|
श्रीमद् भागवत पुराण वर्णधर्मनिरूपणम्, आश्रमेषु ब्रह्मचारी गृहस्थ धर्मवर्णं च - वर्णाश्रम धर्म निरूपण - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीउद्धव उवाच -
( अनुष्टुप् ) यः त्वया अभिहितः पूर्वं धर्मः त्वद्भक्तिलक्षणः । वर्णाश्रम आचारवतां सर्वेषां द्विपदामपि ॥ १ ॥ यथा अनुष्ठीयमानेन त्वयि भक्तिर्नृणां भवेत् । स्वधर्मेण अरविंदाक्ष तत् समाख्यातुमर्हसि ॥ २ ॥
उद्धवजी म्हणाले - ( अनुष्टुप ) सामान्य त्या मनुष्याला जेणे लाभेल भक्ति ती । वर्णाश्रम असा धर्म तुम्ही प्रथम बोधिला ॥ १ ॥ कृपया सांगणे आता मनुष्या कोणत्या परी । धर्मां अनुष्ठिता लाभे भक्ति या चरणासि ते ॥ २ ॥
वर्णाश्रमाचारवतां - सर्व वर्ण आणि आश्रम यांचे विभाजन स्पष्ट झालेले आहे अशा - सर्वेषां द्विपदां अपि - सर्व मनुष्यांसही उपयुक्त - पूर्वं - आदिकाळी - त्वद्भक्तिलक्षणः यः धर्मः - तुझी भक्ति हेच मुख्य लक्षण ज्याचे असा जो धर्म - त्वया अभिहितः - तू सांगितलास. ॥ १ ॥ अरविंदाक्ष - हे कमलनेत्रा - नृणां त्वयि भक्तिः भवेत् - जीवांची तुझ्या ठिकाणी भक्ति राहील अशासाठी - स्वधर्मेण यथा अनुष्ठीयमानेन - स्वधर्माचे अनुष्ठान कसे करावे - तत् समाख्यातुं अर्हसि - ते सर्व मला सांगण्याला तू योग्य आहेस. ॥ २ ॥
उद्धव म्हणाला हे कमलनयन श्रीकृष्णा ! आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळणार्या माणसांसाठी तसेच सर्वच माणसांसाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला होत्या, त्या त्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केल्याने माणसांना आपली भक्ती प्राप्त होईल, ते मला सांगावे. (१-२)
पुरा किल महाबाहो धर्मं परमकं प्रभो ।
यत्तेन हंसरूपेण ब्रह्मणेऽभ्यात्थ माधव ॥ ३ ॥
अगोदर महाबाहो हंस रूपास घेउनी । ब्रहम्यासी बोध तो केला श्रेष्ठ धर्मचि माधवा ॥ ३ ॥
माधव महाबाहो - लक्ष्मीपते आजानुबाहो - तेन हंसरूपेणं - त्वा हंसरूप घेऊन - ब्रह्मणे - ब्रह्मदेवाला - प्रभो - हे सर्वेश्वरा - पुरा - फार प्राचीन काळी - यत् - जो - परमकं धर्मं अभ्यात्थ किल - श्रेष्ठतम धर्माचाच उपदेश केला. ॥ ३ ॥
हे प्रभो ! महाबाहो माधवा ! पूर्वी आपण हंसरूपाने ब्रह्मदेवांना परमधर्माचा उपदेश केला होता. (३)
स इदानीं सुमहता कालेनामित्रकर्शन ।
न प्रायो भविता मर्त्य लोके प्राक् अनुशासितः ॥ ४ ॥
मृत्युलोक असा झाला असोनी नसल्या परी । बहूत दिन ते झाले तुम्ही ना उपदेशिले ॥ ४ ॥
सः प्राक् अनुशासितः - तो मागे सांगितलेला कर्तव्यरूपी धर्म - अमित्रकर्शन - शत्रुसंहारका - सुमहता कालेन - पुष्कळच काळ लोटल्यामुळे - इदानीं - या काळी - मर्त्यलोके - मृत्युलोकी - प्रायः न भविता - बहुधा कल्याणकारक होणार नाही. ॥ ४ ॥
हे रिपुदमना ! पुष्कळ काळ निघून गेल्याकारणाने यावेळी पूर्वी सांगितलेला तो धर्म मृत्यूलोकातून जवळजवळ नाहीसा झाल्यासारखाच आहे. (४)
वक्ता कर्ताविता नान्यो धर्मस्याच्युत ते भुवि ।
सभायामपि वैरिञ्च्यां यत्र मूर्तिधराः कलाः ॥ ५ ॥
पृथ्वि नी सत्य लोकात मुर्तिमान वेद राजती । वक्ता ना कुणिही त्यांचा तुमच्याविण या जगीं ॥ ५ ॥
अच्युत - सदा स्वरूपातच असणार्या देवा - भुवि - या लोकी - धर्मस्य वक्ता, कर्ता, अविता - धर्माचे प्रवचन करणारा, धर्मस्थापना करणारा, धर्मसंरक्षण करणारा - ते अन्यः न - तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही - यत्र मूर्तिधराः कलाः - जेथे वेदादि प्रत्यक्ष मूर्तिमंत असतात अशा - वैरिच्यां सभायां अपि - ब्रह्मसभेत सुद्धा. ॥ ५ ॥
हे अच्युता ! ब्रह्मदेवाच्या ज्या सभेतही वेदादिक कला मूर्तिमंत होऊन विराजमान असतात, तेथे सुद्धा आपल्याखेरीज दुसरा कोणीही, आपला हा धर्म तयार करणारा, तो सांगणारा व त्याचे रक्षण करणारा नाही मग पृथ्वीवर कसा असेल ? (५)
कर्त्रावित्रा प्रवक्त्रा च भवता मधुसूदन ।
त्यक्ते महीतले देव विनष्टं कः प्रवक्ष्यति ॥ ६ ॥
धर्मप्रवर्तको तैसे रक्षिते उपदेशक । तुम्हीच एकटे आहा पूर्वीही रक्षिले तुम्ही ॥ आवरोनि लिला सर्व जाता धामास तैं तुम्ही । धर्म हा लोप पावेल सांगेल कोण तो पुन्हा ॥ ६ ॥
मधुसूदन देव - मधु राक्षसाला मारणार्या देवा - कर्त्रा, अवित्रा, प्रवक्त्रा च भवता - धर्मकर्ता, धर्मसंरक्षक, आणि धर्मोपदेशक जो तू त्या त्वा - महीतले त्यक्ते - ही पृथ्वी सोडून गेल्यानंतर - विनष्टं - नष्ट झालेला धर्म - कः प्रवक्ष्यति - कोण सांगू शकेल ? ॥ ६ ॥
हे मधुसूदना ! या धर्माचे प्रवर्तक, रक्षण करणारे आणि उपदेशक असे आपणच पृथ्वीवरून निघून गेल्यावर हा लुप्त धर्म कोण सांगेल ? (६)
तत्त्वं नः सर्वधर्मज्ञ धर्मः त्वद्भक्तिलक्षणः ।
यथा यस्य विधीयेत तथा वर्णय मे प्रभो ॥ ७ ॥
मर्मज्ञ सर्व धर्माचे म्हणोनी सांगणे प्रभो । भक्ति प्राप्त जये होय विधान कोणते तसे ॥ ७ ॥
तत् - म्हणून - सर्वधर्मज्ञ प्रभो - सर्व धर्मांचे ज्ञान असणार्या कृष्णा - त्वद्भक्तिलक्षणः धर्मः - त्वद्भक्तियुक्त धर्म - नः - आम्हांपैकी - यस्य यथा विधीयेत - ज्या कोणास जसा उपदेश अवश्य हितकर आहे - तथा - त्याप्रमाणे - त्वं मे वर्णय - तू मला सविस्तर सांग. ॥ ७ ॥
म्हणून सर्व धर्म जाणणार्या हे प्रभो ! आपली भक्ती प्राप्त करून देणारा हा धर्म ज्याला जसा आचरणे योग्य आहे, तसा सांगावा. (७)
श्रीशुक उवाच -
इत्थं स्वभृत्यमुख्येन पृष्टः स भगवान् हरिः । प्रीतः क्षेमाय मर्त्यानां धर्मान् आह सनातनान् ॥ ८ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - पुसता प्रश्र हा ऐसा भगवंतास उद्धवे । हासोनी वदलो कृष्ण कल्याणप्रद धर्म तो ॥ ८ ॥
इत्थं - याप्रमाणे - स्वभृत्यमुख्येन - आपल्या सेवकांमध्ये मुख्य अशा उद्धवाने - पृष्ठः - विचारलेला - सः भगवान् हरिः - तो भगवान श्रीकृष्ण - प्रीतः - संतुष्ट होऊन - मर्त्यानां क्षेमाय - मनुष्यांच्या कल्याणाकरिता - सनातनान् धर्मान् आह - पुरातन अशा धर्माप्रत सांगता झाला. ॥ ८ ॥
श्रीशुक म्हणतात - आपल्या भक्तशिरोमणी उद्धवाने जेव्हा असा प्रश्न विचारला, तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांना सनातनधर्माचा उपदेश केला. (८)
श्रीभगवानुवाच -
धर्म्य एष तव प्रश्नो नैःश्रेयसकरो नृणाम् । वर्णाश्रम आचारवतां तमुद्धव निबोध मे ॥ ९ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - धर्ममय असा प्रश्र मनुष्या मोक्ष दायक । म्हणोनी बोधितो सर्व ऐक सावध हो मी ॥ ९ ॥
उद्धव - उद्धवा - एषः तव प्रश्नः धर्म्यः - हा तुझा प्रश्न धर्माला अनुकूल म्हणून फार चांगला - वर्णाश्रमाचारवतां नृणां नैःश्रेयसकरः च - व वर्णाश्रमानुसार चालण्याचा ज्यांचा निश्चय आहे, त्यांचे कल्याण करणार आहे - तं मे निबोध - तोच धर्म मजपासून ऐक. ॥ ९ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - हे उद्धवा ! तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या व आश्रमांच्या माणसांना परम कल्याणस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे म्हणून मी तुला त्या धर्मांविषयी सांगतो ऐक. (९)
आदौ कृतयुगे वर्णो नृणां हंस इति स्मृतः ।
कृतकृत्याः प्रजा जात्या तस्मात् कृतयुगं विदुः ॥ १० ॥
पूर्वी कृतयुगा मध्ये हंस एकचि वर्ण तो । कृतकृत्य प्रजा सारी म्हणोनी कृतयूग ते ॥ १० ॥
आदौ कृतयुगे - आरंभकाळी कृतयुगात - नृणां वर्णः ‘हंसः ’ इति स्मृतः - सर्व लोकांचा एकच वर्ण होता. त्यालाच ‘हंस ’ असे म्हणत असत - प्रजाः जात्या कृतकृत्याः - त्यावेळी सर्व लोक कृतार्थ होते - तस्मात् - म्हणून - ‘कृतयुगं ’ विदुः - त्या काळाला ‘कृतयुग ’ हे सार्थ नाव आहे. ॥ १० ॥
या कल्पाच्या आरंभी, सत्ययुगात सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता त्यावेळी सर्वजण जन्मतःच कृतकृत्य होते म्हणूनच त्याचे नाव कृतयुग असेही आहे. (१०)
वेदः प्रणव एवाग्रे धर्मोऽहं वृषरूपधृक् ।
उपासते तपोनिष्ठा हंसं मां मुक्तकिल्बिषाः ॥ ११ ॥
ॐकारीं वेद तै होते धर्म मी वृषभो रुपीं । निष्पाप सर्व तै भक्त हंस रूपास पूजिती ॥ ११ ॥
अग्रे - आदिकालीन युगात - अहं वृषरूपधृक् धर्मः वेदः प्रणवः एव - चतुष्पादरूप धरणारा जो धर्म तो मी प्रणवात्मक मात्र वेद होतो - मुक्तकिल्बिषाः तपोनिष्ठाः - तत्कालीन पापशून्य असून एकनिष्ठ मनस्तपश्चर्या करणारे लोक - मां हंसं उपासते - हंसरूप जो मी, त्या माझे ध्यानमात्र करीत असत. ॥ ११ ॥
त्यावेळी फक्त प्रणवच. (ॐकार) वेद होता आणि तपश्चर्या, पावित्र्य, दया व सत्य अशा चार चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण केलेला धर्म होतो त्यावेळचे निष्पाप आणि केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते. (११)
त्रेतामुखे महाभाग प्राणान् मे हृदयात् त्रयी ।
विद्या प्रादुरभूत् तस्या अहं आसं त्रिवृन्मखः ॥ १२ ॥
चेतायमात माझ्याची श्वासे त्रै वेद जाहले । ते यज्ञ घेवोनी तदा मी पातलो असे ॥ १२ ॥
त्रेतासुखे - त्रेतायुगाच्या आरंभी - महाभाग - सौभाग्यशील उद्धवा - मे प्राणात् हृदयात् - माझ्या प्राणरूपी शक्ति असणार्या हृदयापासून - त्रयी विद्या प्रादुरभूत् - ऋक्, यजुः, साम, ही वेदत्रयी प्रकट झाली - तस्याः - तिच्यामुळे - अहं - मी - त्रिवृन्मुखः आसं - तीन स्वरूपांचा झालो. ॥ १२ ॥
हे उद्धवा ! त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद असे तीन वेद प्रगट झाले त्यांपासून होता, अध्वर्यू व उद्गाता हे कर्मरूप तीन भेद असणार्या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो. (१२)
विप्रक्षत्रिय विट् शूद्रा मुखबाहूः उपादजाः ।
वैराजात् पुरुषात् जाता य आत्माचारलक्षणाः ॥ १३ ॥
विराटामुखि ते विप्र भुजांत क्षत्रियो तसे । मोडासी वैश्य नी पायीं शूद्र ते जन्मले पहा । स्वभावे वर्तने येती आपणा ओळखावया ॥ १३ ॥
विप्रक्षत्रियविट्शूद्राः - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण - वैराजात् पुरुषात् - विराट नामक पुरुषाच्या - मुखबाहूरुपादजाः जाताः - अनुक्रमे मुख, हस्त, मांडया आणि चरण यांपासून उत्पन्न झाले - ये आत्माचारलक्षणाः - ते सर्व लोक स्वभावसिद्ध गुणधर्मानुरूप त्या त्या वर्णांचे असे ठरे. ॥ १३ ॥
विराट पुरूषाच्या मुखापासून ब्राह्मण, बाहूंपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्रांची उत्पत्ती झाली त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खूण होती. (१३)
गृहाश्रमो जघनतो ब्रह्मचर्यं हृदो मम ।
वक्षःस्थलाद् वने वासो न्यासः शिर्षणि संस्थितः ॥ १४ ॥
गृहस्थाश्रम मांडीसी ब्रह्मचर्य हृदीं मम । छातीसी वानप्रस्थो नी संन्यास शिरिं जाहला ॥ १४ ॥
मम जघनतः गृहाश्रमः - माझ्या जघनापासून गृहस्थाश्रम - हृदः ब्रह्मचर्यं - हृदयापासून ब्रह्मचर्य आश्रम - वक्षःस्थानात् वने वासः - वक्षःस्थलापासून वानप्रस्थ (आणि) - शीर्षणि न्यासः संस्थितः - मस्तकापासून संन्यासाची उत्पत्ति झाली. ॥ १४ ॥
विराट पुरूषरूप माझ्या जघनभागापासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षःस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रमाची उत्पत्ती झाली. (१४)
वर्णानां आश्रमाणां च जन्मभूमि-अनुसारिणीः ।
आसन् प्रकृतयो नृणां नीचैः नीचोत्तमोत्तमाः ॥ १५ ॥
जन्मस्थानानुसारेच वर्ण आश्रम पौरुषी । स्वभाव जाहले तैसे उत्तमाधम मध्यम ॥ १५ ॥
वर्णानां आश्रमणां च नृणां प्रकृतयः - वर्णांत व आश्रमांत राहणार्या पुरुषांच्या प्रकृति म्हणजे स्वभाव वगैरे - जन्मभूम्यनुसारिणीः आसन् - जन्मभूमि म्हणजे क्षेत्रे - जन्मस्थाने यांनुसार असत - नीचैः नीचाः - नीच जन्मस्थान असेल तर नीच प्रकृति - उत्तमोत्तमा - उत्तम असेल, तर उत्तम प्रकृति असे. ॥ १५ ॥
या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभावसुद्धा त्यांच्या जन्माच्या ठिकाणांनुसार उत्तम, मध्यम आणि अधम असे झाले. (१५)
शमो दमस्तपः शौचं संतोषः क्षांतिरार्जवम् ।
मद्भक्तिश्च दया सत्यं ब्रह्मप्रकृतयस्त्विमाः ॥ १६ ॥
शम दमो तपो शुद्धी संतोष शांति आर्जत । मद्भक्ती नि दया सत्य विप्रस्वभाव तो असे ॥ १६ ॥
शमः, दमः, तपः, शौचं, मनाचा शम, इंद्रियांचा दम, तप, शुद्धि, - संतोषः, क्षांतिः, आर्जवं, मद्भक्तिः च, - संतोष, समाधान, क्षमा, ऋजुता, माझी भक्ति, - दया, सत्यं, इमाः तु ब्रह्मप्रकृतयः - दया, सत्य ह्या ब्राह्मणप्रकृति. ॥ १६ ॥
शम, दम, तपश्चर्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया आणि सत्य हे ब्राह्मणवर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१६)
तेजो बलं धृतिः शौर्यं तितिक्षौदार्यमुद्यमः ।
स्थैर्यं ब्रह्मण्यतैश्वर्यं क्षत्र प्रकृतयस्त्विमाः ॥ १७ ॥
धैर्य तेज बले शौर्य उदार क्षम्य उद्यमी । ऐश्वर्य स्थैर्य ब्रह्मण्यत क्षात्र स्वभाव ता असा ॥ १७ ॥
तेजः, बलं, धृतिः, शौर्यं, - तेजस्वीपणा, शारीरिक व मानसिक बल, - तितिक्षा, औदार्यं, उद्यमः, - धैर्य, शौर्य, क्षमा, उदारपणा, उद्योगाची हौस, - स्थैर्यं, ब्रह्मण्यता, ऐश्वर्यं, - स्थिरता, वेदांच्या ठायी भक्ति आणि प्रभुता - इमाः तु क्षत्रप्रकृतयः - ह्या दहा क्षत्रियाच्या प्रकृति म्हणजे सहजसिद्ध गुण होत. ॥ १७ ॥
तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मणभक्ती आणि ऐश्वर्य हे क्षत्रिय वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१७)
आस्तिक्यं दाननिष्ठा च अदंभो ब्रह्मसेवनम् ।
अतुष्टिः अर्थोपचयैः वैश्य प्रकृतयस्त्विमाः ॥ १८ ॥
अस्तिक्य दानशीलो नी अदंभ व्दिजसेवन । धनार्जनी असंतुष्ट वैश्याचा तो स्वभावची ॥ १८ ॥
आस्तिक्य, दाननिष्ठा च, अदंभः, - आस्तिक्यबुद्धि, दानशूरता, निष्कपटता किंवा सरळपणा किंवा ढोंगाचा अभाव, - ब्रह्मसेवनं, अर्थोपचयैः अतुष्टिः, - ब्रह्मसेवा व संपत्तीची हाव - इमाः तु वैश्यप्रकृतयः - ही वैश्याची सहज प्रकृति असते. ॥ १८ ॥
आस्तिकता, दानशूरपणा, दंभ नसणे, ब्राह्मणांची सेवा करणे आणि धनसंचयाने संतुष्ट न होणे, हे वैश्य वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१८)
शुश्रूषणं द्विजगवां देवानां चापि अमायया ।
तत्र लब्धेन संतोषः शूद्र प्रकृतयस्त्विमाः ॥ १९ ॥
व्दिज गो देवतासेवा निष्ठेने करणे तसे । लाभात तोष मानावा शूद्रवर्ण स्वभाव तो ॥ १९ ॥
द्विजगवां, देवानां च अपि अमायया शुश्रूषणं - द्विजन्मे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची व गायीची, त्याप्रमाणे देवांची सेवा म्हणजे चाकरी - तत्र लब्धेन संतोषः - या चाकरीने जे काय मिळेल त्यांत संतोष - इमाः तु शुद्रप्रकृतयः - हे शूद्राचे सहजसिद्ध गुण - प्रकृति - स्वभाव होत. ॥ १९ ॥
ब्राह्मण, गायी आणि देवतांची निष्कपट भावनेने सेवा करणे आणि त्यातून जे काही मिळेल, त्यात संतुष्ट असणे, हे शूद्र वर्णाचे स्वाभाविक धर्म होत. (१९)
अशौचं अनृतं स्तेयं नास्तिक्यं शुष्कविग्रहः ।
कामः क्रोधश्च तर्षश्च स्वभावः अंत्यावसायिनाम् ॥ २० ॥
खोटे अशौच नी चौर्य नास्तिक्य भांडणे तसे । काम क्रोध तसे तृष्णी वशणे हा स्वभावची ॥ २० ॥
अशौचं, अनृतं, स्तेयं, नास्तिक्यं, - मलीनपणा, असत्यभाषण, चोरी करणे, श्रद्धा नसणे, - शुष्काविग्रहः, कामः, क्रोधः च, तर्षः च, - कारण नसता भांडणे, कामुकता, क्रोध असणे, लोभ - अंतेवसायिनां स्वभावः - हे अति शूद्राचे सहजसिद्ध गुण असत. ॥ २० ॥
अपवित्रता, खोटे बोलणे, चोरी करणे, ईश्वर आणि परलोकाची फिकीर न करणे, खोटेनाटे भांडण करणे, काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जाणे, हे अंत्यजाचे स्वभाव होत. (२०)
अहिंसा सत्यं अस्तेयं अकामक्रोधलोभता ।
भूतप्रियहितेहा च धर्मोऽयं सार्ववर्णिकः ॥ २१ ॥
अहिंसा सत्य अस्तेयी रहावे दृढ निश्वये । काम क्रोधीं न बद्धावे हा तो सर्वास धर्मची ॥ तेणे प्रसन्न हो चित्त तयात लाभ तो खरा ॥ २१ ॥
अहिंसा, सत्यं, अस्तेयं, - कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे, सत्यप्रेम, चोरी न करणे, - अकामक्रोधलोभता, - काम - क्रोध - लोभ यांनी शून्य असणे, - भूतप्रियहितेहा च - लोकांचे हित व प्रिय करण्याची ईहा म्हणजे इच्छा असणे, - अयं सार्ववर्णिकः धर्मः - हा सर्व वर्णांचा साधारण धर्म आहे. ॥ २१ ॥
सर्व वर्णांसाठी सर्वसाधारण धर्म हेच आहेत की, मन, वाणी आणि शरीराने कोणाचीही हिंसा न करणे, सत्यावर अढळ राहाणे, चोरी न करणे, कामक्रोधलोभापासून दूर राहाणे आणि प्राणिमात्रांचे कल्याण होईल, तेच करणे. (२१)
द्वितीयं प्राप्य अनुपूर्व्यात् जन्म उपनयनं द्विजः ।
वसन् गुरुकुले दांतो ब्रह्म अधीयीत चाहूतः ॥ २२ ॥
सोळा संस्कार ते घेता दुसरा जन्म त्या त्रया । लाभता शिकणे वेद गुरूच्या आश्रमी पुन्हा ॥ २२ ॥
आनुपूर्व्यात् - पूर्वीच्या जातकरणादि संस्कारांनंतर - उपनयनं द्वितीयं जन्म प्राप्य - उपनयन म्हणजे मौजीबंधन नामक दुसरा जन्म प्राप्त झाला म्हणजे - द्विजः - त्या दुसर्य़ांदा जन्मलेल्या ब्रह्मचार्याने - दांतः - इंद्रियनिग्रह करून - गुरुकुले वसन् च - गुरूच्या आश्रमात राहून - आहुतः ब्रह्म अधीयीत - गुरुजींनी आज्ञपिल्याप्रमाणे ब्रह्माचा म्हणजे वेदाचा अभ्यास करावा. ॥ २२ ॥
ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी गर्भधान इत्यादी संस्कारांनी प्रारंभ करून क्रमाने यज्ञोपवीत संस्काररूप दुसरा जन्म प्राप्त करून गुरूकुलात राहावे तेथे इंद्रियांवर संयम ठेवून आचार्यांनी बोलावल्यावर वेदांचे अध्ययन करावे. (२२)
मेखला अजिन दण्डाक्ष ब्रह्मसूत्रकमण्डलून् ।
जटिलो अधौतदद्वासः अरक्तपीठः कुशान् दधत् ॥ २३ ॥
मेखळा चर्म नी दंड ब्रह्मसूत्र कमंडलू । रुद्राक्ष नि जटा व्हाव्या दात वस्त्रे नटोनये ॥ रंगीत आसना ना घे कुश घेवोनि बैसणे ॥ २३ ॥
मेखलाजिनदंडाक्षब्रह्मसूत्रकमंडलून् दधत् - कटिसूत्र, मृगासन, यष्टि, माळा, यज्ञोपवीत, कमंडलू धारण करणारा - जटिलः - जटाधारी - अघौतद्वासः - दांत व वस्त्र न धुणारा - अरक्तपीठः - आसन न रंगविणारा - कुशान् दधत् - दर्भ धारण करणारा - (ब्रह्मचारी असावा) ॥ २३ ॥
मेखला, मृगचर्म, दंड, रूद्राक्षमाळ, यज्ञोपवीत आणि कमंडलू धारण करावे डोक्यावर जटा ठेवाव्यात दंतधावन आणि वस्त्रे धुणे या गोष्टी हौस म्हणून करू नयेत रंगीत आसनावर बसू नये आसनासाठी वगैरे कुश घ्यावेत. (२३)
स्नानभोजनहोमेषु जपोच्चारे च वाग्यतः ।
न च्छिंद्यान् नखरोमाणि कक्ष-उपस्थगतान्यपि ॥ २४ ॥
स्नान भोजन नी होम जप शौचासि मौन ते । बगला गुप्त अंगाचे केश नख न काढिणे ॥ २४ ॥
स्नानभोजनहोमेषु - स्नान, भोजन व हवन करताना - जपोच्चारे च - जप करताना व मलविसर्जन करताना - वाग्यतः - वाणी स्तब्ध असावी - नखरोमाणी कक्षोपस्थगतानि अपि - नखे केश - खाकेतील व गुह्य स्थानावरील सुद्धा - न छिंद्यात् - कापून किंवा उपटून काढू नयेत. ॥ २४ ॥
स्नान, भोजन, हवन, जप आणि मलमूत्र त्याग करतेवेळी मौन पाळावे काख आणि गुप्तेंद्रियाजवळील केस काढू नयेत तसेच नखेही कधी काढू नयेत. (२४)
रेतो न अवकिरेत् जातु ब्रह्मव्रतधरः स्वयम् ।
अवकीर्णे अवगाह्य अप्सु यतासुः त्रिपदीं जपेत् ॥ २५ ॥
ब्रह्मचर्य असो पूर्ण स्वयेंही वीर्य ना त्यजो । स्वप्नात पडता वीर्य स्नाने गायत्रि जापिणे ॥ २५ ॥
ब्रह्मव्रतघरः स्वयं रेतः न जातु अवकिरेत् - ब्रह्मचार्याने केव्हाही स्वतः रेत स्खलू देऊ नये - अवकीर्णे - आपोआप स्खलित झालेच तर - अप्सु अवगाह्य - स्नान करून - यतासुः - प्राणायाम करावा - त्रिपदीं जपत् - त्रिपदा गायत्रीचा जप करावा. ॥ २५ ॥
पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे स्वतः कधीही वीर्यपात करू नये जर कधी वीर्यस्खलन झालेच, तर पाण्याने स्नान करून, प्राणायाम करून गायत्री मंत्राचा जप करावा. (२५)
अग्न्यर्काचार्य-गो-विप्र गुरु-वृद्ध-सुरान् शुचिः ।
समाहित उपासीत संध्ये च यतवाग्-जपन् ॥ २६ ॥
पवित्र राहुनी त्याने अग्नि आचार्य गो व्दिज । वृद्ध नी देवता यांची करावी ती उपासना ॥ संध्या नी जप गायत्री मौन संध्येसि ते करा ॥ २६ ॥
यतवाक् - मौन धारण करून - संध्ये च जपन् - सकाळी व संध्याकाळी संध्या करून - अग्नि अर्क आचार्य - अग्नि, सूर्य, आचार्य, - गो विप्र गुरु वृद्धसुरान् - धेनु, ब्राह्मण, ज्ञानवृद्ध व वयोवृद्ध वडील माणसे व देव यांची - शुचिः समाहितः उपासीत - शुचिर्भूत व एकचित्त होऊन सेवा करावी. ॥ २६ ॥
ब्रह्मचर्याने पावित्र्य पाळून एकाग्रतेने अग्नी, सूर्य, आचार्य, गाय, ब्राह्मण, गुरू, वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी तसेच सायंकाळी आणि प्रातःकाळी मौन धारण करून संध्योपासना व गायत्री मंत्राचा जप करावा. (२६)
आचार्यं मां विजानीयात् न-अवमन्येत कर्हिचित् ।
न मर्त्यबुद्ध्यासूयेत सर्वदेवमयो गुरुः ॥ २७ ॥
स्वरूपी गुरूची मानो तिरस्कार नकोच तो। माणूस नच तो मानो सर्वदेवमयो गुरु ॥ २७ ॥
आचार्यं मां विजानीयात् - आचार्य - गुरुजी - प्रत्यक्ष मी - म्हणजे परमात्माच आहे असे जाणावे - कर्हिचित् न अवमन्येत - आचार्याचा केव्हाही मानभंग व आज्ञाभंग करू नये - न मर्त्यबुद्ध्या असूयेत - तो मनुष्य म्हणून त्याचा मत्सर करण्यास प्रत्यवाय नाही, असे केव्हाही समजू नये - गुरुः सर्वदेवमयः - गुरु म्हणजे सर्व देव एकवटलेले स्वरूप होय. ॥ २७ ॥
आचार्याना माझेच स्वरूप मानावे त्यांचा कधीही अपमान करू नये त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांच्याकडे दोषदृष्टीने पाहू नये कारण गुरू सर्वदेवमय आहेत. (२७)
सायं प्रातः उपानीय भैक्ष्यं तस्मै निवेदयेत् ।
यच्चान्यद् अपि अनुज्ञातं उपयुञ्जीत संयतः ॥ २८ ॥
भिक्षा मागोनि आणावी गुरुच्या ठेविणे पुढे । संयमे घेउनी आज्ञा भिक्षेचा तो स्विकार हो ॥ २८ ॥
सायं, प्रातः - संध्याकाळी व सकाळी - यत् - जे - भैक्ष्यं - अन्न, भिक्षा - अन्यत् - व दुसरे काही - उपानीय - शुद्ध करून आणून - तस्मै निवेदयेत् - ते ते गुरूला अर्पण करावे - अनुज्ञातं - गुरूने आज्ञा केल्यानंतर - संयतः उपयुंजीत - त्या त्या अन्नाचे अगर इतर वस्तूंचे सेवन मनोनिग्रह करून करावे. ॥ २८ ॥
सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून आणून ती गुरूंसमोर ठेवावी तसेच इतरही गुरूदेवांना अर्पण करावे त्यांची आज्ञा झाल्यावरच त्याचा उपयोग करावा. (२८)
शुश्रूषमाण आचार्यं सदा-उपासीत नीचवत् ।
यान शय्यासनस्थानैः नातिदूरे कृताञ्जलिः ॥ २९ ॥
आचार्या पाठिसी चालो सावधे दूर बैसणे । थकता चोपणे पाय अज्ञेसी हात जोडणे ॥ २९ ॥
आचार्यं शुश्रूषमाणाः - गुरूची सेवा करणार्या शिष्याने - सदा - नेहमी - नीचवत् उपासीत - अति नम्र वृत्तीने जवळ असावे - यानशय्यासनस्थानैः न अतिदूरे - गुरुजी बाहेर जात असता, शयनी असता, बसले असता, त्या स्थानापासून दूर असू नये - कृतांजलिः - नेहमी हात जोडून असावे. ॥ २९ ॥
आचार्य कुठे जात असतील, तर त्यांच्या मागे मागे चालावे ते झोपल्यानंतर त्यांच्या जवळपास झोपावे. ते बसले असतील तर त्यांच्या आज्ञेची वाट पाहात, हात जोडून, जवळच उभे राहावे. अशा प्रकारे स्वतःकडे कमीपणा घेऊन शुश्रूषा करून आचार्यांची आज्ञा पालन करण्यात नेहमी तत्पर असावे. (२९)
एवंवृत्तो गुरुकुले वसेद् भोगविवर्जितः ।
विद्या समाप्यते यावद् बिभ्रद् व्रतं अखण्डितम् ॥ ३० ॥
मिळेपर्यन्त विद्या ती भोग सर्वचि त्यागुनी । रहावे गुरुकूलात न खंडा ब्रह्मचर्य ते ॥ ३० ॥
एवंवृत्तः - असे व्रत धारण करून - भोगविवर्जितः - सर्वप्रकारच्या भोगांचा त्याग करून - अखंडितं व्रतं बिभ्रत् - आपले ब्रह्मचर्यव्रत अखंडित ठेवून - यावत् विद्या समाप्यते - विद्येचे अध्ययन पूर्ण होईपर्यंत - गुरुकुलेवसेत् - गुरुकुलात राहावे. ॥ ३० ॥
विद्याध्ययन संपेपर्यंत सर्व सुखोपभोगांपासून दूर राहून गुरूकुलात या प्रकारे वागत राहावे आणि ब्रह्मचर्यव्रत कधीही खंडित होऊ देऊ नये. (३०)
यदि असौ छंदसां लोकं आरोक्ष्यन् ब्रह्मविष्टपम् ।
गुरवे विन्यसेद् देहं स्वाध्यायार्थं बृहद्व्रतः ॥ ३१ ॥
ब्रह्मलोक हवा त्याने नैष्ठीक ब्रह्मचारि ते । राहोनी गुरुची सेवा आजन्म करणे असे ।३१ ॥
यदि असौ - जर तो ब्रह्मचारी - छंदसां लोकं ब्रह्मविष्टप आरोक्ष्यन् - छंदांचा लोक म्हणजे महर्लोक त्याप्रत - ब्रह्मविष्टपः - ब्रह्मलोक त्याप्रत जाण्याची इच्छा करणारा असेल तर - बृहद्वृतः - त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्यव्रत धारण करून - स्वाध्यायार्थं - पुढील श्रेष्ठ अध्ययनासाठी - गुरवे देहं विन्यसेत् - गुरुजीस आपला देहसुद्धा अर्पण करावा. ॥ ३१ ॥
ब्रह्मचार्याची वेदांच्या निवासस्थानीब्रह्मलोकात जाण्याची इच्छा असेल तर त्याने जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेमध्येच समर्पित करावे. (३१)
अग्नौ गुरावात्मनि च सर्वभूतेषु मां परम् ।
अपृथग्धीः उपसीत ब्रह्मवर्चस्वी अकल्मषः ॥ ३२ ॥
संपन्न ब्रह्मतेजाने निष्पाप शिष्य होतसे । गुरु अग्नि तनू मध्ये सर्वत्र मजला पुजो ॥ ३२ ॥
अपृथग्धीः - अभेदबुद्धि धारण करून - ब्रह्मवर्चस्वी - तो वेदोभास्कर - अकल्मषः - सर्वथा शुद्ध असणारा - अग्नौ गुरौ - अग्नीच्या ठिकाणी, गुरूच्या ठिकाणी, - आत्मनि च सर्वभूतेषु - स्वस्वरूपात, आणि सर्व स्थिर जंगम पदार्थांत - परं मां - श्रेष्ठ असा जो मी त्या माझी - उपासीत - उपासना करावी. ॥ ३२ ॥
असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याने अग्नी, गुरू, आपले शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठायी मज परमात्म्याची उपासना करावी सर्वत्र एकच परमात्मा आहे, असा भाव ठेवावा. (३२)
स्त्रीणां निरीक्षण स्पर्श संलाप क्ष्वेलनादिकम् ।
प्राणिनो मिथुनीभूतान् अगृहस्थो अग्रतस्त्यजेत् ॥ ३३ ॥
पाहू नये स्त्रियांना नी स्पर्श तो नच हो मुळी । हास्य विनोद टाळावा न पहा प्राणि मैथुन ॥ ३३ ॥
अगृहस्थः - नैष्ठिक ब्रह्मचारी - स्त्रीणां निरीक्षणस्पर्शसंलाषक्ष्वेलनादिकं - स्त्रियांचे दर्शन, त्यांच्याशी भाषण, थटटामस्करी - मिथूनीभूतान् प्राणिनः - रत्यर्थ एकत्र झालेली नरमादीची जोडपी - अग्रतः त्यजेत् - अगोदर त्याग करावा. ॥ ३३ ॥
ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशांनी स्त्रीकडे पाहाणे, तिला स्पर्श करणे, तिच्याशी बोलणे किंवा थट्टामस्करी करणे इत्यादींपासून लांब राहावे मैथुन करणार्या प्राण्यांकडे पाहू नये. (३३)
शौचं आचमनं स्नानं संध्योपासनमार्जवम् ।
तीर्थसेवा जपोऽस्पृश्या अभक्ष्य संभाष्यवर्जनम् ॥ ३४ ॥ सर्वाश्रमप्रयुक्तोऽयं नियमः कुलनंदन । मद्भवः सर्वभूतेषु मनोवाक्-कायसंयमः ॥ ३५ ॥
शोच आचमनो स्नान संध्योपासन आर्जव । तीर्थसेवा मम जाप्य संयमे सम पाहणे ॥ ३४ ॥ अस्पृश्या नच हो स्पर्श संभाषण नको तया । अभक्ष्य नच हो खाणे चारी आश्रम धर्म हा ॥ ३५ ॥
शौचं आचमनं स्नानं - मन, शुद्धि, आचमन, स्नान, - संध्योपासनं आर्जवं तीर्थसेवा जपः - संध्या, ऋजुता, जप ही व्रते नित्य चालवावी - अस्पृश्य अभक्ष्य - अस्पृश्याला स्पर्श करणे, अभक्ष भक्षिणे, - असंभाष्यवर्जनं - बोलण्यास योग्य नाही त्यांच्याशी बोलणे, या सर्व गोष्टी वर्ज्य कराव्या. ॥ ३४ ॥ कुलनंदन - कुलास आनंद देणार्या उद्धवा - अयं नियमः - आताच गेल्या श्लोकात सांगितलेला नियम - सर्वाश्रमयुक्तः - ब्रह्मचार्यादि चारी आश्रमांत घालून दिलेला आहे - सर्वभूतेषु मद्भावः - सर्व भूतांचे ठिकाणी मी आहे अशी दृढ भावना - मनोवाक्कायसंयमः - मन वाणी व शरीर ही सर्व आपल्या स्वाधीन ठेवणे हा आत्मसंयम होय. ॥ ३५ ॥
प्रिय उद्धवा ! शुचिता, आचमन, स्नान, संध्योपासना, सरळपणा, तीर्थसेवन, जप, सर्व प्राण्यांच्या ठायी मलाच पाहाणे, मन, वाणी तसेच शरीराचा संयम हे नियम सर्व आश्रमांनाच लागू आहेत अस्पृशांना न शिवणे, अभक्ष्य वस्तू न खाणे आणि ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे, हे नियमसुद्धा या सर्वांसाठी आहेत. (३४-३५)
एवं बृहद्व्रतधरो ब्राह्मणोऽग्निः इव ज्वलन् ।
मद्भक्तः तीव्रतपसा दग्धकर्माशयोऽमलः ॥ ३६ ॥
ब्रह्मचारी व्रते ऐशा अग्निच्या परि शोभतो । तपाने जळती कर्म शुद्ध होता मला मिळे ॥ ३६ ॥
एवं - याप्रकारे - बृहद्व्रतधरः - नैष्ठिकब्रह्मचारी - अग्निः इव ज्वलन् ब्राह्मणः मद्भक्तः - अग्नीप्रमाणे तेजस्वी असा मद्भक्त ब्राह्मण - तीव्रतपसा - कडकडीत तपश्चर्येने - दग्धकर्माशयः - कर्मजनक व कर्मजन्य वासनांस जाळून टाकतो - अमलः - शुद्धचित्त होतो. ॥ ३६ ॥
नेष्ठिक ब्रह्मचारी ब्राह्मणाने या नियमांचे पालन केल्याने तो अग्नीसारखा तेजस्वी होतो तीव्र तपश्चर्येमुळे त्याच्या वासना भस्म होऊन जातात अंतःकरण शुद्ध होते आणि तो माझा भक्त होतो. (३६)
अथ अनंतरं आवेक्ष्यन् यथा जिज्ञासितागमः ।
गुरवे दक्षिणां दत्त्वा स्नायाद् गुर्वनुमोदितः ॥ ३७ ॥
नैष्ठीक ब्रह्मचारी जे राहण्या नच इच्छिती । अभ्यास संपता द्यावी गुरुला युक्त दक्षिणा ॥ समावर्त करोनीया गुर्वाज्ञे आश्रमा त्यजो ॥ ३७ ॥
अथ - वेदाभ्यास संपल्यानंतर - यथाजिज्ञासितागमः - इच्छेप्रमाणे वेदवेदार्थ समजून घेतला आहे असा - अनंतरं - द्वितीय आश्रमात - आवेक्ष्यन् - प्रवेश करू इच्छित असल्यास - गुर्वनुमोदितः - गुरूंची आज्ञा घेऊन - गुरवे दक्षिणां दत्वा - गुरूला दक्षिणा देऊन - स्नायात् - मंगलस्नान करावे. ॥ ३७ ॥
प्रिय उद्धवा ! ब्रह्मचारी जर गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल, तर त्याने विधिपूर्वक वेदाध्ययन संपवून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा. (३७)
गृहं वनं वोपविशेत् प्रव्रजे द्वा द्विजोत्तमः ।
आश्रमादाश्रमं गच्छेत् नान्यथा मत्परश्चरेत् ॥ ३८ ॥
वन वा गृह सेवावे व्दिज तो यति हो शके । इच्छिता तो क्रमे घ्यावा स्वेच्छाचारी न हो कधी ॥ ३८ ॥
द्विजोत्तमः गृह्यं वनं वा उपविशेत् - त्या द्विजोत्तम ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम इच्छेनुसार स्वीकारावा - प्रव्रजेत् वा - अथवा संन्यासग्रहणहि करावे किंवा - आश्रमात् आश्रमं गच्छेत् - प्रथम गृहस्थाचा, मग वनाचा, मग संन्यासाचा अशाच क्रमाने त्याने जावे - अन्यथा न - उलट क्रम केव्हाही धरू नये - मत्परः चरेत् - माझी भक्ति मात्र सर्वदा अखंड असावी. ॥ ३८ ॥
त्यानंतर ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा तो ब्राह्मण असेल तर संन्याससुद्धा घेऊ शकतो किंवा क्रमाने एका आश्रमातून दुसर्या आश्रमात प्रवेश करावा मत्परायण भक्ताने याहून वेगळ्या प्रकारे वागू नये. (३८)
गृहार्थी सदृशीं भार्यां उद्वहेद् अजुगुप्सिताम् ।
यवीयसीं तु वयसा यां सवर्णां अनुक्रमात् ॥ ३९ ॥
गृहार्थी तो वरो पत्नी कुलीन अनुरूपची । समवर्ण वयीं सान अथवा क्रमि खालच्या ॥ ३९ ॥
गृहार्थी - गृहस्थाश्रमात जाऊ इच्छिणार्याने - अजुगुप्सितां सदृशीं वयसा - कुलीन आणि अव्यंग, आपणाहून वयाने लहान - यवीयसीं भार्यां उद्वहेत् - व समान वर्णाची भार्या निवडून तिच्याशी धर्मविहित विवाह करावा - या संवर्णा अनुक्रमात् - या सवर्ण भार्येनंतर क्रमाने खालच्या वर्णांतील भार्या करावी. ॥ ३९ ॥
गृहस्थाश्रमाचा स्वीकार करू इच्छिणार्याने आपल्याला अनुरूप व उत्तम लक्षणांनी संपन्न अशा कुलीन कन्येशी विवाह करावा ती वयाने लहान आणि आपल्याच वर्णाची असावी अन्य वर्णाची कन्या वरावयाची असल्यास आपल्याहून खालच्या वर्णाची वरावी. (३९)
इज्य-अध्ययन-दानानि सर्वेषां च द्विजन्मनाम् ।
प्रतिग्रहो-अध्यापनं च ब्राह्मणस्यैव याजनम् ॥ ४० ॥
यज्ञाध्यायन नी दान त्रैवर्णि कर्म हे असे । अध्यापनो प्रतिगृह्य यज्ञकर्म व्दिजासची ॥ ४० ॥
इज्याध्ययनदानानि - यज्ञ, अध्ययन, दान, ही कर्मे - सर्वेषां द्विजन्मनां च - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही द्विजांस अवश्य आहेत - प्रतिग्रहः अध्यापनं याजनं च ब्राह्मणस्य एव - परंतु दान घेणे, शिकविणे आणि यज्ञकर्म हे अधिकार ब्राह्मणास मात्र आहेत. ॥ ४० ॥
यज्ञयाग, अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजांना आहे परंतु दान घेणे, अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. (४०)
प्रतिग्रहं मन्यमानः तपस्तेजोयशोनुदम् ।
अन्याभ्यामेव जीवेत शिलैर्वा दोषदृक् तयोः ॥ ४१ ॥
परंतु प्रतिगृह्याने व्दिजांचे तेज संंपते । अध्यापने नि यज्ञाने साधावा चरितार्थ तो ॥ दिसता त्यातही दोष कण वेचूनि भक्षिणे ॥ ४१ ॥
प्रतिग्रहं मन्यमानः तपस्तेजोयशोनुदं - दान घेणे हे तपाची, तेजाची, व यशाची हानि करणारे आहे - अन्याभ्यां एव जीवेत - अध्यापनाने अथवा याजनाने मात्र आपला योगक्षेम चालवावा - तयोः दोषदृक् - त्याही दोन्ही वृत्ति दूषित आहेत असे ज्याला वाटते त्याने - शिलैः - शेतातील कणांनी आपला उदरनिर्वाह करावा. ॥ ४१ ॥
दान घेण्यामुळे तपश्चर्या, तेज आणि यश यांचा ह्रास होतो असे वाटले, तर ब्राह्मणाने अध्यापन आणि यज्ञ करविणे याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा किंवा या दोन वृत्तींमध्येही काही दोष वाटत असेल तर धान्याची कणसे तोडल्यावर शेतात पडलेले किंवा बाजारात पडलेले दाणे वेचून त्यांवर उदरनिर्वाह करावा. (४१)
ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते ।
कृच्छ्राय तपसे चेह प्रेत्यानन्तसुखाय च ॥ ४२ ॥
दुर्लभो व्दिज देहो तो तुच्छ भोगार्थ तो नसे । तप नी कष्ट सोसोनी स्वानंद मोक्ष मेळिणे ॥ ४२ ॥
ब्राह्मणस्य हि अयं देहः - हा ब्राह्मणाचा देह - क्षुद्रकामाय न इष्यते - क्षुद्र पदार्थांची इच्छा करण्यात दवडू नये - कृच्छ्राय तपसे - येथे इहलोकी तीव्र तपश्चर्येच्या कामी त्यांचा विनियोग करावा - इह प्रेत्य च अनंतसुखाय च - आणि देहपात झाल्यानंतर परलोकी अनंत सुख मिळेल अशा कर्माकडे त्याला लावावे. ॥ ४२ ॥
ब्राह्मणाचे हे शरीर तुच्छ विषयभोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठीण तपश्चर्या करून शेवटी अनंत आनंदस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठीच आहे. (४२)
( इंद्रवज्रा )
शिलोञ्छवृत्त्या परितुष्टचित्तो धर्मं महांतं विरजं जुषाणः । मय्यर्पितात्मा गृह एव तिष्ठन् नातिप्रसक्तः समुपैति शांतिम् ॥ ४३ ॥
( इंद्रवज्रा ) निष्काम भावे व्दिज जो रहातो वेचून दाणे जगतो असा नी । जो अर्पि देहो अन प्राण माते संन्यासि जाणा घेरि राहता तो ॥ ४३ ॥
शिलोंछवृत्या परितुष्टचित्तः - शेतात पडलेले दाणे टिपणे हे शिल व बाजारात पडलेले बिनवारशी दाणे वेचणे ही उंछवृत्ति अशा शिलेंच्छ वृत्तीतच जो संतुष्ट राहतो - विरजं महान्तं धर्मं जुषाणः - परम शुद्ध असा जो आतिथ्यप्रभृति धर्म तो अक्षरशः व अर्थशः पाळतो - मयि अर्पितात्मा - मलाच आपला आत्मा अर्पण केला आहे - गृहे एव तिष्ठन् न अतिप्रसक्तः - घरात राहूनही आसक्त असत नाही - समुः शांति विप्रंपेति - तोच उत्तम प्रकारचा शांतीचा अधिकारी होतो. ॥ ४३ ॥
जो ब्राह्मण आपल्या महान धर्मांचे निष्कामभावाने पालन करतो आणि शेतात तसेच बाजारात पडलेलेसांडलेले धान्याचे दाणे वेचून त्यांवर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो, त्याचबरोबर आपले सर्वस्व मला समर्पित करून कोठेही आसक्ती ठेवीत नाही, तो घरात राहूनही शांतिरूप असे परमपद प्राप्त करून घेतो. (४३)
( अनुष्टुप् )
समुद्धरंति ये विप्रं सीदंतं मत्परायणम् । तान् उद्धरिष्ये न चिराद् आपद्भ्यो नौः इवार्णवात् ॥ ४४ ॥
( अनुष्टुप ) मम भक्त व्दिजाची ती विपत्ति पाहता उठे । तयाही शीघ्र मी पावे नाव ती बुडत्या जशी ॥ ४४ ॥
सोदंतं मत्परायणं - दुःखात असलेल्या मद्भक्तविप्राला - ये समुद्धरंति - जे कोणी धनसंपन्न लोक दारिद्र्यातून वर काढितात - अर्णवात् नौः इव - खवळलेल्या समुद्रातून नाव तारावी त्याप्रमाणे - आपद्भ्यः तान् नचिरात् उद्धरिष्ये - त्यांस त्यांच्या संकटांपासून मी परमेश्वर तत्काळ मुक्त करतो. ॥ ४४ ॥
संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या ब्राह्मण भक्ताला जे संकटातून सोडवितात, त्यांची मी ताबडतोब, समुद्रात बुडणार्यांची नाव जशी सुटका करते, तशी सर्व आपत्तींमधून सुटका करतो. (४४)
सर्वाः समुद्धरेद् राजा पितेव व्यसनात् प्रजाः ।
आत्मानं आत्मना धीरो यथा गजपतिर्गजान् ॥ ४५ ॥
नृपे कष्टे प्रजा सर्व उद्धार करणे पहा । हत्ती हत्तीस रक्षी जैं तसा तो मोक्ष पावतो ॥ ४५ ॥
सर्वाः प्रजाः राजा व्यसनात् समुद्धरेत् - सर्वपालक राजाने आपल्या प्रजेला व्यसनमुक्त करावे - पिता इव - पिता मुलांचे संकट नष्ट करतो तसे - धीरः आत्मना आत्मानं - धीरपुरुषाने आपल्या स्वतःस आपल्या सद्विवेकाने संकटमुक्त करावे - गजपतिः गजान् यथा - जसा गजेंद्र इतर हत्तींस सोडवून आपणासही सोडवितो तसा. ॥ ४५ ॥
जसा एक गजराज दुसर्या हत्तींचे रक्षण करतो, त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टांपासून रक्षण करावे, त्यांचा उद्वार करावा, आणि धीरगंभीर राहून स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा. (४५)
एवंविधो नरपतिः विमानेनार्कवर्चसा ।
विधूय इह अशुभं कृत्स्नं इंद्रेण सह मोदते ॥ ४६ ॥
रक्षिता ती प्रजा ऐसी पापमुक्तचि होउनी । सूर्याचे तेज लाभोनी इंद्राच्या सम हो सुखी ॥ ४६ ॥
इह कृत्स्नं अशुभं विधूय - या लोकातील सकल अमंगल सुखदुःख नाहीशी करून - एवंविधः नरपतिः - वर सांगितल्याप्रमाणे राहणारा राजा - अर्कवर्चसा विमानेन - सूर्याप्रमाणे तेजस्वी असणार्या विमानात बसून जातो - इंद्रेण सह मोदते - इंद्राच्या समागमात आनंदरूप होतो. ॥ ४६ ॥
अशा प्रकारचा राजा सर्व पापांपासून मुक्त होऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राबरोबर सुखोपभोग घेतो. (४६)
सीदन् विप्रः वणिक् वृत्त्या पण्यैः एवापदं तरेत् ।
खड्गेन वा आपदाक्रांतो न श्ववृत्त्या कथञ्चन ॥ ४७ ॥
वैश्यवृत्ती विपत्तीत विप्रे घेवोनि त्यागिणे । संकटी शस्त्रही घ्यावे श्वानवृत्ती न हो कदा ॥ ४७ ॥
सीदन् विप्रः - दरिद्री जो विप्र त्याने - वणिग्वृत्त्या पण्यैः एव - वाण्याच्या धंद्यातील खरेदी विक्रीच्या व्यवहाराने मात्र - आपदं तरेत् आपल्या आपत्तीतून मुक्त व्हावे - आपदाक्रांतः खड्गेन वा - आपत्तीतून मोकळीक होईनाच तर त्याने क्षात्रवृत्तीचा अंगीकार करावा - श्ववृत्या कथंचन न - केव्हाही कशीही शुद्रवृत्ती पत्करू नये. ॥ ४७ ॥
एखादा ब्राह्मण दारिद्य्राने गांजला असेत तर त्याने वैश्यवृत्तीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले, तर तलवार हातात घेऊन क्षत्रिय वृत्तीनेही आपला उदर निर्वाह चालवावा, परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. (४७)
वैश्यवृत्त्या तु राजन्यो जीवेत् मृगययापदि ।
चरेद् वा विप्ररूपेण न श्ववृत्त्या कथञ्चन ॥ ४८ ॥
तसेचि क्षत्रिये घ्यावी वैश्यवृत्ती विपत्तिसी । अध्यापने शिकारीने जगावे,श्वानवृत्ति ना ॥ ४८ ॥
आपदि राजन्यः तु - संकटकाळी क्षत्रियाने तर - वैश्ववृत्या मृगयया जीवेत् - वैश्यवृत्तीचा स्वीकार करून जगण्यासाठी शिकारीहि व्हावे - वा विप्ररूपेण चरेत् - किंवा ब्राह्मणवृत्तीने योगक्षेम चालवावा - श्ववृत्या कथंचन न - सेवावृत्ती केव्हाही स्वीकारू नये. ॥ ४८ ॥
याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल, तर त्याने वैश्यवृत्तीने व्यापार करून निर्वाह करावा अतिशय घोर आपत्तीत सापडला असेल तर त्याने शिकार करून किंवा ब्राह्मणांचा व्यवसाय अध्यापन करून निर्वाह करावा परंतु नीचांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये. (४८)
शूद्रवृत्तिं भजेद् वैश्यः शूद्रः कारुकटक्रियाम् ।
कृच्छ्रान् मुक्तो न गर्ह्येण वृत्तिं लिप्सेत कर्मणा ॥ ४९ ॥
वैश्याने शूद्रवृत्ती ती करणे त्या विपत्तिसी । चटया विणणे आदी संकटीच असे असो ॥ ४९ ॥
शूद्रवृत्तिं वैश्यः भजेत् - वैश्याने शूद्रवृत्ति स्विकारावी - शूद्रः कारुकटक्रियां - आणि शूद्राने चटया वगैरेंचा धंदा करावा - कृच्छ्रातं मुक्तः - संकटमुक्त होताच - न गर्ह्येण कर्मणा वृत्तिं लिप्सेत - स्वीकारलेला धंदा करण्याचा लोभ ठेवू नये. ॥ ४९ ॥
प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा शूद्रांची वृत्तीसेवा करून आपला उदरनिर्वाह चालवावा आणि शूद्रानेसुद्धा चटया विणणे इत्यादी कामे करून आपले जीवन चालवावे परंतु प्रतिकूल काळ संपताच कनिष्ठ वर्णाच्या वृत्तीने उदरनिर्वाह करण्याचा लोभ करू नये. (४९)
वेदाध्याय स्वधा स्वाहा बलि अन्नाद्यैः यथोदयम् ।
देवर्षिपितृभूतानि मद् रूपाणि अन्वहं यजेत् ॥ ५० ॥
हवन तर्पणो यज्ञ बलीहरण आदि ते । गृहस्थे पूजिणे नित्य समस्त विभुती पहा ॥ ५० ॥
यथोदयं - स्वतःच्या संपत्यनुसार - वेदाध्याय स्वधा स्वाहा - वेदपाठादि म्हणजे ब्रह्मयज्ञ, स्वधा - पितृयज्ञ, स्वाहा - देवयज्ञ, - बलि अन्नाद्यैः - बलि - आणि अन्न म्हणजे मनुष्ययज्ञ करून - मद्रूपाणि देवर्षिपितृभूतानि - मत्स्वरूप देव, ऋषि, पितर व भूते यांचे - अन्वहं यजेत् - प्रतिदिवशी यजन करावे. ॥ ५० ॥
गृहस्थाने ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबली, भूतयज्ञ आणि अन्नदानाने अतिथियज्ञ इत्यादींच्या द्वारे माझेच स्वरूप असणारे ऋषी, देवता, पितर, मनुष्य इत्यादींचे दररोज पूजन करावे. (५०)
यदृच्छया उपपन्नेन शुक्लेन उपार्जितेन वा ।
धनेन अपीडयन् भृत्यान् न्यायेन एव आहरेत् क्रतून् ॥ ५१ ॥
उचित धन मेळोनी अन्यां कष्ट न पोचिता । गृहस्थे करणे यज~झ विधि न्याय जसा असे ॥ ५१ ॥
यदृच्छया उपपन्नेन - आकस्मिक रीतीने प्राप्त झालेल्या - उपार्जितेन वा - किंवा स्वतः योग्य रीतीने मिळविलेल्या - शुक्लेन धनेन - शुद्ध धनाने - भृत्यान् अपीडयन् - दारापुत्रादि व सेवकादि यांस पीडा न होईल अशा रीतीने - न्यायेन एव क्रतून् आहरेत् - न्यायाने सर्व कर्मे शास्त्रोक्त पद्धतीने यथाशक्ति करावी. ॥ ५१ ॥
गृहस्थाने दैवाने प्राप्त झालेल्या किंवा न्यायमार्गाने मिळविलेल्या धनाने आपले कुटुंबीय किंवा आश्रमाला असलेले नोकर इत्यादींना कोणत्याही प्रकारे पीडा न देता विधीनुसार यज्ञ करावे. (५१)
कुटुंबेषु न सज्जेत न प्रमाद्येत् कुटुंबी अपि ।
विपश्चित् नश्वरं पश्येद् अदृष्टमपि दृष्टवत् ॥ ५२ ॥
कुटुंबी नच गुंतावे व्यापाने भक्ति ना त्यजो । भोग ते नाशवंतोची चतुरे जाणणे पहा ॥ ५२ ॥
कुटुंबेषु न सज्जेत - कुटुंबातील मंडळीवर अथवा गेहदेहादिकांवर आसक्ति ठेऊ नये - कुटुंबी अपि न प्रमाद्येत् - गृहस्थाश्रमी असला तरी त्याने नीतिभ्रष्ट किंवा भक्तिभ्रष्ट होऊ नये - विपश्चित् - जो ज्ञानी आहे त्याने - दृष्टवत् अदृष्टं अपि नश्वरं पश्येत् - दृश्य नश्वर आहे तसे अदृष्ट म्हणजेच स्वर्गसुखात्मक कर्मफलहि विनाशी आहे असे समजावे. ॥ ५२ ॥
गृहस्थाने कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये स्वधर्माचरण व भगवद्भजन करण्याची टाळाटाळ करू नये बुद्धिमान पुरूषाने या जगातील वस्तूंप्रमाणे परलोकांतील भोगसुद्धा नाशवानच आहेत, असे समजावे. (५२)
पुत्रदारा आप्तबंधूनां संगमः पांथसङ्गमः ।
अनुदेहं वियन्त्येते स्वप्नो निद्रानुगो यथा ॥ ५३ ॥
पुत्र आप्त सखे स्त्रि नी गुरुसी भेटणे सदा । क्षणाचे सोबती सारे मरता कोण ये सवे ॥ ५३ ॥
पुत्रदाराप्तबंधूनां - पुत्र, कलत्र, मित्र, भ्राते इत्यादिकांची - संगमः - संगति - पांथसंगमः - पांथस्थांच्या संगतीसारखी क्षणिक - अनुदेहं एते वियंति - एक देह सुटल्यानंतर दुसर्या जन्मात यांची सोबत नसते - निद्रानुगः स्वप्नः यथा - प्रत्येक निद्रेत असणारे स्वप्न त्या निद्रेबरोबरच नष्ट होते तसे. ॥ ५३ ॥
स्त्रीपुत्र, आप्तेष्ट इत्यादींचा संबंध पाणपोईवर भेटलेल्या वाटसरूंसारखा समजावा प्रत्येक देहात तो वेगवेगळा असतो जसे झोप असेपर्यंतच स्वप्न असते, तसा हा देह असेपर्यंतच संबंध असतात. (५३)
इत्थं परिमृशन् मुक्तो गृहेषु अतिथिवद् वसन् ।
न गृहैः अनुबध्येत निर्ममो निरहङ्कृतः ॥ ५४ ॥
अतिथी परि तै व्हावे प्रपंचात असोनिया । ममता त्यजिता सर्व घराचा बंध ना पडे ॥ ५४ ॥
इत्थं परिमृशन् - असा विचार करून - मुक्तः - हा जीवन्मुक्त - गृहेषु - घरादिकांमध्ये - अतिथिवत् वसन् - केवळ पाहुण्यासारखा राहतो - न गृहैः अनुबध्येत - स्वगृहादि त्याला बांधू शकत नाहीत - निर्ममः निरहंकृतः - ममत्वशून्य व अहंताशून्य असतो. ॥ ५४ ॥
असा विचार करून गृहस्थाने गृहस्थाश्रमात अडकू नये एखादा पाहुणा तात्पुरता राहातो, त्याप्रमाणे राहावे. जो शरीराबद्दल मीपण आणि घर इत्यादींमध्ये ममता ठेवीत नाही, त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही. (५४)
कर्मभिः गृहमेधीयैः इष्ट्वा मामेव भक्तिमान् ।
तिष्ठेद् वनं वोपविशेत् प्रजावान् वा परिव्रजेत् ॥ ५५ ॥
घरीच मज चिंतावे भक्त प्रापंचिके पहा । पुत्रवंते वना जावे किंवा संन्यास घेइजे ॥ ५५ ॥
गृहमेधीयैः कर्मभिः - गृहस्थधर्मास अवश्य अशा सर्व धार्मिक कर्मांनी - भक्तिमान् - मद्भक्त - मां एव इष्ट्वा - मला मात्र संतुष्ट करीत - तिष्ठेत् - घरीच राहील - प्रजावान् वनं वा उपविशेत् - मुलेबाळे कर्ती झाल्यावर वानप्रस्थ होईल - वा - किंवा - परिव्रजेत् - संन्यास घेईल. ॥ ५५ ॥
भक्ताने गृहस्थोचित शास्त्रोक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी राहावे किंवा पुत्रवान असेल तर वानप्रस्थ आश्रमात किंवा संन्यास स्वीकारावा. (५५)
यस्तु आसक्तमतिः गेहे पुत्रवित्तैषणा आतुरः ।
स्त्रैणः कृपणधीः मूढो मम अहं इति बध्यते ॥ ५६ ॥
गृहस्थी जीवना मध्ये गृहस्था परि राहता । स्त्रैण नी कृपणा मूढा भवाचा फेर ना चुके ॥ ५६ ॥
यः तु गेहे आसक्तमतिः - ज्याला घराचीच आसक्ती असते - पुत्रवित्तैषणातुरः - पुत्र व्हावा, वित्त मिळवावे अशा पुत्रैषणवित्तैषणांमुळे जो व्याकुळ असतो - स्त्रैणः - जो स्त्रीवश असतो - मूढः कृपणधीः - तो मूर्ख मनुष्य, मंदमति - ‘मम ’ ‘अहं ’इति बद्ध्यते - मी व माझे या पाशांनी घटट बांधला जातो. ॥५६ ॥
जे लोक गृहस्थाश्रमात आसक्त असतात, पुत्र, धन इत्यादींच्या इच्छेतच अडकून व्याकूळ होतात, तसेच मूर्खपणाने स्त्रीलंपट आणि कंजूष बनून ‘मीमाझे‘ या भावनेमुळे कर्मबंधनाने बांधले जातात. (५६)
अहो मे पितरौ वृद्धौ भार्या बालात्मजऽऽत्मजाः ।
अनाथा मामृते दीनाः कथं जीवन्ति दुःखिताः ॥ ५७ ॥
चिंतिती पितरे वृद्ध लेकुरे सान सानची । जाता मी दुःख हो सवा जगतील कसे पुन्हा ॥ ५७ ॥
अहो मे पितरौ वृद्धौ - अहो माझे आईबाप वृद्ध आहेत - भार्या बालात्मजा - पत्नी लेकुरवाळी आहे - आत्मजाः अनाथाः - मुलांना कोणाचा आधार नाही - मां ऋते दीनाः दुःखिताः - माझ्याशिवाय दीन व दुःखी झालेली ही सर्व - कथं जीवंति - आपले आयुष्य कसे कंठतील ? ॥५७ ॥
ते असा विचार करतात, "अरेरे ! माझे आईवडील वृद्ध झाले आहेत, माझ्या पत्नीची मुले अजून लहान आहेत माझ्याशिवाय अनाथ, दीन आणि दुःखी झालेले हे कसे जगतील बरे ?" (५७)
एवं गृहाशयाक्षिप्त हृदयो मूढधीः अयम् ।
अतृप्तस्तान् अनुध्यायन् मृतोऽन्धं विशते तमः ॥ ५८ ॥
वासनात असे ज्याचे राहिले चित्त गुंतुनी । विषयी तृप्त ना होय शेवटी जाय नर्कि तो ॥ ५८ ॥
एवं गृहाशयाक्षिप्तहृदयः - याप्रमाणे घराच्या वासनेने ज्याचे अंतःकरण मोक्षभ्रष्ट झाले आहे असा - अयं मूढधीः - हा मूढबुद्धीचा पुरुष - अतृप्तः - असमाधानी राहून - तान् अनुध्यायन् - घरादिकांचे चिंतन करीत - मृतः - मेला असता - अंधं तमः विशते - घोर नरकावस्थेप्रत जातो. ॥ ५८ ॥
अशा प्रकारे घरदारासंबंधीच्या वासनांनी ज्याचे चित्त विचलित झालेले असते, तो मूर्ख मनुष्य विषयभोग घेऊन कधी तृप्त होत नाही आणि त्यांचेच मरणसमयी चिंतन करीत मेल्यानंतर घोर नरकात जाऊन पडतो. (५८)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |