श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
सप्तविंशोऽध्यायः

सांख्यक्रियायोग वर्णनम् -

क्रियायोगाचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीउद्धव उवाच -
( अनुष्टुप् )
क्रियायोगं समाचक्ष्व भवदाराधनं प्रभो ।
यस्मात्त्वां ये यथार्चन्ति सात्वताः सात्वतर्षभ ॥ १ ॥
उद्धवजीने विचारिले -
( अनुष्टुप )
क्रियायोगे कुणी भक्त पूजिती काय कारणे ।
क्रियायोग पुजा सांगा कृपया भक्तवत्सला ॥ १ ॥

प्रभो भवदाराघनं क्रियायोगं - भगवंता ! तुझे आराधन साध्य करण्याचा क्रियायोग - समाचक्ष्व - मला साद्यंत सांग - सात्वतर्षभ - हे यादवश्रेष्ठा - यस्मात्, यथा- कोणत्या कारणास्तव व कोणत्या प्रकारे - ये सात्त्वताः - जे तुझे अधिकारी भक्त ते - त्वा अर्चंति - तुझी पूजाअर्चा करतात - ॥१॥
उद्धव म्हणाला - हे भक्तवत्सल श्रीकृष्णा ! जे भक्तजन, ज्या प्रकारे, ज्या उद्देशाने, आपली पूजा अर्चा करतात, तो आपल्या आराधनेचा क्रियायोग आपण मला सांगा. (१)


एतद् वदन्ति मुनयो मुहुर्निःश्रेयसं नृणाम् ।
नारदो भगवान् व्यास आचार्योऽग्‌गिरसः सुतः ॥ २ ॥
नारदो भगवान व्यास आचार्य अंगिरासुत ।
वदती साधना भद्र क्रियायोग पुनःपुन्हा ॥ २ ॥

नारदः, भगवान् व्यासः, अंगिरसः, सुतः आचार्यः - देवर्षी नारद, भगवान सर्वज्ञ व्यास, अंगिरस-सुत बृहस्पति आचार्य - मुनयः - हे सर्व मुनि - मुहुः वदंति - वारंवार सांगतात की - नृणां एतत् निःश्रेयसं - जीवांस हेच तुझे आराधन परमकल्याणकारक आहे - ॥२॥
देवर्षी नारद, भगवान व्यास आणि आचार्य बृहस्पती इत्यादी मुनी वारंवार हे मनुष्याच्या परम कल्याणाचे साधन आहे, असे सांगतात. (२)


निःसृतं ते मुखाम्भोजाद् यदाह भगवानजः ।
पुत्रेभ्यो भृगुमुख्येभ्यो देव्यै च भगवान् भवः ॥ ३ ॥
आपुल्याचि मुखातून क्रियायोगहि पातला ।
ब्रह्म्याने भृगु आदींना शंकरे बोधिली उमा ॥ ३ ॥

भृगमुख्येभ्यः पुत्रेभ्यः - भृगुप्रमुख पुत्रांस - भगवान् अजः यत् आह - श्रीभगवान ब्रह्मदेव जे सांगता झाला - च - आणि - भगवान् भवः देव्यै (आह) - श्रेष्ठ भगवान श्रीशंकर पार्वती देवीस जे उपदेशिता झाला - (तत्) ते मुखांबुजात् निःसृतं - ते सर्व तुझ्या मुखकमलापासूनच प्रकट झाले आहे - ॥३॥
सर्वप्रथम आपल्याच मुखारविंदातून बाहेर पडलेला हा क्रियायोग ब्रह्मदेवांनी भृग इत्यादी पुत्रांना आणि भगवान शंकरांनी पार्वतीदेवीला सांगितला होता. (३)


एतद् वै सर्ववर्णानां आश्रमाणां च सम्मतम् ।
श्रेयसामुत्तमं मन्ये स्त्रीशूद्राणां च मानद ॥ ४ ॥
चारी वर्णाश्रमी यांना क्रियायोगाचे भद्र तो ।
स्त्रिया शद्रादिकांनाही श्रेष्ठ साधन हे असे ॥ ४ ॥

मानद - हे सज्जनवृंदमान्य देवा - सर्ववर्णानां आश्रमाणां च स्त्रीशूद्राणां च संमतं एतत् - ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य, चारी आश्रमांतील साधक व स्त्री-शूद्र या सर्वांस तुझे भक्त्यमृत सेवन - श्रेयसां उत्तमं मन्ये वै - मोक्ष देणार्‍या साधनांत उत्तमोत्तम साधन आहे असे मला निश्चयपूर्वक वाटते - ॥४॥
हे मर्यादारक्षक प्रभो ! हाच क्रियायोग सर्व वर्ण आणि सर्व आश्रमांच्यासाठी उपयुक्त असून परम कल्याणकारी आहे, असे मी समजतो किंबहुना स्त्रीशूद्रांसाठी सुद्धा हाच सर्वश्रेष्ठ उपाय असावा. (४)


एतत्कमलपत्राक्ष कर्मबन्धविमोचनम् ।
भक्ताय चानुरक्ताय ब्रूहि विश्वेश्वरेश्वर ॥ ५ ॥
देवाधिदेव तू ईश प्रेमी भक्त पदास मी ।
कर्म बंधन त्यागार्थ कृपया विधि सांगणे ॥ ५ ॥

कमलपत्राक्ष - हे कमलनेत्रा - विश्वेश्वरेश्वर - सर्वविश्वनियामक देवाधिदेवा - कर्मबंधविमोचनं एतत् - कर्मबंधाचा निरास करणारे हे तुझे आराधनारूपी कर्म - भक्ताय च अनुरक्ताय ब्रूहि - तुझा निःसीम भक्त व तुजवर अनुरक्त अशा मला कृपा करून सांग - ॥५॥
हे कमलनयन श्यामसुंदरा ! आपण शंकर इत्यादी जगदीश्वरांचेसुद्धा ईश्वर आहात आणि मी आपलाच प्रेमी भक्त आहे म्हणून कर्मबंधनातून मुक्त करणारा हा विधी आपण मला सांगावा. (५)


श्रीभगवानुवाच -
न ह्यन्तोऽनन्तपारस्य कर्मकाण्डस्य चोद्धव ।
सङ्‌क्षिप्तं वर्णयिष्यामि यथावदनुपूर्वशः ॥ ६ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात-
विस्तार कर्मकांडांचा एवढा नच त्या सिमा ।
म्हणोनी थोडक्यामाजी क्रामाने विधि सांगतो ॥ ६ ॥

उद्धव - उद्धवा - अनंतपारस्य कर्मकांडस्य च हि अंतः न - हे मत्पूजारूपी कर्मकांड अनंत व अपार आहे - अनुपूर्वशः - अनुक्रम धरून - यथावत् - यथास्थित रीतीने - संक्षिप्तं वर्णयिष्यामि - सार तेच तुला वर्णन करून सांगतो - ॥६॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - उद्धवा ! कर्मकांडांच्या विस्ताराला काही मर्यादाच नाही म्हणून मी थोडक्यात पहिल्यापासून याचे वर्णन करतो. (६)


वैदिकस्तान्त्रिको मिश्र इति मे त्रिविधो मखः ।
त्रयाणामीप्सितेनैव विधिना मां समर्चरेत् ॥ ७ ॥
वैदीक तंत्र नी मिश्र पूजा ती त्रिविधा अशी ।
भक्ता जी आवडे पूजा तियेने पूजिणे मला ॥ ७ ॥

वैदिकः, - वेदमंत्रोक्त, -तांत्रिकः, मिश्रः इति - तंत्रोक्त म्हणजे आगमोक्त आणि वेद आणि तंत्र मिळून एक -मे मखः त्रिविधः - असे माझ्या पूजनरूपी यज्ञाचे तीन प्रकार आहेत - त्रयाणां ईप्सितेन विधिना एव - या तीन प्रकारांतील जो आवडेल, त्या प्रकारानेच - मां समर्चयेत् - माझी पूजा अर्चा करावी - ॥७॥
वैदिक, तांत्रिक आणि मिश्र असे माझ्या पूजेचे तीन विधी आहेत या तिन्हीपैंकी जो अनुकूल वाटेल, त्या विधीने भक्ताने माझी आराधना करावी. (७)


यदा स्वनिगमेनोक्तं द्विजत्वं प्राप्य पूरुषः ।
यथा यजेत मां भक्त्या श्रद्धया तन्निबोध मे ॥ ८ ॥
विधिने समयी घ्यावे पुरुषे ते द्विजत्त्व नी ।
श्रद्धेने मजला पूजो तयाचा विधी सांगतो ॥ ८ ॥

यदा स्वनिगमेन उक्तं - ज्याच्या वंशात रुढ असणार्‍या वैदिक संस्काराने म्हणजे विहित उपनयानाने उक्त असे - पूरुषः - पुरुषाला - द्विजत्वं - द्विजत्व - प्राप्य - मिळते त्या काळी - श्रद्धया, भक्त्या, यथा मां यजेत - श्रद्धापूर्ण भक्तीने ज्या पद्धतीने माझे अर्चन-भजन करावे - तत् - ती पद्धति - मे निबोध - मी सांगतो ऐक - ॥८॥
माणसाने आपल्या अधिकारानुसार सर्वप्रथम शास्त्रोक्तविधीने द्विजत्व प्राप्त करून घ्यावे नंतर श्रद्धा आणि भक्तीने युक्त होऊन कोणत्या प्रकारे माझी पूजा करावी, ते तू माझ्याकडून समजून घे. (८)


अर्चायां स्थण्डिलेऽग्नौ वा सूर्ये वाप्सु हृदि द्विजः ।
द्रव्येण भक्तियुक्तोऽर्चेत् स्वगुरुं माममायया ॥ ९ ॥
पिता वा गुरुपती मी पूजावे विधिने पहा ।
सूर्याग्नि जल वा मूर्ती वा वेद द्विज वा हृदीं ॥ ९ ॥

अचार्या, स्थंडिले, अग्नौ, वा सूर्ये, वा अप्सु हृदि, द्विजे - मूर्ति, यज्ञकुंड, अग्नि, सूर्य, जल, हृदय आणि ब्राह्मण यांचे ठिकाणी - द्रव्येण - प्राप्त द्रव्याने - स्वगुरुं मां - प्रत्येकाचा उद्धारकर्ता जो मी गुरु त्या माझे - अमायया - कोणत्याही कपट अथवा शाठय न करिता - भक्तियुक्तः अर्चेत् - भक्तिपूर्वक आराधन करावे - ॥९॥
भक्तिपूर्वक, निष्कपट भावाने आपला पिता आणि गुरूरूप अशा माझी पूजासामग्रीने मूर्ती, वेदी, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय किंवा ब्राह्मण या ठिकाणी भावना व्यक्त करून आराधना करावी. (९)


पूर्वं स्नानं प्रकुर्वीत धौतदन्तोऽङ्गशुद्धये ।
उभयैरपि च स्नानं मन्त्रैर्मृद् ग्रहणादिना ॥ १० ॥
प्रातःकाळी उठोनीया मुखमार्जन स्नान नी ।
मंत्राने भस्म नी माती लेपोनी स्नान ते करा ॥ १० ॥

अंगशुद्ध्ये - शरीराची शुद्धि व्हावी म्हणून - धौतदंतः पूर्वं स्नानं प्रकुर्वीत - दात घासून मग प्रथमतः भक्तीने स्नान करावे - मृद्‌ग्रहणादिना उभयैः अपि मंत्रैः च स्नानं - स्नानप्रसंगी मृत्तिका, भस्म इत्यादि शुद्धिकर द्रव्यांचा उपयोग करून वैदिक आणि तांत्रिक दोन्ही मंत्र म्हणावे - ॥१०॥
उपासकाने सकाळी दात घासून शरीरशुद्धीसाठी अगोदर स्नान करावे आणि नंतर वैदिक व तांत्रिक मंत्रांनी माती, भस्म इत्यादी लावून पुन्हा स्नान करावे. (१०)


सन्ध्योपास्त्यादिकर्माणि वेदेनाचोदितानि मे ।
पूजां तैः कल्पयेत् सम्यक् सङ्कल्पः कर्मपावनीम् ॥ ११ ॥
संध्यावदन संकल्पे नित्य कर्म पुन्हा करो ।
वैदिकी तंत्र मंत्राने पवित्र मजला पुजा ॥ ११ ॥

वेदेन आचोदितानि - वेदविहित अथवा वेदतंत्रविहित - संध्योपास्त्यादिकर्माणि - जी संध्या ब्रह्मयज्ञ इत्यादि नित्यकर्मे आहेत - तैः - त्यांच्यासह - सम्यक्संकल्पः - उत्तम संकल्प करून - कर्मपावनीं मे पूजां कल्पयेत् - कर्मबंध नष्ट करून चित्तशुद्धि करणारी माझी पूजा करावी - ॥११॥
यानंतर वेदोक्त संध्यावंदन इत्यादी नित्यकर्म करावे त्यानंतर माझ्या आराधनेचाच दृढ संकल्प करून वैदिक आणि तांत्रिक निधींनी कर्मबंधनातून सोडविणारी माझी पूजा करावी. (११)


शैली दारुमयी लौही लेप्या लेख्या च सैकती ।
मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टविधा स्मृता ॥ १२ ॥
अष्टविधा मम मूर्ती दगडी काष्ठ धातु नी ।
माती चंदन चित्रोनी वाळू नी मन वा मणी ॥ १२ ॥

शैली, दारुमयी, लौही, - दगडाची, लाकडाची, लोहादि धातूची, - लेप्या, लेख्या च, सैकती, मनोमयी, - मातीची, चित्ररूप, वाळूची, मनाने अंतःकरणात साठविलेली, - मणिमयी अष्टविधा प्रतिमा स्मृता - आणि रत्नाची, अशी माझी प्रतिमा आठ रूपांची असते - ॥१२॥
पाषाण, लाकूड, सुवर्ण, माती, चित्र, वाळू, मन आणि रत्‍न असे माझ्या मूर्तीचे आठ प्रकार आहेत. (१२)


चलाचलेति द्विविधा प्रतिष्ठा जीवमन्दिरम् ।
उद्वासावाहने न स्तः स्थिरायामुद्धवार्चने ॥ १३ ॥
चल वा अचलो मूर्ती माझेचि जीवमंदिरे ।
रोज ना अचला मूर्ती आवाहन विसर्जन ॥ १३ ॥

जीवमंदिरं - साधकाला भगवंताच्या देवालयाप्रमाणे पवित्र असणारी - प्रतिष्ठा - प्रतिमा - चला अचला इति द्विविधा - चल व अचल अशी दोन प्रकारची असते - उद्धव - उद्धवा - अर्चने - पूजाविधीमध्ये - स्थिरायां - अचल मूर्ति असेल तर - उद्वास-आवाहने - आवाहन आणि विसर्जन - न स्तः - असत नाहीत - ॥१३॥
स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या प्रतिमा हे माझे मंदिर होय उद्धवा ! स्थिर प्रतिमेची पूजा करताना दररोज आवाहन आणि विसर्जन करू नये. (१३)


अस्थिरायां विकल्पः स्यात् स्थण्डिले तु भवेद् द्वयम् ।
स्नपनं त्वविलेप्यायां अन्यत्र परिमार्जनम् ॥ १४ ॥
ऐच्छीक चलमूर्तीसी करा वा न करा तसे ।
वाळूच्या प्रतिमेलागी करावे नित्य त्या दिनीं ॥
माती चंदन चित्रांना स्नान ना घालणे कधी ।
केवलो मार्जनो व्हावे अन्यांना रोज स्नान द ॥ १४ ॥

अस्थिरायां विकल्पः स्यात् - चल मूर्ति असल्यास आवाहनादि करावे वा करू नये, असा विकल्प आहे - स्थंडिले तु द्वयं भवेत् - यज्ञकुंड असल्यास आवाहन-विसर्जन इष्ट आहे - अविलेप्यायां तु स्नपनं - मातीची मूर्ति नसेल अथवा चित्ररूप नसेल तेथे मूर्तीस स्नान घालावे - अन्यत्र परिमार्जनं - इतरत्र परिमार्जन (उदक शिंपडणे) मात्र करावे - ॥१४॥
अस्थिर प्रतिमेच्या बाबतीत आवाहनविसर्जन करावे किंवा करू नये परंतु वाळूच्या प्रतिमेचे मात्र केले पाहिजे माती, चित्र इत्यादी प्रतिमांवर फुलाने पाणी शिंपडावे इतर सर्व प्रकारच्या मूर्तींना मात्र स्नान घालावे. (१४)


द्रव्यैः प्रसिद्धैर्मद्यागः प्रतिमादिष्वमायिनः ।
भक्तस्य च यथालब्धैः हृदि भावेन चैव हि ॥ १५ ॥
अनेक प्रतिमा वस्तू मीच जाणोनि पूजिती ।
निष्काम भक्त तो पाही सर्वत्र मम रूप ते ॥ १५ ॥

अमायिनः भक्तस्य च - कोणत्याही प्रकारचे शाठय न करणारा माझा जो भक्त त्याने - प्रतिमादिषु - मूर्तिप्रमुख मत्स्वरूपाचे ठिकाणी - यथालब्धैः प्रसिद्धैः द्रव्यैः - यथाकाल व यथाशक्ति जी गंधपुष्पादि द्रव्यसामग्री मिळाली असेल त्या मंगलप्रद सामग्रीने - मद्यागः - माझे पूजन करावे - च - आणि - हृदि भावेन एव हि - मनोमय मूर्ति असेल, तर नुसत्या मनोमय द्रव्याने मात्र माझी पूजा करावी - ॥१५॥
प्रतिमा इत्यादींध्ये सुप्रसिद्ध पदार्थांनी माझी पूजा करावी परंतु निष्काम भक्तांनी मिळेल त्या वस्तूंनी पूजा करावी किंवा हृदयामध्ये मानसिक पूजा करावी. (१५)


स्नानालङ्करणं प्रेष्ठं अर्चायामेव तूद्धव ।
स्थण्डिले तत्त्वविन्यासो वह्नावाज्यप्लुतं हविः ॥ १६ ॥
स्नान वस्त्रादिके द्यावी केवलो धातुमूर्तिला ।
वाळू वा मृत्तिका मूर्ती वेदीट पूजिता तदा ॥
मंत्राने सर्व ते देव यथा स्थानी पूजो पहा ।
आहुत्या घृत घालोनी अग्नि पूजेसि अर्पिणे ॥ १६ ॥

उद्धव - उद्धवा - अर्चायां तु स्नानालंकरणं एव प्रेष्ठं - पाषाणमयादि मूर्तीला मात्र स्नान घालणे, अलंकार लेवविणे, मला प्रियकर असते - स्थंडिले तत्त्वविन्यासः - यज्ञकुंडात तर प्रधानादि देवतांचे समंत्रक स्थापन करावे - वन्हौ आज्यप्लुतं हविः - अग्निरूपाने मत्पूजन करणे असेल तर घृताने पूर्ण असलेले होमद्रव्य मला अर्पावे - ॥१६॥
हे उद्धवा ! मूर्तीलाच स्नान, वस्त्र, अलंकार इत्यादी घालावेत स्थंडिलावर मंत्रांनी अंगदेवता आणि प्रमुख देवतांची स्थापना करून पूजा करावी तसेच अग्नीमध्ये पूजा करावयाची असेल, तर तूपमिश्रित हविर्द्रव्याच्या आहुती द्याव्यात. (१६)


सूर्ये चाभ्यर्हणं प्रेष्ठं सलिले सलिलादिभिः ।
श्रद्धयोपाहृतं प्रेष्ठं भक्तेन मम वार्यपि ॥ १७ ॥
भूर्यप्यभक्तोपाहृतं न मे तोषाय कल्पते ।
गन्धो धूपः सुमनसो दीपोऽन्नाद्यं च किं पुनः ॥ १८ ॥
उपस्थानात सूर्याला मुख्य ते अर्घ्य दान दे ।
जळही अर्पिता प्रेमे प्रीय ते मजला असे ॥ १७ ॥
अभक्त अर्पिता खूप तयात तोष ना मला ।
भक्तीने फूल नी गंध धूप नैवेद्य दीप ते ॥
अर्पिता पुसणे काय प्रसन्न तेथ मी असे ॥ १८ ॥

सूर्ये च अभ्यर्हणं प्रेष्ठं - सूर्यरूप जो मी त्याची पूजा अर्ध्य-उपस्थानसहित करावी; ती मला आवडते - सलिले सलिलादिभिः - जलरूपी जो मी, त्या मला तर्पणादिकांनी प्रसन्न करावे - वारि अपि मम भक्तेन श्रद्धया उपाहृतं प्रेष्ठं - माझ्या भक्ताने श्रद्धेने मला नुसते वारि म्हणजे जल जरी अर्पिले, तरी ते मला अत्यंत प्रिय आहे - ॥१७॥ अभक्तोपहृतं भूरि अपि - ज्याला माझी भक्ति नाही, त्याने गंधपुष्पादि पुष्कळसे द्रव्य मला अर्पिले तरी ते - मे तोषाय न कल्पते - मला संतोष देत नाही - किं पुनः गंधः धूपः सुमनसः - जर मला भक्ताच्या जलानेच संतोष होतो, तर त्याने गंध, धुप, पुष्पे, दीप, - दीपः अन्नाद्यं च - गुडप्रभृति अन्न अर्पिले, तर मी संतुष्ट होतो, हे सांगावयास नकोच ! - ॥१८॥
सूर्याला अर्घ्य, उपस्थान अत्यंत प्रिय आहे तसेच पाण्यामध्ये पाण्याने तर्पण इत्यादीचे मला प्रिय आहे अभक्ताने मला पुष्कळ काही दिले तरी त्याने मी संतुष्ट होत नाही परंतु माझ्या भक्ताने मला श्रद्धने पाणी सुद्धा अर्पण केले तरी मला ते अत्यंत आवडते तर मग गंध फुले, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण केले, तर काय सांगावे. (१७-१८)


शुचिः सम्भृतसम्भारः प्राग्दर्भैः कल्पितासनः ।
आसीनः प्रागुदग् वार्चेद् अर्चायामथ सम्मुखः ॥ १९ ॥
उपासके पुजोनीया सामग्री एक ती करो ।
पूर्वेसी आसनाच्या त्या दशांना करणे पहा ॥
अचला मूर्ति सामोरी आसना घालणे असे ।
पूजा कार्या पुन्हा व्हावा आरंभ विधि हा जसा ॥ १९ ॥

शुचिः, संभृतसंभारः प्राग्‌दर्भैः कल्पितासनः - अंतर्बाह्य स्वच्छ असे पूजासाहित्य घेऊन आणि साग्र दर्भांनी आसन परिकल्पून - प्राक् उदक् वा आसीनः अर्चेत् - पूर्वेकडे वा उत्तरेकडे मुख करुन बसलेले राहून पूजा करावी - अथ अर्चायां संमुखः - जर अचल मूर्ति असेल तर मूर्तीसन्मुख बसावे - ॥१९॥
उपासकाने आधी पूजेची सामग्री एकत्रित करून ठेवावी नंतर पूर्वेकडे टोक असलेले कुशासन अंथरून, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून त्यावर बसावे मूर्ती स्थिर असेल तर तिच्यासमोर बसावे नंतर पूजा करावी. (१९)


कृतन्यासः कृतन्यासां मदर्चां पाणिनामृजेत् ।
कलशं प्रोक्षणीयं च यथावदुपसाधयेत् ॥ २० ॥
अंगन्यास करन्यास मंत्राने मूर्ति न्यास तो ।
निर्माल्य त्यागिणे सर्व पात्रात कलशें धुणे ॥
गंध पुष्पादिके तेथे पूजावे मज भक्तिने ॥ २० ॥

कृतन्यासः - तंत्रोक्त न्यास करून - पणिना - आपल्या हाताने - कृतन्यासां मदर्चां मृजेत् - न्यास केलेल्या माझ्या मूर्तीला स्वच्छ करावे - कलशं, प्रोक्षणीयं च यथावत् उपासाधयेत - कलश व लहान उदकपात्रे यथाविधि संस्कारावी - ॥२०॥
प्रथम अंगन्यास आणि करन्यास करावे नंतर मूर्तीमध्ये मंत्रन्यास करून हाताने निर्माल्य काढून मूर्ती पुसून घ्यावी नंतर भरलेला कलश, प्रोक्षणपात्र इत्यादींची पूजा करावी. (२०)


तदद्‌भिर्देवयजनं द्रव्याण्यात्मानमेव च ।
प्रोक्ष्य पात्राणि त्रीण्यद्‌भिः तैस्तैर्द्रव्यैश्च साधयेत् ॥ २१ ॥
पात्रींचे जळ घेवोनी सामग्री, देह प्रोक्षिणे ।
आचम्य पाद्य अर्घ्यासी त्रिपात्रीं जल पात्रि त्या ॥ २१ ॥

तदद्भिः - त्या संस्कारलेल्या जलाने - देवयजनं, द्रव्याणि, आत्मानं एव च - देवपूजेचे स्थान, पूजाद्रव्ये आणि आपले शरीरही - प्रोक्ष्य - प्रोक्षण करून - त्रीणि पात्रणि - पाद्य, अर्ध्य व आचमनीय ही तीन पात्रे - अद्भिः, तैः तैः द्रव्यैः च साधयेत् - जलाने व त्या त्या विहित द्रव्याने सिद्ध करावी - ॥२१॥
प्रोक्षणपात्रातील पाण्याने पूजेची सामग्री आणि आपले शरीर यांवर प्रोक्षण करावे त्यानंतर पाद्य, अर्घ्य व आचमनासाठी, कलशामधून तीन पात्रात पाणी भरून घेऊन त्यात योग्य त्या वस्तू घालाव्यात. (२१)


पाद्यार्घ्याचमनीयार्थं त्रीणि पात्राणि दैशिकः ।
हृदा शीर्ष्णाथ शिखया गायत्र्या चाभिमन्त्रयेत् ॥ २२ ॥
टाकणे युक्त त्या वस्ती क्रमाने तीन पात्र ते ।
हृदो शीर्ष शिखा मंत्रे गायत्रे अभिमंत्रिणे ॥ २२ ॥

दैशिकः - पूजा करणारा जो साधक त्याने - पाद्यार्घाचमनीयार्थं त्रीणि पात्राणि - पाद्य, अर्घ्य व आचमन या कार्यांसाठी उपयोगी पडणारी तीन पात्रे - हृदा, शीर्ष्णा, अथ शिखया - हृदय शिर व शिखा यांच्या मंत्रांनी - गायत्र्या च - आणि सर्व द्रव्ये गायत्री मंत्राने - अभिमंत्रयेत् - मंत्रून सिद्ध करावी - ॥२२॥
पूजा करणार्‍याने यानंतर तिन्ही पात्रे अनुक्रमे हृदयमंत्र, शिरोमंत्र आणि शिखामंत्राने अभिमंत्रित करून शेवटी गायत्रीमंत्राने तीनही अभिमंत्रित करावीत. (२२)


0पिण्डे वाय्वग्निसंशुद्धे हृत्पद्मस्थां परां मम ।
अण्वीं जीवकलां ध्यायेत् नादान्ते सिद्धभाविताम् ॥ २३ ॥
वायुने प्राण नी अग्नी करोनी शुद्ध ते पुन्हा ।
हृदयी दीप ज्योतीची पहावी जीवनोकळा ॥ २३ ॥


वायु-अग्नि-संशुद्धे पिंडे - वायु व अग्नि यांनी शुद्ध केलेल्या आपल्या शरीरामध्ये - हृत्-पद्म-स्थां - हृदयकमलात राहणारी - परां अण्वीं मम जीवकलां - अत्यंत श्रेष्ठ व सूक्ष्म जी माझी चैतन्यकला तिचे - ध्यायेत् - ध्यान करावे - नादांते सिद्धभावितां - ती कला नादाच्या अंती सिद्ध पुरुषांनी ध्यान केलेली अशी आहे - ॥२३॥
यानंतर प्राणायामाने प्राणवायू आणि शरीरातील अग्नी शुद्ध करून हृदयकमलामध्ये, सूक्ष्म अशा माझ्या श्रेष्ठ जीवकलेचे ध्यान करावे जिचे सिद्धांनी ॐकारातील नादाच्या शेवटी ध्यान केले आहे. (२३)


तयाऽऽत्मभूतया पिण्डे व्याप्ते सम्पूज्य तन्मयः ।
आवाह्यार्चादिषु स्थाप्य न्यस्ताङ्गं मां प्रपूजयेत् ॥ २४ ॥
आत्मरूपिणि ती ज्योत मनाने पूजिणे तदा ।
मंत्राने अंगन्यासाने पूजावे मजला पुन्हा ॥ २४ ॥

आत्मभूतया तया पिंडे व्याप्ते - जीवात्मस्वरूप झालेल्या त्या चित्कलेने संपूर्ण देह व्यापिल्यानंतर - तन्मयः आवाह्य संपूज्य - चिन्मय झालेल्या पूजकाने तिची आमंत्रणपूर्वक पूजा करून - (नंतर) - अर्चादिषु स्थाप्य - बाहेरील मूर्तीमध्ये तिची स्थापना करावी - न्यस्तांगं मां प्रपूजयेत् - अंगोपांग न्यास करून माझी पूजा करावी - ॥२४॥
भगवंतांचा तेजोमय अंश माझ्या हृदयात आहे त्या आत्मस्वरूप जीवकलेने सगळे शरीर व्यापून गेल्यावर मानसिक उपचारांनी तिची पूजा करावी त्यानंतर तन्मय होऊन आवाहन करावे आणि प्रतिमा इत्यादींमध्ये तिची स्थापना करावी नंतर मंत्रांनी प्रतिमेवर न्यास करून माझी पूजा करावी. (२४)


पाद्योपस्पर्शाहणादीन् उपचारान् प्रकल्पयेत् ।
धर्मादिभिश्च नवभिः कल्पयित्वाऽऽसनं मम ॥ २५ ॥
पद्ममष्टदलं तत्र कर्णिकाकेसरोज्ज्वलम् ।
उभाभ्यां वेदतन्त्राभ्यां मह्यं तूभयसिद्धये ॥ २६ ॥
माझ्या आसनि तो धर्म आणीक शक्ति पाहणे ।
धर्म ज्ञान नि वैराग्य ऐश्वर्य चार पाय हे ॥ २५ ॥
त्रैगुणी पृष्ठभागो नी पद्म‍अष्टदळो तिथे ।
सुवर्णकर्णिका त्याची प्रकाशमान केशरी ॥
वैदीक मंत्र ते गावे तांत्रीक करणे पुजा ।
पाद्य आचम्य अर्घ्याने भोग मोक्षा पुजा मला ॥ २६ ॥

धर्मादिभिः च नवभिः मम आसनं कल्पयित्वा - ‘धर्मादि ’ नव मंत्रांनी माझे आसन सिद्ध करून - पाद्य-उपस्पर्श-अर्हण-आदीन् उपचारान् प्रकल्पयेत् - पाद्य, आचमन, अर्ध्य इत्यादि उपचारांनी माझे समंत्रक पूजन करावे - ॥२५॥ अष्टदलं पद्मं - आठ पाकळ्यांचे कमल - तत्र कर्णिका-केसर-उज्वलं - जे कर्णिका व केसर यांनी प्रकाशित आहे ते त्या आसनावर काढावे - उभयसिद्धये तु - अभ्युदय व निःश्रेयस यांच्या सिद्धीसाठी - उभाभ्यां वेदतंत्राभ्यां - वेद व तंत्र यांनी विहित असलेल्या मंत्रांनी - मह्यं - मला पूजा अर्पण करावी - ॥२६॥
माझ्यासाठी धर्म इत्यादी नऊ गुणांनी युक्त आसन तयार करावे त्या आसनावर एक अष्टदळ कमळ तयार करून त्याचा मध्यभाग पिवळा करावा त्यावर मूर्ती ठेवून पाद्य, आचमनीय, अर्घ्य इत्यादी उपचार अर्पण करावेत याप्रमाणे भोग आणि मोक्ष प्राप्त होण्यासाठी वैदिक आणि तांत्रिक मंत्रांनी माझी पूजा करावी. (२५-२६)


सुदर्शनं पाञ्चजन्यं गदासीषुधनुर्हलान् ।
मुसलं कौस्तुभं मालां श्रीवत्सं चानुपूजयेत् ॥ २७ ॥
गदा सुदर्शनो खड्‍ग धनुष्य बाण नी हल ।
मुसलो अष्ट आयूधे पूजावी आठ त्या दिशीं ॥
कौस्तुभो वैजयंती नी श्रीचिन्ह अर्पिणे मला ॥ २७ ॥

सुदर्शनं, पांचजन्यं, - सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, - गदा-असि-इषु-धनुः-हलान् मुसलं, - गदा, खड्‌ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसल - कौस्तुभं, मालां, श्रीवत्सं च अनुपूजयेत् - ही माझी आयुधे आणि कौस्तुभमणि, वनमाला, व श्रीवत्स हे अलंकार यांची पूजा मग करावी-॥२७॥
सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, कौमोदकी गदा, खड्‌ग, बाण, धनुष्य, नांगर, मुसळ या आठ आयुधांची आठ दिशांना पूजा करावी व कौस्तुभमणी, वैजयंतीमाला आणि श्रीवत्सचिन्हाची वक्षःस्थळावर पूजा करावी. (२७)


नन्दं सुनन्दं गरुडं प्रचण्डं चण्डमेव च ।
महाबलं बलं चैव कुमुदं कुमुदेक्षणम् ॥ २८ ॥
दुर्गां विनायकं व्यासं विष्वक्सेनं गुरून् सुरान् ।
स्वे स्वे स्थाने त्वभिमुखान् पूजयेत् प्रोक्षणादिभिः ॥ २९ ॥
नंद सुनंद गरुडो प्रचंड चंड नी बलो ।
महाबल नि कुमुदो कुमदेक्षण पार्षद ॥ २८ ॥
दुर्गा विनायको व्यास विष्वक‍सेन गुरु तसे ।
दिशांना अष्ट दिक पाल विधिने पूजिणे तयां ॥ २९ ॥

नंदं, सुनंदं, गरुडं, प्रचंडं, चंडं, एव च महाबलं, बलं च एव, कुमुदं, कुमुदेक्षणं - ह्या माझ्या नंदसुनंदादि पार्षदांची - ॥२८॥ दुर्गां, विनायकं, व्यासं, विष्वक्सेनं, गुरून्, सुरान् तु - दुर्गाप्रभृतींची - स्वे स्वे स्थाने - त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या स्थानी - प्रोक्षणादिभिः - अर्घ्यादिकांनी - पूजयेत् - पूजा करावी - अभिमुखान् - या सर्वांच्या सन्मुख पूजकाने असावे - ॥२९॥
नंद, सुनंद, प्रचंड, चंड, महाबल, बल, कुमुद आणि कुमदेक्षण या आठ पार्षदांची आठ दिशांना, गरूडाची समोर, दुर्गा, विनायक, व्यास आणि विष्वक्‌सेन यांची चार कोपर्‍यात स्थापना करून पूजा करावी डावीकडे गुरूंची, पूर्वादी दिशांमध्ये क्रमाने इंद्र इत्यादी आठ लोकपालांची आपल्याकडे तोंड करून स्थापना करावी व प्रोक्षण, अर्घ्य इत्यादी अर्पण करून पूजा करावी. (२८-२९)


चन्दनोशीरकर्पूर कुङ्कुमागुरुवासितैः ।
सलिलैः स्नापयेन्मन्त्रैः नित्यदा विभवे सति ॥ ३० ॥
स्वर्णघर्मानुवाकेन महापुरुषविद्यया ।
पौरुषेणापि सूक्तेन सामभी राजनादिभिः ॥ ३१ ॥
वाळा चंदन कर्पूर केशरो अर्गजादिने ।
अभिषेक करावा तो समयीं सूक्त गाउ‍नी ॥ ३० ॥
जितम ते पुंडरीकाक्ष, सुवर्ण घर्म वा तसे ।
सहस्त्र शीर्षा पुरुषः इंद्र नरोहि गाउ‍नी ॥ ३१ ॥

चंदन-उशीर-कर्पूर-कुंकुम-अगुरु-वासितैः सलिलैः - चंदन, वाळा, कापूर, केशर, उद यांनी सुवासित केलेल्या जलांनी - मंत्रैः - मंत्रपूर्वक - नित्यदा - प्रतिदिवशी - विभवे सति - द्रव्यादि सामर्थ्य असेल तर - स्नापयेत् - मला व मत्पार्षदादिकांस स्नान घालावे - ॥३०॥ स्वर्णधर्मानुवाकेन - ‘सुवर्णं धर्मं परिवेदवेनं ’ या नावाच्या अनुवाकाचे मंत्रांनी - महापुरुषविद्यया - ‘जितं ते पुंडरीकाक्ष ’ इत्यादी महापुरुषविद्यात्मक श्लोकांनी - पौरुषेण अपि सूक्तेन - सुप्रसिद्ध पुरुषसूक्तांनीही - राजनादिभिः सामभिः - ‘राजनादि ’ सामवेद मंत्रांनी - ॥३१॥
ऐपत असेल तर दररोज चंदन, वाळा, कापूर, केशर आणि अगुरू इत्यादी सुगंधित वस्तूंनी सुवासित केलेल्या पाण्याने मला स्नान घालावे आणि त्यावेळी स्वर्णघर्मानुवाक, महापुरूषविद्या, पुरूषसूक्त आणि राजनादी साममंत्रांनी अभिषेक करावा. (३०-३१)


वस्त्रोपवीताभरण पत्रस्रग्गन्धलेपनैः ।
अलङ्कुर्वीत सप्रेम मद्‍भक्तो मां यथोचितम् ॥ ३२ ॥
वस्त्रालंकार पावितो पत्रमाला नि गंध ते ।
करो अर्पोनिया पूजा भ्रक्त तो मम ॥ ३२ ॥

वस्त्रोपवीताभरणपत्रस्रग्गंधलेपनैः - वस्त्र, यज्ञोपवीत, आभरणे, अनेक प्रकारच्या पत्री किंवा मुद्रा, माळा, गंधलेपन या प्रकारांनी - मद्भक्तः - माझा जो भक्त त्याने - मां सप्रेम - मला मोठया प्रेमाने - यथा उचितं - यथायोग्य - अलंकुर्वीत - अलंकृत करावे - ॥३२॥
माझ्या भक्ताने वस्त्र, यज्ञोपवीत, अलंकार घालावेत केशराने वेलबुट्टी काढावी फुलांचा हार, चंदन इत्यादी प्रेमपूर्वक मला वाहून सुशोभित करावे. (३२)


पाद्यं आचमनीयं च गन्धं सुमनसोऽक्षतान् ।
धूपदीपोपहार्याणि दद्यान्मे श्रद्धयार्चकः ॥ ३३ ॥
गूळ खीर पुरी तूप लाडू पोहे शिरा दही ।
विविध चटण्या यांचा नैवेद्य लाविणे मला ॥ ३३ ॥

पाद्यं, आचमनीयं च, गंधं, सुमनसः अक्षतान् - पाद्यादिकांसह - धूपदीपोपहार्याणि - धूप, दीप, नैवेद्य हे उपचार - अर्चकः - पूजकाने - मे - मला - श्रद्धा दद्यात् - श्रद्धापुरःसर अर्पावे - ॥३३॥
उपासकाने श्रद्धापूर्वक मला पाद्य, आचमन, चंदन, फुले, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात. (३३)


गुडपायससर्पींषि शष्कुल्यापूपमोदकान् ।
संयावदधिसूपांश्च नैवेद्यं सति कल्पयेत् ॥ ३४ ॥
श्रद्धेने पाद आचम्य चंदनो पुष्प अक्षता ।
धूप दीपादि सामग्री भक्ताने अर्पिणे मला ॥ ३४ ॥

गुड-पायस-सर्पींषि शष्कुल्यापूपमोदकान् - गुळ, क्षीर, घृत, करंज्या, अपूप, मोदक - संयाव-दधि-सूपान्-च - सांजा, दही, वरणासारखे व्यंजक पदार्थ - नैवेद्यं - अशा प्रकारचा नैवेद्य - सति - सामर्थ्य असेल त्याप्रमाणे - कल्पयेत् - सिद्ध करावा - ॥३४॥
शक्य असेल तर गूळ, खीर, तूप, करंज्या, अनरसे, मोदक, हलवा, दही, वरण इत्यादी विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. (३४)


अभ्यङ्गोन्मर्दनादर्श दन्तधावाभिषेचनम् ।
अन्नाद्यगीतनृत्यादि पर्वणि स्युरुतान्वहम् ॥ ३५ ॥
मंजनो उटणे लेप पंचामृतहि अर्पुनी ।
स्नान घालोनिया तैल लावोनी भिंग दाविणे ॥
भोग लावोनिया शक्य असता नृत्य गान हो ॥ ३५ ॥

अभ्यंग उन्मर्दन - सुवासिक तेले लावणे, अंग घासणे, - आदर्श-दंतघाव-अभिषेचनं - आरसा दाखविणे, दांत घासणे, अभिषेकासह स्नान घालणे - अन्नाद्यं - भोजनीय व भक्ष्य अर्पिणे - गीतनृत्यादि - माझ्या सन्मुख गाणे व नाचणे इत्यादि उपचार - पर्वणि - पवित्र दिवशी - उत - अथवा - अन्वहं - प्रतिदिवशी - स्युः - करावे - ॥३५॥
भगवंतांच्या मूर्तीचे दात घासावेत, तेल व उटणे लावून अभ्यंग स्नान घालावे अंग चोळावे आरसा दाखवावा, नैवेद्या दाखवावा आणि सामर्थ्य असेल तर दररोज किंवा उत्सवाच्या वेळी नृत्य, गीते इत्यादी सादर करावीत. (३५)


विधिना विहिते कुण्डे मेखलागर्तवेदिभिः ।
अग्निमाधाय परितः समूहेत् पाणिनोदितम् ॥ ३६ ॥
कुंडात स्थापिणे अग्नि वेदीं वा गर्त मेखळा ।
शोभायमान ती व्हावी हाताने अग्नि पेटवा ॥ ३६ ॥

मेखला-गर्त - मेखला म्हणजे दर्भाच्या दोर्‍या व गर्त म्हणजे खळगा - वेदिभिः विधिना विहिते कुंडे - आणि वेदि म्हणजे बैठक वगैरे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या यज्ञकुंडात - अग्निं आधाय - अग्नीची स्थापना करावी - उदितं - त्या पेटलेल्या अग्नीला - पाणिना - हाताने - परितः समूहेत - गोळा करून एक ठिकाणी करावे - ॥३६॥
शास्त्रोक्त विधीने तयार केलेल्या मेखला, खोली आणि वेदीने युक्त कुंडामध्ये अग्नीची स्थापना करावी त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करून हाताने परिसमूहन करावे. (३६)


परिस्तीर्याथ पर्युक्षेद् अन्वाधाय यथाविधि ।
प्रोक्षण्याऽऽसाद्य द्रव्याणि प्रोक्ष्याग्नौ भावयेत माम् ॥ ३७ ॥
वीस वीस कुश असे चारी बाजूस ठेवूनी ।
मंत्राने प्रोक्षिणे त्यांना समिधा अर्पिणे पुन्हा ॥
सामग्रि प्रोक्षोनी सर्व अग्नीत मज ध्या असे ॥ ३७ ॥

परिस्तीर्य अथ पर्युक्षेत् - नंतर अग्नीभोवती दर्भ पसरून मग कुंडासभोवार उदक शिंपडावे - यथाविधि अन्वाधाय - नंतर शास्त्रविहित मंत्रांनी अन्वाधान करून, सर्पण घालून - द्रव्याणि आसाद्य - होमद्रव्ये स्वस्थानी ठेऊन - प्रोक्षण्या प्रोक्ष्य - प्रोक्षणीपात्रोदकाने त्या द्रव्यांचे प्रोक्षण करून - अग्नौ मां भावयेत - अग्नीत मत्स्वरूपाचे ध्यान करावे - ॥३७॥
नंतर दर्भपरिस्तरणे ठेवून त्यावर पर्युक्षण करावे यानंतर विधिपूर्वक अन्वाधान करावे अग्नीच्या उतरेकडे होमाला उपयुक्त अशा ठेवलेल्या पात्रांवर व द्रव्यांवर प्रोक्षणीपात्रातील पाण्याने प्रोक्षण करावे त्यानंतर अग्नीमध्ये माझे या प्रकारे ध्यान करावे. (३७)


तप्तजाम्बूनदप्रख्यं शङ्खचक्रगदाम्बुजैः ।
लसच्चतुर्भुजं शान्तं पद्मकिञ्जल्कवाससम् ॥ ३८ ॥
तळपे हेममूर्ती मी रोम रोमात शांत ती ।
सायुधी चार त्या बाहू विलसे वस्त्र केशरी ॥ ३८ ॥

तप्त-जांबूनद-प्रख्यं - तापविलेल्या सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल - शंखं-चक्र-गदा-अंबुजैः लसत् - शंख, चक्र, गदा व कमल या आयुधांनी शोभिवंत झालेले - चतुर्भुजं, शांतं - चतुर्भुज व शांत - पद्म-किंजल्क-वाससं - कमलकेसरसदृश्य पीतांबरधारी - ॥३८॥
माझी शांत मूर्ती तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकत आहे चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म शोभत आहेत पीतांबर कमळातील केसराप्रमाणे शोभून दिसत आहे. (३८)


स्फुरत्किरीटकटक कटिसूत्रवराङ्गदम् ।
श्रीवत्सवक्षसं भ्राजत् कौस्तुभं वनमालिनम् ॥ ३९ ॥
कर्धनी कंकणे टोप झळकती बाजुबंदही ।
कौस्तुभो वनमाला नी श्रीवत्स चिन्ह शोभते ॥ ३९ ॥

स्फुरत्-किरीट-कटक-कटिसूत्र-वरांगदं - झळकणारे मुकुट, कडीतोडे, कटदोरा व श्रेष्ठ बाहुभूषणे असलेले - श्रीवत्सवक्षसं - श्रीवत्स आहे वक्षःस्थळी ज्याच्या असे - (च) भ्राजत्कौ कौस्तुभं - आणि कंठात झळकणारा कौस्तुभ - वनमालिनं - व आपाद मस्तक लांब असणारी वनमाला यांनी शृंगारलेले जे माझे स्वरूप त्याची यज्ञकुंडातील अग्नीत ध्यानपूर्वक भावना करावी - ॥३९॥
मस्तकावर मुगुट, मनगटात कडी, कमरेला करदोटा आणि बाहूंंमध्ये बाजूबंद झगमगत आहेत वक्षःस्थळावर श्रीवत्साचे चिह्न आहे गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगत आहे गळ्यात वनमाळा रूळत आहे". (३९)


ध्यायन्नभ्यर्च्य दारूणि हविषाभिघृतानि च ।
प्रास्याज्यभागावाघारौ दत्त्वा चाज्यप्लुतं हविः ॥ ४० ॥
जुहुयान्मूलमन्त्रेण षोडशर्चावदानतः ।
धर्मादिभ्यो यथान्यायं मन्त्रैः स्विष्टिकृतं बुधः ॥ ४१ ॥
अग्नीत ध्याउनी पूजो आहुती अर्पिणे पुन्हा ।
आघार आज्य भागो नी स‍आज्य आहुती करा ॥ ४० ॥
इष्ट मंत्रे तसे सोळा मंत्राने मला ।
धर्मादी देवता ज्ञाते विधिने हविणे पहा ॥ ४१ ॥

ध्यायन् - याप्रमाणे ध्यान करून - अभ्यर्च्य - अग्नीचे अष्टादिशांस अक्षता पेरून अर्चन करावे - च - आणि - हविषा अभिघृतानि दारूणि प्रास्य - घृताने पूर्ण भिजलेला दारु म्हणजे शुष्क समिधा अग्नीत प्रक्षेपून - आज्यभागौ च आघारौ दत्वा - आज्यभाग नामक व आघार नामक दोन दोन आहुति देऊन - आज्यप्लुतं हविः - घृतसिंचित होमद्रव्य - ॥४०॥ मूलमंत्रेण, अवदानतः षोडशर्चा - ‘ॐ नमो वासुदेवाय ’ या मूलमंत्राने व प्रत्येक ऋचेस एक एक अवदान याप्रमाणे सोळा ऋचांनी - जहुयात् - अग्नीला अर्पण करावे-हवन करावे - मंत्रैः धर्मादिभ्यः यथान्यायं - त्याप्रमाणे धर्मांदिकांस यथाशास्त्र समंत्रक आहुति द्याव्या - स्विष्टकृतं - स्विकृत होम समंत्रक करावा - बुधः - साधक ज्ञात्याने - ॥४१॥
असे ध्यान करून पूजा करावी त्यानंतर वाळलेल्या समिधांवर तुपाचा अभिधार करून त्यांच्या आहुती द्याव्या तसेच आघारहोम करून तुपाच्या दोन आहुतींनी हवन करावे त्यानंतर तूप घातलेल्या हविर्द्रव्याने "ॐनमो नारायणाय" या अष्टाक्षरी मंत्राने किंवा पुरूषसूक्ताच्या सोळा मंत्रांनी हवन करावे नंतर होमकर्त्याने धर्म इत्यादी देवतांना उद्देशून विधिपूर्वक मंत्रांनी हवन करावे तसेच शेवटी स्विष्टकृत आहुती द्यावी. (४०-४१)


अभ्यर्च्याथ नमस्कृत्य पार्षदेभ्यो बलिं हरेत् ।
मूलमन्त्रं जपेद् ब्रह्म स्मरन्नारायणात्मकम् ॥ ४२ ॥
अग्निदेवां पुजोनिया कर्मांग बलि दे पुन्हा ।
स्मरावे परब्रह्माला मूलमंत्र पुन्हा म्हणा ॥ ४२ ॥

अभ्यर्च्य - नंतर पूजाद्रव्याने ईश्वराची पूजा करावी - अथ नमस्कृत्य - नंतर ईश्वराला म्हणजे मला नमस्कार करावा - पार्षदेभ्यः बलिं हरेत् - पार्षदांस बली अर्पावा - नारायणात्मकं ब्रह्मस्मरन् - नारायणस्वरूप ब्रह्माचे स्मरण मनात जागृत ठेऊन - मूलमंत्रं जपेत् - वरील मूलमंत्र जपावा - ॥४२॥
नंतर भगवंतांची पूजा करून त्यांना नमस्कार करावा आणि नंदसुनंद इत्यादी पार्षदांना आठही दिशांकडे हवनकर्मांग बली द्यावा नंतर परब्रह्मस्वरूप भगवान नारायणांचे स्मरण करून "ॐनमो नारायणाय" या भगवतस्वरूप मूलमंत्राचा जप करावा. (४२)


दत्त्वाऽऽचमनमुच्छेषं विष्वक्सेनाय कल्पयेत् ।
मुखवासं सुरभिमत् ताम्बूलाद्यमथाहयेत् ॥ ४३ ॥
आचम्य भगवंता दे प्रसाद लाविणे तसा ।
तांबूल इष्टदेवाला पुष्पांजलिहि अर्पिणे ॥ ४३ ॥

आचमनं दत्वा (च) - आणि देवाप्रत आचमन अर्पून - विष्वक्सेनाय उच्छेषं कल्पयेत् - विष्वक्सेन नामक पार्षदाला नैवेद्याचा शेष असो, असे संकल्पावे - अथ - नंतर - तांबूलाद्यं सुरभिमत् मुखवासं अर्हयेत् - तांबूलादि सुवासिक मुखवास म्हणजे मुखशुद्धिरूपी खाद्य देऊन मंत्रपुष्पांजली भक्तिपूर्वक अर्पावी - ॥४३॥
त्यानंतर भगवंताना आचमन द्यावे आणि शेष नैवेद्याचा विष्वक्सेनाला नैवेद्य दाखवावा यानंतर मुखशुद्धीसाठी सुगंधी तांबूल अर्पण करून मंत्रपुष्पे वाहावीत. (४३)



उपगायन् गृणन् नृत्यन् कर्माणि अभिनयन् मम ।
मत्कथाः श्रावयन् श्रृण्वन् मुहूर्तं क्षणिको भवेत् ॥ ४४ ॥
माझ्या लीलेस ते गावे अभिनयहि तो करा ।
तन्मये नाचणे तैसे विसरा सर्व विश्व हे ॥ ४४ ॥

उपगायन्, गृणन्, नृत्यन्, - नंतर पूजकाने मल्लीला गाणारा, वर्णन करणारा, नाचणारा, - मम कर्माणि अभिनयन्, मत्कथाः श्रावयन्, शृण्वन् - अभिनयून दाखविणारा, माझ्या कथा सांगणारा व ऐकणारा व्हावे - मुहूर्तं क्षणिकः भवेत् - एक घटकाभर स्वस्थ व शांत चित्ताने माझ्या ठिकाणी एकनिष्ठ होऊन बसावे - ॥४४॥
माझ्या लीलांचे गायन करावे, त्यांचे वर्णन करावे आणि माझ्या लीलांचा अभिनय करावा हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचावे माझ्या कथा स्वतः ऐकाव्यात आणि दुसर्‍यांना ऐकवाव्यात आणि हे करताना प्रपंचाला काही वेळापुरते तरी विसरून जावे. (४४)


स्तवैरुच्चावचैः स्तोत्रैः पौराणैः प्राकृतैरपि ।
स्तुत्वा प्रसीद भगवन् इति वन्देत दण्डवत् ॥ ४५ ॥
स्तवनो स्त्रोत्र ते गावे भगवान पाव हो मला ।
कृपेने करिरे पूर्ण, वदोनी दंडवत नमा ॥ ४५ ॥

पौराणेः, प्राकृतैः अपि स्तोत्रैः, उच्चावचैः स्तवैः स्तुत्वा - संस्कृत व प्राकृत स्तोत्रांनी सुद्धा व त्याचप्रमाणे लहान मोठया स्तुतिपाठांनी माझे स्तवन करून - प्रसीद भगवन् - ‘हे भगवन् ! प्रसन्न व्हावे ’- इति - अशी प्रार्थना करावी - दंडवत् वंदेत - साष्टांग नमस्कार घालावे - ॥४५॥
प्राचीन ऋषींनी किंवा सामान्य भक्तांनी रचलेल्या लहानमोठ्या स्तोत्रांनी माझी स्तुती करून प्रार्थना करावी की, "हे भगवान ! आपण प्रसन्न व्हावे" असे म्हणून साष्टांग दंडवत घालावा. (४५)


शिरो मत्पादयोः कृत्वा बाहुभ्यां च परस्परम् ।
प्रपन्नं पाहि मामीश भीतं मृत्युग्रहार्णवात् ॥ ४६ ॥
पायासी टेकिणे डोके म्हणावे भवसागरी ।
बुडतो भेडवी मृत्यू कृपया रक्षिणे प्रभो ॥ ४६ ॥

बाहुभ्यां परस्परं मत्पादयोः शिरं च कृत्वा - नंतर दोन्ही हातांनी माझ्या पायांचा अवलंब करून, पायांवर मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार करावा - ईश ! - परमेश्वरा ! - मृत्यु-ग्रहार्णवात् भीतं - मृत्युनामक नक्र असलेल्या भवसागराला भ्यालेल्या - प्रपन्नं मां पाहि (इति) - व म्हणून तुला शरण आलेल्या अशा माझे रक्षण कर, अशी प्रार्थना करावी - ॥४६॥
आपले मस्तक माझ्या चरणांवर ठेवावे आणि आपल्या दोन्ही हातांनी चरण धरून म्हणावे "भगवान ! या संसारसागरात मी बुडू लागलो आहे मृत्यूरूपी मगर माझा पाठपुरावा करीत आहे भयग्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे हे प्रभो ! आपण माझे रक्षण करावे". (४६)


इति शेषां मया दत्तां शिरस्याधाय सादरम् ।
उद्वासयेद् चेद् उद्वास्यं ज्योतिर्ज्योतिषि तत्पुनः ॥ ४७ ॥
शेष माला प्रसादो ती स्वयेंचि शिरि ठेविणे ।
विसर्जन जरी इच्छा स्मरावे दिव्य ज्योत ती ॥
मूर्तिच्या मधली लीन आपुल्या हृदयीं स्थिरे ॥ ४७ ॥

इति - ‘इति ’ पदाचा संबंध मागच्या श्लोकाशी आहे - मया दत्तां शेषां सादरं शिरसी आधाय - नंतर उरलेला शेष, निर्माल्य, मी भगवंतानेच दिला आहे असे समजून तो मस्तकावर भक्तिपूर्वक धारण करावा - उद्वास्यं चेत् - विसर्जन करणे अगत्यच असेल तर - ज्योतिषी तत् ज्योतिः पुनः उद्वासयेत् - हृदयातील चिज्जोतीमध्येच त्या मूर्तीतील ज्योतीचे विसर्जन करावे - ॥४७॥
अशा प्रकारे स्तुती करून मला अर्पण केलेला फुलांचा हार मोठ्या आदराने आपल्या मस्तकावर ठेवावा नंतर विसर्जन करावयाचे असेल तर अशी भावना करावी की, प्रतिमेतून एक दिव्य ज्योत निघून ती आपल्या हृदयस्थ ज्योतीमध्ये लीन झाली आहे. (४७)


अर्चादिषु यदा यत्र श्रद्धा मां तत्र चार्चयेत् ।
सर्वभूतेष्वात्मनि च सर्वात्माहं अवस्थितः ॥ ४८ ॥
मूर्तीत असता श्रद्धा मजला पूजिणे तदा ।
मी तो सर्वात्मची आहे आपुल्या हृदयीं स्थित ॥ ४८ ॥

अर्चादिषु यदा यत्र श्रद्धा - मूर्त्यादि अष्टाधिष्ठानातून जेव्हा जेथे श्रद्धा असेल - तत्र च मां अर्चयेत् - त्यावेळी तेथेच माझे सांगोपांग पूजन करावे - अहं सर्वात्मा सर्वभूतेषु आत्मनि च अवस्थितः - मी सर्व चराचरांचा आत्मा सर्वदा सर्व भूतांत आणि जीवांतही विद्यमान असतो॥४८॥
जेव्हा जेथे ज्या प्रतिमा इत्यादींमध्ये श्रद्धा निर्माण होईल, तेव्हा तेथे, माझे पूजन करावे कारण मी सर्वात्मा असल्यामुळे सर्व प्राण्यांच्या तसेच आपल्याही हृदयात आहे. (४८)


एवं क्रियायोगपथैः पुमान्वैदिकतान्त्रिकैः ।
अर्चन् उभयतः सिद्धिं मत्तो विन्दत्यभीप्सिताम् ॥ ४९ ॥
वैदिकी तांत्रिकी करीयायोगाने पूजिता मला ।
अभिष्ट लाभती सिद्धी इह नी परलोकि ही ॥ ४९ ॥

एवं - या प्रकारे - वैदिकतांत्रिकैः क्रियायोगपथैः - वेदोक्त व तंत्रशास्त्रोक्त पूजाविधायक कर्मपंथाने - अर्चन् पुमान् - पूजा करणारा मानवी जीव - मत्तः - मजपासूनच - उभयतः - इहपरलोकात - अभीप्सितां सिद्धिं विंदाति - इष्ट असणार्‍या मनोरथांची सिद्धि प्राप्त करून घेतो - ॥४९॥
जो मनुष्य अशा प्रकारे वैदिक, तांत्रिक पद्धतींनी माझी पूजा करतो, तो, हा लोक आणि परलोक अशा दोन्ही ठिकाणी इच्छित सिद्धी प्राप्त करून घेतो. (४९)


मदर्चां सम्प्रतिष्ठाप्य मन्दिरं कारयेद् दृढम् ।
पुष्पोद्यानानि रम्याणि पूजायात्रोत्सवाश्रितान् ॥ ५० ॥
पूजादीनां प्रवाहार्थं महापर्वस्वथान्वहम् ।
क्षेत्रापणपुरग्रामान् दत्त्वा मत्सार्ष्टितामियात् ॥ ५१ ॥
बांधावी मंदिरे थोर असेल शक्ति जै तशी ।
स्थापावी प्रतिमा माझी बगीचे वाढवा पुढे ॥
श्रद्धेने पूजिणे रोज यात्रा उत्सव योजिणे ॥ ५० ॥
यात्रा वा उत्सवा साठी अथवा नित्य पूजनीं ।
बाजार शेत अर्पी त्यां ऐश्वर्य मम लाभते ॥ ५१ ॥

मदर्चां संप्रतिष्ठाप्य दृढं मंदिरं कारयेत् - माझ्या मूर्तीची शास्त्रविधिपूर्वक स्थापना करून तिच्यासाठी टिकाऊ देवालय बांधावे - रम्याणि पुष्पोद्यानानि - सुंदर पुष्पांची रमणीय उपवने सिद्ध करावी - पूजा-यात्रा-उत्सव-आश्रितान् क्षेत्र-आपण पुर-ग्रामान् - पूजा, यात्रा, उत्सवप्रसंगी उपयोग व्हावा म्हणून भूमी, बाजार, नगरे गावेही - महापर्वसु अथ अन्वहं पूजादीनां प्रवाहार्थं दत्त्वा - महापर्वकाळी व प्रतिदिवशी पूजाअर्चाप्रभृति अखंड चालवण्यासाठी देवाला अर्पण केल्याने - मत्सर्ष्टितां इयात् - त्या दात्याला माझे ऐश्वर्य प्राप्त होते - ॥५०-५१॥
आर्थिक सामर्थ्य असेल, तर उपासकाने सुंदर पक्के मंदिर बांधावे आणि त्यात माझ्या प्रतिमेची स्थापना करावी सुंदर फुलांचे बगीचे लावावेत, दररोजची पूजा, यात्रा आणि उत्सवांची व्यवस्था करावी. जो मनुष्य विशेष उत्सव किंवा दररोजची पूजा नेहमी चालू राहावी, म्हणून शेती, बाजार, नगर किंवा गाव माझ्या नावाने करून देतो, त्याला माझ्यासारख्या ऐश्वर्याची प्राप्ती होते. (५०-५१)


प्रतिष्ठया सार्वभौमं सद्मना भुवनत्रयम् ।
पूजादिना ब्रह्मलोकं त्रिभिर्मत्साम्यतामियात् ॥ ५२ ॥
स्थापी जो मम मूर्ती ती सार्वभौ‍म मिळे तया ।
मंदीर निर्मितो त्याला त्रिलोकराज्य लाभते ॥
पूजासामग्रि देई तो ब्रह्मलोकास पावतो ।
तिन्हिही करि जो त्याला सारुप्य मम लाभते ॥ ५२ ॥

प्रतिष्ठया सार्वभौ‌मं, - मूर्तिप्रतिष्ठापनेचे फल सार्वभौ‌मत्व, - सद्मना भुवनत्रयं, - मंदिर बांधण्याचे फल त्रिभुवनाचे राज्य, - पूजादिना ब्रह्मलोकं, - पूजादिकांचे फल ब्रह्मदेवाचा लोक - त्रिभिः च मत्साम्यतां इयात् - आणि ही तिन्हीही करणार्‍याला माझी समानता नामक मुक्ति मिळते - ॥५२॥
माझ्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने पृथ्वीचे एकछत्री राज्य, मंदिर बांधल्याने त्रैलोक्याचे राज्य, पूजा इत्यादींची व्यवस्था केल्याने ब्रह्मलोक आणि हे तीनही केल्याने माझी समानता प्राप्त होते. (५२)


मामेव नैरपेक्ष्येण भक्तियोगेन विन्दति ।
भक्तियोगं स लभते एवं यः पूजयेत माम् ॥ ५३ ॥
निष्कामे पूजिता नित्य माझा तो भक्तियोगची ।
लाभतो स्वय तो घेई मिळवोनि मला पहा ॥ ५३ ॥

नैरपेक्ष्येण भक्तियोगेन मां एव विंदति - निष्काम भक्तियोगाने पूजकाला स्रायुज्यत्वच मिळते - यः मां एवं पूजयेत - जो माझी अशी निष्काम सेवा, पूजा करतो - सः भक्तियोगं लभते - त्यालाच निष्काम भक्तियोग साध्य होतो - ॥५३॥
जो निष्कामभावाने माझी पूजा करतो, त्याला माझा भक्तियोग प्राप्त होतो आणि त्या निरपेक्ष भक्तियोगाने तो मलाच प्राप्त करून घेतो. (५३)


यः स्वदत्तां परैर्दत्तां हरेत सुरविप्रयोः ।
वृत्तिं स जायते विड्भुग् वर्षाणां अयुतायुतम् ॥ ५४ ॥
स्वय वा दुसर्‍यांनी जे अर्पिले देव ब्राह्मणा ।
हारिता जीविका त्याला युगांत रौरवा मिळे ॥ ५४ ॥

स्वदत्तां, परैः दत्तां सुरविप्रयोः वृत्तिं यः हरेत - आपण स्वतः किंवा दुसर्‍यांनी देवाब्राह्मणास दान दिलेल्या वृत्तीचा जो अपहार करतो किंवा ती वृत्ति बंद करतो - सः वर्षाणां अयुतायुतं विड्‌भुक् जायते - तो दहा कोट वर्षे नरकलोकांतील मल खाणारा कृमि होतो - ॥५४॥
जो आपण दिलेले किंवा दुसर्‍याने दिलेले देवता किंवा ब्राह्मणाच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतो, तो कोट्यावधी वर्षापर्यंत विष्ठेतील किडा होतो. (५४)


कर्तुश्च सारथेहेतोः अनुमोदितुरेव च ।
कर्मणां भागिनः प्रेत्य भूयो भूयसि तत्फलम् ॥ ५५ ॥
जे लोक दुष्ट कार्यासी प्रेरिती मिळती तयीं ।
फळ त्यां लाभते घोर जसा भाग तसेचि ते ॥ ५५ ॥

कर्तुः यत्फलं - प्रत्यक्ष कर्त्याला जे फल मिळते - तत् फलं सारथेः च, हेतोः अनुमोदितुः एव च - तेच फल साह्यकार्‍याला, तत्प्रवर्तकाला व अनुमोदन देणार्‍याला मिळते - कर्मणां भागिनः - हे सर्व कार्यभागीच होतात - प्रेत्य - आणि ते परलोकी गेल्यावर - भूयसि भूयः - त्यांचा सहभाग जितका अधिक तितके अधिक फल त्यास मिळते - ॥५५॥
जे लोक अशा कामांमध्ये मदत करतात, प्रेरणा देतात किंवा सहमत होतात तेसुद्धा मरणानंतर वरील व्यक्तीप्रमाणेच त्या कर्माच्या फळाचे भागीदार होतात आणि त्यांचा सहभाग त्यात अधिक असेल, तर फळसुद्धा त्यांना अधिक मिळते. (५५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥
अध्याय सत्ताविसावा समाप्त

GO TOP