|
श्रीमद् भागवत पुराण सत्त्वादिगुणत्रय वृत्तिनिरूपणम् - तिन्ही गुणांच्या वृत्तींचे निरूपण - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीभगवानुवाच -
गुणानामसमिश्राणां पुमान् येन यथा भवेत् । तन्मे पुरुषवर्येदं उपधारय शंसतः ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात - ( अनुष्टुप ) प्रत्येक व्यक्तिच्या अंगी वेगळे गुण तेज हो । स्वभाव भेद तो तेणे भेद ते ऐक सांगतो ॥ १ ॥
असमिश्राणां गुणानां - मिश्रण न झालेल्या गुणांपैकी - येन पुमान् यथा भवेत - ज्या गुणाने मानवी जीव जसा असतो - तत् इदं - ते हे सर्व - शंसतः मे - सांगणारा जो मी त्याजवळून - पुरुषवर्य - नरश्रेष्ठा - उपघारय - ऐकून घे - ॥१॥
भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पुरूषश्रेष्ठा कोणत्या गुणामुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो, ते मी तुला सांगतो लक्ष देऊन ऐक. (१)
शमो दमस्तितिक्षेक्षा तपः सत्यं दया स्मृतिः ।
तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा ह्रीर्दयादिः स्वनिर्वृतिः ॥ २ ॥
शम दमो तितिक्षा नी विवेक तप सत्य नी । दया तपो नि संतोष त्याग श्रद्धा नि लाज ती ॥ अनिच्छा दान विनयो सरलो आत्मरम्यता । वृत्ती या गुण सत्त्वाच्या उद्धवा प्रवरा पहा ॥ २ ॥
शमः, दमः, तितिक्षा, ईक्षा, - शम, दम, सहिष्णुता, विवेक, - तपः, सत्यं, दया, स्मृतिः, तुष्टिः, त्यागः, - तप, सत्य, दया, स्मरण, संतोष, वैराग्य, - अस्पृहा, श्रद्धा, र्हीः, दयादिः, स्वनिर्वृतिः - आस्तिकता, शिष्टसभ्यता, औदार्य, दयाप्रभृति आणि आत्मप्रेम हे सात्त्विक गुण होत ॥२॥
मनः संयम, इंद्रियनिग्रह, सहिष्णूता, विवेक, तप, सत्य, दया, स्मृती, संतोष, त्याग, विषयउपभोगांबद्दल अनिच्छा, श्रद्धा, लज्जा, आत्मरती, दान, विनय, सरलता इत्यादी सत्त्वगुणाच्या वृत्ती होत. (२)
काम ईहा मदस्तृष्णा स्तम्भ आशीर्भिदा सुखम् ।
मदोत्साहो यशःप्रीतिः हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥ ३ ॥
काम यत्न मदो तृष्णा धारिष्ट्य द्रव्य मेळिणे । भेदबुद्धी नि ते भोग युद्धोत्साह नि प्रेम नी ॥ पराक्रम तसे हास्य उद्योग रजवृत्ति त्या ॥ ३ ॥
कामः, ईहा, मदः, तृष्णा, - विषयेच्छा, सकाम कर्म, उन्मत्तपणा, दुराशा, - स्तंभः, आशीः, भिदा, सुखं, मदोत्साहः, - अहंमान्यता, सकाम भक्ति, भेदबुद्धि, विषयभोग, अपहारि युद्धप्रियता, - यशःप्रीतिः, हास्यं, वीर्यं, बलोद्यमः - यशाची आवड, ग्राम्य विनोदीपणा, वीर्य, बलप्रेरित उद्योग हे रजोगुण होत - ॥३॥
इच्छा, प्रयत्न, गर्व, लोभ, ताण, अपेक्षा, भेदबुद्धी, विषययोग, युद्ध इत्यादीसाठी गर्वयुक्त उत्साह, आपल्या यशावर प्रेम, हास्य, पराक्रम, हट्टाने उद्योग करणे इत्यादी रजोगुणाच्या वृत्ती होत. (३)
क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याच्ञा दम्भः क्लमः कलिः ।
शोकमोहौ विषादार्ती निद्राऽऽशा भीरनुद्यमः ॥ ४ ॥
क्रोध लोभ तसे खोटे हिंसा पाखंड नी श्रम । याचना कलहो शोक विषाद मोह दीनता ॥ अकर्म भय नी आशा तमोवृत्ति अशा पहा ॥ ४ ॥
क्रोधः, लोभः, अनृतं, हिंसा, - संताप, कंजूषता, असत्य, हिंसा, - याञ्चा, दंभः, क्लमः, कलिः, शोकमोहौ, - भिक्षावृत्ति, ढोंग, श्रम, कलह, रडणे, भ्रांतिष्ठ होणे, - विषादार्ती, निद्रा, आशा, भीः, अनुद्यमः - दुःख व दीनता, झोप, आशाळभूतपणा, भीति, आळस इ. वृत्ति तामसी होत ॥४॥
क्रोध, लोभ, मिथ्या भाषण, हिंसा, याचना, पाखंड, श्रम, भांडण, शोक, मोह, विषाद, दीनता, निद्रा, आशा, भय आळस इत्यादी तमोगुणीच्या वृत्ती होत. (४)
सत्त्वस्य रजसश्चैताः तमसश्चानुपूर्वशः ।
वृत्तयो वर्णितप्रायाः सन्निपातमथो श्रृणु ॥ ५ ॥
सत्त्व रज तमो वृत्ती वेगळ्या असती अशा । वृत्तीं या मेळ तो होता वृत्ति त्या ऐकणे कशा ॥ ५ ॥
एताः वर्णितप्रायाः वृत्तयः - ह्या वर्णन केलेल्या वृत्ति - अनुपूर्वशः - अनुक्रमाने - सत्त्वस्य रजसः च तमसः च - सत्त्व रज व तम या गुणांच्या स्वरूपवृत्ति होत - अथो - आता - संनिपातं श्रृणु - त्यांचे मिश्रस्वरूप ऐक - ॥५॥
अशाप्रकारे मी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या बहुतेक वृत्तींचे वर्णन केले आता त्यांच्या मिश्रणाने ज्या वृत्ती निर्माण होतात, त्यांचे वर्णन ऐक. (५)
सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः ।
व्यवहारः सन्निपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥ ६ ॥
मीपणात तिन्ही वृत्ती मन शब्द नि इंद्रिय । प्राणांच्या कारणे सर्व तिन्हिच्या वृत्ति होत त्या ॥ ६ ॥
तु - परंतु - उद्धव ‘अहं ’ इति, ‘मम ’ इति, या मतिः - मी व माझे ही जी बुद्धि सामान्यतः सर्व जीवांत असते, ती बुद्धि - सन्निपातः - मिश्रणाचे कार्य होय - मनोमात्रेंद्रियासुभिः - मन, पंचमहाभूतांचे घटकावयव, ज्ञानकर्मेंद्रिये आणि पंचप्राण या सात्त्विक तामसी व राजसी गुणात्मकांकडून - व्यवहारः सन्निपातः - जो व्यवहार होतो तोही मिश्रणकार्य होय - ॥६॥
उद्धवा ! तीन गुणांच्या मिश्रणानेच "मी" आणि "माझे" या प्रकारची बुद्धी उत्पन्न होते मन, शब्दादी विषय, इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने वृत्तींचा वव्यहार होतो. (६)
धर्मे चार्थे च कामे च यदासौ परिनिष्ठितः ।
गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥ ७ ॥
धर्मार्थ रमता कामी सत्त्वे श्रद्धे रजो गुणे । रति आणि तमे द्रव्य लाभतीगुण मिश्रित ॥ ७ ॥
यदा असौ धर्मे च अर्थे च कामे च परिनिष्ठितः - जेव्हा तो तो पुरुष धर्म, अर्थ, काम ह्या तीन पुरुषार्थांवर निष्ठा ठेऊन तदनुसार आचरण करतो - गुणानां संनिकर्षः अयं - तेव्हा तो तो त्या प्रत्येकाचा व्यवहार म्हणजे गुणांचे मिश्रणकार्य होय - श्रद्धा-रति-धनावहः - आणि त्याचे फल, श्रद्धा प्रेम आणि धनप्राप्ति यांत परिणत होते - ॥७॥
जेव्हा मनुष्य धर्म, अर्थ आणि काम हे पुरूषार्थ साध्य करण्यात तत्पर असतो, तेव्हा त्याला सत्त्वगुणापासून श्रद्धा, तमोगुणापासून धन आणि रजोगुणापासून प्रेम यांची प्राप्ती होते. हेही गुणांचेच मिश्रण होय. (७)
प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान् यर्हि गृहाश्रमे ।
स्वधर्मे चानु तिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥ ८ ॥
सकामनिष्ठ पुरुषा गृहस्थाश्रम प्रीय त्यां । तिन्हीही गुण मेळाने लाभले मानणे असे ॥ ८ ॥
यर्हि - जेव्हा - प्रवृत्तिलक्षणे - प्रवृत्ति हेच लक्षण आहे ज्याचे अशा संसारोत्पादक काम्य कर्मांत - गृहाश्रमे - गृहस्थाश्रमामध्ये - स्वधर्मे च - आणि वेदविहित नित्यकर्मांत - पुमान् निष्ठा अनुतिष्ठेत - पुरुष जी निष्ठा साचरण ठेवतो - सा हि गुणानां समितिः - ती त्या तिन्ही गुणांचे मिश्रण होय - ॥८॥
जेव्हा माणूस सकाम कामात किंवा गृहस्थाश्रमात किंवा स्वधर्मापालनात निष्ठा ठेवून ती ती कामे करतो, त्यावेळी सुद्धा त्याचे ठिकाणी तिन्ही गुणांचे मिश्रण आहे, असे समजावे. (८)
पुरुषं सत्त्वसंयुक्तं अनुमीयाच्छमादिभिः ।
कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम् ॥ ९ ॥
शांत जितेंद्रियो सत्त्वी कामना ठेविता मनी । रज मिश्रण ते होय क्रोध हिंसे तमो पहा ॥ ९ ॥
शमादिभिः पुरुषं - शमादि सात्त्विक गुण प्रकट असले म्हणजे तो मनुष्य - सत्त्वसंयुक्तं अनुमीयात् - सात्त्विक आहे असे अनुमान करावे - कामादिभिः रजोयुक्तं - काम, मद तृष्णाप्रभृति असतील तर तो मनुष्य राजसी - क्रोधाद्यैः तमसा युतं - क्रोध, लोभ वगैरे असतील तर तामसी अशी अनुमाने करावी - ॥९॥
माणसाच्या ठिकाणी शमदमादी गुणांवरून सत्त्वगुण, कामादी प्रवृत्तींवरून रजोगुण आणि कामक्रोध इत्यादींवरून तमोगुण प्रबल आहे, असे समजावे. (९)
यदा भजति मां भक्त्या निरपेक्षः स्वकर्मभिः ।
तं सत्त्वप्रकृतिं विद्यात् पुरुषं स्त्रियमेव वा ॥ १० ॥
नर नारी असो कोणी नैमित्तिक नि नित्य त्या । सकामे मजला ध्याता मानणे गुण सत्त्व तो ॥ १० ॥
स्वकर्मभिः - वेदविहित स्वकर्मांनी - मां भक्त्या यदा - जो माझी प्रेमळ उपासना - निरपेक्षः भजति - निष्कामत्वाने करतो - तं पुरुषं सत्त्वप्रकृतिं विद्यात् - त्या पुरुषाला सात्त्विक म्हणावे - स्त्रियं एव वा - स्त्रीही त्याप्रमाणेच सात्त्विक होय - ॥१०॥
पुरूष असो की स्त्री, जेव्हा निष्काम भावनेने आपल्या नित्यनैमित्तिक कर्मांनी माझी आराधना करते, तेव्हा ती व्यक्ती सत्त्वगुणी समजावी. (१०)
यदा आशिष आशास्य मां भजेत स्वकर्मभिः ।
तं रजःप्रकृतिं विद्याद् हिंसामाशास्य तामसम् ॥ ११ ॥
सकामे मजला ध्याता रजो गुणचि तो असे । शत्रूचा मृत्यु साधाया भजता तम तो असे ॥ ११ ॥
यदा - जेव्हा - आशिषः आशास्य - ऐहिक व स्वर्गीय विषयोपभोगांची लालसा ठेऊन - स्वकर्मभिः मां भजेत - वेदोक्त कर्मांनी जो माझे पूजन करतो - तं रजःप्रकृतिं विद्यात् - तो राजसी प्रकृतीचा पुरुष आहे असे जाणावे - हिंसां आशास्य तामसं - हिंसेची इच्छा ठेवणारा तो तामसी होय - ॥११॥
सकाम भावनेने आपल्या कर्मांनी माझे भजनपूजन करणारा रजोगुणी होय आणि जो शत्रुनाश इत्यादीसाठी माझे पूजन करतो, तो तमोगुणी समजावा. (११)
सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे ।
चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥ १२ ॥
गुणां रज तमा सत्त्वा कारणी चित्त ते असे । संबंध मम ना तेथे मोहाने बंध ते पडे ॥ १२ ॥
सत्त्वं रजः तमः इति गुणाः जीवस्य एव - सत्त्व, रज, व तम हे गुण जीवाचेच आहेत - मे न - माझे नव्हेत - चित्तजाः - हे जीवाच्या चित्तापासून निर्माण होतात - भूतानां सज्जमानः - भूतविषयांच्या ठिकाणी आसक्त होणारा पुरुष - यैः तु निबध्यते - ह्या सत्त्वादि गुणांनी बांधला जातो - ॥१२॥
सत्त्व, रज, तम हे तीन गुण जीवाचे आहेत, माझे परमात्म्याचे नव्हेत. हे प्राण्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात त्यांमध्ये आसक्त झाल्याने जीव संसारबंधनात बांधला जातो. (१२)
यद् इतरौ जयेत् सत्त्वं भास्वरं विशदं शिवम् ।
तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान् ॥ १३ ॥
सत्त्व प्रकाशको शांत स्वच्छ तो झाकतो रजें । तमाने वाढतो तेंव्हा सुख धर्म विभागती ॥ १३ ॥
यदा - जेव्हा - भास्वरं विशदं शिवं सत्त्वं - उज्वल, निर्मल व शुभकारी सत्त्वगुण - इतरौ जयेत् - रज आणि तम यांचा पराभव करील - तदा - तेव्हा - पुमान् - मनुष्य जो त्याचा - धर्म-ज्ञानादिभिः सुखेन युज्येत - धर्म, ज्ञान प्रभृतींशी सुखानेच संयोग होईल - ॥१३॥
सत्त्वगुण हा प्रकाशदायी, निर्मल आणि शांत आहे. तो जेव्हा रजोगुण आणि तमोगुण यांचा पराभव करून वाढतो, तेव्हा पुरूष सुख, धर्म, ज्ञान इत्यादींनी युक्त होतो. (१३)
यदा जयेत्तमः सत्त्वं रजः सङ्गं भिदा चलम् ।
तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥ १४ ॥
रजाने बुद्धिचा भेद आसक्ती हा स्वभाव तो । तमाने दबता सत्त्व वाढे रजगुणो तदा ॥ दुःख कर्म यशो लक्ष्मी संपन्न जीव होतसे ॥ १४ ॥
यदा संगं-भिदा बलं रजः - जेव्हा आसक्तीला व भेदबुद्धीला आणि बलाच्या अभिमानाला कारण होणारा रजोगुण - तमः सत्त्वं जयेत् - सत्त्व आणि तमोगुणावर सरशी करतो - तदा कर्मणा यशसा श्रिया दुःखेन युज्येत - तेव्हा पुरुषाची दुःखासह कर्म, यश आणि संपत्ति यांच्याशी गाठ पडते - ॥१४॥
रजोगुण भेदबुद्धीला कारणीभूत आहे आसक्ती आणि प्रवृत्ती हा त्याचा स्वभाव आहे जेव्हा तमोगुण आणि सत्त्वगुण यांच्यावर मात करून रजोगुण वाढतो, तेव्हा मनुष्य दुःख, कर्म, यश आणि आर्थिक संपन्नता यांनी युक्त होतो. (१४)
यदा जयेद् रजः सत्त्वं तमो मूढं लयं जडम् ।
युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥ १५ ॥
तयाचे रूप अज्ञान आलस्य मूढता तयी । दाबता रज नी सत्त्वा हिंसा शोकात तो बुडे ॥ १५ ॥
मूढं, लयं, जडं, तमः - मोह, अज्ञान, व आळस उत्पन्न करणारा तमोगुण - यदा रजः सत्त्वं जयेत् - जेव्हा सत्त्व व रज यांहून प्रबळ होतो - तदा शोकमोहाभ्यां - तेव्हा शोक आणि मोह यांसहवर्तमान - निद्रया हिंसया आशया युज्येत - निद्रा, क्रौर्य आणि मनोराज्य यांची संगती मिळते - ॥१५॥
अज्ञान हे तमोगुणाचे स्वरूप आहे. आळस आणि बुद्धीची मूढता हे त्याचे स्वभाव हाेेत जेव्हा तो वाढून सत्त्वगुण आणि रजोगुणाला मागे टाकतो, तेव्हा माणूस आकांक्षा शोक, मोह, हिंसा, निद्रा, आळस यांना वश होतो. (१५)
यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः ।
देहेऽभयं मनोऽसङ्गं तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥ १६ ॥
जधी चित्त प्रसन्नो नी निवृत्त शांतइंद्रियी । सत्त्वाची वृद्धि ती जाणा ते तत्त्व मज मेळिण्या ॥ १६ ॥
यदा चित्तं प्रसीदेत - जेव्हा चित्त प्रसन्न असते - च - आणि - इंद्रियाणां निर्वृतिः - ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये उपशम पावलेली असतात - देहे अभयं - शरीरात भ्रांतीचा लवलेश नसतो - मनः असंगं - मन आसक्तिशून्य असते - तत् - तेव्हा - मत्पदं सत्त्वं विद्धि - मत्पद प्राप्त करून देणारा सत्त्वगुण प्रकटला आहे असे समजावे - ॥१६॥
जेव्हा चित्त प्रसन्न असते, इंद्रिये शांत असतात, देह निर्भय असतो आणि मनामध्ये आसक्ती नसते, तेव्हा सत्त्वगुण वाढलेला आहे असे समजावे माझ्या प्राप्तीचे सत्त्वगुण हे साधन आहे. (१६)
विकुर्वन् क्रियया चाधीः अनिवृत्तिश्च चेतसाम् ।
गात्रास्वास्थ्यं मनो भ्रान्तं रज एतैर्निशामय ॥ १७ ॥
चंचलो नि असंतुष्ट विकारी मन भ्रांत तो । अस्वस्थ शरिरी ऐसा रजाने ग्रासिला असे ॥ १७ ॥
क्रियया विकुर्वन् आधीः च - कर्मामुळे विकार पावलेले चित्त गडबडले आहे - चेतसां अनिर्वृतिः च - कर्णनेत्रादि ज्ञानेंद्रिये अशांत आहेत - गात्रास्वास्थ्यं - हस्तपादादि कर्मेंद्रिये अस्वस्थ आहेत - मनः भ्रांतं - मनाला भ्रम झाला आहे - एतैः - या चिन्हांनी - रजः निशामय - रजोगुण प्रबल झाला आहे असे जाणावे - ॥१७॥
जेव्हा कर्म करीत असताना जीवाची बुद्धी चंचल, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट, कम]द्रिये अस्वस्थ आणि मन भ्रांत होते, तेव्हा रजोगुणाचा जोर वाढला आहे, असे समजावे. (१७)
सीदच्चित्तं विलीयेत चेतसो ग्रहणेऽक्षमम् ।
मनो नष्टं तमो ग्लानिः तमस्तदुपधारय ॥ १८ ॥
शब्दादी न कळे ज्याला खिन्न लीनचि जाहला । अज्ञान खेद तो वाढे समजा तम वाढता ॥ १८ ॥
सीदत् चित्तं चेतसः - अंतर्धान पावणारे स्मरणात्मक चित्त - ग्रहणे अक्षमं विलीयेत - ज्ञानाचे विषय घेण्याला असमर्थ झाल्यामुळे लीन होते - मनः नष्टं - संकल्पात्मक मन नाश पावते - तमः, ग्लानिः - अज्ञान वाढते, खिन्नता पसरते - तत् - तेव्हा - तमः उपधारय - तमोगुणाने राज्य प्रतिस्थापिले असे जाणावे - ॥१८॥
चित्त जेव्हा ज्ञानेंद्रियांच्या द्वारा शब्द इत्यादी विषय योग्य रीतीने समजण्यास असमर्थ ठरेल आणि खिन्न होऊन निराश होईल, मन सुन्न होईल, तसेच अज्ञान आणि खेद यांची वाढ होईल, तेव्हा तमोगुण वाढला आहे, असे समजावे. (१८)
एधमाने गुणे सत्त्वे देवानां बलमेधते ।
असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥ १९ ॥
देवता सत्त्ववृद्धीने असूर रज वाढता । तमे त्या राक्षसां शक्ती क्रमाने वाढते तशी ॥ १९ ॥
उद्धव - उद्धवा - सत्त्वे गुणे एधमाने - सत्त्वगुण उत्कर्ष पावला असता - देवानां बलं एधते - देवांचे, दैवी गुणांचे सामर्थ्य वाढते - रजसि असुराणां च - रजोगुणवृद्धीने असुरांचे आणि - तमसि रक्षसाम् - तमोगुणोत्कर्षाने राक्षसांचे व तद्गुणांचे बळ वाढते - ॥१९॥
उद्धवा ! सत्त्वगुण वाढल्यावर देवतांचे, रजोगुण वाढल्यावर असुरांचे आणि तमोगुण वाढल्यावर राक्षसांचे बळ वाढते. (वृत्तींमध्ये सुद्धा अनुक्रमे सत्त्व इत्यादी गुण वाढल्यावर देवत्व, असुरत्व आणि राक्षसत्वप्रधान, निवृत्ती, प्रवृत्ती किंवा मोह यांचे प्राबल्य दिसून येते). (१९)
सत्त्वाज्जागरणं विद्याद् रजसा स्वप्नमादिशेत् ।
प्रस्वापं तमसा जन्तोः तुरीयं त्रिषु सन्ततम् ॥ २० ॥
सत्त्वाने जागृती होय रजाने स्वप्न वाढती । तमे सुषुप्ति ती वाढे तुरियीं सारखे तिन्ही ॥ एकरस असा आत्मा जाणावा शुद्ध तोच की ॥ २० ॥
सत्त्वात् जंतोः जागरणं विद्यात् - सत्त्वगुणामुळे जीवाला जागृतावस्था प्राप्त होते असे जाणावे - रजसा स्वप्नं - तसेच रजोगुणामुळे स्वप्नस्थिति - तमसा प्रस्वापं आदिशेत् - आणि तमोगुणामुळे गाढ निद्रावस्था जीवाला प्राप्त होतात असे जाणावे - तुरीयं त्रिषु संततं - तुरीय म्हणजे जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तिन्ही अवस्थांत विद्यमान असणारी चवथी अवस्था होय - ॥२०॥
सत्त्वगुणामुळे जागृती, रजोगुणामुळे स्वप्न आणि तमोगुणामुळे सुषुप्ती असते, असे समजावे तुरीय अवस्था आत्मरूप असल्याने या तिहींमध्ये साक्षित्वाने एकरूप होऊन व्याप्त असते. (२०)
उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः ।
तमसाधोऽध आमुख्याद् रजसान्तरचारिणः ॥ २१ ॥
वेदज्ञ द्विज सत्वाने वरच्या लोकि पातती । तमे वृक्षादि त्या योनी मनुष्य योनि त्या रजें ॥ २१ ॥
सत्त्वेन ब्राह्मणाः जनः उपर्युपरि गच्छंति - सत्त्वगुणाच्या साह्याने वेदनिष्ठ ब्राह्मण श्रेष्ठ लोकापर्यंत लीलेने जातात - तमसा आमुख्यात् अधः अधः - तमोगुण असेल तर स्थावरपाषाणापर्यंतच्या अधोलोकास जावे लागते - रजसा अंतरचारिणः - रजोगुण असला म्हणजे भूलोक आणि भुवर्लोक यांमधील लोकांत म्हणजे भूलोकी जन्म येतो - ॥२१॥
वेदाभ्यासामध्ये तत्पर असणारे ब्राह्मण सत्त्वगुणाच्याद्वारे उत्तरोत्तर वरच्या लोकांमध्ये जातात तमोगुणामुळे जीवांना वृक्ष इत्यादींपर्यंतची अधोगती प्राप्त होते आणि रजोगुणामुळे मनुष्यशरीर प्राप्त होते. (२१)
सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः ।
तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः ॥ २२ ॥
सत्त्वात मरता स्वर्ग रजी त्या नरदेह हा । तमात मरता नर्क गुणातीतास मुक्ति ती ॥ २२ ॥
सत्त्वे प्रलीनाः स्वः यांति - सत्त्वगुण असता मृत झालेले स्वर्गी जातात - रजोलयाः नरलोकं - रजोगुण असता मृत प्राणी मनुष्यलोकी जन्मतात - तमोलयाः तु निरयं - तमोवृत्तीत मेल्यास नरकलोकी जाऊन पडतात - निर्गुणाः मां एव यांति - गुणशून्य वृत्तीत देह टाकल्यास माझ्या परमात्मरूपालाच प्राप्त होतात - ॥२२॥
सत्त्वगुणांच्या वृद्धीत मृत्यू आला असता स्वर्गाची प्राप्ती होते, रजोगुणाच्या वृद्धीत मृत्यू आलेल्याला मनुष्यलोक मिळतो आणि तमोगुणाची वृद्धी असताना ज्याला मृत्यू येतो, त्याला नरकाची प्राप्ती होते परंतु जे त्रिगुणातीत असतात, त्यांना माझीच प्राप्ती होते. (२२)
मदर्पणं निष्फलं वा सात्त्विकं निजकर्म तत् ।
राजसं फलसङ्कल्पं हिंसाप्रायादि तामसम् ॥ २३ ॥
निष्काम करिता कर्म सात्वीक परि जो फळा । इच्छितो रज तो जाणा कम नाशी असा तम ॥ २३ ॥
मदर्पणं निष्फलं वा निजकर्म तत् सात्त्विकं - मला अर्पण केलेले वा कामनारहित असलेले वेदोक्त स्वकर्म सात्त्विक असते - फलसंकल्पं राजसं - फलाच्या इच्छेने केलेले राजस असते - हिंसाप्रायादि तामसं - हिंसात्मक प्रभृति कर्म तामसी असते - ॥२३॥
जेव्हा आपल्या धर्मानुसार केलेले कर्म निष्काम किंवा मला समर्पित केले जाते, तेव्हा ते सात्त्विक होते ज्या कर्माच्या अनुष्ठानामध्ये एखाद्या फळाची अपेक्षा असते, तेव्हा ते राजस होते आणि कर्म करण्यात एखाद्याला त्रास देणे इत्यादी भाव असतो, तेव्हा ते तामसिक होते. (२३)
कैवल्यं सात्त्विकं ज्ञानं रजो वैकल्पिकं च यत् ।
प्राकृतं तामसं ज्ञानं मन्निष्ठं निर्गुणं स्मृतम् ॥ २४ ॥
कैवल्य सात्विको ज्ञान कर्ता राजस मानिती । शरीर तामसी मानी निर्गुणी रूप ते मम ॥ २४ ॥
कैवल्यं ज्ञानं सात्त्विकं - उपाधिशून्य ज्ञान सात्त्विक - यत् च वैकल्पिकं (तत्) रजः - सोपाधिक ज्ञान राजस - प्राकृतं ज्ञानं तामसं - प्राकृत म्हणजे निर्बुद्धाचे ज्ञान तामस - मन्निष्ठं निर्गुणं स्मृतं - परमात्मज्ञान निर्गुण होय - ॥२४॥
एकमेवाद्वितीय आत्म्याचे ज्ञान हे सात्त्विक ज्ञान होय देहयुक्त आत्मा कर्ता, भोक्ता आहे असे समजणे, हे राजस ज्ञान आहे आणि केवळ शरीरालाच आत्मा मानणे, हे तामस ज्ञान आहे आणि गुणातीत ज्ञान हे माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होय. (२४)
वनं तु सात्त्विको वासो ग्रामो राजस उच्यते ।
तामसं द्यूतसदनं मन्निकेतं तु निर्गुणम् ॥ २५ ॥
वनीं सात्विक तो राही गावात राजसी तसा । जुगारीं तमि तो राही मंदिरी निर्गुणा वसे ॥ २५ ॥
तु - आणि - वनं सात्त्विकः वासः - अरण्यवास सात्त्विक - ग्रामः राजसः - ग्रामवास राजस - द्यूतसदनं तामसं - जुगारी घरातील वास्तव्य तामसी - मन्निकेतं तु निर्गुणं उच्यते - परमात्मस्थानी वास्तव्य निर्गुण होय - ॥२५॥
वनात राहणे हा सात्त्विक निवास आहे, गावामध्ये राहाणे राजस आहे आणि जुगार इत्यादी चालणार्या घरात राहाणे हा तामस आहे आणि माझ्या मंदिरात राहाणे हा निर्गुण निवास आहे. (२५)
सात्त्विकः कारकोऽसङ्गी रागान्धो राजसः स्मृतः ।
तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः ॥ २६ ॥
अनासक्त अशा भावे सात्वीक कर्म ते करी । कामना धरुनी चित्ती राजसी कर्म ते करी ॥ तोडी परंपरा कर्मीं तामसी जाणणे तसा । माझ्याचि प्राप्तिच्या साठी निर्गुणी कर्म ते करी ॥ २६ ॥
असंगी - कर्मफलांचे ठिकाणी आसक्ति नसणारा - कारकः - कर्मकर्ता - सात्त्विकः - सात्त्विक होय - रागांधः - अत्यंत आसक्तिने अंध होऊन कर्म करणारा कर्ता - राजसः - राजस - स्मृतः - म्हटला आहे - स्मृतिविभ्रष्टः - पूर्वापरस्मृतिशून्य होऊन कर्म करणारा कर्मकर्ता - तामसः - तामस समजावा - मदपाश्रयः - तसेच केवळ माझ्या आश्रयाने निरभिमानाने कर्म करणारा कर्ता - निर्गुणः - निर्गुण होय - ॥२६॥
अनासक्त भावाने कर्म करणारा सात्त्विक होय अत्यंत आसक्त होऊन कर्म करणारा राजस होय कोणताही विचार न करता कर्म करणारा तामस होय आणि फक्त मलाच शरण येऊन कर्म करणारा निर्गुण समजावा. (२६)
सात्त्विक्याध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी ।
तामस्यधर्मे या श्रद्धा मत्सेवायां तु निर्गुणा ॥ २७ ॥
श्रद्धा तो आत्म ज्ञानाची सात्विको मानणे पहा । कर्म श्रद्धा रजाची नी अधर्मीं तामसी असे ॥ माझ्या सेवेत ज्या श्रद्धा श्रद्धा निर्गुण ती असे ॥ २७ ॥
आध्यात्मिकी श्रद्धा सात्त्विकी, कर्मश्रद्धा तु राजसी - अध्यात्मिका श्रद्धा सात्त्विक, पण कर्मासंबंधाने श्रद्धा राजस असते - अधर्मे या श्रद्धा (सा) तामसी - अधर्माचे ठिकाणी असणारी श्रद्धा तामसी असते - मत्सेवायां तु निर्गुणा - पण माझ्या सेवेच्या ठायी असणारी श्रद्धा निर्गुण असते - ॥२७॥
आत्मज्ञानविषयक श्रद्धा सात्त्विक, कर्मविषयक श्रद्धा राजस, अधर्माच्या ठिकाणी श्रद्धा तामस आणि माझी सेवा करण्यामध्ये श्रद्धा ही निर्गुण होय. (२७)
पथ्यं पूतमनायस्तं आहार्यं सात्त्विकं स्मृतम् ।
राजसं चेन्द्रियप्रेष्ठं तामसं चार्तिदाशुचि ॥ २८ ॥
पवित्र सात्त्विकी अन्न राजसी रुचियुक्त ते । दुःखदायी अपवित्र आहार तामसी असे ॥ २८ ॥
पथ्यं पूतं अनायस्तं आहार्यं सात्त्विकं, - हितकर, शुद्ध, स्वच्छ व सहज मिळालेले अन्न सात्त्विक, - इंद्रियप्रेष्ठं च राजसं, आर्तिदाशुचि च तामसं स्मृतं - इंद्रियांस प्रियकर असणारे राजस आणि त्रास देणारे व अस्वच्छ असणारे तामस होय - ॥२८॥
आरोग्यदायी, पवित्र आणि अनायासे मिळालेले भोजन सात्त्विक होय जिभेला रूचकर वाटणारे अन्न राजस होय आणि दुःखदायी व अपवित्र आहार तामस जाणावा. (२८)
सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् ।
तामसं मोहदैन्योत्थं निर्गुणं मदपाश्रयम् ॥ २९ ॥
आत्मचिंतनि ते सौख्य सात्त्विकी मानणे पहा । विषयी राजसी सौख्य दीन-अज्ञान तामसां ॥ माझ्या भेटीत ज्या सौख्य गुणातीतचि मानणे ॥ २९ ॥
आत्मोत्थं सुखं - आत्मसंबंधाने होणारे सुख सात्त्विक - विषयोत्थं तु राजसं - विषयांपासून होणारे राजस - मोह-दैन्य-उत्थं तामसं - मोहापासून व दैन्यापासून होणारे तामस - मदपाश्रयं निर्गुणं - माझ्या भक्तीच्या आश्रयापासून होणारे सुख निर्गुण होय - ॥२९॥
आत्मचिंतनाने प्राप्त होणारे सुख सात्त्विक, विषयांपासून प्राप्त होणारे राजस, मोह आणि दीनतेने प्राप्त होणारे सुख तामस आणि जे सुख माझ्या आश्रयाने मिळणारे ते गुणातीत समजावे. (२९)
द्रव्यं देशः फलं कालो ज्ञानं कर्म च कारकः ।
श्रद्धावस्थाकृतिर्निष्ठा त्रैगुण्यः सर्व एव हि ॥ ३० ॥
द्रव्य देश फलो काल अवस्था ज्ञान कर्म नी । कर्ता मनुष्य नी देव तनू त्या त्रिगुणात्मकी ॥ ३० ॥
द्रव्यं, देशः, फलं, कालः, - द्रव्य, देश, फल, काल, - ज्ञानं, कर्म च, कारकः, श्रद्धा, अवस्था, - ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा, अवस्था, - आकृतिः, निष्ठा, सर्वः एव हि त्रैगुण्यः - रूप, निष्ठा हे सर्व प्रत्येकी त्रिगुणात्मक आहे - ॥३०॥
वस्तू, स्थान, फल, काल, ज्ञान, कर्म, कर्ता, श्रद्धा अवस्था, निरनिराळी शरीरे आणि निष्ठा हे सर्व त्रिगुणात्मकच आहे. (३०)
सर्वे गुणमया भावाः पुरुषाव्यक्तधिष्ठिताः ।
दृष्टं श्रुतं अनुध्यातं बुद्ध्या वा पुरुषर्षभ ॥ ३१ ॥
पुरुष प्रकृती मध्ये आश्रीत सर्वभाव ते । गुणयुक्त तसे सर्व बुद्धिने कळती पहा ॥ ३१ ॥
पुरुषर्षभ - पुरुषश्रेष्ठ उद्धवा - पुरुष अव्यक्त-धिष्ठिताः - पुरुष आणि प्रकृति या उभयतांच्या अधिष्ठानावर विद्यमान असणारी - सर्वे भावाः गुणमयाः - दृश्यभास्ये म्हणजे भाव हे गुणात्मक-त्रिगुणरूप आहेत - दृष्टं श्रुतं बुद्ध्या वा अनुध्यातं - जे जे नेत्रांनी पाहातो, कर्णांनी ऐकतो, अथवा बुद्धीने चिंतितो - ते सर्व गुणात्मक आहे - ॥३१॥
हे पुरूषश्रेष्ठा ! पुरूष आणि प्रकृती यांच्या आश्रयाने असणारे सर्व पदार्थ गुणमय आहेत मग ते इंद्रियाच्या अनुभवाचे असोत, शास्त्रांनी सांगितलेले असोत अथवा बुद्धीने विचार केलेले असोत. (३१)
एताः संसृतयः पुंसो गुणकर्मनिबन्धनाः ।
येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः । भक्तियोगेन मन्निष्ठो मद्भवाय प्रपद्यते ॥ ३२ ॥
जीवांच्या गति नी योनी गुण कर्मेचि लाभती । चित्ताने गुण ते सर्व त्यजोनी मजला भजे ॥ तयासी मम हे रूप मोक्ष हा मिळतो पहा ॥ ३२ ॥
सौम्य - शांत उद्धवा - एताः पुंसः संसृतयः गुणकर्मनिबंधनाः - पुरुषाच्या मागे लागणार्या या बद्धक संसृति-जन्ममरणे-भ्रांति-गुणांनी आणि कर्मांनी उत्पन्न होतात - येन जीवेन इमे चित्तजाः गुणः निर्जिताः - ज्या जीवाने हे चित्तातच जन्म पावून विद्यमान असणारे सत्त्वादि गुण जिंकले - भक्तियोगेन मन्निष्ठः - भक्तियोगाने जो परमेश्वरनिष्ठ झाला - मद्भावाय प्रपद्यते - माझ्या निजरूपाप्रत प्राप्त होतो - ॥३२॥
जीवाला योनी किंवा गती त्या त्या गुणकर्मानुसार मिळतात हे सौम्य ! जो जीव चित्तात उत्पन्न होणार्या विकारांवर विजय मिळवतो, तो भक्तियोगाने माझ्यामध्ये निष्ठा ठेवतो आणि त्यामुळे माझे स्वरूप प्राप्त करून घेतो. (३२)
तस्मादद् देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम् ।
गुणसङ्गं विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः ॥ ३३ ॥
दुर्मीळ माणुसी देह ज्ञान विज्ञान मेळि हा । म्हणोनी त्यजिणे मोह भजणे नित्य ते मला ॥ ३३ ॥
तस्मात् - म्हणून - ज्ञानविज्ञानसंभवं इमं देहं लब्ध्वा - ज्या या नरदेहात ज्ञानाची व विज्ञानाची उत्पत्ति होणे संभवनीय आहे, तोच देह प्राप्त झाला असता - गुणसंगं विनिर्धूय - गुणांवरील आसक्ति पार नाहीशी करून - विचक्षणाः मां भजंतु - विवेकी लोक मद्भक्ति करण्यास प्रवृत्त होवोत - ॥३३॥
म्हणून शहाण्या माणसांनी तत्त्वज्ञान आणि साक्षात्कार यांची प्राप्ती करून देणारे हे मनुष्यशरीर मिळाल्यावर गुणांची आसक्ती दूर करून माझेच भजन करावे. (३३)
निःसङ्गो मां भजेद् विद्वान् अप्रमत्तो जितेन्द्रियः ।
रजस्तमश्चाभिजयेत् सत्त्वसंसेवया मुनिः ॥ ३४ ॥
सात्त्विकें जिंकिणे दोन्ही रज नी तम या गुणा । आसक्ति त्यजुनी सर्व भजणे नित्यची मला ॥ ३४ ॥
अप्रमतः, जितेंद्रियः - नेहमी दक्ष असून इंद्रियांचे संयमन करणार्या विवेकी पुरुषाने - विद्वानं मां निःसंगः भजेत् - माझे भजन निःसंग होऊन करावे - सत्त्वसंसेवया मुनिः - सत्त्वगुणाचा सादर स्वीकार करून व सत्त्वनिष्ठेने सात्त्विक आचरण करून - रजः तमः च अभिजयेत् - रज व तम या दोन्ही गुणांचा पराभव करावा - ॥३४॥
विचारवंताने सावध राहून सत्त्वगुण अंगीकारून रजोगुण आणि तमोगुण यांवर विजय मिळवावा इंद्रियांवर ताबा मिळवावा आणि आसक्ती सोडून माझ्या भजनी लागावे. (३४)
सत्त्वं चाभिजयेद् युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ।
सम्पद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम् ॥ ३५ ॥
योगाने जिंकिणे सत्व जीवाभावास सोडिणे । शांतवृत्ती अशी होता मिळे तो मजला पहा ॥ ३५ ॥
च - आणि - युक्तः शांतधीः नैरपेक्ष्येण सत्त्वं अभिजयेत् - आत्मनिष्ठ शांत वृत्ति होऊन निरपेक्षतेने सर्वस्वतंत्र आत्मज्ञानाने सत्त्वगुणाचाही पराभव करावा - गुणैः मुक्तः जीवः जीवं विहाय - याप्रमाणे गुणांपासून मुक्त झालेला जीव आपली जीवोपाधि सोडून - मां - मत्स्वरूपाप्रत - संपद्यते - प्राप्त होतो - ॥३५॥
चित्तवृत्ती शांत करून कोणतीही अपेक्षा न ठेवता सत्त्वगुणावरसुद्धा विजय मिळवावा, अशा प्रकारे गुणांपासून मुक्त होऊन जीव आपला जीवभाव सोडतो आणि माझ्याशी एकरूप होतो. (३५)
जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः ।
मयैव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥ ३६ ॥
एकतत्त्व धरी चित्ता त्यजोनी लिंगदेहही । ब्रह्मरूप असा आत्मा विषया नच ये कधी ॥ ३६ ॥
जीवविनिर्मुक्तः आशयसंभवैः गुणैः च - जीवनामक उपाधि व अंतःकरणात उत्पन्न होणारे गुण यांपासून मुक्त झालेला - मया एव ब्रह्मणा पूर्णः - ब्रह्म जो मी त्याने संपूर्ण झालेला - जीवः - जीव - न बहिः न अंतरः चरेत् - बाहेर म्हणजे दृश्य जगात व आंतर म्हणजे मनोराज्यात वावरतच नाही - ॥३६॥
जीवभावातून मुक्त झालेला जीव अंतःकरणात उत्पन्न होणार्या विकारांपासूनही मुक्त होतो आणि ब्रह्मस्वरूप माझ्याशी एकरूप होऊन पूर्ण होतो मग त्याचे कोठेही येणेजाणे होत नाही. (३६)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |