|
श्रीमद् भागवत पुराण तितिक्षुद्विजोपाख्यानम् - भिक्षुतीतम् - एका तितिक्षू ब्राह्मणाचा इतिहास - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीबादरायणिरुवाच -
( मिश्र ) स एवमाशंसित उद्धवेन भागवतमुख्येन दाशार्हमुख्यः । सभाजयन् भृत्यवचो मुकुंदः तं आबभाषे श्रवणीयवीर्यः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - ( इंद्रवज्रा ) कथा हरीच्या श्रवणीय ऐशा तो मुक्तीदाता बहु प्रेम देई । श्री उद्धवांनी जधि प्रार्थिले ते प्रशंसुनीया मग कृष्ण बोले ॥ १ ॥
भागवतमुख्येन उद्धवेन - भगवद्भक्तप्रमुख भागवतसंप्रदायी भक्त उद्धवाने - एवं आशंसितः सः - याप्रमाणे ज्याची प्रार्थना केली तो - दाशार्हमुख्यः श्रवणीयवीर्यः मुकुंदः - दाशार्हांचा स्वामी सर्ववंद्य व पराक्रमी अशा श्रीकृष्णाने - भृत्यवचः सभाजयन् - आपल्या दासाच्या विनंतीचा अभिनंदनपूर्वक सादर स्वीकार केला आणि - तं आबभाषे - त्याला विस्तारपूर्वक मोक्षप्रद उपदेश केला. ॥ १ ॥
श्रीशुक म्हणतात ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत, अशा यदुश्रेष्ठ मुकुंदांना परम भगवद्भक्त उद्धवाने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नाची प्रशंसा करून त्याला म्हटले. (१)
श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् ) बार्हस्पत्य स वै नात्र साधुर्वै दुर्जनेरितैः । दुरक्तैर्भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ॥ २ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - ( अनुष्टुप ) जगी ना मिळती संत दुर्जने कटुवाणिने । त्रासिता राहती शांत श्रीदेवगुरुशिष्यजी ॥ २ ॥
बार्हस्पत्य - बृहस्पतिशिष्या - अत्र - या लोकी - दुर्जनेरितैः दुरुक्तैः वै - दुष्ट लोकांच्या दुष्टमनाने प्रेरिलेली जी दुष्ट वाक्ये त्यांनी - भिन्नं आत्मानं - भिन्न म्हणजे क्षुब्ध मनाला - समाधातुं - शांत करण्याचे - यः ईश्वरः - प्रभुत्व असणारा - सः साधुः न वै - असा साधुच प्रायः असत नाही. ॥ २ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - हे बृहस्पतिशिष्या ! दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घरे पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरूष या जगात सहसा सापडत नाही. (२)
न तथा तप्यते विद्धः पुमान् बाणैः सुमर्मगैः ।
यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥ ३ ॥
बाणाने विंधिता देहा न त्रास तेवढा घडे । दुर्जने विंधिता शद्धे होतो त्रास बहू मना ॥ ३ ॥
यथा - ज्याप्रमाणे - असतां - दुष्टांचे - मर्मस्थाः परुषेषवः - मर्मभेदक तीक्ष्ण वाग्बाण - तुदंतिहि - दुःसह व्यथा उत्पन्न करतात - तथा - त्याप्रमाणे - सुमर्मगैः बाणैः विद्धः - मर्मी घाव घालणार्या लोखंडी बाणांनी जर्जर झालेला - पुमान् - पुरुष - न तप्यते - व्यथित होत नाही. ॥ ३ ॥
माणसाच्या हृदयाला जेवढी पीडा दुष्टांच्या मर्मभेदी कठोर वाग्बाणांनी होते, तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही. (३)
कथयन्ति महत्पुण्यं इतिहासं इहोद्धव ।
तमहं वर्णयिष्यामि निबोध सुसमाहितः ॥ ४ ॥
इतिहास जुना संत संदर्भा सांगती पहा । तुम्हासी सांगतो सर्व चित्त देऊन ऐकणे ॥ ४ ॥
उद्धव - उद्धवा - इह - यासंबंधी - महत्पुण्यं इतिहासं कथयंति - एक पवित्र, मोठा पुण्यकारी व सहनशीलता शिकविणारा असा इतिहास सांगतात - तं अहं वर्णयिष्यमि - तो इतिहास मी सविस्तर सांगतो - सुसमाहितः निबोध - तू एकनिष्ठपणे मन शांत करून ऐक. ॥ ४ ॥
उद्धवा ! यासंबंधी एक मोठा पुण्यकारक इतिहास सांगतात, तो मी तुला सविस्तर सांगतो लक्षपूर्वक ऐक. (४)
केनचिद् भिक्षुणा गीतं परिभूतेन दुर्जनैः ।
स्मरता धृतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम् ॥ ५ ॥
एका भिक्षूस दुष्टाने त्रासिता भिक्षु गायिला । धैर्याने पूर्वजन्मीचा इतिहासचि वर्णिला ॥ ५ ॥
दुर्जनैः परिभूतेन - दुष्टांच्या भाषणादिकांनी अपमानलेला - निजकर्मणां विपाकं स्मरता - परंतु आपल्या कर्मांचा विपाक म्हणजे परिणाम स्मरणारा - धृतियुक्तेन - व मनाचे धैर्य असणारा - केनचित् भिक्षुणा - कोणी एक भिक्षु म्हणजे संन्यासी त्याने - गीतं - ही इतिहासरूपी गाथा गायिली. ॥ ५ ॥
एका भिक्षूला दुष्टांनी अतिशय त्रास दिला त्यावेळी त्याने आपले धैर्य सोडले नाही आणि हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे, असे समजून आपल्या मनातील भाव प्रगट केला होता. (५)
अवन्तिषु द्विजः कश्चिद् आसीदाढ्यतमः श्रिया ।
वार्तावृत्तिः कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपनः ॥ ६ ॥
उज्जैनीं पूर्वि तो विप्र राही व्यापार हि करी । श्रीमंत कृपणो कामी शद्धा शद्धास रागवे ॥ ६ ॥
अवंतिषु - अवंती राज्यात - कश्चित् - कोणी एक - श्रिया आढयतमः - मोठा श्रीमंत - वार्तावृत्तिः - व्यापारी - तु कदर्यः, कामी, लुब्धः, अतिकोपनः - पण कंजूष, हावरा, लोभी व तामसी असा - द्विजः आसीत् - ब्राह्मण राहात असे. ॥ ६ ॥
अवन्तिनगरात एक ब्राह्मण राहात होता शेती, व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती तो अतिशय कंजूष, कामी, लोभी आणि रागीट होता. (६)
ज्ञातयोऽतिथयस्तस्य वाङ्मात्रेणापि नार्चिताः ।
शून्यावसथ आत्मापि काले कामैरनर्चितः ॥ ७ ॥
अतिथी ज्ञातिबंधूंना न शब्दे गोड बोलला । तिकाम्या घरिची राही स्वयंही सुख भोगिना ॥ ७ ॥
तस्य ज्ञातयः - त्याचे जातभाई - अतिथयः - पाहुणे, पांथस्थ - वाङ्मात्रेण अपि न अर्चिताः - त्याकडे येत, त्यांस त्याने ‘या, बसा ’ असा सुखाचा एक शब्द बोलून सुद्धा पाहुणचार केला नाही - शून्यावसथे - आपल्या शून्य घरी - आत्मा अपि कामैः - आपल्या शारीरिक अथवा मानसिक गरजांची सुद्धा - काले - वेळोवेळी - अनर्चितः - विचारणा केली नाही. ॥ ७ ॥
त्याने आपले जातीबांधव किंवा अतिथी यांना कधी गोड शब्दांनीही सुखविले नाही तर मग खाऊपिऊ घालण्याची गोष्ट तर दूरच राहो ! कधीही धर्मेकर्मे न होणार्या घरात तो राहात असे आणि योग्यवेळी सुद्धा सुखोपभोगांनी आपल्या शरीराला सुखी करीत नसे. (७)
दुःशीलस्य कदर्यस्य द्रुह्यन्ते पुत्रबान्धवाः ।
दारा दुहितरो भृत्या विषण्णा नाचरन् प्रियम् ॥ ८ ॥
कद्रुता पाहुनी पुत्र पुत्रि बंधु नि पत्नि नी । राहती दुःखि ते भृत्य अनिष्ट चिंतिती मनीं ॥ न व्यवहार कुणा प्रीय कधीच करि तो तसा ॥ ८ ॥
दुःशीलस्य - त्या दुष्ट स्वभावाच्या - कदर्यस्य - कृपणाचा - पुत्रबांधवाः - त्याचे पुत्र बंधु - द्रुह्यंते - द्वेष करित असत - विषण्णाः दाराः दुहितरः भृत्याः - दुःखाने गांजलेली बायको, त्याच्या मुली, त्याचे सेवक कोणीही - प्रियं न आचरन् - त्याचे प्रिय करीत नसे. ॥ ८ ॥
त्याचा कंजूषपणा आणि वाईट स्वभाव यांमुळे त्याचे पुत्रकन्या, बंधूबांधव, नोकरचाकर, पत्नी इत्यादी सर्वजण दुःखी असत त्यामुळे ते त्याच्या मनाला बरे वाटेल असे काहीही करीत नसत. (८)
तस्यैवं यक्षवित्तस्य च्युतस्योभयलोकतः ।
धर्मकामविहीनस्य चुक्रुधुः पञ्चभागिनः ॥ ९ ॥
लोक नी परलोकाला मुकोनी रक्षिले धना । न धर्म भोग ना घेई देवता क्रोधल्या तदा ॥ ९ ॥
एवं - याप्रमाणे - उभयलोकतः च्युतस्य - ऐहिक व पारलौकिक कर्तव्याला भ्रष्ट झालेला - धर्मकामविहीनस्य - धर्मविहित वासना नसणारा - यक्षवित्तस्य तस्य - यक्षाप्रमाणे द्रव्याची राखण करणारा जो कृपण त्याच्यावर - पंचभागिनः चुक्रुधुः - पाचही यज्ञदेवता रागावल्या. ॥ ९ ॥
इहलोक आणि परलोक अशा दोहोंनाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणार्या त्याच्यावर धर्मकर्मांच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागावल्या. (९)
तदवध्यानविस्रस्त पुण्यस्कन्धस्य भूरिद ।
अर्थोऽप्यगच्छन्निधनं बह्वायासपरिश्रमः ॥ १० ॥
पूर्वपुण्यसहाय्याने टिकले धन जेवढे । सरता पुण्य ते सारे धनही सरले तसे ॥ १० ॥
भूरिद - हे उदारशील उद्धवा - तदवध्यानविस्रस्तपुण्यस्कंधस्य - त्या देवतांचा अनादर केल्यामुळे नाहीसा झाला पुण्याचा संचय ज्याचा अशा त्या कृपण ब्राह्मणाचे - बह्वायासपरिश्रमः अर्थः अपि - अनेक कष्टकारी श्रमसाहसांनी मिळविलेले द्रव्यही - निघनं अगच्छत् - नष्ट झाले. ॥ १० ॥
हे उदार उद्धवा ! पंचमहायज्ञाच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळवलेले धनही नष्ट झाले. (१०)
ज्ञातयो जगृहुः किञ्चित् किञ्चिद् दस्यव उद्धव ।
दैवतः कालतः किञ्चिद् ब्रह्मबन्धोर्नृपार्थिवात् ॥ ११ ॥
नीचाचे धन ते पुत्रे चोरांनी लुटिले असे । जळाले देवता कोपे उरले दंडि संपले ॥ ११ ॥
उद्धव ब्रह्मबंधोः ज्ञातयः किंचित् जगृहुः - उद्धवा ! त्या ब्राह्मण म्हणविणार्याचे काही धन भाऊबंदांनी घेतले - दस्यवः किंचित् - काही चोरांनी लुबाडले - दैवतः कालतः नृपार्थिवात् किंचित् - काही दुर्दैवाने काही काळचक्राने व काही लोकांनी व काही राजाने हिरावून नेले. ॥ ११ ॥
उद्धवा ! त्या अधम ब्राह्मणाचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले, काही चोरांनी चोरून नेले काही दैवी कोपाने नष्ट झाले, काही काळाच्या प्रभावाने नाहीसे झाले, काही इतर माणसांनी घेतले आणि उरलेसुरलेले धन राजाने काढून घेतले. (११)
स एवं द्रविणे नष्टे धर्मकामविवर्जितः ।
उपेक्षितश्च स्वजनैः चिन्तामाप दुरत्ययाम् ॥ १२ ॥
धन ते सरले ऐसे धर्म भोगाविनाच ते । संबंधी दूर ते गेले चिंतेने विप्र ग्रासिला ॥ १२ ॥
एवं द्रविणे नष्टे - याप्रमाणे सर्व द्रव्य नाहीसे झाले तेव्हा - धर्मकाम विवर्जितः - धर्म म्हणजे परलोकासाठी असणारी कर्तव्ये व काम म्हणजे ऐहिक वासना यांनी त्यागिलेला - च - आणि - स्वजनैः उपेक्षितः - आप्तेष्टमित्रांनी टाकून दिलेला - सः - तो दरिद्री कृपण - दुरत्ययां चिंतां आप - दुर्लंघ्य अशा चिंतेप्रत प्राप्त झाला. ॥ १२ ॥
अशा प्रकारे त्याची सर्व संपत्ती निघून गेली त्याने धर्म जोडला नाही की सुखोपभोग घेतले नाहीत इकडे त्याच्या सोयर्याधायर्यांनी सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली, आता त्याला भयानक चिंतेने घेरले. (१२)
तस्यैवं ध्यायतो दीर्घं नष्टरायस्तपस्विनः ।
खिद्यतो बाष्पकण्ठस्य निर्वेदः सुमहानभूत् ॥ १३ ॥
हॄदयी भडका झाला मनाला खेद जाहला । अश्रनी दाटला कंठ वैराग्य जाहले मनीं ॥ १३ ॥
एवं दीर्घं ध्यायतः - याप्रमाणे पुष्कळ काळपर्यंत आपल्या स्थितीचे चिंतन करणारा - नष्टरायः - निर्धन - तपस्विनः - संतप्त - खिद्यतः बाष्पकंठस्य तस्य - व खिन्न आणि दुःखाश्रूंनी रुद्धकंठ असा जो हा ब्राह्मण त्याला - सुमहान् - मोठे - निर्वेदः - कडकडीत वैराग्य - अभूत् -प्राप्त झाले. ॥ १३ ॥
धन नाहीसे झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचार्याला मनात खेद उत्पन्न झाला अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला परंतु यामुळेच त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झाले. (१३)
स चाहेदमहो कष्टं वृथाऽऽत्मा मेऽनुतापितः ।
न धर्माय न कामाय यस्यार्थायास ईदृशः ॥ १४ ॥
हाय मी कष्टलो व्यर्थ जीवाला त्रासुनी असे । धर्म कर्म न ते केले न भोग घेतले सुखे ॥ १४ ॥
सः च इदं आह - आणि तो असे म्हणाला - अहो कष्टं - अहो मोठया दुःखाची गोष्ट की - यस्य ईदृशः अर्थायासः न धर्माय न कामाय - ज्या द्रव्यासाठी केलेला माझा आयास ना धर्मासाठी ना प्रापंचिक सुखासाठी झाला - मे आत्मा वृथा अनुतापितः - माझा देह मी व्यर्थ व्यर्थ मात्र दुःखात घातला. ॥ १४ ॥
आता तो ब्राह्मण मनात म्हणू लागला की, "अरेरे ! मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले ! जे धन मिळविण्यासाठी मी कठीण परिश्रम केले, त्याने ना धर्म साधला, ना सुखोपभोग ! (१४)
प्रायेणार्थाः कदर्याणां न सुखाय कदाचन ।
इह चात्मोपतापाय मृतस्य नरकाय च ॥ १५ ॥
कळले कृपणा नाही धनात सुख ते मुळी । चिंतेने जळाती नित्य अधर्मे नर्कि पावती ॥ १५ ॥
कदर्याणां अर्थाः प्रायेण - कृपणांचे द्रव्य बहुशः - कदाचन न सुखाय - केव्हाही सुखाला कारण होत नाही - च इह आत्मोपतापाय - आणि या लोकी ताप देणारे - मृतस्य नरकाय च - आणि मेल्यावर नरकाप्रत नेणारेच असते. ॥ १५ ॥
कंजूष माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही या लोकी तो धन मिळविणे आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होतो आणि मेल्यानंतर धर्म न केल्याकारणाने नरकात जातो. (१५)
यशो यशस्विनां शुद्धं श्लाघ्या ये गुणिनां गुणाः ।
लोभः स्वल्पोऽपि तान्हन्ति श्वित्रो रूपमिवेप्सितम् ॥ १६ ॥
रुपा थोडाहि तो कोड यशाला लोभ नासवी । गुणाचा गर्व तो होता मिटवी गुण सर्व ते ॥ १६ ॥
यशस्विनां शुद्धं यशः - यशस्वी लोकांचे जे पवित्र यश - ये गुणिनां श्लाघ्याः गुणाः - गुणवंत लोकांचे जे वर्णनीय गुण - तान् - त्या सर्वांस - स्वल्पः अपि लोभः हंति - अगदी सूक्ष्मस्वरूपाचा सुद्धा लोभ नाहीसे करतो - ईप्सितं रूपं श्वित्रः इव - श्वित्र म्हणजे पांढरे कोड रूपसौंदर्याचा नाश करते तसा. ॥ १६ ॥
जसे अंगावरील थोडेसेही कोड सुंदर स्वरूप बिघडवून टाकते, त्याचप्रमाणे थोडासासुद्धा लोभ यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण नष्ट करतो. (१६)
अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये ।
नाशोपभोग आयासः त्रासश्चिन्ता भ्रमो नृणाम् ॥ १७ ॥
संचयी वर्धनी खर्चीं भोग नाशात दुःखची । परिश्रय भयो चिंता भ्रमासी नित्य झुंजणे ॥ १७ ॥
अर्थस्य साधने सिद्धे - अर्थसाधन म्हणजे द्रव्यसाधन सिद्ध झाल्यावर - उत्कर्षे - याची वाढ करणे - रक्षणे - त्याचे रक्षण करणे - नाशोपभोगे - आणि उपभोग घेताना अथवा इतर कारणांनी नष्ट होण्याचा प्रसंग असता - व्यये - खर्च करणे यात - नृणां आयासः, त्रासः, चिंता, भ्रमः - पुरुषांस श्रम, संताप, चिंता व भ्रम अनुक्रमे होतात. ॥ १७ ॥
माणसांना धन मिळविणे, त्यात वाढ करणे, ते जपून ठेवणे, ते खर्च होणे, त्याचा नाश होणे किंवा उपभोग घेणे, अशा सर्वच बाबतीत परिश्रम, भय, चिंता आणि भ्रम यांच्याशीच सामना करावा लागतो. (१७)
स्तेयं हिंसानृतं दम्भः कामः क्रोधः स्मयो मदः ।
भेदो वैरमविश्वासः संस्पर्धा व्यसनानि च ॥ १८ ॥ एते पञ्चदशानर्था ह्यर्थमूला मता नृणाम् । तस्मादनर्थमर्थाख्यं श्रेयोऽर्थी दूरतस्त्यजेत् ॥ १९ ॥
चोरी हिंसा तसे खोटे दंभ काम नि क्रोध तो । अहंकार तसा गर्व स्पर्धा भेद नि वैर ते ॥ १८ ॥ अविश्वास तसा लोभ जुगार मदिरा तशी । अर्थाचे हे अनर्थोची ज्ञात्याने सोडिणे असे ॥ १९ ॥
स्मयः, मदः, भेदः, वैरं, अविश्वासः, - चोरी, हिंसा, असत्य, दंभ, काम, - स्तेयं, हिंसा, अनृतं, दंभः, कामः, क्रोधः, - क्रोध, आश्चर्य, उन्माद, भेदवृत्ति, शत्रुत्व, अविश्वास, - संस्पर्धा, व्यसनानि च - स्पर्धायुक्त मत्सर आणि स्त्री, मद्य, द्यूत ही तीन व्यसने. ॥ १८ ॥ एते अर्थमूलाः पंचदश अनर्थाः हि - मिळून १५ अनर्थ द्रव्यापासून उत्पन्न होतात - नृणां मताः - असे जनमत आहे - तस्मात् - म्हणून - श्रेयोर्थी - कल्याणेच्छु जो त्याने - अर्थाख्यं अनर्थं - द्रव्यनामक अनर्थ - दूरतः त्यजेत् - दुरूनच टाकून द्यावा. ॥ १९ ॥
चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे पंधरा अनर्थ मुनष्यांच्या ठिकाणी धनामुळेच होतात, असे मानले गेले आहे म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे, त्याने अर्थ नावाच्या अनर्थाला लांबच ठेवावे. (१८-१९)
भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा ।
एकास्निग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥ २० ॥
माता पिता तसे बंधू पुत्र नी सोयरे सखे । कवडीच्या निमित्ताने शत्रू ते बनती पुन्हा ॥ २० ॥
भ्रातरः, दाराः, पितरः, तथा सुहृदः भिद्यंते - बंधु, बायको, मातापितरे व त्याचप्रमाणे स्नेही यांत द्रव्यामुळेच फूट पडते - सर्वे एकास्निग्धाः - एकजीव असलेले हे सर्व लोक - काकिणिना -एका दीडदमडीमुळे - सद्यः अरयः कृताः - तत्काळ वैरी होतात. ॥ २० ॥
बांधव, स्त्रिया, वडील, मित्र असे जे जे स्नेहबंधनाने एकरूप होऊन राहातात, ते सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की, ताबडतोप ते एकमेकांचे शत्रू होतात. (२०)
अर्थेनाल्पीयसा ह्येते संरब्धा दीप्तमन्यवः ।
त्यजन्त्याशु स्पृधो घ्नन्ति सहसोत्सृज्य सौहृदम् ॥ २१ ॥
क्रोधती अल्प पैशाने स्नेहही त्यजिती तसा । प्राणाशी बेतती नित्य सर्व नाशास योजिती ॥ २१ ॥
अल्पीयसा हि अर्थेन - थोडयासुद्धा द्रव्यामुळे - एते - हे कलत्र, पुत्र, मित्रादि - संरब्धाः दीप्तमन्यवः आशु त्यजंति - क्षुब्ध होऊन क्रोधावशात द्रव्यवंताला तात्काळ टाकतात - सौहृदं सहसा उत्सृज्य - मित्रभाव एकदम सोडून देऊन - स्पृधः ध्नंति - ते मत्सरी त्याचा घात करितात. ॥ २१ ॥
हे लोक थोडयाशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात एकमेकांशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री तोडून एकमेकांच्या जिवावर उठतात. (२१)
लब्ध्वा जन्मामरप्रार्थ्यं मानुष्यं तद् द्विजाग्र्यताम् ।
तदनादृत्य ये स्वार्थं घ्नन्ति यान्त्यशुभां गतिम् ॥ २२ ॥
देवदुर्लभ हा देह द्विज ज्ञाती मिळोनिया । नाशिती सत्य तो स्वार्थ अशूभ गति मेळिती ॥ २२ ॥
अमरप्रार्थ्यं मानुष्यं जन्म - देवांनीही प्रार्थिलेला मनुष्यजन्म - तत् द्विजाग्रयतां लब्ध्वा - त्यातही ब्राह्मणत्व प्राप्त झाले असता - तत् अनादृत्य -त्या ब्राह्मणत्वाचा धिःकार करून - ये स्वार्थं घ्नंति - जे आपल्या स्वार्थाचा घात करतात - अशुभां गतिं यांति - अमंगल स्थितीत जाऊन पडतात. ॥ २२ ॥
देवतांनीही इच्छा करावी, असा मनुष्यजन्म आणि त्यातही श्रेष्ठ असे ब्राह्मणत्व होऊनही जे त्याचा अनादर करून आपल्या खर्या स्वार्थाला तिलांजली देतात, ते अशुभ गतीला जातात. (२२)
स्वर्गापवर्गयोर्द्वारं प्राप्य लोकमिमं पुमान् ।
द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनर्थस्य धामनि ॥ २३ ॥
मनुष्यशरिरी मोक्ष स्वर्गाचे दार हे असे । बुद्धिमंत असा कोण अनर्थीं फसुनि वसे ॥ २३ ॥
स्वर्गापवर्गयोः द्वारं - स्वर्ग आणि मुक्ति या उभयतांमध्ये प्रवेश करून देणारे द्वार म्हणजेच - इमं लोकं प्राप्य - हा मानवी देह प्राप्त झाला असता - मर्त्यः कः पुमान् - कोणता विचारी पण मर्त्यदेहधारी पुरुष - अनर्थस्य धामनि द्रविणे - अनर्थाचे माहेरघर जे जन्ममरणात्मक द्रव्य, विषय त्यात - अनुषज्जेत - आसक्तीने रममाण होईल ? ॥ २३ ॥
मोक्ष आणि स्वर्गाचे द्वारे असे मनुष्यशरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्य सापडेल ? (२३)
देवर्षिपितृभूतानि ज्ञातीन् बन्धूंश्च भागिनः ।
असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥ २४ ॥
देवता पितरे प्राण्या भागाने नच तोषवी । न भोग स्वयही घेई दुर्गती लाभते तया ॥ २४ ॥
देवर्षिपितृभूतानि - देव, ऋषि, पितर व सर्व भूते - ज्ञातीन् - गोत्रज - बंधून् च - भाऊ - भागिनः - मनुष्याच्या संपत्तीमध्ये वाटेकरी असतात - आत्मानं च - आणि आपणही वाटेकरी असतो - असंविभज्य - ज्यांचे त्यांचे वाटे त्यांस देऊन त्यांचे संतर्पण केले नाही तर - यक्षवित्तः अधः पतति - द्रव्यसंरक्षक कंजूष अधोगतीला जातो. ॥ २४ ॥
जो मनुष्य देव, ऋषी, पितर, प्राणी, बांधव, कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्यांचा हिस्सा देत नाही किंवा स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही, धनाचे रक्षण करणार्या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजूष अधोगतीला जातो. (२४)
व्यर्थयार्थेहया वित्तं प्रमत्तस्य वयो बलम् ।
कुशला येन सिध्यन्ति जरठः किं नु साधये ॥ २५ ॥
कर्तव्या ढळलो मी ते प्रमादे सर्व वेचिले । विवेकी मोक्षही घेती वृद्धत्वीं काय ते करू ॥ २५ ॥
व्यर्थया अर्थेहया प्रमत्तस्य - द्रव्य मिळविण्याच्या व्यर्थ उद्योगाने उन्मत्त झालेल्या माझे - वित्तं वयः बलं - द्रव्य, आयुष्य आणि शक्ति व्यर्थ गेल्या - येन- ज्या वित्ताच्या वयाच्या व बलाच्या साह्याने - कुशलाः सिद्ध्यंति - शहाणे पुरुष स्वर्गमोक्षादि साधतात - जरठः किं नु साधये - मी म्हातारा आता काय साधू शकणार ? ॥ २५ ॥
ज्यांनी विवेकी लोक मोक्षसुद्धा प्राप्त करून घेतात, तीच आयुष्य, धन आणि बळ ही साधने मी मूर्खाने धन मिळविण्याच्या प्रयत्नात व्यर्थ खर्च केली आता वृद्धापकाळी मी काय करणार ? (२५)
कस्मात्संक्लिश्यते विद्वान् व्यर्थयार्थेहयासकृत् ।
कस्यचिन्मायया नूनं लोकोऽयं सुविमोहितः ॥ २६ ॥
विव्दान धन तृष्णेने दुःखी कां नच ते कळे । माया संसारिही सर्वां मोहित करिते पहा ॥ २६ ॥
व्यर्थया अर्थेहया - निष्फल व दुष्फल अर्थसंचयाच्या इच्छा धरून - असकृत् - वारंवार - विद्वान् कस्मात् संक्लिश्यते - शहाणा पंडितसुद्धा संकटात का उडी टाकतो बरे ? - नूनं कस्यचित् मायया - कोणाच्या तरी मायेनेच खरोखर - अयं लोकः सुविमोहितः - हे सर्व लोक वेडे होत असले पाहिजेत. ॥ २६ ॥
विद्वानसुद्धा धनाच्या व्यर्थ हव्यासाने नेहमी दुःखी का होतात बरे ! हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे. (२६)
किं धनैर्धनदैर्वा किं कामैर्वा कामदैरुत ।
मृत्युना ग्रस्यमानस्य कर्मभिर्वोत जन्मदैः ॥ २७ ॥
विक्राळ काळदाढेत मनुष्य देह सापडे । धन नी धनदादेव कर्म त्यां काय ते करी ॥ २७ ॥
मृत्युना ग्रस्यमानस्य - मृत्यु ज्याला नित्य गिळतो त्याला - किं धनैः धनदैः - धनाचा किंवा धन देणार्य़ांचा, - वा किं कामैः कामदैः उत वा - वासनांचा किंवा वासना पुरविणार्य़ांचा, किंवा जन्मदैः कर्मभिः उत वा - जन्ममृत्यूच उत्पन्न करणार्या कर्मांचा काय उपयोग आहे बरे ? ॥ २७ ॥
काळाच्या विक्राळ दाढेत सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे, सुखभोग किंवा ते पूर्ण करणारे, तसेच पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मे यांपासून काय लाभ आहे ? (२७)
नूनं मे भगवांन् तुष्टः सर्वदेवमयो हरिः ।
येन नीतो दशामेतां निर्वेदश्चात्मनः प्लवः ॥ २८ ॥
सर्वदेवमयो विष्णू प्रसन्न नच संशय । म्हणोनी दिधला त्याग वैराग्यानाव ही दिली ॥ २८ ॥
सर्वदेवमयः हरिः भगवान् - सर्व देवतांचा आत्मा जो षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान तो श्रीहरीच - मे - मजवर - तुष्टः नूनं - संतुष्ट झाला आहेसे दिसते - येन एतां दशां नीतः - त्यानेच मला ही स्थिती दिली - आत्मनः प्लवः निर्वेदः च - जीवाच्या तारणाला नौकारूपी वैराग्य प्राप्त करून दिले. ॥ २८ ॥
सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले, यात काहीच शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या दशेला आणून वैराग्य दिले वैराग्यच आत्म्याला संसारसागरातून पार करणारी नाव आहे. (२८)
सोऽहं कालावशेषेण शोषयिष्येऽङ्गमात्मनः ।
अप्रमत्तोऽखिलस्वार्थे यदि स्यात् सिद्ध आत्मनि ॥ २९ ॥
उरली आयु ती त्यात करीन परमार्थ तो । सुकवीन तसा देह तपाने मम सर्व हा ॥ २९ ॥
सः अहं कालावशेषेण - यापुढे शिल्लक राहिलेल्या आयुष्यात वैराग्यसंपन्न मी - आत्मनः अंगं - आपल्या देहसंघात - अप्रमत्तः - सावध राहून - शोषयिष्ये - तपादिकांना शुष्क करीन - अखिलस्वार्थे आत्मनि यदि सिद्धः स्यात् - मात्र सर्व पुरुषार्थांचा निधि जो आत्मस्वरूपप्राप्ति त्यात सिद्ध म्हणजे सज्ज, संतुष्ट असलो पाहिजे. ॥ २९ ॥
जर माझे आयुष्य शिल्लक असेल, तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईन आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चर्येने सुकवून टाकवीन किंवा ज्ञानाने लयाला नेईन. (२९)
तत्र मां अनुमोदेरन् देवास्त्रिभुवनेश्वराः ।
मुहूर्तेन ब्रह्मलोकं खट्वाङ्गः समसाधयत् ॥ ३० ॥
अनुमोदन संकल्पा त्रिलोकस्वामी तो करी । खट्वांगे घडि त्या दोन उरता मोक्ष साधिला ॥ ३० ॥
तत्र - या माझ्या तपश्चर्येच्या कामी - त्रिभुवनेश्वराः देवाः मां अनुमोदेरन् - त्रिभुवनेश्वर देवांचे मला अनुमोदन असावे - मुहूर्तेन - एका घटकेतच - खट्वांगः ब्रह्मलोकं समसाधयत् - खट्वांगराजाने ब्रह्मलोकाची प्राप्ति करून घेतली होती. ॥ ३० ॥
तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संमती देवोत राजा खट्वांगाने नाही का दोन घटकांमध्येच भगवद्धामाची प्राप्ती करून घेतली !". (३०)
श्रीभगवानुवाच -
इत्यभिप्रेत्य मनसा ह्यावन्त्यो द्विजसत्तमः । उन्मुच्य हृदयग्रन्थीन्शान्तो भिक्षुरभून्मुनिः ॥ ३१ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात- त्या द्विजे निश्चये ऐशी अहंची गाठ तोडिली । पुन्हा तो शांत होवोनी मौनी संन्याशी जाहला ॥ ३१
इति मनसा हि अभिप्रेत्य - याप्रमाणेच मनाचा निश्चित संकल्प करून - आवंत्यः द्विजसत्तमः - तो अवंतीचा ब्राह्मणश्रेष्ठ - हृदयग्रंथीन् उन्मुच्य - अंतःकरणाच्या अहंकारादि गाठी सोडविता झाला - शांतः भिक्षुः - कामक्रोधादि नष्ट झाल्यामुळे शांतचित्त संन्यासी होऊन - मुनिः अभूत् - सतत ध्यानमग्न असा आत्मवेत्ता मुनि झाला. ॥ ३१ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणतात - त्या अवंतिनिवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशाप्रकारे मनोमन निश्चय करून मीमाझेपणाची गाठ तोडून टाकली यानंतर तो शांत होऊन, मौन धारण करून संन्यासी झाला. (३१)
स चचार महीमेतां संयतात्मेन्द्रियानिलः ।
भिक्षार्थं नगरग्रामान् असङ्गोऽलक्षितोऽविशत् ॥ ३२ ॥
आसक्त त्यजुनी सर्व इंद्रिया वश ठेविले । भिक्षेला नगरीं जाई नोळखी परि त्या कुणी ॥ ३२ ॥
संयतात्मेंद्रियानिलः सः - अंतःकरण, इंद्रिये व प्राण यांचे संयमन करणारा तो मुनि - एतां महीं चचार - पृथ्वीवर संचार करू लागला - भिक्षार्थं असंगः अलक्षितः - भिक्षेसाठी तो निःसंग व अनिकेत-कोणत्याही आश्रमाची चिन्हे धारण न करणारा होऊन - नगरग्रामान् अविशत् - नगरात व गावात प्रवेश करू लागला. ॥ ३२ ॥
आपले मन, इंद्रिये आणि प्राण वश करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहरांत किंवा खेड्यांत कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे. (३२)
तं वै प्रवयसं भिक्षुं अवधूतं असज्जनाः ।
दृष्ट्वा पर्यभवन् भद्र बह्वीभिः परिभूतिभिः ॥ ३३ ॥
अवधूत असा भिक्षू वृद्धत्वी पावला पुन्हा । पाहोनी त्रासिती दुष्ट तिरस्कार तसाच तो ॥ ३३ ॥
भद्र - कल्याणस्वरूपी उद्धवा - तं प्रवयसं अवधूतं भिक्षुं दृष्ट्वा - त्या वृद्ध, मलीन संन्याशाला पाहून - ते असज्जनाः - त्या नगरातील जे दुष्ट पुरुष त्यांनी - बह्वीभिः परिभूतिभिः पर्यभवन् वै - त्या भिक्षूचा अनेक तिरस्कारमूलक कृतींनी भारी अपमान करण्यास प्रारंभ केला. ॥ ३३ ॥
उद्धवा ! तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता त्याला पाहाताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पीडा देत. (३३)
केचित्त्रिवेणुं जगृहुः एके पात्रं कमण्डलुम् ।
पीठं चैकेऽक्षसूत्रं च कन्थां चीराणि केचन ॥ ३४ ॥
हिसकावी कुणी दंड भिक्षापात्रास फेकिती । माला कमंडलू कंथा घेवोनी पळती कुणी ॥ ३४ ॥
केचित् त्रिवेणुं जगृहुः - काहींनी त्याचा त्रिदंड हिसकावून घेतला - एके पात्रं कमण्डलुम् - कित्येकांनी पात्र व कमंडलु पळविला - एके पीठं च, केचन अक्षसूत्रं कंथां चीराणि च - कोणी आसन, कोणी जपमाला व कोणी कंथा-वाकळ-वल्कले लुबाडली. ॥ ३४ ॥
कोणी त्याचा त्रिदंड हिसकावून घेई, कोणी भिक्षापात्र, कोणी कमंडलू, कोणी आसन, कोणी रूद्राक्षमाळ, कोणी झोळी कोणी लंगोटी तर कोणी छाटी काढून घेत. (३४)
प्रदाय च पुनस्तानि दर्शितान्याददुर्मुनेः ।
अन्नं च भैक्ष्यसम्पन्नं भुञ्जानस्य सरित्तटे ॥ ३५ ॥ मूत्रयन्ति च पापिष्ठाः ष्ठीवन्त्यस्य च मूर्धनि । यतवाचं वाचयन्ति ताडयन्ति न वक्ति चेत् ॥ ३६ ॥
दावोनी हरिती वस्तू जेवता नदिसी कधी । थुंकती मुतती माथी गावचे पापि लोक ते ॥ ३५ ॥ मौन पाहोनि बोलाया लावण्या त्रासिती तसे । न बोलता कुणी त्याला मारिती दुष्ट दुर्जन ॥ ३६ ॥
च - आणि - मुनेः दर्शितानि तानि प्रदाय पुनः आददुः - ती दंडवस्त्रादि त्याला थट्टेने दाखवून, त्याच्या हातांतही देऊन पुनः ती सर्व हिसकावून घेतली ! - सरित्तटे - नदीतीरी - अन्नं च भैक्ष्यसंपन्नं भुंजानस्य - भिक्षेत मिळालेले अन्न तो बिचारा खात बसला असता. ॥ ३५ ॥ पापिष्ठाः अस्य मूर्घनि मूत्रयंति च ष्ठीवंति च - ते अतिनीच व महापापी तेथे जाऊन त्याच्या मस्तकावर लघुशंका करीत आणि थुंकीच्या पिचकार्या सोडीत - यतवाचं - त्या मौनवृत्ति भिक्षूला - वाचयंति - ते पापी बोलावयास लावीत - न वक्ति चेत् - नच बोलला तर - ताडयंति - त्याला ताडण करीत. ॥ ३६ ॥
काहीजण त्याला वस्तू देऊन तर काहीजण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेत तो जेव्हा मधुकरी मागून आणून गावाबाहेर नदीकिनारी जेवावयास बसत असे, तेव्हा काही नीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्रविसर्जन करीत तर कधी थुंकत ते लोक अशा तर्हेने त्या मौनी अवधूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे भाग पाडीत आणि एवढे करूनही जेव्हा तो काहीच बोलत नसे, तेव्हा त्याला मारहाणही करीत. (३५-३६)
तर्जयन्त्यपरे वाग्भिः स्तेनोऽयमिति वादिनः ।
बध्नन्ति रज्ज्वा तं केचिद् बध्यतां बध्यतामिति ॥ ३७ ॥
त्रासिती चोर मानोनी बांधा बांधा वदे कुणी । दोरीने बांधिती कोणी त्रासिती दुष्ट ते असे ॥ ३७ ॥
अपरे ‘स्तेनः अयं ’ इति वादिनः वाग्भिः तर्जयंति - दुसरे काही ‘हा चोर आहे ’ असे बोलत आणि त्याला शिव्या देत - ‘बध्यतां बध्यतां ’ इति केचित् रज्ज्वा तं बध्नंति - ‘बांधा, बांधा ’ असे ओरडून काहीजण त्याला दोर्यांनी बांधीत. ॥ ३७ ॥
काहीजण त्याला ‘चोर‘ म्हणून धाकदपटशा दाखवीत काही जण त्याला ‘बांधा, बांधून टाका,‘ म्हणत दोरीने बांधीत. (३७)
क्षिपन्त्येकेऽवजानन्त एष धर्मध्वजः शठः ।
क्षीणवित्त इमां वृत्तिं अग्रहीत् स्वजनोज्झितः ॥ ३८ ॥ अहो एष महासारो धृतिमान् गिरिराडिव । मौनेन साधयत्यर्थं बकवद् दृढनिश्चयः ॥ ३९ ॥
तिरस्कारे कुणी बोले कृपणे ढोंग घेतले । मुलांनी त्यजिले यासी भीक मागोनि हा जगे ॥ ३८ ॥ पहा हा तगडा भिक्षू धैर्यवान पर्वतापरी । मौनाने साधितो काम बगळ्याहुनि ढोंगि हा ॥ ३९ ॥
एके अवजानंतः ‘एषः धर्मध्वजः शठः ’(इति) क्षिपंति - हा दांभिक लुच्चा आहे अशी अवज्ञापूर्वक काही त्याची निंदा करीत - क्षीणवित्तः स्वजनोझ्जितः - अहो हा धनशून्य झाला म्हणून याच्या माणसांनी याला टाकून दिले आहे - इमांवृत्तिं अग्रहीत् - याने हा बकसंन्यास घेतला आहे. ॥ ३८ ॥ अहो एषः महासारः गिरिराट् इव धृतिमान् - अहो हा दणगट, झोंड आणि धिटाई करणारा हिमालयासारखा अढळ आहे - बकवत् - हा बगळ्यासारखा आतल्या गाठीचा - दृढनिश्चयः मौनेन - हट्टाने मौन धरून - अर्थं साधयति - मतलब साधणारा आहे. ॥ ३९ ॥
काहीजण त्याची निर्भर्त्सना करीत म्हणत, "याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगांनी याला घराबाहेर काढले तेव्हा या लबाडाने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला अहो, हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे असे असून मौन धारण करून हा बकसंन्यासी आपले काम साधून घेत आहे. (३८-३९)
इत्येके विहसन्त्येनं एके दुर्वातयन्ति च ।
तं बबन्धुर्निरुरुधुः यथा क्रीडनकं द्विजम् ॥ ४० ॥
हासती पाहती कोणी पाळीव पोपट जसे । टाकिती पिंजर्या मध्ये घरात बंद ठेविती ॥ ४० ॥
एके दुवार्तयंति च - आणि काही निर्लज्ज त्याच्यावर अपानवायु सोडीत - यथा क्रीडनकं तथा - शुक, सारिका, माकडे वगैरेस बांधून पिंजर्यात घालतात त्याप्रमाणे - द्विजं - त्या ब्राह्मणाला - बबंधुः - बांधले - निरुरुधुः - व पिंजर्यात ही कोंडले. ॥ ४० ॥
कोणी त्याचा उपहास करीत, तर कोणी त्याच्यावर अपानवायू सोडीत ज्याप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात किंवा पिंजर्यामध्ये बंद करतात, त्याचप्रमाणे ते लोक त्याला बांधीत किंवा कोंडून ठेवीत. (४०)
एवं स भौतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत् ।
भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥ ४१ ॥
सर्व ते गप्प हा साही ज्वराने पीडिला तरी । न करी द्वेष कोणाचा कर्माचे फळ मानिले ॥ ४१ ॥
एवं भौतिकं, दैविकं, दैहिकं, यत् दुःखं तत् - याप्रमाणे माणसांनी दिलेले, दैवाने-देवांनी पाठविलेले, शरीराला होणारे जे दुःख ते - आत्मनः दिष्टं - दैवाने कपाळी लिहिले आहे, ते प्रारब्धच होय - प्राप्तं प्राप्तं भोक्तव्यं - ते भोगलेच पाहिजे - इति - असे - सः अबुध्यत - त्याचा विवेक त्याला सांगे. ॥ ४१ ॥
कधी त्याला ताप इत्यादीमुळे देहाचे दुःख, कधी थंडीऊन इत्यादी दैवी कष्ट, तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादीद्वारे भौतिक पीडा सहन कराव्या लागत परंतु तो, "हे सर्व आपल्या पूर्वकर्मांचे फळ असल्याने आपल्याला हे अवश्य भोगले पाहिजे," असे मानत असे. (४१)
परिभूत इमां गाथां अगायत नराधमैः ।
पातयद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम् ॥ ४२ ॥
त्रासिती मोडण्या धर्म परी हा निश्चये स्थिरे । सात्वीक बांधुनी धैर्य कधी उद्गार तो करी ॥ ४२ ॥
पातयद्भिः नराधमैः परिभूतः - त्याला धर्मभ्रष्ट करू इच्छिणार्या नराधमांनी त्याचा असा भयंकर छळ केला तरी - स्वधर्मस्थः - स्वधर्मच्युत न होता - सात्त्विकीं धृतिं आस्थाय - उत्तम प्रकारचे सात्त्विक धैर्य धरून - इमां गाथां अगायत - ही पुढील-मी अनुवदणार आहे ती-गाथा गायिली. ॥ ४२ ॥
अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत, तरीसुद्धा तो सात्त्विक धैयाने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राही तो म्हणू लागला. (४२)
द्विज उवाच -
( मिश्र ) नायं जनो मे सुखदुःखहेतुः न देवतात्मा ग्रहकर्मकालाः । मनः परं कारणमामनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद् यत् ॥ ४३ ॥
ब्राह्मण म्हणे - ( इंद्रवज्रा ) दुःखास कोणी नच कारणी या न देह देवो गृह नी शरीर । आहेत ते कर्म नि काल आदी मनोचि बांधी श्रुति संत बोला ॥ ४३ ॥
अयं जनः सुखदुःखहेतुः न - हे लोक माझ्या सुखदुःखाचे कारण नव्हेत - न देवताः आत्मा, ग्रहाः, - तसेच सर्व देव-देवता किंवा आत्मा=शरीर किंवा शनिमंडळ वगैरे ग्रह, - कर्मकालाः - किंवा माझी पूर्वसंचित वा प्रारब्धकर्में किंवा सर्वभक्षक काल हे माझ्या सुखादिकांचे कारक नव्हेत - यत् संसारचक्रं परिवर्तयेत् - संसाराचे सुखदुःखात्मक जन्म मरणांचे चक्र जे फिरविते - मनः परं कारणं आमनंति - मनच सर्वश्रेष्ठ व मूळ कारण होय, असे जाणते लोक म्हणतात आणि तेच खरे आहे. ॥ ४३ ॥
ब्राह्मण म्हणाला - माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसे नाहीत, देवता नाहीत, शरीर नाही, ग्रह नाहीत, कर्म नाही की काल नाही मनच त्याला खरे कारणीभूत आहे, असे श्रुती सांगतात तेच जीवाला या संसारचक्रात फिरवीत असते. (४३)
मनो गुणान् वै सृजते बलीयः
ततश्च कर्माणि विलक्षणानि । शुक्लानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्यः सवर्णाः सृतयो भवन्ति ॥ ४४ ॥
बलिष्ठ आहे मन हे रची ते गुणात्मका ही सगळीच सृष्टी । त्रैगुण्य कर्मे मुळि वृत्ती होते कर्मेचि होते गति भिन्न जीवा ॥ ४४ ॥
बलीयः मनः गुणान् सृजते वै - सर्वशक्ति मनच गुण म्हणजे सात्त्विकादि गुणवृत्ति उत्पन्न करते - ततः च - त्या गुणांपासून - शुक्लानि, कृष्णानि, अथ लोहितानि विलक्षणानि कर्माणि - सात्त्विक, तामस, आणि राजस अशी निरनिराळ्या प्रकारची कर्मे उद्भवतात - तेभ्यः सवर्णाः सृतयः - आणि त्या त्या कर्मांपासून सवर्ण म्हणजे कर्मानुरूप सृति म्हणजे जन्म होतात. ॥ ४४ ॥
हे अतिशय बलवान मनच कामक्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्त्विक, राजस आणि तामस अशी अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात. (४४)
अनीह आत्मा मनसा समीहता
हिरण्मयो मत्सख उद्विचष्टे । मनः स्वलिङ्गं परिगृह्य कामान् जुषन् निबद्धो गुणसङ्गतोऽसौ ॥ ४५ ॥
आत्म स्थिरोनी मन नित्य धावे आत्मा सखा तो प्रगटोनि येतो । भोक्ता बनोनी मग बद्ध होतो ॥ ४५ ॥
समीहता मनसा - उत्तम प्रकारची इच्छा करणार्या मनासहवर्तमान - हिरण्मयः - स्वयंप्रकाश ज्ञानाने पूर्ण - मत्सखा - अहंवृत्तीच्या जीवाचा सखा जो आत्मा - अनीहः - जो अनीह म्हणजे कर्मासक्तिशून्य असून - उद्विचष्टे - केवळ साक्षी असतो - असौ - तोच जीवरूप आत्मा - स्वलिंगं मनः परिगृह्य - संसारात्मक चिन्ह असणारे जे मन त्याचा स्वीकार करतो - कामान् जुषन् - वासनासक्त होतो. ॥ ४५ ॥
क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्तिप्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षीरूपाने पाहातो परंतु जीवा आत्म्याच्या ठिकाणी संसार भासविणार्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारात बांधला जातो. (४५)
दानं स्वधर्मो नियमो यमश्च
श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि । सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः ॥ ४६ ॥
दान स्वधर्मे नियमे यमाने वेदे नि कर्मे सदवर्तनाने । एकाग्र चित्ते हरिसी पुजीता स्थिरावता चित्तचि श्रेष्ठ योग ॥ ४६ ॥
दानं स्वधर्मः नियमः यमः च - दान देणे, स्वधर्मानुरूप आचरण करणे, यम, नियम, - श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि - श्रुतिविहित कर्म करणे आणि व्रते करणे - सर्वे मनोनिग्रहलक्षणांताः - सर्व उपाय मनोनिग्रह हेच फल उत्पन्न करणारे आहेत - हि - प्रसिद्ध आहे की - मनसः समाधिः परः योगः - मनोनिग्रह करून मन स्थिर करणे हा अत्यंत श्रेष्ठ योग म्हणजे ज्ञानात्मक उपाय आहे. ॥ ४६ ॥
दान, स्वधर्माचे पालन, यमनियम,वेदाध्ययन, सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे. (४६)
समाहितं यस्य मनः प्रशान्तं
दानादिभिः किं वद तस्य कृत्यम् । असंयतं यस्य मनो विनश्यद् दानादिभिश्चेदपरं किमेभिः ॥ ४७ ॥
समाहितो हे शांत ज्याचे दानादि पुण्ये फळ लाभ होतो । चांचल्य आलस्य मनास होता दानेहि त्याला मुळि लाभ नाही ॥ ४७ ॥
यस्य मनः समाहितं प्रशांतं - ज्याचे मन समाधानी व शांत झाले आहे - तस्य दानादिभिः किं कृत्यं वद - त्याला दानादिकांचा काय उपयोग आहे ते सांग बरे - यस्य असंयतं मनः - ज्याचे अनिगृहीत मन - विनश्यत् चेत् - नष्ट होत असेल तर - एभिः दानादिभिः - या दानादिकांनी - अपरं किं - दुसरे काय साध्य होणार. ॥ ४७ ॥
ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले, त्याला दान इत्यादींची काय आवश्यकता आहे, सांग ना ! परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे, त्याने दानादी कर्मे केली, तरी त्यांचा काय उपयोग ? (४७)
मनोवशेऽन्ये ह्यभवन् स्म देवा
मनश्च नान्यस्य वशं समेति । भीष्मो हि देवः सहसः सहीयान् युञ्ज्याद् वशे तं स हि देवदेवः ॥ ४८ ॥
इंद्रिय सारे वशती मनाला मनो न होते वश इंद्रियाला । बळीहुनी हे बळि ते नी होय बलिष्ठ देवो मन हेच आहे ॥ ४८ ॥
मनः वशे - मन जर स्वाधीन झाले तर - अन्ये देवाः अभवन् स्म - दुसरे देव म्हणजे इंद्रिये वा इंद्रियांच्या देवता वश झाल्याच समजा - च - आणि - मनः अन्यस्य वशं न समेति - मन तर दुसर्याच्या स्वाधीन कधीही असत नाही - हि - म्हणून - सहसः सहीयान् देवः भीष्मः - बलवंतांचाही बलवंत असणारा हा मनोरूपी देव, फार भयंकर आहे - तं वशे युंज्यात् - त्या मनोदेवाला जो वश करील - सः हि देवदेवः - तो पुरुष अर्थात् देवांचा देव म्हणजे सर्वनियंता होतो. ॥ ४८ ॥
मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिये वश होतात इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हा बलवानांपेक्षाही बलवान भयंकर आहे जो या मनावर नियंत्रण मिळवतो, तो देवांचाही देव होतो. (४८)
तं दुर्जयं शत्रुमसह्यवेगं
अरुन्तुदं तन्न विजित्य केचित् । कुर्वन्त्यसद्विग्रहमत्र मर्त्यैः मित्राण्युदासीनरिपून् विमूढाः ॥ ४९ ॥
खरेचि आहे मन थोर शत्रू आवेग त्याचा नच साहवे तो । ते मर्मस्थानी हृदयास भेदी या शत्रुलागी प्रथमो जितावे । ते मूर्ख याला नच जिंकिती नी निराश होती जगतास अंती ॥ ४९ ॥
तं दुर्जयं असह्यवेगं - त्या अशा जिंकण्यास कठीण, असह्य वेगाच्या आणि - अरुंतुदं - मर्मावर घाव घालणार्या - शत्रुं - शत्रूला - तत् - म्हणजे त्या मनाला - न विजित्य - न जिंकता - केचित् विमूढाः - काही मूर्ख लोक - अत्र - ह्या लोकी - मर्त्त्यैः - इतर मर्त्यांबरोबरच - असद्विग्रहं कुर्वंति - दुष्ट रीतीने कलह करतात - मित्राणि, उदासीनरिपून् (कुर्वंति) - आणि आपल्या विरुद्ध असतील त्या उदासीन शत्रूंस मित्रत्वाने वागवितात. ॥ ४९ ॥
मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे त्याचे रागादिक वेग असह्य आहेत ते मर्मस्थानेच घायाळ करते त्याला जिंकल्याशिवायच मूर्ख लोक दुसर्यांशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू, मित्र किंवा उदासीन ठरवितात. (४९)
देहं मनोमात्रमिमं गृहीत्वा
ममाहमित्यन्धधियो मनुष्याः । एषोऽहमन्योऽयमिति भ्रमेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥ ५० ॥
अंधत्व येते मतिसी तदा ते त्या मीपणाच्या फसतीच फंदी । मानी दुजाभाव फसोनी फंदी अनंत अज्ञान तमात गुंत ॥ ५० ॥
मनोमात्रं इमं देहं ‘मम, अहं ’ इति गृहीत्वा - हा मनोमात्र असणारा-स्वरूपतः नसणारा देहच ‘माझा देह व मी देह ’असे समजून - अंधधियः मनुष्याः - बुद्धिशून्य लोक - ‘एषः अहं ’- ’हा मी’ ‘-अयं अन्यः ’ - हा ममेतर - इति भ्रमेण - असल्या भ्रमाने - दुरंतपारे तमसि भ्रमंति - अनंतपार जो अंधकारपूर्व भवसागर, त्यात भ्रमण करतात. ॥ ५० ॥
अविवेकी माणसे या केवळ मनःकल्पित शरीराला ‘मीमाझे‘ मानून हा मी आणि हा दुसरा या भ्रमाने या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहातात. (५०)
जनस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्
किमात्मनश्चात्र हि भौमयोस्तत् । जिह्वां क्वचित् सन्दशति स्वदद्भि तद्वेदनायां कतमाय कुप्येत् ॥ ५१ ॥
मानीयल्या दोषिच देवता त्या तरीहि आत्म्या नच हानि कांही । आत्मा असे एक तनूत सार्या अंगास अंगे नच द्वेष जैसा ॥ ५१ ॥
जनः तु सुखदुःखयोःहेतुःचेत् - लोकच जीवाच्या सुखदुःखाचे कारक असतील तर - अत्र च - हा पक्ष घेतला म्हणजे - किं आत्मनः - अकर्मा व अकर्ता व अभोक्ता अशा आत्म्याला काय त्यांचे - ह - निश्चयाने - भौमयोः तत् - ही कर्तृत्वे भोक्तृत्वे त्या त्या कर्त्या व भोक्त्या देहांस असणार आणि हे देह तर भूमीचे विकार होत - क्वचित् स्वदद्भिः जिव्हां संदशति - कोणी एखादा आपल्याच दातांनी जिव्हेला चावला तर - तद्वेदनायां कतमाय कुप्येत् - दुःख झाले म्हणून कोणावर रागाववायाचे ? ॥ ५१ ॥
मनुष्यच सुखदुःखाला कारणीभूत आहे असे मानले, तर त्याचा आत्म्याशी काय संबंध ? कारण सुखदुःख देणारेही भौतिक शरीर आणि भोगणारेसुद्धा भौतिक शरीरच ! एखादे वेळी आपल्या दातांनीच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावे ? (५१)
दुःखस्य हेतुर्यदि देवतास्तु
किमात्मनस्तत्र विकारयोस्तत् । यदङ्गमङ्गेन निहन्यते क्वचित् क्रुध्येत कस्मै पुरुषः स्वदेहे ॥ ५२ ॥
मानीयल्या दोषिच देवता त्या जरीहि आत्म्या नच हानि कांही । आत्मा असे एक तनूत सार्या अंगास अंगे नच द्वेष जैसा ॥ ५२ ॥
तु - पण - यदि देवताः - देवताच जर - दुःखस्य हेतुः - दुःखकारक आहेत असे समजले तर - तत्र - ह्या पक्षीही - किं आत्मनः - आत्म्याशी संबंध काय - तत् विकारयोः - आत्म्याशी त्या जड सुखदुःखांचा संबंधच नसतो - स्वदेहे - आपल्या शरीरातील - यत् - जर - अंगेन अंगं क्वचित् निहन्यते - एखादेवेळी एका अवयवाने दुसर्या अवयवाला इजा केली - पुरुषः कस्मै क्रुद्धेत - पुरुष कोणावर रागावेल ? ॥ ५२ ॥
दुःख देण्याला देवता कारण आहे असे मानले, तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे ? कारण सर्वांच्या शरीरांमध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारीही ठरते जसे आपल्याच एका अवयवाने दुसर्या अवयवाला इजा केली, तर माणसाने कोणावर रागवावे ? (५२)
आत्मा यदि स्यात् सुखदुःखहेतुः
किं अन्यतः तत्र निजस्वभावः । न ह्यात्मनोऽन्यद् यदि तन्मृषा स्यात् क्रुध्येत कस्मान्न सुखं न दुःखम् ॥ ५३ ॥
आत्मा जरी कारण दुःख मानो तरी तयाचा स्वय तोच आहे । आत्म्याहुनी ना नच भिन्न रूप न क्रोध दुःखास मुळीच राही ॥ ५३ ॥
यदि आत्मा सुखदुःखहेतुः स्यात् - आत्मा हाच सुखादिकांचा कारक असेल तर - किं अन्यतः तत्र - त्या पक्षात दुसर्याकडे काय ? त्याकडे काही बोलच नाही - निजस्वभावः - सुखदुःख देणे हा आत्मस्वभावच होय असे या पक्षाचे म्हणणे ना - आत्मनः अन्यत् नहि - आत्म्याशिवाय दुसरे काहीच नसते - यदि स्यात् - दिसते म्हणाल तर - तत् मृषा - ते मिथ्या असते - क्रुध्येत कस्मात् - काय म्हणून कोणावर रागावणार - न सुखं न दुःखं - वस्तुतः सुख नाही, दुःख नाही, देणारा कोणी नाही, भोगणारा कोणी नाही. ॥ ५३ ॥
सुखदुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले, तर त्याचा इतरांशी काय संबंध ? तो त्याचाच स्वभाव ठरेल कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काहीही नाही काही भासमान होत असेल, तर ते खोटे आहे म्हणून सुखदुःखही नाहीत मग रागाचे कारणच काय ? (५३)
ग्रहा निमित्तं सुखदुःखयोश्चेत्
किमात्मनोऽजस्य जनस्य ते वै । ग्रहैर्ग्रहस्यैव वदन्ति पीडां क्रुध्येत कस्मै पुरुषस्ततोऽन्यः ॥ ५४ ॥
निमित्त झाले ग्रह ते सुखाला आत्म्यास हानी नच कांहि तेंव्हा । ते पीडिती या तनुसी सदा नी आत्मा परा तो मग क्रोध कोणा ? ॥ ५४ ॥
सुखदुःखयो निमित्तं ग्रहाः चेत् - सुखदुःखांचे कारक ग्रह आहेत असे समजू - अजस्य आत्मनः किं - जन्मच प्राप्त न होणार्या आत्म्याच्या ग्रहनिमित्त सुखादिकांशी संबंधच नसतो - ते वै जनस्य - ते ग्रह जन्म पावणार्या देहाच्या सुखादिकांचे कारक असतात - ग्रहैः ग्रहस्य एव पीडां वदंति - ग्रहालाच ग्रह पीडा करतात असे तज्ञ म्हणतात - ततः अन्यः पुरुषः ग्रह कस्मै क्रुद्ध्येत् - तेव्हा या देह इत्यादि जडांहून निराळा असणारा चिद्रूपी आत्मा रागावेल कोणावर - ॥ ५४ ॥
सुखदुःख देणारे ग्रह आहेत असे मानले, तर अजन्मा अशा आत्म्याला सुखदुःख देण्यास कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जी शरीरे ज्या लग्नावर जन्मतात, त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार ? (५४)
कर्मास्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्
किमात्मनस्तद्धि जडाजडत्वे । देहस्त्वचित्पुरुषोऽयं सुपर्णः क्रुध्येत कस्मै न हि कर्ममूलम् ॥ ५५ ॥
कर्मास मानी सुख दुःख तेंव्हा जडास आत्मा नच की शिवे तो । आत्मा सदा साक्षि नि निर्विकार कर्मा न तत्त्वो मग क्रोध कोणा ॥ ५५ ॥
सुखदुःखयोः हेतुः कर्म अस्तु चेत् - सुखादिकारक कर्म समजले तरी - आत्मनः किं - आत्म्याला काय त्याचे - हि तत् जडाजडत्वे - कारण जडाजड असणारा पदार्थच सुखदुःख भोगण्यास योग्य असतो - तु - पण - देहः अचित् - देह जड, सुखदि जाणण्यास असमर्थ असतो - अयं पुरुषः सुपर्णः - आणि पुरुष तर अजड आहे - कस्मै क्रुद्ध्येत् - तो संतापणार कोणावर ? - हि - कारण - कर्ममूलं न - सुखदुःखमूलक कर्म अस्तित्वात नाही. ॥ ५५ ॥
जर कर्मांनाच सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध ? कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असेत, तेथेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला, तरी केवळ साक्षी आहे म्हणून कर्मच संभवत नाही मग तो कोणावर क्रोध करील. (५५)
कालस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्
किमात्मनस्तत्र तदात्मकोऽसौ । नाग्नेर्हि तापो न हिमस्य तत् स्यात् क्रुध्येत कस्मै न परस्य द्वन्द्वम् ॥ ५६ ॥
तो काळ मानी जर सौख्य दुःखा अग्नीस अग्नी नच जाळितो की । न बर्फ बर्फे कधि थंड होई आत्म्यां तसा काळ न दुःख देई ॥ ५६ ॥
तु - जरी - सुखदुःखयोः कालः हेतुः चेत् - कालच सुखादिकारक मानला तरी - तत्र किं आत्मनः - तेथेही आत्मा निःसंबद्धच - तदात्मकः असौ - कालच स्वतः आत्मस्वरूप आहे - हि अग्नेः तापः न, हिमस्य तत् न स्यात् - कारण असे कधी होत नाही की, अग्नीलाच ताप आला किंवा शीताला थंडी वाजली - क्रुद्ध्येत कस्मै - मग तो रागावणार कोणावर ? - परस्य द्वंद्वं न - परमश्रेष्ठ अद्वितीय आत्मस्वरूपात द्वंद्वाला अवकाशच नाही. ॥ ५६ ॥
काळ हा सुखदुःख देणारा आहे असे मानले, तर काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्याच ज्वाळेला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करून शकत नाही काळाहून आत्मा वेगळा मानला तरी आत्म्याला सुखदुःखात्मक द्वंद्व नाही मग तो कोणावर का रागावेल ? (५६)
न केनचित्क्वापि कथञ्चनास्य
द्वन्द्वोपरागः परतः परस्य । यथाहमः संसृतिरूपिणः स्याद् एवं प्रबुद्धो न बिभेति भूतैः ॥ ५७ ॥
देहा नि धर्मा अन कार्य लेशा न स्पर्शि आत्मा मुळि गंध ना त्या । न तो पडे त्या मुळि चक्रि कोण्या म्हणोनि तो ना भयभीत होतो ॥ ५७ ॥
अस्य परस्य - ह्या परमश्रेष्ठ चिद्रूप आत्म्याला - परतः - तदन्य जड प्रकृतीपासून - केनचित् - कोणत्याही निमित्ताने - कथंचन - कसाही - द्वंद्वोपरागः न - द्वंद्वस्पर्श होईल, असा संभव नाही - यथा संसृतिरूपिणः अहमः स्यात् - जन्ममरणात्मक संसृतिरूप अहंवृत्तीला द्वंद्वस्पर्श होतो तसा आत्म्याला होणे शक्य नाही - एवं - याप्रमाणे - प्रबुद्धः भूतैः न बिभेति - विचार करणारा विवेकी जड भूतांस भीत नाही, त्याला भिण्याचे कारणही नाही. ॥ ५७ ॥
प्रकृतीच्या पलीकडे आत्म्याला कोणाच्याही द्वारे, कोठेही, कोणत्याही प्रकारे, द्वंद्वाचा स्पर्श होत नाही जशी नसलेला संसार दाखविणार्या अहंकाराला सुखदुःखादी द्वंद्वे निर्माण होतात, असे ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही. (५७)
एतां स आस्थाय परात्मनिष्ठां
अध्यासितां पूर्वतमैर्महर्षिभिः । अहं तरिष्यामि दुरन्तपारं तमो मुकुन्दाङ्घ्रिनिषेवयैव ॥ ५८ ॥
मोठे ऋषी आश्रय तोच घेती घेईन मी आश्रय तोच आत्मा । मुक्ती तथा प्रेमदाता हरी तो तरेन त्याच्या पदि लागुनिया ॥ ५८ ॥
पूर्वतमैः महर्षिभिः अध्यासितां - पुराणकालीन सर्वज्ञकल्प महर्षींनी अभ्यासून आपलीशी केलेली - एतां - ही जी - परात्मनिष्ठां - परमात्मस्वरूपाची मोक्षदायी निष्ठा - समास्थाय - उत्तम अभ्यासपूर्वक आपलीशी करून - अहं - मी भिक्षु - मुकुंदांघ्निनिषेवया एव - श्री मुकुंदाच्या चरणाच्या सेवेच्या साधनाने - दुरंतपारं तमः तरिष्यामि - दुस्तर असणारा अनंतपार व अज्ञानांधःकाररूपी भवसागर तरून जाईनच जाईन. ॥ ५८ ॥
प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता, तिचाच आश्रय घेऊन मी भगवंतांच्या चरणकलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईन. (५८)
श्रीभगवानुवाच -
निर्विद्य नष्टद्रविणे गतक्लमः प्रव्रज्य गां पर्यटमान इत्थम् । निराकृतोऽसद्भिरपि स्वधर्माद् अकंपितोऽमुं मुनिराह गाथाम् ॥ ५९ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले- धना सवे क्लेशही दूर झाले संन्यास घेताचि विरक्त झाला । त्रासी कुणी त्या परि शांत राही मौनी असे गीतचि गायिला तै ॥ ५९ ॥
नष्टद्रविणः इत्थं निर्विद्य गतक्लमः - नष्टधन झालेल्या त्या ब्राह्मणाला वैराग्य प्राप्त झाल्यामुळे तो चिंताशून्य झाला - प्रवज्य - सर्वसंगपरित्याग करून - गां पर्यटमानः - पृथ्वीवर संचार करीत असता - असद्भिः निराकृतः अपि - दुष्टांनी लाथाडून त्याचा छळ केला असताही - स्वधर्मात् अकंपित - स्वधर्म=भिक्षुधर्म, एका अंशानेही त्या भिक्षुधर्मापासून भ्रष्ट न होता - मुनिः अमूं गाथां आह - त्या मुनीने ही मी सांगितलेली गाथा गाइली. ॥ ५९ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणतात - त्या ब्राह्मणाचे फक्त धनच नव्हे, तर सगळे क्लेशसुद्धा नाहीसे झाले आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता त्याला दुष्टांनी पुष्कळ त्रास दिला, तरीसुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही मौन धारण केलेल्या अवधूताने त्यावेळी या ज्ञानाचे चिंतन केले. (५९)
( अनुष्टुप् )
सुखदुःखप्रदो नान्यः पुरुषस्यात्मविभ्रमः । मित्रोदासीनरिपवः संसारस्तमसः कृतः ॥ ६० ॥
( अनुष्टुप ) सुख दुःख न ते देई आपणा दुसरे कोणी । चित्ताचा भ्रम तो होय अज्ञानें कल्पना गमे ॥ ६० ॥
पुरुषस्य सुखदुःखप्रदः न अन्यः - पुरुषाला सुखदुःख देणारा दुसरा कोणी नाही व नसतोही - मित्रोदासीनरिपवः संसारः - हा मित्र तटस्थ शत्रू प्रभृतींनी मंडित केलेला संसार - तमसः कृतः आत्मविभ्रमः - अज्ञानाने केलेली पुरुषाची आत्मभ्रांति होय. ॥ ६० ॥
मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही दुसरा दुःख देतो, हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र, उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पिलेले आहेत. (६०)
तस्मात् सर्वात्मना तात निगृहाण मनो धिया ।
मय्यावेशितया युक्त एतावान् योगसंग्रहः ॥ ६१ ॥
माझ्यात म्हणूनी वृत्ती लावोनी शक्तिने पुन्हा । मनास वश ठेवावे योगाचे सार हे असे ॥ ६१ ॥
तस्मात् - म्हणून - तात - हे उद्धवा - मयि आवेशितया धिया - माझ्या ठिकाणी प्रविष्ट करून तेथे स्थिरावलेल्या एकनिष्ठ बुद्धीने - सर्वात्मना युक्तः - सर्व प्रकारे युक्त राहून - मनः निगृहाण - मनाला सर्वतोपरी स्वाधीन करून घे - एतावान् योगसंग्रहः - हे सर्व योगविधींच्या संग्रहाचे सार आहे. ॥ ६१ ॥
म्हणून बाबा रे ! माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव बस्स ! सर्व योगसाधनेचे हेच सार आहे. (६१)
य एतां भिक्षुणा गीतां ब्रह्मनिष्ठां समाहितः ।
धारयन् श्रावयन् श्रृण्वन् द्वन्द्वैर्नैवाभिभूयते ॥ ६२ ॥
भिक्षुचे गीत ते कार्य मूर्तिमान ब्रह्मज्ञान ते । एकाग्रे ऐकुनी घेता मिटती सर्व द्वंद्व नी ॥ निर्भय राहतो आत सिंहाच्या परि गर्जना ॥ ६२ ॥
यः समाहितः - जो एकाग्रचित्तपूर्वक - एतां भिक्षुणा गीतां ब्रह्मनिष्ठां - ही भिक्षूने गायिलेली ब्रह्मनिष्ठारूप गाथा - धारयन् - धारण करील - श्रावयन् - इतरांस ऐकवील - शृण्वन् - व स्वतः ऐकेल - द्वंद्वैः न एव अभिभूयते - द्वैतरूपी सुखदुःखात्मक संसाराचा केव्हाही त्रास होत नाही. ॥ ६२ ॥
भिक्षूने गाइलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो दुसर्यांना ऐकवितो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. (६२)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |