श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
चतुर्विंशोऽध्यायः

सांख्ययोगवर्णनम् -

सांख्ययोग -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
अथ ते सम्प्रवक्ष्यामि साङ्ख्यं पूर्वैर्विनिश्चितम् ।
यद्विज्ञाय पुमान् सद्यो जह्याद् वैकल्पिकं भ्रमम् ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
आता मी सांख्यशास्त्राच्या निर्णया सांगतो पुढे ।
पूर्वी निश्चय तो झाला ऋषिंचा श्रेष्ठ हा असा ॥ १ ॥

अथ पूर्वविनिश्चितं सांख्यं - यानंतर आता मी ज्या सांख्य-शास्त्राची पूर्वी महर्षींनी निश्चयेकरून स्थापना केली ते - ते - तुला - संप्रवक्ष्यामि - सांगतो - यत् विज्ञाय - जे सांख्यदर्शन जाणले असता - पुमान् - विवेकी पुरुष - सद्यः - तत्काल - वैकल्पिकं भ्रमं - विकल्प उत्पन्न करणारा भ्रम - जह्यात् - सोडून देण्याला समर्थ होतो - ॥१॥
श्रीभगवान म्हणतात, प्राचीन काळच्या ऋषींनी ज्याचा निश्चय केला आहे, ते सांख्यशास्त्र मी तुला सांगतो हे जाणले असता मनुष्य काल्पनिक भेदरूप भ्रम ताबडतोब सोडून देतो. (१)


आसीज्ज्ञानमथो अर्थ एकमेवाविकल्पितम् ।
यदा विवेकनिपुणा आदौ कृतयुगेऽयुगे ॥ २ ॥
आदि सत्ययुगा मध्ये विवेकपूर्ण लोक ते ।
द्रष्टा दृश्य जग्गजीव ब्रह्मपूर्णचि पाहती ॥ २ ॥

अयुगे - युगाच्या पूर्वी - ज्ञानं अथो अर्थः - ज्ञान आणि सर्व अर्थ म्हणजे ज्ञेय ही दोन्ही - एकं एव - एकच एकरूप - अविकल्पितं आसीत् - आणि भेदशून्य होती - आदौ कृतयुगे - सर्वारंभी असणार्‍या कृतयुगात - यदा विवेकनिपुणाः - ज्यावेळी लोक विवेकी असतात त्यावेळी ज्ञानज्ञेय एकरूपच असते - ॥२॥
अगदी सुरूवातील जेव्हा प्रलयकाल होता, तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मिळून एकच तत्त्व होते नंतर जेव्हा कृतयुग आले, तेव्हाही विवेकी लोकांच्या दृष्टीने एकच आत्मतत्त्व होते. (२)


तन्मायाफलरूपेण केवलं निर्विकल्पितम् ।
वाङ्‌मनोऽगोचरं सत्यं द्विधा समभवद् बृहत् ॥ ३ ॥
विकल्पहीन ते ब्रह्म केवलो एक सत्य ते ।
न गावे वाणि वित्ताला जीव हे प्रतिबिंब की ॥ ३ ॥

सत्यं बृहत् - सत्य सर्वव्यापी - केवलं - एकजिनसी - निर्विकल्पितं - भेदाभेदशून्य - तत् - ते ब्रह्म - मायाफलरूपेण - माया=दृश्य व फल या रूपांनी - वाङ्‌मनोगोचरं द्विधा समभवत् - वाणीला व मनाला गोचर होणारे द्विधा झाले - ॥३॥
कोणत्याही प्रकारचा भेद नसलेले ते सत्य ब्रह्म होते, मन किंवा वाणी यांना ते कळत नव्हते माया आणि तीत प्रतिबिंबित झालेल्या जीवाच्या रूपाने दृश्य आणि द्रष्टा या दोन भागात ते विभागले गेले. (३)


तयोरेकतरो ह्यर्थः प्रकृतिः सोभयात्मिका ।
ज्ञानं त्वन्यतमो भावः पुरुषः सोऽभिधीयते ॥ ४ ॥
प्रतिबिंब असे विश्व कार्यकारणरूप ते ।
ज्ञास्वरूप दुसरे पुरुष म्हणणे तया ॥ ४ ॥

तयोः एकतरः हि अर्थः प्रकृतिः - त्या दोन प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे प्रकृति होय - सा उभयात्मिका - ती प्रकृति दोन जातीची असते - ज्ञानं तु अन्यतमः भावः - पण ज्ञान हा दुसरा प्रकार होय - सः ‘पुरुषः ’ अभिधीयते - त्याला पुरुष असे म्हणतात - ॥४॥
त्यांपैकी एका वस्तूला प्रकृती म्हणतात तिनेच जगामध्ये कार्य आणि कारण अशी दोन रूपे धारण केली दुसरी वस्तू म्हणजे ज्ञानस्वरूप जीवात्मा त्याला पुरूष म्हणतात. (४)


तमो रजः सत्त्वमिति प्रकृतेरभवन् गुणाः ।
मया प्रक्षोभ्यमाणायाः पुरुषानुमतेन च ॥ ५ ॥
जीवांचे कर्म काणोनी प्रकृती क्षुब्ध केलि मी ।
सत्त्व रज तमो ऐसे जाहले गुण तीन ते ॥ ५ ॥

मया पुरुषानुमतेन च प्रक्षोभ्यमाणायाः प्रकृतेः - मी आणि जीवांचे मत यांनी प्रक्षुब्ध केली म्हणजे प्रेरित केली जी माया तिच्यापासून - तमः रजः सत्त्वं इति गुणाः अभवन् - तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण प्रकट झाले - ॥५॥
जीवांच्या शुभअशुभ कर्मांनुसार मीच प्रकृतीला प्रक्षुब्ध केले तेव्हा तिच्यापासून सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण प्रगट झाले. (५)


तेभ्यः समभवत् सूत्रं महान् सूत्रेण संयुतः ।
ततो विकुर्वतो जातो अहङ्कारो विमोहनः ॥ ६ ॥
तयातुनि क्रियासूत्र नि ज्ञानशक्ति जाहली ।
विकारे त्यातुनि व्यक्त अहंकारचि मोह तो ॥ ६ ॥

तेभ्यः सूत्रं समभवत् - त्या गुणांच्या वैषम्याने सूत्र प्रकट झाले - सूत्रेण महान् संयुतः - सूत्र आणि महत् यांचा संयोग झाला - ततः विकुर्वतः - नंतर विकृतरूप असलेल्या संयोगापासून - अहंकारः जातः - अहंकार उत्पन्न झाला - यः विमोहनः - हा अहंकारच मोहाचा कारक आहे - ॥६॥
त्यांच्यापासून क्रियाशक्तिप्रधान सूत्र आणि ज्ञानशक्तिप्रधान महतत्त्व हे प्रगट झाले हे दोघे एकमेकांत मिसळलेलेच आहेत महत्तत्त्वापासून अहंकार उत्पन्न झाला हा अहंकारच जीवांना मोह उत्पन्न करतो. (६)


वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिवृत् ।
तन्मात्रेन्द्रियमनसां कारणं चिदचिन्मयः ॥ ७ ॥
सत्त्व रज तमो तीन तयाचे भेद हे असे ।
तयाचे पंचतन्मात्रे इंद्रिये मन जाहले ॥ ७ ॥

वैकारिकः, तेजसः च, तामसः च इति त्रिवृत् अहं - वैकारिक, तेजस आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार असतो - चिदचिन्मयः - तो चित् आणि अचित् म्हणजे अजड व जड या उभयतांनी बनलेला आहे - तन्मात्रेंद्रियमनसां कारणं - तो तन्मात्रा, इंद्रिये व मन यांच्या उत्पत्तीचे कारण असतो - ॥७॥
तो अहंकार सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे पंचतन्मात्रा, इंद्रिये आणि मन ही अहंकाराची कार्ये आहेत म्हणून तो जडचेतन असा उभयात्मक आहे. (७)


अर्थस्तन्मात्रिकाज्जज्ञे तामसादिन्द्रियाणि च ।
तैजसाद् देवता आसन् एकादश च वैकृतात् ॥ ८ ॥
तमऽहंकार तन्मात्रे पाचभूतेही जाहली ।
रजाच्या पासुनी तैसी इंद्रिये जाहली पहा ॥
अधिष्ठात्रे असे देव इंद्रिये सत्वि जाहले ॥ ८ ॥

तामसात् तन्मात्रिकात् अर्थः जज्ञे - तमोमय तन्मात्रांपासून पृथ्वीप्रभृति पंचमहाभूते झाली - तैजसात् इंद्रियाणि च - व तैजसापासून ज्ञानकर्मेंद्रिये - वैकृतात् एकादश देवताः च आसन् - आणि वैकृतापासून अकरा इंद्रियांवर स्वामित्व ठेवणार्‍या देवता उत्पन्न झाल्या - ॥८॥
तामस अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि त्यांपासून पंच महाभूते उत्पन्न झाली राजस अहंकारापासून इंद्रिये आणि सात्त्विक अहंकारापासून इंद्रियांच्या अधिष्ठात्या अकरा देवता प्रगट झाल्या. (८)


मया सञ्चोदिता भावाः सर्वे संहत्यकारिणः ।
अण्डं उत्पादयामासुं ममायतनमुत्तमम् ॥ ९ ॥
माझ्याचि प्रेरणेने ते पुन्हा एकत्र जाहले ।
ब्रह्मांड अंड ते झाले मम उत्तम गेह जे ॥ ९ ॥

मया संचोदिताः - मी प्रेरणा केलेले - सर्वे भावाः संहत्यकारिणः - सर्व महतत्त्वादि भाव क्रियाशक्तीने एकत्र झाले - अंडं - त्यांनी एक अंडे - उत्पादयामासुः - उत्पन्न केले - मम उत्तमं आयतनं - ते अंडे माझे राहण्याचे उत्तम स्थान होय - ॥९॥
माझ्या प्रेरणेने हे सर्व पदार्थ एकत्र होऊन एकमेकात मिसळले गेले आणि त्यांनी ब्रह्मांडरूप अंडे उत्पन्न केले हे ब्रह्मांड माझे उत्तम निवासस्थान आहे. (९)


तस्मिन् अहं समभवं अण्डे सलिलसंस्थितौ ।
मम नाभ्यामभूत् पद्मं विश्वाख्यं तत्र चात्मभूः ॥ १० ॥
जळात स्थिरल्या अंडी नारायण विराजलो ।
नाभीच्या विश्वपद्मात ब्रह्मा तो प्रगट पुन्हा ॥ १० ॥

तस्मिन् सलिलसंस्थितौ अंडे - त्या जलात असणार्‍या अंडयामध्ये - अहं समभवं - मी प्रकट झालो - मम नाभ्यां विश्वाख्यं पद्मं अभूत् - माझ्या नाभीमधून एक विश्वनामक कमल उत्पन्न झाले - तत्र च आत्मभूः - आणि त्या कमलात स्वयंभु ब्रह्मदेव उत्पन्न झाला - ॥१०॥
जेव्हा ते अंडे पाण्यामध्ये स्थिर झाले, तेव्हा मीच नारायणरूपाने त्यात विराजमान झालो माझ्या नाभीपासून विश्वकमळाची उत्पत्ती झाली त्यावर ब्रह्मदेव प्रगट झाला. (१०)


सोऽसृजत्तपसा युक्तो रजसा मदनुग्रहात् ।
लोकान् सपालान् विश्वात्मा भूर्भुवः स्वरिति त्रिधा ॥ ११ ॥
ब्रह्म्याने तप ते केले प्रसाद मम लाभता ।
त्रिलोक लोकपालांना तयाने निर्मिले पुन्हा ॥ ११ ॥

रजसा युक्तः सः विश्वात्मा - रजोगुणाने युक्त असलेल्या त्या विश्वात्म ब्रह्मदेवाने - तपसा - तप केले - मदनुग्रहात् - माझ्या अनुग्रहाने - सपालान् लोकान् असृजत - अध्यक्ष देवतांसह लोक म्हणजे भुवने उत्पन्न केली - भूः भुवः स्वः इति त्रिधा - भूलोक, भुवर्लोक, आणि स्वर्गलोक असे तीन प्रकार त्या भुवनांचे आहेत - ॥११॥
विश्वरूप ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि माझ्या कृपेने रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या तीन लोकांची व त्यांच्या लोकपालांची निर्मिती केली. (११)


देवानामोक आसीत् स्वर्भूतानां च भुवः पदम् ।
मर्त्यादीनां च भूर्लोकः सिद्धानां त्रितयात् परम् ॥ १२ ॥
देवता राहती स्वर्गी अंतरिक्षात भूत ते ।
भुमीसी माणसे तैसे सिद्धांचे अन्य लोकही ॥ १२ ॥

स्वः देवानां ओकः आसीत् - स्वर्गलोक देवांच्या राहण्याचा लोक आहे - भुवः च भूतानां पदं - भुवर्लोक हे भूतांचे स्थान आहे - भूः मर्त्यादीनां लोकः च - आणि भूमि ही मनुष्यादि प्राण्यांचे भुवन आहे - सिद्धानां त्रितयात् परं - या तीन भुवनांच्या पलीकडे सिद्ध राहतात - ॥१२॥
देवतांचे निवासस्थान स्वर्ग, भूतप्रेतांचे अंतरिक्ष आणि मनुष्य इत्यादींसाठी पृथ्वी हे स्थान ठरविले या तीन लोकांच्या वरच्या बाजूला महर्लोक इत्यादी सिद्धींची निवासस्थाने ठरविली. (१२)


अधोऽसुराणां नागानां भूमेरोकोऽसृजत् प्रभुः ।
त्रिलोक्यां गतयः सर्वाः कर्मणां त्रिगुणात्मनाम् ॥ १३ ॥
नाग नी असुरां तेणे सात पाताळ निर्मिले ।
कर्माने गति ती लाभे त्रिलोकी राहण्या तशी ॥ १३ ॥

भूमेः अधः - भूलोकाच्या खाली - असुराणां नागानां ओकः प्रभुः असृजत् - पाताळात असुर लोक व नागलोक राहतात - त्रिगुणात्मनां कर्मणां - सत्त्वादि गुणांनी प्रेरित केलेल्या सर्व कर्मांचे - सर्वाः गतयः - फलसर्वस्व - त्रिलोक्यां - भूर्भुवादि तीन लोकांतच मिळते - ॥१३॥
ब्रह्मदेवाने असुर आणि नागांच्यासाठी पृथ्वीच्या खाली लोक तयार केले या तिन्ही लोकांमध्ये त्रिगुणात्मक कर्मांना अनुसरून जीवांना निरनिराळ्या गती प्राप्त होतात. (१३)


योगस्य तपसश्चैव न्यासस्य गतयोऽमलाः ।
महर्जनस्तपः सत्यं भक्तियोगस्य मद्‌गतिः ॥ १४ ॥
तपस्या योग संन्यासे महर्जन तपास नी ।
वैकुंठ मम ते धाम माझ्या भक्तीत लाभते ॥ १४ ॥

योगस्य तपसः च एव न्यासस्य - परंतु योग तप आणि संन्यास यांपासून निर्माण होणारी - गतयः - फले - अमलाः - गुणमलाने दूषित झालेली नसतात - महः, जनः, तपः, सत्यं - त्या निर्मळ गति म्हणजे महर्लोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक यांची प्राप्ति होय - भक्तियोगस्य मद्‌गतिः - माझी भक्ति युक्तत्वाने करणार्‍या भक्ताला माझा लोक व माझे स्वरूप ही प्राप्त होतात - ॥१४॥
योग, तपश्चर्या आणि संन्यास यांचेद्वारा महर्लोक, जनलोक, तपोलोक व सत्यलोकरूप उत्तम गती प्राप्त होते आणि भक्तियोगाने माझे परम धाम प्राप्त होते. (१४)


मया कालात्मना धात्रा कर्मयुक्तमिदं जगत् ।
गुणप्रवाह एतस्मिन् उन्मज्जति निमज्जति ॥ १५ ॥
कर्मयुक्त जगत सर्व काळ मी फळ देतसे ।
प्रवाही बुडतो जीव कधी येतो वरी तसा ॥ १५ ॥

कालात्मना धात्रा मया - काळस्वरूपी जो मी सर्वकर्ता परमेश्वर त्याने - इदं जगत् - हे भूर्भुवादि लोक - कर्मयुक्तं - कर्मानेच जीवास प्राप्त व्हावे अशी योजना केली आहे - एतस्मिन् गुणप्रवाहे - या विश्वातील लोक सत्त्वादि तीन्ही गुणांच्या प्रवाहात - उन्मज्जति निमज्जति - वर येतात व खाली जातात - ॥१५॥
हे कर्मयुक्त जग कर्मफल देणार्‍या कालरूप माझ्यामुळे या गुणप्रवाहात कधी वर तर कधी अधोगतीला जाते. (१५)


अणुर्बृहत् कृशः स्थूलो यो यो भावः प्रसिध्यति ।
सर्वोऽप्युभयसंयुक्तः प्रकृत्या पुरुषेण च ॥ १६ ॥
सान थोर असे सर्व काळ मी फळ देतसे ।
प्रवाही बुडतो जीव कधी येतो वरी तसा ॥ १६ ॥

अणुः, बृहत्, कृशः, स्थूलः - लहान, मोठा, कृश आणि लठठ अशा प्रकारचा - यः यः भावः - जो जो भाव - प्रसिद्‌ध्‌यति - पदार्थ प्रकट होतो - सर्वः अपि - तो तो म्हणजे सर्व पदार्थ - प्रकृत्या पुरुषेण च उभयसंयुक्तः - प्रकृति आणि पुरुष या उभयतांच्या संयोगाने सिद्ध झालेला असतो - ॥१६॥
लहानमोठे, कृशस्थूल असे जे जे पदार्थ उत्पन्न होतात, ते सर्व प्रकृती आणि पुरूष या दोघांच्या संयोगानेच. (१६)


यस्तु यस्यादिरन्तश्च स वै मध्यं च तस्य सन् ।
विकारो व्यवहारार्थो यथा तैजसपार्थिवाः ॥ १७ ॥
यदुपादाय पूर्वस्तु भावो विकुरुतेऽपरम् ।
आदिरन्तो यदा यस्य तत् सत्यमभिधीयते ॥ १८ ॥
आदी मध्ये नि अंती जे राहते सत्य ते असे ।
विकार कल्पनामात्र सत्य माती घटीं जशी ॥ १७ ॥
अहंकारादि तत्त्वाने जन्मते सृष्टि सर्वही ।
आदी अंती उरे तत्त्व म्हणोनी सत्य ते असे ॥ १८ ॥

यस्य यः तु आदिः, अंतः च - जो ज्याचे आदि म्हणजे उत्पत्तिकारण आहे व लयस्थानही आहे - तस्य सः मध्यं च वै - तो त्याचे मध्यही निश्चयाने असतो - सन् - तोच सत् असतो - विकारः व्यवहारार्थः - सर्व प्रकारचे विकार व्यवहाराला मात्र उपकारक होतात - यथा तैजसपार्थिवाः - उदाहरणार्थ तेजाचे म्हणजे सुवर्णप्रभृतींचे व पार्थिव म्हणजे मृत्तिकेचे विकार म्हणजे कुंडलादि व घटादि कार्ये व्यवहाराला उपयोगी होतात - ॥१७॥ तु यत् उपादाय - परंतु ज्याचा उपादानरूपाने स्वीकार करून - पूर्वः भावः - पूर्वी असणारे निमित्त कारण - अपरं - अपराला म्हणजे कार्याला - विकुरुते - उपादानातून उत्पन्न करते - यदा यस्य आदिः अंतः - ज्यावेळी ते ज्याचे आदि-अंती असते - तत् सत्यं (इति) अभिधीयते - त्याला सत्य असे म्हणतात - ॥१८॥
ज्याच्या सुरूवातीला आणि शेवटी जे असते, तेच मध्ये असते आणि तेच सत्य आहे कार्य ही फक्त व्यवहारासाठी केलेली कल्पना आहे जशी बांगड्याकुंडले इत्यादी सोन्याची कार्ये किंवा घडागाडगे इत्यादी मातीची कार्ये पहिला कारण पदार्थ ज्या परम कारणाच्या आधाराने पुढील कार्यपदार्थाला उत्पन्न करतो, तेच परमकारण केवळ सत्य असते कारण तेच कार्याच्या आधी आणि शेवटीही असते. (जसा भिजलेला मातीचा गोळा घड्याचे कारण असतो पण तो मूळ माती या परमकारणाच्या आधाराने घडारूप कार्याचे कारण बनतो भिजलेल्या गोळ्याच्या आधी माती, गोळ्यात माती, घड्यात माती आणि घडा फुटल्यावरही मातीच असते म्हणून मातीच सत्य होय). (१७-१८)


प्रकृतिर्यस्य उपादानं आधारः पुरुषः परः ।
सतोऽभिव्यञ्जकः कालो ब्रह्म तत्त्रितयं त्वहम् ॥ १९ ॥
प्रकृतीने मिळे सृष्टी काळ हा निर्मितो तिला ।
व्यव्हार काल नी तत्त्व मीही शुद्धचि ब्रह्म ते ॥ १९ ॥

अस्य सतः प्रकृतिः हि उपादानं - त्या सत्याचे प्रकृति हे उपादान कारण आहे - परः पुरुषः आधारः - परम पुरुष त्या सत्याचाच आधार असतो - कालः अभिव्यंजकः - गुण प्रकट करणारा काल आहे - तु तत् त्रितयं - परंतु प्रकृति, परम पुरुष, काल ही त्रयी - अहं ब्रह्म - मीच ब्रह्म आहे - ॥१९॥
या प्रपंचाचे उपादनकारण प्रकृती आहे, आधार परमात्मा आहे आणि यांना प्रगट करणारा काल आहे प्रकृती, परमपुरूष आणि काल ही तिन्ही रूपे खरे पाहता ब्रह्मस्वरूपच आहेत आणि तेच शुद्ध ब्रह्म मी आहे. (१९)


सर्गः प्रवर्तते तावत् पौवापर्येण नित्यशः ।
महान् गुणविसर्गार्थः स्थित्यन्तो यावदीक्षणम् ॥ २० ॥
परमात्मा जधी पाही तदा तो सर्व रक्षितो ।
पिता पुत्रादि रूपाने सृष्टिचे चक्र हे फिरे ॥ २० ॥

यावत् ईक्षणं - जोपर्यंत परमेश्वराची ईक्षणक्रिया चालते - तावत् - तोपर्यंत - पौर्वापर्येण - कारण-कार्यरूपाने - महान् सर्गः - हा प्रचंड प्रपंचव्यवहार - नित्यशः - नित्य, अखंड - प्रवर्तते - चालतो - गुणविसर्गार्थः - हा सृष्टिक्रम गुणविसर्गासाठी मात्र चालत असतो - स्थित्यंतः - सृष्टिक्रम स्थितीच्या शेवटपर्यंत चालतो - ॥२०॥
जोपर्यंत परमात्म्याची ईक्षणशक्ती आपले काम करीत राहाते, तोपर्यंत जीवांच्या कर्मभोगासाठी कारणकार्यरूपाने हे विविध सृष्टिचक्र अखंड चालू राहाते. (२०)


विराण्मयाऽऽसाद्यमानो लोककल्पविकल्पकः ।
पञ्चत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह ॥ २१ ॥
विराट रंगभूमी ही सर्व लोकांस लाभली ।
संकल्पी प्रलया मी तै विनाशा सर्व पावती ॥ २१ ॥

मया आसाद्यमानः - मी ज्याला व्यापितो, तो - लोककल्पविकल्पकः - लोकांचे उदयास्त करणारा - विराट् - विराट् म्हणजे ब्रह्मांड - भुवनैः सह - १४ भुवनांसह - पंचत्वाय विशेषाय कल्पते - पंचमहाभूतरूप विभागाला योग्य होतो - ॥२१॥
मी कालरूपाने हे ब्रह्मांड व्यापलेले असते, तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती व संहार होत असतात जेव्हा मी प्रलय करण्याचा संकल्प करतो, तेव्हा ब्रह्मांड भुवनांसह विनाशाला योग्य होते. (२१)


अन्ने प्रलीयते मर्त्यं अन्नं धानासु लीयते ।
धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गन्धे प्रलीयते ॥ २२ ॥
प्राण्यांचे देह ते अन्नी अन्न बीजात लोपते ।
बीज भूमीत भूमी ती गंधात लोप पावते ॥ २२ ॥

अन्ने मर्त्यं प्रलीयते - मर्त्यशरीर अन्नामध्ये लीन होते - धानासु अन्नं लीयते - अन्नाचा धान्यबीजात लय होतो - धान्यः भूमौप्रलीयंते - बीजे भूमीत लय पावतात - भूमिः गंधे प्रलीयते - भूमी गंधगुणात लीन होते - ॥२२॥
विनाशाच्या वेळी प्राण्यांचे शरीर अन्नामध्ये, अन्न बीजामध्ये, बीज भूमीमध्ये आणि भूमी गंधतन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते. (२२)


अप्सु प्रलीयते गन्ध आपश्च स्वगुणे रसे ।
लीयते ज्योतिषि रसो ज्योती रूपे प्रलीयते ॥ २३ ॥
पाण्यात मिसळे गंध रसाळ जळ ते मिळे ।
रस तेजीं तसे तेज रूपात लीन होतसे ॥ २३ ॥

गंधः अप्सु प्रलीयते - गंध जलामध्ये लीन होते - आपः स्वगुणे रसे च - जल रसात लीन होते - रसः ज्योतिषि लीयते - जलरस तेजामध्ये लीन होतात - ज्योतिः रूपे प्रलीयते - तेज रूपामध्ये विलीन होते - ॥२३॥
गंध पाण्यामध्ये, पाणी आपला गुण जो रस त्यामध्ये, रस तेजामध्ये आणि तेज रूपामध्ये लीन होऊन जाते. (२३)


रूपं वायौ स च स्पर्शे लीयते सोऽपि चाम्बरे ।
अम्बरं शब्दतन्मात्र इन्द्रियाणि स्वयोनिषु ॥ २४ ॥
वायूत रूप नी वायू स्पर्शात स्पर्श तो पुन्हा ।
आकाशी लीन होवोनी शब्दी आकाश लीन हो ॥
इंद्रीय देवतां मध्ये राजसी मिळती पुन्हा ॥ २४ ॥

रूपं वायौ - रूप हे वायूत - सः च स्पर्शे - तो वायु स्पर्शगुणात - सः अपि च अंबरे लीयते - आणि तो स्पर्शही आकाशात लीन होतो - अंबरं शब्दतन्मात्रे - आकाश हे आपल्या तन्मात्रेत, शब्दात - इंद्रियाणि स्वयोनिषु - ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये आपआपल्या कारणात म्हणजे सूर्यादि देवतांत लीन होतात - ॥२४॥
रूप वायूमध्ये, वायू स्पर्शामध्ये, स्पर्श आकाशामध्ये आणि आकाश शब्दतन्मात्रेमध्ये लीन होऊन जाते इंद्रिये आपापल्या अधिष्ठात्या देवतांमध्ये आणि शेवटी राजस अहंकारामध्ये समाविष्ट होऊन जातात. (२४)


योनिर्वैकारिके सौम्य लीयते मनसीश्वरे ।
शब्दो भूतादिमप्येति भूतादिर्महति प्रभुः ॥ २५ ॥
रज सत्त्वमनीं येई शब्दादी तामसी मिळे ।
अहंकार त्रयो मोह महत्तत्त्वात तो मिळे ॥ २५ ॥

सौ‌म्य ! योनिः - उद्धवा, त्या त्या इंद्रियदेवता - वैकारिके मनसि ईश्वरे लीयते - सात्त्विक व समर्थ मनात लीन होतात - भूतादिं शब्दः अप्येति - भूतकारण अहंकारात शब्द - प्रभुः भूतादिः महति - तो समर्थ व भूतकारण अहंकार महतत्त्वात - ॥२५॥
हे सौम्य ! राजस अहंकार आपला नियंता असलेल्या सात्विक अहंकाररूप मनामध्ये, शब्दतन्मात्रा महाभूतांचे कारण असलेल्या तामस अहंकारामध्ये आणि सर्व जगाला मोहित करण्यास समर्थ असलेला त्रिविध अहंकार, महतत्त्वामध्ये लीन होऊन जातो. (२५)


स लीयते महान् स्वेषु गुणेशु गुणवत्तमः ।
तेऽव्यक्ते संप्रलीयन्ते तत्काले लीयतेऽव्यये ॥ २६ ॥
ज्ञानशक्ति क्रिया शक्ती गुणात लीन होतसे ।
गुण ते प्रकृती मध्ये अविनाशात प्रकृती ॥ २६ ॥

गुणवत्तमः सः महान्-स्वेषु गुणेषु लीयते - तो सर्वगुणोत्तम महान् स्वतःच्या सत्त्वादि गुणात लीन होतो - ते अव्यक्ते संप्रलीयंते - ते गुण अव्यक्तात लय पावतात - तत् अव्यये काले लीयते - ते अव्यक्त अखंड कालात लय पावते - ॥२६॥
हे महतत्त्व आपल्याला कारण असलेल्या त्रिगुणांमध्ये लीन होऊन जाते. गुण प्रकृतीमध्ये आणि प्रकृती अविनाशी कालामध्ये लीन होऊन जाते. (२६)


कालो मायामये जीवे जीव आत्मनि मय्यजे ।
आत्मा केवल आत्मस्थो विकल्पापायलक्षणः ॥ २७ ॥
मायामय जिवी काल जीव आत्म्यात तो शिरे ।
आत्मा ना लीन तो होई स्वरूपीं स्थित राहतो ॥
सृष्टी लया अधिष्ठान तसाचि अवधीहि तो ॥ २७ ॥

कालः मायामये जीवे - मायायुक्त जो जीव-सगुण ईश्वर, त्यात काल - मयि अजे आत्मनि - मी अज व अमर परमात्मा त्यात - जीवः - जीव लीन होतो - विकल्पापायलक्षणः केवलः आत्मा आत्मस्थः - विकल्प व अपाय म्हणजे विश्वाची उभारणी व संहारणी करणारा केवल म्हणजे निर्गुण आत्मा स्वरूपातच राहतो - ॥२७॥
काल मायामय जीवामध्ये आणि जीव माझ्यामध्येअजन्मा परमात्म्यामध्ये लीन होऊन जातो. आत्मा मात्र आपल्या स्वरूपातच स्थित राहातो तो विश्वाची उत्पत्ती आणि लय यांच्या अधिष्ठानामुळे जाणला जातो. (२७)


एवमन्वीक्षमाणस्य कथं वैकल्पिको भ्रमः ।
मनसो हृदि तिष्ठेत व्योम्नीवार्कोदये तमः ॥ २८ ॥
विवेक पाहता चित्ता प्रपंच भेद तो न हो ।
हृदयीं नच थांबे नष्टे सूर्ये तमो जसा ॥ २८ ॥

एवं अन्वीक्षमाणस्य - याप्रमाणे समर्थून विचार करणार्‍याला - वैकल्पिकः भ्रमः कथं तिष्ठेत - भेद उत्पन्न करण्याचे वेड कोठून येणार ? - मनसः हृदि - भेद मनात उत्पन्न कसा होणार ? - व्योम्नि अर्कोदये तमः इव - ज्याप्रमाणे आकाशात सूर्योदय झाला असता अंधकाराची उद्भव स्थिती होत नाही त्याप्रमाणे - ॥२८॥
अशा प्रकारे विवेकदृष्टीने जो पाहातो, त्याच्या चित्तामध्ये भेदविषयक भ्रम कसा निर्माण होईल आणि झालाच तरी हृदयात कसा टिकू शकेल ? सूर्योदयानंतर आकाशात अंधकार राहू शकेल काय ? (२८)


एष साङ्ख्यविधिः प्रोक्तः संशयग्रन्थिभेदनः ।
प्रतिलोमानुलोमाभ्यां परावरदृशा मया ॥ २९ ॥
साक्षी मी कारणा कार्या सृष्टी नी लय ही तसा ।
बोललो विधि संख्याचा संदेह तुटतो यये ॥
पुरुष आपुल्या रूपी स्थित नित्यचि होतसे ॥ २९ ॥

संशयग्रंथिभेदनः - संशयाचे जाळे तोडणारे - प्रतिलोमानुलोमाभ्यां - प्रतिलोम व अनुलोम पद्धतीने - एषः सांख्यविधिः - हे सांख्यदर्शन - परावरदृशा मया प्रोक्तः - भूतभविष्य जाणणार्‍या अशा मी सांगितले - ॥२९॥
कार्य आणि कारण या दोघांचाही साक्षी असणार्‍या मी सृष्टीची उत्पत्ती ते प्रलय आणि प्रलयापासून उत्पत्तीपर्यंतचे सांख्यशास्त्र तुला सांगितले यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा संशय नाहीसा होतो. (२९)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
अध्याय चोविसावा समाप्त

GO TOP