श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
षड्‌विंशोऽध्यायः

ऐलगीतम् -

पुरूरव्याची वैराग्योक्ती -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
मल्लक्षणमिमं कायं लब्ध्वा मद्धर्म आस्थितः ।
आनन्दं परमात्मानं आत्मस्थं समुपैति माम् ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात-
( अनुष्टुप )
स्वरूप ज्ञानप्राप्तीचे नदेहचि साधन ।
लाभता भजि तो प्रेमे स्वानंदा तोच पावतो ॥ १ ॥

मल्लक्षणं इमं कायं लब्ध्वा - माझे स्वरूप ज्यायोगे लक्षिता येते असा हा मानव देह प्राप्त करून घेऊन - मद्धर्मे आस्थितः - माझ्या भक्तीमध्ये जो एकनिष्ठ असतो - आत्मस्थं परं आनंदं - पराकाष्ठेचा आनंदरूप असा जीवाच्या अंतर्यामी असणारा - आत्मानं मां समुपैति - जो मी परमात्मा त्या माझी प्राप्ति होते - ॥१॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या मला आनंदस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. (१)


गुणमय्या जीवयोन्या विमुक्तो ज्ञाननिष्ठया ।
गुणेषु मायामात्रेषु दृश्यमानेष्ववस्तुतः ।
वर्तमानोऽपि न पुमान् युज्यतेऽवस्तुभिर्गुणैः ॥ २ ॥
गुणमयी गती योनी ज्ञानाने मुक्त पावणे ।
दिसती त्रैगुणी रूप माया ती फसवी पहा ॥
ज्ञान होता न बाधी ती तिच्यात राहुनी तसे ।
गुणांची नच ती सत्तवास्तवीक तशी मुळी ॥ २ ॥

ज्ञाननिष्ठया - ज्ञानाभ्यासाने - गुणमय्या जीवयोन्या विमुक्तः - त्रिगुणपूर्ण जी जीवावस्था तिच्यापासून विमुक्त होऊन - अवस्तुतः दृश्यमानेषु मायामात्रेषु गुणेषु - मिथ्या असणारे जे मायिक म्हणजे दृश्य गुण - वर्तमानः अपि - त्यात वागत असताही - अवस्तुभिः गुणैः - अवास्तविक-मिथ्या असणार्‍या गुणांशी - पुमान् न युज्यते - तो ज्ञाननिष्ठ पुरुष संगतीच ठेवीत नाही - ॥२॥
जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीवयोनीपासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसूनही दिसणार्‍या केवळ मायास्वरूप गुणांच्या पसार्‍यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला जात नाही कारण त्या गुणांना वास्तविक अस्तित्वच नाही. (२)


सङ्गं न कुर्यादसतां शिश्नोदरतृपां क्वचित् ।
तस्यानुगस्तमस्यन्धे पतत्यन्धानुगान्धवत् ॥ ३ ॥
संग त्या कधि ना व्हावा शिश्न पोटासि ध्ययि जो ।
अंधाचा आसरा घेता अंध चाले दुजा जसा ॥ ३ ॥

शिश्र्नोदरतृपां असतां - शिश्र्नोदरपरायणं नास्तिकांशी - संगं क्वचित् न कुर्यात् - केव्हाही समागम करू नये - अंधानुगांधवत् - आंधळ्याचा हात धरून चालणार्‍या आंधळ्याप्रमाणे - तस्य अनुगः - नास्तिकानुयायी - अंधे तमसि पतति - अंधतमात पडतो - ॥३॥
जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात, अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणार्‍यांची अधोगतीच होते जसा एखादा आंधळा दुसर्‍या आंधळ्याच्या साहाय्याने वाटचाल करू लागला, तर त्याची जशी स्थिती होते, तशीच याचीही होते. (३)


ऐलः सम्राडिमां गाथां अगायत बृहच्छ्रवाः ।
उर्वशीविरहान् मुह्यन् निर्विण्णः शोकसंयमे ॥ ४ ॥
उर्वशी विरहे शुद्ध हारवे तो पुरूरवा ।
शोक संपोनि वैराग्य लाभरा गीत गायिला ॥ ४ ॥

बृहच्छ्‌रवाः ऐलः सम्राट - मोठी कीर्ति असलेला ऐलनामक चक्रवर्ती राजा - उर्वशीविरहात् मुह्यन् - उर्वशीच्या विरहाने वेडा होऊन पुनः भानावर आल्यानंतर - शोकसंयमेनिर्विण्णः - व शोक नष्ट करून विषयविरक्त झाल्यानंतर - इमां गाथां अगायत - ही पुढील गाथा त्याने गाइली - ॥४॥
परम यशस्वी सम्राट पुरूरवा प्रथम उर्वशीच्या विरहाने वेडापिसा झाला होता पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले तेव्हा तो म्हणाला. (४)


त्यक्त्वाऽऽत्मानं व्रजन्तीं तां नग्न उन्मत्तवन्नृपः ।
विलपन् अन्वगाज्जाये घोरे तिष्ठेति विक्लवः ॥ ५ ॥
उर्वशी त्यजिते तेंव्हा नागवा हा पिशापरी ।
विव्हल धावुनी बोले निष्ठूर देवि थांब तू ॥ ५ ॥

उन्मत्तवत् नग्नः नृपः - उन्मत्ताप्रमाणे दिगंबर असलेला तो ऐल राजा - आत्मानं त्यक्त्वा - आपल्याला टाकून - व्रजंतीं तां - निघून जाणार्‍या उर्वशीला - ‘जाये घोरे तिष्ठ ’ इति विलपन् - ‘हे कठोर भार्ये ! ऊभी रहा, उभी रहा ’ असा विलाप करीत - विक्लवः अन्वगात् - व्याकुलतेने तिच्या मागे चालू लागला - ॥५॥
आपल्याला सोडून निघून जाणार्‍या उर्वशीच्या मागे राजा पुरूरवा नग्न अवस्थेत वेड्यासारखा अतिशय विव्हळ, होऊन, जात जात म्हणू लागला "हे निष्ठुरहृदये प्रिये थांब, थांब". (५)


कामानतृप्तोऽनुजुषन् क्षुल्लकान् वर्षयामिनीः ।
न वेद यान्तीर्नायान्तीः उर्वश्याकृष्टचेतनः ॥ ६ ॥
आकर्षिले तिने चित्त न तृप्त नृप जाहला ।
विषयीं बुडला नित्य रात्रीच्या रात्रि संपल्या ॥ ६ ॥

क्षुल्लकान् कामान् अनुजुषन् - क्षुल्लक म्हणजे मोक्षाला निरुपयोगी असणार्‍या वासना पूर्ण झाल्या नाहीत म्हणून - अतृप्तः - अतृप्तच राहिलेला - उर्वश्याकृष्टचेतनः - उर्वशीने आकर्षून घेतले चित्त व जीवित ज्याचे असा - यांतीः वर्षयामिनीः - वर्षांतील किती रात्री गेल्या व किती आल्या, - न आयांतीः न (वेद) - हे त्याला काही समजले नव्हते. त्याला कालाचे भानच नव्हते - ॥६॥
उर्वशीने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते क्षुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला होता की, कित्येक वर्षाच्या रात्री आल्या आणि गेल्या तरी त्याला त्याचे ज्ञान नव्हते. (६)


ऐल उवाच -
अहो मे मोहविस्तारः कामकश्मलचेतसः ।
देव्या गृहीतकण्ठस्य नायुःखण्डा इमे स्मृताः ॥ ७ ॥
पुरुरवा म्हणाला-
हाय मी मूढ हा कैसा कामाने चित्त दोषिले ।
वर्षच्या वर्ष ते गेले विस्मृतीलाहि ती सिमा ॥ ७ ॥

देव्या गृहीतकंठस्य - माझ्या उर्वशी भार्येने माझा कंठ, माझे सर्वस्व हरण केला गेलेला मी, तिच्या गळ्यातला ताईत झाल्यामुळे - कामकश्मल चेतसः मे - कामाने मलीन झाले आहे मन ज्याचे, अशा अशुद्ध मनाचा जो मी त्या माझा - अहो मोहविस्तारः - केवढातरी हा मोहाचा विस्तार पहा - इमे आयुःखंडाः न स्मृताः - माझ्या आयुष्याची ही इतकी वर्षे कशी गेली त्याचे मला भानच राहिले नाही - ॥७॥
पुरूरवा म्हणाला - अरेरे ! माझा किती हा मूर्खपणा ! कामवासनेने चित्त कलुषित झालेल्या आणि उर्वशीने गळ्याला मिठी घातलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्षे फुकट गेली, कळलचे नाही. (७)


नाहं वेदाभिनिर्मुक्तः सूर्यो वाभ्युदितोऽमुया ।
मूषितो वर्षपूगानां बताहानि गतान्युत ॥ ८ ॥
तिनेच लुटिले हाय उदयास्त न तो काळ ।
खदकी आयुचे कैक वर्ष सरले कसे ॥ ८ ॥

अमुया मुषितः अहं - उर्वशीच्या संगतीने नष्टज्ञान झालेला मी - अभिनिर्मुक्तः अभ्युदितः वा सूर्यः - सूर्य मावळला किंवा उगवला हे - न वेद - जाणण्यास असमर्थ झालो - बत - अरेरे ! - वर्षपूगानां अहानि गतानि उत - अनेक वर्षांचे दिवससुद्धा या मोहातच नाहीसे व्हावे ना ? - ॥८॥
हिच्या सहवासात सूर्य मावळला की उगवला हेही मला समजत नसे अरेरे ! कित्येक वर्षाचे दिवसच्या दिवस निघून गेले हिने मला पुरते लुटले ! (८)


अहो मे आत्मसम्मोहो येनात्मा योषितां कृतः ।
क्रीडामृगश्चक्रवर्ती नरदेवशिखामणिः ॥ ९ ॥
आश्चर्य वाढला मोह नरेंद्र चक्रवर्ति मी ।
सम्राटा तरि त्या स्त्रीने केले हो खेळणे असे ॥ ९ ॥

नरदेवशिखामणिः चक्रवर्ती - अनेक मांडलिक राजांचा चूडामणि, चक्रवर्ती मी ! - मे - माझा - अहो आत्मसंमोहः - केवढा मोठा आत्मघातकी मूढपणा हा ! - येन आत्मा - या मूढपणाने माझा, चक्रवर्तीचा आत्मा - योषितां - बायकांचे - क्रीडाःमृगः कृतः - खेळणे की हो झाला - ॥९॥
अहो ! माझ्या मनातील मोह इतका वाढला की, ज्याने चक्रवर्ती महापुरूष असलेल्या मला स्त्रियांचे खेळणे केले. (९)


सपरिच्छदमात्मानं हित्वा तृणमिवेश्वरम् ।
यान्तीं स्त्रियं चान्वगमं नग्न उन्मत्तवद् रुदन् ॥ १० ॥
मर्यादारक्षिता मी नी नागडा धावलो कसा ।
रडलो पडलो तैसा हाय जीवन हे असे ॥ १० ॥

सपरिच्छदं ईश्वरं आत्मा नं - सकल ऐश्वर्यसंपन्न, सर्व प्रभु जो मी चक्रवर्ती त्या मला - तृणं इव - तृणासारखा, कस्पटापरी - हित्वा - टाकून देऊन - यांतीं स्त्रियं च - जाणार्‍या त्या उर्वशीच्या पाठी मागून - उन्मत्तवत् - उन्मत्त वेडयासारखा - नग्नः रुदन् अन्वगमं - नग्न आणि रडत ओरडत मी गेलो ! - ॥१०॥
प्रजेवर सत्ता चालवणार्‍या मला आणि माझ्या राजसिंहासनाला गवताच्या काडीप्रमाणे सोडून उर्वशी निघून चालली असता मी वेडा होऊनउघडा रडतकढत तिच्या पाठीमागे निघालो. (१०)


कुतस्तस्यानुभावः स्यात् तेज ईशत्वमेव वा ।
योऽन्वगच्छं स्त्रियं यान्तीं खरवत् पादताडितः ॥ ११ ॥
गाढवी परि त्या लाथा खावोनी पाठि लागलो ।
प्रभाव तेज सामर्थ्य उरले कायसे मला ॥ ११ ॥

कुतः - कोठे ? - तस्य - त्या माझ्या - अनुभवः स्यात्, तेजः, ईशत्वं एव वा ? - सामर्थ्याची, तेजाची किंवा प्रभुत्वाची काय किंमत राहिली ? - खरवत् पादताडितः यः - लाथाडल्या जाणार्‍या गर्दभाप्रमाणे जो मी - यांतीं स्त्रियं अन्वगच्छं - त्या निष्ठुर स्त्रीच्या मागे मागे गेलो - ॥११॥
गाढवाप्रमाणे मारलेल्या लाथा सहन करूनही मी त्या स्त्रीच्या पाठीमागे निघालो ! अशा स्थितीत माझ्या ठिकाणी प्रभाव, तेज आणि स्वामित्व कसे राहू शकेल बरे ? (११)


किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन वा ।
किं विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनो हृतम् ॥ १२ ॥
व्यर्थ विद्या तपो त्याग श्रुतिचा लाभ काय तो ।
एकांत मौनही व्यर्थ स्त्रियेने चित्त चोरिता ॥ १२ ॥

यस्य स्त्रीभिः मनः हृतं - ज्याचे मन स्त्रियांनी चोरून नेले - किं विद्यया, किं तपसा, - त्याची विद्या, त्याचे तप, - किं त्यागेन, श्रुतेनवा किं - वैराग्य, त्याचे श्रवण - विविक्तेन, मौनन - किंवा त्याचे एकांतवास्तव्य, अथवा मूकव्रत ही सर्व व्यर्थ होत - ॥१२॥
स्त्रियांनी ज्याचे मन चोरले, त्याची विद्या, तपश्चर्या, त्याग, शास्त्राभ्यास, एकांतात राहाणे किंवा मौन, सारे सारे निष्फळच आहे. (१२)


स्वार्थस्याकोविदं धिङ् मां मूर्खं पण्डितमानिनम् ।
योऽहमीश्वरतां प्राप्य स्त्रीभिर्गोखरवज्जितः ॥ १३ ॥
हानि ना कळली चित्ता मानितो तरि पंडित ।
धिक्कार मूर्ख मी हाय वृषभा परि गुंतलो ॥ १३ ॥

यः अहं ईश्वरतां प्राप्य - ज्या मला सकल ऐश्वर्य प्राप्त झाले असून - स्त्रीभिः गो-खर-वत् जितः - स्त्रीयांकडून बैल व गर्दभ यांच्यासारखा वश केला गेलो - तं स्वार्थस्य अकोविदं - त्या स्वतःचा उत्तम पुरुषार्थ न जाणणार्‍या - मूर्खं पंडितमानिनं मां - मूर्ख आणि पंडितमन्य मला - धिक् - धिःकार असो - ॥१३॥
स्वार्थ न कळणार्‍या, तरीसुद्धा स्वतःला पंडित समजणार्‍या मज मूर्खाचा धिक्कार असो ! अरेरे ! मी सम्राट असूनही स्त्रियांनी मला गाढवबैलासारखे आपल्या अधीन केले. (१३)


सेवतो वर्षपूगान् मे उर्वश्या अधरासवम् ।
न तृप्यत्यात्मभूः कामो वह्निराहुतिभिर्यथा ॥ १४ ॥
उर्वशी‍ओठिचे मद्य पिलो मी वर्ष वर्ष ते ।
न झाला काम तो तृप्त तुपे अग्नि न तो शमे ॥ १४ ॥

उर्वश्याः अधरासवं वर्षपूगान् सेवतः - उर्वशीचे अधरामृत मी अनेक वर्षे आसोशीने प्यालो - मे आत्मभूः - माझ्या मनातील विषयवासनेची - न तृप्यति - तृप्ति झालीच नाही ! - यथा आहुतिभिः वह्निः - आहुति देऊन अग्नीची कधीही शांति होत नाही तशी - ॥१४॥
अनेक वर्ष उर्वशीचे अधरामृत सेवन करूनही माझी कामवासना तृप्त झाली नाही जसा आहुतीमागून आहुती दिल्या तरी अग्नी तृप्त होत नाही. (१४)


पुंशल्यापहृतं चित्तं को न्वन्यो मोचितुं प्रभुः ।
आत्मारामेश्वरमृते भगवन्तं अधोक्षजम् ॥ १५ ॥
चोरिले चित्त वेश्येने आत्मारामा विना मला ।
स्वामी तो सोडवी कोण अशा या चिखलातुनी ॥ १५ ॥

आत्मरामेश्वरं भगवंतं अधोक्षजं ऋते - श्रीपुरुषोत्तम भगवान जो अधोक्षज विष्णु त्याच्यावाचून - पुंश्चल्या अपहृतं चित्तं - उर्वशी वेश्येने पिंजर्‍यात कोंडलेले माझे चित्त - मोचितुं - बंधमुक्त करण्याला - कः नु अन्यः प्रभुः - दुसरा कोण समर्थ आहे ? - ॥१५॥
कुलटेने चोरलेल्या चित्ताला जीवन्मुक्तांचे स्वामी, इंद्रियातीत अशा भगवंताखेरीज कोण मुक्त करू शकेल ? (१५)


बोधितस्यापि देव्या मे सूक्तवाक्येन दुर्मतेः ।
मनोगतो महामोहो नापयात्यजितात्मनः ॥ १६ ॥
तिने तो श्रुतिच्या शब्दे मजला समजाविले ।
परी ना नष्टला मोह हद्द माझीच संपली ॥ १६ ॥

देव्या सूक्तवाक्येन बोधितस्य अपि - त्या देवीने सदुपदेश करून मला बोधिले तरी - अजितात्मनः दुर्मतेः मे - इंद्रियवश असलेला हीनमति जो मी त्या माझ्या - मनोगतः - प्रबल मनात वाढलेला - महामोहः - बळकट मोह - न अपयाति - नष्ट होतच नव्हता ना ! - ॥१६॥
वैदिक सूक्तांनी उर्वशीने मला चांगल्या रीतीने उपदेश करूनसुद्धा मन ताब्यात नसलेल्या मज मूर्खाच्या मनातील तो भयंकर मोह नाहीसा झाला नाही ! (१६)


किमेतया नोऽपकृतं रज्ज्वा वा सर्पचेतसः ।
रज्जु स्वरूपाविदुषो योऽहं यदजितेन्द्रियः ॥ १७ ॥
न जया कळला दोष तयाला भीति वाटते ।
तिचे ते चुकले काय इंद्रियी मीच गुंतलो ॥ १७ ॥

किं एतया नः अपकृतं - या उर्वशीने माझा काय बरे अपराध केला ? - रज्जुस्वरूपाऽविदुषः सर्पचेतसः रज्ज्वा वा - दोरीचे स्वरूप ठाऊक नसल्यामुळे दोरीला सर्प मानणार्‍याचा दोरी काय अपराध करिते ? - यत् - ज्याअर्थी - यः अहं अजितेंद्रियः - इंद्रिये मन इत्यादि ताब्यात नसणारा जो मी त्या माझाच हा सर्व अपराध आहे - ॥१७॥
दोरीचे स्वरूप न जाणल्याने तिच्याजागी सापाची कल्पना करून जो भयग्रस्त होतो, त्याला दोरी काय करणार ! मनच जर माझ्या ताब्यात नाही, तर मी तिला का दोष द्यावा ? (१७)


क्वायं मलीमसः कायो दौर्गन्ध्याद्यात्मकोऽशुचिः ।
क्व गुणाः सौमनस्याद्या ह्यध्यासोऽविद्यया कृतः ॥ १८ ॥
दुर्गंधयुक्त तो देह पुष्पोचित गुणो कुठे ।
अज्ञाने घाणिला मी तो सौं‍दर्य मानिले असे ॥ १८ ॥

क्व अयं मलीमसः दौंर्गध्याद्यात्मकः अशुचिः कायः - कोणीकडे हा अति मलीन, दुर्गंध पदार्थांनी भरलेला अशुद्ध देह - सौमनस्याद्याः क्व गुणाः - निर्मळ, सुगंधी, नाजूक पुष्पाप्रमाणे सात्त्विक गुण ? - अविद्यया कृतः अध्यासः हि - मलीनत्वादि दुर्गुण असणार्‍या देहाचे ठिकाणी निर्मलता प्रभृति चांगल्या गुणांचा आरोप जीव करतो, ते अविद्येचे फल होय़ - ॥१८॥
कुठे ते मलिन, दुर्गंधीने भरलेले अपवित्र शरीर आणि कुठ ते सुकुमारता, इत्यादी फुलासारखे गुण ! परंतु मी अज्ञानाने वाइटाला चांगले मानले ! (१८)


पित्रोः किं स्वं नु भार्यायाः स्वामिनोऽग्नेः श्वगृध्रयोः ।
किमात्मनः किं सुहृदां इति यो नावसीयते ॥ १९ ॥
पित्रांचा लाडका मी का पत्नीचे धन देह हा ।
कुत्र्याचे भोजनो हा का मित्रांचा नच ते कळे ॥ १९ ॥

पित्रोः स्वं किं नु - मातापितरांचा हा स्व म्हणजे देह आहे - भार्यायाः - किंवा पत्नीचा आहे - स्वामिनः - किंवा आपल्या यजमानाचा, - अग्नेः - का अग्नीचा, - श्वगृध्रयोः - का कुत्रे-गिधाडांचा, - किं आत्मनः - का आपलाच, - किं सुहृदां ? - का मित्रांचा ? - इति यः न अवसीयते - हा देह तो कोणचा हे काहीच ठरविता येत नाही - ॥१९॥
हे शरीर मात्यापित्यांच्या मालकीचे की पत्‍नीच्या ? हे मालकाचे की अग्नीचे की कुत्रीगिधाडांचे ? हे आपले की बांधवांचे ? खूप विचार केला तरी हे निश्चित ठरवता येत नाही. (१९)


तस्मिन् कलेवरेऽमेध्ये तुच्छनिष्ठे विषज्जते ।
अहो सुभद्रं सुनसं सुस्मितं च मुखं स्त्रियः ॥ २० ॥
अपवित्र असा देह मरता सडतो तसा ।
लट्टू ते वदती रूप आ हा ! हास्य कसे पहा ॥ २० ॥

तस्मिन् अमेध्ये तुच्छनिष्ठे कलेवरे - त्या ह्या अपवित्र व शेवटी अत्यंत तुच्छ स्वरूप घेणार्‍या जड देहावरच - सुभद्रं सुनसं सुस्मितं च स्त्रियः मुखं - या स्त्रीचे मुख, उत्तम नाक, सरळ व मनोहर हास्य यांमुळे कितीतरी सुंदर आहे असा आरोप करुन - अहो विषज्जते - वेडया आषकपणाने लुब्ध होतो - ॥२०॥
अशा अपवित्र, तुच्छ शरीराच्या ठिकाणी माणूस आसक्त होऊन म्हणतो की, अहाहा ! स्त्रीचे मुख, नाक आणि हास्य किती सुंदर आहे ! (२०)


त्वङ्‌मांसरुधिरस्नायु मेदोमज्जास्थिसंहतौ ।
विण्मूत्रपूये रमतां कृमीणां कियदन्तरम् ॥ २१ ॥
त्वचा मास नि रक्ताचे मज्जा स्नायू नि मेद नी ।
अस्थि पू मलमूत्राने कृमीने देह व्यापिला ॥ २१ ॥

त्वङ्‌मांसरुधिरस्नायु - त्वचा, मांस, रक्त, स्नायु, - मेदोमज्जास्थिसंहतौ - चरबी, मगज, हाडके, या सात अमंगल पदार्थांच्या मेळवण्याने सिद्ध झालेल्या या देहसंघाताचे ठिकाणी - रमतां (मादृशानां) - रममाण होणार्‍या माझ्यासारख्यात - विण्मूत्रपूये (रमतां) कृमीणां - विष्ठा, मूत्र, पू यांच्या कर्दमात लोळण्याचा आनंद मानणार्‍या किडयात - कियत् अंतरं - काय फरक आहे ? - ॥२१॥
हे शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद, मज्जा आणि हाडे यांचा समूह असून ते मलमूत्र व पुवाने भरलेले आहे यामध्ये रममाण होणार्‍या माणसांत आणि किड्यांत अंतर कुठे राहिले ? (२१)


अथापि नोपसज्जेत स्त्रीषु स्त्रैणेषु चार्थवित् ।
विषयेन्द्रियसंयोगान् मनः क्षुभ्यति नान्यथा ॥ २२ ॥
हित इच्छि तये ज्ञातें स्त्रियांचा संग त्यागिणे ।
विषयेंद्रिय संयोग विकारे मन ते पहा ॥ २२ ॥

अथ अपि - असे ज्याअर्थी आहे त्याअर्थी - स्त्रीषु स्त्रैणैषु च अर्थवित् न उपसज्जेत - स्त्रियांची व स्त्रीलोलुपांची संगति पुरुषार्थ जाणणार्‍या विद्वानांनी करूच नये - विषयेंद्रियसंयोगात् मनः क्षुभ्यति - विषयांचा इंद्रियांशी संयोग झाला की मन भोगासाठी क्षुब्ध होतेच होते - न अन्यथा - त्याला क्षुब्ध करण्याला दुसरे काही समर्थ नाही - ॥२२॥
म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे असेल अशा विवेकी मनुष्याने स्त्रिया आणि स्त्रीलंपट यांची संगत करू नये विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगानेच मनात विकार उत्पन्न होतात, एरव्ही नाही. (२२)


अदृष्टाद् अश्रुताद्‍भावात् न भाव उपजायते ।
असम्प्रयुञ्जतः प्राणान् शाम्यति स्तिमितं मनः ॥ २३ ॥
तस्मात्सङ्गो न कर्तव्यः स्त्रीषु स्त्रैणेषु चेन्द्रियैः ।
विदुषां चाप्यविस्रब्धः षड्वर्गः किमु मादृशाम् ॥ २४ ॥
न ऐकिली न देखे जी तिचा मोह न तो घडे ।
विषया इंद्रिये सोडी तयाचे मन शांत हो ॥ २३ ॥
तदा वाणी मने कर्णे स्त्रियेसी संग ना घडो ।
मी तो क्षुद्र, मुनी ज्ञानी यांचाही चित्त घात घे ॥ २४ ॥

अदृष्टात्, अश्रुतात् भावात् - न पाहिलेल्या व न ऐकलेल्या पदार्थांपासून - भावः न उपजायते - दृश्यादृश्य कार्य उत्पन्न होत नाही - प्राणान् असंप्रयुंजतः - इंद्रियांस, मनास व प्राणास प्रेरणा न करणार्‍या पुरुषाचे - स्तिमितं मनः शाम्यति - स्तब्धता प्राप्त झालेले मन शांत, क्षोभशून्य होते - ॥२३॥ तस्मात् स्त्रीषु स्त्रैणेषु च इंद्रियैः संगः न कर्तव्यः - म्हणून स्त्रिया आणि स्त्रीसंगी पुरुष यांच्या ठायी इंद्रियांचा संयोग केव्हाही करू नये- च - कारण - विदुषां अपि षड्‌वर्गः अविश्रब्धः - मोठया ज्ञानी पुरुषांचे सुद्धा कामक्रोधादि सहा विकार विश्वास ठेवण्याला योग्य नसतात - किमु मादृशां - मग माझ्यासारख्यांची गोष्टच कशाला ? - ॥२४॥
जी वस्तू कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही, तिच्याबद्दल विकार उत्पन्न होत नाही जे विषयांबरोबर इंद्रियांचा संयोग होऊ देत नाहीत, असे मन निश्चल होऊन शांत होते म्हणून इंद्रियांचा स्त्रिया किंवा स्त्रीलंपट यांच्याशी संबंध येऊ देऊ नये माझ्यासारख्यांची गोष्ट कशाला, पण मोठमोठ्या विद्वानांच्या बाबतीत सुद्धा त्यांची इंद्रिये आणि मन विश्वास ठेवण्याजोगी नसतात. (२३-२४)


श्रीभगवानुवाच -
( मिश्र )
एवं प्रगायन् नृपदेवदेवः
     स उर्वशीलोकमथो विहाय ।
आत्मानमात्मन्यवगम्य मां वै
     उपारमत् ज्ञानविधूतमोहः ॥ २५ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणतात -
( इंद्रवज्रा )
बोलोनि राजेश्वर चित्ति ऐसे
     त्या उर्वशीचा परित्याग केला ।
ज्ञानोदयाने मिटलाहि मोह
     आत्मस्वरूपी मग शांत झाला ॥ २५ ॥

एवं प्रगायन् सः नृपदेवदेवः - याप्रमाणे तो जो चक्रवर्ती ऐल राजा त्याने हे गीत गाउन - अथो - नंतर - उर्वशीलोकं विहाय - उर्वशी वास्तव्य करीत होती तो लोक सोडून दिला - मां आत्मानं आत्मनि अवगम्य - मी जो परमात्मा त्याला आपल्या आत्मस्वरूपातच जाणले - ज्ञान विधूतमोहः उपारमत् वै - आत्मज्ञानाने सर्व मायामोह नाहीसा करून विषयापराङ्‌मुख झाला - ॥२५॥
भगवान श्रीकृष्ण म्हणतात - राजराजेश्वर पुरूरव्याच्या मनामध्ये जेव्हा अशा तर्‍हेचे उद्‌गार उमटू लागले, तेव्हा त्याने उर्वशीलोक सोडून दिला आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा मोह नाहीसा झाला नंतर त्याने आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला व तो शांत झाला. (२५)


( अनुष्टुप् )
ततो दुःसङ्गमुत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमान् ।
सन्त एवास्य छिन्दन्ति मनोव्यासङ्गमुक्तिभिः ॥ २६ ॥
( अनुष्टुप )
म्हणोनि बुद्धिमंतांनी कुसंग त्यजिणे सदा ।
संतांच्या सह राहोनी आसक्ति सर्व तोडिणे ॥ २६ ॥

ततः - याकरिता - दुःसंगं उत्सृज्य - दुष्टांची संगति सोडून देऊन - बुद्धिमान् - शहाणा जो त्याने - सत्सु सज्जेत - संतांची संगति धरावी - उक्तिभिः संतः - साधुलोक उपदेशी भाषणांनी - एतस्य - शहाण्याच्या - मनोव्यासङ्‌गं - मनात असणार्‍या विषयासक्तिचा - छिंदंति - उच्छेदच करतात - ॥२६॥
म्हणून बुद्धिमान पुरूषाने दुःसंग सोडून देऊन सत्संग धरावा संतपुरूष सदुपदेशाने मनातील आसक्ती नष्ट करतात. (२६)


सन्तोऽनपेक्षा मच्चित्ताः प्रशान्ताः समदर्शिनः ।
निर्ममा निरहङ्कारा निर्द्वन्द्वा निष्परिग्रहाः ॥ २७ ॥
निरपेक्षिच तो संत माझ्यात चित्त लाविता ।
प्रशांत समदर्शी तो अहिंसा स्पर्शिना तया ॥ २७ ॥

संतः अनपेक्षाः, - संत निस्पृह, - मच्चिताः, प्रशांताः, समदर्शिनः, - सर्वदा माझे ध्यान मनोभावे करणारे, विनयशील, राजारंकांस एकाच दृष्टीने पाहणारे, - निर्ममाः, निरहंकाराः, - ममत्वशून्य, अहंकारशून्य, - निर्द्वंद्वाः निष्परिग्रहाः - द्वैतातीत, कसलाही पाश न असणारे असतात -॥२७॥
संतांना कशाचीही अपेक्षा नसते त्यांचे चित्त माझे ठायी जडलेले असते ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात त्यांचे ठिकाणी मीमाझेपणा नसतो सुखदुःखादी द्वंद्वे त्यांना बाधत नाहीत तसेच ते कशाचाही संग्रह करीत नाहीत. (२७)


तेषु नित्यं महाभाग महाभागेषु मत्कथाः ।
सम्भवन्ति हिता नृणां जुषतां प्रपुनन्त्यघम् ॥ २८ ॥
संतांचे भाग्य ते काय सदा लीलेस गाति ते ।
सेविता हितची होते पाप नी ताप नष्टते ॥ २८ ॥

महाभाग - भाग्यशाली उद्धवा ! - तेषु महाभागेषु - त्या पुण्यशील संतांच्या वृंदात - नित्यं - नित्य - मत्कथाः संभवंति हि - माझ्या अवतारकथांचे श्रवणमननादि चालत असते - ताः जुषतां नृणां - त्या कथासेवन करणार्‍या पुरुषाचे सर्व पातक - अघं प्रपुनंति - त्या ह्या कथा धुवून टाकतात व जीवास शुद्ध करतात - ॥२८॥
हे भाग्यवान उद्धवा ! संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणार्‍या माझ्या कथा चालतात जे त्या ऐकतात, त्यांचे सगळे पाप नाहीसे होते. (२८)


ता ये श्रृण्वन्ति गायन्ति ह्यनुमोदन्ति चादृताः ।
मत्पराः श्रद्दधानाश्च भक्तिं विन्दन्ति ते मयि ॥ २९ ॥
भावे जे कीर्तनी गाती ऐकती अनुमोदिती ।
प्रेमभक्ती मिळे त्याला अनन्य मम ती अशी ॥ २९ ॥

ये आदृताः ताः - त्या आदरणीय कथांचे - श्रृण्वंति गायंति अनुमोदंति हि च - जे आदरपूर्वक श्रवण व गायन व अनुमोदन करतात - मत्पराः श्रद्दधानाः च - मत्पर व श्रद्धालु असतात - ते मयि भक्तिं विंदंति - त्या श्रद्धालूस माझ्या ठिकाणी प्रेमभक्ति उत्पन्न होते - ॥२९॥
जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचे श्रवण, गायन आणि कौतुक करतात, तसेच जे माझेच चिंतन करतात, तेच माझी भक्ती प्राप्त करून घेतात. (२९)


भक्तिं लब्धवतः साधोः किमन्यद् अवशिष्यते ।
मय्यनन्तगुणे ब्रह्मण्यानन्दानुभवात्मनि ॥ ३० ॥
आश्रयो गुण कल्याणी केवलानंद शुद्ध मी ।
ब्रह्म मी मजला ध्याता संतो कर्म न ते उरे ॥ ३० ॥

मयि अनंतगुणे - अनंत गुण असणारा मी सगुण - आनंदानुभवात्मनि - आनंदस्वरूप असणारा निर्गुण परमात्मा जो मी त्या माझ्या - ब्रह्मणि - ब्रह्मस्वरुपाची - भक्तिं लब्धवतः साधोः - भक्ति दृढ झालेल्या साधूला - किं अन्यत् अवशिष्यते - आणखी काय मिळवण्यासाठी कर्म अवश्य असते ? तात्पर्य तो कृतकृत्य होतो - ॥३०॥
अनंत गुणांचा आश्रय, आनंदानुभवस्वरूप अशा ब्रह्मरूप माझी भक्ती ज्याला प्राप्त झाली, त्या सत्पुरूषाला दुसरे मिळवावयाचे काय शिल्लक राहाते ? (३०)


यथोपश्रमाणस्य भगवन्तं विभावसुम् ।
शीतं भयं तमोऽप्येति साधून् संसेवतस्तथा ॥ ३१ ॥
त्या संता शरणी जाता भय अज्ञान संपते ।
आश्रया अग्निच्या जाता न थंडी नच तो तम ॥ ३१ ॥

भगवंतं विभावसुं उपाश्रयमाणस्य - भगवान अग्नीचा आश्रय करणार्‍याला - शीतं, भयं, तमः, यथा अप्येति - थंडी, भीति, अंधकार यांची पीडा होत नाही - तथा साधून संसेवतः - त्याप्रमाणे साधूंची उत्तम सेवा करणार्‍या साधकाला कसली भीति किंवा कर्तव्य उरत नाही - ॥३१॥
ज्याने अग्नीचा आश्रय घेतला, त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नसते, त्याप्रमाणे जे संतांना शरण जातात, त्यांची जडता, संसारभय आणि अज्ञान नाहीसे होते. (३१)


निमज्ज्योन्मज्जतां घोरे भवाब्धौ परमायनम् ।
सन्तो ब्रह्मविदः शान्ता नौर्दृढेवाप्सु मज्जताम् ॥ ३२ ॥
भवात बुडला त्याला शांत संतचि आश्रय ।
जशी त्या बुडत्या लागी जळात नाव तारिते ॥ ३२ ॥

घोरे भवाब्धौ निमज्ज्य उन्मज्जतां - घोर भवसागरात गटांगळ्या खाणार्‍यास - परं आयनं - उत्तम तारक - ब्रह्मविदः शांताः संतः - शांत व ब्रह्मज्ञ संतच होत - अप्सु मज्जतां दृढा नौः इव - पाण्यात बुडणार्‍याला जशी बळकट नौका तारते, त्याप्रमाणे - ॥३२॥
जशी पाण्यात बुडणार्‍या लोकांना बळकट नौकाच आश्रय असते, त्याप्रमाणे जे या घोर संसारसागरात गटांगळ्या खातात, त्यांच्यासाठी ब्रह्मवेत्ते शांत संतच आश्रय होत. (३२)


अन्नं हि प्राणिनां प्राण आर्तानां शरणं त्वहम् ।
धर्मो वित्तं नृणां प्रेत्य सन्तोऽर्वाग् बिभ्यतोऽरणम् ॥ ३३ ॥
अन्न जै रक्षिते प्राण्यां तसा दुःख्यासि रक्षि मी ।
परलोकी धनो धर्म तसे संत जगीं जना ॥ ३३ ॥

अन्नं हि प्राणिनां प्राणः - अन्न हे प्राण्यांचे जीवन आहे - आर्तानां शरणं तु अहं - दुःखित दीनांचा आधाररक्षक मी आहे - प्रेत्य नृणां धर्मः वित्तं - मेल्यावर प्राण्यांची दौलत म्हणजे त्यांचे धर्माचरण - संतः अर्वाक् बिभ्यतः अरणं - आगामी जन्ममरणाला भ्यालेल्या जीवास साधूच निर्भय करतात - ॥३३॥
जसे अन्नच प्राण्यांचे प्राण आहे, दीनांचा रक्षण करणारा मी आहे, माणसांचे परलोकामध्ये धर्म हेच धन आहे, त्याचप्रमाणे संसारामुळे भयभीत झालेल्यांसाठी संतजनच रक्षणकर्ते आहेत. (३३)


सन्तो दिशन्ति चक्षूंषि बहिरर्कः समुत्थितः ।
देवता बान्धवाः सन्तः सन्त आत्माहमेव च ॥ ३४ ॥
सूर्य जै दृष्टि दे लोकां संत तै देव दाविती ।
संत देव सखे तेची आत्मा नी मीहि त्या रुपी ॥ ३४ ॥

संतः चक्षूंषि दिशंति - संतमंडळ अनेक अंतर्बाह्य ज्ञानोपकारक साधने अस्तित्वात आणतात - समुत्थितः अर्कः बहिः - उगवलेला सूर्य बाहेरचे मात्र पाहणार्‍या नेत्राला उपकारक होतो - संतः देवताः, बांधवाः, - संतच सर्व देवता, सर्व आप्तेष्ट, - संतः आत्मा, - फार काय संत म्हणजे, प्रत्यक्ष आत्मा - अहं एव च - आणि संत म्हणजे परमात्मा ! तात्पर्य, संत सर्वश्रेष्ठ होत - ॥३४॥
जसा सूर्य उदय पावून लोकांच्या डोळ्यांना पाहाण्याची शक्ती देतो, त्याप्रमाणे संतपुरूष स्वतःला आणि भगवंतांना पाहाण्याची दृष्टी देतात संत हे अनुग्रहशील देवता आहेत संत आपले हित इच्छिणारे सुहृद आहेत संत आपले प्रियतम आत्मा आहेत किंबहुना संत म्हणजे मीच आहे. (३४)


वैतसेनस्ततोऽप्येवं उर्वश्या लोकनिस्पृहः ।
मुक्तसङ्गो महीमेतां आत्मारामश्चचार ह ॥ ३५ ॥
साक्षात्कार नृपां होता न स्पृही उर्वशीस तो ।
आसक्ति नष्टुनी हिंडे स्वानंदे पृथिवी वरी ॥ ३५ ॥

ततः - नंतर - एवं - याप्रमाणे - उर्वश्या लोकनिस्पृहः वैतसेनः अपि - उर्वशीभुवनाला अथवा तिचे अवलोकन, स्पर्श, प्रेम इत्यादिकाला वैतागलेला - मुक्तसंगः - व मुक्तसंग म्हणजे निःसंग झालेला - आत्मारामः - आत्मस्वरूपात रममाण होऊन - एतां महीं - या भूलोकावर - चचार ह - यथेष्ट संचार करीत राहिला - ॥३५॥
अशा रीतीने पुरूरव्याला आत्मसाक्षात्कार होताच त्याचे उर्वशीलोकाचे आकर्षण नाहीसे झाले त्याच्या सर्व आसक्ती नष्ट झाल्या आणि आत्म्यात रममाण होऊन तो या पृथ्वीवर वावरू लागला. (३५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे षड्‌विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP