श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
एकोत्रिंशोऽध्यायः

भागवतधर्म निरूपणम्, उद्धवस्य बदरिकाश्रमगमनं च -

भागवत धर्मांचे निरूपण आणि उद्धवाचे बदरिकाश्रमाला जाणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीउद्धव उवाच -
( अनुष्टुप् )
सुदुश्चरां इमां मन्ये योगचर्यामनात्मनः ।
यथाञ्जसा पुमान् सिद्ध्येत् तन्मे ब्रूह्यञ्जसाच्युत ॥ १ ॥
उद्धवजी म्हणाले- ( अनुष्टुप )
जयाला वश ना चिता योग त्याला कठिणची ।
सोपे कांही असे सांगा सहजी तरण्या भवी ॥ १ ॥

अनात्मनः - ज्याने मनोजय केला नाही त्याच्या हातून - इमां योगचर्यां - हे तू सांगितलेले योगाचरण - सुदुष्करां मन्ये - घडणे अत्यंत कठीण आहे, असे वाटते - अच्युत - श्रीकृष्णा - यथा अंजसा पुमान् सिद्धयेत् - ज्या प्रकाराने अथवा प्रक्रियेने कोणत्याही पुरुषाला अंजसा म्हणजे सुलभ रीतीने सिद्धी मिळेल - तत् - तो प्रकार व ती प्रक्रिया - मे अंजसा ब्रूहि - मला सहज समजेल अशा रीतीने सांग. ॥१॥
उद्धव म्हणाला - हे अच्युता ! मन ज्याच्या ताब्यात नाही, त्याच्यासाठी ही योगसाधना करणे अतिशय अवघड आहे, असे मला वाटते म्हणून आपण जेणे करून माणूस सहजपणे परमपद प्राप्त करू शकेल, असा सोपा उपाय मला सांगा. (१)


प्रायशः पुण्डरीकाक्ष युञ्जन्तो योगिनो मनः ।
विषीदन्त्यसमाधानान् मनोनिग्रहकर्शिताः ॥ २ ॥
जाणता पुंडरिकाक्षा योगी चित्तास रोधिती ।
न मिळे यश ते त्यांन पुन्हा ते दुःख पावती ॥ २ ॥

पुंडरीकाक्ष - कमलनयन श्रीकृष्णा - प्रायशः - बहुधा - मनः युंजंतः योगिनः - मनाचा निग्रह करून त्याला ज्ञानप्रवण करणारे योगी - मनोनिग्रहकर्शिताः - मनोनिग्रहाच्या श्रमाने थकले जातात - असमाधानात् विषीदन्ति - मन शांत न झाल्यामुळे असमाधानी होऊन खिन्न होतात. ॥२॥
हे कमलनयना ! बहुतेक योगी जेव्हा आपले मन एकाग्र करू लागतात, तेव्हा वारंवार प्रयत्‍न करूनही मन वश न झाल्यामुळे खिन्न होतात त्यांना मनोनिग्रहाच कष्ट तेवढे होतात. (२)


( मिश्र - १२ अक्षरी )
अथात आनन्ददुघं पदाम्बुजं
     हंसाः श्रयेरन्नरविन्दलोचन ।
सुखं नु विश्वेश्वर योगकर्मभि
     स्त्वन्माययामी विहता न मानिनः ॥ ३ ॥
( इंद्रवजा )
पदांबुजे ही तव देति मोद
     म्हणोनि येती चतुरो पदासी ।
जे घेता ना आश्रय या पदाचा
     गर्वेचि त्याची मति कुंठते की ॥ ३ ॥

अथ अतः - म्हणूनच - अरविंदलोचन - कमलाक्ष देवा - हंसाः - सत्याअसत्याचा विवेक करणारे, सारासार निवडणारे भक्तरूपी हंस - आनंददुधं पदांबुजं - तुझे आनंदमात्र स्रवणारे जे पदकमल त्याचा आश्रय करितात, - सुखं नु श्रयेरन् - तुझ्या पदकमलाची निश्चित्सुखाने सेवा करतात - विश्वेश्वर - विश्वपते - योगकर्मभिः - त्वद्भक्तिशून्य योगांनी व कर्मांनी - अमीमानिनः - हे उन्मत्त झालेले योगी - न - तुझ्या पादांबुजाचा आश्रय करीत नाहीत - त्वन्मायया विहताः - तुझ्या मायेने जिंकले गेल्यामुळे तिलाच वश होतात. ॥३॥
हे कमलनयना ! हे विश्वेश्वरा ! म्हणूच सारासार विचार करणारे भक्त आनंदाचा वर्षाव करणार्‍या आपल्या चरणकमलांचा आनंदाने आश्रय घेतात परंतु जे योगकर्मांनीच सिद्धी मिळवू इच्छितात, अशा अहंकारी लोकांची बुद्धी आपल्या मायेने भ्रष्ट झाल्यामुळे ते आपल्या चरणकमलांचा आश्रय घेत नाहीत. (३)


( वसंततिलका )
किं चित्रमच्युत तवैतदशेषबन्धो
     दासेष्वनन्यशरणेषु यदात्मसात्त्वम् ।
योऽरोचयत् सह मृगैः स्वयमीश्वराणां
     श्रीमत्किरीटतटपीडितपादपीठः ॥ ४ ॥
( वसंततिलका )
सर्वं हितैषि सुहृदो नवलाव नाही
     तू तो बळीसि अथवा वनजास मित्र ।
ब्रह्मदि घेति पद हे शिरि आपुलिया
     आणीक ते रगडती अति प्रेमभावे ॥ ४ ॥

अच्युत ! अशेषबंधो - अखिल जीवांस साह्य करणार्‍या परमेश्वरा - अनन्यशरणेषु दासेषु - अनन्य शरण आलेले जे तुझे भक्त त्यासंबंधाने - यत् तव आत्मसात्त्वं - तुझे जे आत्मसात्त्व म्हणजे दासांचे दासपण तू स्वीकारतोस - एतत् किं चित्रं - त्यात आश्चर्य कसले ? - ईश्वराणां श्रीमत्किरीट - ब्रह्मदेव इंद्रप्रभृति देवदेवांचे जे पृथ्वीमोलाचे मुकुट, - तटपीडित - त्यांच्या तटांनी-अग्रांनी, पीडित-घासले गेले आहे, - पादपीठः स्वयं (सन्) - पादपीठ-पाय ठेवण्याची बैठक ज्याची असा सर्वेश्वर जो स्वतः श्रीमान् परमेश्वर तू त्या तुला - मृगैः सह यः अरोचयत् - सुग्रीव-हनुमंतादि वानरांशीही श्रीराम‌अवतारी सख्य करणे जर रुचते. ॥४॥
हे अच्युता ! आपण सर्वांचे बंधू आहात आपण आपल्या अनन्य शरणागत भक्तांच्या अधीन होता, यात काय आश्चर्य ! ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल, ज्यांनी चरणकमल ठेवलेल्या चौरंगावर आपले दिव्य मुकुट घासतात, तेच आपण रामावतारामध्ये वानरांबरोबर मित्राप्रमाणे वागलात ! (४)


तं त्वाखिलात्मदयितेश्वरमाश्रितानां
     सर्वार्थदं स्वकृतविद् विसृजेत को नु ।
को वा भजेत् किमपि विस्मृतयेऽनु भूत्यै
     किं वा भवेन्न तव पादरजोजुषां नः ॥ ५ ॥
आत्मा नि स्वामी प्रिय तू शरणागताला
     इच्छील ते पुराविता पद कोण त्यागी ।
गर्ती फसोनि विषया मग कोण इच्छी
     आम्ही पदास भजता न मिळेल काय ? ॥ ५ ॥

आश्रितानां सर्वार्थपदं - आश्रित जे भक्त त्यांचे सर्व हेतु पूर्ण करणारा - अखिलात्मदयितेश्वरं - अखिल विश्वाचा आत्मा व प्रियतम - सेवा करण्यास योग्य असणारा असा जो तू ईश्वर - तं त्वा - त्या तुझा - कः स्वकृतवित् विसृजेत नु ? - त्वदुपकार जाणणारा कोणता भक्त त्याग करील बरे ? - भूत्यै - भूत्यै म्हणजे सांसारिक उत्कर्ष प्राप्त करून घेण्यासाठी मात्र व - अनु विस्मृतये - अनु म्हणजे तो प्राप्त झाल्यानंतर विस्मृतये म्हणजे तुझे विस्मरण होण्यासाठी मात्र - कः वा किं अपि भजेत् ? - परमेश्वरा ! तुझी भक्ति कोणता बरे समंजस्य भक्त करील ? - तव पादरजोजुषां नः - तुझ्या पायाचे रज म्हणजे धूली, तिचे सेवन करणारे जे आम्ही त्या आम्हास - किं वा न भवेत् - कोणता बरे पुरुषार्थ साध्य होणार नाही ?. ॥५॥
हे प्रभो ! आपण सर्वांचे प्रियतम स्वामी आणि आत्मा आहात शरणागतांना सर्वस्व देणारे आहात आपण भक्तांसाठी जे केले, ते जाणणारा कोण बरे आपल्याला सोडील ? तसेच आपला विसर पाडणार्‍या विषयसुखांच्या मागे कोण लागेल ? आपल्या चरणकमलांच्या धुळीचे उपासक असणार्‍या आम्हांला दुर्लभ असे काय आहे बरे ? (५)


नैवोपयन्त्यपचितिं कवयस्तवेश
     ब्रह्मायुषापि कृतमृद्धमुदः स्मरन्तः ।
योऽन्तर्बहिस्तनुभृतां अशुभं विधुन्वन्
     आचार्यचैत्त्यवपुषा स्वगतिं व्यनक्ति ॥ ६ ॥
आत्मा रुपात हृदयीं गुरुरूपि बाह्य
     तू पाप ताप हरिशी अवतार घेशी ।
ब्रह्म्यास शक्य नच ते उतराय होणे
     तो आठवी उपकृता अन हर्ष पावे ॥ ६ ॥

ईश - विश्वस्वामिन - ब्रह्मायुषा अपि - ब्रह्मदेवाचे अति दीर्घ आयुष्य प्राप्त झालेले असले तरी - तव कृतं स्मरंतः ऋद्धमुदः कवयः - तुझे अनंत उपकार स्मरणारे व वृद्धींगत झालेल्या आनंदाचा उपभोग घेणारे जे उत्तमोत्तम ज्ञानी त्यांस - अपचितिं न एव उपयंती - तुझ्या उपकारांची फेड झाली, असे अनृणतव कधीच प्राप्त होत नाही - तनुभृतां - शरीरी जे तुझे भक्त त्यांची - अंतर्बहिः आचार्यचैत्यवपुषा - आचार्य म्हणजे गुरुरूपाने बाहेरील, आणि चैत्य म्हणजे अंतर्यामी रूपाने आतील, सारांश अंतर्बाह्य, - अशुभं विधुन्वन् - अशुभे-विषयवासना निरसून - यः स्वगतिं व्यनक्ति - त्याच अंतर्बाह्य गुरुचैत्यरूपाने आत्मरुप साक्षात्कृत करणारा जो तू - त्या तुझे उपकार फिटतच नाहीत. म्हणून भक्तांनी आत्मसर्वस्व तुलाच अर्पिले पाहिजे. ॥६॥
हे ईश्वरा ! आपण केलेल्या उपकारांचे स्मरण होऊन अधिकाधिक आनंदित होणारे आत्मज्ञानी ब्रह्मदेवाचे आयुष्य जरी त्यांना मिळाले, तरीसुद्धा ते आपल्या उपकारांची परतफेड करू शकणार नाहीत जे आपण मनुष्यांच्या अंतरंगात आत्मरूपाने आणि बाहेर आचार्यांच्या रूपाने राहून त्यांचे पाप नाहीसे करता व त्यांच्यापुढे स्वतःला प्रकट करता. (६)


श्रीशुक उवाच -
( मिश्र - १२ अक्षरी )
इत्युद्धवेनात्यनुरक्तचेतसा
     पृष्टो जगत्क्रीडनकः स्वशक्तिभिः ।
गृहीतमूर्तित्रय ईश्वरेश्वरो
     जगाद सप्रेममनोहरस्मितः ॥ ७ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
तो देव देवो मुळि कृष्ण एक
     ब्रह्मा शिवो नी हरि तोच होतो ।
हा ऐकता श्रश्नचि उद्धवाचा
     हसोनि बोले मग प्रेमभावे ॥ ७ ॥

अत्यनुरक्तचेतसा उद्धवेन इति पृष्टः - ईश्वरावर निरतिशय प्रेम करणारे ज्याचे चित्त त्या उद्धवाने ज्याला प्रश्नरूपी वरील विनंती केली - जगत्क्रीडनकः, - जो जगताची उत्पत्यादी कर्में करून लीला करणारा, - स्वशक्तिभिः - स्वतःच्या शक्तींनी म्हणजे सत्त्वदि गुणत्रयानेच - गृहीतमूर्तित्रयः, ईश्वरेश्वरः सः - जो ब्रह्मा, विष्णु, शंकर यांची स्वरूपे धारण करणारा तो ईश्वरेश्वर, देवांचाही देव श्रीकृष्ण - प्रेम-मनोहरस्मितः - प्रेमपूर्ण असल्यामुळे रमणीय असणारे हास्य करून - जगाद - बोलता झाला. ॥७॥
श्रीशुकदेव म्हणतात भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेव इत्यादी ईश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत तेच आपल्या शक्तींनी ब्रह्मदेव, विष्णू आणि रूद्र यांचे रूप धारण करून जगाची उत्पत्ती, स्थिती, लयरूप खेळ खेळतात उद्धवाने अत्यंत प्रेमाने भरलेल्या चित्ताने त्यांना असे विचारले, तेव्हा त्यांनी मोहक हसून मोठ्या प्रेमाने सांगण्यास प्रारंभ केला. (७)


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
हन्त ते कथयिष्यामि मम धर्मान् सुमङ्गलान् ।
याञ्छ्रद्धयाऽऽचरन् मर्त्यो मृत्युं जयति दुर्जयम् ॥ ८ ॥
श्री भगवान म्हणाले -
( अनुष्टुप )
आता मी सांगतो माझा धर्म जो की सुमंगल ।
श्रद्धेने आचरिता हा भवाचे भय ना उरे ॥ ८ ॥

हंत मम सुमंगलान् धर्मान् ते कथयिष्यामि - शाबास उद्धवा ! माझे मंगलकारी भागवतधर्म मी तुला सांगतो ऐक - यान् श्रद्धया आचरन् - ज्यांचे श्रद्धेने आचरण केले असता - दुर्जयं मृत्युं - दुर्जय जो मृत्यु त्याच्यावर - मर्त्यः जयति - मनुष्यास जय मिळतो. ॥८॥
श्रीभगवान म्हणाले छान ! मी तुला माझे अत्यंत मंगलमय धर्म सांगतो त्यांचे श्रद्धापूर्वक आचरण केल्याने मनुष्य जिंकण्यास अत्यंत कठीण अशा संसाररूप मृत्यूला सहज जिंकून घेतो. (८)


कुर्यात् सर्वाणि कर्माणि मदर्थं शनकैः स्मरन् ।
मय्यर्पितमनश्चित्तो मद्धर्मात्ममनोरतिः ॥ ९ ॥
भक्ताने सर्व ती कर्मे मज अर्पोनिया स्मरे ।
मद्रूप मन तैं होते आत्माही रमतो मसी ॥ ९ ॥

शनैकेः (मां) स्मरन् - दक्षतेने व सावधान मनाने माझे स्मरण ठेऊन - सर्वाणि कर्माणि मदर्थं कुर्यात् - यच्चयावत् सर्व कर्में मत्प्रीत्यर्थ करावी - मयि अर्पितमनश्चित्तः - माझ्या ठिकाणी मात्र संकल्पविकल्पात्मक मन व अनुसंधान ठेवणारे चित्त ही अर्पावी - मद्धर्मात्ममनोरतिः - मत्संबंधी धर्मामध्येच स्वतःचे मन रंगवावे. ॥९॥
मनुष्याने आपली सगळी कर्मे माझ्यासाठीच करावीत आणि ती करतेवेळी माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा त्यामुळे त्याचे मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्याचे मन व आत्मा माझ्याच धर्मांमध्ये रममाण होतील. (९)


देशान् पुण्यान् आश्रयेत मद्‍भक्तैः साधुभिः श्रितान् ।
देवासुरमनुष्येषु मद्‍भक्ताचरितानि च ॥ १० ॥
भक्त पवित्र ज्या स्थानी राहती राहणे तिथे ।
अनन्य वागती भक्त तसेचि वागणे पहा ॥ १० ॥

साधुभिः मद्भक्तैः श्रितान् - पुण्यकारी जे माझे भक्त त्यांनी अलंकृत झालेली - पुण्यान् देशान् आश्रयेत - जी पुण्यक्षेत्रे त्यांचे दर्शन घ्यावे, तेथे वास्तव्य करावे - देव-असुर-मनुष्येषु - देवांमध्ये, राक्षसांमध्ये, मनुष्यांमध्ये - मद्भक्ताचरितानि च (आश्रयेत) - जे माझे महाभक्त झाले, त्यांनी केलेल्या कर्मांचाही आश्रय करावा. ॥१०॥
साधुजन ज्या पवित्र ठिकाणी निवास करीत असतील तेथेच माझ्या भक्तजनांनी राहावे आणि देवता, असुर, किंवा मनुष्यांपैकी जे माझे भक्त असतील, त्यांच्या आचरणाचे अनुकरण करावे. (१०)


पृथक् सत्रेण वा मह्यं पर्वयात्रामहोत्सवान् ।
कारयेद् ‍गीत नृत्याद्यैः महाराजविभूतिभिः ॥ ११ ॥
पर्वाला मिळुनि वृंदीं अथवा एकटाहि तो ।
महाराजा अशा थाटे गावो नाचो महोत्सवी ॥ ११ ॥

पृथक्, सत्रेणा वा - प्रत्येकाने किंवा अनेकजण मिळून - गीतनृत्याद्यैः महाराजविभूतिभिः कारयेत् - मत्प्राप्त्यर्थ गीतनृत्यप्रभृति महाराजोपचारांनी - पर्वयात्रामहोत्सवान् - पर्वे, यात्रा व महोत्साहप्रसंगी - मह्यं - मला - (महापूजा बांधाव्या). ॥११॥
पर्वकाळ, यात्रा आणि महोत्सवांचे वेळी सर्वांबरोबर किंवा एकट्याने नृत्य, गायन, वाद्ये इत्यादींनी महाराजांना शोभून दिसतील, अशा थाटामाटात माझी यात्रा इत्यादी महोत्सव करावेत. (११)


मामेव सर्वभूतेषु बहिरन्तरपावृतम् ।
ईक्षेतात्मनि चात्मानं यथा खममलाशयः ॥ १२ ॥
मी एक सर्व प्राण्यात आत बाहेर पाहणे ।
पहावा हृदयी मीच आकाशी सर्व दाटला ॥ १२ ॥

सर्वभूतेषु बहिः अंतः - सर्व चराचरांस आत व बाहेर व्यापून - अपावृतं अमलाशयः मां एव ईक्षेत - मीच उघड एक स्पष्ट आहे असे चित्त शुद्ध झालेल्या भक्ताने पाहावे - च - आणि - आत्मनि आत्मानं - अंतरंगीही आत्मा मीच आहे, असे त्याने पाहावे - यथा खं - ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापी असते. ॥१२॥
अंतःकरण शुद्ध करून माणसाने आकाशासारख्या आतबाहेर परिपूर्ण तसेच आवरणशून्य अशा मलापरमात्म्यालाच सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही असल्याचे पाहावे. (१२)


इति सर्वाणि भूतानि मद्‍भावेन महाद्युते ।
सभाजयन् मन्यमानो ज्ञानं केवलमाश्रितः ॥ १३ ॥
ब्राह्मणे पुल्कसे स्तेने ब्रह्मण्येऽर्के स्फुलिङ्गके ।
अक्रूरे क्रूरके चैव समदृक् पण्डितो मतः ॥ १४ ॥
साधके सर्व प्राण्यात पदार्थीं पाहणे मला ।
माझेनि रूप मानोनी सत्कार तसा ॥ १३ ॥
द्विजचांडाळ वा चोर सूर्य वा ठिणगी तसे ।
कृपाळू क्रूर ही सर्व पाही जो सम ज्ञानि तो ॥ १४ ॥

महाद्युते - श्रेष्ठ ज्ञानी उद्धवा - इति - याप्रकारे - केवलं ज्ञानं आश्रितः - त्याची केवल ज्ञानदृष्टीच ज्ञानाचा आश्रय असल्यामुळे झाली म्हणून - मद्भावेन सर्वांणि भूतानि मन्यमानः - सर्व भूतांच्या ठिकाणी मला पाहणारा मद्भक्त - सभाजयन् - सर्व भूतांचा सत्कार करतो. ॥१३॥ ब्राह्मणे पुल्कसे, स्तेने ब्रह्मण्ये, अर्के - ब्राह्मण व अंत्यज, धनदाता व धनहर्ता, सूर्याप्रमाणे तेजस्वी दीर्घजीवी - स्फुलिंगके अक्रुरे क्रूरके च - व अग्निस्फुलिंगाप्रमाणे क्षणभंगुर, अक्रूर व क्रूर - एव समदृक् पंडितः मतः - या विषम असणार्‍यांस जो समतेने वागवितो तोच खरा पंडित म्हणजे आत्मवेत्ता होय. ॥१४॥
हे निर्मलबुद्धी उद्ववा ! जो फक्त ह्याच ज्ञानदृष्टीने सर्वांना माझेच स्वरूप मानून त्यांचा आदर करतो, त्याप्रमाणे ब्राह्मण व चांडाळ, चोर व ब्राह्मणभक्त, सूर्य व ठिणगी तसेच कृपाळू आणि क्रूर अशा सर्व ठिकाणी समान दृष्टी ठेवतो, त्यालाच खरा ज्ञानी समजले पाहिजे. (१३-१४)


नरेष्वभीक्ष्णं मद्‍भावं पुंसो भावयतोऽचिरात् ।
स्पर्धासूयातिरस्काराः साहङ्कारा वियन्ति हि ॥ १५ ॥
नर नारीत मी नित्य पाहता होड लोपते ।
ईर्षा द्वेष अहंकार पळती आदि दोष ते ॥ १५ ॥

अभीक्ष्णं नरेषु मद्भावं भावयतः पुंसः - वारंवार किंवा नित्य जो पुरुष इतरांमध्ये माझे स्वरूप पाहतो त्याचे - साहंकाराः स्पर्धा-असूया-तिरस्काराः - स्पर्धा, मत्सर, तिरस्कार इत्यादि सर्व दुष्ट विकार अहंकारसुद्धा - अचिरात् वियंति हि - वियंति म्हणजे लवकरच नष्ट होतात. ॥१५॥
जेव्हा अशा प्रकारे नेहमी सर्व स्त्रीपुरूषांचे ठिकाणी माझीच भावना केली जाते, तेव्हा थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तातील स्पर्धा, ईर्ष्या, तिरस्कार आणि अहंकार हे दोष नाहीसे होतात. (१५)


विसृज्य स्मयमानान् स्वान् दृशं व्रीडां च दैहिकीम् ।
प्रणमेद् दण्डवद् भूमौ अश्वचाण्डालगोखरम् ॥ १६ ॥
दुर्लक्षा हासती त्यांना लोकलज्जेस त्यागिणे ।
कुत्रा चांडाळ वा गाय गाढवा दंडवत नमा ॥ १६ ॥

स्मयमानान् स्वान् - उपहासक स्वकीय - च - आणि - दैहिकीं दृशं व्रीडां - देहदृष्टीने उत्पन्न होणारी लज्जा - विसृज्य - सोडून देऊन - भूमौ दंडवत् आश्वचांडालगोखरं प्रणमेत - कुत्रा, चांडाल, गाय, गाढव यांस म्हणजे सर्वांस साष्टांग नमस्कार घालावा. ॥१६॥
आपलेच लोक आपल्याला हसले, तरी तिकडे लक्ष न देता लोकलज्जा व देहदृष्टी सोडून कुत्रा, चांडाळ, गाय, गाढव इत्यादींना साष्टांग नमस्कार करावा. (१६)


यावर् सर्वेषु भूतेषु मद्‍भावो नोपजायते ।
तावदेवमुपासीत वाङ्‌मनःकायवृत्तिभिः ॥ १७ ॥
भगवद्‍भावना ऐशी माझी सर्वत्र होई तो ।
मन वाणी शरीराने संकल्पे मजला भजा ॥ १७ ॥

यावत् सर्वेषु भूतेषु मद्भावः न उपजायते - जोपर्यंत भूतमात्राचे ठायी माझे ईश्वररूपच आहे, अशी भावना उत्पन्न होत नाही - तावत् - तोपर्यंत - वाङ्‌मनःकायवृत्तिभिः एवं उपासीत - मद्भक्ताने आताच सांगितल्याप्रकारे वाणीने, मनाने व शरीराने उपासना चालू ठेवावी. ॥१७॥
जोपर्यंत सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझी भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे मन, वाणी आणि शरीराच्या सर्व कर्मांनी माझी उपासना करीत राहावे. (१७)


सर्वं ब्रह्मात्मकं तस्य विद्ययाऽऽत्ममनीषया ।
परिपश्यन् उपरमेत् सर्वतो मुक्तसंशयः ॥ १८ ॥
सर्व ब्रह्मात्मकी बुद्धी ध्याताचि ब्रह्मरूप हो ।
संदेह मिटतो सारा मग तो मुक्तची असे ॥ १८ ॥

तस्य आत्ममनीषया विद्यया - याप्रमाणे उपासना करणार्‍या भक्ताला सर्वत्र ईश्वर पाहण्याची जी विद्या प्राप्त होते, - सर्वं ब्रह्मात्मकं परिपश्यन् - त्या विद्येने सर्व ब्रह्ममय असे तो पाहू लागतो - मुक्तसंशयः सर्वतः उपमरेत् - निःसंदेह झाल्यानंतर त्याने उपरमावे म्हणजे कर्म संन्यास करावा. ॥१८॥
हे उद्धवा ! जेव्हा अशा प्रकारे सगळीकडे ईश्वरदृष्टी केली जाते, तेव्हा थोड्यात दिवसात त्याला ज्ञान होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागते अशी दृष्टी झाल्यावर सगळे संशय आपोआप नाहीसे होतात अशा प्रकारे माझा साक्षात्कार करून घेऊन तो संसारातून विरक्त होतो. (१८)


अयं हि सर्वकल्पानां सध्रीचीनो मतो मम ।
मद्‍भावः सर्वभूतेषु मनोवाक्कायवृत्तिभिः ॥ १९ ॥
साधने मम प्राप्तीची त्यात हे सर्व श्रेष्ठची ।
मन वाणी पदार्थात देह वृत्तीत मी पहा ॥ १९ ॥

सर्वभूतेषु मनो-वाक्-कायनिवृत्तिभिः मद्भावः - सर्व भूतांचे ठिकाणी मानसिक, वाचिक, व कायिक वृत्तींनी माझे स्वरूप पाहणे - अयं (कल्पः) - हा उपाय - सर्व कल्पांना - सर्व उपायांत - सध्रीचीनः हि - श्रेष्ठतर होय - मम मतः - असा माझा सिद्धांत आहे. ॥१९॥
माझ्या प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन मी हेच मानतो की, सर्व चराचरांत मन, वाणी व शरीराच्या सर्व वृत्तींनी माझीच भावना करावी. (१९)


न ह्यङ्गोपक्रमे ध्वंसो मद्धर्मस्योद्धवाण्वपि ।
मया व्यवसितः सम्यङ् निर्गुणत्वादनाशिषः ॥ २० ॥
हा माझा भागवद्धर्म न बाधा मुळि त्यात ये ।
निष्काम धर्म हा ऐसा मानितो निर्गुणीच मी ॥ २० ॥

अंग उद्धव ! - कारण, उद्धवा ! - अनाशिषः मद्धर्मस्य - मी स्थापिलेल्या निष्काम धर्मामध्ये - उपक्रमे अणु अपि ध्वंसः न हि - उपक्रमादि कसलेही ध्वंसात्मक वैगुण्य नाही - निर्गुणत्वात् मया सम्यक् व्यवसितः - निर्गुण जो मी त्यानेच हा धर्म उत्तम प्रतीच्या व्यवस्थेने निश्चित करून ठेवला आहे. ॥२०॥
हे उद्धवा ! या भागवतधर्माची एकदा सुरूवात केल्यानंतर कोणतेही विघ्न आले, तरी जराही उणीव राहात नाही कारण हा धर्म निष्काम व निर्गुण असल्यामुळे मी सर्वोत्तम ठरवला आहे. (२०)


यो यो मयि परे धर्मः कल्प्यते निष्फलाय चेत् ।
तदायासो निरर्थः स्याद् ‍भयादेरिव सत्तम ॥ २१ ॥
न त्रुटी त्यात की राही रडणे पडणे असे ।
मजला अर्पिता सर्व तोच धर्म घडे पहा ॥ २१ ॥

सत्तम ! भयादेः इव निरर्थः यः यः आयासः - भक्तश्रेष्ठ उद्धवा ! भयशोकासारखा जो जो निष्फल आयास - मयि परे निष्फलाय कल्प्यते चेत् - माझ्या ठिकाणी निष्काम बुद्धीने अर्पण केला तर - सः तदा - तो त्या वेळी - धर्मः स्यात् - धर्मस्वरूपच होतो. ॥२१॥
हे उद्धवा ! इतकेच काय, पण भय, शोक इत्यादींमुळे उत्पन्न होणारी पळणे, रडणे, अशी निरर्थक कामे सुद्धा निष्काम भावनेने मला परमात्म्याला समर्पित केली असता ती सुद्धा धर्म ठरतात. (२१)


एषा बुद्धिमतां बुद्धिः मनीषा च मनीषिणाम् ।
यत्सत्यमनृतेनेह मर्त्येनाप्नोति मामृतम् ॥ २२ ॥
कष्टाने ज्ञान ज्ञान्याचे चातुर्य चतुरे असे ।
लावावे नी विनाशी या देहाने सत्त्व जोडणे ॥ २२ ॥

इह - ह्या जगामध्ये - अनृतेन मर्त्येन - मिथ्या व विनाशी अशा मनुष्यशरीराच्या योगे - सत्यं अमृतं मा - सत्य व अविनाशी सुखरूप अशा माझी - यत् आप्नोति - जी प्राप्ती करून घेणे - एषा बुद्धिमतां बुद्धिं - हेच विवेकवंतांच्या विवेकाचे - मनीषिणां च मनीषा - व कुशलांच्या कौशल्याचे स्वरूप होय. ॥२२॥
असत्य आणि नाशिवंत शरीराने सत्य आणि अमृतस्वरूप अशा मला परमात्म्याला प्राप्त करून घेणे हाच बुद्धिमंतांचा विवेक आणि हेच आत्मज्ञान्यांचे ज्ञान होय. (२२)


एष तेऽभिहितः कृत्स्नो ब्रह्मवादस्य सङ्ग्रहः ।
समासव्यासविधिना देवानामपि दुर्गमः ॥ २३ ॥
संपूर्ण ब्रह्मविद्येचे सार मी वदलो तुम्हा ।
रहस्य कळणे याचे देवतानाहि दुर्लभ ॥ २३ ॥

एषः कृत्स्नः ब्रह्मवादस्य संग्रहः - हा कृत्स्र्नः =सर्व ब्रह्मवादाचा संग्रह - समासव्यासविधिना - संक्षेपतः व विस्तारशः या दोन्ही पद्धतीनी - ते अभिहितः - तुला सांगितला - देवानां अपि दुर्गमः - हा संग्रह देवांसही दुर्लभ आहे. ॥२३॥
ब्रह्मविद्येचे हे संपूर्ण रहस्य मी थोडक्यात तसेच विस्तारपूर्वक तुला सांगितले हे रहस्य देवतांना सुद्धा मिळणे अतिशय अवघड आहे. (२३)


अभीक्ष्णशस्ते गदितं ज्ञानं विस्पष्टयुक्तिमत् ।
एतद् विज्ञाय मुच्येत पुरुषो नष्टसंशयः ॥ २४ ॥
युक्तियुक्त असे ज्ञान वर्णिले मी पुनःपुन्हा ।
मर्म जाणोनिया गाठी तोडिता मुक्तता मिळे ॥ २४ ॥

विस्पष्टयुक्त्तिमत् - स्पष्ट व निःसंदिग्ध युक्तींनी परिपूर्ण असे - ज्ञानं ते अभीक्ष्णशः गदितं - लौकिक ज्ञान तुला वारंवार उपदेशिले आहे - एतत् विज्ञाय - याचे विज्ञान झाल्यावर - नष्टसंशयः पुरुषः मुच्येत - पुरुष निःसंदेह होऊन मुक्त होतो. ॥२४॥
ज्या सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध रीतीने ज्ञानाचे वर्णन मी वारंवार तुला सांगितले त्याचे मर्म जो जाणतो, त्याच्या अंतःकरणातील संशय नाहीसा होऊन तो मुक्त होतो. (२४)


सुविविक्तं तव प्रश्नं मयैतदपि धारयेत् ।
सनातनं ब्रह्मगुह्यं परं ब्रह्माधिगच्छति ॥ २५ ॥
उत्तरा बोललो पूर्ण आमुचे प्रश्न उत्तरे ।
विचारे धारिता सर्व वेदांचे ते रहस्यही ।
ब्रह्मसनातनो त्याला लाभते नच संशय ॥ २५ ॥

मया तव प्रश्नं सुविविक्तं - मी तुझ्या प्रश्नाचे जे सविस्तर उत्तर दिले - एतत् अपि धारयेत् - त्या या उत्तराचेच जो अनुसंधान ठेवील - सनातनं ब्रह्मगुह्यं - वेदांमध्येही रहस्यरूपाने असणार्‍या सनातन - परं ब्रह्म अधिगच्छति - परब्रह्माची प्राप्ति करून घेईल. ॥२५॥
तुझ्या प्रश्नांची मी चांगल्या रीतीने उत्तरे दिली जो ही प्रश्नोत्तरे विचारपूर्वक आत्मसात करील, तो वेदांचेही परम रहस्य असलेले सनातन परब्रह्म प्राप्त करून घेईल. (२५)


य एतन्मम भक्तेषु सम्प्रदद्यात् सुपुष्कलम् ।
तस्याहं ब्रह्मदायस्य ददाम्यात्मानमात्मना ॥ २६ ॥
माझ्या भक्तास हा धर्म जो देई समजावुनी ।
ज्ञान दात्यासि मी ऐशा माझेचि रूप देतसे ॥ २६ ॥

यः मम भक्तेषु - जो कोणी माझ्या भक्ताला - एतत् सुपुष्कलं संप्रदद्यात् - हे ज्ञानाचे प्रकरण उत्तम रीतीने समजून सांगेल - तस्य ब्रह्मदायस्य - त्या ब्रह्मज्ञानदात्याला - अहं - मी - आत्मानं आत्मना ददामि - स्वतःचा आत्मा देतो, मत्स्वरूप करतो. ॥२६॥
जो माझ्या भक्तांना हे चांगल्या रीतीने स्पष्ट करून सांगेल, त्या ज्ञानदात्याला मी माझे स्वरूपसुद्धा देऊन टाकतो. (२६)


य एतत् समधीयीत पवित्रं परमं शुचि ।
स पूयेताहरहर्मां ज्ञानदीपेन दर्शयन् ॥ २७ ॥
संवाद हा पवित्रोची दुजांना शुद्ध हा करी ।
दुजाला ज्ञानदीपो ह रोजची दाविता शुची ॥ २७ ॥

यः एतत् पवित्रं, परमं शुचि समधीयीत - जो कोणी या पवित्र आणि परम शुद्ध ज्ञानाचे मोठमोठयाने अध्ययन करील - सः अहः अहः ज्ञानदीपेन - तो प्रतिदिवशी ज्ञानरूप दीपाने - मां दर्शयन् पूयेत - माझे दर्शन घेणारा व इतरांसही त्या दर्शनाचा लाभ देणारा स्वतः परमशुद्ध होतो. ॥२७॥
उद्धवा ! जो आमचा हा परम पवित्र संवाद उत्तम रीतीने दररोज वाचील आणि दुसर्‍यांना या ज्ञानदीपाने माझे दर्शन घडवील तो पवित्र होईल. (२७)


य एतत् श्ररद्धया नित्यं अव्यग्रः श्रृणुयान्नरः ।
मयि भक्तिं परां कुर्वन् कर्मभिर्न स बध्यते ॥ २८ ॥
एकाग्र करुनी चित्त श्रद्धेने रोज ऐकता ।
पराभक्त तया लाभे कर्मबंधनही तुटे ॥ २८ ॥

यः नरः एतत् श्रद्धया - जो कोणी या ज्ञानाख्यानाचे श्रद्धेने - नित्यं अव्यग्रः शृणुयात् - नित्य स्थिर चित्ताने श्रवण करील - मयि परा भक्तिं कुर्वन् - माझ्या ठायी परमभक्ति ठेवणारा होऊन - सः कर्मभिः न बध्यते - त्याला कर्माचे बंधन मुळीच असत नाही. ॥२८॥
जो कोणी एकाग्र चित्ताने हे नित्य श्रद्धापूर्वक ऐकेल, त्याला माझी परमभक्ती प्राप्त होईल आणि तो कर्मबंधनातून मुक्त होईल. (२८)


अप्युद्धव त्वया ब्रह्म सखे समवधारितम् ।
अपि ते विगतो मोहः शोकश्चासौ मनोभवः ॥ २९ ॥
कळाले का तुला माझे ब्रह्मरूप सख्या प्रिया ।
चित्ताचा मोह नी शोक झाला का नष्ट तो तुझ्या ? ॥ २९ ॥

उद्धव सखे - परममित्रा उद्धवा - अपि त्वया ब्रह्म समवधारितं - तुला हे ब्रह्म व ब्रह्मज्ञान चांगले समजले आहे ना - अपि ते मनोभवः मोहः विगतः - तुझा मनोजन्य मोह सर्वस्वी गेला ना - असौ शोकः च - आणि तो शोकही नाहीसा झाला ना. ॥२९॥
प्रिय सखया ! ब्रह्माचे स्वरूप तू चांगल्या रीतीने समजून घेतलेस ना ! आणि तुझ्या चित्तातील मोह व शोक दूर झाले ना ? (२९)


नैतत्त्वया दाम्भिकाय नास्तिकाय शठाय च ।
अशुश्रूषोरभक्ताय दुर्विनीताय दीयताम् ॥ ३० ॥
अभक्ता उद्धटा तैसे दांभिका ठक नास्तिका ।
धर्म हा नच त्यां द्यावा अश्रद्धाला कधीच की ॥ ३० ॥

त्वया एतत् - तू हे - दांभिकाय, नास्तिकाय, शठाय - दांभिक, नास्तिक, शठ=लबाड - अशुश्रूषोः अभक्ताय - ऐकण्याची इच्छा नसणारे अभक्त व - दुर्विनीताय च न दीयताम् - उन्मत्त अशा लोकांस ज्ञानाचे आख्यान कधीही सांगू नये. ॥३०॥
हे ज्ञान तू दांभिक, नास्तिक, लबाड, श्रद्धा नसलेल्या, भक्तिहीन आणि उद्धट पुरूषाला कधीही सांगू नकोस. (३०)


एतैर्दोषैर्विहीनाय ब्रह्मण्याय प्रियाय च ।
साधवे शुचये ब्रूयाद् ‍भक्तिः स्यात् शूद्रयोषिताम् ॥ ३१ ॥
दोषरहित या ऐशा द्विजभक्ता नि प्रेमिका ।
शुद्ध चारित्र्य त्यालाची भागवद्धर्म हा वदा ॥
प्रेमीभक्त अशा शूद्रा स्त्रियांना उपदेशिणे ॥ ३१ ॥

एतैः दोषैः विहीनाय - हे दोष ज्यात नाहीत अशा - ब्रह्मण्याय प्रियाय च - वेदाभिमानी व मला प्रिय असणार्‍या - साधवे, शुचये ब्रूयात् - साधु व शुद्धवर्तनी पुरुषाला हे ज्ञानदान करावे - शूद्रेयोषितां भक्तिः स्यात् - तसेच शूद्र व स्त्रिया मजवर प्रेम करीत असतील तर त्यांसही हे ज्ञानदान करावे. ॥३१॥
जो या दोषांपासून मुक्त असेल, ब्राह्मणभक्त असेल, प्रेमळ असेल, साधू असेल आणि पवित्र आचरणाचा असेल, त्यालाच हा संवाद सांगावा माझ्याबद्दल भक्ती असणार्‍या स्त्रीशूद्रांनाही हे ज्ञान द्यावे. (३१)


नैतद् विज्ञाय जिज्ञासोः ज्ञातव्यं अवशिष्यते ।
पीत्वा पीयूषममृतं पातव्यं नावशिष्यते ॥ ३२ ॥
दिव्य अमृतपानाने न पिणे कांहि राहते ।
जिज्ञासूला तसे योगे जाणणे नच ते उरे ॥ ३२ ॥

एतत् विज्ञाय - हे ज्ञानाचे आख्यान समजल्यानंतर - जिज्ञासोः - ज्ञानेच्छु पुरुषाला - ज्ञातव्यं - जाणावयाचे असे - न अवशिष्यते - दुसरे काही शिल्लकच उरत नाही - पीयूषं अमृतं पीत्वा - गोड अमृताचे पान केल्यावर - पातव्यं न अवशिष्यते - पिण्याचे दुसरे काहीच उरत नाही. ॥३२॥
अमृतपान केल्यावर जसे काहीही पिण्यासारखे शिल्लक राहात नाही, त्याचप्रमाणे हे जाणून घेतल्यावर जिज्ञासूला आणखी काहीही जाणून घेण्याचे शिल्लक राहात नाही. (३२)


ज्ञाने कर्मणि योगे च वार्तायां दण्डधारणे ।
यावानर्थो नृणां तात तावांस्तेऽहं चतुर्विधः ॥ ३३ ॥
ज्ञान कर्म तसे योगे वाणिज्ये नृप दंडिता ।
मोक्ष धर्म तसे काम अर्थ हे फळ लाभते ॥
परी अनन्य भक्ताला सर्व ते फळ मीच की ॥ ३३ ॥

ज्ञाने, कर्मणि, योगे च, वार्तायां, दंडधारणे - ज्ञान, कर्म, योग वार्ता म्हणजे शेतकीव्यापारप्रभृति वृत्ति, दंडधारण=राजकारण, या सर्वांमध्ये - नृणां - पुरुषांस - यावान् अर्थः - जो जो अर्थ म्हणजे प्राप्तव्य असते - तात - उद्धवा - तावान् चतुर्विधः ते अहं - तो तो चारी प्रकारचा अर्थ मीच प्रत्यक्ष तुजजवळ आहे. ॥३३॥
प्रिय उद्धवा ! मनुष्याला ज्ञान, कर्म, योग, व्यापार आणि राजनीती यांपासून ज्या चतुर्विध पुरूषार्थांची प्राप्ती होते, ती सर्व तुझ्यासारख्या अनन्य भक्तांसाठी मीच आहे. (३३)


( मिश्र )
मर्त्यो यदा त्यक्तसमस्तकर्मा
     निवेदितात्मा विचिकीर्षितो मे ।
तदामृतत्वं प्रतिपद्यमानो
     मयाऽऽत्मभूयाय च कल्पते वै ॥ ३४ ॥
( इंद्रवज्रा )
समस्त कर्मा त्यजुनी मला जो
     आत्माहि अर्पी मज मान्य तो हो ।
जीवत्त्व सोडी अन मोक्ष दे मी
     तदाचि होतो मम रूप भक्त ॥ ३४ ॥

यदा त्यक्तसमस्तकर्मा - सर्व कर्माचा संन्यास करून - निवेदितात्मा - मला ज्याने आत्मसर्वस्व अर्पिले आहे अशा - मर्त्यः - मनुष्याला - मे - मी - विचिकीर्षितः - सर्वोत्कृष्ट स्थान प्राप्त करून देण्याचे त्याचे इच्छेनुरूप योजितो - तदा - तेव्हा - अमृतत्वं प्रतिपद्यमानः - मोक्षप्रवण असलेल्या त्या भक्ताला - मया आत्मभूयाय च वै कल्पते - मीच आपले स्वरूप, सायुज्यता, मुक्ति मिळविण्यास त्याला निश्चित रूपाने योग्य करतो. ॥३४॥
मनुष्य जेव्हा सगळी कर्मे टाकून फक्त मला शरण येतो तेव्हा तो मला अतिशय प्रिय होतो. (त्यावेळी त्याला काय देऊ आणि काय नको असे मला होते) मग मी त्याला अमृतत्त्व प्राप्त करून देतो आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. (३४)


श्रीशुक उवाच -
स एवमादर्शितयोगमार्गः
     तदोत्तमःश्लोकवचो निशम्य ।
बद्धाञ्जलिः प्रीत्युपरुद्धकण्ठो
     न किञ्चिदूचेऽश्रुपरिप्लुताक्षः ॥ ३५ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात-
हा योगमार्ग परिपूर्ण बोध
     त्या उद्धवाला मिळताच नेत्री ।
ते अश्रू आले अन कंठ दाटॆ
     जोडोनि हाता नच कांहि बोले ॥ ३५ ॥

एवं आदर्शितयोगमार्गः - या प्रमाणे दाखविला आहे योगमार्ग ज्याला असा - सः - तो उद्धव - तदा - त्यावेळी - उत्तमश्लोक कवचः निशम्य - उत्तम म्हणजे पुण्यकारक आहे श्लोक म्हणजे कीर्ती ज्याची अशा श्रीकृष्णाचे ते आत्मयोगसाधक भाषण ऐकून - बद्धांजलिः - बद्धांजलि होऊन - प्रीत्युपरुद्धकंठः - प्रेमाने भरून आला आहे कंठ ज्याचा असा - अश्रुपरिप्लुताक्षः - अश्रूंनी ओले चिंब झाले नेत्र ज्याचे असा - न किंचित् ऊचे - काही वेळ स्तब्ध झाला. ॥३५॥
श्रीशुक म्हणतात भगवान श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून ज्याला योगमार्ग कळला अशा उद्धवाचे डोळे अश्रूंनी भरून आले प्रेमावेगाने त्याचा गळा दाटून आला, हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला त्याच्याच्याने काहीही बोलवेना. (३५)


विष्टभ्य चित्तं प्रणयावघूर्णं
     धैर्येण राजन्बहुमन्यमानः ।
कृताञ्जलिः प्राह यदुप्रवीरं
     शीर्ष्णा स्पृशंस्तच्चरणारविन्दम् ॥ ३६ ॥
उचंबळे चित्तचि प्रेम भावे
     धैर्येचि रोधी स्वय नी पुन्हा तो ।
सौभाग्य मानी अन वंदि कृष्णा
     स्पर्शोनिया पाया स्तवि प्रार्थना ही ॥ ३६ ॥

राजन् - हे राजा - धैर्येण प्रणयावघूर्णं चित्तं विष्टभ्य - प्रेमातिशयाने क्षुब्ध झालेल्या चित्ताला धैर्याने विष्टभ्य म्हणजे शांत करून - बहुमन्यमानः - आपणाला कृतार्थ मानणारा उद्धव - शीर्ष्णा तच्चरणारविंदं स्पृशन् - मस्तकाने भगवंताच्या चरणाला स्पर्श करून - कृतांजलिः - हात जोडून - यदुप्रवीरं प्राह - यदुराणा जो कृष्ण त्याला म्हणाला. ॥३६॥
हे राजा ! प्रेमावेगाने द्रवलेले चित्त त्याने धैर्यपूर्वक आवरले स्वतःला अत्यंत भाग्यवान मानीत त्याने यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून प्रार्थना केली. (३६)


श्रीउद्धव उवाच -
विद्रावितो मोहमहान्धकारो
     य आश्रितो मे तव सन्निधानात् ।
विभावसोः किं नु समीपगस्य
     शीतं तमो भीः प्रभवन्त्यजाद्य ॥ ३७ ॥
उद्धवजी म्हणाले-
तू ब्रह्ममाया मुळ कारणो नी
     मी या भवाच्या तमि हिंडलो नी ।
तुझ्याचि संगे तम नाशला तो
     त्या अग्निपासी तम थंडि कैसी ? ॥ ३७ ॥

अजाद्य - अज जो ब्रह्मदेव त्याच्याही आद्या म्हणजे जनका - यः मे मोहमहांधकारः आश्रितः - ज्या मोहोत्पन्न महाअंधकाराला मी आश्रय दिला होता - तव सन्निधानात् विद्रावितः - तुझ्या स्वयंप्रकाशी समागमानेच पार नाहीसा झाला आहे - विभावसोः समीपगस्य शीतं, तमः, भीः, प्रभवंति किं नु ? - तेजःपूर्ण अग्नि सन्निध असणार्‍यास थंडी, अंधेर, भीति ह्या कशाने ?॥३७॥
उद्धव म्हणाला हे प्रभो, आपण माया व ब्रह्मदेव यांचेही मूळ कारण आहात मी ज्या महान मोहरूपी अंधारात सापडलो होतो, तो अंधार तुमच्या सान्निध्यात कुठल्या कुठे पळून गेला जो अग्नीजवळ जातो, त्याला थंडी, अंधार यांचे भय कोठून असणार ? (३७)


प्रत्यर्पितो मे भवतानुकम्पिना
     भृत्याय विज्ञानमयः प्रदीपः ।
हित्वा कृतज्ञस्तव पादमूलं
     कोऽन्यत् समीयाच्छरणं त्वदीयम् ॥ ३८ ॥
त्या मोहिनीने मम ज्ञान दीप
व् नेला परी तू दिधला कृपेने ।
महान बोधे मज बोधिले तू
     ऐशा पदाला मग कोण सोडी ॥ ३८ ॥

अनुकंपिना भवता - दयाघन जो तू त्या तू - भृत्याय मे - तुझ्या दासाला, मला - विज्ञानमयः प्रदीपः प्रत्यर्पितः - ज्ञानविज्ञानपूर्ण असा तेजस्वी दीप पुनः अर्पण केला - तव कृतज्ञः कः - तुझ्या उपकाराची जाणीव असणारा मी - त्वदीयं पादमूलं हित्वा - तुझे चरण सोडून - अन्यत् शरणं समीयात् - दुसर्‍याला शरण जाईन काय ?. ॥३८॥
दयाळू अशा आपण मलाआपल्या सेवकालाविज्ञानरूपी दिवा पुन्हा दिला आपले उपकार जाणणारा कोण बरे आपले चरणकमल सोडून दुसर्‍याला शरण जाईल ? (३८)


वृक्णश्च मे सुदृढः स्नेहपाशो
     दाशार्हवृष्ण्यन्धकसात्वतेषु ।
प्रसारितः सृष्टिविवृद्धये त्वया
     स्वमायया ह्यात्मसुबोधहेतिना ॥ ३९ ॥
दाशार्ह वृष्णी अन अंधको नी
     त्या सात्वता यादव या सवे त्या ।
मायेत होते मज बद्ध केले
     नी आज बोधे हरिल्यास ग्रंथी ॥ ३९ ॥

सृष्टिविवृद्धये - सृष्टीच्या वाढीसाठी - त्वया स्वमायया - तू आपल्या मायेला पुढे करून - दाशार्ह-वृष्णि-अंधक-सात्त्वतेषु - दाशार्ह, वृष्णि, अंधक, सात्त्वत या यादवकुलांसंबंधाने - सुदृढः प्रसारितः मे स्नेहपाशः - सुटण्यास कठीण आणि फार पसरलेला माझ्या अंतःकरणात मायापाश होता तो - आत्मसुबोधहेतिना हि वृक्णः च - तुझ्या उत्तम व तीक्ष्ण आत्मज्ञानरूपी खड्‌गाने छिन्नविच्छिन्न केला आहे. ॥३९॥
आपणच आपल्या मायेने सृष्टीची वृद्धी करण्यासाठी मला अगोदर दाशार्ह, वृष्णी, अंधक आणि सात्वतवंशी यादवांशी दृढ स्नेहपाशांनी बांधले होते आणि आज आपणच आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीने ते पाश तोडून टाकलेत. (३९)


( अनुष्टुप् )
नमोऽस्तु ते महायोगिन् प्रपन्नमनुशाधि माम् ।
यथा त्वच्चरणाम्भोजे रतिः स्यादनपायिनी ॥ ४० ॥
( अनुष्टुप )
महायोगेश्वरा कृष्णा तुजला प्रणिपात हा ।
आज्ञापा मजला ऐसे अनन्य भक्ति जैं मिळे ॥ ४० ॥

ते नमः अस्तु - तुला प्रणिपात करतो - महायोगिन् - योगेश्वरा - यथा त्वच्चरणांभोजे अनपायिनी (मे) रतिः स्यात् - तुझ्या चरणकमलाचे ठिकाणी माझे प्रेम अखंड राहील असा - प्रपन्नं मां अनुशाधि - शरण आलेल्या मला बोध कर. ॥४०॥
हे महायोगेश्वरा ! मी आपणांस नमस्कार करतो आता आपण शरण आलेल्या माझ्यावर अशी कृपा करा की, ज्यायोगे आपल्या चरणकमलांवर माझी अनन्य भक्ती कायम राहील. (४०)


श्रीभगवानुवाच -
गच्छोद्धव मयाऽऽदिष्टो बदर्याख्यं ममाश्रमम् ।
तत्र मत्पादतीर्थोदे स्नानोपस्पर्शनैः शुचिः ॥ ४१ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले-
आता माझ्याच आज्ञेने बद्रिकाश्रमि जा मम ।
गंगाजळे तिथे न्हाता प्राशिता शुद्ध हो तिथे ॥ ४१ ॥

उद्धव - उद्धवा - मया आदिष्टः मम बदर्याख्यं आश्रमं गच्छ - माझ्या आज्ञेने माझा बद्रिकाश्रम आहे तेथे जा - तत्र - तेथे - मत्पादतीर्थोदि - माझ्या चरणापासून उत्पन्न झालेल्या पवित्र गंगोदकात - स्नान-उपस्पर्शनैः शुचि - स्नान व आचमने करून शुद्ध हो. ॥४१॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा ! माझ्या आज्ञेने तू आता माझ्या बदरिकाश्रमामध्ये जा तेथे माझ्या चरणकमलांचे तीर्थ असलेल्या अलकनंदेचे स्नानपान केले असता तू पवित्र होशील. (४१)


ईक्षयालकनन्दाया विधूताशेषकल्मषः ।
वसानो वल्कलान्यङ्ग वन्यभुक्सुखनिःस्पृहः ॥ ४२ ॥
नष्टेल पाप नी ताप लेवोनी वल्कले तिथे ।
भक्षावी कंद मूळे नी निवृत्त धुंद राहणे ॥ ४२ ॥

अलकनंदायाः ईक्षया - अलकनंदा नामक जी गंगा तिच्या दर्शनाने - विधूत अशेष-कल्मषः - धुवून गेले आहे सर्व अज्ञानरूपी पाप असा - वल्कलानि वसानः - वल्कले नेसणारा - अंग - उद्धवा - वन्यभुक् - वनातील फळे, मुळे मात्र खाणारा - सुखनिःस्पृहः - विषयसुखाविषयी विरक्त होऊन स्वस्थ ऐस. ॥४२॥
अलकनंदेच्या दर्शनाने तुझे सारे पाप नाहीसे होईल उद्धवा ! तू तेथे वल्कले नेस, वनातील कंदमुळे, फळे खा आणि कोणतीही अपेक्षा न करता, आत्मानंदात राहा. (४२)


तितिक्षुः द्वन्द्वमात्राणां सुशीलः संयतेन्द्रियः ।
शान्तः समाहितधिया ज्ञानविज्ञानसंयुतः ॥ ४३ ॥
साहिणे सुख दुःखांना सौ‍म्य नी संयतेंद्रिय ।
मम या स्वरूपी शांत डुंबोनी मोद पावणे ॥ ४३ ॥

द्वंद्वमात्राणां तितिक्षुः - शीतोष्णादिकांसंबंधी सहनशील - सुशीलः संयतेंद्रियः - सात्त्विक स्वभावाचा, इंद्रियसंयमी, - समाहितधिया शांतः ज्ञानविज्ञानसंयुतः - समस्वरूप झालेल्या बुद्धीमुळे शांत आणि शास्त्रीय ज्ञानाचा अपरोक्ष साक्षात्कार झालेला. ॥४३॥
थंडीऊन, सुखदुःख इत्यादी द्वंद्वे सहन कर सदाचरणाने इंद्रिये ताब्यात ठेव चित्त शांत व बुद्धी स्थिर ठेव आणि माझे स्वरूपज्ञान आणि अनुभव यात डुंबत राहा. (४३)


मत्तोऽनुशिक्षितं यत्ते विविक्तमनुभावयन् ।
मय्यावेशितवाक्‌चित्तो मद्धर्मनिरतो भव ।
अतिव्रज्य गतीस्तिस्रो मामेष्यसि ततः परम् ॥ ४४ ॥
बोध मी दिधला जो हा एकांती अनुभावणे ।
वाणी चित्त मला लावी भागवद्धर्माची रमा ॥
निर्गुणा पावशी तेणे परमार्थचि तो मिळे ॥ ४४ ॥

मत्तः यत् ते अनुशिक्षितं - मी जो उपदेश केला आहे त्याला - विविक्तं अनुभावयन् - सुविचाराने मननपूर्वक निदिध्यासून व अनुभवून - मयि आवेशितवाक्‌चित्तः - माझ्या ठायी अर्पित केली आहेत वाणी व चित्त असा - मद्धर्मनिरतः भव - माझ्या भागवतधर्मांमध्ये रममाण हो - तिस्रः गतीः आतव्रज्य - तीन गुणांच्या अतीत होऊन - ततः परं मां एष्यसि - मायेपलीकडील माझ्या स्वरूपाला येऊन मिळशील. ॥४४॥
मी तुला जो उपदेश केला, त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा आपली वाणी आणि चित्त माझे ठिकाणी स्थिर कर आणि मी सांगितलेल्या भागवत धर्मांमध्ये रममाण हो शेवटी तू त्रिगुणांमुळे मिळणार्‍या गती पार करून त्यांच्याही पलीकडे असणार्‍या मला मिळशील. (४४)


श्रीशुक उवाच -
( मिश्र )
स एवमुक्तो हरिमेधसोद्धवः
     प्रदक्षिणं तं परिसृत्य पादयोः ।
शिरो निधायाश्रुकलाभिरार्द्रधीः
     न्यषिञ्चदद्वन्द्वपरोऽप्यपक्रमे ॥ ४५ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( इंद्रवज्रा )
श्री उद्धवे ते मग मुक्त होता
     प्रदक्षणोनी हरिपाद वंदी ।
निर्द्वंद्व झाले पद स्पर्शिता ते
     नी आसवांनी धुतले पदाला ॥ ४५ ॥

हरिमेधसा एवं उक्तः - ज्याचे ठिकाणी जडलेली बुद्धि संसाराचे हरण करिते त्या कृष्णाने असे सांगितल्यावर - सः उद्धवः - तो उद्धव - तं प्रदक्षिणं परिसृत्य - त्याला प्रदक्षिणापूर्वक - पादयोः शिरः निधाय - पायावर मस्तक ठेऊन - अश्रुकलाभिः न्यषिंचत् - अश्रुधारांनी कृष्णचरण भिजविता झाला - अद्वंद्वपरः अपि - तो द्वंद्वातीत, अद्वैतपूर्ण झाला होता तरी - अपक्रमे आर्द्रधीः - निघताना त्याला प्रेमळ हरीचा वियोग होणार म्हणून भडभडून आले. ॥४५॥
श्रीशुक म्हणतात - ज्यांचे ज्ञान संसारभ्रम दूर करते, त्या श्रीकृष्णांनी उद्धवाला असा उपदेश केला, तेव्हा त्याने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले भगवंतांच्या उपदेशाने त्याचे सुखदुःखादी द्वंद्व नाहीसे झाले होते असे असूनही तेथून जातेवेळी त्याचे हृदय प्रेमाने भरून आले त्यामुळे आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांतून वाहाणार्‍या अश्रुधारांनी त्याने भगवंतांचे चरणकमल भिजवून टाकले. (४५)


सुदुस्त्यजस्नेहवियोगकातरो
     न शक्नुवंस्तं परिहातुमातुरः ।
कृच्छ्रं ययौ मूर्धनि भर्तृपादुके
     बिभ्रन् नमस्कृत्य ययौ पुनः पुनः ॥ ४६ ॥
दुस्त्यज्य स्नेहे तनु कंपली नी
     न सोडवे ते पद श्रीहरीचे ।
मूर्च्छीत झाले पदपादुकांशी
     प्रस्थान केले नमुनीहि कृष्णां ॥ ४६ ॥

सुदुस्त्यजस्नेहवियोग-कातरः - सोडण्यास कठीण अशा परमोत्कृष्ट स्नेहाला अंतरणार, हे मनात येऊन भ्यालेला उद्धव - आतुरः तं परिहातुं न शकुवन् - विव्हल झाल्यामुळे कृष्णापासून दूर जाण्याला समर्थ झाला नाही - कृच्छरं ययौ - कष्टी झालेला - भर्तृपादुके मूर्धनि बिभ्रत् - श्रीकृष्णाच्या पादुका मस्तकी घेऊन - पुनः पुनः नमस्कृत्य - पुनः पुनः नमस्कार करून - ययौ - जाता झाला. ॥४६॥
ज्यांच्यावरील प्रेम सोडणे अत्यंत कठीण, अशा भगवंतांना सोडून जाण्याच्या कल्पनेने व्याकूळ झालेला उद्वव त्यांना सोडू शकत नव्हता तरीही त्यांच्या आज्ञेमुळे त्याला अत्यंत जड अंतःकरणाने जावे लागले, जाताना त्याने भगवंतांच्या चरणपादूका आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि त्यांना वारंवार प्रणाम करीत तो तेथून निघाला. (४६)


ततस्तमन्तर्हुदि सन्निवेश्य
     गतो महाभागवतो विशालाम् ।
यथोपदिष्टां जगदेकबन्धुना
     तपः समास्थाय हरेरगाद् ‍गतिम् ॥ ४७ ॥
ती दिव्य ज्योती हृदयी धरोनी
व् तपास आले बदरीवनासी ।
तो एक मात्रोचि हितैशि कृष्ण
     बोधानुसारे गति लाभली त्यां ॥ ४७ ॥

ततः तं अंतर्हृदि संनिवेश्य - मग त्या कृष्णाच्या मूर्तीची अंतःकरणात स्थापना करून - महाभागवतः विशालां गतः - तो महाभगवद्भक्त उद्धव विशालानामक बदरिकाश्रमाला गेला - ततः - तदनंतर - जगदेकबंधुना यथोपदिष्टां - लोकबंधु जो कृष्ण त्याने उपदेश केल्याप्रमाणे - (गतिं) समास्थाय - गति म्हणजे कृष्णपद्धति उत्तम रीतीने पाळून - हरेः गतिं अगात् - हरीच्या स्वरूपाला गेला, मुक्त झाला. ॥४७॥
भगवंतांचा परमप्रेमी भक्त उद्धव, हृदयामध्ये त्यांना धारण करून बदरिकाश्रमात पोहोचला आणि तेथे त्याने जगताचे एकमेव बंधू भगवान श्रीकृष्ण यांच्या उपदेशानुसार तपोमय जीवन व्यतीत करून त्यांचे स्वरूप प्राप्त करून घेतले. (४७)


य एतद् आनन्दसमुद्रसम्भृतं
     ज्ञानामृतं भागवताय भाषितम् ।
कृष्णेन योगेश्वरसेविताङ्‌घ्रिणा
     सच्छ्रद्धयाऽऽसेव्य जगद्विमुच्यते ॥ ४८ ॥
श्रीशंकरादी हरि सेवितात
     त्या श्रीहरीने निज बोध केला ।
महोदधी ज्ञानचि सार हा तो
व् यां सेविता मुक्तचि विश्व होते ॥ ४८ ॥

योगेश्वरसेवितांघ्रिणा कृष्णेन - योगेश्वर जे ब्रह्मदेवादि त्यांनी सेविले जातात चरण ज्या कृष्णाचे त्याने - भागवताय - भागवताला म्हणजे उद्धवाला - भाषितं - सांगितलेले - आनंदसमुद्रसंभृतं - आनंदसागराने तुडुंब भरलेले - एतत् ज्ञानामृतं - हे ज्ञानरूपी अमृत - सच्छ्‌रद्धया - पूर्ण श्रद्धेने - आसेव्य - सेवन करणारा - यः - जो भक्त - (सः) विमुच्यते - तो मुक्त होतो - जगत् - त्या भागवताच्या समागमाने विश्व सुद्धा मुक्त होते. ॥४८॥
योगेश्वरसुद्धा ज्यांच्या चरणांच्या सेवेत रत असतात, अशा श्रीकृष्णांनी भगवद्‌भक्त उद्धवाला आनंदसागराचे सार असे हे ज्ञानामृत सांगितले जो श्रद्धेने याचे थोडेसेही सेवन करतो, तो तर मुक्त होतोच शिवाय त्याच्या संगतीने सगळे जग मुक्त होते. (४८)


( मालिनी )
भवभयमपहन्तुं ज्ञानविज्ञानसारं
     निगमकृद् उपजह्रे भृङ्गवद् वेदसारम् ।
अमृतमुदधितश्चा पाययद् भृत्यवर्गान्
     पुरुषं ऋषभमाद्यं कृष्णसंज्ञं नतोऽस्मि ॥ ४९ ॥
( मालिनी )
मधुकर मधु जैसा पुष्पसारोचि घेई
     भवभय हरण्याते तैं हरी बोध देई ।
अमरस स्व भक्ता पीववी मंथनाचे
     पुरुषचि हरि कृष्णो सारविश्वा नमी मी ॥ ४९ ॥

भवभयं अपहंतुं - भवाचे भय नष्ट करण्यासाठी - निगमकृत् - वेदकर्ता जो भगवान् त्याने - भृंगवत् - भ्रमराच्या कौशल्याने - वेदसारं ज्ञानविज्ञानसारं - वेदाचे सार असे ज्ञानासह विज्ञान - उपजह्रे - उद्धृत केले - उदधितः अमृतं - समुद्रातून अमृत काढले - च - आणि - भृत्यवर्गान् अपाययत् - सेवकवर्गास पाजिले - पुरुषं आद्यं ऋषभं कृष्णसंज्ञं - त्या आद्य कृष्णनामक पुरुषोत्तमाला - नतः अस्मि - मी नमस्कार करतो. ॥४९॥
भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचे सार असलेल्या मध एकत्र करतो, त्याप्रमाणे वेद प्रगट करणार्‍या श्रीकृष्णांनी भक्तांना संसारातून मुक्त करण्यासाठी, हे वेदांचे सार असणारे श्रेष्ठ ज्ञानविज्ञान साररूपाने सांगितले तसेच समुद्रातून अमृत काढून जरारोगादी भय दूर करण्यासाठी ते भक्तांना पाजले अशा श्रीकृष्ण नाव असणार्‍या श्रेष्ठ आदिपुरूषांना मी नमस्कार करतो. (४९)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे एकोनत्रिंशोऽध्यायः ॥ २९ ॥
अध्याय एकोणतिसावा समाप्त

GO TOP