श्रीमद् भागवत पुराण
एकादशः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः

मायायास्ततः सन्तरेणोपायस्य च वर्णनं ब्रह्मकर्मादि निरूपणं च -

माया, माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
परस्य विष्णोरीशस्य मायिनां अपि मोहिनीम् ।
मायां वेदितुमिच्छामो भगवंतो ब्रुवंतु नः ॥ १ ॥
नानुतृप्ये जुषन् युष्मद् वचो हरिकथामृतम् ।
संसारतापनिस्तप्तो मर्त्यः तत्तापभेषजम् ॥ २ ॥
राजा निमिने विचारले -
( अनुष्टुप्‌ )
भगवन ! विष्णुची माया मोहिते न कळे कधी ।
इच्छितो रूप मायेचे जाणण्या ते वदा मला ॥ १ ॥
मॄत्युचा सावजो मी तो संसारे तापलो बहू ।
नामामृत तुम्ही देता तृप्ति ना हो कधी ॥ २ ॥

भगवंत - हे ज्ञानिश्रेष्ठहो ! - परस्य ईशस्य विष्णोः - सर्वांचे कारण व सर्वांतर्यामी अशा श्रीविष्णूची - मायिनाम् अपि - मायावी अशा ब्रह्मदेवादिकांनाहि - मोहिनीं मायां - मोहित करणारी माया - वेदितुं इच्छामि - जाणण्याची इच्छा करतो - नः ब्रुवन्तु - आम्हाला ती सांगावी - संसारतापनिरस्तप्तः - संसारसंबंधी तापांनी अत्यंत तप्त झालेला - मर्त्यः - मरणधर्मी असा - तत्तापभेषजम् - त्या संसारसंबंधी तापांचे औषध असे - हरिकथामृतम् - हरिकथामृतरूप - युष्मद्‌वचः जुषन् - आपले भाषण सेवन करणारा - न अनुतृप्ये - तृप्त होत नाही. ॥ १-२ ॥
राजाने विचारले सर्वशक्तीमान परमकारण भगवंतांच्या मायावींनासुद्धा मोहित करणार्‍या मायेचे स्वरूप आम्ही जाणू इच्छितो तरी आपण ते आम्हांला सांगावे. (१) संसारातील निरनिराळ्या तापांनी पोळलेला मी एक मनुष्य, त्या तापांवरील औषध असणारे, आपण जे भगवत्कथारूप अमृताचे पान आपल्या वाणीने करवीत आहात, तिचे सेवन करीत असताना माझी तृप्तीच होत नाही. (२)


श्रीअंतरिक्ष उवाच -
एभिर्भूतानि भूतात्मा महाभूतैर्महाभुज ।
ससर्जोच्चावचान्याद्यः स्वमात्रात्मप्रसिद्धये ॥ ३ ॥
योगीश्वर अंतरिक्ष म्हणाले-
भगवान शक्तिने होतो भूतांचा कारणी तसा ।
रचितो सृष्टि ही सर्व हीच माया असे पहा ॥ ३ ॥

महाभुज - हे आजानुबाहो ! - स्वमात्रात्मप्रसिद्धये - आपली उपासना करणार्‍या जीवांना उत्तम सिद्धि प्राप्त व्हावी याकरिता - भूतात्मा - सर्वांचा कारणभूत असा - आद्यः - आदिपुरुष - एभिः महाभूतैः - पंचमहाभूतांच्या योगे - उच्चावचानि भूतानि ससर्ज - लहानमोठी शरीरे उत्पन्न करता झाला. ॥ ३ ॥
अंतरिक्ष म्हणाला राजन ! आदिपुरूष ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन, त्यांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्याद्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठकनिष्ठ सृष्टी निर्माण करतात, तिलाच "माया" म्हणतात. (३)


एवं सृष्टानि भूतानि प्रविष्टः पञ्चधातुभिः ।
एकधा दशधाऽऽत्मानं विभजन् जुषते गुणान् ॥ ४ ॥
भूतांत वसतो नित्य दशेंद्रिय विभागितो ।
तयां द्वारेचि तो सर्व विषया भोगितो पहा ॥ ४ ॥

एवं पंचधातुभिः - याप्रकारे पंचमहाभूतांच्या योगे - सृष्टानि भूतानि - उत्पन्न केलेल्या भूतांत - प्रविष्टः - अंतर्यामी रूपाने प्रविष्ठ झालेला भगवान् - आत्मानं - आपल्याला - एकधा दशधा - एक व दहा प्रकारे - विभजन् सन् - विभागणारा होऊन् - गुणान् जुषते - विषयांचे सेवन करतो. ॥ ४ ॥
अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या द्वारे तयार झालेल्या प्राणिशरीरांमध्ये प्रवेश करून स्वतःलाच एक मन आणि पाच ज्ञानेंद्रिये व पाच कम]द्रिये अशा दहा रूपांत विभागून त्यांच्याद्वारा तोच विषयांचा उपभोग घेतो. (४)


गुणैर्गुणान् स भुञ्जान आत्मप्रद्योतितैः प्रभुः ।
मन्यमान इदं सृष्टं आत्मानं इह सज्जते ॥ ५ ॥
देहभिमानि तो जीव इंद्रियीं भ्ग सेवितो ।
आसक्त होऊनि बैसे आपुले रूप मानुनी ॥ ५ ॥

सः प्रभुः - तो जीव - आत्मप्रद्योतितैः - अंतर्यामी आत्म्याने प्रकाशित केलेल्या - गुणांनी गुणान् भूजानः - इंद्रियांनी विषयांना भोगणारा - इदं सृष्टः - उत्पन्न झालेल्या या शरीराला - आत्मानं मन्यमानः - आत्मा मानणारा - इह सज्जते - शरीरादिकांचे ठिकाणी आसक्त होतो. ॥ ५ ॥
तो देहाभिमानी जीव ईश्वराकडून प्रकाशित झालेल्या इंद्रियांच्या द्वारा विषयांचा उपभोग घेतो आणि या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या शरीरालाच आपले स्वरूप मानून त्यातच आसक्त होतो. (५)


कर्माणि कर्मभिः कुर्वन् सनिमित्तानि देहभृत् ।
तत्तत् कर्मफलं गृह्णन् भ्रमतीह सुखेतरम् ॥ ६ ॥
सकाम करितो कर्म सुख दुःख मिळे तसे ।
शरीर घेउनी हिंडे मायेचे कार्य हे असे ॥ ६ ॥

कर्मभिः समिनित्तानि कर्माणि कुर्वन् - कर्मेंद्रियांनी वासनायुक्त कर्मे करणारा, - तत्त कर्मफलं सुखेतरं गृह्णन् - त्या त्या कर्माचे सुखदुःखात्मक फल ग्रहण करणारा, - अयं देहभृत् - हा देहधारी जीव - इह भ्रमति - या जन्ममरणरूप संसारात भ्रमण पावतो. ॥ ६ ॥
नंतर तोच देहधारी जीव इंद्रियांनी सकाम कर्मे करतो आणि त्यानुसार शुभ कर्माचे फळ सुख आणि अशुभ कर्माचे फळ दुःख भोगत या जगात भटकत राहातो. (६)


इत्थं कर्मगतीर्गच्छन् बह्वभद्रवहाः पुमान् ।
आभूतसंप्लवात्सर्ग प्रलयौ अश्नुते अवशः ॥ ७ ॥
कर्मगति अशी भोगी जीव तो फळ लाभता ।
जन्मे मरे पुन्हा जन्मे माया हीच असे पहा ॥ ७ ॥

इत्थं बव्ह अभद्रवहाः - अकलाण व ताप देणार्‍या - कर्मगतीः गच्छन् - कर्ममूलक योनीस जाणारा - पुमान् अवशः - जीव परतंत्र, कर्माच्या अधीन झालेला - आभूतसंप्लवात् - भूतांचा, जगाचा प्रलय होईपर्यंत - सर्गप्रलयौ अश्नुते - जन्ममृत्यूचे सेवन करतो. ॥ ७ ॥
अशा प्रकारे हा कर्मपरतंत्र जीव अनेक अमंगल कर्मफळांना भोगत पंचमहाभूतांच्या प्रलयापर्यंत जन्ममृत्यूंच्या फेर्‍यात फिरत राहातो. (७)


धातूपप्लव आसन्ने व्यक्तं द्रव्यगुणात्मकम् ।
अनादिनिधनः कालो ह्यव्यक्तायापकर्षति ॥ ८ ॥
भूतांचा प्रलयो येता अनंतानादि काळ तो ।
ओढितो व्यक्त अव्यक्त माया हीच असे पहा ॥ ८ ॥

धातूपप्लवे आसन्ने सति - पंचमहाभूतांच्या नाशाचे कारण प्राप्त झाले असतां - अनादिनिधनः कालः द्रव्यगुणात्मकं - ज्याला आदि व अंत नाहीत असा काल स्थूल-सूक्ष्मभूतात्मक - व्यक्तं अव्यक्ताय - कार्यरूप जगाला अव्यक्त अशा ईश्वररूपामध्ये घेऊन जाण्याकरता - अपकर्षति हि - आकर्षित करतोच. ॥ ८ ॥
जेव्हा पंचमहाभूतांच्या प्रलयाची वेळ येऊन ठेपते, तेव्हा अनादि आणि अनंत असा काळ, द्रव्यगुणात्मक व्यक्त सृष्टीला नामरूपरहित करून मूळ कारणात विलीन करतो. (८)


शतवर्षा ह्यनावृष्टिः भविष्यति अत्युल्बणा भुवि ।
तत्कालोपचितोष्णार्को लोकान् त्रीन् प्रतपिष्यति ॥ ९ ॥
आवर्षण शतवर्षे सूर्याचे तेज वाढते ।
तापितो तिन्हि लोकांना माया हीच असे पहा ॥ ९ ॥

भुवि शतवर्षा - या पृथ्वीवर शंभर वर्षे - अत्युल्बणा हि - अगदी महाभयंकर - अनावृष्टिः भविष्यति - आवर्षण होईल - तत्कालोपचितोष्णार्क - जांची उष्णता तत्काळ वाढली आहे असा सूर्य - त्रीन् लोकान् प्रतपिष्यति - स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तिन्ही लोकांना तापवील. ॥ ९ ॥
त्यावेळी पृथ्वीवर सलग शंभर वर्षेपर्यंत भयंकर कोरडा दुष्काळ पडतो प्रलयकाळाच्या शक्तीने सूर्याची उष्णता आणखी वाढून तिन्ही लोक तापू लागतात. (९)


पातालतलमारभ्य सङ्‌कर्षणमुखानलः ।
दहन् ऊर्ध्वशिखो विष्वग् वर्धते वायुनेरितः ॥ १० ॥
शेषाच्या मुखिच्या ज्वाळा वायूने जाळिती जगा ॥ १० ॥

पातालतलं आरभ्य - पाताळापासून आरंभ करून - जगत् दहन् सन् - जगाला जाळीत - वायुना ईरितः ऊर्ध्वशिखः - वायूच्या प्रेरणेने ज्याच्या ज्वाला वर जातात त्याप्रमाणे - संकर्षणमुखानलः विष्वक् वर्धते - शेषाच्या मुखातील अग्नि चोहोकडे पसरतो. ॥ १० ॥
त्यावेळी शेषनागाच्या सहस्त्र मुखांतून बाहेर पडणारा अग्नी वार्‍याच्या साह्याने पाताळापासून वर वर येऊन सारे जाळण्यास सुरूवात करतो आणि तो चारी बाजूंना पसरतो. (१०)


सांवर्तकौ मेघगणो वर्षति स्म शतं समाः ।
धाराभिहस्तिहस्ताभिः लीयते सलिले विराट् ॥ ११ ॥
सांवर्तक ढगगणो धारा जैं हत्तिशुंडिशा ।
करिता शतवर्शे हे बुडे ब्रह्मांड त्यात की ॥
भगवान्‌ प्रभुची माया हीच ऐशी असे पहा ॥ ११ ॥

सांवर्तकः मेघगणः - प्रलय करणारा मेघांचा समुदाय - हस्तिहस्ताभिः धाराभिः - हत्तीच्या सोंडांसारख्या प्रचंड धारांनी - शतं समाः - शंभर वर्षे - वर्षति स्म - वृष्टि करतो. - विराट् सलीले लीयते - ब्रह्मांड त्या पाण्यात लीन होते. ॥ ११ ॥
एवढे झाल्यावर प्रलयकालीन मेघ हत्तीच्या सोंडेएवढ्या पर्जन्यधारांचा शंभर वर्षेपर्यंत वर्षाव करतात त्यामुळे हे विराट ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जाते. (११)


ततो विराजं उत्सृज्य वैराजः पुरुषो नृप ।
अव्यक्तं विशते सूक्ष्मं निरिंधन इवानलः ॥ १२ ॥
संपता काष्ठ जैं अग्नी मिटतो तैचि ब्रह्म हा ।
सूक्ष्मात लीन तो होतो माया हीच असे पहा ॥ १२ ॥

नृप ! - हे राजा ! - ततः वैराजः पुरुष - त्यानंतर ब्रह्मांडशरीरी विराट पुरुष - विराजं उत्सृज्य - आपल्या ब्रह्मांडरूप शरीराला सोडून - निरिंधनः अग्नि इव - ज्यात काष्टे नाहीत अशा अग्निप्रमाणे - सूक्ष्मं अव्यक्तं विशते - कोणत्याही प्रकारे व्यक्त म्हणजे प्रकट न होणार्‍या सूक्षब्रह्मांत प्रविष्ट होतो. ॥ १२ ॥
राजन ! जसे इंधन नसेल, तर आग विझून जाते, त्याचप्रमाणे त्यावेळी विराट पुरूष आपले ब्रह्मांडशरीर सोडून सूक्ष्म अशा अव्यक्तात विलीन होतो. (१२)


वायुना हृतगंधा भूः सलिलत्वाय कल्पते ।
सलिलं तद्‌धृतरसं ज्योतिष्ट्वायोपकल्पते ॥ १३ ॥
पृथ्वीचा गंध शोषोनी वायुचे जल होतसे ।
जल हो कारणी अग्नी माया हीच असे पहा ॥ १३ ॥

वायूना हृतगंधा भूः - वायूने जिचा मुख्य गुण गंध आहे तोच हरण केला आहे ती पृथ्वी - सलिलत्वाय कल्पते - उदकरूपास पावते. - तद् हृतरसं सलिलं - त्या वायूनेच ज्याचा रस हा गुण आहे असे ते जल - ज्योतिष्ट्वाय उपकल्पते - तेजोरूपास प्राप्त होते. ॥ १३ ॥
प्रलयकालीन वारा पृथ्वीचा गुण गंध आकर्षून घेतो त्यामुळे तिचे पाण्यात रूपांतर होते जेव्हा तोच वारा पाण्यातील रस शोषून घेतो, तेव्हा तेच पाणी तेज बनते. (१३)


हृतरूपं तु तमसा वायौ ज्योतिः प्रलीयते ।
हृतस्पर्शोऽवकाशेन वायुर्नभसि लीयते ॥ १४ ॥
तमाला गिळितो अग्नी अग्नि वायूत लीन हो ।
आकाश वायुची शक्ति घेते सर्व हिरावुनी ॥
स्पर्शतो संपतो त्याची माया हीच असे पाहा ॥ १४ ॥

ज्योतिः तु प्रलयकालीनेन तमसा - तेज तर प्रलयकाळच्या तमाने - हृतरूपं सत् - ज्योतीच्या रूप या गुणाचे हरण करून ते - वायौ प्रलीयते - वायूच्या ठिकाणी लीन होते. - वायुः अवकाशेन - आकाशाने वायूचा - हृतस्पर्शः नभसि लीयते - स्पर्श हा गुण हरण केला आणि तो आकाशात लीन झाला. ॥ १४ ॥
जेव्हा प्रलयकालीन अंधार अग्नीचा गुण रूप काढून घेतो, तेव्हा तो अग्नी वायूमध्ये लीन होतो आणि जेव्हा आकाश वायूचा स्पर्शगुण काढून घेते, तेव्हा तो वायू आकाशात लीन होतो. (१४)


कालात्मना हृतगुणं नभ आत्मनि लीयते ।
इन्द्रियाणि मनो बुद्धिः सह वैकारिकैर्नृप ।
प्रविशंति ह्यहङ्‌कारं स्वगुणैः अहमात्मनि ॥ १५ ॥
काळ आकाश शब्दाचे गुण घेई हिरावुनी ।
तामसी लीन होवोनी बुद्धि राजसि लीन हो ॥
प्रकृतीत महत्तत्व ब्रह्मी प्रकृति ती मिळे ।
क्रमाने सृष्टि हो ऐशी माया असे हीच पहा ॥ १५ ॥

नभः कालात्मना - कालात्मा परमेश्वराने आकाशाचा - हृतगुणं आत्मनि लीयते - हरीचा शब्द गुण हरण करीत तो तामस अहंकारामध्ये लीन झाला. - नृप ! - हे राजा ! - इंद्रियाणि बुद्धिः च - इंद्रिये आणि बुद्धिः - राजसं अहंकारं प्रविशति हि - राजस अहंकाराप्रत प्रविष्ठ होतातच - वैकारिकैः सह मनः - इंद्रियांच्या देवतांसह मन - अहं स्वगुणैः सह - अहंकार आपल्या कार्यभूत सत्त्वादि गुणांसह - आत्मनि लीयते - महत्तत्त्वामध्ये लीन होते. ॥ १५ ॥
राजन ! त्यानंतर काळरूप ईश्वर जेव्हा आकाशाचा गुण शब्द, काढून घेतो, तेव्हा ते आकाश तामस अहंकारात लीन होते इंद्रिये आणि बुद्धी राजस अहंकारात लीन होतात सात्त्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या देवतांसह मन सात्त्विक अहंकारात प्रवेश करते अहंकार महत्तत्त्वामध्ये विलीन होतो महत्तत्त्व प्रकृतीमध्ये आणि प्रकृती ब्रह्मामध्ये लीन होते. (१५)


एषा माया भगवतः सर्गस्थित्यंतकारिणी ।
त्रिवर्णा वर्णिता अस्माभिः किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥ १६ ॥
ही सृष्टि स्थित संहार माया त्रिगुण्य ती रची ।
वर्णिले सर्वच्या सर्व इच्छिता काय ते पुढे ॥ १६ ॥

सर्गस्थित्यंतकारिणी - उत्पत्ति-स्थिति-लय करणारी - भगवतः - भगवंताची - एषा त्रिवर्णा माया - ही त्रिगुणात्मिका माया - अस्माभिः वर्णिता - आम्ही सांगितली. - भूयः किं श्रोतुं इच्छसि - आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे. ॥ १६ ॥
उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी ही भगवंतांची त्रिगुणमय माया आहे आम्ही तुला हिचे वर्णन करून सांगितले आता तू आणखी काय ऐकू इच्छितोस ? (१६)


श्रीराजोवाच -
यथा एतां ऐश्वरीं मायां दुस्तरां अकृतात्मभिः ।
तरंत्यञ्जः स्थूलधियो महर्ष इदमुच्यताम् ॥ १७ ॥
राजा निमिने विचारले-
माया ही प्रभुची ऐसी जीवा दुस्तरची असे ।
शरीरा मानिती सत्य माया तेणे कशी तरो ॥ १७ ॥

महर्षे ! - हे महामुने ! - अकृतात्मभिः - ज्याचे अंतकरण स्वाधीन झालेले नाही अशा पुरुषांना - एतां दुस्तरां - तरून जाण्यास कठीण अशा या - ऐश्वरीं मायां - ईशरी मायेला - स्थूलधियः - ज्यांची स्थूल, म्हणजे शरीराच्या ठिकाणी धी म्हणजे अहंबुद्धी आहे अशांना - यथा अंजः तरंति - ज्यायोगे सहज तरून जातील - इदं उच्यताम् - ते सांगावे. ॥ १७ ॥
राजाने म्हटले, महर्षे ! आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही, त्यांना तरण्यास कठीण अशी ही भगवंतांची माया स्थूलबुद्धी लोक सहज कसे पार करू शकतील, ते मला सांगा. (१७)


श्रीप्रबुद्ध उवाच -
कर्माणि आरभमाणानां दुःखहत्यै सुखाय च ।
पश्येत् पाकविपर्यासं मिथुनीचारिणां नृणाम् ॥ १८ ॥
योगीश्वर प्रबुद्ध म्हणाले-
भिन्न लिंगी रमे जीव सुखेच्छे दुःख मेळवी ।
उलटे फळ ते लाभे जाणावे त्या मुमुक्षेने ॥ १८ ॥

दुःखहत्यै सुखाय च - दुःखाच्या नाशाकरिता व सुखाच्या प्राप्तीकरिता - कर्माणि आरंभमाणानां - कर्मे वा उद्योग आरंभणार्‍या - मिथुनीचरणां नृणां च - व दांपत्य जीवन अनुसरणार्‍या मनुष्यांना - पाकविपर्यासं पश्येत् - फलाचा विपर्यास म्हणजे विचारांच्या उलट फलप्राप्ती होते ती पहावी. ॥ १८ ॥
प्रबुद्ध म्हणाला - स्त्रीपुरूषसंबंध इत्यादी संबंधानी बांधली गेलेली माणसे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यासाठी कर्मे करीत असतात परंतु त्यांचे फळ मात्र उलट मिळते, याचा विचार करावा. (१८)


नित्यार्तिदेन वित्तेन दुर्लभेनात्ममृत्युना ।
गृहापत्याप्तपशुभिः का प्रीतिः साधितैश्चलैः ॥ १९ ॥
धनाने वाढते दुःख मेळिता मेळिल्यावरी ।
नाशवंत तसे सारे मेळिता सुख शांती ना ॥ १९ ॥

नित्यार्दितेन दुर्लभेन - निरंतर दुःखच देणार्‍या व मिळण्यास कठीण अशा - आत्ममृत्युना - आपल्या मृत्युरूप - वित्तेन साधितैः - द्रव्याने मिळविलेल्या - चलैः गृहापत्याप्तपशुभिः - चंचल अशा गृह, अपत्य, आप्त, पशु यांत - का प्रीतिः - काय सुख आहे बरे ! ॥ १९ ॥
मिळविण्यास कठीण, नेहमी पीडा देणारे व स्वतःचा मृत्यूस्वरूप असलेले, द्रव्य, घर, पुत्र, आप्तेष्ट, पशू इत्यादी नाशवान पदार्थ मिळाले तरी त्यांपासून कोणते सुख मिळणार आहे ? (१९)


एवं लोकं परं विद्यात् नश्वरं कर्मनिर्मितम् ।
सतुल्यातिशयध्वंसं यथा मण्डलवर्तिनाम् ॥ २० ॥
तराया इच्छितो त्याने स्वर्गही मर्त्य जाणणे ।
अल्पकर्मे मिळे स्वर्ग तिथेही लक्षणे असे ॥
ईर्षा द्वेष असे भाव तिथे ना सोडिती मुळी ।
घृणा येतेहि थोरांची सरता पुण्य थोडके ॥
जन्मावे लागते येथे नाशाचे भय तेथही ॥ २० ॥

एवं - याप्रमाणे - यथा मंडलवर्तिनां - जसे मांडलिक राजांमध्ये - सतुल्यातिशयध्वंसं - ज्यांत तुल्य अशा सुखसंपत्तिवंतांशी स्पर्धा असल्यामुळे त्यापासून होणार्‍या दुःखदायक - कर्मनिमित्तम् - कर्मांनी संपादिलेला - परं लोकं - स्वर्गादि परलोक देखील - नश्वरं विंद्यात् - विनाशी जाणावा. ॥ २० ॥
याचप्रमाणे कर्माने मिळणारे परलोकसुद्धा असे नाशवान आहेत, असे समजावे तेथेही पृथ्वीवरील लहानलहान राजांप्रमाणे बरोबरीच्यांशी स्पर्धा व वरचढांशी द्वेष असतो शिवाय त्यांचाही नाश असतो. (२०)


तस्माद् गुरुं प्रपद्येत जिज्ञासुः श्रेय उत्तमम् ।
शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मणि उपशमाश्रयम् ॥ २१ ॥
गुरूच्या शरणी जावे जिज्ञासू साधके पहा ।
शब्द ब्रह्मासि जाणी जो गुरू तो पाहिजे असा ॥
परिनिष्ठित नी ज्ञानी वागुनी सांगु जो शके ।
शांतचित्त असावा नी विशेष लोभि जो नसे ॥ २१ ॥

तस्मात् - म्हणून - उत्तमं श्रेयः - सर्वोत्कृष्ट कल्याण - जिज्ञासुः - जाणण्याची इच्छा करणारा पुरुष - शाब्दे - वेदाख्य - परे च - व साक्षात्काररूप - ब्रह्मणि निष्णाते - ब्रह्मामध्ये निष्णात म्हणजे परिपूर्ण - उपशमाश्रयं च - परम शांतीचे घरच अशा - गुरुं प्रपद्येत - सद्‌गुरूला शरण जावो. ॥ २१ ॥
म्हणून आपले परम कल्याण व्हावे, अशी ज्याला इच्छा असेल, त्याने गुरूंना शरण गेले पाहिजे ते गुरू शब्दज्ञानी, ब्रह्मानुभवी व त्यामुळे शान्तचित्त असावेत. (२१)


तत्र भागवतान् धर्मान् शिक्षेद् गुर्वात्मदैवतः ।
अमाययानुवृत्त्या यैः तुष्येद्‌ आत्माऽऽत्मदो हरिः ॥ २२ ॥
इष्टदेव नि आत्मा तो शिष्याने प्रिय माणणे ।
शिकावा भगवत्‌ धर्म श्रीपती आकळा तसा ॥ २२ ॥

तत्र गुर्वात्मदैवतः सन् - तेथे ज्याचा आत्मा व दैवत गुरुच आहे असे होऊन - अमायया अनुवृत्त्या - निष्कपट अशा सेवेने - भागवतान् धर्मान् शिक्षेत् - भगवंतांनी स्वमुखाने सांगितलेले आत्मप्राप्तीचे उपाय असे धर्म शिको. - यैः आत्मा - ज्यांचे योगे आत्मरूप असा - आत्मदः च हरिः तुष्येत् - व भक्तांना आत्मस्वरूप देणारा असा हरि संतुष्ट होतो. ॥ २२ ॥
ब्रह्मजिज्ञासूने गुरूंनाच आपला आत्मा आणि देव मानून, निष्कपटभावाने त्यांची सेवा करून आणि त्यांच्या सान्निध्यात राहून भागवतधर्माचे शिक्षण प्राप्त करून घ्यावे यामुळेच सर्वात्मा व भक्तांना स्वतःचे दान करणारे भगवान प्रसन्न होतात. (२२)


सर्वतो मनसोऽसङ्‌गं आदौ सङ्गं च साधुषु ।
दयां मैत्रीं प्रश्रयं च भूतेष्वद्धा यथोचितम् ॥ २३ ॥
अनासक्ति करोनिया संतसेवा करा पुन्हा ॥ २३ ॥

आदौ - सर्वप्रथम - सर्वतः - सर्व म्हणजे स्त्री, पुत्र, धन, देह इत्यादिचे ठिकाणी - मनसः असंगं - मनाची अनासक्ति (वैराग्य) - साधुषु संगं च - व साधूंचा सहवास - भूतेषु च - आणि सर्व भूतांचे ठिकाणी - यथोचितम् - ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार - दयां मैत्रीं प्रश्रयं अद्धा - दया, मैत्री, नम्रता असावी. ॥ २३ ॥
(ते भागवत धर्म असे) सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टीबद्दल अनासक्तभाव, नंतर सत्संगती व सर्वाबद्दल यथायोग्य दया, मैत्री आणि विनय असावा. (२३)


शौचं तपस्तितिक्षां च मौनं स्वाध्यायमार्जवम् ।
ब्रह्मचर्यं अहिंसां च समत्वं द्वंद्वसंज्ञयोः ॥ २४ ॥
शीच तप तितिक्षा नी मौन स्वाध्याय आर्जव ।
ब्रह्मचर्य अहींसा नी समत्व शिकणे पुन्हा ॥ २४ ॥

शौचं तपः तितिक्षां च - व प्रत्यक्ष अंतर्बाह्य पवित्रता, स्वधर्माचरण व क्षमा - मौनं स्वाध्यायं आर्जवम् - व्यर्थ भाषण न करणे, वेदाध्ययन व मनाचा सरळपणा - ब्रह्मचर्यं अहिंसांच - ब्रह्मचर्य व कोणचाही द्वेष न करणे - समत्वं द्वंद्वसंज्ञयोः - लाभ-हानि, सुख-दुःख इत्यादि द्वंद्व संज्ञा असलेल्यांचे ठिकाणी समत्वबुद्धी असणे ॥ २४ ॥
पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा तसेच सुखदुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये समबुद्धी असणे. (२४)


सर्वत्रात्मेश्वर अन्वीक्षां कैवल्यं अनिकेतताम् ।
विविक्तचीरवसनं संतोषं येन केनचित् ॥ २५ ॥
सर्वात्मी पाहणे ईशा एकांत पर मानणे ।
पवित्र नेसणे व्रस्त्र गृहस्थी साधके तसे ॥
भग्याने लाभले तैसे संतोषे फाटके असो ॥ २५ ॥

सर्वत्र आत्मेश्वरान्वीक्षां - सर्वत्र सत्य-ज्ञानरूपाने आत्मा व नियामक रूपाने ईश्वर भरून राहिला आहे असे पाहणे - कैवल्यं - एकांतवास - अनिकेततां - गृहधनादिकांचे ठिकाणी अभिमान त्याग - विविक्तचीरवसनं - यथा तथा वस्त्र किंवा वल्कले परिधान करणे - येनकेनचित् संतोषः - कशानेही संतोष असणे - ॥ २५ ॥
सर्व ठिकाणी चैतन्यरूपात आत्म्याला आणि नियंता म्हणून ईश्वराला पाहाणे, एकांतात राहणे, घराची आसक्ती न ठेवणे, पवित्र वल्कले धारण करणे, जे काही मिळेल, त्यातच संतोष मानणे. (२५)


श्रद्धां भागवते शास्त्रे अनिंदां अन्यत्र चापि हि ।
मनोवाक् कर्मदण्डं च सत्यं शमदमौ अपि ॥ २६ ॥
श्रद्धा भागवती व्हावी न निंदा अन्य शास्त्र ते ।
प्राणायामे तसे मौने वासना वाणि रोधिणे ॥
बोलावे सत्य ते नित्य मन इंद्रिय रोधिणे ॥ २६ ॥

भागवते शास्त्रे श्रद्धां - भगवत्प्रतिपादक शास्त्राविषयी विश्वास - अन्यत्र च अपि अनिंदांहि - आणि इतर शात्रांविषयी सुद्धा अगदी अनिंदा - मनोवाक् कर्मदंडं च - आणि मन, वाणी व कर्म यांचे नियमन - सत्यं शमदमौ अपि - सत्य, मनोनिग्रह व इंद्रियांचा निग्रह करणे - ॥ २६ ॥
भगवत्प्राप्तीचा मार्ग दाखविणार्‍या शास्त्रांविषयी श्रद्धा आणि दुसर्‍या कोणत्याही शास्त्रांची निंदा न करणे, प्राणायामाने मनाचा, मौनाने वाणीचा आणि वासना सोडून कर्मांचा संयम करणे, सत्य भाषण करणे, इंद्रियांचा व मनाचा निग्रह करणे. (२६)


श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेः अद्‌भुतकर्मणः ।
जन्मकर्मगुणानां च तदर्थेऽखिलचेष्टितम् ॥ २७ ॥
श्रवणे कीर्तने ध्याने लीला अद्‌भूत मेळिणे ।
तयाचे जन्म नी कर्म गुण ते द्वयची पहा ॥
ध्यान कर्म तसे सर्व शिकावे त्याजसाठि की ॥ २७ ॥

हरेः अद्‌भुतकर्मणः - ज्याची कर्में विलक्षण आहेत अशा श्रीहरीच्या - जन्मकर्मगुणानां - अवतारातील, चरित्रांचे व गुणांचे - श्रवणं कीर्तनं ध्यानं - श्रवण, कीर्तन, ध्यान-चिंतन - तदर्थे च - आणि त्याच्या म्हणजे भगवम्तांच्या प्रीत्यर्थच - अखिलचेष्टितम् - सर्व कर्मांचे आचरण भगवंतासाथीच करणे ॥ २७ ॥
अद्‌भूत लीला करणार्‍या भगवंतांच्या जन्म, कर्म आणि गुणांचे श्रवण, कीर्तन आणि ध्यान करणे तसेच सर्व कर्मे भगवंतांसाठीच करणे. (२७)


इष्टं दत्तं तपो जप्तं वृत्तं यच्चात्मनः प्रियम् ।
दारान् सुतान् गृहान् प्राणान् यत्परस्मै निवेदनम् ॥ २८ ॥
यज्ञ दान तपो जाप्य सदाचार तसा असो ।
प्रियसर्व तया पायी सोपवा त्या निवेदने ॥ २८ ॥

इष्टं दत्तं तपः जप्तं - यज्ञादिक वैदिक कर्मे, दानादिक स्मार्त कर्मे, तपश्चर्या, जप, - वृत्तं यत् च - सदाचरण आणि जे - आत्मनः प्रियं - आपणाला प्रिय अशा - दारान् सुतान् गृहान् - स्त्री, पुत्र घर इत्यादि - प्राणान् परस्मै यत् निवेदनम् - प्राण व परमेश्वराला प्रिय अशी सेवा समर्पण करणे - ॥ २८ ॥
यज्ञ, दान, तप, जप, सदाचारपालन आणि स्त्री, पुत्र, घर, प्राण इत्यादी जे काही आपल्याला प्रिय असेल, ते सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण करणे. (२८)


एवं कृष्णात्मनाथेषु मनुष्येषु च सौहृदम् ।
परिचर्यां चोभयत्र महत्सु नृषु साधुषु ॥ २९ ॥
जयांनी कृष्ण तो आत्मा स्वमीरूपचि पाहिला ।
जीव संत ययांची तै सेवा ती शिकणे पहा ॥ २९ ॥

एवं कृष्णात्मनाथेषु - कृष्ण हाच ज्यांचा आत्मा, स्वामी अशा - मनुष्येषु - मनुष्यांचे ठिकाणी - सौहृदं कर्तुं च - स्नेह करण्याला आणि - उभयत्र च विशेषतः नृषु - स्थावर जंगम प्राण्यांचे, त्यांत विशेषतः मनुष्यांचे ठिकाणी - तत्रापि साधुषु - त्यांतही स्वधर्मांचे ठिकाणी - ततोऽपि महत्सु - त्यापेक्षाही भगवद्‌भक्तांचे ठिकाणी - परिचर्यां कर्तुं शिक्षेत् - सेवाशुश्रूषा करण्याला शिकावे. ॥ २९ ॥
ज्या मनुष्यांनी श्रीकृष्णांचा आपला आत्मा आणि स्वामी म्हणून साक्षात्कार करून घेतला असेल, त्यांच्यावर प्रेम, तसेच स्थावरजंगम अशा प्राण्यांची, विशेषतः संतमहंतांची सेवा करणे. (२९)


परस्परानुकथनं पावनं भगवद् यशः ।
मिथो रतिर्मिथस्तुष्टिः निवृत्तिर्मिथ आत्मनः ॥ ३० ॥
भगवत्‌ किर्तिची व्हवी चर्चा नी प्रेमभाव हो ।
आपसी माणणे तोष निवृत्ते शांती मेळिणे ॥ ३० ॥

पावनं भगवद्‌यशः - पवित्र भगवंतांचे यश - परस्परानुकथनं - परस्परांनी केलेले वर्णन - आत्मनः मिथः रतिः - मनाने परस्परांत रमणे - या मिथः तुष्टिः - जो परस्पर संतोष - या मिथः निवृत्तिः - आणि परस्पर सर्व दुःखांतून निवृत्त होऊन शांतिचा अनुभव घेणे - ॥ ३० ॥
भगवंतांच्या परमपावन यशासंबंधी एकमेकांशी चर्चा करणे आणि अशा प्रकारच्या साधकांवर आपापसात प्रेम करणे, आपापसात संतुष्ट राहाणे आणि प्रपंचातून निवृत्त होऊन एकमेकांमध्ये आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणे. (३०)


स्मरंतः स्मारयंतश्च मिथोऽघौघहरं हरिम् ।
भक्त्या सञ्जातया भक्त्या बिभ्रत्युत्पुलकां तनुम् ॥ ३१ ॥
पापांच्या राशिही सर्व जळती कृष्ण बोलता ।
स्मरावा स्मरणा घ्यावा साधनी भक्ती लाभते ॥
मिळता प्रेमभक्ती ती अंग रोमांच होतसे ॥ ३१ ॥

अघौघहरं - पापसमूह नष्ट करणार्‍या - हरिं स्मरंतः - श्रीहरीला स्मरणारे - मिथः स्मारयंतः च - परस्पर आणि स्मरण करविणारे - भक्त्या उत्पुलकां तनुं बिभ्रति - भगवंताच्या प्रेमलक्षणा भक्तीने रोमांचित शरीर बनतात. ॥ ३१ ॥
राजन ! पापांच्या समूहांचे श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात सर्वांनी त्यांचेच स्मरण करावे आणि एकमेकांकडून स्मरण करवून घ्यावे अशा प्रकारे साधनभक्तीचे अनुष्ठान करता करता प्रेमभक्तीचा उदय होतो आणि प्रेमाच्या उद्रेकाने त्यांच्या शरीरांवर रोमांच उभे राहातात. (३१)


( वंशस्था )
क्वचिद् रुदंत्यच्युतचिंतया क्वचिद्
     हसंति नंदंति वदंत्यलौकिकाः ।
नृत्यंति गायंत्यनुशीलयंत्यजं
     भवंति तूष्णीं परमेत्य निर्वृताः ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
चिंती मनीं की हरि कोणि दावा
     जाऊ कुठे नी पुसु मी कुणाला ।
हासे वदे नी रडतो कधी तो
     आनंदमग्नी हरिसीच बोले ।
गाये नि नाचे रिझवी कधी त्या
     धुंडी कधी संनिधि शांत राही ॥ ३२ ॥

अलौकिकाः - लोकविलक्षण - अच्युतचिंतया - भगवत् चिंतनाने - क्वचित् रुदंति - केव्हा रडतात - क्वचित् हसंति - केव्हां हसतात - क्वचित् नंदंति - कधी आनंद पावतात - क्वचित् वदंति - केव्हा बोलतात - क्वचित् नृत्यंति - कधी नाचतात - अजं गायंति - जन्मरहित परमात्म्याचे गुण गातात - अनुशीलयंति - त्यांच्या लीलांचे अनुकरण करतात - परं एत्य निर्वृताः संतः - परमेश्वराला प्राप्त होऊन सुखी होत - तूष्णीं भवंति - स्वस्थ होतात. ॥ ३२ ॥
अशी प्रेमभक्ती उत्पन्न झाली की, ते भक्त भगवच्चिंतन करता करता कधी रडतात, कधी हसतात, कधी आनंदित होतात, कधी भान विसरून भगवंतांशी बोलू लागतात, नाचतात, गातात, त्यांना शोधतात आणि शेवटी त्यांच्याशी एकरूप होऊन आनंदमग्न होतात. (३२)


( अनुष्टुप् )
इति भागवतान् धर्मान् शिक्षन् भक्त्या तदुत्थया ।
नारायणपरो मायां अञ्जस्तरति दुस्तराम् ॥ ३३ ॥
( अनुष्टुप्‌ )
अस भागवतो धर्म भक्ताने शिकता तया ।
हरीचा प्रिय तो होतो मायेच्या मधुनि सुटे ॥ ३३ ॥

इति भागवतान् धर्मान् - पूर्वोक्त भागवत धर्मांना - शिक्षन् पुरुषः - शिकणारा मनुष्य - तदुत्थ भक्त्या - भागवतधर्मांच्या आचरणाने उत्पन्न झालेल्या भक्तीने - नारायणःपरः सन् - भगवंताच्याच ठिकाणी तत्पर होत - दुस्तरां अपि मायां - तरून जाण्यास कठीण अशाही मायेला - अंजः तरति - सहज तरून जातो. ॥ ३३ ॥
जो अशा प्रकारचे भागवतधर्माचे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो, त्याला त्यांच्या योगाने भक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायणपरायण होऊन, जिच्या कचाट्यातून सुटणे अतिशय अवघड आहे, ती माया सहजपणे पार करतो. (३३)


श्रीराजोवाच -
नारायणाभिधानस्य ब्रह्मणः परमात्मनः ।
निष्ठां अर्हथ नो वक्तुं यूयं हि ब्रह्मवित्तमाः ॥ ३४ ॥
राजा निमिने विचारिले-
नारायण अशा नामे परब्रह्मचि ते असे ।
जाणिता तुम्हि त्या रूपा कृपया सांगणे मला ॥ ३४ ॥

नारायणाभिधानस्य - नारायणनामक - परमात्मनः ब्रह्मणः निष्ठां - परमात्म ब्रह्माचे स्वरूप - नः वक्तुं अर्हथ - आम्हांला सांगण्याला योग्य आहा - हि - ज्या अर्थी - यूयं ब्रह्मवित्तमाः - आपण ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ आहा. ॥ ३४ ॥
राजाने म्हटले परमात्म्याचे स्वरूप जाणणार्‍यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात म्हणून मला आता ज्या परब्रह्म परमात्म्याचे ‘नारायण‘ नावाने वर्णन केले जाते, त्यांचे स्वरूप सांगा. (३४)


श्रीपिप्पलायन उवाच -
( वसंततिलका )
स्थित्युद्‌भवप्रलयहेतुः अहेतुः अस्य
     यत् स्वप्नजागरसुषुप्तिषु सद् बहिश्च ।
देहेंद्रियासुहृदयानि चरंति येन
     सञ्जीवितानि तद् अवेहि परं नरेंद्र ॥ ३५ ॥
योगेश्वर पिप्पलायन म्हणाले-
( वसंततिलका )
जन्म स्थिती नि प्रलयो ययि कारणी जो
     स्वप्नी सुषुप्ति अन जागरणी तसेची ।
ध्यानात साक्षि वसतो अन त्राण देहा
     नारायणोचि समजा अशि सत्यवस्तु ॥ ३५ ॥

नरेंद्र ! - हे राजा ! - अस्य जगतः - या जगाच्या - स्थित्युद्‌भवप्रलयहेतुः - उत्पत्ति, स्थिती, संहारांना कारण - परं स्वयं अहेतुः - पण स्वतःला काहीच कारण नाही अशा - यत् स्वप्नजागरसुषुप्तिषु - स्वप्न, जागृति, निद्रांमध्ये सतत असणारे - संजीवितानि - चैतन्यशक्ति दिलेली अशी - देहेंद्रियासुहृदयानि चरंति - देह, इंद्रिये, प्राण, मन आपापला व्यवहार करतात - तत् ते एकमेव परं तत्त्वं अवेहि - ते एकच श्रेष्ठ तत्त्व जाण. ॥ ३५ ॥
पिप्पलायन म्हणाला - राजन ! जी या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण असून स्वतः मात्र कारणहित आहे; स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या अवस्थांमध्ये तसेच समाधी अवस्थेतसुद्धा साक्षीरूपाने विद्यमान असते, जिच्या सत्तेनेच शरीर, इंद्रिये, प्राण आणि अंतःकरण ही सर्व चेतन होऊन आपापली कामे करतात, त्याच परम सत्य वस्तूला ‘नारायण‘ समजावे. (३५)


नैतन्मनो विशति वागुत चक्षुरात्मा
     प्राणेंद्रियाणि च यथानलमर्चिषः स्वाः ।
शब्दोऽपि बोधकनिषेधतयात्ममूलम्
     अर्थोक्तमाह यद्‌ऋते न निषेधसिद्धिः ॥ ३६ ॥
जाळी न तेज नच दे ठिणगी जशी ती
     ते आत्म्रूप तईची नच आकळे की ।
त्या नेति श्ब्दि श्रुति ते रुप बोधितात
     नाही निषेध ठरतो करण्यास सिद्ध ॥ ३६ ॥

यथा स्वाः अर्चिषः अनलं (न प्रकाशयति न दहति) - ज्याप्रमाणे अग्नीच्या अंशभूत ठिणग्या अग्नीला (प्रकाशत नाहीत वा जाळत नाहीत - ततः मनः एतद् न विशति - त्याप्रमाणे मनाला ब्रह्मांत गति नाही - उत वाक् चक्षु आत्मा - तसेच वाणी, नेत्र वा बुद्धि - प्राणेंद्रियाणि च - व प्राण आणि इंद्रिये - शब्दः अपि बोधकनिषेधतया - वा वेदही ’नेति नेति’ म्हणत बोध करून देणार्‍या साधनांचा निषेध करून - आत्ममूलं सत् अर्थोक्तं आह - आत्म्याविषयी प्रमाण असूनही तात्पर्य सांगावे अशा रीतीने सांगतो. - यद् ऋते निषेधसिद्धिः न भवति - या ब्रह्म्याव्यतिरिक्त निषेधाची सिद्धीच होत नाही. ॥ ३६ ॥
जशा अग्नीच्या ठिणग्या अग्नीला प्रकाशित करू शकत नाहीत की, जाळू शकत नाहीत, त्याचप्रमाणे त्या परमतत्त्वामध्ये मनाची गती नाही की वाणीची गती नाही, डोळे त्याला पाहू शकत नाहीत आणि बुद्धी त्यांच्यासंबंधी विचार करू शकत नाही, प्राण आणि इंद्रियेही त्याला जाणत नाहीत "नेतिनेति" हे श्रुतींचे शब्दसुद्धा बोध करून देणार्‍या साधनांचा निषेध करून तात्पर्यरूपाने जेथे निषेध संपतो, ते आपले मूळ दाखवितात कारण हे मूळ नसेल, तर निषेधच सिद्ध होणार नाही. (३६)


सत्त्वं रजस्तम इति त्रिवृदेकमादौ
     सूत्रं महानहमिति प्रवदंति जीवम् ।
ज्ञानक्रियार्थफलरूपतयोरुशक्ति
     ब्रह्मैव भाति सत् असच्च तयोः परं यत् ॥ ३७ ॥
सत्वो रजो तम उरे प्रलयात गाण्या
     गावे कुणास कुणि जैं नच कोणि तेथे ।
ज्ञानक्रियार्थ फलरुप नि सर्व शक्ती
     सारेचि सर्व हरिचे निजरुप ब्रह्म ॥ ३७ ॥

आदौ एकं - प्रथमारंभी एकच ब्रह्म असते - तदेव सत्त्वं रजः तमः इति त्रिवृत् प्रवदंति - त्यालाच सत्त्वरजतमात्मक त्रिगुणप्रधान म्हणतात - तदेव सूत्रं, महान्, अहं जीवं इति प्रवदंति - त्यालाच सूत्र, महान, अहंरूपी जीव असे म्हणतात - ज्ञानक्रियाफलरूपतया - ज्ञान, क्रिया, अर्थ, फल या निरनिराळ्या रूपांनी - उरुशक्ति - अत्यंत शक्तिशाली - ब्रह्मएव भाति - ब्रह्मच प्रकाशत आहे - यत् सत् असत् च तयोः परं - जे स्थूल व सूक्ष्म व त्यांचे श्रेष्ठ कारण आहे. ॥ ३७ ॥
जेव्हा सृष्टी नव्हती, तेव्हा केवळ हे एकच तत्त्व होते सृष्टीचे निरूपण करण्यासाठी त्यालाच सत्त्वरजतमात्मक प्रकृती म्हटले गेले परत त्यालाच ज्ञानप्रधान असल्यामुळे महत्तत्त्व, क्रियाप्रधान असल्याने सूत्रात्मा आणि जीवाची उपाधी असल्याने अहंकार म्हटले गेले वास्तविक इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, इंद्रिये, त्यांचे विषय किंवा त्यांपासून मिळणारे सुख या विविध शक्ती ब्रह्मच आहेत तात्पर्य, जे काही कार्यकारण आहे, ते सर्व, तसेच त्याच्या पलीकडे जे काही आहे, तेसुद्धा ब्रह्मच आहे. (३७)


नात्मा जजान न मरिष्यति नैधतेऽसौ
     न क्षीयते सवनविद् व्यभिचारिणां हि ।
सर्वत्र शश्वद् अनपायि उपलब्धिमात्रं
     प्राणो यथेंद्रियबलेन विकल्पितं सत् ॥ ३८ ॥
आत्म्यां न जन्म स्वरूपोचि ब्रह्म
     ना वाध नी घट ताया नच कांहि कार्य ।
सर्वत्र तो बसुनिया नच की दिसे तो
     ज्ञानस्वरूप गमतो बहु त्या शरीरीं ॥ ३८ ॥

असौ आत्मा न जजान - हा आत्मा जन्मला नाही - न मरिष्यति - मरणार नाही - न एधते - पुष्टही होत नाही - न क्षीयते - वा क्षीणही होत नाही. - हि व्यभिचारिणां - कारण आपले रूप सोडून जन्ममरणादि विकार पावणार्‍या सर्व दृश्यादृश्य पदार्थांना - सवनवित् - जाणणारा काळ - सर्वत्र शश्वत् - सर्व ठिकाणी नित्य - अनपायि - अजरामर - उपलब्धिमात्रं - ज्ञानरूप, सच्चित्‌रूप - तत् सत् एव - ते सत्‌च - बलेन - इंद्रियांच्या बळाने - विकल्पितं - अनेक प्रकारे कल्पिलेले असे भासते - यथा एकः प्राणः - जसा प्राण एकच असून निरनिराळ्या ठिकाणी असतो. ॥ ३८ ॥
आत्मा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे कधी जन्म घेत नाही की कधी मरत नाही कधी त्याची वाढ होत नाही की कधी त्याच्यात घट होत नाही परिवर्तनशील सर्व अवस्था व पदार्थ यांच्या तिन्ही काळांचा तोच साक्षी आहे सर्वांमध्ये नेहमी अविनाशी असा तो आहे जसा प्राण एकच असूनही निरनिराळ्या ठिकाणी असल्याने त्याची अनेक नावे आहेत, त्याचप्रमाणे आत्मा ज्ञानस्वरूप व एक असूनसुद्धा इंद्रियांमुळे अनेक भासतो. (३८)


अण्डेषु पेशिषु तरुषु अवविनिश्चितेषु
     प्राणो हि जीवमुपधावति तत्र तत्र ।
सन्ने यदिंद्रियगणेऽहमि च प्रसुप्ते
     कूटस्थ आशयमृते तदनुस्मृतिर्नः ॥ ३९ ॥
अंडीं नि नाळ धरती अन घाममार्गीं
     जे जन्मती तयि वसे मुळि प्रण एक ।
झोपेत गर्व नसतो परि होय जागा
     राही संरुती हिच असे मुळि प्राणशक्ती ॥ ३९ ॥

अंडेषु पेशिषु तरुषु - अंड्यात, पेशींत, वृक्षात - अविनिश्चितेषु योनिषु - अविनिश्चित् योनीत - तत्र तत्र प्राणः - तेथे तेथे प्राण - जीवं उपधावति हि - जीवानुसरण करून विद्यमान असतोच - यत् इंद्रियगणे सन्ने - जेव्हा इंद्रिये लीन झालेली असतात - अहमि च प्रसुप्ते - अहंवृत्ति निद्रावश झालेली असते - आशयं ऋते कूटस्थ आत्मा - उपाधिशून्य निर्लेप आत्मा - नः तदनुस्मृतिः - आम्हाला त्या आत्म्याचे स्मरण राहात नाही. ॥ ३९ ॥
अंडज, जरायुज, उद्‌भिज्ज व स्वेदज या सर्व जीवशरीरांमध्ये एकच प्राणशक्ती जीवांच्याबरोबर तेथे तेथे जाते सुषुप्तिअवस्थेमध्ये जेव्हा इंद्रिये निश्चेष्ट झालेली असतात, अहंकारसुद्धा निद्रितावस्थेत असतो, तेव्हा लिंगशरीररहित हा कूटस्थ आत्माच असतो त्यामुळेच ‘मी सुखाने झोपलो होतो‘ याचे स्मरण आपल्याला नंतर होते. (३९)


यह्यब्जनाभचरणैषणयोरुभक्त्या
     चेतोमलानि विधमेद्‌ गुणकर्मजानि ।
तस्मिन् विशुद्ध उपलभ्यत आत्मतत्त्वं
     शाक्षाद् यथामलदृशोः सवितृप्रकाशः ॥ ४० ॥
चित्तास वृत्तिजधि हो हरिपादपद्मी
     भक्तीच अग्निपरि लाळितसे मळाला ।
होताचि शुद्ध मन ते मग तत्व भेटे
     जैं डोळसास दिसतो रविचा प्रकाश ॥ ४० ॥

यर्हि - जर - अब्जनाभचरण एषणया - ज्याच्या नाभीमध्ये कमल आहे अशा श्रीविष्णूच्या चरणांची इच्छा करणार्‍या - उरुभक्त्या - एकनिष्ठ भक्तीच्या साह्याने - यर्हि चेतोमलानि - जेव्हा अंतःकरणातील मळ - विधमेत् - दूर होईल तेव्हा - यथा सवितृप्रकाशः विशुद्धे - ज्याप्रमाणे शुद्ध दृष्टीस् सूर्यप्रकाशाची प्रतीती येते - तस्मिन् आत्मतत्त्वं - त्याप्रमाणे त्या शुद्ध अंतःकरणामध्ये आत्मस्वरूप - साक्षात् उपलभ्यते - प्रत्यक्ष प्रगट होते. ॥ ४० ॥
भगवान कमलनाभांच्या चरणकमलांची प्राप्ती करण्याच्या इच्छेने जेव्हा तीव्र भक्ती केली जाते, तेव्हा तीच भक्ती गुण आणि कर्मांनी उत्पन्न झालेले चित्तातील सर्व दोष, जाळून टाकते जेव्हा चित्त शुद्ध होते, तेव्हा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो जसे डोळे निर्दोष असल्यास सूर्याच्या प्रकाशाची प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागते. (४०)


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
कर्मयोगं वदत नः पुरुषो येन संस्कृतः ।
विधूयेहाशु कर्माणि नैष्कर्म्यं विंदते परम् ॥ ४१ ॥
राजा निमिने विचरिले-
( अनुष्टुप्‌ )
कर्मयोग कथा आता ज्या द्वारे सत्वरी अम्हा ।
शुद्ध होवोनि कर्माचे नैष्कर्म्य ज्ञान लाभ हो ॥ ४१ ॥

येन संस्कृतः - ज्या कर्मयोगाने शुद्धचित्त झालेला पुरुष - इह कर्माणि विधूय - यालोकी कर्मे टाकून (म्हणजेच फलाचा त्याज करून) - परं नैष्कर्म्यं - श्रेष्ठ अशा नैष्कर्म्यस्थितीला - आशु विन्दते - चटकन प्राप्त होतो - नः कर्मयोगं वदत - त्या कर्मयोगाचा आम्हाला उपदेश करा, ॥ ४१ ॥
राजा म्हणाला - आता आपण आम्हांला कर्मयोगाचा उपदेश करा ज्यायोगे मनुष्य शुद्ध होऊन त्याला लवकरच कर्मफलत्यागाने मिळणारी श्रेष्ठ नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते. (४१)


एवं प्रश्नं ऋषीन् पूर्वं अपृच्छं पितुरंतिके ।
नाब्रुवन् ब्रह्मणः पुत्राः तत्र कारणमुच्यताम् ॥ ४२ ॥
एकदा हाच मी प्रश्न पुसला पितया पुढे ।
सनकादिक संताना सर्व्ज असुनि तये ॥
न दिले उत्तरो त्याचे काय कारण असे ॥ ४२ ॥

पूर्वं पितुः अंतिके - पूर्वी माझा पिता समक्ष असता - एवं प्रश्नं - या प्रकारचाच प्रश्न - ऋषीन् अपृच्छम् - मी ऋषींना विचारला होता - ब्रह्मणः पुत्राः - पण ब्रह्मदेवाचे सनकादि पुत्र - न अब्रुवन् - त्यासंबंधात कांहीच बोलले नाहींत. - तत्र कारणं उच्यताम् - त्याचे काय कारण असावे बरे ? ॥ ४२ ॥
हाच प्रश्न एकदा मी माझ्या वडिलांजवळ असताना सनकादी ऋषींना विचारला होता परंतु सर्वज्ञ असूनही त्यांनी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही याचेही कारण आपण मला सांगावे. (४२)


श्रीआविहोत्र उवाच -
कर्माकर्म विकर्मेति वेदवादो न लौकिकः ।
वेदस्य चेश्वरात्मत्वात् तत्र मुह्यंति सूरयः ॥ ४३ ॥
योगीश्वर आविर्होत्र म्हणाले-
कर्माकर्म विकर्मो हे वेदवाद न लैकिक ।
वेद हे ईश्वरी रूप तात्पर्या ते कठीणची ॥
अभिप्राय करोनिया चुकती श्रेष्ठ ते मुनी ॥ ४३ ॥

कर्म अकर्म विकर्न - विहित कर्म, निषिद्ध कर व विहित कर्म न करणे - इति वेदवादः - हा विषय वेदवचनांनी कळणारा आहे - लौकिकः न - लौकिक वचनांनी कळण्यासारखा नाही. - वेदस्य च - आणि वेदांना - ईश्वरात्मत्वात् - ईश्वराने आत्मरूप सांगण्यासाठी स्वस्फूर्तीने उत्पन्न केलेले असल्यामुळे - तत्र - त्या कर्म-अकर्म-विकर्म निर्णय संबंधी - सूरयः अपि मुह्यंति - शहाणे लोकही मोह पावतात (स्तंभित होतात). ॥ ४३ ॥
आविर्होत्र म्हणाला - राजन ! कर्म (शास्त्रविहित), अकर्म (निषिद्ध) आणि विकर्म (विहित कर्माचे उल्लंघन) ही तिन्ही कर्मे फक्त वेदांद्वारेच जाणली जातात लौकिक व्यवहारातून यांचे स्वरूप ठरवणे योग्य नाही वेद अपौरूषेयईश्वररूप आहेत, म्हणून त्यांचे तात्पर्य विद्वानांनाही कळत नाही, असे समजून सनकादी ऋषींनी तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. (४३)


परोक्षवादो वेदोऽयं बालानां अनुशासनम् ।
कर्ममोक्षाय कर्माणि विधत्ते ह्यगदं यथा ॥ ४४ ॥
अपरोक्ष असे वेद बाळाला नच बोलले ।
कर्मनिवृत्ति ते कर्म गुळांत औषधी जशी ॥ ४४ ॥

परोक्षवादः - एका प्रकाराने असलेला अर्थ गुप्त राखण्यसाठी वरवर दुसर्‍या प्रकाराने सांगणारा - अयं वेदः - हा वेद - यथा बालानां अगदं तथा - जसे बालकांना मिठाईची लालूच दाखवून कडू औषध दिले जाते त्याप्रमाणे - अनुशासनं यथा स्यात् तथा - अज्ञांना कर्मफलाचे प्रलोभन दाखवून - कर्ममोक्षाय कर्माणि विधाते हि - कर्मबंधन तुटण्यासाठी वेद कर्मच करवितो. ॥ ४४ ॥
या वेदांचा मुख्यार्थ वेगळा आणि तात्पर्य वेगळे असते कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी हे कर्मच करावयास सांगतात जसे, लहान मुलाला मिठाईची लालूच देऊन औषध दिले जाते, त्याप्रमाणे हे अज्ञानी लोकांना फळांचे प्रलोभन दाखवून कर्मांमध्ये प्रवृत्त करतात. (४४)


नाचरेद् यस्तु वेदोक्तं स्वयं अज्ञोऽजितेंद्रियः ।
विकर्मणा हि अधर्मेण मृत्योर्मृत्युमुपैति सः ॥ ४५ ॥
अज्ञानवश ते लोक वेदांचा मार्ग सांदिती ।
अधर्म घडतो तेणे भवाचा फेर तो पडॆ ॥ ४५ ॥

अजितेंद्रियः - इंद्रिये स्वाधीन नसलेला - तु यः स्वयं अज्ञा सन् - पण जो स्वतः अज्ञानी असूनही - वेदोक्तं न आचरेत् - जर वेदांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणार नाही - सः विकर्मणा अधर्मेण - मग तो अधर्माने वागणारा अर्थात् विहित कर्मे न करणारा असा, - मृत्युः मृत्युं उपैति हि - मृत्युमागून मृत्यूलाच प्राप्त होतो. ॥ ४५ ॥
जो अज्ञानी असून इंद्रिये ज्याला वश नाहीत, त्याने जर आपल्या मनानुसार वेदोक्त कर्मांचा त्याग केला, तर त्याने विहित कर्मांचे आचरण व केल्यामुळे त्याच्या हातून अधर्म घडतो व तो जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटत नाही. (४५)


वेदोक्तमेव कुर्वाणो निःसङ्‌गोऽर्पितमीश्वरे ।
नैष्कर्म्यं लभते सिद्धिं रोचनार्था फलश्रुतिः ॥ ४६ ॥
फळाची सोडुनी आशा कॄष्णार्पण्चि कर्म ते ।
करावे लाभते तेणे निवृत्ति ज्ञान सिद्धि ती ॥
व्हावया रुचि कर्माची स्वर्गादी फळ वर्णिले ॥ ४६ ॥

निःसंगः सन् - आणि आसक्तिरहित होत्साता - ईश्वरे अर्पितं (यथा स्यात्) - जसे होईल तसे पण ईश्वरार्पित भावाने - वेदोक्तं एव कुर्वाणः - वेदाज्ञेनुसार कर्मे करणारा - नैष्कर्म्यां सिधिं लभते - नैष्कर्म्यरूप सिद्धि प्राप्त करऊन घेतो. - फलश्रुतिः तु रोचनार्था - वेदातील स्वर्गादिप्राप्तिरूप फलकथन तर गोडी लागावी यासाठी आहे. ॥ ४६ ॥
म्हणून जो वेदोक्त कर्मांचेच अनुष्ठान करून त्यांच्या फळाची इच्छा न धरता ती भगवंतांना समर्पण करतो, त्याला कर्माच्या निवृत्तीपासून प्राप्त होणारी ज्ञानरूपी सिद्धी प्राप्त होते वेदांमध्ये स्वर्गादिरूप फळांचे जे वर्णन आहे, त्याचे तात्पर्य कर्मांची आवड निर्माण करण्यामध्ये आहे. (४६)


य आशु हृदयग्रंथिं निर्जिहीर्षुः परात्मनः ।
विधिनोपचरेद् देवं तंत्रोक्तेन च केशवम् ॥ ४७ ॥
शीघ्रातिशीघ्र तो इच्छी मुक्ती तेणेचि वैदिक ।
तांत्रीक दोन्हि या मार्गे भजावा भगवान्‌ पहा ॥ ४७ ॥

यः परमात्मनः - जो परब्रह्मर्तूपी आपल्या जीवात्म्याचा - हृदयग्रंथिं - अहंकाररूप बंध - आशु निर्जिहीर्षुः - त्वरित तोडू इच्छिणार्‍या पुरुषाने - वैदिकेन तंत्रोक्तेन च विधिना - वैदिक आणि तांत्रिक विधीने - केशवं देवं उपचरेत् - केशव भगवंताची पूजा करावी. ॥ ४७ ॥
ज्याला आपल्या ब्रह्मस्वरूप आत्म्याची हृदयग्रंथी, "मी आणि माझे" ही कल्पना नाहीशी व्हावी असे वाटत असेल, त्याने वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतींनी भगवंतांची आराधना करावी. (४७)


लब्ध्वानुग्रह आचार्यात् तेन संदर्शितागमः ।
महापुरुषमभ्यर्चेन् मूर्त्याभिमतयाऽऽत्मनः ॥ ४८ ॥
मेळवा गुरुसेवेने शिकावा विधि सर्व तो ।
प्रीय मूर्ति तया द्वारा भजावा पुरुषोत्तम ॥ ४८ ॥

आचार्यात् लब्धानुग्रहः - ज्याने आपल्या सद्‌गुरुकडून मंत्र घेतला आहे - तेन च संदर्शितागमः - आणि त्या गुरुने पूजादिप्रकार विधि दाखविला आहे अशा पुरुषाने - आत्मनः अभिमतया मूर्त्या - आपल्याला इष्ट असणार्‍या मूर्तीच्या द्वारे - महापुरुषं अभ्यर्चेत् - परमेश्वराची पूजा करावी. ॥ ४८ ॥
गुरूंच्याकडून दीक्षा मिळाल्यावर त्यांच्याकडून अनुष्ठानविधी शिकावा नंतर आपल्याला भगवंतांची जी मूर्ती प्रिय वाटेल, तिच्या ठिकाणीच भगवंतांची पूजा करावी. (४८)


शुचिः संमुखमासीनः प्राणसंयमनादिभिः ।
पिण्डं विशोध्य संन्यास कृतरक्षोऽर्चयेद् हरिम् ॥ ४९ ॥
शुद्ध संमुख होवोनी प्राणायामादि ते करा ।
मंत्र नी देवता यांनी न्यासे तो हरि पूजिणे ॥ ४९ ॥

प्राणसंयमनादिभिः - प्राणायामादि साधनांनी - पिण्डं संशोध्य - शरीर सुद्ध करून - शुचिः संमुखं आसीनः - शुचिर्भूत पूजकाने ईश्वरसंमुख बसावे - संन्यासकृतरक्षः - न्यास करून स्वतःला सुरक्षित करून घ्यावे - हरिं अर्चयेत् - आणि हरिपूजा करावी. ॥ ४९ ॥
अगोदर स्नान इत्यादी करून शुद्ध होऊन भगवंतांच्या मूर्तीसमोर बसावे प्राणायाम इत्यादींनी शरीर शुद्ध करावे त्यानंतर आसनविधी, न्यास वगैरे करून घेऊन भगवंतांची पूजा करावी. (४९)


अर्चादौ हृदये चापि यथालब्धोपचारकैः ।
द्रव्यक्षित्यात्मलिङ्‌गानि निष्पाद्य प्रोक्ष्य चासनम् ॥ ५० ॥
पाद्यादीन् उपकल्प्याथ सन्निधाप्य समाहितः ।
हृदादिभिः कृतन्यासो मूलमंत्रेण चार्चयेत् ॥ ५१ ॥
सामग्री करणे शुद्ध निर्माल्य त्यजिणे पहा ।
मंत्राने शिंपडा पाणी अघ्याने पात्र स्थापिणे ॥ ५० ॥
एकग्र चित्त योजोनि करावा न्यास तो पुन्हा ।
प्रतिमा अथवा चित्ती भगवान्‌ पूजिणे असा ॥ ५१ ॥

द्रव्यक्षित्यात्मलिंगानि - पूजाद्रव्ये, भूमि आपण स्वतः व मूर्ति यांना - निष्पाद्य - प्रोक्षणाने शुद्ध करून - आसनं च प्रोक्ष्य - आणि आसन प्रोक्षण करून - अथ सन्निधाप्य - ती जवळ ठेऊन - समाहितः सन् - अंतःकरण स्थिर करून - हृदादिभिः कृतन्यासः - हृदयादिकांचा षडंग न्यास करून - मूल मंत्रेण च - व मूळमंत्रांनी - यथालब्धोपचारकैः - यथालब्ध उपचारांनी - अर्चादौ - मूर्तीचे ठिकाणी - हृदये च अपि - व हृदयाचे ठिकाणीही - अर्चयेत् - पूजा करावी. ॥ ५०-५१ ॥
अगोदर पूजासाहित्य, जमीन, स्वतः व देवमूर्ती हे सर्व पूजेसाठी योग्य बनवावे नंतर आसनावर मंत्रोच्चारपूर्वक पाणी शिंपडून, पाद्य, अर्घ्य इत्यादी पात्रे जवळ तयार ठेवावीत तदनंतर एकाग्रचित्त होऊन, हृदयादी न्यास करावे नंतर हृदयात भगवंतांचे ध्यान करून समोरील मूर्तीमध्ये तिची स्थापन करावी आणि देशकालानुसार मिळालेल्या पूजासामग्रीने मूलमंत्र म्हणून तिची पूजा करावी. (५०-५१)


साङ्गोपाङ्गां सपार्षदां तां तां मूर्तिं स्वमंत्रतः ।
पाद्यार्घ्याचमनीयाद्यैः स्नानवासोविभूषणैः ॥ ५२ ॥
गंधमाल्याक्षतस्रग्भिः धूपदीपोपहारकैः ।
साङ्गं संपूज्य विधिवत् स्तवैः स्तुत्वा नमेत् हरिम् ॥ ५३ ॥
सांगोपांग समंत्रे नी सपार्षद पुजा तया ।
अर्घ्य आचमने पाद्ये स्नाने वस्त्रे नि भूषणे ॥ ५२ ॥
अक्षता गंध माळा नी नैवेद्य धूप दीप या ।
विधिने पूजुनी त्यला स्तवुनी नमिणे तया ॥ ५३ ॥

सांगोपांगां - हृदयादिक अंगे व सुदर्शनादिक उपांगे यांसह - सपार्षदां च - व नंदादि पार्षदांसह - तां तां मूर्तिं - त्या त्या रामकृष्णादि मूर्तींची - स्वमंत्रतः - मूलमंत्राने - पाद्यार्ध्याचमनीयाद्यैः - पाद्य, अर्घ्य, आचमनीय, इत्यादि - स्नानवासोविभूषणैः - अभिषेक, वस्त्रे, अलंकार - गंधमाल्यक्षतस्त्रग्भिः - गंध, फुले, अक्षता, माळा - धूपदीपोपहारकैः - धूप, दीप, नैवेद्य इत्यादि उपचारांनी - सांगं विधिवत् संपूज्य - यथासांग यथाविधि पूजा करून - स्तवैः स्तुत्वा च - व स्तोत्रपाठांनी स्तुति करून - हरिं नमेत् - श्रीहरिमूर्तीला नमस्कार करावा. ॥ ५२-५३ ॥
त्या त्या उपास्यदेवतेच्या मूर्तीची हृदयादी अंगे आयुधादी उपांगे आणि पार्षदांसहित त्यांच्या त्यांच्या मंत्रांनी पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्रे, अलंकार, गंध, फुले, अक्षता, माळा, धूप, दीप, नैवेद्य इत्यादींनी यथासांग पूजा करावी नंतर स्तोत्रांनी स्तुती करून भगवंतांना नमस्कार करावा. (५२-५३)


आत्मानं तन्मयं ध्यायन् मूर्तिं संपूजयेत् हरेः ।
शेषामाधाय शिरसा स्वधाम्नि उद्वास्य सत्कृतम् ॥ ५४ ॥
ध्यानही असता तैशी भगवत्‌ मूर्ती ध्यावि ती ।
निर्माल्य शिरि घेवोनि युक्त स्थानास मूर्ति ती ॥
स्थापावी पुढती ऐशी पूजा संपन्न ती करा ॥ ५४ ॥

आत्मानं तन्मयं ध्यायन् - आपण स्वतः हरिस्वरूप आहोत असे ध्यान करीत - हरेः मूर्तिं संपूजयेत् - हरीच्या मूर्तीची पूजा करावी - शिरसा शेषां आधाय - मस्तकावर निर्माल्य धारण करून - सत्कृतम् - पूजिलेल्या - स्वधाम्नि उद्वास्य - क्रमाने हृदयामध्ये व करंड्यामध्ये स्थापना करावी. ॥ ५४ ॥
तेच आपल्यामध्ये आहेत, असे ध्यान करीत भगवंतांच्या मूर्तीचे पूजन करावे निर्माल्य आपल्या मस्तकावर धारण करावे नंतर मोठ्या आदराने भगवंतांना हृदयामध्ये व योग्य ठिकाणी ठेवून पूजेची समाप्ती करावी. (५४)


एवं अग्न्यर्कतोयादौ अतिथौ हृदये च यः ।
यजतीश्वरमात्मानं अचिरान् मुच्यते हि सः ॥ ५५ ॥
अग्नि सूर्य जलो किंवा अतिथी हृदयात त्या ।
आत्म्रूप पुजे जो तो सीघ्रची मुक्त होतसे ॥ ५५ ॥

एवं अग्नि अर्क तोयादौ - अग्नि, सूर्य, जल इत्यादिकांचे ठिकाणी - अतिथौ - अतिथीचे ठिकाणी - हृदये च - आणि हृदयाचे ठिकाणी - यः ईश्वरं आत्मानं यजति - जो ईश परमात्म्याचे पूजन करतो - सः अचिरात् मुच्यते हि - तो लवकरच खात्रीने मुक्त होतो. ॥ ५५ ॥
जो मनुष्य अशा प्रकारे अग्नी, सूर्य, जल, अतिथी आणि आपल्या हृदयामध्ये आत्मरूप श्रीहरींची पूजा करतो, तो लवकरच मुक्त होतो. (५५)


इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां एकादशस्कन्धे त्रितीयोऽध्यायः ॥ ३ ॥
अध्याय तिसरा समाप्त

GO TOP