|
श्रीमद् भागवत पुराण
वसुदेवाय देवर्षि नारदोपदेश, तत्र निमि-नवयोगेश्वर संवादरूपेण
श्रीनारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) गोविंदभुजगुप्तायां द्वारवत्यां कुरूद्वह । अवात्सीत् नारदोऽभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः ॥ १ ॥
श्री शुकदेवजी सांगतात - ( अनुष्टुप ) देवर्षि भेटण्या कृष्णा इच्छितीच सदैव नी । वारंवार तिथे जाती जेथे शाप न दक्षाचा ॥ १ ॥
कुरूद्वह - हे कुरुनरेंद्रा - गोविंदभुजगुप्तायां द्वारवत्यां - श्रीकृष्णाच्या भुजबलाने सुरक्षित अशा द्वारकेत - कृष्णोपासनलालसः नारदः - कृष्णाची भक्ति करण्याची लालसा असलेले नारदमुनि - अभीक्ष्णं अवात्सीत् - पुनः पुनः येऊन राहात असत ॥ १ ॥
श्रीशुक म्हणतात हे कुरूनंदना ! श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहात असत. (१)
को नु राजन् इंद्रियवान् मुकुंदचरणांबुजम् ।
न भजेत् सर्वतोमृत्युः उपास्यं अमरोत्तमैः ॥ २ ॥
ब्रह्यादी कोण ते राजा मुकुंदचरणांबुजा । नेच्छिती घेरिता मृत्यु मंगलोपद सेविण्या ॥ २ ॥
हे राजन् ! - हे परीक्षिता ! - अमरोत्तमैः - श्रेष्ठ श्रेष्ठ देवांनी - उपास्यं - उपासना करण्यास योग्य - मुकुंदचरणांबजं - वच्चरणकमल - कः इंद्रियवान् - इंद्रिये असलेला असा कोणता पुरुष - सर्वतोमृत्युः - सर्वत्र मृत्यु ज्याच्या भोवती आ पसरून उभा राहिला आहे - नः भजेत नु ? - उपास्य दैवज्ञ करणार नाही ? ॥ २ ॥
हे राजन ! ज्याला इंद्रिये आहेत असा, सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनीसुद्धा उपासना करावी, अशा श्रीकृष्णचरणकमलांची सेवा करणार नाही ? (२)
तं एकदा तु देवर्षिं वसुदेवो गृहागतम् ।
अर्चितं सुखमासीनं अभिवाद्य इदमब्रवीत् ॥ ३ ॥
एकदा वसुदेवाच्या घरी नारद पातले । विधीने पूजुनी त्यांना वसुदेवे विचारिले ॥ ३ ॥
एकदा तु - एके वेळी तर - गृहागतं अर्चितं सुखं आसीनं - आपल्या घरी आलेल्या आणि पूजा स्विकारून सुखाने आसनावर बसलेल्या - देवर्षिं - त्या देवर्षि नारदाला - अभिवाद्य - नमस्कार करून - वसुदेवः - वसुदेव - इदं अब्रवीत् - असे म्हणाला ॥ ३ ॥
एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधिपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले - (३)
श्रीवसुदेव उवाच -
भगवन् भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम् । कृपणानां यथा पित्रोः उत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥ ४ ॥
वसुदेवजी म्हणाले- येता माता पिता तैसे घरासी सांधुसंत ते । दिवाळी दसरा तं ची कल्याणा तुम्ही ॥ ४ ॥
भगवन् ! - हे ऋषिवर्य ! - भवतः यात्रा - आपले पर्यटन - सर्वदेहिनां स्वस्तये अस्ति - सर्व जीवांच्या कल्याणासाठी आहे - यथा पित्रो अपय्त्यानां - ज्याप्र्माणे मातापितरांचे मुलांच्या किंवा - उत्तमश्लोकवर्त्मनां - पुण्यश्लोक व परमेश्वराच्या प्राप्तीचे मार्गदर्शक अशा साधूंचे - कृपणानां स्वस्तये अस्ति - दीनांच्या कल्याणसाठीच असते. ॥ ४ ॥
वसुदेव म्हणाले ज्याप्रमाणे मातापित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवद्भक्तांचे येणे प्रपंचाला उबगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते, तसेच, हे भगवन ! आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. (४)
भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च ।
सुखायैव हि साधूनां त्वादृशां अच्युतात्मनाम् ॥ ५ ॥
देवचरित्र जीवांना दुखवी सुखवी कधी । संतांची कृति ती नित्य प्राण्यांकल्याण साधिते ॥ ५ ॥
हि - कारण - देवचरितं - देवतांचे आचरण - भूतानां - जीवांच्या - सुखाय च दुःखाय च - सुखाला व दुःखालाही - अच्युतात्मना - ज्यांचा आत्मा अच्युताचे ठिकाणी आहे अशा - त्वादृशां - आपल्यासारख्या - साधूनां - साधूंचे ठिकाणी - केवलं सुखायैव - केवळ सुखासाठीच असते. ॥ ५ ॥
देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते परंतु आपल्यासारख्या भगवत्प्रेमी साधूंची प्रत्येक कृती सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. (५)
भजंति ये यथा देवान् देवा अपि तथैव तान् ।
छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥ ६ ॥
जो ज्या भावे भजे देवां देवही फळ तैचि दे । दीनवत्सल ते संत कर्माला नच इच्छिती ॥ ६ ॥
ये देवान् यथा भजंति - जे देवांना असे भजतात - तान् - त्यांना - छाया इव - छायेप्रमाणेच - कर्मसचिवा - कर्मच ज्यांना साहाय्य असे - देवाः अपि - देव सुद्धा - तथा एव - त्याप्रमाणेच - परंतु साधवः दीनवत्सला - पण साधु मान्त्र दीनदयाळू आहेत. ॥ ६ ॥
लोक देवतांना ज्याप्रकारे भजतात, त्याचप्रमाणे देवतासुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात परंतु सत्पुरूष दीनवत्सल असतात ते सर्वांनाच आपले समजतात. (६)
ब्रह्मन् तथापि पृच्छामो धर्मान् भागवतान् तव ।
यान् श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते सर्वतो भयात् ॥ ७ ॥
तरीही पुसतो मी ते धर्म साधन प्रश्र्न की । श्रद्धेने ऐकता ज्याने भवाचे भय ना उरे ॥ ७ ॥
ब्रह्मन् - हे महर्षे - तथा अपि भागवतान् धर्मान् तव पृच्छामः - आपण दीनवत्सल व दया करणारे असल्याने, तुम्हाला आम्ही ’भागवत धर्माबद्दल प्रश्न करतो - यान् श्रद्धया श्रुत्वा - जे धर्म श्रद्धापुरःसर ऐकले असता - मर्त्यः सर्वतः भयात् मुच्यते - मर्त्यः मानव सर्व भयांपासून मुक्त होतो. ॥ ७ ॥
हे ब्रह्मन ! तरीसुद्धा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारीत आहोत जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणार्या या संसारापासून मनुष्य मुक्त होतो. (७)
अहं किल पुरानंतं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् ।
अपूजयं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥ ८ ॥
आदल्या जन्मि मी केले तप ते भगवान मला । मिळावे पुत्र रूपाने लीलेने मोहिलो तदा ॥ ८ ॥
देवमायया मोहितः भुवि - मी परमेश्वरी मायेने मुग्ध झालो होतो म्हणून मृत्युलोकी - अहं पुरा प्रजार्थः - पूर्वी मी पुत्रप्राप्तीची इच्छा केली - मुक्तिदं अनंत अपूजयं किल - आणि त्या मोक्ष प्रदान करणार्या अनंता पूजा केली खरी - न तु मोक्षाय - पण ती पूजा मोक्षासाठी नाही केली. ॥ ८ ॥
पूर्वी मी मुक्ती देणार्या भगवंतांची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे, तर ते मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावेत, म्हणून केली होती कारण भगवंतांच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो. (८)
यथा विचित्रव्यसनाद् भवद्भिः विश्वतोभयात् ।
मुच्येम ह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सुव्रत ॥ ९ ॥
सुव्रता उपदेशावे जन्म मृत्यु-भवातुनि । सहजी तारण्या कांही मोहिती सुख दुःख ते ॥ ९ ॥
विश्वतोभयात् विचित्रव्यसनात् - सर्वत्र व सर्वदा भयप्रद असणार्या संसारातील नानाप्रकारच्या संकटांपासून - अंजसा एव - थोड्याश्याच श्रमाने - अद्धा - प्रत्यक्ष - भवद्भिः यथा मुच्येमहि - आपल्या उपदेशामुळे आम्ही मुक्त होऊ - तथा - असा - सुव्रत नः शाधि - हे सुव्रत नारदा, आम्हाला उपदेश करा. ॥ ९ ॥
हे सुव्रता ! आपण मला आता असा उपदेश करा की, ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूंनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईन. (९)
श्रीशुक उवाच -
राजन् एवं कृतप्रश्नो वसुदेवेन धीमता । प्रीतस्तं आह देवर्षिः हरेः संस्मारितो गुणैः ॥ १० ॥
श्री शुकदेवजी सांगतात - बुद्धिमान वसुदेवाने हरिचे गुण रूप ते । जाणण्या पुसला प्रश्र्न तन्मयी हो-उनी तदा ॥१०॥
राजन् ! - हे परीक्षित राजा ! - धीमता वसुदेवेन - बुद्धिमान वसुदेवाने - एवं कृतप्रश्नः - या प्रमाणे केलेला प्रश्न ऐकून - प्रीतः - नारद मुनि प्रसन्न झाले - हरेः गुणैः - परमेश्वर हरीच्या गुणांचे - संस्मारितः - स्मरण झाल्यामुळे हर्षित झालेले नारदमुनि - तं आह - वसुदेवाला म्हणाले - ॥ १० ॥
श्रीशुक म्हणतात राजन ! बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गुणांचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले - (१०)
श्रीनारद उवाच -
सम्यक् एतद् व्यवसितं भवता सात्वतर्षभ । यत् पृच्छसे भागवतान् धर्मान् त्वं विश्वभावनान् ॥ ११ ॥
नारदजी म्हणाले- छान हा पुसला प्रश्र्न तुम्ही तो यदुश्रेष्ठजी । धर्म भागवतो ऐसा विश्वकल्याण होतसे ॥ ११ ॥
सात्वतर्षभ - हे यदुकुलश्रेष्ठा ! - यत् विश्वभावनान् भागवतान् धर्मान् - ही जी विश्वाचे कल्याण करणारी पवित्र भागवत धर्माची - त्वं पृच्छसे - तू जी पृच्छा केलीस - एतत् भवता - ते तुझे हे कृत्य - सम्यक् व्यवसितम् - फारच चांगले आहे. ॥ ११ ॥
नारद म्हणाले - हे यदुश्रेष्ठा ! विश्वाचे कल्याण करणारा भागवतधर्म जाणून घेण्यासंबंधीचा तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे. (११)
श्रुतोऽनुपठितो ध्यात आदृतो वानुमोदितः ।
सद्यः पुनाति सद्धर्मो देव विश्वद्रुहोऽपि हि ॥ १२ ॥
हा असा एकची धर्म स्मरता ऐकता वदो । हृदयी धरिता त्याचक्षणि पावन जीव हो ॥ १२ ॥
सद्धर्मः - भागवतधर्म - श्रुतः अनुपठितः - ऐकला वा पठण केला - ध्यातः आदृतः - अथवा त्याचे चिंतन केले वा आदराने स्विकार केला - वा अनुमोदितः - किंवा अंतःकरणपूर्वक त्याला संमति दिली तर - देवविश्वद्रुहः अपि हि - देव आणि विश्व यांचा जे द्रोह करणारे त्यांस सुद्धा - सद्य पुनाति - तत्काळ पवित्रता देतो. ॥ १२ ॥
हे वसुदेवा ! हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की, जो ऐकल्याने, त्याचा उच्चार केल्याने, त्याचे स्मरण केल्याने, त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्यामुळेसुद्धा दुर्जनही त्याच क्षणी पवित्र होतात. (१२)
त्वया परमकल्याणः पुण्यश्रवणकीर्तनः ।
स्मारितो भगवान् अद्य देवो नारायणो मम ॥ १३ ॥
पापी पावन ते होती करिता किर्तने अशी । स्मरणा वदले तुम्ही देव नारायणो मम ॥ १३ ॥
परमकल्याणः - अतिश्रेष्ठ मंगलधाम - पुण्यश्रवणकीर्तनः - ज्याचे श्रवण व कीर्तन पुण्यकारक आहे - भगवान नारायणः देवः - षडगुणैश्वर्यसंपन्न नारायण देवाची - अद्यः - आज - त्वया - तुझ्यामुळे - मम स्मारितः - मला आथवण करून दिली गेली आहे. ॥ १३ ॥
ज्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे, त्या परमकल्याणस्वरूप व माझे आराध्यदैवत, अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे. (१३)
अत्रापि उदाहरंति इमं इतिहासं पुरातनम् ।
आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मनः ॥ १४ ॥
आज जे पुसले तुम्ही त्याचा तो इतिहास ते । सांगती संत संवाद ऋषभपुत्र जे नऊ ॥ योगीश्वर महात्म्यांचा, विदेहीच बोलणे ॥ १४ ॥
अत्र अपि इदं - आत मी जे सांगणार आहे तो - पुरातनं इतिहासं उदाहरन्ति - प्राचीन काळचा घडलेला इतिहास सांगत असतात तो - आर्षभाणां च महात्मनः - ऋषभ नामक जो विष्णूंचा अंश त्याचे पुत्र आणि - विदेहस्य संवादं - महात्मा विदेह राजा यांमधी संवाद होय ॥ १४ ॥
त्यासंबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय. (१४)
प्रियव्रतो नाम सुतो मनोः स्वायंभुवस्य यः ।
तस्य अग्नीध्रः ततो नाभिः ऋषभः तत्सुतः स्मृतः ॥ १५ ॥
मनु स्वायंभुवा पुत्र प्रियव्रता पुढे तसे । आग्नीध्र त्यासि तो नाभ नाभा ऋषभ तो पुढे ॥ १५ ॥
स्वायंभवस्य मनोः - स्वायंभुव मनूचा - यः प्रियव्रतः नाम सुतः - पुत्र प्रियव्रव - तस्य आग्नीध्रः - त्याचा पुत्र आग्नीध्र - ततो नाभिः - त्याचा पुत्र नाभि - तसुतः ऋषभः स्मृतः - आणि नाभीची पुत्र ऋषभ होय. ॥ १५ ॥
स्वायंभुव मनूचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता, त्याचा पुत्र आग्नीध्र, आग्नीध्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ. (१५)
तं आहुः वासुदेवांशं मोक्षधर्म विवक्षया ।
अवतीर्णं सुतशतं तस्यासीद् ब्रह्मपारगम् ॥ १६ ॥
वासुदेवांश ते होते मानिती शास्त्र सर्व ते । मोक्षधर्मोपदेशीच जाहले शतपुत्र त्यां ॥ १६ ॥
मोक्षधर्म विवक्षया - मोक्षधर्म कथन करण्याच्या इच्छेने - अवतीर्णं तं - अवतार घेणार्या ऋषभाला - वासुदेवांशं आहुः - वासुदेवाचा प्रत्यक्ष अवतारच म्हणत असत. - तस्य सुतशतः वदपारगं आसीत् - त्याचे शंभर पुत्र वेदपारंगत होते. ॥ १६ ॥
वासुदेवांचा अंश असणार्या त्यांनी मोक्षधर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता त्याचे शंभर पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते. (१६)
तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणः ।
विख्यातं वर्षमेतद् यत् नाम्ना भारतमद्भुतम् ॥ १७ ॥
भरत श्रेष्ठ तो त्यात भक्त नारायाणास जो । अजनाभ यया वर्षा भारतो नाम त्याचिये ॥ देश भारत हा श्रेष्ठ आहे हा की अलौकिक ॥ १७ ॥
तेषां ज्येष्ठः भरतः वै - त्या शंभर पुत्रात भरत हा पहिला मुलगा - नारायणपरायणः महान् नारायण भक्त - यन्नात्मा - ज्याच्या नावाने - एतत् अद्भुतं वर्षं - हे जे अपूर्व खंड - भारतं इति विख्यातं - ते भरतखंड या नावाने प्रसिद्ध झाले. ॥ १७ ॥
भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला तो नारायणांचा परम भक्त होता त्यांच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष या नावाने प्रसिद्ध झाला. (१७)
स भुक्तभोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिम् ।
उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिः त्रिभिः ॥ १८ ॥
पृथ्वीचे भोगुनी राज्य अंति ते वनि पातले । त्रिजन्म तप ते झाले भगवान भेटले तदा ॥ १८ ॥
भुक्तभोगां इमां त्यक्त्वा - सर्व भोगसुखांचा उपभोग अनुभवल्यानंतर ही पृथ्वी सोडून - सः तपसा हरिं उपासीनः निर्गतः - तो राजा भरत तपाचरणाने हरीची उपासना करण्यासाठी अरण्यात गेला - तत्पदवीं त्रिभिः जन्मभिः वै लेभे - आणि तीन जन्मांनी त्याला हरिपदाची प्राप्ति झाली. ॥ १८ ॥
त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला तेथे त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून तीन जन्मांमध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतले. (१८)
तेषां नव नवद्वीप-पतयोऽस्य समंततः ।
कर्मतंत्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥ १९ ॥
उरले नवु ते होते नवू द्वीपास भूपती । एक्यांशी जाहले विप्र कर्मकांडपरायण ॥ १९ ॥ भाग्यवान नऊ ते झालेसंन्यासी अधिकारि जे ।
तेषां नव - त्या ऋषभपुत्रांपैकी नऊ - नवद्वीपपतयः - नऊ द्वीपांचे (खंडांचे) अधिपती झाले - अस्य समंततः - सर्व भरतखंडभर - एकाशीति - एक्क्याऐंशी मुलगे - कर्मतंत्रप्रणेतारः द्विजातयः - कर्ममार्गाचे प्रणेते, कर्ममार्गाचा संप्रदाय सुरू करून चालविणारे ब्राह्मण झाले. ॥ १९ ॥
त्या पुत्रांपैकी नऊ पुत्र या भारतवर्षाच्या नऊ द्वीपांचे अधिपती झाले आणि एक्क्याऐंशी पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले. (१९)
नवाभवन् महाभागा मुनयो ह्यर्थशंसिनः ।
श्रमणा वातरशना आत्मविद्याविशारदाः ॥ २० ॥ कविः हरिः अंतरीक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविहोत्रोऽथ द्रुमिलः चमसः करभाजनः ॥ २१ ॥
मेळिली आत्म विद्या नी दिगंबरचि राहिले ॥ अधिकार बघोनीया बोधिती वस्तुरूप की ॥ २० ॥ कवि हरी अंतरीक्ष प्रबुद्ध पिप्पलायन । अविर्होत्र द्रुमीलो नी चमसो करभाजन ॥ २१ ॥
नव - बाकी राहिलेले नऊजण - महाभागाः - महापूज्यवंत - अर्थसंशिनः - श्रेष्ठ अर्थाचे उद्घाटन करणारे - श्रमणाः - तपस्वी, संन्यासी - वातरशना - वायूचे वेष्टन घालणारे म्हणजे दिगंबर - आत्मविद्याविशारदाः मुनयः अभवन् - आत्मविद्येमध्ये प्रवीण असे हे नऊ मुनि झाले. ॥ २० ॥ कविः, हरिः, अंतरिक्ष, प्रबुद्धः, पिप्पलायनः, आविर्होत्र, अथ द्रुमिलः, चमसः, करभाजनः - अशी त्या नऊ जणांची नावे होती. ॥ २१ ॥
उरलेल्या भाग्यशाली नऊ जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ते आत्मज्ञानी झाले होते त्यामुळे ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहात आणि अधिकारी पुरूषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत त्यांची नावे अशी होती कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. (२०-२१)
ते एते भगवद्रूपं विश्वं सद् असदात्मकम् ।
आत्मनोऽव्यतिरेकेण पश्यंतो व्यचरन् महीम् ॥ २२ ॥
असे ते भगद्रूप विश्वाला जाणुनि पहा । हिंडती पृथिवी सर्व स्वच्छंद मोदपूर्ण ते ॥ २२ ॥
सददात्मकं - सदात्मक व असदात्मक अस्णारे हे भगवद्रुपी विश्व ब्रह्मांड आत्मस्वरूपच आहे - आत्मनः अव्यतिरेकेण - आत्मव्यतिरिक्त नाही - भगवद्रूपं विश्वं पश्यन्तः एते वै - असे परमार्थतः विश्वब्रह्मच होय असे जाणणारे हे नऊ ब्रह्मवेत्ते - महीं व्यचरन् - पृथ्वीवर संचार करीत. ॥ २२ ॥
हे व्यक्त-अव्यक्त जग भगवद्रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही, असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते. (२२)
( वसंततिलका )
अव्याहतेष्टगतयः सुरसिद्धसाध्य गन्धर्व यक्ष नरकिन्नर नागलोकान् । मुक्ताश्चरंति मुनि-चारण-भूतनाथ विद्याधर-द्विज-गवां भुवनानि कामम् ॥ २३ ॥
(वसंततिलका) वाटेल तेथ फिरती सुर सिद्ध्यांत गंधर्व यक्ष नर कीन्नर नागलोकी । मुक्तो भ्रमंति मुनि चारण भूत लोकीं विद्याधरो द्विज नि गो भुवनात सर्व ॥ २३ ॥
सुर-सिद्ध-साध्य, गंधर्व, यक्ष, नर-किन्नर, - गंधर्व, यक्ष, किन्नर इत्यादि - नागलोकान्, मुनि-चारण-भूतनाथ, विद्याधर, द्विज-गवां भुवनानि - देव, सिद्ध साध्यादि लोकांत व ऋषिचारणादिकांच्या स्थानांमध्ये - अव्याहतेषुगतयः मुक्ताः कामं चरन्ति - जे जीवन्मुक्त नऊ मुनि स्वेच्छेने हिंडत असत. ॥ २३ ॥
मनात येईल, तिकडे ते जात असत. देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य किन्नर, नाग, मुनी, चारण, भूतनाथ, विद्याधर, ब्राह्मण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात सर्वजण जीवन्मुक्तच होते. (२३)
( अनुष्टुप् )
ते एकदा निमेः सत्रं उपजग्मुः यदृच्छया । वितायमानं ऋषिभिः अजनाभे महात्मनः ॥ २४ ॥
(अनुष्टुप्) एकदा भारता मध्ये महान यज्ञ चालला । नवू योगेश्वर तेथे पोचले यज्ञ मंडपी ॥ २४ ॥
अजनाभे - या भारतबर्षात - महात्मनः निमेः - महात्मा निमिराजाचे - ऋषिभिः वितायमानं सत्रं - ऋषींनी चालविलेले जे सत्र तेथे - ते एकदा - ते नऊ मुनि एकेवेळी - यदृच्छया जग्मुः - स्वेच्छेने जाते झाले. ॥ २४ ॥
ते एकदा या अजनाभ वर्षात महात्म्या निमीच्या, ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले. (२४)
तान् दृष्ट्वा सूर्यसङ्काशान् महाभागवतान् नृप ।
यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एव उपतस्थिरे ॥ २५ ॥
सूर्यकांत अशा यांना निमिने असे । अग्नि ऋत्विज नी विप्र स्वागता राहिले उभे ॥ २५ ॥
नृप - हे परीक्षित राजा, - सूर्यसंकाशान्, महाभागवतान् तान् दृष्ट्वा - सूर्याप्रमाणे देदीप्यमान असणारे ते महाभगवद्भक्त आलेले पाहून - यजमानः, अग्नयः, विप्राः सर्वे एव उपतस्थिरे - यजमान निमि राजा, अग्नि, ब्राह्मण सर्वजण सत्कारपूर्वक उठले ॥ २५ ॥
ते भगवंतांचे परम भक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते त्यांना पाहून यजमान निमी, अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजणच त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. (२५)
विदेहस्तान् अभिप्रेत्य नारायणपरायणान् ।
प्रीतः संपूजयान् चक्रे आसनस्थान् यथार्हतः ॥ २६ ॥
विदेहनृपते त्यांना घातली श्रेष्ठ आसने । संत जाणोनिया त्यांना आनंदे पूजिले पहा ॥ २६ ॥
यथा अर्हतः आसनस्थान् - यथायोग्य आसनांवर विराजमान झालेल्या - तान् नारायणपरायणान् - नारायणपरायण आहेत - अभिप्रेत्य प्रीतः विदेहः - असे जाणून संतुष्ट झालेला विदेह जनक जो - संपूज्ययांचक्रे - त्यांची परमादराने पूजा करता झाला. ॥ २६ ॥
ते भगवंतांचे परम भक्त आहेत, असे जाणून विदेहराजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसविले आणि प्रेमाने त्यांची विधिपूर्वक पूजा केली. (२६)
तान् रोचमानान् स्वरुचा ब्रह्मपुत्रोपमान् नव ।
पप्रच्छ परमप्रीतः प्रश्रयावनतो नृपः ॥ २७ ॥
ब्रह्मपुत्रांपरी बंधू तेजे तळपती तदा । नमोनि प्रेमभावाने राजाने प्रश्र्न टाकिला ॥ २७ ॥
परमप्रीतः नृपः - अत्यंत संतुष्ट झालेला जनक राजा - प्रश्रयावनतः - पूज्य बुद्धीने नम्र होऊन - स्वरुचा रोचमानान् - स्वतःच्या तेजाने प्रकाशणार्या - ब्रह्मपुत्रोपमान् तान् नव - ब्रह्मपुत्र सनत्कुमारादि यांसारख्या त्या नऊजणांना - पत्रच्छ - विचारता झाला. ॥ २७ ॥
ते नऊही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते राजाने विनम्रतेने मस्तक लववून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला. (२७)
श्रीविदेह उवाच -
मन्ये भगवतः साक्षात् पार्षदान् वो मधुद्विषः । विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरंति हि ॥ २८ ॥
विदेहराज निमि म्हणाला - हरिचे पार्षद तुम्ही वाटता मजला पहा । संसारी प्राणिमात्रांना फिरता तारण्या असे ॥ २८ ॥
वः भगवतः मधुद्विषः - आम्ही आपणांस भगवान मधुसूदनाचे - साक्षात् पार्षदान् मन्ये - प्रत्यक्ष सेवक मानतो - हि - कारण - विष्णोः भूतानि - विष्णूची भक्ति करणारे लोक - लोकानां पावनाय - इतर लोकांच्या उद्धारासाठी - चरन्ति - फिरत असतात ॥ २८ ॥
विदेहराजा म्हणाला - मी तर असे समजतो की, आपण सर्वजण मधुसूदन भगवंतांचे पार्षदच आहात कारण भगवंतांचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. (२८)
दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः ।
तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठ-प्रियदर्शनम् ॥ २९ ॥
दुर्लभो मानुषी देह क्षणभंगुर तो परी । अशा या जीवना मध्ये संत दर्शन दुर्लभ ॥ २९ ॥
देहिनां मानुषः देहः - देहधारी प्राण्यांचा मनुष्यदेह - क्षणभंगुरः दुर्लभः च - क्षणांत नष्ट होणारा व मिळण्यास कठीण असा आहे - तत्र अपि - त्यामध्येहि - वैकुंठप्रियदर्शनं दुर्लभं मन्ये - - श्री विष्णूचे प्रियकरांचे दर्शन दुर्लभ आहे असे मी मानतो ॥ २९ ॥
जीवांना मनुष्यशरीर प्राप्त होणे, हे अतिशय कठीण शिवाय ते क्षणभंगुर अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन आणखीच दुर्लभ आहे. (२९)
अतः आत्यंतिकं क्षेमं पृच्छामो भवतोऽनघाः ।
संसारेऽस्मिन् क्षणार्धोऽपि सत्सङ्गः शेवधिर्नृणाम् ॥ ३० ॥
म्हणोनी पुसतो प्रश्र्ण कल्याणरूप काय ते । अर्धाही क्षण सत्संग मोठाचि लाभ मानवा ॥ ३० ॥
अतः अनघाः - म्हणून अहो मिष्पाप मुनिहो, - भवतः आत्यन्तिकं क्षेमं - तुम्हाला अविनाशी अशा कल्याणाबद्दल - पृच्छामः - विचारणात आहोत. - अस्मिन् संसारे - या संसारात - क्षणार्धः अपि - अर्धा क्षणहि घडलेला - सत्संगः नृणां शेवधिः - साधूंचा समागम मनुष्यांच्या कल्याणाचे भांडारच होय. ॥ ३० ॥
म्हणून हे त्रिलोकपावन महात्म्यांनो ! आम्ही आपणास आमच्या परम कल्याणासंबंधी विचारीत आहोत कारण या जगात अर्धा क्षण झालेला सत्संगसुद्धा मनुष्याचा फार मोठा ठेवा आहे. (३०)
धर्मान् भागवतान् ब्रूत यदि नः श्रुतये क्षमम् ।
यैः प्रसन्नः प्रपन्नाय, दास्यति आत्मानमप्यजः ॥ ३१ ॥
अधिकार जसा माझा तसे ते सांगणॆ तुम्ही । जयाने पावतो कृष्ण शरणागतवत्सल ॥ ३१ ॥
यदि नः श्रूयते क्षमं - जर आम्हाला ऐकण्यास योग्य असतील तर - भागवतान् धर्मान् ब्रूत - भगवद्भक्तांचे धर्म सांगा - यैः प्रसन्नः अजझ् - ज्यायोगे प्रसन्न झालेला परमेश्वर - प्रपन्नाय - शरणागताला - आत्मानं अपि दास्यति - स्वतःलाही अर्पण करील. ॥ ३१ ॥
आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो, तर आपण आम्हांला भागवतधर्माचा उपदेश करावा कारण त्यामुळे प्रसन्न झाले असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःलासुद्धा देऊन टाकतात. (३१)
श्रीनारद उवाच -
एवं ते निमिना पृष्टा वसुदेव महत्तमाः । प्रतिपूज्य अब्रुवन् प्रीत्या ससदस्य ऋत्विजं नृपम् ॥ ३२ ॥
देवर्षि नारद सांगतात- भगवतप्रेमि संतांना निमिने वसुदेवजी । पुसता अभिनंदोनी सर्वांना मुनि बोलले ॥ ३२ ॥
वसुदेव, एवं निमिना पृष्टा - वसुदेवा, याप्रमाणे जनकाने विचारलेले - महत्तमाः ते - अत्यंत श्रेष्ठ असे ते मुनि - ससदस्य ऋत्विजं नृपं - सभासद व ऋत्विज यांसह बसलेल्या राजाचे - प्रतिपूज्य अब्रूवन - अभिनंदन करून म्हणाले ॥ ३२ ॥
नारद म्हणाले हे वसुदेवा ! निमीने जेव्हा त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋत्विजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमीला ते म्हणाले - (३२)
श्रीकविरुवाच -
( इंद्रवज्रा ) मन्येऽकुतश्चिद् भयमच्युतस्य पादांबुजोपासनमत्र नित्यम् । उद्विग्नबुद्धेः असदात्मभावात् विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ॥ ३३ ॥
कविजी म्हणाले- (इंद्रवजा) उपासिता अच्युत नित्य राही त्या भक्त्राजाहृदयात क्षेम । उदविग्न तो हो मग प्रपंची निवृत्ति लाभे भजता हरीला ॥ ३३ ॥
अच्युतस्य पादांबुजोपासनं - श्रीविष्णुच्या चरणकमलांचे सेवन (सेवा) - अकुतश्चिद्भयं मन्ये - कोणतेही भय उत्पन्न करणारे नाही असे आम्ही मानतो - अत्र असदात्मभावात् - येथे पांचभौतिक मिथ्या वस्तूचे ठिकाणी अहंपणा ठेवल्यामुळे - नित्यं इद्वुग्नबुद्धेः भीः - नेहमी खिन्नबुद्धि झालेल्याची भिती - यत्र विश्वात्मना निवर्तते - जेथे परमेश्वराच्या ठिकाणी भक्ति केल्याने सर्बथा नाहीशी होते. ॥ ३३ ॥
कवी म्हणाला राजन ! भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे माझे निश्चित मत आहे नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते, त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. (३३)
( अनुष्टुप् )
ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये । अञ्जः पुंसां अविदुषां विद्धि भागवतान् हि तान् ॥ ३४ ॥
(अनुष्टुप) भोळया भाळ्याच भक्तांना पावतो श्रीहरी स्वयें । स्वमुखे वदला धर्म भागवत असाचि जो ॥ ३४ ॥
हि - कारण - अविदुषां पुंसां - अज्ञानी पुरुषांना - अञ्जः आत्मलब्धये - सहज आत्मप्राप्ती व्हावी एवढ्यासाठी - वै ये उपायाः - खरोखर जे उपाय - भगवता प्रोक्ता - परमेश्वराने सांगितले आहेत - तान् भागवतान् विद्धी - तेच भगवद्भक्तांचे धर्म जाण ॥ ३४ ॥
अज्ञानी लोकांनासुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत, तेच "भागवत धर्म" समज. (३४)
यानास्थाय नरो राजन् न प्रमाद्येत कर्हिचित् ।
धावन् निमील्य वा नेत्रे न स्खलेन् न पतेदिह ॥ ३५ ॥
भागवत पथी जाता विघ्ने ती नच बाधिती। डोळे झाकोनिया धावा त्रुटि वा वंचना नसे ॥ ३५ ॥
राजन् - हे जनकराजा - यान् आस्थाय - ज्या धर्मांचा स्वीकार करून - नरः कर्हिचित् न प्रमाध्येत - मनुष्य कधीही गोंधळून जाणार नाही. - इह नेत्रे निमील्य - ह्या धर्मामध्ये अगदी डोळे मिटून - धावन् न स्खलेत् - धांवत असतांही अडखळणार नाही - वा न पतेत् - किंवा पडणार नाही. ॥ ३५ ॥
राजन ! या भागवत धर्माचा अवलंब करणार्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी, त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. (३५)
( मिश्र )
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावात् । करोति यद् यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥ ३६ ॥
(इंद्रवजा) काये नि वाचे मन इंद्रियानी बुद्धि स्वभावे करि कर्म जे जे । अनेक वा एकचि जन्मि सर्व नारायणा अर्पुनि टाकणे की ॥ ३६ ॥
कायेन वाचा - देहाने वा वाणीने - मनसा वा इंद्रियैः - मनाने किंवा इंद्रियांनी - बुद्ध्या वा आत्मना - बुद्धीने किंवा अहंकाराने - अनुसृतस्वभावान् - अनुसरलेल्या प्रारब्धामुळे - यत् यत् करोति - जे काही करतो - ते सकलं - ते सर्व काही - तस्मै नारायणाय इति समर्पयेत् - श्रेष्ठ अशा परमेश्वराला याप्रमाणे अर्पण करावे. ॥ ३६ ॥
मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंदियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्मे करील, ती ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरूष नारायणांनाच समर्पण करावीत. (३६)
भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यात्
ईशात् अपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः । तन्माययातो बुध आभजेत् तं भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा ॥ ३७ ॥
नी विन्मुखासी रुप विस्मृती हो मनुष्य देवो भ्रम मानितात । देहादि मध्ये भय साचलेले म्हणोनि ध्यावे गुरुमार्गी देवा ॥ ३७ ॥
तन्मायया ईशात् अपेतस्य - परमेश्वराच्या मायेने परमेश्वराला पराङ्मुख झालेल्या पुरुषाला - विपर्ययः अस्मृतिः - विपरीतज्ञानपूर्वक विस्मरण होते - ततः द्वितीयाभिनिवेशतः - नंतर द्वैत मताला अनुसरल्यामुळे - भयं स्यात् - भिती उत्पन्न होते. - अतः गुरुदेवतात्मा बुधः - म्हणून सद्गुरूचे ठिकाणी देवताबुद्धि ठेवणार्या ज्ञानी पुरुषाने - एकया भक्त्या - अनन्य भावाने - तं ईशं आभजेत् - त्या परमेश्वराचे मोक्षप्राप्ति होईपर्यंत सेवन करावे. ॥ ३७ ॥
जो ईश्वराला विन्मुख झाला, त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते म्हणून गुरूंनाच आपले आराध्यदैवत मानून अनन्य भक्तीने त्या ईश्वराचे भजन करावे. (३७)
अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयो
ध्यातुः धिया स्वप्नमनोरथौ यथा । तत्कर्म सङ्कल्प विकल्पकं मनो बुधो निरुंध्याद् अभयं ततः स्यात् ॥ ३८ ॥
आत्म्याविना ती नच वस्तु ऐशी ध्याताचि येते प्रचिती तयाची । विकल्प संकल्प त्यजोनि देता जीवास होते परमात्म प्राप्ती ॥ ३८ ॥
ध्यातुः धियाः - चिंतन करणार्याच्या बुद्धीने - यथा स्वप्नमनोरथो - ज्याप्रमाणे स्वप्न व मनोराज्ये केली जातात - तथा अविद्यमानः अपि - त्याप्रमाणे अस्तित्वात नसणाराही - द्वयः अवभाति - द्वैतरूपी संसार भासतो - तत् बुधः - म्हणून ज्ञानी पुरुषाने - कर्मसंकल्पविकल्पकं मनः - कर्माचा संकल्प व विकल्प करणारे मन - निरुन्धात् - ताब्यात ठेवावे - ततः अभयं स्यात - त्यायोगे भय नाहीसे होईल. ॥ ३८ ॥
राजन ! हा द्वैतप्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणार्याला तो भासतो ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहाणार्याच्या कल्पनेमुळे किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विलक्षण सृष्टी दिसू लागते त्याप्रमाणे म्हणून विवेकी पुरूषाने संसारातील कर्मांसंबंधी संकल्पविकल्प करणार्या मनाला आवरावे त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. (३८)
श्रृण्वन् सुभद्राणि रथाङ्गपाणेः
जन्मानि कर्माणि च यानि लोके । गीतानि नामानि तदर्थकानि गायन् विलज्जो विचरेत् असङ्गः ॥ ३९ ॥
लीला किती मंगल श्रीहरीच्या कित्येक नामे स्मरतात गाता । सोडोनि लज्जा गुणगान गावे स्थानादि सारे त्यजिता फिरावे ॥ ३९ ॥
लोके - या लोकी - रथांगपाणेः यानि सुभद्राणि - चक्रपाणी ईश्वराची जी कल्याणकारक - जन्मानि च कर्माणि - जन्मे (अवतार) आणि कर्मे - तानि शृण्वन् - त्यांचे श्रवण करून - विलज्ज - निर्लज्जपणे - तदर्थकानि गीतानि च नामानि - भगवंतांच्या चरित्रांनी ओथंबलेली गीते व नामसखीर्तन गाऊन - असंगः विचरेत् - सर्वसंग सोडून फिरत रहावे (वावरावे) ॥ ३९ ॥
भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत, त्या ऐकाव्यात तसेच त्यांच्याविषयीची नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत. (३९)
एवंव्रतः स्वप्रियनामकीर्त्या
जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः । हसत्यथो रोदिति रौति गायति उन्मादवत् नृत्यति लोकबाह्यः ॥ ४० ॥
व्रतास या घेउनि कीर्ति गाता प्रेमांकुरो ये द्रवताचि चित्ती । हासे रडे तो मग उच्च हो जैं नाचे नि गातो हरिरूप होता ॥ ४० ॥
एवंव्रतः - अशा तर्हेचे व्रतानुष्ठान करणारा - स्वप्रियनामकीर्त्या - स्वतःला प्रिय अशा परमेश्वराच्या नावाचे कीर्तन करून - जातानुरागः - ज्याच्या अंतःकरणात अधिक प्रेम उत्पन्न झाले आहे असा - द्रुतचित्तः - ज्याच्या चित्तात प्रेमाचा पाझर फुटला आहे असा - लोकबाह्यः - लोकविलक्षण पुरुष - उच्चैः हसति - मोठमोठ्याने हसतो - अथो रोदिति रौति गायति - नंतर रडतो, ओरडतो, गातो - उन्मादवत् नृत्यति - बेभान होऊन नाचू लागतो. ॥ ४० ॥
जो हे व्रत घेतो, त्याच्या हृदयात, आपल्या प्रियतम प्रभूंच्या नामसंकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो त्याचे चित्त द्रवते तो वेड्याप्रमाणे कधी खदखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो कधी कधी नाचतोसुद्धा अशा वेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. (४०)
खं वायुमग्निं सलिलं महीं च
ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन् । सरित्समुद्रांश्च हरेः शरीरं यत्किं च भूतं प्रणमेत् अनन्यः ॥ ४१ ॥
आकाश वायू जल अग्नि पृथ्वी तारे दिशा वॄक्ष नद्या समुद्रीं । दिसे तयाला हरिरूप सर्व नी भक्ती भावे नमितो तयांना ॥ ४१ ॥
खं वायुं अग्निं सलिलं च महीं - आकाश, वायु, अग्नी, उदक आणि पृथ्वी - ज्योतींषि दिशः सत्त्वानि द्रुमाद्रिन् सत्त्वानि - नक्षत्रे, दिशा, वृक्षादिक, प्राणी - सरित् च समुद्रान् यत् किंच भूतं - नदी व समुद्र व जे जे काही दिसणारे आहे ते सर्व - हरेः शरीरं - परमेश्वराचे शरीर होय. - अतः अनन्यः तं प्रणमेत् - म्हणून अनन्यभक्तीने त्या भगवम्ताच्या मूर्तीला नमन करावे. ॥ ४१ ॥
आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रहनक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्षवनस्पती, नद्या, समुद्र हे सगळे, इतकेच काय, सारे चराचर भगवंतांचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा. (४१)
भक्तिः परेशानुभवो विरक्तिः
अन्यत्र चैष त्रिक एककालः । प्रपद्यमानस्य यथाश्नतः स्युः तुष्टिः पुष्टिः क्षुदपायोऽनुघासम् ॥ ४२ ॥
क्षुधा नि तुष्टी अन पुष्टि सर्व प्रत्येक ग्रासी मिटते सवेची । क्षणा क्षणाला तई भक्तराजा वैराग्य ते प्रेम नि रूप लाभे ॥ ४२ ॥
भक्तिः परेशानुभवः - भक्ति भगवत्स्वरूपाचे स्फुरण - अन्यत्र विरक्तिः - परमेश्वराव्यतिरिक्त इतर वस्तूंचे ठिकाणी वैराग्य - एषः त्रिकः एककालः - ही त्रयी, एककालीच - प्रपद्यमानस्य - शरणागत भक्ताला - यथा अश्नतः तुष्टिः पुष्टिः क्षुदपायः - ज्याप्रमाणे जेवणार्याला संतोष, पुष्टता व भुकेची शांति ही - अनुघासं स्युः - प्रत्येक घासागणिक होतात. ॥ ४२ ॥
जसे जेवणार्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे तीन फायदे एकाच वेळी होतात, त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो, त्याला भगवंतांबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य, अशा तीनही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. (४२)
इति अच्युताङ्घ्रिं भजतोऽनुवृत्त्या
भक्तिः विरक्तिः भगवत् प्रबोधः । भवंति वै भागवतस्य राजन् ततः परां शांतिमुपैति साक्षात् ॥ ४३ ॥
प्रतिक्षणाला भजता असा तो ती प्रेमभक्ती नि विरक्ती लाभे । होतो तदा भागवतस्वरूपी नी शांति घेतो परमो अशीच ॥ ४३ ॥
इति अनुवृत्त्या - याप्रमाणे अविश्रांतपणे - अच्युताङ्घ्रिं भजतः - परमेश्वराची चरणसेवा करणार्या भगवद्भक्ताला - भक्तिः विरक्तिः भगवत्प्रबोधः - भक्ति, वैराग्य व भगवत्स्वरूपाचे ज्ञान - भवन्ति वे - ही खरोखर प्राप्त होतात. - राजन् - हे राजा ! - ततः साक्षात् परां शांतिं उपैति - नंतर प्रत्यक्ष त्याला श्रेष्ठ शांति प्राप्त होते. ॥ ४३ ॥
हे राजन ! अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो, त्याला भगवंतांविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परम शांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो. (४३)
श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् ) अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम् । यथाचरति यद् ब्रूते यैर्लिङ्गैः भगवत्प्रियः ॥ ४४ ॥
राजा निमिने विचारले- (अनुष्टुप) आता भागवताची ती लक्षणे धर्म भाव तो । सांगावे वागती कैसे बोलती प्रीयभक्त जे ॥ ४४ ॥
अथ भागवतं ब्रूत - आता भगवद्भक्त कोणाला म्हणावे ते सांगा - यद्धर्मः नृणां यादृशः - त्याचा धर्म, मनुष्यांना कशा स्वरूपाचा दिसतो - यथा चरति यत् ब्रूते - ज्या रीतीने तो वागतो, तो जे बोलतो - यैः लिंगैः भगवत्प्रियः भवति च - आणि ज्या चिन्हांमुळे तो ग्भगवंताला प्रिय होतो. ॥ ४४ ॥
राजाने विचारले आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे, ते सांगा त्याचे धर्म कोणते ? त्याचा स्वभाव कसा असतो ? तो माणसांशी कसा वागतो ? काय बोलतो ? आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो ? (४४)
श्रीहरिरुवाच -
सर्वभूतेषु यः पश्येद् भगवद् भावमात्मनः । भूतानि भगवत्यात्मन् येष भागवतोत्तमः ।। ४५ ॥
योगी हरिजी म्हणाले- आत्म्स्वरूप भगवान जीवात स्थित नित्य तो । प्रभूची पाहि जो सता तो भागवत उत्तम ॥ ४५ ॥
यः सर्वभूतेषु आत्मनः - जो सर्व प्राण्यांचे ठिकाणे आत्मरूप, - भगवद्भावं पश्येत् - भगवत्स्वरूपाला पाहतो - भगवति आत्मनि च भूतानि - व भगवत्स्वरूपी आत्म्याचे ठिकाणी सर्व प्राणिमात्रांना पाहतो - एषः भागवतोत्तमः - तो सर्व भगवद्भक्तांमध्ये श्रेष्ठ होय. ॥ ४५ ॥
हरी म्हणाला आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहते, असे जो पाहातो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतांमध्येच आहेत, असे पाहातो, तो उत्तम भागवत समजावा. (४५)
ईश्वरे तद्अधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च ।
प्रेममैत्रीकृपोपेक्षा यः करोति स मध्यमः ॥ ४६ ॥
भजे नी सेवि जो संता अज्ञांन्यां मार्गि लावि जो । उपेक्षी जो अभक्तासी तो भागवत मध्यम ॥ ४६ ॥
ईश्वरे, तद् अधिनेषु - ईश्वराचे ठिकाणी, त्याच्या भक्तांचे ठिकाणी - बालिशेषु द्विषत्सु च - अज्ञानी जीवाचे ठिकाणी व शत्रूचे ठिकाणी - प्रेम मैत्री कृपा उपेक्षा - अनुक्रमे प्रेम, स्नेह, अनुग्रह व उपेक्षा - यः करोति स मध्यमः - जो करतो तो मध्यम भागवत होय. ॥ ४६ ॥
जो भगवंतांवर प्रेम, त्यांच्या भक्तांशी मैत्री, दुःखी व अज्ञान्यांवर कृपा आणि भगवंतांचा द्वेष करणार्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत होय. (४६)
अर्चायां एव हरये पूजां यः श्रद्धयेहते ।
न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः ॥ ४७ ॥
मूर्तीला पूजि जो श्रद्धे परी ना संत सेवि तो । साधारण असा भक्त तो भागवत मानणे ॥ ४७ ॥
यः हरये एव - जो केवळ हरीची - अर्चायां पूजां श्रद्धया ईहते - प्रतिमाच ठेऊन हरिपूजा श्रद्धेने करू इच्छितो, श्रद्धेने करतो - तद्भक्तेषु अन्येषु च न - तो हरिभक्तांमध्ये किंवा इतरत्र हरि आहे असे समजून त्या ठिकाणी पूज्य भाव ठेवेत नाही - सः भक्तः प्राकृतः स्मृतः - तो भक्त प्राकृत, म्हणजे कनिष्ठ दर्जाचा असे समजतात. ॥ ४७ ॥
आणि जो भगवंतांच्या मूर्तीचीच पूजाअर्चा श्रद्धेने करतो, परंतु त्यांचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही, तो कनिष्ठ भक्त होय. (४७)
गृहीत्वापि इन्द्रियैः अर्थान् यो न द्वेष्टि न हृष्यति ।
विष्णोर्मायां इदं पश्यन् स वै भागवतोत्तमः ॥ ४८ ॥
शद्बरूपादि विषया जाणितो परि आपुल्या । इच्छे विरुद्ध विषया न दुःखी नच हर्ष हो ॥ जाणी त्यां भगवतमाया तो भागवत उत्तम ॥ ४८ ॥
इंद्रियैः अर्थान् गृहित्वा अपि - प्रत्येक इंद्रियाने त्याच्या विषयाचे ग्रहण झाले तरी - इदं विष्णोः मायां पश्यन् - नेत्रादिकांचे रूपरसादि सर्व अर्थ विष्णूची मायाच आहे असे समजणारा - यः न द्वेष्टि न हृष्यति - जो भक्त उद्विग्न होत नाही की आनंदित होत नाही - सः भागवतोत्तमः वै - तो खरोखर भगवतोत्तम होय. ॥ ४८ ॥
जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो, परंतु त्याबद्दल आवडनावड बाळगत नाही, ही सर्व भगवंतांचीच माया आहे, असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. (४८)
( इंद्रवज्रा )
देहेन्द्रिय प्राण मनोधियां यो जन्माप्ययक्षुद् भय तर्ष कृच्छ्रैः । संसारधर्मैः अविमुह्यमानः स्मृत्या हरेर्भागवतप्रधानः ॥ ४९ ॥
(इंद्रवज्रा) देहेंद्रियें प्राण मने मतीने जन्म क्षुधा नी भय कष्ट तृष्णा । ना आठवे ज्या नच मोह होतो तो उत्तमो भागतोचि जाणा ॥ ४९ ॥
हरेः स्मृत्या - हरीचे स्मरण अखंड असल्याने - देहेंद्रियप्राण मनोधियां - शरीर, मन, प्राण, मन व बुद्धी या सर्वांपासून उत्पन्न होणार्या - जन्माप्ययक्षुद्भयतर्षकृच्छ्रैः - या सर्वांच्या जन्म, मरणक्षुधा, भय व तृष्णा - संसारधर्मैः यः - या दुःखद संसारधर्मांनी - अविमुह्यमानः सः भागवतप्रधानः - जो मोहग्रस्त होत नाही तोच भागवतोत्तम होय. ॥ ४९ ॥
जन्ममृत्यू, तहानभूक, श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना होत असतातच जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की, या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. (४९)
( अनुष्टुप् )
न कामकर्मबीजानां यस्य चेतसि संभवः । वासुदेवैकनिलयः स वै भागवतोत्तमः ॥ ५० ॥
(अनुष्टुप्) न काम कर्म बीजांच्या वासना मनिं येत तो । वासुदेवी रमे नित्य तो भागवत उत्तम ॥ ५० ॥
यस्य चेतसि - ज्याच्या अंतःकरणात - कामकर्मबीजानां संभवः न - काम आणि कर्म यांची बीजेच उत्पन्न होत नाहीत - वासुदेवैकनिलयः - जो वासुदेवाच्या मात्र ठिकाणी विश्रांतीचे स्थान संपादितो - स वै भागवतोत्तमः - तोच खरखर भागवतोत्तम होय. ॥ ५० ॥
ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा, कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहातो, तो उत्तम भागवत होय. (५०)
न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः ।
सज्जतेऽस्मिन् अहं भावो देहे वै स हरेः प्रियः ॥ ५१ ॥
शरीर कुल नी भक्ती कर्म वा वर्ण आश्रमा । अहंभाव न जातीचा कृष्णाचा भक्त प्रीय तो ॥ ५१ ॥
यस्य अस्मिन् देहे - ज्याला या देहामध्ये - न जन्मकर्मभ्यां - जन्मानि आणि कर्मांनी तसेच - वर्णाश्रमजातिभिः - वर्ण आश्रम आणि जाति - अहंभावः सज्जते - यांनी अहंभाव, अहंकार स्पर्श करीत नाही - स वै हरेः प्रियः - तोच वस्तुतः हरीचा आवडता होतो. ॥ ५१ ॥
ज्याला या शरीराचा, चांगल्या कुळात जन्मल्याचा, तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो, तोच भगवंतांना प्रिय असतो. (५१)
न यस्य स्वः पर इति वित्तेषु आत्मनि वा भिदा ।
सर्वभूतसमः शांतः स वै भागवतोत्तमः ॥ ५२ ॥
धन संपत्ति देहासी समभाव नि शांत जो । संकल्पी नच विक्षिप्त तो भागवत उत्तम ॥ ५२ ॥
वित्तेषु आत्मनि वा - वित्तामध्ये भोग्य विषयांच्या संबंधाने - स्वः परः इति - हे माझे हे दुसर्याचे असा अथवा आत्मसंबंधाने ’हा माझा व हा परका’ - यस्य नि भिदा - असा भेदाभेद जो करीत नाही - सर्वभूतसमः - जो सर्व भूतांस समत्वाने पाहतो - शांतः - ज्याची वृत्ति सदैव शांत समाधानाची असते - सः वै भागवतोत्तमः - तोच खरा भागवतोत्तम होय. ॥ ५२ ॥
जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत "हे माझे आणि हे दुसर्याचे" असा भेदभाव मानीत नाही, सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहात असतो, व त्यामुळे शांत राहातो, तो भगवंतांचा उत्तम भक्त होय. (५२)
( पुष्पिताग्रा )
त्रिभुवन-विभवहेतवेऽप्यकुण्ठ । स्मृतिः अजितात्म सुरादिभिर्विमृग्यात् । न चलति भगवत् पदारविंदात् । लव निमिषार्धमपि यः स वैष्णवाग्र्यः ॥ ५३ ॥
(पुष्पिताग्रा) ऋषि मुनि नित ध्याति चित्ती त्यासी क्षण्भर त्यागुनि ना कुठेच जाती । त्रिभुवन धन देउनि न चित्ती विचलित हो जन श्रेष्ठ भक्त त्याचा ॥ ५३ ॥
त्रिभुवनविभवहेतवे अपि - लोकत्रयस्वामित्वाच्यासाठी सुद्धा - लवनिमिषार्धं अपि - लवार्ध म्हणजे एका निमिषाचा १/१२० आणि निमिषार्ध म्हणजे डोळ्याची उघडझाप करण्यास लागणारा वेळ, त्याचा अर्ध. तात्पर्य - अत्यंत अल्प वेळही - अकुंठितस्मृतिः - अखंड, ज्याचे हरिस्मरण स्थिर आहे असा भक्त - अजितात्मसुरादिभिः विमृग्यात् - देवादिकांनीसुद्धा ज्या भगवंताच्या चरणकमलाचा शोध चालविला आहे - भगवत्पदारविंदात् यः न चलति - त्या हरिचरणापासून क्षणभरसुद्धा जो चळत नाही असा जो भक्त - सः वैष्ण्ववाग्रयः - तोच वैष्णवाग्रणी होय. ॥ ५३ ॥
आपले अंतःकरण भगवन्मय करणार्या देवतासुद्धा भगवंतांचे जे चरणकमल धुंडाळीत असतात, त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जो दूर होत नाही, मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरीसुद्धा तो त्यांचे स्मरण सोडीत नाही, तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. (५३)
भगवत उरुविक्रमाङ्घ्रिशाखा
नखमणिचंद्रिकया निरस्ततापे । हृदि कथमुपसीदतां पुनः स प्रभवति चंद्र इवोदितेऽर्कतापः ॥ ५४ ॥
भगवत व्रजि क्रीडला नखे ज्या नख मणिचंद्र बघिनि ताप जाये । नच पुढति गमे तयास पुन्हा शशि उदये रवि ताप हो न जैसा ॥ ५४ ॥
भगवतः उरुविक्रमांघ्रिशाखा - भगवंताच्या अत्यंत कार्यक्षम असल्यामुळे पराक्रमी असलेल्याचरणांच्या अंगुलीला शोभायमान करणार्या - नखमणिचंद्रकया - नखरूपी रत्नांच्या चंद्रसदृश शीतल तेजाने - निरस्ततापे - ज्यांतील त्रिविधताप सर्वथा नाहीसे झाले आहेत अशा - उपसीदतां हृदि - भक्तांच्या हृदयात - पुनः कथं सः प्रभवति - पुनः कसा ताप उत्पन्न व्हावा ? - चंद्रे इव उदिते अर्कतापः - चंद्र उगवला असता जसा सूर्यताप निरस्त होऊन पुनः उत्पन्न होणे शक्यच नाही. ॥ ५४ ॥
भगवंतांच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एक वेळ दूर केला, त्यांच्या हृदयामध्ये, जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही, तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवील ? (५४)
विसृजति हृदयं न यस्य साक्षाद्
हरिः अवशाभिहितोऽप्यघौघनाशः । प्रणयरशनया घृताङ्घ्रिपद्मः स भवति भागवतप्रधान उक्तः ॥ ५५ ॥
हृदयी रमुनि राहि श्रीहरि त्या जरि तई नाम वदेचि भक्त फक्त मुखी । हरि धरि हॄदि प्रेमदोर पाया विमलचि भागवतो नि श्रेष्ठ सर्वां ॥ ५५ ॥
अवशाऽभिहितः अपि - नकळता, अबुद्धिपूर्वक, सहजच हरिनाम घेतलेले पाहून मात्र - अघौघनाशः साक्षात् हरिः - पापप्रवाहांचा नाश करणारा प्रत्यक्ष हरि - प्रणयरशनया - प्रेमरूपी रज्जूनेज्याचे चरणकमलद्वय - धृतांघ्रिपद्मः - भक्तांच्या हृदयात डांबून टाकले आहेत असा - यस्य हृदयं न विसृजति - ज्या भक्ताचे हृदयातून जात नाही - स भागवतप्रधानः उक्तः भवति - तोच भक्त भागवतप्रधान, भक्तश्रेष्ठ होय असे म्हटले आहे. ॥ ५५ ॥
अगतिक होऊन नामोच्चार केल्यावरसुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी, प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे ज्याचे हृदय एका क्षणापुरतेसुद्धा सोडीत नाहीत, तो भगवद्भक्तांमध्ये मुख्य होय. (५५)
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां |