|
श्रीमद् भागवत पुराण अथर्ववेदविभागः, पुराणलक्षणवर्णनं च - अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
सूत उवाच -
(अनुष्टुप्) अथर्ववित्सुमन्तुश्च शिष्यं अध्यापयत् स्वकाम् । संहितां सोऽपि पथ्याय वेददर्शाय चोक्तवान् ॥ १ ॥
सूत सांगतात - ( अनुष्टुप् ) अथर्वज्ञ सुमंताने कबंधा बोधिले तये । वेददर्शक नी पथ्या दोन भागात बोधिले ॥ १ ॥
सूत म्हणतात - सुमंतुमुनी अथर्ववेदाचे ज्ञानी होते. आपली संहिता त्यांनी आपला शिष्य कबंध याला शिकविली. कबंधाने त्या संहितेचे दोन भाग करून पथ्य आणि वेददर्श यांना ती शिकविली. (१)
शौक्लायनिर्ब्रह्मबलिः मादोषः पिप्पलायनिः ।
वेददर्शस्य शिष्यास्ते पथ्यशिष्यानथो श्रृणु । कुमुदः शुनको ब्रह्मन् जाजलिश्चापि अथर्ववित् ॥ २ ॥
शोक्लायनी ब्रह्मबली मोदोष पिप्पलायनी । वेददर्शकचे चार पथ्य शिष्य हि सांगतो ॥ २ ॥
वेददर्शाचे शौक्लायनी, ब्रह्मबली, मोदोश आणि पिप्पलायनी या नावाचे शिष्य होते. आता पथ्याच्या शिष्यांची नावे ऐका. (२)
बभ्रुः शिष्योऽथांगिरसः सैन्धवायन एव च ।
अधीयेतां संहिते द्वे सावर्णाद्यास्तथापरे ॥ ३ ॥ नक्षत्रकल्पः शान्तिश्च कश्यपाङ्गिरसादयः । एते आथर्वणाचार्याः श्रृणु पौराणिकान् मुने ॥ ४ ॥
कुमुदो शुनको तैसा अथर्वज्ञहि जाजली । अंगिरा गोत्र उत्पन्न शुनका दोन पुत्र ते । सैंधवान नी बभ्रु एकेक शिकले द्वय ॥ ३ ॥ नक्षत्रकल्प सावर्ण्य शांत कश्यप अंगिरा । आणखी शिष्य ते होते ऐका पौराणिका पुढे ॥ ४ ॥
शौनका ! कुमुद, शुनक आणि अथर्ववेत्त जाजली असे पथ्याचे तीन शिष्य होते. अंगिरा गोत्राचा शुनक याचे बभ्रू आणि सैंधवायन असे दोन शिष्य होते. त्यांनी दोन संहितांचे अध्ययन केले. अथर्ववेदाच्या आचार्यांमध्ये यांच्याखेरीज सैंधवायन इत्यादींचे शिष्य सावर्ण्य इत्यादी, तसेच नक्षत्रकल्प, शांती, कश्यप, आंगिरस इत्यादी पुष्कळ विद्वान होऊन गेले. आता मी तुम्हांला पौराणिकांच्यासंबंधी ऐकवितो. (३-४)
त्रय्यारुणिः कश्यपश्च सावर्णिः अकृतव्रणः ।
वैशंपायनहारीतौ षड् वै पौराणिका इमे ॥ ५ ॥
त्र्यय्यारूणी कश्यपो नी सावर्षी अकृतव्रन । वैशंपायन हारीत पौराणिक सहा असे ॥ ५ ॥
त्रय्यारुणी, कश्यप, सावर्णी, अकृतव्रण, वैशंपायन आणि हारीत असे सहा पुराणांचे आचार्य प्रसिद्ध आहेत. (५)
अधीयन्त व्यासशिष्यात् संहितां मत्पितुर्मुखात् ।
एकैकां अहमेतेषां शिष्यः सर्वाः समध्यगाम् ॥ ६ ॥
या सर्वांनी पिता माझे भगवान् व्यासजीकडे । तसे मी शिकलो त्यांच्या सह ही संहिता पहा ॥ ६ ॥
व्यासांचे शिष्य असलेल्या माझ्या वडिलांच्याकडून हे एक-एक संहिता शिकले होते. या सहाही आचार्यांकडून मी सर्व संहितांचे अध्ययन केले. (६)
कश्यपोऽहं च सावर्णी रामशिष्योऽकृतव्रणः ।
अधीमहि व्यासशिष्यात् चत्वारो मूलसंहिताः ॥ ७ ॥
सहा त्या संहिता तैशा शिकलो मूळ चारही । कश्यपो मी नि सावर्णी सम नी अकृतोव्रण ॥ ७ ॥
याखेरीज आण्खी चार मूळ संहिता, कश्यप, सावर्णी, परशुरामांचे शिष्य अकृतव्रण आणि मी अशा चौघांनी शिष्य असलेल्या श्रीरोमहर्षणाकडून यांचे अध्ययन केले. (७)
पुराणलक्षणं ब्रह्मन् ब्रह्मर्षिभिः निरूपितम् ।
श्रृणुष्व बुद्धिमाश्रित्य वेदशास्त्रानुसारतः ॥ ८ ॥
वेद नी शास्त्र आधारे पुराणलक्षणे ऋषि । सांगती स्वस्थ होवोनी वर्णना ऐकणे तुम्ही ॥ ८ ॥
शौनका ! ब्रह्मर्षींनी वेद आणि शास्त्रे यांनुसार पुराणांची लक्षणे सांगितली आहेत, ती लक्षपूर्वक ऐक. (८)
सर्गोऽस्याथ विसर्गश्च वृत्तिरक्षान्तराणि च ।
वंशो वंशानुचरीतं संस्था हेतुरपाश्रयः ॥ ९ ॥ दशभिः लक्षणैर्युक्तं पुराणं तद्विदो विदुः । केचिन् पञ्चविधं ब्रह्मन् महदल्पव्यवस्थया ॥ १० ॥
विसर्ग सर्ग नी वृत्ति रक्शा मन्वंतरे तसे । वंश वंशानुचरित संस्था हेतू अपाश्रय ॥ ९ ॥ कोणी महा पुराणांची मानिती दश लक्षणे । कोणी सान पुराणांची मानिती पाच लक्षणे ॥ १० ॥
शौनका ! पुराणे जाणणारे विद्वान असे सांगतात की, पुराणांची सर्ग, विसर्ग, वृत्ती, रक्षा, मन्वन्तर, वंश, वंशानुचरित, संस्था (प्रलय), हेतू (ऊती) आणि अपाश्रय अशी दहा लक्षणे आहेत. काही आचार्य पुराणांची पाचच लक्षणे मानतात. दोघांचेही म्हणणे बरोबर आहे; कारण महापुराणांची दहा लक्षणे असतात आणि लहान पुरणांची पाच. (९-१०)
अव्याकृतगुणक्षोभान् महतस्त्रिवृतोऽहमः ।
भूतसूक्ष्मेन्द्रियार्थानां संभवः सर्ग उच्यते ॥ ११ ॥
मूळ त्या प्रकृती मध्ये ते लीन गुण क्षोभता । निपजता महत्तत्व अहंकार त्रयी तरीं ॥ अहंकारात तन्मात्रा इंद्रीय विषयो तयीं । उपपत्ति क्रमा ऐशा सर्व नाम असे पहा ॥ ११ ॥
जेव्हा मूळ प्रकृतीतील साम्यावस्थेत असलेले गुण प्रक्षुब्ध होतात, तेव्हा महत्तत्त्वाची उत्पत्ती होते. महत्तत्त्वापासून तामस, राजस, आणि सात्विक असा तीन प्रकारचा अहंकार निर्माण होतो. यापासूनच या उत्पत्तिक्रमाला ‘सर्ग’ म्हणतात. (११)
पुरुषानुगृहीतानां एतेषां वासनामयः ।
विसर्गोऽयं समाहारो बीजाद्बीजं चराचरम् ॥ १२ ॥
इच्छेने भगवंताच्या होती ते वासनामय । निपजे सर्व सृष्टी ही निसर्ग नाम त्याजला ॥ १२ ॥
परमेश्वराच्या कृपेने सृष्टि-निर्मितिचे सामर्थ्य प्राप्त करून घेऊन महत्तत्त्व इत्यादींनी, पूर्वकर्मानुसार उत्पन वासनानुरूप केलेली, जी कार्यरूप चराचर शरीरात्मक जीवाची उत्पत्ती तिला ‘विसर्ग’ म्हणतात. एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न व्हावे, तसे ते होते. (१२)
वृत्तिर्भूतानि भूतानां चराणां अचराणि च ।
कृता स्वेन नृणां तत्र कामात् चोदनयापि वा ॥ १३ ॥
अचरे जगती प्राण दुग्धादी तो स्वभावची । शास्त्रनुसारही खाती वृत्ति नाम यया असे ॥ १३ ॥
हालचाल करणार्या प्राण्यांची, स्थिर पदार्थ ही ‘वृत्ती’ म्हणजेच जीवननिर्वाहाची सामग्री होय. तिच्यापैकी काही माणसांनी स्वतःच्या इच्छेनुसार तर काही शास्त्राच्या आज्ञेनुसार निश्चित केली आहे. (१३)
रक्षाच्युतावतारेहा विश्वस्यानु युगे युगे ।
तिर्यङ्मर्त्यर्षिदेवेषु हन्यन्ते यैस्त्रयीद्विषः ॥ १४ ॥
युगा युगात तो ईश जन्मोनी धर्म रक्षितो । पापी वा दुर्जना मारी रक्षा हे नाम त्याजला ॥ १४ ॥
युगायुगामध्ये भगवान पशु-पक्षी, मनुष्य, ऋषी, देवता इत्यादी रूपांमध्ये अवतार धारण करून वेद-धर्माला विरोध करणार्यांचा संहार करतात. त्यांची ही अवतार-लीला म्हणजे ‘रक्षा’ होय. (१४)
मन्वन्तरं मनुर्देवा मनुपुत्राः सुरेश्वराः ।
ऋषयोंऽशावताराश्च हरेः षड्विधमुच्यते ॥ १५ ॥
मनु देव मनूपुत्र इंद्र सप्तर्षि आदि ते । सहांच्या युक्त वेळेला नमवंतर नाम ते ॥ १५ ॥
मनू, देवता, मनुपुत्र, इंद्र, सप्तर्षी आणि भगवंतांचा अंशावतार या सहा गोष्टींनी युक्त असलेल्या वेळेला ‘मन्वन्तर’ म्हणतात. (१५)
राज्ञां ब्रह्मप्रसूतानां वंशस्त्रैकालिकोऽन्वयः ।
वंशानुचरितं तेषां वृत्तं वंशधराश्च ये ॥ १६ ॥
भविष्य वर्तमानो नी भूतकाळात जे नृप । परंपरा तयांची जी त्याजला नाम वंश ते ॥ १६ ॥
ब्रह्मदेवापासून जितक्या राजांची उत्पत्ती झाली, त्यांच्या भूत, भविष्य आणि वर्तमानकालीन संततीला ‘वंश’ म्हणतात. ते राजे तसेच त्यांच्या वंशजांच्या चरित्राचे नाव ‘वंशानुचरित’ असे आहे. (१६)
नैमित्तिकः प्राकृतिको नित्य आत्यन्तिको लयः ।
संस्थेति कविभिः प्रोक्तः चतुर्धास्य स्वभावतः ॥ १७ ॥
नैमित्तिको प्राकृतिको नित्य आत्यंतिकोलय । स्वभावे घडती सर्व संस्था हे नाम त्याजला ॥ १७ ॥
या ब्रह्मांडाचा स्वभावतःच प्रलय होतो. नैमित्तिक, प्राकृतिक, नित्य आणि आत्यंतिक असे त्याचे चार भेद आहेत. यांनाच तत्वज्ञ विद्वान ‘संस्था’ म्हणतात. (१७)
हेतुर्जीवोऽस्य सर्गादेः अविद्याकर्मकारकः ।
यं चानुशायिनं प्राहुः अव्याकृतमुतापरे ॥ १८ ॥
जीवास हेतु हे नाम अविद्यावश तो असे । चैतन्ये पाहती कोणी व्यक्त अव्यक्त रूप ते ॥ १८ ॥
पुराणांच्या लक्षणांमध्ये ‘हेतू’ नावाने ज्याचा व्यवहार होतो, तो जीवच आहे. कारण वास्तविक तोच सर्ग-विसर्ग इत्यादींचा हेतू आहे. म्हणजेच अविद्येने तो कर्मे करणारा आहे. काही विद्वान त्याला अनुशयी म्हणजे प्रकृतीमध्ये निद्रा करणारा असे म्हणतात तर काहीजण त्याला अव्याकृत म्हणजेच प्रकृतिरूप आहे, असे म्हणतात. (१८)
व्यतिरेकान्वयो यस्य जाग्रत् स्वप्नसुषुप्तिषु ।
मायामयेषु तद्ब्रह्म जीववृत्तिष्वपाश्रयः ॥ १९ ॥
व्यतिरेकान्वये भासे जागृत् स्वप्नी सुषुप्तिशी । तुरियीं जाणवे ब्रह्म नाम त्यास अपाश्रय ॥ १९ ॥
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या जीवाच्या वृत्तींचे अभिमानी असणारे विश्व, तैजस आणि प्राज्ञ या मायामय रूपांमध्ये भासणारे आणि या अवस्थांच्या पलीकडील तुरीय तत्त्वामध्येसुद्धा असणारे जे ब्रह्म त्यालाच येथे ‘अपाश्रय’ म्हटले आहे. (१९)
पदार्थेषु यथा द्रव्यं सन्मात्रं रूपनामसु ।
बीजादि पञ्चतान्तासु ह्यवस्थासु युतायुतम् ॥ २० ॥
रूप नामे पदार्थाची सिद्धता होतसे पहा । ब्रह्म हे त्यातले सत्य साक्षी रूप नि आश्रय ॥ २० ॥
घटादी पदार्थांमध्ये माती इत्यादी द्रव्ये समाविष्ट असतात व त्याहून बाहेरही असतात किंवा नाम व आकार यांमध्ये केवळ सत्ता असते, पण ती त्याहून बाहेरही असते, त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अवस्थांत ब्रह्म उपादान कारण म्हणून समाविष्ट असते व निमित्त कारण म्हणून बाहेरही असते, त्यालाच ‘अपाश्रय’ म्हणतात. (२०)
विरमेत यदा चित्तं हित्वा वृत्तित्रयं स्वयम् ।
योगेन वा तदात्मानं वेदेहाया निवर्तते ॥ २१ ॥
निवृत्ति लाभते योगे तत्वमसि उदीत हो । कर्म नी वासना संपे निवृत्त नाम त्याजला ॥ २१ ॥
चित्त जेव्हा योगाभ्यासाने तिन्ही वृत्तींचा त्याग करून शांत होते, तेव्हा आत्मज्ञानाचा उदय होतो आणि आत्मवेत्ता पुरूष कर्म-वासना आणि कर्मप्रवृत्ती या दोहोंपासून निवृत्त होतो. (२१)
एवं लक्षणलक्ष्याणि पुराणानि पुराविदः ।
मुनयोऽष्टादश प्राहुः क्षुल्लकानि महान्ति च ॥ २२ ॥
ज्ञान्यांनी ही पुराणांची लक्षणे कथिली दहा । अठरा सान मोठे ते पुराण लक्षणांकित ॥ २२ ॥
हे ऋषींनो ! इतिहासतज्ञ विद्वानांनी अशा लक्षणांनी युक्त अशी लहान-मोठी अठरा पुराणे सांगितली आहेत. (२२)
ब्राह्मं पाद्मं वैष्णवं च शैवं लैङ्गं सगारुडं ।
नारदीयं भागवतं आग्नेयं स्कान्दसंज्ञितम् ॥ २३ ॥ भविष्यं ब्रह्मवैवर्तं मार्कण्डेयं सवामनम् । वाराहं मात्स्यं कौर्मं च ब्रह्माण्डाख्यं इति त्रिषट् ॥ २४ ॥
ब्रह्म विष्णु नि पद्मो नी शिव लिंग गरूड नी । नारदो नी भागवतो अग्नि स्कंद गरूड नी ॥ २३ ॥ ब्रह्मवैवर्त नी तैसे मार्कंडेय नि वामन । वराहो मत्स्य नी कूर्म ब्रह्मांड अठरा असे ॥ २४ ॥
त्यांची नावे अशी आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, लिंगपुराण, गरूडपुराण, नारदपुराण, भागवतपुराण, अग्निपुराण, स्कंदपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, मार्कंडेयपुराण, वामनपुराण, वराहपुराण, मत्स्यपुराण, कुर्मपुराण आणि ब्रह्मांडपुराण अशी ती अठरा होत. (२३-२४)
ब्रह्मन्निदं समाख्यातं शाखाप्रणयनं मुनेः ।
शिष्यशिष्यप्रशिष्याणां ब्रह्मतेजोविवर्धनम् ॥ २५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
व्यासजींच्या कडोनीया शिकलो जे परंपरें । पुराणश्रुति या ऐशा वाचता ब्रह्मतेज हो ॥ २५ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
शौनका ! व्यासांच्या शिष्यपरंपरेने जी वेद-पुराणे पुढील पिढ्यांपर्यंत नेली, ते मी तुला सांगितले. हे वर्णन ऐकणारांच्या आणि वाचणार्यांच्या ब्रह्मतेजाची अभिवृद्धी करते. (२५)
स्कन्द बारावा - अध्याय सातवा समाप्त |