श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द अकरावा
सप्तमोऽध्यायः

उद्धवपृष्टेन भगवता तस्मै ज्ञानोपदेशकरणं
तत्र प्रसंगेन अवधूतोपाखानं आरभ्य तदीय चतुर्विंशति गुरुषु
अष्टगुरुभ्य उपदेशग्रहण वर्णनम् -

अवधूतोपाख्यान - पृथ्वी ते कबुतर या आठ गुरूंची कथा -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
यदात्थ मां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे ।
ब्रह्मा भवो लोकपालाः स्वर्वासं मेऽभिकाङ्‌क्षिणः ॥ १ ॥
भगवान्‌ श्रीकृष्ण म्हणाले -
( अनुष्टुप्‌ )
उद्धवा रे महाभागा इच्छिशी तेच इच्छि मी ।
ब्रह्मादी इच्छिती देव मी स्वधामास पातणे ॥ १ ॥

महाभाग - हे श्रेष्ठ भाग्यवंता - मां - मला - यत् - जे - आत्थ - म्हणालास - तत् - ते - मे चिकीर्षितं एव - करण्याचा माझा संकल्पच झाला आहे - ब्रह्मा भव: लोकपाला: - ब्रह्मदेव, शंकर व इंद्रवरुणप्रभृति लोकपाल - मे - माझा - स्वर्वासं अभिकाङ्क्षिण: - यापुढे स्वर्गलोकीच वास असावा अशी इच्छा आतुरतेने करतात ॥७-१॥
श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा ! तू मला जे म्हणालास, तेच मी करू इच्छितो ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी लोकपालांनासुद्धा मी त्यांच्या लोकात यावे, असे वाटते. (१)


मया निष्पादितं ह्यत्र देवकार्यं अशेषतः ।
यदर्थं अवतीर्णोऽहं अंशेन ब्रह्मणार्थितः ॥ २ ॥
पृथ्वीसी देवकार्यो ते केले मी सर्व ते पुरे ।

अत्र - या भूलोकी - मया - मी या अवतारी - अशेषत: देवकार्यं निष्पादितं हि - देवांचे सर्व कार्य नि:शेषतेने पार पाडलेच आहे - यदर्थं - ज्या ह्या कार्यासाठीच - ब्रह्मणा अर्थित: - ब्रह्मदेवाने विनंती केल्यावरून - अहं - मी - अंशेन अवतीर्ण: - माझ्या पूर्ण स्वरूपाच्या अंशाने मात्र हा अवतार घेतला होता ॥७-२॥
पृथ्वीवर देवतांचे जे काम होते, ते मी पूर्ण केले आहे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून याच कामासाठी मी बलरामासह अवतीर्ण झालो होतो. (२)


कुलं वै शापनिर्दग्धं नङ्क्ष्यत्यन्योन्यविग्रहात् ।
समुद्रः सप्तमेऽह्न्येतां पुरीं च प्लावयिष्यति ॥ ३ ॥
जळाले द्विजशापाने युद्धात मरतील हे ।
बुडवील समुद्रो हा सातव्या दिनि द्वारका ॥ ३ ॥

कुलं - आमचे यादवकुलही - शापनिर्दग्धं वै - ब्राह्मणशापाने वस्तुत: जळून गेल्यासारखेच आहे - अन्योन्यविग्रहात् (च) - आणि परस्परांमधे भांडभांडून - नङ्क्ष्यति - नष्ट होऊन जाणार आहे - च - आणि - एतां पुरीं - ही नगरी - सप्तमे अह्नि - सातव्या दिवशी - समुद्र: प्लावयिष्यति - समुद्र बुडवून टाकील ॥७-३॥
ब्राह्मणांच्या शापाने जणू भस्म झालेला हा यदुवंश आता आपापसात युद्ध करून नष्ट होऊन जाईल आजपासून सातव्या दिवशी या पुरीला समुद्र बुडवून टाकील. (३)


यर्ह्येवायं मया त्यक्तो लोकोऽयं नष्टमङ्गलः ।
भविष्यत्यचिरात् साधो कलिनापि निराकृतः ॥ ४ ॥
जाताचि त्या स्वधामा मी संपेल सर्व मंगल ।
कलीचा बोलबाला तो पसरेल धरेस या ॥ ४ ॥

साधो - हे साधुपुरुषा उद्धवा - यर्हि - जेव्हा - अयं लोक: - हा भूलोक - मया त्यक्त: - मी सोडून जाईन - एव अचिरात् - तेव्हा लागलीच - नष्टमङल: भविष्यति - त्याचे सौभग्य नष्ट होईल - कलिना अपि निराकृत: - कलियुगातील भांडणांनि हा लोक व्यापून जाईल ॥७-४॥
प्रिय उद्धवा ! ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन, त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल. (४)


न वस्तव्यं त्वयैवेह मया त्यक्ते महीतले ।
जनोऽधर्मरुचिर्भद्र भविष्यति कलौ युगे ॥ ५ ॥
त्यजिता पृथिवी मी तैं न राहा येथ साधु तू ।
अधर्मी रुचि वाढेल लोकांची या कलीत ती ॥ ५ ॥

मया त्यक्ते महीतले - मी हा पृथ्वीलोक सोडून गेल्यावर - त्वया - त्वा - इह - येथे - न वस्तव्यं एव - मुळीच राहू नयेस - भद्र - हे महाभागा - कलौ युगे - कलियुगात - जन: - सर्व लोक - अधर्मरुचि: भविष्यति - अधार्मिक होतील ॥७-५॥
मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू येथे राहू नकोस कारण बाबा रे ! कलियुगातील बहुतेक लोकांची रूची अधर्माकडेच राहील. (५)


त्वं तु सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजनबंधुषु ।
मय्यावेश्य मनः सम्यक् समदृग् विचरस्व गाम् ॥ ६ ॥
स्वजनी तोडणे स्नेह अनन्य भक्ति ठेवुनी ।
समभाव मनी ठेवी विचरी पृथिवीवरी ॥ ६ ॥

त्वं तु स्वजनबन्धुषु - तू तर आपल्या कुलबंधु बांधवांच्या संबंधाने - सर्वं स्नेहं - सर्व प्रकारचे प्रेम - परित्यज्य - टाकून देऊन - मयि - मी जो परमेश्वर त्याचे ठिकाणी - मन: सम्यक् आवेश्य - आपल्या मनाला उत्तमरीतीने एकनिष्ठ ठेऊन - आणि माझे स्वरूप मनामध्ये बिंबवून समदृक् - सर्वत्र समबुद्धि होत्साता - गां विचरस्व - पृथ्वीवर संचार करत रहा ॥७-६॥
तू आपले आप्त, स्वजन आणि भाऊबंदांचा स्नेहसंबंध सोडून दे आणि अनन्य प्रेमाने माझ्याठायी आपले मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर. (६)


यदिदं मनसा वाचा चक्षुर्भ्यां श्रवणादिभिः ।
नश्वरं गृह्यमाणं च विद्धि मायामनोमयम् ॥ ७ ॥
मने शब्दे तसे नेत्रे कर्णे जे कळते तसे ।
नाशवंत तितका तो माया मिथ्याच जाण तू ॥ ७ ॥

मनसा वाचा - मनाने, वाणीने - चक्षुर्भ्यां श्रवणादिभि: च - दोन्ही डोळ्यांनी व कर्णांदि इंद्रियांनी - यत् इदं गृह्यमाणं - जे जे काही हे घेतले जाते, विषय म्हणून स्वीकृत होते - मायामनोमयं नश्वरं विद्धि - मायेच्या राज्यातील मनाने म्हणजे कल्पनेने उत्पन्न झालेले, कल्पनामय म्हणून नश्वर आहे असे जाण ॥७-७॥
या जगात मन, वाणी, डोळे, कान इत्यादी इंद्रियांनी जे अनुभवले जाते, ते सर्व नाशवान आहे मनाचा कल्पनाविलास आहे, म्हणून मायाच आहे, असे समज. (७)


पुंसोऽयुक्तस्य नानार्थो भ्रमः स गुणदोषभाक् ।
कर्म अकर्मविकर्मेति गुणदोषधियो भिदा ॥ ८ ॥
अनेक दिसती वस्तू अशांता वेडची जसे ।
भासती गुण दोषो ते बुद्धिचे खेळ सर्व ते ॥ ८ ॥

अयुक्तस्य पुंस: - परमेश्वराचे ठिकाणी एकनिष्ठ नसणार्‍या पुरुषाला - नानार्थ: भ्रम: - भेद सर्वत्र आहे असा जो भ्रम असतो - स: गुणदोषभाक् - तो गुणदोषांनी युक्त असतो. - कर्माकर्मविकर्मेति - हे वेदोक्त कर्म, हे उक्त कर्माचे अनाचरण, हे निषिद्ध कर्म या प्रकारची - गुणदोष धिय: भिदा - गुणदोषयुक्त दृष्टी असणार्‍या पुरुषाला भेदबुद्धि असते ॥७-८॥
ज्या पुरूषाचे मन एकाग्र नसते, त्याला वस्तू पुष्कळ आहेत, असा भ्रम होतो अनेकत्वाचा भ्रम झाल्यानेच गुणदोष दिसू लागतात ज्याची बुद्धी गुणदोषयुक्त असते त्याच्यासाठीच कर्म, अकर्म आणि विकर्म असा भेद असतो. (८)


तस्माद् युक्तेन्द्रियग्रामो युक्तचित्त इदं जगत् ।
आत्मनि ईक्षस्व विततं आत्मानं मयि अधीश्वरे ॥ ९ ॥
संयमी उद्धवा व्हावे इंद्रीय चित्त वृत्ति त्या ।
दोराने बांधणे त्यांना सर्वात्मी ब्रह्म मी पहा ॥ ९ ॥

तस्मात् - म्हणून - युक्तेन्द्रियग्राम: युक्तचित्त: - आपला विषयग्राहक इंद्रियगण आणि आपले चित्त युक्त म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी एकाग्र करून - इदं विततं जगत् - हे विस्तीर्ण असलेले दृश्य विश्व - आत्मनि ईक्षस्व - आपल्या आत्मस्वरूपात आहे असे पहा - आत्मानं मयि अधिश्वरे - आपला विश्वव्यापक आत्मा, मी जो सर्वप्रभु परमेश्वर श्रीकृष्ण त्यामधे आहे असे पहाण्यास शीक. ॥७-९॥
म्हणून तू अगोदर आपली सर्व इंद्रिये आणि मन ताब्यात ठेव मग हे सगळे जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून, तो आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत, असा अनुभव घे. (९)


ज्ञानविज्ञानसंयुक्त आत्मभूतः शरीरिणाम् ।
अत्मानुभव तुष्टात्मा न अन्तरायैः विहन्यसे ॥ १० ॥
ज्ञान विज्ञान जाणोनी आनंदमग्न होशि जै ।
आत्मा होशील सर्वांचा न दुःख मिळते तदा ॥ १० ॥

ज्ञानविज्ञानसंयुक्त: - शास्त्रजन्य ज्ञान व आत्मानुभवजन्य विज्ञान यांनी युक्त होत्साता - शरीरिणां आत्मभूत: - सर्व चराचर भूतांचा आत्मा मी आहे असे जाणून सिद्ध झालास म्हणजे - आत्मानुभवतुष्टात्मा - आत्मसाक्षात्काराने तुला उत्तम प्रकारचे समाधान होईल - अन्तरायै: न विहन्यसे - तुला कोणत्याही विघ्नांची घातकी बाधा होणार नाही ॥७-१०॥
त्यानंतर शब्दज्ञान आणि अनुभव यांनी चांगल्या रीतीने संपन्न होऊन तू आपल्या आत्म्याच्या अनुभवामध्येच आनंदमग्न होशील तसेच सर्व शरीर धारण करणार्‍यांचा आत्मा होऊन राहाशील असे झाल्यानंतर कोणत्याही विघ्नाने तू दुःखी होणार नाहीस. (१०)


दोषबुद्ध्या उभयातीतो निषेधात् न निवर्तते ।
गुणबुद्ध्या च विहितं न करोति यथार्भकः ॥ ११ ॥
त्यागिता गुण दोषाते बालका परि वृत्ति हो ।
पुण्यही करिता त्याने गुण बुद्धि न राहि त्यां ॥ ११ ॥

यथा अर्भक: - ज्याप्रमाणे एखादे साधे मूल - उभयातीत: - गुणबुद्धि व दोषबुद्धि या उभय बुद्धींच्या पलीकडे असणारे - निषेधात् - निषिद्धाचरणापासून - दोषबुद्ध्या - दोषबुद्धीने - न निवर्तते - निवृत्त होत नाही - च - आणि - विहितं - शास्त्रोक्त आचरण - गुणबुद्ध्या - गुणांच्या बुद्धीने - न करोति - करीत नाही ॥७-११॥
जो माणूस गुणदोषबुद्धीच्या पलीकडे जातो, तो लहान मुलाप्रमाणे सदोष म्हणून निषिद्ध कर्मे टाकून देत नाही की गुणबुद्धीने विहित कर्मे करीत नाही. (११)


सर्वभूतसुहृत् शान्तो ज्ञानविज्ञाननिश्चयः ।
पश्यन् मदात्मकं विश्वं न विपद्येत वै पुनः ॥ १२ ॥
श्रुति ना जाणती चित्ती साक्षात्कारात शांति हो ।
आत्मरूप बघे विश्वा न फेरा त्याजला पुन्हा ॥ १२ ॥

सर्वभूतसुहृत् - सर्वांचे कल्याण इच्छिणारा मित्र - शान्त: - शांत - ज्ञानविज्ञाननिश्चय: - ज्ञानविज्ञानांमुळे नि:संदेह असणारा - मदात्मकं विश्वं पश्यन् - हे सर्व विश्व आत्मस्वरूप होय असे जाणत होत्साता - पुन: न विपद्येत वै - पुन: पुन: भवसागरात गटांगळ्या केव्हाही कोठेही खात नाही ॥७-१२॥
ज्याने श्रुतींच्या तात्पर्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभवही घेतला आहे, तो सर्व प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याच्या वृत्ती नेहमीच शांत राहातात सर्व दृश्य विश्वाला तो माझेच स्वरूप समजतो म्हणून त्याला जन्ममृत्यू असत नाहीत. (१२)


श्रीशुक उवाच -
इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप ।
उद्धवः प्रणिपत्याह तत्त्वं जिज्ञासुः अच्युतम् ॥ १३ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
कृष्णे आदेशिता ऐसे भगवत्‌प्रीय उद्धवे ।
नमोनि तत्त्वज्ञानाच्या इच्छेने पुसले असे ॥ १३ ॥

नृप - राजा - भगवता - श्रीकृष्ण भगवानाने - इति आदिष्ट: - याप्रमाणे उपदेश केल्यानंतर - तत्वजिज्ञासु: - मूळ तत्व समजून घेण्याची इच्छा करणारा - महाभगवत: उद्धव: - तो भागवतश्रेष्ठ उद्धव - प्रणिपत्य - वंदन करून - अच्युतं - श्रीकृष्णाला - आह - म्हणाला ॥७-१३॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला, तेव्हा भगवद्‌भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारले. (१३)


श्रीउद्धव उवाच -
योगेश योगविन्यास योगात्मन् योगसंभव ।
निःश्रेयसाय मे प्रोक्तः त्यागः संन्यासलक्षणः ॥ १४ ॥
उद्धवजी म्हणाले -
योगाची गुप्त किल्ली नी योगेश्वर तुम्ही असा ।
योगरूप नि आधार कल्याणा त्याग बोलले ॥ १४ ॥

योगेश - योगेश्वरा - योगाविन्न्यास - योगरहस्याचे निधाना - योगात्मन् - योगाचे स्वरूप असणार्‍या - योगसम्भव - योगजनका - नि:श्रेयसाय - मला मोक्ष मिळावा म्हणून - संन्यासलक्षण: त्याग: - सर्वस्वत्याग हे ज्याचे स्वरूप आहे असा संन्यास नामक त्याग - मे प्रोक्त: - मला सांगितलास ॥७-१४॥
उद्धव म्हणाला - आपण योगेश्वर, सर्व योगांचे आधार, त्यांचे कारण आणि योगस्वरूप आहात माझ्या परम कल्याणासाठी आपण त्या संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश केला आहे. (१४)


त्यागोऽयं दुष्करो भूमन् कामानां विषयात्मभिः ।
सुतरां त्वयि सर्वात्मन् अभक्तैरिति मे मतिः ॥ १५ ॥
अनंता विषयी ज्यांचे मुरले चित्त नित्य त्यां ।
अशक्य त्यागिण्या इच्छा मजला वाटते असे ॥ १५ ॥

भूमन् - विश्वव्यापक श्रेष्ठ देवा - विषयात्मभि: - विषयभोगांच्या वासनांनी पूर्ण भरले आहे मन ज्यांचे अशांकडून - कामानां अयं त्याग: - वासनांचा सांगितलेला हा त्याग - दुष्कर: - अति कठिण आहे - सर्वात्मन् - सर्वांचे नियमन करणार्‍या देवा - त्वयि - तुझ्या ठिकाणी - अभक्तै: - भक्ति मुळीच नसणार्‍यांस - सुतरां - अधिकच कठिण - इति मे मति: - असे मला वाटते ॥७-१५॥
परंतु हे अनंता ! जे लोक विषयांतच गुरफटले गेले आहेत, त्यांना विषयभोगांचा त्याग करणे अतिशय कठीण आहे हे सर्वस्वरूपा ! त्यातसुद्धा जे लोक आपल्याला विन्मुख आहेत, त्यांना तर हे सर्वथैव अशक्य आहे, असे माझे मत आहे. (१५)


( वसंततिलका )
सोऽहं ममाहं इति मूढमतिर्विगाढः
     त्वन्मायया विरचितात्मनि सानुबन्धे ।
तत्त्वञ्जसा निगदितं भवता यथाहं
     संसाधयामि भगवन् अनुशाधि भृत्यम् ॥ १६ ॥
( वसंततिलका )
"हा मी" म्हणोनि रुतलो तव मायिकात
    देहादि पुत्र धनि यां नित गुंतले की ।
संन्यास बोध तुम्हि जो मज बोलला तो
    सोपा करोनि वदणे मज शक्य ऐसा ॥ १६ ॥

सानुबन्धे - पुत्रमित्रादि परिवारासह - त्वन्मायया विरचितात्मनि - तुझ्या भ्रामक मायेने घडविलेल्या मनाने - मम अहं इति मूढमति: - हे दृश्य माझे, हा देहच मी अशी ज्याची मूर्खपणाची बुद्धी आहे असा - स: अहं - तो हा मी - विगाध: - या मोहात गढून गेलो आहे - भगवन् - भगवंता - भवता निगदितं तत् - त्वा उपदेशिलेला तो मार्ग - यथा - ज्याप्रकारे - अहं तु - मी ही - अञ्जसा साधयामि - सहज आक्रमून पार पाडू शकेन - भृत्यं अनुशाधि - तुझ्या या सेवकाला सांग ॥७-१६॥
हे प्रभो ! मीही आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित 'मीमाझे' या मिथ्या कल्पनेने प्रापंचिक वस्तूंमध्ये बुडून गेलो आहे म्हणून हे भगवन ! आपण ज्या संन्यासाचा मला उपदेश केला, त्याचे स्वरूप आपल्या या सेवकाला अशा प्रकारे समजावून सांगा की, मी सहजपणे ते आचरू शकेन. (१६)


सत्यस्य ते स्वदृश आत्मन आत्मनोऽन्यं
     वक्तारमीश विबुधेष्वपि नानुचक्षे ।
सर्वे विमोहितधियस्तव माययेमे
     ब्रह्मादयस्तनुभृतो बहिरर्थभावाः ॥ १७ ॥
तू काळरूप हरि तूच स्वयंप्रकाश
    देवासही न जमणे मज बोध द्याया ।
ब्रह्मादि देव सगळे रुतलेत मायीं
    तेंव्हा तुम्हीच मजला निजबोध द्यावा ॥ १७ ॥

सत्यस्य स्वदृश: - सत्यस्वरूपी व स्वयंप्रकाश असणार्‍या - आत्मन: - ते आत्मस्वरूपी तुझ्याहून - ईश - हे सर्वप्रभो देवा - अन्यं आत्मन: वक्तारं - आत्मस्वरूपाचे व्याख्यान करणारा दुसरा कोणी आहे असे - विबुधेषु अपि - देवांमध्ये सुद्धा - न अनुचक्षे - मला दिसत नाही - तव मायया - तुझ्याच मायेने - इमे सर्वे - हे सर्व - ब्रह्मादय: - ब्रह्मदेव प्रभृति देव - विमोहितधिय: - ज्यांची बुद्धी भ्रांत झाली आहे असे - तनुभृत: - देहधारी आहेत - बहि: अर्थभावा: - आत्मबाह्यच पदार्थ वास्तविक आहेत असे मानणारे आहेत ॥७-१७॥
हे प्रभो ! आपण त्रिकालाबाधित सत्यस्वरूप, स्वयंप्रकाश व सर्वांचे आत्मा आहात हे प्रभो ! आत्मतत्त्वाचा उपदेश करणारा आपल्याव्यतिरिक्त देवतांमध्येसुद्धा मला दुसरा कोणी दिसत नाही कारण ब्रह्मदेव इत्यादी शरीराभिमानी देव आपल्या मायेने मोहित झालेले आहेत त्यामुळेच ते बाह्य विषयांना सत्य मानतात. (१७)


तस्माद् भवन्तमनवद्यमनन्तपारं
     सर्वज्ञमीश्वरमकुण्ठ विकुण्ठ धिष्ण्यम् ।
निर्विण्णधीरहमु ह वृजिनाभितप्तो
     नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये ॥ १८ ॥
चारी कडोनि जळलो विषयाग्नि मध्ये
    नी ही विरक्ति धरुनी तव पायि आलो ।
सर्वज्ञ नित्य हरि तू अविनाशि ऐसा
    नारायणो नर सख्या तुजला नमस्ते ॥ १८ ॥

तस्मात् - म्हणून - उ - हे भगवान - वृजिनाभितप्त: - संकटांनी अत्यंत भाजलेला - निर्विण्णधी: अहं- सर्वथा निराश झाली आहे ज्याची बुद्धी असा मी - अनवद्यं - परम शुद्ध - अनन्तपारं - आदि अंत नसणारा - सर्वज्ञं - सर्व जाणणारा - ईश्वरं - सर्वप्रभु - अकुण्ठविकुण्ठधिष्ण्यं - कालादिकांस अलंघ्य अशा वैकुंठात रहाणारा - नरसखं - नराचा, नर ऋषीचा किंवा अर्जुनाचा सखा - नारायणं भवन्तं - नारायण जो तू त्याला - शरणं प्रपद्ये ह - मी शरण येतो ॥७-१८॥
भगवन ! आपण निर्दोष, अनन्त, सर्वज्ञ, नियन्ते, शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठधामाचे निवासी, तसेच माणसाचे नित्य सखा नारायण आहात म्हणूनच त्रिविध तापांनी पोळल्यामुळे विरक्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे. (१८)


श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् )
प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणाः ।
समुद्धरन्ति हि आत्मानं आत्मनैवाशुभाशयात् ॥ १९ ॥
भगवान्‌ श्रीकृष्ण म्हणाले-
( अनुष्टुप्‌ )
जगात काय नी कैसे चिकित्सा करिता अशी ।
विवेके वासना सर्व स्वताच मिटवू शके ॥ १९ ॥

लोके - या दृश्य विश्वात - लोकतत्वविचक्षणा: मनुजा: - दृश्यांचे तत्व काय आहे याचे परीक्षण करण्यात कुशल असलेले मानव - प्रायेण - बहुत करून - अशुभाऽऽशयात् - अमंगल विषयांच्या मलीन वासनादिकांपासून - आत्मना एव - आपल्या स्वत:च्याच प्रयत्नांनी - आत्मानं - आपल्या स्वत:ला - समुद्धरन्ति ह - खात्रीने चांगल्या प्रकारे उद्धरतात ॥७-१९॥
श्रीकृष्ण म्हणाले - हे उद्धवा ! जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत, ते चित्तातील अशुभ वासनांपासून बहुधा स्वतःच स्वतःचा उद्वार करून घेतात. (१९)


आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः ।
यत् प्रत्यक्ष अनुमानाभ्यां श्रेयऽसौ अनुविन्दते ॥ २० ॥
जीवांचा गुरु तो आत्मा पुरुषांचा विशेषतः ।
अनुभवे अनुमाने हिताहिति समर्थ तो ॥ २० ॥

विशेषत: - विशेष करून - पुरुषस्य - मानवी जीवाचा - आत्मा एव - आत्मा हाच - आत्मन: गुरु: - स्वत:चा गुरु असतो - यत् - कारण - असौ - हा स्वयंगुरु - प्रत्यक्षानुमानाभ्यां - प्रत्यक्ष व अनुमान या दोन प्रमाणांनी - श्रेय: - कल्याणमार्ग - अनुविन्दते - प्राप्त करून घेतो ॥७-२०॥
सर्व प्राण्यांचा, विशेषतः मुनष्याच्या बाबतील आपणच आपले गुरू असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्या द्वारेच आपले कल्याण करून घेतो. (२०)


पुरुषत्वे च मां धीराः साङ्ख्ययोगविशारदाः ।
आविस्तरां प्रपश्यन्ति सर्वशक्ति उपबृंहितम् ॥ २१ ॥
एक-द्वि-त्रि-चतुस्पादो बहुपादस्तथापदः ।
बह्व्यः सन्ति पुरः सृष्टाः तासां मे पौरुषी प्रिया ॥ २२ ॥
धीरवंत पुरूषो जो सांख्ययोग विशारद ।
मला तो आत्मतत्वाने प्रगट पाहुही शके ॥ २१ ॥
एक दो त्रि चतुष्पाद बहुपाद न पाद ज्यां ।
निर्मिले सर्व मी प्राणी परी माणुस तो प्रिय ॥ २२ ॥

पुरुषत्वे च - सामर्थ्यशील जी मानवयोनी, तीत जन्म असतो म्हणून - सांख्ययोगविशारदा: धीरा: - सांख्य व योगशास्त्रात निपुण असलेले बुद्धिमंत जीव - मां - मला - आविस्तरां - अत्यंत स्पष्टपणे - सर्वशक्त्युपबृंहितं - सर्व प्रकारच्या सामर्थ्याने युक्त व अलंकृत आहे असा - प्रपश्यन्ति - पहातात - एकद्वित्रिचतुष्पाद - एक, दोन, तीन, चार पाय असणारी - बहुपाद: - अनेक पाय असणारी - तथा - त्याप्रमाणे - अपद: - मुळीच पाय नसणारी - बह्व्य: पुर: - अनेक शरीरे - सृष्टा: सन्ति - निर्माण केली किंवा झाली आहेत - तासां - त्यापैकी - पौरुषी - पुरुषाचे, मानवाचे शरीर - मे प्रिया - मला प्रिय आहे ॥७-२१, २२॥
सांख्ययोगपारंगत विद्वान या मनुष्ययोनीमध्ये इंद्रियशक्ती, मनःशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणार्‍या माझाआत्मतत्त्वाचा पूर्णतः प्रगटरूपाने साक्षात्कार करून घेतात. (२१)
मी एक, दोन, तीन, चार आणि चारापेक्षाही अधिक पाय असलेली आणि पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे. (२२)


अत्र मां मृगयन्त्यद्धा युक्ता हेतुभिरीश्वरम् ।
गृह्यमाणैः गुणैर्लिङ्गैः अग्राह्यं अनुमानतः ॥ २३ ॥
एकाग्र चित्त नी बुद्धी अनुमान असे तया ।
विषया भिन्न मी माझी तयाला प्रचितीहि हो ॥ २३ ॥

अत्र - या शरीरात - युक्ता: - एकनिष्ठ विद्वान - अग्राह्यं ईश्वरं मां - मी व माझे या ग्राह्य वस्तूंहून निराळा ईश्वर अशा मला - गृह्यमाणै: गुणै: हेतुभि: - ज्ञानाचा विषय होण्यास योग्य जे बुद्धिप्रभृति जीवाचे गुण त्यांच्या द्वारा - लिङ्गै: - बुद्ध्यादि चिन्हांच्या सहाय्याने - अनुमानत: - अनुमानाने - अद्धा - साक्षात - मार्गयन्ति - शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. ॥७-२३॥
कारण या मनुष्यशरीरात एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणार्‍या साधनांनी अनुमानाचा विषय नसूनही माझासर्वप्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेतात. (२३)


अत्रापि उदाहरन्ति इमं, इतिहासं पुरातनम् ।
अवधूतस्य संवादं यदोः अमिततेजसः ॥ २४ ॥
संबंधी या महात्मे ते प्राचीन इतिहास तो ।
तेजस्वी अवधूतो नी यदुसंवादि सांगती ॥ २४ ॥

अत्र अपि - ह्याच विषयसंबंधाने - इमं पुरातनं इतिहासं - हा पूर्वकालीन इतिहास - अमिततेजस: अवधूतस्य - ज्याचे तेजाचे मोजमाप करता येणार नाही त्या अवधूताचा - यदो: - यदुराजाचा - संवादं - संवाद - उदाहरन्ति - उदाहरणादाखल सांगत असतात. ॥७-२४॥
या संबंधात महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परम तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे. (२४)


अवधूतं द्विजं कञ्चित् चरन्तं अकुतोभयम् ।
कविं निरीक्ष्य तरुणं यदुः पप्रच्छ धर्मवित् ॥ २५ ॥
एकदा यदु धर्मज्ञे द्विज दत्तासि पाहिले ।
स्वच्छंदी फिरता त्यांना प्रश्न हा पुसला असे ॥ २५ ॥

अकुतोभयं चरन्त: - ज्याला कोठेही भय नाही अशा रीतीने संचार करणारा - कविं - ज्ञानी - तरुणं - तरुण - अवधूतं कञ्चित् द्विजं - दिगंबर अशा एका द्विजाला - निरीक्ष्य - पाहून - धर्मविद् यदु: - स्वधर्मज्ञानी यदुराजा - प्रपच्छ - विचारता झाला॥७-२५॥
धर्माचे मर्म जाणणार्‍या यदूने एकदा एक त्रिकालदर्शी, तरूण, अवधूत, ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेले पाहून त्यांना विचारले. (२५)


श्रीयदुरुवाच -
कुतो बुद्धिरियं ब्रह्मन् अकर्तुः सुविशारदा ।
यामासाद्य भवान् लोकं विद्वान् चरति बालवत् ॥ २६ ॥
राजा यदुने विचारिले-
कर्म ना करिता विप्रा निपुण बुद्धिमान्‌ कसे ।
विद्वान जाहला कैसे बालका परि हिंडता ॥ २६ ॥

ब्रह्मन् - हे महाब्राह्मणा - अकर्तु: - नैष्कर्म्यसिद्ध अकर्त्याची - इयं - ही - सुविशारदा बुद्धि: - सुनिपुण बुद्धी - कुत: - तुज तरुणाला कोठून प्राप्त झाली - यां आसाद्य - जी ही विलक्षण बुद्धी संपादून - भवान् विद्वान् - तू ब्रह्मवेत्ता - बालवत् - अर्भकाप्रमाणे - लोकं - ह्या लोकी - चरति - संचार करतोस ॥७-२६॥
यदूने विचारले ब्रह्मन ! आपण काही कर्म तर करीत नाही, तरीपण आपल्याला ही चतुर बुद्धी कोठून प्राप्त झाली ? जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये वावरत आहात. (२६)


प्रायो धर्मार्थकामेषु विवित्सायां च मानवाः ।
हेतुनैव समीहन्ते आयुषो यशसः श्रियः ॥ २७ ॥
जगात माणसे सर्व दिसती मग्न पौरुषीं ।
इच्छिती आयु नी येश अकारण कुणी नसे ॥ २७ ॥

प्राय: - सामान्यत: - धर्मार्थकामेषु - धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांमधे - विवित्सायां च - आणि आत्मज्ञान करून घेण्याच्या इच्छेमधे - मानवा: - सर्व लोक - आयुष: - दीर्घायुष्याच्या - यशस: - कीर्तीचा - श्रिय: - संपत्तीचा - हेतुना एव - यापैकी कोणता तरी हेतु सकामत: धारण करूनच - समीहन्ते - प्रवृत्त होत असतात ॥७-२७॥
साधारणतः असे दिसते की, माणसे आयुष्य, यश, संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींच्या इच्छा मनात धरूनच धर्म, अर्थ, काम किंवा तत्त्वजिज्ञासामध्ये प्रवृत्त होतात. (२७)


त्वं तु कल्पः कविर्दक्षः सुभगोऽमृतभाषणः ।
न कर्ता नेहसे किञ्चित् जडोन्मत्तपिशाचवत् ॥ २८ ॥
समर्थ विद्वान्‌ निपुणो तुम्हा मी जाणितो तसा ।
भाग्य सौंदर्य ते थोर सुधावाणी स्रवे सदा ॥
तरीही हिंडता ऐसे हेतुवीण पिशाचवत्‌ ॥ २८ ॥

तु - परंतु - त्वं - तू - कल्प: - कर्म संकल्पिण्यास समर्थ - कवि: - विद्वान्, बुद्धिमंत - दक्ष: - दक्ष - सुभग: - दैववान्, सुंदर - अमृतभाषण: - अमृतासारखी मधुर वाणी असणारा - न कर्ता - काही करत नाहीस - न किञ्चित् ईहसे - कसलीही इच्छा करत नाहीस - जडोन्मत्तपिशाचवत् - जड किंवा उन्मत्त पिशाचाप्रमाणे वागतोस ॥७-२८॥
परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ, विद्वान, निपुण, सुंदर आणि अमृतमधुर बोलणारे आहात असे असूनही आपण वेडा, उन्मत्त किंवा पिशाच्च यांच्यासारखे राहाता काही करीत नाही की काही इच्छित नाही. (२८)


जनेषु दह्यमानेषु कामलोभ-दव-अग्निना ।
न तप्यसेऽग्निना मुक्तो गङ्गाम्भःस्थ इव द्विपः ॥ २९ ॥
काम लोभे जळे विश्व तुम्ही तो मुक्त भासता ।
दावाग्नी मधुनी हत्ती गंगेत स्थिरतो जसा ॥ २९ ॥

कामलोभद्वाग्निना - काम आणि लोभ हाच कोणी वणवा, त्याच्या तापाने - दह्यमानेषु जनेषु - पोळून गेलेल्या लोकात राहूनही - न तप्यसे - त्या अग्नीच्या ज्वाळांनी तू भाजत नाहीस - गङ्गाऽभस्थ: द्विप: इव - गंगा नदीत डुंबणार्‍या गजाप्रमाणे - अग्निना मुक्त: - त्या अग्नीपासून तू मुक्त झाला आहेस ॥७-२९॥
जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वणव्यात होरपळत असतात परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली दिसन नाही जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वणव्याची आच लागत नाही. (२९)


त्वं हि नः पृच्छतां ब्रह्मन् आत्मन्यानन्दकारणम् ।
ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ॥ ३० ॥
संसाराचा न वारा नी स्वरुपी स्थिर राहता ।
आत्मानंद कसा लाभे कृपया सांगणे मला ॥ ३० ॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मवेत्त्या - स्पर्शविहीनस्य - विषय टाकून असणारा - केवलात्मन: - आत्मरूपात रहाणार्‍या - भवत: आत्मनि आनन्दकारणं - तुझे आत्मरूपामध्येच महानंद अनुभवण्याचे कारण - पृच्छतां न: - विचारणारे जे आम्ही त्यांस - त्वं हि ब्रूहि - तूच सांग ॥७-३०॥
ब्रह्मन ! संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो ? आपण हे आम्हांला सांगावे. (३०)


श्रीभगवानुवाच -
यदुनैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा ।
पृष्टः सभाजितः प्राह प्रश्रयावनतं द्विजः ॥ ३१ ॥
भगवान्‌ श्रीकृष्ण म्हणाले -
पूर्वजो आमुचे राजे यदु ते द्विज भक्तीची ।
दत्ता पूजोनिया नम्र प्रश्न हा पुसला तये ॥ ३१ ॥

सुमेधसा - महाबुद्धिमंत - ब्रह्मण्येन - ब्रह्माविषयी पूज्य बुद्धी असणार्‍या - यदुना - यदुराजाने - एवं पृष्ट: - असा प्रश्न केला असता - सभाजित: महाभाग: - उत्तमोत्तम सत्कार झाला ज्याचा तो महातेजस्वी अवधूत - प्रश्रयावनतं नृपं आह - पूज्यबुद्धीमुळे नम्रवृत्ती राजाला सांगता झाला ॥७-३१॥
श्रीकृष्ण म्हणाले ब्राह्मणभक्त, शुद्धबुद्धी, यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लववून तो त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा ब्राह्मण म्हणाले. (३१)


श्रीब्राह्मण उवाच -
सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः ।
यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह तान् श्रृणु ॥ ३२ ॥
ब्रह्मवेत्ता दत्तात्रेयजी म्हणाले-
राजा मी आपुल्या बुद्धे अनेक गुरु घेतले ।
शिकोनी हिंडतो ऐसा गुरु-शिक्षाहि सांगतो ॥ ३२ ॥

राजन् - हे राजा - बुद्ध्युपाश्रित: - बुद्धिसहाय्याने मात्र आदरपूर्वक स्वीकृत केलेले - मे - माझे - बहव: गुरव: सन्ति - अनेक गुरु आहेत - यत: - ज्या ह्या गुरूंपासून - बुद्धिं उपादाय - अनेक धडे घेऊन - मुक्त: इव अटामि - बंधनरहित होत्साता सर्व पृथ्वीवर मी संचार करतो - तान् शृणु - ते माझे गुरु कोण ते ऐक ॥७-३२॥
ब्राह्मण म्हणाले राजन ! मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे, फिरत असतो तू त्या गुरूंची नावे आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण ऐक. (३२)


पृथिवी वायुराकाशं आपोऽग्निश्चन्द्रमा रविः ।
कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद् गजः ॥ ३३ ॥
मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकः ।
कुमारी शरकृत् सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥ ३४ ॥
पृथिवी वायु आकाश जलाग्नि चंद्र सूर्य नी ।
कबूतर समुद्रो नी पतंग मधुमक्षिका ॥
हरीण हत्ति नी मासा वेश्या नामक पिंगला ॥ ३३ ॥
कुमारी बाळ नी क्रौंच बाणकर्मी नि सर्प तो ।
किटकी भृंगि हे सर्व अज्‌गरो मधुकर्मिही ॥ ३४ ॥

पृथ्वी, वायु:, आकाश:, आप:, अग्नि:, चन्द्रमा:, रवि:, कपोत:, अजगर:, सिन्धु:, पतङ्ग:, मधुकृत्, गज:, मधुहा, हरिण:, मीन:, पिङ्गला, कुरर:, अर्भक:, कुमारी, शरकृत्, सर्प:, ऊर्णनाभि:, सुपेशकृत् - पृथ्वी, वायु, आकाश, जल, अग्नि, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधहर्ता, हरिण, मासा, पिंगला नामक वेश्या, कुरर, बाल, कन्या, बाण करणारा, साप, कोळी, आणि सुपेशकार हे २४ गुरु होत ॥७-३३, ३४॥
माझ्या गुरूंची नावे अशी आहेत पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबुतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरीण, मासा, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी. (कीटक) आणि कुंभारमाशी. (३३-३४)


एते मे गुरवो राजन् चतुर्विंशतिराश्रिताः ।
शिक्षा वृत्तिभिरेतेषां अन्वशिक्षमिहात्मनः ॥ ३५ ॥
चोवीस गुरु हे ऐसे गेलो त्यांच्याचि आश्रया ।
तयांचे वागणे शिक्षा मानिले गुरुमंत्र ते ॥ ३५ ॥

राजन् - हे राजा - एते - हे - मे आश्रिता: - मी आश्रय घेतलेले - चतुर्विंशति: गुरव: - चोवीस गुरु आहेत - एतेषां वृत्तिभि: - यातील प्रत्येकाचे वर्तन पाहून त्यांच्या द्वारा - इह - ह्या लोकी - आत्मन: - मला उपयोगी पडणार्‍या - शिक्षा: - वर्तनाचे शिक्षण, धडे - अन्वशिक्षं - शिकलो ॥७-३५॥
राजन ! मी या चोवीस गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली. (३५)


यतो यदनुशिक्षामि यथा वा नाहुषात्मज ।
तत्तथा पुरुषव्याघ्र निबोध कथयामि ते ॥ ३६ ॥
ययातिनंदना वीरा शिकलो जे तयांकडे ।
जसे तसेचि ते सर्व सांगतो तुज ऐकणे ॥ ३६ ॥

नहुषात्मज - नहुष राजाचा पुत्र ययाति, त्याच्या पुत्रा - यत: - ज्यापासून - यत् - जे - वा - अथवा - यथा - जसे - अनुशिक्षामि - शिक्षण घेतले आहे - तत् - ते - तथा - तसेच - पुरुषव्याघ्र - वाघासारख्या शूर असणार्‍या राजा - ते - तुला - कथयामि - सांगतो - निबोध - ते नीट समजून घे ॥७-३६॥
हे वीरवर ययातिनंदन ! मी ज्याच्याकडून, ज्या प्रकारे, जे काही शिकलो आहे, ते सर्व तुला सांगतो ऐक. (३६)


भूतैः आक्रम्यमाणोऽपि धीरो दैववशानुगैः ।
तद् विद्वान्न चलेन्मार्गाद् अन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥ ३७ ॥
शश्वत्परार्थसर्वेहः परार्थैकान्तसंभवः ।
साधुः शिक्षेत भूभृत्तो नगशिष्यः परात्मताम् ॥ ३८ ॥
क्षमा मी धरतीची ती शिकलो बघ सोशिते ।
आघात दैव मानोनी न क्रोधे कधिही कुणा ॥
धीरवंते तसे व्हावे क्रोध कोणा करू नये ॥ ३७ ॥
गिरि नी वृक्ष ही तैसे दुजांचे हित साधिती ।
तयांचा जन्म त्या साठी परोपकार हा शिका ॥ ३८ ॥

दैववशानुगै: भूतै: - ईश्वरसृष्टीतील ज्ञात व अज्ञात कार्यकारणादि नियमास म्हणजे दैवास वश असणार्‍या चराचर भूतांकरवी - आक्रम्यमाण: अपि - पछाडला जाऊन पीडित झाला तरी - तद्विद्वान धीर: - हे जाणणारा बुद्धिवंत - मार्गात् - ठरलेल्या मार्गापासून - न चलेत् - भ्रष्ट होता कामाचे नाही - क्षिते व्रतं - हे पृथ्वीचे क्षमाव्रत - अन्वशिक्षं - शिकलो. ॥ ३७ ॥
भूभृतः - पर्वत व वृक्ष या रूपाने असणार्‍या पृथ्वीपासून - नगशिष्य: (साधु:) - अचलांचा शिष्य होणारा जो साधक त्याने - परात्मतां शिक्षेत - स्वेतरांसाठी आपला आत्मा आहे ही शिक्षा शिकावी - शश्वत् - सर्वकाळी - परार्थसर्वेह: परार्थैकान्तसम्भव: - दुसर्‍याच्या कल्याणासाठीच सर्व इच्छा धारण करणारा व परहितासाठीच मात्र आपला जन्म आहे असे समजणारा - साधु: - साधक व्हावे ॥७-३८॥

पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला, तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते तिच्याकडून मी 'क्षमा' हे व्रत शिकलो जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरूषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये. (३७)
पृथ्वीचेच रूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसर्‍यांच्या हितासाठीच असतात किंबहुना दुसर्‍याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो साधु पुरूषाने त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे. (पृथ्वी पासून क्षमा व परोपकार हे गुण घ्यावेत). (३८)


प्राणवृत्त्यैव सन्तुष्येन् मुनिर्नैवेन्द्रियप्रियैः ।
ज्ञानं यथा न नश्येत नावकीर्येत वाङ्‌मनः ॥ ३९ ॥
आहार केवलो इच्छी प्राणवायु तनूतला ।
संक्षेपे विषयो त्यांचा शिकलो अल्प सेवना ॥ ३९ ॥

यथा - ज्याप्रकारे - ज्ञानं - विवेकयुक्त ज्ञान - न नश्येत - नाहीसे होणार नाही - वाङ्मन: - वाणी व मन - न अवकीर्येत - कल्याणमार्ग सोडणार नाहीत - प्राणवृत्त्या एव - प्राणांचे संरक्षण मात्र होईल त्यापासूनच - मुनि: संतुष्येत् एव - मुनीने संतोष मानून घ्यावाच - न इंद्रियप्रियै: - इंद्रियास प्रिय करण्यासाठी विषयसेवन करू नये ॥७-३९॥
प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे साधकानेसुद्धा इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावेत थोडक्यात, ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही, मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही, हे पाहावे. (३९)


विषयेषु आविशन् योगी नानाधर्मेषु सर्वतः ।
गुणदोषव्यपेतात्मा न विषज्जेत वायुवत् ॥ ४० ॥
बाहेर वायु तो नित्य हिंडतो नच गुंतता ।
गुणदोष न तो घेतो न द्वेषी मुळिही कुणा ॥ ४० ॥

नानाधर्मेषु विषयेषु - सुखदु:खादि गुणधर्म असणार्‍या विषयांमध्ये - आविशन् योगी - संचार करणारा जो योगी त्याने - वायुवत् - वायुप्रमाणे - सर्वत: गुणदोषव्यपेतात्मा - सर्वथा गुणदोषांपासून अलिप्त राहून - न विषज्जेत - विषयांत आसक्त होऊ नये ॥७-४०॥
वायू अनेक गुणधर्माच्या पदार्थावर जातो, पण कोठेही आसक्त होत नाही की कोणाचाही गुणदोष घेत नाही त्याचप्रमाणे योग्याने वेगवेगळ्या गुणधर्माच्या विषयांकडे जावे लागले, तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कोणाचे गुणदोष पाहू नयेत. (४०)


पार्थिवेष्विह देहेषु प्रविष्टस्तद् गुणाश्रयः ।
गुणैर्न युज्यते योगी गन्धैर्वायुः इवात्मदृक् ॥ ४१ ॥
पृथ्वीचा गंध तो नेई परी शुद्धची राहतो ।
पार्थिवा सुख दुःखाला वाहणे त्याच की परी ॥ ४१ ॥

इह - पृथ्वीवर - पार्थिवेषु देहेषु - पार्थिव शरीरात - - प्रविष्त: - प्रवेश केलेला - तद्गुणाश्रय: - त्या त्या शारीर गुणांचा आश्रय असणारा - योगी - एकनिष्ठ ज्ञानयोगी - आत्मदृक् - आत्मद्रष्टा योगी - गुणै: न युज्यते - त्या त्या पार्थीव वस्तूंच्या गुणधर्मांनी लिप्त होत नाही - वायु: इव गन्धै: - सर्वगामी वायु पदार्थाच्या गंधानेही जसा लिप्त होत नाही ॥४१॥
पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यांचा वास वाहून नेत असला, तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही त्याचप्रमाणे आत्मदर्शी योग्याने या पार्थिव शरीराशी संबंध असेपर्यंत त्याच्या आधिव्याधी, तहानभूक इत्यादी सहन करावे परंतु त्यांपासून सर्वथा अलिप्त असावे. (वायूपासून अल्पसंतुष्टता, इतरांचे गुणदोष न पाहाणे व न घेणे आणि अलिप्त असणे, हे गुण घ्यावेत). (४१)


( मिश्र )
अन्तहितश्च स्थिरजङ्गमेषु
     ब्रह्मात्मभावेन समन्वयेन ।
व्याप्त्याव्यवच्छेदमसङ्गमात्मनो
     मुनिर्नभस्त्वं विततस्य भावयेत् ॥ ४२ ॥
( इंद्रवज्रा )
घटा मठाशी नभ भिन्न भासे
    तसेचि ब्रह्मो रुपि भिन भासे ।
माळेतल्या त्या मणिसा बघावा
    आकाश तैसा हरि साधकांनी ॥ ४२ ॥

अन्तर्हित: - प्रत्येक पदार्थात असून - च - आणि - स्थिरजङ्गमेषु - चराचर वस्तूंमधे - समन्वयेन ब्रह्मात्मभावेन - आत्मा हाच ब्रह्म आहे व तो सर्वत्र समन्वित आहे अशा भावनेने - व्याप्त्या (अपि) - आपण सर्वव्यापी असलो तरी - आत्मन: - आपला - असङ्गं - असंगपणा - अव्यवच्छेदं - आपला एकजिनसीपणा - विततस्य नभस्त्वं - सर्वगामी व सर्वव्यापी आकाशाप्रमाणे - मुनि: भावयेत् - निर्मळ आहेत असे मुनीने चिंताचे ॥७-४२॥
आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरांत आतबाहेर व्यापून असते, तरी त्या वस्तूंपासून अलिप्त असते त्याचप्रमाणे साधकाने, आपण ब्रह्मस्वरूपाने सर्वत्र अधिष्ठानरूपात व्यापून असलो, तरी सर्वांपासून अलिप्त व अमर्याद आहोत, ही भावना आकाशापासून शिकावी. (४२)


( अनुष्टुप् )
तेजोऽबन्नमयैर्भावैः मेघाद्यैर्वायुनेरितैः ।
न स्पृश्यते नभस्तद्वत् कालसृष्टैर्गुणैः पुमान् ॥ ४३ ॥
( अनुष्टुप्‌ )
लागो आग पडो वर्षा आकाशा नच स्पर्श हो ।
लाभो जन्म बुडो पृथ्वी आत्मा त्यां नच स्पर्शितो ॥ ४३ ॥

वायुना ईरितै: मेघाद्यै: - वायूने गती दिलेल्या मेघादिकांनी - नभ: - आकाश तद्वत् - त्याप्रमाणे - कालसृष्टै: - कालाने उत्पन्न केलेल्या - गुणै: - गुणांनी - तेजोऽबन्नमयै: भावै: - तेज, जल, अन्न यांनी पूर्ण असलेल्या शरीर घटक पदार्थांनी - पुमान् - आत्मा - न स्पृश्यते - स्पृष्ट होत नाही ॥७-४३॥
तेज, पाणी, पृथ्वी इत्यादी पदार्थ किंवा वार्‍याने ढकललेले ढग, धूळ इत्यादी पदार्थ आकाशातच असतात, पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही, त्याचप्रमाणे काळाच्या ओघात उत्पन्न होणार्‍या देहादी पदार्थांचा आत्म्याशी संबंध असत नाही. (आकाशापासून अलिप्तपणा, अमर्यादपणा हे गुण घ्यावेत). (४३)


स्वच्छः प्रकृतितः स्निग्धो माधुर्यस्तीर्थभूर्नृणाम् ।
मुनिः पुनात्यपां मित्रं ईक्षोपस्पर्शकीर्तनैः ॥ ४४ ॥
स्वच्छ शुद्ध करी पाणी उच्चार स्पर्श पाहता ।
गंगा ती नष्टिते पाप तसे आपण वागणे ॥ ४४ ॥

अपां - जलाच्या - ईक्षोपस्पर्शकीर्तनै: - दर्शन, स्पर्श आणि पठण या साधनांनी - प्रकृतित: - स्वभावत:च - स्वच्छ: स्निग्ध: माधुर्य: - निर्मळ, नितळ व गोड - तीर्थभू: - तीर्थाप्रमाणे पवित्र असणारा - मुनि: - एकनिष्ठ योगी - नृणां मित्र: - लोकांचा मित्र होत्साता - पुनाति - त्यास पवित्र करतो ॥७-४४॥
जसे पाणी स्वभावतःच स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारे असते, तसेच तीर्थांचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनीसुद्धा लोक पवित्र होतात, त्याचप्रमाणे साधक पाण्यासारखा स्वभावतःच शुद्ध, प्रेमळ, मधुरभाषी आणि लोकपावन असतो व त्याचे दर्शन, स्पर्श आणि नामोच्चार यांनी लोक पवित्र होतात. (पाण्यापासून शुद्धता, पावित्र्य इत्यादी गुण घ्यावेत). (४४)


तेजस्वी तपसा दीप्तो दुर्धर्षोदरभाजनः ।
सर्वभक्ष्योऽपि युक्तात्मा नादत्ते मलमग्निवत् ॥ ४५ ॥
तेजस्वी ज्योति तो अग्नि कोणी त्याला न झाकीते ।
अग्नि ना संग्रहो ठेवी वस्तुदोषी न लिंपतो ॥
साधके विषयादिंच्या दोषात नच गुंतणे ॥ ४५ ॥

तेजस्वी तपसा दीप्त: - सतेज, प्रतापाने दैदीप्यमान - दुर्धर्षोदरभाजन: - सामान्यत: दुराराध्य असून उदर हेच भोजनपात्र करणारा - सर्वभक्ष: अपि - जे येईल ते खाणारा असला तरी - युक्तात्मा - नैष्ठिक म्हणजे व्रतस्थ मुनी - अग्निवत् - अग्नीप्रमाणेच - मलं न आदत्ते - मळाचा स्वीकार करत नाही ॥७-४५॥
दुसर्‍या तेजाने पराभूत न होणारा, सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नी काहीही खाऊनसुद्धा त्यांच्या दोषांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने तळपणारा, तपश्चर्येने देदीप्यमान, मनइंद्रियांकडून पराभूत न होणारा, संग्रह न करणारा साधक सर्व विषयांचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिये यांना त्यांचा दोष लागू देत नाही. (४५)


क्वचिच्छन्नः क्वचित् स्पष्ट उपास्यः श्रेय इच्छताम् ।
भुङ्क्ते सर्वत्र दातॄणां दहन् प्रागुत्तराशुभम् ॥ ४६ ॥
गुप्त नी प्रगटे अग्नि साधके राहणे तसे ।
भिक्षेचे हव्य घेवोनी अशुभा जाळणे पहा ॥ ४६ ॥

क्वचित् छन्न: - केव्हा झाकलेला, अप्रकट - क्वचित् स्पष्ट: - केव्हा प्रगट असणारा - श्रेय: इच्छतां - कल्याणेच्छूंनी - उपास्य: - उपासिलेला जो अग्नि त्याप्रमाणेच - सर्वत्र भुङ्क्ते - सर्वदा सर्व ठिकाणी प्राप्त झालेले अन्न भक्षण करतो - दातॄणां प्रागुत्तराशुभं दहन् - अन्नदात्यांची भूतकालीन व भविष्यकालीन पापे दग्ध करतो ॥७-४६॥
अग्नी लाकडात गुप्त असतो पण कल्याणेच्छू याजकांसाठी यज्ञकुंडात प्रगट असतो सर्वांकडून हविर्द्रव्य घेऊन त्यांचे भूतभविष्यांतील पाप नाहीसे करतो त्याचप्रमाणे सिद्धपुरूष बहुधा एकांतात, अप्रगट असतो, पण मुमुक्षूंसाठी त्यांच्याजवळ राहातो शिवाय सर्वत्र दात्यांनी दिलेले स्वीकारून त्यांचे पूर्वोत्तर पाप धुऊन टाकतो. (४६)


स्वमायया सृष्टमिदं सदसल्लक्षणं विभुः ।
प्रविष्ट ईयते तत्तत् स्वरूपोऽग्निरिवैधसि ॥ ४७ ॥
कसेही लाकडे होती अग्नीचे रूप वेगळे ।
तसा व्यापक तो आत्मा वेगळा पाहणे असे ॥ ४७ ॥

एधसि प्रविष्ट: अग्नि: - इंधनामध्ये, लाकडामध्ये प्रविष्ट झालेला अग्नि - तत्तत्सरूप: ईयते - त्या त्या सर्पणाचा आकार घेतो - इव - त्याप्रमाणे - विभु: - सर्वेश्वर परमात्मा - सदसल्लक्षणं - सत् व असत् आहे स्वरूप ज्याचे असे - स्वमायया सृष्टं इदम् - आपल्याच मायेने उत्पन्न झालेले हे दृश्य विश्व त्यात प्रवेश करून तत्स्वरूप धारण करतो. ॥७-४७॥
अग्नीला विशिष्ट आकार नसतो, पण तो लाकडाच्या आकाराप्रमाणे तसा तसा दिसतो त्याप्रमाणे सर्वव्यापक आत्मासुद्धा आपल्या मायेने रचलेल्या कार्यकारणरूप जगात प्रवेश केल्यामुळे त्या त्या वस्तूंचा नामरूपासारखा भासतो. (अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, इंदियसंयम, उपास्यता, उपाधीशी असंबद्धता इत्यादी गुण घ्यावेत). (४७)


विसर्गाद्याः श्मशानान्ता भावा देहस्य नात्मनः ।
कलानामिव चन्द्रस्य कालेनाव्यक्तवर्त्मना ॥ ४८ ॥
कला होती कमी जास्त चंद्र तो सारखा असे ।
अवस्था तनुच्या तैशा आत्म्याला नच स्पर्शिती ॥ ४८ ॥

अव्यक्तवर्त्मना कालेन - ज्याचा ओघ स्पष्ट नाही अशा कालाने उत्पन्न होणारे - विसर्गाद्या: स्मशानान्ता: भावा: - जन्मादिपासून तो श्मशानात जाईपर्यंतच्या सर्व अवस्था - देहस्य - देहाच्याच असतात - न आत्मन: - आत्म्याला जन्ममरणादि अवस्था नाहीत - चंद्रस्य कलानां इव - चंद्रकला कमी जास्त होतात त्याप्रमाणे ॥७-४८॥
काळाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या कळा कमीजास्त होतात तरीसुद्धा चंद्र हा चंद्रच असतो त्याचप्रमाणे जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या असतात, आत्म्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. (चंद्रापासून हा गुण घ्यावा देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाही). (४८)


कालेन ह्योघवेगेन भूतानां प्रभवाप्ययौ ।
नित्यावपि न दृश्येते आत्मनोऽग्नेर्यथार्चिषाम् ॥ ४९ ॥
हळूच संपते ज्योत जळही वाहते तसे ।
न कळे सरते केंव्हा तसी आयुहि संपते ॥ ४९ ॥

ओघवेगेन कालेन - नदीप्रवाहाप्रमाणे सदैव वाहत असणार्‍या कालसामर्थ्याने - आत्मन: भूतानां - जीवांच्या देहांचे - प्रभवाऽप्ययौ - वृद्धि व क्षय हे भाव - नित्यौ अपि - दरक्षणी चाललेले असतात तरी - न दृश्यते हि - दृष्टीला गोचर होतच नाहीत - यथा - जसे अग्ने: अर्चिषां अग्नीच्या ज्वालांचे ॥७-४९॥
आगीच्या ज्वाळा किंवा दिव्याची ज्योत क्षणाक्षणाला उत्पन्न आणि नष्ट होत राहाते, परंतु कळत नाही तसेच वेगवान काळामुळे प्राण्यांच्या शरीराची क्षणाक्षणाला उत्पत्ती आणि विनाश होत असतो, परंतु तो लक्षात येत नाही. (अग्नीची ज्वाळा किंवा दिव्याच्या ज्योतीपासून प्रकृतीचे विनाशित्त्व जाणावे अग्नीसंबंधीचा हा आणखी एक गुण). (४९)


गुणैर्गुणानुपादत्ते यथाकालं विमुञ्चति ।
न तेषु युज्यते योगी गोभिर्गा इव गोपतिः ॥ ५० ॥
सूर्य तो शोषितो पाणी समयी वर्षितो पुन्हा ।
योग्याने विषयो तैसे सेविने त्यागिणे पुन्हा ॥
आसक्ती नच ठेवावी विषयी आपुल्या तशी ॥ ५० ॥

योगी - योगयुक्त पुरुष - गुणै: गुणान् उपादत्ते - इंद्रियद्वारा गुणांचा म्हणजे विषयांचा स्वीकार करतो - यथाकालं विमुञ्चति - यथाकाळी त्यांचा त्याग करतो - तेषु न युज्यते - त्या त्या विषयात आसक्त होत नाही - गोभि: गा: - आपल्या गो म्हणजे किरण त्यांनी जले - गोपति: इव - आकर्षण करणारा सूर्य जलाशी संसक्त होत नाही त्याप्रमाणे ॥७-५०॥
सूर्य जसा आपल्या किरणांनी पृथ्वीवरील पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला देतो, त्याचप्रमाणे योगी पुरूष इंद्रियांच्याद्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्यांचे दानसुद्धा करून टाकतो विषयांत तो आसक्त असत नाही. (५०)


बुध्यते स्वे न भेदेन व्यक्तिस्थ इव तद्‌गतः ।
लक्ष्यते स्थूलमतिभिः आत्मा चावस्थितोऽर्कवत् ॥ ५१ ॥
घटीं घटीं दिसे सूर्य असोनी एकची परी ।
आत्मा तो पाहणे तैसा सर्व जीवात एकची ॥ ५१ ॥

च - आणि - आत्मा - जीवात्मा व प्रत्यगात्मा - स्वे अवस्थित: - स्वरूपात असतांना - भेदेन न बुध्यते - भिन्न आहे. वेगळा आहे असा ज्ञात होत नाही - तद्गत: व्यक्तिस्थ: - उपाधीमध्ये शिरून व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न दिसणारा साहंकार जीव - स्थूलमतिभि: लक्ष्यते - मंदमति जीवास निरनिराळासा प्रामाणिकपणे वाटते - अर्कवत् - जलप्रवाहात सूर्य प्रतिबिंबरूपाने निरनिराळा दिसतो त्याप्रमाणे ॥७-५१॥
पाण्याच्या निरनिराळ्या पात्रांमध्ये प्रतिबिंबित झालेला एकच सूर्य त्यातच प्रवेश करून वेगवेगळा झाल्याचे सामान्य बुद्धीच्या माणसाला दिसते, त्याचप्रमाणे उपाधींच्या भेदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मा वेगवेगळा आहे, असे वाटते. (सूर्यापासून अनासक्ती व उपाधीमुळे भेदप्रतीती हे गुण घ्यावेत). (५१)


नातिस्नेहः प्रसङ्गो वा कर्तव्यः क्वापि केनचित् ।
कुर्वन् विंदेत संतापं कपोत इव दीनधीः ॥ ५२ ॥
अत्यंत स्नेह आसक्ती कोणाशी न घडो कधी ।
कबूतरा न स्वातंत्र्य होती अत्यंत क्लेश ते ॥ ५२ ॥

क्व अपि - कोठेही - केनचित् - कोणाशी सुद्धा - अतिस्नेह: - अतिरिक्त स्नेह - वा - अथवा - प्रसंग: - जास्त समागम - न कर्तव्य: - करू नये - कुर्वन् - फाजील प्रेम व समागम करणारा - दीनधी: - मंदगती पुरुष - कपोत: इव कपोताप्रमाणे सन्तापं विन्देत - त्रास मात्र प्राप्त करून घेतो ॥७-५२॥
कधीही, कोणाशीही, अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये अन्यथा अशा माणसाची बुद्धी दीनवाणी होऊन त्याला कबुतराप्रमाणे अतिशय क्लेश सहन करावे लागतात. (५२)


कपोतः कश्चनारण्ये कृतनीडो वनस्पतौ ।
कपोत्या भार्यया सार्धं उवास कतिचित् समाः ॥ ५३ ॥
एकदा जंगली एक कबूतर सपत्‍निक ।
राहिले दिन ते कांही खोप्यात जंगली तिथे ॥ ५३ ॥

अरण्ये - अरण्यातील - वनस्पतौ - एका वृक्षावर - कृतनीड: कश्चित् कपोत: - आपले घरटे बांधले आहे असा कोणी एक कपोत - कपोत्या भार्यया सार्द्धं - आपली भार्या कपोती हिच्यासह - कतिचित् समा: - कित्येक वर्षे - उवास - राहिला होता ॥७-५३॥
एका जंगलात एक कपोत झाडावर आपले घरटे बांधून त्यात मादीसह काही वर्षेपर्यंत राहात होता. (५३)


कपोतौ स्नेहगुणित हृदयौ गृहधर्मिणौ ।
दृष्टिं दृष्ट्याङ्गमङ्गेन बुद्धिं बुद्ध्या बबन्धतुः ॥ ५४ ॥
द्वयांचा स्नेह तो वाढे गृहस्थधर्म वाढला ।
अंग अंगा तसी दृष्टी बुद्धि बुद्धीसि बांधिली ॥ ५४ ॥

स्नेहगुणितहृदयौ - प्रेमाच्या रज्जूंनी ज्यांची हृदये घट्ट बांधली गेली आहेत असे ते - गृहधर्मिणौ कपोतौ - गृहस्थाश्रमी कपोत जोडपे - दृष्टिं दृष्ट्या - एकमेकांच्या दृष्टीने - अङ्गं अङ्गेन - अंगावयवांनी - बुद्धिं बुद्ध्या - अंत:करणाने अंत:करण - बबन्धतु: - याप्रमाणे परस्परांस बांधते झाले ॥७-५४॥
त्यांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमी स्नेह वाढत होता ते दांपत्यधर्मानुसार एकमेकांच्या दृष्टीने दृष्टीला, अंगाने अंगाला आणि बुद्धीने बुद्धीला जखडून टाकत होते. (५४)


शय्यासनाटनस्थान वार्ताक्रीडाशनादिकम् ।
मिथुनीभूय विस्रब्धौ चेरतुर्वनराजिषु ॥ ५५ ॥
विश्वास जाहला तैसा निःशंक वृक्षि झोपती ।
बसती फिरती खाती खेळती बोलती तसे ॥ ५५ ॥

शय्याऽऽसनाऽटनस्थानवार्ताक्रीडाशनादिकं - निजणे, बसणे, फिरणे, रहाणे, आलाप, खेळणे, खाणे इत्यादी सर्व व्यवहार - मिथुनीभूय - दोघे एकत्र राहूनच करीत - वनराजिषु - आणि वनांच्या रायांमध्ये - विस्रब्धौ - नि:शंक - चेरतु: - संचार करीत ॥७-५५॥
त्यांचे एकमेकांवर एवढे प्रेम होते की, ते निःशंकपणे त्या वनराईत बरोबरीने निजत, बसत, हिंडतफिरत, थांबत, गोष्टी करीत, खेळत आणि खातपीत होते. (५५)


यं यं वाञ्छति सा राजन् तर्पयन्ति अनुकम्पिता ।
तं तं समनयत् कामं कृच्छ्रेणाप्यजितेन्द्रियः ॥ ५६ ॥
पत्‍निची पुरवी इच्छा बहूत कष्ट भोगुनी ।
पतीची कामना पूर्ण करी तीही कबूतरी ॥ ५६ ॥

राजन् - यदुराजा - तर्पयन्ती - शृंगारचेष्टांनी -------- - अनुकंपिता: - प्रेमपूर्ण दयेने वागवलेली - सा - ती कपोती - यं यं वाञ्छति - ज्या ज्या पदार्थाची इच्छा करी - तं तं कामं - तो तो इष्ट पदार्थ - कृच्छ्रेण अपि - कितीही श्रम पडले तरी - अजितेन्द्रिय: समनयत् - तो आत्मसंयमी कपोत संपादन करून तिला देई ॥७-५६॥
हे राजन ! मन ताब्यात नसलेला तो कबुतर त्या कबुतरीला जे काही हवे असेल, ते कितीही कष्ट पडले तरी आणून देत असे तीसुद्धा त्याच्या कामना पूर्ण करीत असे. (५६)


कपोती प्रथमं गर्भं गृह्णन्ती काल आगते ।
अण्डानि सुषुवे नीडे स्वपत्युः सन्निधौ सती ॥ ५७ ॥
पहिला राहिला गर्भ समयी त्या कबूतरीं ।
पतीच्या जवळी घाली आपुली अंडि ती पहा ॥ ५७ ॥

काले आगते - योग्य समय आला तेव्हा - प्रथमं - पहिल्यांदाच - गर्भं गृह्णती - गर्भ धरण करणारी - कपोती स्वपत्यु: सन्निधौ सती - आपल्या नवर्‍या जवळ असणारी कपोती - नीडे - घरट्यात - अण्डानि सुषुवे - अंडी घालती झाली ॥५७॥
वेळ येताच कबुतरीला पहिल्यांदा गर्भ राहिला तिने घरट्यात आपली पतीजवळच अंडी घातली. (५७)


तेषु काले व्यजायन्त रचितावयवा हरेः ।
शक्तिभिः दुर्विभाव्याभिः कोमलाङ्गतनूरुहाः ॥ ५८ ॥
अचिंत्य हरिची शक्ती समयी अंडि फोडुनी ।
पाय पंखादिची पिल्ले कोवळी जन्मली पहा ॥ ५८ ॥

दुर्विभाव्याभि: - अतर्क्य अशा - हरे: शक्तिभि: - परमेश्वराच्या शक्तिसामर्थ्याने - तेषु - त्या अंड्यांमध्ये - कोमलाङ्गतनूरूहा: - कोमल अंगे व पंख आहेत ज्यांचे असे - रचिताऽवयवा: - सर्वांगपरिपूर्ण असे बाल पक्षी - काले - योग्य वेळ येताच - व्यजायन्त - जन्मास आले ॥७-५८॥
भगवंतांच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळी ती अंडी फुटली आणि त्यांतून अवयव असणारी पिल्ले बाहेर पडली त्यांचे अंग आणि त्यावरील लव अत्यंत कोमल होती. (५८)


प्रजाः पुपुषतुः प्रीतौ दम्पती पुत्रवत्सलौ ।
श्रृण्वन्तौ कूजितं तासां निर्वृतौ कलभाषितैः ॥ ५९ ॥
दोघांची लागली दृष्टी सारखी त्या पिलांवरी ।
प्रेमाने पोषिती त्यांना गुटर्‌गूं हर्षि ऐकती ॥ ५९ ॥

तासां कूजितं शृण्वन्तौ - त्या बालकांचे मधुर कूजन ऐकणार्‍या - कलभाषितै: निर्वृतौ - त्यांच्या मधुर अस्पष्ट शब्दांनी आनंदलेल्या - प्रीतौ - समाधान झालेल्या - पुत्रवत्सलौ दम्पती - त्या पुत्रप्रेमी जोडप्याने - प्रजा: पुपुषतु: - आपल्या मुलांचे लालनपोषण केले ॥७-५९॥
पिलांवर प्रेम असणारी ती दोघे मोठ्या प्रेमाने पिल्लांचे पालन पोषण करीत आणि त्यांचे गोड 'गुटुरगूं' ऐकून आनंदमग्न होऊन जात. (५९)


तासां पतत्रैः सुस्पर्शैः कूजितैः मुग्धचेष्टितैः ।
प्रत्युद्‌गमैः अदीनानां पितरौ मुदमापतुः ॥ ६० ॥
प्रसन्न राहती पिल्ले पितृपंखास स्पर्शिती ।
कुंजती करिती चेष्टा पितरां मोद तो भरे ॥ ६० ॥

तासां अदीनानां - त्या सौभाग्यशाली व आनंदी बालकांचे - सुस्पर्शै: पतत्रै: - मऊ मऊ पंख - मुग्धचेष्टितै: कूजितै: - लाडकेपणाच्या लीला व किलबिलस्वरूपी आलाप - प्रत्युद्गमै: - हळू हळू येणे जाणे इत्यादि चेष्टांनी - पितरौ - ती दोघे आईबापे - मुदं आपतु: - हर्षभरित झाली ॥७-६०॥
ती उत्साही पिल्ले जेव्हा आपल्या सुकुमार पंखांनी आईवडीलांना खेटून बसत, कूजन करीत, सुंदर खोड्या करीत आणि लुटूलुटू करीत आईबाबांकडे चालत येत, तेव्हा मातापित्यांना आनंद होई. (६०)


स्नेहानुबद्धहृदयौ अन्योन्यं विष्णुमायया ।
विमोहितौ दीनधियौ शिशून् पुपुषतुः प्रजाः ॥ ६१ ॥
मायेने मोहिले दोघां स्नेहात बद्ध जाहले ।
लोक नी परलोकाचे भान त्या मुळिही नसे ॥ ६१ ॥

विष्णुमायया विमोहितौ - हरिमायेने मोहित झाल्यामुळे - दीनधियौ - मंदबुद्धि - अन्योन्यं - एकमेकांशी - स्नेहानुबद्धहृदयौ - प्रेमाने बद्ध झालेली ती कपोत-कपोती - प्रजा: शिशून् - आपली लहान बालके - पुपुषतु: - धारण पोषणाने पाळीत होती ॥७-६१॥
भगवंतांच्या मायेने मोहित होऊन एकमेकांच्या स्नेहबंधनांत बांधलेली ती दोघे आपल्या लहान पिल्लांच्या पालनपोषणात गुंतून गेलेली असत. (६१)


एकदा जग्मतुस्तासां अन्नार्थं तौ कुटुम्बिनौ ।
परितः कानने तस्मिन् अर्थिनौ चेरतुश्चिरम् ॥ ६२ ॥
एकदा नर मादीने चारा तो आणण्या वनीं ।
पिलांच्या साठि ते गेले हिंडले ते चहू कडे ॥ ६२ ॥

एकदा - एक दिवस - तौ कुटुम्बिनौ - ते नरमादीचे जोडपे - तासां अर्थिनौ - त्या पिल्लांना भक्ष्य आणण्यास - जग्मतु: - बाहेर गेले - तस्मिन् कानने - त्या अरण्यात - अर्थिनौ - भक्ष्य संपादणारे जोडपे - चिरं - पुष्कळ काळपर्यंत - परित: चेरतु: - खाद्य मिळावे म्हणून इकडे तिकडे भटकत राहिले ॥७-६२॥
एके दिवशी ती दोघेही पिल्लांना चारा आणण्यासाठी जंगलात गेली होती चारा गोळा करण्यासाठी बराच वेळ ती जंगलात भटकत राहिली. (६२)


दृष्ट्वा तान् लुब्धकः कश्चिद् यदृच्छातो वनेचरः ।
जगृहे जालमातत्य चरतः स्वालयान्तिके ॥ ६३ ॥
खोप्यासी व्याध तो आला जाळे ही टाकिले तये ।
फड्‌फडी पाहिली पिल्ले धरिले त्यांजला पहा ॥ ६३ ॥

कश्चित् वनेचर: लुब्धक: - कोणी वनचर पारधी - यदृच्छात: तान् - त्या पिल्लांना यदृच्छेने - स्वालयाऽन्तिके चरत: दृष्ट्वा - आपल्या घरट्याजवळ बागडतांना पाहून - जालं आतत्य - जाळे पसरता झाला - जगृहे - त्यांना त्याने पकडले ॥७-६३॥
इकडे एक पारधी सहज फिरतफिरत त्या घरट्याजवळ येऊन पोहोचला घरट्याच्या आसपास कबुतरीची पिल्ले दुडुदुडु धावत असल्याचे पाहून, त्याने जाळे टाकून, त्यांना पकडले. (६३)


कपोतश्च कपोती च प्रजापोषे सदोत्सुकौ ।
गतौ पोषणमादाय स्वनीडं उपजग्मतुः ॥ ६४ ॥
क्षणोक्षणी नर मादी उत्सूक पिल्ल पाहण्या ।
खोप्याच्या पाशि ते आले चारा घेवोनिया पहा ॥ ६४ ॥

प्रजापोषे सदा उत्सुकौ - आपल्या मुलांचे पोषण करण्याच्या कामी नेहेमी तत्पर असणारे - गतौ - बाहेर गेलेले - कपोत: कपोती च - ते कपोताचे जोडपे - पोषणं आदाय - भक्ष्य घेऊन - स्वनीडं उपजग्मतु: - आपल्या घरट्याजवळ प्राप्त झाले ॥७-६४॥
पिल्लांचे पोषण करण्यात नेहमीच तत्पर असलेले ते जोडपे चारा घेऊन आपल्या घरट्याजवळ आहे. (६४)


कपोती स्वात्मजान् वीक्ष्य बालकान् जालसंवृतान् ।
तान् अभ्यधावत् क्रोशन्ती क्रोशतो भृशदुःखिता ॥ ६५ ॥
दुःखे चीं चीं असे सान पिल्ले जाळ्यात पाहिली ।
दुःखाने रडली पत्‍नी पिलांच्या पाशि पातली ॥ ६५ ॥

स्वात्मजान् बालकान् जालसंवृतान् क्रोशत: वीक्ष्य - आपल्या पोटची बालके जाळ्यात अडकलेली असून ती ओरडत आहेत असे पाहून - भृशं दु:खिता क्रोशन्ती - दु:खाने विलाप करणारी - कपोती - ती कपोती - तान् अभ्यधावत् - त्या बालकांकडे तडक धावून गेली ॥७-६५॥
कबुतरीने पाहिले की, तिची पिल्ले जाळ्यात अडकून चीची करीत आहेत त्यांना अशा स्थितीत पाहून कबुतरीला अपार दुखः झाले ती रडतरडतच त्यांच्या जवळ धावली. (६५)


सा असकृत् स्नेहगुणिता दीनचित्ताजमायया ।
स्वयं चाबध्यत शिचा बद्धान् पश्यन्त्यपस्मृतिः ॥ ६६ ॥
दीन दुःखी तसे झाले माया दोरात बांधके ।
शुद्ध ना राहिली कांही मादी जाळ्यात गुंतली ॥ ६६ ॥

अजमायया - हरीच्या मायेने - असकृत्स्नेहगुणिता दीनचित्ता सा - नित्य वाढत जाणार्‍या प्रेमाने मूढ झालेली ती कपोती - शिचा बद्धान् पश्यन्ती अपस्मृति: - जाळ्यात अडकून गेलेल्या बालकांना पाहूनच घाबरल्यामुळे चांगले वाईट विसरली - स्वयं च अबद्ध्यत - आणि स्वत: जाळ्यात पडून स्वत:स बांधून घेतले ॥७-६६॥
भगवंतांच्या मायेने अत्यंत दुःखी झालेली ती उचंबळणार्‍या स्नेहरज्जूने घट्ट बांधली गेली होती आपली पिल्ले जाळ्यात अडकलेली पाहून भान हरपून ती स्वःतच जाळ्यात जाऊन अडकली. (६६)


कपोतश्चात्मजान् बद्धान् आत्मनोऽप्यधिकान् प्रियान् ।
भार्यां चात्मसमां दीनो विललापातिदुःखितः ॥ ६७ ॥
पिल्ले पत्‍नी अशी प्रीय जाळ्यात गुंतले असे ।
नराने पाहता दुःख खरेचि जाहले पहा ॥ ६७ ॥

च - आणि - आत्मन: अपि अधिकान् प्रियान् आत्मजान् - आपल्या स्वत:च्या प्राणांहूनही प्रिय असणारी जी लाडकी बालके ती - आत्मसमां भार्यां - आपल्या बरोबरीची गृहधर्मचारिणी - बद्धान् - बद्ध झाली - कपोत: अतिदु:खित: दीन: - कपोत अतिशय दु:खी दीन अनाथ झाला - च - आणि - विललाप - शोक करू लागला. ॥७-६७॥
कबुतराने प्राणाहूनही अधिक प्रिय असलेली आपली पिल्ले आणि प्राण प्रिय मादीसुद्धा जाळ्यात अडकलेली पाहून तो अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागला. (६७)


अहो मे पश्यतापायं अल्पपुण्यस्य दुर्मतेः ।
अतृप्तस्य अकृतार्थस्य गृहस्त्रैवर्गिको हतः ॥ ६८ ॥
अभागी मी हाय हाय सत्यनाशचि जाहला ।
आकांक्षा पूर्ण ना झाल्या गॄहस्थाश्रम मोडला ॥ ६८ ॥

अल्पपुण्यस्य दुर्मते: मे - फारच थोडे पुण्य गाठी असणारा दुष्टबुद्धि जो मी त्या माझे - अपायं अहो पश्यत - दुर्दैवाने ओढवलेले संकट पहा हो - अतृप्तस्य, अकृतार्थस्य - माझ्या वासना पूर्ण नाही हो झाल्या - (मे) त्रैवर्गिक: गृह: हत: - आणि इतक्यात धर्म, अर्थ व काम साधून देणार्‍या माझ्या गृहस्थाश्रमाचा नाश झाला हो ॥७-६८॥
काय मी कमनशिबी ! माझी बुद्धीच चालेनाशी झाली आहे अरेरे ! या संसारात मी अतृप्त असतानाच व सर्व गोष्टी पुर्‍याहोण्याआधीच माझा धर्म, अर्थ आणि काम याचे मुळ असणारा हा माझा गृहस्थाश्रम नष्ट झाला. (६८)


अनुरूपानुकूला च यस्य मे पतिदेवता ।
शून्ये गृहे मां संत्यज्य पुत्रैः स्वर्याति साधुभिः ॥ ६९ ॥
इष्टदेव मला पाही प्राणप्रीया सदोदित ।
एकटा सोडुनी आज स्वर्गाला निघली पहा ॥ ६९ ॥

यस्य मे - ज्या माझी - अनुकूला, अनुरूपा व पतिदेवता (भार्या) - माझ्या मर्जीने वागणारी, मलाच योग्य असणारी आणि पति हेच मुख्य दैवत असे मानणारी माझी ही भार्या - शून्ये गृहे मां सन्त्यज्य - शून्य घरात मला टाकून देऊन - साधुभि: पुत्रै: - आनंद देणार्‍या सात्विक पुत्रांसह - स्व: याति - स्वर्गाला चालली आहे ॥७-६९॥
मला शोभणारी व माझे सर्व ऐकणारी माझी पतिव्रता पत्‍नी उजाड घरात मला एकट्याला सोडून आमच्या साध्याभोळ्या पिल्लांसह स्वर्गात निघाली. (६९)


सोऽहं शून्ये गृहे दीनो मृतदारो मृतप्रजः ।
जिजीविषे किमर्थं वा विधुरो दुःखजीवितः ॥ ७० ॥
पिल्ले मेले तशी पत्‍नी मरणा मार्गि लागली ।
खोप्यात एकटा काय जगू मी कासया अता ॥ ७० ॥

स: अहं - तो मी - मृतदार: मृतप्रज: दीन: - ज्याची प्रिय पत्नी व लाडकी बालके गेल्यामुळे दीन झालो आहे असा - शून्ये गृहे किमर्थं जिजीविषे - गृहिणीशून्य व बालकशून्य घरात राहून जगण्याची इच्छा कशाला धरू - वा विधुर: दु:खजीवित: - किंवा जगलो तर विधुर दशेत सगळा जन्म दु:खात काढू ॥७-७०॥
पिल्ले गेली पत्‍नीही गेली आता दिनवाणा विधुर झालेला मी या उजाड घरात कोणासाठी जगू ? (७०)


तान् तथैवावृतान् शिग्भिः मृत्युग्रस्तान् विचेष्टतः ।
स्वयं च कृपणः शिक्षु पश्यन्नपि अबुधोऽपतत् ॥ ७१ ॥
तड्‌फडा बघुनी त्यांचा मृत्यचा सापळा तसा ।
तरी हा मूर्ख त्या जाळीं मोहाने पडला पहा ॥ ७१ ॥

शिग्भि: तथा एव आवृतान् - जाळ्याने पूर्वीप्रमाणेच वेष्टिल्यामुळे पकडली गेलेली - मृत्युग्रस्तान् - मृत्युमुखी पडलेली - विचेष्टत: - तरीही धडपड करणारी - तान् - ती मुले व पत्नी यास - पश्यन् अपि - पाहून सुद्धा - कृपण: अबुध: - दीन झाल्यामुळे विवेकभ्रष्ट झालेला कपोत - स्वयं च शिक्षु अपतत् - आपल्या स्वत:लाही त्या जाळ्यामध्ये अडकवून घेता झाला ॥७-७१॥
पिल्ले व मादी जाळ्यात अडकून तडफडत असून ती आता मरणाच्या दारात आहेत, हे स्पष्ट दिसत असूनही बिचारा कबुतर स्वतःच जाळ्यात जाऊन पडला. (७१)


तं लब्ध्वा लुब्धकः क्रूरः कपोतं गृहमेधिनम् ।
कपोतकान् कपोतीं च सिद्धार्थः प्रययौ गृहम् ॥ ७२ ॥
दुष्ट व्याध तसा होता नर मादी नि पिल्ल ती ।
आनंदे घेतले आणि घरासी निघला असे ॥ ७२ ॥

गृहमेधिनं तं कपोतं - त्या गृहस्थाश्रमी कपोताला - कपोतीं कपोतकान् च - तसेच कपोती व कपोतबालके यांना - लब्ध्वा - संपादन करून, पकडून - सिद्धार्थ: क्रूर: लुब्धक: - पुष्कळ पारध मिळाल्यामुळे कृतकार्य झालेला तो निर्दय पारधी - गृहं प्रययौ - स्वगृही चालता झाला ॥७-७२॥
तो क्रूर पारधी, गृहस्थाश्रमी कबुतरजोडपे आणि त्याची पिल्ले मिळाल्याने 'आपले काम झाले' असे पाहून त्यांना घेऊन घरी गेला. (७२)


एवं कुटुंबि अशान्तात्मा द्वन्द्वारामः पतत्रिवत् ।
पुष्णन् कुटुम्बं कृपणः सानुबन्धोऽवसीदति ॥ ७३ ॥
कुटुंबी रमती त्यांना शुद्धती नच राहते ।
शांती ती न मिळे केंव्हा सदैव दुःख भोगणे ॥ ७३ ॥

एवं - याचप्रमाणे - द्वन्द्वराम: अशान्तात्मा कृपण: - सुखदु:खात गढल्यामुळे समाधान व उदार बुद्धी नसणारा - कुटुम्बी - गृहस्थ - कुटुम्बं पुष्णन् - कुटुंबाचे, बायकामुलांचे धारण पोषण करीत असतांनाच - पतत्रिवत् - त्या कपोतांप्रमाणे सानुबन्ध: अवसीदति - सर्व कुटुंबासह नाश पावतो ॥७-७३॥
ज्या कुटुंबवत्सल माणसाला प्रपंचातील सुखदुःखातच आनंद वाटतो आणि जो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यातच आपले स्वत्व गमावून बसतो, त्याला कधीच शांती मिळत नाही त्या कबुतराप्रमाणे तो आपल्या कुटुंबियांबरोबर नाश पावतो. (७३)


यः प्राप्य मानुषं लोकं मुक्तिद्वारं अपावृतम् ।
गृहेषु खगवत्सक्तः तं आरूढच्युतं विदुः ॥ ७४ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
मुक्क्तिचे द्वार हे आहे मनुष्य एक देह तो ।
फसे कबूतर ऐसा आरूढच्युत हो तसा ॥ ७४ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सातवा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ ७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

मानुषं लोकं प्राप्य - मनुष्ययोनीमधे जन्म प्राप्त होणे म्हणजे - मुक्तिद्वारं अपावृतं - मुक्तीचा दरवाजाच उघडला, असे होणे होय - य: - जो मनुष्य - खगवत् गृहेषु सक्त: - त्या कपोताप्रमाणेच गृहकार्यांतच गुंग होऊन रहातो - तं - त्याला - आरूढच्युतं विदु: - तो मोक्षाच्या दारापर्यंत पोहोचून तेथून खाली पडतो म्हणून आरूढच्युत म्हणतात. ॥७-७४॥
मुक्तीचे उघडलेले दारच असे मनुष्यशरीर मिळूनही जो कबुतराप्रमाणे आपल्या घरादारातच गुंतलेला असतो, तो उंचीवर जाऊन खाली पडू पाहाणारा म्हटला पाहिजे त्याला "आरूढच्युत" म्हणतात. (कबुतरापासून, कुटुंबविषयक अत्यासक्ती सर्वनाशाला कारण होते, हा बोध घ्यावा). (७४)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
अध्याय सातवा समाप्त

GO TOP