श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
पञ्चदशोऽध्यायः

अष्टादशसिद्धिवर्णनम् -

विभिन्न सिद्धींची नावे व लक्षणे -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
जितेंद्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः ।
मयि धारयतश्चेत उपतिष्ठंति सिद्धयः ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण संगतात -
( अनुष्टुप )
इंद्रिय मन नी प्राण ठेवोनी वश योगि जो ।
अर्पुन चित्ति त्या ध्याता येती सिद्धी तया पुढे ॥ १ ॥

जितेंद्रियस्य जितश्वासस्य युक्तस्य - जितेंद्रिय, जितप्राण युक्त - मयि चेतः - माझ्या ठिकाणी चित्त - धारयतः योगिनः - स्थापन करणार्‍या अशा योग्याला - सिद्धय उपतिष्ठन्ति - सर्व सिद्धि प्राप्त होतात. ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणातात - योगी जेव्हा इंद्रिये, प्राण आणि मन आपल्या स्वाधीन करून घेऊन चित्त माझे ठिकाणी एकाग्र करतो, तेव्हा त्याच्यासमोर पुष्कळ सिद्धी येऊन उभ्या राहातात. (१)


श्रीउद्धव उवाच -
कया धारणया का स्वित् कथं वा सिद्धिः अच्युत ।
कति वा सिद्धयो ब्रूहि योगिनां सिद्धिदो भवान् ॥ २ ॥
उद्धवजी म्हणाले -
कोणत्या धारणेने त्या मिळती सिद्धि कोणत्या ।
संख्या त्यांची किती आहे योग्यांना देशि कोणत्या ॥ २ ॥

अच्युत कया धारणया सिद्धिः - हे ईश्वरा - कोणत्या धारणेने सिद्धि - कास्वित् - कोणत्या बरे नावाची - कथंस्वित् - कोणत्या स्वरूपाची - काति वा सिद्धयः - सिद्धि किती आहेत - तत् ब्रूहि - ते सांग. - भवान् योगिनां सिद्धिदः - तूं योग्यांस सिद्धि प्राप्त करून देणारा आहेस. ॥ २ ॥
उद्धव म्हणाला - हे अच्युता ! आपणच योग्यांना सिद्धी देणारे आहात तेव्हा कोणत्या धारणेने कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होते आणि त्यांची संख्या किती आहे, हे मला सांगा. (२)


श्रीभगवानुवाच -
सिद्धयो अष्टादश प्रोक्ता धारणा योगपारगैः ।
तासां अष्टौ मत्प्रधाना दशैव गुणहेतवः ॥ ३ ॥
भगवान श्रीकृष्ण सांगतात -
परागामी असे योगी अठरा सिद्धि सांगती ।
प्रधान आठ त्या होती न्यून सत्त्वात पावती ॥ ३ ॥

योगपारगैः - योगपारंगत विद्वानांनी - अष्टादश सिद्धयः - अठरा सिद्धि - धारणाः च प्रोक्ताः- व अठरा धारणा सांगितल्या आहेत - तासां अष्टौ मत्प्रधानाः - त्यांपैकी आठ सिद्धींचे आधारस्थान मी आहे. - दश गुणहेतवः एव - दहा सिद्धि सत्वांचा उत्कर्ष करणार्‍या म्हणजे सत्त्वगुणप्रधान म्हणून गौण आहेत. ॥ ३ ॥
श्रीकृष्ण म्हणाले - उद्धवा ! धारणा योगातील निष्णात योग्यांनी अठरा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत त्यांपैकी आठ सिद्धी मुख्यतः माझ्या ठिकाणीच वास करतात उरलेल्या दहा सत्त्वगुणाचा विकास झाल्याने साधकाला प्राप्त होतात. (३)


अणिमा महिमा मूर्तेः लघिमा प्राप्तिरिंद्रियैः ।
प्राकाम्यं श्रुतदृष्टेषु शक्तिप्रेरणमिशिता ॥ ४ ॥
गुणेष्वसङ्गो वशिता यत्कामः तदवस्यति ।
एता मे सिद्धयः सौम्य अष्ट उत्पत्तिका मताः ॥ ५ ॥
अणिमा महिमा तैशी लघिमा या तनूतल्या ।
प्राप्ती ही इंद्रियाची नी प्राकाम्या स्वर्ग भोगिते ॥
कार्येच्छे चालवी तीते ईषिता सिद्धि नाम हे ॥ ४ ॥
विषयी जी अनासक्ती वशिता नाम हे तिचे ।
कामना चिंतिता देते सिद्धी कामावसायिता ॥
आठी माझ्याच अंगीच्या अंशाने देइ मी तयां ॥ ५ ॥

मूर्तेः अणिमा महिमा लघिमा - देहसंबंधी अणिमा, महिमा व लघिमा या तीन सिद्धि होत - इंद्रियैः प्राप्तिः - इंद्रियदेवतांच्या संबंधी प्राप्ति - श्रुतदृष्टेषु प्राकाश्यं - श्रुत आणि दृष्ट वस्तूला प्रकट करणारी ती प्राकाश्य - शक्तिप्रेरणं ईशिता - ईश्वराचे ठिकाणी मायेची व इतरांचे ठिकाणी मायेच्या अंशांची प्रेरणा करणारी ती ईशिता - गुणेषु असंगः वशिता - विषयगुणांसंबंधे अनासक्ति ही वशिता - यत्कामः तत् अवस्यति - इच्छेची पूर्ति - सौम्य, एताः मे अष्टौ - मत्संबंधी या आठ महासिद्धि - ’औत्पत्तिकाः मताः - मत्सहभूत असतात असे ज्ञानी म्हणतात. (४-५)
त्यांपैकी ‘अणिमा‘ ‘महिमा, आणि ‘लघिमा‘ या तीन सिद्धी शरीराशी संबंधित आहेत ‘प्राप्ती‘ नावाची इंद्रियांची सिद्धी आहे लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी ‘प्राकाम्य‘ नावाची सिद्धी आहे माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालविणे या सिद्धीला ‘ईशिता‘ असे म्हणतात. विषयांमध्ये राहूनसुद्धा त्यामध्ये आसक्त न होणे हिला ‘वशिता‘ म्हणतात आणि ज्याची ज्याची इच्छा करावी, ती पूर्णपणे मिळवणे, ती ‘कामावसायिता‘ नावाची आठवी सिद्धी होय या आठ सिद्धी माझ्या ठायी स्वभावतःच आहेत. (४-५)


अनूर्मिमत्त्वं देहेऽस्मिन् दूरश्रवणदर्शनम् ।
मनोजवः कामरूपं परकायप्रवेशनम् ॥ ६ ॥
स्वच्छंदमृत्युर्देवानां सहक्रीडानुदर्शनम् ।
यथा सङ्कल्प संसिद्धिः आज्ञाप्रतिहता गतिः ॥ ७ ॥
आणखी सिद्धि त्या ऐशा भूक तृष्णा न होय ती ।
दूरदृष्टी तसे ऐके मनोवेगेचि पोचणे ॥
इच्छिले रूप ते घेणे परकाया प्रवेश नी ॥ ६ ॥
इच्छामरण नी पाही अप्सरा देव क्रीडता ।
संकल्प सिद्धि नी आज्ञा दहा सत्त्वात लाभती ॥ ७ ॥

अस्मिन् देहे - या वर्तमान देहामध्ये - अनूर्मिमत्वं - क्षुधा तृषा इत्यादि शारीरिक आवेगांचा अभाव - दूरश्रवणदर्शनं - दूरचे ऐकण्याचे व पाहण्याचे सामर्थ्य - मनोजवः - मनाच्या शीघ्रगतीप्रमाणे शरीराची शीघ्र गति - कामरूपं - इच्छेला येईल ते रूप घेता येणे - परकायप्रवेशनं - दुसर्‍या शरीरात प्रवेश करण्याचे सामर्थ्य. ॥ ६ ॥ स्वच्छंदमृत्युः - इच्छामरणाचे सामर्थ्य - देवानां सह क्रीडाऽन्य्दर्शन - देवांसह स्वर्गीय विलासांची प्राप्ति - यथा संकल्पसंसिद्धिः - स्वतःच्या संकल्पांची पूर्ति होणे - अप्रतिहतागतिः आज्ञा - निरंकुश आज्ञाशक्ति ॥ ७ ॥
देहावर तहानभुकेचा परिणाम न होणे, पुष्कळ लांबची वस्तू दिसणे, पुष्कळ लांबचे ऐकू येणे, मनाच्या वेगाने शरीरानेही त्या ठिकाणी जाणे, पाहिजे ते रूप घेणे, दुसर्‍या शरीरात प्रवेश करणे, आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे, अप्सरांबरोबर होणार्‍या देवक्रीडेचे दर्शन होणे, जो संकल्प कराल तो सिद्ध होणे, सगळ्या ठिकाणी, सगळ्यांकडून आपल्या आज्ञेचे पालन होणे, या दहा सिद्धी सत्त्वगुणाच्या विशेष विकासाने प्राप्त होतात. (६-७)


त्रिकालज्ञत्वं अद्वन्द्वं परचित्ताद्यभिज्ञता ।
अग्न्यर्काम्बुविषादीनां प्रतिष्टंभोऽपराजयः ॥ ८ ॥
त्रिकालज्ञत्व नी तैसे निर्व्दंव्द चित्त जाणणे ।
महाभूते तसे वीष स्तंभीत करणे तसे ॥
पराभूत न होणे या सिद्धि योग्यास लाभती ॥ ८ ॥

त्रिकालज्ञत्वं - भूत-भविष्य वर्तमानकालांचे ज्ञान - अद्वंद्वं - शीतोष्ण सुखदुःखादि द्वंद्वे सहन करण्याचे सामर्थ्य - परचित्तादि अभिज्ञता - - दुसर्‍याचे मनोविचार व मनोवृत्तिप्रभृति कळणे - अग्नि अर्क अंबु विषादीनां प्रतिष्टंभः - अग्नि, सूर्य, जल, विष वगैरे मारक पदार्थांचे गुन स्तंभित करणे - अपराजयः - अपयशाचा अभाव - ॥ ८ ॥
तिन्ही काळातील गोष्टी समजणे, शीतउष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणे, दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे, अग्नी, सूर्य, जल, विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणे आणि कोणाकडूनही पराजित न होणे या पाच सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात. (८)


एताश्च उद्देशतः प्रोक्ता योगधारणसिद्धयः ।
यया धारणया या स्याद् यथा वा स्यान्निबोध मे ॥ ९ ॥
योगाने लाभती ऐशा सिद्धि मी वदलो तुला।
कोणत्या धारणेने त्या लाभते ऐक सांगतो ॥ ९ ॥

एताः - या - योगधारणयसिद्धयः - योगधारकांनी प्राप्त होणार्‍या सिद्धींपैकीं काहींचा म्हणजे तेवीस सिद्धींचा - उद्देशतः च प्रोक्ताः - उल्लेख केवळ उदाहरणादाखल आहे - यया धारणया या स्यात् - ज्या विशिष्ट धारणेने जी विशेष सिद्धि प्राप्त होते ते - यथा वा स्यात् - आणि कशी प्राप्त होते ते - मे निबोध - मजपासून ऐक. ॥ ९ ॥
योगधारणा केल्याने ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्यांचे मी नावांसह वर्णन केले आता कोणत्या धारणेने कोणती सिद्धी, कशी प्राप्त होते, ते सांगतो, ऐक. (९)


भूतसूक्ष्मात्मनि मयि तन्मात्रं धारयेन्मनः ।
अणिमानं अवाप्नोति तन्मात्रोपासको मम ॥ १० ॥
तन्मात्रा देहची माझा तन्मात्रा ध्यानि चिंतिता ।
आणिमा सिद्धि ती लाभे अणुता प्राप्त होतसे ॥ १० ॥

भूतसूक्ष्मात्मनि मयि - भूतपरमाणूसंबंधी उपाधि असणारा जो मी भगवान त्या माझे ठिकाणी - मनः तन्मात्रं धारयेत् - योगसाधकाने परमाणूचा आकार असणारे आपले मन ठेऊन चिंतन करावे - तन्मात्रोपासकः मम - या तन्मात्रोपासकाला माझी - अणिमानं अवाप्नोति - अणिमा - अत्यंत सूक्ष्म स्वरूप सिद्धि मिळते. ॥ १० ॥
प्रिय उद्धवा ! तन्मात्र नावाचे पंचमहाभूतांचे जे सूक्ष्म रूप, ते माझेच रूप आहे जो योगी माझ्या या रूपामध्ये आपल्या मनाची धारणा करतो, त्याला ‘अणिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते. (१०)


महत्यात्मन्मयि मयि यथासंस्थं मनो दधत् ।
महिमानं अवाप्नोति भूतानां च पृथक् पृथक् ॥ ११ ॥
महत्तत्वी प्रकाशे मी चित्त त्याच्यात लाविता ।
महिमा लाभते सिद्धि नभादी रूप तै मिळे ॥ ११ ॥

महति आत्मन् मयि परे - महत् तत्त्वासंबंधी उपाधि असणारा जो परमात्मा मी, त्या माझे ठिकाणी - यथासंस्थं मनः दधत् - आपले मन तितकेच मोठे करून त्याचेच चिंतन करणारा - भूतानां पृथक्‌पृथक् च - पृथ्वीत्यादि महद्‌भूतांचे निरनिराळ्या - महिमानं अवाप्नोति - महत्स्वरूपाला प्राप्त होतो. ॥ ११ ॥
आपल्या मनाला महत्तत्त्वरूप माझ्यामध्ये जो धारण करतो, त्याला महत्तत्त्वाकार ‘महिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे एकेका महाभूतामध्ये त्याने मनाची धारणा केली, तरीसुद्धा त्याला त्या त्या महाभूताएवढी ‘महिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते. (११)


परमाणुमये चित्तं भूतानां मयि रञ्जयन् ।
कालसूक्ष्मार्थतां योगी लघिमानं अवाप्नुयात् ॥ १२ ॥
वायु आदी रुपा ध्याता लघिमा सिद्धि लाभते ।
काळाच्या परि ती सूक्ष्म हिच्याने रूप लाभते ॥ १२ ॥

भूतानां परमाणुमये मयि - भूतांचा परमाणूंची उपाधि असणार्‍या माझ्या ठिकाणी - चित्तं रंजयन् योगी - मनाला एकाग्रतेने रंजविणार्‍या योग्याला - कालसूक्ष्मार्थतां - कालसूक्ष्मतेचे स्वरूप - लघिमानं अवाप्नुयात् - अशी लघिमा सिद्धि प्राप्त होते. ॥ १२ ॥
जो योगी आपले चित्त भूतांच्या परमाणुस्वरूप माझ्या ठिकाणी लावतो, त्याला ‘लघिमा‘ नावाची सिद्धी प्राप्त होते व त्याला कालाच्या सूक्ष्म परमाणूएवढे रूप घेता येते. (१२)


धारयन् मय्यहंतत्त्वे मनो वैकारिकेऽखिलम् ।
सर्वेंद्रियाणां आत्मत्वं प्राप्तिं प्राप्नोति मन्मनाः ॥ १३ ॥
अहंकार रुपामाजी योगी तो चित्त लविता ।
समस्त इंद्रियां जिंकी प्राप्तीने मज मेळि तो ॥ १३ ॥

वैकारिके अहंतत्त्वे मयि - महत्तत्त्वाचा विकार असनारा जो अहंकार तीच उपाधि असणार्‍या माझ्या ठिकाणी - अखिलं मनं धारयन् - आपले सर्व मन धारण करणार्‍या - मन्मनाः - मदेकनिष्ठ योग्याला - सर्वेंद्रियाणां आत्मत्वं - सर्व इंद्रियांचे नियंतृत्व प्राप्त होणे - प्राप्तिं प्राप्नोति - एतद्‌रूप ’प्राप्ती’ नामक सिद्धि प्राप्त होते. ॥ १३ ॥
योग्याने जर सात्त्विक अहंकाररूप माझ्यामध्ये आपले मन एकाग्र केले, तर तो सर्व इंद्रियांवर स्वामित्व मिळवू शकतो अशा प्रकारे मन माझ्या ठिकाणी लावणारा भक्त ‘प्राप्ती‘ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. (१३)


महत्यात्मनि यः सूत्रे धारयेन्मयि मानसम् ।
प्राकाम्यं पारमेष्ठ्यं मे, विंदतेऽव्यक्तजन्मनः ॥ १४ ॥
महत्तत्वाभिमानी त्या लाविता चित्त आपुले ।
प्राकाम्या लाभते सिद्धि इच्छिले भोग लाभती ।१४ ॥

महति आत्मनि सूत्रे मयि - महत्तत्व उपाधि हाच ज्याचा आत्मा आहे - सूत्रे मयि - असा जो सूत्रात्मा त्या माझे ठिकाणी - यः मानसं धारयेत् - योग्याने आपले मन एकाग्रतेने स्थापले म्हणजे - अव्यक्तजन्मनः मे - अव्यक्तजन्मा जो मी त्या माझे - पारमेष्ठ्यं प्राकाश्यं - पारमेष्ठ्य म्हणजे उत्कृश्तत्व तद्‌रूप प्राकाश्य नामक सिद्धि - विन्दते - त्या योग्याला मिळते. ॥ १४ ॥
महत्तत्त्वाचा अभिमानी असा जो सूत्रात्मा त्या रूपातील माझ्या ठिकाणी मनाची धारणा केली, तर ‘प्राकाम्य‘ नावाची सिद्धी प्राप्त होते तो अव्यक्तापासून जन्मलेल्या मज परमेष्ठीचे श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतो. (१४)


विष्णौ त्र्यधीश्वरे चित्तं धारयेत् कालविग्रहे ।
स ईशित्वं अवाप्नोति क्षेत्रज्ञक्षेत्रचोदनाम् ॥ १५ ॥
कालरूपास ध्यायी त्यां प्रेरणा शक्ती लाभते ।
ईशित्व नावची सिद्धी लाभते योगियास त्या ॥ १५ ॥

कालविग्रहे त्रधेश्वरे विष्णौ - कालस्वरूप त्रैलोक्याधीश्वर विष्णूच्या ठिकाणी - यः चित्तं धारयेत् - जो चित्त धारण करतो - सः - तो - क्षेत्रक्षेत्रज्ञचोदनां - सर्व चराचरांची प्रेरणा करण्याचे सामर्थ्यरूप - ईशित्वं अवाप्नोति - ’ईशित्व’ नामक सिद्धीला प्राप्त होते. ॥ १५ ॥
त्रिगुणात्मक मायेचा स्वामी असलेल्या माझ्या या कालशरीर विष्णुस्वरूपामध्ये जो चित्ताची धारणा करील, त्याला ईशित्व‘ सिद्धी प्राप्त होते त्यामुळे त्याला जीवांना व त्यांच्या शरीरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. (१५)


नारायणे तुरीयाख्ये भगवत् शब्दशब्दिते ।
मनो मय्यादधद् योगी मद्धर्मा वशितामियात् ॥ १६ ॥
नारायण स्वरूपात लाविता चित्त आपुले ।
माझा स्वभाव त्यां लाभे वशिता सिद्धि ती मिळे ॥ १६ ॥

भगवत् शब्द शब्दिते - ’भगवान’ हे ज्याचे अन्वर्थ नाव आहे त्या - तुरीयाख्ये - तुरीय अवस्थेच्या - नारायणे - नारायणरूप अशा - मयि मनः आदधत् - माझ्या ठिकाणी आपल्या मनाची धारणा करणारा - मद्धर्मा योगी - माझा स्वभाव प्राप्त झालेला योगी - वशितां इयात् - ’वशिता’ नामक सिद्धि प्राप्त करून घेतो. ॥ १६ ॥
विराट, हिरण्यगर्भ व कारण या तीन उपाधींनी रहित म्हणून ‘तुरीय‘ व सहा ऐश्वर्यांनी संपन्न म्हणून ‘भगवान‘ अशी ज्यांना नावे आहेत, त्या माझ्या नारायणस्वरूपामध्ये जो योगी मनाची धारणा करतो, त्याचे ठिकाणी माझे गुण येतात असा योगी ‘वशिता‘ नावाची सिद्धी प्राप्त करून घेतो. (१६)


निर्गुणे ब्रह्मणि मयि धारयन् विशदं मनः ।
परमानंदं आप्नोति यत्र कामोऽवसीयते ॥ १७ ॥
निर्गुणी ब्रह्म मी आहे तयात चित्त लाविता ।
कामावसायता सिद्धि लाभता पूर्ण तृप्ती हो ॥ १७ ॥

निर्गुणे ब्रह्मणि मयि - स्वरूपतः निर्गुण ब्रह्म असणार्‍या माझ्याच ठिकाणी - विशदं मनः धारयन् - आपले शुद्ध चित्त स्थान करणार्‍या - योगी - योग्याला - परमानंदं आप्नोति - श्रेष्ठ आनंदाची प्राप्ति होते - यत्रः कामः अवसीयते - जेथे सर्व काम आशा, मनीषा प्रभृति समाप्त होतात. ॥ १७ ॥
ज्या योग्याचे मन स्वच्छ होऊन निर्गुण ब्रह्म अशा माझ्या ठायी स्थिर झाले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो या स्थितीत त्याला कोणत्याही प्रकारची कामना नसते हिला ‘कामावसायिता‘ नावाची सिद्धी म्हणतात. (१७)


श्वेतद्वीपपतौ चित्तं शुद्धे धर्ममये मयि ।
धारयन् श्वेततां याति षडूर्मिरहितो नरः ॥ १८ ॥
शुद्धधर्ममयी शवेत व्दीपरूप स्मरे तया ॥
भूक तृष्णादि ऊर्मी त्या कधीच नच होत की ॥ १८ ॥

शुद्धे धर्ममये - शुद्ध धर्ममूर्ति असणार्‍या - श्वेतद्वीपपतौ मयि - श्वेतद्वीपाचा स्वामी जो मी त्या माझे ठिकाणी - विशदं चित्तं धारयन् नरः - निर्मल मनाची स्थापना करणारा योगी - षडूर्मिरहितं - क्षुधादि सहा शारीरिक ऊर्मींनी रहित होत्साता - श्वेततां याति - श्वेत म्हणजे शुद्ध सात्विक होतो. ॥ १८ ॥
श्वेतद्वीपाचा स्वामी व धर्मरूप अशा माझ्या विशुद्ध स्वरूपात जो आपले चित्त स्थिर करतो, तो तहान, भूक, काम, क्रोध, शोक, मोह यांनी त्रासला जात नाही व माझ्या शुद्ध स्वरूपाची त्याला प्राप्ती होते. (१८)


मय्याकाशात्मनि प्राणे मनसा घोषमुद्वहन् ।
तत्रोपलब्धा भूतानां हंसो वाचः श्रृणोत्यसौ ॥ १९ ॥
आकाश रूप ते माझे सर्वात्मा स्मरता तयां ।
दूरश्रवण सिद्धि ती लाभते साधका पहा ॥ १९ ॥

आकाशात्मनि आकाशाचा आत्मा असणारा - प्राणे मयि - - जो समष्टि प्राण त्या रूपाची मला उपाधि असणार्‍या माझ्या ठिकाणी - मनसा घोषं उद्वहन् - मन ठेऊन अनुहत ज्ञाना होता - असौ हंसः - हा जीव - भूतानां वाचं शृणोति - तेथील सर्व प्रकारचे आवाज भूलोकीच बसून ऐअण्याला समर्थ होतो. ॥ १९ ॥
आकाशात्मा जो समष्टिप्राण त्या माझ्या स्वरूपात जो मनाने अनाहतनादाचे चिंतन करतो, तो ‘दूरश्रवण‘ नावाच्या सिद्धीने युक्त होतो या सिद्धीमुळे त्या योग्याला आकाशातील निरनिराळ्या वाणी ऐकू येतात. (१९)


चक्षुः त्वष्टरि संयोज्य त्वष्टारं अपि चक्षुषि ।
मां तत्र मनसा ध्यायन् विश्वं पश्यति दूरतः ॥ २० ॥
सूर्यासी नेत्र लावोनी मनी ध्याताच साधका ।
दूरदर्शन ती सिद्धि लाभते दूर पाहण्या ॥ २० ॥

त्वष्टरि चक्षुः - सूर्याचे ठिकाणी नेत्राचा - त्वष्टारं अपि चक्षिषि - आणि नेत्राचे ठिकाणी सूर्याचा - संयोज्य - संयोग करून - तत्र - त्या ठिकाणी - मां मनसा ध्यायन् - माझे एकाग्र ध्यान करणारा - सूक्ष्मदृक् विश्वं पश्यति - सूक्ष्मद्रष्टा होत्साता सर्वांगांनी विश्व पाहतो. ॥ २० ॥
जो योगी डोळ्यांना सूर्यामध्ये आणि सूर्याला डोळ्यांमध्ये एकरूप करतो आणि त्या दोन्हींमध्ये मनाने माझे ध्यान करतो, त्याची दृष्टी सूक्ष्म होते, त्याला ‘दूरदर्शन‘ नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळे विश्व पाहू शकतो. (२०)


मनो मयि सुसंयोज्य देहं तदनु वायुना ।
मद्धारणा अनुभावेन तत्रात्मा यत्र वै मनः ॥ २१ ॥
मन देह नि प्राणाने संयुक्त मज चिंतिता ।
मनोजव अशी सिद्धि साधका साध्य होतसे ॥ २१ ॥

मनः तद् अनुवायुनां देहं - मन आणि त्यामागून जाणार्‍या वायूसह देह - मयि सुसंयोह्य - माझ्या ठिकाणी स्थापला असता - मद्‌धारणानुभावेन - माझ्या ठिकाणी केलेल्या धारणेच्या माहात्म्याने - यत्र मनः तत्र आत्मा वै - जेथेच मन तेथेच आत्मा म्हणजे देहही जातो. ॥ २१ ॥
मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून जो माझी धारणा करतो, त्याला ‘मनोजव‘ नावाची सिद्धी प्राप्त होते त्यामुळे तो योगी जेथे मन जाईल, तेथे शरीराने त्याच क्षणी जाऊ शकतो. (२१)


यदा मन उपादाय यद् यद् रूपं बुभूषति ।
तत्तद् भवेत् मनोरूपं मद्‌योगबलमाश्रयः ॥ २२ ॥
उपादान मने ध्याता देवतारूप ते तसे ।
पाहिजे रूप ते तैसे साधका लाभते पहा ॥ २२ ॥

मनं उपादाय यदा - मनालच उपादानकरण करून जेव्हा - यत् यत् रूपं बुभूषति - जे जे स्वरूप प्रप्त व्हावे अशी योग्याला इच्छा असते - तत् तत् मनोरूपं भवेत् - तेव्हां ते ते मनोवांछित रूप प्राप्त होते - मद् योगबलं आश्रयः - माझ्या योगबलाचा त्याला आश्रय असतो. ॥ २२ ॥
ज्यावेळी योगी मनाला उपादानकारण बनवून ज्या कोणाचे रूप धारण करू इच्छितो, ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो कारण, त्याने आपले मन माझ्याशी जोडलेले असते. (२२)


परकायं विशन् सिद्ध आत्मानं तत्र भावयेत् ।
पिण्डं हित्वा विशेत् प्राणो वायुभूतः षडङ्‌घ्रिवत् ॥ २३ ॥
प्राण वायूस धारोनी योगिया सिद्धि लाभता ।
परकायेमधेही तो जावोनी निवसू शके ॥ २३ ॥

परकायं विशन् सिद्धः - परकी शरीरात् शिरण्याची इच्छा करणार्‍या सिद्धाने - आत्मानं तत्र भावयेत् - आपण त्या परकी शरीरात आहोतच अशी दृढ भावना करावी - वायुभूतः प्राणः - वायुस्वरूपच झालेला प्राण - पिंडं हित्वा आविशेत् - स्वस्थूल देह सोडून त्यात प्रवेश करतो. ॥ २३ ॥
जो योगी दुसर्‍या शरीरात प्रवेश करू इच्छितो, त्याने अशी भावना करावी की, आपण त्याच शरीरात आहोत असे केल्याने त्याचा प्राण वायुरूप धारण करतो आणि भ्रमर जसा एका फुलावरून दुसर्‍या फुलावर सहज जातो, त्याप्रमाणे तो आपले शरीर सोडून दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो. (२३)


पार्ष्ण्याऽऽपीड्य गुदं प्राणं हृद्‌ उरः कण्ठमूर्धसु ।
आरोप्य ब्रह्मरंध्रेण ब्रह्म नीत्वोत्सृजेत्तनुम् ॥ २४ ॥
गुदास टाच लावोनी क्रमाने प्राण तो वरी ।
ब्रह्मरंध्रात नेवोनी शरीर सोडणे घडे ॥ २४ ॥

षडंघ्रिवत् - भ्रमर जसा एकांतून दुसर्‍या पुष्पात् प्रवेश करतो त्याप्रमाणे - पार्ष्ण्या गुदं आपीड्य - टाचेन अधोद्वार बंद करून - हृदुरः कंठमूर्धसु प्राणं आरोप्य - लिंगदेहाला हृदय, उर, कंठ आणि शिर या उत्तरोत्तर ऊर्ध्वस्थानी स्थापून - ब्रह्मरंध्रेण ब्र्ह्म नीत्वा - ब्रह्मरंध्राच्या द्वाराने ब्रह्मस्थानी त्या लिंगदेहाला मनाने नेऊन - तनुं त्यजेत् - स्थूल देह सोडावा. ॥ २४ ॥
योग्याला जर शरीराचा त्याग करावयाचा असेल तर त्याने टाचेने गुदद्वार दाबून धरून प्राणवायूला अनुक्रमे हृदय, छाती, कंठ आणि मस्तकात घेऊन जावे नंतर ब्रह्मरंध्राच्या मार्गाने त्याला ब्रह्मामध्ये लीन करून शरीराचा त्याग करावा. (२४)


विहरिष्यन् सुराक्रीडे मत्स्थं सत्त्वं विभावयेत् ।
विमानेनोपतिष्ठंति सत्त्ववृत्तीः सुरस्त्रियः ॥ २५ ॥
शुद्ध सत्वमयी माझे मनात रूप ध्यायिता ।
सुंदरी सत्वरूपी त्या देवपत्‍न्याहि लाभती ॥ २५ ॥

सुराक्रीडे विहरिष्यन् - देवांचे विलास हवे अशी इच्छा करणार्‍या योग्याचे - मत्स्थं सत्त्वं विभावयेत् - माझ्या ठिकाणी असलेल्या शुद्ध सत्त्वाचे चिंतन करावे - सत्त्ववृत्तीः सुरस्त्रियः - सत्त्वशील देवांगना - विमानेन उपतिष्ठन्ति - विमाने घेऊन येतात आणि सेवेला सादर असतात. ॥ २५ ॥
देवतांच्या विहारस्थलांमध्ये क्रीडा करण्याची इच्छा असेल त्याने माझ्या ठिकाणच्या सत्त्वगुणाचे ध्यान करावे त्यामुळे सत्त्वगुणाच्या अंशस्वरूप अशा सुरसुंदरी विमानात बसून त्याच्याजवळ येऊन पोहोचतात. (२५)


यथा सङ्कल्पयेद् बुद्ध्या यदा वा मत्परः पुमान् ।
मयि सत्ये मनो युञ्जन् तथा तत्समुपाश्नुते ॥ २६ ॥
सत्यसंकल्प रूपास लाविता चित्त योगि तो ।
संकल्प सिद्ध ते होती मनीं जे इच्छिले तसे ॥ २६ ॥

मयि सत्ये मनः युंजन् - सत्यस्वरूपी जो मी त्या माझे ठिकाणी मन स्थापून - मत्परः पुमान् - मन्निष्ठ पुरुष - बुद्ध्या - बुद्धिपुरःसर - यदा वा यथा संकल्पयेत् - जेव्हा अथवा जसे संकल्प करतो - तदा तथा तत् समुपाश्नुते - तेव्हा त्याचे ते ते संकल्प पूर्ण होतात. ॥ २६ ॥
माझ्याशी परायण झालेल्या ज्या योग्याने, सत्यसंकल्परूप अशा माझ्यामध्ये चित्त स्थिर केले असेल त्याचा संकल्प सिद्ध होतो. मनाने ज्या वेळी जो संकल्प तो करतो, त्याचवेळी त्याचा तो संकल्प सिद्ध होतो. (२६)


यो वै मद्‍भवमापन्न ईशितुः वशितुः पुमान् ।
कुतश्चित् न विहन्येत तस्य चाज्ञा यथा मम ॥ २७ ॥
इशित्व नी वशित्वाचा स्वामी तो मीच की असे ।
माझे भाव स्मरोनीया टाकिता शब्द ना टळे ॥ २७ ॥

ईशितुः वशितुः मत् - सर्व नियंता व सर्वतंत्र असा जो मी त्या माझ्या - भवं आपन्नः - स्वभावाला प्राप्त झालेला - यः पुमान् - जो पुरुष - कुतश्चित् न विहन्येत वै - अगदी कोठेही पराभूत होत नाही - तस्य च आज्ञा यथा मम - कारण त्याची आज्ञा ती मीच केलेली आज्ञा असते. ॥ २७ ॥
‘ईशित्व‘ आणि ‘वशित्व‘ अशा दोन्ही सिद्धींचा स्वामी असलेल्या माझ्या त्या रूपाचे चिंतन करून जो त्याच भावाने युक्त होतो, माझ्याप्रमाणेच त्याची आज्ञासुद्धा कोणी टाळू शकत नाही. (२७)


मद्‍भक्त्या शुद्धसत्त्वस्य योगिनो धारणाविदः ।
तस्य त्रैकालिकी बुद्धिः जन्ममृत्यूपबृंहिता ॥ २८ ॥
जयाचे शुद्ध ते चित्त जाहले मम भक्तिने ।
त्रिकालज्ञ असा होतो जाणितो सर्व तेथले ॥ २८ ॥

मद्‌भक्त्या - माझ्या भक्तीने - शुद्धसत्त्वस्य - ज्याचे मन शुद्ध झाले आहे अशा - धारणाविदः तस्य योगिनः - धारणा जाणणार्‍या त्या योग्याला - जन्ममृत्यूपबृंहिता - जन्ममृत्यूच्या ज्ञानासह - त्रैकालिकी बुद्धिः - तीन्ही काळांचा ज्ञान प्राप्त होते. ॥ २८ ॥
माझी धारण करीत करीत ज्या योग्याचे चित्त माझ्या भक्तीने शुद्ध झाले असेल, त्याला जन्ममृत्यूसह तिन्ही काळांतील सर्व गोष्टी समजतात. (२८)


अग्न्यादिभिः न हन्येत मुनेः योगमयं वपुः ।
मद्‌योगश्रांतचित्तस्य यादसां उदकं यथा ॥ २९ ॥
जळात राहती मासे जळाने मरती न ते ।
लाविता चित्त माझ्यात शैथिल्ये जळ त्रासिना ॥ २९ ॥

मद्योगश्रांतचित्तस्य मुनेः - माझे ध्यान करणार्‍या योग्याचे चित्त श्रांत म्हणजे मन्मय झाले असल्यामुळे - यादसा यथा उदकं - जसे जलचरांना जल घातक होत नाही त्याप्रमाणे - योगमयं वपुः - त्या मुनीचे मूर्तिमंत योगरूप झालेले शरीर - अग्न्यादिभिः न हन्येत - अग्न्यादिकांनी पीडित होत नाही. ॥ २९ ॥
पाण्यात राहणार्‍या प्राण्यांचा पाण्याकडून नाश होत नाही, त्याचप्रमाणे ज्या योग्याचे चित्त माझ्यामध्ये स्थिर झाले आहे, त्याच्या योगमय शरीराला अग्नी, पाणी इत्यादी कोणतीही वस्तू नष्ट करू शकत नाही. (२९)


मद्विभूतीः अभिध्यायन् श्रीवत्सास्त्रविभूषिताः ।
ध्वजातपत्रव्यजनैः स भवेद्‌ अपराजितः ॥ ३० ॥
शंखचक्रादि शस्त्रांनी नी श्री वत्सादि चिन्ह ते ।
संपन्न चवर्‍यादी नी रूपा ध्याता अजेय हो ॥ ३० ॥

ध्वजापत्रव्यजनैः - ध्वज, छत्र, चामर यांसह - श्रीवत्सास्त्रविभूषिताः मद्‌विभूतीः - श्रीवत्स, सुदर्शन, प्रभूतींनी झालेल्या झाल्या अवतारांचे - अभिध्यायन् - दृढ ध्यान करणारा - सः अपराजितः भवेत् - तो अजिंक्य होतो. ॥ ३० ॥
जो योगी श्रीवत्स इत्यादी चिह्ने आणि शंख, चक्र, गदा, पद्म इत्यादी आयुधांनी विभूषित, त्याचप्रमाणे ध्वज, छत्र, चामर इत्यादींनी संपन्न अशा माझ्या अवतारांचे ध्यान करतो, तो अजिंक्य होतो. (३०)


उपासकस्य मामेवं योगधारणया मुनेः ।
सिद्धयः पूर्वकथिता उपतिष्ठंत्यशेषतः ॥ ३१ ॥
विचारी साधको सारे योगाने ध्याति ते मला ।
तयांना सर्वत्या सिद्धी लाभती वर्णिल्या तशा ॥ ३१ ॥

एवं योगधारणया - याप्रमाणे निरनिराळ्या योगधारणांनी - मां उपासकस्य मुनेः - माझी उपासना करणार्‍या मुनींच्या - पूर्वकथिताः सिद्धयः - आताच सांगितलेल्या सिद्धि - अशेषतः उपतिष्ठन्ति - सर्वथा सेवेला सादर असतात. ॥ ३१ ॥
अशा प्रकारे जो माझे चिंतन करणारा पुरूष योगधारणेने माझी उपासना करतो, त्याला मी वर्णन केलेल्या सिद्धी पूर्णपणे प्राप्त होतात. (३१)


जितेंद्रियस्य दांतस्य जितश्वासात्मनो मुनेः ।
मद्धारणां धारयतः का सा सिद्धिः सुदुर्लभा ॥ ३२ ॥
न दुर्लभ मुळी सिद्धी संयमे मज चिंतित्ता ।
सर्वच्या सर्व या सिद्धी प्रीय भक्तास लाभती ॥ ३२ ॥

जितेंद्रियस्य दान्तस्य - इंद्रियांना वश करणारा आणि दान्त - जितश्वासात्मनः मुनेः - प्राणायामपरायण मुनीने - मद्धारणां धारयतः - माझी शास्त्रोक्त धारणा केली असता - सुदुर्लभा सिद्धिः - अत्यंत दुर्लभ अशी सिद्धि - का सा ? - कोणती असणार ? ॥ ३२ ॥
ज्याने आपले प्राण, मन आणि इंद्रियांवर विजय मिळवून माझ्याच स्वरूपावर धारणा केली आहे, त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार ? (३२)


अंतरायान् वदंत्येता युञ्जतो योगमुत्तमम् ।
मया संपद्यमानस्य कालक्षपणहेतवः ॥ ३३ ॥
साधको जाणणे हे की मज प्राप्तीस सिद्धि त्या ।
विघ्नची असती सर्व व्यर्थ वेळहि जातसे ॥ ३३ ॥

मया संपद्यमानस्य - माझ्या साह्याने माझी परम प्राप्ति करून घेण्यासाठी - उत्तमं योगं युंजतः - उत्तमोत्तम योगसाधन निष्कामत्वाने करणार्‍या योग्याला - एताः अंतरायान् वदन्ति - या सिद्धि म्हणजे मोक्षमार्गांतील अडथळेच होत असे म्हणतात - कालक्षपणहेतवः - या सिद्धि म्हणजे कालाचा व्यर्थ अपव्यय होय. ॥ ३३ ॥
परंतु श्रेष्ठ पुरूष असे सांगतात की, जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिले आहेत, त्यांच्यासाठी या सिद्धी हे एक विघ्नच आहे कारण यांच्यामुळे भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी विलंब होतो. (३३)


जन्मौषधि तपोमंत्रैः यावतीः इह सिद्धयः ।
योगेनाप्नोति ताः सर्वा न अन्यैः योगगतिं व्रजेत् ॥ ३४ ॥
जन्म नी औषधी ध्याने मंत्राने सिद्धि लाभती ।
योगानेमिळती ज्या त्या मुक्तिना भजण्या विना ॥ ३४ ॥

जन्मौषधितपोमंत्रैः - जन्मामुळे, औषधींनी, तपसामर्थ्याने, मंत्राच्या प्रभावाने - इह यावतीः सिद्धयः - येथे ज्या सिद्धि प्राप्त होतात - ताः सर्वाः योगेन आप्नोति - त्या सर्व योगाने मिळतातच - अन्यैः योगगतिं न व्रजेत् - अन्य जन्मादिकांनी योगलभ्य मुक्तीचा लाभ मिळत नाही. ॥ ३४ ॥
जन्म, औषधी, तपश्चर्या आणि मंत्र इत्यादींमुळे ज्या सिद्धी प्राप्त होतात, त्या सर्व योगाच्या द्वारे प्राप्त होतात परंतु योगाची अंतिम परिणती जी भगवत्प्राप्ती, ती माझ्यावर धारणा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. (३४)


सर्वासामपि सिद्धीनां हेतुः पतिः अहं प्रभुः ।
अहं योगस्य साङ्ख्यस्य धर्मस्य ब्रह्मवादिनाम् ॥ ३५ ॥
सांख्यओग नि धर्मादी साधने ज्ञानि सांगती ।
समस्त सिद्धिचा हेतू मीच की स्वामि नी प्रभू ॥ ३५ ॥

अहं - मी - सर्वासां अपि सिद्धीनां - या सर्वच्या सर्व सिद्धींचा - हेतुः पतिः प्रभु च - - कारण, पालक व स्वामी आहे - अहं योगस्य सांख्यस्य - मी योगशास्त्राचा, सांख्यशास्त्राचा - धर्मस्य, ब्रह्मवादिनांच - धर्मशास्त्राचा आणि तत्त्ववेत्त्यांचाही - ॥ ३५ ॥
ब्रह्मवादी लोकांनी योग, सांख्य, धर्म इत्यादी पुष्कळ साधने सांगितली आहेत त्यांचा तसेच सर्व सिद्धींचे कारण, पालन करणारा आणि प्रभू मीच होय. (३५)


अहं आत्मा आंतरः बाह्यः अनावृतः सर्वदेहिनाम् ।
यथा भूतानि भूतेषु बहिरंतः स्वयं तथा ॥ ३६ ॥
पंचभूतात भूतांची सत्ता ती नसते मुळी ।
तसा मी प्राणियां मध्ये आत्मा बाहेर एकची ॥ ३६ ॥

सर्वदेहिनां अहं आत्मा - सर्व शरीराचा आत्मा मी आहे - आंतरः - अंतर्नियामक आहे - बाह्यः - बाहेरून सर्वव्यापक मी आहे - अनावृतः - मला कसलेही आवरन नाही - यथा भूतेषु - ज्याप्रमाणे त्रिभुवनातील सर्व प्रकारच्या पदार्थांच्या - बहिः अन्तः - आत बाहेर - भूतानि स्वयं - पृथ्वीप्रभृति पंचमहाभूते स्वतः असतात - तथा - त्याप्रमाणे. ॥ ३६ ॥
ज्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आतबाहेर पंचमहाभूतेच आहेत, त्याचप्रमाणे मी सर्व प्राण्यांच्या आत द्रष्टारूपाने आणि बाहेर दृश्यरूपाने आहे कारण मी कोणतेही आवरण नसलेला, सर्व प्राण्यांचा आत्मा आहे. (३६)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP