|
श्रीमद् भागवत पुराण
भक्तिहीनपुरुषाणां निष्ठायाः प्रतियुगं पूजाविधानस्य च भेदवर्णनम् - भक्तिहीन पुरूषांची गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीराजोवाच -
भगवन्तं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः । तेषां अशान्तकामानां का निष्ठा अविजितात्मनाम् ॥ १ ॥
राजा निमिने विचारिले - (अनुष्टुप् ) न शांत कामना ज्याच्या भोगांची लालसा उरे । मनेंद्रियी नसे ताबा अभक्तां गति काय ती ॥ १ ॥
आत्मवित्तमा: - हे आत्मवेत्ते ऋषी हो - भगवन्तं - श्रीभगवान - हरि
- हरीची - प्राय: - सामान्यत: - भजन्ति न - उपासना करत नाहीत. - तेषां - त्यापैकी - अविजितात्मनां - ज्यांनी आपला देह, मन, बुद्धी प्रभृति स्वाधीन करून घेतली नाहीत - अशान्तकामानां - ज्यांच्या वासना निमाल्या नाहीत - का - कोणती - निष्ठा - स्थिती प्राप्त होते ॥५-१॥
श्रीचमस उवाच -
( अनुष्टुप् ) मुखबाहूरुपादेभ्यः पुरुषस्याश्रमैः सह । चत्वारो जज्ञिरे वर्णा गुणैर्विप्रादयः पृथक् ॥ २ ॥ ये एषां पुरुषं साक्षात् आत्मप्रभवमीश्वरम् । न भजन्ति अवजानन्ति स्थानाद्भ्रष्टाः पतन्त्यधः ॥ ३ ॥
योगीश्वर चमसजी म्हणाले - मुख बाहू नि मांड्यांसी पायासी पुरुषाचिया । वर्ण आश्रम ते आले क्रमाने प्रगटोनिया ॥ २ ॥ वर्णांचा जन्मदाता तो आत्मा नी स्वामी तोच की । न भजे हरिसी जीव अधःपतन त्यां घडे ॥ ३ ॥
पुरुषस्य - महापुरुष जो विराट त्याच्या - मुखबाहुरूपादेभ्य: - तोंड, हात, मांड्या आणि पाय यापासून - आश्रमै: - चार ब्रह्मचर्यादि आश्रम यांच्या - सह - सहवर्तमान - विप्रादय: - ब्राह्मणप्रभृति - चत्वार: - चार - वर्णा: - वर्ण - गुणै: - सत्वादि तीन गुणांच्या सहाय्याने - पृथक् - निरनिराळे - जज्ञिरे - उत्पन्न झाले. ॥५-२॥ एषां - यांच्यापैकी - ये - जे कोणी - आत्मप्रभवं - आपली उत्पत्ती ज्यापासून झाली त्या - ईश्वरं - सर्वसत्ताधीश - साक्षात् पुरुषं - साक्षात महापुरुषाला - भजन्ति न - भजत नाहीत. - अवजानन्ति - व त्याचा अनादर करतात. - (ते) स्थानात् - ते स्वत:च्या वर्णापासून व आश्रमापासून - भ्रष्टा: - भ्रष्ट होतात - अध: - खाली - पतन्ति - पडतात. ॥५-३॥
चमस म्हणाला - विराट पुरूषांच्या मुखापासून सत्त्वप्रधान ब्राह्मण, भुजांपासून सत्त्वरजप्रधान क्षत्रिय, मांड्यांपासून रजतम प्रधान वैश्य आणि चरणांपासून तमप्रधान शूद्र अशी गुणांनुसार चार वर्णांची उत्पत्ती झाली आहे तसेच त्यांच्याच मांड्यांपासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षःस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले आहेत जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणार्या भगवंतांचे भजन करीत नाहीत, उलट त्यांचा अनादर करतात, ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात. (२-३)
दूरे हरिकथाः केचिद् दूरे चाच्युतकीर्तनाः ।
स्त्रियः शूद्रादयश्चैव तेऽनुकम्प्या भवादृशाम् ॥ ४ ॥
कीर्तनापासुनी कैक स्त्रिया शूद्रहि दूर ते । तुम्ही संत दयावंत कीर्तने उद्धरा तयां ॥ ४ ॥
केचित् - पण त्यातील काही लोक - दूरेहरिकथा: - श्रीहरीच्या कथा ज्यांस ऐकावयास सापडणे अशक्य असते - च - आणि - दूरे अच्युतकीर्तना: - अच्युताच्या नामकीर्तनाचे प्रसंग ज्यांस कधी येतच नाहीत अशा - स्त्रिय: - स्त्रिया - च - आणि - शूद्रादय: - शूद्रप्रभृति अज्ञ लोक - ते भवादृशां - ते तुमच्यासारख्या पुण्यपुरुषांच्या - अनुकम्प्या: एव - दयेस पात्र असतात ॥५-४॥
पुष्कळशा स्त्रिया आणि शूद्र इत्यादी भगवंतांच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत आपल्यासारख्यांनी त्यांना कथाकीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी. (४)
विप्रो राजन्यवैश्यौ वा हरेः प्राप्ताः पदान्तिकम् ।
श्रौतेन जन्मनाथापि मुह्यन्त्याम्नायवादिनः ॥ ५ ॥
द्विज क्षात्र तसे वैश्ये यज्ञो पवित धारिणे । हरिच्या पदि ते ठेले चुकती वेदअर्थ ते ॥ ५ ॥
अथ - परंतु - श्रौतेन - उपनयनादि श्रुत्युक्त - जन्मना - दुसरा वेदोक्त जन्म प्राप्त होऊन - अपि - ही - विप्र - ब्राह्मण - च - आणि - राजन्यवेश्यौ - क्षत्रिय, वैश्य हे - हरे: - श्रीहरीच्या - पदान्तिकं - चरणांजवळ - प्राप्ता: - प्राप्त होणारे ते - आम्नायवादिन: - वेदांच्या परोक्ष अर्थाचा मात्र स्वीकार करतात म्हणून - मुह्यन्ति - मोह पावतात, मूर्ख होतात. ॥५-५॥
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जन्माने, वेदाध्ययनाने तसेच उपनयनादी संस्कारांनी भगवंतांच्या चरणांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत तरीसुद्धा वेदांतील अर्थवादामुळे ते कर्मफलांत आसक्त होतात. (५)
कर्मण्यकोविदाः स्तब्धा मूर्खाः पण्डितमानिनः ।
वदन्ति चाटुकान् मूढा यया माध्व्या गिरोत्सुकाः ॥ ६ ॥
रहस्य न कळे तेही गर्वे पंडित बोलती । भुलती गोड शब्दाते बोलती चुकिचे तसे ॥ ६ ॥
कर्मणि - वेदोक्त कर्मांचे - अकोविदा: - रहस्य न समजणारे - स्तब्धा: - हट्टी - मूर्खा: - मूर्खा - पण्डितमानिन: - आपणास पंडित, सर्वज्ञ समजणारे - यया - ज्या - माध्व्या - वेदांच्या वरवर, मधुर व मोहक - गिरा - वाणीने - उत्सुका: - हुरळून जाणारे - मूढा: - मूढ - चाटुकान् - त्या वेदांचा आधार घेऊन गोड गोड वाक्यांची - वदन्ति - आवृत्ति करीत बसतात. ॥५-६॥
त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूप वाणीची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःही स्वर्गसुखांची वाखाणणी करू लागतात. (६)
रजसा घोरसङ्कल्पाः कामुका अहिमन्यवः ।
दाम्भिका मानिनः पापा विहसन्ति अच्युतप्रियान् ॥ ७ ॥
रजें संकल्प तो वाढे कामना वाढती तशा । भरे सापापरी क्रोध पापी भक्तास हासती ॥ ७ ॥
रजसा - रजोगुणामुळे - घोरसंकल्पा: - भयंकर व दुसर्यास अपकारक संकल्प करणारे - कामुका: - विषयांचा-कामिनीकांचनाचा अभिलाष धरणारे - अहिमन्यव: - सर्पाप्रमाणे दीर्घकाल दंश धरणारे - दांभिका: - ढोंगी - मानिन: - हट्टी असे - पापा: - पापी लोक - अच्युतप्रियान् - श्रीअच्युताला प्रिय असणार्या प्रेमळ भक्तांस - विहसन्ति - थट्टेचा विषय करतात ॥५-७॥
रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात त्यांच्या इच्छांनातर सीमाच नसते सापासारखा त्यांचा क्रोध असतो असे हे ढोंगी, घमेंडखोर पापी भगवंतांच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवितात. (७)
( मिश्र )
वदन्ति तेऽन्योन्यमुपासितस्त्रियो गृहेषु मैथुन्यपरेषु चाशिषः । यजन्ति असृष्टान् अविधान् अदक्षिणं वृत्त्यै परं घ्नन्ति पशून् अतद्विदः ॥ ८ ॥
(इंद्रवज्रा ) उपासिती मूर्ख स्त्रियास कोणी स्त्री सौख्य मोठे वदती कुणी ते । यज्ञात दानो नच देति कोणा पोसावया देह वधी पशूला ॥ ८ ॥
उपासितस्त्रिय: - उपभोग्य स्त्रियांची उपासना करणारे - ते - ते हे विषयासक्त लोक - मैथुन्यपरेषु - रतिसुखासाठी मात्र निर्माण केलेल्या - गृहेषु - मंदिरांमध्ये - अन्योन्यं - एकमेकांस - आशिष: - आशीर्वाद - वदन्ति - देतात - च असृष्टान्नविधानदक्षिणं - व अन्नसंतर्पण, वेदोक्त विधिविधान आणि ब्राह्मणांस दक्षिणा ज्यात नाही असे वेदनिषिद्ध - यजन्ति - यज्ञ करतात - वृत्यै - जीवरक्षणासाठी - परं - मात्र - पशून् घ्नन्ति - पशूंची हिंसा करतात - अतद्विद: - त्यांस वेदांचे रहस्य कळलेले नसते ॥५-८॥
ते स्त्रियांच्या सहवासात राहून गृहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख तेच असल्याचे सांगतात ते अन्नदान, यज्ञविधी, दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचार्या पशूंची हत्या करतात. (८)
श्रिया विभूत्याभिजनेन विद्यया
त्यागेन रूपेण बलेन कर्मणा । जातस्मयेनांधधियः सहेश्वरान् सतोऽवमन्यन्ति हरिप्रियान्खलाः ॥ ९ ॥
श्रीवैभवो कूळ नि दान विद्या त्यागे नि रूपे बळ कर्म योगे । होतो तयांना बहु गर्व मोठा देवा नि संता अवमानितात ॥ ९ ॥
श्रिया - संपत्तीने - विभूत्या - ऐश्वर्याने - अभिजनेन - कुलीनपणामुळे - विद्यया - विद्येने - त्यागेन - दानधर्माने - रूपेण - रूपसौंदर्याने - बलेन - शरीरबलाने - कर्मणा - कर्तबगारीने - जातस्मयेन - संपत्त्यादिकांमुळे अतिशय गर्व झाल्याकारणाने - अन्धधिय: - ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे असे ते - सहेश्वरान् - ब्रह्मांडनायकासह - हरिप्रियान् - हरिप्रिय हरिदास जे - सत: - साधुसंत त्यांचा - अवमन्यन्ति - तिरस्कार करतात - खला: - हे लोक दुष्ट असतात ॥५-९॥
धन, वैभव, कुलीनता, विद्या, दान, सौंदर्य, सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात असे हे दृष्ट, भगवत्प्रेमी संतांचा, इतकेच नव्हे तर ईश्वराचासुद्धा अपमान करतात. (९)
सर्वेषु शश्वत् तनुभृत्स्ववस्थितं
यथा खमात्मानमभीष्टमीश्वरम् । वेदोपगीतं च न श्रृण्वतेऽबुधा मनोरथानां प्रवदन्ति वार्तया ॥ १० ॥
नभापरी ईश सर्वां रुपात आत्मारुपाने प्रिय उत्तमो तो । हे बोलती वेद पुनः पुन्हा ही ते मूर्ख स्वप्ना रचिती मनासी ॥ १० ॥
यथा - ज्याप्रमाणे - खं - आकाश - सर्वेषु - अखिल - तनुभृत्सु - शरीरधारी जीवांमध्ये - अवस्थितं व्यापक स्वरूपाने रहाणारे - शश्वत् - नित्य - आत्मानं - आत्मतत्व - अभीष्टं - अत्यंत इष्ट असणारे - ईश्वरं - ईश्वरी स्वरूपच - च - आणि - वेदोपगीतं - वेदाने ज्याची कीर्ति गाईली त्या स्वरूपाची - अबुधा: - समंजस लोक नव्हेत ते - न शृण्वते - आत्मा व परमात्मा यांचे श्रवणच करीत नाहीत - मनोरथानां - आपल्या वासनापूर्ण संकल्पांच्या - वार्तया - वार्तारूपाने - प्रवदन्ति - वेदमंत्रांचा अर्थ करतात. ॥५-१०॥
भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणार्यांमध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत हे वेदांनी सांगितलेले तत्त्व हे मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याचे सांगतात. (१०)
लोके व्यवाय आमिषमद्यसेवा
नित्यास्तु जन्तोर्न हि तत्र चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाहयज्ञ सुराग्रहैरासु निवृत्तिरिष्टा ॥ ११ ॥
मैथून मांसो अन मद्य घेणे विधान नाही परि सेविण्याचे । विवाह यज्ञींच तशी व्यवस्था सीमा असे ती त्यजिण्या श्रुतिची ॥ ११ ॥
लोके - या भूलोकी - जन्तो: - जीवाचे - व्यवायामिषमद्यसेवा: - व्यवाय म्हणजे मैथुन, आनिष म्हणजे मांसाशन आणि मद्यपान यांचा उपभोग - नित्या: तु - स्वाभाविकच असतात - तत्र - त्याकामी - चोदना न हि - वेदाज्ञेची प्रेरणा असण्याचे कारणच नाही. - तेषु विवाह-यज्ञ-सुराग्रहै: व्यवस्थिति: - त्या उपभोगांमध्ये लग्न, यज्ञ आणि सौत्रामणि विधि ह्यांनी सुंदर व्यवस्था उत्पन्न होते - आसु निवृत्ति: इष्टा - या वरील उपभोगांमध्ये पराङ्मुखता इष्ट आहे ॥५-११॥
जगात मैथुन, मांस आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत तर विवाह, यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञांच्या द्वारे जी त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे, ती लोकांच्या उच्छृंखल प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे. (११)
धनं च धर्मैकफलं यतो वै
ज्ञानं सविज्ञानमनुप्रशान्ति । गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य मृत्युं न पश्यन्ति दुरन्तवीर्यम् ॥ १२ ॥
धनास ते एक फळोचि धर्म ज्ञानोनि निष्ठा मिळतेहि शांती । धनास मूढो धरिती प्रपंची न पाहती की जवळीच मृत्यू ॥ १२ ॥
धनं - द्रव्य - धर्मैकफलं - धर्म हेच एक ज्याचे फल आहे असे आहे - यत: - धर्माचरणापासून - अनुप्रशान्ति: - उत्तम अनुतापद्वारा शांती प्राप्त होते - च - आणि - सविज्ञानं - साक्षात्कारसहित - ज्ञानं वै - ज्ञान, आत्मज्ञान मिळतेच - गृहेषु - घरादारादिकांत - युञ्जन्ति - उपयोजितात - कलेवरस्य - या पांचभौतिक देहाचा - (ग्रासकं) दुरन्तवीर्यं - ग्रासक अकुंठपराक्रमी, सर्वविजयी - मृत्युं - कालरूपी मृत्यु - न पश्यन्ति - पहात नाहीत ॥५-१२॥
धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय कारण धर्मामुळेच परमतत्त्वाचे ज्ञान, त्यापासून साक्षात्कार व त्यामुळेच परम शांती यांचा लाभ होतो परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे, हे ते पाहात नाहीत. (१२)
यद् घ्राणभक्षो विहितः सुरायाः
तथा पशोः आलभनं न हिंसा । एवं व्यवायः प्रजया न रत्या इमं विशुद्धं न विदुः स्वधर्मम् ॥ १३ ॥
यज्ञात मद्या मुळि सुंगणे नी मांसास स्पर्शो नच मान्य हिंसा । प्रजार्थ स्त्री ती नच भोगण्याला हा शुद्ध धर्मो त्यजितात मूढ ॥ १३ ॥
यत् - ज्याअर्थी - सुराया: - मद्याचा - घ्राणभक्ष: - वास घेणे हेच भक्षण होय - विहित: - असे श्रुतीने विहित केले आहे - तथा - त्याच अर्थी - पशो: - यज्ञपशूचा - आलभनं - स्पर्श मात्र विहित केला आहे - न हिंसा - त्याची हिंसा करणे श्रुतीला मान्य नाही - एवं - याच न्यायाने - प्रजया - पुत्रोत्पादनासाठी मात्र - न रत्या - रतिसुखसाठी नाही - व्यवाय: - संभोग विहित आहे - इमं - हा - विशुद्धं - अत्यंत निर्मळ - स्वधर्मं - वर्णाश्रमधर्म - न विदु: - या कामुक लोकांस माहीत नाही ॥५-१३॥
सौत्रामणी यज्ञामध्येसुद्धा मद्याचा वास घेणे, एवढेच विधान आहे पिण्याचे नाही यज्ञामध्ये पशूला फक्त स्पर्श करावयासच सांगितले आहे, हिंसा नव्हे ! तसेच धर्मपत्नीबरोबर मैथुनसुद्धा विषयभोगासाठी नव्हे, तर संततीसाठी आहे हा आपला विशुद्ध धर्म ते जाणत नाहीत. (१३)
( अनुष्टुप् )
ये तु अन्-एवंविदो असन्तः स्तब्धाः सदभिमानिनः । पशून् द्रुह्यन्ति विश्रब्धाः प्रेत्य खादन्ति ते च तान् ॥ १४ ॥
(अनुष्टुप् ) शुद्ध धर्म असा जे ना मानिती गर्वि ते पहा । हींसीं ते मरता त्यांना भक्षिती पशु तेच की ॥ १४ ॥
तु - परंतु - ये - जे - अनेवंविद: - शुद्ध धर्मसंबंधाने खरे ज्ञान नसणारे - असन्त: - हट्टी, उद्धट - सदाभिमानिन: - आपण म्हणतो तेच सत्य होय, असा वृथा अभिमान बाळगणारे - विस्रब्धा: - नि:शंक होत्साते - पशून् - यज्ञपशूंचा - द्रुह्यन्ति - द्वेष करून वध करतात - तान् - त्या अधर्माचरणी लोकांस - ते च - ते पशूच - प्रेत्य - मेल्यानंतर इतर लोकी - खादन्ति - खातात ॥५-१४॥
जे हे जाणत नाहीत, ते गर्विष्ठ वास्वविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निःशंकपणे पशूंची हिंसा करतात परंतु मेल्यानंतर ते पशूच त्यांना खातात. (१४)
द्विषन्तः परकायेषु स्वात्मानं हरिमीश्वरम् ।
मृतके सानुबन्धेऽस्मिन् बद्धस्नेहाः पतन्त्यधः ॥ १५ ॥
मर्त्य देहास संबंधी मरता तुटती तदा । स्वताला देव मानोनि द्वेषिती भगवंत जे ॥ त्या मूर्खांचे घडे नक्की अधःपतन ते तसे ॥ १५ ॥
परकायेषु - स्वेतरांच्या शरीरात - स्वात्मानं - रहाणारा जो नित्य आत्मा - ईश्वरं - जो सर्व प्रभु - हरि - श्रीहरी साक्षात आहे त्याचा - द्विषन्त: - द्वेष करणारे हेच नास्तिक - अस्मिन् - ह्या - सानुबन्धे - पुत्रादिकांच्या देहासह - मृतके - या मर्त्य देहावरच - बद्धस्नेहा: - अत्यंत प्रेम करून देहवश होतात - अध: - खाली - पतन्ति - पडतात ॥५-१५॥
हे शरीर मरणारे आहे व याच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसर्या शरीरात राहाणाराही आपलाच आत्मा सर्वशक्तिमान श्रीहरीच आहे, हे न कळून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अधःपात होतो. (१५)
ये कैवल्यं असम्प्राप्ता ये चातीताश्च मूढताम् ।
त्रैवर्गिका ह्यक्षणिका आत्मानं घातयन्ति ते ॥ १६ ॥
जया ना मिळला मोक्ष अशांत अधुरे असे । कुर्हाड मारणे पायी तसेच आत्मघाति ते ॥ १६ ॥
ये - ज्या लोकांस - कैवल्यं - केवळ जे आत्मस्वरूप ते - असंप्राप्ता: - मिळालेले नसतेच - च - आणि - ये मूढतां - जे मूर्खपणाच्याही - अतीता: - पलीकडे गेलेले असतात - ते - ते लोक - त्रैवर्गिका: - धर्म, अर्थ व काम या तिहींच्या पाठी मागे लागतात - च - आणि - अक्षणिका: - आपण नित्य आहो असे मानतात - आत्मानं - आपल्या स्वत:चा - घातयन्ति हि - घातच करतात ॥५-१६॥
ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानीसुद्धा नाहीत, ते धर्म, अर्थ, काम या तीन पुरूषार्थांनाच महत्त्व देतात त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही ते आत्मघातकीच होत. (१६)
एते आत्महनोऽशान्ता अज्ञाने ज्ञानमानिनः ।
सीदनती अकृतकृत्या वै कालध्वस्तमनोरथाः ॥ १७ ॥
अज्ञाना वदती ज्ञान तया ना शांति ती मिळे । भंगती स्वप्न ते सर्व विषाद दाह ना मिटे ॥ १७ ॥
एते - हे - आत्महन: - आत्मघातकी - अशान्ता: - अस्वस्थ - अज्ञाने - अज्ञानातच - ज्ञानमानिन: - आपण ज्ञानी आहो असे समजणारे - अकृतकृत्या: - कर्तव्य न केल्यामुळे अकृतार्थ असलेले - कालध्वस्तमनोरथा: - कालाने ज्यांचे मनोरथ उध्वस्त केले आहेत असे - सीदन्ति वै - खरोखर नाश पावतात ॥५-१७॥
अज्ञानालाच ज्ञान मानणार्या या आत्मघातकी लोकांना कधीच शांती मिळत नाही काळाने ज्यांचे मनोरथ धुळीला मिळवले आहेत, असे हे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात. (१७)
हित्वा अत्यायारचिता गृहापत्यसुहृत् स्त्रियः ।
तमो विशन्ति अनिच्छन्तो वासुदेवपराङ्मुखाः ॥ १८ ॥
कृष्णा विन्मुख ते सारे श्रमे प्रपंच साधिती । अंती ते सोडणे लागे नरकी पडणे घडे ॥ १८ ॥
अत्याऽऽयासरचिता: - पराकाष्ठेचे श्रम करून तयार केलेली - गृहाऽपत्यसुहृच्छ्रिय: - घर, मुले, स्नेही आणि संपत्ति ही विषयोपभोगाची साधने - हित्वा - टाकण्यास भाग पडलेले - वासुदेवपराङ्मुखा: - श्रीहरीला पारखे झालेले जीव - अनिच्छन्त: - इच्छा नसतांनाही - तम: - अंधकारमय नरकात - विशन्ति - प्रविष्ट होऊन दु:खे भोगीत रहातात ॥५-१८॥
जे लोक भगवंतांना विन्मुख झाले आहेत, ते अत्यंत परिश्रम करून मिळविलेली घर, पुत्र, मित्र आणि धनसंपत्ती सोडून देऊन शेवटी नाईलाजाने घोर नरकात जाऊन पडतात. (१८)
श्री राजोवाच -
कस्मिन् काले स भगवान् किं वर्णः कीदृशो नृभिः । नाम्ना वा केन विधिना पूज्यते तदिहोच्यताम् ॥ १९ ॥
राजा निमिने विचारिले- कोण्या काळी कसा रंग आकार घेइ श्रीहरी । मनुष्ये कोणत्या नामे विधीने पूजिणे तया ॥ १९ ॥
कस्मिन् - कोणत्या - काले - काळी, युगात - स: - तो - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीहरी - कीदृश: - कोणत्या स्वरूपाचा - किंवर्ण: - कोणत्या वर्णाचा असतो - वा - अथवा - केन - कोणत्या - नाम्ना - नावाने - विधिना - वेदोक्त विधीने - नृभि - मानवांकडून - इह - या लोकी - पूज्यते - पूजिला जातो - तत् - ते - उच्यतां - कृपाकरून सांगावे ॥५-१९॥
राजाने म्हटले - भगवान, कोणत्या वेळी, कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्यांची कोणत्या नावांनी आणि विधींनी उपासना करतात, ते आपण सांगावे. (१९)
श्रीकरभाजन उवाच -
कृतं त्रेता द्वापरं च कलिरित्येषु केशवः । नानावर्णाभिधाकारो नानैव विधिनेज्यते ॥ २० ॥
योगीश्वर करभाजन म्हणाले- सत्य त्रेता नि द्वापार कलि या युगि केशवा । अनेक रूप नामाने विधिने पूजिणे असे ॥ २० ॥
कृतं - कृतयुग - त्रेता - त्रेतायुग - द्वापरं - द्वापरयुग - च: - आणि - कलि: - कलियुग - इति - या नावाच्या - एषु - ह्या ह्या युगात - केशव: - श्रीकेशव - नानावर्णाभिधाकार: - अनेक पण प्रत्येक युगाला योग्य असा विशेष वर्ण, विशेष नाव आणि विशेष आकार म्हणजे स्वस्वरूप धारण करणारा जो श्री केशव त्याची - नाना एव विधिना - निरनिराळ्या विधींनी म्हणजे प्रकारांनी - इज्यते - उपासना करतात ॥५-२०॥
करभाजन म्हणाला - सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युगे आहेत या युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे रंग, नामे आणि आकृती असतात तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते. (२०)
कृते शुक्लश्चतुर्बाहुः जटिलो वल्कलाम्बरः ।
कृष्णाजिनोपवीताक्षान् बिभ्रद् दण्डकमण्डलू ॥ २१ ॥
श्वेत सत्यीं चतुर्बाहू जटावल्कलधारि तो । कृष्णाजीन पवीताक्ष धारी दंड कमंडलू ॥ २१ ॥
कृते - कृतयुगात - शुक्ल: - शुभ्रवर्ण - चतुर्बाहु: - चार हातांचा - जटिल: - जटा धारण करणारा - वल्कलाम्बर: - झाडाच्या सालींची वस्त्रे परिधान करणारा - कृष्णाजिनोपवीताक्षान् - कृष्णमृगचर्म, यज्ञोपवित आणि रुद्राक्षमाला ही - बिभ्रत् - धारण करणारा - दण्डकमण्डलू - दंड आणि कमंडलू ॥५-२१॥
सत्ययुगांमध्ये भगवंतांचा रंग शुभ्र असतो त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात ते वल्कले नेसतात कृष्णाजिन, यज्ञोपवीत, रूद्राक्षांची माळ, दंड आणि कमंडलू ते धारण करतात. (२१)
मनुष्यास्तु तदा शान्ता निर्वैराः सुहृदः समाः ।
यजन्ति तपसा देवं शमेन च दमेन च ॥ २२ ॥
हितैषी समदर्शी नी शांत ती माणसे तदा । इंद्रियां रोधुनी ध्यानी प्रकाशात्मचि पूजिती ॥ २२ ॥
तदा - त्या युगात - मनुष्या: - मनुष्यप्राणी - तु - खरोखर - शान्ता; - शांतवृत्तीचे - निर्वैरा: - कोणाशीही शत्रुभाव न धरणारे - सुहृद: - सर्वांशी मैत्रीने वागणारे - समा: - उच्चनीच भाव न धरणारे - देवम् - श्रीहरीचे - तपसा - तपश्चर्या करून शमेन च - आणि शांत मनाने - दमेन च - आणि इंद्रियास आपल्या ताब्यात ठेऊन - यजन्ति - आराधना करतात ॥५-२२॥
त्या युगातील माणसे शांत, वैरभाव न बाळगणारी, सर्वांचे हित चिंतिणारी आणि समदर्शी असतात इंद्रिये आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चर्येने देवाची आराधना करतात. (२२)
हंसः सुपर्णो वैकुण्ठो धर्मो योगेश्वरोऽमलः ।
ईश्वरः पुरुषोऽव्यक्तः परमात्मेति गीयते ॥ २३ ॥
हंसो सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वरामल । ईश्वरो पुरुषोऽव्यक्त नावाने पूजिती तया ॥ २३ ॥
हंस: - हंस - सुपर्ण: - सुपर्ण - वैकुण्ठ: - वैकुंठ - धर्म: - धर्म - योगेश्वर: - योगेश्वर - अमल: - पवित्र - ईश्वर: - ईश्वर - पुरुष: - पुरुषोत्तम - अव्यक्त: - इंद्रियांस अगोचर असणारा - परमात्मा - परमात्मा - इति - या नावांनी - गीयते - परमेश्वराचे संकीर्तन होत असते, कृतयुगात परमेश्वराची ही नावे प्रसिद्ध असतात. ॥५-२३॥
त्या युगात हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरूष, अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात. (२३)
त्रेतायां रक्तवर्णोऽसौ चतुर्बाहुस्त्रिमेखलः ।
हिरण्यकेशः त्रय्यात्मा स्रुक् स्रुवादि उपलक्षणः ॥ २४ ॥
त्रेतात रक्तवर्णो तो चारभूजा नि मेखळा । सुवर्ण केश ते त्याचे स्त्रुक् स्रुवा धारितो करी ॥ २४ ॥
त्रेतायां - त्रेतायुगात - असौ - हा परमेश्वर - रक्तवर्ण: - तांबड्या रंगाचा - चतुर्बाहु: - चार हातांचा - त्रिमेखल: - तीन रज्जूंचा कमरपट्टा धारण करणारा - हिरण्यकेश: - पिंगट वर्णाचे केस असणारा - त्रय्यात्मा - तीनही वेदांचा आत्मा असणारा - स्रुक्स्रुवाद्युपलक्षण: - स्रुक्स्रुवादि यज्ञपात्रे धारण करणारा ॥५-२४॥
त्रेतायुगामध्ये भगवंतांचा रंग लाल असतो त्यांना चार हात असतात ते तीन मेखला धारण करतात त्यांचे केस सुवर्णासारखे असतात ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून स्रुक, स्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात. (२४)
तं तदा मनुजा देवं सर्वदेवमयं हरिम् ।
यजन्ति विद्यया त्रय्या धर्मिष्ठा ब्रह्मवादिनः ॥ २५ ॥
धर्मनिष्ठ असे सारे वेदाध्यायनि सर्वची । गावोनी तीन वेदाते पूजिती सर्वदेव तो ॥ २५ ॥
तदा - त्या त्रेतायुगात - सर्वदेवमयं - सर्व देवांस स्वस्वरूपात अंतर्भूत करणारा - हरि - हरि - तं - त्या - देवं - परमेश्वराला - धर्मिष्ठा: - वेदधर्मानुरूप चालणारे - ब्रह्मवादिन: - वेदवेदांतवेत्ते - मनुजा: - मानव - त्रय्या विद्यया - तीनही वेदविद्यांनी - यजन्ति - आराधना करतात ॥५-२५॥
त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययनअध्यापन करणारी असतात ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदरूप वेदत्रयीच्या द्वारे ते सर्वदेवस्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात. (२५)
विष्णुर्यज्ञः पृश्निगर्भः सर्वदेव उरुक्रमः ।
वृषाकपिर्जयन्तश्च उरुगाय इतीर्यते ॥ २६ ॥
त्रेतात अधिकांशाने लोकात यज्ञ विष्णु नी । वॄषाकपि जयंतो नी उरुगायादि पूजिती ॥ २६ ॥
विष्णु: - विष्णु - यज्ञ: - यज्ञ - पृश्निगर्भ: - पृश्नीचा सुत - सर्वदेव: - परमेश्वर - उरुक्रम: - महापराक्रमी, त्रिविक्रम - वृषकपि: - वृषाकपि - जयन्त: - जयंत - च - आणि - उरुगाय: - सर्ववंद्य, अलौकिक कीर्तीचा - इति - या प्रकारांनी - ईर्यते - आळवतात ॥५-२६॥
त्रेतायुगामध्ये त्यांना विष्णू, यज्ञ, पृश्निगर्भ, सर्वदेव, उरूक्रम, वृषाकपी, जयंत आणि उरूगाय या नावांनी संबोधतात. (२६)
द्वापरे भगवान् श्यामः पीतवासा निजायुधः ।
श्रीवत्सादिभिः अङ्कैश्च लक्षणैः उपलक्षितः ॥ २७ ॥
द्वापारी भगवान् श्याम पीतवस्त्र निजायुधे । श्रीवत्सचिन्हही धारी कौस्तुभे शोभती पहा ॥ २७ ॥
द्वापरे - द्वापर युगात - भगवान् - श्रीपरमेश्वर - श्याम: - काळसर वर्णाचा - पीतवासा: - पिवळा पितांबरधारी - निजायुध: - शंका, चक्र, गदा, पद्म ही आयुधे धारण करणारा - श्रीवत्सादिभि: - श्रीवत्सप्रभृति - अङ्कै: - चिन्हांनी - च - आणि - लक्षितै: उपलक्षित: - कौस्तुभादि अलंकारांनी सुशोभित असा हा देव ओळखता येतो. ॥५-२७॥
द्वापरयुगात भगवंतांचा रंग सावळा असतो ते पीतांबर धारण करतात शंख, चक्र, गदा, पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात वक्षःस्थळावरील श्रीवत्स इत्यादी चिह्ने आणि कौस्तुभमणी इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात. (२७)
तं तदा पुरुषं मर्त्या महाराजोपलक्षणम् ।
यजन्ति वेदतन्त्राभ्यां परं जिज्ञासवो नृप ॥ २८ ॥
जिज्ञासु छत्र चौर्यादी चिन्हांनी पूजिती तया । तांत्रिकी वैदिकी मार्गे विधिने पूजिती तसे ॥ गाती ते स्तुतिही त्याची श्रद्धेने कर जोडुनी ॥ २८ ॥
नृप - राजा - तदा - द्वापर युगात - महाराजोपलक्षणं - छत्र चामरादि सार्वभौम राजाची चिन्हे धारण करणार्या - तं - त्या - पुरुषं - पुरुषोत्तमाला - परं जिज्ञासव: - अति श्रेष्ठ जे परमात्मतत्व ते जाणण्याची तीव्र इच्छा करणारे - मर्त्या: - मर्त्य मानव - वेदतन्त्राभ्यां - वेद म्हणजे निगम व तंत्र म्हणजे आगम, आगमनिगमांच्या सहाय्याने - यजन्ति - आराधन करतात ॥५-२८॥
राजन ! त्यावेळी जिज्ञासू माणसे, राजचिह्नांनी युक्त अशा त्या परमपुरूषाची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात. (२८)
नमस्ते वासुदेवाय नमः सङ्कर्षणाय च ।
प्रद्युम्नाय अनिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः ॥ २९ ॥ नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने । विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः ॥ ३० ॥
नमस्ते वासुदेवाला नमो संकर्षणास या । प्रद्युम्ना अनिरुद्धाला भगवंतासि या नमो ॥ २९ ॥ असे द्वापारि ते गाती स्तवने जगदीश्वरा । नारायण ऋषिसी नी महात्मा पुरुषास त्या ॥ विश्वेश्वरा नि विश्वा नी भूतात्मा भगवान् नमो ॥ ३० ॥
वासुदेवाय - वासुदेव अशा - ते नम: - तुला नमस्कार असो - च - आणि - सङ्कर्षणाय नम: - संकर्षण नामक तुला नमस्कार असो - प्रद्युम्नाय - प्रद्युम्ननामक - अनिरुद्धाय - अनिरुद्ध नामक - तुभ्यं - तुला - भगवते - भगवंताला - नम: - नमस्कार असो ॥५-२९॥ नारायणाय - नारायणनामक - ऋषये - ऋषीश्वराला - पुरुषाय - पुरुषोत्तमाला - महात्मने - महानुभावाला - विश्वेश्वराय - ब्रह्मांडाच्या प्रभूला - विश्वाय - ब्रह्मांडस्वरूप जो त्याला - सर्वभूतात्मने - सर्व चराचराचा आत्मा जो परमेश्वर त्याला - नम: - नमस्कार असो ॥५-३०॥
ते म्हणतात, "वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरूद्ध या चतुर्व्यूह रूपात असणार्या आपणास आम्ही नमस्कार करतो ऋषी नारायण, महात्मा नर, विश्वेश्वर, विश्वरूप आणि सर्वभूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो. (२९-३०)
इति द्वापर उर्वीश स्तुवन्ति जगदीश्वरम् ।
नानातन्त्रविधानेन कलौ अपि तथा श्रृणु ॥ ३१ ॥
आता कलियुगामध्ये विधि कित्येक पूजनी । पूजिती लोक या ईशा प्रकार ऐकणे तसे ॥ ३१ ॥
उर्वीश - हे पृथिवीपते - इति - या पूर्वोक्त नावांनी - द्वापरे - द्वापर युगात - जगदीश्वरं - ब्रह्मांडनायक जो प्रभु त्याला - स्तुवन्ति - स्तवितात, परमेश्वराची स्तुती करतात - कलौ अपि - कलियुगात सुद्धा - नानातन्त्रविधानेन - अनेक आगमोक्त विधानांनी - यथा - ज्याप्रकारे आराधतात - श्रृणु - ऐक ॥५-३१॥
राजन ! अशा प्रकारे द्वापरयुगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतींनी भगवंतांची जशी पूजा केली जाते, त्याचे वर्णन ऐक. (३१)
कृष्णवर्णं त्विषाकृष्णं साङ्गोपाङ्गास्त्र पार्षदम् ।
यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैः यजन्ति हि सुमेधसः ॥ ३२ ॥
कृष्णवर्ण कलीमाजी शस्त्र नी पार्षदे तशी । यज्ञ संकीर्तनो भक्ती प्रधान नाम गायिणे ॥ ३२ ॥
हि - कारण - कृष्णवर्ण - काळ्या वर्णाचा - त्विषा - तेजाने - अकृष्णं - शुभ्र असणारा - साङ्गोपाङ्गास्त्रपार्षद: - सर्व प्रधान व गौण शस्त्रास्त्रे धारण करून सुनंदादि पार्षद म्हणजे परिपार्श्विकांसह असणारा जो भगवान त्याची - सुमेधस: - सुबद्ध भक्त - सङ्कीर्तनप्रायै: - नामसंकीर्तनादिकांनीच व्यापलेल्या - यज्ञै: - यज्ञांनी - यजन्ति - आराधना करतात ॥५-३२॥
कलियुगामध्ये भगवंतांचा कृष्णवर्ण असतो इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते ते हृदय इत्यादी अंगे, कौस्तुभ इत्यादी उपांगे, सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंद प्रभृती पार्षदांनी युक्त असतात श्रेष्ठ बुद्धिमान पुरूष कलियुगात, नामसंकीर्तनरूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात. (३२)
( वसंततिलका )
ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् । भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥ ३३ ॥
(वसंततिलका ) हे भक्त रक्षक हरी चरणारविंदा ध्याताचि मुक्ति मिळते जणु कामधेनु । तीर्थास तीर्थ पद जे पुजि सांब ब्रह्मा वंदे महापुरुष तू,चरणारविंदा ॥ ३३ ॥
प्रणतपाल - दीन आश्रितांचे रक्षण करणार्या - महापुरुष - पुरुषोत्तमा - ते - तुझे - चरणारविंद - चरणकमल जे त्याला - वन्दे - वंदन करतो - सदा - सदैव - ध्येयं - ध्यान करण्यास योग्य - परिभवघ्नं - सर्व आधिव्याधींचा नाश करणारे - अभीष्टदोहं - सर्व इष्ट मनोरथांची कामधेनु - तीर्थास्पदं - पवित्र तीर्थांचे आश्रयस्थान - शिवविरचिनुतं - शंकर व ब्रह्मदेव यांनी स्तविलेले - शरण्यं - शरणागतास आश्रय देणारे - भृत्यार्तिहं - दासांची, भक्तांची संकटे निवारण करणारे - च - आणि - भवाब्धिपोतं - भवसागरातून सुरक्षित नेणारी नौकाच होय ॥५-३३॥
ते लोक अशी स्तुती करतात "हे शरणागतरक्षका ! आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य, सांसारिक संकटांचा नाश करणारे, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत ते तीर्थस्वरूप आहेत शिव, बह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात शरण जाण्यास योग्य, सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारे व संसारसागर पार करून नेणारी ती नौका आहे हे महापुरूष ! अशा आपल्या चरणारविंदांना मी वंदन करीत आहे. (३३)
त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेप्सित राज्यलक्ष्मीं
धर्मिष्ठ आर्यवचसा यदगात् अरण्यम् । मायामृगं दयितयेप्सितमन्वधावद् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् ॥ ३४ ॥
दुस्त्यज्य राज्य त्यजिले वनि पातला तू मानोनि पितृवचना फिरलास पायी । मायामृगास हरिण्या पदि धावलास वंदे महापुरुष तू निजधर्मसीमा ॥ ३४ ॥
धर्मिष्ठ - हे धर्मपालका - महापुरुष - पुरुषोत्तम - ते चरणारविन्दं वन्दे - तुझे चरणकमळ मी शिरी धारण करतो - सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं त्यक्त्वा - देवांसही हवे असणार्या म्हणून त्याग करण्याला अत्यंत कष्टप्रद अशा राज्यवैभवाचाही त्याग करून - यत् - ज्याअर्थी - अरण्यं - अरण्यवासासाठी - आर्यवर्चसा - पित्याची आज्ञा झाली म्हणून - अगात् - गेलास - दयितया - आपली प्राणप्रिया सीतामाऊली त्यांस - ईप्सितं - हौसेने हवा असलेल्या - मायामृगं - कपटी कांचनमृगाचा अन्वधावत् - पाठलाग केला ॥५-३४॥
हे धर्मशील महापुरूष ! रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनीसुद्धा इच्छा करावी आणि जी टाकणे कठीण अशा राज्यलक्ष्मीला सोडून रानावनात फिरत राहिले, पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरिणाचा ज्यांनी पाठलाग केला, त्या चरणारविंदांना मी वंदन करतो. (३४)
( अनुष्टुप् )
एवं युगानुरूपाभ्यां भगवान् युगवर्तिभिः । मनुजैः इज्यते राजन् श्रेयसां ईश्वरो हरिः ॥ ३५ ॥
(अनुष्टुप् ) राजा भिन्न युगीचे ते युगानुसार पूजिती । न संदेह मुळी त्यात पुरुषार्थस्वामि तो हरी ॥ ३५ ॥
एवं - याप्रमाणे - राजन् - जनक राजा - युगवर्तिभि: - युगविशेषात असणार्या - मनुजै: - नरनारींकडून - श्रेयसां ईश्वर: - पुरुषार्थाचा प्रभु असणारा - हरि: - जो श्रीहरी तो - युगानुरूपाभ्यां - त्या त्या विशेष अनुरूप युगाला असणार्या पूजादिकांनी व नामादि संकीर्तनांनी - इज्यते - पूजिला जात असतो ॥५-३५॥
राजन ! निरनिराळ्या युगांतील लोक याप्रमाणे आपपल्या युगानुरूप नामरूपांनी भगवंतांची आराधना करतात कारण सर्व पुरूषार्थांचे स्वामी श्रीहरीच आहेत. (३५)
कलिं सभाजयन्त्यार्या गुणज्ञाः सारभागिनः ।
यत्र सङ्कीर्तनेनैव सर्वस्वार्थोऽभिलभ्यते ॥ ३६ ॥
नामसंकीर्तनो सोपे कलीत स्वार्थ साधण्या । म्हणून कलिची गाती महती संत थोर ते ॥ ३६ ॥
यत्र - ज्या कलियुगात - संकीर्तनेन एव - केवळ नामसंकीर्तनाने मात्र - सर्व: स्वार्थ: - सर्व प्रकारचे इष्ट पुरुषार्थ - अभिलभ्यते - पूर्णतेने प्राप्त होतात - कलिं - त्या कलियुगाला - सारभागिन: - उत्तमाचा अंगिकार करणारे - आर्या: - श्रेष्ठ साधु - सभाजयन्ति - आदरपूर्वक वंदन प्रसिद्धपणे करतात ॥५-३६॥
कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरूष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात. (३६)
न ह्यतः परमो लाभो देहिनां भ्राम्यतामिह ।
यतो विन्देत परमां शान्तिं नश्यति संसृतिः ॥ ३७ ॥
संसारी भटके जीव कीर्तने लाभ होतसे । जन्माचा चुकतो फेरा शांति ती लाभते पहा ॥ ३७ ॥
हि - कारण - यत: - ज्यापासून - परमां शान्तिं - श्रेष्ठ प्रकारची शांती - विन्देत - मिळवता येते - च - आणि - संसृति: - संसार - नश्यति - नाहीसा होतो - अत: - त्या हरिनामसंकीर्तनापेक्षा - भ्राम्यतां देहिन: - जन्ममरणाच्या चक्रात भ्रमण करणार्या जीवास - परम: लाभ: - श्रेष्ठतर लाभ - इह - या मृत्युलोकी - न - नाहीच ॥५-३७॥
संसारचक्रामध्ये फिरणार्या माणसांना भगवंतांच्या नामसंकीर्तनापेक्षा अधिक दुसरा लाभ नाही कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परम शांतीचा अनुभव येतो. (३७)
कृतादिषु प्रजा राजन् कलौ इच्छन्ति संभवम् ।
कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायणाः ॥ ३८ ॥ क्वचित् क्वचित् महाराज द्रविडेषु च भूरिशः । ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी ॥ ३९ ॥ कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी । ये पिबन्ति जलं तासां मनुजा मनुजेश्वर । प्रायो भक्ता भगवति वासुदेवेऽमलाशयाः ॥ ४० ॥
कृतादीत प्रजा राजा या युगी जन्म इच्छिते । कित्येक भक्त ते होती नर नारायणाश्रमी ॥ ३८ ॥ महाराजा कलियुगी द्रविडीं भक्त ते बहू । होतील त्या नद्या तेथे ताम्रपर्णी पयस्विनी ॥ कृतमाला नि कावेरी प्रतीची नी महानदी ॥ ३९ ॥ पिती जळ नद्यांचे ह्या त्याचे हॄदय शुद्ध हो । भगवान् वासुदेवाचा त्वरीत भक्त होतसे ॥ ४० ॥
राजन् - जनका - कृतादिषु - कृत, त्रेता, द्वापर, या युगातील - प्रजा: - लोक - कलौ - कलियुगात - सम्भवं - जन्म व्हावा असे - इच्छन्ति - इच्छितात - कलौ - कलियुगात - खलु - खरोखर - नारायणपरायणा: - नारायणनिष्ठ - भविष्यन्ति - होणार असा संभव आहे ॥५-३८॥
महाराज - सार्वभौम राजा - क्वचित् क्वचित् - कोठे कोठे - च - आणि - द्रविडेषु - द्रविड देशात - भूरिश: - पुष्कळ होतील - यत्र - ज्या द्रविड देशात - ताम्रपर्णी - ताम्रपर्णी - नदी - नदी आहे - कृतमाला पयस्विनी - कृतमाला पयस्विनी - च - आणि - महापुण्या कावेरी - अत्यंत पवित्र व पुण्यप्रद कावेरी - प्रतीची च महानदी - प्रतीची व महानदी या नद्या आहेत ॥५-३९॥ मनुजेश्वर - नरपते - तासां जलं - त्या नद्यांचे पाणी - ये - जे - मनुजा: - मानव - पिबन्ति - पितात - अमलाशया: - अमल म्हणजे शुद्ध आशयाचे म्हणजे अंत:करणाचे होऊन - भगवति वासुदेवे - भगवान वासुदेवाचे ठिकाणी - प्राय: - बदुधा - भक्ता: - भक्ति धारण करतात ॥५-४०॥
राजन ! सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांतील प्रजेला असे वाटते की, आपला जन्म कलियुगात व्हावा कारण कलियुगात काही काही ठिकाणी भगवत्परायण भक्त जन्माला येतील म्हणून महाराज ! कलियुगात द्रविड देशामध्ये पुष्कळसे भक्त होतील तेथे ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी, परम पवित्र कावेरी, महानदी आणि प्रतीची नावाच्या नद्या वाहातात राजन ! जे लोक या नद्यांचे पाणी पितात, त्यांचे अंतःकरण शुद्ध होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात. (३८-४०)
( मिश्र )
देवर्षिभूताप्तनृणां पितॄणां न किङ्करो नायमृणी च राजन् । सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम् ॥ ४१ ॥
(इंद्रवज्रा ) त्यागोनि इच्छा पदि जे हरीच्या आला तयाने ऋण फेडियेले । तो मुक्त जाणा भवसागरात ना राहि भृत्यो अन स्वामि कोणा ॥ ४१ ॥
कर्तं - इतर सर्व प्रकारची कर्मे - परिहृत्य - टाकून देऊन - शरण्यं मुकुन्दं - सर्वांना आश्रय देणार्या मुकुंदाला - सर्वात्मना - अंत:करणपूर्वक सर्वथा - य: - जो - शरणं गत: - अनन्य भावाने शरण जातो - अयं - तो हा - देवर्षिभूताप्तनृणां - देव, ऋषी, भूते, आप्त व लोक यांचा - पितृणां - आणि पितरांचा - न किङ्कर: - दास असत नाही - च - आणि - ऋणी न - ऋणीही नसतो ॥५-४१॥
राजन ! जो कर्तृभाव सोडून सर्वात्मभावाने शरणागतवत्सल, भगवान मुकुंदांना शरण जातो, तो, देव, ऋषी, भूत, कुटुंबीय, अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहात नाही. (४१)
स्वपादमूलं भजतः प्रियस्य
त्यक्तान्यभावस्य हरिः परेशः । विकर्म यत् च उत्पतितं कथञ्चित् धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः ॥ ४२ ॥
अनन्य भावे भजि जो हरीला आस्था नि वृत्ती त्यजुनीच सर्व । न पाप होते मुळि त्या कराने धुतो हरी तो हृदयी बसोनि ॥ ४२ ॥
स्वपादमूलं - आपले जे चरणकमल त्याचे - भजत: - आराधना करणार्या - त्यक्ताऽन्यभावस्य - इतर सर्व भावना टाकून देणार्या - प्रियस्य - प्रिय भक्तांचे - यत् विकर्म - जे काही वाईट कर्म - कथंचित् - कसे तरी यदृच्छेने, प्रारब्धाने - उत्पातितं - उत्पन्न झालेले असते - सर्व - ते सर्व - हृदि सन्निविष्ट: - हृदयात स्थिर असलेला - परेश: हरि: - श्रीपरमेश्वर, श्रीहरी - धुनोति - हलवून टाकतो, नाहीसे करतो ॥५-४२॥
जो भक्त आपल्या प्रियतम भगवंतांच्या चरणकमलांचे अनन्यभावाने भजन करतो, त्याच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले, तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरूष श्रीहरी ते सगळे धुऊन टाकतात. (४२)
श्रीनारद उवाच -
( अनुष्टुप् ) धर्मान् भागवतान् इत्थं श्रुत्वाथ मिथिलेश्वरः । जायन्तेयान् मुनीन् प्रीतः सोपाध्यायो ह्यपूजयत् ॥ ४३ ॥
नारदजी सांगतात - (अनुष्टुप् ) धर्म भागवतो ऐसा ऐकता मिथिलेश्वरे । आनंदे पूजिले योगी ऋत्विजाचार्य यां सह ॥ ४३ ॥
इत्थं - याप्रकारे - भागवतान् धर्मान् - भागवत संप्रदायात रूढ झालेले धर्म - श्रुत्वा - ऐकून - अथ - नंतर - सोपाध्याय - उपाध्यायासह - प्रीत: - आनंदित झालेला - मिथिलेश्वर: - मिथिलेचा राजा जनक - जायन्ते यान् मुनीन् - जयंतीचे पुत्र जे नऊ मुनी, त्याची - अपूजयत् हि - मोठ्या भक्तिभावाने पूजा करता झाला ॥५-४३॥
नारद म्हणतात - असे हे भागवतधर्म ऐकून मिथिलानरेश संतुष्ट झाला त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयन्तीपुत्रांची पूजा केली. (४३)
ततोऽन्तर्दधिरे सिद्धाः सर्वलोकस्य पश्यतः ।
राजा धर्मानुपातिष्ठन् अवाप परमां गतिम् ॥ ४४ ॥
सर्वा समक्ष ते सिद्ध आंतर्धानहि पावले । धर्माने वागला राजा गती परम पावला ॥ ४४ ॥
तत: - त्यानंतर - सर्वलोकस्य पश्यत: - सर्व लोक पहात असताच सिद्धा: - ते नऊ सिद्ध मुनी - अन्तर्दधिरे - अंतर्धान पावले, अदृश्य झाले - धर्मान् उपातिष्ठन् - नुमिप्रणीत भागवत धर्माप्रमाणे वागणारा राजा, एकनिष्ठ जनक राजा - परमां गतिं - अतिश्रेष्ठ गती- मोक्ष - अवाप - मिळवता झाला ॥५-४४॥
यानंतर सर्वांच्या देखतच हे सिद्ध अंतर्धान पावले निमीने त्यांच्याकडून ऐकलेल्या भागवतधर्मांचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली. (४४)
त्वमप्येतान् महाभाग धर्मान् भागवतान् श्रुतान् ।
आस्थितः श्रद्धया युक्तो निःसङ्गो यास्यसे परम् ॥ ४५ ॥
वदलो भागवद्धर्म भगवान् वसुदेवजी । आचरिता तुम्ही याला लाभेल परमोपद ॥ ४५ ॥
महाभाग - महाभग्यशाली वसुदेवा - श्रुतान् एतान् - त्वा ऐकलेले हे - भागवतान् धर्मान् - सर्व भागवत धर्म - आस्थित: - जर पाळलेस - श्रद्धया युक्त: - आणि पूर्ण श्रद्धेने युक्त होऊन - नि:सङ्ग: - विषयांची संगती सोडून अनासक्त झालास तर - त्वं अपि - तूही - परं यास्यसे - सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ प्राप्त करून घेऊ शकशील ॥५-४५॥
हे वसुदेवा ! तुही ऐकलेल्या या भागवत धर्मांचे जर श्रद्धेने आचरण करशील, तर शेवटी सर्व आसक्तींपासून मुक्त होऊन भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेशील. (४५)
युवयोः खलु दम्पत्योः यशसा पूरितं जगत् ।
पुत्रतां अगमद् यद् वां भगवान् ईश्वरो हरिः ॥ ४६ ॥
तुम्ही नी देवकीचे ते यश सर्वत्र जाहले । उदरी जाहला पुत्र भगवान् कृष्ण तो स्वये ॥ ४६ ॥
यत् - ज्याअर्थी भगवान् ईश्वर: हरि: - श्रीभगवान् परमेश्वर हरि - वां - तुम्हा उभयतांच्या - पुत्रतां अगमत् - पुत्रत्वाप्रत प्राप्त झाला - युवयो: दम्पत्यो: - तुम्हा वसुदेव-देवकी नामक दांपत्याचे - यशसा - यशाने - जगत् - पृथ्वी - पूरितं खलु - खरोखर भरून राहिली आहे ॥५-४६॥
तुम्हा दांपत्यांच्या कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे कारण सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र झाले आहेत. (४६)
दर्शनालिङ्गनालापैः शयनासनभोजनैः ।
आत्मा वां पावितः कृष्णे पुत्रस्नेहं प्रकुर्वतोः ॥ ४७ ॥
भगवत् दर्शने स्पर्शे नी आलिंगुनि बोलले । वात्सल्य लावुनि त्याला पवित्र जाहले असा ॥ ४७ ॥
दर्शनालिङ्गनालापै: - त्या हरीचे दर्शन, त्याला आलिंगन, त्याच्याशी बोलेणे इत्यादींनी - शयनासनभोजनै: - आणि निजवणे, बसवणे, खाऊ घालणे या प्रकारांनी - कृष्णे पुत्रस्नेहं - कृष्णाचे ठिकाणी अंत:करणातील पुत्रप्रेम - प्रकुर्वतो: त्वां - प्रकट करणार्या तुम्हा उभायतांचा - आत्मा पावित: - आत्मा निर्मल झाला आहे ॥५-४७॥
श्रीकृष्णांवर पुत्रप्रेम करणार्या तुम्ही त्यांच्यासंबंधीच्या दर्शन, आलिंगन, बोलणेचालणे, झोपवणे, बसविणे, जेवू घालणे, इत्यादींद्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे. (४७)
( वसंततिलका )
वैरेण यं नृपतयः शिशुपालपौण्ड्र शाल्वादयो गतिविलास-विलोकनाद्यैः । ध्यायन्त आकृतधियः शयनासनादौ तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किम् ॥ ४८ ॥
(वसंततिलका ) शत्रु असोनि नृपती शिशुपाल पौंड्र शाल्वादिकेहि स्मरता सहजी असेची । त्या चित्त वृत्ति बनल्या हरिरूप सर्व तो जो प्रियो भजक त्या नच कांहि शंका ॥ ४८ ॥
शिशुपालपौंड्रशाल्वादय: नृपतय: - शिशुपाल, पौंड्र, शाल्व प्रभृति राजे - शयनासनादौ - निजताना, बसताना वगैरे प्रसंगी - वैरेण - विरोध भक्तीने - यं ध्यायन्त: - ज्याचे ध्यान अखंड करत होते - गतिविलासविलोकनादयै: - चालणे, विलास करणे, पाहाणे वगैरेंच्या साह्याने - आकृतधिय: - ज्यांची बुद्धी कृष्णाकार झाली आहे असे - तत्साम्यं - श्रीकृष्णाची समानता - आपु: - प्राप्त करून घेते झाले - अनुरक्तधियां - ज्यांची बुद्धी प्रेमाने कृष्णाचे ठिकाणी अनुरक्त झाली आहे असे त्यांचे - पुन: किं - अंत:करण श्रीकृष्णमय झाले हे काय सांगावयास पाहिजे ? ॥५-४८॥
शिशुपाल, पौंड्रक, शाल्व इत्यादी राजांनी वैरभावाने का असेना, श्रीकृष्णांचे चालणे, लीलाविलास पाहणे इत्यादींचे झोपताबसताना चिंतन केले होते आणि त्यायोगे त्यांची वृत्ती श्रीकृष्णाकार झाली त्यामुळे ते सारूप्यमुक्तीचे अधिकारी झाले तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात, त्यांच्याविषयी काय बोलावे ? (४८)
( अनुष्टुप् )
मा अपत्यबुद्धिं अकृथाः कृष्णे सर्वात्मनीश्वरे । मायामनुष्यभावेन गूढैश्वर्ये परेऽव्यये ॥ ४९ ॥
(अनुष्टुप् ) न माना पुत्र त्या कृष्णा सर्वात्मा अविनाशि तो । ऐश्वर्य लपवी सर्व मनुष्यरूप घेउनी ॥ ४९ ॥
सर्वात्मनि - सर्वांचा आत्मा असणार्या - मायामानुष्यभावेन - मायेने मनुष्यभाव प्राप्त झाल्यामुळे - गूढेश्वर्ये - अत्यंत गहन ऐश्वर्यवंत - परे - सर्वश्रेष्ठ - अव्यये - शाश्वत अक्षर - ईश्वरे कृष्णे - परमेश्वर जो श्रीकृष्ण त्याच्या ठिकाणी - अपत्यबुधिं मा अकृथा: - हा आपला पुत्र आहे अशी बुद्धी करू नका ॥५-४९॥
श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा समजू नका ते सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत त्यांनी मायेने मनुष्यरूप प्रगट करून आपले ऐश्वर्य झाकून ठेवले आहे. (४९)
भूभारासुरराजन्य हन्तवे गुप्तये सताम् ।
अवतीर्णस्य निर्वृत्यै यशो लोके वितन्यते ॥ ५० ॥
असुरां वधण्या तैसे रक्षाया संत सज्जना । जीवास शांति नी मुक्ती देण्याला अवतीर्णला ॥ जगी कीर्ती तशी त्याची गाती संत मुनीहि ते ॥ ५० ॥
भूभारासुरराजन्यहन्तवे - भूमीला भारभूत झालेले हे क्षत्रियरूपी राक्षस त्यांना ठार मारण्यासाठी - सतां गुप्तये निवृत्यै - आणि साधूंचे परित्राण करण्यासाठी व त्यांना मोक्ष देण्यासाठी - अवतीर्णस्य - ज्याने अवतार घेतला आहे त्याचे - यश: - माहात्म्य - लोके - या ब्रह्मांडात - वितन्यते - ओतप्रोत भरलेले आहे. ॥५-५०॥
पृथ्वीला भारभूत झालेल्या राजरूप असुरांचा नाश, संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत, म्हणूनच त्यांची कीर्ती सगळ्या जगात गाईली जाते. (५०)
श्रीशुक उवाच -
एतत् श्रृत्वा महाभागो वसुदेवोऽतिविस्मितः । देवकी च महाभागा जहतुः मोहमात्मनः ॥ ५१ ॥
श्री शुकदेवजी सांगतात- ऐकता नारदाचे हे हर्षले वसुदेवजी । तसेच देवकीचेही माया मोहचि संपले ॥ ५१ ॥
एतत् - हे सर्व - श्रुत्वा - ऐकून - महाभाग: वासुदेव: - अत्यंत दैववान वसुदेव - अतिविस्मित: - अत्यंत आश्चर्यचकित झाला - महाभागा देवकी च - आणि भाग्यसंपन्न देवकीही आश्चर्यचकित झाली - आत्मन: - आपल्या अंत:करणात असलेला - मोहं - मायामोह - जहतु: - उभयतां वसुदेव देवकी नाहीसे करती झाली ॥५-५१॥
श्रीशुक म्हणतात नारदांच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले त्यांच्या मनात जो काही मोह शिल्लक होता, तो त्यांनी त्याच क्षणी सोडून दिला. (५१)
इतिहासं इमं पुण्यं धारयेद् यः समाहितः ।
स विधूयेह शमलं ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
इतिहास पवित्रो हा एकाग्रे ऐकता यया । संपतो शोक नी मोह लाभते पद ब्रह्म ते ॥ ५२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पाचवा अध्याय हा ॥ ११ ॥ ५ ॥ ॥ हरिः ॐ तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु ॥
इमं - हा - पुण्यं - पुण्यदायक - इतिहासं - इतिहास - य: - जो - समाहित: - समाधान वृत्तीने - धारयेत् - अथिर ध्य्नाचा विषय करील - स: - तो - इह - येथील संसारात - शमलं - अहंकार, वासना. अज्ञान या मलांचा - विधूय - निरास करून - ब्रह्मभूयाय कल्पते - ब्रह्मप्राप्तीचा अधिकारी होतो.
राजन ! हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो, तो आपला सगळा शोकमोह दूर सारून ब्रह्मपदाला पात्र होतो. (५२)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |