श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय पंच्याऐंशिवा

वसुदेवमुखेन भगवत्तत्त्वप्रतिपादनं भगवता देवकीप्रार्थनया तदीय मृतपुत्राणां आनयनं च -

श्रीभगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीबादरायणिरुवाच -
( अनुष्टुप् )
अथैकदात्मजौ प्राप्तौ कृतपादाभिवन्दनौ ।
वसुदेवोऽभिनन्द्याह प्रीत्या सङ्कर्षणाच्युतौ ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
एकदा कृष्ण नी राम नमिण्या मातृ पितृ ते ।
जाताचि अभिनांदोनी वदले वसुदेवजी ॥ १ ॥

अथ - नंतर एकदा - एके दिवशी वसुदेवः - वसुदेव (समीपे) प्राप्तौ कृतपादाभिवन्दनौ (च) - जवळ येऊन पायाला वंदन केले आहे ज्यांनी असे आत्मजौ संकर्षणाच्युतौ - पुत्र जे बलराम व श्रीकृष्ण त्यांना प्रीत्या अभिनन्द्य - प्रेमाने अभिनंदून आह - म्हणाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात - असेच एके दिवशी राम-कृष्णांनी वडिलांना नमस्कार केल्यावर वसुदेवांनी मोठ्या प्रेमाने दोन्ही भावांचे कौतुक करून म्हटले. (१)


मुनीनां स वचः श्रुत्वा पुत्रयोर्धामसूचकम् ।
तद्वीर्यैर्जातविश्रम्भः परिभाष्याभ्यभाषत ॥ २ ॥
मुनींनी भगवत्‌लीला वदता पुत्र हे द्वय ।
असामान्यचि जाणोनी प्रेमाने बोधिले तयां ॥ २ ॥

सः - तो वसुदेव पुत्रयोः धामसूचकं - बलराम व श्रीकृष्ण ह्यांचा प्रभाव सुचविणारे मुनीनां वचःश्रुत्वा - ऋषींचे भाषण श्रवण करून तद्वीर्यैः जातविश्रम्भः - त्यांच्या पराक्रमांनी उत्पन्न झालेली आहे श्रद्धा ज्यामध्ये असा परिभाष्य अभ्यभाषत - स्तुती करून भाषण करिता झाला. ॥२॥
ऋषींच्या तोंडून वसुदेवांनी भगवंतांचा महिमा ऐकला होता. तसेच त्यांचे ऐश्वर्यपूर्ण कार्यसुद्धा त्यांनी पाहिले होते. यामुळे पूर्ण विश्वास उत्पन्न होऊन पुत्रांना उद्देशून ते म्हणाले. (२)


कृष्ण कृष्ण महायोगिन् सङ्कर्षण सनातन ।
जाने वामस्य यत् साक्षात् प्रधानपुरुषौ परौ ॥ ३ ॥
कृष्णा कृष्णा महायोग्या बळीराम तुम्ही द्वय ।
सनातन असेची नी नियंते परमेश्वर ॥ ३ ॥

कृष्ण महायोगिन् कृष्ण - हे कृष्णा, हे महायोगी कृष्णा सनातन संकर्षण - हे पुरातन बलरामा यत् - जे अस्य (जगतः) साक्षात् (कारणं) तौ परौ प्रधानपुरुषौ - ह्या त्रैलोक्याचे प्रत्यक्ष कारण श्रेष्ठ प्रधान पुरुष (तत्) वां जाने - ते मी तुम्हाला समजतो. ॥३॥
हे श्रीकृष्णा ! हे महायोगीश्वर संकर्षणा ! तुम्ही दोघेही सनातन आहात. तुम्ही दोघे सर्व जगाचे साक्षात कारणस्वरूप प्रधान आणि पुरुषाचे सुद्धा नियामक असे परमेश्वर आहात, हे मी जाणतो. (३)


यत्र येन यतो यस्य यस्मै यद् यद् यथा यदा ।
स्यादिदं भगवान् साक्षात् प्रधानपुरुषेश्वरः ॥ ४ ॥
निर्माते तुम्हि विश्वाचे सामग्रीही तुम्हीच त्या ।
भोग्य भोक्ता असे दोन्ही रूपे ती तुमचीच की ॥ ४ ॥

यत्र - ज्या ठिकाणी येन - ज्याच्याकडून व ज्याच्या सहाय्याने यतः - ज्याच्यातून यस्य - ज्याच्या संबंधाने यस्मै - ज्याच्यासाठी यत् - ज्याचे यत् - जे यथा - जशा रीतीने यदा - ज्या वेळी इदं (विश्वं) स्यात् - हे विश्व उत्पन्न होते साक्षात् - प्रत्यक्ष प्रधानपुरुषेश्वरः भवान् (एव) - प्रकृति व पुरुष या उभयतांचाहि नियन्ता असा जो तू तोच आहेस. ॥४॥
तुम्ही या जगाचे आधार, निर्माते, निर्माण सामग्री आणि स्वामी असून क्रीडेसाठी तुम्ही याची निर्मिती केली आहे. हे ज्यावेळी , ज्या रूपात, जे काही असते, होते, ते सर्व तुम्हीच आहात. प्रकृती व पुरुष आपणच असून त्यांच्या पलीकडे असणारे त्यांचे नियामक असे साक्षात भगवानसुद्धा तुम्हीच आहात. (४)


एतन्नानाविधं विश्वं आत्मसृष्टमधोक्षज ।
आत्मनानुप्रविश्यात्मन् प्राणो जीवो बिभर्ष्यज ॥ ५ ॥
तुम्हा विकार तो नाही तुम्हीच जग निर्मिले ।
सर्वात्मा तुम्हिची विश्वा शक्तिने पोषिता तुम्ही ॥ ५ ॥

अधोक्षज - हे श्रीकृष्णा आत्मन् - हे आत्मरूपा एतत् आत्मसृष्टं नानाविधं विश्वं - हे स्वतः उत्पन्न केलेले नानाविध विश्व (तस्मिन्) आत्मना अनुप्रविश्य - त्यामध्ये अंतर्यामीरूपाने प्रवेश करून अजः (त्वम्) - जन्मरहित असा तू प्राणः जीवः (च भूत्वा) - क्रियाशक्ति व ज्ञानशक्ति होऊन बिभर्षि - धारण करितोस. ॥५॥
हे इंद्रियातीता ! हे अजन्मा ! परमात्मन ! हे नाना प्रकारचे विश्व तुम्हीच निर्माण केले असून यामध्ये तुम्हीच आत्मरूपाने प्रवेश केला आहे. तसेच तुम्हीच प्राण(क्रियाशक्ती) आणि जीव(ज्ञानशक्ती) होऊन याचे पालन-पोषण करीत आहात. (५)


प्राणादीनां विश्वसृजां शक्तयो याः परस्य ताः ।
पारतंत्र्याद् वै सादृष्याद् द्वयोश्चेष्टैव चेष्टताम् ॥ ६ ॥
तुम्हीच शक्ति या विश्वा अन्यथा ते अचेतन ।
प्रयत्‍न फक्त त्यां हाती न शक्ति शक्ति तो तुम्ही ॥ ६ ॥

याः विश्वसृजां प्राणादीनां शक्तयः - ज्या जगदुत्पत्ति करणार्‍या प्राणादिकांच्या शक्ति ताः - त्या (प्राणादीनां) पारतंत्र्यात् - प्राणादिक परतंत्र असल्यामुळे द्वयोः (प्राणेश्वरयोः) वैसादृश्यात् (च) - आणि प्राण व ईश्वर या दोघांमध्ये विसदृशपणा असल्यामुळे परस्य (एव सन्ति) - ईश्वराच्याच होत चेष्टताम् (एषां) चेष्टा एव - यांची हालचाल ही केवळ चेष्टाच आहे. ॥६॥
क्रियाशक्तिप्रधान प्राण इत्यादींमध्ये जगातील वस्तूंची निर्मिती करण्याचे जे सामर्थ्य आहे, ते तुमचेच आहे. कारण ते तुमच्यासारखे चेतन नसल्यामुळे तुमच्या‍अधीन आहेत. तुमच्यामुळे त्यांच्या क्रिया होतात. (६)


कान्तिस्तेजः प्रभा सत्ता चन्द्राग्न्यर्कर्क्षविद्युताम् ।
यत्स्थैर्यं भूभृतां भूमेः वृत्तिर्गन्धोऽर्थतो भवान् ॥ ७ ॥
चंद्रकांती अग्नितेज सूर्याचे तेज नी तसे ।
गिरी पृथ्वी तसे तारे स्थानादी रूपही तुम्ही ॥ ७ ॥

चंद्राग्न्यर्कर्क्षविद्युताम् - चंद्र, अग्नी, सूर्य, नक्षत्रे, वीज कान्तिः तेजः प्रभा सत्ता - कान्ति, तेज, प्रकाश व अस्तित्व ही भूभृतां यत् स्थैर्यम् - पर्वतांचा जो स्थिरपणा तो भूमेः वृत्तिः गंधः - पृथ्वीचा धर्म गंध हा अर्थतः भवान् एव - खरोखर तूच आहेस. ॥७॥
हे प्रभो ! चंद्राचे चांदणे, अग्नीचे तेज, सूर्याची प्रभा, नक्षत्रे आणि वीज इत्यादींचे चमकणे, पर्वतांचे स्थैर्य, पृथ्वीची आधारशक्ती व गंधरूप गुण, हे सर्व वास्तविक तुम्हीच आहात. (७)


तर्पणं प्राणनमपां देव त्वं ताश्च तद्रसः ।
ओजः सहो बलं चेष्टा गतिर्वायोस्तवेश्वर ॥ ८ ॥
जळाची तृप्ति नी शुद्धी रसही तुम्हिची प्रभो ।
चालाया तुमची शक्ती शरीर वायुसी तसे ॥ ८ ॥

देव - ईश्वर त्वम् (एव) - तूच अपां तर्पणप्राणनम् - पाण्याचा तृप्त करण्याचा व जीवन देण्याचा धर्म ताः तद्रसः च - ते जल व त्याचा धर्म जो चव तो ईश्वर - हे ईश्वरा ओजः - इंद्रियांचे बळ सहः - मनाचे बळ बलम् - शरीराचे बळ चेष्टाः - हालचाल वायोः गतिः - वायूमध्ये असलेले सर्व ठिकाणी जाण्याचे सामर्थ्य (एतानि) तव (एव) - ही तुझीच होत. ॥८॥
हे परमेश्वरा ! ज्याच्यामध्ये तृप्त करण्याची व जीवन देण्याची शक्ती आहे ते पाणी आणि त्याचे द्रवत्व तुम्हीच आहात. हे प्रभो! इंद्रियशक्ती, अंत:करणाची शक्ती, शरीराची शक्ती, त्याची हालचाल, चालणे-फिरणे इत्यादी वायूच्या शक्ती यासर्व तुमच्याच आहेत. (८)


दिशां त्वं अवकाशोऽसि दिशः खं स्फोट आश्रयः ।
नादो वर्णस्त्वमोङ्कार आकृतीनां पृथक्‌कृतिः ॥ ९ ॥
दिशा आकाशही तुम्ही शब्द वाणी नि नादही ।
ओंकाररूपही तुम्ही पदरूप नि वैखरी ॥ ९ ॥

दिशां अवकाशः - दिशांची पोकळी दिशः खं आश्रयः स्फोटः - दिशा, आकाश व त्या आकाशाचा आश्रय असे स्फोट नामक ध्वनीचे सूक्ष्मस्वरूप त्वम् असि - तूच आहेस नादः ओंकारः - नाद ओंकार आकृतीनां पृथक्कृतिः वर्णः - पदार्थांना निरनिराळी नावे देणारी अक्षरे त्वम् (एव) - तूच आहेस. ॥९॥
दिशा आणि त्यांच्या आजूबाजूला असणारे आकाश हेसुद्धा तुम्हीच आहात. आकाश आणि त्याच्या आश्रयाने व्यक्त होणारा शब्द(परा), नाद(पश्यंती), ॐकार तसेच वर्ण(मध्यमा) व पदार्थांचे वेगळेपण दाखविणारी पदरूप(वैखारी) वाणीसुद्धा तुम्हीच आहात. (९)


इन्द्रियं त्विन्द्रियाणां त्वं देवाश्च तदनुग्रहः ।
अवबोधो भवान् बुद्धेः जीवस्यानुस्मृतिः सती ॥ १० ॥
इंद्रिया शक्ति ती तुम्ही अधिष्ठात्राहि देवता ।
बुद्धीचा निश्चयो तुम्ही स्मृतिही तुम्हि ती असा ॥ १० ॥

इंद्रियाणां इंद्रियं - इंद्रियांची इंद्रियशक्ति देवाः तदनुग्रहः च - आणि देव व त्यांचा अनुग्रह त्वं तु - तुच आहेस बुद्धेः अवबोधः - बुद्धीचे ज्ञानस्वरूप जीवस्य (सती) अनुस्मृतिः - जीवाची नीट धोरण ठेवण्याची शक्ति भवान् (एव) - तूच आहेस. ॥१०॥
इंद्रिये, त्यांची विषयांना ग्रहण करणारी शक्ती आणि त्यांच्या देवता तुम्हीच आहात. बुद्धीची निश्चय करण्याची शक्ती आणि जीवाची शुद्ध स्वरूपात असणारी स्मृतीसुद्धा तुम्हीच आहात. (१०)


भूतानामसि भूतादिः इन्द्रियाणां च तैजसः ।
वैकारिको विकल्पानां प्रधानमनुशायिनम् ॥ ११ ॥
भूती तामसऽहंकार तैजसो इंद्रियात तो ।
दैवती सत्वऽहंकार जीवा माया तुम्हीच की ॥ ११ ॥

भूतानां भूतादिः (त्वम्) असि - सर्व भूतांमध्ये आदिभूत जो तामस अहंकार तो तू आहेस इंद्रियाणां तैजसः च - आणि इंद्रियांमधील तैजस नामक राजस अहंकार आहेस विकल्पानां वैकारिकः - देवाचा सात्त्विक अहंकार तूच आहेस अनुशायिनां प्रधानं - जीवांचे संसारकारण प्रधान. ॥११॥
भूतमात्रांमध्ये त्यांचे कारण तामस अहंकार, इंद्रियांमधील त्यांना कारणीभूत असणारा राजस अहंकार आणि इंद्रियांच्या देवतांमध्ये त्यांना कारण असणारा सात्त्विक अहंकार त्याचप्रमाणे जीवांच्या जन्म-मरणाला कारणीभूत असणारी अविद्या तुम्हीच आहात. (११)


नश्वरेष्विह भावेषु तदसि त्वं अनश्वरम् ।
यथा द्रव्यविकारेषु द्रव्यमात्रं निरूपितम् ॥ १२ ॥
घटां वृक्षात ती माती तया कारण ते तुम्ही ।
अविनाशी तसे तत्व वास्तवी तुमचे रुप ॥ १२ ॥

इह नश्वरेषु भावेषु - ह्या लोकी नाशिवंत पदार्थामध्ये (यत्) अनश्वरं - जे अविनाशी तत् त्वं असि - ते तू आहेस यथा - ज्याप्रमाणे द्रव्यविकारेषु - द्रव्यापासून केलेल्या पदार्थात द्रव्यमात्रं निरूपितं - मूळ द्रव्यच दिसून येते. ॥१२॥
हे भगवन ! जसे माती इत्यादी वस्तूंचे कार्य असणार्‍या घडा, झाडे इत्यादींमध्ये माती असते, त्याचप्रमाणे सर्व नाशवंत पदार्थांमधील अविनाशी तत्त्व तुम्ही आहात. (१२)


सत्त्वं रजस्तम इति गुणास्तद्‌वृत्तयश्च याः ।
त्वय्यद्धा ब्रह्मणि परे कल्पिता योगमायया ॥ १३ ॥
गुण रज तमो सत्व वृत्ती नी तत्व ते तुम्ही ।
योग माये तुम्हा सारे मनात कल्पिता असे ॥ १३ ॥

सत्त्वं रजः तमः इति गुणाः - सत्त्व, रज व तम हे गुण याः च तद्‌वृत्तयः - आणि जी त्या गुणांची कार्ये अद्धा त्वयि परे ब्रह्मणि - प्रत्यक्ष तू जो परब्रह्म त्या तुझ्या ठिकाणी योगमायया कल्पिताः - योगमायेने कल्पिल्या आहेत. ॥१३॥
हे प्रभो ! सत्त्व, रज व तम हे तीन गुण आणि त्यांची कार्ये, परब्रह्मस्वरूप तुमच्यामध्ये योगमायेच्या द्वारा कल्पिली गेली आहेत. (१३)


तस्मान्न सन्त्यमी भावा यर्हि त्वयि विकल्पिताः ।
त्वं चामीषु विकारेषु ह्यन्यदाव्यावहारिकः ॥ १४ ॥
विकार भाव ना तुम्हा कल्पित दिसता तसे ।
कल्पा संपता तुम्ही निर्विकल्पचि ते असा ॥ १४ ॥

तस्मात् अमी भावाः न सन्ति - म्हणून हे पदार्थ वस्तुतः नाहीतच यर्हि त्वयि विकल्पिताः (तर्हि ते) सन्ति - जर तुझ्या ठिकाणी ते कल्पिले तर ते असतात त्वं च - आणि तू अमीषु विकारेषु (असि) - ह्या विकारांच्या ठिकाणी असतोस अन्यदा - नाही तर (त्वं) अव्यावहारिकः हि (असि) - तू काहीच व्यवहार न करणारा असाच खरोखर आहेस. ॥१४॥
म्हणून हे जन्म इत्यादी भाव वास्तविक तुमच्यामध्ये नाहीत. जेव्हा तुमच्या ठायी यांची कल्पना केली जाते, तेव्हा तुम्ही या विकारांमध्ये असल्यासारखे दिसता. एरव्ही निर्विकल्प परमार्थस्वरूप फक्त तुम्हीच शिल्लक राहाता. (१४)


गुणप्रवाह एतस्मिन् अबुधास्त्वखिलात्मनः ।
गतिं सूक्ष्मामबोधेन संसरन्तीह कर्मभिः ॥ १५ ॥
गुणप्रवाहि हे विश्व सुख दुःखे असे भरे ।
अज्ञानी रूप ना जाणी फसतो भवसागरी ॥ १५ ॥

एतस्मिन् गुणप्रवाहे - हा त्रिगुणाचा प्रवाह जो संसार त्यामध्ये इह - ह्या लोकी अखिलात्मनः सूक्ष्मां गतिं अबुधाः तु - परमेश्वराचे प्रपंचरहित असे सूक्ष्मस्वरूप न जाणणारे तर अबोधेन - अज्ञानामुळे कर्मभिः - कर्मांनी संसरन्ति - जन्ममरणरूप संसारात पडतात. ॥१५॥
सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या प्रवाहरूप या देहात तुमचे सर्वात्मक असे सूक्ष्मस्वरूप जे अज्ञानी जाणत नाहीत, ते आपल्या देहाभिमानरूप अज्ञानामुळेच कर्मांच्या जाळ्यात अडकून वारंवार जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरत राहातात. (१५)


यदृच्छया नृतां प्राप्य सुकल्पामिह दुर्लभाम् ।
स्वार्थे प्रमत्तस्य वयो गतं त्वन्माययेश्वर ॥ १६ ॥
प्रारब्धे लाभला देह मायेने वश जाहलो ।
खरा स्वार्थ न जाणी मी आयुष्य सरले असे ॥ १६ ॥

ईश्वर - हे श्रीकृष्णा इह - ह्या लोकी दुर्लभां - दुर्लभ सुकल्पां - चांगल्या रीतीने बनविलेल्या नृतां - मनुष्यदेहाला यदृच्छया - स्वेच्छेने प्राप्य - मिळवून स्वार्थे प्रमत्तस्य मम - स्वार्थाविषयी असावध राहिलेल्या माझे वयः - आयुष्य त्वन्मायया गतं - तुझ्या मायेने व्यर्थ निघून गेले. ॥१६॥
हे परमेश्वरा ! योगायोगाने मला सर्व सामर्थ्याने युक्त अत्यंत दुर्लभ असे मनुष्य शरीर प्राप्त झाले आहे. परंतु तुमच्या मायेमुळे मी माझ्या खर्‍या कल्याणरूप स्वार्थाच्या बाबतीत बेसावध राहिलो आणि माझे आयुष्य फुकट गेले. (१६)


असौ अहं मम एवैते देहे चास्यान्वयादिषु ।
स्नेहपाशैर्निबध्नाति भवान्सर्वमिदं जगत् ॥ १७ ॥
देह माझा अहंता ही अहंते प्रेमबंधन ।
प्रेमपाशात हे विश्व तुम्हीच बांधिले असे ॥ १७ ॥

देहे असौ अहं - देहाच्या ठिकाणी हा मी अस्य च अन्वयादिषु - आणि ह्या देहाच्या पुत्रपौत्रादिकांच्या ठिकाणी एते मम एव (इति) - हे माझेच अशा स्नेहपाशैः - प्रेमपाशांनी भवान् सर्वं इदं जगत् निबध्नाति - तू हे सर्व जग बांधून टाकितोस. ॥१७॥
हे प्रभो ! हे शरीर म्हणजेच मी आणि या शरीराशी संबंधित असणारे माझे, या प्रकारच्या स्नेहाच्या दोर्‍यांनी तुम्ही हे सर्व जग बांधून टाकले आहे. (१७)


युवां न नः सुतौ साक्षान् प्रधानपुरुषेश्वरौ ।
भूभारक्षत्रक्षपण अवतीर्णौ तथाऽऽत्थ ह ॥ १८ ॥
जाणितो तुम्हि ना पुत्र जीवांचे स्वामि हो तुम्ही ।
भार तो उतरायाते पातले, बोलले तसे ॥ १८ ॥

युवां नः सुतौ न - तुम्ही दोघे आमचे मुलगे नव्हेत साक्षात् प्रधानपुरुषेश्वरौ - प्रत्यक्ष प्रकृति व पुरुष ह्यांचेहि अधिपति आहा भूभारक्षत्त्रक्षपणे - पृथ्वीला भारभूत जे राजे त्यांच्या नाशासाठी अवतीर्णौ - अवतार घेतलेले आहा तथा ह आत्थ - तसे तुम्ही सांगितलेहि आहे. ॥१८॥
तुम्ही दोघे आमचे पुत्र नाहीत, तर प्रकृती आणि सर्व जीवांचे स्वामी आहात. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश करण्यासाठीच तुम्ही अवतार धारण केला आहे, ही गोष्ट तुम्ही मला सांगितली होतीच ! (१८)


( वसंततिलका )
तत्ते गतोऽस्म्यरणमद्य पदारविन्दम्
     आपन्नसंसृतिभयापहमार्तबन्धो ।
एतावतालमलमिन्द्रियलालसेन
     मर्त्यात्मदृक् त्वयि परे यदपत्यबुद्धिः ॥ १९ ॥
( वसंततिलका )
जे दीन त्यास हित ते तुम्हि सत्य देता
     पाया म्हणोनि तुमच्या धरितो असा मी ।
इंद्रीयलुप्त तनु ही भयग्रस्त आहे
     तेणेचि आत्म मति ही स्थिर केलि ऐशी ॥ १९ ॥

आर्तबन्धो - हे पीडितांचे रक्षण करणार्‍या कृष्णा तत् - म्हणून अद्य - आज आपन्नसंसृतिभयापहं ते पदारविन्दं - शरणागताचे संसारभय दूर करणार्‍या तुझ्या चरणकमलाला अरणं गतः अस्मि - मी शरण गेलो आहे यत् - ज्याच्या योगाने मर्त्यात्मदृक् - मर्त्य शरीराच्या ठिकाणी आत्मा अशी बुद्धि ठेवणारा झालो परे त्वयि (च) अपत्यबुद्धिः - व श्रेष्ठ अशा तुझ्या ठिकाणी पुत्रबुद्धी ठेवणारा झालो (तेन) एतावता इंद्रियलालसेन अलं अलम् - त्या एवढया इंद्रियलोलुपतेचा संबंध अगदी पुरे झाला. ॥१९॥
म्हणून हे दीनबंधो ! मी आज तुमच्या चरणकमलांना शरण आलो आहे. कारण शरणागतांचे संसारभय नाहीसे करणारे तेच आहेत. पुरे झाली ही इंद्रियांची विषयलोलुपता ! यांमुळेच मी शरीराला आत्मा आणि परमात्मा असणार्‍या तुम्हांला पुत्र समजलो. (१९)


सूतीगृहे ननु जगाद भवानजो नौ
     सञ्जज्ञ इत्यनुयुगं निजधर्मगुप्त्यै ।
नानातनूर्गगनवद् विदधज्जहासि
     को वेद भूम्न उरुगाय विभूतिमायाम् ॥ २० ॥
सूतीगृहात तुम्हिची वदले मला की
     ना जन्म तो तरिहि हे जग तारण्याला ।
तुम्हा द्वया कडुनि हा अवतार घेतो ।
     वेदादि गाति सकलो तव कीर्ति तैशी ॥ २० ॥

अजः भवान् - जन्मरहित तू निजधर्मगुप्त्यै अनुयुगं संजज्ञे इति - स्वधर्मरक्षणासाठी प्रत्येक युगात उत्पन्न होतो असे सूतीगृहे ननु नौ जगाद - प्रसूती प्रसूतीगृहात खरोखर आम्हाला म्हणालास नानातनूः विदधत् (त्वं) - अनेक शरीरे धारण करणारा तू (ताः) गगनवत् जहासि - ती आकाशाप्रमाणे सोडून देतोस उरुगाय - हे सर्वांनी गायिलेल्या श्रीकृष्णा भूम्नः (तव) विभूतिमायां - सर्वव्यापी अशा तुझ्या ऐश्वर्ययुक्त योगमायेला कः वेद - कोण जाणतो. ॥२०॥
प्रभो ! प्रसूतिगृहात तुम्ही आम्हांला सांगितले होते की, " मी जरी अजन्मा असलो, तरीसुद्धा मीच तयार केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येक युगामध्ये, तुम्हा दोघांच्या द्वारा अवतार धारण करतो. " हे भगवन ! तुम्ही आकाशप्रमाणे अलिप्त राहूनही अनेक शरीरे धारण करता आणि सोडता सर्वव्यापी अशा तुमच्या विभूतिरूप योगमायेला कोण जाणू शकेल बरे?" (२०)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
आकर्ण्येत्थं पितुर्वाक्यं भगवान् सात्वतर्षभः ।
प्रत्याह प्रश्रयानम्रः प्रहसन् श्लक्ष्णया गिरा ॥ २१ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! वसुदेवाचे ऐकिले भक्तवत्सले ।
हासले कृष्ण नी नम्र झुकोनी गोड बोलले ॥ २१ ॥

इत्थं पितुः वाक्यं आकर्ण्य - याप्रमाणे पित्या वसुदेवाचे भाषण ऐकून प्रश्रयानम्रः - सप्रेम नम्र झालेला सात्वतर्षभः - यादवश्रेष्ठ भगवान् - श्रीकृष्ण प्रहसन् श्‍लक्ष्णया गिरा प्रत्याह - हसतहसत मृदुवाणीने म्हणाला. ॥२१॥
श्रीशुक म्हणतात- वसुदेवांचे हे बोलणे ऐकून भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण विनम्रतेने मान खाली घालून मधुर वाणीने हसत हसत म्हणाले. (२१)


श्रीभगवानुवाच -
वचो वः समवेतार्थं तातैतदुपमन्महे ।
यन्नः पुत्रान् समुद्दिश्य तत्त्वग्राम उदाहृतः ॥ २२ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
पिताजी ! अम्हि तो पुत्र आम्या लक्षोनिया तुम्ही ।
वदले ब्रह्मज्ञानाते सयुक्त मानितो अम्ही ॥ २२ ॥

तात - अहो ताता समवेतार्थं - अर्थाने भरलेले एतत् वः वचः उपमन्महे - हे तुमचे भाषण आम्ही मान्य करितो यत् - कारण पुत्रान् नः समुद्दिश्य - पुत्र अशा आम्हाला उद्देशून तत्त्वग्रामःउदाहृतः - तत्त्वसमूह उपदेशिला गेला. ॥२२॥
श्रीकृष्ण म्हणाले- बाबा ! आम्हा मुलांना उद्देशून आपण जो हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, तो पूर्ण तर्कसंगत आहे, असे आम्ही मानतो. (२२)


अहं यूयमसावार्य इमे च द्वारकौकसः ।
सर्वेऽप्येवं यदुश्रेष्ठ विमृश्याः सचराचरम् ॥ २३ ॥
पिताजी तुम्हि नी आम्ही द्वारकावासि जीवही ।
सर्वच्या सर्व ती रूपे ब्रह्मरूपचि मानणे ॥ २३ ॥

यदुश्रेष्ठ - हे यादवश्रेष्ठा वसुदेवा अहं यूयं असौ आर्यः - मी, तुम्ही, हा बलराम इमे द्वारकौकसः च - आणि हे द्वारकेत रहाणारे लोक सचराचरं (जगत्) - स्थावरजंगमात्मक जग सर्वे अपि - ही सगळी (एवं) विमृश्याः - याप्रमाणे ब्रह्मच मानावी. ॥२३॥
हे यदुश्रेष्ठ ! आपण सर्वजण, मी , बलरामदादा हे द्वारकानिवासी किंबहुना संपूर्ण चराचर जग असे सगळे आपण ब्रह्मस्वरूपच आहोत, असे समजले पाहिजे. (२३)


आत्मा ह्येकः स्वयंज्योतिः नित्योऽन्यो निर्गुणो गुणैः ।
आत्मसृष्टैस्तत्कृतेषु भूतेषु बहुधेयते ॥ २४ ॥
आत्मा तो एकची आहे गुणाने जन्मतो तसा ।
पंचभूते असा भिन्न प्रकाशा परि दृश्य तो ।
नित्य अनित्य तो होई निर्गुणी सगुणात या ॥ २४ ॥

आत्मा हि एकः - आत्मा हा खरोखर एक आहे स्वयंज्योतिः नित्यः - स्वयंप्रकाश, अविनाशी अन्यः - देहादिकांहून वेगळा निर्गुणः - गुणविरहित असा आत्मसृष्टैः गुणैः - आत्म्यापासून उत्पन्न झालेल्या गुणांनी तत्कृतेषु भूतेषु बहुधा ईयते - त्यांनी निर्मिलेल्या भूतांमध्ये अनेक प्रकारांनी अनुभवास येतो. ॥२४॥
आत्मा हा स्वयंप्रकाश, नित्य, निर्गुण, असूनही त्याने स्वत:च गुणांच्या द्वारा निर्मिलेल्या पंचमहाभूतांमध्ये तो एक असूनही अनेक रूपांनी प्रतीत होतो. (२४)


खं वायुर्ज्योतिरापो भूस्तत्कृतेषु यथाशयम् ।
आविस्तिरोऽल्पभूर्येको नानात्वं यात्यसावपि ॥ २५ ॥
पंचभूतादि हे सर्व दिसती सान थोर ते ।
वास्तवी एकची रूप तुमचे बोल ते खरे ॥ २५ ॥

खं वायुःज्योतिः आपः भूः - आकाश, वायु, तेज, उदक व पृथ्वी ही भूते तत्कृतेषु - त्यांच्यापासून झालेल्या पदार्थांमध्ये यथाशयं नानात्वं (यान्ति) - उपाधींना अनुसरून अनेकपणाला प्राप्त होतात असौ एकः अपि - हा आत्मा एक असताहि आविस्तिरोऽल्पभूरि (नानात्वं) - प्रकट, गुप्त, लहान, मोठा, अशा अनेकपणाला याति - प्राप्त होतो. ॥२५॥
आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पंचमहाभूते कारणस्वरूपात एक असूनही ज्याप्रमाणे आपले कार्य असणार्‍या वस्तूंमध्ये प्रगट-अप्रगट, लहान-मोठी, एक-अनेक अशा रूपांत प्रगट होतात, त्याप्रमाणे आत्मा एक असूनसुद्धा उपाधींच्या भेदामुळे अनेक भासतो. (२५)


श्रीशुक उवाच -
एवं भगवता राजन् वसुदेव उदाहृतः ।
श्रुत्वा विनष्टनानाधीः तूष्णीं प्रीतमना अभूत् ॥ २६ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
परीक्षित् ! कृष्ण बोलाने त्यजिली वसुदेवने ।
विभिन्न बुद्धि ती सर्व आनंदी मग्न जाहले ।
मौन ते धारिले तैसे संकल्पहीन जाहले ॥ २६ ॥

राजन् - हे राजा एवं - याप्रमाणे भगवताउदाहृतः वसुदेवः - श्रीकृष्णाकडून बोलला गेलेला वसुदेव (तत्) श्रुत्वा विनष्टनानाधीः - ते ऐकून ज्याची भेदबुद्धि नष्ट झाली आहे असा प्रीतमनाः तूष्णीं अभूत् - प्रसन्न झाले आहे मन ज्याचे असा स्तब्ध राहिला. ॥२६॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! श्रीकृष्णांची ही वचने ऐकून वसुदेवांनी अनेकत्वबुद्धीचा त्याग केला आणि आनंदात मग्न होऊन ते स्वस्थ राहिले. (२६)


अथ तत्र कुरुश्रेष्ठ देवकी सर्वदेवता ।
श्रुत्वानीतं गुरोः पुत्रं आत्मजाभ्यां सुविस्मिता ॥ २७ ॥
होती तेथे कुरुश्रेष्ठा देवकी सर्वदेवता ।
मृतपुत्र गुरूचा तो आणिला ज्ञात ते तिला ।
लीला ऐकोनिया ऐशा स्तिमित चित्ति होतसे ॥ २७ ॥

कुरुश्रेष्ठ - हे परीक्षिता अथ तत्र - नंतर तेथे सर्वदेवता देवकी - सर्व देवता आहेत जीमध्ये अशी देवकी आत्मजाभ्यां आनीतं गुरोः पुत्रं श्रुत्वा - आपल्या दोघा पुत्रांनी आणिलेल्या सांदीपनी गुरूच्या पुत्राविषयी ऐकून सुविस्मिता - अत्यंत आश्चर्यचकित झाली. ॥२७॥
हे कुरुश्रेष्ठा ! सर्वदेवस्वरूप देवकी आपल्या मुलांनी पूर्वी मृत गुरुपुत्राला परत आणलेले ऐकून अत्यंत आश्चर्यचकित झाली होती. (२७)


कृष्णरामौ समाश्राव्य पुत्रान् कंसविहिंसितान् ।
स्मरन्ती कृपणं प्राह वैक्लव्याद् अश्रुलोचना ॥ २८ ॥
आता त्या सात पुत्रांचा आठवो चित्ति पातला ।
अश्रुंनी भरले नेत्र वदली रामकृष्णला ॥ २८ ॥

कृष्णरामौ - बलराम व श्रीकृष्ण ह्यांना कंसविहिंसितान् पुत्रान् समाश्राव्य - कंसाने मारिलेल्या आपल्या पुत्रांविषयी ऐकवून (तान्) स्मरन्ती - त्या पुत्रांना स्मरणारी वैक्लव्यात् अश्रुलोचना - दुःखाने अश्रु वहात आहेत जीच्या नेत्रांतून अशी कृपणं प्राह - दीनपणाने बोलली. ॥२८ ॥
आता कंसाने मारलेल्या आपल्या पुत्रांची आठवण होऊन दु:खाने देवकीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. ती दीनपणे श्रीकृष्ण-बलरामांना उद्देशून म्हणाली. (२८)


श्रीदेवक्युवाच -
राम रामाप्रमेयात्मन् कृष्ण योगेश्वरेश्वर ।
वेदाहं वां विश्वसृजामि ईश्वरौ आदिपूरुषौ ॥ २९ ॥
देवकी म्हणाली -
लोकाभिराम तू रामा योग्यांचा योगि कृष्ण तू ।
जाणते ब्रहदेवाचे तुम्ही नारायणो असा ॥ २९ ॥

अप्रमेयात्मन् रामराम - ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप करिता येत नाही अशा मनाला आनंद देणार्‍या हे बलरामा योगेश्वरेश्वर कृष्ण - मोठया योग्यांच्या अधिपते श्रीकृष्णा अहं - मी वां - तुम्हा दोघांना विश्वसृजां ईश्वरौ आदिपूरुषौ वेद - प्रजापतीचे अधिपति व मूळ पुरुष असे जाणते. ॥२९॥
देवकी म्हणाली- हे लोकाभिरामा ! मन आणि वाणीला आकलन होणार नाही अशी तुझी शक्ती आहे. हे श्रीकृष्णा ! तू योगेश्वरांचासुद्धा ईश्वर आहेस. तुम्ही दोघेही प्रजापतींचे सुद्धा ईश्वर, आदिपुरुष नारायण आहात, हे मला कळले. (२९)


कलविध्वस्तसत्त्वानां राज्ञां उच्छास्त्रवर्तिनाम् ।
भूमेर्भारायमाणानां अवतीर्णौ किलाद्य मे ॥ ३० ॥
काळाने आपुले धैर्य सत्त्व संयम सोडिले ।
स्वेच्छाचारी तसे झाले धर्म ओलांडिला जये ।
अशांना मारण्या जन्म तुम्ही हा घेतला असे ॥ ३० ॥

कालविध्वस्तसत्त्वानां उच्छास्त्रवर्तिना - ज्यांचे बळ काळाने नष्ट झाले आहे व जे अधर्माने वागणारे आहेत अशा भूमेर्भारायमाणानां राज्ञां - पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांच्या अद्य किल - आज खरोखर मे - माझ्या ठिकाणी अवतीर्णौ - तुम्ही दोघे अवतरला आहा. ॥३०॥
कालगतीनुसार सत्वगुण नाहीसा होऊन जे शास्त्राच्या आज्ञांचे उल्लंघन करून स्वच्छंदीपणे वागत होते, अशा भूमीला भार झालेल्या राजांचा नाश करण्यासाठी तुम्ही दोघे माझे पुत्र म्हणून अवतीर्ण झालात, हेही मला माहित आहे. (३०)


यस्य अशांशांशभागेन विश्वोत्पत्तिलयोदयाः ।
भवन्ति किल विश्वात्मन् तं त्वाद्याहं गतिं गता ॥ ३१ ॥
तुम्हा पुरुष अंशाची माया ती गुण निर्मिते ।
लेशाने जग हे जन्मे विकास प्रलयो तसा ।
हृदया पासुनी आज तुम्हा शरण पातले ॥ ३१ ॥

विश्वात्मन् - हे जगन्मूर्ते श्रीकृष्णा अहं - मी यस्य अंशांशांशभागेन विश्वोत्पत्तिलयोदयाः किल भवन्ति - ज्याच्या अंशाच्या अंशाच्याहि अंशाच्या विभागाने जगाची उत्पत्ति, स्थिति व संहार ही खरोखर होतात तं त्वा अद्य गतिं गता - त्या तुला मी आज शरण आले आहे. ॥३१॥
हे विश्वात्मन ! ज्यांच्या पुरुषरूप अंशापासून उत्पन्न झालेल्या मायेचे अंश असणार्‍या गुणांच्या केवळ अंशाने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो, त्या तुम्हांला आज मी शरण आले आहे. (३१)


चिरान् मृतसुतादाने गुरुणा किल चोदितौ ।
आनिन्यथुः पितृस्थानाद् गुरवे गुरुदक्षिणाम् ॥ ३२ ॥
आणिला बहुती वर्षे मेलेला गुरुपुत्र तो ।
दक्षिणा दिधली त्यांना सर्व ते ज्ञातची मला ॥ ३२ ॥

गुरुणा - सांदीपनीने चिरान्मृतसुतादाने - पुष्कळ काळापूर्वी मृत झालेल्या पुत्राला आणण्यासाठी कालचोदितौ (युवाम्) - योग्य काळी प्रेरिलेले तुम्ही दोघे गुरवे गुरुदक्षिणां (इति) - गुरूला गुरुदक्षिणा म्हणून पितृस्थानात् आनिन्यथुः - यमलोकातून आणिते झालात. ॥३२॥
तुमचे गुरु सांदीपनी यांच्या पुत्राचा मृत्यू होऊन पुष्कळ दिवस झाले होते. त्यांना गुरुदक्षिणा देण्यासाठी तुम्ही दोघांनी काळाच्या प्रेरणेने त्यांचा पुत्र यमपुरीहून आणून त्यांना परत दिला होता. (३२)


तथा मे कुरुतं कामं युवां योगेश्वरेश्वरौ ।
भोजराजहतान् पुत्रान् कामये द्रष्टुमाहृतान् ॥ ३३ ॥
योगयोगेश्वरो तुम्ही माझी इच्छा करा पुरी ।
कंसाने मारिल्या पुत्रा आणावे, पाहु द्या मला ॥ ३३ ॥

योगेश्वरेश्वरौ युवां - मोठया योग्यांचेहि अधिपति असे तुम्ही दोघे तथा मे कामं कुरुतं - तशाच रीतीने माझी इच्छा पूर्ण करा भोजराजहतान् - कंसाने मारिलेल्या पुत्रान् - पुत्रांना (युवाभ्यां) आहृतान् - तुम्ही परत आणिलेले द्रष्टुं - पहाण्यास कामये - इच्छिते. ॥३३॥
तुम्ही दोघे योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर आहात. म्हणून आज माझीसुद्धा इच्छा पूर्ण करा. ज्यांना कंसाने मारले होते, त्या माझ्या पुत्रांना तुम्ही दोघांनी घेऊन यावे. मी त्यांना डोळे भरून पाहीन. (३३)


ऋषिरुवाच -
एवं सञ्चोदितौ मात्रा रामः कृष्णश्च भारत ।
सुतलं संविविशतुः योगमायां उपाश्रितौ ॥ ३४ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
मातेची ऐकता इच्छा सुतला राम कृष्ण ते ।
योगमायाश्रये गेले प्रियराजा परीक्षिता ॥ ३४ ॥

भारत - हे परीक्षित राजा एवं मात्रा संचोदितौ रामः कृष्णः च - याप्रमाणे आईने प्रेरिलेले बलराम व श्रीकृष्ण योगमायां उपाश्रितौ - योगमायेचा आश्रय करून सुतलं संविविशतुः - सुतलामध्ये गेले. ॥३४॥
श्रीशुक म्हणतात- हे परीक्षिता ! मातेचे हे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनीही योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. (३४)


( वशंस्था )
तस्मिन्प्रविष्टावुपलभ्य दैत्यराड्
     विश्वात्मदैवं सुतरां तथात्मनः ।
तद्दर्शनाह्लादपरिप्लुताशयः
     सद्यः समुत्थाय ननाम सान्वयः ॥ ३५ ॥
( इंद्रवज्रा )
राजा बळीने बलराम कृष्णा
     जै पाहिले त्या जगदात्मरूपा ।
नी दर्शने मग्न नि हर्ष पावे
     उठोनि सर्वें नमिले हरीला ॥ ३५ ॥

तस्मिन् - त्या सुतलात प्रविष्टौ - शिरलेले विश्वात्मदैवं - सर्व जगाचे दैवत असे तथा सुतरां आत्मनः दैवं - तसेच विशेषेकरून आपले दैवत असे (तौ) उपलभ्य - ते बलराम व कृष्ण पाहून तद्दर्शना हृलादपरिप्लुताशयः - त्याच्या दर्शनाने झालेल्या आनंदाने भरून गेले आहे हृदय ज्याचे असा दैत्यराट् - दैत्यांचा राजा बळी सद्यः समुत्थाय - तत्काळ उठून सान्वयः - आपल्या कुटुंबासह ननाम - नमस्कार करिता झाला. ॥३५॥
जगाचे व आपले आत्मा आणि इष्टदेव असे राम-कृष्ण आलेले पाहून त्यांच्या दर्शनाने बलीचे हृदय आनंदात मग्न झाले. त्याने आपल्या कुटुंबियांसह ताबडतोब आपल्या आसनावरून उठून भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला. (३५)


तयोः समानीय वरासनं मुदा
     निविष्टयोस्तत्र महात्मनोस्तयोः ।
दधार पादाववनिज्य तज्जलं
     सवृन्द आब्रह्म पुनद् यदम्बु ह ॥ ३६ ॥
नी आसने ती दिधली बसाया
     नी बैसता ते धुतलेहि पाय ।
ब्रह्म्यासही जे करिते पवित्र
     ते तीर्थ घेई अपुल्या शिरी तो ॥ ३६ ॥

सवृन्दः (सः) - परिवारासह बलिराजा निविष्टयोः तयोः - प्रविष्ठ झालेल्या त्या दोघांसाठी मुदा वरासनं समानीय - आनंदाने श्रेष्ठ आसन देऊन तत्र तयोः महात्मनोः पादौ अवनिज्य - तेथे त्या महात्म्यांचे पाय धुऊन तज्जलं दधार - ते उदक धारण करिता झाला यत् अम्बु ह आब्रह्म (जगत्) पुनत् (वरीवर्ति) - जे उदक खरोखर ब्रह्मदेवापर्यंत सर्व जगाला पवित्र करीत शोभत आहे. ॥३६॥
अत्यंत आनंदित होऊन त्याने त्या महापुरुषांना श्रेष्ठ आसन दिले आणि जेव्हा ते दोघे त्यावर विराजमान झाले. तेव्हा त्याने त्यांचे पाय धुऊन जे चरणतीर्थ ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना पवित्र करते, ते परिवारासह, आपल्या मस्तकी धारण केले. (३६)


समर्हयामास स तौ विभूतिभिः
     महार्हवस्त्राभरणानुलेपनैः ।
ताम्बूलदीपामृतभक्षणादिभिः
     स्वगोत्रवित्तात्मसमर्पणेन च ॥ ३७ ॥
तै दैत्यराये बहुमूल्य वस्त्र
     आभूषणे तांबुल चंदनादी ।
पत्‍नीसवे ते द्वय पूजिले नी
     अर्पीयले सर्वचि नी नमीले ॥ ३७ ॥

सः - तो बलिराजा विभूतिभिः - मोठमोठया ऐश्वर्ययुक्त अशा महार्हवस्त्राभरणानुलेपनैः - मोठी मूल्यवान वस्त्रे, अलंकार, चंदनादि उटी यांनी ताम्बूलदीपामृतभक्षणादिभिः - विडे, दीप, मधुर असे खाण्याचे पदार्थ इत्यादिकांनी च स्वगोत्रवित्तात्मसमर्पणेन - आणि स्वतःचे कुल व द्रव्य यांसहित स्वतःला अर्पण करून तौ समर्हयामास - त्या दोघांची पूजा करिता झाला. ॥३७॥
नंतर बहुमोल वस्त्रे, अलंकार, चंदन, तांबूल, दीपक, अमृतासारखे भोजन तसेच अन्य विविध सामग्रींनी त्यांची उत्तम पूजा केली आणि आपला परिवार, धन तसेच स्वत:लाही त्यांच्या चरणांवर समर्पित केले. (३७)


स इन्द्रसेनो भगवत्पदाम्बुजं
     बिभ्रन्मुहुः प्रेमविभिन्नया धिया ।
उवाच हानन्दजलाकुलेक्षणः
     प्रहृष्टरोमा नृप गद्‌गदाक्षरम् ॥ ३८ ॥
तो दैत्यरजा हरिपाद घेई
     वक्षी तसा तो धरि मस्तकाते ।
प्रेमे तयाचे भरलेचि नेत्र
     रोमांच होता स्तुति गायि दैत्य ॥ ३८ ॥

नृप - हे परीक्षित राजा भगवत्पदाम्बुजं मुहुः बिभ्रत् सः इंद्रसेनः - श्रीकृष्णाच्या चरणकमळाला वारंवार धारण करणारा तो बलिराजा प्रेमविभिन्नया धिया - प्रेमाने थबथबलेल्या हृदयाने आनंदजलीकुलेक्षणः - आनंदाश्रूंनी ज्याचे डोळे भरून गेले आहेत असा प्रहृष्टरोमा गद्‌गदाक्षरम् उवाच ह - रोमांच उत्पन्न झालेला अडखळत बोलला. ॥३८॥
हे राजा ! बलीने प्रेमपूर्ण बुद्धीने वारंवार भगवंतांचे चरणकमल घट्ट धरले. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अंग रोमांचित झाले. तो सद्‌गददित होऊन भगवंतांची स्तुती करू लागला. (३८)


बलिरुवाच -
( अनुष्टुप् )
नमोऽनन्ताय बृहते नमः कृष्णाय वेधसे ।
साङ्ख्ययोगवितानाय ब्रह्मणे परमात्मने ॥ ३९ ॥
दैत्यराज बळी म्हणाला -
( अनुष्टुप् )
नमस्ते शेषरूपाला श्रीकृष्णासी तसे नमो ।
सांख्ययोग प्रबोधाला परमात्म्या नमो नमः ॥ ३९ ॥

बृहते अनन्ताय नमः - मोठया शेषस्वरूपी तुला नमस्कार असो वेधसे कृष्णायः नमः - जगत् निर्माण करणार्‍या कृष्णाला नमस्कार असो साङ्‌ख्ययोगवितानाय परमात्मने ब्रह्मणे (नमः) - सांख्य व योग ह्यांचा प्रसार करणार्‍या ब्रह्मस्वरूपी परमात्म्या तुला नमस्कार असो. ॥३९॥
बली म्हणाला- महान अशा अनंताला माझा नमस्कार असो. सर्व जगाचे निर्माते, ज्ञानयोग आणि भक्तियोग यांचे प्रवर्तक, परब्रह्मस्वरूप अशा आपल्यालाही नमस्कार असो. (३९)


दर्शनं वां हि भूतानां दुष्प्रापं चाप्यदुर्लभम् ।
रजस्तमःस्वभावानां यन्नः प्राप्तौ यदृच्छया ॥ ४० ॥
द्वयांची दर्शने प्राण्यां दुर्लभो, मिळते कृपे ।
रज तम स्वभावांच्या दैत्याहि भेटता तुम्ही ॥ ४० ॥

भूतानां दुष्प्रापं च अपि हि - प्राण्याला मिळण्यास कठीण असेही खरोखर वां दर्शनम् - तुम्हा दोघांचे दर्शन (केषांचित्) अदुर्लभम् (भवति) - कित्येकांना सुलभ होते यत् - कारण रजस्तमःस्वभावानां नः - रज, तम या गुणांनी युक्त अशा आम्हाला (युवां) यदृच्छया प्राप्तौ - तुम्ही सहजगत्या भेटला. ॥४०॥
भगवन ! आपल्या दोघांचे दर्शन प्राण्यांना अत्यंत दुर्लभ असूनसुद्धा आपल्या कृपेने ते सुलभ असावे; कारण आज आपण कृपा करून रजोगुणी आणि तमोगुणी स्वभाव असलेल्या आम्हां दैत्यांनाही दर्शन दिलेत. (४०)


दैत्यदानवगन्धर्वाः सिद्धविद्याध्रचारणाः ।
यक्षरक्षःपिशाचाश्च भूतप्रमथनायकाः ॥ ४१ ॥
विशुद्धसत्त्वधाम्न्यद्धा त्वयि शास्त्रशरीरिणि ।
नित्यं निबद्धवैरास्ते वयं चान्ये च तादृशाः ॥ ४२ ॥
केचनोद्‌बद्धवैरेण भक्त्या केचन कामतः ।
न तथा सत्त्वसंरब्धाः सन्निकृष्टाः सुरादयः ॥ ४३ ॥
आमुच्या सम जे दैत्य सिद्ध गंधर्व दानव ।
यक्ष चारण नी भूत विद्याधर नि राक्षस ॥ ४१ ॥
भजणे दूर ते राहो तुजसी वैर ठेविती ।
वेदमय असे शुद्ध सत्वरूप तुझे हरी ॥ ४२ ॥
काहींनी स्मरता तूते पदाला मिळवीयले ।
समीप देवता त्यांना कधी ना मिळते असे ॥ ४३ ॥

दैत्यदानवगन्धर्वाः - दैत्य, दानव, गंधर्व सिद्धविद्याधरचारणाः - सिद्ध, विद्याधर, चारण यक्षरक्षःपिशाचाः (च) भूतप्रमथनायकाः च - यक्ष, राक्षस आणि पिशाच तसेच भूत व प्रमथ यांचे अधिपति तादृशाः अन्ये च वयं च ते च - तशाचसारखे दुसरे व आम्ही आणि ते सर्व विशुद्धसत्त्वधाम्नि शास्त्रशरीरिणी त्वयि - अत्यंत शुद्ध, सत्त्व गुणात्मक तेजोरूप अशा, व शास्त्र हेच शरीर आहे ज्याचे अशा तुझ्या ठिकाणी अद्धा नित्यं निबद्धवैराः (आसन्) - नित्य बांधलेले आहे वैर ज्यांचे असे होते. ॥४१-४२॥ केचन उद्‌बद्धवैरेण भक्त्या - कित्येक उत्कटतेने बांधलेल्या वैराने केलेल्या भक्तीने केचन कामतः (भक्त्या) - कित्येक कामवासनेने केलेल्या भक्तीने यथा - जसे संनिकृष्टाः - तुझ्याकडून जवळ ओढिले गेले तथा - तसे सत्त्वसंरब्धाः सुरादयाः न (संनिकृष्टाः) - सत्त्वगुणात्मक देव आदिकरूनहि जवळ ओढिले गेले नाहीत. ॥४३॥
हे प्रभो ! आम्ही आणि आमच्यासारखे दुसरे दैत्य. दानव, गंधर्व, सिद्ध, विद्याधर,चारण, यक्ष, राक्षस, पिशाच्च, भूत आणि प्रमथनायक इत्यादी आपल्याशी नेहमी वैरभावाने वागतात; परंतु असे असूनही साक्षात वेदमय आणि विशुद्ध सत्त्वस्वरूप अशा आपली काहींनी वैरभावाने, काहींनी भक्तीने आणि काहींनी काही कामना धरून प्राप्ती करून घेतली. जी आपल्याजवळ राहूनही सत्त्वप्रधान देवादिकांना झाली नाही. (४१-४३)


इदमित्थमिति प्रायः तव योगेश्वरेश्वर ।
न विदन्त्यपि योगेशा योगमायां कुतो वयम् ॥ ४४ ॥
योगेश्वर असे थोर तुझी माया न जाणिती ।
तर हे आम्हि ते कोण आम्हाला कळणे कशी ॥ ४४ ॥

योगेश्वरेश्वर - हे योग्यांच्या नियंत्या कृष्णा योगेशाः अपि - मोठमोठे योगी सुद्धा इदं इत्थं इति - हे असे आहे अशा रीतीने प्रायः - बहुतकरून तव योगमायां न विदन्ति - तुझ्या योगमायेला जाणत नाहीत वयं कुतः (विद्मः) - आम्ही कोठून जाणणार ? ॥४४॥
हे योगेश्वरांचे अधीश्वर ! आपली योगमाया ही आहे आणि अशी आहे, हे जर योगेश्वरसुद्धा प्राय: जाणत नाहीत, तर आमच्याविषयी काया सांगावे ? (४४)


( वसंततिलका )
तन्नः प्रसीद निरपेक्षविमृग्ययुष्मत्
     पादारविन्दधिषणान्यगृहान्धकूपात् ।
निष्क्रम्य विश्वशरणाङ्‌घ्र्युपलब्धवृत्तिः
     शान्तो यथैक उत सर्वसखैश्चरामि ॥ ४५ ॥
( वसंततिलका )
सांगा मला चरणि चित्त रहावयाला
     कांही उपाय असला, गति जैचि लाभे ।
शांती अशीच हवि जी विचरेल एक
     झालाचि संग तर तो घडवा सतांसी ॥ ४५ ॥

तत् नः प्रसीद - म्हणून आमच्यावर प्रसन्न हो निरपेक्षविमृग्ययुष्मत्पादारविन्दधिषणान्यगृहान्धकूपात् निष्क्रम्य - निरिच्छ भावनेने शोधण्यास योग्य असे तुमचे जे चरणकमलरूपी आश्रयस्थान त्याहून निराळ्या अशा क्षुद्र गृहरूपी अंधकारमय विहिरीतून बाहेर पडून विश्वशरणाङ्‌घ्र्युपलब्धवृतिः - विश्वाचे रक्षण करणारे जे वृक्ष त्यांच्या तळापासून मिळविली आहे उपजीविका ज्याने असा शांतः (सन्) - शांत झालेला असा एकः - एकटा उत - किंवा सर्वसखैः (सह) - सर्वांचे मित्र अशा साधूंसह चरामि - हिंडेन. ॥४५॥
म्हणून, हे स्वामिन ! माझ्यावर अशी कृपा करा की, कशाचीही अपेक्षा न ठेवणारे परमहंस ज्यांचा शोध घेत असतात, अशा आपल्या चरणकमलांच्या ठायी माझी चित्तवृत्ती जडावी आणि त्यायोगे मी, त्यापासून अत्यंत वेगळ्या अशा या गृहस्थाश्रमाच्या अंधार्‍या विहिरीतून वर यावे. हे प्रभो ! अशा प्रकारे, जे सगळ्या विश्वाचे एकमेव आश्रय आहेत, त्या आपल्या चरणकमलांना मी शरण जाऊन शांतचित्त व्हावे. सर्वांचे हितचिंतक अशा संतांचीच मी संगत धरावी. (४५)


( अनुष्टुप् )
शाध्यस्मानीशितव्येश निष्पापान् कुरु नः प्रभो ।
पुमान्यच्छ्रद्धयातिष्ठन् चोदनाया विमुच्यते ॥ ४६ ॥
( अनुष्टुप् )
संपावे पाप हे सर्व आज्ञा स्वामी अशी वदा ।
श्रद्धेने पाळिता आज्ञा बंध हे सर्व नष्टती ॥ ४६ ॥

ईशितव्येश प्रभो - सेवकस्वरूपी जीवांचा स्वामी अशा हे श्रीकृष्णा अस्मान् शाधि - आम्हाला शिकव नः निष्पापान् कुरु - आम्हाला निष्पाप कर यत् श्रद्धया तिष्ठन् पुमान् - ज्यावर श्रद्धा ठेवून रहाणारा पुरुष चोदनायाः विमुच्यते - धर्माज्ञेतून मुक्त होतो. ॥४६॥
चराचराचे नियंते असणार्‍या हे प्रभो! आपण आम्हांला आज्ञा करून आमच्या पापांचा नाश करा. कारण जो पुरुष श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो, तो विधिनिषेधाच्या बंधनातून मुक्त होतो. (४६)


श्रीभगवानुवाच -
आसन् मरीचेः षट्पुत्रा ऊर्णायां प्रथमेऽन्तरे ।
देवाः कं जहसुर्वीक्ष्य सुतं यभितुमुद्यतम् ॥ ४७ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले -
ऊर्णीगर्भी मरीचीला सहादेवचि जन्मले ।
ब्रह्मा जै पुत्रिच्या मागे धावला हांसले तदा ॥ ४७ ॥

प्रथमे अन्तरे - पहिल्या मन्वन्तरामध्ये मरीचेः ऊर्णायां षट् पुत्राः आसन् - मरीचि ऋषीपासून ऊर्णेच्या ठिकाणी सहा पुत्र झाले देवाः - देव सुतां यभितुं उद्यतं कं - मुलीशी संभोग करण्यास उद्युक्त झालेल्या ब्रह्मदेवाला वीक्ष्य जहसुः - पाहून हसू लागले. ॥४७॥
श्रीकृष्ण म्हणाले- " स्वायंभुव मन्वन्तरामध्ये मरीचीला ऊर्जेपासून सहा पुत्र झाले होते. ते सर्व देव होते. ब्रह्मदेव आपल्या कन्येशीच समागम करण्यासाठी उद्युक्त झालेला पाहून ते हसू लागले. (४७)


तेनासुरीमगन् योनिं अधुनावद्यकर्मणा ।
हिरण्यकशिपोर्जाता नीतास्ते योगमायया ॥ ४८ ॥
देवक्या उदरे जाता राजन् कंसविहिंसिताः ।
सा तान् शोचत्यात्मजान् स्वां ते इमेऽध्यासतेऽन्तिके ॥ ४९ ॥
ब्रह्म्याने शापिता त्यांना असुरी योनि लाभली ।
हिरण्यकशिपू पोटी, पुन्हा ते देवकीचिया ॥ ४८ ॥
गर्भात जन्मले सर्व योगमाया करी तसे ।
कंसाने मारिले सर्व येथे ते पातले पुन्हा ॥ ४९ ॥

ते - ते देव तेन अवद्यकर्मणा - त्या निंद्य कर्माने आसुरीं योनिम् अगमन् - असुरयोनीला प्राप्त झाले अधुना हिरण्यकशिपोः जाताः - तत्क्षणी हिरण्यकशिपूच्या पोटी जन्मास आले योगमायया नीताः ते - योगमायेने तेथून नेलेले ते. ॥४८॥ राजन् - हे राजा देवक्याः उदरे जाताः - देवकीच्या उदरी जन्मलेले कंसविहिंसिताः - कंसाने मारून टाकिले सा - ती देवकी तान् स्वान् आत्मजान् शोचति - त्या स्वतःच्या पुत्रांविषयी शोक करीत आहे इमे ते (तव) अन्तिके अध्यासते - ते हे पुत्र तुझ्या जवळ रहात आहेत.॥४९॥
त्या अपराधामुळे ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला आणि ते असुरयोनीमध्ये हिरण्यकशिपुचे पुत्र झाले. आता योगमायेने त्यांना तेथून आणून देवकीच्या गर्भामध्ये ठेवले आणि त्यांचा जन्म होताच कंसाने त्यांना मारून टाकले. हे दैत्यराजा ! देवकी त्या पुत्रांसाठी अतिशय शोकाकुल झाली आहे. ते पुत्र तुझ्याजवळ आहेत. (४८-४९)


इत एतान् प्रणेष्यामो मातृशोकापनुत्तये ।
ततः शापाद् विनिर्मुक्ता लोकं यास्यन्ति विज्वराः ॥ ५० ॥
मातेचा शोक तो दूर करण्या नेउ इच्छितो ।
शाप त्यांचा मिटे तेंव्हा जातीलहि स्वलोकि ते ॥ ५० ॥

मातृशोकापनुत्तये - मातेचा शोक दूर करण्यासाठी एतान् इतः प्रणेष्यामः - ह्या पुत्रांना येथून नेणार आहो ततः शापाद्विनिर्मुक्ताः - नंतर शापातून मुक्त झालेले विज्वराः - पीडारहित असे (देव) लोकं यास्यन्ति - देवलोकी जातील. ॥५०॥
म्हणून आम्ही आपल्या मातेचा शोक नाहीसा करण्यासाठी त्यांना येथून घेऊन जाऊ. यानंतर हे शापातून मुक्त होतील आणि आनंदाने आपल्या लोकात जातील. (५०)


स्मरोद्‌गीथः परिष्वङ्गः पतङ्गः क्षुद्रभृद् घृणी ।
षडिमे मत्प्रसादेन पुनर्यास्यन्ति सद्‌गतिम् ॥ ५१ ॥
स्मरद्‌गीथो परिष्वंग पतंगो क्षुद्रभूत् घृणी ।
मिळेल सद्‌गती यांना माझ्या ऐशा कृपेमुळे ॥ ५१ ॥

स्मरोद्‌गीथः परिष्वङ्‌गः पतङ्‌ग क्षुद्रभृत् घृणी - स्मर, उद्‌गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत, घृणी इमे षट् - हे सहा मत्प्रसादेन पुनः सद्‌गतिं यास्यन्ति - माझ्या प्रसादाने पुनः सद्‌गतीला जातील. ॥५१॥
स्मर, उद्‌गीथ, परिष्वंग, पतंग, क्षुद्रभृत आणि घृणी अशी या सहाजणांची नावे आहेत. माझ्या कृपेने यांना पुन्हा सद्‌गती प्राप्त होईल. (५१)


इत्युक्त्वा तान् समादाय इन्द्रसेनेन पूजितौ ।
पुनर्द्वारवतीमेत्य मातुः पुत्रानयच्छताम् ॥ ५२ ॥
वदता जाहले शांत दैत्याने पूजिले द्वयां ।
दोघांनी आणिले पुत्र दिधले देवकीस ते ॥ ५२ ॥

इन्द्रसेनेन पूजितौ (तौ रामकृष्णौ) - बलिराजाने पूजिलेले ते बलराम व श्रीकृष्ण इति उक्त्वा - असे बोलून तान् पुत्रान् समादाय - त्या मुलांना घेऊन पुनः द्वारवतीम् एत्य - पुनः द्वारकेत येऊन मातुः अयच्छताम् - मातेला अर्पिते झाले. ॥५२॥
असे सांगितल्यावर बलीने त्या दोघांची पूजा करून ती मुले त्यांच्या स्वाधीन केली. यानंतर बालकांना घेऊन ते दोघे द्वारकेला परत आले व त्यांनी माता देवकीकडे तिचे पुत्र सोपविले. (५२)


तान् दृष्ट्वा बालकान् देवी पुत्रस्नेहस्नुतस्तनी ।
परिष्वज्याङ्कमारोप्य मूर्ध्न्यजिघ्रदभीक्ष्णशः ॥ ५३ ॥
देवकी पाहता बाळे हृदयी प्रेम दाटले ।
स्तनात दाटले दुग्ध सुंगी त्यां वक्षि घेउनी ॥ ५३ ॥

देवी - देवकी तान् बालकान् दृष्टवा - त्या मुलांना पाहून पुत्रस्नेहस्नुतस्तनी - पुत्रप्रेमामुळे जिच्या स्तनांतून दूध गळत आहे अशी परिष्वज्य अङ्‌कं आरोप्य - आलिंगन देऊन व मांडीवर बसवून अभीक्ष्णशः मूर्घ्नि अजिघ्रत् - वारंवार मस्तकाला हुंगिती झाली. ॥५३॥
त्या मुलांना पाहून देवकीच्या स्तनांतून पुत्रस्नेहाने दुधाच्या धारा वाहू लागल्या. वारंवार त्यांना मांडीवर घेऊन व छातीशी धरून ती त्यांची मस्तके हुंगू लागली. (५३)


अपाययत् स्तनं प्रीता सुतस्पर्शपरिप्लुता ।
मोहिता मायया विष्णोः यया सृष्टिः प्रवर्तते ॥ ५४ ॥
आनंदे भरता ऐसे देवकी पाजि त्या मुलां ।
मोहीत जाहली माये विष्णुचे सृष्टिचक्र हे ॥ ५४ ॥

यया सृष्टिः प्रवर्तते - ज्या मायेच्या योगे सृष्टि उत्पन्न होते (तया) विष्णोः मायया मोहिता - त्या विष्णूच्या मायेने मोहित झालेली देवकी सुतस्पर्शपरिप्लुता प्रीता - पुत्रांच्या स्पर्शाने आनंदाने भरून गेलेली अशी स्तनं अपाययत् - स्तन पाजिती झाली. ॥५४॥
पुत्रांच्या स्पर्शाने आनंदित झालेल्या देवकीने त्यांना स्तनपान करविले. कारण ज्याच्यामुळे हे सृष्टीचक्र चालते, त्या भगवंतांच्या मायेने ती मोहित झाली होती. (५४)


पीत्वामृतं पयस्तस्याः पीतशेषं गदाभृतः ।
नारायणाङ्गसंस्पर्श प्रतिलब्धात्मदर्शनाः ॥ ५५ ॥
ते नमस्कृत्य गोविन्दं देवकीं पितरं बलम् ।
मिषतां सर्वभूतानां ययुर्धाम दिवौकसाम् ॥ ५६ ॥
साक्षात् अमृत ते होय पिला जे कृष्णदेव ते ।
कृष्णाने स्पर्शिता त्यांना आत्मज्ञानचि जाहले ॥ ५५ ॥
देवकी वसुदेवाला कृष्ण रामासही तदा ।
बाळांनी वंदिले आणि देवलोकासि पातले ॥ ५६ ॥

गदाभृतः पीतशेष तस्याः अमृतं पयः पीत्वा - गदाधारी श्रीकृष्णाने पिऊन उरलेल्या त्या देवकीच्या मधुर दुधाचे प्राशन करून नारायणाङ्‌गसंस्पर्शप्रतिलब्धात्मदर्शनाः - नारायणाच्या शरीरस्पर्शाने झाले आहे स्वस्वरूपाचे दर्शन ज्यांना असे ते - ते पुत्र गोविन्दं देवकीं पितरं बलं नमस्कृत्य - श्रीकृष्ण, देवकी, वसुदेव व बलराम ह्यांना नमस्कार करून सर्वभूतानां मिषतां - सर्व लोकांसमक्ष दिवौकसां धाम ययुः - देवांच्या लोकाला गेले. ॥५५-५६॥
देवकीच्या स्तनांतील श्रीकृष्णांनी पिऊन उरलेले अमृतमय दूध प्यालामुळे आणि भगवान श्रीकृष्णांच्या अंगाचा स्पर्श झाल्याने त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. (५५) यानंतर त्या सर्वांनी श्रीकृष्ण देवकी, वसुदेव आणि बलराम यांना नमस्कार केला आणि सर्वांच्या देखतच ते देवलोकाकडे गेले. (५६)


तं दृष्ट्वा देवकी देवी मृतागमननिर्गमम् ।
मेने सुविस्मिता मायां कृष्णस्य रचितां नृप ॥ ५७ ॥
विस्मीत देवकी झाली आले गेलेही पुत्र ते ।
उमगे ती मनामाजी कृष्णाची सर्व ही लिला ॥ ५७ ॥

नृप - हे राजा देवकी देवी - देवकी माता तं मृतागमननिर्गमं दृष्टवा - त्या मृत पुत्रांचे येणे व पुनः जाणे हे पाहून सुविस्मिता - आश्चर्यचकित झालेली (तां) कृष्णस्य रचितां मायां मेने - ती कृष्णाने रचिलेली माया मानिती झाली. ॥५७॥
परीक्षिता ! मेलेली मुले परत आली आणि पुन्हा निघूनही गेली. हे पाहून देवकीला अत्यंत आश्चर्य वाटले. ही श्रीकृष्णांचीच माया आहे, हे तिला कळले. (५७)


एवंविधान्यद्‌भुतानि कृष्णस्य परमात्मनः ।
वीर्याण्यनन्तवीर्यस्य सन्त्यनन्तानि भारत ॥ ५८ ॥
कृष्णाची शक्ति ही ऐशी अनंत परमात्म तो ।
अद्‌भूत कैक त्याच्या त्या कथा, ना थांग लागतो ॥ ५८ ॥

भारत - हे परीक्षित राजा अनन्तवीर्यस्य परमात्मनः कृष्णस्य - अगणित पराक्रम करणार्‍या परमात्म्या श्रीकृष्णाची एवंविधानि अनन्तानि अद्‌भुतानि वीर्याणि - अशा प्रकारची अगणित आश्चर्यकारक पराक्रमाची कृत्ये सन्ति - आहेत. ॥५८॥
परीक्षिता ! अनंतशक्ती भगवान श्रीकृष्णांची अशी अद्भुउत चरित्रे अनंत आहेत. (५८)


श्रीसूत उवाच -
( मालिनी )
य इदमनुशृणोति श्रावयेद् वा मुरारेः
     चरितममृतकीर्तेर्वर्णितं व्यासपुत्रैः ।
जगदघभिदलं तद्‌भक्तसत्कर्णपूरं
     भगवति कृतचित्तो याति तत्क्षेमधाम ॥ ५९ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
मृताग्रजानयनं नाम पञ्चाशीतितमोऽध्यायः ॥ ८५ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
सूतजी सांगतात -
( द्रुतविलंबित )
अमर अशि हरीची कीर्ति आहे सुधा जै
     मिटवि सकल तापा भक्तकर्णात जाता ।
सकल स्वय शुकांनी वर्णिली व्यासपुत्रे
     मिटति सकल वृत्ती लाभते मोक्षधाम ॥ ५९ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर पंच्याऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

यः - जो कोणी भगवतिकृतचित्तः - भगवंताच्या ठिकाणी ठेविले आहे अन्तःकरण ज्याने असा व्यासपुत्रेः वर्णितं - व्यासपुत्र जे शुकाचार्य त्यांनी वर्णिलेले जगदघभित् - जगातील पातकांचा नाश करणारे तद्‌भक्तसत्कर्णपूरं - त्या भगवद्‌भक्तांचा कानात घालण्याचा उत्तम अलंकार असे अमृतकीर्तेः मुरारेः इदं चरितं - अविनाशी आहे कीर्ती ज्याची अशा श्रीकृष्णाचे हे चरित्र अलं अनुश्रृणोति श्रावयेत वा - मनःपूर्वक श्रवण करील किंवा ऐकवील (सः) तत्क्षेमधाम याति - तो त्या परमेश्वराच्या कल्याणमय स्थानाला जाईल. ॥५९॥ पंचाऐंशीवा अध्याय समाप्त
सूत म्हणतात- अमरकीर्ती श्रीकृष्णांचे हे श्रीशुकांनी वर्णन केलेले चरित्र सर्व जगाचे पाप पूर्णपणे मिटवणारे व भक्तांच्या कानांचे भूषण आहे. जो याचे श्रवण करतो किंवा ते दुसर्‍याला ऐकवितो, त्याच्या चित्तवृत्ती भगवंतांचे ठिकाणी लागतात आणि तो त्यांचा परम कल्याणस्वरूप लोक प्राप्त करून घेतो. (५९)


अध्याय पंचाऐंशीवा समाप्त

GO TOP