श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः

द्रव्यदेशादि गुणदोषवर्णनम् -

गुणदोषव्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
य एतान्मत्पथो हित्वा भक्तिज्ञान क्रियात्मकान् ।
क्षुद्रान्कामांश्चलैः प्राणैः जुषन्तः संसरन्ति ते ॥ १ ॥
उद्धवजी म्हणाले -( अनुष्टुप )
भक्ती ज्ञान क्रिया योग त्यजोनी चित्त चंचले ।
भोगिती भोग जे नित्य तया भव न तो टळे ॥ १ ॥

एतान् भक्तिज्ञानक्रियात्मकान् मत्पथः हित्वा - हे माझे म्हणजे मी सांगितलेले माझी प्राप्ति करून देणारे ज्ञानभक्तिक्रियात्मक मार्ग सोडून देऊन - ये - जे - चलैः प्राणैः - चंचल वा अस्थिर अशा इंद्रियांद्वारे - क्षुद्रान् कामान् जुषंतः - तुच्छ असणार्‍या विषयांच्या अभिलाषाचे सेवन करतात - ते संसरंति - ते संसाराच्या, जन्ममरणाच्या चक्रात सापडतात - ॥१॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - भक्ती, ज्ञान आणि कर्म हे माझ्या प्राप्तीचे तीन मार्ग आहेत ते सोडून चंचल इंद्रियांच्याद्वारे जे क्षुद्र भोग भोगीत राहातात, ते वारंवार जन्ममृत्यूरूप संसाराच्या चक्रात फिरत राहातात. (१)


स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुणः परिकीर्तितः ।
विपर्ययस्तु दोषः स्याद् उभयोरेष निश्चयः ॥ २ ॥
अधिकार अनुसारे धर्मनिष्ठादि ते गुण ।
उलटे वागणे दोष वस्तुनिष्ठ न कांहिही ॥ २ ॥

स्वे स्वे अधिकारे या निष्ठा - स्वतःच्या आत्मिक योग्यतेला अनुरूप असणारी जी कर्तव्याची निष्ठा-कर्तव्ये करण्याची एकाग्रता - सः गुणः परिकीर्तितः - तो गुणच होय, ती एकाग्र अनुष्ठानाची निष्ठा उपकारक आहे - विपर्ययः तु - परंतु वर्णाश्रमाला योग्य असणारी कर्तव्ये न करणे हा तर - दोषः स्यात - दोष आहे - उभयोः एषः निश्चयः - उभयतांसंबंधे हाच सिद्धांत होय - ॥२॥
आपापल्या अधिकारानुसार धर्मांचे ठिकाणी दृढ निष्ठा ठेवणे याला गुण म्हटले आहे आणि याविरूद्ध वागणे हाच दोष आहे गुण आणि दोष यांच्या स्वरूपाविषयी हाच निश्चय आहे. (२)


शुद्धी अशुद्धी विधीयेते समानेष्वपि वस्तुषु ।
द्रव्यस्य विचिकित्सार्थं गुणदोषौ शुभाशुभौ ॥ ३ ॥
समान असुनी वस्तु अशुद्ध ही असी ।
नियंत्रित करायाते प्रवृत्ती सर्व आपुल्या ॥ ३ ॥

द्रव्यस्य विचिकित्सार्थ - अमुक द्रव्य योग्य, अमुक द्रव्य अयोग्य हे ठरविण्यासाठी - समानेषु अपि वस्तुषु - एकाच स्वरूपाच्या वस्तूंमध्ये - शुभाशुभौ गुणदोषौ - अमुक मंगल-उपकारक आणि अमुक अमंगल म्हणून अपकारक - शुद्‍ध्यशुद्धी - हे शुद्ध व योग्य अथवा अशुद्ध व अयोग्य असे - विधीयेते - विहित केलेले आहे - ॥३॥
सर्व वस्तू सारख्याच असल्या, तरी पदार्थांचे गुणदोष शुभअशुभ किंवा शुद्धअशुद्ध हे भेद, पदार्थ योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्यासाठी केलेले असतात. (३)


धर्मार्थं व्यवहारार्थं यात्रार्थमिति चानघ ।
दर्शितोऽयं मयाऽऽचारो धर्मं उुद्वहतां धुरम् ॥ ४ ॥
धर्मसंपादिणे तेणे निर्वाह सुविधाहि हो ।
धर्माचा वाहती बोजा मनु आदीस बोध हा ॥ ४ ॥

धर्मार्थं, व्यवहारार्थं, यात्रार्थं, इति च - धर्माचरणप्रसंगी, व्यवहारासाठी आणि प्रायश्चितार्थ यात्रांसाठी असे मी ठरविले - अनघ - हे निष्पाप उद्धवा - धर्मं धुरं उद्वहतां - धर्मरूपी जो भार, जे ओझे, ते वाहणार्‍या लोकांसाठी - मया अयं आचारः दर्शितः - मी हा असा आचार दाखवून दिला आहे - ॥४॥
हे उद्धवा ! धर्मानुसार कर्मे करणार्‍यांच्या धर्मासाठी, व्यवहारासाठी आणि शरीरनिर्वाहासाठी मी हा आचार सांगितला आहे. (४)


भूम्यम्ब्वग्न्यनिलाकाशा भूतानां पञ्चधातवः ।
आब्रह्मस्थावरादीनां शारीरा आत्मसंयुताः ॥ ५ ॥
पंचभूतादि नी ब्रह्म्यापासुनी सर्व जीव ते ।
समान शरिरी सर्व सर्वां आत्माहि एकची ॥ ५ ॥

भूम्यंव्बग्न्यनिलाकाशाः - पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पाच महाभूते - आब्रह्मस्थावरादीनां भूतानां - ब्रह्मदेवापासून तो स्थावरापर्यंत असणार्‍या प्राण्यांचे - शारीराः पंच घातवः आत्मसंयुताः - शरीरघटक तन्मात्रा, आत्मसंयुत म्हणजे आत्मस्वरूपाने, अस्ति-भाति-प्रिय रूपाने युक्त आहेत ॥५
पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतेच ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सर्व प्राण्यांच्या शरीरांना मूळ कारण आहेत अशा तर्‍हेने सर्व स्थावरजंगम शरीरांच्या दृष्टीने समान आहेत आणि सर्वांचा आत्मासुद्धा एकच आहे. (५)


वेदेन नामरूपाणि विषमाणि समेष्वपि ।
धातुषूद्धव कल्प्यन्त एतेषां स्वार्थसिद्धये ॥ ६ ॥
वासना खंडिण्या सर्व वर्णाश्रम श्रुती वदे ।
असुनी देह तो एक भेद तो बोलिला असे ॥
आपुले गुण जाणोनी साधण्या पुरुषार्थ ते ॥ ६ ॥

एतेषां - या जीवांच्या - स्वार्थसिद्धये - पुरुषार्थसिद्धीसाठी - उद्धव - उद्धवा - समेषु अपि धातुषु - यद्यपि सर्व जड‍अजड पदार्थांचे पंचभौतिक देह समान द्रव्यानेच घटित आहेत - वेदेन - वेदाने मात्र - विषमाणि नामरूपाणि - भिन्नभिन्न नाम आणि रूपे - कल्प्यन्ते - कल्पिली आहेत -॥६॥
हे उद्धवा ! सर्वांचे देह समान असले तरी वेदाने त्यांची नावे आणि रूपे वेगवेगळी सांगितली आहेत कारण त्यांनी त्या नामरूपानुसार आचरण करून आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीला आळा घालून चारही पुरूषार्थांची सिद्धी करून घ्यावी, म्हणून. (६)


देशकालादिभावानां वस्तूनां मम सत्तम ।
गुणदोषौ विधीयेते नियमार्थं हि कर्मणाम् ॥ ७ ॥
देशकालादि भावांना गुण दोष विधान हे ।
वदलो नच हो भंग जनीं सीमा म्हणोनिया ॥ ७ ॥

सत्तम - हे श्रेष्ठ पुरुषा उत्तम भक्ता - कर्मणां हि नियमार्थं - कर्तव्यकर्मादि कर्मांचाही नियम करण्यासाठी - देशकालादिभावानां वस्तूनां - जे देशकाल प्रभृति अमूर्त आणि वस्तु म्हणजे मूर्त पदार्थ त्यासंबंधीही - मम (म्यां) गुणदोषौ विधीयेते - गुणदोष ठरवून सांगितले आहेत - ॥७॥
हे श्रेष्ठ उद्धवा ! देश, काल इत्यादींबद्दल आणि पदार्थांच्याबद्दल जे गुणदोषांचे विधान सांगितले गेले आहे, ते कर्म नियमितरूपाने व्हावे, यासाठी. (७)


अकृष्णसारो देशानां अब्रह्मण्योऽशुचिर्भवेत् ।
कृष्णसारोऽप्यसौवीर कीकटासंस्कृतेरिणम् ॥ ८ ॥
विप्र नी कृष्णसारो जैं न तो देश पवित्र ना ।
संतभूमी सदा शुद्ध कीट वस्ती अशुद्धची ॥
पडीक वांझ ती भूमी अपवित्रचि मानणे ॥ ८ ॥

देशानां - भूलोकातील देशांपैकी - अकृष्णसारः अब्रह्मण्यः अशुचिः भवेत् - काळ्या पाठीचे हरिण नसणारा देश जो असेल, जो अब्रह्मण्य असेल म्हणजे जेथे ज्ञानी व निष्काम कमीं ब्राह्मण नसतील तो अशुचि, वसतीला अयोग्य होतो - कृष्णसारः अपि असौवीरकीकटासंस्कृतेरिणं - कृष्णसार देशातील कीकटसुद्धा पवित्र होतो, जर तेथे सत्पुरुष असतील, संस्कृत कर्में होत असतील, पण उखर जमीन असेल तर तो अपवित्र -॥८॥
ज्या देशात काळवीट नसतील आणि जेथील लोक ब्राह्मणभक्त नसतील, तो देश अपवित्र होय काळवीट असले तरी जेथे संतपुरूष राहातात, तेवढाच भाग सोडून अंग, वंग, कलिंग इत्यादी देश अपवित्र होत तसेच असंस्कृत लोक राहात असलेला किंवा रेताड प्रदेशही अपवित्रच होय. (८)


कर्मण्यो गुणवान् कालो द्रव्यतः स्वत एव वा ।
यतो निवर्तते कर्म स दोषोऽकर्मकः स्मृतः ॥ ९ ॥
द्रव्यस्य शुद्ध्यशुद्धी च द्रव्येण वचनेन च ।
संस्कारेणाथ कालेन महत्वाल्पतयाथ वा ॥ १० ॥
पवित्र समयो तोची जेंव्हा सामग्रि कर्म हो ।
न घडे कार्य ती वेळ अशुद्ध माणणे पहा ॥ ९ ॥
शुद्ध अशुद्ध ते द्रव्य संस्कार वचते तसे ।
महत्व अथवा काले अल्पत्वात घडे पहा ॥ १० ॥

द्रव्यतः - यज्ञसामग्री असलेला - स्वतः एव वा - किंवा पर्वयुक्त, पूर्वान्हींचा असणारा - कर्मण्यः कालः - कर्मांचा काळ - गुणावान् - उपकारक असतो - यतः कर्म निवर्तते - जेव्हा द्रव्य नसेल तेव्हांचा काळ किंवा जातशौचकाल म्हणजे सुएर वा मृताशौच काल - स - तो - अकर्मकः दोषः स्मृतः - कर्मास अयोग्य समजावा - द्रव्येण - जलादि द्रव्यांनी - वचनेन च - आणि आप्तवाक्यांनी - संस्कारेण - प्रोक्षणादि संस्कारांनी - अथ कालेन - वा कालाने - महत्त्वाल्पतया अथवा - किंवा जलादिकांच्या संचयाने किंवा संकोचाने - द्रव्यस्य च शुद्ध्‌यशुद्धी - द्रव्याची योग्यता अथवा अयोग्यता वाढते - ॥९-१०॥
जेव्हा कर्म करण्यास योग्य अशी सामग्री मिळून कर्मही होऊ शकेल, ती वेळ चांगली समजावी आणि ज्यावेळी सामग्री न मिळाल्याने किंवा अन्य कारणाने कर्म होऊ शकत नाही, तो काळ वाईट होय. (९) पदार्थांची शुद्धी किंवा अशुद्धी, द्रव्य, वचन, संस्कार, काल, अधिकपणा किंवा कमीपणा यांमुळेही होते. (१०)


शक्त्या अशक्त्याथ वा बुद्ध्या समृद्ध्या च यदात्मने ।
अघं कुर्वन्ति हि यथा देशावस्थानुसारतः ॥ ११ ॥
शक्ति अशक्ति बुद्धी नी वैभवो वय स्थान नी ।
व्यहार जाणुनी सर्व अशुद्ध शुद्ध ही असे ॥ ११ ॥

शक्त्या, अशक्त्या अथवा बुद्‌ध्या, समृद्‌ध्या च - सामर्थ्य, असामर्थ्य, बुद्धि, श्रीमंती यांच्या योगाने - यथा देशावस्थानुसारतः - देश, स्थळ व अवस्था यांस अनुसरून - हि - सामान्यतः - आत्मने यत् अघं कुर्वंति - लोक पातके करतात - ॥११॥
शक्ती आणि असमर्थता, बुद्धी आणि वैभव यांनुसार जे दोष उत्पन्न होतात, त्यांचा ठिकाणी आणि अवस्था पाहूनच विचार केला जातो. (११)


धान्यदार्वस्थितन्तूनां रसतैजसचर्मणाम् ।
कालवाय्वग्निमृत्तोयैः पार्थिवानां युतायुतैः ॥ १२ ॥
धान्य लाकूड नी सुत रस तेजस चर्म ते ।
कालाग्नि वायु मातीने करणे शुद्ध ते पहा ॥ १२ ॥

धान्यदार्वस्थितंतूनां रसतैजसचर्मणाम् - धान्याची, काष्ठांची, गजदंतांची, तंतूंची, तेलतुपांची, सुवर्णादिकांची, मृगादि आसनांची - पार्थिवानां - अग्निकुंडांच्या विटादिकांची शुद्धि - युतायुतैः कालवाय्वग्निमृत्तोयैः - काल, वायु, अग्नि, माती, जल यांनी म्हणजे ही सर्व मिळून अथवा एकेकाच्या साह्याने करतात॥१२॥
धान्य, लाकूड, हाडे, सूत, रस, सोने, पारा इत्यादी तेजस्वी पदार्थ, चामडे, घडा इत्यादी मातीच्या बनविलेल्या वस्तू, वेळेनुसार आपोआप हवा लागल्याने, आगीत जाळल्याने, मातीने घासल्याने किंवा पाण्याने धुतल्याने शुद्ध होतात पदार्थांची कधी अनेक पदार्थांनी तर कधी एकानेसुद्धा शुद्धी होते. (१२)


अमेध्यलिप्तं यद् येन गन्धलेपं व्यपोहति ।
भजते प्रकृतिं तस्य तच्छौचं तावदिष्यते ॥ १३ ॥
अशुद्ध लागता कांही घासोनी मळ काढिणे ।
पूर्वरूप मिळे गंध तेंव्हा ते शुद्ध होतसे ॥ १३ ॥

येन - ज्याच्या साह्याने - यत् अमेध्यलिप्तं गंधं लेपं - अपवित्र झालेले, वाईट घाण येणारे वास व लेप म्हणजे बुरसे - व्यपोहति - नाहीसे होतात - प्रकृतिं भजते - ती ती द्रव्ये स्वस्वरूप घेतात - तस्य - त्या मळकट द्रव्याचे - तत् शौचं तावत् इष्यते - ते शुद्धीकरण त्या त्या साधनांनी करणे इष्ट आहे - ॥१३॥
जर एखाद्या वस्तूला एखादा अशुद्ध पदार्थ चिकटला तर ज्या कृतीने त्या पदार्थाचा वास किंवा लेप जाईल आणि ती वस्तू पूर्वीप्रमाणे होईल, तेव्हा ती शुद्ध समजावी. (१३)


स्नानदानतपोऽवस्था वीर्यसंस्कारकर्मभिः ।
मत्स्मृत्या चात्मनः शौचं शुद्धः कर्माचरेद् द्विजः ॥ १४ ॥
वय स्नान तपे दाने बले संस्कार कर्म नी ।
स्मरता मम रूपाते चित्ताची शुद्धि होतसे ।
ययांनी शुद्ध होवोनी आश्रमी धर्म आचरा ॥ १४ ॥

स्नानदानतपोऽवस्थावीर्यसंस्कारकर्मभिः - स्नान, दान, तप, कोमाराद्यवस्था, शक्ति, संस्कार, व कर्में यांच्या साह्याने - मत्स्मृत्या च - व माझ्या स्मरणाने - आत्मनः शौचं - कर्मकर्त्याने आपली शुद्धि करून घ्यावी - द्विजः - ब्राह्मणादि कर्मकर्त्याने - शुद्धः - शुद्ध होऊन - कर्म आचरेत् - वेदोक्त कर्म करावे - ॥१४॥
स्नान, दान, तपश्चर्या, वय, सामर्थ्य, संस्कार, कर्म आणि माझे स्मरण केल्याने चित्ताची शुद्धी होते यांद्वारा शुद्ध होऊन ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी आपल्या विहित कर्मांचे आचरण करावे. (१४)


मन्त्रस्य च परिज्ञानं कर्मशुद्धिर्मदर्पणम् ।
धर्मः सम्पद्यते षड्‌भिः अधर्मस्तु विपर्ययः ॥ १५ ॥
मंत्रे बोधे करा चित्त शुद्ध नी अर्पिणे मला ।
षट्‍कर्म शुद्ध ते केंव्हा दोषाचा गुण तो कधी ॥ १५ ॥

मंत्रस्य च परिज्ञानं - मंत्र शास्त्रोक्त असून त्याच्या विनियोगाचे यथासांग ज्ञान ही मंत्रशुद्धि होय - मदर्पणं कर्मशुद्धिः - सर्व कर्म मला, परमेश्वराला अर्पण करणे ही कर्मशुद्धि होय - षड्‌भिः - वर सांगितलेले देश, काल, द्रव्य, कर्ता, मंत्र आणि कर्म ही सहा यथार्थ झाली असता - धर्मः संपद्यते - धर्माचे उपकारक अनुष्ठान होते - तु - परंतु - विपर्ययः अधर्मः - उलट प्रकार झाला, व्यंग पडले तर अधर्म होतो - ॥१५॥
गुरूमुखाने ऐकून योग्य तर्‍हेने जाणून घेतल्याने मंत्राची आणि मला समर्पित केल्याने कर्माची शुद्धी होते उद्ववा ! अशा रीतीने देश, काल, पदार्थ, कर्ता, मंत्र आणि कर्म या सहा गोष्टी शुद्ध असल्यास धर्म आणि अशुद्ध असल्यास अधर्म होतो. (१५)


क्वचिद्‌गुणोऽपि दोषः स्याद् दोषोऽपि विधिना गुणः ।
गुणदोषार्थनियमः तद्‌भिदामेव बाधते ॥ १६ ॥
गुणाचा दोष तो केंव्हा दोषाचा गुण तो कधी ।
घडतो करिता कर्म भेद ते कल्पनाच की ॥ १६ ॥

क्वचित् - केव्हा केव्हा - गुणः अपि - गुणालाही - दोषः स्यात् - दोषस्वरूप येते - विधिना - दैवयोगाने - दोषः अपि गुणः - दोषालाही गुणस्वरूप येते - गुणदोषार्थनियमः - गुणदोषांचे नियामक शास्त्र आहे - तद्‌भिदां एव - त्यांमधील भेदच - बाधते - ते नाहीसा करते - ॥१६॥
शास्त्रविधिनुसार गुणही दोष ठरतो आणि दोषही गुण ठरतो एकाच वस्तूविषयी हा गुणदोषांचा नियम पाहिला तर लक्षात येते की, हे गुणदोष वास्तविक नसून कल्पित आहेत. (परंतु शास्त्राने सांगितलेले असल्याने त्यांना प्रामाण्य आहे). (१६)


समानकर्माचरणं पतितानां न पातकम् ।
औत्पत्तिको गुणः सङ्गो न शयानः पतत्यधः ॥ १७ ॥
पतिता पाप ना दोष श्रेष्ठांना त्याज्य तेच हो ।
पत्‍निसंग न ते पाप संन्याश्या घोर पाप ते ॥
भूमिसी झोपता खाली पडेल कोण तो कसा ।
तसाचि पतिता नोव्हे पापकर्मात दोष तो ॥ १७ ॥

समानकर्माचरणं - एकाच कर्माचे आचरण - पतितानां न पातकं - जे पतित आहेत, धर्मभ्रष्ट आहेत, त्यांस अधिक पतित करीत नाही - औत्पत्तिकः संगः गुणः - स्वभावप्राप्त अथवा संस्कारप्राप्त जो संग, समागम असतो, तो केव्हा गुणच होतो - शयानः अधः न पतति - जो भुईवरच पडला आहे तो आणखी खाली कोठे पडेल ? ॥१७॥
सुरापानासारखे कर्म पापजनक असले तरी ते पतितांसाठी पातक ठरत नाही. (यतीसाठी स्त्रीसंग हा दोष असला तरी) गृहस्थांसाठी तो आवश्यक गुण आहे जे जमिनीवरच झोपले आहेत, ते तेथून कोठे पडतील ? (त्याचप्रमाणे पतित हे दुराचरणाने आणखी पतित ते काय होतील ?). (१७)


यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः ।
एष धर्मो नृणां क्षेमः शोकमोहभयापहः ॥ १८ ॥
उपरती मिळे चित्ता त्या कर्म बंध ते तुटे ।
मनुष्या धर्म तो क्षेम मिटवी भय शोक तो ॥ १८ ॥

यतः यतः निवर्तेत - ज्या ज्या विषयापासून जीवाची निवृत्ति होते - ततः ततः विमुच्येत - त्या त्या विषयापासून-कर्मापासूनही तो जीव मुक्त होतो - एषः धर्मः नृणां क्षेमः - हा आतापर्यंत सांगितलेला धर्म मनुष्यांना निर्भयता देणारा आहे - शोकमोहभयापहः - त्यांच्या शोकाचा, मोहाचा व भयाचा निरास करणारा आहे - ॥१८॥
ज्या ज्या पदार्थांपासून मनुष्याचे चित्त निवृत्त होते, त्या त्या वस्तूच्या बंधनातून तो मुक्त होतो हा निवृत्तिरूप धर्मच माणसांसाठी परम कल्याणाचे साधन आहे कारण हा शोक, मोह आणि भय नाहीसा करणारा आहे. (१८)


विषयेषु गुणाध्यासात् पुंसः सङ्गस्ततो भवेत् ।
सङ्गात्तत्र भवेत् कामः कामादेव कलिर्नृणाम् ॥ १९ ॥
गुण ते विषयी ध्याता आसक्ती वाढते मनी ।
आसक्तीत बसे इच्छा इच्छापूर्तीत भांडणे ॥ १९ ॥

पुंसः - मनुष्याला - विषयेषु गुणाध्यासात् - विषयच उपकारक आहेत असा विषयाचे ठिकाणी चिंतनामुळे अध्यास म्हणजे भ्रम झाला असता - ततः - त्या भ्रमामुळे - संगः भवेत् - विषयांवर आसक्ति उत्पन्न होते - संगात् - संगामुळे - तत्र - मग विषयाचे ठिकाणी - कामः भवेत् - काम म्हणजे अभिलाष उत्पन्न होतो - नृणां कलिः कामात् एव - पुरुषांपुरुषांमध्ये भांडणे होतात, ती या विषयाभिलाषानेच होत - ॥१९॥
विषयांवर गुणांचा आरोप करण्याने त्या विषयांबद्दल माणसाला आसक्ती उत्पन्न होते आसक्ती वाटल्याने ते मिळविण्याची इच्छा निर्माण होते आणि मग त्या कामनापूर्तीमध्ये बाधा निर्माण झाल्यास लोकांमध्ये कलह होऊ लागतो. (१९)


कलेर्दुर्विषहः क्रोधः तमस्तमनुवर्तते ।
तमसा ग्रस्यते पुंसः चेतना व्यापिनी द्रुतम् ॥ २० ॥
कलही वाढतो क्रोध क्रोध बोध न तो कळे ।
सारासार विचारांची त्वरेचि शक्ति संपते ॥ २० ॥

कलेः - भांडणामुळे - दुर्विषहः क्रोधः - असह्य क्रोध जन्म पावतो - तं - त्याला - तमः - मोह - अनुवर्तते - पाठीराखा होतो - पुंसः व्यापिनी चेतना - पुरुषाची सर्वव्यापी बुद्धि - तमसा - मोह - द्रुतं ग्रस्यते - झटपट गिळून टाकतो -॥२०॥
कलहामुळे सहन होणार नाही एवढा क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे बुद्धीवर अज्ञानाचे आवरण पसरते या अज्ञानामुळे मनुष्याची कार्याकार्याचा निर्णय करणारी चेतनाशक्ती ताबडतोब लुप्त होते. (२०)


तया विरहितः साधो जन्तुः शून्याय कल्पते ।
ततोऽस्य स्वार्थविभ्रंशो मूर्च्छितस्य मृतस्य च ॥ २१ ॥
स्मृति ती संपते तेंव्हा मनुष्यपण संपते ।
शून्यवत पशुवत होतो प्रेमवत्‌जीवनोचि ते ॥
न स्वार्थ परमार्थोही घाडतो त्याजला पुन्हा ॥ २१ ॥

साधो - साधु पुरुषा - तथा विरहितः जंतुः - बुद्धिलोप किंवा स्मृति नष्ट झालेला मूढ जीव - शून्याय कल्पते - शून्यरूपच होतो - ततः - त्यामुळे किंवा नंतर - अस्य मूर्छितस्य मृतस्य च - मूर्छित झालेला नव्हे ! बहुतेक मेलेल्या या शून्यरूप जीवाची - स्वार्थविभ्रंशः - पुरुषार्थहानी होते - ॥२१॥
हे साधो ! चेतना शक्ती लुप्त झाल्याने मनुष्य असून नसल्यासारखा होतो एखाद्या मूर्छा आलेल्या किंवा मेलेल्याप्रमाणे त्याची अवस्था होते अशा स्थितीत तो स्वार्थाला पूर्ण मुकतो. (२१)


विषयाभिनिवेशेन नात्मानं वेद नापरम् ।
वृक्ष जीविकया जीवन्व्यर्थं भस्त्रेव यः श्वसन् ॥ २२ ॥
ध्यासाने विषयी होतो होई जड तरूपरी ।
आत्मा वंचित तो होतो भाता जैं व्यर्थ श्वास तो ॥ २२ ॥

व्यर्थं वृक्षजीविकया जीवन् - पुरुषार्थहानीमुळे पारतंत्र्यात वृक्षतुल्य जीवित कंठणारा - यः भस्त्रा इव श्वसन - जो लोहाराच्या भात्याप्रमाणे श्वासोच्छ्‌वास करतो - विषयाभिनिवेशेन - विषयांवर हट्टी आसक्तीचा अभिमान धरतो - न आत्मानं वेद - आपले स्वतःचे जीवरूपही जाणत नाही - न अपरं - व दुसरेही काही जाणत नाही - ॥२२॥
विषयांचे चिंतन करता करता ते स्वतःला ओळखत नाही की दुसर्‍याला त्याचे जीवन वृक्षाप्रमाणे ज्ञानशून्य होते लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याच्या शरीरात श्वास चालू असतो इतकेच. (२२)


फलश्रुतिरियं नृणां न श्रेयो रोचनं परम् ।
श्रेयोविवक्षया प्रोक्तं यथा भैषज्यरोचनम् ॥ २३ ॥
वर्णी फलश्रुती वदे न म्हणे परमार्थ त्यां ।
रुची कर्मासि तो दावी गुळात औषधी जशी ॥ २३ ॥

इयं फलश्रुतिः - हे फल सांगणारा वेद - नृणां न श्रेयः - पुरुषास आत्यंतिक कल्याण प्राप्त करून देत नाही - परं रोचनं - ती फलश्रुति रोचनासाठी, कर्माची प्रवृत्ति व्हावी यासाठी आहे - यथा भैषज्य रोचनं - जसे औषधावर रुचि उत्पन्न होण्यासाठी काही रोचक पदार्थ देतात त्याप्रमाणे - श्रेयोविवक्षया प्रोक्तं - फलश्रुतीही मोक्षावह स्वधर्माचरण करण्याविषयी रुचि उत्पन्न व्हावी यासाठीच आहे - ॥२३॥
लहान मुलाला औषध आवडावे, म्हणून त्याला प्रलोभन दाखवावे, त्याचप्रमाणे वेदांमध्ये सांगितलेली फलश्रुती वास्तविक कल्याणकारक नसली, तरी मोक्षाविषयी रूची निर्माण करण्यासाठी असते. (२३)


उत्पत्त्यैव हि कामेषु प्राणेषु स्वजनेषु च ।
आसक्तमनसो मर्त्या आत्मनोऽनर्थहेतुषु ॥ २४ ॥
जगींचे सर्वची लोक आसक्त जन्मताच की ।
आत्मोन्नतीस ती बाधा अनर्थकारि ती असे ॥ २४ ॥

आसक्तमनसः मर्त्याः - विषयासक्त असलेले मर्त्य - आत्मनः - आपल्या स्वतःच्या - अनर्थहेतुषु - अनर्थास कारण होणार्‍या - कामेषु, प्राणेषु, स्वजनेषु च - वासना, प्राण, दारापुत्रादि स्वजन या सर्वांमध्ये - उत्पत्त्या एवहि - जन्मतःच स्वभावानुरूपच - ॥२४॥
मनुष्यांची मने जन्मतःच स्वतःचे अकल्याण करणार्‍या विषय, इंद्रिये आणि आप्तेष्टांमध्ये आसक्त असतात. (२४)


न तानविदुषः स्वार्थं भ्राम्यतो वृजिनाध्वनि ।
कथं युञ्ज्यात् पुनस्तेषु तांस्तमो विशतो बुधः ॥ २५ ॥
न जाणी पुरुषार्था त्यां स्वर्गादींचे प्रलोभन ।
कळता सरतो स्वर्ग ज्ञाते त्यां नच इच्छिती ॥ २५ ॥

स्वार्थं अविदुषः - परमसुख न जाणणारे - नतान् - नम्र झालेले - वृजिनाध्वनि - संकटप्रचुर मार्गात - भ्राम्यतः - भ्रमण करणारे - तमः विशतः तान् - तमोमार्गात प्रविष्ट होणारे त्या लोकास - बुधः - लोककल्याणकारी वेद - पुनः तेषु - पुनः त्याच मार्गाकडे - कथं युंज्यात् - कशी प्रवृत्ती उत्पन्न करील बरे ? ॥२५॥
आपले परम कल्याण न जाणणार्‍या व देवादी योनिरूप पापमार्गात भटकणार्‍या किंबहुना आणखी पापे करून वृक्षपाषाणादी योनीत जाणार्‍या माणसांना हितचिंतक वेद त्याच विषयांत कसा प्रवृत्त करील बरे ? (२५)


एवं व्यवसितं केचिद् अविज्ञाय कुबुद्धयः ।
फलश्रुतिं कुसुमितां न वेदज्ञा वदन्ति हि ॥ २६ ॥
दुर्बुद्धि कर्मवादी ते अभिप्राय न जाणुनी ।
रनती कल्पना विश्वीं वेद तैसे न सांगती ॥ २६ ॥

एवं व्यवसितं अविज्ञाय - हा वेदाचा अभिप्राय न जाणता - केचित् कुबुद्धयः - काही दुष्टबुद्धीचे लोक - कुसुमिती फलश्रुतिं वदंति - रमणीय वाटणारी फलश्रुति आहे असे म्हणतात - न हि वेदज्ञाः - वेदाचे मनोगत जाणणारे ज्ञानी तसे म्हणत नाहीत - ॥२६॥
काही अज्ञानी लोक वेदांचा हा अभिप्राय समजून न घेता वरवर गोड वाटणार्‍या फलश्रुतीला भुलतात, परंतु वेदांचे रहस्य जाणणारे मात्र असे सांगत नाहीत. (२६)


कामिनः कृपणा लुब्धाः पुष्पेषु फलबुद्धयः ।
अग्निमुग्धा धूमतान्ताः स्वं लोकं न विदन्ति ते ॥ २७ ॥
वासनेत फसे लोभी मुग्घ कर्मींच होत ते ।
स्वर्गादी लाभ ते त्यांना निजधाम न त्यां मिळे ॥ २७ ॥

कामिनः कृपणाः लुब्धाः पुष्पेषु फलबुद्धयः - कामी, कद्रू, लोभी, पुष्पालाच फळ म्हणणारे - अग्निमुग्धाः - अग्निकर्मामुळेच मूढ झालेले - धूमतांताः - धूममार्गाने शेवटपर्यंत जाणारे जे लोक असतात - ते - त्यांस - स्वं लोकं - स्वतःचा म्हणजे आत्म्याचा लोक - न विदंति - केव्हाही जाणता येत नाही म्हणून मिळत नाही - ॥२७॥
विषयांची इच्छा करणारे दीनहीन, लोभी पुरूष, स्वर्ग इत्यादी फुलांनाच फळे समजतात अग्नीच्याद्वारा सिद्ध होणार्‍या यज्ञ इत्यादी कर्मांना भुलतात त्यामुळे त्यांना शेवटी देवलोक, पितृलोक इत्यादींचीच प्राप्ती होते त्यांना आत्मस्वरूपाची कधीच ओळख होत नाही. (२७)


न ते मामङ्ग जानन्ति हृदिस्थं य इदं यतः ।
उक्थशस्त्रा ह्यसुतृपो यथा नीहारचक्षुषः ॥ २८ ॥
कर्मची साधना त्याची फल इंद्रियतृप्ति ती ।
विषयी धुंदिने नेणे मी वसे ईश त्या हृदीं ॥ २८ ॥

अंग हृदिस्थं मां ते न जानंति - उद्धवा ! त्या लोकांस हृदयात राहणारा जो मी, त्या माझे स्वरूपच ठाऊक नसते - यः इदं - जो मी हे सर्व दृश्य, कल्प्य आहे - यतः इदं - ज्या माझ्यापासूनच हे सर्व झाले आहे - उक्थशस्त्राः - उक्थ म्हणजे कर्म हेच शस्त्र ज्यांचे - हि असुतृपः - जे प्राणालाच भोग देऊन संतुष्ट करतात - यथा नीहारचक्षुषः - धुक्याने व्याप्त झालेल्या नेत्रांच्या पुरुषास जसे दिसत नाही, तसेच त्यांस माझे स्वरूप दिसत नाही - ॥२८॥
कर्माची प्रशंसा करून त्यायोगे इंद्रियांना तृप्त करणारे लोक ज्या परमात्म्यापासून हे विश्व उत्पन्न झाले आहे, त्या हृदयातच विराजमान असणार्‍या मला पाहात नाहीत जसे आंधळ्यांना जवळचेही दिसत नाही. (२८)


ते मे मतमविज्ञाय परोक्षं विषयात्मकाः ।
हिंसायां यदि रागः स्याद् यज्ञ एव न चोदना ॥ २९ ॥
हिंसाविहारा ह्यालब्धैः पशुभिः स्वसुखेच्छया ।
यजन्ते देवता यज्ञैः पितृभूतपतीन् खलाः ॥ ३० ॥
वाढे अभक्षणीं क्रोध संकोचार्थ यजा तया ।
अपूर्व नच ते कर्म संध्यावंदन जै असे ॥ २९ ॥
परोक्षज्ञान नेणोनी इंद्रिया तोषिण्यास ते ।
करिती यज्ञ आदी ते देवनावेचि ढोंग की ॥ ३० ॥

हिंसायां यदि रागः स्यात् - हिंसा करण्यामध्येच हौस असेल तर - यज्ञे एव - यज्ञामध्येच ती करावी - न चोदना - हिंसा केलीच पाहिजे अशी धर्माची आज्ञा नाही - मे परोक्षं मतं अविज्ञाय - माझे अस्फुट, अस्पष्टतेने प्रकट झालेले मत न जाणता - ते विषयात्मकाः - ते लोक मांसाद्यासक्त होतात आणि आपण वैदिक आहो असे म्हणतात - ॥२९॥ आलब्धैः हि पशुभिः - यज्ञामध्ये स्पर्श करूनच ठार मारलेल्या पशूद्वारा - स्वसुखेच्छया - स्वदेहादिकांच्या सुखेच्छेने प्रेरित होऊन - हिंसाविहाराः खलाः - हिंसाकर्मातच रमणारे दुष्ट लोक - यज्ञैः - यज्ञ करून - देवतः पितृभूतपतीन् - देवतांस, पितरांस, भूतपतींस म्हणजे क्रूर देवतांस - यजंते - बली देऊन संतुष्ट करतात - ॥३०॥
हिंसेची आवड असेल तर फक्त यज्ञासाठीच हिंसा करा, असे सांगून स्वाभाविक हिंसक प्रवृत्तीला जो मी वेदवाणीच्या द्वारा आळा घातला आहे, ते माझे मत लक्षात न घेऊन, विषयलोलुप दुष्ट लोक हिंसेच्या खेळात पशूंना मारतात आणि त्यांच्या योगाने देव, पितर आणि भूतपतींना उद्देशून यज्ञ करतात. (२९-३०)


स्वप्नोपमं अमुं लोकं असन्तं श्रवणप्रियम् ।
आशिषो हृदि सङ्कल्प्य त्यजन्त्यर्थान् यथा वणिक् ॥ ३१ ॥
स्वर्गादी फळ ते खोटे ऐकण्या गोड वाटते ।
संकल्प करितो भोगां मुद्दला गमवी पहा ॥ ३१ ॥

श्रवणाप्रियं अमुं लोकं - श्रवणाला मनोहर असणारा परलोक - स्वप्नोपमं - स्वप्नसुखाप्रमाणेच - असंतं - असत आहे असे समजून - त्यजंति - टाकून देतात - हृदि अशिषः संकल्प्य - अंतःकरणातच मोठमोठे भोग मनानेच कल्पून - अर्थान् - खरे पुरुषार्थही - यथा वणिक् - जसा वैश्य पुढील आशेवर दृष्टि ठेऊन प्राप्त असलेले भाग किंवा द्रव्य टाकतो - ॥३१॥
स्वर्ग इत्यादी लोक स्वप्नासारखे नाशवंत आहेत परंतु त्यांची वर्णने कानाला गोड वाटतात त्यामुळे तेथील भोगांची आशा मनात बाळगून त्यासाठी माणसे आपल्याजवळील धन खर्च करून टाकतात व्यापारी जसा अधिक नफ्याच्या आशेने समुद्रप्रवासासारखी साहसे करून आपले मूळ भांडवलसुद्धा गमावून बसतो. (३१)


रजःसत्त्वतमोनिष्ठा रजःसत्त्वतमोजुषः ।
उपासत इन्द्रमुख्यान् देवादीन् न तथैव माम् ॥ ३२ ॥
रजोगुणादि सांभाळी तशा त्या देवता पुजी ।
तेवढे कष्ट लावोनी मजला नच तो पुजी ॥ ३२ ॥

रजःसत्त्वमोनिष्ठाः - राजस, सात्त्विक व तामस गुणांवरच निष्ठा ठेवणारे - रजःसत्त्वतमोजुषः - रजोगुणादिकांच्या देवतांची उपासना करणारे - इंद्रमुख्यान् देवादीन उपासते - इंद्रप्रभृति देवांची उपासना करतात - न तथा एव मां - पण माझे स्वरूप ओळखून माझी एकनिष्ठ उपासनाच करीत नाहीत - ॥३२॥
सत्त्वरजतमोगुणी लोक त्याच गुणांच्या इंद्रादी देवतांची उपासना करतात परंतु तशी माझी उपासना करीत नाहीत. (३२)


इष्ट्वेह देवता यज्ञैः गत्वा रंस्यामहे दिवि ।
तस्यान्त इह भूयास्म महाशाला महाकुलाः ॥ ३३ ॥
एवं पुष्पितया वाचा व्याक्षिप्तमनसां नृणाम् ।
मानिनां चातिलुब्धानां मद्वार्तापि न रोचते ॥ ३४ ॥
वदती पुष्पवाणीने यज्ञाने स्वर्ग मेळवू ।
भोगूत दिव्य ते जन्मता उच्च जन्म हो ॥ ३३ ॥
महाली त्या कुटुंबात तेथेही मिळवू सुखा ।
गर्व होई असा त्यांना माझी गोष्टहि नावडे ॥ ३४ ॥

इह यज्ञैः देवताः इष्ट्‌वा - या लोकी यज्ञांनी देवतांस प्रसन्न करून घेऊन - दिवि गत्वा रंस्यामहे - स्वर्गात जाऊन आम्ही सुख भोगू - तस्य अंते इह भूयास्म - स्वर्गसुख संपल्यानंतर येथे जन्म घेऊ - महाकुलाः महाशालाः - महाकुलीन घराण्यात संपत्तिमान गृहस्थ होऊ असे समजतात - ॥३३॥ एवं पुष्पितया वाचा - अशा प्रकारच्या वेदातील रमणीय फलश्रुतीने - व्याक्षिप्तमनसां - विचारभ्रष्ट झालेली मने ज्यांची असे - मानिनां - अभिमानी - अतिस्तब्धानां च नृणां - आणि अत्यंत हट्टी असणार्‍या लोकांस - मद्‌वार्ता अपि न रोचते - माझी वार्ता सुद्धा रुचत, आवडत नाही - ॥३४॥
ते अशी कल्पना करतात की, "आम्ही या लोकी यज्ञांचेद्वारा देवतांचे यजन करून स्वर्गांमध्ये जाऊ आणि तेथे दिव्य पदार्थांचा उपभोग घेऊ त्यानंतर जेव्हा पुन्हा आम्हांला जन्म मिळेल, त्यावेळी आम्ही मोठ्या कुलीन श्रीमंत परिवारात जन्म घेऊ अशाप्रकारे भुलविणार्‍या वेदवाणीने त्यांचे चित्त मोहित होते अशा घमेंडखोर अहंकारी लोकांना माझ्याविषयी काहीच आवडत नाही. (३३-३४)


वेदा ब्रह्मात्मविषयाः त्रिकाण्डविषया इमे ।
परोक्षवादा ऋषयः परोक्षं मम च प्रियम् ॥ ३५ ॥
बोलती वेद त्रीकांडी ब्रह्मात्मा एकता अशी ।
मंत्रात गुप्त ठेवोनी इष्ट ते मीच बोलणे ॥ ३५ ॥

त्रिकांडविषयाः इमे वेदाः - कर्म, भक्ति, व ज्ञान अशी तीन कांडे असणारे हे वेद - ब्रह्मात्मविषयाः - ब्रह्म आणि आत्मा यांविषयींचे मात्र ज्ञान देणारे आहेत - ऋषयः परोक्षवादाः - मंत्रद्रष्टे ऋषि परोक्षरीतीने, अप्रत्यक्षत्वाने ज्ञान सांगणारे आहेत - परोक्षं मम च प्रियं - परोक्षकथन हेच मला आवडते - ॥३५॥
उद्धवा ! कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी तीन कांडे असणारे वेद ब्रह्म आणि आत्मा यांची एकताच सांगतात परंतु ऋषी हा विषय अप्रत्यक्षपणे सांगतात आणि तसे सांगणेच मलाही आवडते. (३५)


शब्दब्रह्म सुदुर्बोधं प्राणेन्द्रियमनोमयम् ।
अनन्तपारं गम्भीरं दुर्विगाह्यं समुद्रवत् ॥ ३६ ॥
शब्दब्रह्म सुदुर्बोध प्राण वाणी मनास ती ।
गंभीर नि अथांगो ती असीम उदधीपरी ॥ ३६ ॥

शब्दब्रह्म - ब्रह्मरूपी जो वेद तो - सुदुर्बोधं - समजण्याला अत्यंत कठीण - प्राणेंद्रियमनोमयं - प्राण आणि इंद्रिये आणि मन या सर्वांचे मूळ स्वरूप असल्यामुळे प्राणादिकांस अगोचर - समुद्रवत् अनंतपारं - समुद्राप्रमाणे हा वेदोराशि अनंत अपार - गंभीरं - गंभीरं म्हणजे गूढ - दुर्विगाह्यं - दुर्विगाह्यं म्हणजे तरून जाण्याला अत्यंत कष्टमय आहे - ॥३६॥
वेदांना शब्दब्रह्म म्हणतात त्यांचे रहस्य समजणे अतिशय कठीण आहे ते परा, पश्यंती आणि मध्यमा वाणीच्या रूपात प्राण, मन आणि इंद्रियमय आहे ते समुद्राप्रमाणे सीमा नसलेले, गूढ असून, त्याचा थांग लागणे अतिशय अवघड आहे. (३६)


मयोपबृंहितं भूम्ना ब्रह्मणानन्तशक्तिना ।
भूतेषु घोषरूपेण बिसेषूर्णेव लक्ष्यते ॥ ३७ ॥
अनंत शक्ति संपन्न अनंत ब्रह्म मी असे ।
माझीच वेदवाणी ती अनाहत रुपी गमे ॥ ३७ ॥

भूम्ना, अनंतशक्तिना, ब्रह्मणा मया - भूमा=सर्वव्यापी आणि अपरिच्छिन्न तसाच अनंतशक्ति आणि ब्रह्म म्हणजे निर्विकार जो अंतर्यामी मी परमात्मा त्याने - उपबृंहितं - आधारलेला अधिष्ठित केलेला हा वेदोराशि - घोषरूपेण भूतेषु लक्ष्यते - सर्व चराचर पदार्थांत नादरूपाने बुद्धिवंतास ओळखता येतो - बिसेषु ऊर्णा इव - कमलाच्या देठातील तंतूप्रमाणे चराचरांच्या अंतर्यामी नादरूपाने असतो - ॥३७॥
अनंत शक्तिसंपन्न, सर्वव्यापी ब्रह्मस्वरूप अशा मीच वेदवाणीचा विस्तार केला आहे कमळाच्या देठामध्ये जसा बिसतंतू असतो, त्याप्रमाणे ही वेदवाणी प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये अनाहतनादाच्या रूपाने दिसून येते. (३७)


यथोर्णनाभिर्हुदयाद् ऊर्णां उद्‌वमते मुखात् ।
आकाशाद् घोषवान् प्राणो मनसा स्पर्शरूपिणा ॥ ३८ ॥
छन्दोमयोऽमृतमयः सहस्रपदवीं प्रभुः ।
ओंकाराद्व्यञ्जितस्पर्श स्वरोष्मान्तस्थभूषिताम् ॥ ३९ ॥
विचित्रभाषाविततां छन्दोभिश्चतुरुत्तरैः ।
अनन्तपारां बृहतीं सृजत्याक्षिपते स्वयम् ॥ ४० ॥
हिरण्यगर्भ भगवन अमृतमय वेद ते ।
प्राणाने जाणणे त्यांना कळती ते अनाहती ॥ ३८ ॥
कीट जै निर्मिती जाळे गिळिती स्वयची मुखे ।
स्पर्शादी वर्ण संकल्पे मन रुप निमित्त ते ॥ ३९ ॥
हृदयाकाश मार्गाने प्रगटे वेदवैखरी ।
सूक्ष्म ओंकार तेथेनी प्रगटे लीन हो तिथे ॥
अभिव्यक्त तसा स्पर्श अंतःस्थ स्वर ऊष्म ते ।
चार चार असे वर्ण वाढती छंद ते तिथे ॥
विचित्रा रूप भाषेने विस्तार जाहला असे ॥ ४० ॥

यथा - ज्याप्रमाणे - हृदयात् मुखात् - हृदयाकारणापासून मुखाच्या द्वारे - ऊर्णनाभिः - कोळी किंवा कातणीचा कृमि - उर्णां उद्धमते - लोकरीच्या धाग्यासारखे मऊ तंतु बाहेर आणतो - घोषवान् प्राणः - नादस्वरूपी प्राण - आकाशात् - आकाशकारणापासून - मनसा - मनाच्याद्वारे - स्पर्शरूपिणा - स्पर्श म्हणजे ‘क ’ पासून ‘म ’ पर्य़ंतचे जे पंचविस वर्ण त्या वर्णांच्या रूपाने - ॥३८॥ छंदोमयः अमृतमयः प्रभुः - छंद- वेदांतील वृत्तास म्हणतात छंदोमय - पद्यमय अमृतरूपी असा जो वेदमूर्ति प्रभु त्याने - ओंकारात् - ओंकारकारणापासून - सहस्त्र पदवीं - अनेक सहस्त्ररूपांची - व्यंजितस्प र्शस्वरोष्मांतस्थभूषितां - त्या नादाला उर, कंठ, यांचा समागम झाल्यामुळे अनेक रूपे असणारे व्यक्त स्पर्श क ते म अखेर २५ व्यंजने; १६ स्वर, ऊष्मा-‘श, ष, स, ह ’ आणि अंतस्थ - ‘य, र, ल, व ’ हे मिळून अनेकरूपी व सुंदर भूषणांनी अलंकृत अशी वाणी प्रभु प्रकट करिता झाला - ॥३९॥ विचित्रभाषाविततां - अनेक भिन्न भिन्न भाषारूपाने - चतुरुत्तरैः छंदोभिः - चार चार अधिक अक्षरांनी वाढत जाणार्‍या अनेक छंदांनी - अनंतपारां बृहतीं - जिच्या विस्ताराची सीमा अनंत आहे अशी - स्वयं - तो प्रभु स्वतःच - सृजति - उत्पन्न करतो - आक्षिपते (च) - व उपसंहृतही करतो - ॥४०॥
कोळीकीटक हृदयात उत्पन्न होणारे तंतू आपल्या तोंडातून बाहेर काढतो, त्याप्रमाणे अमृतमय, वेदमय प्रभू प्राणाच्या उपाधीने नादवान होऊन, मनाला निमित्त करून हृदयाकाशातून ॐकारापासून हजारो प्रकारची वैखरी वाणी प्रगट करतो ती वाणी ‘स्पर्श‘. (‘क‘ पासून ‘म‘ पर्यंत व्यंजने), स्वर. (‘अ‘ पासून ‘औ‘ पर्यंत) ऊष्म. (श, ष, स, ह) आणि अंतःस्थ. (य, र, ल, व) या वर्णांनी विभूषित झालेली आहे तीमध्ये उत्तरोत्तर चार चार वर्णांनी वाढत जाणारे छंद आहेत आणि तिचा वेगवेगळ्या भाषांच्या रूपाने विस्तार झाला आहे तिचा पार लागणे कठीण आहे तोच प्रभू ती वाणी प्रलयकाली स्वतःमध्ये विलीन करून घेतो. (३८-४०)


गायत्रि उष्णिग् अनुष्टुप् च बृहती पङ्‌क्तिरेव च ।
त्रिष्टुब्जगति अतिच्छन्दो ह्यत्यष्ट्यतिजगद् विराट् ॥ ४१ ॥
गायत्री उष्णिक बृहती अनुष्टुप जगती त्रिष्टुप ।
अंत्यष्टि अतिछंदो नी अतीजगति नी विराट ॥ ४१ ॥

गायत्री, उष्णिक्, अनुष्टुप् च, बृहती, पंक्तिः एव च, त्रिष्टुप्, जगती, अतिछंदः हि, अत्याष्टि, अतिजगत्, विराट - गायत्री उष्णिक् प्रभृति वैदिक अनेक छंद व अतिछंद आहेत - ॥४१॥
काही छंद पुढीलप्रमाणे आहेत गायत्री, उष्णिक, अनुष्टुभ्‌, बृहती, पंक्ती, त्रिष्टुभ, जगती, अतिच्छंद, अत्यष्टी अतिजगती आणि विराट. (४१)


किं विधत्ते किमाचष्टे किमनूद्य विकल्पयेत् ।
इत्यस्या हृदयं लोके नान्यो मदद् वेद कश्चन ॥ ४२ ॥
कर्म ते काय ती सांगे देवता कोणत्या तसे ।
विकल्प ज्ञान ते सारे रहस्य मीच जाणतो ॥ ४२ ॥

किं वधत्ते - हा वेदोराशि कोणत्या आज्ञा करतो - किं आचष्टे - काय प्रकाशितो - किं अनूद्य - काय सांगून - विकल्पयेत् - त्याचा निषेध करतो - इति - हे सर्व - अस्याः हृदयं - जे वेदांचे मनोगत आहे ते - लोके - या ब्रह्मांडात - मदन्यः कश्चन न वेद - माझ्याशिवाय इतर दुसर्‍या कोणालाही कळले नाही - ॥४२॥
ती वेदवाणी कर्मकांडामध्ये कशाचे विधान सांगते, उपासनाकांडामध्ये कोणकोणत्या देवतांचे वर्णन करते आणि ज्ञानकांडामध्ये कशाकशाचा अनुवाद करून कोणाकोणाचा निषेध करते, याचे रहस्य माझ्याखेरीज अन्य कोणीही जाणत नाही. (४२)


मां विधत्तेऽभिधत्ते मां विकल्प्यापोह्यते त्वहम् ।
एतावान्सर्ववेदार्थः शब्द आस्थाय मां भिदाम् ।
मायामात्रमनूद्यान्ते प्रतिषिध्य प्रसीदति ॥ ४३ ॥
स्पष्ट मी सांगतो सारे सर्वची श्रुति त्या मम ।
विधन वदती कर्मीं उपास्य देवता रुपीं ॥
माझेचि वर्णिती रूप आरोप नि निषेधही ।
माझ्याच आश्रयी सार्‍या माझाच भेद सांगती ॥
मायेने भाष्य ते होते निषेध करुनी पुन्हा ।
माझ्यात शांत होवोनी शेवटी शेष मी उरे ॥ ४३ ॥

मां विधत्ते - यज्ञरूपी जो मी त्या यज्ञाचे विधि सांगतो - मां अभिधत्ते - ईश्वररूपी जो मी त्या माझे स्वरूप प्रकाशून उपासनाविधि सांगतो - मां विकल्प्य अपोह्यते - माझ्याच स्वरूपात आकाशदिकांच्या कर्तृत्वाचा विकल्प करून ते नाहीसे करतो - अहं तु एतावान् सर्ववेदार्थः - मीच ह्या सर्व वेदांच्या अर्थाचे स्वरूप आहे - मां आस्थाय - माझ्याच आश्रय करून - शब्दः - वेद - मायामात्रं भिदा - मायामय भेदरूपाने दिसणारे विश्व - अनूद्य - प्रथम जमेला धरून - अंते प्रतिषिध्य - शेवटी त्याचा निषेध करून - प्रसीदति - निर्व्यापार होतो - ॥४३॥
वेद कर्मकांडामध्ये यज्ञरूपाने माझेच विधान करतात, उपासनाकांडात मलाच देवता म्हणतात ज्ञानकांडात माझ्याखेरीज अन्य वस्तूंचे वर्णन करून "नेति नेति" या वाक्यांच्याद्वारे अन्य सर्व वस्तूंचा निषेधही करतात सर्व वेदांचा अर्थ एवढाच आहे अशा प्रकारे वदे माझ्यामध्येच भेद निर्माण करून ही सगळी माया आहे, असे म्हणून शेवटी भेदाचा निषेध करून वेद प्रसन्न होतात. (४३)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP