|
श्रीमद् भागवत पुराण वेदस्तुती - वेदस्तुती - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीपरीक्षिदुवाच -
( अनुष्टुप् ) ब्रह्मन् ब्रह्मण्यनिर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तयः । कथं चरन्ति श्रुतयः साक्षात् सदसतः परे ॥ १ ॥
परीक्षिताने विचारले - ( अनुष्टुप् ) कार्य गुण परा ब्रह्म श्रुति तो वर्णिती तया । निर्गुणा वर्णिती कैसे जेथ वाणी न पोचते ॥ १ ॥
ब्रह्मन् - हे शुकाचार्य - गुणवृत्तयः श्रुतयः - गुणासंबंधानेच अर्थबोधक सामर्थ्य आहे ज्यांचे असे वेद - सदसतः परे निर्गुणे अनिर्देश्ये ब्रह्मणि - कारण व कार्य यांच्या पलीकडे असणार्या, निर्गुण व अमुक म्हणून दाखविता न येणार्या अशा ब्रह्माच्या ठिकाणी - साक्षात् कथं चरन्ति - प्रत्यक्ष कसा अर्थबोध करितात. ॥१॥
परीक्षिताने विचारले- भगवन ! ब्रह्म हे कार्य आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडचे आहे. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण त्यात नाहीतच. वाणीने किंवा मनानेसुद्धा ते सांगता येत नाही. दुसर्या बाजूला, सर्व श्रुतींचा विषय तर तीन गुण हाच आहे. अशा स्थितीत श्रुती निर्गुण ब्रह्माचे प्रतिपादन कसे काय करतात ? (१)
श्रीशुक उवाच -
बुद्धीन्द्रियमनःप्राणान् जनानां असृजत् प्रभुः । मात्रार्थं च भवार्थं च आत्मनेऽकल्पनाय च ॥ २ ॥
श्रीशुकदेव सांगतात - इंद्रीय मन नी बुद्धी जीवांना अर्पितो प्रभु । स्विकार करिता श्रद्धे मोक्षादि मिळती जिवा ॥ २ ॥
प्रभुः - परमेश्वर - जनानां मात्रार्थं - लोकांच्या विषयोपभोगासाठी - भवार्थं च - आणि कर्मासाठी - आत्मने च - व आत्म्यासाठी - अकल्पनाय च - आणि कल्पनेच्या निरासासाठी - बुद्धीन्द्रियमनः प्राणान् असृजत् - बुद्धि, इंद्रिये, मन, प्राण हे उत्पन्न करिता झाला. ॥२॥
श्रीशुक म्हणतात- भगवंतांनी जीवांना अर्थ, धर्म, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी त्यांच्या ठिकाणी बुद्धी, इंद्रिये, मन आणि प्राणांची निर्मिती केली.(२)
सैषा ह्युपनिषद् ब्राह्मी पूर्वेशां पूर्वजैर्धृता ।
श्र्रद्धया धारयेद् यस्तां क्षेमं गच्छेदकिञ्चनः ॥ ३ ॥
श्रुतिचे स्वरुपो ऐसे सनकादिकि धारिले । श्रद्धेने करिता कर्म तुटती सर्व बंध ते ॥ ३ ॥
स एषा - ती ही - पूर्वेषां पूर्वजैः धृता - वाडवडिलांच्याहि पूर्वजांनी धारण केलेली - ब्राह्मी उपनिषत् हि - ब्रह्मविचाराने भरलेले उपनिषत आहे - यः अकिंचनः - जो सर्वसंग टाकलेला पुरुष - श्रद्धया तां ध्यायेत् - आस्तिक्यबुद्धीने तिला धारण करील - (सः) क्षेमं गच्छेत् - तो कल्याणप्रत जाईल. ॥३॥
ब्रह्माचे प्रतिपादन करणार्या उपनिषदांचे हेच ज्ञान पूर्वजांचेसुद्धा पूर्वज असलेल्या सनकादी ऋषींनी स्वीकारले. जो कोणी श्रद्धापूर्वक यांचे श्रवण-मनन करतो, तो सर्व उपाधींपासून मुक्त होऊन परमकल्याणस्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो. (३)
अत्र ते वर्णयिष्यामि गाथां नारायणान्विताम् ।
नारदस्य च संवादं ऋषेर्नारायणस्य च ॥ ४ ॥
अन्वया सांगतो गाथा हरि नारायणी अशी । संवाद नारदाचा नी श्रेष्ठ नारायणात जो ॥ ४ ॥
अत्र - याविषयी - नारदस्य च नारायणस्य ऋषेः च संवादं - नारद व नारायण ऋषि यांचा संवाद असा - नारायणान्वितां गाथां - नारायणाशी संबद्ध असलेला इतिहास - ते वर्णयिष्यामि - तुला सांगतो. ॥४॥
याविषयी मी तुला नारायणांशी संबंधित एक कथा ऐकवितो. ती कथा म्हणजे नारद आणि नारायण ऋषींचा संवाद होय. (४)
एकदा नारदो लोकान् पर्यटन् भगवत्प्रियः ।
सनातनमृषिं द्रष्टुं ययौ नारायणाश्रमम् ॥ ५ ॥
देवर्षि एकदा गेले फिरत बद्रिकाश्रमी । दर्शना भगवंताच्या, नारायण ऋषेश्वरां ॥ ५ ॥
एकदा भगवत्प्रियः नारदः - एकदा भगवत्प्रिय नारदऋषि - लोकान् पर्यटन् - त्रैलोक्यात फिरत फिरत - सनातनं ऋषिं द्रष्टुं - अति प्राचीन अशा नारायण ऋषीचे दर्शन घेण्याकरिता - नारायणाश्रमं ययौ - नारायण ऋषीच्या आश्रमी गेला. ॥५॥
भगवंतांचे भक्त नारद एकदा निरनिराळ्या लोकांमध्ये फिरत फिरत सनातन ऋषी भगवान नारायणांचे दर्शन घेण्यासाठी बद्रिकाश्रमात गेले. (५)
यो वै भारतवर्षेऽस्मिन् क्शेमाय स्वस्तये नृणाम् ।
धर्मज्ञानशमोपेतं आकल्पादास्थितस्तपः ॥ ६ ॥
कल्पारंभाहि पासोनी लोक कल्याण हेतुने । संयमे धर्म नी ज्ञाने तप ते नित्य साधिती ॥ ६ ॥
यो वै अस्मिन् भारतवर्षे - जो खरोखर ह्या भरतखंडामध्ये - नृणां क्षेमाय स्वस्तये (च) - मनुष्यांच्या स्वास्थ्याकरिता व कल्याणाकरिता - धर्मज्ञानशमोपेतं तपः - धर्म, ज्ञान व शांति ह्यांनी युक्त अशी तपश्चर्या - आकल्पात् आस्थितः - कल्पाच्या आरंभापासून करीत आहे. ॥६॥
मनुष्यमात्राचे लौकिक कल्याण आणि त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी, म्हणून भगवान नारायण या भारतवर्षामध्ये या कल्पाच्या सुरुवातीपासूनच धर्म, ज्ञान आणि संयम धारण करून तपश्चर्या करीत आहेत. (६)
तत्रोपविष्टं ऋषिभिः कलापग्रामवासिभिः ।
परीतं प्रणतोऽपृच्छद् इदमेव कुरूद्वह ॥ ७ ॥
कलापग्रामिच्या सिद्ध-मुनिंच्या समुदायि त्या । नारदे बसता त्यांना प्रश्न हाचि विचारिला ॥ ७ ॥
कुरूद्वह - हे कौरवश्रेष्ठा परीक्षित राजा - तत्र उपविष्टं - तेथे बसलेल्या - कलापग्रामवासिभिः ऋषिभिः परीतं (तं) - कलाप गावी रहाणार्या ऋषींनी वेष्टिलेल्या त्या ऋषीला - प्रणतः इदम् एव अपृच्छत् - नमस्कार केलेला हेच विचारिता झाला. ॥७॥
परीक्षिता ! एके दिवशी ते कलापग्रामवासी सिद्ध ऋषींच्याबरोबर बसले होते. त्यावेळी नारदांनी त्यांना प्रणाम करून हाच प्रश्न विचारला होता. (७)
तस्मै ह्यवोचद्भगवान् ऋषीणां श्रृणतामिदम् ।
यो ब्रह्मवादः पूर्वेषां जनलोकनिवासिनाम् ॥ ८ ॥
नारायण तदा त्यांना उत्तरा बोलले जसे । पूर्वीही जनलोकांच्या लोकांना बोलले तसे ॥ ८ ॥
भगवान् - नारायण ऋषि - ऋषीणां शृण्वतां - ऋषि श्रवण करीत असता - तस्मै इदं हि अवोचत् - त्या नारदाला हे खरोखर सांगता झाला - यः - जो - जनलोकनिवासिनां पूर्वेषां - जनलोकात रहाणार्या पूर्वीच्या सत्पुरुषांध्ये झालेला - ब्रह्मवादः (आसीत्) - ब्रह्मसंबंधी विचार होता. ॥८॥
भगवान नारायणांनी सर्व ऋषी ऐकत असता जनलोकांमध्ये राहाणार्या पूर्वीच्या लोकांचा जो ब्रह्मविचार झाला होता, तो नारदांना सांगितला. (८)
श्रीभगवानुवाच -
स्वायम्भुव ब्रह्मसत्रं जनलोकेऽभवत् पुरा । तत्रस्थानां मानसानां मुनीनां ऊर्ध्वरेतसाम् ॥ ९ ॥
भगवान् नारायण म्हणाले - एकदा जनलोकात सनकादिक संत जे । ब्रह्म्याचे मानसीपुत्र ब्रह्मसत्रात श्रेष्ठ त्या ॥ ९ ॥
स्वायंभुव - हे नारदा - पुरा - पूर्वी - जनलोके - जनलोकामध्ये - तत्रस्थानां मानसानां ऊर्ध्वरेतसां मुनीनां - तेथे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अशा वैराग्यशील सनत्कुमार ऋषींचे - ब्रह्मसत्रं - ब्रह्मसत्र - अभवत् - चालू होते. ॥९॥
भगवान नारायण म्हणाले- नारदमुने ! पूर्वी एकदा जनलोकांमध्ये राहाणारे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नैष्ठिक ब्रह्मचारी सनक, सनंदन, सनातन इत्यादी ऋषींचे ब्रह्मसत्र (ब्रह्मविषयक चर्चासत्र) झाले होते. (९)
श्वेतद्वीपं गतवति त्वयि द्रष्टुं तदीश्वरम् ।
ब्रह्मवादः सुसंवृत्तः श्रुतयो यत्र शेरते । तत्र हायमभूत्प्रश्नस्त्वं मां यमनुपृच्छसि ॥ १० ॥ तुल्यश्रुततपःशीलाः तुल्यस्वीयारिमध्यमाः । अपि चक्रुः प्रवचनं एकं शुश्रूषवोऽपरे ॥ ११ ॥
श्वेतद्वीपी तदा तुम्ही आलेत मम दर्शना । चर्चा झाली तिथे छान नेति ज्यां श्रुति बोलती । तिथे प्रश्न असा झाला तुम्ही जो पुसला मला ॥ १० ॥ समान बंधु हे चारी शीले ज्ञाने तपे तसे । वक्ता सनंदनो झाले तिघे श्रोतेचि जाहले ॥ ११ ॥
तदीश्वरं द्रष्टुं - त्या श्वेद्वीपाच्या अधिपतीचे दर्शन घेण्याकरिता - त्वयि श्वेतद्वीपं गतवति - तू श्वेतद्वीपाला गेला असता - ब्रह्मवादः सुसंवृत्तः - ब्रह्मविषयक विचार उत्तम झाला - यत्र श्रुतयः शेरते - ज्या विचारात श्रुति आलेल्या आहेत - तत्र - त्या विचारात - त्वं मां यं अनुपृच्छसि (सः) ह अयं प्रश्नः अभूत् - तू मला जो विचारित आहेस तोच हा प्रश्न उत्पन्न झाला होता - तुल्यश्रुततपःशीलाः - समान आहे शास्त्रश्रवण, तपश्चर्या व शील ज्यांचे असे - तुल्यस्वीयारिमध्यमाः अपि - सारखेच आहेत मित्र, शत्रु व तटस्थ ज्यांना असेही - एकं प्रवचनं चक्रुः - आपल्यापैकी एकाला वक्ता करिते झाले - अपरे शुश्रूषवः (बभूवुः) - इतर श्रोते झाले. ॥१०-११॥
त्यावेळी तू माझ्या श्वेताद्वीपाधिपती अनिरुद्धांचे दर्शन घेण्यासाठी श्वेताद्वीपाकडे गेला होतास. त्यावेळी तेथे ज्या ब्रह्माच्या विषयात श्रुती मौन धारण करतात, त्यासंबंधी अतिसुंदर चर्चा झाली होती. जो तू मला आता विचारलास, तोच प्रश्न त्यावेळी तेथे उपस्थित केला गेला होता. (१०) सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार हे चारही भाऊ शास्त्रीय ज्ञान, तपश्चर्या आणि स्वभाव याबाबतीत समान आहेत. त्यांना शत्रू, मित्र आणि उदासीन एकसारखेच वाटतात. त्यांनी आपल्यापैकी सनंदन यांना वक्ता म्हणून नियुक्त केले आणि अन्य भाऊ श्रोते झाले. (११)
श्रीसनन्दन उवाच -
स्वसृष्टमिदमापीय शयानं सह शक्तिभिः । तदन्ते बोधयां चक्रुः तल्लिङ्गैः श्रुतयः परम् ॥ १२ ॥ यथा शयानं सम्राजं वन्दिनस्तत्पराक्रमैः । प्रत्यूषेऽभेत्य सुश्लोकैः बोधयन्त्यनुजीविनः ॥ १३ ॥
सनंद म्हणाले - गाती भूपाळि वंदी ते नृपाला उठवावया । नृपाचे गाउनी येश प्रभात समयास त्या ॥ १२ ॥ तसेचि श्रुतिही गाती उठाया लीन रूप ते । प्रलयांती असे गाती श्रुति त्या उठवावया ॥ १३ ॥
स्वदृष्टं इदं आपीय - आपण निर्मिलेल्या ह्या जगाला आपल्या स्वरूपी तल्लीन करून - शक्तिभिः सह शयानं - शक्तीसह निजलेल्या - परं - परमेश्वराला - तदन्त - त्या निद्रेच्या शेवटी - श्रुतयः - वेद - तल्लिङगैः बोधयांचक्रुः - त्याचे वर्णन करणार्या वाक्यांनी जागे करिते झाले. ॥१२॥ यथा अनुजीविनः वन्दिनः - ज्याप्रमाणे त्यावरच अवलंबून रहाणारे स्तुतिपाठक - प्रत्यूषे - सकाळी - शयानं सम्राजं अभ्येत्य - निजलेल्या सार्वभौम राजाजवळ येऊन - सुश्लोकैः तत्पराक्रमैः - चांगली आहे कीर्ति ज्यांत अशा त्या राजांच्या पराक्रमांच्या वर्णनांनी - (तं) बोधयन्ति - त्याला जागे करितात. ॥१३॥
सनंदन म्हणाले- पहाटॆ झोप घेत असलेल्या सम्राटाला जागे करण्यासाठी जसे त्याचे नोकर भाट त्याच्याजवळ येतात आणि त्याचे पराक्रम व सुयशाचे गायन करून त्याला जागे करतात, त्याचप्रमाणे जेव्हा परमात्मा आपणच निर्माण केलेल्या संपूर्ण जगाला आपल्यामध्ये लीन करून आपल्या शक्तींसहित झोपी जातो, तेव्हा प्रलयाच्या शेवटी श्रुती, त्यांचे प्रतिपादन करणार्या वचनांनी त्यांना जागे करतात. (१२-१३)
श्रीश्रुतय ऊचुः -
( अवितथ गाथा - पुढील, म्हणजे १४ ते ४१ या श्लोकांना वेदस्तुति म्हणतात ) जय जय जह्यजामजित दोषगृभीतगुणां त्वमसि यदात्मना समवरुद्धसमस्तभगः । अगजगदोकसामखिलशक्त्यवबोधक ते क्वचिदजयाऽऽत्मना च चरतोऽनुचरेन्निगमः ॥ १४ ॥
श्रुति म्हणतात - ( नर्कुटक ) जय जय हो तुझा रचिसि मिथ्यचि मोह हरी । तुजविण जीव ते न तरती भव सागरि या ॥ जरि असमर्थ् हो अम्हि तुझे गुण वर्णियण्या । सगुणरूपा स्वये धारिशि तै क्वचिदो सरलो ॥ १४ ॥
अजित - हे अजिंक्य परमेश्वरा - जय जय - तू आपला विजय नित्य प्रकट कर - अखिलशक्त्यवबोधक - हे सकलशक्तिप्रकाशका - अगजगदोकसां - स्थावर-जंगम शरीरधारक जीवांच्या - दोषगृभीतगुणां अजां जहि - दुष्टपणाकरिता गुणस्वीकार करणार्या मायेला नष्ट कर - यत् - कारण - त्वं - तू - आत्मना समवरुद्धसमस्तभगः असि - स्वस्वरूपाने मिळविली आहेत सर्व ऐश्वर्ये ज्याने असा आहेस - निगमः - वेद - क्वचित् - सृष्टीच्या उत्पत्तीसारख्या एखाद्या वेळी - अजया चरतः - मायेसह व्यवहार करणार्या - (नित्यं) च आत्मनः (चरतः) - आणि एरवी नित्य व स्वस्वरूपाने संचार करणार्या - ते - तुझे - अनुचरेत् - वर्णन करू शकतो. ॥१४॥
श्रुती म्हणतात- ज्यांना कोणी जिंकू शकत नाही, अशा हे प्रभो! आपला जयजयकार असो! जयजयकार असो ! आपण स्वभावत:च सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहात. म्हणून चराचर जीवांच्या आनंदामय अशा मूळ स्वरूपाला आच्छादित करून त्यांना बंधनात अडकविणार्या त्रिगुणांना धारण करणार्या मायेचा नाश करा. प्राण्यांमधील ज्ञानादी सर्व शक्तींना जागृत करणारे आपणच आहात. कधी आपण मायेच्या द्वारा जगाची उत्पत्ती करून सगुण रूप धारण करता तर कधी मूळ सच्चिदानंदस्वरूपात राहाता. आम्ही वेद आपले असेच वर्णन करतो. (१४)
बृहदुपलब्धमेतदवयन्त्यवशेषतया
यत उदयास्तमयौ विकृतेर्मृदि वाविकृतात् । अत ऋषयो दधुस्त्वयि मनोवचनाचरितं कथमयथा भवन्ति भुवि दत्तपदानि नृणाम् ॥ १५ ॥
जगतचि ब्रह्म माणुनि अम्ही स्तवितो तुजसी । जगात तुझ्या मुळे प्रतित हो न विकार तुला ॥ शतमख रूप ते स्तवितसो रुप तेहि तुझे । सकल जगी तुझेचि रुप हे तव नामचि ते ॥ १५ ॥
अवशेषतया - प्रलयकाळीही अवशिष्ट रहाणारे असल्यामुळे - एतत् उपलब्धं - हे अनुभवाद येणारे जग - बृहत् अवयन्ति - ब्रह्मच असे जाणतात - अविकृतात् यतः - विकाररहित अशा ज्या ब्रह्मापासून - विकृतेः मृदि वा - विकारस्वरूपी घटापासून मृत्तिकेच्या ठायी जशी - (तथा जगतः) उदयास्तमयौ (भवतः) - तशा जगाची उत्पत्ति व नाश ही होतात - अतः - म्हणून - ऋषयः - ऋषि - मनोवचनाचरितं - आपल्या मनाने व वाणीने केलेले कार्य - त्वयि दधुः - तुझ्याकडे लाविते झाले - नृणां भुवि दत्तपदानि - मनुष्यांची पृथ्वीवर ठेविलेली पाऊले - अयथा कथं भवन्ति - तशी ठेविलेली नव्हेत अशी कशी होतील ? ॥१५॥
ज्याप्रमाणे घटादी कार्ये मातीरूप कारणातून उत्पन्न होऊन त्यातच लय पावतात, त्याप्रमाणे ज्या आपल्यामध्येच कोणताही बदल न घडता, हे सारे इंद्रियांना कळणारे विश्व ज्या आपल्यापासून उत्पन्न होऊन आपल्यातच विलीन होते आणि विश्व नसते, तेव्हाही केवळ आपणच शिल्लक असता, म्हणून वेदमंत्र आणि मंत्रद्रष्टे ऋषी हे सर्व विश्व ब्रह्मच मानतात. तसेच मनाचे चिंतन असो की वाणीचे उच्चरण तेही आपल्यासंबंधीच आहे, असे त्यांना वाटते. (कारण आपल्याशिवाय अन्य वस्तूच नाही ना ! ) जसे, माणसांनी कोठेही पाय ठेवला तरी तो पृथ्वीवर ठेवला, असेच होते. (मग तो लाकडावर ठेवो, की दगडावर. कारण हे सर्व पदार्थ पृथ्वीस्वरूपच आहेत.) (१५)
इति तव सूरयस्त्र्यधिपतेऽखिललोकमल
क्षपणकथामृताब्धिमवगाह्य तपांसि जहुः । किमुत पुनः स्वधामविधुताशयकालगुणाः परम भजन्ति ये पदमजस्रसुखानुभवम् ॥ १६ ॥
गुणत्रय विश्व हे नटखटा तूचि नाचिविशी । म्हणवुनि संत ध्याती तुझिये कथनामृत ते ॥ मिटवुनि राग द्वेष गुण जो रुपि मग्नचि की । सकल मिटेचि ताप नि सुखी नित ते जगती ॥ १६ ॥
स्त्र्यधिपते - हे त्रैलोक्याधिपते - सूरयः - विवेकी पुरुष - इति - याप्रमाणे - तव - तुझ्या - अखिललोकमलक्षपणकथामृताब्धिं अवगाह्य - सर्व लोकांचे पातक नष्ट करणार्या कथारूपी अमृतसागरात बुडी मारून - तपांसि जहुः - दुःखांचा त्याग करिते झाले - उत - मग - स्वधामविधुताशयकालगुणाः ये - आत्मस्वरूपाच्या तेजाने धुऊन टाकिले आहेत हृदयाचे कामक्रोधादि विकार व कालाने केलेल्या बाल्यादि अवस्था ज्यांनी असे जे - अजस्रसुखानुभवं पदं भजन्ति - पुष्कळ सुखाचा अनुभव ज्यात आहे अशा श्रेष्ठ पदाला सेवितात - (इति) किम्- हे काय सांगावयास पाहिजे ? ॥१६॥
म्हणूनच हे त्रिगुणात्मकमायाधिपते ! विवेकी लोक, सर्व लोकांचे सर्व पाप नाहीसे करणार्या तुमच्या कथामृतसागरात डुंबत राहून सर्व प्रकारचे पाप-ताप नाहीसे करतात. तर मग हे पुरुषोत्तमा ! ज्यांनी आत्मज्ञानाने अंत:करणातील विकार आणि काळामुळे उत्पन्न होणारे वार्धक्यादी दोष दूर केले आहेत आणि त्यामुळे जे अखंड आनंदस्वरूप अशा आपल्या परमपदाला प्राप्त झाले आहेत, त्यांचे पाप-ताप नाहीसे होतील, यात काय शंका ! (१६)
दृतय इव श्वसन्त्यसुभृतो यदि तेऽनुविधा
महदहमादयोऽण्डमसृजन् यदनुग्रहतः पुरुषविधोऽन्वयोऽत्र चरमोऽन्नमयादिषु यः सदसतः परं त्वमथ यदेष्ववशेषमृतम् ॥ १७ ॥
न भजति ते वृथा श्वसति जै श्वसि धौकनिची । मिळवुनि तत्व सृष्टि रचिशी अन मोह घडे ॥ नि तव कृपेचि ते कळते कि परा तयि तू । नच कळते उरे तव रुपो परि सत्यचि ते ॥ १७ ॥
असुभृतः - प्राणधारी मनुष्य - यदि ते अनुविधाः (स्युः) - जर तुझी भक्ति करणारे असतील - (तर्हि ते) श्वसन्ति - तरच ते जिवंत होत - (इतरथा) दृतयः इव - एरवी ते भात्याप्रमाणे होत - अथ - त्याचप्रमाणे - यदनुग्रहतः - ज्या परमेश्वराच्या अनुग्रहामुळे - महदहमादयः अण्डम् असृजन् - महत्तत्व, अहंकार इत्यादि तत्त्वे ब्रह्माण्डाला उत्पन्न करिती झाली - यः पुरुषविधः अत्र अन्वयः (सन्) - जो अंतर्यामि रूपाने या अन्नमयादि कोशात प्रविष्ट असून - अन्नमयादिषु चरमः - अन्नमयादि पांच कोशांमध्ये शेवटचा आहे - यत् सदसतः परं (सत्) - जे कार्यकारणांहून पलीकडे असून - एषु अवशेषम् - या सर्वांच्या मागे अवशिष्ट रहाणारे - अथ ऋतं - आणि त्रिकालाबाधित असे आहे - (तत्) त्वम् (असि) - ते तू आहेस. ॥१७॥
हे भगवन ! मनुष्यप्राणी जर तुमची सेवा करतील, तरच त्यांचे जीवन सफल होय. नाहीतर त्यांचे श्वासोच्छवास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखेच होत. आपल्या अनुग्रहामुळेच महतत्त्व, अहंकार इत्यादी जड तत्त्वांनी ब्रह्मांड रचले. अन्नमयादी पाच कोशात त्या त्या आकाराने (परंतु त्यांच्याशी लिप्त न होता ) राहून आपण त्यांना चैतन्यमय केले. य पाच कोशांचा आधार असलेले ब्रह्मही आपणच आहा. किंबहुना कार्यकारणात्मक विश्वाच्या ही पलीकडे असणारे व त्याच्या नाशानंतरही शिल्लक राहाणारे साक्षिभुत सत्य तत्त्व आपणच आहात. (१७)
उदरमुपासते य ऋषिवर्त्मसु कूर्पदृशः
परिसरपद्धतिं हृदयमारुणयो दहरम् । तत उदगादनन्त तव धाम शिरः परमं पुनरिह यत्समेत्य न पतन्ति कृतान्तमुखे ॥ १८ ॥
मणििपुरा चक्रि अग्निरुपि ते ऋषि ध्याति तुला । अरुण जनो हृदी स्मरति ब्रह्म पाहती रुपा ॥ हृदय सुषुम्नि ब्रह्मकमला जइ मार्ग मिळे । पुढती वरिच ज्योति स्थळि जै नच जन्म पुन्हा ॥ १८ ॥
अनंत - हे अविनाशी ईश्वरा - ये - जे - ऋषिवर्त्मसु कूर्पदृशः - ऋषींच्या मार्गांमध्ये अज्ञानरूप खडे आहेत डोळ्यात ज्यांच्या असे लोक - उदरं उपासते - उदर हेच ब्रह्म असे समजून त्याची उपासना करितात - आरुणयः - आरुणिमार्गीय लोक - परिसरपद्धतिं दहरं हृदयं (उपासते) - सभोवार पसरणार्या नाड्यांचे मूलस्थान अशा हृदयातील आकाशाची उपासना करितात - ततः - त्या हृदयापासून - तव परमं धाम शिरः उदगात् - तुझे श्रेष्ठ तेज मस्तकापर्यंत गेले आहे - यत् समेत्य - जे मिळविले असता - पुनः इह कृतान्तमुखे न पतन्ति - पुनः या संसाररूप काळाच्या तोंडात पडत नाहीत. ॥१८॥
ऋषींनी आपल्या प्राप्तीचे जे मार्ग सांगितले आहेत, त्यांपैकी मणिपूर चक्रात असणार्या ब्रह्माची उपासना स्थूलदृष्टीचे साधक करतात. जेथून सर्व नाड्या शरीरभर पसरल्या आहेत, त्या हृदयात दहर ब्रह्माची उपासना ’आरूणी’ साधक करतात. हे अनन्ता ! त्या हृदयातून ’सुषुम्ना’ नावाची जी एक नाडी, तुमच्या साक्षात्काराचे श्रेष्ठ स्थान असलेल्या ब्रह्मरंधात गेली आहे, तेथे काही साधक तुमची उपासना करतात. या साधकांना तेथे तुमचा साक्षात्कार झाल्यानंतर पुन्हा या संसारात यावे लागत नाही. (१८)
स्वकृतविचित्रयोनिषु विशन्निव हेतुतया
तरतमतश्चकास्स्यनलवत् स्वकृतानुकृतिः । अथ वितथास्वमूष्ववितथां तव धाम समं विरजधियोऽनुयन्त्यभिविपण्यव एकरसम् ॥ १९ ॥
स्वकृत विचित्र योनि मधुनी प्रगटोनि रुपे । दिसशि जणू शिखा भडकती लघु थोर यज्ञीं ॥ न फसति संत हाट भरता मनहंसजनो । सकल रुपी तुझ्या बघति ते समभाव तसे ॥ १९ ॥
स्वकृतानुकृतिः - आपणच निर्मिलेल्या जगाचे अनुकरण करणारा - स्वकृतविचित्रयोनिषु - आपण उत्पन्न केलेल्या अनेक योनींमध्ये - हेतुतया विशन् इव - उपादानकारणरूपाने जणू प्रवेश करणारा - अनलवत् तरतमतः चकास्सि - अग्नीप्रमाणे न्यूनाधिक भावाने प्रकाशितोस - अथ - पण - अभिविपण्यवः विरजधियः - सर्व प्रकारे सोडिले आहे व्यवहारकार्य ज्यांनी असे निर्मळ बुद्धीचे सत्पुरुष - वितथासु अमूषु - मिथ्याभूत ह्या योनीमध्ये - अवितथं - सत्यरूप - एकरसं - एकच आहे रूप ज्याचे अशा - समं तव धाम - भेद नसलेल्या त्या तुझ्या स्थानाला - अन्वयन्ति - जाणतात. ॥१९॥
स्वत:च निर्माण केलेल्या निरनिराळ्या योनींमध्ये उपादान कारणरूपाने आपणच असून जीवरूपाने जणू प्रवेश केला आहे. अग्नी जसा लहान-मोठ्या लाकडामुळे लहान-मोठा वाटतो, त्याप्रमाणे त्या त्या योनीत राहाण्यामुळे आपण लहान-मोठे भासता. म्हणूनच निर्मल अंत:करण असलेले निष्काम भक्त, मिथ्या असणार्या या सर्व योनींत सत्य, सर्वत्र समान, एकरस असे तुमचे स्वरूपच असल्याचा अनुभव घेतात. (१९)
स्वकृतपुरेष्वमीष्वबहिरन्तरसंवरणं
तव पुरुषं वदन्त्यखिलशक्तिधृतोंऽशकृतम् । इति नृगतिं विविच्य कवयो निगमावपनं भवत उपासतेऽङ्घ्रिमभवम्भुवि विश्वसिताः ॥ २० ॥
धरि तनु जीव आवरण ते न लिपे तयि ते । ऋषि वदती कि शक्तिरुप ते तव ना जरि तू ॥ मुनिपद ध्याति जीव स्वरुपा मनि जाणुनि तुझ्या । सकलचि वेदकर्म तुजशी मिळती सुटण्या ॥ २० ॥
अमीषु स्वकृतपुरेषु - आपल्या पूर्वकर्माने धारण केलेल्या ह्या शरीरामध्ये - अबहिरन्तरसवरणं - बाहेरून व आतून नाही आहे आवरण ज्याला अशा - पुरुषं - पुरुषाला - अखिलशक्तिधृतः तव अंशकृतं वदन्ति - सर्व शक्तिंनी धारण करणार्या तुझ्या अंशापासून निर्मिलेला म्हणतात - इति - याप्रमाणे - नृगतिं विविच्य - जीवाच्या गतीचा शोध करून - विश्वसिताः कवयः - विश्वास उत्पन्न झालेले ज्ञानी - निगमावपनं अभवं भवतः अंघ्रिं - वैदिक कर्मांचे क्षेत्र अशा संसारातून मुक्त करणार्या तुझ्या चरणाला - भुवि - ह्या लोकी - उपासते - सेवितात. ॥२०॥
स्वत:च्या कर्माने निर्माण केलेल्या या शरीरांत राहाणारा कार्य-कारणरहित असा जो जीवात्मा तो सर्वशक्तीसंपन्न अशा आपलेच स्वरूप आहे. ज्ञानी लोक जीवाच्या या वास्तविक स्वरूपाचा विचार करून या भूलोकात सर्व वेदोक्त कर्मांच्या समर्पणाचे स्थान व मोक्षस्वरूप अशा आपल्या चरणांची पूर्ण श्रद्धेने उपासना करतात. (कारण या उपासनेनेच जीवाला ’मीच ब्रह्म आहे’, हा साक्षात्कार होतो.) (२०)
दुरवगमात्मतत्त्वनिगमाय तवात्ततनोः
चरितमहामृताब्धिपरिवर्तपरिश्रमणाः । न परिलषन्ति केचिदपवर्गमपीश्वर ते चरणसरोजहंसकुलसङ्गविसृष्टगृहाः ॥ २१ ॥
नच परमात्म तत्त्व सुलभो कळण्या भगवन् । अवतरशी अम्हा समजण्या नि लिला करिशी ॥ पिउनी कथासुधा मन नवजे जरि मोक्ष उभा । नि परमहंस त्यागिति तसे गृह आश्रम तो ॥ २१ ॥
ईश्वर - हे परमेश्वरा - दुरवगमात्मतत्त्वनिगमाय - जाणण्यास कठीण अशा ब्रह्मतत्त्वाला दाखविण्यासाठी - आत्ततनोः तव - शरीर धारण करणार्या तुझ्या - चरितमहामृताब्धिपरिवर्तपरिश्रमणाः - कथारुपी मोठ्या अमृताच्या समुद्रात पोहल्यामुळे निघून गेले आहेत संसाराचे श्रम ज्यांचे असे - केचित् - कित्येक जण - ते चरणसरोजहंसकुलसंगविसृष्टगृहाः - तुझ्या चरणकमलाच्या ठिकाणी हंसाप्रमाणे रममाण होणार्या साधुसंघाची संगति घडल्यामुळे त्यागिले आहे घर ज्यांनी असे - अपवर्गम् अपि न परिलषन्ति - मोक्षालाहि इच्छीत नाहीत ॥२१॥
हे परमेश्वरा ! कळण्यास अत्यंत कठीण अशा आत्मतत्त्वाचे ज्ञान करून देण्यासाठी अवतार घेणार्या आपल्या चरित्ररूप अमृताच्या महासागरात पोहून जे आपले त्रिविध ताप नाहीसे करतात, त्यांना मोक्षाचीही इच्छा नसते. इतकेच काय, पण काहीजण तर, आपल्या चरणकमलांचे हंस बनून सेवा करणार्या भक्तांच्या सहवासात राहाण्यासाठी आपल्या घरादाराचाही त्याग करतात. (२१)
त्वदनुपथं कुलायमिदमात्मसुहृत्प्रियवत्
चरति तथोन्मुखे त्वयि हिते प्रिय आत्मनि च । न बत रमन्त्यहो असदुपासनयात्महनो यदनुशया भ्रमन्त्युरुभये कुशरीरभृतः ॥ २२ ॥
तव पथ साधना तनुचि दे प्रियप्राण तया । असशि, न ज्या फळ अवगती मिळेचि तया ॥ फळ निच कष्टदायिच मिळे पशु आदि जन्मी । नि भटकणे घडे भवभयीं जनना मरणा ॥ २२ ॥
कुशरीरभृतः - आत्मघातकी व निंद्य शरीर धारण करणारे अज्ञानी लोक - त्वदनुपथं इदं कुलायं - तुझी सेवा करण्यालाच योग्य असे हे मनुष्यशरीर - आत्मसुहृत्प्रियवत् चरति - आत्मा, मित्र व प्रिय यांप्रमाणे वाटते - तथा (अपि) - तरी पण - असदुपासनया - नश्वर अशा त्या देहादिकांच्याच उपासनेने - उन्मुखे हिते प्रिये च आत्मनि त्वयि - साह्य करण्यास सिद्ध, कल्याणकारी व प्रिय अशा आत्मस्वरुपी तुझ्या ठिकाणी - आत्महनः - आत्मघात करणारे लोक - अहो बत न रमन्ति - खरोखर रममाण होतच नाहीत - यदनुशया कुशरीरभृतः उरुभये भ्रमन्ति - ज्यांच्या ठिकाणी वासना ठेवणारे मंद बुद्धीचे प्राणी महाभयंकर अशा संसारात भ्रमण करितात ॥२२॥
जर हे शरीर तुमच्या सेवेसाठी उपयोगात आणले तर तेच आपला आत्मा, हितचिंतक आणि मित्र बनते. शिवाय आपणही जीवाचे हितचिंतक, मित्र व आत्मा असल्यामुळे त्याला भेटायला नेहमी उत्सुक असता. अशी सर्व सोय असूनही जीवांचे केवढे हे दुर्दैव की, ते आपल्या उपासनेत रमत नाहीत. उलट शरीर, घरदार इत्यादी विनाशी वस्तूंत रमून स्वत:ची अधोगती करून घेतात. परिणामी त्यांच्या ठिकाणीच वासना जडल्याने पशुपक्ष्यादी क्षुद्र शरीरे त्यांना प्राप्त होताच आणि या भयंकर जन्ममृत्यूरूप प्रपंचात ते भटकत राहातात. (२२)
निभृतमरुन्मनोऽक्षदृढयोगयुजो हृदि यत्
मुनय उपासते तदरयोऽपि ययुः स्मरणात् । स्त्रिय उरगेन्द्रभोगभुजदण्डविषक्तधियो वयमपि ते समाः समदृशोऽङ्घ्रिसरोजसुधाः ॥ २३ ॥
ऋषि मुनि इंद्रिया वशविती नि तुला स्मरती । परि नवलो कि शत्रुसिहि ती मिळेच कृपा ॥ भुजि धरिशी प्रिया सुख तसे मिळतेहि अम्हा । तुज मनि नाचि भाव मुळिही जनि आप परा ॥ २३ ॥
निभृतमरुन्मनोऽक्षदृढयोगयुजः - प्राण, मन व इंद्रिये ह्यांचे संयमन केल्यामुळे जे बळकट योगाभ्यास करणारे आहेत असे - मुनयः यत् हृदि उपासते - ऋषि ज्याची हृदयात उपासना करितात - तत् अरयः अपि स्मरणात् ययुः - शत्रुहि स्मरणाने त्यालाच प्राप्त होतात - उरगेन्द्रभोगभुजदण्डविषक्तधियः स्त्रियः - सर्पराजाच्या शरीरासारख्या तुझ्या बाहुदंडावर आसक्त आहे मन ज्यांचे अशा गोपी - अंघ्रिसरोजसुधाः वयम् अपि - तुझे चरणकमळ उत्तम रीतीने मनात धरणार्या आम्ही श्रुति देखील - समदृशः ते - समदृष्टि ठेवणार्या तुला - समाः (स्मः) - सारख्याच आहो ॥२३॥
योगीजन प्राण, मन,इंद्रिये यांचा निग्रह करून दृढ योगाभ्यासाने अंत:करणात ज्या तत्त्वरूप आपलि उपासना करतात, त्याच तत्त्वाला तुमचे शत्रूसुद्धा निरंतर तुमच्या स्मरणाने प्राप्त होतात. शेषनागाच्या शरीराप्रमाणे असणार्या तुमच्या बाहूंवर आसक्त होणार्या स्त्रिया आणि तुमची चरणकमले नित्य धारण करणार्या आम्ही श्रुती समदर्शी अशा तुमच्या दृष्टीने सारख्याचा. (योगाने असो, द्वेषाने असो, प्रेमाने असो की अद्वितीय भावनेने असो तुमचे स्मरणच तुमची प्राप्ती करून देणारे आहे.) (२३)
क इह नु वेद बतावरजन्मलयोऽग्रसरं
यत उदगादृषिर्यमनु देवगणा उभये । तर्हि न सन्न चासदुभयं न च कालजवः किमपि न तत्र शास्त्रमवकृष्य शयीत यदा ॥ २४ ॥
नच कुणि जाणि रूप तव ते कि विरंचिही न तो । निजसि जधी जगा मिटवुनी नच साक्षि तया ॥ स्थुळ लघु ते हि ना उरतसे क्षण काल नुरे । नि सकल शास्त्रहि मिळती लिनत्वात तसे ॥ २४ ॥
अवरजन्मलयः - मागाहून झालेली आहेत उत्पत्ति व नाश ज्याची असा - कः - कोणता पुरुष - इह - या जगात - अग्रसरं (त्वां) बत नु वेद - वडील अशा तुला खरोखर जाणतो - यतः ऋषिः उदगात् - ज्यापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला - यम् अनु - ज्या ब्रह्मदेवामागून - उभये देवगणाः (उदगुः) - दोन्ही प्रकारचे देव उत्पन्न झाले - यदा अवकृष्य (भवान्) शयीत - जेव्हा सर्वांचे आकर्षण करून आपण शयन करता - तर्हि - तेव्हा - न सत् न च असत् - कारण नसते व कार्यहि नसते - उभयं न - कारण व कार्य अशा दोघांपासून उत्पन्न होणारे शरीरहि नसते - कालजवः च न - कालाचा वेगहि नसतो - तत्र किमपि शास्त्रं न - तेथे कोणते शास्त्रही नसते ॥२४॥
हे भगवन ! अनादी न अनन्त अशा ज्या आपल्यापासून प्रथम ब्रह्मदेव व त्यानंतर आध्यात्मिक व आधिदैविक देवगण उत्पन्न झाले, त्या आपल्याला या जगात ज्यांचे जन्म-मृत्यू त्याहीनंतरचे आहेत, त्यांपैकी कोण बरे जाणू शकेल? शिवाय ज्यावेळी आपण सारे विश्व आपल्यात समाविष्ट करून झोपी जाता ,त्यावेळी तर स्थूल-सूक्ष्म जग, काळाचा वेग किंवा शास्त्र काहीच नसते. (तर मग तुमचे ज्ञान कोणाला कसे होणार ? ) (२४)
जनिमसतः सतो मृतिमुतात्मनि ये च भिदां
विपणमृतं स्मरन्त्युपदिशन्ति त आरुपितैः । त्रिगुणमयः पुमानिति भिदा यदबोधकृता त्वयि न ततः परत्र स भवेदवबोधरसे ॥ २५ ॥
जनमत ते असत् निपजते अन सत्य नष्टी । नि वदति आत्मरूप कितिको अन कर्म खरे ॥ भ्रम सकलो तसे वदति ते नच संशयहि तो । सकल परा नि ज्ञान नच रुपो नच वाद मुळी ॥ २५ ॥
ये - जे - असतः (विश्वस्य) जनिं वदन्ति - असतापासून जगाची उत्पत्ति होते असे म्हणतात - (ये) सतः (दुःखस्य) मृतिं (वदन्ति) - जे एकवीस प्रकारच्या दुःखांचा नाश होतो असे म्हणतात - (ये) च - आणि जे - उत आत्मनि भिदां - आत्म्याच्या ठिकाणी भेदकल्पना करितात - ते सांख्याः - ते सांख्य - (ये) विपणं ऋतं स्मरन्ति - जे कर्मफलांचा देवदेवीचा व्यवहार सत्य असे म्हणतात - ते आरुपितैः उपदिशन्ति - ते आरोपिलेल्या भ्रमांनीच असे म्हणतात - त्रिगुणमयः पुमान् भिदा - तीन गुणांनी युक्त पुरुष आहे अशी भेदबुद्धी - यत् - ज्या अर्थी - त्वयि अबोधकृता - तुझ्या ठायी अज्ञानामुळे मानलेली आहे - ततः परत्र अवबोधरसे सः न संभवेत् - त्या अज्ञानाच्या पलीकडे असणार्या ज्ञानरसामध्ये ते अज्ञान संभवत नाही ॥२५॥
वैशेषिक पूर्वी नसलेले जग नवीन उत्पन्न झाले असे मानतात. नैयायिक एकवीस प्रकारच्या दु:खांचा नाश हाच मोक्ष मानतात. सांख्य आत्मे अनेक मानतात. मीमांसिक कर्मफलेच सत्य मानतात. श्रुतिविरोधामुळे हे सर्व भ्रामात्मक ज्ञान आहे. परमात्मा त्रिगुणात्मक आहे, ही भेदबुद्धी तुमच्या बाबतीत अज्ञनामूलक आहे. अज्ञानाच्या पलीकडे केवळ ज्ञानस्वरूप असणार्या आपल्या ठिकाणी हा भेद कोठून असणार ? (२५)
सदिव मनस्त्रिवृत्त्वयि विभात्यसदामनुजात्
सदभिमृशन्त्यशेषमिदमात्मतयाऽत्मविदः । न हि विकृतिं त्यजन्ति कनकस्य तदात्मतया स्वकृतमनुप्रविष्टमिदमात्मतयावसितम् ॥ २६ ॥
त्रयगुण विश्व कल्पितचि हे न खरे पुरुषा । तव रुप सत्य श्रेष्ठचि वदो मुनि ज्ञानि तसे ॥ ृपवर कुंडले न त्यजिती नि सुवर्ण कळे । अनुभवि आत्मज्ञान म्हणती सकळ तुचि तो ॥ २६ ॥
आमनुजात् - पुरुषापर्यंतची सर्व - मनः - मनःस्वरुपी - त्रिवृत् असत् - त्रिगुणात्मक असे मिथ्या जग - त्वाय सत् इव विभाति - तुझ्या ठिकाणी खर्याप्रमाणे भासते - आत्मविदः - आत्मज्ञानी लोक - आत्मतया - आत्मस्वरुपामुळे - इदं अशेषं सत् अभिमृशन्ति - हे सर्व सत् असेच जाणतात - (कनकार्थिनः) कनकस्य विकृतिं तदात्मतया न हि त्यजन्ति - सुवर्णाची इच्छा करणारे पुरुष सुवर्णाचा बनविलेला अलंकार सुवर्णमयच असल्यामुळे मुळीच टाकून देत नाहीत - (तथा) स्वकृतं अनुप्रविष्टं इदम् - त्याचप्रमाणे स्वतः निर्मिलेले व मागून प्रवेश केलेले हे जग - आत्मतया अवसितम् - आत्मस्वरुपाने निश्चित केले जाते ॥२६॥
तुमच्या अधिष्ठानावर पुरुषापासून सर्व त्रिगुणात्मक जग, मनामुळे नसूनही असल्यासारखे भासते. आत्मज्ञानी मात्र हे सर्व विश्व आत्म्यापासून उत्पन्न झाल्यामुळे आत्म्याप्रमाणेच सत्य मानतात. सोन्याचा दागिनाही सोने म्हणूनच स्वीकारला जातो ना? तसेच आपल्यापासून उत्पन्न झालेले व आपण ज्यात प्रवेश केला आहे, असे हे जग आत्मज्ञानी निश्चयाने आत्मरूपच मानतात. (२६)
तव परि ये चरन्त्यखिलसत्त्वनिकेततया
त उत पदाक्रमन्त्यविगणय्य शिरो निर्ऋतेः । परिवयसे पशूनिव गिरा विबुधानपि तान् त्वयि कृतसौहृदाः खलु पुनन्ति न ये विमुखाः ॥ २७ ॥
भजति तुला जनो सकल आश्रय जाणुनि जे । मरणहि जिंकिती शिरि पदे चिरडोनि तया ॥ विमुख बुधास बांधि श्रुति ती पशु जै धरणे । नि भजक तो दुजा सहित तो करि पावन हो ॥ २७ ॥
ये - जे - तव अखिलसत्त्वनिकेततया - तुझ्या सर्व प्राण्यांचे निवासस्थान असण्याच्या स्थितीमुळे - (त्वां) परि चरन्ति - तुझी सेवा करितात - उत ते - तेच खरोखर - अविगणय्य - तिरस्कार करून - निऋतेः शिरः पदा आक्रमन्ति - मृत्यूच्या मस्तकावर पायाने आक्रमण करितात - पशून् इव तान् विबुधान् अपि गिरा परिवयसे - पशुंना बांधावे त्याप्रमाणे त्या ज्ञान्यांनाहि तू वाणीने बांधून टाकितोस - ये त्वयि कृतसौहृदाः - जे तुझ्या ठिकाणी मैत्री केलेली असे आहेत - खलु पुनन्ति - खरोखर पवित्र करितात - विमुखाः न (पुनन्ति) - तुला पराङ्मुख झालेले लोक पवित्र करीत नाहीत. ॥२७॥
सर्व चराचर हे आपले निवासस्थान आहे, असे समजून जे तुमची सेवा करतात, ते जन्म-मृत्यूची पर्वा न करता मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवतात. (अर्थात मुक्त होताता) परंतु तुमच्यापासून जे दूर जातात, ते जरी विद्वान असले, तरी त्यांना तुम्ही जनावरांना बांधावे तसे वेदवाणीरूपी दाव्याने बांधून टाकता. याउलट जे तुमची भक्ती करतात, ते स्वत:ला आणि इतरांनाही पवित्र करतात.(भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते आणि भक्तांना साक्षात्कार होतो.) (२७)
त्वमकरणः स्वराडखिलकारकशक्तिधरः
तव बलिमुद्वहन्ति समदन्त्यजयानिमिषाः । वर्षभुजोऽखिलक्षितिपतेरिव विश्वसृजो विदधति यत्र ये त्वधिकृता भवतश्चकिताः ॥ २८ ॥
करण नि साधनी परय तू सकली पुरा । स्वय बलि तेजहि स्वयचि हो न हवी तुजसी ॥ गरजचि इंद्रियी नृप जसा स्वया घोषित नी । पुजन करोनि घे तव रुपा जन पूजिति रे ॥ २८ ॥
अकरणः - इंद्रिय रहित - स्वराट् - स्वयंप्रकाशी - त्वं - तू - अखिलकारकशक्तिधरः (असि) - सर्व प्राण्यांच्या इंद्रियशक्ति धारण करणारा आहेस - अजया - मायेने - अनिमिषाः - देव - तव बलिम् उद्वहन्ति - तुला बलि अर्पण करितात - (स्वयं बलिं) समदन्ति - स्वतः बलि भक्षण करितात - वर्षभुजः अखिलक्षितिपतेः इव - मांडलिक राजे सार्वभौम राजाला भिऊन जसे करितात तसे - ये विश्वसृजः यत्र अधिकृताः - जे प्रजापति जेथे अधिकारावर नेमिलेले आहेत - भवतः चकिताः तु विदधाति - तुला भ्यालेले असेच आपली नेमिलेली कार्ये करितात. ॥२८॥
हे प्रभो ! आपण इंद्रियरहित आहात, पण स्वयंप्रकाश आहात. (आपल्या ज्ञानाला इंद्रियांची जरूर नाही.) सार्या प्राण्यांची इंद्रिये आपल्यामुळेच कार्ये करतात. म्हणूनच मायावेष्टित ब्रह्मदेवासह सर्व देव आपली पूजा करताता आणि मनुष्यांनी दिलेले हव्यकव्यादी भक्षण करतात. ज्याप्रमाणे मांडलिक राजे प्रजेकडून कर घेऊन सम्राटाला देतात, त्याचप्रमाणे सर्व देव त्यांना ज्या ज्या कार्यासाठी नेमलेले असेल, ते ते तुमच्या भीतीने ते पार पाडतात. (हे कार्य करणे, हीच तुमची पूजा आहे आणि मनुष्यांनी केलेली देवांची पूजा हे त्यासाठी देवांना मिळालेले वेतन आहे.) (२८)
स्थिरचरजातयः स्युरजयोत्थनिमित्तयुजो
विहर उदीक्षया यदि परस्य विमुक्त ततः । न हि परमस्य कश्चिदपरो न परश्च भवेद् वियत इवापदस्य तव शून्यतुलां दधतः ॥ २९ ॥
अतित प्रभो जधी क्रिडसि तू मनि कल्पिशि तू । परम दयाळु तू नभ जसे नच आप परा ॥ मन गति वाणिची नच तुला नच रूप तुझे । नदिसशि शून्यची गमसि पै अधिनेत्र तुची ॥ २९ ॥
विमुक्त - हे नित्यमुक्त परमेश्वरा - यदि ततः परस्य तव अजया उदीक्षया विहरः (भवति) - जेव्हा मायेच्या पलीकडे असलेल्या तुझी मायेशी केवळ अवलोकनाने क्रीडा चालते - (तदा) उत्थनिमित्तयुजः स्थिरचरजातयः स्युः - तेव्हा त्यापासून उत्पन्न झालेली कर्मजन्य लिंगशरीरे धारण करणारे स्थावरजंगम प्राणिमात्र उत्पन्न होतात - वियतः इव शून्यतुलां दधतः अपदस्य परमस्य तव - आकाशाप्रमाणे शून्याची बरोबरी करणार्या, इंद्रियांनी अमुक म्हणून दाखविता न येणार्या श्रेष्ठ अशा तुला - कश्चित् अपरः नहि - कोणीही आत्मीय नाही - परः च न भवेत् - आणि परकीही कोणी असणार नाही. ॥२९॥
हे मायारहित प्रभो! जेव्हा आपण मायेसह क्रीडा करू इच्छिता, तेव्हा मायेचा संग नसलेल्या तुमच्या केवळ संकल्पाने, मायेमुळे उत्पन्न होणार्या सूक्ष्म शरीरांनी युक्त होऊन निरनिराळ्या चराचराचा जन्म होतो. (आपल्या संकल्पाने निर्माण झालेल्या सृष्टीत जरी विषमता असली, तरी त्याला कारण आपण नाही. ) कारण आपण आकाशाप्रमाणे सर्वांशी सम असून परमदयाळू आहात. आपल्याला कोणी स्वकीय नाही की परकीय नाही. या सृष्टीत प्रारंभी वाणीला किंवा मनाला न कळणारे आपण शून्यवत होता. (२९)
अपरिमिता ध्रुवास्तनुभृतो यदि सर्वगताः
तर्हि न शास्यतेति नियमो ध्रव नेतरथा । अजनि च यन्मयं तदविमुच्य नियन्तृ भवेत् सममनुजानतां यदमतं मतदुष्टतया ॥ ३० ॥
अपरिमिता ध्रुवो असशि रे जनिता हि तसा । सकलि वसो परि नच कळे कि कसे स्वरुपो ॥ वदति कि जाणिले परि मतिहुनि तू कि परा । मत-मत अंतरे मतपरा असशी कि प्रभो ॥ ३० ॥
ध्रुव - हे त्रिकालाबाधित ईश्वरा - यदि - जर - तनुभृतः - प्राणी - अपरिमिताः ध्रुवाः सर्वगताः (स्युः) - अगणित, नित्य व सर्वगामी असतील - तर्हि शास्यता न (घटत) - तर सुव्यवस्था संभवत नाही - इति (त्वया) नियमः न (स्यात्) - म्हणून तुझ्याकडून त्यांचे नियमनहि होणार नाही - इतरथा (स्यात्) - ह्याच्या उलट असल्यास नियमन होईल - यन्मयं च अजनि - आणि ज्याचा विकार म्हणून जीव नामक वस्तु उत्पन्न झाले - तत् - ते - समम् - सर्वांत सारखे असलेले - अविमुच्य - त्याला न सोडता - (तस्य) नियंतृ भवेत् - त्याचे नियामक होईल - अनुजानतां यत् मतदुष्टतया अमतं - जाणता म्हणणार्यांना जे ज्ञान वस्तूच्या दोषीपणामुळे वस्तुतः ठाऊक नाही. ॥३०॥
हे नित्य एकरस प्रभो ! जर जीव वास्तविक अनंत, नित्य आणि सर्वव्यापी असतील, तर ते आपल्यासारखेच असल्यामुळेच आपण त्यांचे नियंत्रक होऊ शकणार नाही. मात्र असे नसेल, तरच आपण त्यांचे नियंत्रण करू शकाल. उपाधीने का असेना, पण जीवरूप कार्य ज्या परमात्मरूप कारणापासून निर्माण झाले, ते कारण सर्व जीवांमध्ये असल्यामुळे परमात्माच सर्व जीवांचा नियंता ठरतो. जे लोक आपल्याला जाणले, असे म्हणतात, त्यांना आपण कधीच कळलेले नसता ! कारण जाणली जाणारी वस्तू प्रत्येकाच्या मतानुसार वेगळी ठरते. आणि आपण तर नित्य एकरूप आहात. (३०)
न घटत उद्भवः प्रकृतिपूरुषयोरजयोः
उभययुजा भवन्त्यसुभृतो जलबुद्बुदवत् । त्वयि त इमे ततो विविधनामगुणैः परमे सरित इवार्णवे मधुनि लिल्युरशेषरसाः ॥ ३१ ॥
निपज तुझ्या मुळे नच खरे परिणामचि तू । प्रकृति-पुरुष जन्म ना तया जल तोचि फुगा ॥ एक दुजिं कल्पना मधुमधे सकलो फुल जै । नचहि उपाधि तै तुज मुळी पारि हो सकलीं ॥ ३१ ॥
अजयोः प्रकृतिपुरुषयोः उद्भवः न घटत - जन्मरहित अशी जी माया व पुरुष त्यांच्यापासून जीवाची उत्पत्ति होणे संभवत नाही - जलबुद्बुदवत् असुभृतः उभययुजाः भवन्ति - पाण्याचे बुडबुडे जसे वायु व पाणी यांच्या संयोगाने होतात तसे प्राणी प्रकृति व पुरुष या दोघांच्या संयोगाने होतात - ततः - म्हणून - ते इमे - ते हे प्राणी - विविधनामगुणैः - अनेक प्रकारच्या नावांनी व गुणांनी युक्त असे - सरितः अर्णवे इव - नद्या समुद्रात लीन होतात त्याप्रमाणे - अशेषरसाः (वा) मधुनि (इव) - किंवा सर्व प्रकारचे रस मधात लीन होतात त्याप्रमाणे - परमे त्वयि लिल्युः - तू जो श्रेष्ठ कारण त्या तुझ्या स्वरूपात लीन होतात. ॥३१॥
प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही जन्मरहित असल्यामुळे यांपैकी कोणीही एक जीवरूपाने जन्मले असे म्हणता येत नाही. (जर प्रकृती जीवरूपाने जन्मली म्हटले तर जीव अचेतन ठरेल आणि पुरुष जन्मला म्हटले, तर निर्विकार पुरुषात विकार उत्पन्न झाला, असे होईल.) म्हणून वारा हे निमित्तकारण आणि पाणी हे उपादानकारण यांपासून बुडबुडे तयार होतात, तसेच पुरुष व प्रकृती या दोहोंच्या संयोगाने जीव तयार होतात, असे म्हटले पाहिजे. त्यामुळेच हे सारे जीव अनेक प्रकारच्या नामरूपांसह परमकारण अशा तुमच्यामध्येच विलीन होतात. जशा नद्या समुद्रात किंवा जसे सर्व फुलांचे रस मधात विलीन होतात. (३१)
नृषु तव मयया भ्रमममीष्ववगत्य भृशं
त्वयि सुधियोऽभवे दधति भावमनुप्रभवम् । कथमनुवर्ततां भवभयं तव यद्भ्रुकुटिः सृजति मुहुस्त्रिणमिरभवच्छरणेषु भयम् ॥ ३२ ॥
भटकति मायिके परि सतो समजोनि तसे । धरिति पदा तुझ्या भवभयी तरण्यासहि पहा ॥ अभजक तया सदैवचि भिती ऋतु जै सकला । शरणपदीं तया कसलि ती भविची भिती ॥ ३२ ॥
अमीषु नृषु - या जीवांच्या ठिकाणी - तव मायया (कृतम्) - तुझ्या मायेने उत्पन्न केलेले - अनुप्रभवम् भ्रमम् अवगत्य - वारंवार जन्म मिळणे हे भ्रमण समजून घेऊन - सुधियः - ज्ञानी पुरुष - अभवे त्वयि - संसाराचा निरास करणार्या तुझ्या ठिकाणी - भृशं भावं दधति - दृढ भक्ति ठेवितात - (त्वाम्) अनुवर्तताम् - तुझी भक्ति करणार्यांना - भवभयं कथं (स्यात्) - संसाराचे भय कसे होईल - यत् - कारण - तव भ्रुकुटिः - तुझी भुवई - त्रिणेमिः - तीन आहेत भाग ज्याचे अशा काळाच्या रूपाने असलेल्या - अभवच्छरणेषु मुहुः भयं सृजति - नाही आहे तुझा आश्रय ज्यांना त्यांनाच वारंवार भय उत्पन्न करिते. ॥३२॥
हे प्रभो ! तुमच्या मायेमुळे हे जीव जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत आहेत, हे पूर्णपणे जाणून ज्ञानी लोक संसार-निवर्तक अशा आपल्याला शरण येतात. जे आपल्याला अनुसरतात, त्यांना संसारभय कोठून असणार? मात्र ज्यांची भृकुती हाच तीन ऋतू असणारा काळ आहे, तो आपल्याला शरण न येणार्यांना भयभीत करतो. (आपल्याला शरण आल्यास संसारावे वा काळाचे भय उरत नाही. ) (३२)
विजितहृषीकवायुभिरदान्तमनस्तुरगं
य इह यतन्ति यन्तुमतिलोलमुपायखिदः । व्यसनशतान्विताः समवहाय गुरोश्चरणं वणिज इवाज सन्त्यकृतकर्णधरा जलधौ ॥ ३३ ॥
तपि वशितींद्रिये गुरुपदा न धरी जन त्या । श्रम पडती नि ना गवसता मन ते खचते ॥ अन त्रिपदा श्रमो घडतसे कि जहाजि जसे । वणिकहि नाविका विपदि ते बघता खचती ॥ ३३ ॥
अतिलोलम् - अतिशय चंचल अशा - अदान्तमनस्तुरगम् - दमन न केलेल्या मनरूपी घोड्याला - यन्तुम् - आवरण्यासाठी - ये - जे - इह - या लोकी - गुरोः चरणं समवहाय - गुरूचे पाय सोडून - विजितहृषीकवायुभिः यतन्ति - नियंत्रित अशा इंद्रियांनी व प्राणादि वायूंनी प्रयत्न करितात - उपायखिदः - या उपायांनी दुःखित झालेले असे - व्यसनशतान्विताः (भूत्वा) - शेकडो संकटांनी ग्रस्त होऊन - अकृतकर्णधराः जलधौ (गताः) वणिजः इव - नाही घेतले नावाडी साह्याला ज्यांनी अशा समुद्रात गेलेल्या व्यापार्यांप्रमाणे - सन्ति - होत ॥३३॥
हे अजन्मा प्रभो! ज्यांनी इंद्रिये व प्राण यांचा निग्रह केलेला आहे, पण जे गुरुचरणांना शरण गेले नाहीट, ते जर उच्छृंखल व अत्यंत चंचल अशा मनरूप घोड्याला ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतील, तर त्याचे त्यांना फक्त कष्टच होतील व त्यांच्यावर शेकडो संकटे येतील. जशी नावाड्याशिवाय नाव घेऊन समुद्रप्रवास करणार्या व्यापार्याची गत होते, तशी त्या साधकांची गत होते. (३३)
स्वजनसुतात्मदारधनधामधरासुरथैः
त्वयि सति किं नृणां श्रयत आत्मनि सर्वरसे । इति सदजानतां मिथुनतो रतये चरतां सुखयति को न्विह स्वविहते स्वनिरस्तभगे ॥ ३४ ॥
स्वजन सुतो स्त्रि देह धन नी रथ गेह ययी । न सुख नि नश्वरो सकल ते भव दुःखचि ते ॥ सकल लयासि जाय रस ना तइ तो मुळि हो । अखिर मृत्तिकाचि सगळी सुख ती कइ दे ॥ ३४ ॥
सर्वरसे आत्मनि त्वयि श्रयतः (प्राप्तव्ये) सति - सर्व मुखे ज्यात आहेत असा आत्मस्वरूपी तू सेवा करणार्याला सुलभपणे प्राप्त होण्यासारखा असता - नृणाम् - मनुष्यांना - स्वजनसुतात्मदारधनधामधरासुरथैः किम् - आप्त, पुत्र, देह, स्त्री, द्रव्य, गृह, भूमि, प्राण, रथ इत्यादिकांचा काय उपयोग आहे - इति सत् - हे सत्य - अजानताम् - न जाणणार्या - मिथुनतः रतये चरताम् - पतिपत्नीसंबंध करून सुखासाठी प्रयत्न करणार्या माणसांना - स्वविहते स्वनिरस्तभगे इह (संसारे) - आपल्याकडूनच नष्ट केल्या गेलेल्या व आपल्याकडून काढून टाकिले आहे सार ज्यातील अशा या संसारात - कः नु सुखयति - कोणती वस्तू सुख देणार आहे बरे ? ॥३४॥
सर्व रसस्वरूप असे तुम्ही जीवांचा आत्मा असताना तुमचा आश्रय करणार्या माणसाला आप्तेष्ट, पुत्र, शरीर, धन, घर, जमीनजुमला, प्राण किंवा रथ इत्यादी गोष्टींची काय जरूर आहे? याउलट ’आत्मसुख हेच सत्यसुख आहे’, हे न जाणणार्या आणि सुखासाठी मैथुनादी गोष्टींचा अवलंब करणार्या अज्ञानी लोकांना मुळातच नश्वर व नि:सार अशा या संसारातील कोणती वस्तू आनंद देऊ शकणार आहे ? (३४)
भुवि पुरुपुण्यतीर्थसदनान्यृषयो विमदाः
त उत भवत्पदाम्बुजहृदोऽघभिदङ्घ्रिजलाः । दधति सकृन्मनस्त्वयि य आत्मनि नित्यसुखे न पुनरुपासते पुरुषसारहरावसथान् ॥ ३५ ॥
विमलचि तीर्थ संतजन जे त्यजिती आपुला । तप धन गर्व तो पृथिविसी मळ नाशिति ते ॥ तवरुपि मोद घेवुनि मना तुज अर्पिति जी । न फसति गेहि देहि गुण संपविती रमती ॥ ३५ ॥
भवत्पदांबुजहृदः - तुझे चरणकमल हृदयात आहे ज्याच्या असे - अघभिदंघ्रिजलाः - पापनाशक आहे पायांचे तीर्थ ज्यांच्या असे - उत - सुद्धा - विमदाः ते ऋषयः - अहंकाररहित असे ते ऋषि - भुवि - पृथ्वीवर - पुरुपुण्यतीर्थसदनानि (उपासते) - अत्यंत पवित्र अशा तीर्थाच्या स्थानाचेच सेवन करितात - नित्यसुखे आत्मनि त्वयि - शाश्वत आहे सुख जेथे अशा आत्मरूपी तुझ्या ठिकाणी - ये सकृत् मनः दधति - जे एकदा मन ठेवितात - ते - ते - पुरुषसारहरावसथान् पुनः न उपासते - पुरुषाच्या विवेक स्थैर्य इत्यादि गुणरूपी साराचे हरण करणार्या घराचे पुनः सेवन करीत नाहीत. ॥३५॥
या पॄथ्वीतलावर हॄदयात आपल्या चरणकमलांना धारण करणारे व त्यामुळेच ज्यांचे चरणतीर्थ पाप नाहीसे करते, असे ऋषीसुद्धा अहंकाररहित होऊन अतिशय पुण्यमय अशा तीर्थांचा व आश्रमांचा आश्रय करतात. माणसांनी नित्य आनंदमय आत्मस्वरूप अशा आपल्या ठिकाणी एकवेळ जरी मन लावले तरी ते पुन्हा माणसाचे विवेक- वैराग्यादी गुण नाहीसे करणार्या घराकडे फिरकत नाहीत. (३५)
सत इदं उत्थितं सदिति चेन्ननु तर्कहतं
व्यभिचरति क्व च क्व च मृषा न तथोभययुक् । व्यवहृतये विकल्प इषितोऽन्धपरम्परया भ्रमयति भारती त उरुवृत्तिभिरुक्थजडान् ॥ ३६ ॥
घटिं सत मृत्तिका न जरी भेद विवरणे पृथक् । जइचि सर्पहि रज्जुसि गमे नम स्वर्णी मुदीं ॥ जग गमतेहि सत्य नि असे व्यवहारिक खरे । भ्रम पडतो अम्हा न नित कर्म भजण्यासि ॥ ३६ ॥
इदम् (जगत्) सतः उत्थितम् - हे जग सत्य अशा ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे - (तस्मात् इदम्) सत् - म्हणून हे सत्य आहे - इति चेत् (उच्यते न) - असे जर म्हणावे, तर तसे नाही - ननु (तत्) तर्कहतम् - खरोखर हे म्हणणे तर्काने बाधित होणारे आहे - क्वच व्यभिचरति - कोठे कोठे त्याची व्याप्ति दिसत नाही - क्वच मृषा - आणि कोठे कोठे ते खोटेच असते - (तस्मात्) न तथा - म्हणून जग हे तसे म्हणजे ब्रह्मासारखे सत्य नव्हे - (तत्) उभययुक् - ते सत्य ब्रह्म व अज्ञानजन्य भ्रम या दोहोंमुळे झालेले आहे - (सति ब्रह्मणि) विकल्पः व्यवहृतये इषितः - सत्य ब्रह्मावर झालेला असत्य अशा जगाचा आभास व्यवहारासाठी इष्ट आहे - (किन्तु सः) अन्धपरंपरया (जातः) - पण तो अंधपरंपरेनेच उत्पन्न झालेला आहे - ते भारती - तुज परमात्म्याची वेदरूप वाणी - उक्थजडान् (मीमांसकान्) - कर्मामुळे जडबुद्धि झालेल्या मीमांसकांना - उरुवृत्तिभिः भ्रमयति - आपल्या लक्षणा, व्यंजना इत्यादि अनेक अर्थबोधक शक्तींनी भ्रम पाडिते. ॥३६॥
कारण व कार्य एकरूप असतात, या नियमाप्रमाणे हे विश्व सत्तत्त्वापासून उत्पन्न झाल्यामुळे सत् आहे, असे म्हणावे, तर ते तर्कशुद्ध ठरत नाही. (कारण जग हे असत्य आहे.) कारण व कार्य एकरूप असतात, हा नियमही निरपवास नाही. जसा पिता व पुत्र यांच्यात कार्यकारणभाव असला, तरी एकरूपता नसते. काही ठिकाणी तर कार्य काल्पनिक असते. जसे दोरी हे साप भासण्याचे कारण असले, तरी त्या ठिकाणचे कार्य साप हा काल्पनिक असतो. या ठिकाणी सर्पाभासाचे कारण केवळ दोरी नसून दोरीचे अज्ञान हेही एक कारण आहे. याचप्रमाणे सत्तत्त्वाच्या ठिकाणी अज्ञानाने भासणारे हे जग असल्यामुळे ते सापाप्रमाणे मिथ्या किंवा काल्पनिक आहे. व्यवहाराच्या सिद्धीसाठी जग सत्य मानले, तरी त्यामुळे काही बिघडत नाही. (त्यामुळे ब्रह्माद्वैताच्या पारिमार्थिकतेला बाध येत नाही. कारण जगाची सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे. ) आणि ही अन्धपरंपरा अनादी काळापासून चालू आहे. अशा स्थितीत कर्मफल नित्य मानणारी तुमची वेदवाणी कर्मावर अत्यंत श्रद्धा ठेवणार्या मंदमतींना भ्रमित करते. (वास्तविक वेद कर्मफलाला नित्य मानीत नाहीत, तर ते आत्मज्ञानाला पात्र नसलेल्यांना कर्माकडे प्रवृत्त करण्यासाठी कर्माची लक्षणावृत्तीने प्रशंसा करतात, एवढेच.) (३६)
न यदिदमग्र आस न भविष्यदतो निधनाद्
अनु मितमन्तरा त्वयि विभाति मृषैकरसे । अत उपमीयते द्रविणजातिविकल्पपथैः वितथमनोविलासमृतमित्यवयन्त्यबुधाः ॥ ३७ ॥
नच जग पूर्वि न राहि पुढती म्हणुनी न खरे । जइ घट शस्त्र कुंडलि कि माति नि धातु खर्या ॥ तइ उपमाचि देति श्रुति केवल मात्र पहा । न मति जयासि सत्यचि म्हणती कि असत्यचि ते ॥ ३७ ॥
यत् इदम् अग्रे न आस - ज्या अर्थी हे जग सृष्टीपूर्वी नव्हते - निधनात् अनु (च) न भविष्यत् - प्रलयानंतर ते रहाणारे नाही - अतः अन्तरा (अपि) - म्हणून मधल्या अवधीत देखील - एकरसे त्वयि मृषा विभाति - निर्गुण अशा तुझ्य़ा ठिकाणी मिथ्या रूपाने भासते - अतः - म्हणून - द्रविणजातिविकल्पपथैः (तत्) समीयते - मृत्तिकादि द्रव्यांपासून होणार्या भिन्न वस्तूंप्रमाणे त्याला उपमा दिली - (तत्) वितथ मनोविलासम् (सत्) - ते मिथ्या अशा मनाच्या खेळाप्रमाणे असून - अबुधाः - अज्ञानी पुरुष - ऋतम् अवयंति - खरे मानितात. ॥३७॥
हे विश्व उत्पत्तीच्या पूर्वी नव्हते आणि प्रलयानंतरही असणार नाही. त्यावरून हे सिद्ध होते की, मध्येसुद्धा नित्य अशा तुमच्या अधिष्ठानावरच ते मिथ्या भासते. म्हणूनच माती इत्यादी कारणांपासून उत्पन्न झालेल्या घडा इत्यादी कार्यद्रव्यांची जगाला उपमा दिली जाते. (घडा म्हणजे वास्तविक विशिष्ट आकार व नाव असलेली मातीच. तसेच विविध नावारूपांनी नटलेले विश्व म्हणजे एकमेवाद्वितीय परब्रह्मच ) पण अज्ञानी लोक मात्र मनाच्या या खोट्या कल्पनारूप जगाला सत्य मानतात. (३७)
स यदजया त्वजामनुशयीत गुणांश्च जुषन्
भजति सरूपतां तदनु मृत्युमपेतभगः । त्वमुत जहासि तामहिरिव त्वचमात्तभगो महसि महीयसेऽष्टगुणितेऽपरिमेयभगः ॥ ३८ ॥
भ्रमुनिच जीव मेळवियला म्हणुनि भजतो । भवि पडतो न सर्प चिरगुटा मुळि अन्वयो तसा ॥ वसशिहि तू तसा षडगुणीं अपरिमितची । न कसल्या सिमा तुजसि नी नच बद्ध मुळी ॥ ३८ ॥
यत् - जेव्हा - सः - तो जीव - अजया अजां अनुशयीत - मायेमुळे तिला आलिंगितो - (तस्याः) गुणान् तत् अनु च सरूपतां जुषन् - त्या मायेचे गुण घेऊन नंतर तिच्या स्वरूपाचाहि स्वीकार करीत - अपेतभगः - नष्ट झाले आहे ऐश्वर्य ज्याचे असा - मृत्यूं भजति - जन्ममृत्यूरूप संसारात पडतो - उत - पण - त्वम् - तू - अहिः त्वचम् इव - सर्प कात टाकितो त्याप्रमाणे - ताम् जहासि - तिला टाकितोस - आत्तभगः अपरिमेयभगः (च) - स्वाधीन आहे व अमर्याद आहे ऐश्वर्य ज्याचे असा - अष्टगुणिते महसि - अणिमादि आठ प्रकारच्या ऐश्वर्यात - महीयसे - विराजतोस. ॥३८॥
तोच अज्ञानी जीव जेव्हा मायेमुळे अविद्येला कवटाळतो आणि त्यामुळे देहेन्द्रियांना आपलेच खरे रूप समजतो, तेव्हा त्याचे मूळचे नित्य-शुद्ध-बुद्धादी स्वरूप लोप पावते व तो जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत राहातो. परंतु हे प्रभो! आपण मात्र सापाने कात टाकावी, तसा मायेचा त्याग करता, म्हणून आपले ऐश्वर्य नित्य आपल्याबरोबरच राहाते. त्यामुळे अष्टसिद्धीयुक्त अनंत ऐश्वर्यात आपण विराजमान राहाता. (३८)
यदि न समुद्धरन्ति यतयो हृदि कामजटा
दुरधिगमोऽसतां हृदि गतोऽस्मृतकण्ठमणिः । असुतृपयोगिनामुभयतोऽप्यसुखं भगवन्न् अनपगतान्तकादनधिरूढपदाद्भवतः ॥ ३९ ॥
गळिं मणि राहि धुंडि जइ तै यति ना त्यजिता । मनजुट तोचि दुःखभर भरुनि भव भोगितसे ॥ नरकि पडे जनी मिसळता रमवि जो सकला । नच रुप जाणि ना सुटतसे नि अधर्मचि तो ॥ ३९ ॥
यदि - जर - यतयः - इंद्रियदमन करणारे योगी - हृदि (सतीः) कामजटाः - हृदयात असलेल्या वासनांच्या मुळांना - न समुद्धरन्ति - उपटून काढणार नाहीत - (तेषां) असताम् - त्या भोंदूंना - हृदि गतः (अपि त्वम्) - हृदयात असलेलाहि तू - दुरधिगमः (असि) - प्राप्त होण्यास कठीण आहेस - (यथा) अस्मृतकंठमणिः - जसा विसरलेला गळ्यातील मणि त्याप्रमाणे - असुतृपयोगिनाम् - इंद्रियांना तृप्त करणार्या योग्यांना - उभयतः अपि - या लोकी व परलोकी सुद्धा - असुखं (भवति) - दुःख होते - (हे) भगवन् - हे परमेश्वरा - (एकम्) अनपगतान्तकात् - एक दूर न झालेल्या संसारापासून - (अन्यत् च) अनधिरूढपदात् भवतः - आणि दुसरे ज्याच्या पदाची प्राप्ति झाली नाही अशा तुझ्यापासून. ॥३९॥
हे भगवन ! अज्ञानी लोकांनी योगी होऊनसुद्धा जर आपल्या हृदयांतील विषयवासनांना उखडून फेकून दिले नाही, तर आपण त्यांच्या हृदयांत असूनसुद्धा, एखाद्याने आपल्याच गळ्यातील मणी आठवण नसल्याने इकडे तिकडे धुंडाळावा, त्याप्रमाणे ते आपल्याला शोधत राहातात, पण आपण त्यांना आपडत नाही. जे लोक इंद्रियांना तृप्त करण्यातच मग्न असतात, त्यांना इहलोकी उपभोगासाठी द्रव्यार्जन इत्यादींसाठी कष्ट करावे लागतात. शिवाय जन्म मृत्यूपासून त्यांची सुटका झालेली नसते. आणि आपले स्वरूप समजून न घेतल्यामुळे स्वत:च्या वर्णाश्रमधर्माचे उल्लंघन त्यांच्याकडून होते. म्हणून परलोकात गेल्यावर नरकाची भीतीही राहाते. (३९)
त्वदवगमी न वेत्ति भवदुत्थशुभाशुभयोः
गुणविगुणान्वयांस्तर्हि देहभृतां च गिरः । अनुयुगमन्वहं सगुण गीतपरम्परया श्रवणभृतो यतस्त्वमपवर्गगतिर्मनुजैः ॥ ४० ॥
नच सुख दुःख संत जन त्यां निवृत्तिचि मिळे । न तनु बघे युगे बघतसे तुज नी भजतो ॥ गति उरशी फलो निजजना न निषेध उरे । हृदयि वसो तयां नित प्रभो गुण दिव्य रुपे ॥ ४० ॥
(हे) सगुण - हे षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवंता - त्वदवगमी - तुझे ज्ञान असलेला पुरुष - भगदुत्थशुभाशुभयोः - तुझ्यापासून उत्पन्न होणार्या चांगल्या वाईट कर्मांच्या - गुणाविगुणान्वयान् - सुखदुःखरूपी संबंधाना - न वेत्ति - जाणत नाही - तर्हि च - व तेव्हा - देहभृतां गिरः (न वेत्ति) - देहाभिमानी जीवासाठी असलेली विधिनिषेधरूप वचनेहि जाणत नाही - यतः त्वं - ज्या अर्थी तू - मनुजैः अन्वङ्गं - मनुष्यांनी प्रत्येक दिवशी - अनुयुगं - प्रत्येक युगामध्ये - गीतपरंपरया - गायिलेल्या उपदेश परंपरांनी - श्रवणभृतः - श्रवणद्वारा हृदयामध्ये धारण केलेला - अपवर्गगतिः - मोक्षदायक. ॥४०॥
हे भगवन ! आपले वास्तविक स्वरूप जाणणार्या मनुष्याला आपण दिलेल्या पुण्यपापाच्या सुख-दु:खाच्या फळाची जाणीव होत नाही. त्यावेळी विधि-निषेध प्रतिपादन करणारे शास्त्रसुद्धा त्याला लागू होत नाही. शिवाय ज्या माणसांनी दररोज आपल्या प्रत्येक युगामध्ये केलेल्या उपदेशांचे संतांकडून श्रवण करून त्याद्वारा तुम्हांला स्वत:च्या हृदयात प्रतिष्ठित केले, त्यांनाही आपणच मोक्ष प्राप्त करून देता. (४०)
द्युपतय एव ते न ययुरन्तमनन्ततया
त्वमपि यदन्तराण्डनिचया ननु सावरणाः । ख इव रजांसि वान्ति वयसा सह यत् श्रुतयः त्वयि हि फलन्त्यतन्निरसनेन भवन्निधनाः ॥ ४१ ॥
अधिपति इंद्रादिसे थांग नसे कि अनंतचि तू । दशगुणि सात आवरणि ब्रह्महि गोल जयी ॥ उदरि तदा सिमा कसलि तै श्रुति नेति वदे । सफल वदे निषेध करुनी तइअ वस्तुशि ती ॥ ४१ ॥
द्युपतयः एव ते अन्तं न ययुः - स्वर्गादि लोकांचे स्वामी मात्र तुझा अंत जाणत नाहीत - अनंततया त्वम् अपि (तव अंतं न यासि) - तुला अंतच नसल्यामुळे तूही तुझा अंत जाणत नाहीस - यदन्तरा - ज्या तुझ्या उदरामध्ये - ननु - अहो - सावरणाः अंडनिचयाः - सात आवरणांनी वेष्टिलेले असे ब्रह्मांडाचे थवे - रजांसि खे इव - धुळीचे कण आकाशात फिरतात तसे - वयसा सह वांति - कालचक्राच्या योगे एकमेकांसह फिरत असतात - यत् (एवं तत्) - ज्या अर्थी असे आहे त्या अर्थी - भवन्निधनाः श्रुतयः - तुझ्यातच आहे लय ज्यांचा असे वेद - अतन्निरसनेन - ब्रह्माशिवाय इतरांचा निषेध करून - त्वयि हि फलंति - तुझ्याच ठिकाणी आपल्या शब्दाचे पर्यवसान करितात. ॥४१॥
हे भगवन ! स्वर्ग इत्यादी लोकांचे अधिपतीच आपला थांग लावू शकले नाहीत असे नाही, तर आपल्यालासुद्धा तो लागला नाही. कारण जर आपल्याला शेवटच नाही, तर तो कोण कसा जाणू शकेल? प्रभो! जसे आकाशात हवेमुळे धुळीचे अनंत कण उडातात, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कालगतीनुसार उत्तरोत्तर दसपट सात आवरणांसहित असंख्य ब्रह्मांडे एकाच वेळी फिरत असतात. तुम्ही श्रुतीसुद्धा तुमच्या स्वरूपाचे तुमच्या व्यतिरिक्त वस्तूंचा (हे नव्हे, ते नव्हे, असा) निषेध करीत करीत शेवटी तुमच्यापर्यंत येऊन थांबतो. (४१)
श्रीभगवानुवाच -
( अनुष्टुप् ) इत्येतद्ब्रह्मणः पुत्रा आश्रुत्यात्मानुशासनम् । सनन्दनमथानर्चुः सिद्धा ज्ञात्वाऽऽत्मनो गतिम् ॥ ४२ ॥
श्री भगवान् नारायण म्हणाले - ( अनुष्टुप् ) ब्रह्मत्म एकता ऐशी ऐकता सनकादिका । वाटले कृत कृत्यो नी पूजिलेहि सनंदना ॥ ४२ ॥
सिद्धाः ब्रह्मणः पुत्राः - पूर्णज्ञानी असे ते ब्रह्मदेवाचे पुत्र - इति एतत् आत्मानुशासनम् आश्रुत्य - याप्रमाणे हा अध्यात्मज्ञानाचा उपदेश श्रवण करून - अथ - नंतर - आत्मनः गतिं ज्ञात्वा - आत्म्याची गती जाणून - सनन्दनम् आनर्चुः - सनंदनाची पूजा करिते झाले. ॥४२॥
भगवान नारायण म्हणाले- अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रह्म यांचे ऐक्य सांगणारा उपदेश ऐकून आत्मस्वरूपाला जाणले आणि स्वत: ते नित्य सिद्ध असूनही या उपदेशाने कृतकृत्य होऊन त्यांनी सनंदनांची पूजा केली. (४२)
इत्यशेषसमाम्नाय पुराणोपनिषद्रसः ।
समुद्धृतः पूर्वजातैः व्योमयानैर्महात्मभिः ॥ ४३ ॥
नारदा संत ते चौघे पूर्वजो जगतास या । रस हा चाखिला त्यांनी वेदांचे सर्वसार जे ॥ ४३ ॥
इति - याप्रमाणे - अशेषसमाम्नायपुराणोपनिषद्रसः - सर्व वेद, पुराणे व उपनिषदे ह्यांतील सार - पूर्वजातैः व्योमयानैः महात्मभिः - प्राचीन अशा आकाशमार्गांनी संचार करणार्या महात्म्यांनी - समुद्धृतः - काढिले आहे. ॥४३॥
अशा प्रकारे सर्वांचे पूर्वज असणार्या त्या आकाशमार्गी महात्म्यांनी सर्व वेद, पुराणे आणि उपनिषदांचे सार काढले आहे. (४३)
त्वं चैतद्ब्रह्मदायाद श्रद्धयाऽऽत्मानुशासनम् ।
धारयंश्चर गां कामं कामानां भर्जनं नृणाम् ॥ ४४ ॥
ब्रह्मपुत्र तुम्ही तैसे तयांचे वारसोच की । ब्रह्मविद्या स्मरोनीया विचरा पृथिवीस या । जळती वासना सर्व विद्या श्रेष्ठ अशीच ही ॥ ४४ ॥
ब्रह्मदायाद - हे ब्रह्मपुत्रा नारदा - त्वं च - तू पण - नृणां कामानां भर्जनं - मनुष्यांच्या वासना दग्ध करणारा - एतत् आत्मानुशासनं - हा आत्मोपदेश - श्रद्धया धारयन् - श्रद्धेने धारण करीत - कामं गां चर - यथेच्छ पृथ्वीवर संचार कर. ॥४४॥
हे ब्रह्मवेदांच्या मानसपुत्रा ! तूसुद्धा श्रद्धायुक्त अंत:करणाने ही ब्रह्मविद्या धारण करून स्वच्छंदपणे पृथ्वीतलावर विहार कर. ही विद्या माणसांच्या सर्व वासना भस्म करणारी आहे. (४४)
श्रीशुक उवाच -
एवं स ऋषिणाऽऽदिष्टं गृहीत्वा श्रद्धयात्मवान् । पूर्णः श्रुतधरो राजन् आह वीरव्रतो मुनिः ॥ ४५ ॥
श्रीशुकदेव सांगतात - संयमी ज्ञानि नी पूर्ण देवर्षि ब्रह्मचारि ते । ऐकता धारिते झाले श्रद्धेने वदले पुन्हा ॥ ४५ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - आत्मवान् - ज्ञानी - वीरव्रतः श्रुतधरः पूर्णः सः मुनिः - नैष्ठिक व्रत पाळणारा व ऐकिलेले मनात धारण करणारा तो कृतकृत्य नारद ऋषि - एवं ऋषिणा आदिष्टं श्रद्धया गृहीत्वा - याप्रमाणे ऋषि नारायणाने उपदेशिलेले आत्मज्ञान श्रद्धापूर्वक स्वीकारून - आह - म्हणाला. ॥४५॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! संयमी, ज्ञानी, पूर्णकाम आणि नैष्ठिक ब्रह्मचारी अशा नारदांनी भगवान नारायणांनी केलेला उपदेश श्रद्धेने ग्रहण करून म्हटले. (४५)
श्रीनारद उवाच -
नमस्तस्मै भगवते कृष्णायामलकीर्तये । यो धत्ते सर्वभूतानां अभवायोशतीः कलाः ॥ ४६ ॥
देवर्षि नारद म्हणाले - नमो तुला भगवते श्री कृष्णा शुद्धकीर्ति तू । कल्याणा अवतारो हा वारंवार नमो तुला ॥ ४६ ॥
अमलकीर्तये भगवते तस्मै कृष्णाय नमः - निर्मळ कीर्ती असणार्या षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा त्या श्रीकृष्णाला नमस्कार असो - यः - जो - सर्वभूतानां अभवाय - सर्व प्राण्यांच्या संसाराचा निरास करण्यासाठी - उशतीः कलाः धत्ते - मनोहर अवतार धारण करितो. ॥४६॥
नारद म्हणाले- भगवन ! परम पवित्र कीर्ती असणार्या श्रीकृष्णांना नमस्कार असो. आपण सर्व प्राण्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी रमणीय कलावतार धारण करता. (४६)
इत्याद्यमृषिमानम्य तच्छिष्यांश्च महात्मनः ।
ततोऽगाद् आश्रमं साक्षात् पितुर्द्वैपायनस्य मे ॥ ४७ ॥
महात्मा नारदो तेंव्हा नारायण नि शिष्य ते । वंदिता आश्रमी गेले माझिया पितयाचिया ॥ ४७ ॥
इति आद्यं ऋषिं महात्मनः तच्छिष्यान् च आनम्य - याप्रमाणे प्राचीन अशा नारायण ऋषीला व थोर अंतःकरणाच्या त्याच्या शिष्यांना नमस्कार करून - ततः - नंतर - मे साक्षात् पितुः द्वैपायनस्य आश्रमं अगात् - माझा प्रत्यक्ष पिता व्यास महर्षि त्यांच्या आश्रमाला गेला. ॥४७॥
नारदांनी अशा प्रकारे आदिऋषींना आणि त्यांच्या शिष्यांना नमस्कार करून माझे साक्शात पिता असलेल्या कृष्णद्वैपायनांच्या आश्रमाकडे ते गेले. (४७)
सभाजितो भगवता कृतासनपरिग्रहः ।
तस्मै तद् वर्णयामास नारायणमुखाच्छ्रुतम् ॥ ४८ ॥
भगवान् वेद व्यासांनी केले स्वागत तेधवा । ऐकिले सर्व ते त्यांनी हासोनी वदले तया ॥ ४८ ॥
भगवता सभाजितः कृतासनपरिग्रहः - भगवान व्यास महर्षीने पूजिलेला व केला आहे आसनाचा स्वीकार ज्याने असा - नारायणमुखात् श्रुतं तत् - नारायण ऋषीच्या मुखाने श्रवण केलेले ते - तस्मै वर्णयामास - व्यास महर्षींना सांगिता झाला. ॥४८॥
व्यासांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. आसनावर बसल्यावर नारायणांच्या तोंडून जे काही ऐकले होते, ते सर्व नारदांनी त्यांना सांगितले. (४८)
इत्येतद् वर्णितं राजन् यन्नः प्रश्नः कृतस्त्वया ।
यथा ब्रह्मण्यनिर्देश्ये नीऋगुणेऽपि मनश्चरेत् ॥ ४९ ॥
अगोचर परब्रह्मा श्रुति त्या स्तविती कशा । मन तेथे कसे पोचे प्रश्न हा तुमचा असे ॥ ४९ ॥
राजन् - हे परीक्षित राजा - यत् त्वया नः प्रश्नः कृतः - ज्या संबंधाने तू आम्हाला प्रश्न विचारिला - इति एतत् (मया) वर्णितं - ते हे मी सांगितले आहे - श्रुतिः - श्रुति - यथा - ज्या रीतीने - अनिर्देश्ये निर्गुणे अपि ब्रह्मणि चरेत् - बोटाने अमुक म्हणून दाखविता न येणार्या निर्गुण अशाहि ब्रह्माच्या ठिकाणी अर्थबोध करिते. ॥४९॥
राजन ! मन-वाणीच्या पलिकडे असणार्या गुणरहित अशा परमात्म्यामध्ये मनाचा प्रवेश कसा होतो, हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला सांगितले. (४९)
( शार्दूलविक्रीडित )
योऽस्योत्प्रेक्षक आदिमध्यनिधने योऽव्यक्तजीवेश्वरो यः सृष्ट्वेदमनुप्रविश्य ऋषिणा चक्रे पुरः शास्ति ताः । यं सम्पद्य जहात्यजामनुशयी सुप्तः कुलायं यथा तं कैवल्यनिरस्तयोनिमभयं ध्यायेदजस्रं हरिम् ॥ ५० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे वेदस्तुति नाम सप्ताशीतितमोऽध्यायः ॥ ८७ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
( शार्दूलविक्रीडित ) आदी मध्य अंति ही हरि वसे संकल्प तोची तया । जीवा स्वामिहि जन्मताचि वसतो जीवात जन्मीहि तो । ना हो भान सुषुप्ति तैचि भजणे तो वेगळा प्राकृता । तो एको अभयो चिरंतन तया चिंता मनीं जीव हो ॥ ५० ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर सत्त्याऐंशिवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यः - जो - अस्य - ह्या जगाच्या - आदिमध्यनिधने उत्प्रेक्षकः - उत्पत्ति, रक्षण व संहार ह्या विषयीची व्यवस्था पहाणारा - यः - जो - अव्यक्त जीवेश्वरः - दृग्गोचर न होणार्या जीवांचा चालक आहे - यः - जो - इदं सृष्टवा - हे विश्व उत्पन्न करून - ऋषिणा अनुप्रविश्य - जीवासह त्यात प्रविष्ट होऊन - पुरः चक्रे - शरीरे निर्मिता झाला - ताः (च) शास्ति - आणि त्यांचे रक्षण करितो - यं संपद्य - ज्याला प्राप्त होऊन - अनुशयी - पाया पडणारा पुरुष - अजां जहाति - मायेला टाकितो - यथा सुप्तः कुलायं (जहाति) - जसा निजलेला पुरुष स्वतःच्या शरीराला टाकितो तसा - कैवल्यनिरस्तयोनिं - ब्रह्मज्ञानाने नाहीसे केले आहे मायारूप मूळकारण ज्याने अशा - अभयं तं हरिं - भय नाहीसे करणार्या त्या परमेश्वराचे - अजस्रं ध्यायेत् - सतत ध्यान करावे. ॥५०॥ सत्याऐंशीवा अध्याय समाप्त
भगवानच या विश्वाचा संकल्प करतात. तसेच त्याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी तेच असतात. प्रकृती आणि जीव या दोघांचे ते स्वामी आहेत. तेच सृष्टी निर्माण करून जीवाबरोबर हिच्यामध्ये प्रवेश करतात आणि शरीरांची निर्मिती करून तेच त्यांचे नियंत्रण करतात. गाढ झोपेत मनुष्य ज्याप्रमाणे शरीराचे अनुसंधान सोडतो, त्याचप्रमाणे ज्यांची प्राप्ती झाल्यावर मायेतून मुक्त होतो, अशा चिन्मात्र स्वरूपाने मायेचा निरास केलेल्या, संसारभय दूर करणार्या श्रीहरींचे निरंतन चिंतन करीत राहावे. (५०)
अध्याय सत्याऐंशीवा समाप्त |