|
श्रीमद् भागवत पुराण ऋषिगणकृता भगवत्स्तुतिः; वसुदेवयज्ञोत्सवः; बन्धूनां प्रस्थापनादिकं च - वसुदेवांचा यज्ञोत्सव - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( वसंततिलका ) श्रुत्वा पृथा सुबलपुत्र्यथ याज्ञसेनी माधव्यथ क्षितिपपत्न्य उत स्वगोप्यः । कृष्णेऽखिलात्मनि हरौ प्रणयानुबन्धं सर्वा विसिस्म्युरलमश्रुकलाकुलाक्ष्यः ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( वसंततिलका ) कृष्णावरी करिति त्या बहु प्रेम राण्या गांधारि द्रौपदि नि कुंति तशी सुभद्रा । ऐकोनि विस्मित स्त्रिया बहु लाजल्या नी नेत्रात अश्रु भरले सगळ्या जणींच्या ॥ १ ॥
अथ - नंतर पृथा - कुंती सुबलपुत्री याज्ञसेनी - गांधारी, द्रौपदी माधवी - सुभद्रा अथ - त्याचप्रमाणे क्षितिपपत्न्यः - राजस्त्रिया उत सर्वाः स्वगोप्यः - आणि कृष्णाची भक्ति करणार्या सर्व गोपी अखिलात्मनि हरौ कृष्णे - सर्वांचा अंतर्यामी अशा श्रीकृष्णस्वरूप श्रीहरीच्या ठिकाणी (तासाम् स्त्रीणाम्) प्रणयानुबन्धं अलं विसिस्म्युः - अश्रुबिंदूंनी व्याप्त झाले आहेत डोळे ज्यांचे अशा अत्यंत आश्चर्य करित्या झाल्या. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- सर्वात्मा, भक्तभयहारी, भगवान श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या पत्न्यांना किती प्रेम आहे, हे कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, इतर राजपत्न्या आणि भगवंतांच्या प्रियतम गोपी, यांनीही ऐकले. त्यांचे हे अलौकिक प्रेम पाहून सगळ्याजणी अत्यंत मुग्ध झाल्या आणि सर्वांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. (१)
( अनुष्टुप् )
इति सम्भाषमाणासु स्त्रीभिः स्त्रीषु नृभिर्नृषु । आययुर्मुनयस्तत्र कृष्णरामदिदृक्षया ॥ २ ॥
( अनुष्टुप् ) स्त्रिया स्त्रियांत नी तैसे पुरुषासी पुरूष ते । बोलले, दर्शना आले कितेक ऋषि नी मुनी ॥ २ ॥
एवं - याप्रमाणे स्त्रीभिः स्त्रीषु संभाषमाणासु - स्त्रियांशी स्त्रिया बोलत असता नृभिः (च) नृषु (संभाषमाणेषु) - आणि पुरुष पुरुषांशी बोलत असता मुनयः - ऋषि कृष्णरामदिदृक्षया - कृष्ण व बलराम यांचे दर्शन घेण्याच्या इच्छेने तत्र आययुः - तेथे आले. ॥२॥
अशा प्रकारे ज्या वेळी स्त्रिया स्त्रियांशी आणि पुरुष पुरुषांशी बोलत होते, त्याचवेळी पुष्कळसे मुनी, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे आले. (२)
द्वैपायनो नारदश्च च्यवनो देवलोऽसितः ।
विश्वामित्रः शतानन्दो भरद्वाजोऽथ गौतमः ॥ ३ ॥ रामः सशिष्यो भगवान् वसिष्ठो गालवो भृगुः । पुलस्त्यः कश्यपोऽत्रिश्च मार्कण्डेयो बृहस्पतिः ॥ ४ ॥ द्वितस्त्रितश्चैकतश्च ब्रह्मपुत्रास्तथाङ्गिराः । अगस्त्यो याज्ञवल्क्यश्च वामदेवादयोऽपरे ॥ ५ ॥ तान्दृष्ट्वा सहसोत्थाय प्रागासीना नृपादयः । पाण्डवाः कृष्णरामौ च प्रणेमुर्विश्ववन्दितान् ॥ ६ ॥
व्यास नी नारदो तैसे च्यवनो देवलो असित् । विश्वामित्र शतानंद भरद्वाज नि गौतम ॥ ३ ॥ सशिष्य परशूराम वसिष्ठ गालवो भृगु । पुलस्त्य कश्यपो अत्री मार्कंडेय बृहस्पती ॥ ४ ॥ द्वित त्रित नी तो एक ब्रह्मपुत्र नि अंगिरा । याज्ञवल्क्य वामदेवो पुलस्त्यादि प्रमूख ते ॥ ५ ॥ ऋषिंना पाहुनी सर्व नृप नी सर्व पांडव । उठले राम कृष्णोही ऋषिंना त्या प्रणामिले ॥ ६ ॥
द्वैपायनः नारदः च च्यवनः देवलः असितः - द्वैपायन, नारद आणि च्यवन, देवल, असित विश्वामित्र शतानन्दः भरद्वाजः अथ गौतमः - विश्वामित्र, शतानन्द, भरद्वाज आणि गौतम ॥३॥ सशिष्यः भगवान् रामः - शिष्यांसह भगवान परशुराम वसिष्ठः गालवः भृगुः - वसिष्ठ, गालव, भृगु पुलस्त्यः कश्यपः अत्रिः च - पुलस्त्य, कश्यप व अत्रि मार्कण्डेयः बृहस्पतिः - मार्कंडेय, बृहस्पति. ॥४॥ द्वितः त्रितः च एकतः - द्वित, त्रित व एकत तथा च ब्रह्मपुत्रः अंगिराः - त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाचा पुत्र अंगिरा ऋषि अगस्त्यः याज्ञवल्क्यः च - अगस्त्य आणि याज्ञवल्क्य अपरे वामदेवादयः - दुसरे वामदेव आदि करून ऋषि. ॥५॥ प्रागासीना नृपादयः - पूर्वी तेथे असलेले राजे आदिकरून पाण्डवाः कृष्णरामौ च - पांडव, तसेच श्रीकृष्ण व बलराम विश्ववन्दितान् तान् दृष्टवा - सर्वांनी वंदिलेल्या त्या ऋषींना पाहून सहसा उत्थाय - तत्काळ उठून प्रणेमुः - नमस्कार करिते झाले. ॥६॥
व्यास, नारद, च्यवन, देवल, असित, विश्वामित्र, शतानंद, भरद्वाज, गौतम, शिष्यांसह परशुराम, वसिष्ठ, गालव, भृगू, पुलस्त्य, कश्यप, अत्री, मार्कंडेय, बृहस्पती, द्वित, त्रित, एकत, सनक, सनंदन, सनातन, सनत्कुमार, अंगिरा, अगस्त्य, याज्ञवल्क्य, वामदेव, इत्यादी इतरही बरेच विश्ववंद्य ऋषी आलेले पाहून अगोदरपासूनच तेथे असलेले राजे, पांडव, श्रीकृष्ण आणि बलराम लगेच उठून उभे राहिले आणि सर्वांनी त्यांना प्राणाम केला. (३-६)
तान् आनर्चुर्यथा सर्वे सहरामोऽच्युतोऽर्चयत् ।
स्वागतासनपाद्यार्घ्य माल्यधूपानुलेपनैः ॥ ७ ॥
स्वागतो आसनो पाद्य अर्घ्य माला नि धूप ते । धर्मे कृष्णे नृपे सार्या ऋषिंना पूजिले असे ॥ ७ ॥
सर्वे - सर्व यथा - यथाविधि तान् आनर्चुः - त्या ऋषींना पूजिते झाले सहरामः अच्युतः - बलरामासह श्रीकृष्ण स्वागतासनपाद्यार्घ्यमाल्यधूपानुलेपनैः - कुशल प्रश्न, बसायला आसन, पाय धुणे, अर्घ्य, पुष्पे, धूप व चंदन यांनी अर्चयत् - पूजिता झाला. ॥७॥
यानंतर स्वागत, आसन, पाद्य, अर्घ्य, पुष्पमाला, धूप, चंदन इत्यादींनी, सर्व राजांनी व राम-कृष्णांनी त्यांची विधीपूर्वक पूजा केली. (७)
उवाच सुखमासीनान् भगवान् धर्मगुप्तनुः ।
सदसस्तस्य महतो यतवाचोऽनुश्रृण्वतः ॥ ८ ॥
निवांत बैसता सर्व बोलले कृष्ण त्यांजला । कृष्णभाषण ते सारे शांत चित्तेचि ऐकती ॥ ८ ॥
धर्मगुप्तनुः भगवान् - धर्माला राखणारे आहे शरीर ज्याचे असा भगवान श्रीकृष्ण सुखं आसीनान् (ऋषीन्) - सुखाने बसलेल्या ऋषींना यतवाचः तस्य महतः सदसः अनुशृण्वतः - नियंत्रित आहे वाणी जीची अशी ती मोठी सभा ऐकत असता उवाच - म्हणाला. ॥८॥
जेव्हा सर्व ऋषी आरामात बसले, तेव्हा धर्मरक्षणासाठी अवतीर्ण झालेले भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले. त्यावेळी ती सभा अतिशय शांतपणे भगवंतांचे भाषण ऐकत होती. (८)
श्रीभगवानुवाच -
अहो वयं जन्मभृतो लब्धं कार्त्स्न्येन तत्फलम् । देवानामपि दुष्प्रापं यद् योगेश्वरदर्शनम् ॥ ९ ॥
भगवान् श्रीकृष्ण म्हणाले - धन्य हो जीवनो आज साफल्य पूर्ण जाहले । देवदुर्लभ ही होय भेट योगेश्वरासि की ॥ ९ ॥
अहो वयं जन्मभृतः - अहो खरोखर आमचा जन्म आज सफल झाला तत्फलम् (नः) कार्त्स्न्येन लब्धम् - त्या जन्माचे फळ आम्हाला पूर्ण मिळाले यत् देवानाम् अपि दुष्प्रापं योगेश्वरदर्शनं (नः जातम्) - कारण देवानाहि दुर्लभ असे महायोग्याचे दर्शन आम्हाला घडले. ॥९॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले- आम्ही धन्य झालो! जन्म घेतल्याचे फळ आज आम्हांला पुरेपूर मिळाले; कारण ज्या योगेश्वरांचे दर्शन देवतांनासुद्धा दुर्लभ आहे, ते आज आम्हांला झाले. (९)
किं स्वल्पतपसां नॄणां अर्चायां देवचक्षुषाम् ।
दर्शनस्पर्शनप्रश्न प्रह्वपादार्चनादिकम् ॥ १० ॥
पूजिती मूर्ति जे कोणी जीवात्मा त्यजुनी दुरी । तयांना तुमचा स्पर्श पाददर्शन ना मिळे ॥ १० ॥
स्वल्पतपसां - थोडी आहे तपश्चर्या ज्यांची अशा अर्चायां देवचक्षुषां - मूर्तीच्या ठिकाणी देवदृष्टि आहे ज्यांची अशा नृणां - मनुष्यांना योगेश्वराणाम् - योगेश्वर मुनींचे दर्शनस्पर्शनप्रश्नप्रह्वपादार्चनादिकम् - दर्शन, स्पर्श, कुशल प्रश्न, नमस्कार व पायांची पूजा इत्यादि किम् - कसे घडणार ? ॥१०॥
ज्यांची तपश्चर्या अगदी थोडी आहे आणि जे देवाला फक्त विशिष्ट मूर्तीमध्ये पाहातात, अशांना आपले दर्शन, स्पर्श, कुशल-प्रश्न, प्रणाम, पाद्यपूजा इत्यादींची संधी कशी मिळू शकेल बरे ? (१०)
न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ।
ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥ ११ ॥
पाणी ना होतसे तीर्थ मूर्तीत देव का असे ? । संत तो देव नी तीर्थ दर्शने मोक्ष लाभतो ॥ ११ ॥
अम्मयानि तीर्थानि (दर्शनात्) न (पुनन्ति) हि - गंगादि जलमय तीर्थे दर्शन घेताक्षणीच पवित्र करीत नाहीत मृच्छिलामयाः देवाः (दर्शनात् एव) न (पुनन्ति) - मातीचे व पाषाणाचे देव दर्शन घेताक्षणीच पवित्र करीत नाहीत ते उरुकालेन पुनन्ति - ते पुष्कळ काळाने पवित्र करितात साधवः दर्शनात् एव (पुनन्ति) - साधु दर्शन घेताक्षणीच पवित्र करितात. ॥११॥
केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे आणि फक्त दगडमातीच्या प्रतिमा म्हणजेच देवता नव्हेत, तर संत पुरुषच खरे तीर्थ किंवा देवता आहेत. कारण त्यांचे पुष्कळ काळपर्यंत सेवन करावे, तेव्हाच फळ मिळते. परंतु संत पुरुष दर्शनानेच कृतार्थ करतात. (११)
( मिश्र )
नाग्निर्न सूर्यो न च चन्द्रतारका न भूर्जलं खं श्वसनोऽथ वाङ्मनः । उपासिता भेदकृतो हरन्त्यघं विपश्चितो घ्नन्ति मुहूर्तसेवया ॥ १२ ॥
( इंद्रवज्रा ) ते अग्नि सूर्यो जल चंद्र तारा आकाश पृथ्वी अन वायु वाणि । उपासिता पाप न जाय सारे या संतपायी मतिभेद नष्टे ॥ १२ ॥
अग्निः न - अग्नि नव्हे सूर्यः न - सूर्य नव्हे चंद्रतारकाः च न - चंद्र व नक्षत्रे नव्हेत भूः न - पृथ्वी नव्हे जलं खं श्वसनः (च) - उदक, आकाश व वायु अथ वाक् मनः (च) - तसाच वाणी व मन (एते) भेदकृतः - हे सर्व भेदबुद्धि उत्पन्न करणारे उपासिताः (सन्तः) - उपासिले असता अघं हरन्ति - पाप दूर करितात विपश्चितः - ज्ञानी असे साधु मुहूर्तसेवया (एव तत्) घ्नन्ति - थोडया सेवेनेच पाप दूर करितात. ॥१२॥
अग्नी . सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू किंवा वाणी आणि मनाची अधिष्ठात्री देवता, यांची उपासना केली असता भेदबुद्धिरूप अज्ञानाचा नाश होत नाही. परंतु ज्ञानी महापुरुषांची सेवा क्षणभर केली गेली, तरी ते सर्व अज्ञान नाहीसे करतात. (१२)
यस्यात्मबुद्धिः कुणपे त्रिधातुके
स्वधीः कलत्रादिषु भौम इज्यधीः । यत्तीर्थबुद्धिः सलिले न कर्हिचित् जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः ॥ १३ ॥
त्रिधातु देहो शवतुल्य ऐसा विकारि वस्तूसिच देव मानी । संता न मानी बहु तीर्थ हिंडे मनुष्य ना तो पशु हीन जाणा ॥ १३ ॥
यस्य - ज्याची त्रिधातुके कुणपे - वात, पित्त व कफ ह्या तीन धातूंनी निर्मिलेल्या शरीराच्या ठिकाणी आत्मबुद्धिः (भवति) - हाच आत्मा अशी बुद्धि होते कलत्रादिषु स्वधीः - स्त्रीपुत्रादिकांच्या ठिकाणी हेच स्वकीय अशी कल्पना होते भौमे - भूमीपासून होणार्या काष्ठपाषाण इत्यादि पदार्थाच्या ठिकाणी इज्यधीः - याच देवता अशी बुद्धि असते यत् - ज्याची सलिले तीर्थबुद्धिः - उदकाच्या ठिकाणी हेच तीर्थ अशी बुद्धि होते (किंतु) अभिज्ञेषु जनेषु (तीर्थबुद्धिः) कर्हिचित् न - पण ज्ञानी लोकांच्या ठिकाणी हे पवित्र आहेत अशी बुद्धि कधीही नाही सः गोखरः एव - तो पशूंमध्ये गाढवासारखा होय. ॥१३॥
जो मनुष्य वात, पित्त आणि कफ या तीन धातूंनी बनलेल्या शरीरालाच आत्मा, स्त्री-पुरुष इत्यादींनाच आपले आणि माती, लाकूड, इत्यादी पार्थिव वस्तूंनाच देव मानतो, तसेच जो फक्त पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानी पुरुषांना नव्हे, तो मनुष्य असूनही पशूंपेक्षाही अविचारी समजावा. (१३)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) निशम्येत्थं भगवतः कृष्णस्याकुण्थमेधसः । वचो दुरन्वयं विप्राः तूष्णीमासन् भ्रमद्धियः ॥ १४ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) कृष्णाचे गूढ हे भाष्य ऐकता ऋषि सर्व ते । विचारी राहिले सर्व कृष्ण हे कायसे वदे ॥ १४ ॥
इत्थं - याप्रमाणे अकुण्ठमेधसः भगवतः कृष्णस्य - अकुण्ठबुद्धीच्या भगवान श्रीकृष्णाचे दुरन्वयं - समजण्यास कठीण असे वचः निशम्य - भाषण श्रवण करून विप्राः - ते ब्राह्मण भ्रमद्धियः (भूत्वा) - घोटाळली आहे बुद्धि ज्यांची असे होऊन तूष्णीम् आसन् - स्वस्थ राहिले. ॥१४॥
श्रीशुक म्हणतात- अखंड ज्ञानसंपन्न भगवान श्रीकृष्णांचे हे गूढ भाषण ऐकून सर्व ऋषी स्तब्ध झाले. हे काय म्हणत आहेत, तेच त्यांना कळेना ! (१४)
चिरं विमृश्य मुनय ईश्वरस्येशितव्यताम् ।
जनसङ्ग्रह इत्यूचुः स्मयन्तस्तं जगद्गुरुम् ॥ १५ ॥
विचार करुनी खूप सर्वेश्वर असोनिया । संघार्थ वागतो कृष्ण वदले संत ते पुन्हा ॥ १५ ॥
मुनयः - ऋषि ईश्वरस्य ईशितव्यतां चिरं विमृश्य - नियन्ता असा जो श्रीकृष्ण त्याने स्वीकारिलेल्या ईश्वराधीनपणाविषयी बराच विचार केल्यावर (अयं) जनसंग्रहः इति (निश्चित्य) - तो ईश्वराधीनपणा लोकहितास्तव होय असा निश्चय करून स्मयंतः - हसत तं जगद्गुरुं उचुः - त्या जगद्गुरु श्रीकृष्णाला म्हणाले. ॥१५॥
पुष्कळ वेळपर्यंत विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, भगवान सर्वेश्वर असूनही जे कर्माधीन जीवांप्रमाणे असे बोलत आहेत, ते फक्त लोकशिक्षणासाठीच होय. नंतर ते हसत हसत त्या जगद्गुरूंना म्हणाले. (१५)
श्रीमुनय ऊचुः -
( मिश्र ) यन्मायया तत्त्वविदुत्तमा वयं विमोहिता विश्वसृजामधीश्वराः । यदीशितव्यायति गूढ ईहया अहो विचित्रं भगवद् विचेष्टितम् ॥ १६ ॥
( इंद्रवज्रा ) माये तुझ्या मोहिलो आम्हि सर्व ते लोकपालो अन ज्ञानि सर्व । तू माणसाच्या परि वागशी की लीला तुझी आगळि सर्व आहे ॥ १६ ॥
विश्वसृजाम् अधीश्वराः - प्रजापतीचे अधिपति असे तत्त्वविदुत्तमाः वयं - ज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असे आम्ही यन्मायया विमोहिताः - ज्याच्या मायेने मोहित झालो यत् - ज्या अर्थी गूढः - गुप्त असा ईहया - कर्माने ईशितव्यायति - ईश्वराधीन झाल्यासारखा वागतो अहो विचित्रं भगवद्विचेष्टितं - भगवंताचे आचरण किती आश्चर्यकारक आहे बरे. ॥१६॥
मुनी म्हणाले- भगवन ! ज्यांच्या मायेने प्रजापतींचे अधीश्वर मरीची इत्यादी, तसेच मोठमोठे तत्त्वज्ञानी असे आम्ही मोहित होत आहोत, ते आपण स्वत: इश्वर असूनही माणसासारखे व्यवहार करून, स्वत:ला लपवून ठेवीत आहात. भगवन ! आपली लीला अगाध आहे ! (१६)
अनीह एतद् बहुधैक आत्मना
सृजत्यवत्यत्ति न बध्यते यथा । भौमैर्हि भूमिर्बहुनामरूपिणी अहो विभूम्नश्चरितं विडम्बनम् ॥ १७ ॥
माती जशी त्या घट पर्वतात तसाच तू रूप नि नाम घेशी । करोनि सारे नच लिप्त होशी लीला तुझ्या धन्य अशा अनंत ॥ १७ ॥
अनीहः (सः) - निरिच्छ असा तो ईश्वर एकः (सन्) - एकच असून यथा भूमिः हि भौमेः बहुनामरूपिणी (तथा) - ज्याप्रमाणे पृथ्वी खरोखर एकच असून तिच्यापासून उत्पन्न झालेल्या अनेक पदार्थामुळे अनेक नावे व रूपे धारण करिते त्याप्रमाणे एतत् - हे जग आत्मना - स्वतःच बहुधा - पुष्कळ प्रकाराने सृजति - उत्पन्न करितो अवति - रक्षितो अत्ति - खाऊन टाकतो (किन्तु) न बद्ध्यते - पण बद्ध होत नाही अहो - अहो विभूम्नः चरितं विडम्बनम् (अस्ति) - परमेश्वराचे चरित्र अनुकरणच होय. ॥१७॥
जशी पृथ्वी स्वत:च झाडे, घट इत्यादी रूपांमुळे अनेक नामे धारण करते, त्याचप्रमाणे आपण एक आणि कृतिरहित असूनही अनेक रूपे धारण करून या जगाची रचना, रक्षण आणि संहार करता. परंतु हे सर्व करीत असतानाही या कर्मांनी आपण लिप्त होत नाही. सर्वव्यापी, परिपूर्ण अशा आपले हे चरित्र म्हणजे केवळ लीलाच नव्हे काय ? (१७)
अथापि काले स्वजनाभिगुप्तये
बिभर्षि सत्त्वं खलनिग्रहाय च । स्वलीलया वेदपथं सनातनं वर्णाश्रमात्मा पुरुषः परो भवान् ॥ १८ ॥
परा स्वयंब्रह्म असूनि तू तो घेशी रुपे ही जग तारण्याला । या वेदमार्गा हरि रक्षिसी तू ते वर्ण चारी तव रूप सत्य ॥ १८ ॥
अथापि - तरी सुद्धा वर्णाश्रमात्मा परः पुरुषः भवान् - चारहि वर्ण व आश्रम हे ज्याचे स्वरूप आहे असा श्रेष्ठ पुरुष तू काले - योग्य काळी स्वजनाभिगुप्तये - आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी खलनिग्रहाय च - आणि दुष्टांच्या नाशासाठी सत्त्वं बिभर्षि - सत्त्वगुण धारण करतोस स्वलीलया सनातनं वेदपथं च (बिभर्षि) - आणि स्वतः लीलेने पुरातन वेदमार्गाला धारण करितोस. ॥१८॥
आपण जरी प्रकृतीच्या पलीकडील स्वत: परब्रह्म आहात, तरीसुद्धा वेळोवेळी भक्तजनांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी विशुद्ध सत्त्वमय स्वरूप प्रगट करता आणि आपल्या लीलांच्या द्वारे सनातन वैदिक मार्गाचे रक्षण करता. कारण सर्व वर्ण आणि आश्रम हे आपलेच रूप आहे. (१८)
( अनुष्टुप् )
ब्रह्म ते हृदयं शुक्लं तपःस्वाध्यायसंयमैः । यत्रोपलब्धं सद्व्यक्तं अव्यक्तं च ततः परम् ॥ १९ ॥
( अनुष्टुप् ) ब्रह्म ते हृदयो शुद्ध तप स्वाध्याय संयम । साक्षात्कार तुझा होतो सगुणी निर्गुणी तसा ॥ १९ ॥
ब्रह्म ते शुक्लं हृदयम् - वेद म्हणजे तुझे निर्मळ हृदय आहे यत्र - ज्या वेदांमध्ये व्यक्तं - कार्यरूपी जग अव्यक्तं - कारणरूपी प्रकृति ततः परं च सत् - आणि त्या कार्यकारणांहून पलीकडे असणारे परब्रह्म तपःस्वाध्यायसंयमैः उपलब्धं - तपश्चर्या, वेदाध्ययन व योग प्राप्त होणारे आहे. ॥१९॥
वेद आपले विशुद्ध हृदय आहे, तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधीच्या योगाने त्यातच आपल्या साकार, निराकार आणि त्यांच्या अधिष्ठानस्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होतो. (१९)
तस्माद् ब्रह्मकुलं ब्रह्मन् शास्त्रयोनेस्त्वमात्मनः ।
सभाजयसि सद्धाम तद् ब्रह्मण्याग्रणीर्भवान् ॥ २० ॥
द्विजद्वारे मिळे वेद म्हणोनी मानिसी तया । द्विज भक्त शिरोरत्न ऐसाचि असशी हरी ॥ २० ॥
तस्मात् - म्हणून ब्रह्मन् - हे ब्रह्मरूपी श्रीकृष्णा शास्त्रयोनेः आत्मनः सद्धाम - शास्त्राचे उत्पत्तिकारण अशा तुज आत्मरूपी ईश्वराचे श्रेष्ठ प्राप्तिस्थान अशा ब्रह्मकुलं - ब्राह्मणकुळाला सभाजयसि - पूजितोस तत् - त्या कारणास्तव भवान् - आपण ब्रह्मण्याग्रणीः (अस्ति) - ब्राह्मणांच्या हितकर्त्यामध्ये श्रेष्ठ आहा. ॥२०॥
हे परमात्मन ! वेदांचा आधारभूत ब्राह्मणच, वेदप्रमाण अशा आपल्या रूपाच्या जाणिवेचे स्थान आहेत. म्हणूनच आपण त्यांचा सन्मान करता. त्यामुळेच आपण ब्राह्मणभक्त असणार्यांमध्ये अग्रगण्य आहात. (२०)
अद्य नो जन्मसाफल्यं विद्यायास्तपसो दृशः ।
त्वया सङ्गम्य सद्गत्या यदन्तः श्रेयसां परः ॥ २१ ॥
भद्र सीमा हरी तूची साधुंची गति छत्रही । सफल जाहले आज तप विद्या नि ज्ञान हे ॥ २१ ॥
सद्गत्या त्वया संगम्य - साधूंना गति देणार्या अशा तुझ्याशी ऐक्य पावून अद्य नः जन्मसाफल्यं (जातम्) - आज आमच्या जन्माचे सार्थक झाले विद्यायाः तपसः दृशः (साफल्यं) - विद्याध्ययनाचे, तपश्चर्येचे व ज्ञानदृष्टीचेहि सार्थक झाले यत् - कारण (त्वं) श्रेयसां परः अन्तः - तू कल्याणाची पराकाष्ठा आहेस. ॥२१॥
आपण कल्याण करून घेण्याच्या सर्व प्रकारच्या साधनांची अंतिम सीमा आहात आणि संतांचे एकमेव प्राप्तव्य आहात. आपले दर्शन होऊन आज आमचा जन्म, विद्या, तप आणि ज्ञान सफल झाले. (२१)
नमस्तस्मै भगवते कृष्णायाकुण्ठमेधसे ।
स्वयोगमाययाच्छन्न महिम्ने परमात्मने ॥ २२ ॥
अनंता सच्चिदानंदा कृष्णा तू ब्रह्मरूपची । मायेत लपशी ऐसा आमुचा प्रणिपात घे ॥ २२ ॥
अकुण्ठमेधसे - ज्याची धारणाशक्ति कधीहि कुंठित होत नाही अशा स्वयोगमायया छन्नमहिम्ने - आपल्या मायेने ज्याने आपले माहात्म्य झाकून टाकिले आहे अशा परमात्मने - श्रेष्ठ आत्मरूपी अशा तस्मै भगवते कृष्णाय नमः - त्या भगवान श्रीकृष्णाला नमस्कार असो. ॥२२॥
प्रभो ! आपले ज्ञान अनंत आहे. आपण स्वत: परमात्मा भगवान आहात. आपण आपल्या योगमायेने आपला महिमा झाकून ठेवला आहे. आम्ही आपणांस नमस्कार करतो. (२२)
न यं विदन्त्यमी भूपा एकारामाश्च वृष्णयः ।
मायाजवनिकाच्छन्नं आत्मानं कालमीश्वरम् ॥ २३ ॥
यदुंना कळला ना तू अन्यांचे काय ते पुसो । मायेत पडदा घेशी तेणे ना रूप ते दिसे ॥ २३ ॥
अमी भूपाः - हे राजे एकारामाः वृष्णयः च - आणि एकाच ठिकाणी भोजनादि करणारे यादव यं - ज्या कृष्णाला मायाजवनिकाछन्नं आत्मानं - मायेच्या पडद्यामुळे आच्छादिलेल्या परमात्म्याला कालं ईश्वरं - काळस्वरूपी परमेश्वर असे न विदंति - जाणत नाहीत. ॥२३॥
येथे असलेले हे राजे तसेच आपल्याबरोबर आहार-विहार करणारे यादवसुद्धा आपले खरे स्वरूप जाणत नाहीत. कारण जे सर्वांचा आत्मा, जगताचे आदिकारण आणि नियंत्रक आहे, अशा आपल्या स्वरूपाला आपण मायेने झाकून ठेवले आहे. (२३)
यथा शयानः पुरुष आत्मानं गुणतत्त्वदृक् ।
नाममात्रेन्द्रियाभातं न वेद रहितं परम् ॥ २४ ॥
स्वप्नात स्वप्निच्या वस्तू सत्यची भासती पहा । नाम रूपादि मायेने देह हा सत्य भासतो ॥ २४ ॥
यथा शयानः पुरुषः - जसा निजलेला पुरुष गुणतत्त्वदृक् - स्वप्नातील पदार्थांना खर्या दृष्टीने पहाणारा नाममात्रेन्द्रियाभातं आत्मानं - नावे, विषय, व इंद्रिये यांनी भासणार्या स्वतःला रहितं परं न वेद - त्या नामादिकांनी विरहित अशा खर्या स्वरूपाने जाणत नाही. ॥२४॥
जेव्हा माणूस स्वप्न पाहू लागतो, त्यावेळी स्वप्नातील पदार्थांनाच खरे मानतो आणि मनाने जाणवणार्या नाममात्र शरीरालाच खरे मानतो. त्यावेळी त्याला आपले जागृत शरीर जाणवत नाही. (२४)
एवं त्वा नाममात्रेषु विषयेष्विन्द्रियेहया ।
मायया विभ्रमच्चित्तो न वेद स्मृत्युपप्लवात् ॥ २५ ॥
मायेने मोहतो जीव विषयी भटके सदा । विवेकशक्ति नी नासे वेगळा होय ना कुणी ॥ २५ ॥
एवं - याप्रमाणे स्मृत्युपप्लवात् - स्मृतीचा नाश झाल्यामुळे नाममात्रेषु विषयेषु - केवळ नावानेच अस्तित्वात असणार्या विषयांच्या ठिकाणी इन्द्रियेहया मायया - इंद्रियांची प्रवृत्ति करणार्या मायेने विभ्रमच्चितः (भूत्वा) - भ्रम पावत आहे चित्त ज्याचे असा होऊन त्वा न वेद - तुला जाणत नाही. ॥२५॥
त्याचप्रमाणे, स्वप्नतुल्य विषयांकडे इंद्रियांच्या प्रवृत्तिरूप मायेने चित्त मोहित होऊन जीवांची विवेकशक्ती झाकली जाते. त्यामुळेच ते सत्यस्वरूप अशा आपल्याला ओळखत नाहीत. (२५)
( वसंततिलका )
तस्याद्य ते ददृशिमाङ्घ्रिमघौघमर्ष तीर्थास्पदं हृदि कृतं सुविपक्वयोगैः । उत्सिक्तभक्त्युपहताशय जीवकोशा आपुर्भवद्गतिमथानुगृहान भक्तान् ॥ २६ ॥
( वसंततिलका ) ते श्रेष्ठ योगि स्मरती तव पाद चित्ती गंगाजाळास करिती पद ते पवित्र । भाग्येचि आज मिळले तव दर्शनो हे भक्तीत मोह जळता तव लाभ होय ॥ २६ ॥
अद्य तस्य ते - आज त्या तुझ्या सुविपकयोगैः हृदिकृतं - अत्यंत पूर्णावस्थेला पोचलेल्या योगसाधनांनी हृदयांत साठविलेल्या तीर्थास्पदं - गंगादि तीर्थांचे आश्रयस्थान अशा अघौघमर्षं अंघ्रि ददृशिम - पातक समूहांचा नाश करणार्या चरणाला पाहिले आहे उत्सिक्तभक्त्युपहताशयजीवकोशाः - वाढलेल्या भक्तीने नष्ट झाला आहे वासनारूपी प्राणमय कोश ज्यांचा असे पुरुष भवद्गतिं आपुः - तुझ्या गतीला प्राप्त झाले अथ भक्तान् अनुगृहाण - म्हणून भक्तांवर अनुग्रह कर. ॥२६॥
सर्व पापराशी नष्ट करणार्या गंगाजलाचे सुद्धा आश्रयस्थान असलेल्या, ज्या आपल्या चरणकमलांना योगी अत्यंत परिपक्व अशा योगसाधनेने स्वत:च्या हृदयात धारण करतात, त्यांचेच दर्शन आज आम्हांला झाले, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. प्रभो! आम्ही आपले भक्त आहोत. आपण आमच्यावर कृपा करावी. कारण ज्यांच्या लिंगशरीररूप जीवकोश आपल्या उत्कृष्ट भक्तीमुळे नष्ट होतो, त्यांनाच आपल्या परम पदाची प्राप्ती होते. (२६)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इत्यनुज्ञाप्य दाशार्हं धृतराष्ट्रं युधिष्ठिरम् । राजर्षे स्वाश्रमान् गन्तुं मुनयो दधिरे मनः ॥ २७ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) राजर्षी स्तुति गावोनी धृतराष्ट्र युधिष्ठिरा । पुसती निघण्या जाण्या आश्रमा आपुल्या नृपा ॥ २७ ॥
राजर्षे - हे परीक्षित राजा मुनयः - ऋषि इति - याप्रमाणे दाशार्हं धृतराष्ट्रं युधिष्ठिरं अनुज्ञाप्य - श्रीकृष्ण, धृतराष्ट्र व धर्मराज यांचा निरोप घेऊन स्वाश्रमान् गन्तुं मनः दधिरे - आपल्या आश्रमाला जाण्यासाठी मनात विचार करिते झाले. ॥२७॥
श्रीशुक म्हणतात- हे राजर्षे ! अश प्रकारे भगवंतांची स्तुती करून, त्यांचा, धृतराष्ट्राचा तसेच धर्मराजाचा निरोप घेऊन त्यांनी आपापल्या आश्रमात जाण्याचा विचार केला. (२७)
तद् वीक्ष्य तानुपव्रज्य वसुदेवो महायशाः ।
प्रणम्य चोपसङ्गृह्य बभाषेदं सुयन्त्रितः ॥ २८ ॥
जाणोनी मानसां त्यांच्या पातले वसुदेवजी । पायासी नमुनी त्यांच्या विनम्र बोलले असे ॥ २८ ॥
सुयन्त्रितः महायशाः वसुदेवः - उत्तम इंद्रियनिग्रह केलेला मोठा कीर्तिमान वसुदेव तत् वीक्ष्य - ते पाहून तान् उपव्रज्य - त्या ऋषीजवळ जाऊन प्रणम्य - नमस्कार करून (पादौ) उपसंगृह्य च - व पाय धरून इदं बभाषे - याप्रमाणे बोलला. ॥२८॥
त्यांचा जाण्याचा विचार पाहून, कीर्तीमान वसुदेव त्यांच्या जवळ आले, त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय धरून अतिशय नम्रपणे त्यांना म्हणाले. (२८)
श्रीवसुदेव उवाच -
नमो वः सर्वदेवेभ्य ऋषयः श्रोतुमर्हथ । कर्मणा कर्मनिर्हारो यथा स्यान्नस्तदुच्यताम् ॥ २९ ॥
वसुदेव म्हणाले - ऋषिंनो सर्व देवांनो आपणा प्रणिपात हा । कृपया प्रार्थना ऐका बोधावे मोक्षदायक ॥ २९ ॥
ऋषयः - हे ऋषि हो सर्वदेवेभ्यः वः नमः - सर्व देव आहेत ज्यांच्या ठिकाणी अशा तुम्हाला नमस्कार असो (मम वचः) श्रोतुम् अर्हथ - तुम्ही माझे म्हणणे ऐकून घेण्यास योग्य आहा कर्मणा कर्मनिर्हारः यथा स्यात् - कर्मानेच कर्मफलांचा निरास जेणेकरून होईल तत् नः उच्यतां - ते आम्हाला सांगा. ॥२९॥
वसुदेव म्हणाले- ऋषींनो ! सर्वदेवस्वरूप आपणांस मी नमस्कार करीत आहे. आपण माझी एक प्रार्थना ऐकावी. ती अशी की, कर्मांच्या अनुष्ठानाने कर्मवासनांचा नाश कसा होतो, ते आपण मला सांगावे. (२९)
श्रीनारद उवाच -
नातिचित्रमिदं विप्रा वसुदेवो बुभुत्सया । कृष्णं मत्वार्भकं यन्नः पृच्छति श्रेय आत्मनः ॥ ३० ॥
नारदजी म्हणाले - ऋषिंनो नच आश्चर्य कृष्णाला पुत्र मानुनी । जिज्ञासा शुद्ध भावाने कल्याणा पुसती तुम्हा ॥ ३० ॥
विप्राः - ब्राह्मण हो वसुदेवः - वसुदेव बुभुत्सया - जाणण्याच्या इच्छेने कृष्णं अर्भकं मत्वा - कृष्णाला मुलगा असे मानून यत् आत्मनः श्रेयः नः पृच्छति - जे स्वतःच्या कल्याणाविषयी आम्हाला विचारीत आहे इदं अतिचित्रं न - हे काही विशेष आश्चर्य करण्यासारखे नाही. ॥३०॥
नारद म्हणाले- ऋषींनो ! वसुदेव, श्रीकृष्णाला मूल समजून विशेष जाणून घेण्याच्या शुद्ध भावनेनेच आपल्या कल्याणाचे साधन आम्हांला विचारीत आहेत, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. (३०)
सन्निकर्षोऽत्र मर्त्यानां अनादरणकारणम् ।
गाङ्गं हित्वा यथान्याम्भः तत्रत्यो याति शुद्धये ॥ ३१ ॥
आदरो नच तो राही संसारी सन्निधी तया । गंगेच्या तिरिचे लोक तीर्था अन्यत्र हिंडती ॥ ३१ ॥
अत्र येथे मर्त्यानां - मनुष्यांचा सन्निकर्षः - अतिनिकट संबंध अनादरणकारणम् - अनादराला कारणीभूत होतो शुद्धये - शुद्धिसाठी गांगं (जलं) हित्वा - गंगोदक सोडून तत्रत्यः (जनः) - गंगातीरी रहाणारा मनुष्य अन्यांभः याति - दुसर्या उदकाकडे जातो. ॥३१॥
नेहमी जवळ राहाणे माणसाबद्दलच्या अनादराला कारण ठरते ! गंगेजवळ राहाणारा माणूस पवित्र होण्यासाठी दुसर्या तीर्थांवर जातो. (३१)
यस्यानुभूतिः कालेन लयोत्पत्त्यादिनास्य वै ।
स्वतोऽन्यस्माच्च गुणतो न कुतश्चन रिष्यति ॥ ३२ ॥
कृष्णाचे तीन ते हेतू न कोणी मिटवू शके । कोणत्याही निमित्ताने कालशक्ती न ती क्षिणे ॥ ३२ ॥
यस्य अनुभूतिः - ज्याचे ज्ञान अस्य लयोत्पत्यादिना - ह्या विश्वाचा संहार, उत्पत्ति इत्यादिकांनी कालेन - कालाकडून स्वतः अन्यस्मात् च - स्वतः किंवा दुसर्या कारणामुळे गुणतः च कुतश्चन - गुणांपासून आणि कोठूनहि वै न रिष्यति - नाश पावत नाहीच. ॥३२॥
श्रीकृष्णांचे ज्ञान कालगतीनुसार होणारी जगताची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांमुळे नाहीसे होत नाही. तसेच ते आपोआप कोणत्याही दुसर्या कारणाने, गुणांनी किंवा अन्य कशानेही नष्ट होत नाही. (३२)
( वसंततिलका )
तं क्लेशकर्मपरिपाकगुणप्रवाहैः अव्याहतानुभवमीश्वरमद्वितीयम् । प्राणादिभिः स्वविभवैरुपगूढमन्यो मन्येत सूर्यमिव मेघहिमोपरागैः ॥ ३३ ॥
( वसंततिलका ) त्या क्लेश कर्म परिपाक गुणप्रवाहे ना खंडिते स्वरुप ज्ञान असे हरीचे । जन्म स्वये जधि तदा नच मूर्ख जाणी झाकेल काय कधि तो रवि त्या नभासी ॥ ३३ ॥
अन्यः - दुसरा पुरुष क्लेशकर्म परिपाकगुणप्रवाहैः - क्लेशदायक कर्मे व त्यांचा जो सुखदुःखादि फलरूप परिणाम त्यांनी व सत्त्वादि गुणांच्या अखंड प्रवाहांनी अव्याहतानुभवं - ज्याचे ज्ञान नष्ट झाले नाही अशा तं अद्वितीयं ईश्वरं - त्या एकच एक अशा परमेश्वराला मेघहिमोपरागैः उपगूढं सूर्यम् इव - ढग, धुके आणि ग्रहण यांनी आच्छादिलेल्या सूर्याप्रमाणे प्राणादिभिः स्वविभवैः - प्राणादिक स्वतःच्या ऐश्वर्यांनी उपगूढं मन्यते - आच्छादिलेला मानितो. ॥३३॥
त्यांचे ज्ञान अविद्या, राग-द्वेष, पुण्य-पापरूप कर्मे, सुख-दु:खादी कर्मफले, किंवा सत्त्वादी गुणांच्या प्रवाहांनी खंडित झालेले नाही. ते स्वत: अद्वितीय परमात्मा आहेत. जेव्हा ते स्वत:ला आपल्याच प्राण इत्यादी शक्तींनी झाकून घेतात, तेव्हा सामान्य लोकांना ते मनुष्य वाटतात. ढग, धुके किंवा ग्रहण यांमुळे सूर्यच झाकला गेला आहे, असे वाटते, त्याप्रमाणे. (३३)
( अनुष्टुप् )
अथोचुर्मुनयो राजन् आभाष्यानकदुंदुभिम् । सर्वेषां श्रृणतां राज्ञां तथैवाच्युतरामयोः ॥ ३४ ॥
( अनुष्टुप् ) ऋषिंनी भगवान् कृष्णा तसे श्री बलरामच्या । संबोधिले वसुदेवा अन्य राजां समोरही ॥ ३४ ॥
राजन् - हे परीक्षित राजा अथ मुनयः - नंतर सर्व ऋषि सर्वेषां राज्ञां शृण्वताम् - सर्व राजे श्रवण करीत असता तथा एव अच्युतरामयोः (शृण्वतोः) - त्याचप्रमाणे श्रीकृष्ण व बलराम श्रवण करीत असता आनकदुन्दुभिं आभाष्य - वसुदेवाला उद्देशून ऊचुः - बोलले. ॥३४॥
परीक्षिता ! यानंतर श्रीकृष्ण, बलराम आणि अन्य राजांच्या समक्षच वसुदेवांना संबोधून ऋषी म्हणाले. (३४)
कर्मणा कर्मनिर्हार एष साधुनिरूपितः ।
यच्छ्रद्धया यजेद् विष्णुं सर्वयज्ञेश्वरं मखैः ॥ ३५ ॥
वासना जाळण्या कर्मे उपाय एकची असे । यज्ञाने यज्ञदेवो श्री विष्णुला पूजिणे पहा ॥ ३५ ॥
यत् - जे श्रद्धया - श्रद्धेने मखैः - यज्ञांनी सर्वयज्ञेश्वरं विष्णुं यजेत् - सर्व यज्ञांचा अधिपति अशा विष्णूला पुजावे एषः - हा कर्मणा कर्मनिर्हारः साधुनिरूपितः - कर्माने कर्मफलाचा नाश करण्याचा उत्तम उपाय सांगितला आहे. ॥३५॥
कर्मवासना आणि कर्मफलांचा, कर्मांच्या द्वारेच सर्वथैव नाश करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय हाच आहे की, यज्ञांनी सर्व यज्ञांचे अधिपती भगवान विष्णूंची श्रद्धापूर्वक आराधना करणे. (३५)
चित्तस्योपशमोऽयं वै कविभिः शास्त्रचक्षुषा ।
दर्शितः सुगमो योगो धर्मश्चात्ममुदावहः ॥ ३६ ॥
शास्त्राधारे त्रिकालज्ञे सुगमो मार्ग दाविला । मिळे शांती तसा मोक्ष आनंद वर्धि धर्म हा ॥ ३६ ॥
कविभिः शास्त्रचक्षुषा - विद्वानांनी शास्त्ररूपी नेत्राने अयं वै - हीच चित्तस्य उपशमः - अन्तःकरणाची शांति सुगमः योगः - सोपा सद्गति मिळण्याचा मार्ग आत्ममुदावहः धर्मः च - आणि आत्म्याला आनंद देणारा धर्म दर्शितः - दाखविला आहे. ॥३६॥
त्रिकालाचे ज्ञान असणार्या ऋषींनी शास्त्रदृष्टीने हाच उपाय चित्ताच्या शांतीसाठी सुलभ मोक्षसाधन आणि अंत:करणात आनंद निर्माण करणारा धर्म म्हणून सांगितला आहे. (३६)
अयं स्वस्त्ययनः पन्था द्विजातेर्गृहमेधिनः ।
यच्छ्रद्धयाऽऽप्तवित्तेन शुक्लेनेज्येत पूरुषः ॥ ३७ ॥
ब्राह्मणा क्षत्रिया वैश्या कल्याणकारि मार्ग हा । न्यायार्जित धने श्रद्धे पूजावे पुरुषोत्तमा ॥ ३७ ॥
यत् - जे श्रद्धया - श्रद्धेने शुक्लेन - शुद्ध अशा आप्तवित्तेन - मिळविलेल्या द्रव्याने पुरूषः इज्येत - परमेश्वर पूजिला जातो अयं पन्थाः - हा मार्ग गृहमेधिनः द्विजातेः - गृहस्थाश्रमी द्विजाला स्वस्त्ययनः (उक्तः) - कल्याणकारक म्हणून सांगितला आहे. ॥३७॥
आपण न्यायाने मिळविलेल्या धनाने श्रद्धापूर्वक भगवंतांची आराधना करणे, हाच गृहस्थाश्रमी द्विजातींसाठी परम कल्याणाचा मार्ग आहे. (३७)
वित्तैषणां यज्ञदानैः गृहैर्दारसुतैषणाम् ।
आत्मलोकैषणां देव कालेन विसृजेद्बुधः । ग्रामे त्यक्तैषणाः सर्वे ययुर्धीरास्तपोवनम् ॥ ३८ ॥
विचारी पुरुषो तेणे यज्ञ दानादि साधने । भोग ते नष्टिणे सारे निघावे त्या तपोवना ॥ ३८ ॥
देव - हे वसुदेवा बुधः - ज्ञानी पुरुष यज्ञदानैः वित्तैषणाम् - यज्ञांनी व दानांनी द्रव्यविषयक इच्छेला गृहैः दारसुतैषणाम् - गृहांनी स्त्रीपुत्रविषयक इच्छेला कालेन आत्मलोकैषणां - कालाने स्वर्गादि लोकांच्या इच्छेला विसृजेत् - सोडून देवो सर्वे धीराः - सर्व ज्ञानी पुरुष ग्रामे त्यक्तैषणाः - गावात टाकिल्या आहेत सर्व इच्छा ज्यांनी असे तपोवनं ययुः - तपोवनात गेले. ॥३८॥
हे वसुदेवा ! विवेकी पुरुषाने यज्ञ, दान इत्यादी करून धनाची इच्छा, गृहस्थोचित भोगांनी स्त्री-पुत्रांची इच्छा, आणि कालानुसार स्वर्ग इत्यादी लोकसुद्धा नष्ट होतात, हे जाणून त्याही इच्छेचा त्याग कारावा. अशा रीतीने घरात राहूनही या तिन्ही इच्छांचा त्याग करून वनामध्ये जावे. (३८)
ऋणैस्त्रिभिर्द्विजो जातो देवर्षिपितॄणां प्रभो ।
यज्ञाध्ययनपुत्रैस्तानि अनिस्तीर्य त्यजन्पतेत् ॥ ३९ ॥
द्विज क्षत्रिय नी वैश्य देवता ऋषि पितृ या । त्रिऋणे जन्मती तेंव्हा यज्ञ अध्ययने तसे । प्रजोत्पन्ने फिटे बोजा तेंव्हा संसार त्यागिणे ॥ ३९ ॥
प्रभो - हे वसुदेवा द्विजः - द्विज देवर्षिपितृणां त्रिभिः ऋणैः - देव, ऋषि व पितर ह्यांच्या तीन ऋणांनी जातः - उत्पन्न झालेला असतो तानि यज्ञाध्ययनपुत्रैः अनिस्तीर्य (संसारं) त्यजन् पतेत् - यज्ञ, वेदाध्ययन व पुत्रोत्पादन यांनी त्या तीन ऋणांतून मुक्त न होता जर संसाराचा त्याग करील तर अधोगतीला जाईल. ॥३९॥
हे वसुदेवा ! ब्राहण, क्षत्रिय आणि वैश्य हे तिन्ही द्विज, देवता, ऋषी आणि पितरांचे ऋण माथ्यावर घेऊनच जन्माला आलेले असतात. यज्ञ, अध्ययन आणि संतान यांद्वारेच या ऋणांतून मुक्तता होते. यांतून मुक्त झाल्याशिवाय जो संसाराचा त्याग करतो, त्याचे पतन होते. (३९)
त्वं त्वद्य मुक्तो द्वाभ्यां वै ऋषिपित्रोर्महामते ।
यज्ञैर्देवर्णमुन्मुच्य निरृणोऽशरणो भव ॥ ४० ॥
ऋषि नी पितरे यांच्या ऋणात मुक्त हो तुम्ही । यज्ञे देवऋणा फेडा तपाने भगवान् स्मरा ॥ ४० ॥
महामते - हे महाबुद्धिमन्ता वसुदेवा अद्य तु - आज तर त्वं - तु ऋषिपित्रोः द्वाभ्यां वै मुक्तः - ऋषि व पितर अशा दोन ऋणांतून खरोखर मुक्त झाला आहेस यज्ञैः देवर्णम् उन्मुच्य - यज्ञांनी देवांचे ऋण फेडून निऋणः अशरणः भव - फिटली आहेत ऋणे ज्याची असा घराविरहित हो. ॥४०॥
हे बुद्धिमान वसुदेवा ! ऋषी आणि पितरांच्या ऋणातून आपण मुक्त झाला आहात. आता यज्ञ करून देवऋणातून मुक्त व्हा आणि गृहत्याग करा. (४०)
वसुदेव भवान्नूनं भक्त्या परमया हरिम् ।
जगतामीश्वरं प्रार्चः स यद्वां पुत्रतां गतः ॥ ४१ ॥
पूजिले भक्तिने तुम्ही अवश्य जगदीश्वरा । तेणेचि जाहले तुम्हा दोन्ही हे पुत्र थोर की ॥ ४१ ॥
वसुदेव - हे वसुदेवा भवान् नूनं - तू खरोखर परमया भक्त्या - मोठया भक्तीने जगताम् ईश्वरं हरिं प्रार्चः - जगांचा स्वामी अशा जगच्चालक भगवंताचे पूजन केलेस यत् - ज्या अर्थी सः वां पुत्रतां गतः - तो तुमच्या पुत्रपणाला प्राप्त झाला आहे. ॥४१॥
हे वसुदेवा ! आपण परम भक्तीने निश्चितच जगदीश्वर भगवंतांची आराधना केलेली असल्यानेच ते आपले पुत्र झाले आहेत. (४१)
श्रीशुक उवाच -
इति तद्वचनं श्रुत्वा वसुदेवो महामनाः । तान् ऋषीन् ऋत्विजो वव्रे मूर्ध्नाऽऽनम्य प्रसाद्य च ॥ ४२ ॥
श्रीशुकदेव सांगतात - महात्मा वसुदेवाने ऋषिंचे शब्द ऐकिले । प्रसन्ने नमिले त्यांना वरिले ऋत्विजांरुपी ॥ ४२ ॥
महामनाः वसुदेवः - थोर अन्तःकरणाचा वसुदेव इति तद्वचनं श्रुत्वा - याप्रमाणे त्यांचे भाषण ऐकून तान् ऋषीन् मूर्ध्ना आनम्य - त्या ऋषींना मस्तकाने नमस्कार करून प्रसाद्य च - व प्रसन्न करून ऋत्विजः वव्रे - ऋत्विज म्हणून वरिता झाला. ॥४२॥
श्रीशुक म्हणतात- ऋषींचे हे म्हणणे ऐकून उदार वसुदेवांनी, त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून त्यांना नमस्कार केला, त्यांना प्रसन्न केले आणि यज्ञासाठी ऋत्विज म्हणून त्यांचीच योजना केली. (४२)
त एनमृषयो राजन् वृता धर्मेण धार्मिकम् ।
तस्मिन् अयाजयन् क्षेत्रे मखैरुत्तमकल्पकैः ॥ ४३ ॥
पुण्यक्षेत्री कुरुक्षेत्री वरिता ऋषिला असे । क्षेत्री उत्तम साहित्ये केला यज्ञ तदा पहा ॥ ४३ ॥
राजन् - हे परीक्षित राजा धर्मेण वृताः ते ऋषयः - धर्माने वरिलेले ते ऋषि तस्मिन् क्षेत्रे - त्या ठिकाणी उत्तमकल्पकैः मखैः - चांगल्या रीतीने साहित्य ज्यांत संपादिले आहे अशा यज्ञांनी धार्मिकं एनं अयाजयन् - धर्माचरण करणार्या त्या वसुदेवाकडून यज्ञ करविते झाले. ॥४३॥
राजन ! वसुदेवांनी जेव्हा अशा प्रकारे धर्मविधिपूर्वक ऋषींना ऋत्विज म्हणून नेमले, तेव्हा त्या ऋषींनी त्या कुरुक्षेत्रामध्ये धर्मशील वसुदेवांकडून उत्तमोत्तम सामग्रीने युक्त असे यज्ञ करविले. (४३)
तद्दीक्षायां प्रवृत्तायां वृष्णयः पुष्करस्रजः ।
स्नाताः सुवाससो राजन् राजानः सुष्ठ्वलङ्कृताः ॥ ४४ ॥ तन्महिष्यश्च मुदिता निष्ककण्ठ्यः सुवाससः । दीक्षाशालामुपाजग्मुः आलिप्ता वस्तुपाणयः ॥ ४५ ॥
यज्ञदीक्षा वसुदेवे घेता ते सजले यदु । धारिल्या कुंजमाला तै सजले नृप थोर ते ॥ ४४ ॥ वस्त्रहारे सजोनीया दीक्षिता पातल्या तदा । करीं मंगल सामग्री घेवोनी यज्ञमंडपी ॥ ४५ ॥
राजन् - हे परीक्षित राजा तद्दीक्षायां प्रवृत्तायां - त्या यज्ञाची दीक्षा चालू असता पुष्करस्रजः वृष्णयः - कमळांच्या माळा घातलेले यादव स्नाताः सुवाससः सुष्ठ्वलंकृताः राजानः - स्नान केलेले, सुंदर वस्त्रे नेसलेले व उत्तम अलंकार धारण केलेले राजे च - आणि निष्ककण्ठयः सुवाससः - गळ्यात सुवर्णाचे अलंकार घातलेल्या व सुंदर वस्त्रे नेसलेल्या तन्महिष्यः - त्या राजांच्या पटटराण्या मुदिताः आलिप्ताः वस्तुपाणयः - आनंदित झालेल्या, उटी लाविलेल्या व हातांत साहित्य घेतलेल्या अशा दीक्षाशालाम् उपाजग्मुः - यज्ञमंडपाजवळ आल्या. ॥४४-४५॥
परीक्षिता ! वसुदेवांनी जेव्हा यज्ञाची दीक्षा घेतली, तेव्हा यदुवंशियांनी स्नान करून सुंदर वस्त्रे परिधान केली आणि कमलपुष्पांच्या माळ गळ्यात घातल्या. अन्य राजानांही सुंदर वस्त्रालंकार धारण केले. (४४) वसुदेवांच्या पत्नींनी सुंदर वस्त्रे, सुगंधित उटणी आणि सोन्याचे हार घातले आणि त्या मोठ्या आनंदाने आपल्या हातात कलश इत्यादी मंगल सामग्री घेऊन यज्ञशाळेत आल्या. (४५)
नेदुर्मृदङ्गपटह शङ्खभेर्यानकादयः ।
ननृतुर्नटनर्तक्यः तुष्टुवुः सूतमागधाः । जगुः सुकण्ठ्यो गन्धर्व्यः संगीतं सहभर्तृकाः ॥ ४६ ॥
तदा मृदंग नी शंख दुंदुभी वाद्य वाजले । नाचले नट नी नाच्या गाती मागध सूत ते । गंधर्व अन गंधर्व्या गाती गान सवे तदा ॥ ४६ ॥
मृदंगपटहशंखभेर्यानकादयः नेदुः - मृदंग, नगारे, शंख, चौघडे, ढोल इत्यादि वाजू लागले नटनर्तक्यः ननृतुः - नट व नाचणार्या स्त्रिया नाचू लागल्या सूतमागधाः तुष्टुवुः - सूत व स्तुतिपाठक स्तुति करू लागले सुकण्ठयः गंधर्व्यः सहभर्तृकाः - सुंदर आवाज असलेल्या अप्सरा आपापल्या पतींसह संगीतं जगुः - गाणी गाऊ लागल्या. ॥४६॥
मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या. सूत आणि मागध स्तुती करू लागले. गंधर्वांच्या बरोबर त्यांच्या गोड आवाज असणार्या गायिका पत्न्या गाणी गाऊ लागल्या. (४६)
तमभ्यषिञ्चन् विधिवद् अक्तं अभ्यक्तमृत्विजः ।
पत्नीभिरष्टादशभिः सोमराजमिवोडुभिः ॥ ४७ ॥
नेत्री अंजन नी अंगा लोणी ते वसुदेवने । लाविता देवकी आदी आठरा पत्नि यां सवे ॥ ४७ ॥
ऋत्विजः - ऋत्विज अष्टादशाभिः पत्नीभिः - अठरा स्त्रियांसह उडुभिः सोमराजम् इव - रोहिण्यादि सत्तावीस नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे अक्तं अभ्यक्तं (च) - नेत्रांत काजळ घातलेल्या व सर्वांगाला लोणी लाविलेल्या तं - त्या वसुदेवाला विधिवत् अभ्यषिंचन् - यथाशास्त्र अभिषेकिते झाले. ॥४७॥
वसुदेवांनी शास्त्राप्रमाणे डोळ्यांत अंजन घातले व शरीराला लोणी लावले. त्यानंतर त्यांच्या देवकी इत्यादी अठरा पत्न्यांसह ऋत्विजांनी त्यांना, प्राचीनकाळी नक्षत्रांसह चंद्राला अभिषेक झाला होता, त्याप्रमाणे अभिषेक केला. (४७)
ताभिर्दुकूलवलयैः हारनूपुरकुण्डलैः ।
स्वलङ्कृताभिर्विबभौ दीक्षितोऽजिनसंवृतः ॥ ४८ ॥
दीक्षिते मृगचर्माते पत्न्यांनी वसने नवी । कंकणे भूषणे हार लेवोनी सजल्या बहू ॥ ४८ ॥
दीक्षितः अजिनसंवृतः (सः) - यज्ञदीक्षा घेतलेला व मृगचर्म परिधान केलेला तो वसुदेव दुकूलवलयैः हारनूपुरकुण्डलैः - रेशमी वस्त्रे व सुवर्णकंकणे आणि मोत्यांचे हार, पैंजणे व कुंडले यांनी युक्त अशा स्वलंकृताभिः ताभिः - अलंकार धारण केलेल्या त्या स्त्रियांसह विबभौ - चांगला शोभला. ॥४८॥
यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे मृगचर्म धारण केलेले वसुदेव सुंदर पैठण्या, कंकणे, हार, नूपुरे आणि कुंडले इत्यादी वस्त्रालंकारांनी नटलेल्या पत्न्यांसह अतिशय शोभून दिसत होते. (४८)
तस्यर्त्विजो महाराज रत्नकौशेयवाससः ।
ससदस्या विरेजुस्ते यथा वृत्रहणोऽध्वरे ॥ ४९ ॥
रेशमी वस्त्र नी रत्न ऋत्विज् लेवोनि शोभले । इंद्रयज्ञीं तसे पूर्वी सजले, तैचि आज हे ॥ ४९ ॥
महाराज - हे परीक्षित राजा रत्नकौशेयवाससः - रत्ने व रेशमी वस्त्रे धारण करणारे तस्य ते ऋत्विजः - त्या वसुदेवाच्या यज्ञातील ते ऋत्विज ससदस्याः - सभासदांसह यथा वृत्रहणः अध्वरे - जसे इंद्राच्या यज्ञात तसे विरेजुः - शोभले. ॥४९॥
महाराज ! इंद्राच्या यज्ञाप्रमाणे वसुदेवांच्या यज्ञातील ऋत्विज आणि सभासद, रत्नजडित अलंकार व रेशमी वस्त्रे परिधान करून सुशोभित झाले. (४९)
तदा रामश्च कृष्णश्च स्वैः स्वैः बन्धुभिरन्वितौ ।
रेजतुः स्वसुतैर्दारैः जीवेशौ स्वविभूतिभिः ॥ ५० ॥ ईजेऽनुयज्ञं विधिना अग्निहोत्रादिलक्षणैः । प्राकृतैर्वैकृतैर्यज्ञैः द्रव्यज्ञानक्रियेश्वरम् ॥ ५१ ॥
बंधु पत्न्यांसवे कृष्ण तसेचि शोभले तदा । शक्तिने आपुल्या सर्व जीवात वसतो हरी । तसे संकर्षणो आणि श्री नारायण शोभले ॥ ५० ॥ अग्निहोत्रादि यज्ञांनी ज्ञान द्रव्य तसे क्रिये । याजिले वसुदेवांनी मंत्राने विष्णु प्रार्थिला ॥ ५१ ॥
तदा - त्यावेळी स्वैः स्वैः बन्धुभिः स्वसुतैः दारैः अन्वितौ जीवेशौ - आपले बंधु, आपले पुत्र व स्त्रिया यांनी युक्त असे जीवांचे स्वामी रामः च कृष्णः च - बलराम व श्रीकृष्ण स्वाविभूतिभिः रेजतुः - आपापल्या ऐश्वर्यांनी शोभले अग्निहोत्रादिलक्षणैः प्राकृतैः वैकृतैः (च) यज्ञैः - अग्निहोत्र इत्यादि लक्षणांनी युक्त अशा प्राकृत व वैकृत यज्ञांनी द्रव्यज्ञानक्रियेश्वरं - पुरोडाशादि द्रव्य, मंत्रज्ञान व विधि यांचा अधिपति अशा यज्ञ नारायणाला विधिना - शास्त्रोक्त विधीने अनुयज्ञं ईजे - प्रत्येक यज्ञात पूजिता झाला. ॥५०-५१॥
सर्व जीवांचे ईश्वर असलेले श्रीकृष्ण आणि बलराम आपल्याच विभूतिस्वरूप बांधव आणि स्त्री-पुत्रांसह शोभू लागले. (५०) वसुदेवांनी प्रत्येक यज्ञामध्ये ज्योतिष्टोम, दर्श, पूर्णमास इत्यादी प्राकृत यज्ञ, सौरसत्र इत्यादी वैकृत यज्ञ आणि अग्निहोत्र इत्यादी अन्य यज्ञांच्या द्वारा द्रव्य, ज्ञान व क्रिया यांचे अधिपती असणार्या ईश्वराची आराधना केली. (५१)
अथर्त्विग्भ्योऽददात्काले यथाम्नातं स दक्षिणाः ।
स्वलङ्कृतेभ्योऽलङ्कृत्य गोभूकन्या महाधनाः ॥ ५२ ॥
वस्त्रालंकार देवोनी ऋत्विजा वसुदेवने । दिधले धन नी गाई कन्या सुंदर नी धरा ॥ ५२ ॥
अथ - नंतर महाधनः सः - मोठा धनवान असा वसुदेव काले - योग्य काळी यथाम्नातं - शास्त्रात सांगितल्याप्रमाणे गोभूकन्याः अलंकृत्य - गाई, पृथ्वी व कन्या ह्यांच्या अंगावर अलंकार घालून स्वलंकृतेभ्यः ऋत्विग्भ्यः - अलंकार घातलेल्या ब्राह्मणांना दक्षिणाः अददात् - दक्षिणा देता झाला. ॥५२॥
एवढे झाल्यावर त्यांनी योग्यवेळी वस्त्रालंकार घातलेल्या ऋत्विजांना शास्त्रानुसार दक्षिणा व पुष्कळ धनासह अलंकृत गाई, भूमी आणि कन्या अर्पण केल्या. (५२)
पत्नीसंयाजावभृथ्यैः चरित्वा ते महर्षयः ।
सस्नू रामह्रदे विप्रा यजमानपुरःसराः ॥ ५३ ॥
पत्निसंजास अवभृथ् यज्ञांतस्नान जाहले । नंतरे जाहले स्नान रामकुंडात तेधवा ॥ ५३ ॥
ते विप्राः महर्षयः - ते ज्ञानी महर्षि पत्नीसंयाजावभृथ्यैः - पत्नीकडून जे संयाज नामक यज्ञांग कर्म केले जाते ते व अवभृथ स्नान यांनी चरित्वा - अनुष्ठान करून यजमानपुरःसराः - यजमान आहे पुढे चालणारा ज्यांच्या असे रामह्लदे सस्नुः - रामडोहामध्ये स्नान करिते झाले. ॥५३॥
नंतर महर्षींनी पत्नीसंजाय व अवभृथस्नान ही कर्मे करवून, वसुदेवांसह परशुराम तीर्थात स्नान केले. (५३)
स्नातोऽलङ्कारवासांसि वन्दिभ्योऽदात्तथा स्त्रियः ।
ततः स्वलङ्कृतो वर्णान् आश्वभ्योऽन्नेन पूजयत् ॥ ५४ ॥
भार्या नी वसुदेवाने दिले सर्वचि दागिने । वंद्यांना, आणि ते अन्न सर्व प्राण्यासही दिले ॥ ५४ ॥
स्नातः स्वलंकृतः (सः) - स्नान केलेला व अलंकार घातलेला तो वसुदेव बंदिभ्यः अलंकारवासांसि अदात् - स्तुतिपाठकांना अलंकार व वस्त्रे देता झाला तथा स्त्रियः - त्याप्रमाणे स्त्रियांना ततः - नंतर आश्वभ्यः वर्णान् - कुत्र्यापासून उच्च वर्णाच्या लोकांपर्यंत सर्वांना अन्नेन (अ) पूजयत - अन्न देऊन पूजिता झाला. ॥५४॥
स्नान केल्यानंतर वसुदेव व त्यांच्या पत्न्यांनी आपली सगळी वस्त्रे व अलंकार बंदी लोकांना दिले आणि स्वत: नवी वस्त्रे व अलंकार परिधान करून ब्राह्मणांपासून कुत्र्यापर्यंत सर्वांना भोजन दिले. (५४)
बन्धून् सदारान् ससुतान् पारिबर्हेण भूयसा ।
विदर्भकोशलकुरून् काशिकेकय सृञ्जयान् ॥ ५५ ॥ सदस्यर्त्विक्सुरगणान् नृभूतपितृचारणान् । श्रीनिकेतमनुज्ञाप्य शंसन्तः प्रययुः क्रतुम् ॥ ५६ ॥
बंधू नी बायका त्यांच्या विदर्भी कोसली कुरु । सृंजयो केकया काशी-राजे नी ते सभासद ॥ ५५ ॥ ऋत्विजो माणसे भूत पितरे चारणासही । निरोपा दिल्या भेटी कृष्णानुमति घेउनी । यज्ञाची गाउनी कीर्ती स्वस्थाना सर्व पातले ॥ ५६ ॥
भूयसा पारिबर्हेण - मोठया अहेरांनी सदारान् ससुतान् बन्धून् - पत्नींसहित व पुत्रांसहित अशा बन्धूना विदर्भकोसलकुरून् काशिकेकयसृञ्जयान् (च अपूजयत्) - आणि विदर्भ, कोसल, कुरु, काशि, केकय व सृंजय ह्यांना पूजिता झाला. ॥५५॥ सदस्यर्त्विक्सुरगणान् नृभूतपितृचारणान् (अपूजयत्) - सभासद, ऋत्विज, देवसंघ, मनुष्य, भूते, पितर, चारण ह्यांनाहि पूजिले श्रीनिकेतं अनुज्ञाप्य - लक्ष्मीचे घर अशा श्रीकृष्णाची अनुज्ञा घेऊन क्रतुं शंसंतः प्रययुः - यज्ञाची प्रशंसा करीत गेले. ॥५६॥
त्यानंतर आपले बांधव, त्यांच्या पत्न्या, पुत्र तसेच विदर्भ, कोसल, कुरु, काशी, केकय, सृंजय इत्यादी देशांचे राजे, सभासद, ऋत्विज, देवता , माणसे, भुतमात्र, पितर आणि चारणांना पुष्कळ भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. नंतर श्रीकृष्णांचा निरोप घेऊन, यज्ञाची प्रशंसा करीत ते आपापल्या ठिकाणी गेले. (५५-५६)
धृतराष्ट्रोऽनुजः पार्था भीष्मो द्रोणः पृथा यमौ ।
नारदो भगवान् व्यासः सुहृत्संबंधिबांधवाः ॥ ५७ ॥ बन्धून्परिष्वज्य यदून् सौहृदाक्लिन्नचेतसः । ययुर्विरहकृच्छ्रेण स्वदेशांश्चापरे जनाः ॥ ५८ ॥
विदुरो धृतराष्ट्रो नी भीम अर्जुन भीष्म नी । कुंति नी सहदेवो नी व्यास नी आप्त ते दुजे ॥ ५७ ॥ यादवा सोडुनी जाता विरहा सोशिती तदा । कष्टाने आपुल्या देशी निघाले सर्व तेथुनी ॥ ५८ ॥
धृतराष्ट्रः अनुजः (च) - धृतराष्ट्र व त्याचा धाकटा भाऊ विदुर पार्थाः भीष्मः द्रोणः - पांडव, भीष्म व द्रोण पृथा - कुंती यमौ - नकुल, सहदेव नारदः भगवान् व्यासः (च) - नारद व भगवान व्यास सुहृत्संबन्धिबान्धवाः - मित्र, संबंधी व बांधव. ॥५७॥ सौहृदाक्लिन्नचेतसः बन्धून् यदून् परिष्वज्य - प्रेमाने ज्यांच्या हृदयाला पाझर फुटला आहे अशा बांधव यादवांना आलिंगन देऊन विरहकृच्छ्रेण स्वदेशान् ययुः - वियोगाने उत्पन्न होणार्या दुःखाने स्वदेशाला गेले. ॥५८॥
त्या वेळी धृतराष्ट्र, विदुर, पांडव, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, नारद, भगवान व्यास, तसेच अन्य सोयरे, संबंधित आणि बांधव, आपल्या आप्त अशा यादवांना सोडून जावे लागत असल्याकारणाने अत्यंत दु:खित झाले. अतिशय स्नेहाने त्यांनी त्यांना आलिंगन दिले आणि दु:खी अंत:करणाने कसेतरी ते आपापल्या देशाकडे गेले. इतर लोकही त्यांच्याबरोबर तेथूनच रवाना झाले. (५७-५८)
नन्दस्तु सह गोपालैः बृहत्या पूजयार्चितः ।
कृष्णरामोग्रसेनाद्यैः न्यवात्सीद्बन्धुवत्सलः ॥ ५९ ॥
कृष्णे श्रीबलरामा नी नंदाने उग्रसेनला । गोपां सत्कारिले तैसे कितेक दिन राहिले ॥ ५९ ॥
बृहत्या पूजया अर्चितः नंदः तु - मोठया मानाने पूजिलेला नंद तर गोपालैः सह - गोपालांसह बन्धुवत्सलः - बांधवांवर प्रेम करणारा असा कृष्णरामोग्रसेनाद्यैः न्यवात्सीत् - कृष्ण, बलराम आणि उग्रसेन इत्यादिकांसह राहिला. ॥५९॥
श्रीकृष्ण, बलराम तसेच उग्रसेन इत्यादींनी नंदबाबांसह सर्व गोपांचा उत्तम वस्तू देऊन सन्मान केला. तेव्हा आपापसातील प्रेमामुळे ते काही काळ तेथेच राहिले. (५९)
वसुदेवोऽञ्जसोत्तीर्य मनोरथमहार्णवम् ।
सुहृद्वृतः प्रीतमना नन्दमाह करे स्पृशन् ॥ ६० ॥
तरले वसुदेवो ते मनोरथ महार्णवी । सीमा हर्षा न ती राही नंदासी वदले तदा ॥ ६० ॥
सुहृद्वृतः वसुदेवः - मित्रांनी वेष्टिलेला वसुदेव अञ्जसा मनोरथमहार्णवम् उत्तीर्य - सुलभपणे मनोरथरूपी महासागराला उतरून गेल्यामुळे प्रीतमनाः - प्रसन्न झाले आहे अन्तःकरण ज्याचे असा नंदं करे स्पृशन् आह - नंदाचा हात धरून त्याला म्हणाला. ॥६०॥
वसुदेवांनी आपल्या मोठ्या मनोरथाचा महासागर आप्तांसमवेत पार केला होता. एकदा नंदांचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने ते म्हणाले. (६०)
श्रीवसुदेव उवाच -
भ्रातरीशकृतः पाशो नृनां यः स्नेहसंज्ञितः । तं दुस्त्यजमहं मन्ये शूराणामपि योगिनाम् ॥ ६१ ॥
वसुदेवजी म्हणाले - माणसा भगवंताने स्नेहबंधन ते दिले । न तोडू शकती त्याला शूरवीर यती तसे ॥ ६१ ॥
भ्रातः - हे भाऊ नंदा यः स्नेहसंज्ञितः नृणां ईशकृतः पाशः - जो स्नेह नावाचा मनुष्यांचा परमेश्वराने निर्मिलेला पाश तं - त्याला अहं - मी योगिनां शूराणाम् अपि - योगी व शूर अशा पुरुषांनाहि दुस्त्यजं मन्ये - टाकण्यास कठीण मानितो. ॥६१॥
वसुदेव म्हणाले- हे बंधो ! माणसाला भगवंतांनी अशा प्रेमपाशात जखडून टाकले आहे की, मोठमोठे शूर आणि योगीसुद्धा ते तोडण्यास असमर्थ आहेत. (६१)
अस्मास्वप्रतिकल्पेयं यत्कृताज्ञेषु सत्तमैः ।
मैत्र्यर्पिताफला चापि न निवर्तेत कर्हिचित् ॥ ६२ ॥
कृतघ्न अम्हि तो ऐसे तुम्ही ती मैत्रि साधिली । संतची वागती ऐसे पुढे राहील ही अशी ॥ ६२ ॥
यत् - कारण कृताज्ञेषु अस्मासु - केलेल्या उपकाराला न जाणणार्या आमच्या ठिकाणी सत्तमैः (युष्माभिः) अर्पिता इयं मैत्री - अत्यंतात्यंत थोर अशा तुम्ही केलेली मैत्री अप्रतिकल्पा - परत फेड होणारी नाही जीची अफला अपि वा सती - किंवा जिचे काही फळहि नाही अशी असताहि कर्हिचित् न निवर्तेत - कधीही फिटत नाही. ॥६२॥
आम्ही कृतघ्न असूनही आपल्यासारख्या सज्जनांनी आमच्याशी जी मैत्री केली, तिला तोड नाही. याच्या मोबदल्यात आपणास काहीही मिळणार नसले, तरीसुद्धा आपण ती कधीच तोडणार नाही. (६२)
प्रागकल्पाच्च कुशलं भ्रातर्वो नाचराम हि ।
अधुना श्रीमदान्धाक्षा न पश्यामः पुरः सतः ॥ ६३ ॥
बंधनी असता आम्ही हिता ना पडलो तुम्हा । धनाने माजलो आता तुम्ही ना दिसता पहा ॥ ६३ ॥
भ्रातः - हे भाऊ नंदा प्राक् - पूर्वी अकल्पात् - सामर्थ्याच्या अभावामुळे वः कुशलं नहि आचराम - तुमचे हित आम्ही केले नाही अधुना च - आणि आता श्रीमदान्धाक्षाः पुरः सतः न पश्याम - ऐश्वर्याच्या मदाने आंधळे झालेले असे पुढे असतानाहि तुम्हाला पहात नाही. ॥६३॥
हे बंधो ! पूर्वी आम्ही कैदेत असल्याकारणाने आपली काही मदत करू शकलो नाही. आणि आता संपत्तीच्या गर्वाने आंधळे झाल्यामुळे आपण आमच्यासमोर असूनही आम्ही आपल्याकडे लक्ष देत नाही. (६३)
मा राज्यश्रीरभूत्पुंसः श्रेयस्कामस्य मानद ।
स्वजनानुत बन्धून् वा न पश्यति ययान्धदृक् ॥ ६४ ॥
सन्मान दुसर्यां देता दुजांचा नच इच्छिता । न मिळे धन ते ठीक धनाने जन माजती ॥ ६४ ॥
मानद - हे मानदा श्रेयस्कामस्य पुंसः राज्यश्रीः मा अभूत् - कल्याणेच्छु पुरुषाला राज्यैश्वर्य न मिळो यया - ज्या राज्यैश्वर्याने अंधदृक् - आंधळी आहे दृष्टी ज्याची असा स्वजनान् उत बन्धन् वा न पश्यति - आपल्या आप्तांना किंवा बांधवांना पहात नाही ॥६४॥
दुसर्यांना मान देणार्या हे बंधो ! ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे आहे, त्याला राज्यलक्ष्मी कधीच मिळता कामा नये. कारण तिने आंधळा झालेला मनुष्य आप्तेष्टांशीही संपर्क ठेवीत नाही. (६४)
श्रीशुक उवाच -
एवं सौहृदशैथिल्य चित्त आनकदुन्दुभिः । रुरोद तत्कृतां मैत्रीं स्मरन् अश्रुविलोचनः ॥ ६५ ॥
श्रीशुकदेव सांगतात - वदता वसुदेवांचा प्रेमाने कंठ दाटला । आठवे नंदमैत्री ती आसवे नेत्रि पातले ॥ ६५ ॥
एवं सौहृदशैथिल्यचित्तः आनकदुन्दुभिः - याप्रमाणे मित्रप्रेमाने ज्याचे अंतःकरण शिथिल झाले आहे असा वासुदेव तत्कृतां मैत्रीं स्मरन् - त्या नंदाची मैत्री स्मरुन अश्रुविलोचनः - अश्रूंनी भरले आहेत डोळे ज्याचे असा रुरोद - रुदन करु लागला ॥६५॥
श्रीशुक म्हणतात- असे म्हणता म्हणता वसुदेव प्रेमाने सद्ग्दित झाले. आणि नंदांची मैत्री आठवून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले व ते रडू लागले. (६५)
नन्दस्तु सख्युः प्रियकृत् प्रेम्णा गोविन्दरामयोः ।
अद्य श्व इति मासांस्त्रीन् यदुभिर्मानितोऽवसत् ॥ ६६ ॥
नंदजी मित्रप्रेमाने राहिले तीन मास तै । सन्मान यदुवंशाने तयांना बहुही दिला ॥ ६६ ॥
सख्युः गोविंदरामयोः (च) प्रेम्णा प्रियकृत् नंदः तु - मित्र वसुदेवाचे व बलराम आणि श्रीकृष्णाचे प्रेमाने प्रिय करणारा नंद तर अद्य श्वः इति - आज उद्या करिता करिता यदुभिः मानितः - यादवांनी मान दिलेला असा त्रीन् मासान् अवसत् - तीन महिने राहिला. ॥६६॥
आपल्या मित्राला प्रसन्न करण्यासाठी तसेच राम-कृष्णांवरील प्रेमामुळे आज उद्या करता करता नंद तीन महिने तेथेच राहिले. यादवांनीही त्यांना मानाने वागवले. (६६)
ततः कामैः पूर्यमाणः सव्रजः सहबान्धवः ।
परार्ध्याभरणक्षौम नानानर्घ्यपरिच्छदैः ॥ ६७ ॥
वस्त्रालंकार सामग्री श्रेष्ठ ती भेट अर्पुनी । नंद नी नंद बंधुना गोपांना तोषिले असे ॥ ६७ ॥
ततः कामैः पूर्यमाणः (नंदः) - नंतर इच्छित वस्तूंनी परिपूर्ण केलेला नंद सव्रजः सहबान्धवः - गाईच्या कळपांसह व बांधवांसह परार्ध्याभरणक्षौमनानानर्घ्यपरिच्छदैः - अति मूल्यवान अलंकार, रेशमी वस्त्रे व अनेक मूल्यवान अहेर यांसह. ॥६७॥
यानंतर बहुमोल अलंकार, रेशमी वस्त्रे, अनेक प्रकारची उत्तमोत्तम सामग्री आणि उपभोगाच्या वस्तू, नंद, त्यांचे व्रजातील सहकारी आणि बंधव यांना देऊन त्यांना तृप्त केले. (६७)
वसुदेवोग्रसेनाभ्यां कृष्णोद्धवबलादिभिः ।
दत्तमादाय पारिबर्हं यापितो यदुभिर्ययौ ॥ ६८ ॥
वसुदेवे उग्रसेने राम कृष्ण नि उद्धवे । दिधल्या भेट वस्तू त्या, व्रजास नंद पातले ॥ ६८ ॥
वसुदेवोग्रसेनाभ्यां कृष्णोद्धवबलादिभिः - वसुदेव, उग्रसेन, कृष्ण, उद्धव, बलराम इत्यादिकांनी दत्तं पारिबर्हम् आदाय - दिलेले आहेर घेऊन यदुभिः यापितः (ततः) ययौ - यादवांकडून पाठवणी केलेला असा तेथून गेला. ॥६८॥
वसुदेव, उग्रसेन, श्रीकृष्ण, बलराम, उद्धव इत्यादी यादवांनी त्यांना दिलेल्या भेटी घेऊन त्यांनी निरोप दिल्यानंतर नंद आपल्या व्रजाकडे गेले. (६८)
नन्दो गोपाश्च गोप्यश्च गोविन्दचरणाम्बुजे ।
मनः क्षिप्तं पुनर्हर्तुं अनीशा मथुरां ययुः ॥ ६९ ॥
नंद गोप नि गोपिंचे कृष्णासी चित्त लागले । मन सोडोनिया तेथे त्या क्षेत्रातुनि पातले ॥ ६९ ॥
नंदः गोपाः च गोप्यः च - नंद, गोप व गोपी गोविंदचरणाम्बुजे क्षिप्तं मनः - श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या ठिकाणी लाविलेल्या मनाला पुनः हर्तुं - पुनः मागे आणण्यास अनीशाः - असमर्थ अशी मथुरां ययुः - मथुरेस गेली. ॥६९॥
नंद, गोप आणि गोपी यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांच्या चरणी इतके आसक्त झाले होते की, प्रयत्न करूनही तेथून काढून घेण्यास असमर्थ असलेले ते तसेच मथुरेला गेले. (६९)
बन्धुषु प्रतियातेषु वृष्णयः कृष्णदेवताः ।
वीक्ष्य प्रावृषमासन्नाद् ययुर्द्वारवतीं पुनः ॥ ७० ॥
बंधु बांधव ते सारे गेले स्वस्थानि जेधवा । वर्षाकाल तदा आला द्वारकीं यदु पातले ॥ ७० ॥
कृष्णदेवताः वृष्णयः - श्रीकृष्ण आहे देव ज्यांचा असे यादव बन्धुषु प्रयातेषु - बांधव निघून गेले असता प्रावृषं आसन्नां वीक्ष्य - पावसाळा जवळ आलेला पाहून पुनः द्वारवतीं ययुः - पुनः द्वारकेला गेले. ॥७०॥
सर्व आप्तेष्ट निघून गेल्यावर श्रीकृष्णांनाच दैवत मानणारे यादव पावसाळा जवळ आलेला पाहून द्वारकेला गेले. (७०)
जनेभ्यः कथयां चक्रुः यदुदेवमहोत्सवम् ।
यदासीत् तीर्थयात्रायां सुहृत् संदर्शनादिकम् ॥ ७१ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे तीर्थयात्रानुवर्णनं नाम चतुरशीतितमोऽध्यायः ॥ ८४ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
तेथल्या सर्व लोकांना यज्ञ हा वसुदेवचा । प्रसंग सर्वच्या सर्व यात्रीक सांगु लागले ॥ ७१ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चौर्याऐंशिवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
तीर्थयात्रायां - तीर्थयात्रेमध्ये यत् - जे यदुदेवमहोत्सवं - वसुदेवाचा यज्ञमहोत्सव सुहृत्संदर्शनादिकं (च) - व मित्रांच्या भेटी आदि आसीत् - घडले जनेभ्यः कथयांचक्रुः - लोकांना सांगते झाले. ॥७१॥ चौर्यायशींवा अध्याय समाप्त
तेथे गेल्यावर त्यांनी वसुदेवांचा यज्ञमहोत्सव, आप्तेष्टांची भेट इत्यादी तीर्थयात्रेतील प्रसंग तेथील लोकांना सांगितले. (७१)
अध्याय चौर्यायशींवा समाप्त |