श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द अकरावा
अष्टमोऽध्यायः

अवधूतस्य अजगरादि नवगुरूणां वर्णनम् -

अवधूतोपाख्यान - अजगर ते पिंगलेपर्यंत नऊ गुरूंची कथा -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीब्राह्मण उवाच -
( अनुष्टुप् )
सुखं ऐन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च ।
देहिनां यद् यथा दुःखं तस्मान् नेच्छेत तद्‍बुधः ॥ १ ॥
अवधूत दत्तात्रेय सांगतात-
( अनुष्टुप्‌ )
इच्छा न करिती प्राणी न रोधिती तयास ते ।
पूर्वकर्मामुळे स्वर्ग नरक मिळतो पहा ॥
बुद्धिवंते प्रयत्‍नो वा इच्छा तैशा करू नये ॥ १ ॥

राजन् - राजा - यत् - ज्याअर्थी - देहिनां यथा दु:खं (तथैव) - देहधारी जीवास जसे इंद्रियांसंबंधी दु:ख त्याप्रमाणेच - स्वर्गे नरके एव च - स्वर्गात व नरकातही - ऐन्द्रियं सुखं - इंद्रियांसंबंधाचे सुख - तस्मात् - म्हणून - बुध: तत् न इच्छेत - शहाण्या माणसाने त्या इंद्रियसुखाची इच्छा करूच नये ॥८-१॥
अवधूत म्हणतात हे राजन ! प्राण्यांना इद्रियांचे दुःख जसे स्वर्गात व नरकातही मिळते, त्याचप्रमाणे सुखही मिळते म्हणून बुद्धिमान माणसाने त्याची इच्छा धरू नये. (१)


ग्रासं सुमृष्टं विरसं महान्तं स्तोकमेव वा ।
यदृच्छयैव आपतितं ग्रसेत् आजगरोऽक्रियः ॥ २ ॥
न मागे अथवा नेच्छी मिळता खाय जो सुखे ।
अजगरापरी वॄत्ती निर्वाहा असणे बरी ॥ २ ॥

सुमृष्टं विरसं ग्रासं - मधुर अथवा नीरस अन्न - महान्तं स्तोकं एव वा - पुष्कळ असो वा थोडे असो - यदृच्छया एव आपतितं - जे काही सहजगत्या पुढे आलेले असेल ते - ग्रसेत् - खाऊन टाकावे - अक्रिय: आजगर: (एकमेव) - स्वस्थ पडून रहाणारा अजगर असेच करतो ॥८-२॥
प्रयत्‍न न करता योगायोगाने जे अन्न मिळते, ते खाऊनच योग्याने अजगराप्रमाणे जीवननिर्वाह करावा मग ते चविष्ट असो की बेचव अधिक असो की कमी. (२)


शयीताहानि भूरीणि निराहारोऽनुपक्रमः ।
यदि न उपनमेद् ग्रासो महाहिरिव दिष्टभुक् ॥ ३ ॥
न मिळे राहणे तेंव्हा प्रारब्धे तोष मानणे ।
उपासी राहणे होता संतोष मानणे तसा ॥ ३ ॥

यदि ग्रास: न उपनमेत् - काही अन्न वाढून आलेच नाही - महाहि: इव दिष्टभुक् - मोठ्या सर्पाप्रमाणे अयाचित खाद्य खाणार्‍या मुनीने - अनुपक्रम: - कसलीही खटपट न करता - निराहार: भूरिणि अहानि शयीत - पुष्कळ दिवस निराहारच स्वस्थ पडून रहावे ॥८-३॥
पुष्कळ दिवस भोजन मिळाले नाही, तरीसुद्धा त्यासाठी काही प्रयत्‍न न करता तो प्रारब्धाचा भोग समजून आहार न घेता अजगराप्रमाणे पडून राहावे. (३)


ओजःसहोबलयुतं बिभ्रद् देहं अकर्मकम् ।
शयानो वीतनिद्रश्च नेहेतेन्द्रियवानपि ॥ ४ ॥
मन इंद्रिय नी देह बळे निश्चेष्ट राहणे ।
पडावे नसुनी निद्रा सापाचे शिकलो पहा ॥ ४ ॥

ओज:सहोबलयुतं देहं - बळकट व कार्यक्षम इंद्रिये व मन यांनी संपन्न असलेल्याही देहाला - अकर्मकं बिभ्रत् - निष्क्रिय ठेऊन - शयान: वीतनिद्र: च - शय्येवर पडलेला पण झोपी न गेलेला असावा - इन्द्रियवान् अपि न ईहेत - इंद्रियांचे बल व मनोबल यांसह युक्त असला तरी मुनीने कर्मेच्छा करू नये ॥८-४॥
मनोबळ, इंद्रियबळ व शारीरिक बळ या तिन्हींनी युक्त असूनही तसेच इंद्रियांमध्ये कार्य करण्याची क्षमता असूनही देहाने काम न करता झोपल्यासारखे पडून राहावे परंतु सजग असावे. (अजगरापासून, सुखासाठी प्रयत्‍न न करणे, मिळेल ते खाणे, दैवावर विसंबून राहाणे, हे गुण घ्यावेत). (४)


मुनिः प्रसन्नगंभीरो दुर्विगाह्यो दुरत्ययः ।
अनन्तपारो ह्यक्षोभ्यः स्तिमितोद इवार्णवः ॥ ५ ॥
समुद्रे शिकवीले ते गंभीर्य नि प्रसन्नता ।
अथांगहि असोनीया निमीत्ते क्षोभ ना भरो ।
भरती लाट ना व्हावी प्रशांत नित राहणे ॥ ।५ ॥

मुनि: - मुनि जो त्याने - प्रसन्नगम्भीर: दुर्विगाह्य: दुरत्यय: - आनंदी परमार्थी, थांग न लागणारा आणि दुर्लंघ्य म्हणजे अजिंक्य असावे - अनन्तपार: अक्षोभ्य: स्मितिमोद: अर्णव: इव हि - समुद्राप्रमाणे अफाट, निर्विकार आणि शांत व निश्चल असेच ॥८-५॥
निश्चल समुद्र बाहेर प्रसन्न आणि आत गंभीर असतो तो अथांग असतो तो ओलांडता येत नाही त्याचा अंत लागणे कठीण आहे त्याला प्रक्षुब्ध करता येत नाही त्याचप्रमाणे मुनी बाहेरून प्रसन्न पण आतून गंभीर असतो तो कसा आहे, हे कोणाला कळत नाही तेजामुळे कोणाला त्याच्यावर मात करता येत नाही त्याचा अंतपार कोणाला लागत नाही आणि विकारांनी तो विचलित होत नाही. (५)


समृद्धकामो हीनो वा नारायणपरो मुनिः ।
नोत्सर्पेत न शुष्येत सरिद्‌भिः इव सागरः ॥ ६ ॥
न वाढे पावसाळ्यात उन्हाने नच आटतो ।
प्रपंची हर्ष वा दुःख न व्हावे भक्त राजसा ॥ ६ ॥

सागर: - महासमुद्र - सरिद्भि: न उत्सर्पेत, न शुष्येत - भरलेल्या नद्या आत आल्या म्हणून वाढत नाही, किंवा त्यांचे पाणी आटले म्हणून रिकामा होत नाही - इव - त्याप्रमाणे - नारायणपर: मुनि: - श्रीपरमेश्वराचा एकनिष्ठ भक्त अशा मुनीने - समृद्धकाम: हीन: वा (न हृष्येत् नच शोचेत्) - आपल्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणून अत्यानंदी किंवा इच्छा शेवटास गेली नाही म्हणून खिन्न होऊ नये ॥८-६॥
समुद्राला नद्यांचे पाणी येऊन मिळले, तरीसुद्धा तो वाढत नाही आणि नाही मिळाले, तरी तो आटत नाही त्याचप्रमाणे भगवत्परायण मुनीसुद्धा समृद्धीने युक्त असला तरी आनंदाने हुरळून जात नाही आणि दारिद्रय असले तरी दुःखी होत नाही. (समुद्रापासून धीरगंभीरता आणि सुखदुःखात एकरूपता हे गुण घ्यावेत). (६)


दृष्ट्वा स्त्रियं देवमायां तद्‌भावैः अजितेन्द्रियः ।
प्रलोभितः पतत्यन्धे तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥ ७ ॥
अग्नीत पडतो लोभे पतंग वश होऊनी ।
स्त्रियांना पाहता लोक सत्यनाशचि पावती ॥ ७ ॥

अजितेन्द्रिय: - इंद्रिये स्वाधीन नसणारा पुरुष - देवमायां स्त्रियं दृष्ट्वा - देवांच्या फसव्या मायेचाच अवतार असणारी स्त्री पाहून - तद्भावै: प्रलोभित: - तिच्या शृंगारिक हावभावांनी वेडावलेला होत्साता - अग्नौ पङ्गवत् - अग्नीच्या ज्वालांनी मोहित झालेल्या पतंगाप्रमाणे - अन्धे तमसि पतति - गाध अंधकारात पडतो ॥८-७॥
ज्याप्रमाणे पतंग आगीच्या मोहात सापडून आगीवर झेप घेऊन मरतो, त्याचप्रमाणे इंद्रिये ताब्यात नसणारा मुनी देवमायारूपी स्त्रीला पाहून तिच्या विलासांना भुलून घोर नरकात पडतो. (७)


( मिश्र )
योषिद्धिरण्याभरणाम्बरादि
     द्रव्येषु मायारचितेषु मूढः ।
प्रलोभितात्मा ह्युपभोगबुद्ध्या
     पतङ्गवत् नश्यति नष्टदृष्टिः ॥ ८ ॥
( इंद्रवज्रा )
जो कामिनी कांचन वस्त्र यांच्या
     मायेत गुंते फसतो पहा तो ।
लाचार होती मन वृत्ति सार्‍या
     नी तो पतंगापरि नष्ट होतो ॥ ८ ॥

मायारचितेषु योषिद्धिरण्याभरणाम्बरादिद्रव्येषु - मोहक मायेने निर्मिलेली सुंदर स्त्री तिच्या अंगावरील सुवर्णाचे अलंकार, तिचे वस्त्र, तिचे अंगराग, इत्यादि पदार्थांचे ठायी - प्रलोभिताऽत्मा मूढ: - लुब्ध झाले आहे अंत:करण ज्याचे असा वेडा पुरुष - उपभोगबुद्ध्या नष्टदृष्टि: - उपभोगाची लालसा बळावल्यामुळे नष्टदृष्टि म्हणजे विवेकशून्य आंधळा - पतङ्गवत् नश्यति हि - अगदी पतंगाप्रमाणे ठार बुडतो ॥८-८॥
स्त्री, सुवर्ण, अलंकार, वस्त्रे इत्यादी मायेने निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये उपभोगबुद्धीने आसक्त झालेला मूर्ख मनुष्य आपला विवेक घालवून बसतो आणि त्या पतंगाप्रमाणे स्वतः त्यांमध्ये पडून आपला सर्वनाश करून घेतो. (मायानिर्मित पदार्थांमध्ये आसक्त होऊ नये, ही शिकवण पतंगापासून घ्यावी). (८)


( अनुष्टुप् )
स्तोकं स्तोकं ग्रसेद् ग्रासं देहो वर्तेत यावता ।
गृहान् अहिंसन् आतिष्ठेद् वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥ ९ ॥
( अनुष्टुप्‌ )
थोडे थोडेचि मागोनि निर्वाह करणे तसा ।
संन्याशाने गृहस्थांना न द्यावा त्रास तो कधी ॥
भुंग्याच्या परि ते व्हावे पुष्पगंधास मेळिणे ॥ ९ ॥

यावता देह: वर्तेत - जोपर्यंत देह उभा आहे - गृहान् अहिंसन् - कोणत्याही गृहाला म्हणजे गृहस्थाला पीडा न देता - मुनि: - साधक मुनीने - माधुकरीं वृत्तिं आतिष्ठेत् - भ्रमराची वृत्ती स्वीकारून - स्तोकं स्तोकं ग्रासं ग्रसेत् - थोड्या थोड्या अन्नाची भिक्षा मागून निर्वाह करावा ॥८-९॥
भ्रमर जसा अनेक फुलांमधील रस त्यांना पीडा न देता ग्रहण करतो, त्याचप्रमाणे मुनीने थोडेथोडे अन्न काही घरातून माधुकरी मागून आणावे त्यायोगे शरीरनिर्वाहही होईल आणि देणार्‍यालाही कष्ट वाटणार नाहीत. (९)


अणुभ्यश्च महद्‍भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः ।
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ॥ १० ॥
सान थोर फुलां मध्ये भृंग तो मधु घेतसे ।
चतुरे सर्व शास्त्राचा रस तो चाखणे पहा ॥ १०

पुष्पेभ्य: षट्पद: इव - सहा चरणांचा भ्रमर जसा पुष्पांमधून मध घेतो त्याप्रमाणे - कुशल: नर: - चतुर आणि विवेकी पुरुषाने - अणुभ्य: व महद्भ्य: च शास्त्रेभ्य: - लहान व मोठमोठ्या शास्त्रांतून - सर्वत: - सर्व तर्‍हेने - सार: आदद्यात् - सारभाग ग्रहण करीत असावे ॥८-१०॥
भ्रमर जसा सर्व तर्‍हेच्या फुलांमधून रसरूप सार ग्रहण करतो, त्याप्रमाणे कुशल मुनीने सर्व लहानमोठ्या शास्त्रांतून सार ग्रहण करावे. (१०)


सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षितम् ।
पाणिपात्रोदरामत्रो मक्षिकेव न सङ्ग्रही ॥ ११ ॥
सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षुकः ।
मक्षिका इव सङ्गृह्णन् सह तेन विनश्यति ॥ १२ ॥
मधमाशांकडोनिया शिकलो संग्रहो नको ।
फसती मधमाशा त्या संन्याश्या संग्रहो नको ॥ ११
संन्याशाने शिकावे की मुळीच संग्रहो नको ।
करिता संग्रहो जायी जीवही तो तया सवे ॥ १२

सायंतनं श्वस्तनं वा - सायंकाळासाठी किंवा किंवा दुसरे दिवसासाठी - भिक्षितं - भिक्षान्नाचा - न संगृह्णीत - संग्रह करू नये - पाणिपात्रोदरामत्र: - तळहाताचे पात्र करून तितकेच अन्न भक्षिणारा किंवा उदर हेच अमत्र म्हणजे पात्र करणारा असा भिक्षु असावा - मक्षिका इव न संग्रही - मधुमक्षिकेप्रमाणे संग्रह करू नये ॥८-११॥
भिक्षुक: - भिक्षुक - मक्षिका इव संगृह्णन् - मधमाशीप्रमाणे संग्रह करणारा - सह तेन - त्या संग्रहासह - विनश्यति - नाश पावतो ॥८-१२॥
मुनीने सायंकाळसाठी किंवा दुसर्‍या दिवसासाठी भिक्षान्न शिल्लक ठेवू नये भिक्षा घेण्यासाठी पात्राऐवजी फक्त हात आणि ठेवण्यासाठी फक्त पोटच असावे मधमाशीने मध साठवला तर मधासह तिचाही नाश होतो म्हणून मुनीने कोणत्याही तर्‍हेचा संग्रह करू नये. (मधमाशीपासून पुढील गुण घ्यावेत माधुकरी मागावी, शास्त्रांचे तात्पर्य घ्यावे संग्रह करू नये). (११-१२)


पदापि युवतीं भिक्षुः न स्पृशेद् दारवीमपि ।
स्पृशन् करीव बध्येत करिण्या अङ्गसङ्गतः ॥ १३ ॥
हत्ती हत्तिणिसी मोहे फसे त्याचे कडोनिया ।
शिकलो लाकडाच्याही स्त्रियेस नच स्पर्शिणे ॥ १३

पदा अपि - पायाने सुद्धा - दारवीं अपि युवतीं - लाकडाची स्त्री बाहुली असली तरी तिलाही - भिक्षु: न स्पृशेत् - भिक्षु मुनीने स्पर्श करू नये - स्पृशन् - स्पर्श करणारा - करिण्या अंगसंगत: करीव - हत्तीणीशी अंगस्पर्श केल्यामुळे बद्ध होणार्‍या हत्तीप्रमाणे - बद्ध्येत - बद्ध होतो ॥८-१३॥
मुनीने अगदी लाकडाच्या स्त्रीलासुद्धा कधीही पायानेही स्पर्श करू नये, नाहीतर लाकडी हत्तिणीमध्ये आसक्त झालेला हत्ती ज्याप्रकारे बांधला जातो, त्याचप्रमाणे हाही मोहात पडतो. (१३)


नाधिगच्छेत् स्त्रियं प्राज्ञः कर्हिचित् मृत्युमात्मनः ।
बलाधिकैः स हन्येत गजैरन्यैर्गजो यथा ॥ १४ ॥
विवेकी पुरुषाने स्त्री भोगरूप बघू नये ।
स्वीकारिती बलवंत मारिती त्यास ठार की ॥ १४ ॥

गज: बलाधिकै: अन्यै: गजै: यथा - जास्त बलवंत दुसर्‍या हत्तीकडून जसा एक हत्ती - स: प्राज्ञ: - तो साधक बुद्धिमंत - हन्येत - मारला जाईल - स्त्रियं - स्त्रीची गाठ - कर्हिचित् न अधिगच्छेत् - केव्हाही घेऊ नये - (तां) आत्मन: मृत्युं विजानीयात् - ती गाठ म्हणजे आपला मृत्यूच समजावा ॥८-१४॥
आपला साक्षात मृत्यू अशा स्त्रीला विवेकी पुरूषाने कधीही जवळ करू नये कारण हत्तिणीमध्ये आसक्त झालेला हत्ती दुसर्‍या बलवान हत्तींकडून मारला जातो, त्याचप्रमाणे हासुद्धा मृत्यूची शिकार होतो. (हत्तीपासून, स्त्रीसंग वर्ज्य करावा, ही शिकवण घ्यावी). (१४)


न देयं नोपभोग्यं च लुब्धैर्यद् दुःखसञ्चितम् ।
भुङ्क्ते तदपि तच्चान्यो मधुहेवार्थविन्मधु ॥ १५ ॥
मध गोळा करी भिल्ल तयाचे शिकलो असे ।
संग्रहो करिता द्रव्यां भोगिती दुसरेच की ॥ १५ ॥

यथा लुब्धै: दु:खसञ्चितं - ज्याचा मोठे दु:ख कष्ट सहन करून लोभ्याकडून संग्रह होतो ते - न देयं न उपभोग्यं च - त्याचे दान करवत नाही आणि त्याचा उपभोगही घेववत नाही - तत: च अन्य: अपि भुङ्क्ते - तो संग्रह दुसराच कोणीतरी लुटून नेतो - अर्थवित् मधुहा तत् मधु इव - तो मधमाशांनी जमवलेला मध भलताच चाणाक्ष हरण करणारा घेऊन जातोच की नाही ॥८-१५॥
लोभी मनुष्य कष्टाने साठवलेले धन कोणाला देत नाही की, स्वतः त्याचा उपभोग घेत नाही त्याच्याकडील धनाची माहिती असणारा दुसराच कोणीतरी ते घेतो जसे पोळ्यांतील मध काढणारा मनुष्य मधमाशांनी साठवलेला मध आपण घेतो. (१५)


सुदुःखोपार्जितैः वित्तैः आशासानां गृहाशिषः ।
मधुहेवाग्रतो भुङ्क्ते यतिर्वै गृहमेधिनाम् ॥ १६ ॥
धमहारी मधा नेई माश्यांनी जो न सेविला ।
कष्टाने मिळवी जीव संन्याशी द्विज भक्षिती ॥ १६ ॥

मधुहा इव - मध गोळा करणारा भिल्ल जसा - अग्रत: - पहिलाच - यति: - संन्यासी किंवा ब्रह्मचारी - सुदु:खोपार्जितै: वित्तै: - कष्ट करून मिळवलेल्या द्रव्याच्या सहाय्याने - आशासानां गृहमेधिनां गृहाशिष: - आपल्यास सुख मिळेल अशी आशा करणार्‍या गृहस्थांच्या येथील सिद्ध केलेले पदार्थ - भुङ्क्ते वै - उपभोगितात ॥८-१६॥
ज्याप्रमाणे मधमाशांनी मोठ्या कष्टाने जमा केलेला मध त्यांच्या आधीच मध काढणारा मनुष्य खातो, त्याप्रमाणे गृहस्थांनी मोठ्या कष्टाने मिळविलेल्या पैशांतून तयार केलेले अन्नपदार्थ त्यांच्या आधीच संन्यासी उपभोगतो. (मध गोळा करणार्‍याकडून मिळालेली शिकवणधनासाठी कष्ट न करताही उदरनिर्वाह होऊ शकतो). (१६)


ग्राम्यगीतं न श्रृणुयाद् यतिर्वनचरः क्वचित् ।
शिक्षेत हरिणाद् बद्धान् मृगयोर्गीतमोहितात् ॥ १७ ॥
संन्याशाने न ऐकावे विषयी गीत ते कधी ।
व्याधगीतास ऐकोनी हरीण फसतो पहा ॥ १७ ॥

वनचर: यति: - वनात रहाणार्‍या यतीने - क्वचित् - केव्हाही - ग्राम्यं गीतं न शृणुयात् - शृंगारविषयक गीत ऐकू नये - मृगयो: - हरिणांची पारध करणार्‍या शिकार्‍याचे - गीतमोहितात् बद्धात् हरिणात् - गाण्यांनी मूढ होऊन बद्ध झालेल्या हरिणापासून - शिक्षेत - शिकावे ॥८-१७॥
हरिणापासून मी हे शिकलो की, वनवासी संन्याशाने विषयांसंबंधीचे गाणे कधीही ऐकू नये व्याधाच्या गीताने मोहित होऊन बांधल्या जाणार्‍या हरिणाकडून हे शिकावे. (१७)


नृत्यवादित्रगीतानि जुषन् ग्राम्याणि योषिताम् ।
आसां क्रीडनको वश्य ऋष्यश्रृङ्गो मृगीसुतः ॥ १८ ॥
स्त्रियांच्या नाचगाण्याने पाहता वश होउनी ।
बाहुले जाहला त्यांचे ऋष्यश्रृंग भृगोसुत ॥ १८ ॥

योषितां नृत्यवादित्रगीतानि - वेश्यांचे शृंगारिक नाचणे, वाद्ये वाजवणे व गाणे - जुषन् - आनंदाने ------ - मृगीसुत: ऋष्यशृङ्ग: - हरिणीपुत्र ऋष्यशृंग - आसावश्य: क्रीडनक: - --------त्यांस सर्वथा वश होऊन त्यांचे खेळणे झाला ॥८-१८॥
हरिणीपासून जन्मलेले ऋष्यश्रृंग मुनी स्त्रियांचे वैषयिक गाणेबजावणे, नाचणे इत्यादी पाहून, ऐकून त्यांना वश झाले आणि शेवटी त्यांच्या हातातील बाहुले बनले. (वैषयिक गीते ऐकू नयेत, ही शिकवण हरिणापासून घ्यावी). (१८)


जिह्वया-अति-प्रमाथिन्या जनो रसविमोहितः ।
मृत्युं ऋच्छति असद्‍बुधिः मीनस्तु बडिशैर्यथा ॥ १९ ॥
थोड्याशा अमिषे मासा गळां लागोनिया मरे ।
जिव्हेच्या वशि जो जाय तया मृत्यूचि तो पहा ॥ १९ ॥

बडिशै: - आमिष लावलेल्या गळांनी - असद्बुद्धि: मीन: तु यथा - मूर्ख मासा जसा - मृत्युं ऋच्छति - मृत्युप्रत जातो - अतिप्रमाथिन्या जिह्वया - अनावर जिव्हेमुळे - रसविमोहित: (असद्बुद्धि: जन: मृत्युं ऋच्छति) - रसलोलूप बुद्धिशून्य मनुष्य नाश पावतो ॥८-१९॥
मासा जसा गळाला लावलेल्या मांसाच्या तुकड्याच्या लोभाने आपले प्राण गमावतो, त्याचप्रमाणे चवदार पदार्थांचा लोभी निर्बुद्ध माणूससुद्धा मनाला व्याकूळ करणार्‍या आपल्या जिभेला वश होऊन मारला जातो. (१९)


इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः ।
वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥ २० ॥
जिव्हेला बांधिता शीघ्र वश ती अन्य इंद्रिये ।
तिला न आवरीता तो उपास व्यर्थची असे ॥ २० ॥

निराहारा: मनिषिण: - आहारादि वर्ज्य करणारे मनोविजयी मुनि - आशु - लवकर - इन्द्रियाणि जयन्ति - इतर इंद्रिये स्वाधीन करून घेतात - तु रसनं वर्जयित्वा - पण जिह्वेंद्रिय वगळून मात्र - तत् - ते रसनेंद्रिय निरन्नस्य वर्धते - आहार टाकला म्हणजे जास्त बलवान होते ॥८-२०॥
विवेकी लोक जेवण घेण्याचे बंद करून इतर इंद्रियांवर लवकर विजय मिळवितात; परंतु यामुळे जीभ ताब्यात येत नाही उलट भोजन घेणे बंद केल्यामुळे ती अधिकच खवळते. (२०)


तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् ।
न जयेद् रसनं यावत् जितं सर्वं जिते रसे ॥ २१ ॥
इंद्रिया निग्रहो होता सोडिता मोकळी जिव्हा ।
बलवान्‌ घडती सर्व विषयो तेचि की पुन्हा ॥ २१ ॥

यावत् रसनं न जयेत् - जोपर्यंत जिह्वा हातात आली नाही - तावत् - तोपर्यंत - विजितान्येन्द्रिय: पुमान् - नेत्रादि इतर इंद्रियांवर स्वामित्व गाजवणार्‍या पुरुषाला - जितेन्द्रिय: न स्यात् - जितेंद्रियत्व प्राप्त होत नाही - रसे जिते सर्वं जितं - रसना जिंकली की सर्व इंद्रिये जिंकलीच समजा ॥८-२१॥
माणसाने सर्व इंद्रियांवर विजय मिळविला तरी जोपर्यंत तो जिभेला ताब्यात ठेवत नाही, तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही कारण जीभ जिंकली तर सर्व इंद्रिये जिंकली, असे खुशाल समजावे. (जीभ जिंकणे महत्त्वाचे, हे माशापासून शिकावे). (२१)


पिङ्गला नाम वेश्याऽऽसीद् विदेहनगरे पुरा ।
तस्या मे शिक्षितं किञ्चित् निबोध नृपनन्दन ॥ २२ ॥
मिथिला नगरी मध्ये पूर्वी नामक पिंगला ।
होती वेश्या तिचे कांही शिकलो तेहि सांगतो ॥ २२ ॥

पुरा विदेहनगरे - पूर्वी विदेह म्हणजे मिथिला नगरीत - पिङ्गला नाम वेश्या आसीत् - पिंगला नावाची वेश्या रहात होती - नृपनन्दन - हे यदुराजा - तस्या: किञ्चित् मे शिक्षितं - तिच्यापासून मी जो एक धडा शिकलो तो - निबोध - ऐक ॥८-२२॥
हे राजन ! पूर्वी एकदा विदेहनगरात पिंगला नावाची वेश्या राहात होती मी तिच्याकडून जे शिकलो, ते तुला सांगतो. (२२)


सा स्वैरिण्येकदा कान्तं सङ्केत उपनेष्यती ।
अभूत्काले बहिर्द्वारि बिभ्रती रूपमुत्तमम् ॥ २३ ॥
स्वेच्छाचारी रुपवती एकदा सजली बहू ।
पुरुषा मेळवायाला दारात खूप थांबली ॥ २३ ॥

सा स्वैरिणी - ती उच्छृंखल वेश्या - एकदा - एका प्रसंगी - सङ्केते कान्तं उपनेष्यती - कोणा तरी रमणीय तरुणाला एकांत रतिस्थानी नेण्याचा संकल्प करून - उत्तमं रूपं बिभ्रती - उत्तम शृंगारिक अलंकार धारण करीत होत्साती सुंदर रूपवती झाली - काले - योग्यवेळी - बहिर्द्वारि अभूत् - दाराबाहेर उभी राहिली ॥८-२३॥
ती अतिशय सुंदर वेश्या एकदा रात्रीच्या वेळी एखाद्या पुरूषाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी नटूनथटून घराच्या बाहेरच्या दारात उभी राहिली. (२३)


मार्ग आगच्छतो वीक्ष्य पुरुषान् पुरुषर्षभ ।
तान् शुल्कदान् वित्तवतः कान्तान् मेनेऽर्थकामुका ॥ २४ ॥
न इच्छि पुरुषा ती तो धनाची कामना धरी ।
येती जाती तिला भासे धनकू ग्राहको तसा ॥ २४ ॥

पुरुषर्षभ - पुरुषश्रेष्ठ राजा - मार्गे आगच्छत: पुरुषान् वीक्ष्य - मार्गाने येणारे जाणारे पुरुष पाहून - अर्थकामुका - द्रव्यलोभी अशा त्या वेश्येला - तान् - ते सर्व पुरुष - वित्तवत: शुल्कदान् कान्तान् मेने - श्रीमंत, रतिमूल्य देणारे आणि सुंदर होते असे वाटले ॥८-२४॥
हे पुरूषश्रेष्ठा ! पैशाची लालसा असलेल्या तिला वाटेतून येणार्‍या जाणार्‍या पुरूषांना पाहून ते धनवान असून धन देऊन आपला प्रियकर होण्यासाठी येत आहेत, असे वाटे. (२४)


आगतेषु अपयातेषु सा सङ्केतोपजीविनी ।
अप्यन्यो वित्तवान् कोऽपि मामुपैष्यति भूरिदः ॥ २५ ॥
रस्त्याने चालती जे ते सर्वची धन वाटती ।
वाटले खूप ते द्रव्य देता जाईल आपणा ॥ २५ ॥

आगतेषु अपयातेषु - ते आलेले पुरुष काही न बोलता आपापल्या वाटेने गेले असे पाहिल्यानंतर - सा सङ्केतोपजीविनी - संकेताने करार ठरवून देहविक्रय करणारी ती पिंगला चिंतू लागली की - अन्य: क: अपि भूरिद: वित्तवान् - आणखी दुसरा कोणी तरी पैसे उधळणारा श्रीमंत - मां उपैष्यति अपि - रतिसंगासाठी माझ्याकडे खासच येईल ॥८-२५॥
अनेक पुरूष येऊन निघून गेले, तरी त्या वेश्येला वाटे की, आणखी एखादा धनवान माणूस आपल्याकडे येईल व तो आपल्याला पुष्कळ धन देईल. (२५)


एवं दुराशया ध्वस्त निद्रा द्वार्यवलम्बती ।
निर्गच्छन्ती प्रविशती निशीथं समपद्यत ॥ २६ ॥
दुराशा वाढली खूप दारात खूप थांबली ।
उडाली झोप ती सारी आत बाहेर होतसे ॥
प्रकार जाहला ऐसा अर्धी रात्र सरे तशी ॥ २६ ॥

एवं - याप्रमाणे - दुराशया ध्वस्तनिद्रा - दुराशेने जिची झोप उडून गेली अशी ती पिंगला - द्वारि अवलम्बती, निर्गच्छान्ती, प्रविशती - काही वेळ दारात उभी राही, काही वेळ आत जाई आणि पुन्हा बाहेर येई - निशीथं समपद्यत - अर्धरात्र उअलटून गेली ॥८-२६॥
अशी खोटी आशा बाळगून झोपमोड झालेली ती दरवाजाजवळ ताटकळत उभी होती ती कधी बाहेर येई तर कधी आत जाई होता होता मध्यरात्र झाली. (२६)


तस्या वित्ताशया शुष्यद् वक्त्राया दीनचेतसः ।
निर्वेदः परमो जज्ञे चिन्ताहेतुः सुखावहः ॥ २७ ॥
वाईट धन इच्छा ती धनाची वाट पाहता ।
सुकोनी व्याकुळा झाली वॄत्तीं वैराग्य जाहले ॥ २७ ॥

वित्ताशया शुष्यद्वक्त्राया: - द्रव्याशेने जिची जीभ कोरडी झाली आहे अशी ती - दीनचेतस: तस्या: - आणि जिचे अंत:करण खिन्न झाले आहे अशा तिला - परम: निर्वेद: जज्ञे - उत्तमोत्तम वैराग्य उत्पन्न झाले - चिन्ताहेतु: सुखावह: - द्रव्याची चिंता हीच सुख देणारी विरक्ती उत्पन्न करिती झाली ॥८-२७॥
पैशाच्या आशेने चेहरा सुकून गेला चित्त व्याकूळ झाले आणि तिच्या मनात तीव्र वैराग्य निर्माण झाले तिच्या चिन्तेचे कारणच तिच्या सुखाला कारणीभूत ठरले. (२७)


तस्या निर्विण्णचित्ताया गीतं श्रृणु यथा मम ।
निर्वेद आशापाशानां पुरुषस्य यथा ह्यसिः ॥ २८ ॥
वैराग्य जाहले तेंव्हा तिने जे गीत गायिले ।
सांगतो तुजसी राजा वैराग्यशास्त्रची असे ॥
आशेच्या सर्व त्या गाठी वैराग्यें तुटती पहा ॥ २८ ॥

निर्विण्णचित्ताया: तस्या: - विषयसुखाचा वीट येऊन नैराश्य प्राप्त झालेल्या तिने - यथा गीते - जे गीत गायिले ते तसेच्या तसेच - मम श्रृणु - मजपासून ऐक - पुरुषस्य आशापाशानां - पुरुषाला बद्ध करणार्‍या आशांचे जे पाश त्यांचा - निर्वेद: यथा असि: हि - तरवारी सारखी छेदक निर्वेदच म्हणजे वैराग्यच होय ॥८-२८॥
पिंगलेच्या चित्तामध्ये जेव्हा वैराग्य जागृत झाले, तेव्हा तिने गाइलेले गीत माझ्याकडून ऐक "मनुष्याची आशारूपी दोरी तोडणारी तलवार म्हणजे वैराग्य". (२८)


न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति ।
यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥ २९ ॥
जया वैराग्य ना झाले जो ना उबगला यया ।
जो ना इच्छि कधी मुक्ति अज्ञानी मोह ना त्यजी ॥ २९ ॥

नृप - राजा - यथा विज्ञानरहित: मनुज: - ज्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार न झालेला मनुष्य - ममतां (न जहाति तथा) - ममता सोडत नाही त्याप्रमाणे - अङ - राजा - अजातनिर्वेद: - ज्याला विवेकपूर्ण वैराग्य झाले नाही तो - देहबन्धं न जिहासति हि - देहाची बंधने तोडण्यास व सोडण्यास समर्थ असतच नाही. ॥८-२९॥
राजन ! जसा अज्ञानी माणूस ममता सोडू इच्छित नाही, त्याचप्रमाणे ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही, तो शरीर आणि त्याची बंधने तोडून टाकू इच्छित नाही. (२९)


पिङ्गलोवाच -
अहो मे मोहविततिं पश्यता अविजितात्मनः ।
या कान्ताद् असतः कामं कामये येन बालिशा ॥ ३० ॥
पिंगलेने हे गीत गायिले -
हाय मोहित मी झाले मी त्या क्षुद्रांसि इच्छिले ।
सुखाची लालसा केली मूर्ख मी दुःखची मिळे ॥ ३० ॥

अविजितात्मन: मे - जिचा मन:प्रभृति समुदाय वश झाला नाही त्या माझ्या - अहो मोहविततिं पश्यत - मोहाचा केवढा थोर विस्तार आहे पहा हो - या असत: कान्तात् कामं कामये - असत् म्हणजे मिथ्या असणार्‍या म्हणून वस्तुत: नसणार्‍या रमणापासून माझी कामपूर्ती व्हावी अशी ज्या मी इच्छा केली - येन बालिशा - म्हणून मी जी मूर्खातली मूर्ख ठरले ॥८-३०॥
पिंगला म्हणू लागली अहो ! इंद्रियांच्या अधीन झालेल्या माझा मूर्खपणा आणि मोहाची झेप तर पहा ! जी मी क्षुद्र माणसाकडून विषयसुखाची इच्छा करीत आहे. (३०)


( मिश्र )
सन्तं समीपे रमणं रतिप्रदं
     वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।
अकामदं दुःखभयाधिशोक
     मोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥ ३१ ॥
( इंद्रवज्रा )
स्वामी वसे तो हॄदयात माझ्या
     तो देइ साचे परमार्थ द्रव्य ।
अनित्य विश्वो नित स्वामी तोची
     मी तुच्छ जीवा उगि सेविले की ॥ ३१ ॥

समीपे नित्यं सन्तं - सदासर्वदा अत्यंत नजीक आणि वस्तुत: असणारा - वित्तप्रदं रतिप्रदं इमं रमणं - हवे तेवढे कल्याणकारी द्रव्य देणारा, संगसुख अमूप देणारा अशा ह्या रमणाला - विहाय - सोडून - अज्ञा अहं - अज्ञानाची पुतळी असणारी मी - तुच्छमहं अकामदं दु:खभयाधिशोकमोहप्रदं - असत्य म्हणजे अनित्य, कामपूर्ती करणारा आणि उलट दु:खभीतीप्रभृति शोकमोहांचे कारण होणारा जो पुरुष त्याची - भजे - इच्छा करीत बसले आहे ॥८-३१॥
माझा खरा पती नेहमी माझ्याजवळच आहे तोच मला परमानंद आणि परमार्थधन देणारा आहे त्याला सोडून मी माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही, उलट जे मला दुःख, भय, आधिव्याधी, शोक आणि मोह देणारे आहेत, अशा क्षुद्र माणसांचे मी सेवन करीत राहिले किती मी मूर्ख ! (३१)


अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा
     साङ्केत्यवृत्त्या अतिविगर्ह्यवार्तया ।
स्त्रैणान्नराद् यार्थतृषोऽनुशोच्यात्
     क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥ ३२ ॥
पोटार्थ झाले अतिहीन वेश्या
     देहास क्लेशो अन त्रास झाला ।
मी देह माझा विकला पहा की
     त्या निंद्य जीवे मज भोगिले की ।
मी एवढी मूर्ख कशी पहा हो
     मी इच्छिले द्रव्य रतीसुखाते ॥ ३२ ॥

अहो मया आत्मा वृथा परितापित: - किती हा मूर्खपणा की मी आपल्या आत्मारामाला व्यर्थ ताप दिला - या (अहं) - जी मी - अतिविगर्ह्यवार्तया साङ्केतवृत्या - अति निंद्य असणार्‍या म्हणजे संकेताने द्रव्य ठरवून त्यावर अवलंबून असणार्‍या जीविकेच्या सहाय्याने - स्रैणात् - स्त्रीलंपट - अर्थतृष: - लोभी - अनुशोच्यात् - सदैव निंद्य व शोकास्पद अशा - नरात् - पुरुषापासून - क्रीतेन आत्मना वित्तं रतिं इच्छती - द्रव्य व रति इच्छिणारी आपला सोन्यासारखा ------------ सिद्ध झाले ॥८-३२॥
अरेरे ! मी अत्यंत निंद्य अशा वेश्यावृत्तीचा आश्रय करून व्यर्थच माझ्या शरीराला आणि मनाला क्लेश दिले स्त्रीलंपट, लोभी आणि निंद्य अशा लोकांना हे शरीर विकून मी धनाची आणि रतिसुखाची इच्छा करीत होते ! (३२)


यदस्थिभिर्निर्मित-वंशवंश्य
     स्थूणं त्वचा रोमनखैः पिनद्धम् ।
क्षरन्नवद् वारमगारमेतद् ।
     विण्मूत्रपूर्णं मत् उपैति कान्या ॥ ३३ ॥
हा देह तंबू अन अस्थि खांब
nbsp;    चर्मे नि रोमे परि झाकलेला ।
याला नऊ द्वार तयातुनी ते
     वाहे धनो जे मल-मूत्र याचे ।
माझ्या विना ती जगि कोण अन्य
    या स्थूल देहा प्रिय मानिते ती ॥ ३३ ॥

यत् - ज्याअर्थी - अस्थिभि: निर्मितवंशवंश्यस्थूणं - हाडांनी निर्मिली आहेत पाठीचा कणा हाच वंश म्हणजे आढे व बरगड्या ह्याच वंश्य म्हणजे --------- हेच स्थूण म्हणजे खांब ज्याचे असे - त्वचारोमनखै: पिनद्धं - जे कातडी, रोम व नखे यांनी घट्ट बांधून टाकले आहे - क्षरन्नवद्वारं - घाणेरडा घट्ट-पातळ मळ ज्यातून गळत असतो - विण्मूत्रपूर्णं - जे विष्ठा आणि मूत्र यांनी भरलेले आहे - एतत् अगारं - हे शरीररूपी जे घाणीचे घर त्याकडे - मदन्या का उपैति - माझ्याशिवाय दुसरी कोण ------- तयार होईल ? ॥८-३३॥
जसे बांबूचे आढे, वासे, पट्‌ट्या इत्यादींनी घर बांधावे, त्याप्रमाणे पाठीचा कणा, हाडे इत्यादींनी हे शरीररूपी घर तयार झाले आहे ते त्वचा, लव तसेच नखांनी आच्छादिले आहे याच्या नऊ दरवाज्यांमधून सदैव मलमूत्र इत्यादी वाहात असते माझ्याखेरीज दुसरी अशी कोणती स्त्री असेल की, जी अशा या निंद्य शरीरालाच प्रिय समजून त्याचे सेवन करील ? (३३)


( अनुष्टुप् )
विदेहानां पुरे ह्यस्मिन् अहमेकैव मूढधीः ।
य अन्यं इच्छन्ती असत्यस्माद् आत्मदात् काममच्युतात् ॥ ३४ ॥
( अनुष्टुप्‌ )
विदेह नगरीमध्ये सर्वात दुष्ट मूर्ख मी ।
परमात्मा त्यजोनीया पुरुषा अभिलाषिते ॥ ३४ ॥

विदेहानां अस्मिन् पुरे - या विदेह ------------ - अहं एका एव मूढधी: - मीच काय ती एकटी मूर्खत्वाची ---------- - या असती - कारण ही जी मी दुष्ट स्त्री - अस्मात् आत्मदात् अच्युतात् - -------- - अन्यं कामं इच्छन्ती अस्मि - दुसरा -------------- त्याची इच्छा करिती झाले ॥८-३४॥
या विदेही लोकांच्या जीवन्मुक्तांच्या नगरीत मी एकटीच मूर्ख आणि चारित्र्यहीन आहे कारण जी स्वतःचे सुद्धा दान करणार्‍या अविनाशी परमात्म्याला सोडून दुसर्‍या पुरूषाची अभिलाषा धरीत आहे. (३४)


सुहृत्प्रेष्ठतमो नाथ आत्मा चायं शरीरिणाम् ।
तं विक्रीयात्मनैवाहं रमेऽनेन यथा रमा ॥ ३५ ॥
हृदयस्थ प्रभो स्वामी आत्मा नी सुहॄदो तुची ।
विकिते मजला मीच क्रीडते मी रमे परी ॥ ३५ ॥

शरीरिणां प्रेष्ठतम: सुहृत् - देहधार्‍यांचा प्रियोत्तम मित्र - ---------------------- - (त्यांचा स्वामी जो अच्युत - तं - त्याला - अहं आत्म -------------- - आत्मा देऊन विकत घेईन - अनेन रमे - त्याच्याशी रममाण होऊन ------------- रमा ॥८-३५॥
हे सर्व प्राण्यांचे आत्मा, त्यांचे हित करणारे, माझे प्रियतम स्वामी आहेत आता मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे यांच्याबरोबर विहार करीन. (३५)


कियत् प्रियं ते व्यभजन् कामा ये कामदा नराः ।
आद्यन्तवन्तो भार्याया देवा वा कालविद्रुताः ॥ ३६ ॥
मूर्ख चित्ता मला सांग सुख त्या पुरुषें मला ।
किती ते दिधले तैसे जगी सर्वचि मर्त्य की ॥ ३६ ॥

आद्यन्तवन्त: ये कामा: - उत्पन्न होऊन नाश ----------) - कामदा: नरा: - इच्छा पुरवणारे मर्त्य पुरुष - काल-------- - ---- जिंकल्यामुळे त्याला वश असणारे देव - ते - ते सर्व - भार्याया----- - आपापल्या भार्यांचे जे काम ते कितीसे पुरवते झाले ? ॥८-३६॥
जितके म्हणून हे विषय किंवा ते देणारे जन्ममृत्यू असणारे पुरूष आहेत, यांनी तुझे काय प्रिय केले आहे ? किंवा काळाने कवटाळलेल्या देवांनी तरी आपल्या बायकांचे काय भले केले आहे ? (३६)


नूनं मे भगवान् प्रीतो विष्णुः केनापि कर्मणा ।
निर्वेदोऽयं दुराशाया यन्मे जातः सुखावहः ॥ ३७ ॥
पावला शुभ कर्माने अवश्य भगवान्‌ हरी ।
मला वैराग्य हे झाले लाभले सुख निश्चित ॥ ३७ ॥

यत् - ज्याअर्थी - दुराशाया: मे - दुराशा करणार्‍या मला - अयं सुखावह: निर्वेद: जात: - हा सुखपरिणामी विराग उत्पन्न झाला आहे - केन अपि मे कर्मणा - माझ्या कोणत्या तरी सत्कर्माने - भगवान् विष्णु: प्रीत: - श्रीषड्गुणैश्वर्य भगवान् विष्णु प्रसन्न झाला आहे - नूनं - असेच खरोखर झाले असेल काय ? ॥३७॥
माझ्या कोणत्या तरी शुभकर्मामुळेच भगवान विष्णू निश्चितच माझ्यावर प्रसन्न झाले आहेत म्हणून तर भलतील आशा करणार्‍या मला अशा प्रकारे वैराग्य आले माझे हे वैराग्यच मला नक्की सुख देणारे ठरेल. (३७)


मैवं स्युः मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः ।
येनानुबन्धं निर्हृत्य पुरुषः शममृच्छति ॥ ३८ ॥
अभागी असते मी तो दुःख वैराग्य ना घडे ।
वैराग्ये बंध तोडावे शांती लाभास मेळिणे ॥ ३८ ॥

मन्दभाग्याया: क्लेशा: - मज दीनेला झालेले क्लेश - एवं - याप्रकारे - निर्वेदहेतव: मा स्यु: - सुखकारक वैराग्याचे हेतु झालेच नसते - येन - ज्या ह्या वैराग्यामुळे - अनुबन्धं निर्हृत्य - सर्व सांसारिक वासनादि संबंध तोडून टाकून - पुरुष: शमं ऋच्छति - जीव परम कल्याणप्रद पदाकडे जातो ॥८-३८॥
जर मी अभागिनी असते, तर मला झालेले दुःख हे माझ्या वैराग्याचे कारण ठरले नसते ! कारण अशा प्रकारच्या वैराग्यामुळेच मनुष्य आपले संसारबंधन तोडून परमशांती मिळवितो. (३८)


तेनोपकृतमादाय शिरसा ग्राम्यसङ्गताः ।
त्यक्त्वा दुराशाः शरणं व्रजामि तं अधीश्वरम् ॥ ३९ ॥
उपकार तयाचा मी नमस्कारे स्विकारिते ।
भोगांची सोडते आशा भजते हरि ईश्वर ॥ ३९ ॥

तेन उपकृतं शिरसा आदाय - त्या हरीने माझ्यावर निर्वेदरूपकात्मक जो उपकार केला आहे तो मस्तकी धारण करून - ग्राम्यसङ्गता: दुराशा: त्याक्त्वा - आणि विषयांसंबंधींच्या सर्व वासनांचा व दुराशांचा त्याग करून - तं अधीश्वरं शरणं व्रजामि - मी त्या सर्वेश्वर प्रभूला अनन्य भावाने शरण जाते ॥८-३९॥
आता मी भगवंतांचे हे उपकार मस्तकावर झेलून आणि विषयभोगांची इच्छा टाकून देऊन त्याच जगदीश्वरांना शरण जाते. (३९)


सन्तुष्टा श्रद्दधत्येतद् यथालाभेन जीवती ।
विहरामि अमुनैवाहं आत्मना रमणेन वै ॥ ४० ॥
आता जे मिळते तेची भक्षील तोष मानुनी
आत्मारूप प्रभूसी मी रमले नित्यची तशी ॥ ४० ॥

सन्तुष्टा: - परम संतोषी म्हणजे समाधानपूर्ण - एतद् श्रद्दधती - त्या सुखावह निर्वेदावर व रमणावर श्रद्धा ठेऊन - यथालाभेन जीवती - ज्या ज्या वेळी जे जे मिळॆल त्यावर निर्वाह करणारी - अमुना एव रमणेन वै - याच साक्षात अपरोक्ष असणार्‍या निर्य रमणाशीच - अहं आत्मना विहरामि - मी काया वाचा मनाने विहार करीन ॥८-४०॥
आता मला माझ्या प्रारब्धानुसार जे काही मिळेल, त्यावरच मी संतोष मानून श्रद्धापूर्वक जीवन व्यतीत करीन तसेच आपले आत्मस्वरूप अशा या प्रियतम प्रभूंच्या बरोबरच विहार करीन. (४०)


संसारकूपे पतितं विषयैर्मुषितेक्षणम् ।
ग्रस्तं कालाहिनात्मानं कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥ ४१ ॥
जीव संसारकूपात पडला अंध जाहला ।
धरिला काळसर्पाने हरीच सोडवू शके ॥ ४१ ॥

संसारकूपे पतितं - संसाराच्या अथांग कूपात पडलेला - विषयै: मुषितेक्षणं - विषयोपभोगांच्या वासनांमुळे मुषित म्हणजे चोरीस गेले ईक्षण म्हणजे विवेक ज्याचा, असा विवेकशून्य - कालाहिना ग्रस्तं - कालरूपी अजगराने गिळून टाकलेला जो पतित, विवेकशून्य व जन्ममरणांच्या फेर्‍यात सापडलेला जीव आहे त्या अनाथाला - त्रातुं - तारण्याला - अन्य: क: अधीश्वर: - दुसरा कोण समर्थ आहे ? ॥८-४१॥
हा जीव संसाराच्या विहिरीत पडला आहे विषयांनी याला अगदी आंधळे केले आहे काळरूपी अजगराने याला आपल्या दाढेत पकडले आहे आता याचे रक्षण करणारा भगवंतांखेरीज दुसरा कोण आहे ? (४१)


आत्मैव ह्यात्मनो गोप्ता निर्विद्येत यदाखिलात् ।
अप्रमत्त इदं पश्येद् ग्रस्तं कालाहिना जगत् ॥ ४२ ॥
विरक्त विषयीं जीव रक्षितो स्वयची स्वया ।
सावधाने पहावे तो काळाने ग्रासिले जगा ॥ ४२ ॥

यदा - जेव्हा - इदं जगत् कालाहिना ग्रस्तं - हे सर्व दृश्य विश्व कालरूपी सर्पाच्या मुखात शिरले आहे असे - अप्रमत्त: पश्येत् - उन्मादशून्य विवेकसाह्याने जीव पहातो - अखिलात् निर्विद्येत - सर्व विषयांपासून निर्वृत्त होतो - आत्मा एव हि आत्मन: गोप्ता - आत्मा म्हणजे शुद्ध जीवाचा आत्मारामच जीवाचा रक्षक होतो ॥८-४२॥
ज्यावेळी जीव सर्व विषयांपासून विरक्त होतो, त्यावेळी तो स्वतःच आपले रक्षण करतो म्हणून हे सर्व जग काळरूपी अजगराने ग्रासले आहे, हे अत्यंत सावधानपूर्वक जाणले पाहिजे. (४२)


श्रीब्राह्मण उवाच -
एवं व्यवसितमतिः दुराशां कान्ततर्षजाम् ।
छित्त्वोपशममास्थाय शय्यां उपविवेश सा ॥ ४३ ॥
अवधूत दत्तात्रेयजी सांगतात -
राजा रे ! पिंगला वेश्ये दुराशा त्यजिली मनीं ।
शांतभाव धरोनीया शेजेसी झोपली पहा ॥ ४३ ॥

एवं - याप्रकारे - कान्ततर्षजां दुराशां छित्वा - विषयासक्त रमणांची दुष्ट तृषा, वासना टाकून देऊन - उपशमं आस्थाय - परम शांत स्थितीचे संपादन करून - व्यवसितमति: सा - आपल्या बुद्धीचा पक्का निश्चय केलेली ती पिंगला - शय्यां उपविवेश - शय्येवर जाऊन स्थिर झाली ॥८-४३॥
अवधूत म्हणतात असा निश्चय करून पिंगला वेश्येने आपल्या प्रिय धनवंतांची व्यर्थ आशा सोडून देऊन ती आपल्या अंथरूणावर शांतपणे जाऊन झोपली. (४३)


आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् ।
यथा सञ्छिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिङ्गला ॥ ४४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
आशाचि दुःख ते सत्य निराशा सुख श्रेष्ठ ते ।
त्यजिता पिंगला आशा सुखाने झोपली पुन्हा ॥ ४४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥
पहिला अध्याय हा ॥ ११ ॥ ८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

आशा हि परमं दु:खं - विषयाशा ही खरोखर दु:खाची माता आहे - नैराश्यं परमं सुखं - आशात्याग, निर्वेद हा आत्यंतिक सुखाचा जनिता होय - यथा - पहा की वरील सिद्धांत ध्यानात ठेऊनच - कान्ताशां सञ्छिद्य - पिंगलेने नश्वर रमणाशी उपभोग करण्याची दुराशावल्ली तोडून टाकली - पिङ्गला सुखं सुष्वाप - ती सुखरूप होऊन विश्रांती घेती झाली. ॥८-४४॥
खरोखर आशा हेच सर्वांत मोठे दुःख आहे आणि निराशा हेच सर्वांचे मोठे सुख आहे पिंगला वेश्येने जेव्हा पुरूषांची आशा सोडली, तेव्हा ती सुखाने झोपू शकली. (विषयांची आशा करू नये, हे पिंगलेकडून शिकावे). (४४)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
अध्याय आठवा समाप्त

GO TOP