|
श्रीमद् भागवत पुराण
आत्मनः संसारबंधो देहाध्यासादस्तीति बोधनं इहलौकिक व पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरूपण - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् ) मयोदितेष्ववहितः स्वधर्मेषु मदाश्रयः । वर्णाश्रमकुलाचारं अकामात्मा समाचरेत् ॥ १ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले - ( अनुष्टुप् ) साधके शरणी यावे सावधे धर्म माळिणे । निष्काम आश्रमो वर्ण कुळाचारास सेविणे ॥ १ ॥
मया उदितेषु स्वधर्मेषु अवहित: - मी जे धर्माचे उपदेश अनेक वेळा केले आहेत, त्यांचे दक्षतेने सार्थ अनुसंधान ठेवणारा असून - मदाश्रय: - माझाच आश्रय करणारा - अकामात्मा - कोणतीही वासना अंत:करणात न ठेवता - वर्णाश्रमकुलाचारं - वर्णाश्रमानुरूप कुलपरंपरेने आपेल्या संप्रदायाचा आचार - समाचरेत् - चालवावा ॥१०-१॥
श्रीकृष्ण म्हणातात साधकाने सर्व प्रकारे मला शरण येऊन मी सांगितलेल्या आपल्या धर्मांचे सावधपणे पालन करावे निष्काम भावाने आपला वर्ण, आश्रम आणि कूळ यांचेही आचार पाळावेत. (१)
अन्वीक्षेत विशुद्धात्मा देहिनां विषयात्मनाम् ।
गुणेषु तत्त्वध्यानेन सर्वारंभ विपर्ययम् ॥ २ ॥
निष्काम्यां धर्म पाळावा तेणे शुद्धचि चित्त हे । विषया विषयी सत्य मानिता दुःखची मिळे ॥ २ ॥
गुणेषु तत्वध्यानेन - गुण म्हणजे इंद्रियांचे विषय त्यांचा उपभोग हाच खरा पुरुषार्थ होय असे भलतेच चिंतन केल्यामुळे - विषयात्मनां देहिनां - विषयलोलूप शरीरी जीवांचे - सर्वारम्भविपर्ययं - सर्व उद्योगांचे फल विपरीतच होते ते - विशुद्धात्मा (सन्) अति निर्मल चित्त ज्याचे असा होत्साता अन्वीक्षेत - काळजीपूर्वक लक्ष देऊन पहावे ॥१०-२॥
स्वधर्माचरणाने ज्याचे चित्त शुद्ध झाले आहे, त्याने विषयांमध्ये आसक्त झालेले लोक विषयांना सत्य मानून सुखासाठी जी कर्मे करतात, त्या कर्मांचा परिणाम दुःखदायक होतो, ही गोष्ट नीट ध्यानात घ्यावी. (२)
सुप्तस्य विषयालोको ध्यायतो वा मनोरथः ।
नानात्मकत्वाद् विफलः तथा भेदात्मधीर्गुणैः ॥ ३ ॥
स्वप्नात भोगिता वस्तु कल्पना सर्व व्यर्थ त्या । भेद बुद्धि तशी व्यर्थ द्वंद्व सर्वचि व्यर्थ ते ॥ ३ ॥
सुप्तस्य विषयालोक: - निजलेल्या जीवाला स्वप्नामध्ये जे विषयांचे दर्शन होते ते - वा - अथवा - ध्यायत: मनोरथ: - विषयांचे चिंतन करणार्यांचे मनोराज्य - नानात्मकत्वात् - परस्पर विरोधी अशा अनेक उगमांपासून उत्पन्न झाल्यामुळे - विफल: - शून्यफलक, व्यर्थ होत असते - तथा - त्याचप्रमाणे - गुणै: - विषय घेणार्या नेत्रकर्णादि इंद्रियांमुळे - भेदात्मधी: - भेद हाच आहे आत्मा ज्या बुद्धीचा ती अर्थशून्य होते ॥१०-३॥
जसे झोपलेला माणूस स्वप्नामध्ये अनेक विषय पाहातो किंवा जागेपणी मनाने ज्या विषयांचे चिंतन करतो, ते सर्व इंद्रियांनी दिसणारे व अनेक असल्यामुळे खोटेच आहेत, हे समजते, तसेच इंद्रियांच्याद्वारे बाहेरील विषयांत जाणवणारी भेदबुद्धीसुद्धा खोटीच आहे. (३)
निवृत्तं कर्म सेवेत प्रवृत्तं मत्परस्त्यजेत् ।
जिज्ञासायां सम्प्रवृत्तो नाद्रियेत् कर्मचोदनाम् ॥ ४ ॥
कर्म निष्काम भजके करो, सकाम ते त्यजो । ज्ञान जिज्ञासु त्यांना तो कर्म विधि न आवडो ॥ ४ ॥
मत्पर: - मोक्षासाठी चित्त शुद्ध करणार्या साधक आणि मद्भक्तियुक्त जीवाने - निवृत्तं कर्म सेवेत - ज्याला काहीही फल सांगितले नाही असे कर्म निरभिमानपणे करावे - प्रवृत्तं त्यजेत् - सर्व सकाम कर्म टाकून द्यावे - जिज्ञासायां सम्प्रवृत्त: - आत्मस्वरूपाचे वास्तविक ज्ञान संपादण्याचा तीक्ष्ण हव्यास मुमुक्षूने - कर्मचोदनां - श्रुत्युक्त प्रेरणाही - न आद्रियेत् - आदर करू नये ॥१०-४॥
ईश्वरपरायण मनुष्याने नित्यनैमित्तिक कर्मांचेच आचरण करावे सकाम कर्मे कधीही करू नयेत जेव्हा तो आत्मज्ञानासाठी प्रयत्नशील होईल, तेव्हा तर नित्य कर्माचीही फिकीर करू नये. (४)
यमानभीक्ष्णं सेवेत नियमान् मत्परः क्वचित् ।
मदभिज्ञं गुरुं शान्तं उपासीत मदात्मकम् ॥ ५ ॥ अमानि अमत्सरो दक्षो निर्ममो दृढसौहृदः । असत्वरो अर्थजिज्ञासुः अनसूयुः अमोघवाक् ॥ ६ ॥ जायापत्यगृहक्षेत्र स्वजन द्रविणादिषु । उदासीनः समं पश्यन् सर्वेषु अर्थमिवात्मनः ॥ ७ ॥
अहिंसादि यमो व्हावे नियमी आत्मज्ञान हो । मजला जाणता ऐसा गुरु शांतचि सेविणे ॥ ५ ॥ न व्हावा गर्व नी द्रोह दक्ष हो नच आळसी । श्रद्धेने सेविण्या पाय ममत्व नच ठेविणे । सावधाने करो कर्म परमार्थचि इच्छिणे । गुण दोष न काढावे व्यर्थ ते बोलणे नको ॥ ६ ॥ जिज्ञासूंचे धनो आत्मा स्त्री-पुत्रे बघणे तया । ममत्व नच ठेवावे उदास नित्य राहणे ॥ ७ ॥
मत्पर: - माझ्या भक्ताने - यमान् - अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादि जे यम त्यांचे सादर आचरण - अभीक्ष्णं सेवेत - पुन: पुन: करावे - क्वचित नियमान् - नियमांचेही यथाशक्ति पालन करावे - मदभिज्ञं शान्तं मदात्मकं गुरुं उपासीत - माझे म्हणजे आत्म्याचे स्वरूप जाणणारा, उपशम प्राप्त झाल्यामुळे शांत वृत्तीचा जो गुरु, तो माझे म्हणजे आत्मारामाचे स्वरूप आहे असे समजून त्याची सेवारूप उपासना करावी ॥१०-५॥
अमानी - मानापमानशून्य - अमत्सर: - निर्मत्सरी - दक्ष: - दक्ष - निर्मम: - ममत्वशून्य - दृढसौहृद: - दृढस्नेही - असत्वर: - धांदल्या नव्हे - अर्थजिज्ञासु: अनसूयु: अमोघवाक्- तत्व जाणू इच्छिणारा, असूयारहित, व्यर्थ बडबड न करणारा - जायापत्यगृहक्षेत्रस्वजनद्रविणादिषु उदासीन: - भार्या, संतति, घरदार, शेतीवाडी, आप्तइष्ट, धन इत्यादि सर्वांसंबंधाने उदासीन - आत्मन: अर्थं सर्वेषु समं इव पश्यन् - सर्वांमध्येच आत्मा पूर्ण आहे अशी सर्वत्र समदृष्टी ठेवणारा असा हा शिष्य असावा ॥१०-६, ७॥
माझ्या भक्ताने अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या यमांचे पूर्णपणे पालन करावे शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान या नियमांचे आत्मज्ञानाला अडथळा येत नसेल तर यथाशक्ति पालन करावे मला जाणणार्या शांतस्वरूप गुरूंजवळ जाऊन त्यांना माझेच स्वरूप समजून त्यांची सेवा करावी कसलाही अभिमान धरू नये कोणाचाही मत्सर करू नये नेहमी सावध असावे 'माझे' पणाचा भाव सोडावा गुरू आणि माझ्याबद्दल निःसीम प्रेम ठेवावे तत्त्व समजून घेण्याची जिज्ञासा असणार्याने कोणत्याही प्रकारची घाई करू नये कोणाबद्दलही दोषदृष्टी ठेवू नये निरर्थक आणि असत्य भाषण यांपासून दूर राहावे. पत्नी, पुत्र, घर, जमीन, आप्तेष्ट, धन इत्यादी सर्वांमध्ये एकच आत्मा असल्यामुळे सर्वांची सुखदुःखे स्वतःसारखीच आहेत, असा सगळीकडे समभाव ठेवून तटस्थ राहावे. (५-७)
विलक्षणः स्थूलसूक्ष्माद् देहात् आत्मेक्षिता स्वदृक् ।
यथाग्निर्दारुणो दाह्याद् दाहकोऽन्यः प्रकाशकः ॥ ८ ॥
उद्धवा चुलिचा अग्नि-प्रकाशज्योत भिन्न ती । स्थूळ सूक्ष्म द्वयो देह आत्मा भिन्न प्रकाशक ॥ अनित्य जड हा देह आत्मा चेतन नित्य तो । देहाहून असा आत्मा विलक्षण महानची ॥ ८ ॥
स्थूलसूक्ष्मात् देहात् आत्मा विलक्षण: - स्थूल म्हणजे अदृश्य असणारे हे दृश्य शरीर आणि सूक्ष्म म्हणजे अदृश्य असणारे लिंगशरीर या उभय शरीरांहून आत्मा विलक्षण आहे - ईक्षिता - द्रष्टा - स्वदृक् - स्वयंप्रकाश आहे - यथा - जसा - दाह्यात् दारुण: - दहन होण्याला पात्र अशा लाकडांकडून - दाहक: प्रकाशक: अग्नि: अन्य: - जाळणारा आणि प्रकाश देणारा अग्नि निराळा असतो ॥१०-८॥
आत्मा सयंप्रकाशी, सर्वाचा साक्षी आणि स्थूल व सूक्ष्म या दोन्ही देहांपासून तो पूर्णपणे वेगळा आहे ज्याप्रमाणे जळणार्या लाकडापासून जाळणारा व प्रकाश देणारा अग्नी वेगळाच असतो. (८)
निरोधोत्पत्त्यणुबृहन् नानात्वं तत्कृतान् गुणान् ।
अन्तः प्रविष्ट आधत्त एवं देहगुणान् परः ॥ ९ ॥
जळती लाकडे कैक अग्नि ना वाकडा तसे । आत्म्याला गुण ना होती देहात असती जसे ॥ ९ ॥
अन्त: प्रविष्ट: (अग्नि:) तत्कृतान् गुणान् - लाकडाच्या आत शिरून रहाणारा अग्नि आपणच उत्पादिलेले गुण - निरोधोत्पत्त्यणुबृहन्नानात्वं आधत्ते - लाकडाचे नाश, उत्पत्ति, त्यांचा लहानपणा, मोठेपणा, त्यांचे नानात्व इत्यादि गुण घेतल्यासारखे करतो - एवं - याचप्रमाणे - पर: - परमात्मा देहगुणान् आधत्ते - देहाचे गुण अंगीकृत करतो ॥१०-९॥
जसा लाकडाशी संबंधित असून त्याहून वेगळा असलेला अग्नी लाकडाच्या आकारानुसार लहानमोठा, पेटणाराविझणारा असा लाकडाचे गुण स्वतः घेताना दिसतो, त्याचप्रमाणे आत्मासुद्धा देहात असल्यामुळे वेगळा असूनही देहाचे गुण धारण करतो. (९)
योऽसौ गुणैर्विरचितो देहोऽयं पुरुषस्य हि ।
संसारः तत् निबन्धोऽयं पुंसो विद्याद् चिदात्मनः ॥ १० ॥
मायेने निर्मिला देह आत्म्यां आरोप होतसे । जन्मे मरे तसा भास ज्ञानाने मूळ ते तुटे ॥ १० ॥
हि - कारण पहा की - य: असौ देह: (स:) अयं - तो जो देह आहे तो हा - पुरुषस्य गुणै: विरचित: - पुरुषाच्या अथवा पुरुषोत्तमाच्या मायागुणांनी तयार केला आहे - तन्निबन्ध: अयं पुंस: संसार: - त्या देहाच्या दृढ संबंधामुळे हा दृश्य प्रपंच पुरुषाच्या मागे लागला आहे - आत्मन: विद्याछित् - आत्म्याच्या विद्येचा नाश करणारा होय ॥१०-१०॥
हे मनुष्याचे शरीर त्रिगुणांचेच बनलेले आहे या गुणांमध्ये 'मीमाझे' पणा असल्यामुळे माणसाच्या मागे संसार लागला आहे त्याचा नाश आत्मज्ञानानेच होतो. (१०)
तस्मात् जिज्ञासयात्मानं आत्मस्थं केवलं परम् ।
संगम्य निरसेत् एतद् वस्तुबुद्धिं यथाक्रमम् ॥ ११ ॥
म्हणोनी स्वरुपा ध्यावे अद्वैत स्थित जे हृदीं । ज्ञानाने संपती देह क्रमाने शून्य होइजे ॥ ११ ॥
तस्मात् - अशी ही वस्तुस्थिती आहे म्हणून - आत्मस्थं आत्मानं - शरीरात प्रवेशून नियामकत्वाने रहाणारा परमात्मा - केवलं परं - केवल म्हणजे शुद्ध व पर म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे असे - जिज्ञासया सङ्गम्य - आपल्या ज्ञानेच्छेच्या दृढ तपश्चर्येने तत्वत: जाणून - एतद्वस्तुबुद्धिं - ह्या दृश्य जगातच काय ते सत्य आहे ही अयथार्थ बुद्धी - यथाक्रमं निरसेत् - क्रमाक्रमाने नाहीशी करावी ॥१०-११॥
म्हणूण विवेकाने देहामध्ये असणार्या केवलस्वरूप परमात्म्याला नीट जाणून, स्थूलसूक्ष्म देहांविषयीची सत्यबुद्धी सोडून द्यावी. (११)
आचार्यो अरणिः आद्यः स्यात् अन्तेवास्युत्तरारणिः ।
तत्सन्धानं प्रवचनं विद्यासन्धिः सुखावहः ॥ १२ ॥
मेळाया ज्ञान अग्नी तो अरणी गुरु शिष्य ते । मध्यकाष्ठ उपदेश सुखदो अग्नि तो मिळे ॥ १२ ॥
आचार्य: आद्य: अरणि: स्यात् - गुरुजी म्हणजे आधार देणारे खालचे आधारकाष्ठ होय - अन्तेवासी उत्तरारणि: - अंतेवासी म्हणजे शिष्य, हा आश्रय घेणारे वरचे लाकुड होय - प्रवचनं - गुरुजींचे प्रवचन - तत्सन्धानं - या दोन अरणींचा म्हणजे काष्ठांचा संगम करविणारे संधान होय - विद्या सुखावह: सन्धि: - या प्रवचनामुळे शिष्याच्या अंत:करणात उत्पन्न झालेली विद्या हा संधि म्हणजे संधीतून उत्पन्न झालेले सुखकारक कार्य होय ॥१०-१२॥
(यज्ञासाठी अग्नी उंबराच्या लाकडांपासून घुसळून काढतात त्यात खाली लाकूड असते त्याला 'अधरअरणी' म्हणतात वरच्याला 'उत्तरअरणी' म्हणतात आणि मधल्या उभ्या रवीसारख्या लाकडाला 'मंथनकाष्ठ' म्हणतात हे घुसळले असता अग्नी उत्पन्न होतो येथे हे रूपक केले आहे) ज्ञानरूप अग्नी उत्पन्न होणार्या क्रियेत आचार्य खालचे लाकूड आहेत, आणि शिष्य वरचे आचार्यांचे प्रवचन हे मंथनकाष्ठ होय त्यापसून आत्मज्ञानरूपी अग्नी निर्माण होतो तो परमानंद देणारा आहे. (१२)
( उपेंद्रवज्रा )
वैशारदी सातिविशुद्धबुद्धिः धुनोति मायां गुणसंप्रसूताम् । गुणांश्च सन्दह्य यदात्ममेतत् स्वयं च शाम्यति असमिद् यथाग्निः ॥ १३ ॥
( इंद्रवज्रा ) विशारदो घेइ विशुद्ध ज्ञान नी जाळि माया विषयी गुणांची । राही तदा शेषचि एक आत्मा ज्ञानाग्नि ही तो मग शांत होई ॥ १३ ॥
सा वैशारदी अतिविशुद्धबुद्धि: - ती सद्गुरुपासून सच्छिष्याला प्राप्त झालेली अति निर्मळ व अति स्वच्छ बुद्धि - गुणसम्प्रसूतां मायां धुनोति - इंद्रियादिद्वारांनी निर्माण झालेली जी अविद्या तिला धुडकावून देते - गुणान् यत् आत्म एतत् च सन्दह्य - विषय, इंद्रिये हे गुण आणि त्या गुणांमध्ये उत्पन्न झालेले हे विश्व या उभयतांस स्वतेजाने जाळून टाकून - स्वयं च शाम्यति - आपण स्वत:ही शांत होतो ॥१०-१३॥
बुद्धीमान शिष्यांची ती अत्यंत शुद्ध झालेली बुद्धी गुणांपासून उत्पन्न झालेल्या विषयरूप मायेचे भस्म करून टाकते जेव्हा जग उत्पन्न करणारे गुण भस्म होतात, तेव्हा इंधनाला जाळून स्वतः शांत होणार्या अग्नीप्रमाणे ती बुद्धीसुद्धा नाहीशी होते. (१३)
( अनुष्टुप् )
अथैषां कर्मकर्तॄणां भोक्तॄणां सुखदुःखयोः । नानात्वमथ नित्यत्वं लोककालागमात्मनाम् ॥ १४ ॥ मन्यसे सर्वभावानां संस्था ह्यौत्पत्तिकी यथा । तत्तदाकृतिभेदेन जायते भिद्यते च धीः ॥ १५ ॥ एवमप्यङ्ग सर्वेषां देहिनां देहयोगतः । कालावयवतः सन्ति भावा जन्मादयोऽसकृत् ॥ १६ ॥
( अनुष्टुप् ) कदाचित् कर्मकर्ता तू मानिता प्रिय उद्धवा । जीवसृष्टी तसे काल वेद आत्माहि नित्य हे ॥ १४ ॥ घट पटासि आकाशा अंदाजे जाणिसी तयां । अनर्थ समजी सारा मुक्ती ना मिळते कधी । काळाला मानिता सत्य जन्म मृत्यूहि सत्य हो ॥ १५ ॥ कर्म कर्ता नि भोक्ता तो परतंत्रचि होतसे । स्वतंत्र असता त्याला दुःख का भोगणे मिळे ॥ १६ ॥
अथ एषां कर्मकर्तृणां - आता हे कर्मकर्ते - सुखदु:खयो: भोक्तृणां नानात्वं - व सुखदु:खाचे उपभोक्ते अनेक असलेच पाहिजेत - अथ लोककालागमात्मानां नित्यत्वं - तसेच हे विश्व अनंत काल व वेद आणि जीव या सर्व वस्तू नित्य व स्वतंत्र असे - मन्यसे - तू म्हणशील - सर्वभावानां संस्था हि औत्पत्तिकी यथा - तसेच या विश्वात दृगोचर होणार्या सर्व पदार्थांची स्थिती प्रवाहरूपाने नित्य आणि यथार्थ - आभास नव्हे - असाही म्हणशील आणि - तत्तदाकृतिभेदेन धी: जायते भिद्यते च - त्या त्या पदार्थाच्या आकारभेदामुळेच बुद्धि उत्पन्न होऊन भिन्न होते. म्हणून आत्मबुद्धि अनित्य व अनेकत्वात्मक असली पाहिजे असे म्हणशील, हा पूर्वपक्ष करशील, तर उत्तर असे आहे ॥१०-१४, १५॥
एवं अपि - हे तुझे म्हणणे खरे आहे असे घटकाभर समजले तरी - अङ्ग - हे उद्धवा - असकृत् देहयोगत: कालावयवत: - वारंवार कालाचे अवयव जे संवत्सरादी त्यामुळेच - सर्वेषं देहिनां जन्मादय: भावा: सन्ति - जे जे म्हणून शरीरवंत आहेत, त्या सर्वांस अनेक योनिस्वरूपांचा व अनेक जन्मादि अवस्थांचा अनुभव घ्यावा लागतो ॥१०-१६॥
जर तुला असे वाटते की, कर्म करणारे व त्या कर्मांची सुखदुःखादी फळे भोगणारे जीव अनेक आहेत, तसेच कर्मांचे फलस्वरूप लोक, कर्मांच्या उपभोगाची वेळ, ती कर्मे सांगणारी शास्त्रे, कर्मांपासून मिळणारे शरीर, हे सर्व नित्य आहे, त्याचप्रमाणे सर्व पदार्थ प्रवाहरूपाने नित्य असून सत्य आहे, व त्या त्या आकारानुसार ज्ञान उत्पन्न होऊन नष्ट होते, तर हे उद्धवा ! सर्वच मनुष्यांना देह व काळाचे विभाग यांच्यामुळे प्राप्त होणार्या जन्मादिक अवस्था नित्य मानाव्या लागतील व त्यांना मोक्ष कधीच मिळणार नाही. (१४-१६)
तत्रापि कर्मणां कर्तुः अस्वातन्त्र्यं च लक्ष्यते ।
भोक्तुश्च दुःखसुखयोः कोन्वर्थो विवशं भजेत् ॥ १७ ॥
तेणे जीवास मुक्ती ती कधीही मिळु ना शके । परतंत्र असा जीव परमार्थ न तो घडे । स्वार्थ नी परमार्थाला राही वंचित सर्वदा ॥ १७ ॥
अत्र अपि - येथे कर्म करण्यात सुद्धा - कर्मणां कर्तु: - कर्म करणारे जीव - अस्वातन्त्र्यं च - अस्वातंत्र्य म्हणजे परतंत्र आहेत आणि - दु:खसुखयो: भोक्तु: (अस्वातन्त्र्यं) च लक्ष्यते - सुखदु:ख भोगणारेही परतंत्र आहेत असे स्पष्ट दिसते - विवशं - परतंत्र जो आहे त्याला - क: नु अर्थ: भजेत् - कोणता सुखात्मक अर्थ प्राप्त होईल ? ॥१०-१७॥
शिवाय या जगात कर्म करणारा व त्यांची सुखदुःखे भोगणारा मनुष्यप्राणी संपूर्णपणे परतंत्र आहे अशा पराधीन प्राण्याला कोणता विषय सुख देऊ शकेल ? (१७)
न देहिनां सुखं किञ्चिद् विद्यते विदुषामपि ।
तथा च दुःखं मूढानां वृथाहंकरणं परम् ॥ १८ ॥ यदि प्राप्तिं विघातं च जानंति सुखदुःखयोः । तेऽप्यद्धा न विदुर्योगं मृत्युर्न प्रभवेद् यथा ॥ १९ ॥
विद्वाना मिळते दुःख मूर्खाला नच ते कधी । बुद्धिने सुख मी घेतो वदता गर्व व्यर्थ तो ॥ १८ ॥ जर ते मानिले सत्य दुःखनाशासि जाणिती । मग ते मानणे त्यांना मृत्यु तो नच येई की ॥ १९ ॥
विदुषां अपि देहिनां किञ्चित् सुखं न विद्यते - जे मोठे जाडे विद्वान आहेत, कार्यकारणभाव ज्यांना समजतात, त्यांना सुद्धा इवलेसेही शुद्ध सुख प्राप्त होत नाही - तथा च - आणि त्याच प्रमाणे - मूढानां दु:खं - महामूर्खासही सारे दु:खच दु:ख मिळत नाही - अहंकरणं परं वृथा - मी ज्ञानी स्वतंत्र कर्ता आहे हा अभिमान अर्थशून्य आहे ॥१०-१८॥
यदि सुखदु:खयो: प्राप्तिं विघातं च जानन्ति - जरी कित्येकांस सुखाची प्राप्ती होणार व दु:खाचा नाश होणार असे कार्यकारणांच्या विवेचनाने कळत असले - ते अपि - त्यांना सुद्धा - यथा मृत्यु: न प्रभवेत् - मृत्युसत्ता कशी चुकवता येईल - अद्धा योगं न विदु: - त्याचे साधन कोणते या संबंधाने निश्चित ज्ञान नसतेच ना ? ॥१०-१९॥
या जगात असे दिसते की, उत्तम कर्म करू जाणणार्यांनाही सुख मिळत नाही आणि कर्म न जाणणार्या मूर्खांनाही दुःख भोगावे लागत नाही अशा स्थितीत कर्मामुळे सुख मिळवण्याचा अहंकार व्यर्थ आहे जरी सुखदुःखांची प्राप्ती आणि नाश कसा होतो, हे एखाद्याने जाणले, तरीसुद्धा मृत्यू केव्हा येईल व तो कसा टाळावा, हे तर खात्रीने कोणालाही माहीत नाही. (१८-१९)
कोऽन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके ।
आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः ॥ २० ॥
शिरासी मृत्यु तो येता सुख ते काय देतसे । फाशीला निघता प्राणी स्त्री चंदन तोषि कां ? ॥ २० ॥
मृत्यु: अन्तिके - साक्षात मृत्यु जवळ आला असता आपण खास मरणार हे कळले असता - एनं - ह्या जीवाला - क: नु अर्थ: काम: वा सुखयति - कोणताही अर्थ म्हणजे पदार्थ प्राप्त झाला असता अथवा कोणताही मनोरथ पूर्ण होणार अशी आशा असता सुख होईल काय ? नाही - आघातं नीयमानस्य वध्यस्य इव - वधस्थानाकडे नेत असलेल्या वध्याला म्हणजे फाशी जाणार्याला जसा - न तुष्टिद: - कोणताही पदार्थ किंवा मनोरथ आनंद देत नाही ॥१०-२०॥
वधस्थानाकडे नेल्या जाणार्या माणसाला ज्याप्रमाणे कोणतीही भोगसामग्री संतुष्ट करू शकत नाही, त्याचप्रमाणे मृत्यू जवळ असणार्या माणसाला कोणता पदार्थ किंवा कामना सुखी करू शकेल ? (२०)
श्रुतं च दृष्टवद् दुष्टं स्पर्धासूयात्ययव्ययैः ।
बह्वन्तरायकामत्वात् कृषिवच्चापि निष्फलम् ॥ २१ ॥
इह नी परलोकीचे दोषयु्क्तचि ते सुख । आसुया राहि थोरांची नष्टते दिन एक ते ॥ २१ ॥
श्रुतं च - श्रुतीने सांगितलेले स्वर्गसुखही - दृष्टवत् - येथील प्रत्यक्ष दु:खाप्रमाणेच - स्पर्धासूयात्ययव्ययै: - स्पर्धा, असूया नष्ट होण्याची अथवा कमी होण्याची भीती यांनी ग्रस्त झाल्यामुळे दूषित असते - बह्वन्तरायकामत्वात् - त्या स्वर्गसुखाच्या प्राप्तीमध्येही अनेक विघ्ने येत असतात, म्हणून ते सुख दूषित असते - कृषिवत् च अपि - शेतीच्या कामातही अनेक अडचणी येतात हे आपण पहातोच. कृषिफलासारखेच स्वर्गसुखही - निष्फलं - व्यर्थ होय ॥१०-२१॥
या लोकाप्रमाणेच परलोकसुद्धा सदोषच आहे तेथे सुद्धा स्पर्धा, असूया, पुण्य क्षीण होणे आणि नाश पावणे, हे सर्व आहेच जशी पुष्कळ कष्टांनी केलेली शेती अतिवृष्टी, अनावृष्टी, यांसारख्या संकटांनी नष्ट होते, त्याचप्रमाणे परलोकासाठी केलेल्या प्रयत्नांना विघ्ने येतात व ते प्रयत्नही विफल होतात. (२१)
अन्तरायैः अविहितो यदि धर्मः स्वनुष्ठितः ।
तेनापि निर्जितं स्थानं यथा गच्छति तच्छृणु ॥ २२ ॥
निर्विघ्न जाहला यज्ञ तर तो स्वर्ग लाभतो । तयाच्या प्राप्तिचे सारे सांगतो ऐक हे असे ॥ २२ ॥
अन्तरायै: विहित: - कोणतेही विघ्न न आल्यामुळे - यदि धर्म: स्वनुष्ठित: - यथाशास्त्र आणि सांगोपांग धर्मानुष्ठान जर झालेच तर - तेन अपि निर्जितं स्थानं यथा गच्छति - त्या धर्मानुष्ठानाने जिंकून हस्तगत झालेल्या स्थानाकडे अनुष्ठान कर्ता कसा जातो, तेथे त्याची स्थिती काय असते - तत् शृणु - त्याची वार्ता ऐक ॥१०-२२॥
जर कोणतेही विघ्न निर्माण न होता चांगल्या तर्हेने यज्ञ इत्यादींचे अनुष्ठान पूर्ण झाले, तर त्यामुळे परलोकाची प्राप्ती कशी होते ते ऐक. (२२)
इष्ट्वेह देवता यज्ञैः स्वर्लोकं याति याज्ञिकः ।
भुञ्जीत देववत् तत्र भोगान् दिव्यान् निजार्जितान् ॥ २३ ॥
यज्ञे आराधिता देवां स्वर्ग तो प्राप्त होतसे । पुण्यकर्मे तिथे भोगी देवतांसम भोग ते ॥ २३ ॥
इह - ह्या लोकी - यज्ञै: देवता: इष्ट्वा - अनेक यज्ञ करून इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य प्रभृति देवतांस प्रसन्न केल्यावर - याज्ञिक: स्वर्लोकं याति - यज्ञकर्ता स्वर्गलोकास जातो - तत्र निजार्जितान् दिव्यान् भोगान् देववत् भुञ्जीत - तेथे यज्ञकर्मांमुळे प्राप्त झालेल्या दिव्य विषयांचा उपभोग देवांप्रमाणे त्याला घ्यावयास सापडतो ॥१०-२३॥
यज्ञ करणारा पुरूष यज्ञांचे द्वारा देवतांची आराधना करून स्वर्गात जातो आणि तेथे आपल्या पुण्यकर्माच्या द्वारा प्राप्त केलेले दिव्य भोग देवतांप्रमाणे भोगतो. (२३)
स्वपुण्योपचिते शुभ्रे विमान उपगीयते ।
गन्धर्वैर्विहरन् मध्ये देवीनां हृद्यवेषधृक् ॥ २४ ॥
पुण्यानुसार तै त्याला विमान शुभ्र ते मिळे । देवींच्या सह तो त्यात विहार नित्यची करी । गाती गंधर्व त्यां गान इतरां लोभवी रुपें ॥ २४ ॥
स्वपुण्योपचितेशुभ्रे विमाने हृद्यवेषधृक् - आपल्या पुण्याईने संपादलेल्या शुभ्र विमानात सुंदर वेष धारण केलेला हा यज्ञकर्मसुखभोक्ता - देवींनां मध्ये विहरन् - अप्सरांबरोबर विहार करीत होत्साता - गन्धर्वै: उपगीयते - गंधर्वांचे गायनही ऐकतो ॥१०-२४॥
त्याच्या पुण्यानुसार त्याला एक तेजस्वी विमान मिळते आणि तो त्यातून अप्सरांच्याबरोबर मनोहर वेष घेऊन विहार करतो तेव्हा गंधर्व त्याच्या गुणांचे गायन करतात. (२४)
स्त्रीभिः कामगयानेन किंकिणीजालमालिना ।
क्रीडन् न वेदात्मपातं सुराक्रीडेषु निर्वृतः ॥ २५ ॥
विमान चालते इच्छें घंटानाद दिशांत तो । क्रीडतो अप्सरादीत न स्मरे पुण्य ते सरे ॥ २५ ॥
किङ्किणीजालमालिना कामगयानेन - हजारो क्षुद्र घंटा किणकिण आवाज करीत आहेत ज्याच्या सभोवार अशा इच्छानुवर्ती वाहनावर आरुढ होऊन तो - स्त्रीभि: क्रीडन् - दिव्यांगनांसह हास्यविनोदादि क्रीडा करतो - सुराक्रीडेषु निर्वृत्त: आत्मपातं न वेद - सुरांच्या म्हणजे देवांच्या किंवा सुरा म्हणजे मद्य क्रीडांमध्येच रममाण होऊन गेल्यामुळे व तेच खरे सुख असे तो समजत असल्यामुळे त्या मूढाला आपला अध:पात आहे हे कळत नाही ॥१०-२५॥
त्याच्या इच्छेनुसार जाणार्या व घंटांच्या माळा लावलेल्या विमानातून तो देवतांच्या विहारस्थळांमध्ये अप्सरांसह आनंदाने क्रीडा करीत असता आपण लवकरच येथून खाली भूतलावर पडू, याचे त्याला भानही राहात नाही. (२५)
तावत् प्रमोदते स्वर्गे यावत् पुण्यं समाप्यते ।
क्षीणपुण्यः पतत्यर्वाग् अनिच्छन् कालचालितः ॥ २६ ॥
शेष पुण्यें तिथे राही मजेत स्वर्गि त्या पहा । संपता पुण्य ते त्याचे इच्छा त्याची असो नसो । पुन्हा खाली घडे येणे काळाची गति ती अशी ॥ २६ ॥
यावत्पुण्यं समाप्यते तावत् - पुण्य संपेतोपर्यंत - स्वर्गे प्रमोदते - तो स्वर्गामधे आनंदाचा उपभोग घेतो - क्षीणपुण्य: - पुण्य संपले की - कालचालित: अनिच्छन् (अपि, अर्वाक् पतति) - त्याची इच्छा नसतांनाही कालचक्राने लोटून दिलेला तो याज्ञिक खाली पडतो ॥१०-२६॥
जोपर्यंत त्याचे पुण्य शिल्लक असते, तोपर्यंत तो स्वर्गामध्ये मौजमजा करतो पुण्य संपताच, त्याची इच्छा नसतांनाही कालगतीनुसार तो खाली पडतो. (२६)
यद्यधर्मरतः सङ्गाद् असतां वाजितेन्द्रियः ।
कामात्मा कृपणो लुब्धः स्त्रैणो भूतविहिंसकः ॥ २७ ॥ पशूनविधिनाऽऽलभ्य प्रेतभूतगणान् यजन् । नरकानवशो जन्तुः गत्वा यात्युल्बणं तमः ॥ २८ ॥
दुष्टांच्या संगतीमध्ये अधर्मी घडतो असा । स्वैराचारी तसा वागे इंद्रिया वश राहुनी ॥ २७ ॥ प्राण्यांना बळि तो देतो भूत प्रेतासची भजे । शेवटी नरकीं जातो अंधारी फिरणे घडे ॥ २८ ॥
यदि असतां सङ्गात् - जर दुष्टांच्या संगतीने - अधर्मरत: अजितेन्द्रिय: वा - कोणी निषिद्धाचरणी झाला किंवा इंद्रियांच्या स्वाधीन असल्यामुळे - कामात्मा - वासना पूर्ण म्हणून - कृपण: - कृपण म्हणून - लुब्ध: - भोगलोलूप असता - स्रैण: - तो स्त्रीलंपट होतो - भूतिविहिंसक: - भूतांस ताप देणारा होतो ॥१०-२७॥
अविधिना पशून् आलभ्य प्रेतभूतगणान् यजन् - विधि वगैरे टाकून भलत्याच मार्गाने पशुहिंसा करणारा आणि भूत-प्रेत-संमंधादिकांची पूजा करणारा - जन्तु: अवश: नरकान् गत्वा उल्बणं तम: याति - प्राणी परतंत्र होत्साता दु:खद नरकलोकांस जाऊन पुढे तो तम म्हणजे दगडधोंड्यांची स्थावरावस्था प्राप्त करून घेतो ॥१०-२८॥
जर एखादा मनुष्य दुष्टांच्या संगतीत सापडून अधर्माने वागू लागला, किंवा आपल्या इंद्रियांच्या अधीन होऊन स्वच्छंदपणे वागू लागला, कंजूषपणे वागू लागला, लोभी झाला, स्त्रीलंपट झाला किंवा प्राण्यांना त्रास देऊ लागला आणि शास्त्रविधानाच्या विरूद्ध पशूंचा बळी देऊन भूतप्रेतांची उपासना करू लागला, तर त्याला त्याच्या इच्छेविरूद्ध घोर अंधकारमय नरकात जावे लागते. (२७-२८)
कर्माणि दुःखोदर्काणि कुर्वन् देहेन तैः पुनः ।
देहं आभजते तत्र किं सुखं मर्त्यधर्मिणः ॥ २९ ॥ लोकानां लोकपालानां मद् भयं कल्पजीविनाम् । ब्रह्मणोऽपि भयं मत्तो द्विपरार्धपरायुषः ॥ ३० ॥
सकाम कर्मि ते दुःख मोह मायेत गुंतणे । पुन्हा जन्मे पुन्हा मृत्यु मृत्युधर्मी न ते सुख ॥ २९ ॥ लोक नी लोकपालांची एक कल्पचि आयु ती । ब्रह्म्यासही भयो माझे दो परार्धची तो जगे ॥ ३० ॥
देहेन दु:खोदर्कानि कर्माणि कुर्वन् - दु:ख हेच ज्याचे अंतिम फल आहे, अशी कर्मे या वर्तमान देहाने करून - तै: - त्या कर्मांनीच - पुन: देहं आभजते - जीव पुन्हा देह प्राप्त करून घेतो - तत्र - तेथे, असे करण्यामधे - मर्त्यधर्मिण: किं सुखं - मर्त्य देह धारण करणार्या जीवाला कसले तरी सुख आहे काय ? ॥१०-२९॥
कल्पजीवानां लोकानां लोकपालानां मद्भयं - ४ अब्ज, ३२ कोटी मानुषी वर्षे आयुष्य आहे असे लोक व इंद्रादि लोकपाल यांस जसे माझे भय बाळगावे लागते, त्याप्रमाणे - द्विपरार्धपरायुष: ब्रह्मण: अपि मत्त: भयं - दोन परार्ध आयुष्य असणार्या ब्रह्मदेवालाही माझ्या सत्तेखाली वागावे लागते ॥१०-३०॥
सकाम कर्माचे फळ दुःखच आहे जो जीव शरीरामध्ये अहंताममता धरून तशी कर्मे करतो, त्यांची फळे भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मर्त्य जीवाला अशा स्थितीत काय सुख मिळणार ? एक कल्पपर्यंत आयुष्य असणार्या लोक व लोकपाल यांना माझे भय आहे दोन परार्ध आयुष्य असणार्या ब्रह्मदेवालासुद्धा माझ्यापासून भय आहे. (२९-३०)
गुणाः सृजन्ति कर्माणि गुणोऽनुसृजते गुणान् ।
जीवस्तु गुणसंयुक्तो भुङ्क्ते कर्मफलान्यसौ ॥ ३१ ॥ यावत् स्याद् गुणवैषम्यं तावत् नानात्वमात्मनः । नानात्वमात्मनो यावत् पारतंत्र्यं तदैव हि ॥ ३२ ॥
गुणांनी करिती कर्म कर्ता मानिति आपणा । तयांचे फळ ते लाभ सुख नी दुःखही तसे ॥ ३१ ॥ मी पणा असता देहीं एकतत्त्व न ते कळे । द्वैतमानी असा देहीं कर्माआधीन राहणे ॥ ३२ ॥
गुणा: कर्माणि सृजन्ति - गुण म्हणजे इंद्रिये हीच कर्माची कारक आहेत - गुण: गुणान् अनुसृजते - मायेचे सत्वादि गुण इंद्रियांस कर्मप्रेरक होतात - असौ जीव: तु - हा जीव तर - गुणसंयुक्त: - इंद्रियांनी युक्त होत्साता - कर्मफलानि भुङ्क्ते - कर्मफलाचा उपभोग घेतो ॥१०-३१॥
यावत् गुणवैषम्यं स्यात् - जोपर्यंत गुणांची विषमता आहे - तावत् आत्मन: नानात्वं - तावत् काल अनेक आत्मे आहेत असे भान असावयाचे - यावत् आत्मन: नानात्वं - जोपर्यंत अनेक आत्मे आहेत असे भान आहे - तदा एव हि पारतंत्र्यं स्यात् - तोपर्यंत पारतंत्र्य असणारच ॥१०-३२॥
सत्व, रज आणि तम हे तीन गुण इंद्रियांना त्यांचे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि इंद्रिय कर्मे करतात. जीव अज्ञानाने इंद्रियांनी केलेल्या कर्मांशी संबंध जोडून कर्मांची फळे भोगू लागतो जोपर्यंत शरीर इत्यादींमध्ये 'मी माझे' पणाचा अभिमान आहे, तोपर्यंत आत्म्याच्या अनेकत्त्वाचा भ्रम नाहीसा होत नाही जोपर्यंत हा अज्ञानमूलक भ्रम नाहीसा होत नाही, तोपर्यंत तो जीव परतंत्रच राहाणार. (३१-३२)
यावत् अस्य अस्वतंत्रत्वं तावत् ईश्वरतो भयम् ।
ये एतत् समुपासीरन् ते मुह्यन्ति शुचार्पिताः ॥ ३३ ॥
परतंत्र असे त्याला ईश्वरी भयही असे । परतंत्र्या न वैराग्य शोक मोह तया मिळे ॥ ३३ ॥
यावत् अस्य अस्वतन्त्रत्वं - जोपर्यंत जीवाला अस्वतंत्रता आहे - तावत् ईश्वरत: भयं - तोपर्यंत परमेश्वराचे भय व त्याची सत्ता ओघप्राप्तच - ये एतत् समुपासीरन् - जगत् सत्य, जीव नाना, जीव कर्ता-भोक्ता इत्यादि मतांची जे आराधना करतात - ते शुचा अर्पिता: मुह्यन्ति - त्यांस अनित्यत्वामुळे होणारा शोक मोहामध्ये परिणत होतो. ते शोकाचे दास पुढे मोहात पडतात ॥१०-३३॥
जोपर्यंत जीवाला पारतंत्र्य जाणवते, तोपर्यंत ईश्वराचे वाटणारे भय कायमच असते जो अशा प्रकारे गुणांच्या विळख्यात सापडून राहातो, त्याला शोक आणि मोह होतच राहातात. (३३)
काल आत्माऽऽगमो लोकः स्वभावो धर्म एव च ।
इति मां बहुधा प्राहुः गुणव्यतिकरे सति ॥ ३४ ॥
मायेच्या गुण क्षोभाने आत्म्याला काल जीव नी । वेद लोक स्वभावे नी धर्मादी नाम हे पडे ॥ ३४ ॥
गुणव्यतिकरे सति - मायेमुळे गुणवैषम्य प्रादुर्भूत झाल्यामुळे - काल: आत्मा, आगम:, लोक:, स्वभाव:, धर्म: एव च - काल, आत्मा, वेद, लोक, स्वभाव, धर्म अशा प्रकारची नावे - इति मां बहुधा प्राहु: - अज्ञानी लोक मला देतात ॥१०-३४॥
प्रिय उद्ववा ! जेव्हा मायेच्या गुणांमध्ये क्षोभ होतो तेव्हा काल, आत्मा, वेद, लोक, स्वभाव आणि धर्म अशा अनेक रूपांनी व नावांनी मीच एकटा ओळखला जातो. (३४)
श्रीउद्धव उवाच -
गुणेषु वर्तमानोऽपि देहजेष्वनपावृतः । गुणैर्न बध्यते देही बध्यते वा कथं विभो ॥ ३५ ॥
उद्धवजीने विचारिले - आत्मा देहात तो राही सुख दुःख कसे तया । निर्लेप असता आत्मा बंधनी पडतो कसा ॥ ३५ ॥
विभो - परमेश्वरा - देहजेषु गुणेषु - शरीरजन्य गुणांमध्ये, कर्मांमध्ये - वर्तमान: अपि अनपावृत: देही - सदैव राहाणारा कोणी स्वतंत्र देही - गुणै: कथं न बध्यते - गुणांनी का बांधला जात नाही ? - वा कथं बध्यते - आणि तो स्वतंत्र आहे म्हटले तर बद्ध कसा होतो ? ॥१०-३५॥
उद्धव म्हणाला भगवन ! हा अलिप्त आत्मा देह, इंद्रिय इत्यादी गुणांमध्ये, तसेच देहाने केलेली कर्मे व त्यांची फळे यांमध्ये राहात असूनही त्यांपासून मुक्त कसा राहातो ? किंवा वरील गुणांनी बद्ध कसा होतो ? (३५)
कथं वर्तेत विहरेत् कैर्वा ज्ञायेत लक्षणैः ।
किं भुञ्जीतोत विसृजेत् शयीतासीत याति वा ॥ ३६ ॥
बद्ध मुक्त कसे होती ओळखावे कसे तयां । झोपणे चालणे खाणे तयांचे ते कसे असे ॥ ३६ ॥
कथं वर्तेत विहरेत् - जीवाने वागावे कसे ? विहार कोणते करावेत ? - कै: लक्षणै: ज्ञायेत वा - कोणत्या चिन्हांनी बद्ध व मुक्त ओळखावे ? - किं भुञ्जीत - ते काय खातात ? - उत विसृजेत् - व काय टाकतात - शयीत आसीत याति वा - निजतात, बसतात, जातात, कसे बरे ? ॥१०-३६॥
बद्ध किंवा मुक्त पुरूष कसा असतो ? कसा वागतो ? तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो ? काय खातो ? मलत्याग इत्यादी कसे करतो ? झोपतो कसा, बसतो कसा आणि चालतो कसा ? (३६)
एतत् अच्युत मे ब्रूहि प्रश्नं प्रश्नविदां वर ।
नित्यबद्धो नित्यमुक्त एक एवेति मे भ्रमः ॥ ३७ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
अच्युता प्रश्न जाणाया श्रेष्ठ तूं, सांग हे मला । आत्मा अनादि संसर्गे नित्य बद्धचि भासतो । असंग नित्य मुक्तोही भासतो भ्रमची पडे ॥ ३७ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर दहावा अध्याय हा ॥ ॥ ११ ॥ १० ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
अच्युत - हे भ्रमशून्य देवा - एतत् - हाच विषय आहे ज्याचा असा - प्रश्नं - प्रश्न - प्रश्नविदां वर: - प्रश्नवेत्त्यांमध्ये व प्रश्नाचे समर्पक उत्तर देण्यामध्ये श्रेष्ठ व निपुण असणार्या देवदेवा - मे ब्रूहि - मला समजावून हा प्रश्न सोडव - नित्यमुक्त: नित्यबद्ध: एक: एव - एकच आत्मा नित्यमुक्त व नित्य बद्ध कसा ? - इति मे भ्रम: - याविषयी मला भ्रम आहे ॥१०-३७॥
हे अच्युता ! प्रश्नाचे मर्म जाणणार्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात एकच आत्मा अनादी गुणांच्या संबंधामुळे नित्यमुक्तही आहे या गोष्टीमुळे मला संशय उत्पन्न झाला आहे तरी आपण माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्यावे. (३७)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |