श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
त्रिंशोऽध्यायः

यदुकुलसंहार वर्णनम् -

यदुकुळाचा संहार -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
ततो महाभागवत उद्धवे निर्गते वनम् ।
द्वारवत्यां किमकरोद् भगवान् भूतभावनः ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारिले -
( अनुष्टुप )
जधी महाभागवते उद्धवे वन सेविले ।
कृष्णे तैं द्वारकेमाजी केल्या काय लिला पुन्हा ॥ १ ॥

ततः - त्यानंतर - महाभागवते उद्धवे वनं निर्गते - महाभागवत जो भक्तोत्तम उद्धव तो वनात निघून गेल्यानंतर - द्वारवत्यां - द्वारका नगरीत - भूतभावनः भगवान् किं अकरोत् - जीवांचे परम कल्याण करणार्‍या भगवंताने काय केले. ॥१॥
परीक्षिताने विचारले महाभागवत उद्धव बदरिकाश्रमाला निघून गेल्यावर, सर्व प्राण्यांचे आत्मस्वरूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये काय केले ? (१)


ब्रह्मशापोपसंसृष्टे स्वकुले यादवर्षभः ।
प्रेयसीं सर्वनेत्राणां तनुं स कथमत्यजत् ॥ २ ॥
ब्रह्मशाप मिळे तेंव्हा कृष्णाने आपुला प्रिय ।
दिव्य श्रीविग्रहो कैसा सावरीला असे पुन्हा ॥ २ ॥

ब्रह्मशापोपसंसृष्टे स्वकुले - ब्रह्मशापाच्या ग्रहणाचा वेध स्वकुलाला खास ग्रासून टाकणार असे कळल्यामुळे - यादवर्षभः - यदुकुलश्रेष्ठ जो भगवान् - सः - त्याने - सर्वनेत्राणां प्रेयसीं तनुं - सर्वांच्या नेत्रांस प्रियतम असल्या कारणाने आनंद देणारा स्वतःचा देह - कथं अत्यजत् - कशा रीतीने सोडता झाला ? ॥२॥
हे प्रभो ! आपले कुळ ब्राह्मणांच्या शापाने ग्रस्त झाल्यावर यदुवंशशिरोमणींनी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या आपल्या लीलाविग्रहाचा कसा त्याग केला ? (२)


( मंदाक्रान्ता )
प्रत्याक्रष्टुं नयनमबला यत्र लग्नं न शेकुः ।
     कर्णाविष्टं न सरति ततो यत् सतामात्मलग्नम् ।
यच्छ्रीर्वाचां जनयति रतिं किं नु मानं कवीनां ।
     दृष्ट्वा जिष्णोर्युधि रथगतं यच्च तत्साम्यमीयुः ॥ ३ ॥
( मंदाक्रांता )
स्त्रियांचे ते नयन भिडता दृष्टि ना ती चळेची ।
     कानीं ऐको तरिहि मनि ना संतलीला त्यजीती ॥
युद्धी ज्यांनी तनुहि त्यजिली त्यास दे मुक्ति कृष्ण ।
     ऐशा लीला हरिच करितो सावरी रूप कैसा ? ॥ ३ ॥

यत्र लग्नं - ज्या देहाची व नेत्रांची गाठ पडल्यामुळे घट्ट बसलेली मिठ्ठी सोडवायला - नयनं प्रत्याक्रष्टुं - म्हणजे नेत्राला परत घेऊन दुसरीकडे वळविण्याला - अबलाः - अबला असणार्‍या गोपी व परमभक्त्तोत्तम सर्व भागवत - न शेकुः - समर्थ झाले नाहीत - यत् कर्णाविष्टं न ततः सरति - जे वेदवर्णित देहस्वरूप कर्णांत शिरले असता तेथून निघत नाही - (यत्) सतां - साधूंच्या हृदयातील - आत्मलग्नं (न सरति) - आत्म्याशी प्रेमबद्ध झाल्यामुळे जे भगवत्स्वरूप तेथूनही हलत नाही - यच्छ्‌रीः - ज्या देहस्वरूपाची शोभा - कवीनां वाचां रतिं - कवींच्या वाणीला प्रेमाचे उल्हासपूर्ण भरते आणिते आणि - (तेषां) मानं जनयति - त्यांची मानमान्यताही वाढविते - (इति) किं नु (वक्तव्यं) - हे काय सांगायला हवे ? - युधि जिष्णोः रथगतं - आणि कौरवपांडवयुद्धसमयी अर्जुनाच्या रथावर आरूढ झालेले - यत् च दृष्ट्‌वा - जे भगवद्देहरूप पाहिले म्हणूनच - तत्साम्यं ईयुः - त्या दिव्यस्वरूपाशी समता पावून प्रेक्षक मुक्त झाले. ॥३॥
भगवान श्रीकृष्णांचे ते रूप इतके सुंदर होते की, जेव्हा स्त्रिया त्याच्याकडे पाहात, तेव्हा तेथून आपली नजर काढून घेऊ शकत नसत जेव्हा भक्तांच्या कानांवर त्यांचे वर्णन येई, तेव्हा ते त्यांच्या चित्तातून निघून जात नसे त्यांची शोभा कवींना वर्णनाचे प्रेम निर्माण करी आणि त्यायोगे त्यांचा मान वाढवी अर्जुनाच्या रथामध्ये बसलेल्या त्या रूपाला पाहात पाहात युद्धामध्ये ज्यांनी प्राण सोडले, ते सुद्धा त्यांच्या सारूप्याला प्राप्त झाले. (३)


श्री ऋषिरुवाच -
( अनुष्टुप् )
दिवि भुव्यन्तरिक्षे च महोत्पातान् समुत्थितान् ।
दृष्ट्वाऽऽसीनान् सुधर्मायां कृष्णः प्राह यदून् इदम् ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप )
उत्पात पाहता कृष्णे आकाशी पृथीवी वरी ।
सुधर्मा या सभे मध्ये यदुवंशास बोलले ॥ ४ ॥

दिवि, भुवि, अंतरिक्षे च - स्वर्गलोकी, पृथ्वीवर आणि अंतरिक्षामध्ये - समुत्थितान् महोत्पातान् दृष्ट्‌वा - महाभयंकर उत्पात, अनर्थसूचक अरिष्टे पाहून - सुधर्मायां आसीनान् यदून् - सुधर्मानामक नगरसभेत बसलेल्या यादवांस - कृष्णः इदं प्राह - श्रीकृष्ण याप्रमाणे बोलता झाला. ॥४॥
श्रीशुक म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये मोठमोठे अपशकुन होत असलेले पाहून सुधर्मा सभेमध्ये असलेल्या यादवांना असे म्हटले. (४)


श्रीभगवानुवाच -
एते घोरा महोत्पाता द्वार्वत्यां यमकेतवः ।
मुहूर्तमपि न स्थेयं अत्र नो यदुपुङ्गवाः ॥ ५ ॥
पहा या द्वारके माजी मोठे उत्पात होत की ।
अनिष्ट सूचको सर्व न येथ थांबणे मुळी ॥ ५ ॥

द्वार्वत्यां एते घोराः महोत्पाताः - आपल्या द्वारका नगरीत होणारे हे भयंकर व मोठमोठाले उत्पात - यमकेतवः - प्रत्यक्ष मृत्युरूपी यमधर्माचे ध्वजच होत - यदुपुंगवाः अत्र मुहूर्तं अपि - हे यादवपुरुषसिंहानो ! आता यापुढे एक घटकाभर सुद्धा - नः न स्थेयं - या नगरीत आपण राहू नये. ॥५॥
हे श्रेष्ठ यादवांनो ! द्वारकेत हे मोठमोठे भयंकर ‌उत्पात होऊ लागले आहेत ते जणू यमराजाचे ध्वज आहेत आता आपण येथे एक मुहूर्तसुद्धा थांबता कामा नये. (५)


स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च शङ्खोद्धारं व्रजन्त्वितः ।
वयं प्रभासं यास्यामो यत्र प्रत्यक् सरस्वती ॥ ६ ॥
तत्राभिषिच्य शुचय उपोष्य सुसमाहिताः ।
देवताः पूजयिष्यामः स्नपनालेपनाहणैः ॥ ७ ॥
ब्राह्मणांस्तु महाभागान् कृतस्वस्त्ययना वयम् ।
गोभूहिरण्यवासोभिः गजाश्वरथवेश्मभिः ॥ ८ ॥
मुले स्त्रिया नि वृद्धांना शंखोद्धारासि पाठवा ।
प्रभास क्षेत्रि त्या जाऊ पश्चिमीं सर्व आपण ॥ ६ ॥
स्नान घेवोनिया तेथे पवित्र हो‍उनी तदा ।
एकाग्रे चंदनादिंनी देवता पूजुया पहा ॥ ७ ॥
करु या स्वस्ति पाठाते गो भूमी स्वर्ण वस्त्र नी ।
रथ हत्ती तसे घोडे द्विजांना दान दे‍उया ॥ ८ ॥

स्त्रियः, बालाः च, वृद्धाः च, - स्त्रिया, लहान मुले, व वयोवृद्ध पुरुष, - इतः - तात्पर्य सर्व अनाथ म्हणजे स्वसंरक्षण करण्याला असमर्थ असणारी मंडळी, - शंखोद्धारं व्रजंतु - येथून शंखोद्धाराला लवकर पाठवून द्या - वयं - बाकीचे आपण सर्वजण - प्रभासं यास्यामः - प्रभास क्षेत्राला जाऊ - यत्र - जेथे - सरस्वती प्रत्यक् - सरस्वती नदी पश्चिमाभिमुख होऊन वाहते. ॥६॥ तत्र अभिषिच्य शुचयः, - तेथे सरस्वतीवर स्नाने करून शुद्ध होऊ - उपोष्य सुसमाहिताः - आणि तीर्थोपवास करून आपली मने शांत करू (आणि) - स्नपन-आलेपन-अर्हणैः - देवतांस अभिषेक करून, गंधादिकांचे लेपन करू - देवताः पूजयिष्यामः - आणि पुष्पफलादि अर्पून देवतांची पूजा करू - कृतस्वस्त्ययनाः वयं - ब्राह्मणसाह्याने अरिष्टनिवारक शांत्यादि करून आपण - महाभागान् ब्राह्मणान् तु - महातपस्वी व भाग्यशाली ब्राह्मणांस - गो-भू-हिरण्य-वासोभिः - गायी, भूमि, सुवर्ण, वस्त्रे - गज-अश्व-रथ-वेश्मभिः - हत्ती, घोडे, रथ, गृहे इत्यादि दक्षिणेसह देऊन - च पूजयिष्यामः - देवांप्रमाणेच या भूदेवांची पूजा करू -॥७-८॥
स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांनी शंखोद्धारक्षेत्री जावे आणि जेथे सरस्वती नदी पश्चिमेकडे वाहाते, त्या प्रभासक्षेत्री आपण जाऊ, तेथे आपण स्नान करून पवित्र होऊ, उपवास करू आणि एकाग्र चित्ताने अभिषेक, चंदन इत्यादी सामग्रीने देवतांची पूजा करू तेथे आपण पुण्याहवाचनानंतर गाई, भूमी, सोने, वस्त्रे हत्ती, घोडे, रथ आणि निवासस्थाने श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करू. (६-८)


विधिरेष ह्यरिष्टघ्नो मङ्गलायनमुत्तमम् ।
देवद्विजगवां पूजा भूतेषु परमो भवः ॥ ९ ॥
अमंगल यये नाशे सर्वत्र मंगलो घडे ।
वीरांनो पूजिता लाभ देवता गायि विप्र ते ॥ ९ ॥

हि - कारण - एषः विधिः - हा मी सांगितलेला विधि - अरिष्टघ्नः - अरिष्टांचा नाश करणारा - (व) - उत्तमं मंगलायनं - सर्व मंगल प्राप्त करून देणारा उत्तम उपाय आहे - देवद्विजगवां पूजा - देवांची, ब्राह्मणांची व गायींची पूजा - भूतेषु - प्राणिमात्रांस - परमः भवः - भावी परम उत्कर्षाचे स्वर्गलोकी उत्तम सुख भोगण्याचे फल देणारे साधन होय. ॥९॥
हा विधी अमंगलाचा नाश करणारा आणि परम मंगल करणारा आहे देवता, ब्राह्मण आणि गाईची पूजाच मनुष्यांना परम लाभदायक आहे". (९)


इति सर्वे समाकर्ण्य यदुवृद्धा मधुद्विषः ।
तथेति नौभिरुत्तीर्य प्रभासं प्रययू रथैः ॥ १० ॥
वृद्धांनी मान्य ते केले भगवान कृष्ण बोलता ।
त्वरेचि बैसले नावीं पुढे यात्रेस त्या रथें ॥ १० ॥

इति मधुद्विषः समाकर्ण्य - या प्रकारे झालेले मधुहा जो श्रीकृष्ण त्याचे भाषण सावधपणे ऐकून - सर्वे यदुवृद्धाः ‘तथा ’ इति - सर्व पोक्त व ज्ञानवृद्ध यादवांनी ‘ठीक आहे ’ असे म्हटले - नौभिः उत्तीर्य - नावांत बसून ते समुद्रपार गेले (व) - प्रभासं रथैः प्रययुः - पुढे रथांत बसून प्रभास क्षेत्राला गेले. ॥१०॥
श्रीकृष्णांचे हे म्हणणे ऐकून, सर्व वृद्ध यादव "ठीक आहे" असे म्हणून नावांमधून समुद्र पार करून, रथातून प्रभासक्षेत्राकडे गेले. (१०)


तस्मिन् भगवताऽऽदिष्टं यदुदेवेन यादवाः ।
चक्रुः परमया भक्त्या सर्वश्रेयोपबृंहितम् ॥ ११ ॥
शांतिपाठ तिथे झाला कृष्णाने बोधिला तसा ।
श्रद्धेने मंगलो कृत्य केले सर्वचि ते तिथे ॥ ११ ॥

तस्मिन्- त्या क्षेत्रामध्ये - भगवता यदुदेवेन आदिष्टं - भगवान् यदुपति जो श्रीकृष्ण त्याने आज्ञापिलेले - यादवाः - ते यादव - परमया भक्त्या - मोठया भक्तीने - सर्वश्रेयोपबृंहितं - सर्व श्रेय उत्पन्न करणारे, शांति, ब्राह्मणपूजा - चक्रुः - इत्यादि कर्म यथासांग संपादिते झाले. ॥११॥
तेथे गेल्यावर यदुदेव भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार, यादवांनी अत्यंत भक्तीने सर्व प्रकारची मंगलकृत्ये केली. (११)


ततस्तस्मिन् महापानं पपुर्मैरेयकं मधु ।
दिष्टविभ्रंशितधियो यद्द्रवैर्भ्रश्यते मतिः ॥ १२ ॥
केले सर्वेचि हे सारे पै देवे मति हारिली ।
भ्रष्टले मदिरापाने गोड ती सर्वनाशक ॥ १२ ॥

ततः तस्मिन् - नंतर त्याच क्षेत्रामध्ये - यद्‌द्रवैः मतिः भ्रश्यते - ज्याच्या रसाने जीवांची बुद्धि भ्रष्ट होते - महापानं मधु मैरयेकं - पेयद्रव्यांतील महोन्मादक, महाग व गोड मैरेयक नावाचे मद्य - दिष्टविभ्रंशितधियः - दुर्दैवाने बुद्धिभ्रष्ट झालेले यादव - पपुः - प्याले. ॥१२॥
तेथेच दैवाने बुद्धी भ्रष्ट झालेल्या त्यांनी मैरेयक नावाची मदिरा मोठ्या प्रमाणात घेतली नाहीतरी मद्याने बुद्धी भ्रष्ट होतेच. (१२)


महापानाभिमत्तानां वीराणां दृप्तचेतसाम् ।
कृष्णमायाविमूढानां सङ्घर्षः सुमहानभूत् ॥ १३ ॥
तीव्र त्या मदिरापाने सर्वची लढु लागले ।
खरे तो कृष्ण मायेने मूढ सर्वचि जाहले ॥ १३ ॥

महापानाभिमत्तानां - अति मद्यप्राशनाने मत्त झालेले - दृप्तचेतनसां - स्वाभाविक असणार्‍य़ा गर्वाने फुगलेले - कृष्णमायाविमूढानां - आणि कृष्णाच्या मायेने मोहित झालेले - वीराणां - वीरांचा - सुमहान् संघर्षः अभूत् - आपसातच मोठा कलह होऊन वाढला व त्याचा परिणाम घनघोर युद्धात झाला. ॥१३॥
मदिरेच्या अतिसेवनाने धुंद झालेले ते गर्विष्ठ वीर एकमेकांशी लढूझगडू लागले वास्तविक श्रीकृष्णांच्या मायेनेच ते भ्रमिष्ट झाले होते. (मदिरा हे निमित्त होते). (१३)


युयुधुः क्रोधसंरब्धा वेलायां आततायिनः ।
धनुर्भिरसिभिर्भल्लैः गदाभिस्तोमरर्ष्टिभिः ॥ १४ ॥
क्रोधाने भरले सारे लढती ते परस्परा ।
बाण खड्‍गे तसे ऋष्टी भाले तोमर नी गदा ॥
घेवोनी शस्त्रे अस्त्राते भिडले सागरतटीं ॥ १४ ॥

वेलायां - समुद्रकाठी - क्रोधसंरब्धाः - क्रोधाच्या वेगाने खवळून गेल्यामुळे - आततायिनः - अघोर कर्म करण्याला सिद्ध झालेले यादव - धनुभिः, असिभिः, - धनुष्यबाण, असि=खड्‌ग, - भल्लैः गदाभिः तोमरष्टिभिः - भाले, गदा, तोमर, ऋष्टि इत्यादि आयुधे घेऊन - युयुधुः - युद्ध करते झाले. ॥१४॥
रागाच्या भरात विवेकहीन होऊन ते त्या किनार्‍यावरच धनुष्ये व तलवारी, भाले, गदा व तोमर, ऋष्टी इत्यादी शस्त्रांनी एकमेकांशी युद्ध करू लागले. (१४)


( मिश्र - १२ अक्षरी )
पतत्पताकै रथकुञ्जरादिभिः
     खरोष्ट्रगोभिर्महिषैर्नरैरपि ।
मिथः समेत्याश्वतरैः सुदुर्मदा
     न्यहन्छरैर्दद्‌भिरिव द्विपा वने ॥ १५ ॥
( इंद्रवज्रा )
ते मत्त सारे रथ अश्व हत्ती
     नी उंट रेडे खर खेचरांच्या ।
नी माणसांच्याहि बसून स्कंधी
     आले लढाया अन दात खाती ।
रथध्वजा त्या फडकोनि आल्या
     नी पैदळोही उसळोनि आले ॥ १५ ॥

पतत्पताकैः रथकुंजरादिभिः, - ज्यांच्यावरील निशाणे सारखी हालत होती अशा रथांच्या, - खर-उष्ट्र-गोभिः, महिषैः, - हत्तींच्या, त्याचप्रमाणे खर, उंट, बैल, रेडे, - नरैः अपि, अश्वतरैः - नरही (वेठीचे दास ?) यांच्यावर बसून आणि खेचरांच्या साह्याने - सुदुर्मदाः - ते मदोन्मत्त यादव - मिथः समेत्य - परस्परांस गाठून - शरैः न्यहन् - बाणांनी ताडन करिते झाले - वने द्विपाः दद्भिः इव - वनातील हत्ती जसे वनात आपल्या दंतसाह्याने लढतात, तसे हे लोक अविचाराने लढले. ॥१५॥
अत्यंत उन्मत्त झालेले यादव रथ, हत्ती, घोडे, गाढवे, उंट, खेचरे, बैल, रेडे आणि माणसांवरसुद्धा स्वार होऊन एकमेकांना बाणांनी घायाळ करू लागले जसे जंगली हत्तींनी एकमेकांना घायाळ करावे तसे त्यावेळी त्यांच्या वाहनांवर ध्वज फडकत होते. (१५)


प्रद्युम्नसाम्बौ युधि रूढमत्सरौ ।
     अक्रूरभोजौ अनिरुद्धसात्यकी ।
सुभद्रसङ्ग्रामजितौ सुदारुणौ ।
     गदौ सुमित्रासुरथौ समीयतुः ॥ १६ ॥
प्रद्युन्म सांबा नि अक्रूर भोजा
     त्या सात्यकीला अनिरुद्ध मारी ।
संग्रामजित ला भिडला सुभद्र
     गदो उसीला सुरथा सुमित्र ॥ १६ ॥

युधि रूढ-मत्सरौ प्रद्युम्नसांबौ, - युद्धारंभ झाल्यानंतर स्पर्धेला जोर चढून शीघ्रच प्रद्युम्न व सांब, - अक्रूरभोजौ, अनिरुद्धसात्यकी, - अक्रूर आणि भोज, अनिरुद्ध आणि सात्यकी, - सुभद्रसंग्रामजितौ, सुदारुणौ गदौ, - सुभद्र आणि संग्रामजित, महाभयंकर असणारे दोघे गदनामक यादव, - सुमित्रासुरथौ समीयतुः - सुमित्र व असुरथ यांच्यामध्ये भयंकर द्वंद्वयुद्धे झाली. ॥१६॥
प्रद्युम्न सांबाशी, अक्रूर भोजाशी, अनिरूद्ध सात्यकिशी, सुभद्र संग्रामजिताशी, गद गद नावाच्या पुतण्याशी, आणि सुमित्र सुरथाशी युद्ध करू लागला ते भयंकर योद्धे क्रोधाने एकमेकांचा विनाश करण्यासाठी सज्ज झाले होते. (१६)


अन्ये च ये वै निशठोल्मुकादयः
     सहस्रजिच्छतजिद्‍भानुमुख्याः ।
अन्योन्यमासाद्य मदान्धकारिता
     जघ्नुर्मुकुन्देन विमोहिता भृशम् ॥ १७ ॥
सहस्त्रजित नी निषठो नि भानु
     उल्मूक तैसा शतजीत आदी ।
ते सर्वची यादव गुंतले तै
     माया नशेने बहु अंध झाले ॥ १७ ॥

ये वै अन्ये च - तसेच आणखी दुसरे - निशठ-उल्मुकादयः - निशठ‌उल्मुकप्रभृति - सहस्त्रजित्-शतजित्-भानुमुख्याः - सहस्त्रजित्, शतजित्, भानु हे ज्याचे अधिपति होते असे - मदांधकारिताः - मदाच्या अज्ञानाने आंधळे झालेल्या क्रुद्ध एडक्यांप्रमाणे - अन्योन्यं आसाद्य - एकमेकांस हटकून युद्ध करू लागले - मुकुंदेन विमोहिताः - कृष्णमोहामुळे अविचाराने वारंवार एकमेकांस - भृशं जघ्नुः - दृढ प्रहार करून. ॥१७॥
यांच्याव्यतिरिक्त निशठ, उल्मुक, सहस्त्रजित, शतजित, भानू इत्यादी यादवसुद्धा मदधुंद होऊन एकमेकांना भिडले श्रीकृष्णांच्या मायेनेच अतिशय मोहित होऊन ते एकमेकांना मारू लागले. (१७)


दाशाहवृष्ण्यन्धक भोजसात्वता ।
     मध्वर्बुदा माथुरशूरसेनाः ।
विसर्जनाः कुकुराः कुन्तयश्च ।
     मिथस्ततस्तेऽथ विसृज्य सौहृदम् ॥ १८ ॥
दाशार्ह वृष्ण्यंधक भोज सात्वतो
     मधूनि अर्बूद नि शुरसेनो ।
कुकूर माथूर कुतिवंशी
     स्नेही भुलोनी लढु लागले की ॥ १८ ॥

ते दाशार्ह-वृष्णि-अंधक-भोजसात्वताः, - दाशार्ह, वृष्णिक, अंधक, भोज, सात्वत, - मधु-अर्बुदाः, माथुरशूरसेनाः, - मधु, अर्बुद, माथुर, शूरसेन ह्या नऊ यादववंशातील लोक - विसर्जनाः, कुकुराः, कुंतयःच ततः - व विसर्जन कुकुर, कुंति या देशांतील यादव हे सर्व - अथ सौहृदं विसृज्य - पूर्व स्नेहाचा त्याग करून - मिथः - परस्परांशी. ॥१८॥
दाशार्ह, वृष्णी, अंधक, भोज, सात्वत, मधू, अर्बुद, माथुर, शूरसेन, विसर्जन, कुकुर आणि कुंती वंशातील लोक आपापसातील प्रेम विसरून एकमेकांना मारू लागले. (१८)


पुत्रा अयुध्यन् पितृभिर्भ्रातृभिश्च
     स्वस्रीयदौहित्र पितृव्यमातुलैः ।
मित्राणि मित्रैः सुहृदः सुहृद्‌भिः
     ज्ञातीन् त्ववहञ्ज्ञातय एव मूढाः ॥ १९ ॥
पित्यास पुत्रो नि बंधू द्वयात
     मामास भाचा अन नातु आज्या ।
चाचा भतीजे नि सगोत्र सारे
     मूढत्वि तेंव्हा करितात खून ॥ १९ ॥

मूढाः एव - केवळ मूढच बनलेले - पुत्राः तु पितृभिः - मुलगे बापाशी - भ्रातृभिः च स्व यदौहित्रपितृव्यमातुलैः - बंधु-बंधुशी, मामा-भाच्याशी, आजे-नातवाशी, पुतणे-चुलत्याशी, भाचा-मामाशी - मित्राणि मित्रैः - मित्र मित्राशी - सुहृदः सुहृद्भिः - स्नेही स्नेह्याशी - अयुध्यन् - लढते झाले - ज्ञातयः ज्ञातीन् अहन् - ज्ञातींनीच ज्ञातींचा संहार चालविला. ॥१९॥
बुद्धिभ्रंश झालेले पुत्र पित्याशी, भाऊ भावाशी, भाचे मामांशी, नातू आजोबांशी, मित्र मित्रांशी, सुहृद सुहृदांशी, काका पुतण्याशी व नातलग नातलगांशी आपापसात लढून मरूमारू लागले. (१९)


( अनुष्टुप् )
शरेषु क्षीयमाणेषु भज्यमानेषु धन्वसु ।
शस्त्रेषु क्षीयमानेषु मुष्टिभिर्जह्रुरेरकाः ॥ २० ॥
ता वज्रकल्पा ह्यभवन् परिघा मुष्टिना भृताः ।
जघ्नुर्द्विषस्तैः कृष्णेन वार्यमाणास्तु तं च ते ॥ २१ ॥
प्रत्यनीकं मन्यमाना बलभद्रं च मोहिताः ।
हन्तुं कृतधियो राजन् आपन्ना आततायिनः ॥ २२ ॥
( अनुष्टुप )
सर्वांचे संपले बाण तुटली धनु सर्व ती ।
चूर्णाने मुसळाच्या त्या लोहाळे जन्मले तिथे ॥
मारिती उपटोनिया आपसात परस्परे ॥ २० ॥
हातात तृण ते येता वज्राच्या परि जाहले ।
आवेशे मारिती वीर विपक्षा लक्षुनी तदा ॥ २१ ॥
कृष्ण नी बलरामाने वीरांना रोधिता तयां ।
मानिती शत्रु मूढत्वे माराया धावती पहा ॥ २२ ॥

शरेषु क्षीयमाणेषु - बाण संपले - धन्वसु भज्यमानेषु - धनुष्ये मोडली - शस्त्रेषु क्षीयमाणेषु - शस्त्रे खलास झाली तेव्हा - मुष्टिभिः एरकाः जह्नुः - मुठीमध्ये एरका-लवाळ्याच्या काडयाच घेतल्या. ॥२०॥ मुष्टिना भृताः ताः (एरकाः) - मुठीमध्ये धारण केलेल्या त्या एरका - वज्रकल्पाः परिघाः - वज्रासारखे अभेद्य परिघ, लोहदंड - अभवन् हि - झाले - तैः द्विषः जघ्नुः - त्या लोहदंडांनी ते परस्परांवर चढाई करून परस्परांस मारू लागले - कृष्णेन वार्यमाणाः - कृष्ण निवारण करू लागला, असे करू नका म्हणून म्हणू लागला - ते तं च तु - ते यादव त्यालाच मारू लागले !. ॥२१॥ राजन् - राजा - मोहिताः (ते) - मुग्ध झालेल्या यादवांस - (तं) बलभद्रं च प्रत्यनिकं मन्यमानाः - कृष्ण व बलराम हेही प्रत्यनीक म्हणजे शत्रूसारखे वाटू लागले - हंतुं कृतधियः - त्या कृष्णबलरामास मारण्याचा निश्चय करून - आततायिनः आपन्नाः - ते आतताई त्या बंधूंवर चढाई करून गेले. ॥२२॥
शेवटी जेव्हा बाण संपून धनुष्ये मोडली आणि शस्त्रास्त्रे संपली तेव्हा त्यांनी हातांत समुद्रतटावर उगवलेले लव्हाळे उपटून घेतले ते लव्हाळे ऋषींच्या शापामुळे उत्पन्न झालेल्या लोखंडी मुसळाच्या चूर्णापासून तयार झालेले असल्यामुळे वज्राप्रमाणे शक्तिशाली लोहदंड बनले आता तेच एकमेकांवर मारू लागले श्रीकृष्णांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्‍न केला, तर ते मायामोहित अविचारी त्यांना आणि बलरामांनाच आपले शस्त्रू समजून त्यांनासुद्धा मारण्यासाठी सरसावले. (२०-२२)


अथ तावपि सङ्क्रुद्धौ उद्यम्य कुरुनन्दन ।
एरकामुष्टिपरिघौ चरन्तौ जघ्नतुर्युधि ॥ २३ ॥
रामकृष्णहो क्रोधाने फिरती युद्धभूमिसी ।
लोहाळे उपटोनीया इतरां मारिती द्वय ॥ २३ ॥

अथ - नंतर - तौ अपि संक्रुद्धौ - ते रामकृष्ण सुद्धा संतापले, आणि - कुरुनंदन - राजा परीक्षिते ! - एरकामुष्टिपरिघौ उद्यम्य - एरकापूर्ण ज्या मुठी त्याचा लोहदंड करून त्या उभयांनी उचलल्या - युधि चरं तौ जघ्नतुः - रणांगणात संचार करून अनेक यादवांस ठार करते झाले. ॥२३॥
हे कुरूनंदना ! तेव्हा तेही संतप्त होऊन युद्धभूमीवर इकडेतिकडे फिरत हातात लव्हाळ्यांचे परिघ घेऊन त्यांना मारू लागले. (२३)


ब्रह्मशापोपसृष्टानां कृष्णमायावृतात्मनाम् ।
स्पर्धाक्रोधः क्षयं निन्ये वैणवोऽग्निर्यथा वनम् ॥ २४ ॥
मायेने ब्रह्मशापाने मोहाने वंश नष्टला ।
घासता वेळुसी वेळि अग्नीत बेट जै जळे ॥ २४ ॥

ब्रह्मशापोपसृष्टानां - ब्रह्मशापाने युक्त व घेरलेले - कृष्णमायाऽऽवृतात्मनां - कृष्णमायेने बुद्धिभ्रष्ट झालेल्या त्या यादवांचा - स्पर्धाक्रोधः - स्पर्धाजन्य क्रोध - क्षयं निन्ये - नष्ट करिता झाला - यथा वैणवः - वेणुघर्षणाने उत्पन्न झालेला - अग्निः वनं - अग्नि सर्व वेळुवन दग्ध करतो, त्याप्रमाणे. ॥२४॥
जसा बांबूंच्या एकमेकावर घासण्याने निर्माण झालेला अग्नी त्यांचेच भस्म करून टाकतो, त्याचप्रमाणे ब्राह्मणांच्या शापाने शापित आणि श्रीकृष्णांच्या मायेने मोहित झालेल्या यादवांना स्पर्धामूलक क्रोधाने नष्ट करून टाकले. (२४)


एवं नष्टेषु सर्वेषु कुलेषु स्वेषु केशवः ।
अवतारितो भुवो भार इति मेनेऽवशेषितः ॥ २५ ॥
संहार यदुवंशाचा जाहला पूर्ण कृष्ण तो ।
पाहता टाकितो श्वास कार्य पूर्णचि जाहले ॥ २५ ॥

एवं - याप्रकारे - स्वेषु सर्वेषु कुलेषु नष्टेषु - आपले सर्व यादवकुल नष्ट झाले तेव्हा - अवशेषितः भुवः भारः अवतारितः - भारतीयुद्धानंतर अवशिष्ट राहिलेला भूमीचा भार उतरला - इति - असे - केशवः मेने - केशवाला, कृष्णाला वाटले. ॥२५॥
आपल्या सर्व कुळांचा संहार झाला, तेव्हा पृथ्वीवरील उरलासुरला भारसुद्धा नाहीसा झाला, असे श्रीकृष्णांना वाटले. (२५)


रामः समुद्रवेलायां योगमास्थाय पौरुषम् ।
तत्याज लोकं मानुष्यं संयोज्यात्मानमात्मनि ॥ २६ ॥
समुद्रतटि बैसोनी बळीने ध्यान लाविले ।
आत्मरूपी निमाने नी मनुष्यदेह सोडिला ॥ २६ ॥

(नंतर) समुद्रवेलायां पौरुषं योगं आस्थाय - समुद्राचे तीरी पौरुष योगाची धारणा करून - आत्मानं आत्मनि संयाज्य - शुद्ध अंतःकरणात राहणारा आपला आत्मा परमात्मास्वरूपी मिळवून-परमात्मरूप होऊन - रामः मानुष्यं लोकं तत्याज - श्रीबलरामाने मनुष्यदेहासकट मनुष्यलोकाचा त्याग केला. ॥२६॥
बलरामांनी समुद्रकिनार्‍यावर बसून एकाग्रचित्ताने परमात्मचिंतन करीत आत्म्याला परमात्म्याशी जोडून मनुष्यदेहाचा त्याग केला. (२६)


रामनिर्याणमालोक्य भगवान्देवकीसुतः ।
निषसाद धरोपस्थे तुष्णीमासाद्य पिप्पलम् ॥ २७ ॥
रामाची सद्‍गती ऐशी कृष्णाने पाहता स्वय ।
अश्वत्थवृक्ष पाहोनी बैसले भूनिसीच ते ॥ २७ ॥

रामनिर्याणं आलोक्य - बलराम निजधामास गेला असे पाहून - भगवान् देवकीसुतः - देवकीनंदन श्रीकृष्ण भगवान् - घरोपस्थे पिप्पलं आसाद्य - तेथीलच एक अश्वत्थ वृक्ष गाठून त्याच्या खाली जमिनीवर - तूष्णीं निषसाद - स्वस्थ, निष्क्रिय, समाधि लावून बसला. ॥२७॥
बलराम स्वरूपात लीन झालेले पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवरच गप्प बसले. (२७)


बिभ्रच्चतुर्भुजं रूपं भ्राजिष्णु प्रभया स्वया ।
दिशो वितिमिराः कुर्वन् विधूम इव पावकः ॥ २८ ॥
चतुर्भुज रुपो दिव्य कृष्णाने धारिले तदा ।
स्वच्छ त्या अग्निच्या ऐसे प्रकाशमान जाहले ॥ २८ ॥

भ्राजिष्णु चतुर्भुजं रूपं बिभ्रत् - दैदीप्यमान असे चतुर्भुजरूप धारण करणारा - स्वया प्रभया - आपल्या स्वतःच्या तेजाने - दिशः वितिमिराः कुर्वन् - दाही दिशांतील अंधकार नष्ट करून - विधूमः पावकः इव - धूर नाहीसा केलेल्या अग्नीप्रमाणे. ॥२८॥
त्यावेळी त्यांनी स्वतःच्या तेजाने झळकणारे चतुर्भुज रूप धारण केले होते धूर नसलेल्या अग्नीप्रमाणे ते दिशा प्रकाशमान करीत होते. (२८)


श्रीवत्साङ्कं घनश्यामं तप्तहाटकवर्चसम् ।
कौशेयाम्बरयुग्मेन परिवीतं सुमङ्गलम् ॥ २९ ॥
घनश्याम अशा देही दैदीप्य ज्योत पातली ।
श्रीवत्स चिन्ह ती वस्त्रे रूप मोठेचि मंगल ॥ २९ ॥

श्रीवत्सांकं, - श्रीवत्साने सुशोभित, - घनश्यामं, - सजल मेघश्याम, - तप्तहाटकवर्चसं, - तापविलेल्या सुवर्णासारखे तेजस्वी, - कौशेयांबरयुग्मेन, परिवीतं, सुमंगलं - पीतांबर द्वय धारण करणारे, अत्यंत मंगलकारी. ॥२९॥
त्यांच्या मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर तापलेल्या सोन्यासारखी कांती होती वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह शोभत होते त्यांनी रेशमी पीतांबर आणि शेला धारण केला होता त्यांचे हे रूप अतिशय मंगलकारक होते. (२९)


सुन्दरस्मितवक्त्राब्जं नीलकुन्तलमण्डितम् ।
पुण्डरीकाभिरामाक्षं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥ ३० ॥
नीलिमा शोभली गाली सुहास्य मुखपद्‍म नी ।
कमलापरि ते नेत्र मकराकार कुंडले ॥ ३० ॥

सुंदरस्मितवक्‌त्राब्जं, - फुललेल्या कमलासारखे सुहास्यवदन, - नीलकुंतलमंडितं, - निळ्या कुरळ केशांनी अलंकृत, - पुंडरीकाभिरामाक्षं, - पुंडरीकनामक कमलाप्रमाणे सुंदर नेत्र असणारे, - स्फुरन्मकरकुंडलं - कर्णांत मकरकुंडले तळपत असलेले. ॥३०॥
मुखकमलावर सुंदर हास्य आणि काळे कुरळे केस शोभून दिसत होते कमळाप्रमाणे सुंदर नेत्र होते मकराकृती कुंडले कानात झगमगत होती. (३०)


कटिसूत्रब्रह्मसूत्र किरीटकटकाङ्गदैः ।
हारनूपुरमुद्राभिः कौस्तुभेन विराजितम् ॥ ३१ ॥
ब्रह्मसूत्र कटीसूत्र किरीट कंकणे तसे ।
बाजुबंद तसे हार अंगठ्या कौस्तुभो मणी ॥ ३१ ॥

कटिसूत्र-ब्रह्मसूत्र-किरीट-कटक-अंगदैः, - कटिसूत्र=कटिदोरा, यज्ञोपवीत, मुकुट, कडी, तोडे, पोची, - हारनूपुर-मुद्राभिः, - हार-तोरडया, मुद्रिका, - कौस्तुभेन विराजितं - कौस्तुभमणि इत्यादि भूषणांनी विराजीत. ॥३१॥
कमरेला करदोटा, गळ्यात जानवे, मस्तकावर मुगुट हातांमध्ये कंकण, बाहूंमध्ये बाजूबंद, वक्षःस्थळावर हार, पायांमध्ये नूपुरे, बोटांमध्ये अंगठ्या आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत होता. (३१)


वनमालापरीताङ्गं मूर्तिमद्‌भिर्निजायुधैः ।
कृत्वोरौ दक्षिणे पादम् आसीनं पङ्कजारुणम् ॥ ३२ ॥
वनमाला गदा चक्रशंखादी आयुद्धे करीं ।
उजव्या गुडघ्याशी तो डावा पायहि ठेविला ॥
रक्तकमलशी शोभा तळव्यां दिसते पहा ॥ ३२ ॥

वनमालापरीतांगं, - तुळशीच्या माळांनी - मूर्तिमद्भिः निजायुधैः (परीतागं), - व तेजस्वी मूर्त धरणार्‍या आयुधांनी आपाद सुशोभित असणारे - पंकजारुणं पादं दक्षिणे - आणि दक्षिण मांडीवर आरक्त वर्ण वामपाद ठेवलेले - ऊरौ कृत्वा आसीनं - असे सर्वांगसुंदर ध्यान, कृष्ण निजधामास जाणार तेव्हा प्रकट झाले. ॥३२॥
गळ्यात वनमाळा रूळत होती शंख, चक्र, गदा, पद्य ही आयुधे मूर्तिमंत होऊन जवळ उभी होती त्यावेळी भगवान आपल्या उजव्या मांडीवर तांबड्या कमळाप्रमाणे तळवा असलेला डावा पाय ठेवून बसले होते. (३२)


मुसलावशेषायःखण्ड कृतेषुर्लुब्धको जरा ।
मृगास्याकारं तच्चरणं विव्याध मृगशङ्कया ॥ ३३ ॥
जरा नामक तो व्याध मुसळीतुकडा तये ।
घासोनी लाविला बाणा तळवा लाल पाहता ॥
खरेचि मृग मानोनी तयाने वेध घेतला ॥ ३३ ॥

मृग-आस्य-आकारं - मृगाच्या तोंडाच्या आकाराचा - चरणं मृगशंकया - तो चरण मृगच होय अशा शंकेने - मुसलावशेषायः - दुसर्‍या अध्यायात सांगितल्याप्रमाणे मुसळाचा - खंडकृतेषुः - न पीठ होणारा जो लोखंडाचा भाग त्याचाच केला आहे बाण ज्याने अशा - ‘जरा’ लुब्धकः - जरा नावाच्या लुब्धकाने - तत् विव्याध - त्या मृगतुल्य चरणावर नेम धरून तोच बाण मारला. ॥३३॥
जरा नावाचा एक व्याध होता त्याने शापित मुसळाचा उरलेला लोखंडी तुकडा आपल्या बाणाच्या टोकाला लावला होता त्याने तो बाण हरिणाच्या मुखासारख्या वाटणार्‍या भगवंतांच्या त्या पायावर मारला. (३३)


चतुर्भुजं तं पुरुषं दृष्ट्वा स कृतकिल्बिषः ।
भीतः पपात शिरसा पादयोः असुरद्विषः ॥ ३४ ॥
आला नी पाहिले त्याने अरे रे रूप साजिरे ।
घाबरे चरणापाशी कंपीत पडला असे ॥ ३४ ॥

(परंतु) चतुर्भुजं तं पुरुषं दृष्ट्‌वा - चतुर्भुज मनुष्यपुंगव कृष्ण आहे असे पाहून - कृतकिल्बिषः सः भीतः - मनुष्यवधाचे पातक करणारा तो व्याध भ्याला - असुरद्विषः - असुरशत्रु जो कृष्ण - पादयोः शिरसा पपात - त्याच्या पायावर त्याने शिरसाष्टांग नमस्कार घातला. ॥३४॥
जवळ आल्यावर ते चतुर्भुज भगवान आहेत, असे पाहून त्याला अपराधाची जाणीव झाली म्हणून भिऊन त्याने असुरांचा नाश करणार्‍या त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. (३४)


अजानता कृतमिदं पापेन मधुसूदन ।
क्षन्तुमर्हसि पापस्य उत्तमश्लोक मेऽनघ ॥ ३५ ॥
अजाणता असे झाले पाप हे मधुसूदना ।
क्षमावे अपराधाला तुम्ही तो निर्विकारची ॥ ३५ ॥

मधुसूदन - हे मधुसूदना - पापेन अजानता इदं कृतं - मज पाप्याकडून न जाणता हे पातक घडले आहे - उत्तमश्लोक अनघ - हे पुण्यश्लोक निष्पाप देवा - पापस्य मे क्षंतुं अर्हसि - मज पाप्याला क्षमा करण्यास आपण समर्थ आहा. ॥३५॥
तो म्हणाला, "हे मधुसूदना ! मी पाप्याने हे अजाणतेपणाने केले मी पापी आहे उत्तमकीर्ती पुण्यशील भगवन ! आपण मला क्षमा करावी. (३५)


यस्यानुस्मरणं नृणां अज्ञानध्वान्तनाशनम् ।
वदन्ति तस्य ते विष्णो मयासाधु कृतं प्रभो ॥ ३६ ॥
तुमच्या स्मरणे नष्टे अज्ञान संत बोलती ।
केले अनिष्ट ऐसे मी खेदाची गोष्ट जाहली ॥ ३६ ॥

प्रभो - देवा - यस्य अनुस्मरणं नृणां - ज्याचे नुसते स्मरण करणार्‍या पुरुषांची - अज्ञानध्वांतनाशनं वदंति - पातके व अज्ञानरुपी अंधकार ही नष्ट होतात असे म्हणतात - तस्य ते - त्या तुझा - विष्णो - हे कृष्णा - मया असाधु कृतं - मी फार मोठा अपराध केला आहे. ॥३६॥
हे सर्वव्यापक प्रभो ! ज्यांचे स्मरण माणसांचा अज्ञानांधकार नष्ट करते, त्या आपल्या बाबतीत मी फार वाईट कृत्य केले. (३६)


तन्माऽऽशु जहि वैकुण्ठ पाप्मानं मृगलुब्धकम् ।
यथा पुनरहं त्वेवं न कुर्यां सदतिक्रमम् ॥ ३७ ॥
पापी मी हरिणा मारी नाथ मारा मला त्वरे ।
मरता मम हाताने न घडे पाप हे असे ॥ ३७ ॥

तत् - म्हणून - वैकुंठ - हे वैकुंठवासी देवा - मृगलुब्धकं पाप्मानं मा आशु जहि - मृगहत्या करणारा जो मी पापी त्या माझा तू लवकर वध कर - यथा - म्हणजे - पुनः तु एवं सदतिक्रमं अहं न कुर्यां - पुनः अशा प्रकारचा अन्याय माझ्या हातून होणार नाही. ॥३७॥
हे वैकुंठा ! आपण मलापापी पारध्याला तत्काळ मारून टाका त्यामुळे तरी मी पुन्हा असा महापुरूषांचा अपराध करू धजणार नाही. (३७)


( वसंततिलका )
यस्यात्मयोगरचितं न विदुर्विरिञ्चो
     रुद्रादयोऽस्य तनयाः पतयो गिरां ये ।
त्वन्मायया पिहितदृष्टय एतदञ्जः
     किं तस्य ते वयमसद्‍गतयो गृणीमः ॥ ३८ ॥
( वसंततिलका )
तो आत्मयोग रचिला जरि ब्रह्मयाने
     रुद्रादि तेहि नच जाणिति योग तूझा ।
मायेत तेहि रमती तुझिया हरी रे
     मी पापयोनि विषयी मग काय जाणी ॥ ३८ ॥

यस्य आत्मयोगरचितं - ज्या त्वद्वश असणार्‍या तुझ्या मायेने विरचित जो हा अद्‌भुत दृश्यादृश्य प्रपंच - विरिंच - ब्रह्मदेवाला - अस्य तनयाः - ब्रह्मदेवाच्या पुत्रांना - रुद्रादयः - रुद्रदि देवतांना - ये गिरां पतयः - आणि ज्यांस वाणी वश असते, अशा वेदद्रष्ट्यांसही - न विदुः - समजला नाही - त्वन्मायया पिहितदृष्टयः - तुझ्या मायेमुळे मूढ झाली आहे बुद्धदृष्टि ज्यांची असे - असद्‌गतयः वयं - पापयोनीत जन्मून पापगतीलाच जाणारे आम्ही - तस्य ते एतत् - त्या तुज प्रभूचे हे - अंजः गृणीमः किं - ब्राह्मणशापादि कृत्य सहज समजेल किंवा वर्णन करिता येईल काय ?॥३८॥
आपल्या योगमायेचा विलास ब्रह्मदेव, त्यांचे पुत्र रूद्र इत्यादी, किंवा वाणीचे अधिष्ठाता बृहस्पती इत्यादीसुद्धा जाणत नाहीत कारण त्यांचे ज्ञान आपल्या मायेने झाकले गेले आहे मग आमच्यासारखे पापी त्याचे काय वर्णन करू शकणार बरे ? (३८)


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
मा भैर्जरे त्वमुत्तिष्ठ काम एष कृतो हि मे ।
याहि त्वं मदनुज्ञातः स्वर्गं सुकृतिनां पदम् ॥ ३९ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले- ( अनुष्टुप )
हे जरा न भियी ऊठ माझ्या इच्छेंचि हे घडे ।
घे आज्ञा स्वर्गि जा राहा पुण्यवंतास दुर्लभ ॥ ३९ ॥

जरे ! त्वं मा भैः - जरानामक व्याधा ! तू भिऊ नकोस - उत्तिष्ठ - उठ - एष मे कामः कृतः हि - कारण मला जे अभिष्ट तेच तू केले आहेस - मदनुज्ञातः - मी आज्ञा करितो की - त्वं सुकृतिनां पदं स्वर्गं याहि - देह टाकून पुण्यवंतांचे स्थान अशा स्वर्गाप्रत तू जा. ॥३९॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे जरे ! तू भिऊ नकोस ! ऊठ ! हे काम तू माझ्या मनासारखेच केलेस जा ! ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवानांना होते, त्या स्वर्गात माझ्या आज्ञेने जाऊन तू निवास कर. (३९)


इत्यादिष्टो भगवता कृष्णेनेच्छाशरीरिणा ।
त्रिः परिक्रम्य तं नत्वा विमानेन दिवं ययौ ॥ ४० ॥
श्रीशुकदेवजी सांगतात-
भगवंत स्व‍इच्छेने घेतसे देह नृपा ।
प्रदक्षिणा करोनीया विमानी व्याध बैसला ॥ ४० ॥

भगवता इच्छाशरीरिणा - इच्छामात्रे करून शरीर धारण करणार्‍या - कृष्णेन इति आदिष्टः - किंवा इच्छा हेच शरीर ज्याचे अशा भगवान् कृष्णाची आज्ञा मान्य करणारा तो व्याध - त्रिः परिक्रम्य - तीन प्रदक्षिणा करून - तं नत्वा - कृष्णाला नमस्कार करून - विमानेन दिवं ययौ - विमानात बसून स्वर्गाला गेला. ॥४०॥
श्रीशुक म्हणतात आपल्या इच्छेने शरीर धारण करणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी व्याधाला असे म्हटले, तेव्हा त्याने त्यांना तीन प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला आणि विमानात बसून तो स्वर्गात गेला. (४०)


दारुकः कृष्णपदवीम् अन्विच्छन् अधिगम्य ताम् ।
वायुं तुलसिकामोदम् आघ्रायाभिमुखं ययौ ॥ ४१ ॥
अंदाज बांधुनी आला दारुक सारथी तिथे ।
तुलसी गंध जाणोनी आलासे माग काढिता ॥ ४१ ॥

कृष्णपदवीं अन्विच्छन् - श्रीकृष्णचरणांचा शोध करणार्‍या - दारुकः - दारुक सारथ्याला - तुलसिकामोदं वायुं आघ्राय - तुलसीपत्रांच्या सुगंधवाहक वायूच्या अवघ्राणावरून - तां अधिगम्य - ती जागा सापडली - अभिमुखं ययौ - तो सन्मुख येऊन उभा राहिला. ॥४१॥
भगवान श्रीकृष्णांचा सारथी दारूक त्यांचा शोध घेत होता त्यांनी धारण केलेल्या तुळशीच्या सुगंधाच्या वार्‍यावरून तो त्यांच्यासमोर आला. (४१)


( इंद्रवंशा )
तं तत्र तिग्मद्युभिरायुधैर्वृतं
     ह्यश्वत्थमूले कृतकेतनं पतिम् ।
स्नेहप्लुतात्मा निपपात पादयो
     रथादवप्लुत्य सबाष्पलोचनः ॥ ४२ ॥
( इंद्रवज्रा )
दारुक पाही आसनस्थ कृष्णा
     असह्य तेजी करि आयुधे ती ।
रथातुनी धावत तैचि आला
     नी कृष्ण पायी पडला तसा तो ॥ ४२ ॥

तत्र हि अश्वत्थमूले - तेथे त्या अश्वत्थवृक्षाखाली - कृतकेतनं - ज्याने आपली बैठक घातली आहे - तं तिग्मद्युभिः आयुधैः - व ज्याची सर्व लखलखीत सुदर्शनादि तीक्ष्ण आयुधे - वृतं पतिं - जवळ आहेत असा तो आपला धनी पाहून - बाष्पलोचनः - अश्रूंनी ज्याचे नेत्र डबडबले आहेत असा - सः - तो दारुक - रथात् अवप्लुत्य - रथातून खाली उडी घेऊन - स्नेहप्लुतात्मा - स्नेहाने भिजून गेले आहे अंतःकरण ज्याचे अशा त्या दारुकाने - पादयोः निपपात - कृष्णाच्या पायांवर लोटांगण घातले. ॥४२॥
दारुकाने तेथे जाऊन पाहिले, तर आपले स्वामी पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसले आहेत असह्य तेजाची आयुधे मूर्तिमंत होऊन तेथे आली आहेत त्यांना पाहून दारूकाच्या हृदयात प्रेमाचा पूर आला डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या रथातून खाली उडी मारून त्याने भगवंतांच्या चरणांवर लोटांगण घातले. (४२)


( मिश्र )
अपश्यतस्त्वच्चरणाम्बुजं प्रभो
     दृष्टिः प्रणष्टा तमसि प्रविष्टा ।
दिशो न जाने न लभे च शान्तिं
     यथा निशायामुडुपे प्रणष्टे ॥ ४३ ॥
अस्तासि जाता शशि तो निशेसी
     स्थिती जशी हो पथिका वनासी ।
न दर्शनान मज तैचि झाले
     न ज्ञान शांती हृदयात कांही ॥ ४३ ॥

प्रभो - हे जगन्नाथा - त्वच्चरणांबुजं अपश्यतः (मे) दृष्टिः - तुझी चरणकमले दिसेनाशी झाली तेव्हापासून माझी ज्ञानदृष्टि - तमसि प्रविष्टा प्रनष्टा - अज्ञानात शिरली व नाहीशी झाली आहे - दिशः न जाने - मला कर्तव्याअकर्तव्याची दिशा समजत नाही - शांतिं च न लभे - माझी शांतीही या अज्ञानाने नाहीशी झाली आहे - यथा निशायां उडुपे प्रनष्टे - रात्रौ उडुप=चंद्र त्याचा अस्त झाल्यावर दृष्टि नाहीशी होते. ॥४३॥
दारुकाने म्हटले "हे प्रभो ! रात्री चंद्र नसल्यावर अंधारात ज्याप्रमाणे काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे आपले हे चरणकमल न दिसल्यामुळे मला दिशा कळेनाशा झाल्या आणि मी अस्वस्थ झालो. (४३)


( अनुष्टुप् )
इति ब्रुवति सूते वै रथो गरुडलाञ्छनः ।
खमुत्पपात राजेन्द्र साश्वध्वज उदीक्षतः ॥ ४४ ॥
( अनुष्टुप )
परीक्षित दारुके ऐसे कृष्णाला प्रार्थिले तदा ।
घोड्यांसह नभामध्ये उडाला सध्वजा रथ ॥ ४४ ॥

इति सूते ब्रुवति वै - अशी दारुक आपली हकीकत सांगत आहे तोच - राजेंद्र - नृपनाथा - साश्वध्वजः गरुडलांछनः रथः - तो गरुडांकित रथ घोडे व ध्वज यांसकट - उदीक्षतः खमुत्पपात - त्या दारुकाच्या देखत देखत उडून स्वर्गास गेला. ॥४४॥
श्रीशुक म्हणतात दारूक असे बोलत असताना त्याच्यादेखतच भगवंतांचा गरुडध्वज रथ, ध्वज व घोड्यांसह आकाशात उडाला. (४४)


तमन्वगच्छन् दिव्यानि विष्णुप्रहरणानि च ।
तेनातिविस्मितात्मानं सूतमाह जनार्दनः ॥ ४५ ॥
पाठोपाठ तयाच्या ते आयुधे उडले तसे ।
आश्चर्य दारुका वाटे भगवान बोलले तया ॥ ४५ ॥

तं दिव्यानि विष्णुप्रहरणानि च अन्वगच्छन् - त्या रथाच्या मागोमाग विष्णूची दिव्य शस्त्रास्त्रेही स्वर्गी गेली - तेन अतिविस्मितात्मानं - ते पाहून अत्यंत विस्मय पावलेल्या - सूतं - दारुक सारथ्याला - जनार्दनः आह - जनार्दन म्हणाला. ॥४५॥
त्या पाठोपाठ भगवंतांची दिव्य आयुधेसुद्धा निघून गेली हे सर्व पाहून अत्यंत चकित झालेल्या दारूकाला भगवान म्हणाले. (४५)


गच्छ द्वारवतीं सूत ज्ञातीनां निधनं मिथः ।
सङ्कर्षणस्य निर्याणं बन्धुभ्यो ब्रूहि मद्दशाम् ॥ ४६ ॥
दारुका द्वारकी जावे वंश संहार हा असा ।
स्वधाम मम यात्रा नी बळीची सांगणे तिथे ॥ ४६ ॥

सूत - हे दारुका - द्वारवतीं गच्छ - द्वारकेस जा - ज्ञातीनां मिथः निधनं - यादवांनी केलेल्या यादवीत झालेला सर्वांचा संहार - संकर्षणस्य निर्याणं - बलरामाचे महाप्रयाण - मद्दशां - माझी ही दशा म्हणजे माझ्या स्थूलशरीराची मुमूर्षता - बंधुभ्यः ब्रूहि - राहिलेल्या यादव बंधूंना सांग. ॥४६॥
दारूका ! तू द्वारकेला जा आणि तेथील बांधवांना यादवांशी एकमेकांचा केलेला संहार, बलरामदादांची परमगती आणि माझी अवस्था सांग. (४६)


द्वारकायां च न स्थेयं भवद्‌भिश्च स्वबन्धुभिः ।
मया त्यक्तां यदुपुरीं समुद्रः प्लावयिष्यति ॥ ४७ ॥
न राहा द्वारके माजी परिवारा सवे तिथे ।
न जाता द्वारकी मी तो समुद्र बुडवेल ती ॥ ४७ ॥

स्वबंधुभिः च - आणि आपल्या बंधूंसहित - भवद्भिः द्वारकायां च न स्थेयं - द्वारकेत कोणीही राहू नये; त्यास घेऊन बाहेर पडावे - मया त्यक्तां - मी सोडून दिलेल्या - यदुपुरीं समुद्रः प्लावयिष्यति - द्वारकेला समुद्र लवकरच बुडविणार आहे. ॥४७॥
तसेच त्यांना सांगा की, "आता तुम्ही परिवारासह द्वारकेत राहू नका मी सोडलेली ती नगरी समुद्र बुडवून टाकील. (४७)


स्वं स्वं परिग्रहं सर्वे आदाय पितरौ च नः ।
अर्जुनेनाविताः सर्व इन्द्रप्रस्थं गमिष्यथ ॥ ४८ ॥
सर्व लोक धना तैसे मम माता पिता ययां ।
इंद्रप्रस्थासि त्या न्यावे आश्रया अर्जुनासि त्या ॥ ४८ ॥

(म्हणून) स्वं स्वं परिग्रहं - आपआपल्या कुटुंबांना - नः पितरौ च - आमच्या वडिलांनाही - आदाय - बरोबर घेऊन - सर्वे इंद्रप्रस्थं गमिष्यथ - तुम्ही सर्व यादव इंद्रप्रस्थाला जा - अर्जुनेन अविताः सर्वे - मार्गामध्ये अर्जुन तुम्हा सर्वांचे सर्वकाळ रक्षण करील. ॥४८॥
सर्वांनी आपापली संपत्ती आणि मातापित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जावे. (४८)


त्वं तु मद्धर्ममास्थाय ज्ञाननिष्ठ उपेक्षकः ।
मन्मायारचितां एतां विज्ञयोपशमं व्रज ॥ ४९ ॥
तू घ्यावा भागवद्धर्म ज्ञननिष्ठचि हो‍उनी ।
उपेक्षी सर्व ही माया मनात शांत हो पहा ॥ ४९ ॥

त्वं तु - पण दारुका ! तू स्वतः - मद्धर्मं आस्थाय - मी सांगितलेल्या धर्माचा आश्रय करून तेथे स्थित झालास म्हणजे - ज्ञाननिष्ठः, उपेक्षकः - ज्ञानयोगाने ज्ञानी आणि सुखदुःखांची उपेक्षा करणारा होशील - एतां मन्मायारचनां विज्ञाय - ही सर्व माझ्या मायेची रचना आहे, लीला आहे असे जाणून - उपशमं व्रज - समाधानस्थिति प्राप्त करून घेशील. ॥४९॥
मी सांगितलेल्या भागवतधर्माचा तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ होऊन सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो तसेच हे सारे माझी माया समजून शांत हो". (४९)


इत्युक्तस्तं परिक्रम्य नमस्कृत्य पुनः पुनः ।
तत्पादौ शीर्ष्णि उपाधाय दुर्मनाः प्रययौ पुरीम् ॥ ५० ॥
दारुके ऐकता केली भगवंता परिक्रमा ।
पुनः पुन्हा नमोनिया उदास पातला पुरां ॥ ५० ॥

इति उक्तः - अशी आज्ञा झालेला तो दारुक - तं परिक्रम्य, पुनः पुनः नमस्कृत्य - कृष्णाला प्रदक्षिणा घालून व वारंवार नमस्कार करून - तत्पादौ शीर्ष्णि उपाधाय - त्याचे पाय आपल्या मस्तकावर ठेऊन - दुर्मनाः पुरीं प्रययौ - विमनस्क होऊन द्वारकेला गेला. ॥५०॥
हे ऐकून दारूकाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणकमलांवर आपले मस्तक ठेवून वारंवार नमस्कार केला त्यानंतर खिन्न मनाने तो द्वारकेला गेला. (५०)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥
अध्याय तिसावा समाप्त

GO TOP