन्नान् उद्धरिष्यति ।
तेषां अभावे जगतीं मौर्या भोक्ष्यन्ति वै कलौ ॥ १२ ॥
चाणक्य नावचा विप्र नष्टील नंदवंश तो । नृपती मौर्यवंशाचे शासितील धरेस या ॥ १२ ॥
चाणक्य नावाचा कोणी एक ब्राह्मण विख्यात नऊ नंदांना मारवील. त्यांचा नाश झाल्यावर कलियुगामध्ये मौर्यवंशी राजे पृथ्वीचे राज्य करतील. (१२)
स एव चन्द्रगुप्तं वै द्विजो राज्येऽभिषेक्ष्यति ।
तत्सुतो वारिसारस्तु ततश्च अशोकवर्धनः ॥ १३ ॥
चंद्रगुप्तहि तो विप्र अभिषिक्त करील नी । तयाच्या वारिसाराला अशोकवर्धनो पुढे ॥ १३ ॥
तोच ब्राह्मण चंद्रगुप्त मौर्याला राजपदाचा अभिषेक करील. त्याचा पुत्र वारिसार आणि त्याचा अशोकवर्धन होईल. (१३)
सुयशा भविता तस्य सङ्गतः सुयशःसुतः ।
शालिशूकः ततस्तस्य सोमशर्मा भविष्यति ॥ १४ ॥
अशोका सुयशो पुत्र तया संगत हा पुढे । संगता शालिशूको नी सोमशर्मा तयास तो ॥ १४ ॥
त्याचा पुत्र सुयश, सुयशाचा संगत, संगताचा शालिशूक आणि शालिशूकाचा सोमशर्मा होईल. (१४)
शतधन्वा ततस्तस्य भविता तद्बृहद्रथः ।
मौर्या ह्येते दश नृपाः सप्तत्रिंशत् शतोत्तरम् । समा भोक्ष्यन्ति पृथिवीं कलौ कुरुकुलोद्वह ॥ १५ ॥ हत्वा बृहद्रथं मौर्यं तस्य सेनापतिः कलौ । पुष्यमित्रस्तु शुंगाह्वः स्वयं राज्यं करिष्यति । अग्निमित्रः ततः तस्मात् सुज्येष्ठोऽथ भविष्यति ॥ १६ ॥
पुढेती शालिधन्वा नी तयाचा तो बृहद्रथ । दहा ते कलियूगात शतछत्तीस वर्ष ते । करितील पुढे राज्य कलीत पृथिवी वरी ॥ १५ ॥ बृहरथास मारील त्याचा सेनापती पहा । पुष्पमित्र तथा शुंग स्वयें होईन तो नृप । तयाला अग्निहोत्रोनी तया पुत्र सुज्येष्ठ तो ॥ १६ ॥
सोमशर्म्याचा शतधन्वा आणि शतधन्व्याचा पुत्र बृहद्र्थ होईल. हे कुरुवंशविभूषणा ! मौर्यवंशाचे हे दहा राजे कलियुगामध्ये एकशे सदतीस वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र , शुंग राजाचा वध करून स्वत: राजा होईल. त्याचा मुलगा अग्निमित्र आणि अग्निमित्राचा सुज्येष्ठ होईल. (१५-१६)
वसुमित्रो भद्रकश्च पुलिन्दो भविता सुतः ।
ततो घोषः सुतस्तस्माद् वज्रमित्रो भविष्यति ॥ १७ ॥
सुज्येष्ठाला वसुमित्रो तयाच्या भद्रका पुढे । पुलिंदा घोष हा पुत्र घोषाचा वज्रमित्र तो ॥ १७ ॥
सुज्येष्ठाचा वसुमित्र, वसुमित्राचा भद्रक, भद्रकाच पुलिंद, पुलिंदाचा घोष आणि घोषाचा पुत्र वज्रमित्र होईल. (१७)
ततो भागवतः तस्मात् देवभूतिः इति श्रुतः ।
शुङ्गा दशैते भोक्ष्यन्ति भूमिं वर्षशताधिकम् ॥ १८ ॥
वज्रमित्रा भागवतो तयाचा देवभूति तो । दहा हे शुंग वंशाचे नृपती पृथिवीस या । शत द्वादश वर्षे ही राज्यास करितील की ॥ १८ ॥
वज्रमित्राचा भागवत आणि त्याचा पुत्र देवभूती होईल. शुंगवंशाचे हे दहा राजे शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ पृथ्वीचे पालन करतील. (१८)
ततः काण्वानियं भूमिः यास्यत्यल्पगुणान् नृप ।
शुङ्गं हत्वा देवभूतिं काण्वोऽमात्यस्तु कामिनम् ॥ १९ ॥ स्वयं करिष्यते राज्यं वसुदेवो महामतिः । तस्य पुत्रस्तु भूमित्रः तस्य नारायणः सुतः । नारायणस्य भविता सुशर्मा नाम विश्रुतः ॥ २० ॥
शुंगांचा संपता काळ कण्व वंशीय भूपती । अपेक्षा गुणवत्तीने कमीच ठरतील ते ॥ १९ ॥ शुंगांचा अखरी राजा लंपटो देवभूतिला । मंत्री जो कण्ववंशीचा वसुदेव वधील की ॥ करील राज्य चातूर्ये तयाचा भूमि मित्र नी । त्याच्या नारायणो पुत्रा सुशर्मा कीर्तिमान् पुढे ॥ २० ॥
परीक्षिता ! त्यानंतर पृथ्वी कण्ववंशाकडे जाईल. हे राजे कमी गुणवान असतील. शुंगवंशाचा राजा देवभूती हा स्त्रीलंपट असेल. त्याचा मंत्री कण्ववंशी बुद्धिमान वसुदेव त्याचा वध करील आणि स्वत: राज्य करील. त्याचा पुत्र भूमित्र, त्याचा नारायण आणि नारायणाचा सुशर्मा या नावाने प्रसिद्ध होईल. (१९-२०)
काण्वायना इमे भूमिं चत्वारिंशच्च पञ्च च ।
शतानि त्रीणि भोक्ष्यन्ति वर्षाणां च कलौ युगे ॥ २१ ॥
काण्वायन अस् चौघे तीनशे पंचचाळिस । वर्षे तया कली माजी राज्य हो करतील की ॥ २१ ॥
कण्ववंशातील हे चार राजे कलियुगातील तीनशे पंचेचाळीस वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील. (२१)
हत्वा काण्वं सुशर्माणं तद्भृत्यो वृषलो बली ।
गां भोक्ष्यति अन्ध्रजातीयः कञ्चित् कालमसत्तमः ॥ २२ ॥
सुशर्म्यां बलि हा शूद्र आंध्रजाती नि दुष्ट तो । मारोनी राज्य घेवोनी करील कांहि काळ नी ॥ २२ ॥
कण्ववंशी सुशर्म्याचा बली नावाचा एक शूद्र सेवक शुशर्म्याला मारून तो काही काळ स्वत: पृथ्वीवर राज्य करील. तो अंध्रजातीचा व दुष्ट असेल. (२२)
कृष्णनामाथ तद्भ्राता भविता पृथिवीपतिः ।
श्रीशान्तकर्णः तत्पुत्रः पौर्णमासस्तु तत्सुतः ॥ २३ ॥
पुढती कृष्ण हा त्याचा बंधू होईल भूपती । श्रीशांतकर्ण हा त्याचा पौर्णमास तयास हो ॥ २३ ॥
यानंतर त्याचा भाऊ कृष्ण हा राजा होईल. कृष्णाचा पुत्र श्रीशांतकर्ण आणि त्याचा पौर्णमास होईल. (२३)
लम्बोदरस्तु तत्पुत्रः तस्मात् चिबिलको नृपः ।
मेघस्वातिश्चिबिलकात् अटमानस्तु तस्य च ॥ २४ ॥ अनिष्टकर्मा हालेयः तलकः तस्य चात्मजः । पुरीषभीरुः तत्पुत्रः ततो राजा सुनन्दनः ॥ २५ ॥
लंबोदर तया पुत्र तयाचा चिबिलक् पुढे । मेघस्वाति चिबिलका तयाचा अटमान नी ॥ २४ ॥ अनिष्टकर्म्यां हालेय हालेया तलको पुधे । पुरीषभिरुला पुत्र सुनंदनृप होय तो ॥ २५ ॥
पौर्णमासाचा लंबोदर आणि लंबोदराचा पुत्र चिबिलक होईल. त्याचा मेघस्वाती , त्याचा अटमान, त्याचा अनिष्टकर्मा, त्याचा हालेय, त्याचा तलक, त्याचा पुरीषभीरू आणि त्याचा पुत्र सुनंदन होईल. (२४-२५)
चकोरो बहवो यत्र शिवस्वातिः अरिन्दमः ।
तस्यापि गोमती पुत्रः पुरीमान् भविता ततः ॥ २६ ॥
चकोर होइ त्या पुत्र चकोरा बहु नावचे । होतील आठते त्यात सान जो शिवस्वाति तो ॥ होईल वीर तो मोठा मर्दील शत्रु थोर ते । तयाला गोमती पुत्र तयाला पुरिमान् पुढे ॥ २६ ॥
सुनंदाचा पुत्र चकोर होईल. चकोराला ’बहु’ नावाचे आठ पुत्र होतील. त्यांपैकी शिवस्वाती हा वीर असेल. त्याचा गोमतीपुत्र आणि त्याचा पुत्र पुरीमान होईल. (२६)
मेदशिराः शिवस्कन्दो यज्ञश्रीः तत्सुतस्ततः ।
विजयः तत्सुतो भाव्यः चन्द्रविज्ञः सलोमधिः ॥ २७ ॥
मेदाशिरा तया पुत्र तयाचा शिवस्कंद नी । तयाच्या यज्ञश्री याच्या विजया दोन पुत्र ते । तयांचे नाम हे ऐसे चंद्रविज्ञ नि लोमधी ॥ २७ ॥
त्याचा मेद:शिरा, मेद:शिराचा शिवस्कंद, शिवस्कंदाचा यज्ञश्री, यज्ञश्रीचा विजय आणि विजयाचे चंद्रविज्ञ आणि लोमधी नावाचे दोन पुत्र होतील. (२७)
एते त्रिंशत् नृपतयः चत्वार्यब्द शतानि च ।
षट्पञ्चाशच्च पृथिवीं भोक्ष्यन्ति कुरुनन्दन ॥ २८ ॥
चारशे छप्पनी वर्ष तीस राजे असे पुढे । करितील पहा राज्य भूवरी रे परीक्षिता ॥ २८ ॥
परीक्षिता हे तीस राजे चारशे छपन्न वर्षेपर्यंत पृथ्वीचे राज्य उपभोगतील. (२८)
सप्ताभीरा आवभृत्या दश गर्दभिनो नृपाः ।
कङ्काः षोडश भूपाला भविष्यन्ति अतिलोलुपाः ॥ २९ ॥
आवभृती नगरीचे सात आभीर नी दहा । गर्दभी कंक ते सोळा लोभाने राज्य पाहती ॥ २९ ॥
यानंतर अवभृती नगरीचे सात आभीर, दहा गर्दभी आणि सोळा कंक (राजे) पृथ्वीवर राज्य करतील. हे अतिशय लोभी असतील. (२९)
ततोऽष्टौ यवना भाव्याः चतुर्दश तुरुष्ककाः ।
भूयो दश गुरुण्डाश्च मौला एकादशैव तु ॥ ३० ॥
पुन्हा ए यवनी आठ तुर्की चौदा तसे पुन्हा । गुरुंड ते दहा तैसे होतील मौन द्वादश ॥ ३० ॥
यानंतर आठ यवन आणि चौदा तुर्क राजे राज्य करतील. त्यानंतर दहा गुरुंड आणि अकरा मौन राजे होतील. (३०)
एते भोक्ष्यन्ति पृथिवीं दश वर्षशतानि च ।
नवाधिकां च नवतिं मौला एकादश क्षितिम् ॥ ३१ ॥ भोक्ष्यन्ति अब्द शतान्यङ्ग त्रीणि तैः संस्थिते ततः । किलकिलायां नृपतयो भूतनन्दोऽथ वङ्गिरिः ॥ ३२ ॥ शिशुनन्दिश्च तद्भ्राता यशोनन्दिः प्रवीरकः । इत्येते वै वर्षशतं भविष्यन्त्यधिकानि षट् ॥ ३३ ॥
एक हजार नी तैसे नव्यान्नवहि वर्ष ते । करितील तसे राज्य तीनशे वर्ष मौनचे ॥ ३१ ॥ संपता राज्यकालो हा किल्किला नगरीत तो । भूतनंदन हा राजा करील राज नीपुढे ॥ ३२ ॥ वंगिरी नी तया बंधू शिशुनंदि तसाच तो । यशोनंदि प्रविरको एकशे वर्ष नी सहा । पृथिवी करि ते राज्य करितील तसे पहा ॥ ३३ ॥
परीक्षिता ! मौनांच्या खेरीज इतर सर्वजण एक हजार नव्व्याण्णव वर्षेपर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील. तसेच अकरा मौन राजे तीनशे वर्षेपर्यंत पॄथ्वीवर शासन करतील. ते गेल्यावर किलिकिला नावाच्या नगरीत भूतनंद, वंगिरी, शिशुनंदी, त्याचा भाऊ यशोनंदी आणि प्रवीरक हे एकशे सहा वर्षे राज्य करतील. (३१-३३)
तेषां त्रयोदश सुता भवितारश्च बाह्लिकाः ।
पुष्पमित्रोऽथ राजन्यो दुर्मित्रोऽस्य तथैव च ॥ ३४ ॥
तयांचे पुत्र ते तेला बाल्हीक नाम हे तया । पुष्पमित्र पुढे क्षात्रपुत्र दुमित्र तो नृप ॥ ३४ ॥
त्यांना बाह्लिक नावाचे तेरा पुत्र होतील. त्यांच्यानंतर पुष्पमित्र नावाचा क्षत्रिय आणि त्याचा पुत्र दुर्मित्र यांचे राज्य असेल. (३४)
एककाला इमे भूपाः सप्तान्ध्राः सप्त कौशलाः ।
विदूरपतयो भाव्या निषधास्तत एव हि ॥ ३५ ॥
बाल्हीक सर्व ते राज विभिन्न प्रांत घेउनी । अंधकी कोसली तैसे निषधी स्वामि ते पहा ॥ ३५ ॥
बाह्लिक वंशातील राजे एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करतील. त्यांपैकी सात आंध्रदेशाचे व सात कोसल देशाचे अधिपती होतील. काही विदूर भूमीचे शासक तर काही निषध देशाचे राजे होतील. (३५)
मागधानां तु भविता विश्वस्फूर्जिः पुरञ्जयः ।
करिष्यत्यपरो वर्णान् पुलिन्द यदुमद्रकान् ॥ ३६ ॥
विश्वस्फूर्जी जया नाम दुसरा तो पुरंजय । विप्रादी उच्चवर्णींना जातीभ्रष्ठ करील तो ॥ ३६ ॥
यानंतर विश्वस्फूर्जी मगध देशाचा राजा होईल. हा दुसरा पुरंजय, ब्राह्मण इत्यादी वर्णांचे पुलिंद, यदू, मद्र इत्यादी म्लेंच्छांसारख्या जातींमध्ये रूपांतर करील. हा इतका दुष्ट असेल की, तो तीन वर्णांशिवाय असलेल्या जनतेची स्थापना करील. (३६)
प्रजाश्चाब्रह्मभूयिष्ठाः स्थापयिष्यति दुर्मतिः ।
वीर्यवान् क्षत्रमुत्साद्य पद्मवत्यां स वै पुरि । अनुगङ्गमाप्रयागं गुप्तां भोक्ष्यति मेदिनीम् ॥ ३७ ॥
नाशील वर्ण तो चारी शूद्रप्राय करील की । बळाने नागवी क्षात्रां पद्मावतिस राहुनी । पूर्व पश्चिमते राज्य करील दृध आपुले ॥ ३७ ॥
आपल्या शौर्याने तो क्षत्रियांचा विध्वंस करील आणि पद्मवतीपुरी या राजधानीत हरिद्वारापासून प्रयागपर्यंतच्या पृथ्वीचे राज्य करील. (३७)
सौराष्ट्रावन्त्याभीराश्च शूरा अर्बुदमालवाः ।
व्रात्या द्विजा भविष्यन्ति शूद्रप्राया जनाधिपाः ॥ ३८ ॥
वाढेल कलि हा जैसा सर्व प्रांतात विप्र ते । संस्कारशून्य होतील राजेही शून्यवत् तसे ॥ ३८ ॥
हळू हळू सौराष्ट्र, अवंती, आभीर, शूर, अर्बुद आणि मालव देशांतील ब्राह्मण संस्कारशून्य होतील. तसेच राजेसुद्धा शूद्रतुल्य होतील. (३८)
सिन्धोस्तटं चन्द्रभागां कौन्तीं काश्मीरमण्डलम् ।
भोक्ष्यन्ति शूद्रा व्रात्याद्या म्लेच्छाश्चाब्रह्मवर्चसः ॥ ३९ ॥
सिंधू नी चंद्रभागा नी कौंती काशिमिर मंडली । नामधारी द्विजांचे नी म्लेंच्छ राजच होय मी ॥ ३९ ॥
सिंधुतट, चंद्रभागेचा तट, कौंतीपुरी आणि काश्मीर परिसरावर प्राधान्येकरून शूद्रांचे, संस्कार व ब्रह्मतेज नाहीसे झालेल्या ब्राह्मणांचे, तसेच म्लेंच्छांचे राज्य असेल. (३९)
तुल्यकाला इमे राजन् म्लेच्छप्रायाश्च भूभृतः ।
एते अधर्मानृतपराः फल्गुदास्तीव्रमन्यवः ॥ ४० ॥
कंजूष नि निधर्मी ते होतील सर्व भूपती । सान थोर अशा शब्दा होतील क्रोधमान ते ॥ ४० ॥
परीक्षिता ! हे राजे आचार-विचाराच्या बाबतीत म्लेंच्छांसारखे असतील. हे सर्वजण एकाच वेळी निरनिराळ्या प्रांतांमध्ये राज्ये करतील. हे सगळे अधार्मिक, खोटारडे, कंजूष आणि रागीट असतील. (४०)
स्त्रीबालगो द्विजघ्नाश्च परदारधनादृताः ।
उदितास्तमितप्राया अल्पसत्त्वाल्पकायुषः ॥ ४१ ॥
मुले स्त्रिया नि गाईंना विप्रांना मारण्यास ते । धजतील तसे स्त्री नी धनाते लुटतील की । शक्तिनी आयुही त्यंची अत्यल्प होय ती तदा ॥ ४१ ॥
हे दुष्ट लोक स्त्रिया, मुले, ब्राह्मण यांना मारून टाकण्यात संकोच करणार नाहीत. दुसर्यांच्या स्त्रिया आणि धन हडप करण्यासाठी हे नेहमी उत्सुक असतील. यांची उन्नती किंवा अध:पतन होण्यास वेळ लागणार नाही. हे हलक्या मनाचे व अल्पायुषी असतील. (४१)
असंस्कृताः क्रियाहीना रजसा तमसाऽऽवृताः ।
प्रजास्ते भक्षयिष्यन्ति म्लेच्छा राजन्यरूपिणः ॥ ४२ ॥
संस्कारा त्यजुनी सर्व कर्म कर्तव्य तोडिती । तमाने अंध ते होता राजवेषात म्लेंच्छची । लूटमार करोनीया प्रजेचे रक्त शोषिती ॥ ४२ ॥
हे संस्कारहीन कर्तव्यशून्य रजोगुण-तमोगुणाने व्यापलेले , राजाच्या रूपातील म्लेंच्छ प्रजेला खाऊन टाकतील. (४२)
तन्नाथास्ते जनपदाः तच्छीलाचारवादिनः ।
अन्योन्यतो राजभिश्च क्षयं यास्यन्ति पीडिताः ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
होता राजे असे सारे प्रजा होईल ती तशी । शोषितील तयां राजे एकमेकास पीडिता । सर्वच्या सर्व ते अंती विनाश पावतील की ॥ ४३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पहिला अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
राजेच असे असतील, तेव्हा देशातील प्रजेचा स्वभाव, आचरण आणि बोलणे - चालणेही तसेच असेल. राजांकडून त्रस्त झालेली प्रजा आपापसातसुद्धा एकमेकांना त्रास देऊन नष्ट होईल. (४३)
स्कन्द बारावा - अध्याय पहिला समाप्त |