श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
चतुर्दशोऽध्यायः

भक्तेर्महत्त्वं ध्यानयोगवर्णनं च -

भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधिचे वर्णन -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीउद्धव उवाच -
( अनुष्टुप् )
वदंति कृष्ण श्रेयांसि बहूनि ब्रह्मवादिनः ।
तेषां विकल्पप्राधान्यं उत आहो एकमुख्यता ॥ १ ॥
उद्धवजीने विचारिले -
( अनुष्टुप )
श्रीकृष्णा ब्रह्मवादी ते कल्याणा कैक साधने ।
सांगती त्यातले श्रेष्ठ एक साधन सांगणे ॥ १ ॥ ॥

कृष्ण ! - हे कृष्णा ! - ब्रह्मवादिनः - वेदवेदांतांची चर्चा करणारे पंडित - श्रेयांसि - मोक्षाचे साधने - बहूनि वदन्ति - अनेक आहेत असे म्हणतात. - तेषां विकल्पप्राधान्यं - त्यांपैकी कोणतेही साधन घेतले तरी त्याला तत्काळी प्राधान्य असते - उत आहो एकमुख्यता - अथवा त्यांतेल एकच मुख्य म्हणावयाचे ? ॥ १ ॥
उद्धवाने विचारले ! श्रीकृष्णा ! ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती, ध्यान, इत्यादी अनेक साधने सांगितली आहेत हे सर्वच मुख्य आहेत की, यांपैकी कोणते तरी एक मुख्य आहे ? (१)


भवता उदाहृतः स्वामिन् भक्तियोगोऽनपेक्षितः ।
निरस्य सर्वतः सङ्गं येन त्वयि आविशेन्मनः ॥ २ ॥
आत्ताच तुम्हि तो स्वामी भक्तियोग स्वतंत्र नी ।
बोधिला निरपेक्षोही जेणे तन्मयता मिळे ॥ २ ॥ ॥

स्वामिन् - प्रभो - अनपेक्षितः भक्तियोगः - सर्वस्वतंत्र असा, निष्काम भक्तियोग - भवता उदाहृतः - आपण सांगितला आहे - निरस्य सर्वतः संगं - सर्व प्रकारची आसक्ति सर्वथा ज्या भक्तियोगाने तुटते तो - येन मनः - ज्या भक्तियोगाने जीवाचे मन - त्वयि आविशेत् - त्वत्स्वरूपात प्रविष्ट होते. ॥ २ ॥
स्वामी ! आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे, असे सांगितले या भक्तीने सर्व तर्‍हेची आसक्ती नाहीशी होऊन मन आपल्या ठायीच लागून राहाते. (२)


श्रीभगवानुवाच -
कालेन नष्टा प्रलये वाणीयं वेदसंज्ञिता ।
मयाऽऽदौ ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्यां मदात्मकः ॥ ३ ॥
श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
कालाने प्रलयी वेद लुप्त जै जाहले तदा ।
स्वसंकल्पेचि ब्रह्म्याला भागवद्धर्म बोललो ॥ ३ ॥

यस्यां मदात्मकः धर्मः - ज्या वेदवाणीमध्ये मत्स्वरूपी धर्म आहे अशी - आदौ मया ब्रह्मणे प्रोक्ता - सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाला मी सांगितली - इयं वेदसंज्ञिता वाणी - ही वेद नावाची वाणी - कालेन प्रलया नष्टा - कालसामर्थ्यामुळे प्रलयकाल झाला तेव्हा नष्ट झाली. ॥ ३ ॥
श्रीभगवान म्हणाले - प्रलयाच्या वेळी काळाच्या प्रभावाने ही वेदवाणी लुप्त झाली होती नंतर जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा मी ती ब्रह्मदेवांना दिली तिच्यामध्ये माझ्या भागवतधर्माचे निरूपण आहे. (३)


तेन प्रोक्ता स्वपुत्राय मनवे पूर्वजाय सा ।
ततो भृग्वादयोऽगृह्णन् सप्त ब्रह्ममहर्षयः ॥ ४ ॥
त्याने स्वायंभुवो पुत्रा मनुने भृग अंगिरा ।
मरिच पुलहो अत्री पुलस्त्य क्रतु यासही ॥ ४ ॥

पुत्राय पूर्वजाय मनवे - ब्रह्मदेवाने मनु नामक प्रथम पुत्र - तेन च सा प्रोक्ता - त्याला ती वाणी सांगितली - ततः - त्या मनूपासून - भृग्वादयः सप्त - भृगुप्रभृति सात - ब्रह्ममहर्षयः अगृह्णन् - ब्रह्मर्षि शिकले. ॥ ४ ॥
ब्रह्मदेवाने ती आपला ज्येष्ठ पुत्र स्वायंभुव मनू याला सांगितली नंतर त्याच्याकडून भृगू इत्यादी सात ब्राह्मर्षींनीं तिचे ग्रहण केले. (४)


तेभ्यः पितृभ्यः तत्पुत्रा देवदानवगुह्यकाः ।
मनुष्याः सिद्धगंधर्वाः सविद्याधरचारणाः ॥ ५ ॥
किन्देवाः किन्नरा नागा रक्षः किंपुरुषादयः ।
बह्व्यस्तेषां प्रकृतयो रजःसत्त्वतमोभुवः ॥ ६ ॥
देवता दानवो गुह्यक मनुष्य सिद्ध चारण ।
किंदेव किन्नरो नाग किंपुरूष नि राक्षसो ॥ ५ ॥
या सर्वे पूर्वजांचे हे ज्ञान मेळून घेतले ।
सत्त्व रज तमो भिन्न सर्वांच्या भिन्न वासना ॥ ६ ॥

तेभ्यः पितृभ्यः - त्या सप्त पितरांपासून - तत्पुत्राः, देवदानवगुह्यका, - त्यांचे पुत्र, देव, दानव, गुह्यक, - मनुष्याः, सिद्धगंधर्वाः, सविद्याधरचारणाः, - मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, - किन्देवाः, किन्नराः, नागा, रक्षः किंपुरुषादयः - किंदेव, किंनर, नाग, राक्षस, किंपुरुष हे शिकले. - तेषां रजःसत्त्वतमोभुवः - त्यांच्या राजस, सात्त्विक तामस गुणांनुरूप - बह्व्यः प्रकृतयः - अनेक प्रकारच्या प्रकृति झाल्या. ॥ ५-६ ॥
त्या सात महषर्कींडून त्यांचे पुत्र देव, दानव, गुह्यक, मनुष्य, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चारण, किंदेव, किन्नर, नाग, राक्षस, किंपुरूष इत्यादी अनेकजणांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून घेतले यांपैकी काही सात्त्विक, काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते. (५-६)


याभिर्भूतानि भिद्यंते भूतानां मतयस्तथा ।
यथाप्रकृति सर्वेषां चित्रा वाचः स्रवंति हि ॥ ७ ॥
बुद्धि वृत्तिहि त्या भिन्न अनेक भेद ते तसे ।
वेदवाणीस बुद्धीने स्वभावे अर्थ लाविले ॥ ७ ॥

याभिः भूतानि - ज्या प्रकृतिवैचित्र्यांनी चराचर भूते - तथा भूतानां मतयः भिध्यंते - व त्यांच्या त्यांच्या बुद्धि भिन्न केल्या जातात, भिन्न होतात - यथा प्रकृति - जशी प्रकृति असते, स्वभाव असतो, - सर्वेषां - सर्व जीवांच्या - चित्राः वाचः स्रवंतिहि - सर्वांच्या चित्रविचित्र वाणी मुखांतून निघतात. ॥ ७ ॥
या स्वभाववैचित्र्यामुळे देव, असुर, मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या त्या बुद्धीप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे केले गेले. (७)


एवं प्रकृतिवैचित्र्याद् भिद्यंते मतयो नृणाम् ।
पारंपर्येण केषाञ्चित् पाषण्डमतयोऽपरे ॥ ८ ॥
परंपरा अशा कैक मनुष्ये घेतल्या पहा ।
वेदविरुद्ध कोणी ते पाखंडी जाहले तसे ॥ ८ ॥

एवं - याप्रमाणे - प्रकृतिवैचित्र्यात् - स्वभावभेदामुळे - नृणां मतयः भिध्यंते - मनुष्यांच्या प्रकृतीत, शारीरिक, व मानसिक स्वभावात वैशिष्ट्य येते म्हणून बुद्धि भिन्न होतात - केषांचित् पारंपर्येण - काहींच्या बुद्धी, संप्रदाय वैचित्र्यामुळे भिन्न होतात - अपरे पाखंडमतयः - कित्येक पाखंड मताचे होतात. ॥ ८ ॥
अशा रीतीने स्वभाववैचित्र्यामुळे आणि परंपरेमुळे माणसांच्या विचारांत फरक पडतो तर काही माणसे वेदविरोधी मते मांडणारी असतात. (८)


मन्मायामोहितधियः पुरुषाः पुरुषर्षभ ।
श्रेयो वदंति अनेकांतं यथाकर्म यथारुचि ॥ ९ ॥
सर्वांची बुद्धि मायेने मोहीत करुनी तशी ।
कर्म संस्कार रुचिने कल्याण पथ जाहले ॥ ९ ॥

पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठ उद्धवा - मन्मायामोहित पुरुषाः - ज्यांची बुद्धि माझ्या मायेने मूढ झाली आहे असे पुरुष - यथाकर्म - संचितानुरूप जसा स्वभाव प्राप्त झाला असतो त्याप्रमाणे - यथारुचि - किंवा ज्याची जशी आवड असते त्याप्रमाणे - अनेकांतं श्रेयः वदन्ति - श्रेय म्हणजे श्रेष्ठ पुरुषार्थ व त्यांची साधने अनेकत्वाने सांगतात. ॥ ९ ॥
हे पुरूषश्रेष्ठा ! लोकांची बुद्धी माझ्या मायेने अविवेकी बनलेली असते त्यामुळे त्यांना ज्या कर्मात जशी गोडी वाटते त्यानुसार तेच कल्याणाचे साधन आहे, असे ते सांगतात त्यामुळे साधनांत वेगळेपणा येतो. (९)


धर्ममेके यशश्चान्ये कामं सत्यं दमं शमम् ।
अन्ये वदंति स्वार्थं वा ऐश्वर्यं त्यागभोजनम् ॥ १० ॥
धर्म काम यशो सत्य दम नी शमही तसे ।
ऐशवर्य त्याग स्वार्थाला श्रेष्ठ लाभचि सांगती ॥ १० ॥

एके धर्मं - कोणी वेदोक्त धर्म - अन्ये यशः, कामं सत्यं - कोणी कीर्ति, कोणी काम, कोणी सत्य - दमं शमं अन्ये वदन्ति - तर कोणी दम शम म्हणतात - वा स्वार्थं ऐश्वर्यं त्यागभोजनं केचित् - कोणी स्वार्थ, ऐश्वर्य, त्याग वा भोजन - यज्ञतपोदानं, व्रतानि, नियमान्, यमान् - तर कोणी यज्ञ, तप, दान, यम, नियम - ॥ १० ॥
त्यांपैकी मीमांसक कर्माला, साहित्यिक कीर्तीला, कामशास्त्री कामाला, योगशास्त्री सत्य, दम आणि शमाला, राजनीतिज्ञ ऐश्वर्याला, संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात. (१०)


केचिद् यज्ञतपो दानं व्रतानि नियमान् यमान् ।
आद्यंतवंत एवैषां लोकाः कर्मविनिर्मिताः ।
दुःखोदर्काः तमोनिष्ठाः क्षुद्रानंदाः शुचार्पिताः ॥ ११ ॥
कोणी यज्ञ तपा दाना व्रता नी नियमा यमा ।
सांगती पुरुषार्थो हा परी ते नाशवंतची ॥
अज्ञान सर्व ते आहे दोषाने शोकपूर्ण ते ॥ ११ ॥

एषां लोकाः - या संप्रदायप्रवर्तकांनी सांगितलेले लोक - कर्मविनिर्मिताः - कर्मांनी उत्पन्न झालेले - आद्यंतवंत एव - उत्पत्ति व विनाश असणारे जन्ममृत्यु स्वरूपाचे - दुःखोदर्काः - दुःखच हेच फल असणारे - तमोनिष्ठाः - अज्ञानरूप तम हाच ज्यांचा अंत आहे - क्षुद्रानंदाः - जेथील सुख क्षुद्र असते - शुचार्पिताः - शोकमोहांनी ग्रस्त झालेले - ॥ ११ ॥
काहीजण यज्ञ, तप, दान, व्रते, नियम, यम इत्यादींना कल्याणाचे साधन म्हणतात या लोकांना त्या त्या कर्मानुसार त्या त्या लोकांची प्राप्ती होते पण हे लोक उत्पन्न होणारे असल्यामुळे नाशवंत आहेत शिवाय यांचा शेवट दुःखात होतो हे तामसी आहेत यात आनंद नावापुरताच असतो या सर्व कारणांमुळे हे दुःखमयच आहेत. (११)


मय्यर्पितात्मनः सभ्य निरपेक्षस्य सर्वतः ।
मयाऽऽत्मना सुखं यत्तत् कुतः स्याद् विषयात्मनाम् ॥ १२ ॥
निरपेक्ष असा मी तो आत्मारूपात प्रेरितो ।
सर्व ते मजला लाभे न लाभे विषयीं तयां ॥ १२ ॥

सभ्य - सभ्य - सर्वतः निरपेक्षस्य - सर्वथा निष्काम झालेल्याचे - मयि अर्पितात्मनः - ज्याने आपले मन, आत्मा मलाच अर्पण केले आहे अशाला - मया आत्मना - मीच आत्मा असल्यामुळे - यत् सुखं - त्याला जे अपूर्व सुख असते - तत् विषयात्मनां कुतः स्यात् - ते सुख विषयभोग हाच पुरुषार्थ मानणार्‍यास कोठून मिळणार ? ॥ १२ ॥
हे साधो ! ज्याने स्वतःला संपूर्णपणे मला समर्पित केले आहे आणि त्यामुळे ज्याला कोणत्याही विषयाची इच्छा नाही, त्याला आत्मस्वरूप माझ्यामुळे जे सुख मिळते, ते विषयलोभी जीवांना कसे मिळेल ? (१२)


अकिञ्चनस्य दांतस्य शांतस्य समचेतसः ।
मया संतुष्टमनसः सर्वाः सुखमया दिशः ॥ १३ ॥
अकिंचन असे होती विजयी इंद्रिया वरी।
मला पाहोनि संतोषे तया आनंदि विशव हे ॥ १३ ॥

अकिंचनस्य - दरिद्री अशा - दान्तस्य शांतस्य - इंद्रिये व मन वश ठेवणारा अशा - समवेतसः - समबुद्धि अशा - मया संतुष्टमनसः - माझ्या संगतीतच सुखी असणार्‍या मद्‌भक्ताला - सर्वाः दिशः सुखमयाः - दाही दिशांस सर्वत्र सुखच व असते. ॥ १३ ॥
जो अपरिग्रही आहे, इंद्रियांवर ज्याने विजय मिळविला आहे, जो शांत आणि समचित्त आहे, माझ्या ठायी जो संतुष्ट आहे, अशा माझ्या भक्ताला सर्व दिशा आनंदाने भरलेल्या वाटतात. (१३)


( उपेंद्रवज्रा )
न पारमेष्ठ्यं न महेंद्रधिष्ण्यं
     न सार्वभौमं न रसाधिपत्यम् ।
न योगसिद्धीः अपुनर्भवं वा
     मय्यर्पितात्मेच्छति मद् विनान्यत् ॥ १४ ॥
( इंद्रवज्रा )
जो सोपवीती मज भार सारा
     तो सत्यलोका न स्वर्गास इच्छी ।
न सार्वभौ‍मा नि रसातळाही
     न सिद्धि मोक्षा मनि इच्छितो तो ॥ १४ ॥

मयि अर्पितात्मा - माझा अनन्य भक्त - मद्विना अन्यत् - माझ्या खेरीज दुसरे काहीही - न इच्छति - इच्छित नाही - म पारमेष्ठ्यं - न ब्रह्मदेवादि लोक - न महेंद्रधिष्ण्यं, न सार्वभौमं - हा लोक नाही, स्वगलोक नाही - न रसाधिपत्यं, योगसिद्धिः वा पुनर्भवं - चक्रवर्तित्व नाही, पाताळाचे स्वामित्व किंवा योगांच्या अष्टसिद्धि किंवा मोक्षही नाही. ॥ १४ ॥
माझ्या ठिकाणी ज्याने स्वतःला समर्पित केले अशा भक्ताला, माझ्याशिवाय ब्रह्मदेवाचा सत्यलोक, इंद्राचा स्वर्ग, साम्राज्य, रसातळाचे राज्य, योगसिद्धी किंवा मोक्ष यांपैकी काहीही नको असते. (१४)


( अनुष्टुप् )
न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शङ्करः ।
न च सङ्कर्षणो न श्रीः नैवात्मा च यथा भवान् ॥ १५ ॥
( अनुष्टुप )
भक्ताच्या परि ना प्रीय ब्रह्मा शंकर रामही ।
अर्धांगी लक्षुमी तैसा आत्मा माझा न तो प्रिय ॥ १५ ॥

यथा भवान् मे प्रियतमः - माझा भक्त म्हणून ततू जसा मला प्रिय आहेस - तथा न आत्मयोनिः - तसा ब्रह्मदेवही नाही - न शंकरः - शंकरही नाही - नच संकर्षणः - बलरामही नाही - न श्रीः - लक्ष्मीही नाही - न आत्मा एव च - आणि आम्झा प्रत्यक्ष आत्माही नाही. ॥ १५ ॥
हे उद्धवा ! मला तुझ्यासारखे प्रेमी भक्त जितके प्रिय असतात, तितका ब्रह्मदेव, शंकर, बलराम, लक्ष्मी किंबहूना माझा आत्माही मला प्रिय नाही. (१५)


निरपेक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनम् ।
अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यङ्‌‍घ्रिरेणुभिः ॥ १६ ॥
तल्लीन मज जे होती निरपेक्ष असेचि ते ।
न राग व्देषिती कोणा समान दृष्टि ठेविती ॥
पाठीशी मी अशा संतां हिंडोनी धूळ घेतसे ॥ १६ ॥

निरपेक्षं शान्तं - निष्काम, शांत - निर्वैरं, समदर्शनं - द्वेषरहित, समबुद्धि - मुनिं - मुनीच्या पाठीमागे पावलावर पाऊल ठेऊन - अहं नित्यं अनुव्रजामि - मी नित्य मागून जातो - अंघ्रिरेणुभिः पूयेय इति - त्याच्या चरनधूलीने मला पवित्रत्वच प्रात होत असते म्हणून. ॥ १६ ॥
ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, जो शान्त व वैरभावरहित असतो, सर्वांबद्दल समान दृष्टी ठेवतो, त्या महात्म्याच्या चरणांच्या धुळीने माझ्या आत असलेले लोक पवित्र व्हावेत, म्हणून मी नेहमी त्यांच्या मागून जात असतो. (१६)


( इंद्रवंशा )
निष्किञ्चना मयि अनुरक्तचेतसः
     शांता महांतोऽखिलजीववत्सलाः ।
कामैः अनालब्धधियो जुषंति यत्
     नैरपेक्ष्यं न विदुः सुखं मम ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा )
निष्कांचनो नी ममता न देही
     जो रंगला माझिया प्रेम रंगी ।
जो वासनांना शमवोनि शांत
     त्या प्रेमळा हो परमात्म प्राप्ती ॥ १७ ॥

निष्किंचना - कसली उपाधि नसणारे - मयि अनुरक्तचेतसः - माझ्या ठिकाणीच ज्यांची मने रमली आहेत - शांताः महांतः - शांत व मोठ्या मनाचे - अखिलजीववत्सलः - सकल जीवांवर पुत्रसम प्रेम करणारे - कामैः अनालब्धधियः - ज्यांच्या बुद्धींत वासणास प्रवेशच मिळत नाही असे पुरुष - यत् नैरपेक्ष्यं मम सुखं - जे मिष्काम, स्वतंत्र असनारे मत्सुख - जुषन्ति - उपभोगतात - तत् अमुए न विदुः - ते इतरांस समजण्याला सुद्धा अशक्य आहे. ॥ १७ ॥
जे अपरिग्रही असतात, ज्यांचे चित्त माझ्या ठायीच रममाण झालेले असते, जे महापुरूष अतिशय शांत प्रकृतीचे असतात, सर्व जीवांबद्दलच ज्यांना प्रेम वाटते, कामनांमुळे ज्यांची बुद्धी दूषित होत नाही, अशा भक्तांना निरपेक्षपणामुळे माझ्या ज्या परमानंदाचा अनुभव येतो, त्याची इतरांना कल्पना येणार नाही. (१७)


( अनुष्टुप् )
बाध्यमानोऽपि मद्‍भक्तो विषयैः अजितेन्द्रियः ।
प्रायः प्रगल्भया भक्त्या विषयैः न अभिभूयते ॥ १८ ॥
( अनुष्टुप )
जितेंद्रिय न हो भक्त प्रपंची बुडला तरी ।
प्रगल्भ शक्तिने माझ्या विषया जिंकितो पहा ॥ १८ ॥

अजितेंद्रियः मद्‌भक्तः - इंद्रियांवर जय न मिळविलेल्या माझ्या भक्ताला - विषयैः बाध्यमानः अपि - विषयांनी प्रथम प्रथम त्रास दिला तरी - प्रगल्भया भक्त्या - ती त्याची भक्ति दृढ व गंभीर झाली, उत्कर्ष पावली म्हणजे - प्रायः विषयैः - बहुतकरून विषय त्याला - न अभिभूयते - त्रास देत नाहीत. ॥ १८ ॥
इंद्रियांवर विजय मिळवू न शकलेल्या माझ्या भक्ताला विषय स्वतःकडे ओढत असले तरी माझ्या ठिकाणी वाढणार्‍या त्यांच्या भक्तीच्या प्रभावामुळे विषय त्याच्यावर आक्रमण करू शकत नाहीत. (१८)


यथाग्निः सुसमृद्धार्चिः करोति एधांसि भस्मसात् ।
तथा मद्विषया भक्तिः उद्धव-एनांसि कृत्स्नशः ॥ १९ ॥
अग्निच्या भडक्या मध्ये लाकडे खाक होति जै ।
भक्तही पापराशी तै जाळोनी टाकिती तशा ॥ १९ ॥

उद्धव, यथा - हे उद्धवा, ज्याप्रमाणे - सुसमृद्धार्चि अग्निः - चांगल्या प्रचंड ज्वाला उत्पन्न झालेला अग्नि - एधांसि भस्मसात् करोति - सर्व काष्ठे वगैरे दाह्य वस्तु भस्मसात करतो - तथा मद्‌विषया भक्तिः - माझी मात्र भक्तिः - कृत्स्नशः एनांसि - सर्वथा महापातके नाहीशी करते. ॥ १९ ॥
धगधगता अग्नी जसा सर्व जळणाची राख करून टाकतो, त्याचप्रमाणे उद्ववा ! माझी भक्तीसुद्धा पापाच्या सगळ्या राशी जाळून टाकते. (१९)


न साधयति मां योगो न साङ्ख्यं धर्म उद्धव ।
न स्वाध्यायः तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता ॥ २० ॥
योग साधन नी ज्ञाने विज्ञाने तैचि उद्धवा ।
जप पाठ तपी ना ते सामर्थ्य भक्तिचे असे ॥ २० ॥

उर्जिता मम भक्तिः - उत्कर्षाला पावलेली माझी भक्ति - यथा मां साधयति - जशी माझी प्राप्ति करून देते - न योगः, न सांख्यं, धर्मः च - ना योग, न सांख्य किंवा श्रुत्युक्त धर्म, - न स्वाध्यायः, तपः, त्यागः, - किंवा स्वाध्याय वा तप अथवा संन्यास - न मां साधयति - यांपैकी कोणीही माझी प्राप्ति करून देण्याला समर्थ नाही. ॥ २० ॥
हे उद्धवा ! माझ्या अनन्य भक्तीने जसा मी प्राप्त होतो, तसा योग, ज्ञान, धर्माचरण, स्वाध्याय, तप किंवा त्याग यांनी प्राप्त होत नाही. (२०)


भक्त्याहमेकया ग्राह्यः श्रद्धयाऽऽत्मा प्रियः सताम् ।
भक्तिः पुनाति मन्निष्ठा श्वपाकान् अपि संभवात् ॥ २१ ॥
संतांचा प्रीय मी आत्मा भक्तिने बुद्ध होय मी ।
उपाये मिळतो मी या पापीही मुक्त होतसे ॥ २१ ॥

सतां प्रियः आत्मा - सज्जनांस अत्यंत प्रिय व त्यांचा आत्माच असा - अहं एकया श्रद्धया भक्त्या - केवळ एका श्रद्धापूर्ण भक्तीने मात्र - ग्राह्यं - वश केला जातो - मन्निष्ठा भक्तिः - माझी अनन्य भक्ति - श्वपाकान् अपि - चांडाळास सुद्धा - संभवात् पुनाति - नीचकुलजन्मदोष यांपासून मुक्त करते. ॥ २१ ॥
संतांना प्रिय असणारा त्यांचा आत्मा असा मी केवळ श्रद्धाभक्तीनेच प्राप्त होतो जन्माने चांडाळ असलेल्यांनाही माझी भक्ती पवित्र करते. (२१)


धर्मः सत्यदयोपेतो विद्या वा तपसान्विता ।
मद्‍भक्त्यापेतमात्मानं न सम्यक् प्रपुनाति हि ॥ २२ ॥
भक्तिवंचित चित्ताला दया सत्य नि धर्म तो।
तप युक्त अशी विद्या न करी ही पवित्र की ॥ २२ ॥

हि - कारण - सत्यदयोपेतः धर्मः - सत्य, दया यांनी अलंकृत झालेला धर्म - तपसा अन्विता विद्या वा - अथवा तपस्यायुक्त अशी विद्या - मद्‌भक्त्या अपेतं आत्मानं - माझ्या भक्तीने रहित असलेल्या जीवाला - न सम्यक् प्रपुनाति - यथार्थ रीतीने शुद्ध करीत नाही. ॥ २२ ॥
याउलट सत्य आणि दयेने युक्त असा धर्म किंवा तपश्चर्येसह ज्ञान, माझी भक्ती नसेल तर, त्या व्यक्तीला पवित्र करू शकत नाही. (२२)


कथं विना रोमहर्षं द्रवता चेतसा विना ।
विनाऽऽनंदाश्रुकलया शुध्येद् भक्त्या विनाऽऽशयः ॥ २३ ॥
रोमहर्ष न हो तैसे चित्तगद्‍गद त्या विना ।
आनंदे अश्रु ना वाहे तयाचे शुद्ध चित्त कैं ॥ २३ ॥

उद्धव - उद्धवा - रोमहर्षं विना - सर्वांगी रोमांच उभे राहिल्याविना - द्रवता चेतसा विना - सद्‌गदित अंतःकरणविना - आनंदाश्रुकलया विना - आनंदाश्रु गळल्याविना - भक्त्या विना - माझ्या एकनिश्ठ भक्ती शिवाय - आशयः कथं शुद्ध्येत् - अभिमानाने मलीन झालेला देह कसा पवित्र व्हावा ? ॥ २३ ॥
भक्तीने जोपर्यंत शरीर पुलकित होत नाही, चित्त द्रवत नाही, आनंदाश्रू वाहात नाहीत, तोपर्यंत अंतःकरण पूर्ण शुद्ध कसे होईल ? (२३)


( मिश्र )
वाग्-गद्-गदा द्रवते यस्य चित्तं
     रुदत्यभीक्ष्णं हसति क्वचित्-च ।
विलज्ज उद्‌गायति नृत्यते च
     मद्‍भक्तियुक्तो भुवनं पुनाति ॥ २४ ॥
( इंद्रवज्रा )
तो कंठ दाटे स्मरता मला नी
     न अश्रु थांबे क्षण एक तैसे ।
हासे नि गायी त्यजुनीच लाज
     नाचे असा भक्तचि प्रीय माझा ॥ २४ ॥

यस्य वाक् गद्‌गदा - ज्याची वाणी प्रेमाने सद्‌गदित झाली - चित्तं द्रवते - चित्त द्ववित झाले - यः अभीक्ष्णं रुदति - जो पुनः पुनः रडतो - क्वचित् च हसति - कधी हसतो - विलज्ज सन् उद्गायति - निर्लज्ज होऊन गातो - नृत्यति च - व नाचतो - मद्‌भक्तियुक्तः भवनं पुनाति - माझा अनन्य भक्त सर्व जगाला पवित्र करतो. ॥ २४ ॥
ज्याची वाणी भक्तीने सद्‌गदित होते, चित्त द्रवते, जो वियोगाने कधी रडतो तर कधी भेटीने हसतो, लाज सोडून कधी उच्चस्वरात गातो तर कधी नाचतो, असा माझा भक्त सर्व जगाला पवित्र करतो. (२४)


यथाग्निना हेम मलं जहाति
     ध्मातं पुनः स्वं भजते च रूपम् ।
आत्मा च कर्मानुशयं विधूय
     मद्‍भक्तियोगेन भजत्यथो माम् ॥ २५ ॥
जै अग्निमध्ये मळ हेम त्यागी
     तो शुद्ध रूपी श्थित होय तैसा ।
त्या वासनांना त्यजुनीच आत्मा
     भक्ति मधोनी मजला मिळे की ॥ २५ ॥

यथा अग्निना - जसे अग्नीमध्ये घालून - ध्मातं हेम - तापविलेले सुवर्ण - मलं जहाति - आपला मळ टाकून देतो - पुनः च स्वं रूपं भजते - आणि पुनः आपले स्वरूप प्राप्त करून घेते - आत्मा च मद्‌भक्तियोगेन - आत्माही माझ्या भक्तियोगाने - कर्मानुशयं विधूय - कर्माशयातील, चित्तातील मळ धून काढून - अथ मां भजति - नंतर मत्स्वरूपाला प्राप्त होतो. ॥ २५ ॥
सोने ज्याप्रमाणे अग्नीने आपल्यातील मळ टाकून देऊन शुद्ध होते आणि आपल्या खर्‍या रूपाने चमकू लागते, त्याप्रमाणे मनुष्य जेव्हा माझी भक्ती करतो, तेव्हा त्या भक्तियोगाने आपल्या कर्मवासनांचा नाश करून आपले निजस्वरूप असलेल्या मला परमात्म्याला प्राप्त होतो. (२५)


यथा यथाऽऽत्मा परिमृज्यतेऽसौ
     मत्पुण्यगाथा श्रवणाभिधानैः ।
तथा तथा पश्यति वस्तु सूक्ष्मं
     चक्षुर्यथैव अञ्जनसंप्रयुक्तम् ॥ २६ ॥
पवित्र लीला कथनात माझ्या
     चित्ताचिया तो मळहि जळे नी ।
वस्तुस्थितीचे मग ज्ञान होते
     जैं अंजनाने दिसते तळीचे ॥ २६ ॥

मत्पुण्यगाथाश्रवणाभिधानैः - माझ्या पवित्र कथांचे श्रण करून व संकीर्तन करून - यथा यथा - जसा जसा क्रमशः - असौ आत्मा परिमृज्यते - हा जीवात्मा निर्मळ होत जातो - तथा तथा - तशी तशी - सूक्ष्मं पश्यति - सूक्ष्म म्हणजे इंद्रियादिकांस अगोचर असणारी वस्तु परमात्म्याला गोचर होऊ लागते - अंजनसंप्रयुक्तं - जसे अंजन घातले असता - चक्षुः एव यथा - त्या डोळ्याला सूक्ष्म गोष्टी दिसू लागतात. ॥ २६ ॥
उद्धवा ! माझ्या परमपावन लीलाकथांच्या श्रवणकीर्तनाने जसजसा चित्तातील मळ धुतला जातो, तसतसा माझा भक्त, डोळ्यात अंजन घातल्याने जसा डोळा बारीक वस्तूही पाहू शकतो, तसा सूक्ष्म अशा मला पाहू शकतो. (२६)


( अनुष्टुप् )
विषयान् ध्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते ।
मां अनुस्मरतश्चित्तं मय्येव प्रविलीयते ॥ २७ ॥
( अनुष्टुप )
ध्याता त्या विषया नित्य फसते चित्त त्यातची ।
स्मरता मजला त्याची लागते तंद्रि ती पहा ॥ २७ ॥

विषयान ध्यायतः चित्तं - विषयांचे नित्य चिंतन करणारांचे मन - विषयेषु विषज्जते - विषयांमध्येच अत्यासक्त होते - मां अनुस्मरतः चित्तं - माझेच चिंतन रात्रंदिवस करणार्‍या भक्तांचे अंतःकरण - मयि एव प्रविलीयते - मत्स्वरूपांतच लीन होते. ॥ २७ ॥
जो विषयांचे चिंतन करतो, त्याचे चित्त विषयात गुंतते आणि जो नेहमी माझे स्मरण करतो, त्याचे चित्त माझ्या ठायी तल्लीन होऊन जाते. (२७)


तस्मात् असद्-अभिध्यानं यथा स्वप्नमनोरथम् ।
हित्वा मयि समाधत्स्व मनो मद्‍भावभावितम् ॥ २८ ॥
म्हणोनी सर्व ते त्यागा स्वप्न माझ्या विनाच ते ।
म्हणोनी मज चिंतावे एकाग्रे , शुद्ध होइजे ॥ २८ ॥

तस्मात् - म्हणून - यथा स्वप्नमनोरथं - स्वप्नातील मनोरथाप्रमाणे मिथ्या असणारे - असद् अभिध्यानं हित्वा - असत् वस्तूचे चिंतन टाकून देऊन - मद्‌भावभावितं - माझ्यावरील श्रद्धायुक्त भक्तीने शुद्ध झालेले चित्त - मयि समाधत्स्व - माझ्या ठिकाणी सुस्थिर कर. ॥ २८ ॥
नाशवंत विषयांचे चिंतन, स्वप्नाप्रमाणे किंवा मनोरथांप्रमाणे खोटे आहे म्हणून त्यांचे चिंतन करण्याचे सोडून, माझ्या भक्तीत रंगलेले मन माझ्या ठिकाणी लावावे. (२८)


स्त्रीणां स्त्रीसङ्‌‍गिनां सङ्गं त्यक्त्वा दूरत आत्मवान् ।
क्षेमे विविक्त आसीनः चिंतयेत् मां अतंद्रितः ॥ २९ ॥
न तथास्य भवेत्क्लेशो बंधश्चान्यप्रसङ्गतः ।
योषित् सङ्गात् यथा पुंसो यथा तत् सङ्‌गिसङ्गतः ॥ ३० ॥
स्त्रियांनी त्यजिणे स्त्रीया पवित्र स्थान गाठुनी।
एकांती सावधानीने करावे मम चिंतन ॥ २९ ॥
स्त्रैणा स्त्रीसंगि नी तैसे लंपटा पासुनी नरा ।
क्लेश नी बंध जे लाभे न लाभे अन्य त्या गुणे ॥ ३० ॥

स्त्रीणां स्त्रीसंगिनां च - स्त्रियांची व स्त्रियांशी संबंध असणार्‍यांचीही - संगं - संगति - क्षेमे विविक्ते आसीनः - निर्भय अशा एकांत ठिकाणी बसून - मां अतंद्रितः चिंतयेत् - माझे निरलसतेने चिंतन करावे. ॥ २९ ॥ यथा योषिसंगात् - जशी योषितांच्या - हथा तत्संगिसंगतः - आणि त्यांच्याशी संगति करणार्‍यांच्या समागमांत - पुंसः क्लेशः बंधः च - पुरुषाला ताप आणि बंधन उत्पन्न होते - तथा अस्य - त्याप्रमाणे त्याला - अन्यप्रसंगतः न भवेत् - इतर समागमाने होत नाही. ॥ ३० ॥
स्त्रियांच्या किंवा स्त्रीलंपटांच्या संगतीमुळे जितके दुःख किंवा संसारबंधन उत्पन्न होते, तसे आणखी कोणाच्याही संगतीने उत्पन्न होत नाही म्हणून साधकाने इंद्रिये ताब्यात ठेवून स्त्रिया आणि स्त्रीलंपट यांची संगत पूर्णपणे सोडून एकांत, पवित्र ठिकाणी बसून, आळस सोडून माझे चिंतन करावे. (२९-३०)


श्रीउद्धव उवाच -
यथा त्वां अरविंदाक्ष यादृशं वा यदात्मकम् ।
ध्यायेत् मुमुक्षुः एतन्मे ध्यानं त्वं वक्तुमर्हसि ॥ ३१ ॥
उद्धवजीने विचारिले -
कृपया सांगणे आम्हा कंजाक्षा श्यामसुंदरा ।
मुमुक्षू कोणत्या रूपे भावाने ध्यान साधितो ॥ ३१ ॥

अरविंदाक्ष - हे कमलनेत्र कृष्णा - यथा - ज्या पद्धतीने - यादृशं - ज्या स्वरूपाने - यदात्मकं वा - ज्या निजरूपाचे - त्वां मुमुक्षुः धायेत् - मुमुक्षुने तुझे ध्यान करावे - एतत् ध्यानं - ते ध्यान - त्वं मे वक्तुं अर्हसि - मला सांगावयास तूच योग्य आहेस. ॥ ३१ ॥
उद्धवाने विचारले - हे कमलनयना ! मुमुक्षूने आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे, हे आपण मला सांगावे. (३१)


श्रीभगवानुवाच -
सम आसन आसीनः समकायो यथासुखम् ।
हस्तौ उत्सङ्ग आधाय स्वनासाग्रकृतेक्षणः ॥ ३२ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
सम आसन साधावे निवांत बसणे तिथे ।
हात पोटत ठेवावे दृष्टि ती नासिकाग्र हो ॥ ३२ ॥

यथासुखं समे आसने - आपल्याला सुखकर होईल अशा आसनावर - समकायः आसीनः - पाठीचा कणा, शिर छाती एकाच रेषेत येतील अशा रीतीने बसावे - हस्तौ उत्संगे आधाय - हात मांडीवर ठेवावे - स्वनासाप्रकृतेक्षण - आपल्या नाकाच्या टोकावर एकाग्र दृष्टी ठेवावी. ॥ ३२ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - फार उंच किंवा फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाकाच्या अग्रभागी लावावी. (३२)


प्राणस्य शोधयेत् मार्गं पूरकुंभकरेचकैः ।
विपर्ययेणापि शनैः अभ्यसेत् निर्जितेन्द्रियः ॥ ३३ ॥
पूरके कुंभके तैसे रेचके उलटेहि या ।
प्राणयामास साधोनी इंद्रिया जिंकिणे असे ॥ ३३ ॥

निर्जितेंद्रियः - इंद्रियांचे दमन करावे - पूरकुंभकरेचकैः - पूरक, कुंभक व रेचक यांच्या साह्याने - प्राणस्य मार्गं - प्राणाचा मार्ग - शनैः शोधयेत् - हळूहळू शुद्ध करावा. - विपर्ययेणापि - रेचक, कुंभक पूरक या पद्धतीने सुद्धा प्राणशोधन करावे - अभ्यसेत् - हा अभ्यास नित्य करावा. ॥ ३३ ॥
यानंतर पूरक, कुंभक आणि रेचक या क्रमाने प्राणायामाने नाडीशोधन करावे हे एकदा डाव्या नाकपुडीने व एकदा उजव्या नाकपुडीनेही करता येईल हा अभ्यास हळूहळू वाढवावा त्याचबरोबर इंद्रियांवर ताबा ठेवावा. (३३)


हृद्यविच्छिन्न-मोंकारं घण्टानादं विसोर्णवत् ।
प्राणेन-उदीर्य तत्राथ पुनः संवेशयेत् स्वरम् ॥ ३४ ॥
एवं प्रणवसंयुक्तं प्राणमेव समभ्यसेत् ।
दशकृत्वस्त्रिषवणं मासाद्-अर्वाग् जितानिलः ॥ ३५ ॥
हृदयीं पद्म तंतू पै ॐकारा उचलोनि घ्या ।
घंटानादा परी ठेवा स्वरतार तुटो नये ॥ ३४ ॥
तीनवेळा प्रतिदिनी दहावेळा असाचि हा।
प्राणायाम करोनीया मासी प्राणास जिंकणे ॥ ३५ ॥

बिसोर्णवत् - कमलतंतूप्रमाणे - अविच्छिन्नं घंटानादं ओंकारं - अखंड घंटानादाप्रमाणे असणारा ओख्मारध्वनि - हृदि प्राणेन उदीर्य - अंतःकरणामध्ये प्राणाने स्पष्ट उच्चार युक्त करून - अथ पुनः तत्र स्वरं संवेशयन् - मग पुन्हा तेथे स्वराची स्थापना करावी. ॥ ३४ ॥ एवं प्रणसंयुक्तं प्राणं एव - याप्रमाणे ओंकारयुक्त असणारा जो प्राणायाम त्याचा - त्रिषवणं - प्रातःकाळी, मध्यान्ही व सायंकाळी - दशकृत्य समभ्यसत् - दहा दहा वेळा दृढ अभ्यास करावा - मासात् अर्वाक् - एक महिन्याच्या आंतच - जितानलः - अभ्यासकाला प्राणजय साधेल. ॥ ३५ ॥
मूलाधारात उत्पन्न झालेला ॐकार प्राणवायूच्या साह्याने मस्तकापर्यंत न्यावा कमळातील बिसतंतूप्रमाणे तो अखंड असून त्याचा नाद घंटानादाप्रमाणे आहे, असे मनात चिंतन करावे अशा रीतीने दररोज तीन वेळा, प्रत्येक वेळी दहा वेळा, ॐकारासहित प्राणायामाचा अभ्यास करावा असे केल्याने एक महिन्याच्या आतच प्राणवायू वश होतो. (३४-३५)


हृत्पुण्डरीकं अंतःस्थं ऊर्ध्वनालं अधोमुखम् ।
ध्यात्वोर्ध्वमुखमुन्निद्रं अष्टपत्रं सकर्णिकम् ॥ ३६ ॥
कर्णिकायां न्यसेत् सूर्य सोमाग्नीन् उत्तरोत्तरम् ।
वह्निमध्ये स्मरेद्‌ रूपं ममैतद् ध्यानमङ्गलम् ॥ ३७ ॥
पुन्हा स्मरा सवासे ते फुलली अष्टही दळे।
कर्णिका पिवळी तैसी कोवळी त्ती मधोमध ॥ ३६ ॥
क्रमाने रवी चंद्राग्नी यांचा न्यास तयी करा ।
मंगलो रूप हे माझे अग्नीत स्मरणे पुन्हा ॥ ३७ ॥

अंतस्थः - आंत असणारे - ऊर्ध्वनालं अधोमुखं - ज्याचा दांडा वर व मुख खाली आहे असे उलटे असणारे - हृत्पुंडरीकं - हृदयकमल - ऊर्ध्वमुखं उन्निद्रं - ते ऊर्ध्वमुख आहे, पूर्ण विकसित आहे, - सकर्णिकं अष्टपत्रं - कर्णिकेसह आठ पाकळ्यांचे आहे असे हृदयपीठाचे - ध्यात्वा - ध्यान मनात आणून - कर्णिकायां उत्तरोत्तरं - त्या कर्णिकेमध्ये क्रमाने - सूर्यसोमाग्नीन् न्यसेत् - सूर्य, चंद्र व अग्नि यांची स्थापना करावी - मम एतत् रूपं ध्यानमंगलं - हे माझे मंगल ध्यानरूप - वह्निमध्ये स्मरेत् - अग्नीमध्ये आहे असे स्मरण करावे. ॥ ३६-३७ ॥
त्यानंतर शरीराच्या आत वर देठ आणि खाली मुख असलेले हे हृदयकमळ त्याचे मुख वरच्या बाजूला होऊन ते उमलेले आहे, त्याला आठ पाकळ्या आहेत आणि त्याच्या मधोमध पिवळा गड्डा. (कर्णिका) आहे, असे चिंतन करावे. (३६) कर्णिकेवर अनुक्रमे सूर्य, चंद्र आणि अग्नी यांची स्थापना करावी त्यानंतर अग्नीमध्ये माझ्या या रूपाचे स्मरण करावे माझे हे स्वरूप ध्यानासाठी अत्यंत मंगलमय आहे. (३७)


समं प्रशांतं सुमुखं दीर्घचारुचतुर्भुजम् ।
सुचारुसुंदरग्रीवं सुकपोलं शुचिस्मितम् ॥ ३८ ॥
समानकर्ण विन्यस्त स्फुरन् मकरकुण्डलम् ।
हेमांबरं घनश्यामं श्रीवत्स श्रीनिकेतनम् ॥ ३९ ॥
शङ्खचक्रगदापद्म वनमालाविभूषितम् ।
नूपुरैः विलसत्पादं कौस्तुभप्रभया युतम् ॥ ४० ॥
द्युमत् किरीटकटक कटिसूत्राङ्गदायुतम् ।
सर्वाङ्गसुंदरं हृद्यं प्रसाद सुमुखेक्षणम् ।
सुकुमारं अभिध्यायेत् सर्वाङ्गेषु मनो दधत् ॥ ४१ ॥
सुडौल अंग हे माजे रोम रोमात शांति हो ।
प्रसन्न मुखही चांग आजानुबाहु चार या ॥
मान मनोहरी ऐसी गुलाबी स्निग्ध गाल हे ॥ ३८ ॥
मंद‍हास्य समकर्णी मकराकार कुंडले ।
घनःश्याम असा वर्ण झळके किरिटास तो ॥
शंख चक्र गदा पद्म वक्षी श्रीचिन्ह शोभते ॥ ३९ ॥
कौस्तुभो शोभतो कंठी टोप कंकण कर्धनी ।
बाजुबंद असे सारे स्वस्थानी शोभती पहा ॥ ४० ॥
सुंदरो अंग श्रत्यंग दृष्टीने वर्षितो कृपा ।
सुकुमार असे रूप प्रत्यंगी मन लाविणे ॥ ४१ ॥

समं प्रशांतं सुमुखं - प्रमाणबद्ध अवयवयुक्त, शांत सुंदर वदनाचे - दीर्घचारुचतुर्भुजं - गुढघ्यापर्यंत लांब व सुंदर चार हात आहेत - सुचारु, सुंदरग्रीवं - रमणीय, सुंदर मान आहे - सुकपोलं - गाल पुष्ट आहे - शुचिस्मितः - सुंदर स्मितहास्य आहे - ॥ ३८ ॥ समानकर्णविन्यस्त - एकाच आकाराच्या दोन्ही कानांत घातलेली - स्फुरन्मकरकुंडलम् - देदीप्यमान मकरकुंडले आहेत - हेमांबरं - सुंदर पीतांबर नेसलेले - घनश्यामं - मेघतुल्य श्यामल - श्रीवत्सश्रीनिकेतनम् - श्रीवत्स आणि लक्ष्मी यांनी अलंकृत - ॥ ३९ ॥ शंखचक्रगदापद्म - शंख, चक्र, गदा, पद्म ही चार आयुधे चार हातात असणारे - वनमालाविभूषितं - वनमालेने सुशोभित - नूपूरैः विलसत्पादं - झणत्कार करणार्‍या नूपुरांनी चरण भूषित आहेत - कौस्तुभप्रभया युतं - दैदीप्यमान कौस्तुभाच्या प्रभेने युक्त - द्युमत्किरीटकटक - लखलखित किरीट व कडी - कटिसूत्रांगदायुत - कटिदोरा, करगोटा अंगद यांनी युक्त - सर्वांगसुंदर - अंगप्रत्यंगाने सुंदर - हृद्यं - रमणीय - प्रसादसुमुखेक्षणं - ज्याचे मुख व नेत्र प्रसन्न आहेत - ॥ ४०-४१ ॥
माझ्या भगवंतांचे सर्व अवयव सुडौल आहेत मुखकमल अत्यंत शान्त आणि सुंदर आहे चार मनोहर आजानु बाहू आहेत अतिशय सुंदर व मनोहर गळा आहे स्मितहास्याने शोभणारे गाल आहेत दोन्ही समान कानामध्ये मकराकृती कुंडले तळपत आहेत पावसाळ्यातील ढगाप्रमाणे श्यामवर्णाच्या शरीरावर पीतांबर शोभत आहे वक्षःस्थळावर एका बाजूला श्रीवत्साचे चिन्ह आणि दुसर्‍या बाजूला लक्ष्मी विराजमान झाली आहे हातांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले आहे गळ्यात वनमाला शोभून दिसत आहे पायांमध्ये नूपुरे शोभत आहेत गळ्यात कौस्तुभमणी झगमगत आहे आपापल्या स्थानी चमचमणारे किरीट, कडी कमरपट्टा आणि बाजूबंद शोभून दिसत आहेत सर्वांगसुंदर असे हे रूप भक्तांचे हृदय हरण करणारे आहे त्यांची प्रेम पूर्ण नजर कृपाप्रसादाचा वर्षाव करीत आहे सर्व अवयवांवर मन स्थिर करीत माझ्या या सुकुमार रूपाचे ध्यान करावे. (३८-४१)


इंद्रियाणि-इन्द्रियार्थेभ्यो मनसाऽऽकृष्य तन्मनः ।
बुद्ध्या सारथिना धीरः प्रणयेन् मयि सर्वतः ॥ ४२ ॥
चतुरे विषयातून इंद्रिया काढणे तसे ।
बुद्धीच्या त्या सहाय्याने एकेक अंग चिंतिणे ॥ ४२ ॥

सर्वांगेषु - सर्व अंगप्रत्यंगावर - मनः दधत् - ज्ञानदृष्टि ठेऊन - सुकुमारं अभिध्यायेत् - त्या सुकुमार ईशस्वरूपाचे ध्यान करावे - इंद्रियार्थेभ्यः - इंद्रियांच्या विषयांपासून - इंद्रियाणि मनसा आकृष्य - सर्व इंद्रियांना मनाने आकर्षित व निवृत्त करून - तत् मनः - तेच मन - बुद्ध्या सारथिना - बुद्धिरूप सारथ्याच्या साह्याने - धीरः - बुद्धिवंताने - सर्वतः मयि प्रणयेत् - सर्वथा माझ्या ठायीं स्थिर करावे. ॥ ४२ ॥
बुद्धिमान माणसाने मनाने इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून बाजूला करून त्या मनाला बुद्धिरूप सारथ्याच्या साहाय्याने सर्वतोपरी माझ्या ठिकाणी लावावे. (४२)


तत्सर्वव्यापकं चित्तं आकृष्यैकत्र धारयेत् ।
नान्यानि चिंतयेद् भूयः सुस्मितं भावयेत् मुखम् ॥ ४३ ॥
ध्यायिता सर्व अंगाला चित्त ओढोनिया मुखी।
मंद हास्य असे माझे केवलो ध्यानि ठेविणे ॥ ४३ ॥

सर्वव्यापकं तत् चित्तं - सर्व अंगावर स्थिर झालेले ते मन - आकृष्य - ओढून घेऊन - एकत्र धारयेत् - एका ठिकाणी स्थिर करावे - भूयः - फिरून - अन्यानि न चिंतयेत् - दुसर्‍या कशाचाही विचार मनात आणू नये - सुस्मितं मुखं भावयेत् - सुहास्य वदनच आपण पाहात आहोत, अशी भावना करावी. ॥ ४३ ॥
संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला तेथून ओढून आणून एकेका अवयवावर स्थिर करावे आणि शेवटी अन्य अवयवांचे चिंतन न करता केवळ मंद हास्ययुक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी. (४३)


तत्र लब्धपदं चित्तं आकृष्य व्योम्नि धारयेत् ।
तच्च त्यक्त्वा मदारोहो न किञ्चिदपि चिंतयेत् ॥ ४४ ॥
स्थिरावता तिथे चित्त नभात घालणे पुन्हा ।
नभाही त्यागिणे तैसे पुन्हा मद्रूप चिंतिणे ॥ ४४ ॥

तत्र लब्धपदं चित्तं - त्या मुखावर ठेवलेले मुखध्यान करणारे चित्त - आकृष्य - तेथून काढून - व्योम्नि धारयेत् - सर्वकारण जे आकाश तिकडे लावावे - तत् च त्यक्त्वा - ते आकाश टाकून देऊन - मदारोहः - निर्विशेषस्वरूपी जो मी त्या माझ्या ठिकाणी येऊन पोहोचलेल्या भक्तिपूर्ण योग्याने - किंचिदपि न चिंतयेत् - कशाचेही चिंतन करू नये. ॥ ४४ ॥
जेव्हा चित्त मुखारविंदावर स्थिर होईल, तेव्हा ते तेथून काढून घेऊन आकाशात स्थिर करावे त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आरूढ व्हावे आणि माझ्याखेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये. (४४)


एवं समाहितमतिः मां एवात्मानमात्मनि ।
विचष्टे मयि सर्वात्मन् ज्योतिर्ज्योतिषि संयुतम् ॥ ४५ ॥
स्थिरावता असे चित्त ज्योत ज्योतीत जै मिळे ।
तसे तो मज रूपा नी सर्वात्म्या जाणितो पहा ॥ ४५ ॥

एवं समाहितमतिः - याप्रमाणे ज्याची बुद्धि स्वरूपामध्ये स्थित झाली असा भक्त - मां एव आत्मनि - मलाच आपल्या आत्म्यामध्ये - आत्मानं च सर्वात्मन् - आणि आपला आत्मा सर्वात्मक अशा - मयि संयुतं विचष्टे - माझ्यामध्ये संयुक्त झालेला पाहतो - ज्योतिषि संयुतं ज्योतिः इव - ज्योतीशी ज्योती मिळाल्यावर एकरूप होतात त्याप्रमाणे आत्मा व परमात्मा एक होतात. ॥ ४५ ॥
जेव्हा अशा प्रकारे चित्त एकाग्र होते, तेव्हा ज्याप्रमाणे एक ज्योत दुसर्‍या ज्योतीत मिळून एकरूप होते, त्याचप्रमाणे भक्त स्वतःमध्ये मला आणि मज सर्वात्म्यात स्वतःला पाहू लागतो. (४५)


ध्यानेनेत्थं सुतीव्रेण युञ्जतो योगिनो मनः ।
संयास्यत्याशु निर्वाणं द्रव्य ज्ञानक्रियाभ्रमः ॥ ४६ ॥
स्थिरचित्ते रुपा माझ्या तीव्र ध्यानात योगि जो ।
चिंतितो ,भ्रम तो त्याचा नष्टोनी मुक्त होतसे ॥ ४६ ॥

इत्थं - अशा प्रकारे - सुतीव्रेण ध्यानेन - अत्यंत अव्यंग व नैष्ठिक ध्यानाच्या साह्याने - मनः युंजतः योगिनः - मन युक्त करणार्‍या योग्याचे - आशु - लवकरच - द्रव्यज्ञानक्रियाभ्रमः - पदार्थ, ज्ञान व कर्म यासंबंधी भ्रम असतो तो - निर्वाणं संयास्यति - निखालस शांत होतो. ॥ ४६ ॥
अशा प्रकारे जो योगी अत्यंत तीव्र ध्यानाच्याद्वारे माझ्यामध्येच आपले चित्त एकाग्र करतो, त्याचा द्रव्य, ज्ञान, क्रियांविषयीचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होतो आणि त्याला सगळीकडे परमात्म्याचेच स्वरूप दिसू लागते त्यामुळे त्याला तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. (४६)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
अध्याय चौदावा समाप्त

GO TOP