श्रीमद् भागवत पुराण
स्कन्द दहावा
अध्याय ब्या‍ऐंशीवा

कुरुक्षेत्रे सूर्योपरागपर्वणि यदुभिः सह कुरूणां नन्दादिगोपानां च समागमः -

श्रीकृष्ण-बलरामांशी गोप-गोपींची भेट -


संहिता - अर्थ
समश्लोकी - मराठी


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
अथैकदा द्वारवत्यां वसतो रामकृष्णयोः ।
सूर्योपरागः सुमहानासीत्कल्पक्षये यथा ॥ १ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
रामकृष्ण असे दोघे राहती द्वारकापुरीं ।
सूर्यास एकदा तेंव्हा मोठे खग्रास लागले ॥ १ ॥

अथ - नंतर रामकृष्णयोः द्वारवत्यां वसतोः - बलराम व श्रीकृष्ण द्वारकेत रहात असताना एकदा - एके दिवशी यथा कल्पक्षये (तथा) - जसे प्रलयकाळी तसे सुमहान् सूर्योपरागः आसीत् - मोठे सूर्यग्रहण आले. ॥१॥
श्रीशुकाचार्य म्हणतात- असेच एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेत निवस करीत असताना प्रलयाचा वेळी लागावे, तसे खग्रास सूर्यग्रहण लागले. (१)


तं ज्ञात्वा मनुजा राजन्पुरस्तादेव सर्वतः ।
समन्तपञ्चकं क्षेत्रं ययुः श्रेयोविधित्सया ॥ २ ॥
ज्योतिषे सांगता पूर्व कल्याण कोक कैक ते ।
उपार्जना कुरुक्षेत्री येवोनी पोचले पहा ॥ २ ॥

राजन् - हे परीक्षित राजा मनुजाः - मनुष्य पुरस्तात् एव - पूर्वीच तं सर्वतः ज्ञात्वा - ते सूर्यग्रहण पूर्णपणे जाणून श्रेयोविधित्सया - कल्याण करून घेण्याच्या इच्छेने स्यमन्तपञ्चकं क्षेत्रं ययुः - स्यमन्तपंचक नामक क्षेत्राला गेले. ॥२॥
परीक्षिता ! लोकांना त्या ग्रहणाबद्दल अगोदरच समजले होते, म्हणून सर्वजण आपले कल्याण व्हावे, या उद्देशाने स्नान-दान इत्यादी करण्यासाठी समंतपंचक नावाच्या तीर्थक्षेत्रावर आले. (२)


निःक्षत्रियां महीं कुर्वन्रामः शस्त्रभृतां वरः ।
नृपाणां रुधिरौघेण यत्र चक्रे महाह्रदान् ॥ ३ ॥
समंतपंचको क्षेत्री पूर्वी श्री पर्शुरामने ।
पाचकुंड रुधिराने भरिले क्षत्रियांचिये ॥ ३ ॥

शस्त्रभृतां वरः रामः - धनुर्धार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा परशुराम निःक्षत्रियां महीं कुर्वन् - निःक्षत्रिय पृथ्वी करीत यत्र - जेथे नृपाणां रुधिरौघेण - राजांच्या रक्ताच्या प्रवाहाने महाह्लदान् - मोठमोठी सरोवरे चक्रे - निर्मिता झाला. ॥३॥
जेथे शस्त्र धारण करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ अशा परशुरामांनी सगळी पृथ्वी क्षत्रियहीन करून राजांच्या रक्ताने मोठमोठे डोह बनविले होते, तेच हे क्षेत्र. (३)


ईजे च भगवान्रामो यत्रास्पृष्टोऽपि कर्मणा ।
लोकं सङ्ग्राहयन्नीशो यथान्योऽघापनुत्तये ॥ ४ ॥
जसे ते पापनाशार्थ करिती लोक कर्म तै ।
अकर्म असुन रामे यज्ञ केला असे तिथे ॥ ४ ॥

ईशः भगवान् रामः - परमेश्वर असा भगवान परशुराम कर्मणा अस्पृष्टः अपि - कर्माने अलिप्त असताहि लोकस्य ग्राहयन् - लोकांना सन्मार्ग दाखविण्याच्या उद्देशाने यत्र - जेथे अन्यः यथा अघापनुत्तये (तथा) - ज्याप्रमाणे सामान्य पुरुष पापविनाशार्थ यज्ञ करितो त्याप्रमाणे ईजे - यज्ञ करिता झाला. ॥४॥
जसा एखादा सामान्य मनुष्य आपले पाप नाहीसे करण्यासाठी प्रायश्चित्त घेतो, त्याचप्रमाणे सर्वशक्तिमान भगवान परशुरामांनी, स्वत:शी पापकर्माचा काहीही संबंध नसूनही लोकांना सदाचाराचे शिक्षण देण्यासाठी तेथे यज्ञ केला होता. (४)


महत्यां तीर्थयात्रायां तत्रागन्भारतीः प्रजाः ।
वृष्णयश्च तथाक्रूर वसुदेवाहुकादयः ॥ ५ ॥
ययुर्भारत तत्क्षेत्रं स्वमघं क्षपयिष्णवः ।
गदप्रद्युम्नसाम्बाद्याः सुचन्द्रशुकसारणैः ॥ ६ ॥
आस्तेऽनिरुद्धो रक्षायां कृतवर्मा च यूथपः ।
ते रथैर्देवधिष्ण्याभैः हयैश्च तरलप्लवैः ॥ ७ ॥
गजैर्नदद्‌भिरभ्राभैः नृभिर्विद्याधरद्युभिः ।
व्यरोचन्त महातेजाः पथि काञ्चनमालिनः ॥ ८ ॥
सर्व प्रांतातुनी तेथे पर्वाला लोक पातले ।
अक्रूर वसुदेवो नी उग्रसेनादि ज्येष्ठ ही ।
प्रद्युम्न सांब आदीही पाप नाशार्थ पातले ॥ ५ ॥
अनिरुद्ध कृतवर्मा सारणो आदि वीर ते ।
राहिले द्वारकेमाजी रक्षणार्थ तिथे पहा ॥ ६ ॥
तेजस्वी यदुवंशीय दिव्यमाला गळ्यात नी ।
बहुमूल्य तसे वस्त्र सजली कवचे तयां ॥ ७ ॥
लाटेच्या गतिने अश्व चालती भूमिसी पहा ।
चालती हत्ति वेगाने विमानां परि ते रथ ॥ ८ ॥

महत्यां तीर्थयात्रायां - मोठया तीर्थयात्रेच्या प्रसंगी भारतीः प्रजाः - भरतखंडातील सर्व प्रजानन तत्र आगन् - तेथे आले तथा च - त्याचप्रमाणे भारत - हे परीक्षित राजा स्वं अघं क्षपयिष्णवः - आपले पातक दूर करण्याची इच्छा करणारे अक्रूरवसुदेवाहुकादयः - अक्रूर, वसुदेव, आहुक इत्यादि गदप्रद्युम्नसाम्बाद्याः - गद, प्रद्युम्न, सांब इत्यादि वृष्णयः - यादव तत् क्षेत्रं ययुः - त्या क्षेत्राला गेले अनिरुद्धः यूथपः कृतवर्मा च - अनिरुद्ध व सेनापति कृतवर्मा सुचंद्रशुकसारणैः (सह) - सुचंद्र, शुक व सारण ह्यांसह रक्षायाम् आस्ते - द्वारकेच्या रक्षणासाठी राहिले होते महातेजाः काञ्चनमालिनः दिव्यस्नग्वस्रसन्नाहाः ते - अत्यंत तेजस्वी सुवर्णाचे हार घातलेले व दैदीप्यमान पुष्पमाळा वस्त्रे यांनी युक्त असे ते देवधिष्ण्याभैः रथैः - विमानासारख्या रथांनी तरलप्लवैः हयैः - लाटांप्रमाणे उडया मारणार्‍या घोडयांनी नदद्‌भिः अभ्राभैः गजैः - गर्जना करणार्‍या मेघवर्ण हत्तींनी विद्याधरद्युभिः नृभिः च - व विद्याधरांप्रमाणे तेजस्वी अशा मनुष्यांनी खेचराः कलत्रैः इव - देव जसे आपल्या परिवारांनी त्याप्रमाणे पथि - मार्गात व्यरोचंत - शोभले. ॥५-८॥
परीक्षिता ! या महान तीर्थक्षेत्रासाठी भारतवर्षाच्या सर्व प्रांतातील जनता कुरुक्षेत्री आली होती. त्यांमध्ये अक्रूर, वसुदेव, उग्रसेन इत्यादी वृष्णी, तसेच गद, प्रद्युम्न, सांब इत्यादी अन्य यादवसुद्धा आपापल्या पापांचा नाश करण्यासाठी तेथे आले होते. अनिरुद्ध आणि सेनापती कृतवर्मा हे दोघेजण सुचंद्र, शुक, सारण इत्यादींसह नगराचे रक्षण करण्यासाठी म्हणून द्वारकेत राहिले होते. अत्यंत तेजस्वी यादवांनी गळ्यांत सोन्याचे हार, दिव्य पुष्पमाळा, बहुमोल वस्त्रे आणि कवचे धारण केली होती. ते आपल्या पत्‍न्यांसह जाताना देवांसारखे शोभत होते. देवतांच्या विमानांसारखे रथ, समुद्रावरील लाटांप्रमाणे चालणारे घोडे, ढगांसारखे विशालकाय गर्जना करणारे हत्ती आणि विद्याधरांसारखी कांती असणारे पायदळ त्यांच्याबरोबर होते. (५-८)


दिव्यस्रग्वस्त्रसन्नाहाः कलत्रैः खेचरा इव ।
तत्र स्नात्वा महाभागा उपोष्य सुसमाहिताः ॥ ९ ॥
राण्या त्या पालख्यां माजी कुरुक्षेत्रासि पातले ।
संयमे जाहली स्नाने उपवासहि जाहला ॥ ९ ॥

महाभागाः - ते मोठे भाग्यवान यादव तत्र स्नात्वा - तेथे स्नान करून उपोष्य - उपवास करून (९)
त्या थोर यादवांनी तेथे पोहोचल्यावर एकाग्रचित्ताने स्नान करून उपवास केला. (९)


ब्राह्मणेभ्यो ददुर्धेनूः वासःस्रग्‌रुक्ममालिनीः ।
रामह्रदेषु विधिवत् पुनराप्लुत्य वृष्णयः ॥ १० ॥
ददुः स्वन्नं द्विजाग्र्येभ्यः कृष्णे नो भक्तिरस्त्विति ।
स्वयं च तदनुज्ञाता वृष्णयः कृष्णदेवताः ॥ ११ ॥
भुक्त्वोपविविशुः कामं स्निग्धच्छायाङ्‌घ्रिपाङ्‌घ्रिषु ।
तत्रागतांस्ते ददृशुः सुहृत्संबन्धिनो नृपान् ॥ १२ ॥
सुवर्णम्होरक्या माला घालोनी गायि दानिल्या ।
पर्शुरामाचिये कुंडी यदुंनी स्नान घेतले ॥ १० ॥
भोजने दिधली विप्रा हेतू की कृष्णभक्ति हो ।
सर्व ते मानिती कृष्णा आपुला इष्टदेवची ॥ ११ ॥
द्विजाज्ञे जेवले सर्व वृक्षाच्या तळि थांबले ।
विश्रांती घेतली कोणी कोणी मित्रास भेटती ॥ १२ ॥

सुसमाहिताः - शांतचित्त झालेले वासःस्नग्रुक्ममालिनीः धेनूः - वस्त्रे, माळा व सुवर्णालंकार यांनी भूषविलेल्या गाई ब्राह्मणेभ्यः ददुः - ब्राह्मणांना देते झाले. वृष्णयः - यादव पुनः विधिवत् रामह्लदेषु आप्लुत्य - पुनः यथाविधि रामसरोवरामध्ये स्नान करून नः भक्तिः कृष्णे अस्तु इति - आमची भक्ति श्रीकृष्णाच्या ठिकाणी असो असा संकल्प करून द्विजाग्र्‍येभ्यः स्वन्नं दुदुः - श्रेष्ठ ब्राह्मणांना उत्तम अन्न देते झाले च - आणि कृष्णदेवताः वृष्णयः - श्रीकृष्ण आहे उपास्य देवता ज्यांची असे ते यादव तदनुज्ञाताः - श्रीकृष्णाने आज्ञा दिलेले असे स्वयं भुक्त्वा - स्वतः भोजन करून स्निग्धच्छायांघ्रिपाङ्‌घ्रिषु कामं उपविविशुः - थंड छायेच्या झाडांच्या मुळाशी स्वस्थपणे बसले ते - ते यादव तत्र आगतान् - तेथे आलेल्या सुहृत्संबन्धिनः - मित्र व संबंधी अशा. ॥१०-१२॥
नंतर त्यांनी ब्राह्मणांना, ज्यांना सुंदर वस्त्रांच्या झुली, फुलांच्या माळा आणि सोन्याच्या साखळ्या गळ्यात घातल्या होत्या, अशा गाई दान दिल्या. यानंतर ग्रहण सुटल्यावर त्यांनी परशुरामतीर्थात विधिपूर्वक स्नान केले आणि सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर पक्वान्नांचे भोजन दिले. हे सर्व त्यांनी श्रीकृष्णांच्या ठिकाणी भक्ती जडावी, म्हणून केले होते. श्रीकृष्णांनाच आपला देव मानणार्‍या त्यांनी ब्राह्मणांच्या अनुमतीने स्वत: भोजन केले आणि मग दाट सावली असलेल्या वृक्षांच्याखाली आपापल्या इच्छेनुसार ते बसले. नंतर त्यांनी आपल्या सुहृद आणि संबंधित राजांच्या भेटी-गाठी घेणे सुरू केले. (१०-१२)


मत्स्योशीनरकौशल्य विदर्भकुरुसृञ्जयान् ।
काम्बोजकैकयान् मद्रान् कुन्तीनानर्तकेरलान् ॥ १३ ॥
अन्यांश्चैवात्मपक्षीयान् परांश्च शतशो नृप ।
नन्दादीन् सुहृदो गोपान् गोपीश्चोत्कण्ठिताश्चिरम् ॥ १४ ॥
( मिश्र )
अन्योन्यसन्दर्शनहर्षरंहसा
     प्रोत्फुल्लहृद्वक्त्रसरोरुहश्रियः ।
आश्लिष्य गाढं नयनैः स्रवज्जला
     हृष्यत्त्वचो रुद्धगिरो ययुर्मुदम् ॥ १५ ॥
तिथे मत्स्य उशिनरो विदर्भी कोसली कुरू ।
सृंजयो कंबुजो मद्र कैकयो कुंति केरलो ॥ १३ ॥
आनर्त आदि देशाचे शत्रु मित्र कितेक ते ।
तसेच गोपही आले कृष्णाच्या दर्शनास तै ॥ १४ ॥
( इंद्रवज्रा )
भेटोनि वार्तें बहु प्रेम दाटे
     पद्‌मापरी ते खुलले जनो नी ।
अश्रू तयांचे झडले तसेच
     रोमांच अंगी उठले पहा की ॥ १५ ॥

मत्स्योशीनरकौसल्यविदर्भकुरुसृञ्जयान् नृपान् - मत्स्य, उशीनर, कौसल्य, विदर्भ, कुरु व सृंजय या राजांना ददृशुः - पहाते झाले नृप - हे राजा काम्बोजकैकयान् मद्रान् कुंतीन् आनर्तकेरलान् - काम्बोज, कैकय, मद्र, कुंती व आनर्त ह्या देशांतील राजांना अन्यान् च आत्मपक्षीयान् - आणि दुसर्‍या स्वतःच्या पक्षातील राजांना परान् एव च शतशः - आणि कित्येक शत्रुपक्षीय शेकडो राजांनाहि नंदादीन् सुहृदः गोपान् गोपीः च - नंदादिक प्रेमळ गोपांना आणि गोपींना उत्कंठिताः चिरं (ददृशुः) - उत्सुक झालेले असे पुष्कळ वेळपर्यंत पहाते झाले अन्योन्यसंदर्शनहर्षरंहसा - एकमेकांच्या दर्शनाने उत्पन्न झालेल्या आनंदाच्या वेगाने प्रोत्फुल्लहृद्वक्त्रसरोरुहश्रियः - प्रफुल्लित झाली आहे हृदयरूपी कमळांची शोभा ज्यांची असे (परस्परान्) गाढं आश्‍लिष्य - एकमेकांना दृढ आलिंगन देऊन नयनैः स्नवज्जलाः - नेत्रांतून गळत आहेत अश्रु ज्यांच्या असे हृष्यत्त्वचः - ज्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत असे रुद्धगिरः - ज्यांचे कंठ भरून आले आहेत असे (ते) मुदं ययुः - ते यादव आनंदित झाले. ॥१३-१५॥
तेथे मत्स्य, उशीनर, कोसल, विदर्भ, कुरू, सृंजय, कोंबाज, कैकय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ इत्यादी ठिकाणचे स्वपक्षांचे आणि अन्य पक्षांचे शेकडो राजे आले होते. परीक्षिता ! याव्यतिरिक्त नंद इत्यादी गोपमित्र तसेच भगवंतांच्या दर्शनासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्कंठित झालेल्या गोपीसुद्धा तेथे आल्या होत्या. यादव या सर्वांना भेटले. (१३-१४) एकमेकांना भेटून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे सर्वांची हृदयकमळे आणि मुखकमळे प्रफुल्लित झाली. सर्वजण एकमेकांना मिठीत घेऊन आलिंगन देत, त्यावेळी परस्परांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात. अंगावर रोमांच येत. प्रेमाने तोंडातून शब्द फुटत नसे आणि सर्वजण आनंदसमुद्रात डुंबू लागत. (१५)


स्त्रियश्च संवीक्ष्य मिथोऽतिसौहृद
     स्मितामलापाङ्गदृशोऽभिरेभिरे ।
स्तनैः स्तनान् कुङ्कुमपङ्करूषितान्
     निहत्य दोर्भिः प्रणयाश्रुलोचनाः ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
ततोऽभिवाद्य ते वृद्धान् यविष्ठैरभिवादिताः ।
स्वागतं कुशलं पृष्ट्वा चक्रुः कृष्णकथा मिथः ॥ १७ ॥
पृथा भ्रातॄन् स्वसॄर्वीक्ष्य तत्पुत्रान् पितरावपि ।
भ्रातृपत्‍नीर्मुकुन्दं च जहौ सङ्कथया शुचः ॥ १८ ॥
स्त्रिया तशाची भरल्या प्रमोदे
     नी मंद हास्ये बघतात कृष्णा ।
ते केशराचे स्तनही सखीच्या
     स्तनावरी दाबुनि मोद घेती ।
आनंद घेता बहुमोल ऐसा
     प्रेमाश्रु त्यांच्या गळतात नेत्रें ॥ १६ ॥
( अनुष्टुप् )
वंदिती सान थोराते थोर तैसे स्विकारिती ।
आगते स्वागते अन्यां कृष्णलीलाच बोलती ॥ १७ ॥
कुंती नी वासुदेवोही सखे नी सोर्‍यांस त्या ।
तसेच भेटता कृष्ण संपते सर्व दुःख ते ॥ १८ ॥

च - आणि अतिसौहृदस्मितामलापाङ्गदृशः स्त्रियः - अत्यंत प्रेमळ व मंदहास्ययुक्त निर्मळ कटाक्षांनी अवलोकन करणार्‍या स्त्रिया मिथः संवीक्ष्य - एकमेकांना पाहून स्तनैः कुंकुमपंकरूषितान् स्तनान् निहत्य - स्तनांनी केशरांची उटी लाविलेल्या दुसर्‍यांच्या स्तनांना स्पर्श करून प्रणयाश्रुलोचनाः - ज्यांच्या नेत्रांतून आनंदाश्रू निघत आहेत अशा दोर्भिः अभिरेभिरे - बाहूंनी आलिंगन देत्या झाल्या ततः - नंतर यविष्टैः अभिवादिताः ते - लहानांनी वंदिलेल्या त्यांनी वृद्धान् अभिवाद्य - वडील मंडळींना वंदन करून स्वागतं कुशलं पृष्टवा - तुम्ही आला ? बरे झाले, खुशाल आहा ना ? असे प्रश्न विचारिलेले मिथः कृष्णकथाः चक्रुः - एकमेकांमध्ये श्रीकृष्णासंबंधी गोष्टी बोलते झाले पृथा - कुंती भ्रातृन् स्वसृः तत्पुत्रान् पितरौ अपि - भाऊ, बहिणी, त्यांचे मुलगे व आईबाप ह्यांनाहि भ्रातृपत्‍नीः च मुकुन्दं (च) - भावांच्या स्त्रिया आणि श्रीकृष्ण ह्यांना वीक्ष्य - पाहून संकथया शुचः जहौ - समाधानाच्या गोष्टी करून शोक दूर करिती झाली. ॥१६-१८॥
स्त्रियासुद्धा एकमेकींना पाहून अत्यंत स्नेहाने मंदहास्ययुक्त नजरेने एकमेकींकडे पाहात एकमेकींना बाहूंनी घट्ट आलिंगन देऊ लागल्या. त्यावेळी केशर लावलेली त्यांची वक्ष:स्थळे एकमेकींच्या वक्ष:स्थळाला भिडू लागली आणि डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. (१६) तेथे वयाने लहान असणार्‍यांनी मोठ्यांना नमस्कार केला आणि त्या नमस्कार करणार्‍यांना त्यांच्यापेक्षा लहान असलेल्यांनी नमस्कार केला. नंतर एकमेकांचे स्वागत करून ख्याली-खुशाली विचारून ते श्रीकृष्णांच्या मधुर लीलांविषयी आपापसात बोलू लागले. (१७) कुंती, आपले भाऊ, बहिणी, त्यांची मुले, माता-पिता, भावजया आणि श्रीकृष्णांना भेटून व त्यांच्याशी बोलून आपले दु:ख विसरली. (१८)


कुन्त्युवाच -
आर्य भ्रातरहं मन्ये आत्मानमकृताशिषम् ।
यद्वा आपत्सु मद्वार्तां नानुस्मरथ सत्तमाः ॥ १९ ॥
कुंती वसुदेवास म्हणाली -
बंधो खरी अभागी मी इच्छा ना पुरल्या कधी ।
साधुस्वभाव हा बंधू न पुसे संकटी मला ॥ १९ ॥

आर्य भ्रातः - हे श्रेष्ठ बंधो अहं आत्मानं अकृताशिषं मन्ये - मी स्वतःला मनोरथ पूर्ण न झालेली मानिते यत् वा - किंवा सत्तमाः (यूयं) - साधुश्रेष्ठ असे तुम्ही आपत्सु मद्वार्तां न अनुस्मरथ - आपत्तीत सापडलेल्या माझे वर्तमान स्मरत नाही. ॥१९॥
कुंती वसुदेवांना म्हणाली- दादा ! मी स्वत:ला फार दुर्दैवी समजते. कारण आपल्यासारखे श्रेष्ठ बांधव असूनही त्यांना आपत्तीच्या वेळी माझी आठवण आली नाही. (१९)


सुहृदो ज्ञातयः पुत्रा भ्रातरः पितरावपि ।
नानुस्मरन्ति स्वजनं यस्य दैवमदक्षिणम् ॥ २० ॥
श्रीवसुदेव उवाच -
अम्ब मास्मानसूयेथा दैवक्रीडनकान् नरान् ।
ईशस्य हि वशे लोकः कुरुते कार्यतेऽथ वा ॥ २१ ॥
विधाता डावली त्याला संबंधी वागती तसे ।
पिताही विसरे तेंव्हा तुमचा दोष काय तो ॥ २० ॥
वसुदेव म्हणतात -
नको खेद तसा मानू सर्व दैवाधिनी असू ।
वागती ईश इच्छेने भोगिती फळ जीव ते ॥ २१ ॥

सुहृदः ज्ञातयः पुत्राः भ्रातरः पितरौ अपि - मित्र, संबंधी, पुत्र, भाऊ व आईबाप सुद्धा यस्य दैवम् अदक्षिणं (भवति तं) स्वजनं - ज्यांचे दैव प्रतिकूल झाले आहे अशा आप्तेष्टांना न अनुस्मरन्ति - स्मरत नाहीत अंब - हे माते दैवक्रीडनकान् अस्मान् नरान् - दैवाचे खेळणे बनलेल्या आम्हा मनुष्याना मा असूयेथाः - दोष देऊ नको हि - कारण ईशस्य वशे (तिष्ठन्) लोकः - परमेश्वराच्या स्वाधीन असलेला मनुष्य कुरुते अथवा कार्यते - करतो किंवा करविला जातो. ॥२०-२१॥
दादा ! दैव ज्याला प्रतिकूल असते, त्याला हितचिंतक, संबंधी, पुत्र, भाऊ, किंबहुना माता-पितासुद्धा विसरतात, हेच खरे ! (२०) वसुदेव म्हणाले- ताई ! आम्हांला दोष देऊ नकोस. सगळेजण दैवाच्या हातातील खेळणे आहेत. कारण सगळे लोक ईश्वराच्या इच्छेनेच कर्मे करतात. किंवा तसे त्यांना करावे लागते. (२१)


कंसप्रतापिताः सर्वे वयं याता दिशं दिशम् ।
एतर्ह्येव पुनः स्थानं दैवेनासादिताः स्वसः ॥ २२ ॥
कंसाने त्रासिले तेंव्हा दिशांना पांगले अम्ही ।
पुन्हा ईश कृपेने त्या स्थान प्राप्तहि जाहले ॥ २२ ॥

स्वसः - हे ताई वयं सर्वे - आम्ही सर्व कंसप्रतापिताः - कंसाकडून फार पीडिले गेलेले असे दिशंदिशम् याताः - दिशेदिशेला गेलो एतर्हि एव - सांप्रतहि दैवेन - दैवानेच पुनः स्थानम् आसादिताः - पुनः स्वस्थानाला प्राप्त झालो. ॥२२॥
ताई ! कंसाच्या छळामुळे आम्ही देशोधडीला लागलो होतो. थोड्याच दिवसांपूर्वी, सुदैवाने पुन्हा आमच्या जागी आलो. (२२)


श्रीशुक उवाच -
वसुदेवोग्रसेनाद्यैः यदुभिस्तेऽर्चिता नृपाः ।
आसन् अच्युतसन्दर्श परमानन्दनिर्वृताः ॥ २३ ॥
श्रीशुकदेवजी सांगतात -
उग्रसेने वसुदेवे सर्वां सत्कार तो दिला ।
सर्वांना लाभली शांती कृष्णाच्या दर्शने तदा ॥ २३ ॥

वसुदेवोग्रसेनाद्यैः यदुभिः - वसुदेव, उग्रसेन इत्यादि यादवांनी अर्चिताः ते नृपाः - पूजिलेले ते राजे अच्युतसंदर्शपरमानन्दनिर्वृताः आसन् - श्रीकृष्णाच्या दर्शनामुळे उत्पन्न झालेल्या मोठया आनंदाप्रत प्राप्त झाले. ॥२३॥
श्रीशुक म्हणतात- तेथे आलेल्या राजांचा वसुदेव, उग्रसेन इत्यादी यादवांनी सत्कार केला. श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे त्यांना परमानंद झाला. (२३)


भीष्मो द्रोणोऽम्बिकापुत्रो गान्धारी ससुता तथा ।
सदाराः पाण्डवाः कुन्ती सञ्जयो विदुरः कृपः ॥ २४ ॥
कुन्तीभोजो विराटश्च भीष्मको नग्नजिन्महान् ।
पुरुजिद् द्रुपदः शल्यो धृष्टकेतुः सकाशिराट् ॥ २५ ॥
दमघोषो विशालाक्षो मैथिलो मद्रकेकयौ ।
युधामन्युः सुशर्मा च ससुता बाह्लिकादयः ॥ २६ ॥
राजानो ये च राजेन्द्र युधिष्ठिरमनुव्रताः ।
श्रीनिकेतं वपुः शौरेः सस्त्रीकं वीक्ष्य विस्मिताः ॥ २७ ॥
द्रोण भीष्म नि गांधारी धृतराष्ट्र नि पांडव ।
सपत्‍न धर्म नी कुंती सृंजयो विदुरो कृपा ॥ २४ ॥
कुंति भोज विराटो नी भीष्मको नृपनग्नजित् ।
पुरुजित् द्रुपदो शल्य धृतकेतू नि काशि तो ॥ २५ ॥
मदभोष विशालाक्ष मिथिलो मद्र केकयो ।
युधामन्यू सुशर्मा नी सुपुत्र बाल्हिको तसे ॥ २६ ॥
धर्माचे मित्र ते राजे कृष्णविग्रह पाहुनी ।
राण्याही पाहुनी सार्‍या झाले सर्वचि विस्मित ॥ २७ ॥

भीष्मः द्रोणः अंबिकापुत्रः - भीष्म, द्रोण व अंबिकेचा पुत्र धृतराष्ट्र तथा ससुता गांधारी - त्याचप्रमाणे दुर्योधनादि शंभर पुत्रांसह गांधारी सदाराः पाण्डवाः - स्त्रियांसह धर्मादि पाण्डव कुंती सृंजयः विदुरः कृपः - कुंती, सृंजय, विदुर व कृप. ॥२४॥ कुंतिभोजः विराटः - कुंतिभोज, विराट भीष्मकः महान् नग्नजित् च - भीष्मक आणि मोठा पराक्रमी असा नग्नजित राजा पुरुजित् द्रुपदः - पुरुजित, द्रुपद शल्यः सकाशिराट् धृष्टकेतुः - शल्य व काशिराजासह धृष्टकेतु. ॥२५॥ दमघोषः विशालाक्षः मैथिलः मद्रकेकयौ - दमघोष, विशालाक्ष, मिथिला नगरीचा अधिपति जनक, मद्रराजा व केकय राजा युधामन्युः सुशर्मा च - युधामन्यु व सुशर्मा ससुताः बाह्‌लिकादयः - पुत्रांसह बाल्हिक राजे. ॥२६॥ राजेन्द्र - हे राजश्रेष्ठा परीक्षिता ये च युधिष्ठिरम् अनुव्रताः (ते) राजानः - जे आणखी धर्मराजाला अनुकूल होते ते राजे श्रीनिकेतं शौरेः सस्त्रीकं वपुः वीक्ष्य - लक्ष्मीचे वसतिस्थान अशी श्रीकृष्णाची मूर्ति स्त्रियांसह पाहून विस्मिताः - आश्चर्यचकित झाले. ॥२७॥
परीक्षिता ! भीष्म, द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, पुत्रांसह गंधारी, पत्‍न्यांसह पांडव, कुंती, सृंजय, विदुर, कृपाचार्य, कुंतिभोज, विराट, भीष्मक, नग्नजित, पुरुजित, द्रुपद, शल्य, धृष्टकेतू, काशिराज, दमघोष, विशालाक्ष, मिथिलानरेश, मद्रनरेश, केकयनरेश, युधानम्यू, सुशर्मा, पुत्रांसह बाल्हीक आणि युधिष्ठिराचे अनुयायी राण्यांसह अन्य राजे, भगवान श्रीकृष्णांचा लक्ष्मीचे निवासस्थान असलेला श्रीविग्रह पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले. (२४-२७)


अथ ते रामकृष्णाभ्यां सम्यक् प्राप्तसमर्हणाः ।
प्रशशंसुर्मुदा युक्ता वृष्णीन् कृष्णपरिग्रहान् ॥ २८ ॥
कृष्ण नी बलरामाचा सन्मान घेउनी असा ।
द्वयां सन्मान देण्याला यदुवंशा प्रशंसिती ॥ २८ ॥

अथ - नंतर रामकृष्णाभ्यां सम्यक्प्राप्तसमर्हणाः - बलराम व श्रीकृष्ण यांजकडून योग्य सत्कार झाला आहे ज्यांचा असे ते - ते राजे मुदा युताः - आनंदाने युक्त झालेले असे कृष्णपरिग्रहान् वृष्णीन् प्रशशंसुः - कृष्णाच्या परिवारातील यादवांना प्रशंसिते झाले. ॥२८॥
नंतर राम-कृष्णांकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले ते मोठ्या आनंदाने श्रीकृष्णांचे स्वजन असणार्‍या यादवांची प्रशंसा करू लागले. (२८)


अहो भोजपते यूयं जन्मभाजो नृणामिह ।
यत् पश्यथासकृत् कृष्णं दुर्दर्शमपि योगिनाम् ॥ २९ ॥
वदती उग्रसेनाला जगी आपण सर्व ते ।
धन्य धन्य असे झालो घडते कृष्णदर्शन ॥ २९ ॥

अहो भोजपते - हे भोजराजा उग्रसेना इह नृणां यूयं जन्मभाजः - ह्या लोकी मनुष्यांमध्ये तुम्हीच खरे जन्माला आलेले आहा यत् - कारण योगिनाम् अपि दुर्दर्शं कृष्णं - योग्यांनाहि दिसण्यास कठीण अशा श्रीकृष्णाला असकृत् पश्यथ - वारंवार पहाता. ॥२९॥
ते म्हणाले, हे भोजराज ! या जगामध्ये, मनुष्यमात्रात तुमचेच जीवन धन्य आहे. कारण योग्यांनाही दुर्लभ असे श्रीकृष्णांचे दर्शन तुम्हांला नेहमीच होत असते. (२९)


( वसंततिलका )
यद्विश्रुतिः श्रुतिनुतेदमलं पुनाति
     पादावनेजनपयश्च वचश्च शास्त्रम् ।
भूः कालभर्जितभगापि यदङ्‌घ्रिपद्म
     स्पर्शोत्थशक्तिरभिवर्षति नोऽखिलार्थान् ॥ ३० ॥
तद्दर्शनस्पर्शनानुपथप्रजल्प
     शय्यासनाशनसयौनसपिण्डबन्धः ।
येषां गृहे निरयवर्त्मनि वर्ततां वः
     स्वर्गापवर्गविरमः स्वयमास विष्णुः ॥ ३१ ॥
( वसंततिलका )
गाती श्रुती हरिपदी वहतेय गंगा
     जी पावनो करि जगा नित सर्वकाळ ।
कालप्रवाहि अमुचे नत भाग्य होते
     ते लाभले पुनरपी हरिच्या पदाने ॥ ३० ॥
हे उग्रसेन तुम्हि तो हरिआप्त आहा
     स्पर्शी तसा नि बघता बसता तयासी ।
खाता पिता हरिसवे इतरापरी ते
     नांदे घरात हरि तै मिळतोच मोक्ष ॥ ३१ ॥

श्रुतिनुता यत् विश्रुतिः - वेदांनी स्तविलेली ज्या श्रीकृष्णाची कीर्ति पादावनेजनपयः च - व पाय धुण्याचे उदक म्हणजे गंगा वचः शास्त्रं च - व ज्याचे वचनरूप शास्त्र म्हणजे वेद इदं अलं पुनाति - ह्या जगाला सर्वस्वी पवित्र करितात कालभर्जितभगा अपि भूः (च) - आणि कालाने दग्ध केले आहे माहात्म्य जीचे अशीहि पृथ्वी यदङ्‌घ्रिपद्मस्पर्शोत्थशक्तिः - ज्या श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या स्पर्शामुळे प्रगट झाली आहे शक्ति जीची अशी नः अखिलार्थान् अभिवर्षति - आमचे सर्व मनोरथ पुरविते. ॥३०॥ निरयवर्त्मनि वर्ततां - नरकाच्या मार्गात असणार्‍यांना स्वर्गापवर्गविरमः - स्वर्ग व मोक्ष ह्यांविषयी निरिच्छ करणारा विष्णुः - विष्णु येषां वः गृहे - ज्या तुमच्या घरामध्ये तद्दर्शनस्पर्शनानुपथप्रजल्पशय्यासनाशनसयौनसपिण्डबन्धः - त्याचे दर्शन घेणे, स्पर्श करणे, त्याला अनुसरणे, गोष्टी सांगणे, निजणे, बसणे, खाणे, विवाहसंबंध व आनुवंशिक देहसंबंध इत्यादिकांनी बद्ध झालेला असा स्वयम् आस - स्वतः रहाता झाला. ॥३१॥
ज्यांची वेदांनी गाईलेली कीर्ती, चरणतीर्थ असे गंगाजल, आणि ज्यांची वाणी म्हणजेच वेद या जगाला अत्यंत पवित्र करीत आहे. काळामुळे सगळे वैभव नष्ट झालेली पृथ्वी ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुन्हा सर्वशक्तिसंपन्न होऊन आमच्या सर्व अभिलाषा पूर्ण करू लागली, त्या श्रीकृष्णांशी तुमचा कौटुंबिक आणि गोत्रसंबंध आहे. एवढेच काय, तुम्हांला नेहमी त्यांचे दर्शन होऊन त्यांना स्पर्श करता येतो. तुम्ही त्यांच्याबरोबर चालता, बोलता, निजता, बसता आणि खाता-पिता. खरे तर संसारचक्राचे कारण असलेल्या गृहस्थाश्रमामध्ये राहाणार्‍या तुमच्या घरी स्वर्ग-मोक्ष मिटविणारे सर्वव्यापक विष्णू स्व्त: अवतरले आहेत. (३०-३१)


श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् )
नन्दस्तत्र यदून् प्राप्तान् ज्ञात्वा कृष्णपुरोगमान् ।
तत्रागमद्वृतो गोपैः अनः स्थार्थैः दिदृक्षया ॥ ३२ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
नंदासी कळले की श्री कुरुक्षेत्रात कृष्ण हा ।
पातला, पातले तेंव्हा सगोप क्षेत्रि त्या पहा ॥ ३२ ॥

तत्र - तेथे नंदः - नंद कृष्णपुरोगमान् यदून प्राप्तान् ज्ञात्वा - कृष्णप्रमुख यादवांना आलेले जाणून अनस्थार्थैः गोपैः वृतः - गाडयांवर साहित्य घातले आहे अशा गोपांसह दिदृक्षया तत्र आगमत् - दर्शनाच्या इच्छेने तेथे आला. ॥३२॥
श्रीशुक म्हणतात- श्रीकृष्ण इत्यादी यदू तेथे आले आहेत, असे जेव्हा नंदबाबांना समजले, तेव्हा ते गोपांसह आपली सगळी सामग्री घालून त्यांना भेटण्यासाठी तेथे आले. (३२)


तं दृष्ट्वा वृष्णयो हृष्टाः तन्वः प्राणमिवोत्थिताः ।
परिषस्वजिरे गाढं चिरदर्शनकातराः ॥ ३३ ॥
नंदादि पाहता हर्ष यदुंना जाहला असे ।
दृढ आलिंगने देती एकमेकास बोलती ॥ ३३ ॥

तं दृष्टवा हृष्टाः - त्या नंदाला पाहून आनंदित झालेले चिरदर्शनकातराः - पुष्कळ काळाने घडलेल्या दर्शनामुळे चकित झालेले वृष्णयः - यादव प्राणं तन्वः इव उत्थिताः - प्राणाच्या आगमनाने जशी शरीरे त्याप्रमाणे उठलेले गाढं परिषस्वजिरे - दृढ आलिंगन देते झाले. ॥३३॥
त्यांना पाहून यादवांना अतिशय आनंद झाला. मृत शरीरामध्ये प्राणाचा संचार झाल्याप्रमाणे ते उठून उभे राहिले. पुष्कळ दिवसांपासून ते एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. म्हणूनच ते एकमेकांना बराच वेळपर्यंत गाढ आलिंगन देत राहिले. (३३)


वसुदेवः परिष्वज्य सम्प्रीतः प्रेमविह्वलः ।
स्मरन् कंसकृतान् क्लेशान् पुत्रन्यासं च गोकुले ॥ ३४ ॥
प्रेमाने वसुदेवो ते नंदा वक्षासि भेटले ।
आठवे मागचे सारे कृष्णाचे बाळरूप ते ॥ ३४ ॥

संप्रीतः वसुदेवः - प्रसन्न झालेला वसुदेव परिष्वज्य - आलिंगन देऊन प्रेमविह्वलः - प्रेमामुळे विव्हल झालेला कंसकृतान् क्लेशान् - कंसाने दिलेल्या पीडा गोकुले च पुत्रन्यासं - आणि पुत्राचे गोकुळात ठेवणे स्मरन् (आसीत्) - स्मरता झाला. ॥३४॥
अत्यंत प्रेम आणि आनंदाने मन भरून येऊन वसुदेवांनी नंदांना हृदयाशी कवटाळले. कंसाने दिलेला त्रास आणि पुत्राला गोकुळात नेऊन ठेवणे, या गोष्टी त्यांना यावेळी आठवल्या. (३४)


कृष्णरामौ परिष्वज्य पितरावभिवाद्य च ।
न किञ्चनोचतुः प्रेम्णा साश्रुकण्ठौ कुरूद्वह ॥ ३५ ॥
यशोदा नंद यांना ही भेटले रामकृष्ण ते । वंदिले दाटला कंठ न बोलू शकती मुळी ॥ ३५ ॥

कुरूद्वह - हे परीक्षित राजा कृष्णरामौ - श्रीकृष्ण व बलराम पितरौ अभिवाद्य - आईबाप जे नंद व यशोदा त्यांना वंदन करून परिष्वज्य च - आणि आलिंगन देऊन प्रेम्णा साश्रुकण्ठौ - प्रेमाने आनंदाश्रूंनी युक्त झाले आहेत कंठ ज्यांचे असे किंचन न ऊचतुः - काही एक बोलले नाहीत. ॥३५॥
नंद-यशोदा यांनी राम-कृष्णांना मिठीत घेतले. नंतर त्यांनी माता-पित्यांच्या चरणांना वंदन केले. परीक्षिता ! प्रेमाने त्यांचे गळे दाटून आल्याने त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. (३५)


तावात्मासनमारोप्य बाहुभ्यां परिरभ्य च ।
यशोदा च महाभागा सुतौ विजहतुः शुचः ॥ ३६ ॥
यशोदा नंदबाबांनी भुजात घेतले द्वया ।
वियोग मिटला तैसे दुःखही सर्व संपले ॥ ३६ ॥

तौ सुतौ आत्मासनम् आरोप्य - त्या दोन पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून बाहुभ्यां च परिष्वज्य - आणि दोन्ही बाहूंनी आलिंगून (नंदः) महाभागा च यशोदा - नंद व भाग्यवती यशोदा शुचः विजहतुः - विरहजन्य शोक टाकिती झाली. ॥३६॥
भाग्यवती यशोदा आणि नंद यांनी त्या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि दोन्ही हातांनी त्यांना गाढ आलिंगन दिले. त्यामुळे त्यांचे दु:ख नाहीसे झाले. (३६)


रोहिणी देवकी चाथ परिष्वज्य व्रजेश्वरीम् ।
स्मरन्त्यौ तत्कृतां मैत्रीं बाष्पकण्ठ्यौ समूचतुः ॥ ३७ ॥
रोहिणी देवकी दोघी यशोदेसीहि भेटल्या ।
स्मरुनी पूर्विचे सारे बोलल्या दोघि त्या तिला ॥ ३७ ॥

अथ - नंतर रोहिणी देवकी च - रोहिणी व देवकी व्रजेश्वरीं परिष्वज्य - गोकुळाची स्वामिनी जी यशोदा तिला आलिंगन देऊन तत्कृतां मैत्री स्मरन्त्यौ - तिच्याशी केलेल्या मैत्रीचे स्मरण करीत बाष्पकण्ठयौ समूचतुः - अश्रूंनी कंठ भरून आलेल्या अशा बोलू लागल्या. ॥३७॥
रोहिणी आणि देवकी या दोघींनी व्रजराणी यशोदेला आलिंगन दिले. त्यांच्याशी यशोदेने जे मैत्रीपूर्ण वर्तन केले होते, त्याची आठवण होऊन दोघींचे गळे दाटून आले. त्या म्हणाल्या. (३७)


का विस्मरेत वां मैत्रीं अनिवृत्तां व्रजेश्वरि ।
अवाप्याप्यैन्द्रमैश्वर्यं यस्या नेह प्रतिक्रिया ॥ ३८ ॥
राणी गे तुज नी नंदा मित्राच्या सम वागलो ।
न फिटे उपकारो तो विसरे कोण तो तसा ॥ ३८ ॥

व्रजेश्वरि - हे यशोदे अनिवृत्तां वां मैत्रीं - कोणत्याहि कारणाने नष्ट न होणारी तुमची मैत्री का विस्मरेत - कोण बरे विसरेल ऐंद्रम् ऐश्वर्यम् अवाप्य अपि - इंद्राचे ऐश्वर्य मिळाले असताहि इह यस्याः प्रतिक्रिया न - ह्या ठिकाणी ज्या मैत्रीची फेड करिता येत नाही. ॥३८॥
अग यशोदे ! आमच्याशी तुमची जी अतूट मैत्री आहे, तिची त्याबदल्यात इंद्राचे ऐश्वर्य देऊनही आम्ही कधी परतफेड करू शकणार नाही. (३८)


( वसंततिलका )
एतावदृष्टपितरौ युवयोः स्म पित्रोः
     सम्प्रीणनाभ्युदयपोषणपालनानि ।
प्राप्योषतुर्भवति पक्ष्म ह यद्वदक्ष्णोः
     न्यस्तावकुत्र च भयौ न सतां परः स्वः ॥ ३९ ॥
( वसंततिलका )
आम्ही असोनि पितरे तुम्हि पाळिले की
     ना ठेविलाच तुम्हि भेद मुळी तसा तो ।
संस्कार मंगल असे तुम्हि सर्व केले
     नेत्रापरीच जपले नित राम कृष्णा ॥ ३९ ॥

भवति - हे यशोदे अदृष्टपितरौ एतौ - ज्यांना पितरांचे दर्शन घडले नाही असे बलराम व श्रीकृष्ण पित्रोः युवयोः न्यस्तौ - पित्याप्रमाणे पालन करणार्‍या तुम्हा दोघांजवळ ठेवलेले संप्रीणनाभ्युदयपोषणपालनानि - आनंद, उत्कर्ष व लालनपालन ही प्राप्य - मिळवून यद्वत् ह अक्ष्णोः पक्ष्म - ज्याप्रमाणे खरोखर डोळ्यांना पापण्या त्याप्रमाणे अकुत्र भयौ च - ज्यांना कोठेही भय नाही असे ऊषतुः स्म - राहिले सतां परः स्वः न - सज्जनांना आपपर भेद नाही. ॥३९॥
हे देवी ! बलराम आणि श्रीकृष्णांनी जेव्हा आपल्या आई-वडिलांना पाहिलेही नव्हते, अशा वयात यांच्या वडिलांनी या दोघांना आपल्या स्वाधीन केले होते. त्यावेळी पापण्या डोळ्यांतील बुबुळांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे आपण या दोघांचे रक्षण केलेत. तसेच आपण यांना प्रेम दिले. यांचे पालन-पोषण करून यांच्या उत्कर्षासाठी अनेक गोष्टी केल्या. आपल्यामुळे हे निर्भय राहिले. हेही बरोबरच आहे. कारण आपल्यासारख्या सत्पुरुषांच्या दृष्टीत आपला-परका असा भेदभाव नसतो. (३९)


श्रीशुक उवाच -
गोप्यश्च कृष्णमुपलभ्य चिरादभीष्टं
     यत्प्रेक्षणे दृशिषु पक्ष्मकृतं शपन्ति ।
दृग्भिर्हृदीकृतमलं परिरभ्य सर्वाः
     तद्‌भावमापुरपि नित्ययुजां दुरापम् ॥ ४० ॥
श्रीशुकदेव सांगतात -
गोपीस कृष्ण जिवची वदलो तुम्हाला
     पाहावया तरसती नच अंत कांही ।
नेत्रेचि आकळिति नी मनि तृप्त होती
     योग्यास जे कठिण ते जमले तयांना ॥ ४० ॥

सर्वाः गोप्यः - सर्व गोपी अभीष्टं कृष्णं चिरात् उपलभ्य - अत्यंत इष्ट अशा श्रीकृष्णाला पुष्कळ काळाने पाहून यत्प्रेक्षणे च - ज्याच्या अवलोकनाविषयी दृशिषु पक्ष्मकृतं शपन्ति - नेत्रांवर पापण्या निर्माण करणार्‍या ब्रह्मदेवाला शापित्या झाल्या दृग्भिः हृदीकृतं - दृष्टीच्या योगे हृदयात साठविलेल्या श्रीकृष्णाला अलं परिरभ्य - गाढ आलिंगन देऊन नित्ययुजः दुरापम् अपि तद्‌भवम् आपुः - नित्य योगसमाधि करणार्‍यांनाहि दुर्मिळ अशा त्याच्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. ॥४०॥
श्रीशुक म्हणतात- परम प्रियतम श्रीकृष्ण फर दिवसांनी दिसल्यामुळे त्यांना पाहाताना जेव्हा गोपींच्या पापण्यांची उघडझाप होई, तेव्हा त्या, पापण्या निर्माण करणार्‍यालाच शिव्याशाप देऊ लागल्या. डोळ्यांमधून त्यांनी प्रियतमाला हृदयात नेऊन गाढ आलिंगन दिले आणि त्या तन्मय होऊन गेल्या. नेहमी ध्यान करणार्‍या योग्यांनाही जो भाव प्राप्त होणे दुर्लभ, तो भाव आज त्यांना प्राप्त झाला. (४०)


( अनुष्टुप् )
भगवांस्तास्तथाभूता विविक्त उपसङ्गतः ।
आश्लिष्यानामयं पृष्ट्वा प्रहसन् इदमब्रवीत् ॥ ४१ ॥
( अनुष्टुप् )
तादात्म्य पावल्या गोपी कृष्णाने पाहिले तदा ।
एकांती हृदयी घेता वदला हासुनी पुन्हा ॥ ४१ ॥

भगवान् - श्रीकृष्ण विविक्ते - एकांतात तथाभूताः ताः उपसंगतः - तशा तर्‍हेच्या झालेल्या त्या गोपींच्या जवळ गेलेला आश्‍लिष्य - आलिंगन देऊन अनामयं पृष्टवा - खुशाली विचारून प्रहसन् इदम् अब्रवीत् - हसतहसत ह्याप्रमाणे म्हणाला. ॥४१॥
श्रीकृष्णांनी त्यांची ही स्थिती पाहून ते एकांतात त्यांच्याजवळ गेले. नंतर त्यांना आलिंगन देऊन त्यांची खुशाली विचारून हसत हसत त्यांना म्हणाले. (४१)


अपि स्मरथ नः सख्यः स्वानामर्थचिकीर्षया ।
गतांश्चिरायिताञ्छत्रु पक्षक्षपणचेतसः ॥ ४२ ॥
स्वजनी भद्र साधाया साजनी त्यागिल्या अम्ही ।
लढता दिन ते गेले कधी का स्मरता मला ॥ ४२ ॥

सख्यः - मैत्रिणीहो स्वानां अर्थचिकीर्षया गतान् - स्वकीयांचे कार्य संपादण्याच्या इच्छेने गेलेल्या शत्रुपक्षक्षपणचेतसः - शत्रुपक्षीयांचा नाश करण्याकडे आहे लक्ष ज्याचे अशा चिरायितान् नः - पुष्कळ काळाने आलेल्या आम्हाला स्मरथ अपि - स्मरता काय ? ॥४२॥
सख्यांनो ! आम्ही आमच्या बांधवांचे काम करण्यासाठी म्हणून व्रजाबाहेर गेलो आणि तेथे शत्रूंचा नाश करण्यात गुंतल्यामुळे मध्ये पुष्कळ दिवस निघून गेले. तुम्हांला आमची कधी आठवण येत होती काय ? (४२)


अप्यवध्यायथास्मान् स्विदकृतज्ञाविशङ्कया ।
नूनं भूतानि भगवान् युनक्ति वियुनक्ति च ॥ ४३ ॥
कृतघ्न मजसी का ते मानिले चित्ति नी तसे ।
वाईट वाटले का ते ईशात मोद तो जिवा ॥ ४३ ॥

अपिस्वित् अकृतज्ञाः (इति) अविशंकया अस्मान् अवध्यायथ - आम्ही कृतघ्न आहोत अशी थोडीशी शंका घेऊन आम्हाविषयी कल्पना करिता काय भगवान् - परमेश्वर नूनं - खरोखर भूतानि युनक्ति वियुनक्ति च - प्राण्यांना एकत्र व वेगळे करितो. ॥४३॥
मी कृतघ्न आहे, अशी शंका येऊन आमच्याविषयी तुमच्या मनात वेडेवाकडे विचार आले नाहीत ना? खरे तर प्राण्यांवी भेट आणि वियोग घडविणारे भगवंतच आहेत (त्याला मी तरी काय करणार ? ). (४३)


वायुर्यथा घनानीकं तृणं तूलं रजांसि च ।
संयोज्याक्षिपते भूयः तथा भूतानि भूतकृत् ॥ ४४ ॥
वार्‍याने कचरा जैसा मिळतो सुटतो तसा ।
ईश‍इच्छे तुम्ही आम्ही भेटतो तुटतो पहा ॥ ४४ ॥

यथा वायुः - ज्याप्रमाणे वायु घनानीकं तृणं तूलं रजांसि च - मेघसमूह, गवत, कापूस व धूळ ह्यांना तथा भूतकृत् - त्याप्रमाणे सृष्टिकर्ता ईश्वर भूतानि - प्राण्यांना संयोज्य - एकत्र करून भूयः आक्षिपते - पुनः वेगळे करितो. ॥४४॥
वायू ज्याप्रमाणे ढग, गवत, कापूस आणि धूळ यांना एकमेकांजवळ आणतो आणि पुन्हा वेगवेगळे करतो, त्याचप्रमाणे विश्वनिर्माते भगवानसुद्धा सगळ्यांचा संयोग-वियोग करीत असतात. (४४)


मयि भक्तिर्हि भूतानां अमृतत्वाय कल्पते ।
दिष्ट्या यदासीत् मत्स्नेहो भवतीनां मदापनः ॥ ४५ ॥
भाग्याने लाभले प्रेम जेणे मी मिळतो तुम्हा ।
प्रेमभक्ती मला देता वैकुंठधाम देइ मी ॥ ४५ ॥

मयि भूतानां भक्तिः - माझ्या ठिकाणी असणारी प्राण्यांची भक्ति अमृतत्वाय हि कल्पते - मोक्षाला खरोखर कारण होते यत् - कारण भवतीनां मदापनः मत्स्नेहः - तुमचे माझी प्राप्ती करून देणारे माझ्यावरील प्रेम दिष्टया आसीत् - सुदैवाने उत्पन्न झाले आहे. ॥४५॥
सुदैवाने तुम्हांला माझे असे प्रेम मिळाले आहे की, जे माझी प्राप्ती करून देणारे आहे, कारण माझ्या ठिकाणी असलेली भक्ती प्राण्यांना मोक्ष देण्याला समर्थ आहे. (४५)


अहं हि सर्वभूतानां आदिरन्तोऽन्तरं बहिः ।
भौतिकानां यथा खं वार्भूर्वायुर्ज्योतिरङ्गनाः ॥ ४६ ॥
घटात मृत्तिका जैसी वस्त्रात सूत ते जसे ।
सृष्टीमध्ये तसा मी की बाहेर आत मध्यि ही ॥ ४६ ॥

अंगनाः - सुंदरी हो यथा भौतिकानां (अंतः बहिः च) - ज्याप्रमाणे पाच भौतिक वस्तूंच्या आत बाहेर खं वाः भूः वायुः ज्योतिः (सन्ति) - आकाश, उदक, पृथ्वी, वायु व तेज आहेत (तथा) अहं हि - त्याचप्रमाणे मी खरोखर सर्वभूतानां - सर्व प्राण्यांच्या आदिः अन्तः अन्तरं बहिः (अस्मि) - आरंभी व शेवटी तसेच आत व बाहेर आहे. ॥४६॥
गोपींनो ! ज्याप्रमाणे भौतिक पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी आणि आत-बाहेर त्यांना कारणीभूत असणारी पृथ्वी, पाणी, अग्नी , वायू व आकाश ही पंचमाहभूते असतात, त्याचप्रमाणे सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये, शेवटी व आत-बाहेर फक्त मीच असतो. (४६)


एवं ह्येतानि भूतानि भूतेष्वात्माऽऽत्मना ततः ।
उभयं मय्यथ परे पश्यताभातमक्षरे ॥ ४७ ॥
पंचभूत रुपाने नी भोक्ता आत्माहि मी असे ।
अविनाशी तसा सत्य मला ’तो’ हृदयी पहा ॥ ४७ ॥

एवं हि एतानि भूतानि - याप्रमाणे खरोखर ही महाभूते भूतेषु - वस्तूंच्या ठिकाणी तेषु च आत्मा आत्मना ततः - आणि त्यामध्ये आत्मा स्वस्वरूपाने (भोक्तृरूपाने) भरला आहे अथ उभयं - व आत्मा व भूते अशी दोन्ही अक्षरे परे मयि आभातं - निर्विकार व परिपूर्ण अशा माझ्या ठिकाणी भासमान झालेली पश्यत - पहा. ॥४७॥
सर्व पदार्थांमध्ये हीच पंचमहाभूते कारणरूपाने राहिली आहेत आणि आत्मा जीवरूपाने राहिला आहे. परंतु या दोघांच्याही पलीकडील अविनाशी सत्य असणार्‍या माझ्यामध्येच भूते व जीव प्रतीत होतात, असे जाणा. (४७)


श्रीशुक उवाच -
अध्यात्मशिक्षया गोप्य एवं कृष्णेन शिक्षिताः ।
तदनुस्मरणध्वस्त जीवकोशास्तमध्यगन् ॥ ४८ ॥
श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
अध्यात्मज्ञान देवोनी गोपिका शिकवीयल्या ।
जीवकोश त्यजोनीया सदाच्या कृष्ण जाहल्या ॥ ४८ ॥

एवं - याप्रमाणे कृष्णेन अध्यात्मशिक्षया शिक्षिताः - श्रीकृष्णाने अध्यात्मज्ञानाचा उपदेश करून शिकविलेल्या गोप्यः - गोपी तदनुस्मरणध्वस्तजीवकोशाः - त्याच्या नित्य स्मरणाच्या योगाने नष्ट झाला आहे लिंगदेह ज्यांचा अशा तम् अध्यगन् - त्या श्रीकृष्णाच्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. ॥४८॥
श्रीशुक म्हणतात- अश प्रकारे श्रीकृष्णांनी गोपींना अध्यात्मज्ञान दिले. या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले आणि त्या भगवंतांशी एकरूप झाल्या. (४८)


( वसंततिलका )
आहुश्च ते नलिननाभ पदारविन्दं
     योगेश्वरैर्हृदि विचिन्त्यमगाधबोधैः ।
संसारकूपपतितोत्तरणावलम्बं
     गेहं जुषामपि मनस्युदियात् सदा नः ॥ ४९ ॥
इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां
संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे
वृष्णीगोपसंगमो नाम द्व्यशीतितमोऽध्यायः ॥ ८२ ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
त्या म्हणाल्या -
( वसंततिलका )
हे पद्मनाभ तुज योगिहि नित्य ध्याती
     संसारि जीव बुडता तुचि एक नाव ।
संसार कर्म करिता हृदयात राही
     आम्हा पडो विसर ना क्षणमात्र तैसा ॥ ४९ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर ब्याऐंशिवा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

आहुः च - आणि म्हणाल्या नलिननाभ - हे पद्मनाभ श्रीकृष्णा अगाधबोधैः योगेश्वरैः हृदि विचिन्त्यं - गंभीर ज्ञान असणार्‍या योगाधिपतींनी हृदयात चिंतिण्यास योग्य असे संसारकूपपतितोत्तरणावलम्बम् च - व संसाररूपी विहिरीत पडलेल्यांना बाहेर निघण्यासाठी आश्रयभूत असलेले ते पदारविन्दं - तुझे चरणकमळ गेहंजुषां अपि नः मनसि - गृहस्थाश्रमात रहाणार्‍याहि आमच्या मनात सदा उदियात् - नित्य प्रगट होवो. ॥४९॥ ब्यायशींवा अध्याय समाप्त
त्या म्हणाल्या- हे कमलनाभ ! अगाध बोधसंपन्न योगेश्वर आपल्या हृदयात ज्या आपल्या चरणकमलांचे चिंतन करीत असतात, संसाररूपी विहिरीत पडलेले लोक त्यातून बाहेर पडण्यासाठी ज्यांचा आश्रय घेतात, ते आपले चरणकमल, प्रपंचातील कामे करीत असतानाही, नेहमी आमच्या हृदयात विराजमान राहोत. एवढीच कृपा करा. (४९)


अध्याय ब्यायशींवा समाप्त

GO TOP