श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय शाऐंशीवा

सुभद्राहरणं श्रीकृष्णस्य मिथिलागमनं तत्र बहुलाश्वश्रुतदेवयोः सद्मनि सकृदेव प्रवेशः -

सुभद्राहरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीराजोवाच -
( अनुष्टुप् )
ब्रह्मन् वेदितुमिच्छामः स्वसारं रामकृष्णयोः ।
यथोपयेमे विजयो या ममासीत् पितामही ॥ १ ॥
राजा परीक्षिताने विचारले -
( अनुष्टुप् )
द्विजची ! मजला सांगा बहीण रामकृष्णची ।
वरिली कशि त्या माझ्या प्रपिते अर्जुने तदा ॥ १ ॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्य विजयः - अर्जुन यथा - ज्याप्रकारे रामकृष्णयोः स्वसारं उपयेमे - बलराम व श्रीकृष्ण यांच्या बहिणीला वरिता झाला (तत्) वेदितुम् इच्छामः - तो प्रकार जाणण्याची आमची इच्छा आहे या मम पितामही आसीत् - जी सुभद्रा माझी आजी होती. ॥१॥
राजाने म्हटले- मुनिश्रेष्ठ ! राम-कृष्णांची बहिण व माझी आजी सुभद्रा, हिच्याशी अर्जुनाने कोणत्या प्रकारे विवाह केला, हे जाणण्याची आम्हांला इच्छा आहे. (१)


श्रीशुक उवाच -
अर्जुनस्तीर्थयात्रायां पर्यटन् अवनीं प्रभुः ।
गतः प्रभासमश्रृणोन् मातुलेयीं स आत्मनः ॥ २ ॥
दुर्योधनाय रामस्तां दास्यतीति न चापरे ।
तल्लिप्सुः स यतिर्भूत्वा त्रिदण्डी द्वारकामगात् ॥ ३ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
करीत तीर्थयात्रा तो प्रभासासी महाबळी ।
जाता मामेबहीणीचा विवाह कळला तिथे ।
दुर्योधनास तो रामो सुभद्रा देउ इच्छितो ॥ २ ॥
तात नी कृष्ण यांना ही गोष्ट ना रुचली असे ।
अर्जुनाला सुभद्रेची लालसा जाहली तदा ।
त्रिदंडी विप्रवेशाने पातले द्वारकापुरी ॥ ३ ॥

सः प्रभुः अर्जुनः - तो समर्थ अर्जुन तीर्थयात्रायां अवनीं पर्यटन् - तीर्थयात्रेसाठी पृथ्वीवर फिरत प्रभासं गतः - प्रभास क्षेत्री गेलेला आत्मनः मातुलेयीं अशृणोत् - आपल्या मामेबहिणीविषयी ऐकता झाला. ॥२॥ रामः - बलराम तां दुर्योधनाय दास्यति इति - तिला दुर्योधनाला देणार असे अपरे न (इति) च - व दुसरे देत नाहीत असे तल्लिप्सुः - त्या सुभद्रेला मिळवू इच्छिणारा सः - तो अर्जुन त्रिदण्डी यतिः भूत्वा - त्रिदण्डी संन्यासी होऊन द्वारकाम् अगात् - द्वारकेला आला. ॥३॥
श्रीशुक म्हणतात- पराक्रमी अर्जुन एकदा तीर्थयात्रेच्या निमित्ताने पृथ्वीपर्यटन करीत असता प्रभासक्षेत्री जाऊन पोहोचला. तेथे त्याने ऐकले की, आपली मामेबहीण सुभद्रा, हिचा विवाह बलराम दुर्योधनाबरोबर करू इच्छितात. पण इतर त्यांच्याशी सहमत नाहीत. अशावेळी अर्जुन, सुभद्रा आपल्याला मिळावी, म्हणून त्रिदंडी संन्याशाचा वेष घेऊन द्वारकेला पोहोचला. (२-३)


तत्र वै वार्षिकान् मासान् अवात्सीत् स्वार्थसाधकः ।
पौरैः सभाजितोऽभीक्ष्णं रामेणाजानता च सः ॥ ४ ॥
रामाच्यासह सर्वांनी तयांना पूजिले बहू ।
चार मास तिथे होते कोणी ना ओळखी ययां ॥ ४ ॥

(तं) अजानता रामेण - त्याला न ओळखणार्‍या बलरामाकडून पौरैः (च) अभीक्ष्णं सभाजितः - आणि नगरांतील लोकांकडून वारंवार पूजिलेला सः - तो अर्जुन तत्र च वै - त्याच ठिकाणी स्वार्थसाधकः - स्वार्थ साधणारा असा वार्षिकान् मासान् अवात्सीत् - पावसाळ्याचे चार महिने राहिला. ॥४॥
आपली इच्छा पुरी करून घेण्यासाठी अर्जुन तेथे पावसाळ्याचे चार महिने राहिला. तेथे नगरवासीयांनी आणि तो अर्जुन आहे, हे न कळलेल्या बलरामांनी त्याचा चांगला आदरसत्कार केला. (४)


एकदा गृहमानीय आतिथ्येन निमंत्र्य तम् ।
श्रद्धयोपहृतं भैक्ष्यं बलेन बुभुजे किल ॥ ५ ॥
आतिथ्या एकदा रामे श्रद्धेने आपुल्या घरां ।
आणिले, जाहले प्रेमे श्रेष्ठ भोजनही तिथे ॥ ५ ॥

एकदा - एके दिवशी आतिथ्येन निमन्त्र्य - अतिथि सत्काराने आमंत्रण देऊन तं गृहम् आनीय - त्याला घरी आणून बलेन श्रद्धया उपहृतं भैक्ष्यं - बलरामाने श्रद्धेने जवळ आणलेल्या भक्ष्य पदार्थाला किल बुभुजे - खरोखर सेविता झाला. ॥५॥
त्याचे अतिथ्य करावे, म्हणून एकदा बलरामांनी त्याला घरी आमंत्रित केले. तेथे बलरामांनी अत्यंत श्रद्धेने वाढलेली भिक्षा त्याने ग्रहण केली. (५)


सोऽपश्यत्तत्र महतीं कन्यां वीरमनोहराम् ।
प्रीत्युत्फुल्लेक्षणस्तस्यां भावक्षुब्धं मनो दधे ॥ ६ ॥
उपवर अशी पार्थे सुभद्रा पाहिली तदा ।
प्रफुला जाहले चित्ती वरण्या ठरवीयले ॥ ६ ॥

प्रीत्युत्फुल्लेक्षणः - प्रेमाने प्रफुल्लित झाले आहेत नेत्र ज्याचे असा सः - तो अर्जुन तत्र - तेथे वीरमनोहरां महतीं कन्यां - वीरांना मनोहर अशा त्या मोठया कन्येला अपश्यत् - पहाता झाला तस्यां भावक्षुब्धं मनः दधे - त्या कन्येच्या ठिकाणी प्रेमाने क्षुब्ध झालेले मन ठेविता झाला. ॥६॥
अर्जुनाने तेथे वीरांचे मन मोहित करणार्‍या उपवर सुभद्रेला पाहिले. अर्जुनाचे डोळे प्रेमाने प्रफुल्लित झाले. प्रेम जागृत झालेले मन तिच्या ठायी जडले. (६)


सापि तं चकमे वीक्ष्य नारीणां हृदयंगमम् ।
हसन्ती व्रीडितापाङ्गी तन्न्यस्तहृदयेक्षणा ॥ ७ ॥
देखणे पार्थरूपो ते स्त्रियांच्या हृदयी भिडे ।
सुभद्रा हासुनी चित्ती अर्पिजे हृदयो तयां ॥ ७ ॥

हसन्ती व्रीडितापाङ्गी तन्न्यस्तहृदयेक्षणा - हसत, लज्जेने कटाक्ष फेकीत ठेविले आहे त्याच्या ठिकाणी आपले अंतःकरण जीने अशी सा अपि - ती सुभद्रासुद्धा नारीणां हृदयंगमम् तं वीक्ष्य - स्त्रियांच्या हृदयाला आनंद देणार्‍या त्या अर्जुनाला पाहून चकमे - इच्छिती झाली. ॥७॥
स्त्रियांना आवडणार्‍या त्याला पाहिल्यावर सुभद्रेचेसुद्धा मन त्याच्यावर जडले. आणि ती थोडीशी हसून लाजर्‍या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. (७)


तां परं समनुध्यायन् नन्तरं प्रेप्सुरर्जुनः ।
न लेभे शं भ्रमच्चित्तः कामेनातिबलीयसा ॥ ८ ॥
तिच्यासी लागले चित्त हराया संधि पाहती ।
अस्वस्थ चित्त ते झाले न शांती लाभली मुळी ॥ ८ ॥

तां परं समनुध्यायन् - त्या सुभद्रेचे सारखे चिंतन करीत (तस्याः हरणाय) अन्तरं प्रेप्सुः - तिचे हरण करण्याची संधि पहाणारा अर्जुनः - अर्जुन अतिबलीयसा कामेन भ्रमच्चित्तः - अत्यंत बळकट अशा कामाने ज्याचे अन्तःकरण भ्रमिष्ठासारखे झाले आहे असा शं न लेभे - सुख मिळविता झाला नाही. ॥८॥
आता अर्जुन फक्त तिचेच चिंतन करू लागला. आणि तिला पळवून मिळवण्याची संधी शोधू लागला. सुभद्रेला प्राप्त करण्याच्या उत्कट इच्छेने त्याचे चित्त सैरभैर झाले. त्याला थोडीसुद्धा शांती मिळेनाशी झाली. (८)


महत्यां देवयात्रायां रथस्थां दुर्गनिर्गतां ।
जहारानुमतः पित्रोः कृष्णस्य च महारथः ॥ ९ ॥
रथाने एकदा प्रीया निघता देवदर्शना।
सासू नि सासरे यांना तसेच कृष्णजीस ही ।
पार्थाने पुसले तैसे सुभद्रा हरिली तदा ॥ ९ ॥

महारथः - महारथी अर्जुन (तस्याः) पित्रोः कृष्णस्य च अनुमतः - तिचे आईबाप वसुदेव, देवकी व कृष्ण ह्यांनी संमति दिलेला महत्यां देवयात्रायां - मोठया देवयात्रेच्या प्रसंगी रथस्थां दुर्गनिर्गतां (तां) जहार - रथात बसलेल्या व त्या किल्ल्यातून बाहेर पडलेल्या त्या सुभद्रेला हरिता झाला. ॥९॥
सुभद्रा एकदा देवाच्या मोठ्या जत्रेसाठी रथार बसून द्वारकेच्या बाहेर पडली. त्याचवेळी महारथी अर्जुनाने देवकी- वसुदेव आणि श्रीकृष्णांच्या संमतीने, सुभद्रेचे अपहरण केले. (९)


रथस्थो धनुरादाय शूरांश्चारुन्धतो भटान् ।
विद्राव्य क्रोशतां स्वानां स्वभागं मृगराडिव ॥ १० ॥
रोधिण्या पातता सैन्य धनुष्यें ठिकिले तयां ।
स्वजन रडले तेंव्हा नेई हा सिंहभाग जै ॥ १० ॥

रथस्थः (सः) - रथात बसलेला अर्जुन धनुः आदाय - धनुष्य घेऊन मृगराट् स्वभागम् इव - सिंह आपला भाग नेतो तसा आरुन्धतः शूरान् भटान् विद्राव्य - सर्व बाजूंनी अडविणार्‍या पराक्रमी योद्‌ध्यांना पळवून स्वानां क्रोशताम् - आपले बांधव यादव आक्रोश करीत असता (तां) जहार - त्या सुभद्रेला हरिता झाला. ॥१०॥
वीर अर्जुनाने रथावर स्वार होऊन धनुष्य हातात घेतले आणि जे सैनिक त्याला अडविण्यासाठी आले, त्यांना पिटाळून लावले. इकडे सुभद्रेचे आप्तेष्ट ओरडत असताना ज्याप्रमाणे सिंह आपली शिकार घेऊन जातो, त्याप्रमाणे अर्जुनाने सुभद्रेला नेले. (१०)


तच्छ्रुत्वा क्षुभितो रामः पर्वणीव महार्णवः ।
गृहीतपादः कृष्णेन सुहृद्‌भिश्चानुसाम्यत ॥ ११ ॥
प्रक्षुब्ध जाहले राम समुद्रा भरती जशी ।
कृष्णाने धरिले पाय काढिली समजूतही ॥ ११ ॥

तत् श्रुत्वा - ते ऐकून पर्वणि (क्षुभितः) महार्णवः इव - पर्वदिवशीच्या खवळलेल्या महासागराप्रमाणे क्षुभितः रामः - संतापलेला बलराम कृष्णेन सुहृद्‌भिः च गृहीतपादः - कृष्णाने व स्नेहीमंडळींनी ज्याचे पाय धरले आहेत असा अन्वशाम्यत - हळू हळू शांत झाला. ॥११॥
हे ऐकून, पौर्णिमेच्या दिवशी समुद्र जसा खवळतो, त्याप्रमाणे बलराम खवळून उठले. परंतु श्रीकृष्णांनी आणि बांधवांनी त्यांचे पाय धरून त्यांची समजूत घातली, तेव्हा ते शांत झाले. (११)


प्राहिणोत्पारिबर्हाणि वरवध्वोर्मुदा बलः ।
महाधनोपस्करेभ रथाश्वनरयोषितः ॥ १२ ॥
पुन्हा प्रसन्न होवोनी रामे हत्ती नि अश्व ते ।
दिधली धन सामग्री आहेर म्हणुनी तदा ॥ १२ ॥

बलः - बलराम महाधनोपस्करेभरथाश्वनरयोषितः - मौल्यवान साहित्य, हत्ती, रथ, घोडे, दासदासी पारिबर्हाणि - आंदण म्हणून वरवध्वोः मुदा प्राहिणोत् - वधुवरांकडे आनंदाने पाठविता झाला. ॥१२॥
बलरामांनी नंतर वरदक्षिणा म्हणून वधू-वरांसाठी पुष्कळसे धन, अन्य सामग्री, हत्ती, रथ, घोडे आणि दास- दासी पाठविल्या. (१२)


श्रीशुक उवाच -
कृष्णस्यासीद् द्विजश्रेष्ठः श्रुतदेव इति श्रुतः ।
कृष्णैकभक्त्या पूर्णार्थः शान्तः कविरलम्पटः ॥ १३ ॥
स उवास विदेहेषु मिथिलायां गृहाश्रमी ।
अनीहयागताहार्य निर्वर्तितनिजक्रियः ॥ १४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव कुणी द्विज ।
कृष्णभक्त तसा शांत विरक्त ज्ञानिही असे ॥ १३ ॥
संसारी असुनी राही निवांत बसुनी सदा ।
लाभले थोडके त्यात भागवी चरितार्थ तो ॥ १४ ॥

कृष्णैकभक्त्या पूर्णार्थः - एकटया श्रीकृष्णाच्याच ठिकाणी भक्ति ठेविल्यामुळे ज्याचा मनोरथ सफल झाला आहे असा शान्तः कविः अलम्पटः - शांत, ज्ञानी, विषयांवर आसक्ति न ठेवणारा श्रुतदेव इति श्रुतः द्विजश्रेष्ठः - श्रुतदेव या नावाने प्रसिद्ध असा थोर ब्राह्मण कृष्णस्य (भक्तः) आसीत् - श्रीकृष्णाचा भक्त होता. ॥१३॥ गृहाश्रमी सः - गृहस्थाश्रमी असा तो श्रुतदेव अनीहया आगताहार्यनिर्वर्तितनिजक्रियः - प्रयत्‍नावाचून प्राप्त झालेल्या अन्नसामग्रीने पार पाडिल्या आहेत आपल्या क्रिया ज्याने असा विदेहेषु मिथिलायां उवास - विदेह देशात मिथिला नगरीत रहात असे. ॥१४॥
श्रीशुक म्हणतात- विदेहाची राजधानी मिथिला नगरीमध्ये श्रुतदेव नावाचा एक गृहस्थाश्रमी श्रेष्ठ ब्राह्मण श्रीकृष्णांचा परम भक्त होता. तो फक्त भगवद्भक्ती करूनच पूर्णमनोरथ, शांत, ज्ञानी आणि विरक्त होता. तो कोणत्याही प्रकारचा उद्योग न करता जे काही अनायसे मिळेल, त्यावरच आपला निर्वाह चालवी. (१३-१४)


यात्रामात्रं त्वहरहः दैवाद् उपनमत्युत ।
नाधिकं तावता तुष्टः क्रिया चक्रे यथोचिताः ॥ १५ ॥
प्रारब्धे नित्य त्या लाभे निर्वाहा पुरतेच की ।
संतुष्ट तो असे त्यात वर्ण - धर्म परायण ॥ १५ ॥

उत तु - आणि असे की अहरहः - प्रतिदिवशी दैवात् - सुदैवाने यात्रामात्रं - शरीराच्या निर्वाहापुरते (तम्) उपनमति - त्याला मिळत असे अधिकं न - अधिक मिळत नसे तावताः तुष्टः - तेवढ्याने संतुष्ट झालेला यथोचिताः क्रियाः चक्रे - यथायोग्य क्रिया करीत असे. ॥१५॥
दररोज त्याला प्रारब्धानुसार उदरनिर्वाहासाठी पुरेशी सामग्री मिळत असे. त्यापेक्शा अधिक मिळस नसे. पण तो त्यातच संतुष्ट राही आणि आपल्या वर्णाश्रमानुसार योग्य ती धर्मकर्मे करीत असे. (१५)


तथा तद्‌राष्ट्रपालोऽङ्ग बहुलाश्व इति श्रुतः ।
मैथिलो निरहम्मान उभावप्यच्युतप्रियौ ॥ १६ ॥
निरहंकारि नी भक्त द्विजांचा बहुलाश्व हा ।
नृप नी श्रुतदेवो हे द्वयही कृष्णभक्तची ॥ १६ ॥

अङग - हे राजा तथा - त्याचप्रमाणे तद्राष्ट्रपालः - त्या देशाचा राजा बहुलाश्वः इति श्रुतः - बहुलाश्व नावाने प्रसिद्ध असा मैथिलः - जनकाचा वंशज निरहंमानः (आसीत्) - अहंकाररहित होता उभौ अपि अच्युतप्रियौ - दोघेहि श्रीकृष्णावर प्रेम करणारे होते. ॥१६॥
परीक्षिता ! तसाच, त्या देशाचा बहुलाश्व नावाचा राजासुद्धा निरहंकारी होता. हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रिय भक्त होते. (१६)


तयोः प्रसन्नो भगवान् दारुकेणाहृतं रथम् ।
आरुह्य साकं मुनिभिः विदेहान् प्रययौ प्रभुः ॥ १७ ॥
एकदा भगवान् कृष्ण प्रसन्न जाहले द्वया ।
रथात बसुनी गेले दारुकासह मैथिलीं ॥ १७ ॥

तयोः प्रसन्नः भगवान् प्रभुः - त्या दोघांवर प्रसन्न झालेला भगवान श्रीकृष्ण मुनिभिः साकं - ऋषींसह दारुकेण आहृतं रथं आरुह्य - दारुक सारथ्याने आणिलेल्या रथात बसून विदेहान् प्रययौ - विदेह देशाला गेला. ॥१७॥
श्रीकृष्णांनी त्या दोघांवरही प्रसन्न होऊन एके दिवशी दारुकाला सांगून आपला रथ मागविला आणि त्यात बसून ते विदेह देशाकडे जाण्यास निघाले. (१७)


नारदो वामदेवोऽत्रिः कृष्णो रामोऽसितोऽरुणिः ।
अहं बृहस्पतिः कण्वो मैत्रेयश्च्यवनादयः ॥ १८ ॥
नारदो वामदेवो नी परशूराम आरुणी ।
असितो अत्रि नी व्यास च्यवनो नि बृहस्पती ।
मैत्रेय कणव नी मीही होतो त्यांच्या सवे तिथे ॥ १८ ॥

नारदः वामदेवः अत्रिः कृष्णः रामः असितः अरुणिः - नारद, वामदेव, अत्रि, व्यास, परशुराम, असित, अरुणि अहं बृहस्पतिः कण्वः मैत्रेयः च्यवनादयः - मी शुक, बृहस्पति, कण्व, मैत्रेय व च्यवन आदिकरून ऋषि. ॥१८॥
भगवंतांच्याबरोबर नारद, वामदेव, अत्री, वेदव्यास, परशुराम, असित, आरुणी, मी, बृहस्पती, कण्व, मैत्रेय, च्यवन इत्यादी ऋषीसुद्धा होते. (१८)


तत्र तत्र तमायान्तं पौरा जानपदा नृप ।
उपतस्थुः सार्घ्यहस्ता ग्रहैः सूर्यमिवोदितम् ॥ १९ ॥
पूजिती ठायि ठायि तै तेथले नागरीक ते ।
सूर्यनारायणा ऐसे लोकांना कृष्ण वाटती ॥ १९ ॥

नृप - हे परीक्षित राजा जानपदाः पौराः - देशात व नगरात रहाणारे लोक सार्घ्यहस्ताः - हातात पूजासाहित्य घेतलेले ग्रहैः (सह) उदितं सूर्यम् इव - ग्रहांसह उगवलेल्या सूर्याला नमस्कार करावा त्याप्रमाणे आयान्तं तं तत्र तत्र उपतस्थुः - आलेल्या श्रीकृष्णाला ठिकठिकाणी नमस्कार करिते झाले. ॥१९॥
परीक्षिता ! ते जेथे जेथे जाऊन पोहोचत, तेथे तेथे तेथील नागरिक आणि ग्रामवासी, ग्रहांच्याबरोबर असलेल्या उगवत्या सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे, तसे हातात पूजेचे साहित्य घेऊन उपस्थित असत. (१९)


( वसंततिलका )
आनर्तधन्वकुरुजाङ्गलकङ्कमत्स्य
     पाञ्चालकुन्तिमधुकेकयकोशलार्णाः ।
अन्ये च तन्मुखसरोजमुदारहास
     स्निग्धेक्षणं नृप पपुर्दृशिभिर्नृनार्यः ॥ २० ॥
( वसंततिलका )
आनर्त धन्व कुरुजांगल कंक मत्स्य
     पांचाल कुंति मधु केकय कोसलार्ण ।
मुखारविंद रसपान करूनि घाले
     उन्मुक्त हास्य हरिच्या बघुनी मुखाला ॥ २० ॥

नृप - हे परीक्षित राजा आनर्तधन्वकुरुजाङगलकंकमत्स्यपाञ्चालकुन्तिमधुकेकयकोसलार्णाः - आनर्त, धन्व, कुरु, जांगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधु, केकय, कोसल व अर्ण ह्या देशांतील नृनार्यः - पुरुष व स्त्रिया अन्ये च - आणि दुसरे कित्येक उदारहासस्निग्धेक्षणं तन्मुखसरोजं - गंभीर हास्य व प्रेमळ अवलोकन करणार्‍या श्रीकृष्णाच्या मुखकमळाला दृशिभिः पपुः - नेत्रांनी प्राशिते झाले. ॥२०॥
परीक्षिता ! त्या प्रवासात आनर्त, धन्व, कुरु-जांगल, कंक, मत्स्य, पांचाल, कुंती, मधू, केकय, कोसल, अर्ण इत्यादी अनेक देशांतील स्त्री-पुरुष भगवान श्रीकृष्णांच्या मुक्त हास्य आणि प्रेमपूर्ण नजरेने युक्त असे मुखकमल डोळे भरून पाहात असत. (२०)


तेभ्यः स्ववीक्षणविनष्टतमिस्रदृग्भ्यः
     क्षेमं त्रिलोकगुरुरर्थदृशं च यच्छन् ।
श्रृणवन् दिगन्तधवलं स्वयशोऽशुभघ्नं
     गीतं सुरैर्नृभिरगात् शनकैर्विदेहान् ॥ २१ ॥
अज्ञान दृष्टि सरली बघता हरीला
     कल्याण ज्ञान करि दानचि चालता हो ।
नी ठा‍इ ठाइ अपुली निज कीर्ति ऐके
     वैदेहि देशि हरि हा त‍इ पातला की ॥ २१ ॥

स्ववीक्षणविनष्टतमिस्रदृग्भ्यः - आपल्या अवलोकनाने नष्ट झाला आहे अंधकार जीचा अशी दृष्टी आहे ज्यांची अशा तेभ्यः - त्या लोकांना क्षेमं अर्थदृशं च यच्छन् - अभय व तत्त्वज्ञान देणारा त्रिलोकगुरुः - त्रैलोक्याचा गुरु असा श्रीकृष्ण दिगन्तधवलं अशुभघ्नं च - सर्व दिशांना प्रकाशित करणार्‍या व पापनाश करणार्‍या सुरैः नृभिः गीतम् - देव व मनुष्य यांनी गायिलेल्या स्वयशः - आपल्या कीर्तीला शृण्वन् - श्रवण करीत शनकैः विदेहान् अगात्- हळू हळू विदेह देशाला गेला. ॥२१॥
त्रिलोकगुरु भगवान श्रीकृष्ण आपल्या दर्शनाने त्या लोकांची अज्ञानदृष्टी नाहीशी करून, त्यांना ज्ञान देऊन त्यांचे परम कल्याण करीत चालले होते. जी सर्व दिशांना उजळून टाकणारी आणि सर्व अशुभांचा नाश करणारी आहे, अशा कीर्तीचे गायन, जागोजागी माणसे आणि देव करीत होते. ते ऐकत श्रीकृष्ण हळू हळू विदेह देशात जाऊन पोहोचले. (२१)


( अनुष्टुप् )
तेऽच्युतं प्राप्तमाकर्ण्य पौरा जानपदा नृप ।
अभीयुर्मुदितास्तस्मै गृहीतार्हणपाणयः ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
ऐकता कृष्णवार्ता ती हर्षला पार ना उरे ।
सर्वची लोक तेथीचे पातले पूजनार्थ तै ॥ २२ ॥

नृप - हे परीक्षित राजा ते जानपदाः पौराः - ते विदेह देशात व मिथिलेत रहाणारे लोक अच्युतं प्राप्तम् आकर्ण्य - श्रीकृष्णाला आला आहे असे ऐकून गृहीतार्हणपाणयः - हातात भेटीच्या वस्तू घेतलेले असे मुदिताः तस्मै अभीयुः - आनंदित होऊन त्याला सामोरे गेले. ॥२२॥
परीक्षिता ! भगवान श्रीकृष्णांच्या शुभागमनाची बातमी ऐकून नागरिक आणि ग्रामवासी आनंदाने हातात पूजेचे साहित्य घेऊन त्यांचे स्वागत करण्यासाठी सामोरे येत. (२२)


दृष्ट्वा त उत्तमःश्लोकं प्रीत्युत्फुलाननाशयाः ।
कैर्धृताञ्जलिभिर्नेमुः श्रुतपूर्वान् तथा मुनीन् ॥ २३ ॥
कृष्णाला पाहता त्यांची खुलली हृदये तदा ।
तदाचि नमिले त्यांनी कृष्ण नी नवखे ऋषी ॥ २३ ॥

ते - ते लोक श्रुतपूर्वान् मुनीन् - पूर्वोक्त ऋषींना तथा - त्याचप्रमाणे उत्तमश्‍लोकं दृष्टवा - श्रेष्ठ कीर्तीच्या श्रीकृष्णाला पाहून प्रीत्युत्फुल्लाननाशयाः - प्रेमाने ज्यांची मुखे आनंदित झाली आहेत असे धृताञ्जलिभिः कैः - हात जोडलेल्या मस्तकांनी नेमुः - नमस्कार करिते झाले. ॥२३॥
भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन त्यांचे हॄदय आणि चेहरे आनंदाने प्रफुल्लित होत. ते भगवंतांना आणि ज्यांचे फक्त नाव ऐकले होते, त्या मुनींना हात जोडून, मस्तक लववून नमस्कार करीत. (२३)


स्वानुग्रहाय सम्प्राप्तं मन्वानौ तं जगद्‌गुरुम् ।
मैथिलः श्रुतदेवश्च पादयोः पेततुः प्रभोः ॥ २४ ॥
अनुग्रहार्थ हे आले म्हणोनी ते लवंडुनी ।
बहुलाश्व श्रुतदेवो हरीच्या पायि लागले ॥ २४ ॥

तं जगद्‌गुरुं - त्या त्रैलोक्याधिपति श्रीकृष्णाला स्वानुग्रहाय संप्राप्तं मन्वानौ - आपल्यावर अनुग्रह करण्यासाठी आलेला मानणारे मैथिलः श्रुतदेवः च - मिथिलाधिपति बहुलाश्व व श्रुतदेव प्रभोः पादयोः पेततुः - श्रीकृष्णाच्या पाया पडले. ॥२४॥
जगद्‌गुरु भगवान श्रीकृष्ण आपल्यावर कृपा करण्यासाठी आलेले आहेत, असे पाहून बहुलाश्व आणि श्रुतदेव यांनी त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले. (२४)


न्यमन्त्रयेतां दाशार्हं आतिथ्येन सह द्विजैः ।
मैथिलः श्रुतदेवश्च युगपत् संहताञ्जली ॥ २५ ॥
द्वयांनी हरिसी आणि तसेचि मुनिमंडळा ।
आतिथ्य ते स्विकाराया हात जोडोनि प्रार्थिती ॥ २५ ॥

मैथिलः श्रुतदेवः च - मिथिलाधिपति बहुलाश्व व श्रुतदेव सहताञ्जलीः - हात जोडून द्विजेः सह - ब्राह्मणांसह दाशार्हं - श्रीकृष्णाला आतिथ्येन युगपत् न्यमन्त्रयेतां - अतिथिसत्कारार्थ एकाच वेळी निमंत्रण देते झाले. ॥२५॥
बहुलाश्व आणि श्रुतदेव या दोघांनीही एकाच वेळी हात जोडून मुनींसह श्रीकृष्णांना आपल्याकडून अतिथ्य स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. (२५)


भगवान् तदभिप्रेत्य द्वयोः प्रियचिकीर्षया ।
उभयोराविशद्‌ गेहं उभाभ्यां तदलक्षितः ॥ २६ ॥
स्वीकार करिता कृष्णा दोघांच्या घरि एकची ।
समया रूप तो घेता गेले ते नकळे कुणा ॥ २६ ॥

भगवान् - श्रीकृष्ण तदभिप्रेत्य - त्यांचा अभिप्राय जाणून द्वयोः प्रियचिकीर्षया - दोघांचे प्रिय करण्याच्या इच्छेने उभाभ्यां - दोन रूपांनी तदलक्षितः - त्यांनी न पाहिलेला असा उभयोः गेहं आविशत् - दोघांच्या घरात शिरला. ॥२६॥
दोघांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्ण दोघांनाही संतुष्ट करण्यासाठी एकाच वेळी वेगवेगळी रूपे धारण करून त्यांच्या नकळत दोघांच्याही घरी गेले. (२६)


श्रोतुमप्यसतां दूरान् जनकः स्वगृहागतान् ।
आनीतेष्वासनाग्र्येषु सुखासीनान् महामनाः ॥ २७ ॥
प्रवृद्धभक्त्या उद्धर्ष हृदयास्राविलेक्षणः ।
नत्वा तदङ्‌घ्रीन् प्रक्षाल्य तदपो लोकपावनीः ॥ २८ ॥
सकुटुम्बो वहन्मूर्ध्ना पूजयां चक्र ईश्वरान् ।
गन्धमाल्याम्बराकल्प धूपदीपार्घ्यगोवृषैः ॥ २९ ॥
उदार बहुलाश्वाने दुष्टमर्दन कृष्ण नी ।
पूजिले ऋषि ते सर्व आसनी बैसवीयले ॥ २७ ॥
हृदयी भरले प्रेम सर्वांचे पाय धूउनी ।
तीर्थ ते घेतले माथीं गंध माला नि वस्त्र ते ॥ २८ ॥
धूप दीपादि अर्पोनी धन नी बैल गायि ही ।
अलंकारादि अर्पोनी सर्वांना पूजिले असे ॥ २९ ॥

महामनाः जनकः - थोर मनाचा बहुलाश्व राजा असतां श्रोतुं अपि दूरान् - दुर्जनांना ऐकावयासहि दूर असलेल्या अशा स्वगृहागतान् - आपल्या घरी आलेल्या आनीतेषु आसनाग्र्येषु - आणिलेल्या श्रेष्ठ आसनांवर सुखासीनान् - सुखाने बसलेल्या (मुनीन्) नत्वा - ऋषींना नमस्कार करून प्रवृद्धभक्त्या - वाढलेल्या भक्तीने उद्धर्षहृदयास्राविलेक्षणः - उचंबळला आहे हर्ष ज्यात असे आहे हृदय ज्याचे व अश्रूंनी भरून गेले आहेत नेत्र ज्याचे असा तदङ्‌घ्रीन् प्रक्षाल्य - त्याचे पाय धुवून लोकपावनीः तदपः - लोकांना पवित्र करणारी ती उदके सकुटुम्बः मूर्ध्ना वहन् - कुटुंबासह धारण करणारा असा गन्धमाल्याम्बराकल्पधूपदीपार्घगोवृषैः - गंध, फुले, वस्त्रे, भूषणे, वेष, धूप, दीप, पूजासाहित्य, गाई, बैल ह्यांनी ईश्वरान् पूजयांचक्रे - समर्थ अशा सर्वांचे पूजन करिता झाला. ॥२७-२९॥
विदेहराज बहुलाश्व अतिशय बुद्धिमान होता. दुर्जनांना ज्यांचे नावसुद्धा ऐकू येणे कठीण तेच भगवान श्रीकृष्ण आणि ऋषी आपल्या घरी आले आहेत, हे पाहून बहुलाश्वाने सुंदर सुंदर आसने आणवून त्यांना आरामात त्यावर बसविले. प्रेमभक्तीच्या उद्रेकाने त्याचे हृदय भरून आले. नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्य. त्याने त्या अतिथींच्या चरणांना नमस्कार करून त्यांचे पाय धुतले आणि आपल्या कुटुंबियांसह लोकांना पावन करणारे त्यांच्या चरणांचे तीर्थ मस्तकी धारण केले. नंतर भगवान तसेच भगवत्स्वरूप ऋषींना, गंध, पुष्पमाळा, वस्त्रे, अलंकार, धूप, दीप, अर्घ्य, गाई, बैल इत्यादी समर्पण करून त्यांची पूजा केली. (२७-२९)


वाचा मधुरया प्रीणन् इदमाहान्नतर्पितान् ।
पादावङ्कगतौ विष्णोः संस्पृशञ्छनकैर्मुदा ॥ ३० ॥
सर्वांची भोजने झाली पोटासी कृष्णपाय ते ।
धरोनी चेपिता बोले नृप तो स्तुति ही करी ॥ ३० ॥

विष्णोः अङकगतौ (कृष्णस्य) पादौ मुदा शनकैः संस्पृशन् - मांडीवर घेतलेले श्रीकृष्णाचे पाय आनंदाने हळूहळू चेपीत अन्नतर्पितान् (तान्) प्रीणन् - अन्नाने तृप्त झालेल्या त्यांना प्रसन्न करीत मधुरया वाचा इदं आह - मधुर वाणीने असे म्हणाला. ॥३०॥
जेव्हा सर्वजण भोजन करून तृप्त झाले, तेव्हा राजाने श्रीकृष्णांचे चरण आपल्या मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने हळू हळू पाय चेपीत, अत्यंत मधुर वाणीने तो भगवंतांची स्तुती करू लागला. (३०)


श्रीबहुलाश्व उवाच -
भवान्हि सर्वभूतानां आत्मा साक्षी स्वदृग् विभो ।
अथ नस्त्वत्पदाम्भोजं स्मरतां दर्शनं गतः ॥ ३१ ॥
राजा बहुलाश्व म्हणाला -
सर्वात्मा साक्षि नी तेज सर्व जीवास तू प्रभो ।
चिंतितो नित्य या पाया म्हणोनी धन्यता मिळे ॥ ३१ ॥

विभो - हे परमेश्वरा भवान् हि - तू खरोखर सर्वभूतानाम् आत्मा - सर्व प्राण्यांचा अंतर्यामी साक्षी स्वदृक् (अस्ति) - प्रकाशक व स्वयंप्रकाश आहेस अथ - म्हणून त्वत्पदाम्भोजं स्मरतां नः (त्वं) दर्शनं गतः - तुझ्या चरणकमळाला स्मरण करणार्‍या आमच्या तू दृष्टीस पडलास. ॥३१॥
राजा म्हणाला- हे प्रभो ! आपण सर्व प्राण्यांचे आत्मा, साक्षी तसेच स्वयंप्रकाश आहात. आपल्या चरणकमलांचे स्मरण करणार्‍या आम्हांला आज आपण दर्शन देऊन कृतार्थ केले. (३१)


स्ववचस्तदृतं कर्तुं अस्मद्‌दृग्गोचरो भवान् ।
यदात्थैकान्तभक्तान् मे नानन्तः श्रीरजः प्रियः ॥ ३२ ॥
तुम्हीच म्हणता की ते बलराम स्वरूप मी ।
रमा ब्रह्मा ययांहून भक्त ते मजला प्रिय ।
कराया सत्य ते शब्द पातले आज हे असे ॥ ३२ ॥

एकान्तभक्तात् - एकनिष्ठ भक्तापेक्षा अनन्तः श्रीः अजः - शेष, लक्ष्मी, ब्रह्मदेव मे प्रियः न - मला प्रिय नाही (इति त्वं) यत् आत्थ - असे तू जे बोलला आहेस तत् स्ववचः - ते आपले बोलणे ऋतं कर्तुम् - सत्य करण्याकरिता भवान् - तु अस्मदृग्गोचरः (अभवत्) - आमच्या दृष्टिपथात आलास. ॥३२॥
माझ्या अनन्य भक्तापेक्षा मला बलराम, लक्ष्मी किंवा ब्रह्मदेव हेही प्रिय नाहीत हे आपले वचन सत्य करण्यासाठीच आपण आम्हांला दर्शन दिले आहे. (३२)


को नु त्वच्चरणाम्भोजं एवंविद् विसृजेत् पुमान् ।
निष्किञ्चनानां शान्तानां मुनीनां यस्त्वमात्मदः ॥ ३३ ॥
ममता पाहुनी कोण त्यजील पदपंकजा ।
सर्वस्व त्यागिती त्यांना अर्पिसी तू स्वतास ही ॥ ३३ ॥

एवंवित् कः नु पुमान् - हे जाणणारा कोणता बरे पुरुष त्वच्चरणाम्भोजं विसृजेत् - तुझ्या चरणकमळाला सोडून देईल यः त्वं - जो तू निष्किञ्चनानां शान्तानां मुनीनां - सर्वसंगपरित्यागी व शांत अशा ऋषींना आत्मदः (असि) - आत्मज्ञान देणारा आहेस. ॥३३॥
ज्यांनी जगातील सर्व वस्तूंचा त्याग केला आहे, अशा शांत मुनींना जे स्वत:लासुद्धा देऊन टाकतात, अशा आपल्या चरणकमलांचा कोण बरे त्याग करील ? (३३)


योऽवतीर्य यदोर्वंशे नृणां संसरतामिह ।
यशो वितेने तच्छान्त्यै त्रैलोक्यवृजिनापहम् ॥ ३४ ॥
अवतार यदुवंशी घेवोनी यश हे असे ।
विस्तारिलेस जेणे की प्राण्यांना शुद्ध ते करी ॥ ३४ ॥

यः यदोः वंशे अवतीर्य - जो यदुवंशात अवतार घेऊन इह संसरतां नृणां - येथे जन्ममरणरूपी संसारचक्रात फिरणार्‍या मनुष्यांच्या तच्छान्त्यै - त्या संसाराच्या शान्तीसाठी त्रैलोक्यवृजिनापहं यशः वितेने - त्रैलोक्याचे पाप नष्ट करणारे यश पसरिता झाला. ॥३४॥
ज्या आपण यदुवंशात अवतार घेऊन, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात सापडलेल्यांना मुक्त करण्यासाठी जगामध्ये आपल्या विशुद्ध यशाचा विस्तार केला आहे की, जो त्रैलोक्याचे पाप-ताप शांत करणारा आहे. (३४)


नमस्तुभ्यं भगवते कृष्णायाकुण्ठमेधसे ।
नारायणाय ऋषये सुशान्तं तप ईयुषे ॥ ३५ ॥
नमस्ते भगवंताला ब्रह्माला कृष्णरूपसा ।
सच्चिदानंद रूपाला माझा हा प्रणिपात हो ।
नारायणरुपे विश्व शांत्यार्थ तप मांडिले ॥ ३५ ॥

अकुण्ठमेधसे - कोठेहि न अडणारी आहे धारणाशक्ति ज्याची अशा नारायणाय ऋषये - नारायण ऋषि या नावाने प्रसिद्ध असलेला सुशान्तं तपः ईयुषे - अत्यंत शांत रीतीने तप करणार्‍या भगवते कृष्णाय तुभ्यं नमः - भगवान श्रीकृष्ण अशा तुला नमस्कार असो. ॥३५॥
ज्यांचे ज्ञान अनंत आहे, जे परम शांती स्थापन करण्यासाठी नारायण-ऋषींच्या रूपात तपश्चर्या करीत आहेत, त्या भगवान श्रीकृष्णांना मी नमस्कार करीत आहे. (३५)


दिनानि कतिचिद्‌ भूमन् गृहान् नो निवस द्विजैः ।
समेतः पादरजसा पुनीहीदं निमेः कुलम् ॥ ३६ ॥
अनंता सर्वव्यापी तू मुनिंच्या सहही इथे ।
रहावे कांहि ते वार तारावा निमिवंश हा ॥ ३६ ॥

भूमन् - हे विश्वव्यापका द्विजैः समेतः - ब्राह्मणांसह कतिचित् दिनानि नः गृहान् निवस - कित्येक दिवस आमच्या घरी रहा पादरजसा (च) इदं निमेः कुलं पुनीहि - आणि चरणधूलीने ह्या निमिवंशाला पवित्र कर. ॥३६॥
हे अनंता ! मुनिवर्यांसह आपण काही दिवस आमच्या येथे राहावे आणि आपल्या चरणधुळीने हा निमिवंश पवित्र करावा. (३६)


इत्युपामन्त्रितो राज्ञा भगवान् लोकभावनः ।
उवास कुर्वन् कल्याणं मिथिलानरयोषिताम् ॥ ३७ ॥
प्रार्थना ऐकुनी ऐसी राहिले कृष्ण ते तिथे ।
मिथिला नरनारिंच्या कल्याणा दिन कांहि ते ॥ ३७ ॥

इति राज्ञा उपामन्त्रितः - याप्रमाणे बहुलाश्व राजाने विनविलेला लोकभावनः भगवान् - लोकरक्षक भगवान श्रीकृष्ण मिथिलानरयोषितां कल्याणं कुर्वन् (तत्र) उवास - मिथिला नगरीतील स्त्रीपुरुषांचे कल्याण करीत तेथे रहाता झाला. ॥३७॥
सर्वांना जीवन देणारे भगवान श्रीकृष्ण, राजाच्या या प्रार्थनेचा स्वीकार करून, मिथिलावासी स्त्री-पुरुष कल्याण करीत काही दिवस तेथेच राहिले. (३७)


श्रुतदेवोऽच्युतं प्राप्तं स्वगृहाञ्जनको यथा ।
नत्वा मुनीन् सुसंहृष्टो धुन्वन् वासो ननर्त ह ॥ ३८ ॥
तसेच श्रुतदेवोही मुनी नी कृष्ण याजला ।
पाहता आपुल्या गेही नमोनी नाचले बहू ॥ ३८ ॥

श्रुतदेवः - श्रुतदेव यथा जनकः - जसा बहुलाश्व राजा तसाच स्वगृहान् प्राप्तम् अच्युतं - आपल्या घरी आलेल्या श्रीकृष्णाला मुनीन् (च) - आणि मुनींना नत्वा - नमस्कार करून सुसंहृष्टः - अति आनंदित झालेला वासः धुन्वन् ननर्त ह - वस्त्र फडकावीत खरोखर नाचू लागला. ॥३८॥
राजा बहुलाश्वाप्रमाणे श्रुतदेव ब्राह्मणसुद्धा भगवान श्रीकृष्ण मुनिवर्यांसह आपल्या घरी आल्याचे पाहून आनंदविभोर झाला आणि त्यांना नमस्कार करून आपल्या अंगावरील उपरणे हवेत उडवून नाचू लागला. (३८)


तृणपीठबृषीष्वेतान् आनीतेषूपवेश्य सः ।
स्वागतेनाभिनन्द्याङ्‌घ्रीन् सभार्योऽवनिजे मुदा ॥ ३९ ॥
चटई पाट टाकोनी केले स्वागत ते तसे ।
सर्वांचे धुतले पाय सपत्‍न श्रुतदेवने ॥ ३९ ॥

सभार्या सः - पत्‍नीसह तो श्रुतदेव आनीतेषु तृणपीठबृसीषु - आणिलेल्या गवताच्या बैठकीवर व आसनावर एतान् उपवेश्य - ह्यांना बसवून स्वागतेन अभिनन्द्य - कुशल प्रश्नांनी त्यांचा सत्कार करून मुदा अंघ्रीन् अवनिजे - आनंदाने त्यांचे पाय धुता झाला. ॥३९॥
श्रुतदेवाने चटया, पाट आणि कुशासने अंथरून त्यांवर श्रीकृष्ण आणि मुनिवर्यांना बसविले. नंतर त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. तसेच आपल्या पत्‍नीसह मोठ्या आनंदाने त्यांचे चरण धुतले. (३९)


तदम्भसा महाभाग आत्मानं सगृहान्वयम् ।
स्नापयां चक्र उद्धर्षो लब्धसर्वमनोरथः ॥ ४० ॥
( मिश्र )
फलार्हणोशीरशिवामृताम्बुभिः
     मृदा सुरभ्या तुलसीकुशाम्बुजैः ।
आराधयामास यथोपपन्नया
     सपर्यया सत्त्वविवर्धनान्धसा ॥ ४१ ॥
कृष्णाचे पदतीर्थो ते सिंचिले घरच्यास नी ।
घरा दारास सर्वत्र तेंव्हा श्री श्रुतदेवने ॥ ४० ॥
( इंद्रवज्रा )
अर्पीयले पुष्प नि गंध पाणी
     सुगंधि माती तुलसी दलोही ।
पद्‍मे कुशाने पुजिले हरीला
     आराधिले अन्नहि देउनीया ॥ ४१ ॥

उद्धर्षः लब्धसर्वमनोरथः (सः) - उचंबळला आहे आनंद ज्याचा व प्राप्त झाले आहेत सर्व मनोरथ ज्याला असा महाभागः (सः) - मोठा भाग्यवान तो श्रुतदेव सगृहान्वयं आत्मानं - घरातील सर्व परिवारासह स्वतःला तदम्भसा स्नापयांचक्रे - त्या पाय धुतलेल्या उदकाने स्नान घालिता झाला फलार्हणोशीरशिवामृताम्बुभिः - फळे व सत्कारार्ह असे वाळा घालून सुगंधी व मधुर केलेले जे उदक त्याने सुरभ्या मृदा - सुगंधी मृत्तिकेने तुलसीकुशाम्बुजैः - तुळशी, दर्भ व कमळे यांनी सत्त्वविवर्धनान्धसा - बलवर्धक अन्नाने यथोपपन्नया सपर्यया - यथाशक्ति मिळविलेल्या पूजासाहित्याने आराधयामास - पूजिता झाला. ॥४०-४१॥
त्यानंतर महान भाग्यवान अशा श्रुतदेवाने ते चरणोदक स्वत:सह आपले घर आणि कुटुंबियांवर शिंपडले. यावेळी आपले सर्व मनोरथ पूर्ण झाल्याचा त्याला विलक्षण आनंद झाला होता. (४०) त्यानंतर त्याने फळे, वाळा घातलेले अमृतमधुर पाणी, कस्तुरी, तुळस, कुश, कमळे इत्यादी जी मिळाली, ती पूजासामग्री घेऊन त्यांची पूजा केली आणि सत्त्वगुण वाढविणारे अन्न सर्वांना वाढले. (४१)


स तर्कयामास कुतो ममान्वभूद्
     गृहान्धकुपे पतितस्य सङ्गमः ।
यः सर्वतीर्थास्पदपादरेणुभिः
     कृष्णेन चास्यात्मनिकेतभूसुरैः ॥ ४२ ॥
मनात चिंती श्रुतदेव तेंव्हा
     संसार पापी पडलो कुपात ।
अभागि मी हा असता हरीचे
     नी या हरीचे पद लाभले कै ? ॥ ४२ ॥

सः तर्कयामास - तो मनात विचार करू लागला कृष्णेन - श्रीकृष्णाशी च - आणि सर्वतीर्थास्पदपादरेणुभिः अस्य आत्मनिकेतभूसुरैः - सर्व पवित्र स्थानांचा आश्रय आहे पायांची धूळ ज्याच्या अशा ह्या श्रीकृष्णाचे स्वतःचे स्थान झालेल्या ब्राह्मणांशी यः संगमः - जो समागम गृहान्धकूपे पतितस्य मम - गृहरूपी काळोखाच्या विहिरीत पडलेल्या मला कुतः अन्वभूत् - कसा झाला ? ॥४२॥
त्यावेळी श्रुतदेव मनातल्या मनात विचार करू लागला की, मी प्रपंचरूप अंधार्‍या विहिरीत पडलेलो असताना ज्यांच्या चरणांची धूळच सर्वतीर्थस्वरूप आहे, ता श्रीकृष्ण आणि त्यांचे निवासस्थान असलेले ऋषी यांचा सहवास मला कसा प्राप्त झाला ? (४२)


( अनुष्टुप् )
सूपविष्टान् कृतातिथ्यान् श्रुतदेव उपस्थितः ।
सभार्यस्वजनापत्य उवाचाङ्‌घ्र्यभिमर्शनः ॥ ४३ ॥
( अनुष्टुप् )
आतिथ्या या स्विकारोनी सर्व जै बैसले तदा ।
धरोनी कृष्णपायाते ते कुटुंबीय प्रार्थिती ॥ ४३ ॥

सभार्यस्वजनापत्यः - भार्या, परिवार व मुले ह्यांसह अंघ्र्यभिमर्शनः - श्रीकृष्णाच्या पायाला स्पर्श करणारा श्रुतदेवः - श्रुतदेव उपस्थितः - जवळ उभा राहिलेला सूपविष्टान् कृतातिथ्यान् उवाच - स्वस्थपणे आसनावर बसलेल्या व आदरसत्कार केलेल्या त्यांना म्हणाला. ॥४३॥
आतिथ्याचा स्वीकार करून जेव्हा सर्वजण आरामात बसले, तेव्हा आपले स्त्री-पुत्र, आप्तेष्ट यांच्यासह श्रुतदेव तेथे आला आणि भगवान श्रीकृष्णांचे पाय चेपीत म्हणू लागला. (४३)


श्रुतदेव उवाच -
नाद्य नो दर्शनं प्राप्तः परं परमपूरुषः ।
यर्हीदं शक्तिभिः सृष्ट्वा प्रविष्टो ह्यात्मसत्तया ॥ ४४ ॥
श्रुतदेव म्हणाले -
परा नी व्यक्त अव्यक्त आजची भेट ला असे ।
नव्हे तो सर्व जीवांत वसले नित्य की तुम्ही ॥ ४४ ॥

(त्वं) परमपुरुषः अद्य नः दर्शनं प्राप्तः (इति) न - तू श्रेष्ठ पुरुष आज आमच्या दृष्टीस पडलास असे नाही परम् - पण यर्हि हि - जेव्हा खरोखर इदम् शक्तिभिः सृष्ट्वा - हे विश्व आपल्या शक्तींनी उत्पन्न करून (तत्) आत्मसत्तया (त्वं) प्रविष्टः - त्यात आपल्या सत्तेने तू शिरलास. ॥४४॥
श्रुतदेव म्हणाला- जेव्हा आपण आपल्या शक्तींच्या द्वारा हे जग निर्माण करून त्यात स्वत: प्रवेश केला, ते पुरुषोत्तम आपण आहात. म्हणून आपण मला आजच दर्शन दिले, असे काही नाही. (४४)


यथा शयानः पुरुषो मनसैवात्ममायया ।
सृष्ट्वा लोकं परं स्वाप्नं अनुविश्यावभासते ॥ ४५ ॥
स्वप्नात सृष्टि जै जीवा निर्मितो वागतो जसा ।
तसे मायें तुम्ही केले निर्मिले वागता स्वयें ॥ ४५ ॥

यथा शयानः पुरुषः - जसा निजलेला मनुष्य मनसा एव - मनानेच परं लोकं सृष्ट्वा - दुसरा लोक निर्मून आत्ममायया स्वाप्नं अनुविश्य - आपल्या मायेने स्वप्नसृष्टीत शिरून अवभासते - प्रतीतीस करितो. ॥४५॥
जसा झोपी गेलेला पुरुष स्वप्नावस्थेमध्ये अविद्येमुळे दुसरी स्वप्नसृष्टी निर्माण करतो आणि तीत स्वत:च प्रवेश करून अनेक रूपात अनेक कर्मे करणारा असा दिसतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातच आपल्या मायेने जगाची निर्मिती केली आणि नंतर त्यात प्रवेश करून अनेक रूपांनी प्रकाशित होत आहात. (४५)


श्रृणतां गदतां शश्वद् अर्चतां त्वाभिवन्दताम् ।
णृणां संवदतामन्तः हृदि भास्यमलात्मनाम् ॥ ४६ ॥
आपुल्या सर्व या लीला गाती नी ऐकिती तयां ।
हृदया करिता शुद्ध प्रकाश देतसे तिथे ॥ ४६ ॥

शश्वत् त्वा शृण्वतां गदतां अर्चतां अभिवन्दतां - नित्य तुझ्या कथा श्रवण करणार्‍या, तुझी स्तुति करणार्‍या, तुझे पूजन करणार्‍या व तुला वंदन करणार्‍या संवदतां अमलात्मनां नृणां - तुझ्याशी भाषण करणार्‍या निष्पाप अंतःकरणाच्या मनुष्यांच्या अन्तर्हृदि - हृदयामध्ये भासि - प्रकाशतोस. ॥४६॥
जे लोक नेहमी आपल्या कथांचे श्रवण-कीर्तन करतात, तसेच आपल्या प्रतिमांची पूजा करून त्यांना वंदन करतात, आणि आपापसात आपल्याविषयीच चर्चा करतात, त्यांचे हॄदय शुद्ध होते व त्यामुळे आपण त्यात प्रकाशित होता. (४६)


हृदिस्थोऽप्यतिदूरस्थः कर्मविक्षिप्तचेतसाम् ।
आत्मशक्तिभिरग्राह्योऽपि अन्त्युपेतगुणात्मनाम् ॥ ४७ ॥
लौकिक वैदिकी कर्मे वासना धरिता मनी ।
न राहता तिथे तुम्ही भजका सन्निधी असा ॥ ४७ ॥

(त्वं) कर्मविक्षिप्तचेतसां हृदिस्थः अपि अतिदूरस्थः (असि) - तू ज्यांची अंतःकरणे कर्मांनी क्षुब्ध झाली आहेत अशा प्राण्यांच्या हृदयांत असूनहि अत्यंत दूर असल्यासारखाच आहेस आत्मशक्तिभिः अग्राह्यः अपि - अहंकारादि शक्तिंनी ज्याचे ज्ञान होऊ शकत नाही असा असताहि उपेतगुणात्मनाम् अन्ति - आलेले आहेत श्रवणकीर्तनादि संस्काररूपी गुण ज्यांत असे आहे अंतःकरण ज्यांचे त्यांना तू जवळ आहेस. ॥४७॥
ज्या लोकांचे चित्त कर्मांच्या वासनांनी बहिर्मुख झालेले असते, त्यांच्या हृदयात असूनसुद्धा आपण त्यांच्यापासून खूप लांब असता. परंतु ज्यांनी आपले गुणगान करून आपले अंत:करण सद्‌गुतणसंपन्न बनविलेले असते, त्यांच्या बाबतीत मात्र आपण मनाला समजण्यासारखे नसूनही अत्यंत जवळ असता. (४७)


( वंशस्था )
नमोऽस्तु तेऽध्यात्मविदां परात्मने
     अनात्मने स्वात्मविभक्तमृत्यवे ।
सकारणाकारणलिङ्गमीयुषे
     स्वमाययासंवृतरुद्धदृष्टये ॥ ४८ ॥
( इंद्रवज्रा )
जे आत्मज्ञानी वसता तिथे नी
     लोभ्यास मृत्यू भयरूप तैसे ।
माया तुम्हाला नच झाकिते पै
     दृष्टीस झाकी, नमितो तुम्हा मी ॥ ४८ ॥

अध्यात्मविदां परात्मने - ज्ञानी लोकांचा श्रेष्ठ आत्मा अशा अनात्मने स्वात्मविभक्तमृत्यवे - आत्म्याहून भिन्न जीवाला आपल्यापासून वेगळा करून दिला आहे जन्ममृत्युरूप संसार ज्याने अशा सकारणाकारणलिंगम् ईयुषे - ज्यांना प्रकृतिरूप कारण आहे अशी महत् आदिकरून भूते व जिला कारण नाही अशी प्रकृति या दोन्ही प्रकारच्या उपाधींचा स्वीकार करणार्‍या स्वमायया असंवृतरुद्धदृष्टये - आपल्या मायेने स्वतःची उघडी व जीवाची बंद केलेली आहे दृष्टी ज्याने अशा ते नमः अस्तु - तुला नमस्कार असो. ॥४८॥
हे प्रभो ! जे लोक आत्मतत्त्वाला जाणणारे आहेत, त्यांचे परमात्मा आपण असता आणि जे शरीरादींनाच आत्मा मानतात, त्यांच्यासाठी आपण जन्ममृत्यूरूप संसार आहात. आपण महतत्त्व इत्यादी कार्यद्रव्ये आणि प्रकृतिरूप कारणाचे नियंत्रण करणारे आहात. तुमची माया तुमचा स्वत:च्या दृष्टीवर पडदा टाकू शकत नाही, परंतु तिने इतरांची दृष्टी मात्र झाकून टाकली आहे. मी ! आपणास नमस्कार करीत आहे. (४८)


( अनुष्टुप् )
स त्वं शाधि स्वभृत्यान् नः किं देव करवाम हे ।
एतदन्तो नृणां क्लेशो यद्‌भवानक्षिगोचरः ॥ ४९ ॥
( अनुष्टुप् )
स्वतेजा करु मी काय सेवा आपुलि जी प्रिय ।
पाहता संपले क्लेश दुःखात तुम्हिची असा ॥ ४९ ॥

देव - हे श्रीकृष्णा सः त्वं - तो तू (अतः परं) किं करवामहे - आम्ही आता ह्यापुढे काय करावे (तत्) स्वभृत्यान् नः शाधि - ते तुझे भक्त जे आम्ही त्यांना शिकव यत् भवान् अक्षगोचरः - जो तू दृष्टीस पडलास एतदन्तः नृणां क्लेशः (भवति) - तोपर्यंतच मनुष्यांना दुःख होते. ॥४९॥
हे स्वयंप्रकाश प्रभो ! आम्ही आपले सेवक आहोत. आम्ही काय करावे, याची आपण आम्हांला आज्ञा करावी. आपल्या दर्शनानेच आम्हा जीवांचे सर्व क्लेश नाहीसे झाले आहेत. (४९)


श्रीशुक उवाच -
तदुक्तमित्युपाकर्ण्य भगवान् प्रणतार्तिहा ।
गृहीत्वा पाणिना पाणिं प्रहसन् तमुवाच ह ॥ ५० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
स्तुति ही ऐकिली तेंव्हा वदले भक्तवत्सलो ।
हासुनी धरुनी हात श्रुतदेवास हे असे ॥ ५० ॥

इति तदुक्तं उपाकर्ण्य - असे त्या श्रुतदेवाचे भाषण ऐकून प्रणतार्तिहा भगवान् - शरण आलेल्यांच्या पीडा दूर करणारा भगवान श्रीकृष्ण पाणिना पाणिं गृहीत्वा - आपल्या हाताने श्रुतदेवाचा हात धरून प्रहसन् तं उवाच ह - हसत हसत त्या श्रुतदेवाला खरोखर म्हणाला. ॥५०॥
श्रीशुक म्हणतात- शरणागतांचे भय नाहीसे करणार्‍या भगवान श्रीकृष्णांनी श्रुतदेवांची प्रार्थना ऐकून त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत हसत ते त्याला म्हणाले. (५०)


श्रीभगवानुवाच -
ब्रह्मंस्तेऽनुग्रहार्थाय सम्प्राप्तान् विद्ध्यमून् मुनीन् ।
सञ्चरन्ति मया लोकान् पुनन्तः पादरेणुभिः ॥ ५१ ॥
अनुग्रहार्थ हे सारे ऋषीही पातले इथे ।
हिंडता पाय धूळीने जगा पावित्र्य देत जे ॥ ५१ ॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा श्रुतदेवा अमून् मुनीन् - ह्या ऋषींना ते अनुग्रहार्थाय संप्राप्तान् विद्धि - तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आलेले जाण (एते मुनयः) मया (सह) - हे ऋषि माझ्यासह पादरेणुभिः लोकान् पुनन्तः संचरन्ति - पायधुळीने लोकांना पवित्र करीत हिंडतात. ॥५१॥
श्रीकृष्ण म्हणाले- हे ब्रह्मन ! हे ऋषी तुमच्यावर कृपा करण्यासाठीच येथे आले आहेत. हे आपल्या चरणधुळीने लोकांना पवित्र करीत माझ्यबरोबर संचार करीत असतात. (५१)


देवाः क्षेत्राणि तीर्थानि दर्शनस्पर्शनार्चनैः ।
शनैः पुनन्ति कालेन तदप्यर्हत्तमेक्षया ॥ ५२ ॥
श्री भगवान् म्हणाले -
देवता क्षेत्र नी तीर्थे विलंबे फळ लाभते ।
संतपायी त्वरे लाभ देवां शक्ति तयामुळे ॥ ५२ ॥

देवाः क्षेत्राणि तीर्थानि - देव, क्षेत्रे, व तीर्थे दर्शनस्पर्शनार्चनैः - दर्शन, स्पर्श व पूजा ह्यांनी शनैः पुनन्ति - हळूहळू पवित्र करितात तत् अपि - ते सर्वहि अर्हत्तमेक्षया - अत्यंत पूजा अशा भगवद्‌भक्तांच्या केवळ दर्शनाने कालेन (भवति) - तत्काळीच सिद्ध होते. ॥५२॥
देवता, पुण्यक्षेत्रे आणि तीर्थे इत्यादी दर्शन, स्पर्श, पूजन इत्यादींद्वारा हळू हळू पुष्कळ दिवसांनंतर पवित्र करतात; परंतु संत पुरुष आपल्या केवळ दृष्टीनेच सर्वांना पवित्र करतात. एवढेच नव्हे तर देवता इत्यादींमध्ये पवित्र करण्याची जी शक्ती आहे, तीसुद्धा त्यांना संतांच्या दृष्टीतूनच प्राप्त होते. (५२)


ब्राह्मणो जन्मना श्रेयान् सर्वेषां प्राणिनामिह ।
तपसा विद्यया तुष्ट्या किमु मत्कलया युतः ॥ ५३ ॥
जन्मता श्रेष्ठ हे विप्र विद्या संतोष नी तपे ।
असता मम ही भक्ती मग ते सांगणे नको ॥ ५३ ॥

ब्राह्मणः - ब्राह्मण जन्मना (एव) - जन्मानेच इह - या जगात सर्वेषां प्राणिनां श्रेयान् - सर्व प्राणिमात्रांचा कल्याणकर्ता आहे किमु तपसा विद्यया तुष्टया मत्कलया युत (सः) - मग तपाने, ज्ञानाने, संतोषाने आणि माझ्या अंशाने युक्त असा तो असल्यास काय विचारावे ? ॥५३॥
जगामध्ये ब्राह्मण जन्मानेच सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहेत, ते जर तपश्चर्या, विद्या, संतोष आणि माझी उपासना यांनी युक्त असतील, तर मग त्यांच्या श्रेष्ठत्वाविषयी काय सांगावे? (५३)


न ब्राह्मणान्मे दयितं रूपमेतच्चतुर्भुजम् ।
सर्ववेदमयो विप्रः सर्वदेवमयो ह्यहम् ॥ ५४ ॥
चतुर्भुज असे रूप न मला प्रीय त्याहुनी ।
सर्व देवमयी विप्र मीही तो सर्वदेवची ॥ ५४ ॥

एतत् चतुर्भुजं रूपं - हे चतुर्भुज स्वरूप मे ब्राह्मणात् न दयितं - मला ब्राह्मणापेक्षा प्रिय नाही विप्रः सर्ववेदमयः - ब्राह्मण हा सर्व वेदांची मूर्ति हि अहं सर्वदेवमयः - आणि खरोखर मी सर्व देवांची मूर्ति आहे. ॥५४॥
मला माझे हे चतुर्भुज रूपसुद्धा ब्राह्मणांपेक्षा अधिक प्रिय नाही. कारण ब्राह्मण सर्व देवमय आहेत आणि मी सर्वदेवमय आहे. (५४)


दुष्प्रज्ञा अविदित्वैवं अवजानन्त्यसूयवः ।
गुरुं मां विप्रमात्मानं अर्चादाविज्यदृष्टयः ॥ ५५ ॥
दुर्बुद्धी ठेवुनी कांही पूजिती मूर्ति निर्जिव ।
द्विजांचे काढिती दोष ते तो रूप जगद्‌गुरू ॥ ५५ ॥

दुष्प्रज्ञाः - मंद बुद्धीचे लोक एवं - याप्रमाणे विप्रं - ब्राह्मणाला गुरुं मां आत्मानं अविदित्वा - गुरुस्वरूपी, मत्स्वरूपी व आत्मस्वरूपी असे न ओळखता असूयवः - मत्सर करणारे असे अर्चादौ इज्यदृष्टयः - मूर्तीच्या ठिकाणी पूज्य बुद्धि आहे ज्यांची असे अवजानंति - अपमानितात. ॥५५॥
अजाण माणसेही गोष्ट समजून न घेता फक्त मूर्ती इत्यादीमध्येच पूज्यबुद्धी ठेवतात आणि मत्सरामुळे माझे स्वरूप असलेले व लोकगुरु जे ब्राह्मण त्यांचा तिरस्कार करतात. (५५)


चराचरमिदं विश्वं भावा ये चास्य हेतवः ।
मद् रूपाणीति चेतस्य आधत्ते विप्रो मदीक्षया ॥ ५६ ॥
साक्षात्‌कारे मला विप्र जाणिती सर्व जीवि या ।
आत्मरूपास माझ्या ते चित्ती निश्चय तो असे ॥ ५६ ॥

विप्रः - ब्राह्मण चराचरम् इदं विश्वं - स्थावरजंगमात्मक हे जग ये च अस्य हेतवः भावाः (ते) - व जे काही ह्या जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत असे प्रकृत्यादि पदार्थ ते मद्रूपाणि (सन्ति) - माझी रूपे होत इति - असे मदीक्षया चेतसि आधत्ते - मीच सर्वत्र भरलेला आहे अशा कल्पनेने मनात ठसवितो. ॥५६॥
ब्राह्मण माझा साक्षात्कार करून घेऊन आपल्या चित्तात असा निश्चय करतात की, हे चराचर जग आणि याला कारण असणारे महत्तत्त्वादी पदार्थ ही भगवंतांची रूपे आहेत. (५६)


तस्माद्‌ ब्रह्मऋषीनेतान् ब्रह्मन् मच्छ्रद्धयार्चय ।
एवं चेदर्चितोऽस्म्यद्धा नान्यथा भूरिभूतिभिः ॥ ५७ ॥
म्हणोनी श्रुतदेवा ते ब्रह्मर्षि ममरूप ते ।
सदैव पूजिणे त्यांना अन्यथा सर्व व्यर्थ की ॥ ५७ ॥

ब्रह्मन् - हे ब्राह्मणा श्रुतदेवा तस्मात् - म्हणून एतान् ब्रह्मऋषीन् - ह्या ब्रह्मर्षीची मच्छ्‌रद्धया - हे मीच आहेत अशी श्रद्धा ठेवून अर्चय - पूजा कर एवं चेत् - ह्याप्रमाणे जर होईल (तर्हि एव) अद्धा (अहं) अर्चितः अस्मि - तरच साक्षात मी पूजिला गेलो असे होईल अन्यथा भूरिभूतिभिः न - नाहीतर मोठया संपत्तीनेहि मी पूजिला गेलो असे होणार नाही. ॥५७॥
म्हणून हे श्रुतदेवा ! तू या ब्रह्मर्षींना माझेच स्वरूप समजून पूर्ण श्रद्धेने यांची पूजा कर. तू जर असे करशील, तर ते माझेच पूजन केले, असे होईल. नाहीतर पुष्कळ ऐश्वर्यानेही माझी पूजा होऊ शकत नाही. (५७)


श्रीशुक उवाच -
स इत्थं प्रभुनादिष्टः सहकृष्णान् द्विजोत्तमान् ।
आराध्यैकात्मभावेन मैथिलश्चाप सद्‌गतिम् ॥ ५८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
आदेश मिळता ऐसा श्रुतदेवे नि त्या नृपे ।
पूजिता भक्तिभावाने गति उत्तम लाभली ॥ ५८ ॥

इत्थं प्रभुणा आदिष्टः सः - याप्रमाणे श्रीकृष्णाने उपदेशिलेला तो श्रुतदेव मैथिलः च - आणि मिथिलाधिपति बहुलाश्व राजा एकात्मभावेन - ऐक्य बुद्धीने सहकृष्णान् द्विजोत्तमान् आराध्य - श्रीकृष्णासह सर्व ब्राह्मणांची पूजा करून सद्‌गतिं आप - चांगली गति मिळविते झाले. ॥५८॥
श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्णांची ही आज्ञा शिरोधार्य मानून श्रुतदेवाने श्रीकृष्णांसह त्या ब्रह्मर्षींची एकात्मभावाने आराधना केली व त्यांच्या कृपेने तो भगवत्स्वरूपाला प्राप्त झाला. बहुलाश्वालासुद्धा तीच गती प्राप्त झाली. (५८)


एवं स्वभक्तयो राजन् भगवान् भक्तभक्तिमान् ।
उषित्वाऽऽदिश्य सन्मार्गं पुनर्द्वारवतीमगात् ॥ ५९ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
श्रुतदेवानुग्रहो नाम षडशीतितमोऽध्यायः ॥ ८६ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
संत ते पूजिती देवा देव तो संत पूजितो ।
कांही दिन असे कृष्ण राहोनी पातले पुरीं ॥ ५९ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर शहाऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

राजन् - हे परीक्षित राजा भक्तभक्तिमान् भगवान् - भक्तांवर भक्ति करणारा श्रीकृष्ण उषित्वा - तेथे राहून एवं - याप्रमाणे स्वभक्तयोः सन्मार्गं आदिश्य - आपल्या भक्तांना सन्मार्ग दाखवून पुनः द्वारवतीं अगात् - पुनः द्वारकेला गेला. ॥५९॥ शाहाऐंशीवा अध्याय समाप्त
परीक्षिता ! अशा रीतीने भक्तांची भक्ती करणार्‍या भगवंतांनी दोन्ही भक्तांसाठी तेथे काही दिवस राहून त्यांना वेदमार्गाचा उपदेश करून ते द्वारकेला परतले. (५९)


अध्याय शाहाऐंशीवा समाप्त

GO TOP