|
श्रीमद् भागवत पुराण कुरुरादि सप्तगुरूणां वर्णनम्, अवधूतोपाख्यानसमाप्तिश्च - अवधूतोपाख्यान कुरर ते भुंगा अशा सात गुरूंची कथा - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीब्राह्मण उवाच -
( अनुष्टुप् ) परिग्रहो हि दुःखाय यद् यत् प्रियतमं नृणाम् । अनन्तं सुखमाप्नोति तद् विद्वान् यस्त्वकिञ्चनः ॥ १ ॥
अवधूत दत्तात्रेयजी म्हणाले - ( अनुष्टुप् ) प्रियवस्तुपरिग्रहो दुःखाचे कारणो नृपा । अनंत सुख ते लाभे विद्वानें त्यजिता तया ॥ १ ॥
नृणां यत् यत् प्रियतमं - मनुष्यांना जे जे प्रिय असते - परिग्रह: - संग्रह - दु:खाय हि - दु:खालाच कारण असतो - तत् विद्वान् - (सन्) - ते जाणणारा होत्साता - य: तु अकिञ्चन: - जो मुळी नि:संग्रहीच असतो, म्हणजे मुळीच संग्रह करत नाही - अनन्तं सुखमाप्नोति - अपार सुख पावतो ॥९-१॥
अवधूत म्हणाले - माणासाना जी वस्तू आवडते, तिचा साठा करणे त्याच्या दुःखाला कारणीभूत ठरते हे ओळखून जो साठवण करत नाही, तो अपार आनंदाचा अनुभव घेतो. (१)
सामिषं कुररं जघ्नुः बलिनो ये निरामिषाः ।
तदामिषं परित्यज्य स सुखं समविन्दत ॥ २ ॥
एका क्रौंचा मिळे मांस न मिळे बलवान् दुज्यां । बळी तो मारिता चोंचे त्यजिता पहिला सुखी ॥ २ ॥
ये बलिन: निरामिषा: - जे बलवान व नाही मांस ज्यांच्याजवळ असे - सामिषं कुररं - ज्यांच्याजवळ मांस आहे अशा टिटव्यास - जघ्नु: - मारते झाले - स: - तो - तत् - ते - आमिषं - मांस - परित्यज्य - टाकून - सुखं समविन्दत - सुख पावला ॥९-२॥
मांसाचा तुकडा चोचीत धरलेल्या कुररपक्ष्यावर स्वतःजवळ मांस नसलेले दुसरे पक्षी तुटून पडले त्याने मांसाचा तुकडा फेकून दिला, तेव्हा तो सुखी झाला. (संग्रह करणे, हे संकटाचे मूळ आहे, ही शिकवण कुरराकडून घ्यावी). (२)
न मे मानापमानौ स्तो न चिन्ता गेहपुत्रिणाम् ।
आत्मक्रीड आत्मरतिः विचरामीह बालवत् ॥ ३ ॥ द्वावेव चिन्तया मुक्तौ परमानन्द आप्लुतौ । यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्यः परं गतः ॥ ४ ॥
मला मानापमानो ना चिंतामूळ न ते घर । क्रीडतो रमतो आत्मी बाळाचे शिकलो असे ॥ ३ ॥ निश्चिंत दोन ते विश्वीं भोळे-भाळेचि बाळ नी । गुणातीत असे थोर आनंदी मग्न राहती ॥ ४ ॥
मे मानाऽवमानौ न स्त: - मला मान व अपमान यांची क्षिती नाही - गेहपुत्रिणां चिन्ता न - गृह, दारा, पुत्र यासंबंधीची काळजी मला नाही - बालवत् आत्मक्रीड: आत्मरति: - बालकाप्रमाणे आपल्या आत्म्याशी खेळणारा व आपल्याठायीच रमणारा असा - इह विचरामि - या भूतलावर स्वेच्छेने संचार करतो ॥९-३॥
द्वावेव - दोघेच काय ते - चिन्तया मुक्तौ, परमानन्दे आप्लुतौ (च) - चिंतेने मुक्त व परमानंदामधे मग्न आहेत - (एक:) य: विमुग्ध: जड: बाल: (स:) - एक जो अज्ञानी व निरुद्योगी बाल तो - (द्वितीय:) य: गुणेभ्य: परं गत: (स:) - दुसरा, जो गुणांहून पलिकडे असणार्या परमेश्वराप्रत ऐक्य पावला आहे असा साधु तो ॥९-४॥
ज्याप्रमाणे बालक स्वतःशीच रममाण होते, त्याला कोणतीही काळजी नसते, त्याचप्रमाणे मीसुद्धा आत्मानंदात मग्न असतो मान मिळो की अपमान होवो माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही घरपरिवार यांचीही मला काळजी नाही जगात फक्त दोनच व्यक्ती चिंतामुक्त आहेत एक म्हणजे अजाण व काही काम न करणारे बालक किंवा गुणातीत हे दोघेही परम आनंदात मग्न असतात. (मानापमान इत्यादींची चिंता न करणे, हा गुण बालकाकडून घ्यावा). (३-४)
क्वचित् कुमारी तु आत्मानं वृणानान् गृहमागतान् ।
स्वयं तान् अर्हयामास क्वापि यातेषु बंधुषु ॥ ५ ॥
कुमारिका कुणी एक पाहण्या लोक पातले । नव्हते गेहिं ते थोर केले आतिथ्य ते तिने ॥ ५ ॥
क्वचित् - एके ठिकाणी - कुमारी तु - उपवर कन्याच - बन्धुषु - आईबाप वगैरे सर्व माणसे - क्व अपि - कोठेशी बाहेर - यातेषु (सत्सु) - गेलेली असता - आत्मानं वृणानान् - आपल्याला वरणारे - गृहं आगतान् तान् - घरी आलेले असता त्याप्रत - स्वयं अर्हयामास - स्वत: सत्कार करती झाली ॥९-५॥
एके दिवशी कुण्या कुमारिकेच्या घरी तिला मागणी घालण्यासाठी म्हणून काही लोक आले होते त्या दिवशी तिच्या घरातील लोक कोठेतरी बाहेर गेले होते म्हणून तिने स्वतःच त्यांचे आदरातिथ्य करण्याचे ठरविले. (५)
तेषां अभ्यवहारार्थं शालीन् रहसि पार्थिव ।
अवघ्नन्त्याः प्रकोष्ठस्थाः चक्रुः शङ्खाः स्वनं महत् ॥ ६ ॥ सा तत् जुगुप्सितं मत्वा महती वीडिता ततः । बभञ्जैकैकशः शङ्खान् द्वौ द्वौ पाण्योरशेषयत् ॥ ७ ॥
भोजनां कांडिले धान्य एकांती बसुनी तिने । कंकणे ती करातील मोठ्याने वाजु लागले ॥ ६ ॥ आवाज निंद्य वाटोनी कुमारी लाजली बहू । दो दो ठेवोनिया हाती अन्य ते काढिले तिने ॥ ७ ॥
पार्थिव - राजा - तेषां अभ्यव्यहारार्थं - त्या पाहुण्यांच्या भोजनासाठी - रहसि - एकांती - शालीन् - भात - अवघ्नन्त्या: - कांडणार्या - प्रकोष्ठस्था: - मनगटातील - शंखा: - शंखाची कंकणे - महत् (यथा भवति तथा) - जसा मोठा होईल तसा - स्वनं - शब्द, आवाज - चक्रु: - करू लागली ॥९-६॥
महती - मोठी बुद्धिमान - सा - ती कन्या - तत् - ते साळी कांडणे - जुगुप्सितं - दारिद्र्यद्योतक, निंद्य - मत्वा - मानून - व्रीडिता - लाजली - तत: - नंतर - पाण्यो: - हातातील - एकैकश: - एकेक याप्रमाणे सर्व - शंखान् - बभंज - कांकणे काढती झाली - द्वौ द्वौ अशेषयत् - फक्त दोन दोनच राखती झाली ॥९-७॥
राजन ! त्यांच्यासाठी स्वयंपाक करावा या हेतूने ती घरातील एक कोपर्यात भात कांडू लागली त्यावेळी तिच्या मनगटातील बांगड्या मोठ्याने वाजू लागल्या या आवाजावरून घरात धान्य नाही, हे पाहुण्यांना कळेल, हे लक्षात घेऊन तिला अतिशय लाज वाटली आणि तिने एकएक करून सगळ्या बांगड्या फोडून टाकल्या शेवटी दोन्ही हातांमध्ये दोन बांगड्या राहू दिल्या. (६-७)
उभयोरप्यभूद् घोषो ह्यवघ्नन्त्याः स्म शंखयोः ।
तत्राप्येकं निरभिदद् एकस्मात् नाभवद् ध्वनिः ॥ ८ ॥
दो दोही वाजती तेंव्हा काढिले एक एक ते । एकेक राहता हाती आवाज नच जाहला ॥ ८ ॥
अवघ्नन्त्या: - कांडू लागली असता - उभयो: अपि शङ्खयो: - त्या दोन दोन कांकणांचा - घोष: अभवत् स्म हि - आवाज व्हायलाच लागला - तत्रापि एकं - त्यातूनही एकेक - निरभिदत् - काढून ठेवती झाली - एकस्मात् ध्वनि: न अभवत् - एकएकापासून मात्र शब्द होत नाहीसा झाला ॥९-८॥
ती पुन्हा भात कांडू लागली परंतु त्या दोनदोन बांगड्याही जेव्हा आवाज करू लागल्या, तेव्हा तिने आणखी एकएक बांगडी फोडून टाकली दोन्ही मनगटांध्ये जेव्हा एक एक बांगडी शिल्लक राहिली, तेव्हा आवाज बंद झाला. (८)
अन्वशिक्षमिमं तस्या उपदेशमरिन्दम ।
लोकान् अनुचरन् एतान् लोकतत्त्वविवित्सया ॥ ९ ॥ वासे बहूनां कलहो भवेत् वार्ता द्वयोरपि । एक एव चरेत् तस्मात् कुमार्या इव कङ्कणः ॥ १० ॥
लोकांचे वागणे सर्व पाहण्या फिरता जगीं । हिंडता पोचलो तेथे तिचे मी शिकलो असे ॥ ९ ॥ लोकात राहता नित्य कलह पेटतो पुन्हा । दोघेही बोलती व्यर्थ एकटे हिंडतो तदा ॥ १० ॥
अरिंदम - शत्रूंचा नायनाट करणार्या शूर राजा - लोकतत्वविवित्सया - या चराचर विश्वाचे रहस्य समजून घेण्याच्या इच्छॆने - एतान् लोकान् अनुचरन् - या सर्व लोकात संचार करणारा असा - तस्या: - त्या कुमारिकेपासून - इमं उपदेशं - हा धडा - अन्वशिक्षम् - शिकता झालो म्हणजे ग्र्हण करता झालो ॥९-९॥
बहूनां वासे कलह: - अनेक लोक एकत्र आले म्हणजे भांडण ठेवलेले - द्वयो: अपि वार्ता भवेत् - दोघेच असले तरी मोठमोठ्यांदा गप्पागोष्टी चालतातच - तस्मात् - म्हणून - कुमार्या: कङ्कण इव - त्या कुमारीच्या कंकणाप्रमाणे - एक: एव चरेत् - मुमुक्षूने एकाकी मात्र संचार करावा ॥९-१०॥
हे शत्रूंचे दमन करणार्या ! त्या वेळी लोकव्यवहार जाणण्याच्या इच्छेने मीसुद्धा तेथे जाऊन पोहोचलो मी त्या प्रसंगातून हे शिकलो की, जेव्हा पुष्कळ लोक एकत्र राहातात तेव्हा त्यांच्यामध्ये कलह होतो आणि जेव्हा दोघेजण राहतात तेव्हा सुद्धा गप्पागोष्टी होतात म्हणून साधकाने कुमारिकेच्या बांगडीप्रमाणे एकट्यानेच राहिले पाहिजे. (या प्रसंगातून ‘मुनीने एकट्याने राहावे‘ हे कळते). (९-१०)
मन एकत्र संयुञ्ज्यात् जितश्वासो जितासनः ।
वैराग्याभ्यासयोगेन ध्रियमाणं अतन्द्रितः ॥ ११ ॥
आसनीं श्वास जिंकावे वैराग्यें मन बांधिणे । सावधानेचि लक्षावे शिकलो बाणकर्मिचे ॥ ११ ॥
अतन्द्रित: - निरलसपणे - जितासन: जितश्वास: (च सन्) - जिंकले म्हणजे स्वाधीन करून घेतले आहे आसन म्हणजे आसनविद्या ज्याने आणि जिंकला आहे म्हणजे साध्य करून घेतला आहे प्राणायाम ज्याने असा होत्साता - वैराग्याभ्यासयोगेन - वैराग्य व अभ्यास यांच्या योगाने - ध्रियमाणं - स्थिर केले जाणारे - मन: - मन - एकत्र - एके ठिकाणीच - संयुज्यात् - जोडावे ॥९-११॥
आसन आणि श्वास यांच्यावर विजय मिळवून वैराग्य व अभ्यासाने आपले मन ताब्यात आणावे त्यानंतर सावधपणे ते एका लक्ष्यावर लावावे. (११)
( मिश्र )
यस्मिन्मनो लब्धपदं यदेतत् शनैः शनैः मुञ्चति कर्मरेणून् । सत्त्वेन वृद्धेन रजस्तमश्च विधूय निर्वाणमुपैत्यनिन्धनम् ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा ) पदासि होते जधि स्थीर चित्त त्या वासनांची सरतेच धूळ । वृद्धीत सत्वो, रज नी तमो तो तै शांत होतो जइ अग्नि संपे ॥ १२ ॥
यस्मिन् लब्धपदं - ज्या त्या लक्ष्यावर म्हणजे परमात्मपदी प्रविष्ट झालेले यत् एतत् मन: - जे हे एकाग्र मन - शनै: शनै: कर्मरेणून् मुञ्चति - क्रमश: हळू हळू कर्मरूपी रेणूंचा म्हणजे वासनाधूलीचा त्याग करण्याला समर्थ होते - वृद्धेन सत्वेन रज: तम: च विधूय - सत्व गुणाचा उदय व उत्कर्ष होतो म्हणून रजोगुण व तमोगुण अस्ताला लोटून - अनिन्धनं - विषयशून्य, खाद्यरहित होऊन - निर्वाणं उपैति - शून्य रूपाला उन्मनी अवस्थेला प्राप्त होतो ॥९-१२॥
जेव्हा परमात्म्यामध्ये मन स्थिर होते, तेव्हा ते हळू हळू कर्मवासनांची धूळ झटकून टाकते होता होता सत्त्वगुण वाढून रजतम नाहीसे होतात अखेर जसे इंधन नसलेला अग्नी शांत होतो, त्याप्रमाणे मन शांत होते. (१२)
( उपेंद्रवज्रा )
तदैवमात्मन्यवरुद्धचित्तो न वेद किञ्चिद् बहिरन्तरं वा । यथेषुकारो नृपतिं व्रजन्तं इषौ गतात्मा न ददर्श पार्श्वे ॥ १३ ॥
चित्तात होता स्थिर या परी तैं न भान राही मग आत बाह्य । तो बाण कर्मी दिसला स्वकर्मी न भान त्याला नृप थोर जाता ॥ १३ ॥
तदा - त्यावेळी - एवं - आताच सांगितल्याप्रमाणे - आत्मनि अवरुद्धचित्त: - चित्ताचा चित्तपणा नाहीसा झाल्यामुळे आत्मस्वरूपातच समरस झालेला योगी - बहि: अन्तरं वा - आतील किंवा बाहेरील - किञ्चित् - यत्किंचितही - न वेद - जाणले जात नाही - यथा - ज्याप्रमाणे - इषौ गतात्मा इषुकार: - बाण तयार करण्यात गढलेला जो बाण बनवणारा, त्याने - पार्श्वे व्रजन्तं नृपतिं - जवळून त्याच्या बाजूने जाणार्या राजाला - न ददर्श - पाहिले नाही ॥९-१३॥
अशा प्रकारे जेव्हा चित्त आपल्या आत्म्यामध्येच स्थिर होते, तेव्हा त्याला आतबाहेर अशा कोणत्याही पदार्थांचे भान राहात नाही मी असे पाहिले होते की, बाण तयार करणारा एक कारागीर बाण तयार करण्यात इतका मग्न झाला होता की, त्याच्या जवळूनच सैन्यासह राजाची स्वारी निघून गेली, तरी त्याला तिचा पत्ता लागत नाही. (बाणकर्त्याकडून ‘एकाग्रता‘ हा गुण घ्यावा). (१३)
( अनुष्टुप् )
एकचार्यनिकेतः स्याद् , अप्रमत्तो गुहाशयः । अलक्ष्यमाण आचारैः मुनिरेकोऽल्पभाषणः ॥ १४ ॥
(अनुष्टुप् ) सापाचे शिकलो हे की संन्यासी एकटा फिरो । शिष्य नी मठ ना घ्यावे प्रमाद नच तो घडो ॥ न थांबो एकजागेसी अत्यल्प बोलणे तसे । सहाय्य ते न मेळावे गुहेत राहणे पहा ॥ १४ ॥
मुनि: - साधक मुनि जो त्याने - एकचारी - एकाकी संचार करणारा - अप्रमत्त: - दक्ष - अनिकेत: - कोणत्याही आश्रमाच्या लक्षणाची उपाधी नसणारा - गुहाशय: - गुहेतच रहाणारा - आचारै: अलक्ष्यमाण: - कोणाच्याही लक्षात न येणारे आचार असणारा - अल्पभषण: - थोडेच बोलणारा - एक: - एकटा - स्यात् - असे असावे ॥९-१४॥
मुनीने एकटेच राहावे राहाण्याच्या ठिकाणाविषयी ममता नसावी सावध असावे एकांतात किंवा गुहेत राहावे बाह्य वेषावरून स्वतःला कोणासमोर प्रगट करू नये आणि कमी बोलावे. (१४)
गृहारम्भोऽति दुःखाय विफलश्चाध्रुवात्मनः ।
सर्पः परकृतं वेश्म प्रविश्य सुखमेधते ॥ १५ ॥
अनित्य शरिरासाठी घर बांधावयास ते । व्यर्थची पडतो त्रास नसते झंझटो पहा । सापा परी दुज्या गेही घुसोनी शांत राहणे ॥ १५ ॥
अध्रुवात्मन: गृहारम्भ: - अनित्य असणार्या देहासाठी घरादारांचा उद्योग - अतिदु:खाय विफल: च - अति ताप देणारा होऊन पुन: व्यर्थ होतो - परकृतं वेश्म प्रविश्य - दुसर्यांनी केलेल्या घरात प्रवेश करून - सर्प: सुखं एधते - सर्प सुखी असतो ॥९-१५॥
या अनित्य शरीरासाठी अपार कष्ट करून घर बांधणे निरर्थक आहे उंदराने तयार केलेल्या बिळामध्ये साप आरामात राहातो. (सापाच्या उदाहरणाने साधकाने घर वगैरे बांधू नये, हा धडा घ्यावा). (१५)
एको नारायणो देवः पूर्वसृष्टं स्वमायया ।
संहृत्य कालकलया कल्पान्त इदमीश्वरः ॥ १६ ॥ एक एवाद्वितीयोऽभूत् आत्माधारोऽखिलाश्रयः । कालेनात्मानुभावेन साम्यं नीतासु शक्तिषु । सत्त्वादिषु आदिपुरुषः प्रधानपुरुषेश्वरः ॥ १७ ॥ परावराणां परम, आस्ते कैवल्यसंज्ञितः । केवलानुभवानन्द सन्दोहो निरुपाधिकः ॥ १८ ॥
एक नारायणो देव माया ती पूर्वकल्पि जो । रचितो सर्व सृष्टी नी कल्पांती एकटा उरे ॥ १६ ॥ अद्वितीय असा शून्य शेषरूपेचि राहतो । सर्व आश्रय तो एक स्वयाधारचि जो असा । प्रकृती पुरुषाचा या दोहोचा ही नियामक ॥ १७ ॥ कार्यकारण तो एक प्रभावे कालशक्तिने । गुण सत्वादि निर्मोनी कैवल्यरूपि एकटा ॥ १८ ॥
एक: देव: नारायण: - नारायण हा एकरस सर्वेश्वर मात्र नित्य आहे - स्वमायया पूर्वसृष्टं - आपल्या स्वाधीन असणार्या मायेच्या द्वारे पूर्वी उत्पन्न केलेले - इदं - हे विश्व - कल्पान्ते कालकलया - प्रलयकाली आपल्या कालनामक शक्तीने - संहृत्य - आवरून, स्वस्वरूपात लीन करून - ईश्वर: - प्रभु एकच एक अद्वितीय असतो ॥९-१६॥
एक: एव अद्वितीय: - तो एकच एक अद्वितीय परमात्मा - आत्माऽऽधार: - आपणच स्वत:स आधार असणारा, स्वयंभू - अखिलाश्रय: अभूत् - आणि सर्व कार्यकारणात्मक ब्रह्मांडाचा आश्रय होता झाला - आत्मानुभावेन कालेन - निजसामर्थ्याचा अवतार असणार्या कालसाह्याने - सत्वादिषु शक्तिषु साम्यं नीतासु - सत्वादि त्रिगुणात्मक सर्व शक्ति साम्य अवस्थेला गेल्यानंतर - आदिपुरुष: प्रधानपुरुषेश्वर: - साम्य पावलेले गुण म्हणजे प्रधान आणि पुरुष म्हणजे हिरण्यगर्भापासून तो जीवाणुपर्यंतचे सर्व जीव या प्रधानपुरुषाचा ईश्वर व आदिपुरुष म्हणजे नियंता एकच एक अद्वितीय परमात्मा आहे ॥९-१७॥ परावराणां परम: - हा नित्य परमात्मा परांचे म्हणजे श्रेष्ठांचे व अवरांचे म्हणजे कनिष्ठांचे मुख्य प्राप्तव्य म्हणून सर्वश्रेष्ठ आहे - कैवल्यसंज्ञित: - श्रुतीने ह्या परमात्म्याला ‘केवळ’ ह्या नावाने संबोधले आहे - केवलानुभवानन्दसन्दोह: - तो स्वानुभवापासून उत्पन्न होणार्या आनंदाचा अथांग डोह, महासागर आहे - निरुपाधिक: आस्ते - तो उपाधिशून्य म्हणजे केवल आहे ॥९-१८॥
आपल्या मायेने एका नारायण देवांनीच निर्माण केलेले हे विश्व कल्पाच्या शेवटी आपल्या कालशक्तीद्वारे स्वतःमध्येच विलीन करून, सर्वांना आपल्यात घेऊन स्वतःच्याच आधारावर ते एकमेवाद्वितीय होऊन राहिले प्रकृती आणि पुरूष या दोहोंचे नियामक असलेले तेच आदिपुरूष जेव्हा आपल्या कालशक्तीच्या सामर्थ्याने या सत्त्वादी शक्तींना साम्यावस्थेत घेऊन जातात, तेव्हा सर्व कार्यकारणांचे परम कारण असे ते एकटेच असतात ते केवळ अनुभवस्वरूप व आनंदाचा पुंज आहेत तेथे प्रकृतीची कोणतीही उपाधी नाही. (१६-१८)
केवलात्मानुभावेन स्वमायां त्रिगुणात्मिकाम् ।
सङ्क्षोभयन् सृजत्यादौ तया सूत्रमरिन्दम ॥ १९ ॥
विराजमानची राही अद्वितीय असाचि की । आनंदघन तो मुक्त पहिली अभिव्यक्ति तो ॥ १९ ॥
अरिन्दम - शत्रुंजय - केवलात्मानुभावेन - स्वसामर्थ्यरूपच असणार्या एकट्या काल शक्तीने - त्रिगुणाऽऽत्मिकां स्वमायां संक्षोभयन् - सत्वादि गुणवती मायेमधे क्षोभ उत्पन्न करणार्या महामायी परमेश्वराने - तया - त्या मायेच्या सहायाने - आदौ - सृष्टीच्या आरंभी - सूत्रं सृजति - हिरण्यगर्भ नामक सूत्रात्मा उत्पन्न केला ॥९-११९॥
केवळ आपल्या सामर्थ्यानेच ते आपल्या त्रिगुणात्मक मायेमध्ये क्षोभ उत्पन्न करतात हे शत्रुसूदना ! त्या मायेद्वारे ते सर्वप्रथम सूत्राची क्रियाशक्तिप्रधान महत्तत्त्वाची निर्मिती करतात. (१९)
तां आहुः त्रिगुणव्यक्तिं सृजन्तीं विश्वतोमुखम् ।
यस्मिन् प्रोतं इदं विश्वं येन संसरते पुमान् ॥ २० ॥
महत्तत्त्व असोनिया सृष्टीत भरला असे । म्हणोनी जीव या जन्म-मृत्यूच्या फेरि सापडे ॥ २० ॥
यस्मिन् - ज्या समष्टिरूपी सूत्रात्म्यात - इदं विश्वं प्रोतं - हे दृश्य विश्व ग्रथित झाले आहे - येन पुमान् संसरते - ज्या सूत्रात्म्याच्या प्रेरणेने अहंकाराभिमानी जीव कर्म करतो व जन्ममरण भोगतो - विश्वतोमुखं सृजन्तीं - अनेक मुखांनी हे त्रिगुणात्मक विश्व अहंकारद्वार उत्पन्न करणार्या - तां त्रिगुणव्यक्तिं आहु: - त्या सूत्रात्मशक्तीला गुणत्रयाचे प्रत्यक्ष कार्य असे म्हणतात तीच शक्ति अनेक प्रकारची सृष्टी उत्पन्न करते ॥९-२०॥
हे सूत्रच तीन गुणांचे कार्य आहे तेच सार्या विश्वाची अहंकारद्वारा निर्मिती करते त्यामध्ये हे सगळे विश्व आतबाहेर व्यापलेले आहे त्याच्यामुळेच मनुष्य जन्ममृत्यूचक्रात फिरत राहातो. (२०)
यथा उर्णनाभिः हृदयाद् ऊर्णां सन्तत्य वक्त्रतः ।
तया विहृत्य भूयस्तां ग्रसत्येवं महेश्वरः ॥ २१ ॥
जाळे निर्मी गिळी अंती कोळीकिट जसा पहा । ईश तै निर्मितो सॄष्टी मिटवी आपुल्यात की ॥ २१ ॥
यथा - ज्याप्रमाणे - हृदयात् ऊर्णां - हृदयापासून निघालेली लोकर - वक्त्र: संतत्य - तोंडानेच पसरून व जाळे करून - तया विहृत्य - त्या लोकरीशीच काही वेळ खेळून - ऊर्णनाभि: - कोळी - भूय: तां ग्रसति - ती लोकर पुन्हा गिळतो - एवं महेश्वर: - त्याचप्रमाणे परमेश्वर स्वत:च सृष्टी उत्पन्न करून काही वेळ विलासाकरता ठेऊन पुन्हा ती स्वस्वरूपातच लीन करतो ॥९-२१॥
ज्याप्रमाणे कोळीकीटक आपल्या हृदयातून तोंडाच्याद्वारे तंतू बाहेर काढून जाळे पसरतो, त्यातच विहार करतो आणि पुन्हा ते गिळून टाकतो, त्याप्रमाणे परमेश्वरसुद्धा आपल्यापासूनच या जगाची उत्पत्ती करतात, जीवरूपाने त्यामध्ये विहार करतात आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतात. (विश्व आणि ब्रह्म एकरूप आहे, हे कोळ्याच्या जाळ्याच्या दृष्टान्ताने स्पष्ट केले आहे). (२१)
यत्र यत्र मनो देही धारयेत् सकलं धिया ।
स्नेहाद् द्वेषाद् भयाद् वापि याति तत् तत्स्वरूपताम् ॥ २२ ॥
भिंगोरीचे शिक मी की भये द्वेषे नि जाणता । करिता चित्त एकाग्र वस्तुरूप मिळे तसे ॥ २२ ॥
यत्र यत्र - जेथे जेथे किंवा ज्या ज्या पदार्थावर - देही - देहधारी जीव - स्नेहात् द्वेषात् भयात् वा अपि - प्रेमाने, द्वेषाने, किंआ भयानेही - धिया सकलं मन: धारयत् - बुद्धिद्वारा आपले मन:सर्वस्व एकाग्र करतो - तत्स्वरूपतां याति - त्या त्या पदार्थाशी तो जीव सरूपता पावतो ॥९-२२॥
जर एखादा स्नेहाने, द्वेषाने किंवा भीतीनेसुद्धा बुद्धिपूर्वक आपले मन एखाद्या ठिकाणी केंद्रित करील, तर त्याला त्या वस्तूचे स्वरूप प्राप्त होते. (२२)
कीटः पेशस्कृतं ध्यायन् कुड्यां तेन प्रवेशितः ।
याति तत्सात्मतां राजन् पूर्वरूपं असन्त्यजन् ॥ २३ ॥
अळिला कोंडिते भृंगी भयाने अळि चिंतिते । तद्रूप घडतो देह शरीर पालटे पहा ॥ २३ ॥
राजन् - राजा - कुड्या तेन प्रवेशित: कीट: - आपल्या घरकुलात जबरदस्तीने आणलेला कीटक - पेशस्कृतं ध्यायन् - कुंभारीण माशीच (भीतीने ध्यान करीत होत्साता - तत्सात्मतां याति - त्या कुंभारणीच्या स्वरूपाला प्राप्त होतो - पूर्वरूपं असन्त्यजन् - आपले मूळरूप न सोडता ॥९-२३॥
कुंभारमाशी एखाद्या किड्याला पकडून आणून त्याला भिंतीवरील मातीच्या घरात बंदिस्त करून टाकते बाहेरून वारंवार येऊन त्याला भूंभूं करून घाबरविते तिच्या भीतीने तिचेच चिंतन करीत करीत तो आपल्या पहिल्या शरीराचा त्याग न करताही तिच्यासारखाच होतो. (याप्रमाणे कोणत्याही प्रकारे का होईना, परमात्म्याचे सतत चिंतन केल्याने मनुष्यसुद्धा परमात्म्याला प्राप्त करतो, हे ज्ञान किड्याकडून घ्यावे). (२३)
एवं गुरुभ्य एतेभ्य एषा मे शिक्षिता मतिः ।
स्वात्मोपशिक्षितां बुद्धिं श्रृणु मे वदतः प्रभो ॥ २४ ॥
एवढ्या गुरुचे मी ते शिकलो नृपती पहा । स्वदेहा कडुनी जे जे शिकलो तेहि सांगतो ॥ २४ ॥
एवं - याप्रकारे - एतेभ्य: गुरुभ्य: - ह्या ह्या गुरूंपासून - एषा मति: मे शिक्षिता - हा निरनिराळा धडा मी शिकलो - प्रभो - राजेश्वरा - स्वात्मोपशिक्षितां बुद्धिं - माझ्या स्वत:पासून मी कोणता धडा घेतला ते - वदत: मे श्रृणु - मी सांगतो ते ऐक ॥९-२४॥
राजन ! अशा प्रकारे मी इतक्या गुरूंकडून हे ज्ञान घेतले आता, मी आपल्या शरीराकडून जे शिकलो, ते तुला सांगतो नीट ऐक. (२४)
( वसंततिलका )
देहो गुरुर्मम विरक्तिविवेकहेतुः बिभ्रत् स्म सत्त्वनिधनं सततार्त्युदर्कम् । तत्त्वान्यनेन विमृशामि यथा तथापि पारक्यमित्यवसितो विचराम्यसङ्गः ॥ २५ ॥
( वसंततिलका ) दोन्हीहि ते मम गुरूच विवेक हेतू वैराग्यही शिकविते जगणे नि मृत्यू । हे साधने परि असे मिळण्यास तत्व हा नाशवंत म्हणुनी फिरतो निसंग ॥ २५ ॥
विरक्तिविवेकहेतु: - विरक्तीचा व वैराग्याचा कारक असणारा - देह: मम गुरु: - हा माझा देहच माझा गुरु आहे असे जाण - सततार्त्युदर्कं सत्वनिधनं बिभ्रत् स्म - नित्य वृद्ध होत जाणारे दु:ख हेच फल ज्याचे आहे असा उत्पत्ति व विनाश पावणारा असा हा देह वैराग्याचा हेतु होतो - अनेन तत्वानि यथा विमृशामि - याच्याच साह्याने मला ह्या विश्वातील तत्वे यथार्थ जाणता येतात - तथाऽपि - तरी सुद्धा - पारक्यं इति अवसित: - हा परक्याचा असा माझा निश्चय झाल्यामुळे - असङ्ग: विचरामि - नि:संगवृत्तीने वागतो ॥९-२५॥
माझा हा देहसुद्धा माझा गुरूच आहे हा मला वैराग्य आणि विवेकाचा उपदेश करतो याला जन्म व मरण असल्यामुळे याच्या पाठीशी दुःख सततचे लागलेलेच आहे या देहामुळेच मी तत्त्वचिंतन करत असलो तरी हा देह हिंस्त्र प्राणी, अग्नी इत्यादी दुसर्यांचाच आहे, असा निश्चय करून या देहाची आसक्ती सोडून मी वागत असतो. (२५)
जायात्मजार्थपशुभृत्यगृहाप्तवर्गान्
पुष्नाति यत्प्रियचिकीर्षुतया वितन्वन् । स्वान्ते सकृच्छ्रमवरुद्धधनः स देहः सृष्ट्वास्य बीजमवसीदति वृक्षधर्मा ॥ २६ ॥
जाया नि पुत्र पशु भृत्य नि आप्त वर्गा पोसावयास नित जीवचि कष्टतो की । आयू सरोनि मरतो दुसर्याच साठी वृक्षापरी उगवितो अति दुःखबीज ॥ २६ ॥
जायाऽऽत्मजाऽर्थपशुभृत्यगृहाऽऽप्तवर्गान् - दारा, पुत्र, धन, पशु, सेवक, गृह, आप्तेष्ट या सर्वजणांस - यत्प्रियचिकीर्षया - ज्या देहाचे प्रिय करण्याच्या इच्छेने - सकृच्छूरं - मोठ्या कष्टांनी - अवरुद्धधन: - ज्याने धन जपून ठेवले असते - स: देह: स्वान्ते अवसीदति - तोच देह मृत्युसमयी नाहीसा होतो - वृक्षधर्मा अस्य बीजं सृष्ट्वा - वृक्षाप्रमाणे पुढील जन्माचे बीज निर्माण करतो ॥९-२६॥
जो मनुष्य पत्नी, पुत्र, धनदौलत, पशू, सेवक, घर, आप्तेष्ट यांची वाढ करीत त्यांच्याकडून ज्या देहाला सुख मिळेल, अशी इच्छा बाळगून त्यांचे पालनपोषण करतो आणि अतिशय कष्ट करून धनसंचय करतो, तोच देह शेवटी, बी निर्माण करून झाडाने नष्ट व्हावे, त्याप्रमाणे आपल्या पुढच्या जन्मासाठी कर्मरूप बीज तयार करून मृत्यूला कवटाळतो. (२६)
जिह्वैकतोऽमुमपकर्षति कर्हि तर्षा
शिश्नोऽन्यतस्त्वगुदरं श्रवणं कुतश्चित् । घ्राणोऽन्यतश्चपलदृक् क्व च कर्मशक्तिः बह्व्यः सपत्न्य इव गेहपतिं लुनन्ति ॥ २७ ॥
ओढीति त्या सवति जै नवर्यास भोगा तैसेचि कान जननेंद्रिय नाक डोळे । नी जीभही तनुस ओढितसेचि भोग ते गान भोग श्रवणा बघण्या रसादी ॥ २७ ॥
अमुं जिह्वा एकत: अपकर्षति - ह्या देहधारी जीवाला जीभ एकीकडे ओढते - कर्हि तर्षा - केव्हा तहान ओढते - शिश्न: अन्यत: - तर उपस्थ भलतीकडे ओढते - त्वक् उदरं श्रवणं कुतश्चित् - त्वचा, उदर, कर्ण, आपापल्या विषयांकडे ओढतात - घ्राण: अन्यत: - नाक तिसरीकडे - चपलदृक् कर्मशक्ति: क्व च - नेत्र व कर्मेंद्रिये आपल्या विषयासाठी कोणीकडे तरी - लुनन्ति - तोडतात व ओढीत असतात - बह्व्य: सपत्न्य: गेहपतिं लुनन्ति इव - अनेक सवती गृहपतीला, यजमानाला तोडतात व ओढतात त्याप्रमाणे इंद्रिये जीवाला खेचतात ॥९-२७॥
जसे एखाद्या माणसाला त्याच्या पुष्कळशा सवती पत्न्या आपापल्याकडे ओढून त्याला सतावतात, त्याचप्रमाणे देहाभिमानी जीवाला एकीकडे त्याची रसना खाद्यपदार्थांकडे ओढते तर कधी तहान सतावते, कधी एकीकडे जननेंद्रिय व्याकूळ करते, तर दुसरीकडे त्वचा, पोट, कान हे आपापल्या विषयांकडे खेचून घेतात नाक कधी सुगंधाकडे ओढते तर कधी चंचल डोळे रूप पाहण्यासाठी आकर्षित करतात कधी कम]द्रिये आपापल्या विषयांकडे ओढतात. (२७)
सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयाऽऽत्मशक्त्या
वृक्षान् सरीसृप पशून् खगदंशमत्स्यान् । तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय । ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देवः ॥ २८ ॥
पक्षी नि वृक्ष किटको जलप्राणि योनी निर्मोनिया हरिसी ना मुळि तोष झाला । माणूस निर्मि हरि तैं अति बुद्धियुक्ते ज्या ब्रह्मज्ञान कळते मग तोषला तो ॥ २८ ॥
अजया आत्मशक्त्या - अनादि ब्रह्मशक्ति जी माया तिच्या सहाय्याने - वृक्षान् सरीसृपान् खगदंशमत्स्यान् - वृक्ष, सरपटणारे सर्प, पशु, पक्षी, डांस, मत्स्य अशा - विविधानि पुराणि सृष्ट्वा - अनेक जीवांची अनेक प्रकारची शरीरे उत्पन्न करूनही - तै: तै: अतुष्टहृदय: - त्या त्या उत्पत्तीने संतोष झाला नाही ज्याचा असा - देव: - ईश्वर जो त्याने - ब्रह्मावलोकधिषणं पुरुषं विधाय - ब्रह्माचे अपरोक्ष दर्शन घेण्याला समर्थ आहे बुद्धी ज्याची असा मनुष्य देह उत्पन्न केला तेव्हा - मुदं आप - त्याला संतोष झाला ॥९-२८॥
भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्ती असलेल्या मायेद्वारे झाडे, सरपटणारे प्राणी, पशू, पक्षी, डास, मासे अशा अनेक प्रकारच्या योनी निर्माण केल्या, परंतु त्यांपासून त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी मनुष्यशरीराची निर्मिती केली ब्रह्माचा साक्षात्कार करून घेऊ शकणार्या बुद्धीने युक्त अशा याची रचना केल्यावर त्यांना आनंद झाला. (२८)
लब्ध्वा सुदुर्लभमिदं बहुसंभवान्ते
मानुष्यमर्थदमनित्यमपीह धीरः । तूर्णं यतेत न पतेदनुमृत्यु यावन् निःश्रेयसाय विषयः खलु सर्वतः स्यात् ॥ २९ ॥
ही माणुसी तनु तशी अति दुर्लभा की । तैं मोक्षकार्य करणे अतिशीघ्र जीवे ॥ भंगूर देह समजा, विषयार्थ भोग । कोण्याहि योनि मिळती नच मेळवावे ॥ २९ ॥
बहुसम्भावन्ते - अनेक योनींच्या शेवटी - इदं सुदुर्लभं - हे दुष्प्राप्य - अनित्यं अपि अर्थदं - अशाश्वत असूनही मोक्ष हा पुरुषार्थ देण्याला असमर्थ असणारे - मानुष्यं - मनुष्यपण - लब्ध्वा - लाभले आहे य़ास्तव - यावत् मृत्यु अनु न पतेत् - जोपर्यंत मृत्यूच्या मुखात पूर्णपणे गेले नाहीत तोवर - तूर्णं - लवकर लवकर - धीर: नि:श्रेयसाय इह यतेत - शहाणा जो पुरुष त्याने मोक्षासाठी येथेच दीर्घ प्रयत्न करावा - विषय: खलु सर्वत: स्यात् - नश्वर विषयांचा उपभोग वाटेल त्या योनीत मिळतोच ॥९-२९॥
अत्यंत दुर्लभ असणारे हे मनुष्यशरीर पुष्कळ जन्मांनंतर मिळालेले आहे याच्यामुळे परम पुरूषार्थाची प्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर हे नाशही पावणारे आहे, हे जाणून जोवर मृत्यूने त्याला आपल्या कवेत घेतले नाही, तोवरच शहाण्याने तत्काळ आपल्या परम कल्याणासाठी प्रयत्न करावेत कारण विषयभोग तर सर्वत्र मिळतात. (२९)
( अनुष्टुप् )
एवं सञ्जातवैराग्यो विज्ञानालोक आत्मनि । विचरामि महीमेतां मुक्तसङ्गोऽनहङ्कृतिः ॥ ३० ॥
( अनुष्टुप् ) असे वैराग्य ते झाले हृदयीं दीप पेटले । नाहंकार न आसक्ती आनंदे मुक्त हिंडतो ॥ ३० ॥
एवं - अशाप्रकारे - सञ्जातवैराग्य: - वैराग्य उत्पन्न झालेला - आत्मनि विज्ञानाऽऽलोक: - आत्मस्वरूपातच ब्रह्मात्मैक्याचा प्रकाश प्रगट झालेला मी - मुक्तसङ्ग: अनहंकृति: - नि:संग व निरभिमानी होत्साता - एतां महीं विचरामि - आत्मस्वरूपात राहून ह्या पृथ्वीवर संचार करतो आहे ॥९-३०॥
अशा प्रकारे मला वैराग्य प्राप्त झाले अंतःकरणामध्ये विज्ञानाचा प्रकाश पसरला त्यामुळे मी अहंकार व आसक्ती सोडून या पृथ्वीवर स्वच्छंदपणे वावरतो. (३०)
न ह्येकस्मात् गुरोर्ज्ञानं सुस्थिरं स्यात् सुपुष्कलम् ।
ब्रह्मैतत् अद्वितीयं वै गीयते बहुधर्षिभिः ॥ ३१ ॥
यथेष्ट बोध ना लाभे एकट्या गुरुच्या कडे । बुद्धिने शोधिणे अन्य, ब्रह्मा गाती ऋषीश्वर ॥ ३१ ॥
एकस्मात् गुरो: - एकाच गुरुपासून - सुस्थिरं सुपुष्कलं ज्ञानं न हि स्यात् - चिरस्थायी व मोक्षफल देणारे ज्ञान प्राप्त होत नाही. ऋषिभि: - अनेक मंत्रदृष्ट्या ऋषींनी - एतत् अद्वितीयं ब्रह्म - हे अद्वितीय ब्रह्म म्हणजे त्याचे स्वरूप - बहुधा गीयते वै - अनेक प्रकारांनी गायिले आहे ॥९-३१॥
म्हणून एकाच गुरूकडून पुष्कळ ज्ञान मिळाले, तरी ते उत्तम ठसत नाही कारण एकाच अद्वितीय अशा ब्रह्माबद्दल ऋषींनी अनेक प्रकारे वर्णन केले आहे. (३१)
श्रीभगवानुवाच -
इत्युक्त्वा स यदुं विप्रः तं आमन्त्र्य गभीरधीः । वन्दितोऽभ्यर्थितो राज्ञा ययौ प्रीतो यथागतम् ॥ ३२ ॥ अवधूतवचः श्रुत्वा पूर्वेषां नः स पूर्वजः । सर्वसङ्गविनिर्मुक्तः समचित्तो बभूव ह ॥ ३३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले- गंभीरबुद्धि दत्ताने यदुरायासि बोधिले । वंदिता पूजिता गेले प्रसन्न दत्त तेथुनी ॥ ३२ ॥ आमचे पूर्वजो राजे यदू तो बोध ऐकता । विरक्त जाहले चित्ती समदर्शी तसेचि ते ॥ ३३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नववा अध्याय हा ॥ ॥ ११ ॥ ९ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
इति उक्त्वा - असे भाषण करून - स: गभीरधी: विप्र: - तो अगाध बुद्धीचा विप्र म्हणजे श्री दत्त - तं यदुं आमन्त्र्य - त्या यदुराजाचा निरोप घेता झाला - राज्ञा वन्दित: अभ्यर्थित: - यदुराजाने सत्कारून नम्रतापूर्वक वंदिले होते ज्याला असा श्री दत्त - प्रीत: - प्रसन्न मनाने - यथागतं ययौ - यदृच्छेने आला तसाच जाता झाला ॥९-३२॥
अवधूतवच: श्रुत्वा - श्री दत्त अवधूताचे भाषण ऐकल्यानंतर - न: पूर्वेषां पूर्वज: स: - आमच्या पूर्वजांचा पूर्वज तो यदु राजा - सर्वसङ्गविनिर्मुक्त: - सर्व संगांचा परित्याग करून - समचित्त: बभूव ह - समबुद्धीने पहाणारा झाला ॥९-३३॥
श्रीकृष्ण म्हणाले - धीर गंभीर अशा त्या अवधूत दत्तात्रेयांनी राजा यदूला असा उपदेश केला यदूनेही त्यांना वंदन करून प्रार्थना केली नंतर दत्तात्रेय प्रसन्नचित्ताने आपल्या इच्छेनुसार तेथून निघून गेले आमच्या पूर्वजांचे सुद्धा पूर्वज असलेल्या यदूंनी अवधूतांचे हे म्हणणे ऐकून सर्व आसक्तींपासून आपली सुटका करून घेतली आणि ते समदर्शी झाले. (३२-३३)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |