श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द अकरावा
षष्ठोऽध्यायः

श्रीकृष्णोद्धवसंवाद आरंभ -

भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व प्रभासक्षेत्री
जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अथ ब्रह्माऽऽत्मजैः देवैः प्रजेशैः आावृतोऽभ्यगात् ।
भवश्च भूतभव्येशो ययौ भूतगणैर्वृतः ॥ १ ॥
इन्द्रो मरुद्‌भिर्भगवान् आदित्या वसवोऽश्विनौ ।
ऋभवोऽङ्‌गिरसो रुद्रा विश्वे साध्याश्च देवताः ॥ २ ॥
गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धचारणगुह्यकाः ।
ऋषयः पितरश्चैव सविद्याधरकिन्नराः ॥ ३ ॥
द्वारकां उपसञ्जग्मुः सर्वे कृष्णदिदृक्षवः ।
वपुषा येन भगवान् नरलोकमनोरमः ।
यशो वितेनै लोकेषु सर्वलोकमलापहम् ॥ ४ ॥
श्री शुकदेवजी सांगतात -
( अनुष्टुप्‌ )
देवर्षि वसुदेवाते गेले बोधावया जधी ।
सनकादिक देवांच्या मी ब्रह्म्या सह द्वारकी ॥
भूतांच्या सह ते रुद्र इंद्र मरुद्‌गणां सचे ॥ १ ॥
ऋभु नी अंगिरावंशी वसु आठ नि अश्विनो ।
विश्वदेव नि गंधर्व साध्यगण नि चारण ॥
ऋषि चारण नी सिद्ध गुह्यको पितरे तसे ॥ २ ॥
पोचले सर्वच्या सर्व विद्याधर नि किन्नरें ।
लोकांना रमवी कृष्ण विग्रहे श्यामसुंदर ॥ ३ ॥
अशा या भगवान्‌ कृष्णदर्शना सर्व पातले ।
आपुल्या अवताराने पसरी कीर्ति भूवनी ॥
लोकांचे पाप नी ताप मिटवी सर्व तो हरी ॥ ४ ॥

अथ - नारद मुनी गेल्यानंतर - आत्मजै: - सनकादि आपल्या मानसपुत्रांनी - देवै: - इंद्रादि देवांनी - प्रजेशै: - मनुप्रभृति प्रजापतींनी - आवृतै: - वेढलेला, तात्पर्य या सर्वांसह - ब्रह्मा - ब्रह्मदेव - अभ्यगात् - आदराने आला - भूतगणै: वृत: - नंदिप्रभृति भूतगणांसह असणारा - भूतभव्येश: - भूत व भविष्यकालाचा स्वामी - भव: - शंकर - ययौ - आला ॥६-१॥ मरुद्भि: - एकोणपन्नास मरुद्गणांसह - भगवान् - ऐश्वर्यवान - इंद्र: - इंद्र - आदित्या: - बारा आदित्य - वसव: - आठ वसु - अश्विनौ - दोन अश्विनीकुमार - ऋभव: - ऋभु - अङ्गिरस: - अंगिरस - रुद्रा: - आठ रुद्र - विश्वे - विश्वेदेव - साध्या: च - आणि साध्य - देवता: - ह्या व इतर देवता ॥६-२॥ गन्धर्वा: - गंधर्व - अप्सरस: - अप्सरा - नागा: - नागलोक - सिद्धचारणगुह्यका: - सिद्ध, चारण व गुह्यक - सविद्याधरकिन्नरा: - विद्याधर व किन्नर - ऋषय: - सर्व ऋषी - पितर: - पितर - एव च - ह्या सर्वांसह सर्व स्वर्गवासी ॥६-३॥ सर्वे - हे सर्व - कृष्णदिदृक्षव: - श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची इच्छा करणारे - द्वारकां - द्वारकेस - उपसङ्जग्मु: - मोठ्या भक्तीने आले - येन वपुषा - जे सुंदर शरीर धारण करून - लोकेषु - चतुर्दश भुवनांमधे - नरलोकमनोरम: - मनुष्यांच्या नेत्रास मनोहर असणारा - भगवान् - ऐश्वर्यवान् जो श्रीकृष्ण त्याने - यश: - पवित्र यश, पापहारक कीर्ति - वितेने - पसरली - सर्वलोकमलापहं - सर्व लोकांची पापे नाहीशी करणारे ॥६-४॥
श्रीशुक म्हणतात एकदा द्वारकेत आपले पुत्र सनक इत्यादी, देव आणि प्रजापतींसह ब्रह्मदेव, भूतगणांसह सर्वेश्वर महादेव, मरूद्गणांसह देवराज इंद्र, बारा आदित्य, आठ वसू, अश्विनीकुमार, ऋभू, अंगिरस, अकरा रूद्र, विश्वेदेव, साध्यगण, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, ऋषी, पितर, विद्याधर, किन्नर इत्यादी देवगण, मनुष्यासारखा मनोहर वेष धारण करून ज्यांनी आपल्या श्रीविग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पापताप नाहीसे करणारी कीर्ती पसरविली, त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले. (१-४)


तस्यां विभ्राजमानायां समृद्धायां महर्द्धिभिः ।
व्यचक्षतावितृप्ताक्षाः कृष्णं अद्‍भुतदर्शनम् ॥ ५ ॥
ऐश्वर्ये नटले पूर समृद्धी दीपवी मनां ।
एकटक असे त्याला पाहता नच तृप्ति हो ॥ ५ ॥

महर्द्धिभि: - सर्व ऋद्धिसिद्धींनी - समृद्धायां - संपन्न असल्यामुळे - विभ्राजमानायां - अत्यंत दैदीप्यमान असणार्‍या - तस्यां - त्या द्वारका नगरीत - अद्भुतदर्शनं - अपूर्व स्वरूप आणि अपूर्व यश आहे ज्याचे अशा - कृष्णं - श्रीकृष्णाला - अवितृप्राक्षा: - कितीही पाहिले तरी तृप्त न होणार्‍या नेत्रांनी - व्यचक्षत - देवांनी नखशिखांत अवलोकन केले ॥६-५॥
सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने समृद्ध असलेल्या त्या देदीप्यमान द्वारकापुरीत दिव्य तेजाने तळपणार्‍या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांना कितीही पाहिले, तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते. (५)


स्वर्गोद्यानोपगैः माल्यैः छादयन्तो यदूत्तमम् ।
गीर्भिश्चित्रपदार्थाभिः तुष्टुवुर्जगदीश्वरम् ॥ ६ ॥
स्वर्ग उद्यानिच्या पुष्पे झाकिले जगदीश्वरा ।
विविधा अर्थ वाणींनी स्तुति ते करु लागले ॥ ६ ॥

स्वर्गोद्यानोपगै: - स्वर्गातील नंदनादि उपवनात मात्र मिळणार्‍या - माल्यै: - सुवासिक पुष्पांनी - यदूत्तमं छादयन्त:- यादवेश्वर श्रीकृष्णाला मढवून टाकणार्‍या देवांनी - चित्रपदार्थाभि: - मनोहर आहेत शब्द व मनोहर आहेत अर्थ ज्यांच्या अशा - गीर्भि: - वाणींनी - जगदीश्वरं - त्या त्रैलोक्यनाथ श्रीकृष्णाची - तुष्टवु: - उत्तम संतोष देणारी स्तुती केली ॥६-६॥
स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला आणि सुंदर शब्दार्थांनी युक्त अशा वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले. (६)


श्रीदेवा ऊचुः -
( मिश्र )
नताः स्म ते नाथ पदारविन्दं
     बुद्धीन्द्रिय प्राणमनोवचोभिः ।
यच्चिन्त्यतेऽन्तहृदि भावयुक्तैः
     मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशात् ॥ ७ ॥
देवतांनी प्रार्थिले -
( इंद्रवज्रा )
नमो तुझ्या स्वामि पदारविंदा
    बुद्धींद्रियप्राण मने नि वाचे ।
मुमुक्षु आम्ही पदि चिंतितो की
nbsp;   तुझ्या रुपाते अति भक्ति भावे ॥ ७ ॥

कर्ममयोरुपाशात् - कर्माकर्माच्या बळकट पाशांतून - मुमुक्षुभि - सुटका करून घेण्याची इच्छा करणार्‍या तुझ्या भक्तांनी - भावयुक्तै: - अनन्य भावाने व श्रद्धेने - अन्तहृदि - अंत:करणाच्या आत - यत् - जे तुझे चरणकमल - चिन्त्यते - चिंतन केले जाते - ते - त्या तुझ्या - पदारविन्दं - चरणकमलाला - नाथ - हे श्रीकृष्णा - बुद्धीन्द्रियप्राणमनोवचोभि: - आमची बुद्धी, इंद्रिये, पंचप्राण, मन, वाणी यासह - नता: स्म - प्रणिपात केला आहे ॥६-७॥
देव म्हणाले "हे स्वामी ! कर्मांच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षू भक्तिभावाने आपल्या हृदयात ज्यांचे चिंतन करीत असतात, त्या आपल्या चरणकमलांना आम्ही बुद्धी, इंद्रिये, प्राण, मन आणि वाणीने आज प्रत्यक्ष नमस्कार करीत आहोत." (७)


( वसंततिलका )
त्वं मायया त्रिगुणयाऽऽत्मनि दुर्विभाव्यं
     व्यक्तं सृजस्यवसि लुम्पसि तद्‌गुणस्थः ।
नैतैर्भवानजित कर्मभिरज्यते वै
     यत् स्वे सुखेऽव्यवहितेऽभिरतोऽनवद्यः ॥ ८ ॥
( वसंततिलका )
माये गुणत्रय अशी रचितोस सृष्टी
    नामो रुपात्मक अचिंत्य अशीच सारी ।
नी पोषिसी नि लयि नेसि न लिप्त होसी
    तू नित्य मुक्त स्वरुपी नित मग्न होसी ॥ ८ ॥

त्वं - तू - त्रिगुणया - त्रिगुणात्मक - मायया - मायेच्या सहाय्याने - आत्मनि - स्वस्वरूपातच - दुर्विभाव्यं - समजण्याला अत्यंत कठिण - व्यक्तं - स्पष्ट झालेले हे विश्व - सृजसि - उत्पन्न करतोस - अवसि - संसक्षितोस - लुम्पसि - संहार करतोस, गुप्त करतोस - तद्गुणस्थ: - त्या मायेच्या सत्वादि गुणांमध्ये नियमकत्वाने रहाणारा आहेस - अजित - ज्याचा कोणालाही पराभव करता येत नाही अशा अजिंक्य देवा - भवान् - आपणास - एतै: - ह्या - कर्मभि: - उत्पत्ति स्थितिप्रभृति कर्मांनी - न अज्यते - कसल्याही प्रकारचा लेप होत नाही - वै - खरोखर - यत् - कारण - अनवद्य: - मनोविकारांनी मलीन होणारा निर्लेप असा तू - अव्याहिते - अखंड व साक्षात अपरोक्ष असणार्‍या - स्वे सुखे - स्वानंदात - अभिरत: - रममाण झालेला असतोस ॥६-८॥
हे अजित ! आपण मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नामरूपात्मक प्रपंचाची त्रिगुणमय मायेने व्यक्तरूपात आपल्यातच उत्पत्ती, पालन आणि संहार करता पण या कर्मांनी आपण लिप्त होत नाही कारण सर्व दोषांपासून आपण मुक्त आहात आणि कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेल्या आपल्या अखंड स्वरूपभूत परमानंदामध्ये निमग्न असता. (८)


शुद्धिर्नृणां न तु तथेड्य दुराशयानां
     विद्याश्रुताध्ययन दानतपःक्रियाभिः ।
सत्त्वात्मनां ऋषभ ते यशसि प्रवृद्ध
     सच्छ्रद्धया श्रवणसम्भृतया यथा स्यात् ॥ ९ ॥
जे क्रोधि द्वेषि कलुषी जर वैदिको ते
    तेणे तयास नमिळे हृदयात शुद्धी ।
जे कीर्तनेचि भजतो मनिभाव देता
    संपुष्ट ते हृदय हो नित शुद्ध त्यांचे ॥ ९ ॥

ईड्य - हे सर्ववंद्य व सर्वस्तुत्य परमेशा - ऋषभ - पुरुषोत्तमा - श्रवणसम्भृतया - वारंवार तुझ्या यशाचे श्रवण झाल्यामुळे - ते यशसि - तुझ्या पवित्र यशाचे ठिकाणी - प्रवृद्धसच्छ्रद्धया - प्रतिक्षणी पुष्टतर होत जाणार्‍या सात्विक श्रद्धेच्या सहायाने - यथा - ज्या प्रकारे जशी - सत्त्वात्मनां - तुझ्या सात्विक भक्तांच्या मनादिकांची - शुद्धि: - शुद्धी - स्यात् - होते - तथा - तशी - विद्याश्रुताध्ययनदानतप:क्रियाभि: - वेदांतज्ञान, श्रवण, वेदाध्ययन, दान, तप, वेदोक्त कर्मे यांच्याही सहाय्याने - दुराशयानां - दूषित आहेत अंत:करणे ज्यांची अशा - नृणां - लोकांची, लोकमनाची - शुद्धि: - शुद्धी - न - होत नाही ॥६-९॥
हे स्तुती करण्यायोग्य परमात्मन ! ज्या लोकांची चित्तवृत्ती रागद्वेषादिकांनी कलुषित झालेली असते, ते उपासना, वेदाध्ययन, दान, तपश्चर्या, यज्ञइत्यादी कर्मांनी तशी शुद्ध होत नाही, जशी शुद्धान्तःकरण मनुष्यांची आपल्या कीर्तीच्या श्रवणाने वाढलेल्या श्रेष्ठ श्रद्धेने होते. (९)


स्यात् नः तवाङ्‌घ्रिः अशुभाशयधूमकेतुः
     क्षेमाय यो मुनिभिरार्द्रहृदोह्यमानः ।
यः सात्वतैः समविभूतय आत्मवद्‌भिः
     व्यूहेऽर्चितः सवनशः स्वरतिक्रमाय ॥ १० ॥
यश्चिन्त्यते प्रयतपाणिभिरध्वराग्नौ
     त्रय्या निरुक्तविधिनेश हविर्गृहीत्वा ।
अध्यात्मयोग उत योगिभिरात्ममायां
     जिज्ञासुभिः परमभागवतैः परीष्टः ॥ ११ ॥
मोक्षार्थ प्रेम पघळे हृदयात ज्यांच्या
    ते पंचरात्र विधिने पुजिती मुमुक्षु ।
संकर्षणो नि अनिरुद्ध नि वासुदेव
    प्रद्युम्न रूप चवथे पुजितात श्रद्धे ॥ १० ॥
वेदत्रयो नि विधिने ऋषि याज्ञिको ते
    संयेति हाति हवि ते स्मरूनी हवीती ।
आराध्यदेव म्हणुनी भजतात योगी
    ते पाप ताप करि भस्म हरी कृपेने ॥ ११ ॥

य: - जो - क्षेमाय - स्वकल्याणासाठी - मुनिभि: - मुनींनी - आर्दहृदा - प्रेमाने भिजलेल्या अंत:करणाने - ऊह्यमान: - चित्तात धारण केलेला असा - स्वरतिक्रमाय - स्वर्गसुखाचेही अतिक्रमण करण्यासाठी - समविभूतये - सायुज्यतेचे ऐश्वर्य मिळवण्यासाठी - आत्मवद्भि: - मनोजय करून आत्मस्वरूप जाणणार्‍या - सात्वतै: - भागवतसंप्रदायी भक्तांनी - व्यूहे - वासुदेव संकर्षणादि चार स्वरूपांमधे - सवनाश: - प्रात:कालादि तिन्ही काळी - य: अर्चित: - जो पूजिला - (स:) तव अङ्घ्रि: - तो तुझा पाय - न: अशुभाशय धूमकेतु: स्यात् - आमच्या अमंगल वासनांचा नाशक असा होवो ॥६-१०॥
ईश - परमेश्वरा - अध्वराग्नौ - यज्ञाग्नीसमक्ष - त्रय्या - वेदत्रयीने - निरुक्तविधिना - आज्ञापिलेल्या विधीने - हवि: - हवि, आहुति - गृहीत्वा - हातात धारण केल्यामुळे - प्रयतपाणिभि: - नियंत्रित व शुद्ध आहेत ज्यांचे हात अशा याज्ञिकांनी - य: - जो - चिन्त्यते - चिंतिला जातो, ज्याचे ध्यान याज्ञिक करतात - उत - आणखी - अध्यात्मयोगं - आत्म्याचे ज्ञान देणार्‍या ज्ञानयोगामध्ये - आत्ममायां - परमेश्वरी माया - जिज्ञासुभि: - जाणण्याची इच्छा करणार्‍या - योगिभि: - ज्ञानयोग्यांनी - परमभागवतै: - श्रेष्ठ भागवत भक्तांनी - परीष्ट: - भक्तिपूर्वक असा ॥६-११॥
मोक्षप्राप्तीसाठी मननशील मुमुक्षू ज्यांना आपल्या प्रेमाने द्रवलेल्या हृदयात ठेवतात, पांचरात्रविधीचे उपासक आपल्यासारख्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्यांची उपासना करतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरूद्ध या चतुर्व्यूहाच्या ठिकाणी जितेंद्रिय भक्त स्वर्गलोकाच्या पलीकडील भगवद्धामाच्या प्राप्तीसाठी त्रिकाळ ज्यांची पूजा करतात, याज्ञिक लोक तिन्ही वेदांनी सांगितलेल्या विधीने आपल्या पवित्र हातामध्ये हविर्द्रव्य घेऊन ज्यांचे चिंतन करतात, तुमचेच स्वरूप असलेल्या मायेचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणारे योगीजन हृदयाच्या आत ज्यांचे ध्यान करतात आणि श्रेष्ठ भक्तजनांना जे परम इष्ट वाटतात, तेच आपले चरण हे प्रभो ! आमच्या सर्व अशुभ वासना, भस्म करण्यासाठी अग्निस्वरूप होवोत. (१०-११)


पर्युष्टया तव विभो वनमालयेयं
     संस्पार्धिनी भगवती प्रतिपत्‍नीवत् श्रीः ।
यः सुप्रणीतममुयार्हणमाददन्नो
     भूयात् सदाङ्‌घ्रिः अशुभाशयधूमकेतुः ॥ १२ ॥
वक्षस्थलास विभवे वनमाळ ऐशी
    ती स्पर्धिते लछमिसी प्रति पत्‍नि जैशी ।
स्वीकारितोसि स्वजने पुजिताचि माळा
    जाळावयास विषयो धरि अग्निरूप ॥ १२ ॥

विभो - हे प्रभो - इयं - ही - भगवती - ऐश्वर्यसंपन्न - श्री: - लक्ष्मी देवी - प्रतिपत्निवत् - सवतीप्रमाणे - संस्पर्धिनी - जिचा मत्सर करते त्या - पर्युष्टया - शिळ्या झालेल्या - अमुया - ह्या - वनमालया - वनमालेने, तुळशीमालेने - सुप्रणीतं - यथासांग - अर्हणं - पूजन झाले असे समजून - आददन् - त्या वनमालेचा प्रीतीने स्वीकार करणारा - य: - जो - तव - तुझा - अङ्घ्रि: - चरण - सदा - सदैव - न: - आमच्या - अशुभाशयधूमकेतु: - अशुभवासनादिकांचा नाशकर्ता - स्यात् - होवो ॥६-१२॥
हे प्रभो ! ही भगवती लक्ष्मी आपल्या वक्षःस्थळावरील कोमेजलेल्याही वनमालेचा सवतीप्रमाणे मत्सर करीत असते तरीसुद्धा तिची पर्वा न करता भक्तांनी या माळेने केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात, ते आपले चरण नेहमी आमच्या विषयवासनांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप होवोत ! (१२)


केतुः त्रिविक्रमयुतः त्रिपतत्पताको
     यस्ते भयाभयकरोऽसुरदेवचम्वोः ।
स्वर्गाय साधुषु खलेष्वितराय भूमन्
     पदः पुनातु भगवन् भजतामघं नः ॥ १३ ॥
ही व्यापिण्यास धरणी त्रिपदे जधी तू
    पाऊल उंच करिशी विजयध्वजा जैं ।
भक्तास धाम नरको पतितास देशी
    हे पद्मनाभ अमुचे धुवि पाप सर्व ॥ १३ ॥

भूमन् - विश्वव्यापक देवा - त्रिविक्रमायुत: - तीन पावलातच सर्व त्रैलोक्य व्यापणारा - त्रिपतत्पताक - तिन्ही लोकांत संचार करणारी गंगा ही ज्याची पताका आहे असा - असुरदेवचम्वो: - दैत्य व देव यांच्या उभय सैन्यास - भयाभयकर: केतु: - भय व अभय अनुक्रमे देणारा केतूच असा - साधुषु - चांगल्या सज्जनांस म्हणजे देवास - स्वर्गाय - स्वर्गाकडे नेणारा - खलेषु - दुष्ट राक्षसांस - इतराय - दुसर्‍या म्हणजे नरकाकडे नेणारा - य: - जो - ते - तुझा - पाद: - चरण - भगवन् - हे भगवंता - भजतां - तुझे भजन करणारे अशा - न: - आमचे - अघं - पाप - पुनातु - शुद्ध करो, नाहीसे करो ॥६-१३॥
हे भगवन अनंता ! वामन अवतारामध्ये बलीच्या बंधनासाठी ज्याने तीन पावले टाकली होती, जो सत्यलोकावरील विजयध्वजच वाटत होता, ब्रह्मदेवांनी जो धुतला तेव्हा त्यातून कोसळणार्‍या गंगेच्या तीन धारा तीन पताकांसारख्या वाटत होत्या, ज्याला पाहून असुरांची सेना भयभीत आणि देवसेना निर्भय झाली होती, जो देवांना स्वर्ग देणारा आणि असुरांना पाताळात नेणारा होता, तो आपला चरण आम्हा भजन करणार्‍यांचे सगळे पाप धुऊन टाको ! (१३)


नस्योतगाव इव यस्य वशे भवन्ति
     ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरर्द्यमानाः ।
कालस्य ते प्रकृतिपूरुषयोः परस्य
     शं नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य ॥ १४ ॥
ब्रह्मादि देव त्रिगुणी मरती नी येती
    त्यां वेसणी तव असे स्वरुपेचि काले ।
तू तो परेश अन तो पुरुषोत्तमो रे
    तू भद्र तेचि करि पदि घेउनीया ॥ १४ ॥

नस्योतगाव: इव - नाकामधे वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे - मिथु: - परस्परांस - अर्द्यमाना: - युद्धादिकांनी त्रास देणारे, घेणारे - तनुभृत: - देहधारी - ब्रह्मादय: - ब्रह्मादिक देव - यस्य - ज्याच्या - वशे - स्वाधीन - भवन्ति - असतात - प्रकृतिपूरुषयो: - प्रकृति व पुरुष यांच्या, चराचरांच्या - परस्य - पलीकडे असणारा - कालस्य - कालरूपात्मक असा - पुरुषोत्तमस्य ते - पुरुषोत्तम जो तू त्या तुझा - चरण: - पाय - न: - आमचे - शं - कल्याण - तनोतु - करो, वाढवो ॥६-१४॥
आपापसात भांडून कष्टी होणारे ब्रह्मदेव इत्यादी शरीरधारी, वेसण घातलेले बैल मालकाच्या ताब्यात असावेत, त्याप्रमाणे ज्याच्या अधीन आहेत, जो कालस्वरूप व प्रकृतिपुरूषांच्या पलीकडे असणार्‍या आपला पुरूषोत्तमाचा चरण आहे, तो आमचे कल्याण करो ! (१४)


अस्यासि हेतुः उदयस्थितिसंयमानाम्
     अव्यक्तजीवमहतां अपि कालमाहुः ।
सोऽयं त्रिणाभिरखिलापचये प्रवृत्तः
     कालो गभीररय उत्तमपूरुषस्त्वम् ॥ १५ ॥
ते शास्त्र हेच म्हणती नियता जगा तू
    उत्पत्ति वाढ लय यां तुचि कारणो की ।
वर्षादि त्रेय ऋतु ते तव कालरूपे
    गंभीर ती गति तुझी पुरुषोत्तमारे ॥ १५ ॥

अस्य - या विश्वाचा - उदयस्थितिसंयमानां - उत्पत्ति, स्थिति व लय यांचा - हेतु: - परम कारण - असि - आहेस - अव्यक्तजीवमहताम् अपि - प्रकृति, पुरुष व महत्तत्व यांचाही - कालं - नियंता व संहारकर्ता तू आहेस असे - आहु: - म्हणतात - स: - तो - अयं - हा तू - त्रिणाभि: - चातुर्मास्याच्या रूपाने तीन नाभि असणारा संवत्सरच असून - गभीररय: - प्रचंड आहे ज्याचा वेग असा - काल: - काळच असणारा आहेस - अखिलापचये प्रवृत्त: - सर्व ब्रह्मांडाचा संहार करण्यास प्रवृत्त झाला आहेस - पुरुषोत्तम: त्वं - तूच खरा क्षराक्षरापलीकडे असणारा पुरुषोत्तम आहेस ॥६-१५॥
हे प्रभो ! या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांचे आपण परम कारण आहात कारण शास्त्रे म्हणतात की, आपण प्रकृती, पुरूष आणि महत्तत्त्व यांचेसुद्धा नियंत्रण करणारे काल आहात तोच हा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तीन रूपांनी युक्त असणार्‍या संवत्सराच्या रूपाने सर्वांना विनाशाकडे घेऊन जाणारा आहे तो अतिशय वेगवान काळ म्हणजे आपण पुरूषोत्तम आहात. (१५)


त्वत्तः पुमान् समधिगम्य यया स्ववीर्यं
     धत्ते महान्तमिव गर्भममोघवीर्यः ।
सोऽयं तयानुगत आत्मन आण्डकोशं
     हैमं ससर्ज बहिरावरणैरुपेतम् ॥ १६ ॥
माया नि वीर्य तव ते रुप गर्भ घेते
    विश्वास तत्व मिळते मग त्या मधोनी ।
पॄथ्वी जालादि कवचो मग सात होती
    ब्रह्मांड स्वर्णि निघते तयिच्या मधोनी ॥ १६ ॥

त्वत्त: - तुझ्याच पासून - वीर्यं - शक्ति, सामर्थ्य - समधिगम्य - प्राप्त करून घेऊन - अमोघवीर्य: - सदैव सफल होणारे आहे वीर्य ज्याचे असा - पुमान् - पुरुष, ईश्वर - यया - ज्या मायेसह - महान्तं - महत्तत्त्वास - अस्य गर्भं इव - ह्या विश्वाच्या गर्भाप्रमाणे - धत्ते - धारण करतो - तया - त्याच मायेने - अनुगत: - अनुसरलेला - स: - तो - अयं - हा सगुण परमेश्वर - आत्मन: - आपल्यापासून - हैमं - सुवर्णमय - आण्डकोशं - ब्रह्मांडकोश - ससर्ज - उत्पन्न करता झाला - बहि: - बाहेरून - आवरणै: - नऊ आवरणांनी, कवचांनी - उपेतं - युक्त असा ॥६-१६॥
हा पुरूष आपल्याकडे शक्ती प्राप्त करून घेऊन अमोघवीर्य बनतो आणि नंतर मायेमध्ये विश्वाच्या गर्भरूप महत्तत्त्वाची स्थापना करतो यानंतर तेच महत्तत्त्व त्रिगुणमय मायेच्या साह्याने पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार आणि मनरूपी सात आवरणे असलेल्या सोनेरी ब्रह्मांडाची रचना करते. (१६)


तत्तस्थूषश्च जगतश्च भवानधीशो
     यन्माययोत्थगुणविक्रिययोपनीतान् ।
अर्थाञ्जुषन्नपि हृषीकपते न लिप्तो
     येऽन्ये स्वतः परिहृतादपि बिभ्यति स्म ॥ १७ ॥
अधिश्वरो सकल तूचि चराचराचा
    हे कारणो कि नच तू मुळि लिंपतोस ।
हे तो तुलाच हरि रे परि शक्य आहे
    त्यागोनि अन्य विषया तरि भीती चित्ती ॥ १७ ॥

यत् - ज्याअर्थी - उत्थगुणविक्रियया - जागृत झाल्यामुळे विवृत झाले आहेत, विषम झाले आहेत गुण जिचे अशा - मायया - तुझ्याच मायेने - उपनीतान् - जवळ आलेले - अर्थान् - विषय - जुषन् अपि - सेवन करीत असताही - न लिप्त: - लिप्त झाला नाहीस - हृषीकपते - हृषीकेशा - तत् - त्याअर्थी - तस्थुष: - स्थावर पदार्थांचा - च - आणि - जगत: च - संचार करणार्‍या जीवांचाही - भवान् - तू - अधीश: - स्वामी आहेस - ये अन्ये - जे त्वदितर सर्व - स्वत: परिहृतात् अपि - आपल्यापासून दुसरीकडे नेलेल्याही विषयांस - बिभ्यति स्म - भीत असत, भितात व भितील ॥६-१७॥
म्हणून, हे हृषीकेशा ! आपण सर्व चराचर जगाचे अधीश्वर आहात; याच कारणास्तव मायेच्या गुणांच्या विषमतेमुळे निर्माण होणार्‍या निरनिराळ्या पदार्थांचा उपभोग घेत असतानाही आपण त्याने लिप्त होत नाही आपल्या व्यतिरिक्त इतर, स्वतः त्यांचा त्याग करूनसुद्धा त्या विषयांना भीत असतात. (१७)


स्मायावलोकलव-दर्शितभावहारि
     भ्रूमण्डल-प्रहितसौरत-मन्त्रशौण्डैः ।
पत्‍न्यस्तु षोडशसहस्रमनङ्गबाणैः
     यस्येन्द्रियं विमथितुं करणैर्न विभ्व्यः ॥ १८ ॥
सोळा हजार अधिको तव सर्व राण्या
    उंचावुनीहि भुवया रतिबाण देती ।
कामीकलेत तुज त्या जरि बाहतात
    तू पूर्णकाम म्हणुनी नच गुंतसी तै ॥ १८ ॥

स्मायावलोकलवदर्शितभावहारिभ्रूमण्डलप्रहितसारैतमंत्रशौण्डै: - कामोद्दीपक मधुर हास्यांनी युक्त असणारे जे नेत्रकटाक्ष त्यांनी प्रगट केलेल्या इंगितांनी मनोहर झालेल्या भ्रूमंडलद्वयाने सुरतसंबंधी मंत्र प्रेषित करण्यामधे निपुण असलेल्या - अनङ्गबाणै: - मदनाच्या बाणांच्या - करणै: - साधनांनी सुद्धा - यस्य - ज्या श्रीकृष्णाचे - इंद्रियं - इंद्रिय - विमथितुं - विकृत करण्याला, जिंकण्याला - षोडशसहस्रं - सोळा हजार - पत्न्य: तु - पत्न्या सुद्धा - न विभ्व्य: - समर्थ झाल्या नाहीत ॥६-१८॥
सोळा हजारांहून अधिक राण्या आपल्या मंद हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी प्रगट केलेल्या भावामुळे मनोहर दिसणार्‍या भुवयांच्या इशार्‍याने प्रेमभाव प्रगट करण्यात निपुण असणारे सम्मोहक कामबाण आपल्यावर सोडून आणि कामकलांचे प्रदर्शन करूनही आपले मन जराही विचलित करू शकल्या नाहीत. (१८)


विभ्व्यस्तवामृतकथो-दवहास्त्रिलोक्याः
     पादावनेजसरितः शमलानि हन्तुम् ।
आनुश्रवं श्रुतिभिः अङ्‌घ्रिजमङ्गसङ्गैः
     तीर्थद्वयं शुचिषदस्त उपस्पृशन्ति ॥ १९ ॥
गंगा नि कीर्तिसरिता द्वय वाहवीशी
    त्या पापराशि हरण्या जगतात सार्‍या ।
गंगेस स्नान करुनी तव कीर्ति गाता
    ते पाप ताप सगळे मिटतात तीर्थी ॥ १९ ॥

तव - तुझ्या - अमितकथोदवहा: - अमृतासारख्या मधुर असणार्‍या ह्याच कोणी नद्या - पादावनेजसरित: - पायांच्या तीर्थापासून उत्पन्न झालेल्या गंगाप्रभृति नद्या - त्रिलोक्या: - त्रिभुवनात असणारी - शमलानि - पापे - हन्तुं - नाहीशी करण्याला - विभ्व्य: - समर्थ आहेत - आनुश्रवं - वेदात गायलेली भगवकीर्ती - श्रुतिभि: - कर्णेंद्रियांच्या द्वारे - अङ्घ्रिजं (च) - व पायापासून निघालेली गंगा - अङ्गसङै: - सर्वांगाच्या मार्जनसाह्याने - (एवं) ते तीर्थद्वयं - याप्रमाणे कीर्ती व गंगा या दोन्ही तुझ्या तीर्थांचे - उपस्पृशन्ति - सेवन करतात - शुचिषद: - वर्णाश्रमाने चालणारे तुझे निर्मळ अंत:करणाचे भक्त ॥६-१९॥
त्रैलोक्यातील पापांच्या राशी धुऊन टाकण्यासाठी दोन पवित्र नद्या समर्थ आहेत एक आपल्या अमृतमय लीलांनी भरलेली कथानदी आणि दुसरी आपले चरण धुतल्यानंतर वाहाणार्‍या पाण्याने भरलेली गंगानदी ! म्हणूनच आश्रमधर्म पाळणारे लोक कानांनी आपल्या कथानदीमध्ये आणि शरीराने गंगेमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थांचे सेवन करतात. (१९)


श्रीबादरायणिरुवाच -
( अनुष्टुप् )
इत्यभिष्टूय विबुधैः सेशः शतधृतिर्हरिम् ।
अभ्यभाषत गोविन्दं प्रणम्याम्बरमाश्रितः ॥ २० ॥
श्री शुकदेवजी सांगतात - (अनुष्टुप्‌ )
स्तविता मुनि नी देव आकाशी स्थिर राहिले ।
शिवाच्या सह त्या ब्रह्म्ये,पुन्हा ही स्तुति गायिली ॥ २० ॥

इति - याप्रकारे - विबुधै: - देवांसह - सेश: - शंकरासह - शतधृति: - शंभर यज्ञयाग करणारा जो ब्रह्मदेव त्याने - हरि - हरीला - अभिष्टूय - उत्तम प्रकारे स्तवून - अम्बरं - आकाशाचा - आश्रित: - आश्रय केला - प्रणम्य - नमस्कार करून - गोविन्दम् अभ्यभाषत - गोविंदाला विनंती करता झाला ॥६-२०॥
श्रीशुक म्हणतात ब्रह्मदेवांनी, सर्व देव आणि शंकर यांच्यासह अशाप्रकारे भगवंतांची स्तुती केली नंतर नमस्कार करून आकाशात राहून भगवंतांना ते म्हणाले. (२०)


श्रीब्रह्मोवाच -
भूमेर्भारावताराय पुरा विज्ञापितः प्रभो ।
त्वं अस्माभिः अशेषात्मन् तत्तथैवोपपादितम् ॥ २१ ॥
श्री ब्रह्मदेवजी सांगतात -
हराया भूमिचा भार पूर्वी ते प्रार्थिले अम्ही ।
उचित कार्य ते सर्व केले पूर्ण तुम्ही असे ॥ २१ ॥

विभो - हे जगदीशा - अशेषात्मन् - सर्वांचा आत्मा असणार्‍या जगन्नियंत्या देवा - पुरा - पूर्वी - अस्माभि: - आम्हीच - भूमे: - भूमीचा - भारावताराय - भार नाहीसा करण्यासाठी - त्वं - तुला - विज्ञापित: - विनंती केली होती - तत् - ते सर्व - तथा एव - भूभारहरणाचे कार्य यथास्थित रीतीने, आम्ही म्हटले त्याप्रमाणे - उपपादितं - सिद्ध झाले आहे ॥६-२१॥
ब्रह्मदेव म्हणाले सर्वात्मन प्रभो ! आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा, अशी आम्ही अगोदर प्रार्थना केली होती ते काम चांगल्या तर्‍हेने पूर्ण केले आहे. (२१)


धर्मश्च स्थापितः सत्सु सत्यसन्धेषु वै त्वया ।
कीर्तिश्च दिक्षु विक्षिप्ता सर्वलोकमलापहा ॥ २२ ॥
धर्मही स्थापिला तुम्ही साधुकल्याण साधिले ।
कीर्ती पसरली सर्व ऐकता चित्त शुद्ध हो ॥ २२ ॥

च - आणि - सत्यसन्धेषु - सत्यप्रतिज्ञ - सत्सु - सज्जन लोकात - त्वया - त्वा - धर्म: - वेदोक्त धर्म - स्थापित: - स्थापन केला - सर्वलोकमलापहा - सर्व लोकांची पापे धुवून काढणारी - कीर्ति: च - कीर्ती सुद्धा - दिक्षु - दाही दिशात - विक्षिप्ता - पसरून ठेवली - वै - हे सर्व खरे आहे ॥६-२२॥
सत्यपरायण साधुपुरूषांच्या ठिकाणी आपण धर्माची स्थापनासुद्धा केलीत आणि दाही दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरविली. (२२)


अवतीर्य यदोर्वंशे बिभ्रद् रूपमनुत्तमम् ।
कर्माणि उद्दामवृत्तानि हिताय जगतोऽकृथाः ॥ २३ ॥
सर्वोत्तम अशा रूपे यदूंत जन्मले तुम्ही ।
लीला पराक्रमे केल्या जगदोद्धार कारणे ॥ २३ ॥

अनुत्तमं - निरतिशय सुंदर - रूपं - स्वरूप - बिभ्रत् - धारण करणारा - यदो: - यदूच्या - वंशे - वंशात - अवतीर्य - अवतार घेऊन - जगत: - जगातील जीवांच्या - हिताय - हितासाठी - उद्दामवृत्तानि - उदार व अलौकिक स्वरूप आहे ज्यांचे अशी - कर्माणि - पराक्रमाची अनंत कामे - अकृथा: - केली आहेस ॥६-२३॥
आपण हे सर्वोत्तम रूप धारण करून यदुवंशात अवतार घेतलात आणि जगाच्या हितासाठी औदार्य आणि पराक्रमाने परिपूर्ण अशा अनेक लीला केल्या. (२३)


यानि ते चरितानीश मनुष्याः साधवः कलौ ।
श्रृण्वन्तः कीर्तयन्तश्च तरिष्यन्ति अञ्जसा तमः ॥ २४ ॥
कलीत संत ते सारे लीला गातील कीर्तनी ।
अज्ञान तम हा सर्व होतील पार ते सुखे ॥ २४ ॥

ईश - देवदेवा - कलौ - कलियुगामध्ये - यानि - जी - ते चरितानि - त्वा द्वापरात आचरलेली कर्मे - (तानि) शृण्वन्त: - ती ऐकणारे - कीर्तयन्त: च - आणि गाणारे - साधव: - संत - मनुष्या: - लोक - तम: - कलियुगात असणारा अज्ञानसागर - अञ्जसा - लीलेने - तरिष्यन्ति - तरून जाण्यास समर्थ होतील ॥६-२४॥
हे प्रभो ! जी सज्जन माणसे कलियुगात आपल्या या लीलांचे श्रवणकीर्तन करतील, ती या अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील. (२४)


यदुवंशेऽवतीर्णस्य भवतः पुरुषोत्तम ।
शरच्छतं व्यतीयाय पञ्चविंशाधिकं प्रभो ॥ २५ ॥
अवतारा यदुवंशी तुझ्या रे पुरुषोत्तमा ।
सव्वाशे वर्ष ते झाले शक्तीमान प्रभो तुझे ॥ २५ ॥

पुरुषोत्तम प्रभो - पुरुषोत्तज्म प्रभो - यदुवंशे - यदुवंशात - अवतीर्णस्य - अवतार घेतलेल्या - भवत: - आपली - पञ्चविंशाधिकं शरच्छतं - सव्वाशे वर्षे - व्यतीयाय - होऊन गेली ॥६-२५॥
हे पुरूषोत्तम प्रभो ! आपण यदुवंशात अवतार घेतल्याला एकशे पंचवीस वर्षे झाली आहेत. (२५)


नाधुना तेऽखिलाधार देवकार्यावशेषितम् ।
कुलं च विप्रशापेन नष्टप्रायं अभूत् इदम् ॥ २६ ॥
सर्वांधारा असे कांही नच ते कार्य राहिले ।
द्विजशाप मिळोनीया जणू हे कुळ संपले ॥ २६ ॥

अखिलाधाऽऽर - सर्व वस्तुजाताचा आधार असणार्‍या प्रभो - अधुना - आता - देवकार्यावशेषितं - देवकार्यापैकी शिल्लक असे काही - ते - तुला - न - नाही - च - आणि - इदं कुलं - हे यादवकुळ - विप्रशापेन - ब्राह्मणांच्या शापाने - नष्टप्रायं - बहुतेक नाश पावल्यासारखे - अभूत् - झाले आहे ॥६-२६॥
हे सर्वाधार ! आता देवांचे कोणतेही कार्य शिल्लक राहिलेले नाही आपले हे कुळसुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळ जवळ नष्ट झालेलेच आहे. (२६)


ततः स्वधाम परमं विशस्व यदि मन्यसे ।
सलोकान् लोकपालान् नः पाहि वैकुण्ठ-किङ्करान् ॥ २७ ॥
उचित वाटता तुम्ही स्वधामा चालणे हरी ।
लोकपालां नि आम्हाला तेथोनी पाळणे तुम्ही ॥ २७ ॥

तत: - म्हणून, त्यानंतर - यदि - जर - मन्यसे - तुला मानवलेच - परमं - अतिश्रेष्ठ - स्वधाम - तुझे वसतिस्थान जे वैकुंठ - विशस्व - त्वा जाऊन रहावे - सलोकान् - १४ भुवनांसह - लोकपालान् - त्या त्या लोकांचे अधिपति असे - वैकुंठकिङ्करान् - वैकुंठाचे, तुझे दास अशा - न: - आम्हास - पाहि - संरक्षित कर ॥६-२७॥
म्हणून, हे वैकुंठनाथ ! आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परम धामात परत यावे आणि आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा तसेच आमच्या लोकांचा सांभाळ करावा. (२७)


श्रीभगवानुवाच -
अवधारितमेतन्मे यदात्थ विबुधेश्वर ।
कृतं वः कार्यमखिलं भूमेर्भारोऽवतारितः ॥ २८ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
ब्रह्माजी ! निश्चयो तैसा पूर्वीच जाहला असे ।
तुमचे कार्य ते केले धरेचा भार हारिला ॥ २८ ॥

विबुधेश्वर - हे सुरपते, देवा - यत् एतत् - जे हे - मे - मला - आत्थ - सांगितलेस की - व: - तुमचे - अखिलं कार्यं - सर्व कार्य - कृतं - मी केले - भूमे: भार: - भूमीचा भार - अवतारित: - हलका, नाहीसा केला - अवधारितं - ऐकले ॥६-२८॥
श्रीकृष्ण म्हणाले हे ब्रह्मदेवा ! तू म्हणालास, तसेच मी अगोदरच ठरवले आहे तुमचे सर्व काम मी पूर्ण केले असून पृथ्वीवरील भार उतरविला आहे. (२८)


तदिदं यादवकुलं वीर्यशौर्यश्रिया उद्धतम् ।
लोकं जिघृक्षत् रुद्धं मे वेलयेव महार्णवः ॥ २९ ॥
राहिले वंशिचे वीर माजले धन नी बळे ।
निघाले पृथ्वि व्यापाया लागेल रोधिणे तयां ॥ २९ ॥

तत् इदं - ते हे - वीर्यश्रौर्यश्रिया - वीर्य, शौर्य आणि संपत्ति यांच्या संपन्नतेने - उद्धतं - उन्मत्त झालेले - यादवकुलं - यादवांचे कुल - लोकं - सर्व पृथ्वी - जिघृक्षत् - काबिज करू इच्छिणारे आहे - मे - मी - रुद्धं - त्याला आवरून धरले आहे - वलया महार्णव: इव - समुद्राची मर्यादा महासागराला अडवते तसे ॥६-२९॥
परंतु हे यादवकुळ पराक्रम, शौर्य आणि संपत्तीने उन्मत्त होऊ लागले आहे हे सर्व पृथ्वी गिळून टाकील किनारा समुद्राला रोखून धरतो, त्याप्रमाणे मी यांना रोखून धरले आहे. (२९)


यदि असंहृत्य दृप्तानां यदूनां विपुलं कुलम् ।
गन्तास्म्यनेन लोकोऽयं उद्वेलेन विनङ्क्ष्यति ॥ ३० ॥
नष्ट ना करिता यांना आलोचि तर सर्व हे ।
मर्यादा सांडुनी सर्व लोकांना कापितील की ॥ ३० ॥

दृप्तानां - उन्मत्त झालेल्या - यदूनां - यादवांच्या - विपुलं - विस्तारलेल्या मोठ्या - कुलं - कुळाला - असंहृत्य - नष्ट केल्यावाचून - यदि गन्ता अस्मि - जर मी प्रयाण करीन - अनेन - ह्या - उद्वेलेन - कुलाच्या अन्याय्य अतिक्रमणामुळे - लोक: अयं - ही पृथ्वी - विनङ्क्ष्यति - सर्वथा नाश पावेल ॥६-३०॥
या उच्छृंखल यदूंचा हा विशाल वंश नष्ट न करताच मी जर निघून गेलो, तर हा मर्यादेचे उल्लंघन करून या जगाचा संहार करील. (३०)


इदानीं नाश आरब्धः कुलस्य द्विजशापजः ।
यास्यामि भवनं ब्रह्मन् एतदन्ते तवानघ ॥ ३१ ॥
आरंभ जाहला नाशा लाभोनी द्विजशाप तो ।
अंत होताचि तो सारा स्वधामा परतेन मी ॥ ३१ ॥

इदानीं - आताच - कुलस्य - यादवकुलाचा - द्विजशापत: नाश: - विप्रांच्या शापामुळे होणारा नाश - आरब्ध: - आरंभित झाला आहे - अनघ-ब्रह्मन् - निष्पाप ब्रह्मदेवा - एतदन्ते - हा संपूर्ण नाश झाल्यानंतर - तव - तुझ्या - भवनं - भुवनाला - यास्यामि - येईन ॥३१॥
हे पुण्यशील ब्रह्मदेवा ! ब्राह्मणांच्या शापामुळे आता या वंशाचा नाश होण्यास सुरूवात झाली आहे याचा अंत झाला की, मी स्वधामाला परत येईन. (३१)


श्रीशुक उवाच -
इत्युक्तो लोकनाथेन स्वयंभूः प्रणिपत्य तम् ।
सह देवगणैर्देवः स्वधाम समपद्यत ॥ ३२ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
वदता लोकनाथे हे ब्रह्म्याने तो प्रणामिला ।
देवतांसह ते ब्रह्मा स्वलोकां पातले तदा ॥ ३२ ॥

लोकनाथेन - त्रैलोक्यनाथाने - इति उक्त: - याप्रमाणे वर्तमान सांगितलेला - स्वयंभू: देव: - ब्रह्मदेव - तं प्रणिपत्य - त्या श्रीकृष्णाला वंदन करून - सह देवगणै: - सर्व देवांसह - स्वधाम - आपल्या लोकास - समपद्यत - जाता झाला ॥६-३२॥
श्रीशुक म्हणतात अखिल लोकाधिपती श्रीकृष्णांनी असे सांगितल्यावर ब्रह्मदेवाने त्यांना नमस्कार केला आणि देवतांसह ते आपल्या धामाकडे निघून गेले. (३२)


अथ तस्यां महोत्पातान् द्वारवत्यां समुत्थितान् ।
विलोक्य भगवान् आह यदुवृद्धान् समागतान् ॥ ३३ ॥
उत्पात द्वारकी झाले कुशकूनहि सर्व ते ।
पाहता यदु ते येता भगवान्‌ बोलले तयां ॥ ३३ ॥

अथ - त्यानंतर - तस्यां द्वारवत्यां - त्या द्वारकेमधेच - समुत्थितान् - उत्पन्न झालेले - महोत्पातान् - अशुभसूचक व विनाशक भूकंपादि उत्पात - विलोक्य - पाहून - भगवान् - श्रीकृष्ण - समागतान् - एकत्र मिळालेल्या - यदुवृद्धान् - यादवकुळातील पोक्त पुरुषांस - आह - म्हणाला ॥६-३३॥
नंतर त्या द्वारकापुरीमध्ये मोठमोठे अपशकून होऊ लागले ते पाहून यदुवंशातील ज्येष्ठश्रेष्ठ श्रीकृष्णांकडे आले तेव्हा त्यांनी त्यांना असे सांगितले. (३३)


श्रीभगवानुवाच -
एते वै सुमहोत्पाता व्युत्तिष्ठन्तीह सर्वतः ।
शापश्च नः कुलस्यासी‍त् ब्राह्मणेभ्यो दुरत्ययः ॥ ३४ ॥
न वस्तव्यं इह अस्माभिः जिजीविषुभिः आर्यकाः ।
प्रभासं सुमहत् पुण्यं यास्यामोऽद्यैव मा चिरम् ॥ ३५ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
कुशकुन नि उत्पात द्वारकी घडती सदा ।
द्विजांचा लाभला शाप टाळणे तो कठीणची ॥ ३४ ॥
वाचाया प्राण ते येथे राहणे नच युक्त हो ।
अविलंबचि की जावे प्रभास क्षेत्रि आपण ॥ ३५ ॥

इह सर्वत: - येथे सर्व बाजूंनी - एते सुमहोत्पाता; - हे भयंकर उत्पात - व्युतिष्ठन्ति वै - खरोखर उत्पन्न होत आहेत - च - आणि - ब्राह्मणेभ्य: - ब्राह्मणांनी - दुरत्यय: - दुर्धर - शाप: - शाप - न: कुलस्य - आपल्या यदुकुलाला - आसीत् - दिलेला आहे, त्याचाही हा परिणाम असेल ॥६-३४॥
आर्यका: - हे वृद्ध व पोक्त यादवांनो - जिजिविषुभि: अस्माभि: - जगण्याची इच्छा असणार्‍या आम्ही - इह - येथे - वस्तव्यं न - रहाणे ठीक नाही - मा चिरं - अर्थात उशीर न करता - अद्य एव सुमहत्पुण्यं प्रभासं यास्याम: - आजच पुण्यकारक प्रभास क्षेत्रास जाऊ ॥६-३५॥
श्रीकृष्ण म्हणाले जेथे जिकडेतिकडे आजकाळ मोठमोठे अपशकुन होत आहेत शिवाय ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणे कठीण आहे म्हणून सज्जन हो ! आपल्याला जर जगायचे असेल तर आपण येथे राहू नये म्हणून आता उशीर करून नका आपण आचज परम पवित्र अशा प्रभासक्षेत्री जाऊ. (३४-३५)


यत्र स्नात्वा दक्षशापाद् गृहीतो यक्ष्मणोडुराट् ।
विमुक्तः किल्बिषात् सद्यो भेजे भूयः कलोदयम् ॥ ३६ ॥
तेथील महिमा थोर चंद्राचा शाप नष्टला ।
मिटला रोग तो सारा कलांची वृद्धि जाहली ॥ ३६ ॥

यत्र - ज्या पुण्यक्षेत्री - स्नात्वा - स्नान करून - दक्षशापात् - दक्ष प्रजापतीच्या शापामुळे - यक्ष्मणा गृहीत: - क्षय रोगाने पीडलेला - उडुराट् - तारानाथ चंद्र - किल्बिशात् - त्या रोगापासून - सद्य: - तात्काळ - विमुक्त: - मुक्त झाला - भूय: - पुन्हा - कलोदयं - आपल्या षोडश कलांचा उदय - भेजे - प्राप्त करून घेता झाला ॥६-३६॥
दक्ष प्रजापतीच्या शापाने जेव्हा चंद्राला क्षयरोगाने ग्रासले, त्यावेळी त्याने तेथे जाऊन स्नान केले आणि त्याच क्षणी त्या पापजन्य रोगातून त्याची सुटका झाली आणि पुन्हा त्याच्या कला वाढू लागल्या. (३६)


वयं च तस्मिन् आप्लुत्य तर्पयित्वा पितॄन् सुरान् ।
भोजयित्वोषिजो विप्रान् नानागुणवतान्धसा ॥ ३७ ॥
तेषु दानानि पात्रेषु श्रद्धयोप्त्वा महान्ति वै ।
वृजिनानि तरिष्यामो दानैः नौभिः इवार्णवम् ॥ ३८ ॥
करू स्नान तिथे सर्व पितरे देव तर्पुया ।
करू उत्तम ते अन्न द्विजां भोजन देउ ते ॥ ३७ ॥
दक्षिणा दानही देऊ श्रद्धेने ब्राह्मणा तिथे ।
संकटी तरुया सर्व जहाज तरते तसे ॥ ३८ ॥

वयं च - आणि आपणही - तस्मिन् - त्या प्रभास तीर्थात - आप्लुत्य - स्नानादि करून - पितॄन - पितरांना - सुरान च - आणि देवांना - तर्पयित्वा - तर्पणोदकाने संतुष्ट करून - नानागुणवता अन्धसा - माधुर्यादि अनेक गुणांनी युक्त अशा अन्नाने - उशिज: विप्रान् - पवित्र पांच ब्राह्मणांना भोजयित्वा - भोजन घालून ॥६-३७॥
तेषु पात्रेषु - त्या सत्पात्र ब्राह्मणांचे ठिकाणी - महान्ति - मोठमोठाली - दानानि - दाने - श्रद्धया - श्रद्धापुर:सर - उप्त्वा - अर्पण करून, पेरून - वै - खरोखर - दानै: - या दानसाह्याने - (महान्ति) वृजिनानि - ही सर्व भयंकर विघ्नशते - तरिष्याम - तरून जाण्यास समर्थ होऊ - नौभि: - नौकासहाय्याने - अर्णवम् इव - सागर तरता येतो त्याप्रमाणे ॥६-३८॥
आपणसुद्धा तेथे जाऊन स्नान करू देवता आणि पितरांचे तर्पण करू त्याचबरोबर अनेक उत्तमोत्तम पक्वान्ने तयार करून श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन घालू तेथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेने मोठी दानदक्षिणा देऊ आणि अशा प्रकारे नौकेने समुद्र पार करावा, त्याप्रमाणे दानांनी आपण संकटे पार करून जाऊ. (३७-३८)


श्रीशुक उवाच -
एवं भगवताऽऽदिष्टा यादवाः कुलनन्दन ।
गन्तुं कृतधियस्तीर्थं स्यन्दनान् समयूयुजन् ॥ ३९ ॥
श्री शुकदेवजी सांगतात-
आज्ञापिता असे कृष्णे सगळे यदुवंशि ते ।
एकमत करोनिया रथा सजवु लागले ॥ ३९ ॥

कुलनन्दन - कुलभूषणा परीक्षिति राजा - एवं - याप्रमाणे - भगवता - भगवंताने - आदिष्टा: - आज्ञापिलेले - यादवा: - सर्व यादव - तीर्थं - तीर्थाला - गन्तुं - जाण्याचा - कृतधिय: - निश्चय करून - स्यन्दनान् - रथ - समयूजन् - सज्ज करून तयार झाले ॥६-३९॥
श्रीशुक म्हणतात - हे कुलनंदना ! भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अशी आज्ञा केली, तेव्हा यादवांनी प्रभासक्षेत्री जाण्याचे ठरवून रथ सज्ज केले. (३९)


तन् निरीक्ष्योद्धवो राजन् श्रुत्वा भगवतोदितम् ।
दृष्ट्वा अरिष्टानि घोराणि नित्यं कृष्णमनुव्रतः ॥ ४० ॥
विविक्त उपसङ्गम्य जगतां ईश्वरेश्वरम् ।
प्रणम्य शिरिसा पादौ प्राञ्जलिः तमभाषत ॥ ४१ ॥
उद्धवो भक्त कृष्णाचा तयारी पाहता अशी ।
हरीची ऐकुनी आज्ञा कुशकून बघोनिया ॥ ४० ॥
एकांती गाठुनी भेटे एकट्या जगदीश्वरा ।
पायासी टेकुनी डोके हात जोडोनि प्रार्थिले ॥ ४१ ॥

राजन् - राजा - तत् - ते सर्व - निरीक्ष्य - पाहून - भगवता उदितं - (च) श्रुत्वा - व भगवंताचे भषण ऐकून - घोराणि अरिष्टानि - महाभयंकर उत्पात - दृष्ट्वा - पाहून - नित्यं - सदैव - कृष्णं अनुव्रत: - कृष्णाचा अनन्य भक्त - उद्धव: - उद्धव ॥६-४०॥
विविक्ते - एकांतस्थळी - जगतां ईश्वरेश्वरं उपसङ्गम्य - जगन्नायक श्रीकृष्णाला गाठून - पादौ - दोन्ही पायांवर - शिरसा प्रणम्य - शिरसांष्टांग नमस्कार घालून - प्राञ्जलि: तं अभाषत - हात जोडून विनयपूर्वक म्हणाला ॥६-४१॥
परीक्षिता ! उद्धव श्रीकृष्णांचा एकान्त भक्त होता जेव्हा त्याने ती तयारी पाहिली भगवंतांची आज्ञा ऐकली आणि अतिशय घोर अपशकुन झाल्याचेही पाहिले, तेव्हा तो जगाच्या अधिपतींचे ईश्वर असणार्‍या श्रीकृष्णांकडे एकांतात गेला, त्यांच्या चरणावर डोके टेकवून त्यांना त्याने नमस्कार केला आणि हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागला. (४०-४१)


श्रीउद्धव उवाच -
देवदेवेश योगेश पुण्यश्रवणकीर्तन ।
संहृत्यैतत्कुलं नूनं लोकं सन्त्यक्ष्यते भवान् ॥ ४२ ॥
उद्धवजी म्हणाले-
देवदेवेश योगेशा पुण्यश्रवणकीर्तना ।
शक्तिमान्‌ असुनी तूं तो द्विजाचा शाप मानिला ॥
कळाले मजला चित्ती स्वधाम इच्छिले तुम्ही ॥ ४२ ॥

देव - देवा - देवेश - देवाधिदेवा - योगेश - योगेश्वरा - पुण्यश्रवनकीर्तन - पवित्रकर आहे ज्याच्या कीर्तीचे श्रवण व गान अशा पुण्यश्लोका - नूनं - बहुतेक, लवकरच - एतत् कुलं - संहृत्य - भवान् - तू - लोकं - हा पृथ्वीलोक - संत्यक्ष्यते - सोडून जाणार - यत् - कारण - ईश्वर: समर्थ: अपि - कर्तुमकर्तुं समर्थ असूनही - विप्रशापं - ब्राह्मणांनी दिलेला शाप - न प्रत्यहन् - निराकृत केला नाहीस ॥६-४२॥
उद्धव म्हणाला हे योगेश्वर देवाधिदेव ! आपल्या लीलांचे श्रवणकीर्तन पुण्यकारक आहे आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही यावरून मला वाटते की, आता आपण यदुवंशाचा संहार करून या लोकाचा त्याग करणार, हे निश्चित ! (४२)


विप्रशापं समर्थोऽपि प्रत्यहन् न यदीश्वरः ।
नाहं तवाङ्‌घ्रिकमलं क्षणार्धमपि केशव ।
त्यक्तुं समुत्सहे नाथ स्वधाम नय मामपि ॥ ४३ ॥
क्षणार्ध त्यजिणे पाया मजला शक्य ते नसे ।
जीवस्वामी मलाही त्या स्वधामी घेउनी चला ॥ ४३ ॥

केशव - देवा - तव - तुझे - अङ्घ्रिकमलं - चरणकमल - क्षणार्धमपि - एक अर्ध क्षण सुद्धा - त्यक्तुं - सोडण्यास - अहं न समुत्सहे - मला इच्छा, शक्ति व उत्साह नाहीत - नाथ - स्वामिन् - मा अपि - मलाही - स्वधाम नय - तुझ्या वैकुंठलोकी घेऊन चल ॥६-४३॥
परंतु हे केशवा ! आपल्या चरणकमलांना मी अर्ध्या क्षणासाठीसुद्धा सोडू शकत नाही हे स्वामी ! आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला. (४३)


तव विक्रीडितं कृष्ण नृणां परममङ्गलम् ।
कर्णपीयूषमासाद्य त्यजति अन्यस्पृहां जनाः ॥ ४४ ॥
शय्यासनाटनस्थान स्नानक्रीडाशनादिषु ।
कथं त्वां प्रियमात्मानं वयं भक्ताः त्यजेम हि ॥ ४५ ॥
लीला सर्व तुझ्या लोका कल्याणी अमृतापरी ।
चाखिता एकदा त्याला दुसरा रस ना रुचे ॥ ४४ ॥
उठता बसता शय्यी स्नान नी भोजनी तसे ।
तुझ्यात रमलो खेळी सोडू कैसे तुला प्रभो ॥ ४५ ॥

कृष्ण तव विक्रीडितं - कृष्णा तुझ्या लीला - नॄणां - लोकांचे, तुझ्या भक्ताचे - परममङ्गलं - अत्यंत कल्याण करणार्‍या असतात. - कर्णपीयूषं - तुझ्या लीलांचे परम मधुर कर्णामृत - आस्वाद्य - सेवन केल्यानंतर - जन: - प्रत्येक मनुष्य - अन्यस्पृहां - इतर इच्छा - त्यजति - टाकूनच देतो ॥६-४४॥
शय्यासनाटनस्थानस्नानक्रीडाशनादिषु - शय्येवर असता, आसनावर बसतांना, फिरतांना, स्नान, विहार, आहार इत्यादिकांचे वेळी - वयं भक्ता: - आम्ही तुझी सेवा करणारे तुझे भक्त - प्रियं आत्मानं त्वां - आमचा प्रियकर आत्माच असणारा जो तू त्या तुला - कथं - कसे - त्यजेमहि - एकट्यालाच जाऊ देऊ ॥६-४५॥
हे कृष्णा ! आपली लीला माणसांसाठी परम मंगल आणि कानांना अमृतस्वरूप आहे ज्याला एक वेळ तिची गोडी लागली, त्याच्या मनात नंतर दुसर्‍या कोणत्याही वस्तूची इच्छाच शिल्लक राहात नाही प्रभो ! आम्ही तर झोपणे बसणे, हिंडणे, फिरणे, स्नान, खेळ, भोजन इत्यादी सर्व प्रसंगांत आपल्याबरोबरच असतो आपण आमचे प्रियतम आत्मा आहात आम्ही आपल्याला कसे सोडू ? (४४-४५)


त्वयोपभुक्त स्रग् गन्ध वासोऽलङ्कारचर्चिताः ।
उच्छिष्टभोजिनो दासाः तव मायां जयेम हि ॥ ४६ ॥
तुझ्यामाळा गळा ल्यालो तुझे चंदन चर्चिले ।
तुझे वस्त्र तसे ल्यालो दागिने अंगि धारिले ।
उष्ट्याचे सेवको आम्ही माया ना बाधिते अम्हा ॥ ४६ ॥

त्वया - तुवा - उपभुक्तस्रग्गन्धवासोलङ्कारचर्चिता: - उपभोगलेल्या पुष्पमाळांनी व गंध, वस्त्रे, अलंकार यांनी शृंगारलेले - उच्छिष्टभोजिन: - तुला अर्पण केलेल्या प्रसादातून अवशिष्ट राहिलेला प्रसाद खाणारे - तव दासा: - तुझे दास असे आम्ही - मायां - मायेला - जयेमहि - जिंकण्यास नि:संसय समर्थ होतो ॥६-४६॥
आपण वापरलेली माळ, चंदन, वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू प्रसाद म्हणून घेणारे आम्ही आपले सेवक आहोत म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू. (४६)


वातरशना ये ऋषयः श्रमणा ऊर्ध्वमन्थिनः ।
ब्रह्माख्यं धाम ते यान्ति शांताः सन्न्यासीनोऽमलाः ॥ ४७ ॥
कठीण तशि ती माया योग्यांही दुस्तरो अशी ।
ैष्कर्म्य यति ते होती ब्रह्मधामास पावती ॥ ४७ ॥

वातरशना: - वायु भक्षण करणारे - ऋषय: - तप करणारे - श्रमणा: - व्रतस्थ - ऊर्ध्वमन्थिन: - ऊर्ध्वरेते, नैष्ठिक ब्रह्मचारी - संन्यासिन: - परमहंस - शान्ता: अमला: (ते)- शांत व निर्मळ असतात ते - ते - तुझ्या - ब्रह्माखं धाम - वैकुंठ नावाचा जो सर्वश्रेष्ठ लोक त्या प्रत - यान्ति - जातात ॥६-४७॥
अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन करून अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय परिश्रम करतात अशा त्या संन्याशांचे हृदय निर्मळ होते, तेव्हा कुठे ते शांत होऊन आपले ब्रह्म नावाचे स्थान प्राप्त करून घेतात. (४७)


वयं तु इह महायोगिन् भ्रमन्तः कर्मवर्त्मसु ।
त्वद् वार्तया तरिष्यामः तावकैः दुस्तरं तमः ॥ ४८ ॥
स्मरन्तः कीर्तयन्तस्ते कृतानि गदितानि च ।
गत्युत्स्मितेक्षणक्ष्वेलि यत् नृलोकविडम्बनम् ॥ ४९ ॥
कर्मात भ्रमतो आम्ही करितो भजने तुझी ।
लीला मधुर त्या सार्‍या चिंतनी आणितो सदा ॥ ४८ ॥
चालणे हासणे दृष्टी स्मरता तंद्रि लागते ।
येणेचि शक्य ती माया दुस्तरा सहजी तरू ॥ ४९ ॥

तु - परंतु - महायोगिन् - योगेश्वरा - इह - ह्या लोकी - कर्मवर्त्मसु - कर्ममार्गात, संसारात - भ्रमन्त: - भ्रमण करीत असूनही - तावकै: - तुझ्या भक्तांसह - वयं - आम्ही - त्वद्वार्तया - तुझ्या चरित्रसंकीर्तनानेच - दुस्तरं तम: - दुर्लंघ्य असा अज्ञानसागर, संसार - तरिष्याम: - तरण्यास समर्थ होतो ॥६-४८॥
ते कृतानि - तुझ्या लीला - गदितानि - तुझा उपदेश - गत्युत्स्मितेक्षणक्ष्वेलि - तुझे गमनागमन, हसणे, पहाणे, विनोद करणे यांना - स्मरन्त: कीर्तयन्त: च - स्मरणारे व प्रेमाने तुझे यश गाणारे आम्ही मायासागर लीलेने ओलांडतो - यत् - ज्या तुझ्या लीला - नृलोकविडम्बनं - मनुष्याप्रमाणेच वरवर दिसतात, पण मोक्षोपयोगी वस्तुत: असतात ॥६-४९॥
हे महायोगेश्वर ! आम्ही तर कर्ममार्गातच भटकणारे आहोत परंतु आम्ही आपल्या भक्तजनांबरोबर आपले गुण आणि लीलांची चर्चा करून तसेच माणसासारख्या कृती करीत आपण जे काही केलेत, किंवा सांगितलेत, त्यांचे स्मरणकीर्तन करीत राहू त्याचप्रमाणे आपले चालणेबोलणे, हास्ययुक्त पाहाणे आणि थट्टाविनोद यांच्या आठवणीत तल्लीन राहू केवळ एवढ्यानेच आम्ही आपली दुस्तर माया पार करू. (४८-४९)


श्रीशुक उवाच -
एवं विज्ञापितो राजन् भगवान् देवकीसुतः ।
एकान्तिनं प्रियं भृत्यं उद्धवं समभाषत ॥ ५० ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
देवकीनंदना कृष्णां उद्धवे प्रार्थिता असे ।
अन्यही प्रेमि मित्रांना भगवान्‌ वदले पहा ॥ ५० ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सहावा अध्याय हा ॥
॥ ११ ॥ ६ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - राजा - एवं - येणेप्रमाणे - विज्ञापित: - विनवलेला - भगवान् देवकीनन्दन: - देवकी मातेला परमानंद देणारा षड्गुणैश्वर्य भगवान - एकान्तिनं - अत्यंत एकनिष्ठ - प्रियं - आवडता - भक्तं - उपासक अशा - उद्धवं - उद्धवाला - समभाषत - प्रेमाने सांगू लागला ॥६-५०॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांना जेव्हा उद्धवांनी अशी प्रार्थना केली, तेव्हा ते आपल्या अनन्यप्रेमी सखा व सेवक असलेल्या उद्धवाला म्हणाले. (५०)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
अध्याय सहावा समाप्त

GO TOP