श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
एकोनविंशोऽध्यायः

भक्तेः साधनस्य यमनियमादिनां च वर्णनम् -

ज्ञान, भक्ती आणि यमनियमादी साधनांचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
यो विद्याश्रुतसंपन्नः आत्मवान् न अनुमानिकः ।
मयामात्रं इदं ज्ञात्वा ज्ञानं च मयि संन्यसेत् ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
( अनुष्टुप )
जे जे विद्या शिकोनीया ब्रह्मनिष्ठचि जाहले ।
निवृत्त भक्त हे दोघे मजसी पावती पहा ॥ १ ॥

यः विद्याश्रुतसंपन्नः - जो पुरुष विद्या-स्वानुभव आणि श्रुति-शास्त्रजन्य ज्ञान यांनी संपन्न झाला आहे - आत्मवान् - जो प्रत्यक्ष आत्मरूपच झाला आहे - न अनुमानिकः - तर्कावरच अवलंबत नाही - इदं मायामात्रं ज्ञात्वा - हे दिसणारे सर्व मायाच-मिथ्याच आहे, असे जाणून - मयि - मत्स्वरूपामध्येच - ज्ञानं च - आपले सर्व ज्ञान - संन्यसेत् - लीन करावे - ॥१॥
श्रीभगवान म्हणतात फक्त तर्कावर अवलंबून न राहता ज्याने उपनिषदादी शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, त्याने हे विश्व ही केवळ माझ्यावर भासणारी माया आहे हे जाणून नंतर ते ज्ञानसुद्धा माझ्यातच सोडून द्यावे. (१)


ज्ञानिनः तु अहमेवेष्टः स्वार्थो हेतुश्च संमतः ।
स्वर्गश्च एव अपवर्गश्च नान्योऽर्थो मद्‌ऋते प्रियः ॥ २ ॥
अभीष्ट वस्तु मी ज्ञान्या साध्य साधन स्वर्ग मी ।
अपवर्गी मला पाही सर्वत्र मीच त्यां दिसे ॥ २ ॥

ज्ञानिनः तु अहं एव इष्टः - ज्ञानवंताला मी परमात्माच अत्यंत प्रियतम असतो - स्वार्थः - त्याच्या ज्ञानविज्ञानाचे फल मीच असतो - हेतुः - प्रयोजन मीच असतो - संमतः - त्याला मीच मान्य असतो - स्वर्गः च अपवर्गः च - आणि त्याच्या स्वर्गीय सुखाचा उत्कर्ष करणारा आणि त्याला मोक्ष देणाराही मीच असतो - मदृते- माझ्यावाचून - अन्यः अर्थः न एव प्रियः - त्याला दुसरा कोणताच अर्थ प्रिय नसतो- ॥२॥
ज्ञानी पुरूषाचे ध्येय, फळ, त्याच्या प्राप्तीचे साधन, स्वर्ग आणि मोक्षसुद्धा मीच आहे माझ्याशिवाय दुसर्‍या कोणत्याही पदार्थावर तो प्रेम करीत नाही. (२)


ज्ञानविज्ञान संसिद्धाः पदं श्रेष्ठं विदुर्मम ।
ज्ञानी प्रियतमोऽतो मे ज्ञानेनासौ बिभर्ति माम् ॥ ३ ॥
सिद्ध जे ज्ञान विज्ञाने रूप वास्तव जाणिती ।
म्हणोनी मज ते प्रीय नित्य ते मज ध्यायिती ॥ ३ ॥

ज्ञानविज्ञानसंसिद्धाः - शास्त्रज्ञान आणि साक्षात्कारी विज्ञान ज्यास संपूर्ण लाभते ते - मम श्रेष्ठं पदं - माझे निरतिशय श्रेष्ठ स्वरूप - विदुः - जाणतात - अतः - म्हणून - ज्ञानी मे प्रियतमः - ज्ञानी मला अत्यंत प्रिय असतो - असौ मां ज्ञानेन बिभर्ति - कारण तो माझे आपल्या स्वतःच्या स्वानुभवपूर्ण ज्ञानाने धारण पोषण करतो - ॥३॥
ज्ञान आणि विज्ञानाने संपन्न असलेले सिद्धपुरूषचा माझ्या खर्‍या स्वरूपाला जाणतात, म्हणून ज्ञानी मला सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहे ज्ञानी पुरूष ज्ञानाने मला आपल्या अंतःकरणात धारण करतो. (३)


तपस्तीर्थं जपो दानं पवित्राणि इतराणि च ।
नालं कुर्वंति तां सिद्धिं या ज्ञानकलया कृता ॥ ४ ॥
लेश तत्वे मिळे सिद्धी तप तीर्थ जपो तसे ।
अंतःशुद्धी विना दान साधने पूर्ण होत ना ॥ ४ ॥

या ज्ञानकलया (सिद्धिः) कृता - ज्ञानाच्या एका कलेने म्हणजे अंशाने मात्र सिद्धि प्राप्त होते, पुरुषार्थलाभ होतो - तां सिद्धिं - तो लाभ - तपः, तीर्थं, जपः, दानं - तपश्चर्या, तीर्थस्नान, जप, सर्वस्वदान - इतराणि पवित्राणि च - आणि दुसरी सर्व पवित्र कर्मे - न अलं कुर्वंति - मिळवून देण्याला पुरी पडत नाहीत - ॥४॥
ज्ञानाच्या एका अंशानेसुद्धा जी सिद्धी मिळू शकते, ती तपश्चर्या, तीर्थयात्रा, जपजाप्य, दान किंवा अन्य कोणत्याही पवित्र क्रियांनी पूर्णपणे मिळत नाही. (४)


तस्मात् ज्ञानेन सहितं ज्ञात्वा स्वात्मानमुद्धव ।
ज्ञानविज्ञानसंपन्नो भज मां भक्तिभावतः ॥ ५ ॥
म्हणोनी उद्धवा जाणी आत्मरूप पुन्हा तसे ।
ज्ञान विज्ञान संपन्न भक्तिने भजणे मला ॥ ५ ॥

तस्मात् उद्धव - म्हणून उद्धवा - ज्ञानेन सहितं स्वात्मानं ज्ञात्वा - ज्ञानाच्या मात्र साधनाने आत्मस्वरूप जाणून - ज्ञानविज्ञानसंपन्नः - शास्त्रज्ञानासह अपरोक्ष असणारे अनुभवज्ञान संपादून - भक्तिभावतः मां भज - भक्तिभावाने माझे, परमात्मस्वरूपाचे ध्यानभजन अखंड ठेव - ॥५॥
म्हणून उद्धवा ! तू ज्ञानसहित आत्मस्वरूपाला जाणून घे आणि नंतर ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन भक्तिभावाने माझे भजन कर. (५)


ज्ञानविज्ञान यज्ञेन माम् इष्ट्वात्मानमात्मनि ।
सर्वयज्ञपतिं मां वै संसिद्धिं मुनयोऽगमन् ॥ ६ ॥
ज्ञान विज्ञान यज्ञाने श्रेष्ठ ते ऋषि नी मुनी ।
मलाच यजिती चित्ती असे सिद्धीस पावती ॥ ६ ॥

सर्वयज्ञपतिं मां आत्मानं - सर्व यज्ञांचा अधिपति अशा मज स्वात्म्याचे - आत्मनि - आपल्याच ठिकाणी - ज्ञानविज्ञानयज्ञेन - ज्ञानविज्ञानरूपी यज्ञाने - इष्ट्‌वा - आराधन करून - मुनयः - प्राचीन मुनि - मां संसिद्धिं - मत्प्राप्तिरुप सिद्धीला - अगमन् वै - गेले आहेत - ॥६॥
मुनींनी ज्ञानविज्ञानरूप यज्ञाने आपल्याच अंतःकरणात असलेल्या सर्व यज्ञांचा अधिपती अशा मला उद्देशून यज्ञ करून परम सिद्धी मिळविली आहे. (६)


( वसंततिलका )
त्वय्युद्धवाश्रयति यस्त्रिविधो विकारो ।
    मायांतराऽऽपतति नाद्यपवर्गयोर्यत् ।
जन्मादयोऽस्य यदमी तव तस्य किं स्युः ।
    आद्यंतयोः यत् असतोऽस्ति तदेव मध्ये ॥ ७ ॥
( वसंततिलका )
देहो विकारि त्रिविधा मुळि हा समष्टी
     आधीन तो तुमचिया नव्हता न होय ।
जन्म स्थिती नि घट वाढ प्रसंग मृत्यु
     संबंध यासि तुमचा नच ,हा असत्य ॥ ७ ॥

यत् - ज्या अर्थी - उद्धव - हे उद्धवा - यः त्रिविधः विकारः - जो तीन प्रकारचा आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक स्वरूपांचा विकार - त्वयि आश्रयति - तुझ्या आश्रयाला असतो - मायांऽतरा पतति - मायेच्या-मिथ्यात्वाच्या राज्यातच असतो - न आद्यपवर्गयोः - जो मायेच्या पूर्वी नसतो व मायेच्या निरासानंतरही नसतो - अस्य यत् अमी जन्मादयः - त्या विकारानेच हे प्रत्यक्ष जन्ममरणादि ज्या अर्थी परिणाम असतात - तस्य तव किं स्युः - त्या अर्थी तूं जो अखंड निर्विंकारस्वरूप, त्या तुला त्या विकाराचे परिणाम जे जन्मादि, त्यापासून काय लाभ होणार ? - आद्यंतयोः असतः यत् अस्ति - मायेच्या उत्पत्तीपूर्वी व तिचा निरास झाल्यानंतर असताचे जे स्वरूप असते - तदेव - तेच - मध्ये - मधील स्थितीतही असते - ॥७॥
हे उद्धवा ! देह, इंद्रिये व देवता यांचा समुदाय असलेले शरीर ही केवळ माया आहे याचाच तू आश्रय घेतला आहेस हे आधी व शेवटी नसून मध्येच असते जन्म इत्यादी सहा विकारसुद्धा याचेच असतात जे आधी असत नाही, शेवटी असत नाही, ते मध्येही असत नाही अशा या शरीराशी तुझा काय संबंध आहे ? (७)


श्रीउद्धव उवाच -
ज्ञानं विशुद्धं विपुलं यथैतद्
     वैराग्यविज्ञानयुतं पुराणम् ।
आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते
     त्वद्‍भक्तियोगं च महद्विमृग्यम् ॥ ८ ॥
उद्धवजी म्हणाले -
( इंद्रवज्रा )
वैराग्य विज्ञान विशुद्ध ज्ञान
     सांगाचि विश्वेश्वर विश्वमुर्ते ।
त्या स्पष्ट शब्दीं सह भक्तियोगा
     ब्रह्मादि ज्याला नित्त शोधितात ॥ ८ ॥

विश्वेश्वर विश्वमूर्ते - हे विश्वनियंत्या आणि विश्वरूपा - विशुद्धं - अत्यंत निर्मळ - वैराग्यविज्ञानयुतं - वैराग्य व स्वानुभव यांनी अलंकृत - पुराणं - सनातन असलेले - एतत् - हे - ज्ञानं - ज्ञान - विपुलं यथा (तथा) आख्याही - माझे अज्ञान नष्ट होईल अशा रीतीने सविस्तर सांग - महद्विमृग्यं - व मोठमोठया लोकांनाही शोधून काढण्यास योग्य अशा महत्त्वाचा - तव भक्तियोगं च - तुझा भक्तियोगही सांग - ॥८॥
उद्धव म्हणाला ! हे विश्वेश्वरा ! हे विश्वमूर्ते ! आपण विशुद्ध, विपुल आणि सनातन तसेच वैराग्य आणि विज्ञानाने युक्त अशा ज्ञानाचे वर्णन केले आता महापुरूष जे समजून घेण्याचा प्रयत्‍न करतात, त्या भक्तियोगाविषयी मला सांगावे. (८)


( इंद्रवज्रा )
तापत्रयेण अभिहतस्य घोरे
     संतप्यमानस्य भवाध्वनीश ।
पश्यामि नान्यत् शरणं तवाङ्‌घ्रि
     द्वन्द्वातपत्रात् अमृताभिवर्षात् ॥ ९ ॥
जे जीव ऐशा भवि सापडोनी
     त्रिताप तापे जळती मधोनी ।
ना आश्रयों त्यां चरणार विंदा
     विना कुठेही, पद अमृतोचि ॥ ९ ॥

ईश - परमेश्वरा - तापत्रयेण अभिहतस्य - त्रिविध तापांनी जर्जरित झालेला - घोरे भवाध्वनि संतप्यमानस्य - अत्यंत भयंकर अशा संसारपंथात संतप्त झालेला जो मी त्या मला - अमृताभिवर्षात् - ज्ञानरूपी अमृताचा वर्षाव करणार्‍या - तव अंत्रिद्वंद्वातपत्रात् - तुझ्या चरणद्वयांच्या आतपत्राहून म्हणजे छत्राहून - अन्यत् शरणं न पश्यामि - शरण जाण्याला योग्य असे दुसरे आश्रयस्थान दिसतच नाही - ॥९॥
हे प्रभो ! या घोर संसारमार्गावर मी तिन्ही तापांनी होरपळून अत्यंत दुःखी झालो आहे अशावेळी आपल्या छत्रासारख्या चरणकमलांना शरण जाण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय मला दिसत नाही कारण आपले हे चरणकमलच अमृताचा वर्षाव करून शरणागतांना अभय देणारे आहेत. (९)


दष्टं जनं संपतितं बिलेऽस्मिन्
     कालाहिना क्षुद्रसुखोरुतर्षम् ।
समुद्धरैनं कृपयाऽऽपवर्ग्यैः
     वचोभिरासिञ्च महानुभाव ॥ १० ॥
अंधार कूपीं पडलो असा मी
     नी काळ सर्पे विष दंशिले हो ।
वाढेचि मोहो न मिटेचि तृष्णा
     कृपामृते बोधुनि मुक्ति द्यावी ॥ १० ॥

महानुभाव - हे उदार मनाच्या श्रेष्ठ परमेश्वरा - अस्मिन् बिले संपतितं - ह्या संसाराच्या वारुळातल्या बिळात पडलेला - कालाहिना दष्टं - कालरूपी सर्पाने दंश केलेला - क्षुद्रसुखोरुतर्षं - क्षुद्र-नाशवंत सुखाची उरु-अतिशय तर्ष-तहान लागलेला - एनं जनं - अशा ह्या माझा - कृपया समुद्धर - कृपा करून उद्धार कर, मला बिळातून बाहेर काढ - आपवर्गैः वचोभिः आसिंच - मोक्ष देणार्‍या वचनामृतांचा माझ्यावर वर्षाव कर - ॥१०॥
हे महानुभाव ! मी या संसाररूप विहिरीत क्षुद्र विषयरूप पाण्याने सुखोपभोगरूप तहान भागवण्यासाठी आलो व तीत पडलो तेथेच कालरूपी सर्पाने मला दंश केला आता आपणच कृपा करून याला वर काढा आणि याला मुक्त करणार्‍या आपल्या अमृतवाणीने ओलाचिंब करून टाका. (१०)


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतां वरम् ।
अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषां नः अनु शृण्वताम् ॥ ११ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप )
धर्मरायें असा प्रश्र भीष्मांना पुसला असे ।
आम्ही सर्व तिथे होतो व्दयांच्यापाशि तेधवा ॥ ११ ॥

पुरा - पूर्वी - राजा अजातशत्रुः - निर्वैरबुद्धि जो धर्मराजा त्याने - धर्मः भृतां वरं भीष्मं - धर्माचे व्रत धारण करणार्‍यांमध्ये अत्यंत श्रेष्ठ भीष्मपितामहाला - इत्थं - अशाप्रकारे - सर्वेषां नः अनु शृण्वतां - आम्ही सर्व ऐकत असता आमच्या समक्ष - एतत् - असाच - पप्रच्छ - प्रश्न केला होता - ॥११॥
श्रीकृष्ण म्हणाले - असेच हे पूर्वी अजातशत्रू युधिष्ठिराने धार्मिकशिरोमणी भीष्मांना विचारले होते. त्यावेळी आम्ही सर्वजण तेथे उपस्थित होतो. (११)


निवृत्ते भारते युद्धे सुहृन्-निधन विह्वलः ।
श्रुत्वा धर्मान् बहून् पश्चान् मोक्षधर्मान् अपृच्छत ॥ १२ ॥
संपता ते महायुद्ध धर्माला शोक जाहला ।
भीष्माला पुसला त्यांनी मोक्षा संबंधि प्रश्र हा ॥ १२ ॥

निवृत्ते भारते युद्धे - भारती युद्ध आटपल्यानंतर - सुहृन्निधनविव्हलः - आप्तेष्टांच्या मरणामुळे विव्हल झालेल्या धर्मराजाने - बहून् धर्मान् श्रुत्वा - पुष्कळ प्रकारचे धर्म ऐकल्यानंतर - पश्चात् मोक्षधर्मान् अपृच्छत - मग मोक्षधर्म विचारले - ॥१२॥
भारतीय युद्ध संपल्यावर धर्मराज आपल्या आप्तेष्टांच्या संहाराने शोकविह्वळ झाला होता तेव्हा त्याने भीष्मांकडून पुष्कळ धर्मांचे विवरण ऐकल्यानंतर, मोक्षाच्या साधनांसंबंधी प्रश्न विचारला होता. (१२)


तानहं ते अभिधास्यामि देवव्रत मुखाच्छ्रुतान् ।
ज्ञानवैराग्य विज्ञान श्रद्धा भक्ति उपबृंहितान् ॥ १३ ॥
भीष्माच्या मुखिचा मी जो ऐकला मोक्षधर्म तो ।
ज्ञान विज्ञान वैराग्य श्रद्धा नी भक्तिपूर्ण जो ॥ १३ ॥

देवव्रतमुखात् श्रुतान् - धर्माचे उत्कृष्ट अनुष्ठान करणार्‍या भीष्मराजाच्या मुखांतून प्रकट झालेले - ज्ञानवैराग्य विज्ञान - ज्ञान, विरक्ती, स्वानुभव, - श्रद्धा भक्त्युपबृंहितान् - श्रद्धा आणि भक्ति या सर्वांस आश्रय देणारे - तान् - असे जे धर्म तेच - अहं ते अभिधास्यामि - मी तुला सांगतो - ॥१३॥
त्यावेळी भीष्मांच्या तोंडून ऐकलेले धर्म मी तुला सांगतो ते ज्ञान, वैराग्य, विज्ञान, श्रद्धा आणि भक्तीने परिपूर्ण आहेत. (१३)


नवैकादश पञ्च त्रीन् भावान् भूतेषु येन वै ।
ईक्षेत अथ एकमप्येषु तज्ज्ञानं मम निश्चितम् ॥ १४ ॥

ज्या ज्ञाने पाहिली जाती तत्वे अठ्ठाविसीहि ती ।
तृण-ब्रह्मा मध्ये रूप परोक्षज्ञान ते तसे ॥ १४ ॥

भूतेषु नव - या दृश्य विश्वातील चराचर भूतांमध्ये पुरुष, प्रकृति, महत्, अहंकार व पंचतन्मात्रा मिळून नऊ; - एकादश - मन, पांच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये मिळून अकरा; - पंच त्रीन् भावान् - पाच पृथ्व्यादि महाभूते; आणि सत्त्वादि तीन गुण याप्रमाणे अठठावीस भाव, भूतांतील ही अठठावीस तत्त्वे - येन वै ईक्षेत - ज्या साधनाने पहाता व समजता येतील - अथ - आणि - एषु अपि एकं (ईक्षेत) - या सर्व भूतांतही एकच वस्तु सर्वत्र आहे, असे ज्याने समजते - तत् ज्ञानं - तेच यथार्थ ज्ञान होय - मम निश्चितं - माझा निश्चय आहे - ॥१४॥
उद्धवा ! ज्या ज्ञानाने, प्रकृती, पुरूष, महत्तत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा ही नऊ, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कम]द्रिये आणि एक मन ही अकरा, पाच महाभूते आणि तीन गुण ही आठ, अशी ही एकूण अठ्ठावीस तत्त्वेच सर्व कार्यांमध्ये आहेत, तसेच या सर्वांमध्ये एकच परमात्मतत्त्व व्यापून आहे, असे पाहिले जाते, तेच परोक्ष ज्ञान होय, हे माझे निश्चित मत आहे. (१४)


एतदेव हि विज्ञानं न तथैकेन येन यत् ।
स्थिति उत्पत्ति अप्ययान् पश्येद् भावानां त्रिगुणात्मनाम् ॥ १५ ॥
प्रत्येक तत्व ते ब्रह्म विज्ञान पाहता असे ।
उत्पत्ति स्थिति नी मृत्यु देहाचे हेतु जाणणे ॥ १५ ॥

यत् - जेव्हा - येन - ज्याच्या साह्याने - एकेन - एकाच ज्ञानाने अनुगत अन्वित असलेले अनंत पदार्थ - तथा न - तसे नाहीत म्हणजे अनेकत्व नसून सर्व एकच आहे असे जे - एतत् एव हि विज्ञानं - ते हे मात्र विज्ञान आहे - त्रिगुणात्मनां भावानां - सत्त्वादि त्रिगुणात्मक जे विश्व व तद्‌गत पदार्थ - स्थित्युत्पत्त्यप्ययान् पश्येत् - अस्तित्व, उत्पत्ती व संहार पहावे - ॥१५॥
ही अठ्ठावीस तत्त्वे न पाहाता त्यांत व्यापून असलेले एक परमात्मतत्त्वच अनुभवणे याला विज्ञान. (साक्षात्कार) म्हणतात तसेच त्याच तत्त्वापासून त्रिगुणात्मक पदार्थांची उत्पत्ती, स्थिती व लय होतात, हे जाणावे. (१५)


आदौ अंते च मध्ये च सृज्यात् सृज्यं यदन्वियात् ।
पुनः तत् प्रतिसङ्क्रामे यच्छिष्येत तदेव सत् ॥ १६ ॥
सृष्टि आरंभि जी वस्तू अंतीही तीच की उरे ।
साक्षीभूत उरे एक सद्‍वस्तु परमार्थ तो ॥ १६ ॥

आदौ अंते च मध्ये च - उत्पत्तीपूर्वी, विनाशानंतर आणि मधस्थितीत असणारे जे - सृज्यात् सृज्यं यत् अन्वियात् - एका कार्यातून दुसर्‍या कार्यात पदार्थ जात असताना त्या प्रतिकार्यात विद्यमान असते - पुनः तत्प्रतिसंक्रामे - पुनः ती कार्ये उलट रीतीने कारणात जाऊ लागली असताही - यत् शिष्येत - जे शेवटी जसेच्या तसे निर्विकार असते - तत् एव सत् - तेच सत् ब्रह्म होय - ॥१६॥
अशा प्रकारे जे परमात्मतत्त्व सुरूवातीला आणि शेवटी असते, तेच एका कार्यातून दुसर्‍या कार्यात अनुस्यूत होत राहाते आणि प्रलयकाळी उत्पन्न झालेले सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतल्यावर शेवटी जे शिल्लक राहाते, तेच ‘सत्‌‘ तत्त्व होय. (१६)


श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यं अनुमानं चतुष्टयम् ।
प्रमाणेषु अनवस्थानात् विकल्पात् स विरज्यते ॥ १७ ॥
श्रुति प्रत्यक्ष ऐतिह्य अनुमान प्रमाण चौ ।
कसोटी लाविता सर्व प्रपंच नश्वरो असे ॥
विरक्त म्हणुनी व्हावे कल्पना रूप या भवी ॥ १७ ॥

श्रुतिः प्रत्यक्षं ऐतिह्यं अनुमानं चतुष्टयं - श्रुति म्हणजे आप्तवाक्ये, प्रत्यक्ष, ऐतिहासिक आणि अनुमान ही चार प्रमाणे होत - प्रमाणेषु अनवस्थानात् विकल्पात् - या प्रमाणांना गोचर नसणार्‍या किंवा या प्रमाणांनी खंडित न होणार्‍या भेदबुद्धीपासून - सः विरज्यते - तो ज्ञानी विरक्त होतो - ॥१७॥
वेद, प्रत्यक्ष, इतिहास आणि अनुमान या चारही प्रमाणांनी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही म्हणून विवेकी पुरूष भेदबुद्धीचा त्याग करतो. (१७)


कर्मणां परिणामित्वात् आविरिञ्च्यात् अमङ्गलम् ।
विपश्चित् नश्वरं पश्येद् अदृष्टमपि दृष्टवत् ॥ १८ ॥
स्वर्गादी फलदो यज्ञ ब्रह्मलोकादि ते सुख ।
नश्वरो दुःखदायी नी अमंगलचि सर्व ते ॥ १८ ॥

विपश्चित् - ज्ञानी पुरुष - कर्मणां परिणामित्वात् - सर्व कर्मे व त्यांची फले परिणामी, अनित्य असतात म्हणून - आविरिंचात् अदृष्टं अपि - ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंतचे श्रुतिकथित अदृष्ट म्हणजे कर्म व स्वर्गातील तत्फल सुखही - दृष्टवत् अमंगलं नश्वरं पश्येत् - दृश्य सुखासारखेच अमंगल, नाशवंत आहे असे जाणतो - ॥१८॥
जसे या लोकातील भोग नाशवान आहेत, त्याप्रमाणे यज्ञादी कर्मांच्या फलस्वरूप मिळणारी स्वर्गादी ब्रह्मलोकापर्यंतची सर्व सुखे अमंगल, दुःखदायी आणि नाशवान आहेत, असे विवेकी माणसाने जाणावे. (१८)


भक्तियोगः पुरैवोक्तः प्रीयमाणाय तेऽनघ ।
पुनश्च कथयिष्यामि मद्‍भक्तेः कारणं परं ॥ १९ ॥
भक्तियोग तुम्हा पूर्वी वदलो प्रीय जो असा ।
म्हणोनी आणखी त्याचे श्रेष्ठ साधन सांगतो ॥ १९ ॥

अनघ - निष्पाप उद्धवा - पुरा एव - पूर्वीच - प्रीयमाणाय ते - मला प्रियकर असणार्‍या तुला समाधान व्हावे म्हणून - भक्तियोगः उक्तः - भक्तियोग सांगितलाच आहे - मद्‌भक्तेः परं कारणं - माझ्या भक्तीचे श्रेष्ठ कारण - पुनः च कथयिष्यामि - पुनः आणखी एकदा सांगतो - ॥१९॥
हे पुण्यशील उद्धवा ! भक्तियोगाचे स्वरूप मी तुला यापूर्वीच सांगितले आहे; परंतु तो ऐकण्याची तुला अतिशय आवड आहे म्हणून मी तुला माझी भक्ती प्राप्त होण्याचे श्रेष्ठ साधन सांगतो. (१९)


श्रद्धामृतकथायां मे शश्वन् मद् अनुकीर्तनम् ।
परिनिष्ठा च पूजायां स्तुतिभिः स्तवनं मम ॥ २० ॥
भक्ति ज्याला हवी त्याने मत्कथामृत ऐकणे ।
करावी कीर्तने नित्य निष्ठेने पूजिणे मला ॥
श्रद्धेने गाउनी स्तोत्र स्तुतिही करणे पहा ॥ २० ॥

मे अमृतकथायां श्रद्धा - माझ्य़ा अमृतासारख्या मधुर कथांवर श्रद्धा ठेऊन - शश्वत् मदनुकीर्तनं - नेहमी माझ्याविषयीच संकीर्तन करणे - परिनिष्ठा च पूजायां - माझ्या अर्चनामध्ये अखंड निष्ठा ठेवणे - स्तुतिभिः मम स्तवनं - स्तोत्रे म्हणून माझा स्तव करणे - ॥२०॥
माझ्या अमृतमय कथांविषयी श्रद्धा ठेवावी नेहमी माझ्या गुणांचे आणि नामांचे संकीर्तन करावे माझी पूजा करण्यात अत्यंत निष्ठा ठेवावी आणि स्तोत्रांच्याद्वारे माझी स्तुती करावी. (२०)


आदरः परिचर्यायां सर्वाङ्गैः अभिवंदनम् ।
मद्‍भक्तपूजाभ्यधिका सर्वभूतेषु मन्मतिः ॥ २१ ॥
मला श्रद्धेचि पूजोनी साष्टांग नमिणे पुढे ।
अधीक पूजिणे भक्तां समस्ती मजला पहा ॥ २१ ॥

परिचर्यायां आदरः - माझीच पूजादि सेवा करण्यामध्ये उत्तम आदर ठेवणे - सर्वांगैः अभिवंदनं - अष्टांगांनी अभिवंदन करणे - मद्‌भक्तपूजा - माझ्य़ा भक्तांची सादर केलेली पूजा - सर्वभूतेषु मन्मतिः - सर्व चराचर भूतांत मीच परमात्मा ओतप्रोत आहे अशी बुद्धी - अभ्यदिका - अधिका योग्यतेची आहेत हा माझा सिद्धांत - ॥२१॥
माझ्या सेवेमध्ये आदर ठेवावा मला साष्टांग नमस्कार करावा माझ्या भक्तांची पूजा विशेष रीतीने करावी आणि सर्व प्राण्यांमध्ये मला पाहावे. (२१)


मदर्थेष्वङ्गचेष्टा च वचसा मद्‌गुणेरणम् ।
मय्यर्पणं च मनसः सर्वकाम विवर्जनम् ॥ २२ ॥
सर्वकर्मी मला ध्यावे गावेही मजला मुखे ।
मनही मजला अर्पा कामना सर्व त्यागिणे ॥ २२ ॥

मदर्थेषु अंगचेष्टा च - माझ्यासाठीच सर्व व्यवहार, कर्म करणे - वचसा मद्‌गुणेरणं - वाणीने माझ्याच गुणांचे संकीर्तन करणे - मनसः च मयि अर्पणं - सर्व अंतःकरणवृत्ति मला अर्पण करणे - सर्वकामविवर्जनं - अर्थात् सर्व आशा- मनीषा यांचा त्याग करणे - ॥२२॥
आपले सर्व व्यवहार फक्त माझ्यासाठीच करावेत वाणीने माझ्याच गुणांचे वर्णन करावे आणि आपले मन मलाच अर्पण करून सर्व कामना सोडून द्याव्यात. (२२)


मदर्थेऽर्थपरित्यागो भोगस्य च सुखस्य च ।
इष्टं दत्तं हुतं जप्तं मदर्थं यद् व्रतं तपः ॥ २३ ॥
प्राप्त धन सुखा भोगा माझ्या साठीच त्यागिणे ।
यज्ञ दान तपो होम जप नी व्रत सर्व ते ॥
माझ्या प्राप्त्यर्थ ते सर्व कराव भक्तिने तसे ॥ २३ ॥

भोगस्य च, सुखस्य च मदर्थे अर्थपरित्यागः - सर्व उपभोगांचा व सर्व विषयसुखांचा माझ्याप्रीत्यर्थ त्याग करणे - मदर्थं यत् व्रतं, तपः, इष्टं, दत्तं, हुतं, जप्तं, - आणि माझ्या प्रीत्यर्थच सर्व व्रते, तप, यजन, दान, हवन, जप वगैरे करणे - ॥२३॥
धन, भोग आणि सुखाचा माझ्यासाठी त्याग करावा आणि यज्ञ, दान, हवन, जप, व्रत आणि तप असे सर्व काही माझ्यासाठीच करावे. (२३)


एवं धर्मैः मनुष्याणां उद्धवात्मनिवेदिनाम् ।
मयि सञ्जायते भक्तिः कोऽन्योऽर्थोऽस्य अवशिष्यते ॥ २४ ॥
आत्म निवेदना बोलो पाळोनी धर्म हा तदा ।
भक्तिचा उदयो होतो कंही कर्मचि ना उरे ॥ २४ ॥

उद्धव - हे उद्धवा - एवं - या प्रकारांनी - आत्मनिवेदिनां मनुष्याणां धर्मैः - सर्वथा आपला आत्मा म्हणजे शरीर, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धि, अहंकार ही सर्व मला अर्पण करणार्‍या मानवांच्या धर्मांनी कर्तव्यांनी - मयि भक्तिः संजायते - मजविषयी उत्तम प्रकारची प्रेमळ भक्ति उत्पन्न होते - अस्य - मद्‌भक्ताला - कः अन्यः अर्थः अवशिष्यते - दुसरा कोणता पुरुषार्थ साध्य करावयाचा राहतो ? ॥२४॥
उद्धवा ! जे लोक या धर्मांचे पालन करून मला समर्पित होतात, त्यांच्या हृदयामध्ये माझ्या भक्तीचा उदय होतो मग त्याला आणखी काय मिळायचे शिल्लक राहणार ? (२४)


यद् आत्मनि अर्पितं चित्तं शांतं सत्त्वोपबृंहितम् ।
धर्मं ज्ञानं स वैराग्यं ऐश्वर्यं चाभिपद्यते ॥ २५ ॥
सत्त्ववृद्धी तये होते आत्म्याला शांति लाभते ।
आपैसी लाभती भक्ता वैराग्य ज्ञान धर्म ही ॥ २५ ॥

सत्त्वोपबृंहितं शांतं यदा चित्तं - जेव्हा माझ्या भक्ताने आपले सत्त्वगुणाच्या उत्कर्षाने शांतचित्त - आत्मनि अर्पितं - आत्मस्वरूपात अर्पण केलेले असते - सवैराग्यं धर्मं ज्ञानं ऐश्वर्यं च अभिपद्यते - वैराग्यपूर्ण धर्म, ज्ञान, आणि उत्कृष्ट प्रकारचे सिद्धिरूप ऐश्वर्य प्राप्त होते - ॥२५॥
धर्माचे अशा प्रकारे पालन करण्याने चित्तामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी होते आणि ते शांत होऊन आत्मचिंतन करू लागते त्यावेळी भक्ताला धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य स्वतःहून प्राप्त होते. (२५)


यदर्पितं तद्विकल्पे इंद्रियैः परिधावति ।
रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥ २६ ॥
संसारी कल्पना कैक असोनी नाम तो नसे ।
लागता चित्त त्याच्यासी मिहाने सत्य भासते ॥
ज्ञान वैराग्य ते सारे अज्ञानें नष्टती पहा ॥ २६ ॥

यत् - जेव्हा - तत् - तेच चित्त - विकल्पे अर्पितं - भेदामुळे अथवा अनात्मक पुत्रकलत्रगेहदेहादिकांमध्ये मग्न केलेले असते - इंद्रियैः परिधावति - इंद्रिये धावतील तिकडे धावत असते - रजस्वलं असनिष्ठं च - ते रजस्वल म्हणजे विषयासक्त आणि असनिष्ठ म्हणजे नाशवंताचा अभिमान धरणारे चित्त - विपर्ययं विद्धि - उलट प्रकारचे म्हणजे अधर्म, अज्ञान, अविरक्ति आणि अनैश्वर्य प्राप्त करून घेते असे जाण - ॥२६॥
तेच मन जेव्हा मिथ्या प्रपंचात रमून इंद्रियांसह इकडेतिकडे भरकटू लागते, तेव्हा ते चित्त रजोगुणाने व्यापून नश्वर विषयांत गुंतते तेव्हा त्याची स्थिती वरील स्थितीच्या उलट होते. (२६)


धर्मो मद्‍भक्तिकृत् प्रोक्तो ज्ञानं चैकात्म्यदर्शनम् ।
गुणेषु असङ्गो वैराग्यं ऐश्वर्यं च अणिमादयः ॥ २७ ॥
भक्तीच धर्म तो आहे ब्रह्मत्मा कळतो तये ।
वैराग्य राहता लाभे ऐश्वर्य अणिमादिही ॥ २७ ॥

मद्‌भक्तिकृत् धर्मः प्रोक्तः - जेणेकरून मजविषयी भक्ति उत्पन्न होईल तोच धर्म - ज्ञानं च एकात्म्यदर्शनं - ज्ञान म्हणजे एकचएक अद्वितीय आत्मा आहे असा निश्चय - गुणेषु असंगः वैराग्यं - सत्त्वादि गुणांवर मुळीच आसक्ति नसणे हेच वैराग्य - अणिमादयः ऐश्वर्यं च - आणिमादि सिद्धि प्राप्त होणे हे ऐश्वर्य - ॥२७॥
उद्धवा ! ज्याच्यामुळे माझी भक्ती उत्पन्न होते, तोच धर्म होय ज्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा साक्षात्कार होतो, तेच ज्ञान होय विषयांपासून अलिप्त राहाणे हे वैराग्य होय आणि अणिमादी सिद्धी हेच ऐश्वर्य होय. (२७)


श्रीउद्धव उवाच -
यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वारिकर्शन ।
कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा धृतिः प्रभो ॥ २८ ॥
उद्धवजी म्हणाले -
यम ते किति नी कैसे नियमाचे प्रकारही ।
शम दम तितिक्षा नी धर्य ते काय हो प्रभो ? ॥ २८ ॥

अरिकर्शन - शत्रुविनाशका देवा - यमः कतिविधः प्रोक्तः - योगातील प्रथमांग जो यम तो किती प्रकारचा सांगितला आहे ? - वा - अथवा - नियमः - नियम किती प्रकारचे असतात - कः शमः - शमाचे स्वरूप काय - कः दमः - दमाचे काय ? - कृष्ण ! का तितिक्षा - कृष्णा ! सहनशीलता म्हणजे काय - प्रभो - भगवंता - धृतिः - धैर्य म्हणजे काय - ॥२८॥
उद्धवाने विचारले - हे रिपुसूदना ! यम आणि नियम किती प्रकारचे आहेत ? हे श्रीकृष्णा ! शम म्हणजे काय ? दम म्हणजे काय ? हे प्रभो ! तितिक्षा आणि धैर्य, हे काय आहे ? (२८)


किं दानं किं तपः शौर्यं किं सत्यं ऋतमुच्यते ।
कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥ २९ ॥
पुंसः किंस्विद् बलं श्रीमन् भगो लाभश्च केशव ।
का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥ ३० ॥
तपस्या दान नी शैर्य सत्य ऋतु स्वरूप नी ।
त्याग तो सांगणे काय धन यज्ञ नि दक्षिणा ॥ २९ ॥
सत्यबळ पुरूषाचे भग ते म्हणती कशा ।
लज्जा श्री सुख नी दुःख उच्च विद्या कशी असे ॥ ३० ॥

किं दानं - दान म्हणजे काय - किं तपः - तप कोणते - किं शौर्यं - शौर्य कसे असते - ऋतं सत्यं उच्यते - ऋत व सत्य कशाला म्हणतात - कः त्यागः - त्याग कोणता - किं धनं च इष्टं - कोणते धन आदरणीय आहे - कः यज्ञः - यज्ञ म्हणजे काय - का च दक्षिणा - दक्षिणा कशी असते व असावी - ॥२९॥ श्रीमान् - लक्ष्मीपते - पुंसः बलं किंस्वित् - पुरुषाचे खरे बल कोणते - भगः - भाग्य कोणते - लाभः च - खरा लाभ कसा - केशव - कृष्णा - का (परा) विद्या - उत्तम विद्या कोणती - का परा ‍र्‍हीः - उत्कृष्ट विनय कोणता - का परा श्रीः - उत्तमोत्तम संपत्ति कोणती - किं सुखं दुःखं एव च - सुख कसे असते आणि दुःखाचे स्वरूप कसे असते बरे - ॥३०॥
दान, तपश्चर्या, शौर्य, सत्य, ऋत त्याग, कल्याणकारी धन, यज्ञ आणि दक्षिणा यांचे स्वरूप काय आहे ? श्रीमान केशवा ! पुरूषांचे खरे बळ कोणते ? भग आणि लाभ म्हणजे काय ? विद्या, लज्जा, श्रेष्ठ श्री, तसेच सुख व दुःख हे काय आहे ? (२९-३०)


कः पण्डितः कश्च मूर्खः कः पंथा उत्पथश्च कः ।
कः स्वर्गो नरकः कः स्वित् को बंधुरुत किं गृहम् ॥ ३१ ॥
क आढ्यः को दरिद्रो वा कृपणः कः क ईश्वरः ।
एतान् प्रश्नान् मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥ ३२ ॥
कोणे पंडित नी मूर्ख कु-सुमार्गीहि सांगणे ।
स्वर्ग नी नरको काय बंधु कोणास माणणे ॥
घर ते म्हणजे काय सांगणे पुरुषोत्तमा ॥ ३१ ॥
निर्धनी धनवान कोण कोना कृपण ईश्वर ।
प्रश्राची उत्तरे विरोधी भाव सांगणे ॥ ३२ ॥

कः पंडितः कः च मूर्खः - पंडित कोणाला म्हणावे व मूर्ख कोण - कः पंथाः कः च उत्पथः - देवमान्य मार्ग कोणता व भ्रष्टकारी मार्ग कोणता - कः स्वर्गः कः स्वित् नरकः - स्वर्ग कोणता ? नरक कोणता ? - कः बंधुः - बंधु कोण ? - उत किं गृहं - खरे गृह किंवा धाम कोणते - ॥३१॥ क आढयः कः दरिद्रः - खरा श्रीमंत कोण ? दरिद्री कसा असतो - वा - अथवा - कः कृपणः - खरा कंजुष कोण - कः ईश्वरः - ईश्वर कोण - सत्पते - हे सत्पालका कृष्णा - एतान् प्रश्नान् - ह्या प्रश्नांची - विपरीतान् च - व ह्यांच्या उलट जे अशम, अदम इत्यादि त्यांचीही लक्षणे - मम ब्रूहि - मला सांग - ॥३२॥
पंडित आणि मूर्ख यांची लक्षणे कोणती ? सन्मार्ग आणि कुमार्ग म्हणजे काय ? स्वर्ग आणि नरक हे काय आहेत ? बंधू कोणाला मानावे ? घर म्हणजे काय ? धनवान कोण आणि निर्धन कोण ? कंजूष कोण आहे ? ईश्वर कोणाला म्हणतात ? हे भक्तवत्सल प्रभो ! आपण माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या त्याचबरोबर यांच्या विरोधी जे पदार्थ आहेत, त्यांच्याविषयीही सांगा. (३१-३२)


श्रीभगवानुवाच -
अहिंसा सत्यमस्तेयं असङ्गो ह्रीः असञ्चयः ।
आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमा अभयम् ॥ ३३ ॥
शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यं मदर्चनम् ।
तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिः आचार्यसेवनम् ॥ ३४ ॥
एते यमाः सनियमा उभयोः द्वादश स्मृताः ।
पुंसां उपासिताः तात यथाकामं दुहंति हि ॥ ३५ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
अहिंसा सत्य अस्तेय लज्जाऽसंग असंचय ।
आस्तिक्य ब्रह्मचर्यो नी मौन स्थौर्य क्षमाऽभय ॥ ३३ ॥
बारा हे नियमो जाणा यम बारा पुढील ते ।
शौच जप तपो होम श्रद्धा सेवा अतीथिसी ॥ ३४ ॥
परोपकार संतोष तीर्थयात्रा गुरुपुजा ।
सकाम आणि निष्कामे भोगे मोक्षादि देत ती ॥ ३५ ॥

अहिंसा, सत्यं, अस्तेयं, - १) कसली हिंसा न करणे, २) सत्यनिष्ठ असणे, ३) परापहार गुप्तपणे अथवा प्रसिद्धपणेही न करणे, असंगः, र्‍हीः, असंचयः, - ४) कोणत्याही अनात्म विषयावर आसक्ति नसणे, ५) मर्यादा ठेवणे, ६) खाद्य पेय भोग्यांचा संग्रह न करणे, आस्तिक्यं, ब्रह्मचर्यं च, - ७) आप्तवाक्यांवर म्हणजे धर्मगुरु प्रभृति सांगतील त्यावर विश्वास ठेवणे, ८) ब्रह्मचर्य पाळणे, मौनं, स्थैर्यं, क्षमा, अभयं, - ९) व्यर्थ बडबड न करणे, १०) चित्त स्थिर असणे, ११) क्षमावृत्ति धारण करणे आणि १२) सर्वांस अभय देणे हे बारा यम होत - ॥३३॥ शौचं, जपः, तपः, होमः, - १) शरीराची शुद्धि, २) मनाची शुद्धि, ३) जप करणे, ४) तपाचे आचरण, ५) आश्रमास योग्य ते हवन करणे, - श्रद्धा, आतिथ्यं, मदर्चनं, तीर्थाटनं, - ६) धर्माविषयी आदर असणे, ७) अतिथींचा परामर्श घेणे, ८) माझी पूजा करणे, ९) तीर्थयात्रा करणे, परार्थेहा, तुष्टिः, आचार्यसेवनं - १०) आत्मप्राप्तीसाठी मनःपूर्वक यत्न करणे, ११) संतोषवृत्ति असणे, १२) गुरुसेवा करणे हे बारा नियम होत - ॥३४॥ उभयोः एते सनियमाः यमाः द्वादश स्मृताः - प्रवृत्तींच्या पुरुषांस व निवृत्त साधूंस म्हणजे उभयतांस उपयोगी पडणारे बारा नियमांसह बारा यम शास्त्रांनी सांगितले आहेत - तात - बाळा उद्धवा - उपासिताः - या यमनियमांचे सादर ग्रहण व तदनुसार आचरण केल्यास - पुंसां यथाकामं दुहंति - निवृत्त साधूंचे व प्रवृत्त संसार्‍यांचे जे काय मनोरथ असतील ते पूर्ण करितात- हि - असा सिद्धांत प्रसिद्ध आहे - ॥३५॥
श्रीकृष्ण म्हणाले - अहिंसा, सत्य, चोरी न करणे आसक्ती नसणे, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा आणि अभय हे ‘यम‘ होत अंतःशुद्धी बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथिसेवा, माझे पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष आणि गुरूसेवा, हे ‘नियम‘ अशा प्रकारे यम आणि नियम या दोन्हींची संख्या प्रत्येकी बारा आहे हे उद्धवा ! जे लोक यांचे पालन करतात, त्यांना हे त्यांच्या इच्छेनुसार फळे देतात. (३३-३५)


शमो मन्निष्ठता बुद्धेः दम इंद्रियसंयमः ।
तितिक्षा दुःखसम्मर्षो जिह्वोपस्थजयो धृतिः ॥ ३६ ॥
शम ते मजला चित्त इंद्रिया रोधिणे दम ।
तितिक्षा साहणे दुःख जिव्होपस्थीजयो धृती ॥ ३६ ॥

शमः बुद्धेः मन्निष्ठता - शम म्हणजे बुद्धि सर्वस्वी माझ्या ठिकाणी निष्ठेने ठेवणे, तात्पर्य शम- ईश्वरनिष्ठा - दमः इंद्रियसंयमः - दम म्हणजे इंद्रियानिग्रह - तितिक्षा दुःखसंमर्षः - दुःख सहन करण्याचे सामर्थ्य ही तितिक्षा - धृतिः जिव्होपस्थजयः - जिव्हा आणि कामदंड यांच्या आवेगास स्वाधीन ठेवणे ही धृति होय -॥३६॥
बुद्धी माझ्या ठायी स्थिर करणे म्हणजेच ‘शम‘ होय इंद्रियांच्या संयमाचे नाव ‘दम‘ आहे दुःख सहन करण्याला ‘तितिक्षा‘ म्हणतात जीभ आणि जननेंद्रिय यांच्यावर विजय मिळवणे हेच ‘धैर्य’ होय. (३६)


दण्डन्यासः परं दानं काम त्यागः तपः स्मृतम् ।
स्वभावविजयः शौर्यं सत्यं च समदर्शनम् ॥ ३७ ॥
दंड देणे परं दान इच्छा त्यागात ते तप ।
वासना जिंकिता शौर्य समदृष्टीच सत्य ते ॥ ३७ ॥

दंडन्यासः परं दानं - दंडाचा म्हणजे वैरसूचक हत्याराचा त्याग हेच श्रेष्ठ दान - तपः कामत्यागः - वासनांचा त्याग म्हणजेच तप - स्मृतं - असे म्हटले आहे - स्वभावविजयः शौर्यं - आपल्यासह उत्पन्न झालेल्या षड्रिपूंवर जय मिळविणे हे खरे शौर्य - च - आणि - सत्यं समदर्शनं - सर्वत्र अवघे ब्रह्मरूप पाहणे हे सत्य - ॥३७॥
सर्वांना अभय देणे हेच परम ‘दान‘ आहे कामनांचा त्याग म्हणजेच ‘तप‘ आपल्या वासनांवर विजय मिळवणे म्हणजेच ‘शूरता‘ समदर्शन हे ‘सत्य‘ होय. (३७)


अन्यच्च सुनृता वाणी कविभिः परिकीर्तिता ।
कर्मसु असङ्गमः शौचं त्यागः संन्यास उच्यते ॥ ३८ ॥
शब्द सत्य मधु ऋतो अनासक्तीच शौच ते ।
वासनात्याग संन्यास महात्मे सांगती असे ॥ ३८ ॥

ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता - सत्य व प्रिय बोलणे ऋत होय असे समदर्शी कवि म्हणत असतात - कर्मसु असंगमः शौचं - कर्मसंबंधे असंग, निःसंग असणे, अनासक्त असणे याचे नाव शौच - त्यागः संन्यासः उच्यते - त्याग म्हणजे संन्यास असे म्हटले आहे - ॥३८॥
मधुर भाषणाला महात्म्यांनी ‘ऋत‘ म्हटले आहे कर्मांमध्ये आसक्त न होणे म्हणजेच ‘पावित्र्य‘ कामनांचा त्याग हाच ‘संन्यास‘. (३८)


धर्म इष्टं धनं नॄणां यज्ञोऽहं भगवत्तमः ।
दक्षिणा ज्ञानसंदेशः प्राणायामः परं बलम् ॥ ३९ ॥
अभीष्ट धन तो धर्म यज्ञ मी परमेश्वर ।
प्राणायाम बलो श्रेष्ठ ज्ञानोपदेश दक्षिणा ॥ ३८ ॥

नृणां इष्टं धनं धर्मः - लोकांस अत्यंत उपकारक धन कोणते तर धर्म होय - यज्ञः भगवत्तमः अहं - यज्ञ म्हणजे परमश्रेष्ठ जो भगवान तो मी - दक्षिणा ज्ञानसंदेशः - दक्षिणा म्हणजे ज्ञानाचा उपदेश - परं बलं प्राणायामः - प्राणाचा निरोध करता येणे हे श्रेष्ठ बल होय - ॥३९॥
धर्म हेच माणसांचे कल्याणकारी ‘धन‘ आहे मी परमेश्वर ‘यज्ञ‘ आहे ज्ञानाचा उपदेश करणे म्हणजेच ‘दक्षिणा‘ होय प्राणायाम हेच श्रेष्ठ ‘बळ‘ होय. (३९)


भगो मे ऐश्वरो भावो लाभो मद्‍भक्तिरुत्तमः ।
विद्याऽऽत्मनि भिदाबाधो जुगुप्सा ह्रीः अकर्मसु ॥ ४० ॥
भग ऐश्वर्य ते माझे भक्ती श्रेष्ठचि लाभ तो।
आत्माविद्याच ती श्रेष्ठ लज्जा पापास जी धृणा ॥ ४० ॥

भगः मे ऐश्वरः भावः - भग-सुदैव-माझे भगवंताचे जे षड्‌गुण ऐश्वर्य ते - उत्तमः लाभः मद्‌भक्तिः - उत्तमोत्तम लाभ म्हणजे माझी भक्ति होय - विद्या आत्मनि भिदाबाधः - विद्या-जीवात्मस्वरूपात जे भेद भासतात त्यांचा समूळ निरास - र्‍हीः अकर्मसु जुगुप्सा - र्‍ही म्हणजे निंद्यकर्मासंबंधी तिरस्कारबुद्धि - ॥४०॥
माझे ऐश्वर्यच ‘भग‘ आहे माझी भक्ती हाच उत्तम ‘लाभ‘ आहे, जिच्यामुळे ब्रह्म आणि आत्मा यांमधील भेद नाहीसा होतो, तीच खरी ‘विद्या‘ समजावी पाप करण्याची घृणा वाटणे, याचेच नाव ‘लज्जा‘ असे आहे. (४०)


श्रीर्गुणा नैरपेक्ष्याद्याः सुखं दुःखसुखात्ययः ।
दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बंधमोक्षवित् ॥ ४१ ॥
निरपेक्षादि ती श्री नी सुख दुःखा त्यजो सुख ।
विषयी कामना दुःख बंध-मोक्षज्ञ पंडित ॥ ४१ ॥

श्रीः नैरपेक्ष्याद्याः गुणाः - श्री-अलंकार कोणते तर निरपेक्षता-स्वतंत्रता प्रभृति गुण - सुखं दुःखसुखात्ययः - सुख=दुःख व सुख यांच्या पलीकडे असणे, त्यांची खबरही नसणे - दुःखं कामसुखापेक्षा - दुःख म्हणजे इष्ट विषयांच्या उपभोगाची लालसा - पंडितः बंधमोक्षवित् - बंध व मोक्ष यांची स्वरूपे जाणणारा तो पंडित - ॥४१॥
निरपेक्षता इत्यादी गुणच ‘श्री‘ होय सुखदुःखाच्या पलीकडे जाणे म्हणजेच ‘सुख‘ विषयांची कामना हेच ‘दुःख‘ समजावे आणि बंधन व मोक्षाचे तत्त्व जाणणे हेच ‘पांडित्य‘ होय. (४१)


मूर्खो देहाद्यहंबुद्धिः पंथा मन्निगमः स्मृतः ।
उत्पथः चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥ ४२ ॥
नरकः तम उन्नाहो बंधुर्गुरुरहं सखे ।
गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥ ४३ ॥
मी पणा मूर्खता होय भक्तिमार्ग सुमार्ग तो ।
बहिर्चित कुमार्गो नी सत्त्ववृद्धीच स्वर्ग तो ॥ ४२ ॥
नरको तमवृद्धी ती सख्खा बंधू गुरू असे ।
मी स्वता गुरु सर्वांचा देह-घर धनो-गुणी ॥ ४३ ॥

मूर्खः देहाद्यहंबुद्धिः - देहादि नश्वर वस्तूच मी आहे अशी बुद्धि ठेवणारा तो मूर्ख - पंथाः मन्निगमः स्मृतः - सन्मार्ग तो, की ज्या मार्गाने गेले असता माझी-परमेश्वराची गाठ पडते असे स्मृती म्हणते - उत्पथः चित्तविक्षेपः - उत्पथः= चित्ताला विक्षिप्त करणारा, मोह पाडणारा, भ्रष्ट करणारा मार्ग - स्वर्गः सत्त्वगुणोदयः - स्वर्ग= सात्त्विक गुणांचा उदय होतो ते स्थान - ॥४२॥ नरकः तम उन्नाहः - नरक तो, की जेथे तामसी गुणांचा उत्कर्ष होतो - सखे - सख्या उद्धवा - बंधुः गुरुः अहं - बंधु कोण ? मोक्षोपदेश करणारे आचार्य. श्रीकृष्ण म्हणतो मीच सर्वांचा गुरु, सर्वांचा कल्याणकर्ता आहे - गृहं मानुष्यं शरीरं - गृह कोणते ? उत्तम भोग भोगण्याचे साधन जे मानवी शरीर ते होय - आढय= गुणाढयः हि उच्यते - आढय= संपत्तिमान कोण ? जो सात्विकगुणसंपन्न आहे तो - ॥४३॥
शरीर इत्यादींना ‘मी‘ मानणारा तो ‘मूर्ख‘ होय माझी प्राप्ती करून देतो, तोच खरा ‘मार्ग‘ होय चित्ताची बहिर्मुखता हाच ‘कुमार्ग‘ होय सत्त्वगुणाची वृद्धी म्हणजेच ‘स्वर्ग‘ आणि सखया ! तमोगुणाची वृद्धीच ‘नरक‘ होय गुरूच खरा ‘बंधू‘ होय आणि तो गुरू मी आहे हे मनुष्यशरीर हेच खरे ‘घर‘ आहे तसेच जो गुणांनी संपन्न आहे तोच ‘धनवान‘ समजावा. (४२-४३)


दरिद्रो यस्तु असन्तुष्टः कृपणो यो अजितेंद्रियः ।
गुणेषु असक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥ ४४ ॥
असंतुष्ट दरिद्री तो कृपणो अजितेंद्रिय ।
स्वातंत्र्य ईश्वरो रूप आसक्त असमर्थ तो ॥ ४४ ॥

दरिद्रः यः असंतुष्टः - जो सर्वदा असंतुष्ट खिन्नमुख तो दरिद्री - कृपणः यः अजितेंद्रियः - कृपण कोण ? ज्याने इंद्रियांवर आपले प्रभुत्व स्थापन केले नाही तो - ईशः गुणेषु असक्तधीः - प्रभु कोण ? सत्त्वादि गुणांमध्ये जो आसक्त झाला नाही, ज्याची बुद्धी गुणांमध्ये रममाण झाली नाही तो - गुणसंगः विपर्ययः - गुणांमध्ये आसक्ति धरणे याचे नाव अप्रभुत्व, पारतंत्र्य - ॥४४॥
जो असंतुष्ट असतो तो ‘दरिद्री‘ होय इंद्रिये ताब्यात नसलेला तो ‘कृपण‘ होय ज्याची चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही, तोच ‘ईश्वर‘ याच्या उलट जो विषयांमध्ये आसक्त आहे, तोच ‘असमर्थ‘. (४४)


एते उद्धव ते प्रश्नाः सर्वे साधु निरूपिताः ।
किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ।
गुणदोषदृशिर्दोषो गुणस्तु उभयवर्जितः ॥ ४५ ॥
उद्धवा तुमच्या प्रश्रा दिधली सर्व उत्तरे ।
कळता मोक्ष हो सोपा गुण दोष बहूत ते ॥
न पहा मुळि ते कांही शांत संकल्पि राहुनी ।
स्वरुपीं स्थिरची व्हावे सर्वात गुण श्रेष्ठ हा ॥ ४५ ॥

उद्धव एते ते सर्व प्रश्नाः साधु निरूपिताः - उद्धवा ! हे तुझे जे सारे प्रश्न होते त्यांची मी समर्पक उत्तरे दिली आहेत. ती उत्तरे मोक्षोपयोगी आहेत - किं वर्णितेन बहुना - फार काय वर्णन करावे - गुणदोषयोः लक्षणं - गुण व दोष यांचे लक्षण सांगतो ते ऐक - गुणदोषदृशिः दोषः - पदार्थांचे गुणदोष आपल्यास ज्ञात झाले आहे अशी दृष्टि असणे याचे नाव दोष. ॥ ४५ ॥
उद्धवा ! तू जितके प्रश्न विचारले होतेस, त्या सर्वांची मी उत्तरे दिली गुण आणि दोषांची वेगवेगळी लक्षणे मी तुला किती म्हणून सांगू ? सगळ्यांचा सारांश एवढाच की, गुण आणि दोष पाहात राहाणे हाच सर्वात मोठा दोष आहे आणि गुणदोषांकडे दृष्टी न देणे हाच सर्वात मोठा गुण होय. (४५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP