|
श्रीमद् भागवत पुराण द्रौपदीं प्रति श्रीकृष्णपत्नीनां स्वस्वोद्वाहवृत्तांतवर्णनम् - भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) तथानुगृह्य भगवान् गोपीनां स गुरुर्गतिः । युधिष्ठिरमथापृच्छत् सर्वांश्च सुहृदोऽव्ययम् ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) गोपिंना बोधिले कृष्णे बोधवस्तुहि तो स्वता । युधिष्ठिरादि सर्वांना तसाचि बोलला असे ॥ १ ॥
गोपीनां गतिः गुरुः सः भगवान् - गोपींचा आश्रय व ज्ञानोपदेशक असा तो भगवान श्रीकृष्ण तथा अनुगृह्य - तशा रीतीने अनुग्रह करून युधिष्ठिरं - धर्मराजाला अथ सर्वान् सुहृदः च - आणखी इतर सर्व मित्रांना अव्ययं अपृच्छत् - खुशाली विचारिता झाला. ॥१॥
श्रीशुक म्हणतात- गोपींचे गुरु आणि प्राप्तव्य अशा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपा केली. नंतर त्यांनी युधिष्ठिराला व अन्य संबंधितांना खुशाली विचारली. (१)
त एवं लोकनाथेन परिपृष्टाः सुसत्कृताः ।
प्रत्यूचुर्हृष्टमनसः तत्पादेक्षाहतांहसः ॥ २ ॥
अशूभ नष्टले सारे कृष्णाच्या पददर्शने । कृष्णे सत्कारिता त्यांना आनंदे बोलु लागले ॥ २ ॥
एवं लोकनाथेन परिपृष्टाः - याप्रमाणे श्रीकृष्णाने विचारिलेले सुसत्कृताः - चांगल्या रीतीने सत्कारिलेले तत्पादेक्षाहतांहसः - त्या श्रीकृष्णाच्या पायाच्या दर्शनाने नष्ट झाले आहे पाप ज्यांचे असे हृष्टमनसस्ते - आनंदित झाले आहे अंतःकरण ज्यांचे असे ते सर्व प्रत्यूचुः - प्रत्युत्तर देते झाले. ॥२॥
भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे दर्शन घेण्यानेच ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले, त्यांचा जेव्हा त्रैलोक्यनाथाने सत्कार केला व त्यांची खुशाली विचारली, तेव्हा आनंदित होऊन ते म्हणाले. (२)
( मिश्र )
कुतोऽशिवं त्वच्चरणाम्बुजासवं महन्मनस्तो मुखनिःसृतं क्वचित् । पिबन्ति ये कर्णपुटैरलं प्रभो देहंभृतां देहकृदस्मृतिच्छिदम् ॥ ३ ॥
( इंद्रवज्रा ) पदारविंदी रस संत घेती जो दिव्य जीवा भव भेय नष्टी । कर्णद्वयाने भरपूर पीता अमंगलाची मग काय शंका ॥ ३ ॥
प्रभो - हे श्रीकृष्णा महन्मनस्तः मुखनिः सृतं - मोठया साधूंच्या अंतःकरणांतून मुखद्वारा बाहेर पडलेल्या देहंभृतां देहकृदस्मृतिच्छिदं - देहधारी पुरुषांना देह उत्पन्न होण्यास कारणीभूत अशा मायेला तोडून टाकणार्या त्वच्चरणाम्बुजासवं - तुझ्या चरणकमलाचा मकरंद ये क्वचित् - जे एखादे वेळीहि कर्णपुटैः अलं पिबन्ति - कानांच्या योगे पूर्णपणे प्राशितात (तेषां) अशिवं कुतः - त्यांचे अकल्याण कसे बरे होईल ? ॥३॥
भगवन ! महापुरुषांच्या मनातील आपल्या चरणारविंदांचा मकरंद जेव्हा त्यांच्या मुखातून कथामृताच्या रूपाने बाहेर पडतो, तो जे लोक आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून पितात, त्यांचे अमंगल कोठून होणार? कारण प्राण्यांना देह प्राप्त करून देणारे आपले विस्मरण ते कथामृत नाहीसे करते. (३)
( वसंततिलका )
हित्वाऽऽत्म धामविधुतात्मकृतत्र्यवस्थम् आनन्दसम्प्लवमखण्डमकुण्ठबोधम् । कालोपसृष्टनिगमावन आत्तयोग मायाकृतिं परमहंसगतिं नताः स्म ॥ ४ ॥
( वसंततिलका ) आनंदसिंधु हरि तू तइ ज्ञानरूपी बुद्धी नि वृत्ति तुअला नच वेध घेती । काळात वेद सरता अवतार घेशी तर्कोपराचे सगळे, नमितो तुला मी ॥ ४ ॥
श्रात्मधामविधुतात्मकृतत्र्यवस्थं - आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळे नाहीशा झाल्या आहेत आत्म्याने केलेल्या तीन अवस्था ज्यामध्ये अशा आनन्दसम्प्लवं - आनंदाचा निधि अशा अखण्डं अकुण्ठबोधं - त्रिकालाबाधित व ज्याची ज्ञानशक्ति कधीहि कुण्ठित होत नाही अशा कालोपसृष्टनिगमावने आत्तयोगमायाकृतिं - कालाने नष्ट होऊ लागलेल्या वेदांच्या रक्षणासाठी ज्याने योगमायेने मनुष्यरूप धारण केले आहे अशा परमहंसगतिं त्वा हि नताः स्म - वैराग्यशील साधूंना सद्गति देणार्या तुलाच आम्ही नमस्कार करितो. ॥४॥
भगवन ! आपण एकरस ज्ञानस्वरूप आणि अखंड आनंदचे सागर आहात. बुद्धिवृत्तीमुळे होणार्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्था आपल्या स्वयंप्रकाश स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाहीत. परमहंसांचे आपण प्राप्तव्य आहात. काळाच्या ओघात वेदांचा -हास होत असलेला पाहून त्यांच्या रक्षणासाठी आपण आपल्या योगमायेने मनुष्यरूप धारण केले आहे. आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत. (४)
श्रीऋषिरुवाच -
( मिश्र ) इत्युत्तमःश्लोकशिखामणिं जनेषु अभिष्टुवत्स्वन्धककौरवस्त्रियः । समेत्य गोविन्दकथा मिथोऽगृणन् त्रिलोकगीताः श्रृ वर्णयामि ते ॥ ५ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( इंद्रवज्रा ) गाती जधि अन्यहि कृष्णकीर्ती तै यादवांच्या कुरुच्या स्त्रियाही । गोविंदकीर्ती वदु लागल्या त्या मी सांगतो सर्व जशा तशाची ॥ ५ ॥
इति - याप्रमाणे जनेषु उत्तमश्लोकशिखामणिं अभिष्टुवत्सु - लोक उत्तमकीर्तीच्या पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा श्रीकृष्णाची स्तुति करीत असता अन्धककौरवस्त्रियः - यादवांच्या व कौरवांच्या स्त्रिया समेत्य - एकत्र जमून त्रिलोकगीताः गोविंदकथाः - त्रैलोक्यात गाइल्या गेलेल्या श्रीकृष्णाच्या कथा मिथः अगृणन् - आपापसात वर्णित्या झाल्या (ताः) ते वर्णयामि - त्या तुला मी सांगतो शृणु - ऐक. ॥५॥
श्रीशुक म्हणतात- ज्यावेळी इतर लोक याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत होते, त्याचवेळी यादव आणि कौरव यांच्या स्त्रिया एकत्र येऊन आपापसात भगवंतांच्या त्रिभुवनविख्यात लीलांचे वर्णन करीत होत्या. तेच मी तुला सांगतो, ऐक . (५)
श्रीद्रौपद्युवाच -
( अनुष्टुप् ) हे वैदर्भ्यच्युतो भद्रे हे जाम्बवति कौसले । हे सत्यभामे कालिन्दि शैब्ये रोहिणि लक्ष्मणे ॥ ६ ॥ हे कृष्णपत्न्य एतन्नो ब्रूते वो भगवान् स्वयम् । उपयेमे यथा लोकं अनुकुर्वन् स्वमायया ॥ ७ ॥
द्रौपदी म्हणाली - ( अनुष्टुप् ) रुक्मिणी जांबवंती गे भद्रे सत्ये नि रोहिणी । लक्ष्मणे सत्यभामे गे शैब्ये कालिंदि गे तुम्ही ॥ ६ ॥ सांगा गे भगवान् कृष्णे माया ती रचुनी कसे । वरिले एक एकीला माणसा परि ते कसे ॥ ७ ॥
हे वैदर्भि हे भद्रे हे जाम्बवति हे कौसले - हे रुक्मिणि, हे भद्रे, हे जाम्बवति, हे कौसले हे सत्यभामे कालिन्दि शैब्ये रोहिणि लक्ष्मणे - हे सत्यभामे, हे कालिन्दि, हे मित्रविंदे, हे रोहिणि, हे लक्ष्मणे हे कृष्णपत्न्यः - अहो कृष्णस्त्रियाहो भगवान् अच्युतः - भगवान श्रीकृष्ण स्वमायया लोकम् अनुकुर्वन् - आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत यथा स्वयं वः उपयेमे - ज्या रीतीने स्वतः तुम्हाला वरिता झाला एतत् नः ब्रूत - ते आम्हाला सांगा ॥६-७॥
द्रौपदी म्हणाली- हे रुक्मिणी ! भद्रे ! जांबवती ! सत्ये ! सत्यभामे ! कालिंदी ! शैब्ये ! लक्ष्मणे ! रोहिणी ! आणि अन्य श्रीकृष्णपत्न्यांनो ! स्वत: भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मायेने लोकांचे अनुकरण करीत तुमचे कोणत्या प्रकारे पाणिग्रहण केले, ते आम्हांला सांगा. (६-७)
श्रीरुक्मिण्युवाच -
( वसंततिलका ) चैद्याय मार्पयितुमुद्यतकार्मुकेषु राजस्वजेयभटशेखरिताङ्घ्रिरेणुः । निन्ये मृगेन्द्र इव भागमजावियूथात् तच्छ्रीनिकेतचरणोऽस्तु ममार्चनाय ॥ ८ ॥
रुक्मिणी म्हणाली - ( वसंततिलका ) दैत्यादि इच्छिति मला शिशुपाल व्हावा सिंहापरीच हरिने हरिले मला की । जे वीर विश्वि, पदिची धुळ इच्छिती ते सेवा अशीच घडु हे मज जन्म जन्मी ॥ ८ ॥
चैद्याय मा अर्पयितुम् उद्यतकार्मुकेषु राजसु - मला शिशुपालाला देण्यासाठी जरासंधादि राजे धनुष्ये सज्ज करून उभे असता अजेयभटशेखरितांघ्रिरेणुः - अजिंक्य अशा योद्ध्यांनी मस्तकावर तुर्याप्रमाणे धारण केली आहे पायधूळ ज्याची असा मृगेन्द्रः अजावियूथात् भागम् इव - सिंह मेंढ्यांच्या कळपातून आपला भाग नेतो तसा (मां) निन्ये - मला नेता झाला तत् - त्या कारणास्तव श्रीनिकेतचरणः - लक्ष्मीचे निवासस्थान असा श्रीकृष्णाचा चरण मम अर्चनाय अस्तु - मला पूजनाकरिता असो ॥८॥
रुक्मिणी म्हणाली- माझा विवाह शिशुपालाबरोबर व्हावा, म्हणून जरासंधाने राजे शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन आले असता, सिंहाने शेळ्या-मेंढ्यांच्या कळपातून आपली शिकार न्यावी, त्याप्रमाणे अजिंक्य वीरांच्या मस्तकावर पाय देऊन भगवंत मला घेऊन आले. त्या लक्ष्मीनिवासांच्या चरणांचीच सेवा करायला मला मिळावी.(एवढीच माझी इच्छा आहे.) (८)
श्रीसत्यभामोवाच -
यो मे सनाभिवधतप्तहृदा ततेन लिप्ताभिशापमपमार्ष्टुमुपाजहार । जित्वर्क्षराजमथ रत्नमदात्स तेन भीतः पितादिशत मां प्रभवेऽपि दत्ताम् ॥ ९ ॥
सत्यभामा म्हणाली - प्रसेनमृत्यु घडता बहु दुःखि तात स्येमंत रत्न दिधले हरिने तयांना । मिथ्या कलंक कळता भयभीत तात नी अर्पिले मणि तसे मजही ययांना ॥ ९ ॥
यः - जो श्रीकृष्ण सनाभिवधतप्तहृदा ततेन - भावाच्या वधामुळे संतप्त झाले आहे हृदय ज्याचे अशा त्याने लिप्ताभिशापम् अपमार्ष्टुम् - लादिलेला आरोप दूर करण्यासाठी ऋक्षराजं जित्वा - अस्वलांचा अधिपति अशा जांबवानाला जिंकून रत्नं उपाजहार - स्यमंतक मणी आणिता झाला अथ - आणि (तत् मम पित्रे) अदात् - तो माझ्या पित्याला देता झाला तेन भीतः सः मे पिता - त्यामुळे भ्यालेला तो माझा पिता सत्राजित दत्ताम् अपि मां - दिल्याप्रमाणे असलेल्याहि मला प्रभवे अदिशत - समर्थ अशा श्रीकृष्णाला देता झाला ॥९॥
सत्यभामा म्हणाली- आपला भाऊ प्रसेनाच्या मृत्यूने अतिशय दु:खी झालेल्या माझ्या वडिलांनी त्या वधाचा आरोप भगवंतांच्यावर ठेवला. तो कलंक दूर करण्यासाठी त्यांनी ऋक्षराज जांबवानाला जिंकून त्याच्याकडून ते रत्न आणून माझ्या पित्याला दिले. खोटा आरोप ठेवल्याकारणाने माझे वडिल घाबरून गेले. जरी त्यांनी माझा विवाह दुसर्याशी ठरविला होता, तरीसुद्धा त्यांनी स्यमंतकमण्यासह मला भगवंतांच्या हाती सोपविले. (९)
श्रीजाम्बवत्युवाच -
प्राज्ञाय देहकृदमुं निजनाथदैवं सीतापतिं त्रिणवहान्यमुनाभ्ययुध्यत् । ज्ञात्वा परीक्षित उपाहरदर्हणं मां पादौ प्रगृह्य मणिनाहममुष्य दासी ॥ १० ॥
जांबवंती म्हणाली - ना तात सांब स्मरले हरि हाच राम सत्ताविसोहि दिन ते लढले ययांना । नी जाणिताच मजला अन तो मणीही अर्पीयला, मज घडो नित पादसेवा ॥ १० ॥
(मम) देहकृत् - माझा देह उत्पन्न करणारा पिता जांबवान निजनाथदैवं सीतापतिं अमुं (इति) प्राज्ञाय - आपला स्वामी असा जो देव सीतापति रामचंद्र तोच हा श्रीकृष्ण आहे असे न जाणून अमुना (सह) त्रिणवहानि अभ्ययुध्यत् - ह्या श्रीकृष्णाबरोबर सत्तावीस दिवस युद्ध करिता झाला परीक्षितः - झाली आहे स्वरुपाची परीक्षा ज्याला असा (रामं) ज्ञात्वा - हाच राम आहे असे जाणून पादौ प्रगृह्य - पाय धरून मणिना (सह) मां अर्हणं उपाहरत् - स्यमंतक मण्यासह मला भेट म्हणून अर्पिता झाला (एवम्) अहं अमुष्य दासी (अभवम्) - अशा रीतीने मी ह्या श्रीकृष्णाची दासी झाले. ॥१०॥
जांबवती म्हणाली- हेच आपले स्वामी भगवान सीतापती आहेत, हे माझ्या वडिलांना-जांबवानाला न कळल्यामुळे ते सत्तावीस दिवसपर्यंत यांच्याशी लढत राहिले. परंतु जेव्हा लक्षात आले, तेव्हा वडिलांनी यांचे पाय घरून स्यमंतकमण्यासह भेट म्हणून मला यांना अर्पण केले. अशी आहे या दासीची कथा. (१०)
श्रीकालिन्द्युवाच -
( अनुष्टुप् ) तपश्चरन्तीमाज्ञाय स्वपादस्पर्शनाशया । सख्योपेत्याग्रहीत् पाणिं योऽहं तद्गृहमार्जनी ॥ ११ ॥
कालिंदी म्हणाली - ( अनुष्टुप् ) तप मी आचरी तेंव्हा ययांनी जाणिले मला । अर्जुना पुढती यांनी वरिले दासि झाडु मी ॥ ११ ॥
स्वपादस्पर्शनाशया तपः चरन्तीं मा आज्ञाय - आपल्या पायांच्या स्पर्शाची इच्छा धरून तप करणार्या मला जाणून सख्या उपेत्य - मित्र जो अर्जुन त्याच्याबरोबर येऊन यः पाणिं अग्रहीत् - जो माझे पाणिग्रहण करिता झाला तद्गृहमार्जनी अहम् (अस्मि) - त्याच्या घराची झाडसारव करणारी मी दासी झाल्ये ॥११॥
कालिंदी म्हणाली- त्यांच्या चरणांची प्राप्ती व्हावी, म्हणून मी तपश्चर्या करीत आहे, असे जेव्हा भगवंतांना समजले, तेव्हा ते मित्र अर्जुनासह यमुनातीरावर आले आणि त्यांनी माझे पाणिग्रहण केले. तीच मी त्यांच्या घरची झाडलोट करणारी दासी आहे. (११)
श्रीमित्रविन्दोवाच -
( वसंततिलका ) यो मां स्वयंवर उपेत्य विजित्य भूपान् निन्ये श्वयूथगं इवात्मबलिं द्विपारिः । भ्रातॄंश्च मेऽपकुरुतः स्वपुरं श्रियौकः तस्यास्तु मेऽनुभवमङ्घ्र्यवनेजनत्वम् ॥ १२ ॥
मित्रविंदा म्हणाली - ( वसंततिलका ) माझ्या स्वयंवरि यये हरिले विरांना जै सिंहभाग हरितो हरिले मला तै । द्वारवतीस मजला वरुनीच नेले लाभो मला चरणतीर्थ कितेक जन्मी ॥ १२ ॥
श्रियौकः यः - लक्ष्मीचे निवासस्थान असा जो स्वयंवरे उपेत्य - स्वयंवरात येऊन द्विपारिः श्वयूथगं आत्मबलिं इव - जसा सिंह कुत्र्यांच्या कळपात सापडलेला आपला बळी घेऊन जातो तसा अपकुरुतः भूपान् मे भ्रातृन् च - अपकार करणार्या राजांना आणि माझ्या भावांना विजित्य - जिंकून मां स्वपुरं निन्ये - मला आपल्या नगरी नेता झाला तस्य - त्या श्रीकृष्णाचे अङ्घ्य्रवनेजनत्वं मे अनुभवम् अस्तु - पाय धुण्याचे काम मला जन्मोजन्मी मिळो. ॥१२॥
मित्रविंदा म्हणाली- स्वयंवरामध्ये ज्यांनी येऊन विरोध करणार्या माझ्या भावांना व सर्व राजांना जिंकून कुत्र्यांच्या झुंडीमधून सिंहाने आपली शिकार घेऊन जावी, त्याप्रमाणे मला आपल्या वैभवसंपन्न द्वारकापुरीला नेले, त्यांचे जन्मोजन्मी पाय धुण्याचे भग्य मला प्राप्त व्हावे, एवढीच माझी इच्छा आहे. (१२)
श्रीसत्योवाच -
सप्तोक्षणोऽतिबलवीर्यसुतीक्ष्णश्रृंगान् पित्रा कृतान् क्षितिपवीर्यपरीक्षणाय । तान् वीरदुर्मदहनस्तरसा निगृह्य क्रीडन् बबन्ध ह यथा शिशवोऽजतोकान् ॥ १३ ॥
सत्या म्हणाली - माझ्या स्वयंवरिचि बैलहि तीक्ष्ण सात ठेवीयले कि बघण्या बल पौरुषाते । टोचोनि वेसणि यये जितिले पणा नी कर्डापरीच हरिने मज ओढियेले ॥ १३ ॥
क्षितिपवीर्यपरीक्षणाय पित्रा कृतान् - राजांच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी पित्याने योजिलेल्या अशा वीरदुर्मदहनः - पराक्रमी पुरुषांचा दांडगेपणा समूळ नष्ट करणार्या अतिबलवीर्यसुतीक्ष्णशृङगान् - अत्यंत बळकट व पराक्रमी आणि तीक्ष्ण शिंगांच्या तान् सप्त उक्षणः - त्या सात बैलांना यथा शिशवः अजनोकान् - जशी लहान मुले लहान मेंढयांना तसा तरसा निगृह्य - वेगाने धरून क्रीडन् बबन्ध ह - सहज लीलेने बांधिता झाला. ॥१३॥
सत्या म्हणाली- मला वरू इच्छिणार्या राजांचे बळ पाहाण्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय बलाढ्य आणि पराक्रमी, टोकदार शिंगे असलेले सात बैल सोडले होते. मोठमोठ्या वीरांची घमेंड जिरविणार्या त्या बैलांना भगवंतांनी अगदी सहजपणे झेप घेऊन पकडले आणि त्यांना वेसण घातली. लहान मुलींनी शेळीची करडे पकडावीत, त्याप्रमाणे. (१३)
( अनुष्टुप् )
य इत्थं वीर्यशुल्कां मां दासीभिश्चतुरङ्गिणीम् । पथि निर्जित्य राजन्यान् निन्ये तद्दास्यमस्तु मे ॥ १४ ॥
( अनुष्टुप् ) पौरुषे मजला तैसे दास दास्यानि सैन्य ते । घेवोनि निघता शत्रू रणात कैक मारिले । अभिलाषा मनीं ही की सेवा नित्य मिळो मला ॥ १४ ॥
यः - जो इत्थं - याप्रमाणे पथि राजन्यान् निर्जित्य - मार्गामध्ये क्षत्रियांना जिंकून दासीभिः (सह) चतुराङ्गिणीं वीर्यशुल्कां मां - दासीसह चतुरंग सेनेने युक्त व पराक्रमच जीचे मूल्य आहे अशा मला निन्ये - नेता झाला मे तद्दास्यम् (नित्यं) अस्तु - मला त्या श्रीकृष्णाची सेवा नित्य घडो. ॥१४॥
ज्यांनी अशा प्रकारे सामर्थ्याचा पण लावलेल्या मला प्राप्त करून घेऊन चतुरंग सेना आणि दासींसह द्वारकेला आणले. मार्गांमध्ये ज्या क्षत्रियांनी विघ्न आणले, त्यांनाही जिंकले. माझी हीच इच्छा आहे की, यांच्या सेवेची संधी मला सदैव मिळो! (१४)
श्रीभद्रोवाच -
पिता मे मातुलेयाय स्वयमाहूय दत्तवान् । कृष्णे कृष्णाय तच्चित्तां अक्षौहिण्या सखीजनैः ॥ १५ ॥
मामाचे पुत्र हे माझ्या स्वये मी इच्छिले ययां । पित्याने जाणुनी, सेना सदास्या अर्पिले मला ॥ १५ ॥
कृष्णे - हे द्रौपदी मे पिता - माझा बाप स्वयं आहूय - स्वतः बोलावून तच्चित्तां (मां) - त्याच्याच ठिकाणी लागले आहे अंतःकरण जीचे अशा मला अक्षौहिण्या सखीजनैः (च सह) - अक्षौहिणी सेना व मैत्रिणी यांसह मातुलेयाय कृष्णाय - मामेभाऊ अशा श्रीकृष्णाला दत्तवान् - देता झाला. ॥१५॥
भद्रा म्हणाली- हे द्रौपदी ! माझ्या पित्याने स्वत: माझे मामेभाऊ असलेल्या भगवंतांना बोलावून आणून अक्षौहिणी सेना आणि पुष्कळशा दासी यांसह ठायी चित्त जडलेल्या मला त्यांना अर्पण केले. (१५)
अस्य मे पादसंस्पर्शो भवेज्जन्मनि जन्मनि ।
कर्मभिर्भ्राम्यमाणाया येन तच्छ्रेय आत्मनः ॥ १६ ॥
कल्याण इच्छिते मी की कर्माने जन्म जो मिळे । तिथेही पदपद्मचा मजला नित्य स्पर्श हो ॥ १६ ॥
कर्मभिः भ्राम्यमाणायाः मे - कर्मांनी जन्ममरणरूपी संसारचक्रात फिरत रहाणार्या मला जन्मनि जन्मनि - प्रत्येक जन्मामध्ये अस्य पादसंस्पर्शः भवेत् - ह्याच्या पायांचा स्पर्श होवो येन - ज्या अर्थी आत्मनः तत् श्रेयः - जीवाला ती गोष्ट हितकारक आहे. ॥१६॥
माझ्या कर्मानुसार मला जेथे जेथे जन्म घ्यावा लागेल, त्या सगळीकडे त्यांच्याच चरणकमलांचा स्पर्श मला प्राप्त व्हावा, यातच मी माझे परम कल्याण समजते. (१६)
श्रीलक्ष्मणोवाच -
( मिश्र ) ममापि राज्ञ्यच्युतजन्मकर्म श्रुत्वा मुहुर्नारदगीतमास ह । चित्तं मुकुन्दे किल पद्महस्तया वृतः सुसंमृश्य विहाय लोकपान् ॥ १७ ॥
लक्ष्मणा म्हणाली - ( इंद्रवज्रा ) देवर्षि यांची नित कीर्ति गाती लीलावतारा बहु चांग ऐशा । त्या लोकपाला त्यजुनी हरीला वरीयले मी वश या पदासी ॥ १७ ॥
राज्ञि - हे महाराणी नारदगीतं अच्युतजन्मकर्म - नारदाने गायिलेला असा श्रीकृष्णाचा जन्म व त्याची पराक्रमाची कृत्ये मुहुः श्रुत्वा - वारंवार श्रवण करून पद्महस्तया किल (सः) वृतः (इति) सुसंमृश्य - हातात कमळ धारण केलेल्या लक्ष्मीनेहि याला वरिले आहे असा गंभीर विचार करून लोकपान् विहाय - इंद्रादि लोकपालांचा त्याग करून मम अपि चित्तं मुकुन्दे आस ह - माझेहि अंतःकरण श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त झाले. ॥१७॥
लक्ष्मणा म्हणाली- हे राणी ! देवर्षी नारदांच्या मुखातून वारंवार भगवंतांचे अवतार आणि लीलांचे गायन ऐकून आणि लक्ष्मीने सर्व लोकपालांचा त्याग करून भगवंतांनाच वरले, याचाही विचार करून माझे चित्त भगवंतांच्या चरणी आसक्त झाले. (१७)
( अनुष्टुप् )
ज्ञात्वा मम मतं साध्वि पिता दुहितृवत्सलः । बृहत्सेन इति ख्यातः तत्रोपायमचीकरत् ॥ १८ ॥
( अनुष्टुप् ) बृहत्सेन पिता माझे प्रेमाने वर्धिले मला । जाणता मम इच्छा ती पूर्ण केली तये तशी ॥ १८ ॥
साध्वि - हे पतिव्रते द्रौपदी दुहितृवत्सलः - कन्येवर प्रेम करणारा बृहत्सेनः इति ख्यातः - बृहत्सेन नावाने प्रसिद्ध असलेला मम पिता - माझा बाप (मे) मतं ज्ञात्वा - माझे मत जाणून तत्र उपायम् अचीकरत् - त्या बाबतीत उपाय करिता झाला. ॥१८॥
हे साध्वी ! माझे पिता बृहत्सेन यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझे मनोगत जेव्हा त्यांना समजले, तेव्हा त्यांनी मझी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय केला. (१८)
यथा स्वयंवरे राज्ञि मत्स्यः पार्थेप्सया कृतः ।
अयं तु बहिराच्छन्नो दृश्यते स जले परम् ॥ १९ ॥
ज्या परी वरचा मत्स्य अर्जुने वेधिला असे । माझ्याही वरणार्था तो तसाचि टांगिला असे ॥ १९ ॥
राज्ञि - हे द्रौपदी यथा - ज्याप्रमाणे (तव) स्वयंवरे - तुझ्या स्वयंवरामध्ये पार्थेप्सया मत्स्यः कृतः - अर्जुनाला मिळविण्याच्या इच्छेने मत्स्य केला होता अयं तु - हा अर्जुनाच्या वेळचा मत्स्य तर बहिः आच्छन्नः - बाहेरूनच आच्छादिला होता सः परं जले (एव) दृश्यते - तो माझ्या वेळचा मत्स्य केवळ पाण्यातच दिसत असे. ॥१९॥
महाराणी ! अर्जुनाच्या प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे तुमच्या पित्याने स्वयंवरामध्ये मत्स्यवेधाची योजना आखली होती, त्याचप्रमाणे माझ्या पित्यानेसुद्धा केले. फरक एवढाच की, हा मासा बाहेरून झाकलेला होता. फक्त पाण्यातच त्याचे प्रतिबिंब दिसत होते. (१९)
श्रुत्वैतत्सर्वतो भूपा आययुर्मत्पितुः पुरम् ।
सर्वास्त्रशस्त्रतत्त्वज्ञाः सोपाध्यायाः सहस्रशः ॥ २० ॥
राजांना कळता तैसे कितेक नृपती तदा । गुरुंच्या सह ते आले पित्याच्या राजधानिला ॥ २० ॥
एतत् श्रुत्वा - हे ऐकून सर्वास्त्रशस्त्रतत्त्वज्ञाः - सर्व अस्त्रे व शस्त्रे ह्यांची तत्त्वे जाणणारे सोपाध्यायाः सहस्त्रशः भूपाः - उपाध्यायांसह हजारो राजे सर्वतः - सर्व बाजूंनी मत्पितुः पुरं आययुः - माझ्या पित्याच्या नगराला आले. ॥२०॥
राजे लोकांना हे कळले, तेव्हा सर्व ठिकाणांहून शस्त्रास्त्रवेत्ते हजारो राजे आपपल्या गुरुंसह माझ्या पित्याच्या राजधानीत आले. (२०)
पित्रा सम्पूजिताः सर्वे यथावीर्यं यथावयः ।
आददुः सशरं चापं वेद्धुं पर्षदि मद्धियः ॥ २१ ॥
अवस्था बल जाणोनी सर्वां सत्कारिले असे । प्रण जिंकावया सर्वें धनुष्य बाण घेतले ॥ २१ ॥
पित्रा यथावीर्यं यथावयः संपूजिताः - पित्याने जसा ज्याचा पराक्रम व जसे ज्याचे वय त्याप्रमाणे पूजिलेले मद्धियः सर्वे - माझ्याच ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त झाले आहे असे सर्व राजे पर्षदि वेद्धुं सशरं चापं आददुः - सभेमध्ये मत्स्याचा वेध करण्याकरिता बाणांसह धनुष्य घेते झाले. ॥२१॥
माझ्या पित्याने त्या राजांचा पराक्रम आणि वय पाहून चांगल्या त-हेने पाहुणचार केला. मला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने त्या लोकांनी स्वयंवर मंडपात ठेवलेले धनुष्य आणि बाण मत्स्यवेधासाठी उचलले. (२१)
आदाय व्यसृजन् केचित् सज्यं कर्तुमनीश्वराः ।
आकोष्ठं ज्यां समुत्कृष्य पेतुरेकेऽमुनाहताः ॥ २२ ॥
प्रत्यंचा कुणि ना लावी कोणी लवोनिया त्यजी । दुसरे टोक ना गावे पडले झटकोनिया ॥ २२ ॥
केचित् आदाय - कित्येक राजे धनुष्यबाण हाती घेऊन सज्यं कर्तुम् अनीश्वराः - धनुष्यास दोरी चढविण्यास असमर्थ असे व्यसृजन् - टाकून देते झाले एके - दुसरे कित्येक राजे ज्यां आकोष्ठ समुत्कृष्य - दोरी धनुष्याच्या मध्यापर्यंत ओढून अमुना आहताः - त्या धनुष्याने ताडिलेले असे पेतुः - खाली पडले. ॥२२॥
त्यांपैकी काही राजे धनुष्याला दोरीही लावू शकले नाहीत. त्यांनी धनुष्य जसेच्य तसे ठेवून दिले. काहींनी धनुष्याची दोरी एका टोकाला बांधून दुसर्या टोकापर्यंत ती ओढली, परंतु दुसर्या टोकाला ते बांधू शकले नाहीत. त्याच्या झटक्याने ते खाली पडले. (२२)
सज्यं कृत्वापरे वीरा मागधाम्बष्ठचेदिपाः ।
भीमो दुर्योधनः कर्णो नाविन्दन् तदवस्थितिम् ॥ २३ ॥
अंबष्ठो मागधो भीम दुर्योधन नि कर्ण तो । लाविती धनुषां दोरी परी मासा न तो दिसे ॥ २३ ॥
अपरे वीराः मागधाम्बष्ठचेदिपाः - दुसरे कित्येक पराक्रमी असे जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल इत्यादि राजे भीमः दुर्योधनः कर्णः - भीम, दुर्योधन व कर्ण सज्यं कृत्वा (अपि) - धनुष्यावर दोरी चढवूनहि तदवस्थितिं न अविंदन् - त्या मत्स्याचे स्थान जाणते झाले नाहीत. ॥२३॥
जरासंध, अंबष्ठ, शिशुपाल, भीमसेन, दुर्योधन, कर्ण अशा वीरांनी धनुष्याला दोरी बांधली. परंतु मासा कुठे आहे, हे त्यांना समजलेच नाही. (२३)
मत्स्याभासं जले वीक्ष्य ज्ञात्वा च तदवस्थितिम् ।
पार्थो यत्तोऽसृजद्बाणं नाच्छिनत् पस्पृशे परम् ॥ २४ ॥
अर्जुने पाहिला मासा धनुष्य योजिले तसे । लक्षवेध न तो झाला स्पर्शोनी बाण तो पळे ॥ २४ ॥
पार्थः - अर्जुन यत्तः - सज्ज झालेला असा मत्स्याभासं जले वीक्ष्य - मत्स्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहून तदवस्थितिं च ज्ञात्वा - आणि त्या मत्स्याचे स्थान जाणून बाणम् असजृत् - बाण सोडिता झाला किंतु तं न अच्छिनत् - पण त्या मत्स्याला वेधिता झाला नाही (तस्य बाणः) परं (मत्स्यं) पस्पृशे - त्याचा बाण मत्स्याला केवळ स्पर्श करिता झाला. ॥२४॥
अर्जुनाने पाण्यामध्ये त्या माशाचे प्रतिबिंब पाहिले आणि तो कोठे आहे हेही जाणले. अत्यंत सावधपणे त्याने बाण सोडला, परंतु त्याला लक्ष्यवेध करता आला नाही. बाणाने माशाला फक्त स्पर्श केला. (२४)
राजन्येषु निवृत्तेषु भग्नमानेषु मानिषु ।
भगवान् धनुरादाय सज्यं कृत्वाथ लीलया ॥ २५ ॥ तस्मिन् सन्धाय विशिखं मत्स्यं वीक्ष्य सकृज्जले । छित्त्वेषुणापातयत्तं सूर्ये चाभिजिति स्थिते ॥ २६ ॥
गर्व्यांचा संपला गर्व आशा कित्येक सोडिती । सहजी धनु ते कृष्णे घेवोनी एकवेळ तो ॥ २५ ॥ जळात पाहिला मासा तिराने पाडिला पहा । दुपारी अभिजित् वेळी मुहूर्ती घडले असे ॥ २६ ॥
मानिषु भग्नमानेषु राजन्येषु निवृत्तेषु - पूर्वी अभिमानी असूनहि ज्यांचा अभिमान नष्ट झाला आहे असे क्षत्रिय परावृत्त झाले असता अथ - नंतर भगवान् धनुः आदाय - श्रीकृष्ण धनुष्य घेऊन लीलया सज्यं कृत्वा - सहज त्यावर दोरी चढवून. ॥२५॥ तस्मिन् विशिखं संधाय - त्या धनुष्याला बाण लावून जले मत्स्यं सकृत् वीक्ष्य - पाण्यात मत्स्याचे प्रतिबिंब एकदाच पाहून सूर्ये च अभिजिति स्थिते - व सूर्य अभिजित नक्षत्रावर स्थिर असता इषुणा तं छित्वा अपातयत् - बाणाने त्याला वेधून खाली पाडिता झाला. ॥२६॥
अशाप्रकारे अभिमानी राजांचा मानभंग झाला व ते मागे फिरले. तेव्हा भगवंतांनी धनुष्य उचलून सहजपणे त्याला दोरी लावली, बाण जोडला आणि पाण्यात फक्त एकदाच माशाचे प्रतिबिंब पाहून बाण मारून त्याला खाली पाडले. त्यावेळी सूर्य ’अभिजित’ नक्षत्रात होता. (२५-२६)
दिवि दुन्दुभयो नेदुः जयशब्दयुता भुवि ।
देवाश्च कुसुमासारान् मुमुचुर्हर्षविह्वलाः ॥ २७ ॥
जय्जय्कार धरेला नी दुंदुभी वाजल्या नभीं । आनंदे भरले देव वरून वर्षिती फिले ॥ २७ ॥
दिवि - आकाशात जयशब्दयुक्ताः दुन्दुभयः नेदुः - जयजयकार शब्दांनी युक्त असे चौघडे वाजू लागले हर्षविह्वलाः देवाः च - व आनंदाच्या भराने विव्हळ झालेले देव भुवि कुसुमासारान् मुमुचुः - पृथ्वीवर फुलांचे वर्षाव करिते झाले. ॥२७॥
त्यावेळी पृथ्वीवर जयजयकार होऊ लागला आणि आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. देवांनी आनंदविभोर होऊन पुष्पवर्षाव केला. (२७)
( वसंततिलका )
तद् रङ्गमाविशमहं कलनूपुराभ्यां पद्भ्यां प्रगृह्य कनकोइज्वलरत्नमालाम् । नूत्ने निवीय परिधाय च कौशिकाग्र्ये सव्रीडहासवदना कवरीधृतस्रक् ॥ २८ ॥ उन्नीय वक्त्रमुरुकुन्तलकुण्डलत्विड् गण्डस्थलं शिशिरहासकटाक्षमोक्षैः । राज्ञो निरीक्ष्य परितः शनकैर्मुरारेः अंसेऽनुरक्तहृदया निदधे स्वमालाम् ॥ २९ ॥
( वसंततिलका ) त्या रंगशालि जधि मी पद ठेविले तै त्या पैंजणेनि वसनें बहुमूल्य हारें । आले सजोनि स्मित नी बहु लाज होय नी रत्नहार करि घेतियला स्वये की ॥ २८ ॥ शोभी तशीच मजला मणि कुंडलांची चंद्रप्रभे परिच मी उचलोनि मान । हे पाहिले नरपती तिरक्याच नेत्रे नी माळ ती हरिस मी गळि घातली हो ॥ २९ ॥
अहं - मी कनकोज्ज्वलरत्नमालां प्रगृह्य - सुवर्णाच्या कोंदणात बसविलेली तेजस्वी रत्नांची माळ हातात घेऊन नूत्ने कौशिकाग्र्ये निवीय परिधाय च - नवीन सुंदर उंची रेशमी वस्त्रांपैकी एक नेसून व एक पांघरून कबरीधृतस्रक् - वेणीत घातला आहे फुलांचा गजरा जिने अशी सव्रीडहासवदना - लज्जा व हास्य ह्यांनी युक्त झाले आहे मुख जीचे अशी कलनूपुराभ्यां पद्भ्यां - मधुर शब्द करणारे पैंजण घातलेल्या पायांनी तत् रङगम् आविशम् - त्या सभामंडपात शिरले. ॥२८॥ उरुकुन्तलकुण्डलत्विड्गण्डस्थलं वक्त्रं - लांब केस असलेले व कुंडलाचे तेज गालावर पसरले आहे असे मुख उन्नीय - वर करून शिशिरहासकटाक्षमोक्षैः - शीतल हास्ययुक्त कटाक्षांनी परितः राज्ञः निरीक्ष्य - सभोवार राजांकडे पाहून (कृष्णे) अनुरक्तहृदया (अहं) - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आसक्त आहे चित्त ज्यांचे अशी मी स्वमालां - आपली माळ शनकैः - हळू हळू मुरारेः अंसे निदधे - श्रीकृष्णाच्या खांद्यावर ठेविली. ॥२९॥
त्याचवेळी भगवंतांच्या ठिकाणी मन जडलेल्या मी स्वयंवरमंडपात प्रवेश केला. माझ्या पायातील नूपुरे मधुर आवाज करीत होती. मी नवी उत्तम रेशमी वस्त्रे परिधान केली होती. वेणीत गजरा माळलेला होता आणि चेहर्यावर लज्जामिश्रित हास्य विलसत होते. मी हातात सुवर्णजडित तेजस्वी रत्नहार घेतला होता. त्यावेळी दाट कुरळ्या केसांमुळे आणि गालांवर कुंडलांची किरणे पडल्यामुळे शोभणारा माझा चेहरा वर करून सौम्य हास्ययुक्त नजर चारी बाजूंनी बसलेल्या राजांकडे टाकून, नंतर हळुवारपणे माझ्या हातातील वरमाला मी भगवंतांच्या गळ्यात घातली. (२८-२९)
( अनुष्टुप् )
तावन्मृदङ्गपटहाः शङ्खभेर्यानकादयः । निनेदुर्नटनर्तक्यो ननृतुर्गायका जगुः ॥ ३० ॥
( अनुष्टुप् ) घालिता वरमाला ती मृदंग शंख ढोल नी । नगारे वाजली वाद्ये नाचले नट-नर्तिका ॥ ३० ॥
तावत् - इतक्यात शङखभेर्यानकादयः मृदंगपटहाः - शंख, नगारे, मृदंग, ढोल व चौघडे निनेदुः - वाजू लागली नटनर्तक्यः - नाटकी लोक व नाचणार्या स्त्रियाहि ननृतुः - नाचू लागली गायकाः - गवई जगुः - गाऊ लागले. ॥३०॥
त्याबरोबर मृदंग, पखवाज, शंख, ढोल, नगारे इत्यादी वाद्ये वाजू लागली. नट आणि नर्तकी नाचू लागल्या. गवई गाऊ लागले. (३०)
एवं वृते भगवति मयेशे नृपयूथपाः ।
न सेहिरे याज्ञसेनि स्पर्धन्तो हृच्छयातुराः ॥ ३१ ॥
जेंव्हा मी घातली माला स्वामींनी घातली पुन्हा । कामातुर नृपो तेंव्हा चिडले जळता मनीं ॥ ३१ ॥
याज्ञसेनि - हे द्रौपदी भगवति ईशे एवं मया वृते - भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे मी वरिला असता हृच्छयातुराः नृपयूथपाः - कामाने पीडिलेले सेनाधिपति राजे स्पर्धन्तः (तत्) न सेहिरे - चढाओढ करीत ते सहन करते झाले नाहीत. ॥३१॥
हे द्रौपदी ! अशा प्रकारे मी जेव्हा सर्वेश्वर भगवंतांना वरले, तेव्हा कामातुर राजांना मत्सरामुळे ते सहन झाले नाही. (३१)
मां तावद् रथमारोप्य हयरत्नचतुष्टयम् ।
शार्ङ्गमुद्यम्य सन्नद्धः तस्थावाजौ चतुर्भुजः ॥ ३२ ॥
चतुर्भुज हरीने या रथात घेतले मला । धनुष्य घेतले हाती युद्धार्थ सिद्धले तदा ॥ ३२ ॥
चतुर्भुजः - चार बाहु असलेला श्रीकृष्ण तावत् - तितक्यात मां - मला हयरत्नचतुष्टयं रथं आरोप्य - चार उत्तम घोडे जुंपलेल्या रथात बसवून शार्ङगम् उद्यम्य - शार्ङ्ग धनुष्य उचलून सन्नद्धः (भूत्वा) आजौ तस्थौ - सज्ज होऊन युद्धभूमीवर उभा राहिला. ॥३२॥
आपल्या चार घोड्यांच्या रथावर चतुर्भुज भगवंतांनी मला घेतले आणि हातात शार्ड्ग.धनुष्य घेऊन व कवच धारण करून ते युद्धासाठी सज्ज झाले. (३२)
दारुकश्चोदयामास काञ्चनोपस्करं रथम् ।
मिषतां भूभुजां राज्ञि मृगाणां मृगराडिव ॥ ३३ ॥
सोन्याने सजल्या ऐशा रथा दारूक हाकुनी । नेलेसे द्वारके मागी सिंह जै भाग नेतसे ॥ ३३ ॥
राज्ञि - हे राणी द्रौपदी दारुकः - दारुक भूभुजां मिषतां - राजे पहात असता मृगराट् मृगाणाम् (मिषताम्) इव - सिंह जसा पशूंच्या समक्ष त्याप्रमाणे काञ्चनोपस्करं रथं चोदयामास - सुवर्णाने मढविलेला रथ हाकिता झाला. ॥३३॥
परंतु हे राणी ! जसे एखाद्या सिंहाने पशूंची पर्वा न करता त्यांच्यातून निघून जावे, त्याप्रमाणे दारुकाने सोन्याच्या सामानाने भरलेला रथ सर्व राजांच्या देखतच द्वारकेकडे हाकला. (३३)
तेऽन्वसज्जन्त राजन्या निषेद्धुं पथि केचन ।
संयत्ता उद्धृतेष्वासा ग्रामसिंहा यथा हरिम् ॥ ३४ ॥
कांही ते धनु घेवोनी लढाया पातले परी । सिंहाला भुंकती कुत्रे तसे ते व्यर्थ जाहले ॥ ३४ ॥
ते राजन्याः - ते क्षत्रिय अन्वसज्जन्त - पाठलाग करिते झाले केचन - कित्येक पथि निषेद्धुं - मार्गात अडवून धरण्यासाठी उद्धृतेष्वासाः - उचलले आहे धनुष्य ज्यांनी असे ग्रामसिंहाः यथा हरिं (तथा) - कुत्रे ज्याप्रमाणे सिंहाला त्याप्रमाणे संयत्ताः (बभूवुः) - युद्धास सिद्ध झाले. ॥३४॥
त्यांपैकी काही राजांनी धनुष्य घेऊन, युद्धासाठी सज्ज होऊन, भगवंतांना अडविण्याच्या उद्देशाने, कुत्र्यांणी सिंहाचा पाठलाग करावा तसा त्यांचा पाठलाग सुरू केला. (३४)
ते शार्ङ्गच्युतबाणौघैः कृत्तबाह्वङ्घ्रिकन्धराः ।
निपेतुः प्रधने केचिद् एके सन्त्यज्य दुद्रुवुः ॥ ३५ ॥
कृष्णाने सोडिता बाण कुणी गेले पळोनिया । कुणाचे तुटले पाय कुणी मेले रणात त्या ॥ ३५ ॥
ते - ते राजे शार्ङगच्युतबाणौघैः - शार्ङगधनुष्यापासून सुटलेल्या बाणांच्या समूहांनी कृत्तबाह्वाङ्घ्रिकंधराः - तुटले आहेत बाहु, मांडया व माना ज्यांच्या असे झाले केचित् प्रधने निपेतुः - कित्येक युद्धात पडले एके संत्यज्य दुद्रुवुः - कित्येक युद्ध सोडून पळून गेले. ॥३५॥
युद्धामध्ये शार्ड्ग.धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी काहीजणांचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले आणि कोणाच्या माना तुटून ते धारातीर्थी पडले. तर काहीजण युद्धभूमी सोडून पळून गेले. (३५)
( प्रभावती )
ततः पुरीं यदुपतिरत्यलङ्कृतां रविच्छदध्वजपटचित्रतोरणाम् । कुशस्थलीं दिवि भुवि चाभिसंस्तुतां समाविशत्तरणिरिव स्वकेतनम् ॥ ३६ ॥
( गति ) पुन्हा हरि यदुपति भानुच्या परी मला जितोनिहि रिघले सजे पुरी । जनोनि आप्त जमुनि स्वागतोत्सवी ध्वजा कितेक चढविल्या असंख्यची ॥ ३६ ॥
ततः - नंतर यदुपतिः - श्रीकृष्ण अत्यलंकृतां - अतिशय अलंकृत केलेल्या रविच्छदध्वजपटचित्रतोरणाम् - सूर्यालाहि झाकून टाकणार्या वस्त्रांनी युक्त असे ध्वज व चित्रविचित्र तोरणे उभारिली आहेत ज्यात अशा दिवि भुवि च अभिसंस्तुतां - स्वर्गात व पृथ्वीवर स्तविल्या गेलेल्या कुशस्थलीं पुरीं - द्वारका नगरीत तरणिः स्वकेतनम् इव - सूर्य जसा आपल्या मंदिरात शिरावा तसा समाविशत् - शिरला. ॥३६॥
त्यानंतर यदुराज भगवंतांनी सूर्याप्रमाणे, स्वर्गात आणि पृथ्वीवर प्रशंसा केल्या गेलेल्या आपल्या निवासस्थानी, द्वारका नगरीत प्रवेश केला. त्या दिवशी ती विशेषरूपाने सजविली गेली होती. ध्वज, पताका आणि तोरणे इतकी लावली होती की, त्यांच्यामुळे सूर्याची किरणे खाली येऊ शकत नव्हती. (३६)
( अनुष्टुप् )
पिता मे पूजयामास सुहृत्संबंधिबांधवान् । महार्हवासोऽलङ्कारैः शय्यासनपरिच्छदैः ॥ ३७ ॥
( अनुष्टुप् ) पुरता मम इच्छा ही प्रसन्न तात जाहले । आप्त संबंधिता सर्वां सन्माने वस्तु अर्पिल्या ॥ ३७ ॥
मे पिता - माझा पिता महार्हवासोलंकारैः शय्यासनपरिच्छदैः - मोठया मूल्यवान वस्त्रांनी व अलंकारांनी तसेच शय्या, आसने इत्यादि साहित्यांनी सुहृत्संबन्धिबान्धवान् पूजयामास - मित्र, आप्तेष्ट व बंधुवर्ग ह्यांची पूजा करिता झाला. ॥३७॥
माझ्या वडिलांनी सुहृद, संबंधी आणि बांधवांना बहुमोल वस्त्रे, अलंकार, बिछाने, आसने आणि विविध प्रकारची सामग्री देऊन सन्मानित केले. (३७)
दासीभिः सर्वसंपद्भिः भटेभरथवाजिभिः ।
आयुधानि महार्हाणि ददौ पूर्णस्य भक्तितः ॥ ३८ ॥
मजला दिधल्या दास्या हत्ती अश्व तसे रथ । शस्त्रास्त्र श्रेष्ठ संपन्न सैनीक यांजला दिले ॥ ३८ ॥
भक्तितः - भक्तीने सर्वसंपद्भिः दासीभिः - सर्व ऐश्वर्यांनी युक्त अशा दासींसह भटेभरथवाजिभिः - पायदळ, हत्ती, रथ व घोडेस्वार यांसह महार्हाणि आयुधानि - मोठी मूल्यवान शस्त्रे पूर्णस्य ददौ - परिपूर्ण अशा कृष्णाला देता झाला. ॥३८॥
भगवान सर्व प्रकारच्या संपत्तींनी परिपूर्ण होते, तरीसुद्धा माझ्या पित्याने प्रेमाने त्यांना पुष्कळ दासी, सर्व प्रकारची संपत्ती, सैनिक, हत्ती, रथ, घोडे तसेच पुष्कळशी बहुमूल्य शस्त्रास्त्रे समर्पण केली. (३८)
आत्मारामस्य तस्येमा वयं वै गृहदासिकाः ।
सर्वसङ्गनिवृत्त्याद्धा तपसा च बभूविम ॥ ३९ ॥
आसक्ती सोडुनी आम्ही पूर्वजन्मात ते तप । असेल श्रेष्ठ ते केले तेणे सेवा अशी मिळे ॥ ३९ ॥
इमाः - ह्या वयं वै - आम्ही खरोखर सर्वसंगनिवृत्त्या - सर्वसंगपरित्याग करून तपसा च - आणि तपश्चर्येच्या योगे अद्धा - साक्षात आत्मारामस्य तस्य - आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी रममाण होणार्या त्या श्रीकृष्णाच्या गृहदासिकाः बभूविम - घरातील दासी झालो आहो. ॥३९॥
आम्ही पूर्वजन्मी सर्व आसक्ती सोडून फार मोठी तपश्चर्या केली असावी, म्हणूनच आम्ही या जन्मी आत्माराम भगवंतांच्या घरातील दासी झालो आहोत. (३९)
महिष्य ऊचुः -
( वसंततिलका ) भौमं निहत्य सगणं युधि तेन रुद्धा ज्ञात्वाथ नः क्षितिजये जितराजकन्याः । निर्मुच्य संसृतिविमोक्षमनुस्मरन्तीः पादाम्बुजं परिणिनाय य आप्तकामः ॥ ४० ॥
रोहिणी म्हणाली - ( वसंततिलका ) भौमे जितोनि नृपती अम्हि राजकन्यां बंदिस्त ठेवि नि तसे कळता हरीला । मारोनि दैत्य मग हे वरिती अम्हाला आम्ही सदाचि भजतो भयमुक्त पाया ॥ ४० ॥
आप्तकामः यः - पूर्ण आहेत मनोरथ ज्याचे असा जो श्रीकृष्ण तेन क्षितिजये जितराजकन्याः रुद्धाः ज्ञात्वा - त्या भौमासुराने दिग्विजयप्रसंगी जिंकिलेल्या राजांच्या कन्या बंदीत ठेविल्या आहेत असे जाणून सगणं भौमं युधि निहत्य - सैनिकांसह भौमासुराला युद्धात मारून (अस्मान्) निर्मुच्य - आम्हाला बाहेर काढून अथ - नंतर संसृतिविमोक्षं पादाम्बुजं अनुस्मरन्तीः नः - संसारातून मुक्त करणार्या चरणकमलाला स्मरणार्या आम्हाला परिणिनाय - वरिता झाला. ॥४०॥
सोळा हजार पत्न्यांच्या वतीने रोहिणी म्हणाली- दिग्विजयाच्या वेळी भौमासुराने पुष्कळ राजांना जिंकून त्यांच्या आम्हा कन्यांना आपल्या महालांत बंदी करून ठेवले होते. भगवंतांनी हे जाणले व युद्धामध्ये भौमासुराचा त्याच्या सेनेसह संहार करून , स्वत: पूर्णकाम असूनही, आम्हांला तेथून सोडवून आणून आमचे पाणिग्रहण केले. जन्म-मृत्यूरूप संसारचक्रातून मुक्त करणार्या त्यांच्या चरणकमलांचेच आम्ही सदा-सर्वदा चिंतन करीत असतो. (४०)
( अनुष्टुप् )
न वयं साध्वि साम्राज्यं स्वाराज्यं भौज्यमप्युत । वैराज्यं पारमेष्ठ्यं च आनन्त्यं वा हरेः पदम् ॥ ४१ ॥ कामयामह एतस्य श्रीमत्पादरजः श्रियः । कुचकुङ्कुमगन्धाढ्यं मूर्ध्ना वोढुं गदाभृतः ॥ ४२ ॥
( अनुष्टुप् ) द्रौपदी आम्ही या सार्या राज्य वा स्वर्ग भोग ते । आणता असल्या सिद्धी ब्रह्म वा मोक्ष नेच्छितो ॥ ४१ ॥ इच्छितो पदधूळी ती कृष्णाची शिरि नित्यची । वक्षासी धरिता श्रीने केशरीगंध त्यास ये ॥ ४२ ॥
साध्वि - हे द्रौपदी वयं - आम्ही साम्राज्यं - सार्वभौम राज्य स्वाराज्यं - स्वर्गातील राज्य भौजम् - ऐश्वर्यसुखोपभोग अपि उत - आणखीहि वैराज्यं - अणिमादि अष्टसिद्धी च पारमेष्ठयं - आणि ब्रह्मादि लोकांचे राज्य आनन्त्यं - मोक्षसुख वा हरेः पदं - किंवा भगवान श्रीकृष्णाचे चरणकमल न कामयामहे - इच्छित नाही (तर्हि) एतस्य गदाभृतः - तर या श्रीकृष्णाच्या श्रियः कुचकुंकुमगन्धाढयं - लक्ष्मीच्या स्तनांवरील केशराच्या सुगंधाने युक्त अशी श्रीमत्पादरजः - शोभायमान चरणावरील धूळ मूर्ध्ना - मस्तकावर वोढुं - धारण करण्याची कामयामहे - इच्छा करितो. ॥४१-४२॥
हे साध्वी ! आम्हांला सार्वभौम पद, इंद्रपद या दोहोंचे भोग, अणिमा इत्यादी सिद्धींमुळे प्राप्त होणारे ऐश्वर्य, ब्रह्मदेवाचे पद, मोक्ष किंवा सालोक्य, सारूप्य इत्यादी मुक्ती, हे काहीही नको. आम्हांला फक्त एवढेच पाहिजे की, लक्ष्मीच्या वक्ष:स्थळाला लावलेल्या केशराने सुगंधित झालेली, गदाधारी प्रभूंच्या चरणांची धूळ, नेहमी आमच्या मस्तकावर आम्ही धारण करावी. (४१-४२)
व्रजस्त्रियो यद् वाञ्छन्ति पुलिन्द्यस्तृणवीरुधः ।
गावश्चारयतो गोपाः पदस्पर्शं महात्मनः ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे त्र्यशीतितमोऽध्यायः ॥ ८३ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
इच्छिती व्रजिच्या नारी भिल्लिणी तृण नी लता । स्पर्श त्या चरणाचा तो आम्हीही इच्छितो तसा ॥ ४३ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर त्र्याऐंशिवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
यत् - जशा व्रजस्त्रियः - गोपी पुलिन्द्यः - भिल्लिणी तृणवीरुधः - गवत व वेली गोपाः च - व गोप गावः चारयतः महात्मनः - गाई चारणार्या महात्म्या श्रीकृष्णाच्या पादस्पर्शं - पायाचा स्पर्श वाञ्छन्ति - इच्छितात. ॥४३॥ त्र्याऐंशीवा अध्याय समाप्त
महात्मा गोपालकृष्ण गाई चारत असताना गोप, गोपी, भिल्लिणी, गवत आणि वेलीसुद्धा ज्या चरणकमलांना स्पर्श करू इच्छित असत, तोच आम्हांला हवा आहे. (४३)
अध्याय त्र्याऐंशीवा समाप्त |